Home Blog Page 1394

अरविंद केजरीवाल यांनी घेतली उद्धव ठाकरेंची भेट

मुंबई-आम आदमी पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष व दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान हे मुंबई दौऱ्यावर आहेत. आज ‘आप’ मुंबईतर्फे त्यांचे मुंबई विमानतळावर जंगी स्वागत करण्यात आले आहे. त्यानंतर उद्धव ठाकरेंची त्यांनी मातोश्रीवर भेट घेतली. या भेटीमुळे राजकीय तर्कवितर्क लावले जात आहेत.अरविंद केजरीवाल म्हणाले, उद्धव ठाकरेंना भेटण्याची माझी खूप दिवसांची इच्छा होती. कोरोनाची लाट थोपावताना आम्हाला एकमेकांचे मार्गदर्शन झाले.

अरविंद केजरीवाल व पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान ह्यांचा मुंबई दौरा सुरू असताना महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडून त्यांना चहा-पाण्यासाठी आमंत्रण आले होते, हे आमंत्रण स्वीकारत केजरीवाल यांनी त्यांची आज भेट घेतली. यावेळी उभय नेत्यांत चर्चाही झाली मात्र, काय चर्चा झाली याची ठोस माहिती समजू शकली नाही.अरविंद केजरीवाल आणि भगवंत मान यांच्या आगमनामुळे आम आदमी पार्टीच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साह आणि चैतन्याचे वातावरण निर्माण झाले आहे. आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हा दौरा अतिशय महत्वाचा मानला जात आहे

आम आदमी पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष व दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान आज मुंबई दौऱ्यावर एका कार्यक्रमासाठी आले होते. कलिना सांताक्रूझ येथील जनरल एव्हीएशन टर्मिनल येथे आम आदमी पार्टी मुंबईच्या वतीने त्यांच्या आगमनानिमित्त भव्य स्वागत सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. आम आदमी पार्टी मुंबईच्या अध्यक्षा प्रीती शर्मा मेनन यांनी अरविंद केजरीवाल व भगवंत मान यांचे स्वागत केले.

या प्रसंगी त्यांच्या सोबत आम आदमी पार्टी मुंबईचे कार्याध्यक्ष रूबेन मस्करेन्हस, उपाध्यक्ष संदीप कटके, द्विजेंद्र तिवारी, पायस व्हर्गिस, आम आदमी पार्टी मुंबईचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. अरविंद केजरीवाल यांच्या आगमनामुळे आम आदमी पार्टी मुंबईच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे व चैतन्याचे वातावरण निर्माण झाले आहे. आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हा दौरा अतिशय महत्वाचा मानला जात आहे.

बुधवारी कोथरुड, एसएनडीटी, डेक्कन परिसरातील पाणी पुरवठा बंद

पुणे : शहरातील एसएनडीटी भागातील पाण्याच्या टाक्‍यांना, जलशुद्धीकरण केंद्राच्या ठिकाणी फ्लो मीटर बसविण्यात येणार आहे. त्यामुळे संबंधित परिसरातील पाणीपुरवठा येत्या बुधवारी (ता.1) बंद राहणार आहे.पुणे महापालिकेच्या समान पाणी पुरवठा प्रकल्पाअंतर्गत शहराच्या विविध भागातील पाण्याच्या टाक्‍यांना, जलशुद्धीकरण केंद्राच्या ठिकाणी फ्लो मीटर बसविण्यात येणार आहे. त्यानुसार, एसएनडीटी भागात फ्लो मीटर बसविण्याचे काम महापालिकेच्या पाणी पुरवठा विभागाने हाती घेतले आहे.त्यानुसार, बुधवारी (ता.1) रोजी व दुसऱ्या दिवशी संबंधित परिसरातील पाणी पुरवठा कमी दाबाने होणार आहे, अशी माहिती पाणी पुरवठा विभागाचे मुख्य अभियंता अनिरुद्ध पावसकर यांनी दिली आहे.

सेवा हक्क कायद्याची प्रभावीपणे अंमलबजावणी करा – मुख्य सेवा हक्क आयुक्त दिलीप शिंदे

0

औरंगाबाद, दि.24 :- महाराष्ट्र राज्य लोकसेवा हक्क अधिनियमानुसार नागरिकांना कायद्याने मिळणे अपेक्षित असलेली सेवा पारदर्शक पद्धतीने, तत्परतेने आणि त्याचबरोबर विहित केलेल्या कालमर्यादेत उपलब्ध करुन देणे बंधनकारक आहे. सेवा हक्क कायद्याच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी सर्व अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष द्यावे, अशा सूचना राज्याचे मुख्य सेवा हक्क आयुक्त दिलीप शिंदे यांनी दिल्या.

राज्य मुख्य सेवा हक्क आयुक्त दिलीप शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली विभागीय आयुक्त कार्यालयात बैठक झाली. विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर, विभागीय सेवा हक्क आयुक्त डॉ.किरण जाधव यांच्यासह विविध विभागांचे प्रमुख उपस्थित होते.

श्री.शिंदे म्हणाले,  ‘आपली सेवा आमचे कर्तव्य’ हे आयोगाचे घोषवाक्य असून त्यानुसार काम करत असताना ऑनलाईन सेवा पुरवण्यातून जास्तीत जास्त पारदर्शकता आणण्याचा प्रयत्न आहे. अधिसूचित करण्यात आलेल्या ५११ सेवांपैकी आतापर्यंत ३८७ सेवा ऑनलाईन करण्यात आल्या असून भविष्यात सर्वच सेवा ऑनलाईन करणे, आपले सरकार सेवा केंद्रांची संख्या वाढवणे, शासनाच्या सर्व सेवांचे आपले सरकार या एकल संकेतपीठावर एकत्रिकरण करणे आदींसाठी आयोग प्रयत्नशील आहे.

सेवा हक्क कायद्यामध्ये शिक्षा देण्याची तरतूद आहे.  तसेच चांगले काम करणाऱ्या अधिकारी यांना प्रशस्तीपत्र व प्रोत्साहनपत्र देण्याचीही तरतूद आहे. सेवा देणे अधिकाऱ्यांचे कर्तव्य आहे आणि सेवा घेणे नागरिकांचा हक्क आहे. तसेच विविध विभागांची वेगवेगळी वेबपोर्टल आहेत. या सर्वांनाच एकत्र करण्याचे काम लवकरच पूर्ण होईल. आपले सरकार या संकेतस्थळावरून ऑनलाईन अर्ज करता येईल. डिजीटल प्रकियेमुळे बायोमॅट्रिक पद्धतीने डिजीटल स्वाक्षरीचे विविध दस्ताऐवज प्राप्त करण्याची सोय झाली आहे. जाणून बुजून खोटी माहिती देणे, चुकीची माहिती देणे, खोटे दस्ताऐवज देणे आदी लोकसेवा देण्यात कसूर करणाऱ्यांविरुध्द कारवाई करण्याची तरतूदही या कायद्यात आहे. प्रत्येक कार्यालयाने पुरवित असलेल्या सेवा किती दिवसात द्यावयाच्या आहेत असा स्पष्ट फलक कार्यालयात लावणे गरजेचे आहे. महसूल विभाग आणि कामगार विभागाने उत्कृष्ट काम केले आहे. तत्परतेने सेवा द्या, कार्यालयात फलक लावा तसेच प्रलंबित प्रकरणे पूर्ण करा अशा सूचना आयुक्त श्री. शिंदे यांनी दिल्या.

विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी एक महिन्याच्या आत लाईव्ह अपील पूर्ण करा, प्रलंबित प्रकरणे मार्गी लावा अशा सूचना दिल्या.

विभागीय लोकसेवा आयुक्त डॉ.किरण जाधव यांनी काही अडचणी असल्यास एनआयसी मार्फत तांत्रिक अडचणी दूर करण्यासाठी सर्वोतोपरी मदत करण्यात येईल असे सांगितले.

यावेळी विविध विभागांचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते.

