Home Blog Page 1408

तिळवण तेली समाजाचा धंगेकर यांना  पाठिंबा व निवडून आणण्याचा निर्धार- आबा बागुल

पुणे’ज्याच्या मागे तेली तो भाग्यशाली’ अशी श्रद्धा असलेला कसबा मतदारसंघातील सर्व तेली समाज महाविकास आघाडीच्या बाजूने खंबीरपणे उभा राहणार असून धंगेकर यांना विजयी करून दाखवणारच ‘असा निर्धार माजी उपमहापौर व ज्येष्ठ नगरसेवक आबा बागुल यांनी आज येथे व्यक्त केला.

पुणे शहर तिळवण तेली समाजाच्या वतीने कसबा पेठ विधानसभा पोटनिवडणुकीतील काँग्रेस पक्षाचे उमेदवार रविंद्र धंगेकर यांना जाहीर पाठिंबा देण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या बैठकीमध्ये ते बोलत होते. माजी गृहराज्यमंत्री रमेश बागवे, माजी आमदार मोहन जोशी, शिवसेनेचे शहर प्रमुख संजय मोरे ,राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रवींद्र माळवदकर, माजी स्थायी समिती अध्यक्ष विरेंद्र किराड, विशाल धनवडे, अविनाश बागवे, वनराज आंदेकर, लक्ष्मीताई उदयकांत आंदेकर, निसार शेख, सुरेश कांबळे, दत्ता सागरे आदी यावेळी व्यासपीठावर उपस्थित होते.

तेली समाजाचे अध्यक्ष घनश्याम वाळुंजकर यांच्या नेतृत्वाखाली समाजाचे बहुसंख्य स्त्री पुरुष व तरुण यावेळी उपस्थित होते. श्री बागुल पुढे म्हणाले, मेहनत, कर्तुत्व व निष्ठा या त्रिसूत्री पद्धतीने तेली समाज सर्वच क्षेत्रात प्रगतीपथावर असून अचूक व योग्य व्यक्तीची निवड करताना समाज सर्व ताकदीनिशी उभा राहतो, हे मागील पन्नास वर्षाच्या काळात दिसून आले आहे. त्यामुळे रविंद्र धंगेकर यांच्यासारख्या प्रामाणिक कार्यकर्त्याच्या मागे खंबीरपणे उभे राहण्याचा निश्चय समाजाने केला असल्याचे त्यांनी सांगितले.

आपल्या प्रास्ताविक पर मनोगतात समाजाचे अध्यक्ष घनश्याम वाळुंजकर यांनी, कसबा मतदार संघातील ४९२३ कुटुंबे धंगेकर यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहतील अशी घोषणा त्यांनी केली.

यावेळी माजी मंत्री बागवे, मोहन जोशी, रविंद्र माळवदकर, विरेंद्र किराड यांचीही भाषणे झाली. या कार्यक्रमाला प्रवीण करपे, संजय भगत, जयाशेठ किराड,  कुमार भगत, सौरभ अमराळे, दीपक पवार, विलास रत्नपारखी आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अमित बागुल यांनी तर आभार माजी नगरसेवक अविनाश बागवे यांनी मानले.

महाराष्ट्रातील श्री भीमाशंकर हेच धर्मशास्त्रांत वर्णित सहावे ज्योतिर्लिंग असल्याने याविषयी राजकीय वाद नको ! – महाराष्ट्र मंदिर महासंघाची भूमिका

पुणे- महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री श्री. एकनाथ शिंदे यांनी शंकराचार्य-धर्माचार्य यांचे मार्गदर्शन घेऊन पुणे जिल्ह्यातील श्री भीमाशंकर हेच सहावे ज्योतिर्लिंग असल्याची भूमिका देशासमोर मांडावी, असे आवाहन ‘महाराष्ट्र मंदिर महासंघा’च्या वतीने करण्यात आले आहे.

आसाम सरकारने 14 फेब्रुवारी 2023 या दिवशी एक जाहिरात प्रसारीत करून पुण्यातील श्री भीमाशंकर हे सहावे ज्योतिर्लिंग नसून आसाममधील गुवाहाटी येथील भीमाशंकर हे खरे ज्योतिर्लिंग असल्याचा दावा केला आहे. यासंदर्भात सध्या राजकीय आरोप-प्रत्यारोप चालू झाले आहेत. खरेतर तीर्थक्षेत्रे, धार्मिक स्थळे आदी धार्मिक गोष्टींमध्ये राजकारण होणे दुर्दैवी आहे. देव, धर्म, धर्मग्रंथ, प्रथा-परंपरा, तीर्थक्षेत्रे, धार्मिक स्थळे, मंदिरे आदी धार्मिक गोष्टींविषयी धार्मिक क्षेत्रातील तज्ञ अर्थात शंकराचार्य, धर्माचार्य, संत-महंत आदी अधिकारी व्यक्तींना बोलण्याचा अधिकार आहे. राजकारण्यांनी धार्मिक गोष्टींबद्दल न बोललेलेच बरे. स्वत: आद्य शंकराचार्य यांच्या बारा ज्योतिर्लिंग श्लोक, तसेच शिवलिलामृत ग्रंथ, शिवपुराण आदी अनेक मान्यताप्राप्त धर्मग्रंथांमध्ये पुणे जिल्ह्यातील श्रीक्षेत्र भीमाशंकर हेच सहावे भगवान शिवाचे स्वयंभू ज्योतिर्लिंग असल्याचे स्वयंस्पष्ट आहे. पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यामध्ये भीमा नदीचे उगमस्थान असलेल्या घनदाट जंगलातील सह्याद्री पर्वत रांगांमध्ये वसलेले श्री भीमाशंकर हेच अत्यंत प्राचीन आणि सहावे ज्योतिर्लिंग देवस्थान आहे, असे ‘महाराष्ट्र मंदिर महासंघा’चे समन्वयक श्री. सुनील घनवट यांनी स्पष्ट केले आहे.


शिवजयंतीनिमित्त राज्य शासनातर्फे किल्ले शिवनेरी येथे हिंदवी स्वराज्य महोत्सव २०२३

पुणे दि. १५: महाराष्ट्र शासनाचा पर्यटन विभाग आणि जिल्हा प्रशासन पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने किल्ले शिवनेरी येथे श्री छत्रपती शिवाजी महाराज जन्मोत्सव सोहळ्यानिमित्त विविध कार्यक्रमांचे १८ ते २० फेब्रुवारी दरम्यान आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली.

