Home Blog Page 1392

विश्वकरंडक भारताने जिंकावा यासाठी ग्रामदैवत श्री कसबा गणपतीला साकडे

पुणे -एकदिवसीय क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत न्यूझीलंडचा पराभव करून भारताने अंतिम फेरीत धडक मारली असून रविवारी( दि.१९)होणाऱ्या अंतिम सामन्यात विजयी होऊन विश्वकरंडकावर भारतानेच नाव कोरावे यासाठी शनिवारी ग्रामदैवत श्री कसबा गणपतीला साकडे घालण्यात आले
पुणे शहर काँग्रेसचे सरचिटणीस अमित बागुल व मित्रपरिवारातर्फे ग्रामदैवत श्री कसबा गणपतीची महाआरती करून भारताने विश्वचषक जिंकावा अशी मनोभावे प्रार्थना करण्यात आली.यावेळी संयोजक अमित बागुल, नंदकुमार बानगुडे,महेश ढवळे,अभिषेक बागुल, इम्तियाज तांबोळी,सुनील भोसले, सुरेश कांबळे, चेतन अगरवाल, राजु नाणेकर, सुरेश गायकवाड, समीर शिंदे, क्रिकेट कोच मारवाडी, बाबालाल पोळके, राकेश नामेकर, राहुल तौर, जयकुमार ठोंबरे, विश्वास दिघे, गोरख मरळ आदी उपस्थित होते.यावेळी मंदिराबाहेर जल्लोष करून भारतीय क्रिकेट संघाला शुभेच्छाही देण्यात आल्या.यावेळी अमित बागुल म्हणाले की, यंदा क्रिकेट विश्वचषक २०२३ मध्ये भारतीय क्रिकेट संघाने सर्व सामने जिंकून आपले वर्चस्व कायम ठेवले आहे. उत्कृष्ट कामगिरी करत १०पैकी १०सामन्यांमध्ये भारतीय क्रिकेट संघ अपराजित राहिला आहे.त्यामुळे यंदाच्या विश्वकरंडकावर भारताचे नाव कोरले जाईल असा आशावाद संपूर्ण देशात आहे.त्यासाठी स्थानिक क्रिकेट खेळाडूंसमवेत ग्रामदैवत श्री कसबा गणपतीच्या चरणी प्रार्थना करण्यात आली.

पुणे-नगर रोडवरील जड वाहतुक पर्यायी मार्गाने वळविण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

पुणे : खराडी-चंदननगर येथील महालक्ष्मी लॉन्स पुणे नगर रोड या ठिकाणी सकल मराठा समाजाच्या सभेच्या निमित्ताने २० नोव्हेंबर रोजी सकाळी ६ ते रात्री १२ वाजेपर्यंत वाहतुक कोंडी टाळण्याच्यादृष्टीने जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख यांनी पुणे-अहमदनगर रोडवरील जड-अवजड वाहतूक पर्यायी मार्गाने वळविण्याचे आदेश दिले आहेत.

अहमदनगर बाजूकडून पुणे शहराकडे येणारी जड-अवजड वाहने शिक्रापूर येथून चाकण, भोसरीमार्गे पुणे- मुंबईकडे जातील. सदर आदेश अत्यावश्यक सेवेतील वाहने, उदा. पोलीस, रुग्णवाहिका, अग्निशमन वाहन, पेट्रोल- डिझेल टँकर्स, पीएमपीएमएल बसेस, स्कुल बस यांना लागू राहणार नाही.

…तर शासनाला गावकारभाऱ्यांच्या रोषाला सामोरे जावे लागेल-सरपंच परिषदेच्या राज्यस्तरीय बैठकीत इशारा

गावखेड्याच्या अपेक्षा पूर्ण करण्याची मागणी
पुणे : गावगाड्याचा कारभार चालवणाऱ्या सरपंच, ग्रामसेवक, संगणक परिचालक या प्रमुख घटकांच्या अपेक्षा पूर्ण कराव्यात. शासनदरबारी वारंवार मागण्या करूनही गावखेड्यांना सावत्रपणाची वागणूक दिली जात आहे. आमच्या मागण्यांचा सकारात्मक विचार झाला नाही, तर राज्य शासनाला गावकरभाऱ्यांच्या रोषाला सामोरे जावे लागेल, असा इशारा गावखेड्यांच्या अपेक्षा मोर्चाच्या सहविचार व पूर्वतयारीच्या राज्यस्तरीय बैठकीतून देण्यात आला.
अखिल भारतीय सरपंच परिषदेच्या पुढाकाराने पुण्यातील पाषाण रोड भागातील सीपीआर इन्स्टिट्युटच्या सभागृहात सरपंच, ग्रामसेवक, संगणक परिचालक, ग्राम रोजगार सेवक आणि ग्रामपंचायत कर्मचारी या सर्व राज्यस्तरीय संघटनांची संयुक्त बैठक आयोजित करण्यात आली होती. अखिल भारतीय सरपंच परिषदेचे संस्थापक प्रदेशाध्यक्ष जयंतराव पाटील यांच्या संकल्पनेतून राज्यभरातील ग्रामपंचायतींना आणि ग्रामविकासाचा गाडा चालवणाऱ्या प्रमुख घटकांना एकत्र करून लढा उभारण्यासाठी ही विचारविनिमयाची बैठक होती. या बैठकीत ग्रामपंचायत चालवणाऱ्या सर्व घटकांच्या संघटनांची एकत्रित मोट बांधण्याचा व यापुढे सर्वांच्या प्रलंबित मागाण्यांसाठी समान कृती कार्यक्रम तयार करून एकत्रित लढा उभारण्याचे धोरण जाहीर करण्यात आले.

