Home Blog Page 1351

शरद पवारांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी लोकसभेच्या १५ जागा लढविणार- जयंत पाटील म्हणले ,इच्छुकांनी तयारीला लागावे

पुणे- महाविकास आघाडीच्या तर्फे लोकसभा निवडणूक लढविताना शरद पवारांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी लोकसभेच्या १५ जागा लढविणार असून इच्छुकांनी तयारीला लागावे असे आवाहन प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील यांनी केले आहे.

राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या बैठकीत जयंत पाटील यांनी पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले. त्यावेळी त्यांनी लोकसभा निवडणुकीबाबत भाष्य केले. तसेच यावेळी अजित पवार गटाशी दोन हात करण्याची तयारी असल्याचे संकेत दिले.आगामी लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीमध्ये जागा वाटपावरून चर्चा सुरू आहे. काही जागांवर तिढा असला तरी तो सामंजस्याने सोडविण्याचा प्रयत्न आहे. त्यातच उपमुख्यमंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे बंडखोर नेते अजित पवार यांनी बारामती, शिरूर, रायगड, सातारा या लोकसभा मतदारसंघात उमेदवार उभे करणार असल्याचे स्पष्ट केले आहे.

जयंत पाटील त्यासंदर्भाने बोलताना म्हणाले, ‘‘आगामी लोकसभा निवडणूक एप्रिल मे महिन्यात होणार आहे. १४ ते १५ जागा आपण लढविणार आहोत. त्यामध्ये अमरावती, भंडारा, बारामती, सातारा, शिरूर, रायगड, रावेर, दिंडोरी समावेश आहे. काही मतदारसंघात आपण उमेदवार बदलणार आहोत.’’अजित पवार यांचा पक्ष वेगळा झालेला आहे, त्यांना काही जागा लढवाव्या लागतील. काही मतदारसंघात लढवतील ते. पण ते खरंच लढवणार की लढवल्यासारखं दाखवणार हे बघायचं आहे, असा टोला पत्रकारांशी संवाद साधताना जयंत पाटील यांनी अजित पवार यांना मारला..

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबद्दल बोलताना जयंत पाटील म्हणाले, ‘‘एकनाथ यांना रात्रीची व्यवस्थित झोप लागू दे. तुम्ही नका त्यांना त्रास देऊ. ते बिचारे मुख्यमंत्री म्हणून काम करत आहेत. पण प्रशासन देखील त्यांचं ऐकत नाही. ते पदावरून कधीही जाऊ शकतात, त्यामुळे राज्यातील आयएएस, आयपीएस अधिकारी त्यांच ऐकायच्या मनःस्थितीत नाहीत.

बबनराव लोणीकरांच्या घरावर अज्ञातांकडून दगडफेक

जालना – माजी मंत्री राजेश टोपे यांच्या गाडीवर दगडफेक झाल्यानंतर सायंकाळी बबनराव लोणीकर आणि त्यांच्या भावाच्या घरावर दगडफेक झाल्याची घटना घडली आहे.राजेश टोपे यांच्या गाडीवर झालेल्या दगडफेकीनंतर टोपे यांनी बबनराव लोणीकर यांच्यावर आरोप केले होते. लोणीकरांच्या काही कार्यकर्त्यांनी गाडीची तोडफोड करणं निषेधार्ह असल्याचं ते म्हणाले होते. त्याला लोणीकर यांनीही उत्तर दिलं होतं.लोणीकर म्हणाले होते की, चेअरमन आणि व्हाईस चेअरमन निवडीसाठी राजेश टोपेंसोबत माझ्या बंगल्यावर बैठक झाली होती. परतूर-मंठा या दोन तालुक्यात भाजपचा व्हाईस चेअरमन द्यायचा हे ठरलेलं असताना त्यांनी ऐनवेळी पलटी मारली. काही कार्यकर्त्यांनी त्यांना या विश्वासघाताबाबत जाब विचारला तेव्हा त्यांच्या अंगावर गाडी घालण्याचा प्रयत्न करण्यात आला, असा आरोप लोणीकरांनी केला होता.त्यानंतर सायंकाळच्या दरम्यान, बबनराव लोणीकर आणि त्यांच्या भावाच्या घरावर काही अज्ञातांकडून दगडफेक करण्यात आलेली आहे. जालन्यामध्ये आता भाजप-राष्ट्रवादीचा वाद शिगेला पोहोचल्याचं दिसून येतंय. दगडफेक करणारे नेमके कोण होते, याबाबत अद्याप स्पष्टता नाहीये. 

वाहतूक व बांधकाम क्षेत्र प्रदूषणास जास्त कारणीभूत !

भारतातील अनेक प्रमुख शहरांतील हवेच्या प्रदूषणाची पातळी ही धोकादायक स्थितीत आहे. राजधानी दिल्लीसह मुंबई, पुणे या सर्व शहरांमध्ये हवेच्या प्रदूषणाचे शरीरावर होणारे दुष्परिणाम दिसू लागले आहेत. एकाच वेळी ध्वनी, पाणी व हवेचे प्रदूषण यांच्याशी प्रत्येकाला सामना करावा लागत आहे. देशातील प्रवासी व मालवाहतूक व बांधकाम क्षेत्र यांचा प्रदूषणात भर घालण्यात मोठा वाटा आहे. या महत्त्वाच्या समस्यांवर शास्रीय दृष्टीकोनातून उपाययोजना करण्याची गरज आहे.

