सेवा मित्र मंडळ आणि शिवसूर्य प्रतिष्ठान, पुणे तर्फे आयोजन ; गुरुवार, दिनांक २३ नोव्हेंबर पर्यंत विनामूल्य खुले
पुणे : सह्याद्रीच्या कुशीत लपलेल्या, सात डोंगरांनी बनलेल्या, सातवाहन यांच्यापासून ते बदामीचे चालुक्य आणि यादव, बहामनी, आदिलशाही, मराठा ते शेवटी इंग्रज अशा अनेक राजवटींनी राज्य केलेल्या ‘किल्ले वर्धनगड’ ची भव्य प्रतिकृती शुक्रवार पेठेत साकारण्यात आली आहे. गुरुवार, दिनांक २३ नोव्हेंबर पर्यंत हा किल्ला पुणेकरांना पाहण्याकरिता विनामूल्य खुला आहे.
सेवा मित्र मंडळ आणि शिवसूर्य प्रतिष्ठान, पुणे तर्फे दरवर्षी किल्ले प्रदर्शनाचे आयोजन केले जाते. यंदा उपक्रमाचे १६ वे वर्ष असून किल्ले वर्धनगड ची प्रतिकृती १४ बाय १४ फूट आकारात साकारण्यात आली आहे. मंडळाचे अध्यक्ष गणेश सांगळे, शिरीष मोहिते यांनी उपक्रमास मार्गदर्शन केले असून सुरेश तरलगट्टी, संदीप दुडम, रविंद्र काची, हर्ष गांधी यांनी हा किल्ला साकारला आहे. विविध किल्ल्यांच्या छायाचित्रांचे प्रदर्शन देखील आयोजित करण्यात आले आहे.
गणेश सांगळे म्हणाले, मराठा साम्राज्याची एकेकाळची राजधानी असलेला तसेच उज्ज्वल परंपरा, देदिप्यमान इतिहास, थोर पराक्रमाची पार्श्वभूमी असलेला आणि नैसर्गिक सौंदर्याचे वरदान लाभलेला अशा सातारा जिल्ह्यात वर्धनगड किल्ला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या वास्तव्याने पावन झालेला याच जिल्ह्यातील हा किल्ला असून महादेव डोंगररांगेवरील भाडले-कुंडला या उपरांगेवर वसला आहे.
सुरेश तरालगट्टी म्हणाले, सातारा शहराच्या ईशान्येस ३० कि.मी. अंतरावर, कोरेगाव-खटाव तालुक्याच्या सीमेवर, सातारा ते श्री क्षेत्र पंढरपूर रस्त्यावर साताऱ्याकडून जाताना घाट परिसरात डाव्या बाजूस वर्धनगड गावाची कमान दिसते. याची हुबेहूब प्रतिकृती शुक्रवार पेठेत साकारण्यात आली आहे. गुरुवार, दिनांक २३ नोव्हेंबर पर्यंत दररोज सायंकाळी ७ ते रात्री १० यावेळेत किल्ल्याच्या माहितीसह पुणेकरांना किल्ला पाहता येणार आहे.