सरपंच परिषदेचे जयंतराव पाटील, ग्रामसेवक संघटनेचे प्रदेशाध्यक्ष संजीव निकम, संगणक परिचालक संघटनेचे प्रदेशाध्यक्ष सिद्धेश्वर मुंडे, ग्राम रोजगार संघटनेचे प्रदेशाध्यक्ष विनोद चव्हाण, सरपंच परिषदेचे प्रदेश सरचिटणीस विवेक ठाकरे, कोअर कमिटीचे पुरुजीत चौधरी, प्रदेश उपाध्यक्ष शशिकांत मोरे, महिला उपाध्यक्षा रेखा विद्याधर टापरे, प्रदेश सल्लागार प्रा. राजेंद्र कराडे आदी प्रमुख उपस्थित होते. प्रदीप माने यांनी बैठकीचे प्रास्ताविक केले. जळगाव जिल्हाध्यक्ष वासुदेव नरवाडे यांनी आभार मानले.

जयंतराव पाटील म्हणाले, “गावखेड्यांना देण्यात येणारी सावत्र वागणूक थांबवावी, सरपंचांना जाहीर केलेले मानधन नियमित अदा करावे, अनियमिततेच्या नावाखाली ग्रामसेवकांना नाहक फौजदारी कचाट्यात अडकवण्याचे प्रकार थांबवावेत, संगणक परिचालकांना कर्मचारी दर्जा द्यावा, त्यांना खाजगी कंपनीच्या मार्फत नेमून दरसाल कोट्यावधी रुपये वाचवावेत, ग्राम रोजगार सेवकांना दुर्लक्षित करू नये, ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना राहणीमान भत्ता लागू करावा, अशा आमच्या मागण्या आहेत. यावर शासनाने त्वरित निर्णय घ्यावा व आम्हाला न्याय द्यावा.”

“ग्रामपंचायत कारभारात भूमिका असणाऱ्या सर्व प्रमुख घटकांना एकत्र करत शासनाकडे वर्षानुवर्षे प्रलंबित मागण्यांकडे मुद्दाम दुर्लक्ष होत असल्याने येत्या पंधरवाड्यात राज्य शासनाच्या ग्रामविकास विभागाकडे पुन्हा मागणी करण्यात येणार आहे. याबाबत शासनाने तात्काळ धोरण न ठरवल्यास डिसेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात राज्यभरातील ग्रामपंचायती काम बंद आंदोलन उभारतील, असा निर्धार सर्वानुमते करण्यात आला आहे. शासनाचे लक्ष वेधण्यासाठी येत्या काळात सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, ग्रामसेवक, ग्राम रोजगार सेवक, संगणक परिचालक व ग्रामपंचायत कर्मचारी यांच्या सर्वांचा सुमारे तीन लाखाचा मोर्चा मुंबई मंत्रालयावर काढण्याचे ठरले आहे,” असेही पाटील यांनी नमूद केले.

आम्ही कुणाची घरे जाळली? त्यांनी घरे जाळली तेव्हा तुम्ही शांत होते..संभाजी राजेंना भुजबळांचा प्रतिसवाल

इगतपुरी-आम्ही कुणाची घरे जाळली? असा सवाल मंत्री छगन भुजबळ यांनी संभाजीराजेंना केला. आम्ही कुणाची घरे जाळली? त्यांनी घरे जाळली तेव्हा तुम्ही शांत होते. तुम्ही स्वतः बीडला जाऊन पीडितांची भेट घेण्याची गरज होती. पण तुम्ही त्यांचे अश्रू पुसले नाही. हे तुमचे काम नव्हते का? महाराज, मला मंत्रीपद किंवा आमदार पदाची पर्वा नाही. मी गोरगरीबांसाठी लढणारा आहे. पण, तुम्ही छत्रपती शाहूंच्या गादीवर बसलात, त्यामुळे तुम्ही सगळ्यांना न्याय द्या. कुणावरही अन्याय होणार नाही याची काळजी घ्या, असेहि भुजबळ म्हणाले.छगन भुजबळ यांची शनिवारी नाशिकच्या इगतपुरी तालुक्यात सभा झाली. यावेळी त्यांनी मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण देण्यास ठाम विरोध केला. मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण देण्याची भूमिका त्यांनी मांडली. यावेळी त्यांनी आपली मंत्रिमंडळातून हकालपट्टी करण्याची मागणी करणाऱ्या संभाजीराजे छत्रपती यांचा चांगलाच समाचार घेतला.

यावेळी त्यांनी संभाजीराजे छत्रपती यांच्यावर एका विशिष्ट जातीची बाजू घेण्याचाही आरोप केला. संभाजीराजे यांनी या वादात पडण्याची गरज नव्हती. ते केवळ एका समाजाची बाजू घेऊन कसे काय बोलतात? असे ते म्हणालेत.संभाजीराजेंनी काल माझ्यावर 2 समाजांत वितुष्ट निर्माण करण्याचा आरोप केला. त्यांनी माझी मंत्रिमंडळातून हकालपट्टी करण्याची मागणी केली. आम्ही त्यांचा आदर करतो. कारण, आमच्या हृदयात असणाऱ्या छत्रपती शाहू महाराजांनी मागासवर्गीयांच्या उत्थानाचे काम केले. संभाजीराजे त्यांच्या गादीवर बसलेत. ते एका समाजाचे नाहीत. ते राज्याती सर्व समाजाचे आहेत. पण त्यानंतरही ते एका समाजाची बाजू घेऊन कसे काय बोलतात?

एकतर संभाजीराजे यांनी या वादात पडण्याची गरजच नव्हती आणि पडले तर त्यांनी सर्वांचे अधिकार शाबूत ठेवा, कुणावरही अन्याय करू नका अशी भूमिका घेण्याची गरज होती. आम्हाला त्यांच्याकडून हीच अपेक्षा होती, असे छगन भुजबळ म्हणाले.