चालू वर्षांमध्ये देशातील अनेक शहरातील हवेच्या गुणवत्तेचा दर्जा निर्देशांक लक्षणीयरीत्या घसरलेला असून अनेक ठिकाणी त्याने धोक्याची पातळी ओलांडलेली आहे.राजधानी दिल्ली व पुण्यासारख्या शहरांमध्ये तर हवेच्या वाढत्या प्रदूषणामुळे विमानांची उड्डाणे रद्द करावी लागल्याची उदाहरणे आहेत. अन्य प्रमुख शहरांची स्थिती यापेक्षा फार काही वेगळी नाही.याबाबत प्रसिद्ध केलेल्या अहवालामध्ये विविध कारणांमुळे हवेच्या प्रदूषणामध्ये वाढ झाल्याचे दिसून येते. प्रदूषणामध्ये भर घालण्याच्या विविध कारणांपैकी सर्वात दोन महत्त्वाची कारणे आहेत वाहतूक व बांधकाम क्षेत्र.

सध्या भारतातील रस्त्यांवर 70 लाख पेक्षा जास्त ट्रक धावत असतात.त्यामध्ये प्रतिवर्षी नऊ ते दहा लाख नव्या ट्रकची भर पडत असते. भारतात दरवर्षी दोन ट्रिलियन टन किलोमीटर वजनाची मालवाहतूक रस्त्यांवरून केली जाते.त्यासाठी आपण आयात करीत असलेल्या इंधनांपैकी जवळजवळ एक चतुर्थांश डिझेल या ट्रक साठी वापरले जाते एवढेच नाही तर वाहतुकीमुळे हवेमध्ये कार्बन चा धूर सोडण्याचे सर्वात प्रमुख कारण ही ट्रक वाहतूक असून त्यामुळे 90 टक्के कार्बन प्रदूषण ट्रकमुळे होते असे लक्षात आले आहे.भारतातील व्यापार वृद्धीमध्ये होत असलेली वाढ लक्षात घेता देशभरात सर्वत्र ट्रक मधून होणारी मालवाहतूक सातत्याने वाढत असल्याने एकूण हवेच्या प्रदूषणामध्ये त्याचा मोठा परिणाम होताना दिसत आहे.आपल्याकडे विजेवर धावणाऱ्या रेल्वेच्या माध्यमातून मालवाहतूक केली जाते. परंतु त्याचा एकूण वाटा केवळ 20 टक्क्यांच्या घरात आहे. भारतात गेल्या काही वर्षात विजेवर चालणाऱ्या वाहनांची निर्मिती केली जात आहे ही त्या दृष्टिकोनातून समाधानाची बाब असली तरी त्याचे प्रमाण एकूण वाहनांच्या तुलनेत केवळ पाच ते सहा टक्के आहे. विजेवर चालणारे ट्रक आज तरी देशात जवळजवळ नाहीत. त्यामुळे या डिझेलवर चालणाऱ्या ट्रकच्या ताफ्यांना पर्याय हे आपल्यापुढे मोठे आव्हान आहे. सर्वात महत्त्वाची म्हणजे विजेवर चालणाऱ्या ट्रक साठी लागणाऱ्या बॅटऱ्यांची किंमत किंवा खर्च आणि या बॅटऱ्या सातत्याने चार्ज करण्यासाठी लागणारी चार्जिंग स्टेशन्स या त्यातील महत्त्वांच्या अडचणी व आव्हाने आहेत. तसेच विजेवर चालणाऱ्या ट्रक साठी जी वीज वापरली जाते त्याची निर्मिती ही कोळसा वापरून केली जाते. त्यामुळेही प्रदूषणात भर पड़ते. ज्याला हरित वीज म्हणतो अशा प्रकारची वीजनिर्मिती देशात कमी प्रमाणात होते. तरीही मालवाहतूक व प्रवासी वाहतूक यासाठी लागणाऱ्या मोठ्या बसेस आणि ट्रक्स यांची लक्षणीय वाढ लक्षात घेता विजेवर चालणाऱ्या बसेस व ट्रक हा प्रदूषण कमी करण्यावर किंवा नियंत्रण करण्यासाठी महत्त्वाचा मार्ग ठरेल असे वाटते. त्यामुळे वाहनांच्या धुरापोटी निर्माण होते होणारे कार्बन उत्सर्जन आणि धुळीचे हवेतील प्रमाण हे कमी करण्यासाठी तातडीने राष्ट्रीय पातळीवरील उपाययोजना करण्याची निश्चित गरज आहे.

दरवर्षी किमान सात ते आठ हजार विजेवर चालणाऱ्या ट्रकची गरज आहे. जर प्रत्यक्षात हे ट्रक हे विजेवर चालणारे ट्रक रस्त्यावर आले तर त्यामुळे आठशे बिलियन डिझेलची बचत होणार आहे. सध्या देशात दरवर्षी डिझेलवर चालणाऱ्या ट्रकचे वाढते प्रमाण लक्षात घेतले तर 2050 पर्यंत 1.7 कोटी ट्रक भारतीय रस्त्यांवर धावत असतील अशी शक्यता आहे.हा आकडा खरोखरच देशाची चिंता वाढवणारा असून त्या ऐवजी विजेवर चालणारे ट्रक तयार करणे आणि डिझेलवर चालणारे ट्रक लवकरात लवकर बाद करणे हा त्यावर पर्याय आहे.परंतु देशाच्या विविध शहरी व ग्रामीण भागांमध्ये धावणारे डिझेल वरील ट्रक भंगारात काढणे किंवा त्याला पर्यायी वाहतूक यंत्रणा निर्माण करणे हे सहज सोपे नाही. देशातील मालवाहतुकीसाठी सर्वत्र ट्रकचा वापर केला जातो व त्याच्यामध्ये खाजगी गुंतवणूक मोठ्या प्रमाणावर आहे. या वाहतूक व्यवसायाला केंद्र सरकारने मोठ्या प्रमाणावर पायाभूत सुविधांच्या दृष्टिकोनातून मदत करण्याची आवश्यकता आहे.अर्थात त्यासाठी खाजगी उद्योग क्षेत्रातील गुंतवणूक ही वाढण्याची गरज आहे. याचे प्रमुख कारण म्हणजे आज रस्त्यावर येणाऱ्या डिझेल ट्रकची किंमत 40 ते 45 लाख रुपयांच्या घरात आहे.मात्र त्या तुलनेत विजेवर चालणाऱ्या एका ट्रकची किंमत ही जवळजवळ 1.50 कोटीच्या घरात जाते.त्यामुळे डिझेल ट्रकचा वापर कमी करणे आणि त्या ऐवजी विजेवर चालणारे ट्रक देशभरात वापरणे हा जरी उपाय असला तरी त्यातील मोठी गुंतवणूक हा गंभीर प्रश्न असून तीच प्रमुख समस्या आहे.