मानांकनाच्या मागे न लागता जास्तीत जास्त चांगल्या स्पर्धा खेळा-माजी बॅडमिंटनपटू पद्मश्री प्रकाश पदुकोण

 ८४ व्या  वरिष्ठ गटाच्या राष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धेचे उद्घाटनपुणे जिल्हा आणि महानगर बॅडमिंटन संघटना (पीडीएमबीए) यांच्या वतीने आयोजित डॉ. सायरस पूनावाला आणि  वेंकीज यांच्या सहकार्याने व बॅडमिंटन असोसिएशन ऑफ इंडिया व महाराष्ट्र बॅडमिंटन असोसिएशन यांच्या मान्यतेने स्पर्धा

पुणे :  मानांकनाच्या स्पर्धेत खेळाडू नकळतपणे ओढला जातोय. मानांकन कसे वाढेल म्हणून खेळाडू खेळतात. पण, त्याकडे खेळाडूंनी दुर्लक्ष करावे. जास्तीत जास्त चांगल्या स्पर्धा खेळाव्यात आणि त्या कशा जिंकता येतील हे महत्वाचे आहे. स्पर्धा जिंकल्या की तुमचे मानांकन आपोआप सुधारेल, असे मत भारताचे माजी बॅडमिंटनपटू प्रकाश पदुकोण यांनी व्यक्त केले. 
पुणे जिल्हा आणि महानगर बॅडमिंटन संघटना (पीडीएमबीए) यांच्या वतीने आयोजित डॉ. सायरस पूनावाला आणि  वेंकीज यांच्या सहकार्याने व बॅडमिंटन असोसिएशन ऑफ इंडिया व महाराष्ट्र बॅडमिंटन असोसिएशन यांच्या मान्यतेने श्री शिवछत्रपती क्रीडा संकुल येथे सुरु असलेल्या योनेक्स सनराईज  ८४ व्या  वरिष्ठ गटाच्या राष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धेचे शुक्रवारी प्रकाश पदुकोण यांच्या हस्ते औपचारिक उदघाटन झाले. यावेळी पत्रकारांशी संवाद साधताना ते बोलत होते. यावेळी एस. मुरलीधरन, ओमर राशीद, जसविंदर नारंग, मंगेश काशीकर, वैभव डांगे, पुणे जिल्हा आणि शहर बॅडमिंटन संघटनेचे रणजित नातू, अण्णा नातू, श्रीकांत वाड आदी मान्यवर उपस्थित होते.  पोलीस बँडने पदुकोण यांना मानवंदना दिली व नंतर पोलीस बँडच्या तालावर सर्व खेळाडूंचे संचलन झाले.
थॉमस कप बॅडमिंटन स्पर्धेच्या ७४ वर्षांच्या काळात महाराष्ट्रातले जे पुरुष खेळाडू थॉमस कपसाठी खेळले त्या खेळाडूंचा सन्मान प्रकाश पदुकोण यांच्या हस्ते झाला. खेळाडूंना ताम्रपत्र, पुणेरी पगडी देऊन गौरविण्यात आले.  आसिफ पापरिया, इक्बाल मैदर्गी. लेरॉय, संजय शर्मा, रवी कुंटे, विजय लेन्सी,अक्षय देवलकर, जिष्णू सन्याल, निखिल कानेटकर, उदय पवार, आनंद पवार, चिराग शेट्टी, या खेळाडूंचा सन्मान करण्यात आला. दत्ता धोंगडे, दिपांकर भट्टाचार्य यांचा देखील यावेळी विशेष सन्मान करण्यात आला.  
प्रकाश पदुकोण म्हणाले, आज बॅडमिंटनमध्ये खेळणारी पिढी खरंच खूप नशीबवान आहे. त्यांना सर्व एका हाकेसरशी मिळत आहे. बॅडमिंटनही हा भारतात दुसऱ्या क्रमांकाचा लोकप्रिय खेळ बनला आहे. आमच्या काळात स्पर्धांना जाण्यापासून, स्पर्धा केंद्रावर राहणे, साहित्याची उपलब्धता या सगळ्याबाबत अडचणीच अडचणी होत्या. मात्र, आता चित्र बदललेले आहे. ते पुढे म्हणाले, आमच्या कालावधीत आम्हाला संधीची वाट पहावी लागत होती. आज बॅडमिंटन इतके वाढले आहे की स्पर्धा संख्याही वाढल्या आहेत. विविध स्पर्धांच्या माध्यमातून वेगवेगळी व्यासपीठ खेळाडूंसाठी निर्माण झाली आहेत. त्यामुळे आता संधी वाट पहाते की काय असे वाटते. सरकार, संघटना, पुरस्कर्ते, प्रशासक अशा सगळ्याच आघाड्यांवर सहकार्य मिळत आहे. त्यामुळे यांचा हात हातात घेऊन कसे पुढे जायचे हे खेळाडूंनी ठरवायचे आहे.
पदुकोण यांनी बॅडमिंटनच्या वाढीस अनेक वाटा मिळाल्या आहेत. अनेक जण यात काम करत आहेत. पुणे जिल्हा बॅडमिंटन संघटनेने अशा मोठ्या आयोजनाची संधी मिळाली की ती नेहमीच यशस्वी करून दाखवली आहे. बॅडमिंटनच्या प्रसारास अजूनही वाव आहे. त्यावर काम करता येईल, असेही मत पदुकोण यांनी मांडले.

दुखापती आणि कामगिरी हे खेळाडूच्या कारकिर्दीमधील एक अविभाज्य घटक आहेत. आपली तंदुरुस्ती कशी उत्तम राहील आणि चांगली कामगिरी कशी करता येईल याकडे खेळाडूंचे लक्ष वाढायला हवे. असेही पदुकोण म्हणाले. बॅडमिंटनपटूंना आज कारकिर्द घडवताना संधी आणि सुविधा दोन्ही सहज उपलब्ध होत आहेत. आता त्याचा फायदा करून घेणे तुमच्या हातात आहे, असे आवाहन भारताचे माजी बॅडमिंटनपटू प्रकाश पदुकोण यांनी नव्या पिढीला केले.

माणसामधली सृजनशक्ती असेपर्यंत साहित्यही असणार – ज्येष्ठ साहित्यिका डॉ. तारा भवाळकर

0

सांगली दि. 24 :  सृजनात्मा – निर्माण करणारा आत्मा, म्हणजे माणूस हा सर्वश्रेष्ठ आहे. संस्कृती म्हणजे एकमेकांना जोडून राहणं, प्रेम करणं. यंत्रमानवाला आपल्या मेंदूवर स्वार होऊ देऊ नका. यंत्र माणसाच्या हातात पाहिजे, ते माणसाच्या डोक्यावर जाऊ नये. यंत्र असो, तंत्र असो, कृत्रिम बुध्दिमत्ता असो, तिचा निर्माता, सृजनात्मा हा माणूसच आहे. कृत्रिम बुध्दीलाही माणसांनीच निर्माण केलेलं आहे. माणसामधली  सृजनशक्ती आहे, तोपर्यंत त्याची कविताही असणार आहे, त्याची कृतीही असणार आहे, त्याची कलाही असणार आहे, त्याचं साहित्यही असणार आहे आणि माणूसही असणार आहे, असा ‍विश्वास 17 व्या कामगार साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदावरून बोलताना ज्येष्ठ साहित्यिका डॉ. तारा भवाळकर यांनी व्यक्त केला.

महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळामार्फत लोकशाहीर अण्णाभाऊ साठे साहित्यनगरी बालगंधर्व नाट्यमंदिर, मिरज येथे आयोजित 17 व्या कामगार साहित्य संमेलनाचे उद्घाटन महाराष्ट्र राज्य विश्वकोश निर्मिती मंडळाचे अध्यक्ष डॉ. राजा दीक्षित यांच्या हस्ते आणि संमेलनाच्या अध्यक्ष डॉ. तारा भवाळकर, कामगार मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले. यावेळी महापौर दिग्विजय सूर्यवंशी, 99 व्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाचे अध्यक्ष ज्येष्ठ नाटककार प्रेमानंद गज्वी, कामगार विभागाच्या प्रधान सचिव विनिता वेद सिंगल, उप सचिव दादासाहेब खताळ, महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाचे कल्याण आयुक्त रविराज इळवे, दक्षिण महाराष्ट्र साहित्य परिषदेचे अध्यक्ष भिमराव धुळूबुळू यांच्यासह मान्यवर पदाधिकारी, साहित्यिक व कामगार उपस्थित होते.

डॉ. तारा भवाळकर म्हणाल्या, साहित्य, मग ते कोणाचंही, कोणत्याही काळातलं असू देत, निर्माण करणारा माणूसच असतो. आणि प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे ते साहित्य त्याच्या जगण्यातून निर्माण होत असतं. साहित्याचा विषय हा नेहमी माणूसच असतो. मग माणसाचं जगणं, तो ज्या कुटुंबात, समाजस्तरात जन्माला येतो, ज्या वातावरणात वाढतो. त्या वातावरणातलं राजकारण, धर्मकारण, अर्थकारण, शिक्षणव्यवस्था, सांस्कृतिक वातावरण या सगळ्या ताणाबाणांच्या मिश्रतेचा साहित्यात आविष्कार होत असतो. कामगार साहित्यातही हेच होत असतं. कामगारांच्या साहित्यातून श्रमाचा हुंकार बाहेर पडतो, असे त्या म्हणाल्या.

