पुणे, दि. ५ मार्च, २०२३: संगीतमार्तंड पं जसराज यांचे शिष्य व मेवाती घराण्याचे सुप्रसिद्ध गायक पं संजीव अभ्यंकर यांचे बहारदार गायन आणि इमदादखानी घराण्याचे जग प्रसिद्ध सतारवादक पं बुधादित्य मुखर्जी यांच्या सुमधुर सतारवादनाने ९ व्या गानसरस्वती महोत्सवाचे दुसरे सत्र रंगले.
गानसरस्वती किशोरी आमोणकर यांच्या भारतीय शास्त्रीय संगीतातील अलौकिक योगदानाला मानवंदना देण्यासाठी नाट्यसंपदा प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या गानसरस्वती महोत्सवाचे आजचे (रविवार, ५ मार्च) दुसरे सत्र हे सकाळी ७ वाजता सुरू झाले. रसिक प्रेक्षकांनी याला मोठ्या प्रमाणात उपस्थिती लावीत प्रभातकालीन रागांचा मनमुराद आस्वाद घेतला.
महोत्सवाचे हे ९ वे वर्ष असून राजाराम पुलाजवळील डी पी रस्ता येथील केशवबाग या ठिकाणी महोत्सव संपन्न होत आहे. किशोरी आमोणकर यांचे सुपुत्र निहार आणि बिभास आमोणकर, महोत्सवाचे आयोजक पं रघुनंदन पणशीकर, अपर्णा पणशीकर, गायक पं सत्यशील देशपांडे, बेलवलकर हाउसिंगचे समीर बेलवलकर आदी यावेळी उपस्थित होते.
पंडित संजीव अभ्यंकर यांनी राग रामकलीने आपल्या गायनाला सुरुवात केली. यामध्ये त्यांनी विलंबित एकताल ‘ आज राधे तोरे…’ ही व मध्यलय तीनतालमध्ये ‘राधा नंद नंदन अनुरागी…’ ही रचना प्रस्तुत केली
किशोरीताई या कायमच माझ्या गुरुस्थानी होत्या असे सांगत संजीव अभ्यंकर म्हणाले, “कलेचे अंतिम रूप हे भावनिक असते तर तिथवर जाणारा रस्ता हा बौद्धिक असतो मात्र या सर्वांचं उद्दिष्ट मात्र केवळ आत्मिक असतं. असं किशोरीताई नेहमी सांगायच्या. अनुभवाचे मार्ग वेगवेगळे असले तरी अंतिम ध्येय हे प्रत्येक कलाकारासाठी एकच असतं असही त्या म्हणायच्या.”
आमची पिढी ही फोटो वगैरे काढणारी नव्हती तसा माझाही किशोरीताईं सोबत एकही फोटो नव्हता. त्या जायच्या एक वर्ष अगोदर मुंबईत नेहरू सेंटरला त्यांचा एका कार्यक्रम होता, या कार्यक्रमाच्या आधी मी त्यांना भेटलो आणि तुमच्या सोबत माझा फोटो नाही आता काढायचा आहे असे सांगितले. त्या म्हणाल्या कार्यक्रमानंतर काढूयात. मात्र मी हट्ट केला की आधीच हवा आहे, तेव्हा खूप छान हसऱ्या चेहऱ्याने किशोरीताई यांनी माझ्यासोबत फोटो काढला, अशी आठवण अभ्यंकर यांनी आवर्जून सांगितली.
यांनतर त्यांनी राग भटियारमध्ये अद्धा तीनतालात ‘या मोहन के मैं रूप लुभानी…’ व द्रुत एकतालात ‘जागो जागो नंद के लाल…’ या स्वरचित बंदिशी सादर केल्या. यांनतर त्यांनी राग जौनपुरी प्रस्तुत केला. यामध्ये आलाप झंकार सादर करीत ‘पायल की झंकार बैरनिया…’ या मध्यलय तीन तालातील बंदिशीने त्यांनी आपल्या गायनाचा समारोप केला. त्यांना आशय कुलकर्णी (तबला), अभिषेक शिनकर (संवादिनी), धनंजय म्हैसकर, मुक्ता जोशी, वेलिना पात्रा, साईप्रसाद पांचाळ यांनी स्वरसाथ केली.
यानंतर इमदादखानी घराण्याचे जगप्रसिद्ध सतारवादक पं बुधादित्य मुखर्जी यांचे सतारवादन संपन्न झाले. त्यांनी राग ललितच्या प्रस्तुतीने आपल्या वादनाला सुरुवात केली. यामध्ये त्यांनी तीनतालचे दमदार सादरीकरण करीत उपस्थितांची मने जिंकली. राग अल्हैया बिलावलच्या सादरीकरणाने त्यांनी आपल्या सतारवादनाचा समारोप केला. त्यांना सोमेन नंदी यांनी समर्थ अशी तबलासाथ केली.
विघ्नेश जोशी यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.