देशातील विविध महानगरांमधील सुरू असलेली मोठ्या प्रमाणावरील बांधकामे सुद्धा हवेच्या प्रदूषणास प्रदूषणात भर घालणारी ठरत आहेत. बांधकामासाठी वापरली जाणारी खडी आणि सिमेंट यामुळे हवेमध्ये धुळीचे कण मोठ्या प्रमाणावर साचले जातात व त्याचाही प्रतिकूल परिणाम शुद्ध हवेवर मोठ्या प्रमाणावर होतो.महाराष्ट्रातील प्रदूषण नियंत्रण मंडळाने केलेल्या एका पाहणीनुसार मुंबईतील हवेच्या प्रदूषणाला तेथील बांधकाम क्षेत्र कारणीभूत ठरत असून त्याचा 70 टक्क्याच्या घरात आहे. बंगलोर चेन्नई व पुणे तसेच दिल्ली या सर्व शहरांमध्ये सुरू असलेल्या मोठ्या प्रमाणावरील बांधकामापोटी हवेचे प्रदूषण वाढत आहे.देशातील शहरीकरण अत्यंत वेगाने वाढत असून निवासी घरांची व पायाभूत सुविधा निर्माण करणाऱ्या व्यापारी संकुलांची निर्मिती सातत्याने वाढत आहे.याचाच परिणाम होऊन धुळीमुळे होणारे हवेचे प्रदूषण कारणीभूत ठरत आहे. बांधकामासाठी वापरल्या जाणाऱ्या पारंपरिक पद्धतीमुळे हवेतील प्रदूषण वाढत असल्याचे आढळलेले आहे. या धुलीकणांमुळे आबाल वृद्धांपासून गर्भवती असलेल्या महिला, या सर्वांनाच श्वसनाच्या विकारांना सामोरे जावे लागत आहे. देशाच्या अनेक प्रमुख शहरांमध्ये ही मोठी समस्या असल्याचे वैद्यकीय क्षेत्रातील मंडळींनीही वारंवार सरकारच्या निदर्शनास आणून दिलेले आहे. पुणे शहराबरोबरच अनेक शहरांमध्ये मध्येही वाढत्या बांधकामामुळे पाण्याचा प्रश्न गंभीर होत आहे. अहोरात्र सुरू असलेल्या बांधकामामुळे ध्वनी व हवेचे प्रदूषण वाढत आहे.

एकंदरीत देशातील विविध महानगरांमध्ये अक्राळ विक्राळ पद्धतीने वाढत असलेला बांधकाम व्यवसाय, वेगाने वाढणारे शहरीकरण,व्यापार वृद्धीमुळे वाढत असलेली माल वाहतूक या दोन महत्त्वाच्या गोष्टींचा राष्ट्रीय पातळीवर विचार करून त्यावर त्वरित योग्य मार्ग काढण्याच्या शास्त्रीय, व्यावहारिक दृष्टिकोनातून पावले उचलणे आवश्यक आहे.

लेखक -प्रा. नंदकुमार काकिर्डे

(लेखक पुणेस्थित अर्थविषयक जेष्ठ पत्रकार आहेत)*

अमृत महोत्सवानिमित्त डॉ.सुचेता भिडे – चापेकर यांचा ६ डिसेंबर रोजी सत्कार

पुणे:ज्येष्ठ भरतनाट्यम नृत्यांगना, नृत्यगुरु डॉ. सुचेता भिडे – चापेकर यांच्या अमृत महोत्सवानिमित्त त्यांच्या शिष्यवर्गाकडून पुण्यात सत्काराचे आयोजन करण्यात आले आहे.हा सत्कार दि.६ डिसेंबर रोजी सायंकाळी ६.१५ वाजता बाल शिक्षण मंदिर सभागृह, कोथरुड येथे पद्मश्री डॉ.लीला पूनावाला यांच्या हस्ते होणार आहे. कार्यक्रमाच्या संयोजक अरुंधती पटवर्धन, स्मिता महाजन यांनी पत्रकाद्वारे ही माहिती दिली.या कार्यक्रमात डॉ.सुचेता भिडे चापेकर यांच्या शिष्या विविध विलोभनीय नृत्यप्रकार सादर करणार आहेत.डॉ.चैतन्य कुंटे हे डॉ .सुचेता भिडे -चापेकर यांची प्रकट मुलाखत घेणार आहेत.हा कार्यक्रम विनामुल्य आहे.

समर्पित नृत्य जीवन: डॉ.सुचेता भिडे -चापेकर
डॉ.सुचेता भिडे -चापेकर (जन्म ६ डिसेंबर १९४८) या शास्त्रीय नृत्यांगना, नृत्य दिग्दर्शिका आहेत. त्या भरतनाट्यम या नृत्य प्रकारांत निपुण आहेत. भरतनाट्यम या शास्त्रीय नृत्य क्षेत्रातील एक अग्रगण्य नाव. गुरु, वाग्येकार आणि संरचनाकार असलेल्या सुचेता चापेकरांना संगीत नाटक अकादमीने २००७ साली पुरस्कार देऊन गौरविले आहे.

