Home Blog Page 1377

आंतरराष्ट्रीय महिला दिन: शासकीय मध्यवर्ती इमारतीत महिलांचा सन्मान

पुणे, दि.८: आंतराष्ट्रीय महिला दिन आणि आंतरराष्ट्रीय कडधान्य वर्ष हा एक सुरेख संगम असून यानिमित्ताने राज्यातील सर्व माता, भगिनी व महिलांनी आपल्या कुटुंबाचे आरोग्य निरोगी ठेवावे असे आवाहन राज्याचे कृषि आयुक्त सुनील चव्हाण यांनी आज येथे केले. आंतरराष्ट्रीय महिला दिनाचे औचित्य साधून राज्य कृषि आयुक्तालय व विभागीय माहिती कार्यालय पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने पुणे येथील शासकीय मध्यवर्ती इमारतीमध्ये प्रवेशद्वारात सर्व महिला अधिकारी / कर्मचारी यांचा सन्मान स्वागत सोहळा संपन्न झाला. यावेळी ते बोलत होते.
या कार्यक्रमास मुख्य अभियंता, अतुल चव्हाण, सार्वजनिक बांधकाम विभाग, पुणे, कृषिविस्तार प्रशिक्षण संचालक विकास पाटील, कृषि संचालक निविष्ठा व गुणनियंत्रण दिलीप झेंडे, माहिती उपसंचालक डॉ. पुरुषोत्तम पाटोदकर, पर्यटन विभागाच्या उपसंचालक सुप्रिया करमरकर, जिल्हा माहिती अधिकारी डॉ. किरण मोघे आदी उपस्थित होते.
कृषि आयुक्त श्री. चव्हाण यांनी प्रारंभी महिला दिनानिमित्त मध्यवर्ती इमारतीमध्ये कार्यरत असलेल्या सर्व महिला अधिकारी -कर्मचारी यांना महिला दिनाच्या शुभेच्छा देऊन स्वागत केले. पुढे बोलताना ते म्हणाले, संयुक्त राष्ट्रसंघाने यावर्षीचा आंतरराष्ट्रीय महिला दिन ‘डिजिटऑल-लिंग समानतेसाठी नाविन्यता आणि तंत्रज्ञान’ (डिजिटऑल- इनोव्हेशन ॲण्ड टेक्नॉलॉजी फॉर जेंडर इक्वॅलिटी) या संकल्पनेवर राबवण्याचा निर्णय घेतला आहे. या माध्यमातून सर्व महिलांना डिजिटल साक्षर करण्यासह त्यांच्या सर्वसमावेशक विकासाचे काम करणे अपेक्षित आहे.
ते पुढे म्हणाले, भारताच्या प्रयत्नामुळे २०२३ हे वर्ष आंतरराष्ट्रीय भरडधान्य वर्ष म्हणून राबवण्यात येत आहे. महिलावर्ग आरोग्याप्रती जागृत असतात. भरडधान्य हे पौष्टिक असल्याने महिलांनी आपल्या आणि कुटुंबाच्या आरोग्यासाठी त्यांचा पुरेपूर वापर करावा असेही आवाहन त्यांनी केले.
माहिती उपसंचालक डॉ. पुरुषोत्तम पाटोदकर म्हणाले, महिला दिनाचे औचित्य साधून स्त्रीशक्ती प्रती आदर व्यक्त करण्यासाठी हा उपक्रम राबवण्यात येत आहे. स्त्री ही कुटुंबाचे आर्थिक, मानसिक स्थैर्य तसेच आरोग्यासाठी नेहमी झटत असते. त्यामुळे महिलांप्रती आपल्याकडे नेहमीच आदरभाव असला पाहिले. या उपक्रमाच्या माध्यमातून तृणधान्याचे महत्त्व महिलांपर्यंत पोहोचवण्याचे काम करण्यात येत आहे, असेही डॉ. पाटोदकर म्हणाले.
आंतरराष्ट्रीय भरडधान्य वर्ष व महिला दिनानिमित्त अतिशय चांगला उपक्रम राबविल्याबद्दल मुख्य अभियंता अतुल चव्हाण यांनी कृषि आयुक्तालय व विभागीय माहिती कार्यालयाचे कौतुक केले. त्यांनी महिला अधिकारी-कर्मचाऱ्यांना शुभेच्छा दिल्या.
शासकीय मध्यवर्ती इमारतीच्या प्रवेशद्वारातच रेड कारपेटद्वारे महिला वर्गाचे स्वागत करण्यात आले. त्यांचे गुलाबपुष्प, तुळशीचे रोप, पेढा तसेच तृणधान्यापासून बनविण्यात आलेले पौष्टिक पदार्थांचे पाकिटं देऊन स्वागत करण्यात आले.
हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी विभागीय माहिती कार्यालयातील गीतांजली अवचट, विलास कसबे, सचिन बहुलेकर, सुहास सत्वधर, सुजीत भिसे, जितेंद्र खंडागळे व सुनील झुंझार तसेच कृषि आयुक्त कार्यालयातील संगीता माने, उज्वला रजपुत, अश्विनी भोपळे, शिवकुमार सदाफुले, प्रिती हिराळकर आदींनी परिश्रम घेतले.

नाविन्यपूर्ण उपक्रम – स्वागताने महिलावर्ग आनंदी
आंतरराष्ट्रीय महिला दिनी शासकीय मध्यवर्ती इमारतीत अशा प्रकारचा आगळावेगळा स्वागत सोहळा प्रथमच होत आहे. या स्वागत सोहळ्यामुळे मनस्वी आनंद झाला. कृषि आयुक्त सुनील चव्हाण यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या या उपक्रमाबद्दल उपस्थित महिला कर्मचाऱ्यांनी आनंद व्यक्त केला. तसेच हा नाविन्यपूर्ण उपक्रम राबविल्याबद्दल त्यांनी कृषि आयुक्तालय व विभागीय माहिती कार्यालयाचे आभारही मानले.

कॉंग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्याकडून आ.रवींद्र धंगेकर यांचे अभिनंदन

पुणे:

कसबा विधानसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे नवनिर्वाचित आमदार रवींद्र धंगेकर यांनी बंगलोर येथे कॉंग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष खा. मल्लिकार्जुन खरगे यांची भेट घेऊन त्यांचे आशीर्वाद घेतले. याप्रसंगी महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेसचे उपाध्यक्ष मोहन जोशी त्यांच्या समवेत होते. कॉंग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी ऐतिहासिक ठरलेल्या या पोटनिवडणुकीची संपूर्ण माहिती घेतली आणि रवींद्र धंगेकर यांचे अभिनंदन करून म्हटले की, दिवसेंदिवस केंद्रातील मोदी सरकार आणि राज्यांमधील भाजप सरकार यांच्या विरुद्धचा जनतेच्या मनातील रोष वाढत आहे. महागाई, बेकारी यामुळे त्रस्त जनतेला परिवर्तन अपेक्षित आहे. त्यादृष्टीने महाविकास आघाडीचा कसबा मतदारसंघातील विजय हा दिशादर्शक आहे. महाविकास आघाडीचे सर्व नेते व कार्यकर्ते यांनी एकजुटीने कठोर मेहनत करून भाजपाच्या बालेकिल्ल्यात विजय संपादन केला. याचाच अर्थ एकत्रित ताकदीने निवडणुका लढविल्या तर भाजपचा पराभव होऊ शकतो हे या निवडणुकीने दाखवून दिले आहे. आगामी काळातही महाविकास आघाडीच्या रोपाने भाजपसारख्या जातीवादी प्रतिगामी पक्षाचा पूर्ण पराभव करण्यासाठी आपण सर्वांनी एकदिलाने काम केले पाहिजे, असे ते म्हणाले. तसेच मोहन जोशी यांचेही त्यांनी यावेळी अभिनंदन केले.