मी कामगार आहे तळपती तलवार आहे, सारस्वतांनो मी थोडासा गुन्हा करणार आहे! “ म्हणजे लिहिणार आहे असे ज्येष्ठ साहित्यिक नारायण सुर्वे म्हणतात, असे सांगून डॉ. भवाळकर म्हणाल्या, गिरण्या कारखान्यातल्या एकाच प्रकारच्या अनुभवी संघभावनेने कामगाराला नवी दृष्टी दिली व नवं भान दिलं. नवी अस्मिता, अभिमान आणि विश्वास दिला. यंत्रयुगातल्या एकानुभवी समूहाला कष्टाचंही सामूहिक एकीकरण झालं. नवयुगाचं अर्थकारण मालक – मजूर संबंध, संघर्ष, मजुरांचे हक्क इत्यादी बाबींच्यामधून नवभान आलेला कामगारवर्ग निर्माण झाला. नवभान आलेला कामगार साहित्यिक, भांडवलशाहीचं नवं अर्थभान घेऊन लिहू-वाचू लागला. मोर्चे यामुळे कामगार चळवळीचं अस्तित्व समाजाला जाणवू लागलं. त्याचा आविष्कार त्याच्या लेखनातूनं होऊ लागला. नवयुगाच्या विविध चळवळीतुन कामगार चळवळ ही पुढे येत गेली. त्या त्या गटातल्या साहित्याची निर्मिती त्यातून झाली.

        बुध्दी व श्रम ही दोन्ही बले जेंव्हा एकत्र येतात तेंव्हा नवनिर्मिती होते. मनगट, मन आणि बुध्दी एकत्र आल्याशिवाय प्रगती नाही म्हणूनच श्रमातून सौंदर्य निर्माण करणाऱ्या कामगारांना समाजात आदराचे स्थान दिले पाहिजे, असे प्रतिपादन संमेलनाचे उद्घाटक डॉ. राजा दीक्षित यांनी यावेळी केले. 19 व्या शतकात महात्मा फुले, शतपत्रेकार लोकहितवादी गोपाळ हरी देशमुख यांनी कामगारांच्या कष्टाला प्रतिष्ठा मिळवून दिली. नारायण मेघाजी लोखंडे यांनी पहिली कामगार संघटना स्थापना केली. सध्याच्या काळात कामगारांच्या चळवळी मंदावत आहेत. हा जागतिकीकरणाचा दुष्परिणाम आहे. कंत्राटी पध्दतीने कामगार भरती होत असल्याने त्यांना संघटीत होण्यास संधी मिळत नाही, ही चिंतेची बाब असल्याचे ते म्हणाले.

कामगारांनी काम मागण्यापेक्षा देणारे व्हावे, अशी अपेक्षा व्यक्त करून पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे म्हणाले, सर्व उद्योगात कामगार केंद्रबिंदू असल्याने त्याच्या श्रमाला प्रतिष्ठा मिळावी. कामगार साहित्य संमेलनाला मोठा वारसा असून यातून कामगारांच्या कलागुणांना वाव देण्याचे काम कामगार कल्याण मंडळामार्फत होत आहे. कामगार साहित्य संमेलनाच्या मंचावरून कामगारांचे प्रश्न, समस्या यावर चर्चा घडते. कामगार कल्याण मंडळाने 17 वे साहित्य संमेलन साहित्य, आरोग्य पंढरी असलेल्या मिरजेत आयोजित केल्याबद्दल कामगार मंडळाचे त्यांनी आभार मानले.

कामगार विभागाच्या प्रधान सचिव विनिता वेद सिंगल म्हणाल्या, कामगार कल्याण मंडळामार्फत कामगारांच्या कल्याणासाठी अनेक उपक्रम राबविले जात आहेत. कामगारांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी नाट्यस्पर्धा आयोजित केल्या जात असून कबड्डी सारख्या राज्यस्तरीय स्पर्धाही घेतल्या जात आहेत. शिक्षण, साहित्य व सांस्कृतिक विषयक कार्यक्रम आयोजित करून कामगारांमध्ये चैतन्य निर्माण करण्याचे काम कल्याण मंडळामार्फत केले जात असल्याचे त्या म्हणाल्या.

कामगार कल्याण मंडळामार्फत साहित्य संमेलनासारखे उपक्रम आयोजित करून कामगाराला एक व्यासपीठ उपलब्ध करून देण्याचे काम केले जात आहे, असे कामगार कल्याण आयुक्त रविराज इळवे यांनी प्रास्ताविकात सांगितले. सुमारे 12 वर्षानंतर हे साहित्य संमेलन होत असून या साहित्य संमेलनामध्ये ३ हजार कामगार व कुटुंबियांनी नोंदणी केली असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली.

प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. यावेळी स्थानिक कलाकारांनी महाराष्ट्र गीत तर बाबा नदाफ आणि सहकाऱ्यांनी महात्मा फुले यांचा  सत्य सर्वांचे आदिघर, सत्य सर्वांचे माहेर हा अखंड सादर केला. कार्यक्रमात अभिनेत्री रोहिणी कुडेकर, संबळ वादक गौरी वायचळ, अभिनेता अजितकुमार कोष्टी यांचा मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.

१७ व्या कामगार साहित्य संमेलनाचा ग्रंथ दिंडीने शुभारंभ

दरम्यान, ढोल ताशांच्या निनादात आणि ज्ञानोबा… तुकाराम.. जय जय राम कृष्ण हरी….. गजरात 17 व्या कामगार साहित्य संमेलनाचा शुभारंभ ग्रंथ दिंडीने करण्यात आला. मिरज येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यापासून ग्रंथ दिंडीस प्रारंभ झाला. कामगार मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ.सुरेश खाडे आणि कामगार विभागाच्या प्रधान सचिव विनिता वेद सिंगल यांच्या हस्ते ग्रंथ पालखीचे पूजन करण्यात आले. तत्पूर्वी पालकमंत्री डॉ सुरेश खाडे व अन्य मान्यवरांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास अभिवादन केले.

छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती शाहू महाराज यांच्या वेशभूषा करून सहभागी झालेले युवक आणि संबळ वाद्य वाजवणारी गौरी वायचळने ग्रंथ दिंडीत सर्वांचे लक्ष वेधून घेतले. डोक्यावर तुळस कट्टा, हाती ब्रेल लिपीत लिहिलेली ज्ञानेश्वरी, तुकाराम गाथा व मुखाने ज्ञानोबा… तुकाराम .. जय..जय राम… कृष्ण हरी… असा हरी नामाचा गजर करीत ग्रंथ दिंडीत सहभागी झालेले कै. सु.धा. घोडावत या अंध शाळेच्या विद्यार्थ्यांनी सर्वांचे लक्ष वेधले. ग्रंथ दिंडीत अंध शाळेच्या विद्यार्थ्यांच्या चमू सोबत वासुदेवानेही सर्वांचे लक्ष वेधून घेतले.  कामगार साहित्य संमेलनानिमित्त काढण्यात आलेली ही ग्रंथ दिंडी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यापासून सुरुवात होऊन सराफ कट्टा, लक्ष्मी मार्केट, महापालिका कार्यालय, स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकर प्रवेशद्वार या मार्गावरून बालगंधर्व नाट्यमंदिर पर्यंत काढण्यात आली. ग्रंथ दिंडीत पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे, कामगार विभागाच्या प्रधान सचिव विनिता वेद सिंगल, महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाचे आयुक्त रविराज इळवे यांच्यासह मान्यवर पदाधिकारी व कामगार विभागाचे अधिकारी सहभागी झाले होते.

ग्रंथ दिंडी बालगंधर्व नाट्यमंदिर येथे पोहोचल्यानंतर विं. दा. बालमंच, डॉ.शंकरराव खरात ग्रंथ दालन आणि लोकशाहीर पट्टे बापूराव कविता भिंतीचे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.

दिव्यांगाना ईव्हीएम यंत्रावर मतदानासाठी मार्गदर्शन

पुणे,दि.२४: निवडणूक प्रक्रिया सर्वसमावेशक करण्याच्या निवडणूक आयोगाच्या प्रयत्नांर्गत चिंचवड मतदारसंघ निवडणूक कार्यालयात आज दिव्यांगाना ईव्हीएम यंत्राची माहिती देण्यात आली व मार्गदर्शन करण्यात आले.

दिव्यांगांना सहजतेने मताधिकार बजावता यावा यासाठी निवडणूक यंत्रणेने उपलब्ध करून दिलेल्या सुविधा दिव्यांगाना आत्मनिर्भर करण्यासाठी महत्वाचे पाऊल आहे, अशी भावना यावेळी दिव्यांग बांधवांनी व्यक्त केली.

निवडणूक निर्णय अधिकारी सचिन ढोले यांच्या मार्गदर्शनाखाली आणि नायब तहसीलदार संतोष सोनवणे यांच्या नियंत्रणाखाली तज्‍‌ज्ञ प्रशिक्षक म्हणून औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे गटनिदेशक ज्योत सोनवणे, निदेशक शिवदास वाघमारे, सतीश गायकवाड, जीवन ढेकळे अरुण बांबळे, विष्णू साबळे, तानाजी कोकणे, राष्ट्रीय दृष्टिहीन संघाचे जनार्दन कोळसे, चिंचवड बधीर मूक विद्यालयाचे सामाजिक कार्यकर्ता गणेश टिळेकर, वाचा उच्चार तज्ज्ञ बालाजी गीते, वि. रा. रुईया मूक बधीर विद्यालयाचे वाचा उच्चार तज्ज्ञ शरद फड यांची नेमणूक या कामकाजासाठी करण्यात आली आहे.