या कार्यक्रमाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, खासदार श्रीमंत छत्रपती उदयन राजे भोसले, पर्यटन, कौशल्य विकास आणि उद्योजकता, महिला आणि बालविकास मंत्री मंगलप्रभात लोढा, उच्च व तंत्रशिक्षण, वस्त्रोद्योग आणि संसदीय कार्य मंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील, विरोधी पक्षनेते अजित पवार, विधान परिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांसह पुणे जिल्ह्यातील सर्व लोकप्रतिनिधी यांची उपस्थिती लाभणार आहे.

यंदाची शिवजयंती उत्साहात साजरी करण्यासोबतच महाराष्ट्रातील लोकसंस्कृती व महाराष्ट्राचा ऐतिहासिक वारसा नव्या पिढीपर्यंत पोहोचविण्यासाठी तसेच पर्यटन वाढीसाठी महाराष्ट्र शासनाचा पर्यटन विभाग प्रयत्नशील आहे. पर्यटन विभागामार्फत राज्यातील महत्वाच्या उपक्रमांचे पर्यटन वेळापत्रक बनविले असून त्याच उपक्रमांतर्गत यंदापासून शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात येत आहे.

या सोहळ्यानिमित्त जवळपास एक लाख शिवप्रेमी या उत्साहात सहभागी होतील असे नियोजन महाराष्ट्र शासनाकडून करण्यात आले आहे. किल्ले शिवनेरीवर जन्मोत्सव सोहळा साजरा करण्याबरोबरच किल्ल्याच्या पायथ्याजवळ जुन्नर शहरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. ‘शिवकालीन गाव’ हे या महोत्सवाचे प्रमुख आकर्षण असून या वर्षी प्रथमच ‘महाशिव आरती’चे आयोजन करण्यात आले आहे. सोहळ्याच्या निमित्ताने शिव वंदना, स्थानिक पारंपरिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन, महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी शिबीर, विविध स्पर्धांचे आयोजन, पर्यटक आणि मान्यवरांसाठी सहलीचे इत्यादींचे आयोजन करण्यात येईल. या कार्यक्रमासाठी प्रवेश विनामूल्य असून कार्यक्रम सर्वांसाठी खुला आहे.

महाराष्ट्र राज्याची अस्मिता आणि आपले आराध्य दैवत श्री छत्रपती शिवाजी महाराजांची यंदा ३९३ वी जयंती साजरी होत आहे. त्याचबरोबर यावर्षी छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाला ३५० वर्षे पूर्ण होत आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांमुळे महाराष्ट्राची ओळख जगभरात पोहोचली आहे. त्यांनी स्वराज्य रक्षणासाठी उभारलेले गड-किल्ले जगभरातील पर्यटन प्रेमींचे मुख्य आकर्षण आहे. यात शिवनेरी, रायगड व सिंधुदुर्ग हे महत्वाचे किल्ले आहेत. शिवजन्मोत्सवाच्या निमित्ताने पुन्हा एकदा हिंदवी स्वराज्य ही भावना आणि आपले वैभव नव्यापिढी पर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न आहे.

आपले आराध्य दैवत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा करण्यासाठी आणि महाराष्ट्राच्या लोकसंस्कृतीविषयी अभिमान व्यक्त करण्यासाठी नागरिकांनी शिवजन्मोत्सव सोहळ्यात सहभागी व्हावे, असे आवाहन मंत्री श्री.पाटील यांनी केले आहे.

तीन दिवस चालणारे कार्यक्रम पुढील प्रमाणे –

दि. १८ फेब्रुवारी २०२३
सायं. ६:३० वा. हिंदवी स्वराज्य महोत्सव २०२३ उदघाटन
सायं. ७ ते रात्री १० वा. सुप्रसिद्ध दिग्दर्शक अशोक हांडे यांचा ‘मराठी बाणा’ कार्यक्रम

दि. १९ फेब्रुवारी २०२३
स. ९ ते ११ वा. किल्ले शिवनेरीवर शिवजन्मोत्सव सोहळा
दु. ३ ते ५ वा. शिववंदना
सायं. ६:१५ ते ७ वा. महाआरती कार्यक्रम
सायं. ७ ते रात्री १० वा. जाणता राजा या महानाट्याचा कार्यक्रम

दि.२० फेब्रुवारी २०२३
सायं.७ ते रात्री १० वा. जाणता राजा कार्यक्रम

तीनही दिवशी विविध बचतगटांची उत्पादने व खाद्यपदार्थांच्या ३०० स्टॉलचे प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे.

एयर इंडियातर्फे आधुनिक विमानांचे संपादन करण्यासाठी पूर्वकरारावर सही

नवी दिल्ली – एयर इंडिया हा भारतातील आघाडीचा विमानसेवा समूह आणि टाटा सन्म समूहाचा भाग असलेल्या कंपनीने आज एयरबस आणि बोईंगसह पूर्वकरारावर (लेटर्स ऑफ इंन्टेट) सही केल्याचे जाहीर केले. वाइडबॉडी आणि सिंगल आयल विमान संपादन करण्यासाठी हा करार करण्यात आला आहे.

या ऑर्डरमध्ये ४० एयबस A350s, २० बोईंग 787 आणि १० बोईंग 777-9 वाइडबॉडी एयरक्राफ्ट तसेच २१० एयरबस A320/321, निओज आणि १९० बोईंग 737 मॅक्स सिंगल आयल एयरक्राफ्ट यांचा समावेश असेल. A350 एयरक्राफ्टमध्ये रोल्स रॉइस इंजिनचा समावेश असून जीई एयरोस्पेसमध्ये B777/787 इंजिन बसवण्यात आले आहे. सर्व सिंगल आयल एयरक्राफ्टमध्ये सीएफएम इंटरनॅशनल इंजिन्सचा समावेश करण्यात आला आहे.