अवकाळी पावसामुळे आठ जिल्ह्यांतील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने मदत देणार – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती

मुंबई, दि. ८ : राज्यात अवकाळी पावसामुळे आठ जिल्ह्यांत सुमारे १३ हजार ७२९ हेक्टर शेतीचे नुकसान झाले आहे. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदतीसाठी प्रस्ताव तातडीने मागविण्यात आले असून त्यांना तत्काळ मदत देण्यात येईल, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत दिली.

विरोधी पक्षनेते अजित पवार, सदस्य नाना पटोले, छगन भुजबळ यांनी यासंदर्भात मुद्दा उपस्थित केला होता. त्यावर निवेदन करताना उपमुख्यमंत्री बोलत होते.

उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यावेळी म्हणाले की, पालघर जिल्ह्यात विक्रमगड, जव्हार येथे ७६० हेक्टरचे नुकसान झाले असून नाशिक जिल्ह्यात २६८५ हेक्टरचे नुकसान झाले आहे. धुळे येथे ३१४४ हेक्टर, नंदूरबार येथे १५७६ हेक्टर, जळगाव येथे २१४ हेक्टर, अहमदनगर येथे ४१०० हेक्टर, बुलढाणा येथे ७७५ हेक्टर तर वाशीम जिल्ह्यात ४७५ हेक्टर शेतीचे नुकसन झाले आहे.

नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीच्या मदतीसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कालच जिल्हा प्रशासनाला सूचना दिल्या आहेत. नुकसानासंदर्भात अधिकची माहिती घेण्यात येत असून तत्काळ मदतीचे प्रस्ताव मागविण्यात आले आहेत, अहवाल प्राप्त होताच सभागृहात याबाबत निवेदन करण्यात येईल, असे उपमुख्यमंत्री श्री.फडणवीस यांनी सांगितले.

सुनेचा खुन करणाऱ्या सासूला २४ तासाचे आत अटक

पुणे-सुनेचा खून करून तिच्या अपघाती मृत्यूचा बनाव करणाऱ्या सासूला पुणे पोलिसांनी २४ तासात घटनेचा छडा लाऊन अटक केली .
या प्रकरणी पोलिसांनी सांगितले कि,’ ससुन हॉस्पीटल येथुन मिळालेल्या माहितीनुसार रितु मालवी या महिलेचा पाय घसरुन मृत्यु झाल्याची माहिती देण्यात आली होती. सदर घटनेत काही घातपात अथवा संशयाचा प्रकार आहे का याची चौकशी करीत असतांना, मयताचे झाले तपासाचे चौकशीअंती कागदपत्राचे अवलोकन करता, रितु हिचा मृत्यु हा तीची सासु हिने किरकोळ कारणावरुन झालेल्या वादातुन शिवीगाळ करुन केलेल्या मारहाणीत झाला होता.खुनाचा गंभीर गुन्हा लपविण्यासाठी आरोपी सासु हिने तिला उपचारासाठी दाखल केल्यानंतर तिचा पाय घसरुन बेशुध्द झाल्याची माहिती डॉक्टरांना दिली होती.
विमानतळ पोलीसांना या घटनेत संशय निर्माण झाल्यामुळे सासु हिचेकडे केलेल्या अधिक तपासात त्यांनी सुन रितु हिस हाताने मारहान करुन फ्रिजवर ढकलुन, जमिनीवर डोके आपटुन खून केल्याची कबुली दिली. त्या दोघींमध्ये यापुर्वी देखील किरकोळ
कारणावरुन वारंवार भांडणे होत होती. त्यातुनच सासु हिने रागाच्या भरात सुन रितु माळवी हिस मारहाण करुन त्या मारहाणीत ती फरशीवर पडल्यानंतर, तीचे केसाला पकडुन तीचे डोके जमीनीवर आपटुन, तीला जीवे ठार मारले होते. याप्रकरणीविमानतळ पोलीसांनी आरोपी सासुविरुध्द विमानतळ पो स्टे १२७/२०२२, भादविक ३०२,२०३,५०४ अन्वये खुनाचा गुन्हा दाखल करुन तीस अटक केली आहे. सदर गुन्ह्याचा तपास सपोनि लहाने विमानतळ पो. स्टे. हे करीत आहेत.सदरची उल्लेखनीय कामगिरी ही पोलीस आयुक्त पुणे शहर, रितेश कुमार, पोलीस सह आयुक्त, पुणे शहर संदीप कर्णिक, अपर पोलीस आयुक्त, गुन्हे, पुणे शहर,रामनाथ पोकळे, पोलीस उप आयुक्त, परि ४, पुणे शहर, शशिकांत बोराटे, सहा.पोलीस आयुक्त, येरवडा विभाग, पुणे, किशोर जाधव यांचे मार्गदर्शनाखाली विमानतळ पो. स्टे. चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक, विलास सोंडे, पोलीस निरीक्षक (गुन्हे), श्रीमती संगिता माळी, सहा.पो.निरी.एस.एन.लहाणे, म.पो.उप निरी. समु चौधरी, सहा. पोलीस फौज.शेवाळे, पोलीसअंमलदार, पठाण व तोडेकर यांनी केलेली आहे.

स्टोरीटेलवर महिला लेखिकांचा सन्मान!


‘ऐकू आनंदे कार्यक्रमातील महिला दिन विशेषातील स्टोरीटेल लेखिका संवाद!’
प्रख्यात लेखिका दीपा देशमुख, माधवी वागेश्वरी, सायली केदार यांच्याशी स्टोरीटेलवर मुक्त संवाद!
‘आपले प्रश्न सोडवण्यासाठी तरुणींनी लिहिते होणे अपेक्षित’ – लेखिका दीपा देशमुख, माधवी वागेश्वरी, सायली केदार!
आज तरुणींनी सोशल माध्यमांवर व्यक्त होणे गरजेचे – लेखिका दीपा देशमुख, माधवी वागेश्वरी, सायली केदार!