निवडणुकीच्या दिव्यांग कक्षाचे समन्वय अधिकारी श्रीनिवास दांगट यांनी यासाठी विशेष प्रयत्न केले. अंध व्यक्तींसाठी ब्रेल लिपीतील मतपत्रिका आणि बॅलेट युनिटवर असलेली ब्रेल लिपी, अल्पदृष्टी असणा-या व्यक्तींसाठी मॅग्निफायिंग ग्लासची सुविधा, मूक बधीर व्यक्तींना वाचा उच्चार तज्ज्ञामार्फत दिलेली माहिती या सर्व बाबींमुळे इतर कोणाच्याही मदतीशिवाय आता स्वतः मताधिकार बजावता येणार असल्याचा आनंद आहे, अशी भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.

निवडणूक यंत्रणेने मतदान केंद्रावर दिव्यांगांसाठी विशेष स्वयंसेवक नेमले आहेत, व्हील चेअर व रॅम्पची व्यवस्था केली आहे. त्यामुळे या मतदार संघातील सर्व दिव्यांग मतदारांनी आपला मताधिकार बजावून लोकशाही अधिक बळकट करण्यासाठी आपला सहभाग नोंदवावा, असे आवाहन श्री. कोळसे यांनी केले.

दिव्यांग व्यक्तींसाठी भारत निवडणूक आयोगाने अॅप सुरु केले आहे, त्याचादेखील वापर करावा, असे आवाहन निवडणूक निर्णय अधिकारी श्री. ढोले यांनी केले आहे.
००००

छतांवरील सौरऊर्जा निर्मितीसाठी महावितरणला राष्ट्रीय पुरस्कार

0

मुंबई दि. २४ फेब्रुवारी २०२३ – घराच्या छतावर सौरऊर्जा निर्मिती पॅनेल्स बसवून वीजनिर्मिती करण्याच्या ‘रूफ टॉप सोलर’ योजनेतील उल्लेखनीय कामगिरीबद्दल महावितरणला इंडियन चेंबर ऑफ कॉमर्स या संस्थेने विजेता जाहीर केले असून नवी दिल्ली येथे आज (शुक्रवार दि. २४ फेब्रुवारी) पुरस्कार प्रदान करण्यात आला.

                माजी केंद्रीय ऊर्जा सचिव श्री अनिल राजदान व ईआरइडाएचे माजी अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक श्री के. एस.पोपली यांच्याहस्ते महावितरणचे अधीक्षक अभियंता श्री चंद्रमणी मिश्रा यांनी ‘रूफ टॉप सोलर योजनेतील उल्लेखनीय कामगिरीबद्दल महावितरणतर्फ़े पुरस्कार स्विकारला. महावितरणचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल यांनी या पुरस्कारासाठी महावितरणच्या अधिकारी आणि कर्मचा-यांचे अभिनंदन केले आहे. इंडियन चेंबर ऑफ कॉमर्स या कोलकतास्थित संस्थेची स्थापना १९२५ साली उद्योगपती जी. डी. बिर्ला यांच्या नेतृत्वाखाली झाली. देशातील अनेक प्रतिष्ठित व मोठे उद्योगसमूह चेंबरचे सदस्य आहेत. चेंबरने शुक्रवारी नवी दिल्ली येथे हरित ऊर्जेविषयी चर्चा करण्यासाठी आयोजित शिखर परिषदेत हरित ऊर्जा क्षेत्रातील देशभरातील मान्यवरांच्या उपस्थितीत विविध वर्गवारीतील पुरस्कार प्रदान करण्यात आले.

                घराच्या छतावर सौरऊर्जा निर्मिती पॅनेल्स बसवून निर्माण झालेली वीज स्वतः वापरायची आणि जास्त निर्मिती झाली तर महावितरणला विकायची अशी ‘रूफटॉप सोलर’, योजना आहे. या योजनेला महावितरणच्या ग्राहकांची पसंती मिळाली आहे. राज्यात दि. २२ फेब्रुवारी रोजी रूफ टॉप सोलर बसविणाऱ्या ग्राहकांची संख्या ७९,५६४ झाली होती व त्यांच्याकडून १३८७ मेगावॅट वीजनिर्मिती क्षमता गाठली गेली होती.

                राज्यामध्ये पाच वर्षांपूर्वी २०१६ -१७ या आर्थिक वर्षात घरगुती रूफ टॉपचे केवळ १,०७४ ग्राहक होते व २० मेगावॅट सौरऊर्जा निर्मिती क्षमता होती. गेल्या पाच वर्षांत त्यामध्ये मोठी वाढ झाली आहे व १,३८७ मेगावॅटची क्षमता गाठली गेली आहे. चालू आर्थिक वर्षात एप्रिल २०२२ नंतर आतापर्यंत ३५६ मेगावॅट सौर ऊर्जा निर्मिती क्षमतेची भर पडली आहे.

                सौरऊर्जा निर्मितीसाठी रूफ टॉप सोलर योजनेत ग्राहकांना केंद्र सरकारकडून मोठे अनुदान मिळते. सौरऊर्जेतून निर्माण होणाऱ्या वीजेमुळे ग्राहकाला नेहमीचा वीजपुरवठा कमी वापरावा लागतो व वीजबिलात कपात होते. ग्राहकाच्या सौर पॅनेलमधून त्याच्या वापरापेक्षा जास्त वीज निर्माण झाली तर ती महावितरणच्या ग्रीडमध्ये पाठवली जाते व कंपनी त्या विजेच्या मोबदल्यात वीजबिलात सवलत देते. सोलर पॅनेल बसविण्याचा खर्च चार ते पाच वर्षांत भरून निघतो पण त्यांचा उपयोग पंचवीस वर्षे होत राहतो. यामुळे ही योजना लोकप्रिय झाली आहे. या योजनेमुळे वीजबिलात बचत होण्यासोबत पर्यावरण रक्षणाला मदत होते.

                घरगुती ग्राहकांप्रमाणे औद्योगिक ग्राहकही रुफ टॉप सोलर पद्धतीने वीजनिर्मिती करत आहेत. सौर ऊर्जानिर्मितीसाठी पॅनेल बसवू इच्छिणाऱ्या ग्राहकांना महावितरणच्या www.mahadiscom.in/ismart या वेबसाईटवर जाऊन अर्ज करायचा असतो. पॅनेल बसविणाऱ्या एजन्सीसह सर्व बाबतीत महावितरणची मदत मिळते.

कॅन्सरच्या पेशी काढल्या, जबडा पुन्हा तयार केला कोथरूड हॉस्पिटलमध्ये कॅन्सर रुग्णाचे ४ तासात यशस्वी शस्त्रक्रिया

