पुणे – सिम्बायोसिस इंटरनॅशनलने आयोजित केलेला दोन दिवसीय आंतरराष्ट्रीय युवा आणि शाश्वतता महोत्सव 2023 आज पुण्यात सुरू झाला. पुण्यात 10 आणि 11 मार्च रोजी नियोजित आगामी Y20 सल्लामसलत बैठकीची पूर्वतयारी म्हणून सिम्बायोसिस सेंटर फॉर वेस्ट रिसोर्स मॅनेजमेंट आणि एक्सप्लोरइट द्वारे संयुक्तपणे आयोजित, या महोत्सवाचे उद्दिष्ट, तरुणांना शाश्वतता आणि पर्यावरणावर चर्चा करण्यासाठी आणि शिक्षित करण्यासाठी एकत्र आणणे हेच आहे. महोत्सवाचे उद्घाटन “वॉटर मॅन ऑफ इंडिया” डॉ. राजेंद्र सिंह आणि मुंबई आयकर विभागाचे अतिरिक्त आयुक्त डॉ. उज्ज्वल चौहान यांच्या हस्ते झाले. या महोत्सवाच्या सह-यजमानांमध्ये सिम्बायोसिस इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीज, पुणे, सिम्बायोसिस सेंटर फॉर क्लायमेट चेंज अँड सस्टेनेबिलिटी, सिम्बायोसिस सेंटर फॉर आउटरीच प्रोग्राम अँड एक्स्टेंशन, एपीसीसीआय आणि क्लायमेट रिॲलिटी प्रोजेक्ट यांचा समावेश आहे.
अतिथी डॉ. उज्ज्वल चौहान यांनी जळगावातील अनेक गावांमधील पाणीटंचाई आणि संवर्धनाचा त्यांचा प्रेरणादायी प्रवास शब्दरुपात मांडला. एका शेतकऱ्याच्या मृत्यूच्या बातमीने प्रेरित होऊन हे कार्य सुरू केल्याचे त्यांनी सांगितले. 40,000 हून अधिक शेतकर्यांना फायदा मिळवून देणाऱ्या तसेच 70 हून अधिक गावांना दुष्काळमुक्त करण्यासाठी 500 कोटी लिटर क्षमतेचे जलसाठे यशस्वीपणे बांधण्याच्या त्यांच्या सफल कामगिरीचा प्रवास त्यांनी वर्णित केला.
आपल्या प्रमुख भाषणात प्रमुख पाहुणे डॉ. राजेंद्र सिंह यांनी त्यांचे बालपणीचे अनुभव आणि निसर्गावर आधारित शिक्षणाबाबत सांगितले. तरुणांना पर्यावरणाची जबाबदारी घेण्या उचलण्यासाठी त्यांनी प्रेरित केले. मुख्य प्रवाहातील शिक्षण पद्धतींपेक्षा निसर्गाकडून मिळणारे वास्तविक शिक्षण हे शिकण्यासाठीचे अनेक मार्ग खुले करते यावर त्यांनी भर दिला.
भारत आणि दक्षिण आशियातील क्लायमेट रिॲलिटी प्रोजेक्टचे प्रमुख आदित्य पुंडीर उद्घाटन सत्राला उपस्थित होते. सिम्बायोसिस इंटरनॅशनल (डीम्ड युनिव्हर्सिटी)चे कुलसचिव डॉ. एम.एस. शेजूळ यांनी या कार्यक्रमात स्वागतपर भाषण केले तसेच पाहुण्यांचा सत्कार केला. सिम्बायोसिस सेंटर फॉर वेस्ट रिसोर्स मॅनेजमेंटचे संचालक डॉ. माणिकप्रभू धानोरकर आणि एक्स्प्लोरायटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी शिवम सिंग हे देखील या वेळी उपस्थित होते.