६ डिसेंबर १९४८ रोजी एका सुसंस्कृत आणि प्रतिष्ठित घरात सुचेताताईंचा जन्म झाला.बालपण मुंबई येथे गेले. मुलीची नृत्यातली गती आणि आवड बघून स्वतः चित्रकार असलेल्या वडिलांनी त्यांना नृत्य शिकण्यासाठी प्रोत्साहन दिले.गुरु पार्वतीकुमार यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांचे अरंगेत्रम १९६३ साली वयाच्या १५व्या वर्षी झाले. पार्वतीकुमार यांच्या नृत्य कार्यक्रमातून त्यांचा सक्रिय सहभाग असे. त्याचप्रमाणे गुरूंच्या भरतनाट्यम नृत्यातील तंजावर येथील मराठी राजांच्या योगादानाविषयीच्या अभ्यासातही सुचेताताई त्यांच्या सहाय्यक होत्या. मुंबईच्या जे.जे.स्कूल ऑफ आर्टमधून पदवी संपादन करत असतानाच देशभर विविध ठिकाणी त्यांचे नृत्याचे कार्यक्रम होत होते. मद्रास म्युझिक अकादमी येथील त्यांच्या कार्यक्रमाला विशेष पसंती मिळाली.त्यानंतर त्यांना गुरु के.पी.किट्टप्पा यांच्याकडून भरतनाट्यम नृत्यातील प्राचीन रचना आणि कर्नाटक संगीताचे मार्गदर्शन मिळाले.

लग्नानंतर पुण्यात स्थायिक झालेल्या सुचेताताईंनी १९८२ साली पहिला विदेश दौरा केला. लंडन,पॅरीस,रोटरडॅम येथील त्यांच्या नृत्य प्रस्तुतीला रसिकांचा भरभरून प्रतिसाद मिळाला. ऐंशीच्या दशकात महाराष्ट्रासह उत्तर भारतात त्यांनी अनेक कार्यक्रम केले. त्यादरम्यान त्यांच्या लक्षात आलं की केवळ भाषेच्या अडचणीमुळे भरतनाट्यमसारख्या सुंदर कलेचा आस्वाद उत्तर भारतीय रसिक घेऊ शकत नाहीत. त्यातूनच मग नृत्यगंगा या अनुपम नृत्य शैलीचा जन्म झाला. १९८२ साली याचा पहिला प्रयोग मुंबईच्या नॅशनल सेंटर फॉर परर्फॉमिंग आर्ट्स येथे झाला. भरतनाट्यमचे मूळ सौंदर्य कायम राखत हिंदुस्तानी संगीतात हिंदी मराठी रचना त्यांनी सादर केल्या आणि या त्यांच्या प्रयोगाला समीक्षकांसह रसिकांचीही भरघोस दाद मिळाली.या त्यांच्या अभिनव प्रयोगासाठी त्यांनी तंजावूरच्या मराठी राजांच्या रचनांचा सखोल अभ्यास केला आणि पीएच.डी. मिळाली. शहाजीराजे,सरफोजीराजे यांच्या अनेक मराठी,हिंदी आणि संस्कृत रचनांच्या सादरीकरणातून त्यांनी नृत्यकलेत भर घातली आहे.

सवाई गंधर्व संगीत महोत्सवात तीन वेळा नृत्य करण्याचा बहुमान त्यांनी प्राप्त केला आहे. आनंदासाठी कला,कलेसाठी कला आणि जीवनासाठी कला हे ब्रीद घेऊन त्यांनी१९८८ मध्ये समविचारी लोकांच्या बरोबर ‘कलावर्धिनी चॅरिटेबल ट्रस्ट ’ या कलेच्या प्रसार प्रचार करणाऱ्या संस्थेची स्थापना केली. या माध्यमातून अनेक नृत्य कलाकार,रचनाकार आणि अध्यापक यांची जडणघडण त्यांनी केली आहे.

अनेक पुरस्कार त्यांना मिळाले आहेत.राज्यसरकार – महाराष्ट्र गौरव पुरस्कार, सूरसिंगार संसद,मुंबई- नृत्यविलास उपाधी, राष्ट्रीय संगीत नाटक अकादमी,नवी दिल्ली – भरतनाट्यम क्षेत्रातील योगदानासाठीचा सर्वोच्च सन्मान,संगीत नाटक अकादमी पुरस्कार (२००७),
पुणे महापालिकेने रोहिणी भाटे यांच्या नावाने दिला गेलेला २०१५ सालचा ’स्वर्गीय गुरू पंडिता रोहिणी भाटे पुरस्कार’.

द्विराष्ट्र वादाला विरोध केल्याने गांधींची हत्या: शमसुल इस्लाम

पुणे:महाराष्ट्र गांधी स्मारक निधी आणि युवक क्रांती दलाच्या वतीने आयोजित ‘महात्मा गांधी आणि द्विराष्ट्रवादाचा सिद्धांत ‘ या विषयावरील लेखक,समाजशास्त्र अभ्यासक शमसुल इस्लाम यांच्या व्याख्यानाला शुक्रवारी चांगला प्रतिसाद मिळाला. डॉ कुमार सप्तर्षी अध्यक्ष स्थानी होते. प्रशांत कोठडीया,डॉ. शशिकला रॉय, संदीप बर्वे आदी मान्यवर उपस्थित होते.हे व्याख्यान शुक्रवार, दि.१ डिसेंबर २०२३ रोजी सायंकाळी ६ वाजता गांधी भवन, कोथरूड येथे झाले.शमसुल इस्लाम म्हणाले,’पाकिस्तान ज्या प्रमाणे धर्माच्या आधारे इस्लाम राष्ट्र झाले , त्या नुसार भारत हिंदू राष्ट्र होण्यास महात्मा गांधींनी विरोध केला. त्यामुळेच त्यांची हत्या झाली.

