रामदास कदम हे वेडे झाले आहेत की काय? त्यांच्या डोक्यावर परिणाम झाला आहे. रामदास कमद भंपक आहेत. त्यांच्या मुलाचा पराभव केल्याशिवाय गप्प बसणार नाही असा इशारा भास्कर जाधव यांनी आज खेडच्या सभेत बोलताना दिला. उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या गोळीबार मैदान येथील सभेत ते बोलत होते . प्रचंड गर्दी हे सभेचे वैशिष्ट्य ठरले.
“देशाची घटाना संपवली जाते की काय अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. जो माणूस आयुष्यभर कुणाखाली वाकला आणि झुकला नाही त्यांनी आपल्यासमोर साक्षात इथे दंडावत घातला होता, असे म्हणत उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना त्यांनी रत्नागिरीसाठी काय-काय केलं याची यादीच भास्कर जाधव यांनी वाचून दाखवली. “तळये येथील धरण फुटलं त्यावेळी उद्धव ठाकरे रत्नागिरीत आले होते. चिपळूनला महापूर आला त्यावेळी कोरोनाचं संकट असताना देखील उद्धव ठाकरे मदतीसाठी धावून आले. त्यानंतर निसर्ग चक्रीवादळ असो किंवा तक्ते वादळ असो प्रत्येक वेळी उद्धव ठाकरे रत्नागिरीकरांसाठी धावून आले. पुरापासून कोकण वाचावा म्हणून दहा हजार कोटी रूपयांची तरतूद केली. त्यातील एकट्या चिपळूनसाठी 3200 कोटी दिले. कोरोनाच्या संकटात 58 कोटी आणि 67 लाख रूपयांची जिल्हापरिषदेची इमारत दिली. कोकोकणात रस्त्याचं जाळं दिलं. रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या विकासाठी रत्ना-सिंधू योजना आणली असे भास्कर जाधव यांनी यावेळी सांगितले.
भास्कर जाधव म्हणाले, “मुख्यमंत्री झाल्यापासून एकनाथ शिंदे तीन वेळा रत्नागिरीत आले. परंतु, त्यांनी रत्नागिरीकरांसाठी काय दिलं. मुख्यमंत्र्यांनी साडेआठशे कोटी रूपयांच्या कामांचं उद्घाटन केलं. परंतु, त्याला आधी मंजुरी उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री असताना दिली आहे. विनायक राऊत यांचा खासदार निधीचा पाच कोटी रूपयांचा फंड पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गोठवला. आमचा आमदार फंड दोन कोटी होता, तो अजित पवार यांनी पाच कोटी केला.”
सिंधुदुर्ग जिल्ह्याला मेडिकल कॉलेज दिलं, रत्नागिरी जिल्ह्याला जिल्हा महिला आरोग्य केंद्र दिलं. परंतु, यांनी कोकणासाठी काय दिलं? उलट आमच्या बजेटच्या पैशांना स्टे दिला, समाजकल्यानच्या पैशाला स्टे दिला. कोरोनासारख्या संकटाच्या काळात रामदास कदम मतदारसंघात फिरले नाहीत. त्यांनी मतदारसंघासाठी काय काम केलं हे सांगावं? असं आवाहन भास्कर जाधव यांनी दिले.
खेड- “शिवसेनेची स्थापना निवडणूक आयोगाच्या वडिलांनी नाही, तर माझ्या वडिलांनी केली आहे,” असं म्हणत उद्धव ठाकरेंनी नाव न घेता पंतप्रधान नरेंद्र मोदींवर हल्ला चढवला. तसेच भाजपाला आधी गल्लीतलं कुत्रं विचारत नव्हतं, असं म्हणत खोचक टोला लगावला.उद्धव ठाकरे म्हणाले, “मला निवडणूक आयोगाला खास सांगायचं आहे की, त्यांच्या डोळ्यात मोतीबिंदू झाला नसेल, तर कोणती शिवसेना खरी आहे हे पाहायला इकडं या. हा ‘चुना लगाव आयोग’ आहे. ते सत्येचे गुलाम आहेत. वरून जे आदेश येतात त्याप्रमाणे वागणारे हे त्यांचे गुलाम आहेत. हे निवडणूक आयुक्त म्हणून राहायच्या लायकीचे नाहीत, हे मी उघडपणे बोलतो आहे.
उद्धव ठाकरे यांची आज खेड येथील गोळीबार मैदानात सभा झाली . या सभेत सुषमा अंधारे यांनी आपले घणाघाती भाषण करून शिंदे गट, भाजप, किरीट सोमय्यांना लक्ष केले.उद्धव ठाकरे म्हणाले,’म्हणाले, जे ढेकणं आपले रक्त पिऊन फुगली त्यांना चिरडण्याची ताकद एका बोटात आहेत. तोफेची गरजही नाही. आमच्याकडे मुलुखमैदानी तोफ आहे. संजय कदमांच्या रुपाने आपली तोफ परत आपल्याकडे आली. तोफा देशद्रोह्यांविरोधात वापरायच्या असतात.
उद्धव ठाकरे म्हणाले, ज्यांना आजपर्यंत जे – जे मिळाले ते खोक्यात बंद झाले. माझ्या हातात आज काही नाही. रिकामे आहे, मी तुम्हाला काहीही देऊ शकत नाही. आज मी तुमच्याकडे आशिर्वाद मागायला आलो आहे. तुमची साथ हवी. जे भुरटे चोर, गद्दार आहेत त्यांना सांगतो की, नाव, शिवसेना पक्षाचे चिन्ह चोरला पण शिवसेना चोरू शकत नाही. मला निवडणूक आयोगाला सांगायचे की, तुमच्या डोळ्यात मोतीबिंदू झाला नसेल तर शिवसेना पाहायला खेडमधील सभा पाहायला या. चुना लावणारा तो आयोग आहे.ठाकरे म्हणाले, मुख्यमंमत्र्यांचा अर्धा वेळ दिल्लीतच जात आहे. जागतिक पातळीवर कोरोना काळात महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांचेच नाही तर सर्व लोकांचे कौतूक झाले. त्याही परिस्थितीत आपल्याकडे उद्योगधंदे येत होते. सर्व उद्योग गुजरातेत गेले. आयफोनचा कारखाना कर्नाटकात जातो महाराष्ट्राच्या हाती काय आहे.