छगन भुजबळ यांनी यावेळी वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांच्यावरही निशाणा साधला. प्रकाश आंबेडकरांनी आम्हाला सहकार्य केले पाहिजे. आम्ही कुठे चुकलो हे त्यांनी सांगावे. राज्यात काय चालले आहे ते पाहा. आम्हाला त्यांच्याकडून दूर ढकलण्याची नव्हे तर सहकार्याची अपेक्षा आहे. या राज्यातील समजदार लोकांनी आमचे म्हणणे ऐकूण घ्यावे, आमचा आक्रोश समजून घ्यावा, असे ते म्हणाले.आम्ही कुणाच्याही आरक्षणाला विरोध करत नाही. पण तुम्ही सर्वच हिरावून घेत आहात. मोदी साहेबांनी (भाजप) 10 टक्के दिले त्यातही 85 टक्के तुम्हीच. कुणबी प्रमाणपत्र घेऊनही तुम्हीच. मग बाकीच्यांनी जायचे कुठे? असा सवालही छगन भुजबळ यांनी यावेळी आपली भूमिका स्पष्ट करताना उपस्थित केला

व्हिडीओ कॉल घेताना सावधान:निवृत्त लष्करी कर्मचाऱ्याला अश्लील व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत पावणेचार लाख रुपये उकळले

पुणे-लष्करातून निवृत्त झालेल्या एका 64 वर्षीय कर्मचाऱ्यांला अज्ञातांनी अश्लील व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत3 लाख 74 हजार 232 रुपये ट्रान्स्फर करायला लावून फसवणूक केल्याची तक्रार लोणीकंद पोलीस ठाण्यात दाखल झाल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.याप्रकरणी लष्करातून निवृत्त झालेल्या 64 वर्षीय व्यक्तीने फिर्याद दिली आहे. त्यानुसार फोन वरून बोलणाऱ्या राहुल शर्मा आणि अज्ञात मोबाईलधारकाविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना 11 ते 17 ऑगस्ट 2023 दरम्यान ऑनलाईन घडली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे लष्करातून निवृत्त झाले असून ते पुण्यातील वाघोली परिसरात कुटुंबा समवेत राहायला आहेत. सायबर चोरट्याने फिर्यादी यांना व्हिडिओ कॉल केला. फिर्यादी यांच्याकडून अवधानाने तो व्हिडिओ कॉल उचलल्या गेल्या. त्यावेळी समोरील व्यक्ती कपडे काढत होती. यामुळे फिर्यादी यांनी व्हिडिओ कॉल लगेच ठेवला. मात्र सायबर चोरट्याने तो व्हिडिओ कॉल रेकॉर्ड केला. यानंतर सायबर चोरट्याने व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देऊन फिर्यादी यांना पैशाची मागणी केली. तसेच सायबर चोरट्याने फिर्यादी यांना दिल्ली पोलीस मधून बोलत असल्याचे सांगत व्हिडीओ खूप मोठा असून सोशल मीडियावरून डिलिट करण्यासाठी वेळोवेळी 3 लाख 74 हजार 232 रुपये ट्रान्स्फर करायला लावून फसवणूक केली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास लोणीकंद पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक (गुन्हे) एस ढाकणे करत आहेत.

नामदेव जाधवांना शरद पवार समर्थकांचा दणका;तोंडाला फासले काळे…

सत्तेच्या खेळासाठी नाम्या जाधवासारख्याचा वापर करू नका -प्रशांत जगताप

नामदेव जाधव म्हणाले ,ते बौद्धिक गुलाम …याचे परिणाम होतील ,त्यांना शाहू ,फुले आंबेडकरांचे नाव घेण्याचा अधिकार नाही

नामदेवराव जाधव हे पत्रकार भवन येथे कार्यक्रम रद्द झाल्याबद्दल माहिती देत असताना शरद पवार गटाच्या काही कार्यकर्ते येऊन त्यांच्या तोंडाला अचानक काळं फासलं. हा सगळा प्रकार माध्यमांच्या कॅमेऱ्या समोर घडला. यावेळी मोठा गोंधळ निर्माण झाला होता. मात्र पोलिसांनी तत्परता दाखवत नामदेवराव जाधव यांना पूर्ण घेराव करत गाडीत बसून त्यांना तात्काळ घटनास्थळावरून रवाना केलं.

पुणे-राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी पुण्यात प्राध्यापक नामदेव जाधव यांना काळं फासलं आहे. संबंधित प्रकार पुण्याच्या पत्रकार भवन या ठिकाणी घडला. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या गटाच्या कार्यकर्त्यांनी जाधव यांना काळं फासलं. ते प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया देत होते, याचवेळी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी यांच्यावर शाईफेक केली. शरद पवार यांच्या जात प्रमाणपत्रावर कुणबी नोंद असल्याचा दावा नामदेव जाधव यांनी केला होता. त्यानंतर त्यांनी पुन्हा एकदा शरद पवार यांच्याविरोधात वक्तव्य केलं होतं. त्यांच्या वक्तव्यावरुन राष्ट्रवादीच्या कार्यकर्ते आज आक्रमक झाले आहेत. आमच्याविरोधात कारवाई व्हायची ती होऊ द्या. पण माझं म्हणणं आहे, शरद पवार यांच्याविषयी नामदेव जाधव सातत्याने विरोधात वक्तव्य करत आले आहेत. ते कोणीतरी सोडलेलं पिल्लू आहे, नाही तेव्हा शरद पवारांचे पाया पडायला यायचा. शरद पवारांवर टीका केली तर खपवून घेणार नाही, अशी प्रतिक्रिया एका आक्रमक कार्यकर्त्याने दिली. शरद पवारांबद्दल अपशब्द बोलणाऱ्या नामदेव जाधव यांना पुण्याच्या पत्रकार भवनाजवळ काळं फासण्यात आलं आहे, अशी प्रतिक्रिया एका महिला कार्यकर्त्याने दिली. नामदेव जाधव यांचा आज भंडारकर इन्स्टिट्यूटमध्ये कार्यक्रम होणार होता. पण भंडारकर इन्स्टिट्यूटने ती परवानगी नाकारली. कायदा आणि सुव्यवस्थेचं कारण देत कार्यक्रमाला परवानगी नाकारण्यात आली होती. त्यानंतर नामदेव जाधव प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया देण्यासाठी पत्रकार भवनासमोर आले होते. पण राष्ट्रवादीचे कार्यकर्ते पत्रकार भवनसमोर जमले. नामदेव जाधव बोलत असताना राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी त्यांच्यावर काळं फासलं. भंडारकर इन्स्टिट्यूटमध्ये ‘पर्यटनातून उद्योजकतेकडे’ असा व्याख्यानाचा कार्यक्रम होणार होता. तसेच छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आंतरराष्ट्रीय पातळीवर साजरी करण्यात यावी, या विषयावर भंडारकर इन्स्टिट्यूटमध्ये व्याख्यानाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्यासाठी फी देखील ठेवण्यात आली होती. या कार्यक्रमात नामदेव जाधव प्रमुख व्याख्याते असणार होते. पण राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन करण्याचा पवित्रा घेतला.