शमसूल इस्लाम पुढे म्हणाले की महात्मा गांधी यांचा द्विराष्ट्रवादाला आणि धार्मिक तसेच जातीयवादाला प्रथम पासूनच विरोध होता, त्यामुळेच त्यांची पाच वेळा वेगवेगळ्या ठिकाणी हत्या करण्याचे कट करण्यात आले. त्याच प्रकारे अलिकडच्या काळातही ज्यांनी धार्मिक वादाला आणि जातीयवादाला विरोध केला त्या गौरी लंकेश, दाभोळकर, कलबुर्गी, पानसरे यांचीही हत्या झाली.
. त्यामुळे ४० कोटी वा ५५ कोटी पाकिस्तानला दिल्याने गांधींची हत्या केली ही सरळ सरळ एक पुढे केलेली ढोंगी सबब होती”

“महात्मा गांधींची लोकसहभागातून मोठी आंदोलने उभारण्याच्या दृष्टीला आणि हातोटीला शह देण्यासाठीच सत्ताधारी इंग्रजांनी मुस्लिम लीग आणि हिंदू महासभेला हाताशी धरून द्विराष्ट्रवाद म्हणजेच देशात फूट पाडली, या द्विराष्ट्रवादाच्या मोहाला मुस्लिम लीग आणि हिंदू महासभा हे धर्माच्या मोहापायीच बळी पडले आणि त्यातून, ज्यांना दोन राष्ट्र, दोन देश नको होती, फाळणी नको होती, त्यांना ती जबरदस्तीने स्वीकारावी लागली, असेही स्पष्टपणे दिसून येते, असेही मत शमसूल इस्लाम यांनी मांडले.

पिंपरीत ऑटो, टॅक्सी, बांधकाम मजूर, कंत्राटी सफाई कामगार कष्टकरी जनतेचे 2 दिवसीय राष्ट्रीय अधिवेशनाचे दिमाखदार उद्घाटन

पिंपरी-ऑटो, टॅक्सी, बस, रिक्षा चालक मालक यांच्या साठी तातडीने कल्याणकारी मंडळ,मुक्त रिक्षा परवाना शासनाच्या माध्यमातून सोडविणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात लवकरच महाराष्ट्रतील 3 कोटी असंघटित कामगार कष्टकरी जनतेसाठी मंडळ स्थापन करण्यात येणार आहे. त्या माध्यमातून सामजिक सुरक्षा,आरोग्य विमा व ईतर सुविधा मिळणार,आणि कष्टकऱ्यांचे कल्याण होणार असल्याचे प्रतिपादन उद्योग मंत्री उदय सामंत यांनी केले.

पिंपरी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसरात ऑटो, टॅक्सी, बस, ट्रान्सपोर्ट फेडरेशन व ऑटो चालक-मालक संघटना संयुक्त कृती समिती महाराष्ट्र राज्य कष्टकरी जनता आघाडी ,यांच्या दोन दिवसीय राष्ट्रीय अधिवेशनाचे उद्घाटन उद्योग मंत्री उदय सामंत यांच्या हस्ते झाले. या वेळी मंत्री सामंत बोलत होते.

ऑटो, रिक्षा, टॅक्सी, बस, टेम्पो चालक मालक संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष बाबा कांबळे यांच्या नेतृत्वाखाली या अधिवेशनाला सुरुवात झाली.

या वेळी खा. श्रीरंग बारणे व मीर मोहम्मद (जम्मू-काश्मीर)वासू येलटी(आंध्र प्रदेश) संथेल कुमार (तामिळनाडू)
रवी रेड्डी ( कर्नाटक)नरेंद्र ठाकूर (हिमाचल प्रदेश)विनयकुमार (भूषण तेलंगणा)राकेश शिंदे,(महाराष्ट्र)मनोज शाहू – (आंध्र प्रदेश)सुमेर अंबावत (दिल्ली )रवि राठोड(दिल्ली) पद्मराज सुमेधा (तमिळनाडू)अन्वर पाशा (आंध्र प्रदेश) प्रभाकर मलिक (ओडिसा)विष्णुदास (आसाम)प्रदीप (ओडिशा) प्रीतम सेन (छत्तीसगड)गजानन खापे (कर्नाटक) राकेश शिंदे, (महाराष्ट्र)गफार नदाफ (कराड) नरेंद्र गायकवाड, (नांदेड)रमेश जाधव (ठाणे महापौर) शिवाजी गोरे,बबलू आतिश खान(कल्याण डोंबिवली)
रामभाऊ पाटील (सांगली)विष्णुकांत जांभळे (सातारा)एकनाथ ढोले,आनंद तांबे (पुणे) राजू जाधव (कोल्हापूर)चंद्रकांत भोसले (कोल्हापूर)अनिल बमनवार,मलिकार्जुन बिल्लोर (इचलकरंजी)काशिनाथ दादा रुपवते (खोपोली)वैजनाथ देशमुख (नांदेड)
सुग्रीव शिंदे (बीड)ज्ञानेश्वर हुमणे (चंद्रपूर)इलियास खान लोधी (अकोला) आदी मान्यवर उपस्थित होते .

मंत्री सामंत म्हणाले की, असंघटित कल्याणकारी मंडळात रिक्षा चालकांच्या पेन्शनचा समावेश आहे. रिक्षा चालकांच्या आरोग्याची सुविधा आहे. रिक्षा चालकांचे बरे वाईट झाल्यास त्यांना विमा देण्याची तरतूद करण्यात आली आहे. अनेक महिला सद्या रिक्षा चालवत आहेत. या महिलांना स्वस्त दरात रिक्षा मिळाली पाहिजे अशी तरतूद आहे. मुलांच्या शिक्षणासाठी शिष्यवृत्तीची सोय करण्यात आली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या अधिवेशनाला शुभेच्छा देऊन येणाऱ्या काळात सर्व अडचणी सोडवू असे आश्वासन दिल्याचे मंत्री सामंत म्हणाले. अनेक कार्यक्रम करतो. मात्र कष्टकऱ्यांच्या हातून सन्मान होणे हे महत्वाचं मानतो असे मंत्री सामंत म्हणाले.