याप्रसंगी टाटा सन्स आणि एयर इंडियाचे अध्यक्ष श्री. एन. चंद्रशेखरन म्हणाले, ‘एयर इंडिया सुरक्षा, ग्राहक सेवा, तंत्रज्ञान, इंजिनियरिंग, नेटवर्क आणि मनुष्यबळ अशा विविध विभागांचा कायापालट करत आहे. आधुनिक, कार्यक्षम विमानताफा या बदलासाठी अतिशय महत्त्वाचा आहे. ही ऑर्डर एयर इंडियाची Vihaan.AI या स्थित्यंतरावर आधारित कार्यक्रमात निश्चित करण्यात आलेल्या महत्त्वाकांक्षा पूर्ण करण्याच्या दिशेने टाकलेले महत्त्वाचे पाऊल आहे. या कार्यक्रमाअंतर्गत कंपनीने भारतीय आत्मा असलेली जागतिक दर्जाची सेवा प्रवाशांना देण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. या नव्या विमानांमुळे कंपनीचा विमानताफा आधुनिक होईल आणि जागतिक नेटवर्क लक्षणीय प्रमाणात विस्तारेल. या ऑर्डरमुळे विकास साधणे शक्य होईल व पर्यायाने भारतीय विमानसेवा क्षएत्रातील व्यावसायिकांना करियरच्या चांगल्या संधी उपलब्ध होतील. त्याचप्रमाणे भारतीय विमानसेवा यंत्रणेच्या विकासालाही चालना मिळेल.’

नव्या ताफ्यातील पहिले विमान २०२३ च्या अखेरीस उपलब्ध होणार असून २०२५ च्या मध्यानंतर जास्त प्रमाणात विमाने कंपनीच्या ताफ्यात समाविष्ट होतील. दरम्यान एयर इंडियाने भाडेतत्वावर ११ B777 आणि २५ A320 विमाने घेण्यास सुरुवात केली असून त्याद्वारे विमानांचा ताफा आणि नेटवर्कच्या विस्ताराला चालना मिळत आहे.

नव्या विमानात पूर्णपणे नवीन केबिन इंटेरियर असेल, जे एयर इंडियाच्या यापूर्वी जाहीर करण्यात आलेल्या सध्याच्या वाइडबॉडी B787 आणि B777 विमानांत नव्या सीट्स व विमानाअंतर्गत मनोरंजन सुविधा बसवण्याच्या योजनेशी अनुरूप असेल. पुनर्रचना करण्यात आलेली विमाने २०२४ च्या मध्यावर कंपनीच्या विमानताफ्यात समाविष्ट होतील.

एयर इंडिया समूहात सध्या एयर इंडियाच्या संपूर्ण सेवेचा तसेच दोन कमी शुल्क आकारणाऱ्या तसेच सध्या एकत्रीकरणाच्या प्रक्रियेत असलेल्या उपकंपन्या- एयर इंडिया ए क्सप्रेस व एयर एशिया इंडिया यांचा समावेश आहे. त्यांची पालक कंपनी टाटा सन्सने एयर इंडियाचे पूर्णवेळ विमान सेवा देणाऱ्या एयरलाइन व्हिस्तारामध्ये विलिनीकरण करण्याचा मनोदय व्यक्त केला होती. एयर व्हिस्तारा ही टाटा सन्स व सिंगापूर एयरलाइन्स यांच्यातील संयुक्त भागिदारी कंपनी असून त्यामध्ये एयर व्हिस्ताराचा ५१ टक्के वाटा आहे. सद्यस्थितीत नियामक परवानगीनुसार समूहामध्ये एयर इंडिया ही पूर्णवेळ सेवा देणारी एक विमान कंपनी आणि एयर इंडिया एक्सप्रेस ही एक कमी- शुल्क आकारणारी विमानकंपनी यांचा समावेश असेल.

यंदाचा ‘राजहंस पुरस्कार’ ॲड. उज्ज्वल निकम यांच्या हस्ते ‘नूतन गुळगुळे फाऊंडेशन’ला प्रदान!

0

गोरेगाव-: रुग्णांना विनामूल्य सेवा देणाऱ्या ‘राजहंस प्रतिष्ठान’ संस्‍थेचा यंदाचा ‘राजहंस पुरस्कार’ दिव्यांग सेवेत स्वतःला अर्पित करून दिव्यांगांचा विकास हाच आमचा ध्यास म्हणणाऱ्या  ‘नूतन गुळगुळे फाऊंडेशन’ला प्रमुख पाहुणे ऍडव्होकेट उज्ज्वल निकम यांच्या शुभहस्ते नुकताच प्रदान करण्यात आला. फाऊंडेशनचे पुष्कर, विनायक, नूतन गुळगुळे यांसह अमरनाथ तेंडोलकर यांनी हा पुरस्कार स्वीकारला. याप्रसंगी पुरस्कार्थींमध्ये जेष्ठ नाटककार चंद्रकांत कुलकर्णी, वैद्यकीय क्षेत्रातील दिग्गज कर्करोग विशेषज्ञ डॉ. राजेंद्र बडवे, भारतीय लष्करात अचाट शौर्य जागवणारे शौर्यचक्र पुरस्कार विजेते कमांडो मधुसूदन सुर्वे, राजहंसचे सुहास कबरे इत्यादी मान्यवर मंचावर उपस्थित होते.

राजहंस प्रतिष्ठान कलासेवा आणि रुग्णसेवा या क्षेत्रांत गेली अनेक वर्षे कार्यरत आहे. गरजू रुग्णांना विनामूल्य रुग्णसाहित्य पुरवणे, खेडोपाडी वैद्यकीय शिबिरे भरवणे, देहदान, नेत्रदान, त्वचादान आदीविषयी समाजात जागृती निर्माण करणे असे अनेक उपक्रम संस्थेतर्फे चालविले जातात. समाजाच्या विविध क्षेत्रांत समर्पित भावनेने काम करणाऱ्यांचा सन्मान दरवर्षी संस्थेतर्फे ‘राजहंस पुरस्कार’ देऊन केला जातो. यंदा या पुरस्कारासाठी या सामाजिक क्षेत्रात अभिनव कामगिरी करून आपला ठसा उताविणाऱ्या ‘नूतन गुळगुळे फाऊंडेशन’ला सन्मानित केले तसेच त्यांच्या ‘स्वानंद सेवा सदन’ या कोरोनामुळे पालक गमावलेल्या ‘दिव्यांग’ बालकांकरिता आणि त्यांच्या एकल पालकांसाठीच्या भारतातील पहिले वसतिगृह आणि प्रशिक्षण केंद्राच्या उभारणी कार्यासाठी मदत करण्याचे आवाहन करण्यात आले.