महापारेषणच्या उपकेंद्रात बिघाड; चाकणशहर, एमआयडीसी परिसरात वीज खंडित

पुणे, दि. १८ नोव्हेंबर २०२३: महापारेषण कंपनीच्या अतिउच्चदाब २२० केव्ही आळेफाटा उपकेंद्रात बिघाड झाल्यामुळे चाकण १३२ केव्ही उपकेंद्रांचा वीजपुरवठा बंद पडला. परिणामी चाकण शहर व एमआयडीसी परिसरातील सुमारे ४० हजार ३५० घऱगुती, वाणिज्यिक व औद्योगिक ग्राहकांचा वीजपुरवठा शनिवारी (दि. १८) दुपारी १२.३० ते १.०५ वाजेपर्यंत बंद राहिला.

याबाबत माहिती अशी की, महापारेषण कंपनीच्या आळेफाटा २२०/१३२ केव्ही उपकेंद्रातून १३२ केव्ही वीजवाहिनीद्वारे चाकण १३२ केव्ही उपकेंद्राला वीजपुरवठा केला जातो. आज दुपारी १२.३० च्या सुमारास आळेफाटा उपकेंद्रात बिघाड झाल्यामुळे सुमारे ४८ मेगावॅट विजेची पारेषण तूट निर्माण झाली. त्यामुळे भार व्यवस्थापनासाठी एलटीएस (Load Trimming Scheme) यंत्रणा कार्यान्वित झाल्यामुळे चाकण १३२ केव्ही उपकेंद्राला होणारा वीजपुरवठा बंद पडला. परिणामी चाकण उपकेंद्रातून महावितरणच्या २२ केव्हीच्या सात वीजवाहिन्यांचा देखील वीजपुरवठा खंडित झाला. यामुळे चाकण शहर तसेच एमआयडीसी परिसरातील खराबवाडी, म्हाळुंगे, आंबेठाण, रोहकल, बिरदवडी, वाकी, ज्ञानेकरवाडी, कडाची वाडी या गावांतील ३८ हजार घरगुती, वाणिज्यिक तसेच २ हजार ३५० औद्योगिक ग्राहकांचा वीजपुरवठा दुपारी १.०५ वाजेपर्यंत बंद राहिला. 

भारत – श्रीलंका संयुक्त सराव मित्र शक्ती – 2023 आजपासून पुण्यातल्या औंध येथे सुरू

नवी दिल्ली-“मित्र शक्ती-2023 सराव” या नवव्या भारत- श्रीलंका संयुक्त लष्करी सरावाला आज औंध (पुणे) येथे सुरुवात झाली. हा सराव 16 ते 29 नोव्हेंबर 2023 या कालावधीत होणार आहे. 120 जवानांच्या भारतीय पथकाचे प्रतिनिधित्व प्रामुख्याने मराठा लाइट इन्फंट्री रेजिमेंटच्या तुकड्या करत आहेत . श्रीलंकेचे प्रतिनिधित्व 53 पायदळ तुकडीचे जवान करत आहेत. या सरावात भारतीय हवाई दलाचे 15 आणि श्रीलंकन हवाई दलाचे पाच जवान सहभागी होत आहेत.

संयुक्त राष्ट्र सनद अध्याय VII अंतर्गत उप-पारंपरिक मोहिमेचा संयुक्तपणे सराव करणे हा या सरावाचा उद्देश आहे. या सरावात, दहशतवादविरोधी कारवायांमध्ये एकत्रितपणे समन्वयीत प्रतिसादांचा समावेश आहे. दोन्ही देश छापा घालणे, शोधमोहीम आणि शत्रूच्या कारवाया हाणून पाडणे, हेलिकॉप्टर्सद्वारे राबवण्यात येणाऱ्या मोहिमा, इत्यादी रणनीतिक कृतींचा सराव करतील.

मित्र शक्ती – 2023 या सरावामध्ये हेलिकॉप्टर व्यतिरिक्त ड्रोन आणि प्रतिबंध करण्यासाठीच्या मानवरहित हवाई यंत्रणांचाही समावेश असेल. हेलिपॅड सुरक्षित करण्यासाठी आणि दहशतवादविरोधी कारवायांमधील पीडितांना बाहेर काढण्यासाठीचा सराव देखील दोन्ही बाजूंनी संयुक्तपणे केला जाईल. शांतता मोहीमांदरम्यान संयुक्त राष्ट्रांचे हित आणि अजेंडा अग्रस्थानी ठेवून सैन्यांमधील परस्पर कार्यक्षमतेची पातळी वाढवण्यासाठी आणि जीवितहानी आणि मालमत्ता हानीचा धोका कमी करण्याचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी सामूहिक प्रयत्नांवर भर दिला जाईल.

दोन्ही देश युद्ध कौशल्यांच्या विस्तृत कार्यक्षेत्रात संयुक्त दृष्टीकोनाची आणि सरावांची देवाणघेवाण करतील ज्यामुळे सहभागींना परस्परांकडून शिकण्यास मदत होईल. सर्वोत्तम पद्धतींची देवाणघेवाण केल्याने भारतीय लष्कर आणि श्रीलंकेचे लष्कर यांच्यातील संरक्षण सहकार्याची पातळी आणखी वाढेल. या सरावामुळे दोन्ही शेजारी राष्ट्रांमधील द्विपक्षीय संबंध अधिक दृढ होतील.