पत्रकार परिषदेत डॉ. राजेंद्र गुंडावर यांची माहिती

पुणे दि. २४ फेब्रुवारीः ‘कोथरूड हॉस्पिटल’ ने तोंडातील जबड्याच्या कॅन्सरच्या गुंतागुंतीच्या समस्येवर यशस्वीपणे शस्त्रक्रिया करून पुन्हा एकदा आपली उत्कृष्टता सिध्द केली आहे. प्रसिद्ध सर्जन डॉ. राजेंद्र गुंडावार यांनी येथे अशा प्रकारची गुंतागुतीची शस्त्रक्रिया यशस्वीपणे केली. बीड येथील अनिल प्रभाकर बहीर (वयः३९) यांच्या डाव्या जबड्यात कॅन्सर झाला होता. त्यामुळे त्यांना तोंड उघडताही येत नव्हते. ते बोलण्यास ही असमर्थ होते. त्यांच्यावर शस्त्रक्रिया करून नव जीवन दिले. अशी माहिती सुप्रसिद्ध सर्जन डॉ. राजेंद्र गुंडावार यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी हॉस्पिटलचे संचालक डॉ. राजेंद्र मिटकर, भूलतज्ञ डॉ.दिप्ती पोफाळे आणि रूग्ण अनिल बहीर उपस्थित होते.
रुग्णाचा आजार खूप वाढल्यावर नातेवाइकांनी त्यांना पुण्यातील कोथरूड हॉस्पिटलमध्ये आणले. आमच्या हॉस्पिटलमध्ये रूग्णाची तपासणी करून सर्व चाचण्या केल्या. त्यांच्या जबड्यामध्ये ‘कॉप्लेजिक्ट रिसेक्शन’ नावाचा कॅन्सरचे लक्षण दिसले. त्यानंतर ४ तासांची गुंतागुंताची शस्त्रक्रिया करून रुग्णाला वेदनांपासून मुक्त करण्यात आले. यशस्वी शस्त्रक्रियेनंतर रुग्ण आज बोलू लागले. सर्जन डॉ. राजेंद्र गुंडावर यांच्यासह डॉ. संभूस, डॉ. लिना दोभाड, डॉ. राजेंद्र मिटकर यांनी शस्त्रक्रियेत महत्त्वाची भूमिका बजावली.
डॉ. राजेंद्र गुंडावार म्हणाले,“एवढ्या तरूण युवकाच्या खालच्या व वरच्या जबड्यांची पहिल्यांदाच शस्त्रक्रिया केली. तोंडाच्या आतील डाव्या बाजूच्या जबड्यातीच्या कॅन्सरच्या जखमा बरा करण्यात यशस्वी झालो. ऑपरशेन सुरू केल्यानंतर पहिल्या टप्प्यात कॅन्सर रोगाने संक्रमित जबड्याचा भाग मोठ्या फरकाने बाहेर काढण्यात आला. यानंतर दुसर्‍या टप्प्यात मानेमध्ये पसरलेला कॅन्सरचा भाग कापला गेला. तिसर्‍या टप्प्यात वरच्या जबड्यातील पाठिमागचा संपूर्ण भाग बाहेर काढला. त्यानंतर उर्वरित जागा भरण्यासाठी छातीच्या आतिल काही भाग काढून तो जबड्यात बसविण्यात आला. म्हणजेच उर्वरित जागा त्या वस्तुमानाने भरली गेली. सतत ४ तास टीम ने या शस्त्रक्रियेत झुंज दिली आणि अखेर ३९ वर्षीय व्यक्तीला नवजीवन दिले. गरजेनुसार त्यांना काही दिवस किमोथेरपी दयावी लागेल.”
रूग्ण अनिल बहीर म्हणाले,“माझी परिस्थिती अत्यंत बिकट असतांनाही कोथरूड हॉस्पिटलने सामाजिक कर्तव्य म्हणून येथील तज्ञ डॉक्टरांनी माझ्यावर केलेल्या ऑपरेशनमुळे मला जीवनदान मिळाले आहे. कॅन्सरसारखा आजार माणसाला केवळ शारीरिकच नाही तर मानसिक आणि आर्थिकदृष्टयाही हादरवून सोडतो.”
डॉ. राजेंद्र मिटकर म्हणाले,“ रिक्शा चालक रूग्णाला बर्‍याच वर्षापासून तंबाखू व गुटखाच्या सेवनाची सवय होती. वाढत्या वयानुसार त्यांना तोंडाचा त्रास सुरू झाला. बीडमध्ये अनेक डॉक्टरांकडून चेकअप केल्यानंतर ते कोथरूड हॉस्पिटल मध्ये डॉ. राजेंद्र गुंडावार यांच्याकडे उपचारासाठी आले. या यशस्वी शस्त्रक्रियेचे संपूर्ण श्रेय कोथरूड हॉस्पिटलच्या टीमला जाते. हे रुग्ण आता पूर्णपणे बरे असून त्यांना कोथरूड हॉस्पिटल मधून डिस्चार्ज देण्यात आला आहे. हा रूग्ण आनंदीत होऊन घरी गेला.”

CM एकनाथ शिंदेंचा अजित पवारांना जोरदार टोला:म्हणाले – कृष्णेच्या काठावर प्रायश्चित्त घेण्याची वेळ आमच्यावर आली नाही

अजित पवार शिवसेनेचे नेते शोभतात

पुणे-एकनाथ शिंदे जे बोलतात ते करतात. निवडणूक आयोगाचा काय आणि एमपीएससी चा काय शेवटी रिझल्टला महत्व आहे. मी आणि देवेंद्र फडणवीसही रिझल्ट देण्याचे काम करीत आहोत. आम्ही असे काही बोलत नाही, चुकीचे बोलत नाही की, चुकीच्या ठिकाणी जात नाही त्यामुळे कृष्णेच्या काठावर प्रायश्चित्त घेण्याची वेळ आमच्यावर आली नाही, ना कधी येणार नाही. यशवंतराव चव्हाणांच्या समाधीवर डोके ठेवायला कोण गेले होते असे म्हणत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जोरदार टोला राष्ट्रवादी काॅंग्रेसचे नेते अजित पवार यांना लगावला.

कसबा – चिंचवड पोटनिवडणुकीच्या अनुशंगाने आयोजित प्रचारसभेत ते आज बोलत होते.एकनाथ शिंदे म्हणाले, अजित पवार शिवसेनेचे नेते शोभत आहेत. ते आम्हाला सहा महिन्याचा हिशोब विचारता, तुम्ही सत्ता उपभोगली साठ वर्षे पु्ण्यात काय केले ते सांगा. आता आम्ही सरकारमध्ये आहोत. चिंता करू नका. काहींनी ऑनलाईन सभा घेतली आम्हाला वाटले सत्ता गेल्यामुळे लाईनवर येतील पण कुणीतरी कळवले असेल इकडे येऊन उपयोग नाही. आपला आमदार काही निवडून येणार नाही. हेमंत रासणे निवडून येणार असल्याने प्रवासाचा त्रास आणि कष्ट त्यांनी टाळले आहेत.

एकनाथ शिंदे म्हणाले, शार्जिल उस्मानी पुणे येथे आला व आग ओकून गेला. काल पवारांच्या समोर काॅंग्रेसच्या उस्मानी हिरोदी यांनी मोदी, आरएसएस, भाजपला हरवण्यासाठी सौदीतून माणसे आणा आणि मतदान करून हरवा. मी म्हणतो मोदींना हरवणारे अजून कुणी नाहीत.

एकनाथ शिंदे म्हणाले, पीएम मोदींनी या देशाचे नाव, डंका जगभर वाजवला. पुणे ही पावनभूमी ते आपल्याला हरवण्याची भाषा करतात. भाजपने बेईमानी केली असे ते म्हणतात. ज्यांनी अडीच वर्षे भाजपला दगा दिला. राज्यात शिवसेना भाजप युतीचे सरकार म्हणून तुम्हाला हेच सांगतो की, आमचे धनुष्यबाण आणि नाव चोरले मी त्यांना सांगतो की, तुम्ही काॅंग्रेस, राष्ट्रवादीकडे धनुष्यबाण गहाण ठेवला होता. तो आम्ही सोडवला.

मतदारांनी कोणत्याही प्रलोभनाला बळी न पडता निर्भयतेने मतदान करावे-श्रीकांत देशपांडे

पुणे, दि. २४: लोकशाही प्रक्रीयेत योग्य उमेदवार निवडण्यासाठी मतदान करणे महत्वाचे असून मतदारांनी 26 फेब्रुवारी रोजी कोणत्याही प्रलोभनाला बळी न पडता निर्भयपणे मतदान करावे, असे आवाहन अपर मुख्य सचिव व मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे यांनी केले.

चिंचवड विधानसभा मतदारसंघ पोट निवडणुकीच्या अनुषंगाने सांगवी येथे आयोजित मतदार जनजागृती रॅलीच्या शुभारंभप्रसंगी ते बोलत होते. यावेळी निवडणूक निरीक्षक एस. सत्यनारायण, उपजिल्हाधिकारी अजय पवार, वर्शिप अर्थ फाऊंडेशनचे संस्थापक पराग मते, मुख्य कार्यकारी अधिकारी तेजस गुजराथी उपस्थित होते.

श्री.देशपांडे म्हणाले, लोकशाही प्रक्रियेत मतदारांचा सहभाग महत्वाचा आहे. लोकशाही प्रक्रीयेत प्रत्येक मताला महत्व आहे. योग्य उमेदवार निवडण्यासाठी सर्व मतदार सक्षम आहेत. विद्येचे माहेरघर असलेल्या पुण्यामध्ये मतदानाची टक्केवारी वाढवण्यासाठी जास्तीत जास्त मतदारांनी मतदान करण्यात आपला सहभाग द्यावा आणि मतदानाचा संदेश घरोघरी पोहोचवावा, असे आवाहन मुख्य निवडणूक अधिकारी श्री. देशपांडे यांनी केले.

रॅलीमध्ये युवांचा उस्फूर्त सहभाग

इंदिरा महाविद्यालय, ताथवडे संचेती महाविद्यालय,थेरगाव येथील विद्यार्थ्यांनी मतदार जागृती उपक्रमात सहभाग घेतला. ‘मतदार राजा जाग तू, शहाण्यासारखं वाग तू’, ‘माझे मत माझा अधिकार’, ‘आमिषाला बळी पडणार नाही, मतदानापासून वंचित राहणार नाही’, ‘मत द्यायला जायचे आहे,आपले कर्तव्य बजवायचे आहे’, अशा घोषणा देत विद्यार्थ्यांनी नागरिकांना मतदानासाठी आवाहन केले. यावेळी कलापथक व पथनाट्याच्या माध्यमातूनही निर्भयपणे मतदान करण्याचा संदेश देण्यात आला.