या सोहळ्याच्या निमित्ताने गायिका मृदुला दाढे-जोशी व अन्य गायक हे अजरामर राहिलेल्या हिंदी व मराठी गाण्यांचे विश्लेषणासहित सादरीकरण करण्यात आले. या विशेष सोहळ्यासाठी, प्रशांत दळवी, जितेंद्र कुलकर्णी, गीतकार प्रसाद कुलकर्णी, डॉ. संजय दुधाट, माध्यमसल्लागार राम कोंडीलकर, विनोद धोंड इत्यादी मान्यवर उपस्थित होते.

 घोरपडे पेठेत राहणारीअवघ्या तीन वर्षांची वेदांशी विदेशात गाते शिवरायांची स्तुती

पुणे : बालपणात चिऊ- काऊच्या, परिकथेच्या गोष्टी ऐकत आणि भातुकलीचा खेळ खेळत प्रत्येकजण मोठा होतो. पण याच वयात छत्रपती शिवाजी महाराजांच्या शौर्य कथा ऐकून त्यांचे पोवाडे गाणा-या वेदांशी भोसले हिने इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये विक्रम नोंदविला आहे. सर्वात लहान वयात पोवाडे गाण्याचा हा विक्रम तिच्या नावावर आहे. अवघ्या ३ वर्षांची ही चिमुकली परदेशात राहून मराठी मातीतील संस्कार न विसरता छत्रपती शिवाजी महाराजांचा पोवाडा खड्या आवाजात गाते.

वेदांशी ही मूळची पुण्यातील घोरपडे पेठेतील असून सध्या ती तिच्या आई-वडिलांबरोबर डेन्मार्क येथील ओडेन्स या शहरात रहात आहे. ओडेन्स येथे झालेल्या भारतीय सांस्कृतिक कार्यक्रमात ३ मिनिटे आणि ५८ सेकंदात श्री छत्रपती शिवाजी महाराजांचा स्तुती पोवाडा तिने गायला आहे.

सर्वात लहान वयात (वय ३ वर्ष ५ महिने १९ दिवस) पोवाडा गाणारी मुलगी म्हणून इंडिया बुकने तिची नोंद घेतली आहे. आई प्रीती भोसले हि गृहिणी आहे आणि वडील संतोष भोसले हे शास्त्रज्ञ म्हणून कार्यरत आहे. वेदांशी ही २ वर्षांची असल्यापासून मराठी कविता, श्लोक, स्तोत्र, आरती म्हणते.

संतोष भोसले म्हणाले, परदेशात वडीलधा-या  मंडळींच्या अनुपस्थितीत तिला आपले भारतीय संस्कार कसे देता येतील, याचा सतत प्रयत्न आम्ही करीत असतो.

प्रीती भोसले म्हणाल्या, मी वेदांशीला दररोज मराठी भक्ती गीते, भावगीते, श्लोक, गोष्टी आणि छत्रपती शिवाजी महाराजांचे पोवाडे आणि कथा ऐकवत असे आणि तितकेच मन लावून वेदांशी या सगळ्या गोष्टी ऐकायची आणि त्यांचे अनुकरण करायचा प्रयत्न करायची. या गोष्टीचा परिणाम तिचे वय वाढत असताना खूप छान झाला आणि त्यामुळेच ती सगळे श्लोक, भावगीते व पोवडा आनंदाने म्हणते, असेही त्यांनी सांगितले.

अमोल कोल्हे करणार कौटुंबिक मालिकेची निर्मिती

सन टीव्ही नेटवर्कची सन मराठी ही वाहिनी एका वर्षांपूर्वी प्रेक्षकांच्या भेटीस आली. ‘सोहळा नात्यांचा’ हे ब्रीदवाक्य असणाऱ्या या वाहिनीने नात्यांनी सजलेल्या वेगवेगळया मालिका प्रेक्षकांच्या भेटीस आणल्या.

अशीच एक वेगळी गोष्ट सन मराठी घेऊन येत आहे. आपण एखाद्यावर प्रेम करतो म्हणजे नेमकं कशावर प्रेम करतो? त्या व्यक्तीच्या रंग-रूपावर, श्रीमंतीवर, कि त्या व्यक्तीच्या चांगुलपणावर, त्याच्या सुंदर मनावर?   सन मराठीवरील २० फेब्रुवारीपासून, सोमवार ते शनिवार रात्री ९.३०वाजता प्रेक्षकांच्या भेटीस येत असलेली ‘प्रेमास रंग यावे ही मालिका नेमकी ह्याच प्रश्नाभोवती फिरते. ही गोष्ट आहे एका अत्यंत हुशार, सालस, सहृदयी अक्षराची आणि एका चांगल्या मनाच्या पण खुशालचेंडू, न्यूनगंडाने भरलेल्या आणि पारंपरिक अर्थाने देखणा नसलेल्या सुंदरची.

सन मराठीवरील ही नवीन मालिका सुंदर दिसण्यापेक्षा चांगलं माणूस असणं कितीतरी पटीने जास्त महत्वाचं आहेत ह्याची जाणीव करून देते शिवाय मन चांगलं असेल तर मनासारखा जोडीदारही मिळतो हे पटवून देते. कारण म्हणतात ना, प्रेमासारखं दुसरं कुठलं सुख नाही. प्रेमाला कुठला  रंग, कुठलं रूप नाही.

या मालिकेत मनमिळाऊ आणि सगळ्यांना आपलंसं करणाऱ्या ‘अक्षरा’ या मुख्य पात्राच्या भूमिकेत अभिनेत्री अमिता कुलकर्णी असून निर्मळ मनाच्या पण शून्य व्यवहारज्ञान असलेल्या सुंदरची भूमिका सादर करणार आहे अभिनेता रोहित शिवलकर. या सोबतच समीरा गुजर- जोशी, अभिजित चव्हाण, सारिका नवाथे, मोनिका दाभाडे, संजीव तांडेल,किरण डांगे, सचिन माने, गौरी कुलकर्णी, विद्या संत असे अनेक कलाकार मालिकेत दिसणार आहेत. या मालिकेची निर्मिती  डॉ.अमोल कोल्हे यांची जगदंब ही निर्मिती संस्था करत असून मालिकेचे दिग्दर्शन चंद्रकांत गायकवाड ह्यांनी केले आहे.

सन मराठी ही फ्री वाहिनी सर्व प्रमुख डिटीएच प्लॅटफॉर्म्स आणि केबल नेटवर्क्सवर मोफत उपलब्ध आहे. तसेच ही वाहिनी डीडी फ्री डिश वर देखील चॅनेल नंबर ६ वर उपलब्ध आहे.