अधिवेशनाचे अध्यक्ष बाबा कांबळे म्हणाले की, देशात 45 कोटी बांधकाम मजूर, कंत्राटी सफाई कामगार, घरकाम महिला, फेरीवाले असे संघटित कामगार कष्टकरी आहेत. तर महाराष्ट्रातील 3 कोटी एवढी संख्या कष्टकरी बांधवांची आहे. एवढी मोठी संख्या असणाऱ्या कष्टकऱ्यांच्या प्रश्नांना वाचा फोडणे गरजेचे आहे. संघटनेच्या माध्यमातून त्यांचा आवाज बनून आम्ही हे काम करत आहोत. या घटकांना न्याय देण्याची भूमिका घेतली पाहिजे. ऑटो, टॅक्सी, बस, ट्रक, टेम्पो चालकांची संख्या देशांमध्ये 25 कोटी असून या घटकांना न्याय देण्यासाठी मी देशभर, तसेच महाराष्ट्रभर फिरत आहे. देशभरामध्ये सर्व एक झाले असून मजबूत संघटन उभे राहिले आहे. या घटकांना न्याय देण्यासाठी प्रयत्न करत आहे. पुढेही त्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी कटिबध्द असेन असे बाबा कांबळे म्हणाले.

या वेळी या अधिवेशनात विविध मागण्यांवर चर्चा करण्यात आली. या मध्ये ऑटो, टॅक्सी, बस, ट्रक, टेम्पो व सर्व प्रकारच्या ड्रायव्हर साठी राष्ट्रीय आयोग स्थापन करण्यात यावा. केंद्र सरकारने सर्व प्रकारच्या ड्रायव्हर साठी वेल्फेअर बोर्ड स्थापन करून देशातील 45 कोटी ड्रायव्हर यांना सामाजिक सुरक्षा, म्हातारपणी पेन्शन द्यावी. महाराष्ट्रातील 20 लाख ऑटो, टॅक्सी, चालक-मालकांसाठी तातडीने कल्याणकारी महामंडळ घटित करण्यात यावे. महाराष्ट्रातील रिक्षाचा मुक्त परवाना तातडीने बंद करून देशभरातील सर्व इलेक्ट्रिक रिक्षांना परमिट सक्ती करण्यात यावी. फेरीवाले, गरिबाला कायद्याचे अंमलबजावणी करण्यात यावे, छोटे बांधकाम मजूर, त्यांच्यासाठी कायदा व्हावा कंत्राटी पद्धत बंद करून सफाई कामगारांना पिंपरी चिंचवड व सर्व महापालिकेत कायम करण्यात यावे, यासह इतर विविध मागण्यांसाठी हे अधिवेशन आयोजित करण्यात आले होते,

सिंधुदुर्गातील राजकोट किल्ला येथे  छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे पंतप्रधान करणार अनावरण

पंतप्रधान नरेंद्र मोदी 4 डिसेंबर 2023 रोजी महाराष्ट्र दौऱ्यावर येणार आहेत. संध्याकाळी 4.15 च्या सुमारास महाराष्ट्रातील सिंधुदूर्ग इथे ते पोहोचतील आणि राजकोट किल्ल्यातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे अनावरण करतील. त्यानंतर सिंधुदूर्ग येथे ‘नौदल दिन 2023’ कार्यक्रमाला पंतप्रधान उपस्थित राहतील. पंतप्रधान भारतीय नौदलाची जहाजे, पाणबुड्या, विमाने आणि विशेष दलांची प्रात्यक्षिके  सिंधुदुर्गातील तारकर्ली किनाऱ्यावरून पाहतील.

दरवर्षी 4 डिसेंबर रोजी नौदल दिन साजरा केला जातो. सिंधुदूर्ग येथील ‘नौदल दिन 2023’ हा सोहळा छत्रपती शिवाजी महाराजांच्या समृद्ध सागरी वारशाला आदरांजली अर्पण करत आहे. पहिली स्वदेशी विमानवाहू युद्धनौका आय. एन. एस. विक्रांतचे पंतप्रधानांनी जलावतरण केले तेव्हा  शिवरायांच्या राजमुद्रेपासून  प्रेरणा घेत साकारण्यात  आलेल्या नौदलाच्या नव्या ध्वजाचा भारतीय नौदलाने स्वीकार केला.  

दरवर्षी, नौदल दिनानिमित्त, भारतीय नौदलाची जहाजे, पाणबुड्या, विमाने आणि विशेष दलांद्वारे ‘कार्यान्वयन प्रात्यक्षिके’ आयोजित करण्याची परंपरा आहे. ही ‘कार्यान्वयन प्रात्यक्षिके’ लोकांना भारतीय नौदलाने हाती घेतलेल्या बहु-क्षेत्रीय मोहिमांचे विविध पैलू पाहण्याची संधी देतात. हे राष्ट्रीय सुरक्षेप्रती नौदलाच्या योगदानावर प्रकाश टाकते, तसेच नागरिकांमध्ये सागरी जनजागृतीचा प्रसारही करते.

देशाचा अमृतकाळ सुरू असून गुलामीची मानसिकता सोडून नव्या भारतासाठी प्रयत्न केले पाहिजे – गोयल

मुंबई, 2 डिसेंबर 2023

संपूर्ण जगाला भारतात व्यवसाय वाढवायचा आहे, जग भारताकडे मोठ्या आशेने बघत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारत झपाट्याने प्रगती करत आहे. त्यासाठी कोणतेही क्षेत्र मागे राहता कामा नये. वस्त्रोद्योगात भारताला आणखी प्रगतीची झेप घ्यायची आहे त्यासाठी अधिक प्रयत्नांची गरज केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग, वस्त्रोद्योग तसेच ग्राहक व्यवहार आणि अन्न -नागरी पुरवठा मंत्री पीयूष गोयल यांनी व्यक्त केली आहे. मुंबईतील व्हीजेटीआय माटुंगा येथील संस्थेच्या शतक महोत्सवी वर्षानिमित्य आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.