ठाकरे म्हणाले, एसटी महामंडळाच्या बसवर आमची जाहीरात होती की, माझा महाराष्ट्र माझे कुटुंब होय महाराष्ट्र माझे कुटुंब आहे. पण जो कुटुंब बदलतो तो महाराष्ट्राची जबाबदारी काय घेणार? कानडी मुख्यमंत्र्यांनी डोळे वटारले पण आपले शेपूट घालून बसले. आमचे मविआ सरकार चांगले चालत होते पण माशी कुठे शिंकली. नितीन देशमूखांनी भर सभेत सांगितले की, कसे झोपेचे इंजेक्शन दिले. कसा छळ झाला. त्यांनी छळून लोकांना गटात ओढले. राजन साळवींच्या घरी छापा घातला.उद्धव ठाकरे म्हणाले, आम्ही देशद्रोही नाही तुम्ही कसे म्हणता तुम्ही बोलू शकत नाही. आ्म्ही जीभ छाटू. मुंबई वाचवणारे सैनिक आज तुम्हाला देशद्रोही वाटतात. केजरीवाल माझ्याकडे आले व म्हणाले की, आपल्याला एकत्र लढायला हवे. आम्ही पंतप्रधानांना पत्राद्वारे प्रश्न विचारला. ज्यांच्या – ज्यांच्यावर आरोप झाले त्यांच्यावरील कारवाईबाबत विचारणा केली.उद्धव ठाकरे म्हणाले, पोपटांना पिंजऱ्यात टाकण्याची वेळ आली आहे. त्यांची पाप कमी आहेत का, विरोधी पक्षात असले की, गुन्हेगार, भ्रष्ट्राचारी. आज भाजपमध्ये जास्त भ्रष्ट्राचारी आहेत. आधी भाजपच्या व्यासपीठावर साधूसंत दिसायचे आता संधी साधू दिसतात.उद्धव ठाकरे म्हणाले, कितीही खान येऊद्या हल्ली मी त्यांना मोगॅंबो म्हणत आहे. ते आपल्याला आपसांत लढवत आहेत. जागतिक स्तरावर जो घोटाळा होत आहे त्याची चौकशी होत नाही पण सामान्यांच्या मागे लागतात. कुटुंब परिवारवादावर ते बोलतात. मी म्हणतो मी बाळासाहेब ठाकरेंचा मुलगा, बाळासाहेब ठाकरेंचे वडील प्रबोधनकार ठाकरे होय आमच्या सहा पिढ्या महाराष्ट्राची सेवा करीत आहात. आमच्यावर परिवारवादाचा ठपका ठेवता तुमची वंशावळ काय?उद्धव ठाकरे म्हणाले, पुण्यात अमित शहा येऊन बोलले की, उद्धव ठाकरेंनी सत्तेसाठी काॅंग्रेस राष्ट्रवादीचे तळवे चाटतात. तुम्ही काय चाटतात. शिवसेनेचा , मराठी माणसांचा आवाज ते संपवत आहेत. एकदिवस त्यांना देश संपवायचा आहे.उद्धव ठाकरे म्हणाले, तुम्हाला शिवसेनेचा पक्षप्रमुख मिंधे चालेल का? तुम्ही सांगा मी हवा की नको तुम्ही सांगा. निवडणूक आयोगाने चोंबडेपणा करायचा नाही. मी सहन करून घेणार नाही. शिवसेना आमची आहे. तुमची परवानगी घेवून शिवसेनेची स्थापना झाली नाही. न्याय हक्कासाठी लढण्यासाठी शिवसेनेचा जन्म झाला आहे. तुमच्या सारखे आले आणि गेले जातीलही पण शिवसेना कायम राहील.उद्धव ठाकरे म्हणाले, आजपासून ते आशिर्वाद यात्रा काढीत आहेत. चोरांना तुम्ही आशिर्वाद देणार. मिंध्येंच्या हातात धनुष्यबाण दिला पण चेहरा चोरासारखा झाला. तुमच्या हातात धनुष्यबाण घेण्याचा प्रयत्न करा पण मेरा खानदान पुरा चोर है हे कपाळावर लागेल ते अजिबात या जन्मात पुसले जाणार नाही. आम्ही काय असे पाप केले, कोविडमध्ये चांगले काम केले ते पाप, कोकणाच्या विकासासाठी प्रयत्न केले ते पाप. कोकण शिवसेनेचे जीव की, प्राण आहे. शिवसेनेची सत्ता गेली पण कोकणात विजयी झालो. शिवसेनाप्रमुखांनी याच मैदानात माथा टेकवला.उद्धव ठाकरे म्हणाले, ज्यांचा स्वातंत्र्यलढ्याची काडीमात्र संबंध नाही ते गादीवर बसले म्हणून अशी देशाची परिस्थिती आहे. गोमूत्र शिंपडून देशाला स्वातंत्र्य मिळाले नाही तर शहीदांच्या रक्ताने स्वातंत्र्य मिळाले.
संजय कदम यांचा ठाकरे गटात प्रवेश
या सभेत राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार संजय कदम यांचा ठाकरे गटात जाहीर पक्षप्रवेशही झाला आहे. त्यांच्यासह अन्य पदाधिकाऱ्यांनीही ठाकरे गटात आज प्रवेश केला. यावेळी ठाकरेंनी शिवबंधन हाती बांधले.
पंजाब मध्ये अमृतसर इथं 19 ते 20 मार्च 2023 दरम्यान पहिली कामगार 20 (L20) बैठक आयोजित करण्यात आली आहे. जी-20 अंतर्गत संलग्न गटापैकी L20 हा एक गट आहे. यात जी 20 देशांच्या ट्रेड युनियन केंद्रांचे नेते आणि प्रतिनिधींचा समावेश असून ते कामगारांशी संबंधित समस्या सोडवण्याच्या उद्देशानं विश्लेषण आणि धोरण शिफारसी करतात. भारताच्या जी 20 अध्यक्षतेखाली भारतीय मजदूर संघ (BMS) हा L20 स्थापना बैठकीचं आयोजन करणारा एक प्रमुख राष्ट्रीय ट्रेड युनियन केंद्र आहे. या बैठकी शिवाय L20 बैठकीत सहभागी होणाऱ्यांना अमृतसरच्या समृद्ध सांस्कृतिक वारशाचं दर्शन घडवण्याच्या उद्देशानं विविध ठिकाणांची सफर घडवण्यात येणार आहे.
कराड – काँग्रेस, राष्ट्रवादी, डावे आणि ठाकरे गटाने येत्या निवडणुकांना एकत्रित सामोरे जावे अशी विचारधारा आमच्यात आहे. त्यासंदर्भात एकत्र बसून निर्णय घेणार असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खा. शरद पवार यांनी कराडमध्ये प्रसार माध्यमांशी बोलताना दिली आहे. रयत शिक्षण संस्थेचे, सद्गुरू गाडगे महाराज कॉलेज कराड, येथे रयत शिक्षण संस्थेच्या शताब्दी वर्षानिमित्त बांधण्यात आलेल्या “शताब्दी इमारती” चे उद्घाटन समारंभाकरिता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष, रयत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष, खा. शरद पवार हे कराड येथे आले होते. शरद पवार यांचे कराड विमानतळावर आगमन होताच त्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत कराड उत्तर चे आमदार बाळासाहेब पाटील यांनी केले. कार्यक्रमानंतर कराड येथे शरद पवार प्रसारमाध्यमांशी बोलत होते.
शरद पवार म्हणाले, सध्या तरी आम्ही मतदार संघनिहाय आढावा घेतलेला नाही. पण तो घ्यावा लागणार आहे. भाजप निवडणुकीच्या तयारीला लागला असल्याबाबत विचारले असता ‘कोण तयारीत आहे, हे निवडणूक निकालातून दिसले आहे, असे सूचक वक्तव्य त्यांनी केले.
शरद पवार म्हणाले, अलिकडच्या काळात केंद्रीय तपास यंत्रणांनी अनेक जणांवर कारवाई केली आहे. काही लोकांना अटक करून त्यांच्यावर खटले दाखल केले, परंतु त्यातील काही जण भाजपमध्ये गेल्यानंतर त्यांच्यावरील केसेस काढण्यात आल्या. त्याची माहिती 9 पक्षांच्या नेत्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना एका पत्राद्वारे देऊन फेरविचार करण्याची विनंती पत्रात केली असल्याचे शरद पवार यांनी सांगितले.