‘महिला दिन विशेष’, ‘ऐकू आनंदे’ या कार्यक्रमामध्ये डिजिटल युगातील लेखिका म्हणून घडण्याबद्दल ‘स्टोरीटेल ओरिजनल’च्या लेखिका- दीपा देशमुख यांनी माधवी वागेश्वरी, सायली केदार यांच्याशी संवाद साधून नवसाहित्य निर्मितीतील पैलू उलगडण्याचा रंजक सवांद साधला. यानिमित्ताने साहित्य लेखनातील या तीन भिन्न लेखिकांची विचारधारा ऐकण्याची संधी स्टोरीटेलने रसिकांना दिली आहे.

‘डिजिटल माध्यम’ हे साहित्यासाठी अनेकार्थाने वरदान ठरत असल्याचे मत प्रख्यात साहित्यिक दीपा देशमुख यांनी व्यक्त केले आहे, पुढे त्या म्हणतात. “डिजिटल साहित्यामुळे आपण कधीही, केव्हाही, कुठेही ऐकू शकतो, यामुळे ऐकणं खूप सोप्प झालं आहे” त्यांच्या या मताला दुजोरा देत लेखिका सायली केदार म्हणाल्या, “आपला मोबाईल असंख्य गोष्टींची बँक आहे, त्यात आपण कोणतीही गोष्ट ऐकू, वाचू, पाहू शकतोय. आपल्याला हेडफोन लावून आपल्या आवडीच्या गोष्टी सहज ऐकता येतात. सुरुवातीला मी माझ्या इरॉटिकाची फेसबुकवर पोस्ट केली होती, तेव्हा एकही लाईक्स किंवा कमेंट्स आल्या नाहीत. नंतर मी त्यात एक लाईन ऍड केली, ‘हे पुस्तक तुम्ही स्टोरीटेलवर नक्की ऐका, पण हेडफोन लावल्याशिवाय ऐकू नका’…, त्यांनतर मिळालेला प्रतिसाद प्रचंड होता…” ‘जग बदलणारे ग्रंथ’ सिरीज मधील ‘कामसूत्र’ सारखा ग्रंथ वाचताना आपल्या आजूबाजूला कोणी नसावं असं वाटतं, ही उणीव डिजिटलमुळे भरून निघाली आहे, असं लेखिका दीपा देशमुख यांना वाटतंय.

आपण सध्या वेगाच्या दुनियेत जगत आहोत. आसपासच्या अनेक गोष्टी बदलत आहेत. त्यासोबतच छापील पुस्तकेही एक पायरी ओलांडून ‘डिजिटल ऑडिओ बुक्स’च्या रूपात पुढे गेली आहेत. ती लिहिणाऱ्याने त्यात किती भाव ओतले आहेत, त्याचे क्राफ्टिंग किती मजबूत आणि कसदार लिहिले आहे त्यातूनच तो भाव श्रोत्यांपर्यंत पोहचतो म्हणून ‘डिजिटल ऑडिओ बुक्स’ लिहिणे हे अधिक चॅलेंजिंग आहे. ती छापील पुस्तकांची पुढची पायरी आहे. वेगाच्या गतीमुळे शिकण्याचा वेगही गतिमान झाला आहे. अनेक महिला – मुलींनी गतिमान होऊन लिहायला,ऐकायला हवं, असं या संवादातून तिन्ही लेखिकांनी व्यक्त केले. जग बदलत असलं तरी महिलांचे प्रश्न फार बदललेले नाहीत. आणि म्हणूनच नवनव्या लेखिका निर्माण व्हायला हव्यात. आज उपलब्ध असलेल्या संधीचा फायदा घेऊन, तुम्ही भरपूर वाचू-ऐकू शकता, आणि त्यातून व्यक्त होऊन तुमचे प्रश्न थेट मांडू शकता असे परखड मत या लेखिकांनी यानिमीत्त बोलताना व्यक्त केले.

माधवी वागेश्वरी यांनी स्टोरीटेलसाठी ‘सिंगल कमिटेड, कॉम्प्लिकेटेड’, ‘करसाळ’ या दहा-दहा भागाच्या दोन ओरिजनल सिरीज लिहिल्या आहेत. शिवाय काही लघुकथाही त्यांनी ‘स्टोरीटेल’साठी लिहिल्या आहेत. त्यांनी लिहिलेली ‘सिंगल कमिटेड, कॉम्प्लिकेटेड’ ही प्रेमकथा व ‘करसाळ’ ही गूढकथा त्यांच्या वैशिष्ट्यपूर्ण लिखाणामुळे तसेच अभिनेत्री पूजा ठोंबरे, साईनाथ गणूवाड, ऋता पंडित, गजानन परांजपे, उर्मिला निंबाळकर यांच्या वैशिष्टयपूर्ण सादरीकरणामुळे या सर्व मालिकांचे भाग स्टोरीटेलवर खूप लोकप्रिय आहेत. सायली केदार यांनी ‘स्टोरीटेल’साठी काही इरॉटिका, ‘रोमँटिक, रोमँटिक कॉमेडी, क्राईम थ्रिलर अश्या दहा-दहा भागांच्या सिरीज लिहिल्या आहेत. ‘केस नं ००१’, ‘केस नं ००२’ या क्राईम सिरीज आहेत. त्यांनी ‘डेस्परेट हजबंड’ आणि इतर काही इरॉटिक लघुकथांचे ‘स्टोरीटेल ओरिजनल’साठी सिरीज लिहिल्या आहेत. प्रत्येक सिरीजसाठी शीर्षक सुचण्याची प्रोसेस फार गंमतीशीर असते. ‘डेस्परेट हजबंड’मध्ये पाच महिलांच्या भन्नाट कथा ऐकायला मिळतात. यात पहिल्यांदाच चाकोरी मोडून केलेलं लिखाण आहे. या सिरीजला ‘स्टोरीटेल’वर अफलातून प्रतिसाद मिळत आहे.

प्रतिथयश लेखिका म्हणून आज दीपा देशमुख सर्वज्ञात आहे. त्यांची सुमारे ३२ पुस्तके प्रकाशित झालेली आहेत. त्यांच्या ‘जग बदलणारे ग्रंथ’ या पुस्तकाला राज्यशासनाचा सन २०२१ चा स्व. ‘यशवंतराव चव्हाण राज्य वाड्.मय पुरस्कार’ प्राप्त झाला आहे. व सन २०२२ चा मानवाधिकार पुरस्कार सुध्दा त्यांना मिळाला आहे. ‘जग बदलणाऱ्या ग्रंथां’ची ओळख करून देणारी सिरीज खास ‘स्टोरीटेल मराठी’च्या श्रोत्यांना ‘स्टोरीटेल’वर ऐकण्यास उपलब्ध आहे.