मराठी भाषा गौरव दिन साजरा करण्याबाबत आवाहन!

पुणे-“मराठी भाषेची जोपासना करण्यासाठी जगभरातील मराठी भाषिकांनी एकत्र यावे!असे आवाहन डिजिटल पुस्तक युगातील कल्पक तरुण म्हणून ख्यातकीर्त असलेल्या योगेश दशरथ यांनी केले आहे.

ते म्हणाले,’ महाराष्ट्र राज्याचे सांस्कृतिक धोरण म्हणून कवी कुसुमाग्रज यांचा दिनांक २७ फेब्रूवारी हा जन्मदिवस मराठी भाषा गौरव दिन म्हणून साजरा केला जातो. या निमित्ताने मराठी भाषेचा दैदीप्यमान इतिहास आठवावा, मराठी भाषेच्या वैभवाचा अभिमान बाळगावा तसेच मराठी भाषिकांच्या कर्तृत्वाचा आढावा घेऊन मराठी भाषेची जोपासना करण्यासाठी जगभरातील मराठी भाषिकांनी एकत्र येऊन जाणीवपूर्वक प्रयत्न करावेत ही अपेक्षा आहे. हाच उद्देश डोळ्यासमोर धरून २७ फेब्रूवारी २०२३ रोजी मराठी भाषा गौरव दिनानिमित्त एक तरी पुस्तक, ऑडिओबुक किंवा ईबुक विकत घेऊन आपल्या प्रिय व्यक्तीला भेट द्यावे असा आवाहन आम्ही करत आहोत. आपण आपल्या मुलांना, मित्रांना किंवा नातेवाईंकांना मराठी पुस्तके, ऑडिओबुक्स किंवा ईबुक्स विकत घेऊन भेट दिली तर मराठी भाषेतील आर्थिक व्यवहार वाढेल. स्वाभाविकच मराठी प्रकाशन क्षेत्राच्या अर्थव्यवस्थेला हातभार लाभेल व त्यातून लेखक, प्रकाशक, अभिवाचक अशाच सर्वच घटकांना प्रोत्साहन मिळेल व जास्तीतजास्त पुस्तके, ऑडिओबुक्स किंवा ईबुक्स प्रकाशित होतील. असा उपक्रम राबिण्याची कल्पना त्यांनी पत्रकार परिषदेत मांडून याबद्दल माहिती दिली.

यासाठी समाज माध्यमातूनही विविध संस्थांना, मान्यवरांना आणि सर्वसामान्य नागरिकांना आवाहन करणार असून त्यांनी किमान एक मराठी पुस्तक, ऑडिओबुक किंवा ईबुक खरेदी करून आपल्या आवडत्या व्यक्तिला भेट देतानाची छायाचित्र आणि मजकूर समाज माध्यमातून पोस्ट करून मराठी भाषेबद्दलची आपुलकी व्यक्त करावी आणि या संकल्पनेचा प्रसार व प्रचारही करावा आणि ही संकल्पना एक समूह म्हणून राबवावी असे आम्हाला वाटते. यात प्रसारमाध्यमे मोठी भूमिका बजावू शकतात. वृत्तपत्रे बातमी व लेख छापू शकतात, रेडिओ व टि.व्ही. निवेदक आपल्या निवेदनातून त्या दिवशी सर्वांना आवाहन करू शकतात.     

या संकल्पनेबद्दल या पत्रकार परिषदेत महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष मिलिंद जोशी, मराठी प्रकाशक संघाचे अध्यक्ष राजीव बर्वे, जागतिक मराठी अकादमीचे सचिन इटकर, स्टोरीटेल इंडियाचे प्रमुख योगेश दशरथ, थिंकबँक युट्यूब चॅनेलचे प्रमुख विनायक पाचलग आणि स्टोरीटेल मराठीचे प्रसाद मिरासदार यांनी माहिती दिली.

मोदी सरकारने देशामध्ये अघोषित आणीबाणी लागू केली आहे- अरविंद शिंदे

पुणे-केंद्र सरकारच्या अखतारित असलेल्या आयकर खात्याने काल BBC या आंतरराष्ट्रीय वृत्त समुहाच्या दिल्ली व मुंबई येथील कार्यालयांवर छापे टाकून तेथील कामगारांना बंदीस्त करून कारवाई केली याच्या निषेधार्थ आज पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने नवी पेठ पत्रकार भवन येथे तोंडाला काळीफित बांधून शहराध्यक्ष अरविंद शिंदे यांच्या नेतृत्वाखाली मूक आंदोलन करण्यात आले.

      यावेळी बोलताना शहराध्यक्ष अरविंद शिंदे म्हणाले की, ‘‘नरेंद्र मोदी हे हुकूमशाहीपद्धतीने काम करत असून देशात लोकशाही व्यवस्था, संविधान सर्व काही धाब्यावर बसवले आहे. मोदी व शहांच्या विरोधात आवाज उठवणाऱ्यांवर कारवाई करुन तो आवाज दडपण्याचे काम केले जाते. BBC च्या दिल्ली व मुंबईतील कार्यालयावर आयकर विभागाचे छापे हे त्याचाच भाग आहे. BBC ने गुजरात दंगलीसंदर्भात दोन आठवड्यापूर्वी एक डॉक्युमेंटरी प्रसारित केली होती, त्याचा राग धरूनच ही छापेमारी केली असून हा योगायोग नसून देशात अघोषीत आणीबाणी अल्याचेच हे द्योतक आहे, BBC ने तयार केलेली डॉक्युमेंटरी भारतात दाखवू नये यासाठी मोदी सरकारने तात्काळ त्यावर बंदी घातली. बंदी घातली असतानाही काही ठिकाणी ही डॉक्युमेंटरी दाखवण्यात आली. बीबीसीच्या या डॉक्युमेंटरीमुळेच मोदी सरकारचे पित्त खवळले व त्यांच्या आवडत्या अस्त्रातील आयकर विभागाचे छापे टाकून बीबीसीला गप्प करण्याचा प्रयत्न केला आहे. सरकारच्या विरोधात बोलल्यास त्याच्यावर ईडी, सीबीआय अथवा आयकर विभागाच्या माध्यमातून कारवाई करून गप्प करण्याचा प्रयत्न केला जातो. याचा निषेध म्हणून आज आम्ही पत्रकारांच्या संरक्षणासाठी व लोकशाहीच्या चौथ्या आधारस्तंभाच्या स्वातंत्र्यासाठी हे मूक आंदोलन करीत आहोत.’’