शरद पवार म्हणाले, राज्यपाल सरकारच्या कामात हस्तक्षेप करत असल्याचा मुद्दाही पत्रात नमूद करण्यात आला आहे. केंद्र आणि राज्यांमध्ये राज्यपालांमुळे तेढ निर्माण होत असल्याची बाब पत्राद्वारे मोदींच्या निदर्शनास आणून दिली असल्याचे शरद पवार यांनी सांगितले. केंद्रीय यंत्रणांची प्रतिमा मलिन असून त्याबद्दल चिंता व्यक्त केली.
तक्रार करणाऱ्यालाच जज म्हणून नेमले -संजय राऊत यांच्या प्रकरणी पवारांचा आरोप
शरद पवार म्हणाले, ज्या लोकांनी समिती नेमा आणि संजय राऊत यांना अटक करण्याची मागणी केली. त्यांनाच त्या समितीत घेतले आहे. एखाद्याने तक्रार केली असेल आणि तक्रार करणाऱ्या व्यक्तीलाच जज म्हणून नेमले तर त्याचा निकाल कसा लागेल. केंद्राची नाफेड संस्था आहे. शेती मालाचे भाव पडतात तेंव्हा नाफेड बाजारात खरेदीसाठी उतरते. नाफेडने कांदा खरेदी करावा. नाफेडने खरेदी केली तर कांदा उत्पादक शेतकरी वाचू शकतो. कांदा हे उत्पादन देणारे त्यांचे एकच पीक आहे. कांदा खरेदी सुरू केली असल्याचे केंद्राने म्हटले आहे, पण खरेदी सुरू झाली नाही.
नवी दिल्ली-दिल्लीचे उपमुख्यंमत्री मनीष सिसोदिया यांच्या अटकेप्रकरणी विरोधी पक्षांच्या 9 नेत्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहिले आहे. या नेत्यांत दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचाही समावेश आहे. या पत्रात म्हटले आहे की, मनीष सिसोदिया यांच्या अटकेमुळे भारताचे एका लोकशाही देशातून हुकूमशाही शासन पद्धतीत रुपांतर झाल्याचे सिद्ध होते.
मनीष सिसोदिया यांची शनिवारी दिल्ली स्थित राउज अव्हेन्यू कोर्टात पेशी झाली. तिथे त्यांच्या जामीन याचिकेवर सुनावणी होणार होती. पण कोर्टाने जामिनावरील आपला निर्णय 10 मार्चपर्यंत राखून ठेवला. तसेच सीबीआयला त्यांचा ताबा सोपवला.
बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, BRS प्रमुख के चंद्रशेखर राव, पंजाबचे CM भगवंत मान, राजद नेते तेजस्वी यादव, नॅशनल कॉन्फरंसचे नेते फारूक अब्दुल्ला, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार, शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे, सपा प्रमुख अखिलेश यादव.
वाचा पंतप्रधानांना लिहिण्यात आलेले संपूर्ण पत्र…
आदरणीय पंतप्रधान, आम्हाला विश्वास आहे की भारत एक लोकशाही देश आहे असे तुम्हाला अजूनही वाटते. विरोधी पक्षनेत्यांच्या विरोधातील केंद्रीय यंत्रणांच्या मनमानी वापरावरून आपले लोकशाहीतून हुकूमशाहीत रुपांतर झाल्याचे स्पष्ट होते. मनीष सिसोदिया यांना सीबीआयने 26 फेब्रुवारी 2023 रोजी प्रदीर्घ तपासानंतर अटक केली. ही अटक कथित गैरव्यवहाराप्रकरणी तसेच कोणतेही पुरावे न दाखवता करण्यात आली.
सिसोदियांवरील आरोप पूर्णतः निराधार आहेत. ही कारवाई राजकीय कट कारस्थानांतर्गत करण्यात आली आहे. या अटकेने संपूर्ण देशात रोष पसरला आहे. मनीष सिसोदिया जगभरात दिल्ली शालेय शिक्षणातील अमुलाग्र सुधारणांसाठी ओळखले जातात. त्यामुळे त्यांची अटक राजकीय सूडापोटी करण्या आल्याची भावना जगभर पसरली आहे. भाजपच्या हुकूमशाही राजवटीत भारताची लोकशाही मूल्ये धोक्यात आल्याची भीती संपूर्ण जगाला वाटते. त्याची पुष्टी या अटकेतून झाली आहे.
तुमच्या राजवटीत 2014 पासून आतापर्यंत जेवढ्या राजकारण्यांना अटक झाली, छापेमारी करण्यात आली किंवा चौकशी करण्यात आली, त्यात बहुतांश विरोधी पक्षांच्या नेत्यांचा समावेश आहे. मजेशीर गोष्ट म्हणजे या नेत्यांनी भाजपत प्रवेश केल्यानंतर त्यांची चौकशी थंड बस्त्यात टाकली जाते. उदारणार्थ, काँग्रेसचे माजी नेते व आसाममचे विद्यमान मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा. सीबीआय व ईडीने 2014-2015 मध्ये शारदा चिटफंड घोटाळ्यात त्यांची चौकशी सुरू केली. पण त्यांनी भाजपत प्रवेश केल्यापासून ही केस पुढे सरकली नाही.
याच नारदा स्टिंग ऑपरेशन अंतर्गत तृणमूलचे नेते शुभेंदु अधिकारी व मुकूल रॉय ही ED व CBIच्या रडारवर होते. विधानसभा निवडणुकीपूर्वी या नेत्यांनी भाजपत प्रवेश केला. तेव्हापासून या प्रकरणात कोणतीही खास प्रगती झाली नाही. महाराष्ट्रातील नारायण राणे प्रकरणातही हेच झाले. अशी अनेक उदाहरणे आहेत.
2014 पासून विरोधी पक्षांच्या नेत्यांवर छापे, त्यांच्यावरील खटले व त्यांना अटक करण्याचे प्रकार वाढले आहेत. राष्ट्रीय जनता दलाचे लालू प्रसाद यादव असो, शिवसेनेचे संजय राऊत असो, समाजवादी पक्षाचे आझम खान असो, राष्ट्रवादीचे नवाब मलिक किंवा अनिल देशमुख असो अथवा तृणमूल काँग्रेसचे अभिषेक बॅनर्जी असो. तपास यंत्रणांनी या प्रकरणी ज्या पद्धतीने कारवाई केली त्यावरून त्या केंद्र सरकारच्या इशाऱ्यानुसार काम करत असल्याचा संदेश जात आहे. निवडणुका होणार असताना अशा अनेक घटना घडल्या. त्यावरून तपास यंत्रणांच्या या कारवाया राजकीय हेतूने प्रेरित असल्याचे स्पष्ट होते.
विरोधी पक्षांच्या प्रमुख नेत्यांना ज्या पद्धतीने टार्गेट केले जाते, त्यावरून तुमचे सरकार तपास यंत्रणांच्या मदतीने विरोधकांना संपवण्याचा प्रयत्न करत असल्याच्या आरोपांना बळ मिळते. तुमच्या सरकारवर ज्या एजन्सीचा गैरवापर केल्याचा आरोप होतो, त्यात केवळ एकट्या ईडीचाच समावेश नाही.
या यंत्रणांचा प्राधान्यक्रम चुकीचा असल्याचे स्पष्ट आहे. एका आंतरराष्ट्रीय न्यायवैद्यक वित्तीय संशोधन अहवालानंतर SBI व LIC ने एका कंपनीतील आपल्या शेअर्सच्या मार्केट कॅपिटलायझेशनमधील 78 हजार कोटींहून अधिकची रक्कम गमावली. या तपास यंत्रणांना या कंपन्यांतील आर्थिक विसंगतींची चौकशी करण्याचे काम का सोपवले जात नाही. या कंपन्यांत जनतेचा पैसा लागला आहे.