प्रमिला गायकवाड, सत्यशोधक मुक्ता साळवे समाजभूषण पुरस्काराने सन्मानीत

पुणे- आण्णाभाऊ साठे संशोधन व प्रशिक्षण संस्था (ARTI)  पुणे यांचे  वतीने   सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रात  उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींना ‘सत्यशोधक मुक्ता साळवे समाजभूषण पुरस्कार २०२३’   पुरस्कार  देऊन सन्मानित केले जाते.   २०२३ चा पुरस्कार अखिल भारतीय मराठा शिक्षण परिषदेच्या सरचिटणीस सौ.प्रमिला गायकवाड  यांनी शिक्षण क्षेत्रात केलेल्या भरीव कार्याची दाखल घेऊन  जागतिक महिला दिनाच्या पूर्वसंध्येला जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉ. बाबा आढाव यांचे हस्ते देऊन सन्मानित करण्यात आले. सौ. प्रमिला गायकवाड या अविरतपणे बहुजन समाजातील गरजू, होतकरू  विद्यार्थ्याचे केवळ गरीब परिस्थिती अथवा  फी अभावी शिक्षण थांबता कामा नये, किंवा असे   विद्यार्थी शिक्षण प्रवाहातून बाहेर पडू नये या साठी कार्य करत आहे.   याचा कार्याची दखल घेऊन आण्णाभाऊ साठे संशोधन व प्रशिक्षण संस्था (ARTI)  पुणे यांनी हा पुरस्कार देऊन सन्मानित  केले. समाजभूषण स्व.उत्तमराव पाटील यांचा वारसा लाभलेल्या  सौ. प्रमिला गायकवाड  यांना कार्यामध्ये यजमान माजी न्यायाधीश ॲड. भागवतराव गायकवाड  व कुटुंबीय  यांचे मदत झाली.

देशात हिंदू पेटून उठला, तर सावरकरांना माफीवीर म्हणण्याची हिंमत कोणालाही होणार नाही- शरद पोंक्षे 

अखिल ब्राह्मण मध्यवर्ती संस्था (नाशिक), पुणे केंद्र युवा आघाडी तर्फे स्वा. सावरकर यांच्या पुण्यतिथीनिमित्त स्वा. सावरकर विचार दर्शन व्याख्यान संपन्न 

भारतीयाने भारतीयाचा खून करण्याच्या विरोधात सावरकर
पुणे : देशात हिंदू पेटून उठला, तर सावरकरांना माफीवीर म्हणण्याची हिंमत कोणालाही होणार नाही असे वक्तव्य येथे ज्येष्ठ अभिनेते व सावरकरप्रेमी शरद पोंक्षे यांनी केले.अखिल ब्राह्मण मध्यवर्ती संस्था (नाशिक), पुणे केंद्र युवा आघाडी तर्फे स्वा. सावरकर यांच्या पुण्यतिथीनिमित्त स्वा. सावरकर विचार दर्शन या शरद पोंक्षे यांच्या व्याख्यानाचे आयोजन सदाशिव पेठेतील भरत नाटय मंदिर येथे करण्यात आले. यावेळी अ. ब्राह्मण मध्यवर्ती संस्थेचे अध्यक्ष अ‍ॅड.अविनाश भिडे, विश्वनाथ भालेराव, मकरंद माणकीकर, अनिल शिदोरे, सुभाष सबनीस, परेश मेहेंदळे, मोहना गद्रे आदी व्यासपीठावर उपस्थित होते.

 वैचारिक मतभेद असले, तरी आपण भारतीय एक आहोत. समोरच्याने शस्त्र उचलल्यावर आपण अहिंसक होऊन चालणार नाही, त्यामुळे आपण नाईलाजाने शस्त्र उचलावे, असा स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा विचार होता. भारतीयाने भारतीयाचा खून करण्याच्या विरोधात सावरकर होते, त्यामुळे गांधी हत्येत सावरकर असणे शक्यच नाही आणि तसे न्यायालयात  सिद्धही झाले आहे, असे मत शरद पोंक्षे यांनी व्यक्त केले.
शरद पोंक्षे म्हणाले, देशात हिंदू पेटून उठला, तर सावरकरांना माफीवीर म्हणण्याची हिंमत कोणालाही होणार नाही. संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज, समर्थ रामदास स्वामी, छत्रपती शिवाजी महाराज, धर्मवीर संभाजी महाराज यांना बदनाम करायचे आणि हिंदुत्वाची ताकद मोडण्याचे काम सध्या सुरु आहे. नरेंद्र मोदी हे रा. स्व. संघातील व्यक्ती पंतप्रधानपदी विराजमान असल्याची ही पोटदुखी आहे.

ते पुढे म्हणाले, स्वा. सावरकर हे हिंदू राष्ट्रवादी होते आणि ते कॉंग्रेसमध्ये गेले नाहीत, हाच त्यांचा गुन्हा होता. हिंदी राष्ट्रवादाचा बुरखा फाडणारे पहिले व्यक्तिमत्व सावरकर हे होते. वेद, पुराण, कुराण आणि बायबल हे वंदनीय व पूजनीय आहेत. पण काळानुसार अनुकरणीय आहेतच असे नाही, कारण ते काळानुरुप बदलत नाहीत. त्यामुळे विज्ञान हा धर्मग्रंथ हवा, असे सावरकरांचे मत होते.

जातीभेदाबद्दल बोलताना ते म्हणाले, देशात १८ पगड जातींमधील भेद हा हिंदू धर्माला शाप आहे. त्यामुळे जाती संपायला हव्यात, हा विचार मांडून त्याप्रमाणे सावरकरांनी सन १९२४ मध्ये काम केले. हिंदू राष्ट्रवाद हा देशाला तारणारा आहे. हिंदी राष्ट्रवादाऐवजी हिंदू राष्ट्रवाद आपण स्विकारला असता, तर स्वातंत्र्यानंतरची ७५ वर्षे लांगुलचालनाचा तमाशा बघायला लागला नसता, असेही पोंक्षे यांनी सांगितले. मानसी फडके यांनी सूत्रसंचालन केले. मोहना गद्रे यांनी प्रास्ताविक केले. परेश मेहेंदळे यांनी आभार मानले.