देशाचा अमृतकाळ सुरू असून आगामी 25 वर्षात देशाला विकासित भारत बनवायचे आहे. देशातल्या युवाशक्तीच्या प्रयत्नांनीच देश पुढे जाऊ शकतो. गुलामीची मानसिकता सोडून नव्या भारतासाठी   प्रयत्न केले पाहिजे  असे गोयल म्हणाले.

व्हीजेटीआय या संस्थेने देखील आता गरज लक्षात घेऊनपायाभूत सुविधां मध्ये आमूलाग्र बदल घडवला पाहिजे. नवीन आधुनिक तंत्रज्ञान आत्मसात करण्याबरोबरच संस्थेच्या पायाभूत सुविथांंचे अद्ययावतीकरण करण्याकडे  व्यवस्थापनाने  लक्ष द्यावे असे आवाहन गोयल आणि केले.

5000 हजार विद्यार्थी संख्या असलेल्या आणि शतकी महोत्सव साजरी करणाऱ्या व्हीजेटीआय संस्थेला गोयल यांनी शुभेच्छा दिल्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वातंत्र्यदिनी लाल किल्ल्यावरून केलेल्या भाषणातील पंचप्रण चा उल्लेख करत गोयल यांनी पंचप्रण बरोबरच नारीशक्तीचे सक्षमीकरण आणि भ्रष्टाचार मुक्त भारत करण्याचा संकल्प करण्याचे आवाहनही त्यांनी केले.

यावेळी व्हीजेटीआय चे माजी विद्यार्थी आणि उद्योजक योगेश कुसूमगड आणि डाँनियर समूहाचे व्यवस्थापकीय संचालक राजेंद्र अग्रवाल यांचा पीयूष गोयल यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. तसेच एका अहवालाचे प्रकाशनही करण्यात आले.

या कार्यक्रमाला राज्य वस्त्रोद्योग मंत्रालयाचे सचिव विरेंद्र सिंग, एनटीटीएम चे संचालक सौरभ मुखर्जी, व्हीजेटीआयचे संचालक डॉ सचिन कोरे, टेक्सटाईल इंजिनिअरिंगच्या विभाग प्रमुख डॉ नेहा मेहरा यांच्यासह वस्त्रोद्योग क्षेत्रातील प्रख्यात उद्योगपती, व्यावसायिक, तज्ञ, संशोधक आणि संस्थेचे विद्यार्थी उपस्थित होते.

यानंतर वस्त्रोद्योग क्षेत्रातल्या विविध विषयावर तज्ञ आणि संशोधकाचे मार्गदर्शन सत्र झाले.

कायदा राबविण्यासाठी कायदा हातात घेणाऱ्या मनसेचे साईनाथ बाबर व कार्यकर्त्यांविरुद्ध गुन्हे

पुणे : दुकानांवरील इंग्रजी नामफलक, पाट्या हटवून मराठी पाट्यांसाठी आंदोलन करुन तोडफोड केल्याप्रकरणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या (मनसे) पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त्यांविरुद्ध पोलिसांनी गुन्हे दाखल केले आहेत. याप्रकरणी डेक्कन आणि विश्रामबाग पोलीस ठाण्यात दोन स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.टिळक रस्त्यावरील महाराष्ट्र इलेक्ट्रॉनिक्स शोरुमच्या इंग्रजी पाटीची तोडफोड केल्याप्रकरणी विश्रामबाग पोलिसांनी मनसेच्या कार्यकर्त्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी साईनाथ बाबर यांच्यासह कार्यकर्त्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत स्वनेंदू घोष यांनी फिर्याद दिली आहे.आणि शाही भोज हॉटेलचे मालक ब्येनाराम मनारामजी देवासी यांनी डेक्कन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.सहायक पोलीस निरीक्षक बाळकृष्ण नाणेकर तपास करत आहेतआणि सहायक पोलीस निरीक्षक वर्षा शिंदे तपास करत आहेत.

मनसेचे शहराध्यक्ष साईनाथ बाबर, कुलदीप यादव, शाम ताठे, प्रवीण मिसाळ, संदीप माने, प्रवीण सोनवणे, राजेंद्र वागस्कर, दादा साठे, योगेश खडके यांच्यासह दहा ते बारा कार्यकर्त्यांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. याबाबत शाही भोज हॉटेलचे मालक ब्येनाराम मनारामजी देवासी यांनी डेक्कन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. मराठी पाट्या दुकाने, उपाहारगृहांवर लावण्याचे आदेश शासनाने दिले आहेत. मराठी पाट्या न लावल्याच्या निषेधार्थ मनसेच्या कार्यकर्त्यांनी मुंबई, पुणेसह राज्यभरात आंदोलन केले. मराठी पाट्या न लावणाऱ्या दुकानांच्या पाट्यांची तोडफोड करुन काळे फासले. जंगली महाराज रस्त्यावरील शाही भोज हॉटेलच्या बाहेर मनसे कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी केली. इंग्रजी पाटीची तोडफोड केली, तसेच जंगली महाराज रस्त्यावरील लेव्हीज शोरुम, शुभम टाइम्स, बुट्टे पाटील ग्रुपने लावलेल्या इंग्रजी पाट्यांची तोडफोड केली. सहायक पोलीस निरीक्षक वर्षा शिंदे तपास करत आहेत

मी भाजपसोबत यावं म्हणून मुश्रीफ माझ्या घरी 5 तास बसून:अनिल देशमुखांचा गौफ्यस्फोट; म्हणाले, हवं ते मंत्रीपदही द्यायला तयार होते