याशिवाय आणखी एक मुद्दा आहे, ज्यात देशाच्या संघराज्याविरुद्ध युद्ध छेडले जात आहे. देशभरातील राज्यपालांच्या कार्यालयांनी घटनेतील तरतुदींच्या विरोधात जाऊन राज्याच्या कामकाजात अडथळे आणण्यास सुरुवात केली आहे. ते जाणीवपूर्वक लोकशाही पद्धतीने निवडून आलेल्या राज्य सरकारांना कमी लेखत आहेत. विशेषतः त्यांच्या इच्छेनुसार सरकारचे कामकाज प्रभावित करण्याचा प्रयत्न करत आहेत. महाराष्ट्र, तामिळनाडू, पश्चिम बंगाल, पंजाब, तेलंगणा किंवा दिल्लीचे राज्यपाल असो, ते सध्या केंद्र सरकार व बिगर-भाजपशासित राज्यांमधील वाढत्या दरीचा चेहरा बनले आहेत. यामुळे मिळून काम करणाऱ्या संघराज्याच्या भावनेला धोका निर्माण झाला आहे. केंद्राकडून कोणतेही योगदान नसतानाही ही भावना राज्यांनी आजवर कायम ठेवली आहे. त्यामुळे भारतीय लोकशाहीतील राज्यपालांच्या भूमिकेवर देशातील जनता प्रश्नचिन्ह उपस्थित करत आहे.
केंद्रीय यंत्रणा व राज्यपाल पदासारख्या घटनात्मक कार्यालयांचा विरोधी पक्षांचा हिशेब करण्यासाठी करण्यात येणारा गैरवापर अत्यंत निषेधार्ह आहे. ही आपल्या लोकशाहीसाठी चांगली गोष्ट नाही. 2014 पासून या यंत्रणांचा गैरवापर वाढला आहे. यामुळे त्यांची प्रतिमा मलिन झाली असून, त्यांची स्वायत्ता व निःपक्षपातीपणावर प्रश्न निर्माण झाला आहे. जनतेचा या यंत्रणांवरील विश्वास उडाला आहे.
लोकशाहीत जनतेची इच्छा सर्वोतपरी असते. जनतेने दिलेल्या कौलाचा आदर झाला पाहिजे, मग भलेही तो कौल तुमच्या विरोधी विचारसरणी असणाऱ्या एखाद्या पक्षाच्या बाजूने का असेना.
पुणे : रोटरी क्लब ऑफ चाळीसगाव यांच्यातर्फे आयोजित २१ व्या मोफत हॅन्ड व प्लास्टिक सर्जरी शिबिरात १३१ रुग्णांवर यशस्वी उपचार करण्यात आले. चाळीसगाव येथील डॉ. अमित जैन यांच्या महावीर रुग्णालयात हे शिबीर झाले. शिबिराचे हे २१ वे वर्ष होते. जन्मजात आलेले अपंगत्व, भाजल्याने आलेले अपंगत्व, वाकड्या नाकात सुधारणा, हनुवटीच्या आकारात बदल, गोंदण, मस व चेहऱ्यावरील व्रण, जन्मतः असलेले व्यंग, दुभंगलेले ओठ, वाकडी बोटे आदी गोष्टींवर प्लास्टिक व कॉस्मेटिक सर्जरी करण्यात आली. पुण्यातील प्रसिद्ध हॅन्ड सर्जन डॉ. पंकज जिंदल यांच्या नेतृत्वात मुंबईतील प्लास्टिक सर्जन डॉ. शंकर सुब्रह्मण्यम, औरंगाबाद येथील डॉ. अविनाश येळीकर, नाशिकमधील डॉ. प्रशांत मुन, गोव्यातील भूलतज्ज्ञ डॉ. नोएल ब्रिट्टो यांनी दोन दिवसांत शस्त्रक्रिया केल्या. वैद्यकीय संचालक डॉ. उज्ज्वल देवरे यांनी सर्व टीमचे कौतुक केले. शिबिराच्या उद्घाटनासाठी रोटरी क्लबचे प्रांतपाल डॉ. आनंद झुनझुनवाला यांच्या हस्ते झाले. या उपक्रमाचे कौतुक करत हे शस्त्रक्रिया शिबीर त्यांच्या भागातही आयोजित करणार असल्याचे सांगितले. या उपचारांमुळे अशा रुग्णांना पुन्हा एकदा स्वतःच्या पायावर उभे राहून सन्मानाने जगण्याची संधी मिळाली आहे. जळगाव, शहादा, पुणे, शिरूर, वडूज येथेही असे शिबीर आयोजित करण्यात येते, असे डॉ. पंकज जिंदल म्हणाले.
घाटकोपर अमृतनगरमधील छत्रपती शिवाजी महाराज चौकातून यात्रेला सुरूवात
मुंबई: जोरदार शक्तिप्रदर्शन करत भाजपा आणि शिवसेनेच्या आशीर्वाद यात्रेला घाटकोपर पश्चिम अमृतनगरमधील छत्रपती शिवाजी महाराज चौकातून जोरदार सुरूवात झाली. भाजपा मुंबई अध्यक्ष आ. ॲड. आशिष शेलार, खा. मनोज कोटक यांच्या प्रमुख उपस्थितीत अयोध्येतून आणलेला धनुष्यबाण उंचावत यात्रेची सुरुवात झाली. यावेळी हजारोंच्या संख्येने भाजपा – शिवसेनेचे कार्यकर्ते सहभागी झाले होते. एकूण सहा लोकसभा मतदार संघातून ही यात्रा निघणार आहे.
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून आशीर्वाद यात्रेला सुरूवात झाली. यात्रेत जवळपास १० हजारांपेक्षा जास्त कार्यकर्ते बाईकवर स्वार होऊन भाजपा – शिवसेना झेंडा फडकवत सहभागी झाले. यात्रा मुलुंड बाळराजेश्वर मंदिरापर्यंत काढण्यात आली.
यावेळी बोलताना भाजपा मुंबई अध्यक्ष आ. ॲड. आशिष शेलार म्हणाले, “भाजप आणि शिवसेना सोबत असून धनुष्यबाण चिन्ह आणि बाळासाहेब ठाकरेंचे हिंदुत्व आमच्याबरोबर आहे याचा आनंद आहेच, तसा आनंद जनतेलाही आहे. जनतेचा आशिर्वाद घेण्यासाठीच ही यात्रा आहे.” असेही ते म्हणाले. यावेळी आ. राम कदम, आ. मिहीर कोटेचा, आ. पराग शाह यांच्यासह भाजपा पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पुणे- कसबा विधानसभा पोटनिवडणुक निकालानंतर पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी शनिवारी रात्री उशिरा खासदार गिरीश बापट यांची भेट घेतली. यावेळी हेमंत रासने यांच्या भेटीत कार्यकर्त्यांशी देखील संवाद साधून पुन्हा जोमाने कामाला लागण्याची सूचना केली.