7 दिवसांपासून 40 मजूर बोगद्यात अडकलेले,अन PM मोदी वर्ल्डकपच्या फायनलला चालले:निर्दयी सरकार

नवी दिल्ली– उत्तराखंडमधील उत्तरकाशीत गेल्या रविवारी एक बांधकामाधीन बोगदा ढासळला. या बोगद्यात काम करणारे 36 मजूर अडकले आहेत. त्यांना बाहेर काढण्यात अजूनही यश आले नाही. मात्र, देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी क्रिकेट वर्ल्डकपची फायनल बघण्यासाठी चालले आहे. हे अत्यंत निर्दयी सरकार आहे, अशा शब्दांत आज ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी मोदी सरकारवर हल्ला चढवला.

मराठा व धनगर आरक्षणाच्या मुद्द्यावर आज ठाकरे गटाच्या शिष्टमंडळाने राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची भेट घेतली. त्यानंतर पत्रकार परिषदेत संजय राऊतांनी मोदींवर टीकास्त्र सोडले. संजय राऊत म्हणाले, एकीकडे 40 जिवांना वाचवण्याचे आव्हान असताना दुसरीकडे भाजपचे मंत्री पाच राज्यांच्या निवडणुकीच्या प्रचारामध्ये व्यस्त आहेत, तर पंतप्रधान नरेंद्र मोदी हिंदुस्थान आणि ऑस्ट्रेलियात होणारा वन डे विश्वचषकाचा अंतिम सामना पाहण्यासाठी अहमदाबादला जाणार आहेत.

संजय राऊत म्हणाले, हे सरकार अत्यंत निर्दयी आहे. राजकीय स्वार्थासाठी आणि प्रसिद्धीसाठी हपापलेले आहे. 40 काय 40 हजार लोकं जरी अडकले असते तरी सरकार क्रिकेटचा सामना पाहण्यात आणि प्रचारात दंग झाले असते. सरकारला गरिबांची आठवण फक्त निवडणुकीत येते, त्यांना गरिबांच्या जिवाची पर्वा नाही. त्यांना गरिबांच्या जिवाची तडफड दिसणार नाही. त्यामुळे या सरकारकडून मानवता आणि दया या संदर्भात अपेक्षा करणे चुकीचे आहे.

उत्तराखंडमध्ये यमुनोत्री राष्ट्रीय महामार्गावर बांधकाम सुरू असलेल्या सिलक्यारा बोगद्याचा 50 मीटरपर्यंतचा भाग कोसळला. त्यामुळे बोगद्यात काम करत असलेले 40 मजूर अडकले आहेत. या दुर्घटनेस 7 दिवस उलटून गेले असून अद्यापही एकाही मजुराला बाहेर काढण्यात यश आलेले नाही. त्यात अमेरिकन ऑगर मशीनमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने शुक्रवार सायंकाळपासून रेस्क्यू ऑपरेशनही ठप्प झाले आहे.

शुक्रवार पेठेत ‘किल्ले वर्धनगड’ ची भव्य प्रतिकृती 

सेवा मित्र मंडळ आणि शिवसूर्य प्रतिष्ठान, पुणे तर्फे आयोजन ;  गुरुवार, दिनांक २३ नोव्हेंबर पर्यंत विनामूल्य खुले
पुणे : सह्याद्रीच्या कुशीत लपलेल्या, सात डोंगरांनी बनलेल्या, सातवाहन यांच्यापासून ते बदामीचे चालुक्य आणि यादव, बहामनी, आदिलशाही, मराठा ते शेवटी इंग्रज अशा अनेक राजवटींनी राज्य केलेल्या ‘किल्ले वर्धनगड’ ची भव्य प्रतिकृती शुक्रवार पेठेत साकारण्यात आली आहे. गुरुवार, दिनांक २३ नोव्हेंबर पर्यंत हा किल्ला पुणेकरांना पाहण्याकरिता विनामूल्य खुला आहे.

सेवा मित्र मंडळ आणि शिवसूर्य प्रतिष्ठान, पुणे तर्फे दरवर्षी किल्ले प्रदर्शनाचे आयोजन केले जाते. यंदा उपक्रमाचे १६ वे वर्ष असून किल्ले वर्धनगड ची प्रतिकृती १४ बाय १४ फूट आकारात साकारण्यात आली आहे. मंडळाचे अध्यक्ष गणेश सांगळे, शिरीष मोहिते यांनी उपक्रमास मार्गदर्शन केले असून सुरेश तरलगट्टी, संदीप दुडम, रविंद्र काची, हर्ष गांधी यांनी हा किल्ला साकारला आहे. विविध किल्ल्यांच्या छायाचित्रांचे प्रदर्शन देखील आयोजित करण्यात आले आहे.

गणेश सांगळे म्हणाले, मराठा साम्राज्याची एकेकाळची राजधानी असलेला तसेच उज्ज्वल परंपरा, देदिप्यमान इतिहास, थोर पराक्रमाची पार्श्वभूमी असलेला आणि नैसर्गिक सौंदर्याचे वरदान लाभलेला अशा सातारा जिल्ह्यात वर्धनगड किल्ला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या वास्तव्याने पावन झालेला याच जिल्ह्यातील हा किल्ला असून महादेव डोंगररांगेवरील भाडले-कुंडला या उपरांगेवर वसला आहे.

सुरेश तरालगट्टी म्हणाले, सातारा शहराच्या ईशान्येस ३० कि.मी. अंतरावर, कोरेगाव-खटाव तालुक्याच्या सीमेवर, सातारा ते श्री क्षेत्र पंढरपूर रस्त्यावर साताऱ्याकडून जाताना घाट परिसरात डाव्या बाजूस वर्धनगड गावाची कमान दिसते. याची हुबेहूब प्रतिकृती शुक्रवार पेठेत साकारण्यात आली आहे. गुरुवार, दिनांक २३ नोव्हेंबर पर्यंत दररोज सायंकाळी ७ ते रात्री १० यावेळेत किल्ल्याच्या माहितीसह पुणेकरांना किल्ला पाहता येणार आहे.

