पुणे – आजचा समाज हा अधिकाधिक आत्मकेंद्री होत चालला आहे, यामध्ये नकारात्मक भावना दिवसेंदिवस वाढत आहे. अशावेळी प्रामाणिकपणे आणि सचोटीने काम करणाऱ्या छोट्या संस्थांमुळे समाज योग्य रीतीने चालू आहे. आज खऱ्या अर्थाने माणूस घडविणारे संस्कार आणि शिक्षण देण्याची गरज आहे, अशी भावना ज्येष्ठ शिक्षणतज्ञ डॉ.अ.ल.देशमुख यांनी व्यक्त केली.
जनसज्जन सोशल वेल्फेअर फाउंडेशन तर्फे सामाजिक क्षेत्रातील योगदानासाठी आदर्श समाज प्रबोधन पुरस्कार विशेष मुलांना शिक्षण देणाऱ्या श्री साई एज्युकेशन ट्रस्ट या संस्थेला पत्रकार भवन येथे झालेल्या कार्यक्रमात प्रदान करण्यात आला. कीर्तनकेसरी ह.भ.प. चंद्रकांत महाराज वांजळे, फाउंडेशनचे अध्यक्ष प्रविण राठी, प्रभाकर सेलूकर, प्रदीप मोहोळ, नंदकिशोर एकबोटे, सागर शेडगे, सोपान वांजळे, अमर मित्र मंडळाचे अनंत सुतार, चेंज इंडियाचे सचिन धनकुडे, गायक संजय मरळ आदी यावेळी उपस्थित होते. सन्मानचिन्ह, सन्मानपत्र, ११ हजार रुपये असे पुरस्काराचे स्वरूप होते. पुरस्काराचे यंदा १३ वर्ष होते.
डॉ.अ.ल. देशमुख म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराजांनी रायरेश्वर येथे केवळ नऊ मावळ्यांच्या साथीने स्वराज्याची शपथ घेतली. या मावळ्यांच्या सहकार्यानेच त्यांनी एवढे मोठे साम्राज्य निर्माण केले. त्यामुळे छोट्या संस्थांनी आपली सुरुवात छोटी होत आहे, असे समजून न्यूनगंड बाळगू नये. तर अशा छोट्या कामातूनच समाजामध्ये मोठे काम होत असते आणि यातूनच समाजाची वाटचाल योग्य रीतीने होत असते.
चंद्रकांत वांजळे म्हणाले, विशेष व्यक्तींकडे वेगळ्या प्रकारची ताकद असते. ते आपल्या बुद्धिमत्तेच्या जोरावर केवळ वैयक्तिक विकासच नव्हे तर समाजातही चांगले परिवर्तन घडवू शकतात, अशा व्यक्तींना आपण समाजात मुख्य प्रवाहात आणले पाहिजे. त्यांना विकासामध्ये आपल्याबरोबर घेणे हे आपले कर्तव्यच आहे.
सागर शेडगे म्हणाले, मनाचे डोळे उघडे ठेवून समाजाची सेवा आपण केली पाहिजे. अशा प्रकारचे शिक्षण आजच्या तरुण पिढीला देणे गरजेचे आहे. केवळ आपल्याच विकासाकडे लक्ष न देता आपणही काहीतरी समाजाचे देणे लागतो, हा संस्कार आपण समाजामध्ये खोलवर रुजवला पाहिजे.