कसबा विधानसभा पोटनिवडणुकीत भाजपा शिवसेना महायुतीचे उमेदवार हेमंत रासने यांचा अनपेक्षित पराभव झाला. या पराभवानंतर काही कार्यकर्ते निराश झाले होते. शनिवारी पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी हेमंत रासने यांच्या घरी सदिच्छा भेट दिली. या भेटीवेळी रासने यांच्या घरी कसबा मंडलाचे सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या भेटीत पालकमंत्री पाटील यांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधला. “भाजपा हा कार्यकर्त्यांचा पक्ष आहे. पोट निवडणुकीत भाजपाच्या सर्व कार्यकर्त्यांनी कठोर परिश्रम घेतले. संघर्ष हा भाजपाचा स्थायीभाव आहे. संघर्षाच्या बळावरच आपण अनेक आव्हानांचा अतिशय समर्थपणे सामना करुन परतवून लावली. पक्ष सर्व कार्यकर्त्यांच्या सदैव पाठीशी आहे. त्यामुळे खचून न जाता सर्वांनी पुन्हा नव्या जोमाने कामाला लागावे, आगामी काळात विजय आपलाच आहे,” असा विश्वास दिला. यानंतर सर्वांनी आता जिंकेपर्यंत लढायचं, असा निर्धार व्यक्त केला.
यदरम्यान, रासने यांच्या भेटीपूर्वी नामदार चंद्रकांतदादा पाटील यांनी खा. गिरीश बापट यांचीही सदिच्छा भेट घेतली. यावेळी श्री. पाटील यांनी खा. बापट तब्येची विचारपूस केली. ‘बापट साहेब आपण काळजी घ्या, आणि लवकर बरे व्हा!’ अशी सदिच्छा व्यक्त केली.
ठाणे : ठाणे महापालिकेने केलेल्या विविध प्रकल्पांचे लोकार्पण आज करण्यात आले. हा ठाणेकरांसाठी आनंदाचा दिवस आहे. ठाणे बदलत असल्याचे दृश्य परिणाम दिसू लागले आहेत, असे उद्गार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज वागळे इस्टेटमधील लोकार्पण सोहळ्यात काढले. मुंबईप्रमाणेच ठाणेदेखील आंतराष्ट्रीय शहर करण्यासाठी राज्य शासनाकडून लागेल ती मदत देण्याची ग्वाहीसुद्धा मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली.
केंद्र शासन, महाराष्ट्र शासन, ठाणे महानगरपालिका आणि ठाणे स्मार्ट सिटी लिमिटेड यांच्या वतीने निर्माण करण्यात आलेल्या विविध विकास कामांचा लोकार्पण व भूमिपूजन सोहळा शनिवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते पार पडला. यावेळी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, आमदार प्रताप सरनाईक, माजी आमदार रवींद्र फाटक, माजी महापौर नरेश म्हस्के, परिवहन सभापती विलास जोशी, आयुक्त अभिजीत बांगर, अतिरिक्त आयुक्त (१) संदीप माळवी, अतिरिक्त आयुक्त (२) संजय हेरवडे, माजी नगरसेवक आणि नगरसेविका आदी मान्यवर उपस्थित होते.
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची सभा ज्या गावदेवी मैदानात झाली, ते मैदान सुरक्षित ठेवून तेथे चांगली पार्किंग सुविधा तयार करण्यात आली आहे. त्याचबरोबर, कळवा रुग्णालयातील सुविधांचा ठाणेकरांना फायदा होईल. इलेक्ट्रिक बसेस या ठाणे प्रदूषणमुक्त करण्याची पहिली पायरी आहेत. वागळे इस्टेटमधली वाहतूक बेट तर सेल्फी पॉइंट झाले आहे, असे मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले.
ठाण्याच्या इतिहासात राज्य शासनाने प्रथमच एवढा निधी ठाणे महापालिकेस दिला आहे. त्याचा व्यवस्थित विनियोग केला जावा. लोकांचा पैसा लोकांसाठीच्या सुविधांसाठी खर्च झाला पाहिजे. त्या सुविधा गुणवत्तापूर्ण असाव्यात. रस्ते, प्रकल्प यात दर्जा राखला जात नसेल तर कोणतीही तमा न बाळगता कारवाई करा, असे निर्देश त्यांनी आयुक्तांना दिले. त्याचवेळी, छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयातील निवासी डॉक्टरांनी केलेल्या तक्रारींची दखल घेत त्याला कारणीभूत असलेल्या अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचे आदेशही मुख्यमंत्र्यांनी आयुक्तांना दिले.
‘मुख्यमंत्र्यांचे बदलते ठाणे’ या अभियानांतर्गत खड्डेमुक्त ठाणे, कचरा कुंड्यांपासून मुक्ती, शौचालय सुधारणा आणि सौंदर्यीकरण ही कामे सुरू झाली आहेत. ३१ मेपर्यंत ठाणे शहरात आणखी बदल दिसतील आणि ठाणेकरांना सुखद अनुभव मिळेल, अशी ग्वाही आयुक्त अभिजीत बांगर यांनी प्रास्ताविकपर भाषणात दिली.
वाचनालयाचे कौतुक
छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात ‘लेट्स रिड इंडिया फाऊंडेशन’ यांच्या सहकार्याने करण्यात आलेल्या वाचनालयाचे मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी कौतुक केले. ही अतिशय चांगली कल्पना आहे. या वाचनालयाची रचना, त्याची मांडणी आणि त्यातील पुस्तके ही सगळी कल्पना नाविन्यपूर्ण आहे, असे मुख्यमंत्री म्हणाले. वाचन संस्कृती वाढवणारा हा उपक्रम पाहून आनंद झाला, अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी नोंदवली. वाचनालयाच्या या उपक्रमाचा विस्तार करण्याचा महापालिकेचा मनोदय असल्याचे आयुक्त श्री. बांगर यांनी सांगितले.
…थेट नवीन घरात!
ठाण्यातील धोकादायक इमारती हा आपल्या चिंतेचा विषय आहे. म्हणून त्यावर राज्य सरकारने क्लस्टरची योजना आणली आहे. या योजनेत सहभागी होणाऱ्यांनी संक्रमण शिबिरांची भीती बाळगू नये. मोकळ्या जागांवर इमारती बांधून नागरिकांना थेट नवीन घर देण्याचा प्रयत्न आहे. त्याबद्दल कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केले. तसेच, या कामांतील बहुतेक सगळे अडथळे आता दूर झाले आहेत. त्यामुळे तातडीने कामाला सुरूवात करुया, अशा सूचना आयुक्त श्री. बांगर यांना दिल्या.
नवीन रेल्वे स्थानकाचा लाभ ठाणेकरांना
ठाणे ते मुलुंड दरम्यानच्या नवीन रेल्वे स्थानकासाठी मनोरुग्णालयाची जमीन मिळण्यातील स्थगिती उच्च न्यायालयाने उठवली आहे. त्यामुळे नवीन स्थानकाचा मार्ग मोकळा झाला आहे. या स्थानकामुळे मूळ ठाणे स्थानकावरील ताण कमी होईल आणि लाखो ठाणेकरांना त्याचा लाभ मिळेल, असे मुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले.
कंटेनरमधील शौचालये हायवेवरही!
वागळे इस्टेटमध्ये तात्पुरत्या स्वरुपात बांधण्यात आलेल्या कंटनेरमधील शौचालय या संकल्पनेचे मुख्यमंत्री महोदयांनी कौतुक केले. अशा प्रकारची शौचालये हायवेलगत उभारून नागरिकांची गैरसोय टाळता येईल, अशी सूचनाही त्यांनी केली. नागरिकांनीही शहरातील स्वच्छतेसाठी जबाबदारीने वागावे, असे आवाहनही त्यांनी केले.