यावेळी प्रदेश पदाधिकारी ॲड. अभय छाजेड, कमल व्यवहारे, गोपाळतिवारी, संगीता तिवारी, सोनाली मारणे, रजनी त्रिभुवन ब्लॉक अध्यक्ष सचिन आडेकर, सतिश पवार, रमेश सोनकांबळे, लता राजगुरू, सुजाता शेट्टी, रफिक शेख, सुधीर काळे, भरत सुराणा, मारूती माने, सचिन भोसले, आनंद गांजवे, भगवान कडू, प्रकाश पवार, राजेंद्र नखाते, शिवाजी भोईटे, सुनिल पंडित, भोला वांजळे, राजू नाणेकर आदींसह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

फोरसाईट कॉमर्स महाविद्यालय येथे मतदान जनजागृती अभियानाचे आयोजन

पुणे, दि. १५: कसबापेठ व चिंचवड मतदार संघात व्यापक मतदान जागृती अंतर्गत जिल्हा निवडणूक अधिकारी कार्यालय, नेहरू युवा केंद्र आणि स्वराज्य वैद्यकीय संघ यांच्या संयुक्त विद्यमानाने रास्ता पेठेतील फोरसाईट कॉमर्स महाविद्यालय येथे मतदार जनजागृती अभियान आयोजित करण्यात आले.

यावेळी स्वराज्य टास्क फोर्सचे संचालक दीपक कारकर, फोरसाईट कॉमर्स महाविद्यालयाचे प्राचार्य, सचिव शिक्षक वृंद व विद्यार्थी उपस्थित होते.

यावेळी मतदान आपला हक्क असून सर्वांनी मतदान करावे. आपल्या परिसरातील नागरिकांना मतदान करण्याविषयी प्रवृत करावे, असे आवाहन उपजिल्हाधिकारी अजय पवार यांनी विद्यार्थ्यांना केले. आकांक्षा गुंड, तुषार जोंधळे व त्यांच्या चमुने मतदान जनजागृती विषयी पथनाट्याचे सादरीकरण केले.

महाराष्ट्रातील सोसायट्या, कारखाने कुणी चाटून पुसून खाल्ले? ‘राष्ट्रवादी’चे कोण सहभागी?भाजपचा सुप्रिया सुळेंना सवाल

मुंबई-सुप्रियाताई महाराष्ट्रातील सोसासट्या, कारखाने कुणी चाटून पुसून खाल्ले, असा तिखट सवाल भाजपने राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या आणि खासदार सुप्रिया सुळे यांना केला आहे.भाजपकडून महाराष्ट्रातले उद्योग पळवण्यात आले. आता सांस्कृतिक, अध्यात्मिक वारसा पळवण्याचा घाट घातल्याचा आरोप सुप्रिया सुळे केला होता. त्याला भाजपकडून प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी प्रत्युत्तर दिले आहे.

सुळेंचा आक्षेप काय?

देशातील १२ ज्योतिर्लिंगांपैकी सहावे प्रसिद्ध श्री महादेव मंदिर पुणे जिल्ह्यातील भीमाशंकर येथे सह्याद्रीच्या डोंगररांगांत वसलेले आहे. शिवपुराण, शिवलीलामृतात त्याचे पुरावेही आहेत. मात्र आसामचे मुख्यमंत्री हिमंत बिस्वा सरमा यांनी हे “भीमाशंकर ज्योतिर्लिंग’ त्यांच्या राज्यात असल्याचा दावा केला आहे. महाशिवरात्रीचा सण 18 फेब्रुवारी रोजी सर्वत्र साजरा होत आहे. या पार्श्वभूमीवर आसामच्या पर्यटन विभागाने तेथील डाकिनी टेकडी, कामरूप या ठिकाणी हे देवस्थान असल्याच्या जाहिरातही सर्वत्र प्रकाशित करून भाविकांना या मंदिराकडे आकर्षित करण्याचा प्रयत्न केला आहे. यावरच राष्ट्रवादी काँग्रेसने आक्षेप घेत टीका केली होती.

सुप्रिया सुळे यांनी या प्रकरणी ट्विट करून भाजपवर जोरदार टीका केली होती. त्यात ट्विटमध्ये सुळे म्हणतात की, भाजपाच्या नेत्यांनी महाराष्ट्राच्या वाट्याला काहीही ठेवायचं नाही असं ठरवलंय काय? अगोदर महाराष्ट्राच्या वाट्याचे उद्योग आणि रोजगार पळविले आणि आता चक्क आमचा सांस्कृतिक व अध्यात्मिक वारसा पळविण्याचा घाट घातलाय….!

सुप्रिया सुळे पुढे म्हणतात की, श्री शिवशंकराच्या बारा ज्योतिर्लिंगांपैकी सहावे ज्योतिर्लिंग म्हणून महाराष्ट्रातील ‘भीमाशंकर’ जि. पुणे, हे ज्योतिर्लिंग ओळखले जाते.अतिशय निसर्गरम्य परिसरात वसलेले हे शिवालय अगणित भाविकांचे श्रद्धास्थान आहे.पण भाजपाची सत्ता असणाऱ्या आसाम राज्याने गुवाहाटीजवळ असणारे पामोही येथील शिवलिंग सहावे ज्योतिर्लिंग असल्याचा प्रचार सुरूय केला आहे. हा अतिशय खोडसाळ आणि तथ्यहीन प्रसार आहे.

सुप्रिया सुळे पुढे म्हणतात की, श्रीमद् आद्य शंकराचार्य आपल्या बृहद रत्नाकर स्तोत्रामध्ये स्पष्टपणे म्हणतात की, भीमा नदीचा उगम आणि डाकिनीचे जंगल हेच भीमाशंकर ज्योतिर्लिंग. त्यामुळे महाराष्ट्राच्या पुणे जिल्ह्यातील भीमाशंकर हेच १२ ज्योतिर्लिंग मंदिरांपैकी एक आहे, अन्य कोणतेही नाही. आता आणखी कुणाची साक्ष हवी ?