मुख्य निवडणूक अधिकारी श्री.देशपांडे यांनी परिसरातील नागरिकांशी संवाद साधून त्याना मतदान करण्याचे आवाहन केले. प्रशासनाने मतदारांसाठी मतदान केंद्रांवर आवश्यक सुविधा केली असून नागरिकांनी मतदान करून लोकशाही बळकट करावी, असे आवाहन त्यांनी केले. यावेळी मतदारसंघातील शनिमंदिर ते क्रांती चौकपर्यंत विविध गृह निर्माण संस्था व व्यापारी पेठेत भेट देऊन मतदार राजाला मतदानाचे आवाहन करण्यात आले. मतदारांना मतदार मार्गदर्शिकेचे वाटपही करण्यात आले.

माणूस घडविणारे संस्कार आणि शिक्षण गरजेचेज्येष्ठ शिक्षण तज्ञ डॉ.अ.ल.देशमुख : जनसज्जन सोशल फाउंडेशन तर्फे आदर्श समाज प्रबोधन पुरस्कार प्रदान

पुणे – आजचा समाज हा अधिकाधिक आत्मकेंद्री होत चालला आहे, यामध्ये नकारात्मक भावना दिवसेंदिवस वाढत आहे. अशावेळी प्रामाणिकपणे आणि सचोटीने काम करणाऱ्या छोट्या संस्थांमुळे समाज योग्य रीतीने चालू आहे. आज खऱ्या अर्थाने माणूस घडविणारे संस्कार आणि शिक्षण देण्याची गरज आहे, अशी भावना ज्येष्ठ शिक्षणतज्ञ डॉ.अ.ल.देशमुख यांनी व्यक्त केली.

जनसज्जन सोशल वेल्फेअर फाउंडेशन तर्फे सामाजिक क्षेत्रातील योगदानासाठी आदर्श समाज प्रबोधन पुरस्कार विशेष मुलांना शिक्षण देणाऱ्या श्री साई एज्युकेशन ट्रस्ट या संस्थेला पत्रकार भवन येथे झालेल्या कार्यक्रमात प्रदान करण्यात आला. कीर्तनकेसरी ह.भ.प. चंद्रकांत महाराज वांजळे, फाउंडेशनचे अध्यक्ष प्रविण राठी, प्रभाकर सेलूकर, प्रदीप मोहोळ, नंदकिशोर एकबोटे, सागर शेडगे, सोपान वांजळे, अमर मित्र मंडळाचे अनंत सुतार, चेंज इंडियाचे  सचिन धनकुडे, गायक संजय मरळ आदी यावेळी उपस्थित होते. सन्मानचिन्ह, सन्मानपत्र, ११ हजार रुपये असे पुरस्काराचे स्वरूप होते. पुरस्काराचे यंदा १३ वर्ष होते. 

डॉ.अ.ल. देशमुख म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराजांनी रायरेश्वर येथे केवळ नऊ मावळ्यांच्या साथीने स्वराज्याची शपथ घेतली. या मावळ्यांच्या सहकार्यानेच त्यांनी एवढे मोठे साम्राज्य निर्माण केले. त्यामुळे छोट्या संस्थांनी आपली सुरुवात छोटी होत आहे, असे समजून न्यूनगंड बाळगू नये. तर अशा छोट्या कामातूनच समाजामध्ये मोठे काम होत असते आणि यातूनच समाजाची वाटचाल योग्य रीतीने होत असते.

चंद्रकांत वांजळे म्हणाले, विशेष व्यक्तींकडे वेगळ्या प्रकारची ताकद असते. ते आपल्या बुद्धिमत्तेच्या जोरावर केवळ वैयक्तिक विकासच नव्हे तर समाजातही चांगले परिवर्तन घडवू शकतात, अशा व्यक्तींना आपण समाजात मुख्य प्रवाहात आणले पाहिजे. त्यांना विकासामध्ये आपल्याबरोबर घेणे हे आपले कर्तव्यच आहे.

सागर शेडगे म्हणाले, मनाचे डोळे उघडे ठेवून समाजाची सेवा आपण केली पाहिजे. अशा प्रकारचे शिक्षण आजच्या तरुण पिढीला देणे गरजेचे आहे. केवळ आपल्याच विकासाकडे लक्ष न देता आपणही काहीतरी समाजाचे देणे लागतो, हा संस्कार आपण समाजामध्ये खोलवर रुजवला पाहिजे.

भारत सरकार शिष्यवृत्तीमुळे विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक स्वप्नांना बळ

समाजातील सर्वसामान्य, दुर्बल, वंचित व तळागाळातील मागासवर्गीय घटकांचा विकास व्हावा, अनुसूचित जाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती समाजाची सर्वांगीण प्रगती व्हावी, यासाठी सामाजिक न्याय विभाग कार्यरत आहे. या विभागाच्या अनेक योजना मागासवर्गीय घटकांचा शैक्षणिक आणि आर्थिक विकास होण्याकरिता या घटकास समृध्द करण्यासाठी उपयोगी ठरत आहेत. त्यातीलच एक भारत सरकार शिष्यवृत्ती योजना. या योजनेमुळे विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक स्वप्नांना बळ मिळताना दिसत आहे.

अनुसूचित जाती व नवबौध्द घटकांतील विद्यार्थ्यांना मोफत उच्च शिक्षण देण्यासाठी राज्य शासनाच्या सामाजिक न्याय विभागाकडून भारत सरकार शिष्यवृत्ती योजना कार्यान्वित करण्यात आली आहे. या योजनेतून सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग व इतर मागास बहुजन कल्याण विभाग यांच्याकडून अनुसूचित जाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागास वर्ग व विशेष मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांना व महाविद्यालयांना महाडीबीटी प्रणालीव्दारे शिष्यवृत्तीचा लाभ देण्यात येतो.

याबाबत शासन स्तरावरुन भारत सरकार शिष्यवृत्ती, शिक्षण फी, परीक्षा फी, राजर्षि छत्रपत्ती शाहु महाराज गुणवत्ता शिष्यवृत्ती, व्यावसायिक प्रशिक्षण आणि व्यावसायिक अभ्यासक्रमात शिकणाऱ्या विद्यार्थ्यासाठी निर्वाह भत्ता या योजना ऑनलाईन पध्दतीने राबविण्यात येतात, असे सांगून सहाय्यक आयुक्त, समाजकल्याण कैलास आढे यांनी याबाबत अधिक माहिती दिली. ते म्हणाले, या योजनांमधून महाडीबीटी प्रणालीद्वारे ऑनलाईन पद्धतीने सन 2021-22 मध्ये अनुसूचित जातीच्या 14 हजार, 595 विद्यार्थ्यांना 45 कोटी 55 लाख रुपये रक्कम वितरीत करण्यात आली. तर विमुक्त जाती, भटक्या जमाती प्रवर्गातील 33 हजार 584 विद्यार्थ्यांना 89 कोटी, 93 लाख रूपये रक्कम वितरीत करण्यात आली. अशा तऱ्हेने सन 2021-22 या शैक्षणिक वर्षात सोलापूर जिल्ह्यातील अनुसूचित जाती, विमुक्त जाती,  भटक्या जमाती, इतर मागास प्रवर्ग व विशेष मागास प्रवर्गातील प्रतीवर्षी अंदाजे 50 हजार विद्यार्थ्यांना रक्कम रुपये 135 कोटी संबंधित विद्यार्थी व महाविद्यालयांच्या खात्यावर वितरीत करण्यात आली आहे.

याचा लाभ घेऊन अनेक विद्यार्थी आपल्या उज्ज्वल भविष्याची स्वप्ने पाहात आहेत. सोलापूरच्या ए.जी. पाटील इन्स्ट‍िट्युट ऑफ टेक्नॉलॉजी या महाविद्यालयामध्ये क्रांती रावसाहेब रामगुडे ही विद्यार्थिनी कॉम्प्युटर सायन्स इंजिनिअरींगच्या व्दितीय वर्षात शिकते. तिला शिष्यवृत्ती योजनेचा लाभ झाला असून, याबाबत तिने विभागाचे ऋणनिर्देश व्यक्त केले आहेत. क्रांती म्हणाली, ज्या मागासवर्गीय विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीचा लाभ झाला आहे, त्यांच्यासाठी हे खूप मोठे आर्थिक साहाय्य आहे. त्यामुळे अनेक मागासवर्गीय व अनुसूचित जाती-जमातीमधील विद्यार्थी आपले स्वप्न पूर्ण करु शकतात. या शिष्यवृत्तीमुळे माझ्याही जीवनात खूप बदल झाला असून त्यासाठी मी सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाची खूप आभारी आहे.