लोकार्पण आणि भूमिपूजन
कोपरी खाडी किनारा विकास प्रकल्प, गावदेवी भूमिगत वाहनतळ, कळवा खाडी किनारा विकास प्रकल्प, छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात नव्याने तयार करण्यात आलेल्या सुसज्ज अशा प्रसूतिगृहाचे व वाचनालयाचे उद्घाटन, तसेच ब्लड डोनेशन व्हॅन, नातेवाईकांसाठी रात्र निवारा, अक्षयचैतन्य संस्थेतर्फे रुग्णांसाठीच्या मोफत भोजन कक्षाचे लोकार्पण मुख्यमंत्री श्री. शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले. त्याशिवाय, वागळे इस्टेट येथील रोड नं. २२ च्या वाहतूक बेटाचे सुशोभीकरण, ३९१ कोटींच्या रस्ता मजबूतीकरण प्रकल्पांचे भूमिपूजन, परिवहन सेवेत दाखल झालेल्या इलेक्ट्रिक बसगाड्यांचे लोकार्पण मुख्यमंत्री श्री. शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले.
पुणे, दि. ५ मार्च, २०२३: संगीतमार्तंड पं जसराज यांचे शिष्य व मेवाती घराण्याचे सुप्रसिद्ध गायक पं संजीव अभ्यंकर यांचे बहारदार गायन आणि इमदादखानी घराण्याचे जग प्रसिद्ध सतारवादक पं बुधादित्य मुखर्जी यांच्या सुमधुर सतारवादनाने ९ व्या गानसरस्वती महोत्सवाचे दुसरे सत्र रंगले.
गानसरस्वती किशोरी आमोणकर यांच्या भारतीय शास्त्रीय संगीतातील अलौकिक योगदानाला मानवंदना देण्यासाठी नाट्यसंपदा प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या गानसरस्वती महोत्सवाचे आजचे (रविवार, ५ मार्च) दुसरे सत्र हे सकाळी ७ वाजता सुरू झाले. रसिक प्रेक्षकांनी याला मोठ्या प्रमाणात उपस्थिती लावीत प्रभातकालीन रागांचा मनमुराद आस्वाद घेतला.
महोत्सवाचे हे ९ वे वर्ष असून राजाराम पुलाजवळील डी पी रस्ता येथील केशवबाग या ठिकाणी महोत्सव संपन्न होत आहे. किशोरी आमोणकर यांचे सुपुत्र निहार आणि बिभास आमोणकर, महोत्सवाचे आयोजक पं रघुनंदन पणशीकर, अपर्णा पणशीकर, गायक पं सत्यशील देशपांडे, बेलवलकर हाउसिंगचे समीर बेलवलकर आदी यावेळी उपस्थित होते.
पंडित संजीव अभ्यंकर यांनी राग रामकलीने आपल्या गायनाला सुरुवात केली. यामध्ये त्यांनी विलंबित एकताल ‘ आज राधे तोरे…’ ही व मध्यलय तीनतालमध्ये ‘राधा नंद नंदन अनुरागी…’ ही रचना प्रस्तुत केली
किशोरीताई या कायमच माझ्या गुरुस्थानी होत्या असे सांगत संजीव अभ्यंकर म्हणाले, “कलेचे अंतिम रूप हे भावनिक असते तर तिथवर जाणारा रस्ता हा बौद्धिक असतो मात्र या सर्वांचं उद्दिष्ट मात्र केवळ आत्मिक असतं. असं किशोरीताई नेहमी सांगायच्या. अनुभवाचे मार्ग वेगवेगळे असले तरी अंतिम ध्येय हे प्रत्येक कलाकारासाठी एकच असतं असही त्या म्हणायच्या.”
आमची पिढी ही फोटो वगैरे काढणारी नव्हती तसा माझाही किशोरीताईं सोबत एकही फोटो नव्हता. त्या जायच्या एक वर्ष अगोदर मुंबईत नेहरू सेंटरला त्यांचा एका कार्यक्रम होता, या कार्यक्रमाच्या आधी मी त्यांना भेटलो आणि तुमच्या सोबत माझा फोटो नाही आता काढायचा आहे असे सांगितले. त्या म्हणाल्या कार्यक्रमानंतर काढूयात. मात्र मी हट्ट केला की आधीच हवा आहे, तेव्हा खूप छान हसऱ्या चेहऱ्याने किशोरीताई यांनी माझ्यासोबत फोटो काढला, अशी आठवण अभ्यंकर यांनी आवर्जून सांगितली.
यांनतर त्यांनी राग भटियारमध्ये अद्धा तीनतालात ‘या मोहन के मैं रूप लुभानी…’ व द्रुत एकतालात ‘जागो जागो नंद के लाल…’ या स्वरचित बंदिशी सादर केल्या. यांनतर त्यांनी राग जौनपुरी प्रस्तुत केला. यामध्ये आलाप झंकार सादर करीत ‘पायल की झंकार बैरनिया…’ या मध्यलय तीन तालातील बंदिशीने त्यांनी आपल्या गायनाचा समारोप केला. त्यांना आशय कुलकर्णी (तबला), अभिषेक शिनकर (संवादिनी), धनंजय म्हैसकर, मुक्ता जोशी, वेलिना पात्रा, साईप्रसाद पांचाळ यांनी स्वरसाथ केली.
यानंतर इमदादखानी घराण्याचे जगप्रसिद्ध सतारवादक पं बुधादित्य मुखर्जी यांचे सतारवादन संपन्न झाले. त्यांनी राग ललितच्या प्रस्तुतीने आपल्या वादनाला सुरुवात केली. यामध्ये त्यांनी तीनतालचे दमदार सादरीकरण करीत उपस्थितांची मने जिंकली. राग अल्हैया बिलावलच्या सादरीकरणाने त्यांनी आपल्या सतारवादनाचा समारोप केला. त्यांना सोमेन नंदी यांनी समर्थ अशी तबलासाथ केली.
मुंबई: इलेक्ट्रिक वाहनधारकांची गाड्यांच्या चार्जिंगची समस्या सोडविण्यासाठी विकसित केलेल्या सुविधेसाठी महावितरणला ‘आयएसजीएफ इनोव्हेशन ॲवॉर्ड २०२३’ हा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला. महावितरणचे संचालक प्रसाद रेशमे यांनी शुक्रवारी सायंकाळी नवी दिल्ली येथे एका समारंभात हा पुरस्कार स्वीकारला. या यशाबद्दल महावितरणचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल यांनी कंपनीच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांचे अभिनंदन केले.
इंडिया स्मार्ट ग्रिड फोरम (आयएसजीएफ) या संस्थेतर्फे २०१७ पासून ‘आयएसजीएफ इनोव्हेशन ॲवॉर्ड’ दिले जातात. वीज, पाणी, वायू आणि विद्युत वाहनांच्या क्षेत्रात नवा मानदंड प्रस्थापित करणाऱ्या कंपन्यांना हे पुरस्कार दिले जातात. महावितरणला ‘इमर्जिंग इनोव्हेशन इन इलेक्ट्रिक मोबिलिटी डोमेन’ या वर्गवारीत विजेता म्हणून पुरस्कार मिळाला.