मुख्यमंत्र्यांनी हरकत नोंदवावी

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांना नम्र विनंती आहे की, कृपया महाराष्ट्राचा सांस्कृतिक व अध्यात्मिक वारसा जपण्यासाठी याची तातडीने दखल घ्यावी.या विषयाबाबत आसामच्या मुख्यमंत्र्यांना वस्तुस्थिती कळवून आपली हरकत नोंदवावी, अशी मागणीही सुळे यांनी केली होती.

जबाबदारीची अपेक्षा ठेवावी का?

सुप्रिया सुळे यांनी केलेल्या टीकेच्या भडिमाराला भाजपमधून प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी जोरदार उत्तर दिले आहे. ते आपल्या ट्विटमध्ये म्हणतात की, ताई महाराष्ट्रातील सोसायट्या, कारखाने कुणी चाटून पुसून खाल्ले? परत विकत घेतले? किती राष्ट्रवादीचे नेते यांत सहभागी आहेत? या सरकारमध्ये एक उद्योग गेला हे दाखवा? थोडी जबाबदारीची अपेक्षा ठेऊ शकतो ना महाराष्ट्र आपल्याकडून? #मविआ सरकार असतानाच महाराष्ट्रातील उद्योग गेले.

महाराष्ट्राचे उद्योग पळवले आता सांस्कृतिक ,अध्यात्मिक वारसाही पळवायचा ? मुख्यमंत्री -उपमुख्यमंत्री यांनी तातडीने हरकत नोंदवावी : खा. सुप्रिया सुळे


मुंबई- खासदार सुप्रिया सुळे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विनंती केली आहे की, त्यांनी राज्याचा सांस्कृतिक आणि अध्यात्मिक वारसा जपण्यासाठी या प्रकरणाची तातडीने दखल घ्यावी. या विषयाबाबत आसामच्या मुख्यमंत्र्यांना वस्तुस्थिती कळवून आपली हरकत नोंदवावी.

श्री शिवशंकराच्या बारा ज्योतिर्लिंगांपैकी सहावे ज्योतिर्लिंग म्हणून महाराष्ट्रातील ‘भीमाशंकर’ जि. पुणे, हे ज्योतिर्लिंग ओळखले जाते.अतिशय निसर्गरम्य परिसरात वसलेले हे शिवालय अगणित भाविकांचे श्रद्धास्थान आहे.

घटनाबाह्य ED सरकार-आपण गुवाहाटीला आमदारांची फौज पळवून नेली होती.तिथं तुमची सर्व सोय अदृश्य शक्तीच्या वतीने आसामच्या मुख्यमंत्र्यांनी केली होती.त्याचवेळी तुम्ही बदल्यात हे भीमाशंकर ज्योतिर्लिंग तर देऊन आला नाहीत ना?अर्थात अशी शक्यता नाकारता येत नाही.असेही सुप्रिया सुळे यांनी ट्वीट केले आहे.

काँग्रेसकडून आसाम सरकारचा निषेध
दरम्यान काँग्रेस नेते सचिन सावंत यांनी देखील भाजपावर हल्लाबोल केला आहे. सावंत यांनी देखील ट्विट केलं आहे. सावंत यांनी त्यांच्या ट्विटमध्ये लिहिलं आहे की, “केवळ उद्योगच नव्हे तर आता भाजपाला महाराष्ट्रातून भगवान शंकरांनाही हिसकावून न्यायचे आहे. आता भाजपाच्या आसाम सरकारचा दावा आहे की भीमाशंकर येथील सहावे ज्योतिर्लिंग हे महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यात नसून आसाममध्ये आहे. या अत्यंत आगाऊपणाच्या दाव्याचा आम्ही जाहीर निषेध करतो.”

दुसऱ्या ट्विटमध्ये सावंत यांनी म्हटलं आहे की, “शिंदे फडणवीस सरकारने तात्काळ याबाबत भूमिका स्पष्ट करुन आसाममधील भाजप सरकारच्या या निंदनीय कृतीचा निषेध नोंदवला पाहिजे. भाजपाने केवळ महाराष्ट्रातील १२ कोटी जनतेच्याच नव्हे तर तमाम भारतीयांच्या श्रद्धा, भावना दुखावल्या आहेत. भाजपाचा महाराष्ट्राबद्दलचा आकस सातत्याने दिसून येत आहे.”

भाजपा हिंदू भाविकांच्या भावना दुखावण्याचे काम करतोय .

शिंदे फडणवीस सरकारने तात्काळ भूमिका स्पष्ट करुन आसाममधील भाजप सरकारच्या या निंदनीय कृतीचा निषेध केला पाहिजे. भाजपाने केवळ महाराष्ट्रातील 12 कोटी जनतेच्याच नव्हे तर तमाम भारतीयांच्या श्रद्धा, भावना दुखावल्या आहेत. भाजपाचा महाराष्ट्राबद्दलचा आकस सातत्याने दिसून येत आहे असेही ट्वीट कॉंग्रेसच्या सचिन सावंत यांनी केले आहे.

महावितरणच्या रास्ता पेठ कार्यालयात विधी सल्लागारांना लाच घेताना पकडले, ‘एसीबी’ची कारवाई

पुणे : वीज मीटर घेण्यासाठी दाखल अर्जातील हरकतीवर अनुकूल अहवाल देण्यासाठी ४० हजारांची लाच घेणाऱ्या महावितरणच्या विधी सल्लागारांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) पकडले. रास्ता पेठेतील महावितरणच्या कार्यालयात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) कारवाई केली.

या प्रकरणी महावितरणच्या रास्ता पेठ कार्यालयातील विधी सल्लागार सत्यजीत विक्रम पवार, सहायक विधी अधिकारी समीर रामनाथ चव्हाण यांच्या विरुद्ध समर्थ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. याबाबत एकाने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली होती. तक्रारदाराने त्यांच्या नवीन इमारतीत ११ मीटर घेण्यासाठी केलेल्या अर्जावर हरकत घेण्यात आली होती. हरकतीवर अनुकूल अहवाल देण्यासाठी महावितरणचे विधी सल्लागार सत्यजीत पवार, सहायक विधी अधिकारी समीर चव्हाण यांनी तक्रारदाराकडे ४० हजार रुपयांची लाच मागितली होती.तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिल्यानंतर मंगळवारी रात्री सापळा लावण्यात आला. महावितरणच्या रास्ता पेठेतील कार्यालयात लाच घेताना दोघांना पकडण्यात आले. पवार आणि चव्हाण यांच्या विरोधात रात्री उशीरा गुन्हा दाखल करण्यात आला.
पोलीस अधीक्षक अमोल तांबे, अतिरिक्त अधीक्षक सूरज गुरव यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक आयुक्त श्रीहरी पाटील आणि पथकाने ही कारवाई केली. पोलीस निरीक्षक श्रीराम शिंदे तपास करत आहेत.