हडपसर:लग्नाच्या अमिषाने अल्पवयीन मुलगी गर्भवती अन उसने पैसे मागणाऱ्या महिलेचा विनयभंग

पुणे-हडपसर परिसरात राहणाऱ्या एका 17 वर्षीय अल्पवयीन मुलीस तिचा ओळखीचे मित्राने लग्नाचे अमिष दाखवून तिच्याशी प्रेमसंबंध निर्माण केले. तिला त्यानंतर वेळाेवेळी विविध ठिकाणी नेऊन तिच्यासाेबत शरीरसंबंध ठेऊन तिला तीन महिन्याची गर्भवती करण्यास कारणीभूत झाला आहे. याप्रकरणी शेखर ख्यामलींग बिरादार (वय-26,रा.हडपसर,पुणे) या आराेपीवर लाेणी काळभाेर पोलिसांनी गुन्हा दाखल करुन त्याला अटक केली आहे. पोलिस उपनिरीक्षक एन दाभाडे याबाबत पुढील तपास करत आहे.आणखी एका दुसऱ्या घटनेत हडपसर परिसरात राहणाऱ्या एका 37 वर्षीय महिलेस पैशाची गरज असल्याने तिने तिच्या ओळखीचे डांगे नावाचे व्यक्तीस एकदा माेबाईलवर फाेन करुन पैशाची मागणी केली. परंतु त्याचा गैरफायदा घेऊन संबंधित व्यक्तीने महिलेशी फाेनद्वारे जवळीक साधून तिच्याकडे शरीरसुखाची मागणी करुन, फाेन करुन तसेच व्हाॅटसअपद्वारे पाठलाग करुन स्त्री मनास लज्जा उत्पन्न हाेईल असे कृत्य केले. याप्रकरणी हडपसर पाेलिस ठाण्यात आराेपीवर विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हडपसरमध्ये रिक्षाचालकाकडून सात वर्षाच्या मुलीवर अत्याचार

पुणे-रिक्षाचालक असलेल्या 56 वर्षीय व्यक्तीने ओळखीचे व घराजवळ राहणाऱ्या सात वर्षाच्या एका चिमुरडीवर लैंगिक अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी पिडित मुलीच्या 42 वर्षीय आईने हडपसर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केल्यानंतर आराेपी राजु महादु पाटील (वय-56,रा.काळेपडळ, हडपसर,पुणे) याला पोलिसांनी अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार महिला यांचे आेळखीचा आराेपी रिक्षाचालक आहे. तक्रारदार यांची सात वर्षाची मुलगी ही आराेपीच्या रिक्षात एकटी बसलेली हाेती. त्यावेळी आराेपी त्याठिकाणी आला व त्याने मुलगी एकटी असल्याचा गैरफायदा घेऊन तिचा हात स्वत:चे प्रायव्हेट पार्टला लावला. त्यानंतर त्याचदिवशी सायंकाळी तिला चाॅकलेट देण्याचा बहाणा करुन त्याचे घरी आराेपीने बाेलवले. मुलगी घरी आल्यावर तिला खाेलीतील बेडवर झाेपवून आराेपी रिक्षाचालक तीच्या अंगावर झाेपला व तिचे छातीवर व मांडयावर हात फिरवून त्याने मुलीस काेणाला काही सांगितल्यास मारण्याची धमकी दिली. दरम्यान, मुलीने घरी गेल्यावर संबंधित प्रकार आईला सांगितला. त्यानंतर मुलीच्या कुटुंबीयांनी पोलिसांकडे धाव घेत, आराेपी विराेधात तक्रार दाखल केली . अखेर पोलिसांनी आराेपीला अटक केली आहे. याबाबत पुढील तपास हडपसर पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक एस अब्दगिरे हे करत आहे.

शेजाऱ्याचा त्रास अन् पत्नीने घेतला गळफास-पतीने केली पोलिसात तक्रार :धनकवडीतील घटना

पुणे- धनकवडी परिसरात स्वामी विवेकानंद प्रेरणा बि्ल्डींगमध्ये तिसऱ्या मजल्यावर राहणाऱ्या एका 40 वर्षीय महिलेने शेजाऱ्याच्या त्रासाला कंटाळून गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. कविता संजय श्रीवास्तव (वय-40) असे आत्महत्या केलेल्या महिलेचे नाव आहे.पोलिसांनी या प्रकरणी आरोपी अरीफ हरुन मुल्ला (42) याच्यावर आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. याबाबत सहकारनगर पाेलिस ठाण्यात महिलेचे पती संजय शामलाल श्रीवास्तव (45) यांनी आराेपी विराेधात फिर्याद दाखल केली आहे. याबाबत सहकारनगर पाेलिस ठाण्याचे वरिष्ठ पाेलिस निरीक्षक सुरेंद्र मळाळे म्हणाले, शेजारी राहणारे दाेन्ही कुटुंब हाेते त्यांच्यात मागील चार ते पाच महिन्यापासून विविध कारणावरुन दरराेज वाद सुरु हाेते. याबाबत दाेन्ही कुटुंबीयांनी एकमेकांचे विराेधात यापूर्वी तक्रार दाखल केल्यानंतर त्यांच्यात समझाेता करण्यात आला हाेता. मात्र, त्यांच्यातील वाद न मिटल्याने तसेच आराेपी त्रास देत असल्याने महिलेने राहते घरी गळफास घेऊन आत्महत्या केली आहे.असे त्यांच्या पतीचे म्हणणे आहे .

पाेलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार संजय श्रीवास्तव व आराेपी अरीफ मुल्ला हे दाेघे एकमेकांच्या घराशेजारी राहतात. आरोपी अरीफ तक्रारदार यांची पत्नी कविता श्रीवास्तव यांना वेगवेगळ्या कारणावरुन सतत त्रास देत हाेता. त्यामुळे सदर वादास कंटाळून कविता श्रीवास्तव यांनी राहते घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. पाेलिसांना याबाबतची माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी मृतदेह ताब्यात घेऊन ससून रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवला. याबाबत महिला पाेलिस उपनिरीक्षक एस राजगुरु पुढील तपास करत आहेत.