अनिकेत नागेशकुमार बोराडे हा डी. ए. व्ही. वेलणकर महाविद्यालयामध्ये एम. कॉमच्या दुसऱ्या वर्षात शिक्षण घेत आहे. तो म्हणाला, माझ्या शिक्षणात समाजकल्याण विभागाचा मोठा वाटा आहे, कारण मला मिळणाऱ्या शिष्यवृत्तीमुळे मी आज माझे शिक्षण पूर्ण करू शकत आहे. माझे भाऊही शिष्यवृत्ती मिळाल्यामुळे चांगले शिक्षण घेऊन शकले व आज चांगल्या पदावर काम करत आहेत. यात डॉ. बाबासाहेब आंबेडकर व समाज कल्याण विभागाचा खूप मोठा वाटा आहे.

एकविसाव्या शतकामध्ये यशस्वी होण्यास अनुसूचित जाती व नवबौध्द घटकातील विद्यार्थ्यांना आवश्यक असणारे कौशल्य व ज्ञान उपलब्ध व्हावे व त्यांची स्पर्धात्मक युगामध्ये जडणघडण व्हावी याकरिता देशातील उत्तमोत्तम शैक्षणिक संस्थांमध्ये प्रवेश मिळालेल्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती योजनेमुळे शैक्षणिक बळ मिळाले आहे. 

-संप्रदा बीडकर,

जिल्हा माहिती अधिकारी,

सोलापूर 

दहाव्या मानांकित हर्षिलचा संघर्षपूर्ण विजय८४ वी वरिष्ठ गट राष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धा

पुणे जिल्हा आणि महानगर बॅडमिंटन संघटना (पीडीएमबीए) यांच्या वतीने आयोजित डॉ. सायरस पूनावला आणि  वेंकीज यांच्या सहकार्याने व बॅडमिंटन असोसिएशन ऑफ  इंडिया व महाराष्ट्र बॅडमिंटन असोसिएशन यांच्या मान्यतेने स्पर्धा
पुणे – महाराष्ट्राच्या दहाव्या मानांकित हर्षिल दाणी, आर्य भिवपाठकी यांनी राष्ट्रीय अजिंक्यपद बॅडमिंटन स्पर्धेत आपल्या मोहिमेस थाटात सुरुवात केली. आर्यचा विजय एकतर्फी राहिला. हर्षिलला मात्र विजयासाठी तीन गेमपर्यंत झुंजावे लागले. 
पुणे जिल्हा आणि महानगर बॅडमिंटन संघटना (पीडीएमबीए) यांच्या वतीने आयोजित डॉ. सायरस पूनावला आणि  वेंकीज यांच्या सहकार्याने व बॅडमिंटन असोसिएशन ऑफ इंडिया व महाराष्ट्र बॅडमिंटन असोसिएशन यांच्या मान्यतेने  योनेक्स सनराईज  ८४ वी वरिष्ठ गट राष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धा म्हाळुंगे बालेवाडी येथील श्री शिवछत्रपती क्रीडा संकुलात सुरू आहे. स्पर्धेत शुक्रवारी वैयक्तिक लढतींना सुरुवात झाली. स्पर्धेत अस्मिता चलिहाने महिला एकेरीतून पहिल्या फेरीत सहज विजय मिळविला. पुरुष एकेरीत अनुभवी बी. साईप्रणितनेही आपल्या मोहिमेस यशस्वी सुरुवात केली. 
दहाव्या मानांकित महाराष्ट्राच्या हर्षिल दाणीला पहिला अडथळा पार करण्यासाठी ५८ मिनिटे झुंजावे लागले. किरणकुमारने त्याला जबरदस्त प्रतिकार केला. किरणने पहिलाच गेम २१-१६ असा जिंकून सनसनाटी सुरुवात केली. पण, त्यानंतर हर्षिलने आपल्या फटक्यांवर आणि वेगावर नियंत्रण ठेवत खेळ केला. दुसऱ्या गेमलाही किरणने सुरुवातीपासून आघाडी गेत गेमच्या मध्याला ११-७ अशी आघाडी घेतली होती. त्यानंतर हर्षिलने सलग तीन गुण घेत पिछाडी ११-१० अशी भरुन काढली. १३-१३ अशा बरोबरीनंतर हर्षिलने सलग पाच गुण घेत १८-१३ अशी आघाडी मिळवली आणि त्यानंतर मागे वळून बघितले नाही. तिसऱ्या गेमला मात्र हर्षिलच्या आक्रमकतेला किरण उत्तर देऊ शकला नाही. निर्णायक गेमला हर्षिलने ८-४ अशी आघाडी मिळविली. मात्र, किरणने कडवा प्रतिकार करत ९-९ अशी बरोबरी साधली. या बरोबरीनंतर मात्र हर्षिलने सलग ७ गुण घेत १६-८ अशी मोठी आघाडी घेतली आणि ती टिकवून ठेवत विजयावर शिक्कामोर्तब केले. पुरुषांच्या अन्य एका लढती महाराष्ट्राच्या आर्य भिवपाठकीने रिकू खापेचा २४-२२, २१-११ असा पराभव केला. 
महिला एकेरीत  अस्मिता चलिहाने आपली लय कायम राखत गौरीकृष्णाचे आव्हान २१-९, २१-१२ असे सहज मोडून काढले. या गटातील एका चुरशीच्या लढतीत प्रेरणा आलवेकरने पिंकी कर्कीचा प्रतिकार २१-६, २०-२२, २१-१४ असा मोडून काढला.
निकाल –
महिला एकेरी – (पहिली फेरी)

इश्रानी बरुआ वि.वि. करिष्णा खर्डीकर २१-११, २१-९, सूर्या करिष्मा तामिरी वि.वि. याजुम ला २१-८, २१-११, सी. सुजाता वि.वि. अनिषा राय २१-१०, २१-१५, स्मित तोष्णिवाल वि.वि. आदर्षिनी श्री एन. बी. २३-२१, १३-२१, २१-१०, आदिती भट वि. वि. जान्हवी महाले २१-११, २१-१०, अस्मिता चलिहा वि.वि. गौरीकृष्णा टी आर. २१-९, २१-१२, विजेता हरिष वि.वलि. आत्मजयिता राय बर्मन २१-९, २१-९, प्रशंसा बोनम वि.वि. नमिता पठानिया १९-२१, २२-२०, १४-२१, उन्नती बिश्त वि.वि. स्वागतिका राऊत २१-४, ३१-६, तानी चंद्रा वि. वि. रशिका दास २१-८, २१-१०, शेखोटोलू पुरो वि.वि. तेजस्विनी ठाकूर  २१-१३, २१-१०, तनिशा सिंग वि.वि. प्रभावती एस, २१-६, २१-२,  लिखिता श्रीवास्तव वि.वि. याशिका २१-१६, २१-१२, धरित्री यातीश वि.वि. रुचा सावंत २१-१३, १७-२१, २१-९, नेहा पंडित वि.वि. सुनंदिता बिस्ता २१-५, २१-६, रितुपर्ण दास वि.वि. लार्लेम्पुई २१-०, २१-७, प्रेरणा आलवेकर वि.वि. पिंकी कर्की २१-६, २०-२२, २१-१४.

पुरुष – किरण जॉर्ज वि.वि. संकर मुथुस्वामी एस २१-१२, २१-१३, झुचोपेमो ओडुयो वि.वि. बळवंत २१-१४, २१-१२, प्रथमेश कुलकर्णी वि.वि. केविन वोंग वि.वि. भास्कर चक्रवर्ती २१-२, २१-१, अभिषेक येलिगर वि.वि. अंकित मोंडल १४-२१, २१-१४, २१-१२, डी सरथ वि.वि. लाहरुएटलुआंगा जोसेफ २१-१०, २१-१४, श्रेयस जैस्वाल वि.वि. विद्यासागर सालम २१-१७, २१-१७, वकुल शर्मा वि.वि. आयन रशिद २२-२०, २१-१०, शंतनु शर्मा वि.वि. के. गोविंद १६-२१, २१-१६, २१-१०, शुभम गुसेन वि. वि. रितुराज नाग २१-१४, २१-१८, पियांशु राजावत वि.वि. करण चौधरी २२-२०, २१-१५, यशवर्धन वि.वलि. बिशालक्षा पोद्देर २१-८, २१-१७, वैभव जाधव वि.वि. ध्रुव बन्सल २१-७, २१-१९, आर्यभिवपाठकी वि.वि. रिकु खापे २४-२२, २१-११, हर्षिल दाणी वि.वि. किरण कुमार १६-२१, २१-१७, २१-१२, साईप्रणित बी वि.वि. पृथ्वी रॉय २१-१३, २१-१९——————————————-
स्पर्धेचे औपचारिक उद्धाटन
पुणे जिल्हा आणि महानगर बॅडमिंटन संघटना (पीडीएमबीए) यांच्या वतीने आयोजित डॉ. सायरस पूनावाला आणि  वेंकीज यांच्या सहकार्याने व बॅडमिंटन असोसिएशन ऑफ इंडिया व महाराष्ट्र बॅडमिंटन असोसिएशन यांच्या मान्यतेने श्री शिवछत्रपती क्रीडा संकुल येथे सुरु असलेल्या योनेक्स सनराईज  ८४ व्या  वरिष्ठ गटाच्या राष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धेचे शुक्रवारी प्रकाश पदुकोण यांच्या हस्ते औपचारिक उदघाटन झाले. यावेळी एस. मुरलीधरन, ओमर राशीद, जसविंदर नारंग, मंगेश काशीकर, वैभव डांगे, पुणे जिल्हा आणि शहर बॅडमिंटन संघटनेचे रणजित नातू, अण्णा नातू, श्रीकांत वाड आदी मान्यवर उपस्थित होते.  पोलीस बँडने पदुकोण यांना मानवंदना दिली व नंतर पोलीस बँडच्या तालावर सर्व खेळाडूंचे संचलन झाले.