केंद्र सरकार व राज्य सरकारचे इलेक्ट्रिक वाहनांना प्रोत्साहन देण्याचे धोरण आहे. त्यासाठी महाराष्ट्रात महावितरणला राज्य नोडल एजन्सी म्हणून नियुक्त करण्यात आले आहे. इलेक्ट्रिक वाहनांसाठी विशेष दर निश्चित करणे, इलेक्ट्रिक वाहनांसाठी चार्जिंगच्या पायाभूत सुविधा विकसित करणे, चार्जिंग स्टेशन उभारणे, वेब पोर्टल विकसित करणे आणि मोबाईल ॲप विकसित करणे असे विविध पुढाकार महावितरणने हाती घेतले आहेत.
महावितरणने स्वतःची ‘इलेक्ट्रिक व्हेईकल चार्जिंग स्टेशन्स’ उभारण्यासोबतच इलेक्ट्रिक वाहनधारकांसाठी पॉवर अप नावाचे मोबाईल ॲप विकसित केले आहे. त्याचा वापर करून इलेक्ट्रिक वाहनधारक जवळचे चार्जिंग स्टेशन शोधून काढू शकतो, स्वतः गाडीचे चार्जिंग करू शकतो आणि त्यासाठीचे पैसे ऑनलाईन भरू शकतो. महावितरणच्या चार्जिंग स्टेशनसोबत खासगी चार्जिंग स्टेशनबद्दल माहिती मिळण्यासाठी हे ॲप उपयोगी पडते. पॉवर अप या मोबाईल ॲप्लिकेशनमधील ‘मॅप मी’ या सुविधेच्या आधारे महावितरणच्या तसेच अन्य कंपन्यांच्या चार्जिंग स्टेशनची माहिती मिळते.
हे ॲप मराठी व इंग्रजी दोन्ही भाषांमध्ये काम करते. महावितरणला केंद्रीय पद्धतीने सर्व चार्जिंग स्टेशन्सवर देखरेख ठेवणे शक्य होते. आतापर्यंत या ॲप्लिकेशनवर २५०० खासगी व महावितरणची चार्जिंग स्टेशन्स जोडली गेली आहेत. यापूर्वी आत्मनिर्भर भारत शिखर परिषद स्कोच २०२२ पुरस्काराने या प्रकल्पाचा सन्मान झाला आहे.
महावितरणच्या कार्यालयात आणि सब स्टेशन्समध्ये इलेक्ट्रिक वाहनांची चार्जिंग स्टेशन काही ठिकाणी उभारण्यात आली आहेत व ती मनुष्यबळाशिवाय चालतात. तेथे जाऊन वाहनचालक स्वतः चार्जिंग करून घेऊ शकतो. महाराष्ट्रात महावितरणने इलेक्ट्रिक चार्जिंग स्टेशन्ससाठी विविध ठिकाणी जागा निश्चित केल्या असून चार्जिंग स्टेशन्सची संख्या गतीने वाढविण्याचे नियोजन केले आहे.
मुंबई, दि. 4 – सर्वांना परवडणाऱ्या किमतीत दर्जेदार जेनेरिक औषधे उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने नोव्हेंबर 2008 मध्ये भारत सरकारच्या रसायन आणि खते मंत्रालयाच्या फार्मास्युटिकल्स विभागाद्वारे प्रधानमंत्री भारतीय जनऔषधी योजना (PMBJP) सुरू करण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत वाजवी दरात जेनेरिक औषधे उपलब्ध करुन देण्यासाठी जन औषधी केंद्रे म्हणून ओळखले जाणारे समर्पित आउटलेट्स उघडण्यात आले आहेत.
31 ऑक्टोबर 2022 पर्यंत देशभरात 8819 जनऔषधी केंद्रे कार्यरत आहेत. प्रधानमंत्री भारतीय जनऔषधी योजना PMBJP च्या उत्पादनाच्या टोपलीमध्ये 1759 औषधे आणि 280 शस्त्रक्रिया वस्तूंचा समावेश आहे. ही योजना सोसायटी नोंदणी कायद्यांतर्गत नोंदणीकृत सोसायट्यांद्वारे लागू केली जाते, उदाहरणार्थ फार्मा आणि मेडिकल ब्युरो ऑफ इंडिया (PMBI) [पूर्वीचे ब्युरो ऑफ फार्मा PSUs ऑफ इंडिया (BPPI)].
लोकसंख्येच्या सर्व घटकांना विशेषत: गरीब आणि वंचितांना दर्जेदार औषधांची उपलब्धता सुनिश्चित करणे, प्रसिद्धीद्वारे जेनेरिक औषधांबद्दल जागरूकता निर्माण करणे, पीएमबीजेपी केंद्रे उघडण्यासाठी वैयक्तिक उद्योजकांना सहभागी करून रोजगार निर्मिती करणे ही या योजनेची उद्दिष्टे आहेत.
पुणे – सिम्बायोसिस इंटरनॅशनलने आयोजित केलेला दोन दिवसीय आंतरराष्ट्रीय युवा आणि शाश्वतता महोत्सव 2023 आज पुण्यात सुरू झाला. पुण्यात 10 आणि 11 मार्च रोजी नियोजित आगामी Y20 सल्लामसलत बैठकीची पूर्वतयारी म्हणून सिम्बायोसिस सेंटर फॉर वेस्ट रिसोर्स मॅनेजमेंट आणि एक्सप्लोरइट द्वारे संयुक्तपणे आयोजित, या महोत्सवाचे उद्दिष्ट, तरुणांना शाश्वतता आणि पर्यावरणावर चर्चा करण्यासाठी आणि शिक्षित करण्यासाठी एकत्र आणणे हेच आहे. महोत्सवाचे उद्घाटन “वॉटर मॅन ऑफ इंडिया” डॉ. राजेंद्र सिंह आणि मुंबई आयकर विभागाचे अतिरिक्त आयुक्त डॉ. उज्ज्वल चौहान यांच्या हस्ते झाले. या महोत्सवाच्या सह-यजमानांमध्ये सिम्बायोसिस इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीज, पुणे, सिम्बायोसिस सेंटर फॉर क्लायमेट चेंज अँड सस्टेनेबिलिटी, सिम्बायोसिस सेंटर फॉर आउटरीच प्रोग्राम अँड एक्स्टेंशन, एपीसीसीआय आणि क्लायमेट रिॲलिटी प्रोजेक्ट यांचा समावेश आहे.
अतिथी डॉ. उज्ज्वल चौहान यांनी जळगावातील अनेक गावांमधील पाणीटंचाई आणि संवर्धनाचा त्यांचा प्रेरणादायी प्रवास शब्दरुपात मांडला. एका शेतकऱ्याच्या मृत्यूच्या बातमीने प्रेरित होऊन हे कार्य सुरू केल्याचे त्यांनी सांगितले. 40,000 हून अधिक शेतकर्यांना फायदा मिळवून देणाऱ्या तसेच 70 हून अधिक गावांना दुष्काळमुक्त करण्यासाठी 500 कोटी लिटर क्षमतेचे जलसाठे यशस्वीपणे बांधण्याच्या त्यांच्या सफल कामगिरीचा प्रवास त्यांनी वर्णित केला.
आपल्या प्रमुख भाषणात प्रमुख पाहुणे डॉ. राजेंद्र सिंह यांनी त्यांचे बालपणीचे अनुभव आणि निसर्गावर आधारित शिक्षणाबाबत सांगितले. तरुणांना पर्यावरणाची जबाबदारी घेण्या उचलण्यासाठी त्यांनी प्रेरित केले. मुख्य प्रवाहातील शिक्षण पद्धतींपेक्षा निसर्गाकडून मिळणारे वास्तविक शिक्षण हे शिकण्यासाठीचे अनेक मार्ग खुले करते यावर त्यांनी भर दिला.