रोटरी क्लब आणि पुणे शहर बॉक्सिंग संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने महिला खेळाडू दत्तक योजनेस प्रारंभ

पुणे-रोटरी क्लब पुणे सेंट्रल आणि पुणे शहर बॉक्सिग संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने शी कॅन बैंड श्री विल असा उपक्रम सुरू करण्यात येत आहे या उपक्रमात पुणे शहरातील गुणवत्ता प्राप्त महिला खेळाडू यांना दर्जेदार क्रीडा साहित्य उपलब्ध करून दिले जाणार आहे खेळाडूना त्यांच्या डायट प्लान बाबतीत मार्गदर्शन केले जाणार आहे त्याचप्रमाणे राष्ट्रीय पातळीवर नावाजलेले प्रशिक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली शिबीर आयोजित केले जाणार आहे.या उपक्रमामुळे पुणे शहरातील खेळाडू यांच्या गुणवत्तेत भर पडून त्याचा उपयोग पुढील स्पर्धा मधील कामगिरी सुधारण्यास नक्कीच होईल त्याचप्रमाणे राष्ट्रीय पातळीवर काम करणाऱ्या प्रशिक्षकांसोबत शिबिरात काम करण्याच संधी पुणे शहरातील इतर प्रशिक्षकांना मिळणार असल्याने पुणे शहरातील सर्वच खेळाडू यांना भविष्यात लाभ होईल असा विश्वास पुणे शहर बॉक्सिंग संघटनेचे कार्याध्यक्ष अविनाश बागवे यांनी सांगितले

सुररुवातीला पुणे शहरातील राज्य व राष्ट्रीय पातळीवर चमकदार कामगिरी बजावली असणाऱ्या 1 जीनत शेख, 2 भूमिका खिलारे, 3 हर्षदा लोहाट, 4 रिया कुटे, 5 सोनिया सूर्यवंशी, 6 सृष्टी चोरगे, 7 वैष्णवी कदमठ समीक्षा सूर्यवंशी याआठ महिला खेळाडूंची निवड या उपक्रमासाठी करण्यात आली आहे या शिबिरात पुणे शहरातील इतर बॉक्सिग प्रशिक्षकांना सामावून घेतले जाणार आहे.त्याचप्रमाणे पुणेशहरातील खेळ संस्कृतीच्या वाढीसाठी अश्या प्रकारच्या उपक्रमांची गरज संघटनांनीपुढे यावे असे आवाहन बागवे यांनी केले आणि रोटरी क्लब पुणे सेंट्रल चे ब्रि.मुरलीधरन राजा आणि त्यांच्या सर्व सहकार्याचे आभार व्यक्त केले ह्या चांगल्या उप्रमास यशस्वी होण्यासाठी जी काही मदत लागेल ती संघटनेच्या माध्यमातून दिली जाईल याची ग्वाही दिली

सात दिवस झाले,उत्तरकाशीच्या बोगद्यात अडलेल्या मजुरांना वाचवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरुच  

0

हा बोगदा चारधाम प्रकल्पाचा भाग

चार धाम रोड प्रकल्पांतर्गत हा बोगदा बांधला जात आहे. 853.79 कोटी रुपये खर्चून तयार करण्यात आलेला हा बोगदा सर्व हंगामात खुला राहणार आहे. म्हणजे बर्फवृष्टी होत असतानाही लोक यातून ये-जा करू शकतील. त्याच्या बांधकामानंतर, उत्तरकाशी ते यमुनोत्री धाममधील अंतर 26 किमीने कमी होईल.हिवाळ्यात हिमवर्षाव होत असताना राडी टॉप परिसरात यमुनोत्री महामार्ग बंद असतो. त्यामुळे यमुना खोऱ्यातील तीन तहसील मुख्यालये, बरकोट, पुरोला आणि मोरी, जिल्हा मुख्यालय उत्तरकाशीपासून तुटले आहेत. चारधाम यात्रेच्या सोयीसाठी आणि राडी टॉपमधील बर्फवृष्टीच्या समस्येपासून मुक्त होण्यासाठी, ऑल वेदर रोड प्रकल्पांतर्गत येथे दुहेरी मार्गाचा बोगदा बांधण्याची योजना आखण्यात आली होती.

उत्तरकाशी, उत्तराखंड येथे दिवाळीच्या दिवशी (12 नोव्हेंबर) पहाटे 4 वाजता बांधकामाधीन बोगद्याचा 60 मीटरचा भाग खचला. यामध्ये 41 मजूर अडकले. सहा दिवस आत अडकलेल्यांची संख्या 40 असल्याचे सांगितले जात होते, मात्र शनिवारी सकाळी ही संख्या एका मजुराने वाढली. आणखी कामगार आत अडकले असण्याची शक्यता आहे.NHAIDCL चे संचालक अंशू मनीष यांनी सांगितले की, आतल्या लोकांची संख्या 41 आहे. दुर्घटनेचा आज सातवा दिवस असून बचावकार्य पूर्ण झालेले नाही. बोगद्यात अडकलेल्या कामगारांना ऑक्सिजन, अन्न, पाणी आणि औषधे पाईपद्वारे पुरवली जात आहेत.

गेल्या सहा दिवसांत बोगद्यातील मलबा उत्खनन यंत्राद्वारे काढण्याचा पहिला प्रयत्न करण्यात आला. यानंतर तीन वेगवेगळ्या ऑगर्स मशिनच्या सहाय्याने ड्रिलिंग करून आणि ढिगाऱ्याच्या आत स्टीलचे पाइप पाठवून कामगारांना वाचविण्याचा प्रयत्न करण्यात आला, मात्र आजपर्यंत सर्व योजना फोल ठरल्या आहेत.