थॉमस कप बॅडमिंटन स्पर्धेच्या ७४ वर्षांच्या काळात महाराष्ट्रातले जे पुरुष खेळाडू थॉमस कपसाठी खेळले त्या खेळाडूंचा सन्मान प्रकाश पदुकोण यांच्या हस्ते झाला. खेळाडूंना ताम्रपत्र, पुणेरी पगडी देऊन गौरविण्यात आले.  आसिफ पापरिया, इक्बाल मैदर्गी. लेरॉय डीसा, संजय शर्मा, रवी कुंटे, विजय लेन्सी,अक्षय देवलकर, जिष्णू सन्याल, निखिल कानेटकर, उदय पवार, आनंद पवार, चिराग शेट्टी, या खेळाडूंचा सन्मान करण्यात आला. दत्ता धोंगडे, दिपांकर भट्टाचार्य यांचा देखील यावेळी विशेष सन्मान करण्यात आला. 

राज्यात ‘वीर सावरकर पर्यटन सर्कीट’ सुरु करणार – पर्यटनमंत्री मंगलप्रभात लोढा

0

   मुंबई, दि. २४ : स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांचे विचार,जीवनकार्य जागतिक स्तरावर पोहोचवण्यासाठी देशातील पहिले ‘वीर सावरकर पर्यटन सर्कीट’ राज्यात सुरु करण्यात येणार आहे. तसेच, नाशिक येथील भगूर या स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या जन्मस्थानी भव्य सावरकर थीम पार्क आणि संग्रहालयदेखील उभारण्यात येणार आहे. २६ फेब्रुवारी रोजी स्वा.सावरकर आत्मार्पण दिनानिमित्त भगूर येथे भव्य अभिवादन पदयात्रा व कार्यक्रमात सावरकरप्रेमी नागरिक, कार्यकर्ते, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित राहणार असल्याची माहिती पर्यटन मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी मंत्रालय विधीमंडळ वार्ताहर कक्षात आयोजित पत्रकार परिषदेत दिली.

भगूरमधील ‘सावरकर वाडा’ येथे पर्यटन विभागामार्फत आयोजित मुख्य कार्यक्रमात पर्यटन, कौशल्य विकास व उद्योजकता, महिला व बालविकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्यासह नाशिकचे खासदार हेमंत गोडसे, आमदार सरोज अहिरे यांच्यासह विविध सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक संस्था-संघटनांचे प्रमुख पदाधिकारी, कार्यकर्ते, विद्यार्थी उपस्थित राहणार आहेत.  ‘स्वा. सावरकर आत्मार्पण दिनानिमित्त दि. २६ फेब्रुवारी रोजी सकाळी ८ वाजता भगूरमधील नूतन विद्यालय ते सावरकर वाडा अशी भव्य अभिवादन पदयात्रा काढण्यात येणार आहे. सकाळी ९ ते १०:३० दरम्यान सावरकर वाडा येथील मुख्य कार्यक्रमात गायक चारुदत्त दीक्षित व सहकलाकारांचे स्वा. सावरकर लिखित गीतांचे गायन, योगेश सोमण लिखित-दिग्दर्शित अभिवाचन, मान्यवरांचे सत्कार आदी कार्यक्रम होणार आहेत.

वीर सावरकर पर्यटन सर्कीट

देशातील पहिल्या ‘वीर सावरकर पर्यटन सर्किट’मध्ये सावकर यांच्या पदस्पर्शाने पावन झालेली नाशिक, रत्नागिरी, पुणे आणि सांगली येथील ठिकाणे आहेत. यामध्ये सावरकरांचे जन्मस्थान भगूर वाडा आणि अष्टभुजा देवी मंदिर, नाशिक येथील अभिनव भारत मंदिर, तीळभांडेश्वर गल्ली, डेक्कन येथील सावरकर अध्यासन केंद्र, पहिली विदेशी कपड्यांची होळी, रत्नागिरी येथील पतितपावन मंदिर, शिरगाव रत्नागिरी येथे सावरकर काही काळ वास्तव्यास होते ती खोली तसेच डॉ. हेडगेवार आणि सावरकर यांची पहिली भेट झाली ते ठिकाण, गुरव समाजाचे मारूती मंदिर,  रत्नागिरी येथील विठ्ठल मंदिर, सावरकारांनी सुरू केलेली कन्या शाळा,  दादर येथील सावरकर सदन आणि सावरकर स्मारक,सांगली येथील बाबाराव सावरकर स्मारक या ठिकाणांचा समावेश आहे.

थीम पार्क

भगूर येथे निर्माणधीन ‘थीम पार्क’ महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाकडे हस्तांतरित करून स्वा. सावरकरांच्या विचार-दर्शनावर आधारित भव्य थीम पार्क व संग्रहालयाची उभारणी करण्यात येणार आहे.  राष्ट्रासाठी असीम त्याग व समर्पण करणाऱ्या स्वातंत्र्यवीर सावरकरांना, त्यांच्या विचार व कार्याला या भव्य पदयात्रा व कार्यक्रमाच्या निमित्ताने मानवंदना देण्यात येणार आहे. त्यामुळे भगूर, नाशिक शहर, जिल्ह्यासह विविध ठिकाणांहून अधिकाधिक सावरकरभक्त नागरिकांनी यावेळी उपस्थित राहावे, असे आवाहन महाराष्ट्र राज्य पर्यटन विभाग तसेच अन्य सहयोगी संस्था-संघटनांच्यावतीने करण्यात आले आहे.

उपमुख्यमंत्र्यांच्या भेटीने वृद्ध कष्टकऱ्यांच्या चेहऱ्यावर फुलले हास्य

0

मुंबई, दि. २४ : “साहेब, मुंबईचा समुद्र बघितला उंच इमारती, हॉटेल बघितली… झगमगाट बघितला… आनंद वाटला. पण सगळ्यांत जास्त समाधान वाटले ते तुम्हाला भेटून…’’ हे उत्स्फूर्त शब्द आहेत घाटंजी येथील वृद्ध कष्टकऱ्यांचे.

सह्याद्री राज्य अतिथीगृह येथे यवतमाळ जिल्ह्यातील घाटंजी येथील कष्टकरी महिला आणि पुरुषांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. घाटंजी येथील रसिकाश्रय संस्थेच्या माध्यमातून वृद्ध कष्टकरी महिला आणि पुरुषांना मुंबईची सफर घडविण्यात आली.

उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी यावेळी सर्व वृद्ध कष्टकऱ्यांशी आत्मीयतेने संवाद साधून त्यांच्या अडीअडचणी जाणून घेतल्या. या भेटीमुळे वृद्ध कष्टकऱ्यांच्या चेहऱ्यावर समाधानाचे हास्य फुलले

वृद्ध कष्टकऱ्यांशी संवाद साधताना उपमुख्यमंत्री म्हणाले, ‘देशाच्या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त राज्यातील ७५ वर्षांवरील नागरिकांना ‘एसटी’च्या सर्व प्रकारच्या बसमधून मोफत प्रवासाचा लाभ देण्यात येत आहे. या योजनेचा लाभ अनेक ज्येष्ठ नागरिक घेत आहेत. वृद्ध, निराधार आणि कष्टकऱ्यांना विविध योजनांच्या माध्यमातून दिलासा देण्यात येत असल्याचे उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी सांगितले. कष्टकरी आणि वृद्धांना मुंबईची सफर घडवून त्यांच्या जीवनात हास्य फुलविण्याचा रसिकाश्रय संस्थेचा उपक्रम स्तुत्य आहे.

जीवाची मुंबई – गरीब वृद्ध कष्टकऱ्यांची सहल

ज्यांची मुले सक्षम आहेत, त्या वृद्धांनाही अनेकदा कुणी तीर्थयात्रेला नेत नाहीत. स्वत:च्या चकचकीत आयुष्यात अनेक तरुणांना जन्मदातेही नकोसे होतात. मग ज्या वयोवृद्धांना कुणीच नाही, त्यांच्या आनंदाचा कोण विचार करेल? या जाणीवेतून कष्टकरी वृद्धांच्या सहलीचा उपक्रम घेण्यात आल्याचे रसिकाश्रय संस्थेचे महेश पवार यांनी सांगितले.