महाराष्ट्र बॉडी बिल्डिंग असोसिएशनच्या अध्यक्षपदी किरण सावंत यांची बिनविरोध निवड

महाराष्ट्र बॉडी बिल्डिंग असोसिएशन 2023 च्या निवडणुका पूर्ण झाल्या

महाराष्ट्र शरीरसौष्ठव संघटनेच्या निवडणुकीत १७ पदाधिकारी निवडून आले

पुणे८ मार्च 2023, सिल्व्हर बँक्वेट हॉल ताथवडे, पुणे येथे नुकत्याच झालेल्या महाराष्ट्र बॉडीबिल्डिंग असोसिएशनच्या सर्वसाधारण सभेत महाराष्ट्र शरीरसौष्ठव कार्यकारिणीची निवड करण्यात आली, त्यामध्ये 22 जिल्ह्यातील पदाधिकारी उपस्थित होते. या निवडणुकीत बॉडी बिल्डिंग अँड फिजिक्स स्पोर्ट्स असोसिएशन पिंपरी-चिंचवडचे अध्यक्ष किरण सावंत यांची पुढील पाच वर्षांसाठी महाराष्ट्र शरीरसौष्ठव संघटनेच्या अध्यक्षपदी बिनविरोध निवड करण्यात आली. किरण सावंत यांचा शरीरसौष्ठव या खेळावरचा विश्वास आणि प्रेम आणि आजपर्यंत या क्षेत्रात तिने मिळवलेले ठोस यश यामुळे तिची बिनविरोध निवड झाली. यावेळी अधिवक्ता कुमार यांनी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून काम पाहिले तर वर्ल्ड बॉडी बिल्डिंग अँड फिजिक स्पोर्ट्स फेडरेशनचे सरचिटणीस चेतन पठारे यांनी संपूर्ण निवडणूक प्रक्रियेत निरीक्षक म्हणून काम पाहिले. यावेळी जागतिक शरीरसौष्ठव संघटनेचे कायदेशीर सल्लागार व दक्षिण आशियाई बॉडीबिल्डिंगचे अध्यक्ष श्री.विक्रम रोठे व महाराष्ट्र शरीरसौष्ठवचे माजी अध्यक्ष श्री.प्रशांत आपटे उपस्थित होते. सदर निवडणूक कार्यकारिणी समितीमध्ये एकूण 9 पदांची निवड करण्यात आली असून एकूण 17 पदांसाठी निवडणूक प्रक्रिया पूर्ण करण्यात आली आहे. पिंपरी चिंचवड शरीरसौष्ठव सरचिटणीस महेश गंगणे यांनी सर्व पदाधिकाऱ्यांचे स्वागत केले.
                                                                                                                                                                          महाराष्ट्र बॉडी बिल्डिंग असोसिएशनने अध्यक्षपदासाठी पिंपरी चिंचवडमधून किरण सावंत, उपाध्यक्षपदी ठाण्यातून प्रशांत आपटे, मुंबईतून अजय खानविलकर, साताऱ्यातून राजेंद्र हेंद्रे, औरंगाबादमधून सचिन टापरे, नाशिकमधून गोपाळ गायकवाड, जळगावमधून मोहन चव्हाण यांची निवड केली आहे. पश्चिम ठाणे.मधून सचिन डोंगरे निवडून आले सरचिटणीसपदी ठाण्यातील राजेंद्र चव्हाण, औरंगाबादचे कुतुबुद्दीन सय्यद आणि सहसचिवपदी नवी मुंबईचे हेमंत खेबडे, खजिनदारपदी मुंबई उपनगरचे सुनील शेगडे, कोल्हापुरातून राजेश वाडम, अहमदनगरचे मनोज गायकवाड, सिंधुदुर्गातून सूरज तेंडुलकर, परभणीतून मनीष नंद यांची निवड झाली. सहसचिवपदी तर जफर खान यांची परभणीतून निवड झाली. यावेळी जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांनी नवनिर्वाचित सदस्यांचे अभिनंदन केले.

नवाब मलिक यांच्या कोठडीत पुन्हा 14 दिवसांची वाढ

मुंबई-राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांच्या न्यायालयीन कोठडीत 14 दिवसांची वाढ झाली आहे. नवाब मलिक यांची प्रकृती गंभीर असल्याचे उच्च न्यायालयाने शुक्रवारी मान्य केले असले तरिही त्यांना अजुनही जामीन मिळालेला नाही. दाऊद इब्राहिम याच्या मुंबईतील मालमत्तेशी संबंधित आर्थिक गैरव्यवहाराच्या आरोपांप्रकरणी मलिक अटकेत आहेत.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी नोव्हेंबर 2021 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि मंत्री नवाब मलिकांवर गंभीर आरोप केले होते. फडणवीस म्हणाले होते की, मलिकांच्या कंपनीने अशा लोकांकडून जमीन खरेदी केली आहे, जे 1993 च्या मुंबई ब्लास्टमध्ये आरोपी आहेत. ही जमीन दाऊद इब्राहिमशी संबंधीत आहे. तसेच नवाब मलिकचे अंडरवर्ल्डशी संबंध असल्याचा आरोपही करण्यात आला आहे. त्यानंतर ईडीने मनी लाँड्रींगप्रकरणीही नवाब मलिकांवर गुन्हे दाखल करत त्यांची कोट्यवधींची संपत्ती जप्त केली आहे.

मलिकांची ही संपत्ती ईडीकडून जप्त

  • कुर्ल्यातील गोवावाला कंम्पाऊंड जप्त
  • कुर्ला पश्चिमेतील व्यावसायिक जागा ईडीकडून जप्त
  • उस्मानाबादमधील मलिकांची 148 एकर जमीन जप्त
  • कुर्ला पश्चिमेतील 3 फ्लॅट्स जप्त
  • वांद्रे पश्चिमेतील 2 राहती घरेही ईडीकडून जप्त

आतातर त्यांच्या जामीनावर लवकर सुनावणी होईल असे वाटत नाही. कारण त्यांची सुनावणी न्यायमूर्ती मकरंद कर्णिक यांच्या एकलपीठासमोर सुरू असतानाच आता न्यायमूर्ती मकरंद कर्णिक यांची बदली गोवा खंडपीठात झाल्याने मलिक यांना पुन्हा नव्या कोर्टाकडे जावे लागेल. मलिक यांना मुंबई उच्च न्यायालयात मलिकांना आता नव्या बेंचपुढे दाद मागावी लागणार आहे.

पुणेकरांना मिळकतकरात 40 टक्के सवलत पुन्हा लागू करावी आणि शास्ती कर रद्द करा-विधी मंडळाच्या पायऱ्यांवर आंदोलन

मुंबई/पुणे -पुण्यातील मिळकतींचा शास्ती कर रद्द करून मिळकत करातील 40 टक्के सवलत पुन्हा लागू करण्याचा निर्णय राज्य सरकारने तातडीने घ्यावा, यासाठी महाविकास आघाडीच्या वतीने विधी मंडळाच्या पायऱ्यांवर जोरदार घोषणाबाजी करत आंदोलन करण्यात आले. तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लेखी निवेदन देण्यात आले.
निवेदनात म्हटले आहे की, पुणे शहरातील नागरिकांना पानशेत पूर दुर्घटनेपासून स्वतःच्या निवासी मिळकतीत 40 टक्के ही सवलत दिली जात होती. मात्र, महापालिकेने 2018 पासूनची सवलती पोटीची रक्कम वसूल करण्यासाठी आता नागरिकांना एसएमएसच्या माध्यमातून नोटीस बजाविण्यास सुरवात केली आहे. आधीच बंद करण्यात आलेली सवलत आणि त्यावर थकीत रकमेचा बोजा यामुळे करदात्या पुणेकरांवर मोठा आर्थिक बोजा पडत आहे. परिणामी नागरिकांमध्ये असंतोष निर्माण झाला आहे. याशिवाय पुणे महापालिकेकडून अनधिकृत निवासी मिळकतींना दीडपट तर व्यावसायिक मिळकतींना तीनपट इतका दंड (शास्ती) आकारला जात आहे. ही दंडाची ही रक्कम अतिशय अवास्तव आहे.
ज्याप्रमाणे राज्य सरकारने पिंपरी चिंचवड शहरातील शास्ती कर रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे, त्यानुसार पुण्यातील मिळकतींचा शास्ती कर रद्द करून मिळकत करातील 40 टक्के सवलत सरकारने पुन्हा लागू करावी. अशी मागणी करण्यात आलेली आहे.