तज्ज्ञांनी शुक्रवारी बचावासाठी प्लॅन-बीवर तातडीची बैठक घेतली. आता बोगदा वरून कापून आत अडकलेल्या लोकांना एअरलिफ्ट काढण्याचा प्रयत्न केला जाईल, असे ठरले. त्यासाठी ड्रिलिंग आणि तज्ज्ञांच्या पथकांनी शुक्रवारी रात्री सर्वेक्षणही केले आहे. आज रेल्वे आणि नॉर्वेच्या इंजिनिअर्सची तज्ज्ञ टीम यावर काम करणार आहे.

PMO उपसचिव मंगेश घिलडियाल आणि PMO सल्लागार भास्कर खुल्वे शनिवारी सकाळी घटनास्थळी पोहोचले आणि NHAI, रेल्वे आणि नॉर्वे मधील अभियंते आणि तज्ञांची बैठक घेतली. नवीन ऑगर मशीनही सकाळी 11 वाजता उत्तरकाशीला पोहोचले, मात्र दुपारी 3 वाजेपर्यंत बचावकार्य सुरू होऊ शकले नाही.

दादा, आईला सांगू नको मी अडकलोय, भावाशी बोलताना मजूर ढसाढसा रडला

मजूर अडकल्याच्या घटनेला आज सात दिवस झाले आहेत. अमेरिकन ड्रिलिंग मशीनच्या मदतीने मदत आणि बचाव कार्य सुरू आहे. दीडशे तासांहून अधिक काळ बोगद्यात अडकलेल्या कामगारांची प्रकृती आता ढासळू लागली आहे. बोगद्याबाहेर उपस्थित असलेले त्यांचे कुटुंबीय चिंतेत आहेत. काही मजूर त्यांच्या कुटुंबीयांशी बोलले आहेत.त्याचदरम्यान, पुष्कर नावाच्या मजुराला त्याचा भाऊ विक्रम सिंह यांच्याशी बोलण्याची संधी मिळाली. तेव्हा त्याच्या तोंडून जे पहिलं वाक्य बाहेर पडलं ते होतं – ‘भाऊ, मी इथे बोगद्यात अडकलो आहे हे आईला सांगू नकोस.’ अशक्तपणामुळे २५ वर्षीय पुष्करला नीट बोलताही येत नव्हते. कुजबुजत तो भावाला म्हणाला की, ‘मी ठीक आहे. येथे आणखी काही कामगार अडकले आहेत. माझ्याबद्दल आईला सांगितले तर तिला काळजी वाटेल’. यावेळी त्याला स्वत:ची नाही तर त्याच्या आईची काळजी होती. भावाशी बोलताना पुष्करला अश्रू अनावर झाले.बोगद्यात टाकलेल्या पाईपद्वारे विक्रम सिंह पुष्करशी बोलला. चंपावत जिल्ह्यातील छन्नी गोठ गावात राहणारा विक्रम सिंह म्हणाला- ‘गेल्या शुक्रवारी मला माझ्या भावाशी बोलण्याची संधी मिळाली. या संपूर्ण संभाषणात त्याची एकच चिंता होती की मी हे माझ्या आईला सांगू नये. मी त्याला त्याच्या तब्येतीबद्दल विचारले आणि बचाव कार्याचे अपडेट्स दिले. घरात सर्वात लहान असल्याने त्याचे आईवर सर्वात जास्त प्रेम होते. मला या घटनेची माहिती मिळताच मी माझ्या वृद्ध आई-वडिलांना अपघाताबद्दल काहीही न सांगता तात्काळ उत्तरकाशीला आलो. पण माझ्या काही शेजाऱ्यांनी घरी येऊन त्यांना अपघाताची माहिती दिली. ही बातमी ऐकून दोघांनाही खूप धक्का बसला आहे.बचाव कार्यात गुंतलेले कामगार बोगद्यात अडकलेल्या कामगारांशी सतत बोलत आहेत आणि त्यांचे मनोबल वाढवत आहेत. ऑक्सिजन आणि ड्रायफ्रुट्ससह जीवनावश्यक वस्तू बोगद्याच्या आत ११ पाईपद्वारे पाठवल्या जात आहेत. आत अडकलेले मजूर फक्त एकच प्रश्न विचारत आहेत की त्यांना बाहेर कधी काढणार. सध्या त्यांना वाचवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरु आहेत.

6 एजन्सी व्यतिरिक्त 3 देशांचे तज्ञ बचावकार्यात सहभागी आहेत

नॅशनल हायवे अँड इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेड (NHIDCL), NDRF, SDRF, ITBP, BRO, रेल विकास निगमचे 200 हून अधिक लोकांचे पथक चोवीस तास बचावकार्यात गुंतले आहे. याशिवाय थायलंड, नॉर्वे, फिनलंडसह अनेक देशांतील तज्ज्ञांकडून ऑनलाइन सल्ला घेतला जात आहे.

नवीन योजनेनुसार, ड्रिलिंग मशीन बोगद्याच्या वर नेण्यात येईल आणि तळाशी एक छिद्र केले जाईल. बोगद्याच्या मुख्य प्रवेशद्वारापासून डावीकडे जाणाऱ्या मार्गाने मशीन बोगद्याच्या वरच्या बाजूला नेण्यात येईल. येथे बोगद्याचा ‘सी पॉइंट’ आहे, म्हणजे बोगद्यात थोडासा वक्र आहे. या ठिकाणी ड्रिलिंगसाठी सर्वेक्षण करण्यात आले आहे. बोगद्याच्या मजबूत भागात हे ड्रिलिंग केले जाईल. यामुळे बोगद्याचेही काही नुकसान होणार आहे. येथे मशीनला वरपासून खालपर्यंत सुमारे 103 मीटर ड्रिल करावे लागेल.हे ड्रिलिंग मलबा पडण्याच्या ठिकाणापासून 50-60 मीटर अंतरावर आणि पुढे म्हणजे बोगद्याच्या मुख्य प्रवेशद्वारापासून किमान 280-300 मीटर आत केले जाईल. आत अडकलेल्या लोकांना येथून एअरलिफ्ट केले जाईल.