पुणे’ज्याच्या मागे तेली तो भाग्यशाली’ अशी श्रद्धा असलेला कसबा मतदारसंघातील सर्व तेली समाज महाविकास आघाडीच्या बाजूने खंबीरपणे उभा राहणार असून धंगेकर यांना विजयी करून दाखवणारच ‘असा निर्धार माजी उपमहापौर व ज्येष्ठ नगरसेवक आबा बागुल यांनी आज येथे व्यक्त केला.
पुणे शहर तिळवण तेली समाजाच्या वतीने कसबा पेठ विधानसभा पोटनिवडणुकीतील काँग्रेस पक्षाचे उमेदवार रविंद्र धंगेकर यांना जाहीर पाठिंबा देण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या बैठकीमध्ये ते बोलत होते. माजी गृहराज्यमंत्री रमेश बागवे, माजी आमदार मोहन जोशी, शिवसेनेचे शहर प्रमुख संजय मोरे ,राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रवींद्र माळवदकर, माजी स्थायी समिती अध्यक्ष विरेंद्र किराड, विशाल धनवडे, अविनाश बागवे, वनराज आंदेकर, लक्ष्मीताई उदयकांत आंदेकर, निसार शेख, सुरेश कांबळे, दत्ता सागरे आदी यावेळी व्यासपीठावर उपस्थित होते.
तेली समाजाचे अध्यक्ष घनश्याम वाळुंजकर यांच्या नेतृत्वाखाली समाजाचे बहुसंख्य स्त्री पुरुष व तरुण यावेळी उपस्थित होते. श्री बागुल पुढे म्हणाले, मेहनत, कर्तुत्व व निष्ठा या त्रिसूत्री पद्धतीने तेली समाज सर्वच क्षेत्रात प्रगतीपथावर असून अचूक व योग्य व्यक्तीची निवड करताना समाज सर्व ताकदीनिशी उभा राहतो, हे मागील पन्नास वर्षाच्या काळात दिसून आले आहे. त्यामुळे रविंद्र धंगेकर यांच्यासारख्या प्रामाणिक कार्यकर्त्याच्या मागे खंबीरपणे उभे राहण्याचा निश्चय समाजाने केला असल्याचे त्यांनी सांगितले.
आपल्या प्रास्ताविक पर मनोगतात समाजाचे अध्यक्ष घनश्याम वाळुंजकर यांनी, कसबा मतदार संघातील ४९२३ कुटुंबे धंगेकर यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहतील अशी घोषणा त्यांनी केली.
यावेळी माजी मंत्री बागवे, मोहन जोशी, रविंद्र माळवदकर, विरेंद्र किराड यांचीही भाषणे झाली. या कार्यक्रमाला प्रवीण करपे, संजय भगत, जयाशेठ किराड, कुमार भगत, सौरभ अमराळे, दीपक पवार, विलास रत्नपारखी आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अमित बागुल यांनी तर आभार माजी नगरसेवक अविनाश बागवे यांनी मानले.