पालिका आयुक्तांवर हात उगारणे भोवले,आमदार बच्चू कडूंना 2 वर्षाची शिक्षा,बच्चू कडू पोलिसांच्या ताब्यात

नाशिक-नाशिक जिल्हा व सत्र न्यायालयाने आमदार बच्चू कडू यांना 2 वर्ष तुरुंगवासाची शिक्षा सुनावली आहे. या निकालाविरोधात वरच्या न्यायालयात जाऊ. तसेच, नाशिक जिल्हा व सत्र न्यायालयातच जामिनासाठी अर्ज करणार आहे, अशी माहिती या निकालानंतर आमदार बच्चू कडू यांनी दिलीन्यायालयाच्या निकालानंतर पोलिसांनी बच्चू कडू यांना ताब्यात घेतल्याची माहिती आहे. बच्चू कडू यांना नाशिक जिल्हा व सत्र न्यायालयात पोलिसांनी हजर केले आहे. येथे जामिनाची प्रक्रिया पूर्ण केली जाणार आहे.

आमदार बच्चू कडूंना जामीन मंजूर

आमदार बच्चू कडूंना जामीन मंजूर झाला आहे. सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी त्यांना 2वर्षाची शिक्षा सुनावण्यात आली होती.

नेमके प्रकरण काय?

नाशिकच्या मनपा आयुक्तांवर हात उगारल्याप्रकरणी बच्चू कडू यांना नाशिक जिल्हा व सत्र न्यायालयाने भादंविचे कलम 353 अन्वये शिक्षा सुनावली आहे. 2017 मध्ये ही घटना घडली होती. नाशिक महापालिकेत अपंगांच्या मागण्यांसाठी प्रहार संघटनेतर्फे आंदोलन सुरू करण्यात आले होते. पालिका आयुक्तांनी दिव्यांग कल्याण निधी खर्च केला नाही, असा आरोप करत बच्चू कडू यांच्या नेतृत्वात हे आंदोलन करण्यात आले होते. यावेळी महापालिका आयुक्त अभिषेक कृष्णा यांच्यासोबत बच्चू कडूंचा वाद झाला होता. यावेळी बच्चू कडूंनी आयुक्तांना धमकावले व त्यांच्यावर हात उगारला, असा आरोप आहे. दरम्यान, आंदोलनानंतर पोलिसांनी बच्चू कडू यांना ताब्यातही घेतले होते व सरकारी अधिकाऱ्यावर हात उगारणे व सरकारी कामात अडथळा आणल्या प्रकरणी बच्चू कडूंवर सरकारवाडा पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता. 2017 पासून याप्रकरणी बच्चू कडूंविरोधात नाशिक जिल्हा व सत्र न्यायालायात सुनावणी सुरु होती.

पुणेकरांची मिळकत करातील ४० टक्के सवलत कायम ठेवावी !

  • भाजपाच्या शिष्टमंडळाने घेतली मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांची भेट
  • निर्णयासाठी पुढील आठवड्यात बैठक : मुरलीधर मोहोळ

मुंबई/पुणे-

पुणे महापालिका हद्दीत मिळकत करात पुणेकरांना देण्यात येणारी ४० टक्के सवलत कायम ठेवावी, अशी मागणी भारतीय जनता पार्टीच्या शिष्टमंडळाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली. शिवाय देखभाल दुरुस्ती खर्च १ एप्रिल २०१० पासून १५ टक्क्यांहून १० टक्के फरकाची रक्कम मिळकतींकडून वसूल करण्यात येऊ नये, अशीही मागणी यावेळी करण्यात आली. या दोन्ही मागण्यांसदर्भात पुढील आठवड्यात मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री बैठक घेणार असल्याची माहिती माजी महापौर मुरलीधर मोहोळ यांनी दिली.

यावेळी पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील, माजी महापौर मोहोळ यांच्यासमवेत यावेळी आ. माधुरीताई मिसाळ, आ. भीमराव तापकीर, आ. सिद्धार्थ शिरोळे उपस्थित होते.

मिळकत करातील ४०% सवलत दि. १/८/२०१९ पासून स्व: वापर करीत असलेल्या निवासी मिळकतीची काढण्यात येऊ नये आणि देखभाल दुरुस्ती खर्च दि. १/४/२०१० पासून १५% हून १०% फरकाची रक्कम मिळकतींकडून वसूल करण्यात येऊ नये, अशा दोन मागण्या या निवदेनातून करण्यात आल्या आहेत.

या संदर्भात माहिती देताना माजी महापौर मोहोळ म्हणाले, ‘निवासी मिळकतींना देण्यात येणारी ४०% सवलत आणि १५% हून १०% देखभाल दुरुस्ती खर्च नवीन आकारणी होत असलेल्या मिळकतीना दिनांक १/४/२०१९ पासून बंद करण्यात आली आहे. यासंदर्भात २०१९ आणि २०२२ ला महापालिकेच्या मुख्य सभेचा पुन्हा ठराव केला होता. त्याद्वारे हीसवलत रद्द न करता सुरू रहावी, असा ठराव राज्य सरकारकडे पाठवण्याला होता. मात्र तत्कालिन महाविकास आघाडी सरकारने कोणाताही निर्णय घेतला नाही’.

महारापालिकेच्या २०१९ आणि २०२२ च्या ठरावाच्या आधारावर राज्य सरकारकडे या मागण्या केल्या असून याबाबत तातडीने पुढील आठवड्यातच बैठक घेऊन याबाबत पुणेकरांना मोठा दिलासा मिळेल, हा विश्वास आहे, असेही मोहोळ म्हणाले.

महाविकास आघाडीच्या आमदारांचे आंदोलन केवळ नौटंकी : मोहोळ

आम्ही मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांची भेट घेतल्यावर पुण्यातील महाविकास आघाडीच्या आमदारांना जाग आली आणि त्यांनी घाईघाईने विधिमंडळाच्या पायऱ्यांवर आंदोलनाची नौटंकी केली. स्वतःची निष्क्रियता छाकण्यासाठी केलेल्या आंदोलनाच्या नौटंकीला पुणेकर भुलणार नाहीत, अशा शब्दात मोहोळ यांनी उत्तर दिले.