भारत आणि दक्षिण आशियातील क्लायमेट रिॲलिटी प्रोजेक्टचे प्रमुख आदित्य पुंडीर उद्घाटन सत्राला उपस्थित होते. सिम्बायोसिस इंटरनॅशनल (डीम्ड युनिव्हर्सिटी)चे कुलसचिव डॉ. एम.एस. शेजूळ यांनी या कार्यक्रमात स्वागतपर भाषण केले तसेच पाहुण्यांचा सत्कार केला. सिम्बायोसिस सेंटर फॉर वेस्ट रिसोर्स मॅनेजमेंटचे संचालक डॉ. माणिकप्रभू धानोरकर आणि एक्स्प्लोरायटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी शिवम सिंग हे देखील या वेळी उपस्थित होते.
मुंबई- आत्मनिर्भर भारताचे उद्दिष्ट साध्य करण्याच्या दिशेने एक महत्वाचे पाऊल टाकत महराष्ट्रातल्या विदर्भ भागात वणी-वरोडा महामार्गावर जगातील पहिले 200 मीटर लांब असे बांबूचे रस्त्याकडेचे कठडे म्हणजे बांबू क्रॅश बॅरियर उभरण्यात आले आहेत.
‘बाहु बल्ली’ असं नाव दिलेल्या, या बांबूच्या कुंपण्याचा टिकावूपणा तपासण्यासाठी इंदूरमधल्या पिथमपूर येथील नॅशनल ऑटोमोटिव्ह टेस्ट ट्रॅक्स (NATRAX) सारख्या विविध सरकारी संस्थांमध्ये अनेक कठोर परीक्षा घेण्यात आल्या.रुरकी इथल्या इमारत संशोधन संस्था (CBRI) सेंट्रल येथे आयोजित केलेल्या आगनिरोधक चाचणीत या कुंपणाला प्रथम श्रेणी मिळाली. तसेच, इंडियन रोड काँग्रेसनेही त्याला मान्यता दिली आहे. बांबू कुंपणाचे पुनर्वापर मूल्य 50-70 टक्के आहे तर स्टीलच्या कुंपणाचे पुनर्वापर मूल्य 30-50 टक्के आहे.
बांबुसा बालकोआ या बांबूच्या प्रजातीपासून, हे कुंपण बनवण्यात आले आहे. डांबरापासून बनवलेल्या क्रिओसोट या लाकूड रक्षक तेलाने त्यावर प्रक्रिया केली गेली आहे. तसेच हाय-डेन्सिटी पॉली इथिलीनचे लेपन त्यावर करण्यात आले आहे.
बांबूचे हे मजबूत कठडे तयार करण्यात आलेले यश बांबू क्षेत्रासाठी आणि संपूर्ण भारतासाठी उल्लेखनीय आहे, कारण हा क्रॅश बॅरियर स्टीलला एक परिपूर्ण पर्याय ठरू शकेल आणि पर्यावरणविषयक प्रश्नावरही त्यामुळे उत्तर मिळू शकेल. त्याशिवाय, हा एक कृषीसंलग्न ग्रामीण व्यवसाय म्हणून देखील उपयुक्त ठरू शकेल.
सेवा भवन उद्घाटन कार्यक्रमात सरसंघचालकांचे प्रतिपादन पुणे, ४ मार्च– स्वार्थ हा सेवेची प्रेरणा कधीही होऊ शकत नाही. सेवा धर्म गहन आहे परंतु तो माणुसकीचा धर्म आहे, असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मा. डॉ. मोहन भागवत यांनी शनिवारी केले. जनकल्याण समितीच्या सुवर्ण महोत्सवी वर्षाच्या सांगता वर्षानिमित्त राष्ट्रीय स्वयंसेवक संघ जनकल्याण समिती, जनकल्याण सेवा फाउंडेशन आणि डॉ. हेडगेवार स्मारक सेवा निधी या संस्थांनी मिळून ‘सेवा भवन’ या सेवा प्रकल्पाची निर्मिती केली आहे. या प्रकल्पाचे उद्घाटन सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांच्या हस्ते शनिवारी करण्यात आले. यानिमित्त आयोजित कार्यक्रमात सरसंघचालक बोलत होते.
संघाचे पश्चिम महाराष्ट्र प्रांत संघचालक सुरेश उर्फ नाना जाधव, ‘जनकल्याण समिती’चे प्रांत अध्यक्ष डॉ. रवींद्र साताळकर, ‘जनकल्याण सेवा फाऊंडेशन’चे संचालक महेश लेले आणि ‘डॉक्टर हेडगेवार स्मारक सेवा निधी संस्थे’चे कोषाध्यक्ष माधव (अभय) माटे यावेळी व्यासपीठावर उपस्थित होते. जनकल्याण समितीच्या ५० वर्षांच्या वाटचालीचा आढावा घेणाऱ्या ‘अहर्निशं सेवामहे’ याग्रंथाचे प्रकाशन या प्रसंगी सरसंघचालकांच्या हस्ते करण्यात आले. तसेच हरीओम काका मालशे यांचा सामाजिक कार्याबद्दल सत्कार करण्यात आला. यावेळी सरसंघचालक म्हणाले, “जनकल्याण समितीने ५० वर्षे सेवेचे हे कार्य चालविले त्याचा हा उत्सव आहे. संकटकाळात कोणी तरी उभे राहण्याची गरज असते आणि समाज संकटात असला की त्यासाठी काही ना काही करणाऱ्या व्यक्ती समाजात असतातच. देशात सर्वत्र सेवाकार्य चालू आहेत. जनकल्याण समितीचे कार्य हा त्यातील एक भाग आहे.” ते पुढे म्हणाले, समरसता हे सेवेचे तत्त्व आहे आणि सद्भावना हा सेवेचा व्यवहार आहे. मात्र सेवेचा परिणाम सेवा हाच आहे. सेवा करताना हे आम्ही केलं हा अहंकार नसावा. समाज भरभरून देतो मात्र समाजाला हे कळावं लागतं की ही माणसं विश्वासार्ह आहेत. सेवा शब्दा हा भारतीय आहे आणि सर्व्हिस या शब्दात मोबदल्याची अपेक्षा आहे. ते म्हणाले,”सेवा ही मजबूरी नाही किंवा ती भीतीने होऊ शकत नाही. सेवा ही आपली सहज प्रवृत्ती आहे. माणूस म्हटले की संवेदना असतेच. हे अस्तित्वाच्या एकतेचे रहस्य आहे.हे आध्यात्मिक असले तरी वास्तविक सत्य आहे. सर्वांमध्ये असलेल्या चैतन्यामुळे करूणा हा गुण येतो.” प्रास्ताविक करताना डॉ. रवींद्र साताळकर म्हणाले, “जनकल्याण समिती गेली ५९ वर्षे कार्यरत आहे. सध्या विदर्भ वगळता उर्वरित महाराष्ट्रात समितीचे १८८० प्रकल्प सुरू आहेत.” तुकाराम नाईक यांनी प्रमुख पाहुण्यांचा परिचय करून दिला. जनकल्याण समितीचे प्रांत सहमंत्री विनायक डंबीर यांनी ग्रंथाची माहिती दिली. अभय माटे यांनी आभार प्रदर्शन केले.