राष्ट्रवादीचे निकटवर्तीय बिल्डर अनिरुद्ध देशपांडे यांच्या कार्यालयावर आयकर विभागाचा छापा

देशपांडे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचे निकटवर्तीय

पुणे-बांधकाम व्यावसायिक अनिरुद्ध देशपांडे यांच्या कार्यालयावर बुधवारी प्राप्तिकर विभागाने छापा टाकला. प्राप्तिकर विभागाने शहरात एकाच वेळी सहा ठिकाणी छापे टाकले.देशपांडे यांची सिटी काॅर्पोरेशन लिमिटेड बांधकाम कंपनी आहे. या कंपनीचे कार्यालय डेक्कन जिमखाना भागातील फर्ग्युसन रस्त्यावर कार्यालय आहे तसेच हडपसर भागातील अमानोरा पार्क परिसरात एक कार्यालय आहे.देशपांडे यांचे कार्यालय आणि निवासस्थानातून काही कागदपत्रे ताब्यात घेण्यात आली असून या कारवाईत प्राप्तिकर विभागाच्या दिल्ली आणि मुंबईतील अधिकाऱ्यांचे पथक सहभागी झाले.

देशपांडे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या निकटवर्तीयांपैकी एक आहेत. प्राप्तिकर विभागाने देशपांडे यांच्या कार्यालयावर तसेच निवासस्थानी छापे टाकले. या कारवाईत प्राप्तिकर विभागाच्या पथकाने काही कागदपत्रे, इलेक्ट्राॅनिक साधने जप्त केली. आर्थिक गैरव्यवहाराच्या संशयावरुन प्राप्तिकर विभागाने छापे टाकले..

सहावे ज्योतिर्लिंग भीमाशंकर आसाममध्ये असल्याचा आसाम सरकारचा दावा, महाराष्ट्रातल्या नेत्यांचं जाहिरातबाजीवर जोरदार टीकास्त्र

पळून गेलेल्या ४० आमदारांना गुवाहाटीत आश्रय देणाऱ्या आसामला भीमाशंकर दिला का? काँग्रेस-राष्ट्रवादीची टीका :

मुंबईदेशातील १२ ज्योतिर्लिंगांपैकी सहावे प्रसिद्ध श्री महादेव मंदिर पुणे जिल्ह्यातील भीमाशंकर येथे सह्याद्रीच्या डोंगररांगांत वसलेले आहे. शिवपुराण, शिवलीलामृतात त्याचे पुरावेही आहेत. मात्र आसामचे मुख्यमंत्री हिमंत बिस्वा सरमा यांनी हे “भीमाशंकर ज्योतिर्लिंग’ त्यांच्या राज्यात असल्याचा दावा केला आहे.महाशिवरात्रीचा सण १८ फेब्रुवारी रोजी सर्वत्र साजरा होत आहे. या पार्श्वभूमीवर आसामच्या पर्यटन विभागाने तेथील डाकिनी टेकडी, कामरूप या ठिकाणी हे देवस्थान असल्याच्या जाहिरातही सर्वत्र प्रकाशित करून भाविकांना या मंदिराकडे आकर्षित करण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे आता ज्योतिर्लिंगांबाबत नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.

काँग्रेस-राष्ट्रवादीची टीका : पळून गेलेल्या ४० आमदारांना गुवाहाटीत आश्रय देणाऱ्या आसामला भीमाशंकर दिला का?
महाराष्ट्र काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत म्हणाले. ‘उद्योगच नव्हे तर आता भाजपला महाराष्ट्रातून भगवान शंकरांनाही हिसकावून न्यायचे आहे. शिंदे-फडणवीस सरकारने तत्काळ याबाबत भूमिका स्पष्ट करावी.’ राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या, ‘आद्य शंकराचार्य यांच्या बृहद रत्नाकर स्रोतामध्ये ‘भीमा नदीचा उगम व डाकिनीचे जंगल हेच भीमाशंकर’ म्हटले आहे. अजून कोणता पुरावा हवा? घटनाबाह्य ईडी सरकार गुवाहाटीला ४० आमदारांची फाैज घेऊन गेले हाेते. तिथे तुमची साेय आसामच्या मुख्यमंत्र्यांनी केली हाेती. त्याबदल्यात तुम्ही भीमाशंकर त्यांना देऊन आला तर नाही ना?’

परळी येथील पाचवे ज्योतिर्लिंग प्रभू वैद्यनाथ मंदिरावरही झारखंडचा दावा
हिंदू धर्मातील मान्यतेनुसार, भगवान शंकर महादेव ज्या ठिकाणी स्वत: प्रकट झाले ती १२ ठिकाणे ज्योतिर्लिंग म्हणून प्रसिद्ध आहेत. महाराष्ट्र, गुजरात, आंध्र प्रदेश, मध्य प्रदेश, उत्तराखंड, तामिळनाडू या राज्यांमध्येही ही १२ मंदिरे आहेत. पैकी महाराष्ट्रात परळी वैजनाथ, भीमाशंकर, औंढा नागनाथ, त्र्यंबकेश्वर व वेरूळ ही पाच मंदिरे आहेत. बीड जिल्ह्यातील परळी येथील वैद्यनाथ मंदिर हे पाचवे ठिकाण म्हणून प्रसिद्ध आहे. मात्र त्याबाबतही उत्तरेतील राज्यांकडून संभ्रम निर्माण करण्यात येत आहेत. झारखंड येथील देवघर येथे खरे वैद्यनाथ ज्योतिर्लिंग असल्याचा दावा तेथील काही धर्म अभ्यासकांंनी केला. हिमाचल प्रदेशात बैजनाथ येथे पाचवे ज्योतिर्लिंग असल्याचा दावा केला जातो. परंतु संकेश्वरपीठाधीश शंकराचार्य अभिनव विद्यानृसिंह स्वामी यांनी परळी येथील शिव मंदिर हेच ज्योतिर्लिंग असल्याचा दावा केलेला आहे. आसामच्या पर्यटन विभागाने दिलेल्या जाहिरातीतही पाचवे ज्योतिर्लिंग म्हणून परळीचा मंदिराचा उल्लेख केलेला नाही.