पुण्यामध्ये ‘स्पिनी पार्क’  केंद्र सुरू

~ स्पिनी पार्क ग्राहकांना ५०० हून अधिक स्वतः निवडलेल्या व स्पिनीकडून आश्वस्त अशा कार्ससह स्पिनी मॅक्स लक्झरी कारच्या पर्यायांनी परिपूर्ण व अतुलनीय असा कार खरेदी अनुभव देते.

पुणे‘स्पिनी’, भारतातीलवापरलेल्या कारच्या खरेदी विक्रीचे  सुरुवातीपासून ते शेवटपर्यंत सर्व कामे करता येतील असे एक  संपूर्ण व्यासपीठ, यांनी आज पुण्यातील हिंजेवाडी गाव, मुक्काम पोस्ट वाकड येथे ‘स्पिनी पार्क’  हे एक अद्वितीय व अनोखे असे प्रयोगात्मक अनुभव केंद्र सुरू करण्याची घोषणा केली. या पार्कची संकल्पना त्यांच्या स्वतः निवडलेल्या कार्सच्या संग्रहाद्वारे आणि त्यांच्या विस्तृत व अत्याधुनिक जागेच्या माध्यमातून शहरातील ग्राहकांचा कार खरेदीचा अनुभव अधिक समृद्ध करते.

          हे नवीन स्पिनी पार्क एकूण तीन एकराच्या परिसरात पसरलेले आहे. येथे ५०० हून अधिक निवडक व स्पिनीकडून आश्वस्त अशा कार्स आणि स्पिनी मॅक्स पूर्व मालकीच्या लक्झरी कार्ससह मोठ्याप्रमाणात अनेक वेगवेगळ्या कार्स राहू शकतात आणि शिवाय कार्स पाहण्यासाठी, निवडण्यासाठी आणि त्यांची चाचणी घेण्यासाठीसुद्धा मोकळी जागा आहे.

          पुण्यातील स्पिनी सोलापूर, औरंगाबाद आणि रत्नागिरीसह जवळपासच्या शहरांमध्ये घरपोच सेवा आणि घरोघरी तपासणीची सुविधा पुरवते. पुण्यातील कामकाज फेब्रुवारी २०२० मध्ये सुरू झाल्यापासून स्पिनीने २५,००० हून अधिक कार्सच्या खरेदी विक्री व्यवहारांची सेवा दिली आहे, ज्याचा वाटा पुण्याच्या वापरलेल्या कार बाजारातील १०% पेक्षा जास्त आहे.

          स्पिनीने मागील वर्षी बंगळूर येथे आपले प्रमुख आणि भारतातील सर्वात मोठे अनुभव केंद्र सुरू केले होते.

          या घोषणेबाबत बोलताना स्पिनीचे संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. नीरज सिंग म्हणाले, पुणे ही आमच्यासाठी एक महत्त्वाची आणि भरभराटीची बाजारपेठ आहे आणि आम्ही आमच्या ग्राहकांचा शहरातील अनुभव उंचावण्यास उत्सुक आहोत. वापरलेल्या कार उद्योग क्षेत्रात एक साधासहज आणि आनंददायी खरेदी विक्रीचा अनुभव प्रदान करण्यात एक अग्रगण्य  व्यासपीठ म्हणून आम्ही एखाद्या व्यक्तीसाठी आणि त्याच्या कुटुंबासाठी कारची आवश्यकता तिचे महत्व आणि तिचा अर्थ काय असतो हे जाणतो. देशात आमचे दुसरे स्पिनी पार्क चालू केल्याने ग्राहकांना अखंडित व उत्तम कार खरेदी विक्री अनुभव देण्याची आमची वचनबद्धता स्पष्ट होते. पुण्यातील स्पिनी पार्कमध्ये ५०० हून अधिक स्वतः निवडलेल्या कार्सचे विविध प्रकार आहेत. ग्राहकांना आराम मिळावा आणि त्यांच्या आवडत्या कारची चाचणी घेता यावी यासाठी हे आकाराने मोठे निसर्गरम्य परिसरात प्रायोगिक केंद्र उभे केले आहे.

          स्पिनी देशभरात ५७ पेक्षा जास्त कार केंद्र चालवते, ज्याची एकूण पार्किंग क्षमता १२,००० पेक्षा जास्त कार्स एवढी आहे. स्पिनी पुण्यामध्ये ४ कार केंद्र चालवीत आहे, ज्याची एकूण पार्किंग क्षमता ८०० पेक्षा जास्त कार्स एवढी आहे. स्पिनी पार्क जोडल्यामुळे शहरातील एकूण क्षमता १३०० हून अधिक गाड्यांवर पोहोचेल. पीव्ही सिंधुने पुण्यातील स्पिनी पार्क मध्ये नमूद केले की, “मी जितकी अधिक स्पिनीशी जोडले गेले तितकेच अधिक मी हे अनुभवत गेले की स्पिनी विश्वासपारदर्शकता आणि अनुभव या मूलभूत मूल्यांसह वितरण करते. टेनिस कोर्टमध्ये आणि त्या बाहेरही असताना  माझ्यातील जे धैर्य आणि लवचिकता आहे त्याला स्पिनी प्रतिबिंबित करते आणि दाखवते की गोष्टी कठोर आणि योग्य मार्गाने करण्यासाठी कोणताही शॉर्टकट नाही. जसे आपण म्हणतोत्या अतिरिक्त मैलासाठी दूरपर्यंत जात्या अतिरिक्त दिवसासाठी काम करानेहमीच्या सीमांच्या पलीकडे जा, गोष्टी घडवून आणा आणि मग गोष्टी घडतील.

          स्पिनी व्यासपीठावरील प्रत्येक स्पिनी आश्वस्त कार २०० पॉइंट तपासणी चेकलिस्ट, समस्या आढल्यास एक ही प्रश्न न विचारता पाच दिवसांच्या आत पैसे परत मिळण्याची गॅरंटी, विक्रीनंतर एक वर्षांच्या वॉरंटीसह येते; जी संपूर्ण पारदर्शकता, गुणवत्ता, सुविधा आणि विश्वास प्रदान करण्याची ब्रॅंडची वचनबद्धताच प्रतिध्वनीत करते. गेल्या काही वर्षात, स्पिनीची एकूण ग्राहक संख्या दोन लाखांहून अधिक झाली आहे आणि जवळपास ५४% कार खरेदी स्पिनीच्या ऑनलाइन व्यासपीठावरून ऑनलाइन केल्या जातात.

राजकीय हिंदूत्व पुन्हा निर्माण करणे ही काळाची गरज-माजी खासदार प्रदीप रावत 

राजे शिवराय प्रतिष्ठान, कर्वेनगर तर्फे नरवीर तानाजी मालुसरे व ज्ञानेश सेवा समर्पण पुरस्कार प्रदान सोहळा
पुणे :  हिंदुस्थानवर परकीय आक्रमणे शेकडो वर्षांपासून होत आहेत. इस्लाम धर्मियांच्या आक्रमणांनी हिंदू संस्कृती नष्ट करण्याचा प्रयत्न केला. या विचारसरणीतूनच पुण्यातील पुण्येश्वर महादेवाचे मंदिर पाडण्यात आले. राजकीय हिंदुत्व पुन्हा निर्माण करणे ही काळाची गरज असून त्यासाठी पुण्येश्वर महादेव मंदिराची पुर्नस्थापना व्हायलाच हवी, अशी भावना माजी खासदार प्रदीप रावत यांनी व्यक्त केली. 
राजे शिवराय प्रतिष्ठान तर्फे जय शिवराय चौक, कर्वेनगर येथे आयोजित करण्यात आलेल्या शिवजयंती उत्सवात २१ वर्षीय हुतात्मा जवान यश देशमुख यांना नरवीर सुभेदार तानाजी मालुसरे पुरस्कार आणि पंचशील आश्रमाच्या माध्यमातून आदिवासी भागात शिक्षणाची गंगा पोहोचविणा-या स्व. के.मधुकरराव यांना मरणोत्तर स्व. ज्ञानेश पुरंदरे यांच्या स्मृती प्रित्यर्थ ज्ञानेश सेवा समर्पण पुरस्कार प्रदान करण्यात आले. शिवजयंती महोत्सवानिमित्त शिवप्रेरणा मंदिर – पुण्येश्वर मंदिर पुननिर्माण संकल्प सभेचे आयोजन करण्यात आले. 
यावेळी जगद््गुरु तुकाराम महाराज यांचे वंशज ह.भ.प.शिरीष महाराज मोरे, प्रतिष्ठानचे संस्थापक महेश पवळे, माजी नगरसेविका वृषाली चौधरी, युवा उद्योजक परिक्षीत थोरात, कुणाल कांबळे, पुण्येश्वर महादेव मंदिर स्थापना समितीचे प्रमुख सुनील तांबट, सामाजिक कार्यकर्ते चित्रसेन खिलारे, प्रतिष्ठानचे अध्यक्ष शिवाजी खरात, संघटक विक्रम बर्गे, स्वप्नील महाडीक, सनी येळवंडे व उत्सव प्रमुख अक्षय जाधव आदी उपस्थित होते. 
प्रदीप रावत म्हणाले, हजारो वर्षांपासून हिंदुस्तान परकीय आक्रमणाच्या विरोधात लढत आहे. इस्लाम धर्मियांनी हिंदुस्थानाची संस्कृती नष्ट करण्याचा वारंवार प्रयत्न केला. परंतु छत्रपती शिवाजी महाराजांसारख्या धुरंदर योद्ध्यांनी हा प्रयत्न हाणून पाडला. छत्रपती शिवाजी महाराजांच्या शौर्र्यातून प्रेरणा घेऊन आपण पुन्हा एकदा पुण्येश्वर महादेवाच्या मंदिराची स्थापना केली पाहिजे. 
शिरीष महाराज मोरे म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराजांचा विचार  घराघरात पोहोचवला पाहिजे. त्यांच्या नावाचा केवळ जयघोष न करता त्यांचा विचार आपल्या आयुष्यामध्ये उतरवला पाहिजे आणि त्यांच्या विचारांप्रमाणे आपले आयुष्य जगले पाहिजे. 
महेश पवळे म्हणाले, इस्लामच्या विचारांच्या प्रेरणेतूनच पुण्यातील पुण्येश्वर महादेवाचे मंदिर पाडून त्या ठिकाणी मशिद बांधण्यात आली. आज आपण हिंदूंनी एकसंध होऊन पुण्येश्वर महादेवाचे मंदिर पुन्हा स्थापन करण्यासाठी चळवळ उभारली पाहिजे, असेही त्यांनी सांगितले. पुरस्कार समारंभापूर्वी शाहीर श्रीकांत रेणके यांचा गर्जना सह्याद्रीची हा पोवाडयाचा कार्यक्रम झाला. शिवप्रेरणा मंदिराचा देखावा तयार करणारे शिल्पकार महेश रांजणे यांचा यावेळी सत्कार करण्यात आला.

  मोटरसायकलवरून पुणेरी तरूणी रमिला लटपटे निघणार 365 दिवस जगभ्रमंतीस

पुणे : पुण्याची ख्याती जगभर पसरलेली आहे, त्यात आणखीन एक मानाचा तुरा लावण्यासाठी मराठमोळ्या वेशात नऊवारी साडी नेसून पुणेरी महिला रमिला लटपटे मोटरसायकल वरून जगभ्रमंतीसाठी 9 मार्चला निघणार असून सुमारे 365 दिवस प्रवास करून 8 मार्च 2024 रोजी पुन्हा भारतात परतणार आहे.
यासंदर्भात माहिती देताना रमिला लटपटे म्हणाली की, जगभ्रमंती मध्ये 12 खंड, 20 ते 30 देशातून प्रवास करित सुमारे एक लाख किलोमीटर्सचा प्रवास पुर्ण करणार आहे. फक्त प्रवास नाही करणार तर महाराष्ट्रातील विविध बचत गटाच्यामाध्यमातून बनविण्यात आलेले विविध पदार्थांचा आणि भारतीय संस्कृतीचा प्रसार करीत महाराष्ट्राची संस्कृती प्रत्येक देशा पर्यंत पोहोचविण्याचा मानस भारताची मुलगी रमिला लटपटेचा आहे.
रमा (रायजींग एबल मॅनकाईंड ऑल राऊंड) या जगभ्रमंती मोहिमेचे नियोजन केले आहे. त्यानुसार रमिला लटपटे 9 मार्च 2023 रोजी सांयकाळी 4.30 वाजता गेट-वे-ऑफ इंडिया येथून त्यांच्या भ्रमंतीच्या प्रवासाचा प्रारंभ होणार आहे. यावेळी फ्लॅग ऑफसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, शंतनू नायडू, प्रसाद नगरकर, खासदार श्रीरंग बारणे, आमदार महेश दादा लांडगे, अश्‍विनी ताई जगताप, सुरेश भोईर आदी उपस्थित राहणार आहेत.
 तसेच महिला दिनाचे औचित्य साधत भारतीय महिलांमध्ये साहस, जिद्द आणि चिकाटी यावी हा संदेश देण्यासाठीच ह्या जगभ्रमंतीचा घाट घातला आहे.
काही दिवसापुर्वी रमिला लटपटे यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन त्यांना आपल्या मोहिमेची माहिती दिली होती,या उपक्रमांचे मुख्यमंत्र्यांनी कौतुक ही केले होते. रमिला लटपटे या चिंचवड (पुणे) येथील निवासी आहेत. त्या अहिल्या फाऊंडेशन या स्वयंसेवी संस्थेसाठी महिला व तरुणांच्या सक्षमीकरणाचे उपक्रम राबवतात.