पुणे-.माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. देशमुख यांनी म्हटले की, ज्या भारतीय जनता पक्षाने मला खोट्या प्रकरणात मला फसवलं, त्या पक्षासोबत जाण्याचा प्रश्नच नव्हता. त्यांच्यासोबत जाण्यासाठी हवं ते खातं देण्याची त्यांची तयारी होती. ज्यांनी मला फसवलं त्यांच्यासोबत मला जायचं नव्हतं. मी भाजपसोबत यावं यासाठी माझ्या घरी हसन मुश्रीफ पाच तास बसून होते. मला पाहिजे ते मंत्रीपद द्यायला सुद्धा तयार होते. मात्र, मी कायम शरद पवार यांच्यासोबत राहणार असल्याचे अजित पवार यांना सांगितले असल्याचे देशमुख यांनी म्हटले.राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाने भाजपसोबत जाण्याच्या मुद्यावर शरद पवार गटावर आरोप केल्यानंतर आज राष्ट्र्वादी काँग्रेसच्या शरद पवार गटाकडून आरोपांचे खंडन करण्यात आले. पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासह पक्षाचे नेते, माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी देखील आरोपांन जोरदार प्रत्युत्तर दिले.पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाची आज बैठक पार पडली. त्यानंतर पत्रकार परिषद पार पडली. या पत्रकार परिषदेत शरद पवार यांनी अजित पवार गटाने केलेले दावे धुडकावून लावले.

सिंहगड रस्त्यावरील शिंदे मैदान येथे ऑलिम्पियन सर्कस सुरू

पुणे-प्रख्यात ऑलिम्पियन सर्कस सिंहगड रस्त्यावरील वडगाव परिसरात फन टाइम थिएटरच्या मागे असणाऱ्या शिंदे मैदान येथे सुरू झाली असून, रोज दुपारी ४ व सायंकाळी ७ असे सर्कस शो असणार आहेत. शनिवारी व रविवारी अतिरिक्त दुपारी १ वाजतादेखील शो होईल. सर्कशीचा तंबू फायरप्रूफ असून, सर्कसच्या तंबूची आसनक्षमता १२०० आहे. ७५० रुपये अधिक जीएसटी ५०० रुपये, ३०० रुपये व २०० रुपये असे तिकीटदर आहेत. तीन वर्षांखालील बालकांना प्रवेशशुल्क नाही. पार्किंगची स्वतंत्र व्यवस्था आहे.या सर्कसमध्ये मेक्सिको, उझबेकिस्तान, रशिया यांसह देशातील सुमारे २५ कलावंत आहेत आणि एकूण ६० स्टाफ आहे. एकूण दोन तास चालणाऱ्या या सर्कसमध्ये चित्तथरारक कसरती हे वैशिष्ट्य आहे. रशियन रोलर बॅलन्स, रिंग अॅक्रोबॅटिक्स, कॉमिक जग्लिंग. हुल्ला हूप्स, सिल्क अॅण्डस रिंग, नेत्रदीपक सायकल कसरती, मोटारसायकल ग्लोब, मिस्टर स्लिंकी अॅक्ट्स, हंटर अॅक्ट्स, हेअर हँगिंग, स्प्रिंग नेट, तलवारीच्या टोकावरील बॅलन्स, अॅक्रोबॅटिक्स मणिपुरी, रंगतदार दोरीवरील उड्या, कॅण्डल बॅलन्स, क्विक चेंज, लेजरमॅन शो, कॉमेडी शोज्, अॅनिमल कस्टम्स, बटरफ्लाय कॉमेडी असे अनेक मनोरंजनाचे चित्तथरारक खेळ सर्कसमध्ये बघायला मिळतील.सर्कस उद्योगाला सध्या आर्थिक अडचणीचे दिवस आले असताना पुणेकरांनी सर्कसला नेहमीच भरघोस प्रतिसाद दिला आहे, हे महत्त्वाचे आहे, असे ऑलिम्पियन सर्कसचे मालक जॉन मॅथ्यू यांनी सांगितले की, शहरांमध्ये मध्यवर्ती भागात कमी भाड्यात मैदाने उपलब्ध होत नाहीत. वीजपुरवठा अखंडित राहावा, यासाठी संपूर्ण शोला जनरेटरमार्फत वीजपुरवठा केला जातो. डिझेलच्या वाढत्या किमतींमुळे खर्चात अधिक भर पडली आहे. प्रवास, नाष्टा-जेवण, आरोग्य हे सारेच खर्च वाढले आहेत. शिवाय सर्कसला शासकीय मदत नाही. सर्कसला लोकाश्रय खूप आहे, मात्र राजाश्रय नाही, अशी खंत त्यांनी व्यक्त केली. सर्कस अडचणीत असतानाही अपंग, अनाथ यांना आम्ही सर्कस मोफत दाखवतो व सामाजिक जबाबदारी पार पाडतो, असे सांगून अधिकाधिक लोकांनी कुटुंबीयांसमवेत आवर्जून सर्कस बघावी, असे आवाहन त्यांनी केले. ७ जानेवारी २०२४ पर्यंत सर्कसचा मुक्काम पुण्यात असणार आहे. 

नागरी बँकांमध्ये नियामक अनुपालन व तांत्रिक अनुप्रयोग याविषयी राज्यस्तरीय बँकिंग परिषद बुधवारी 

पुणे नागरी सहकारी बँक्स् असोसिएशन लि., पुणे (महाराष्ट्र) तर्फे आयोजन : राज्याचे सहकार आयुक्त अनिल कवडे यांची उपस्थितीमहाराष्ट्रातील ११२ हून अधिक बँकांच्या पदाधिका-यांचा सहभाग
पुणे : नागरी सहकारी बँकांमध्ये नियामक अनुपालन म्हणजेच रेग्युलेटरी कम्प्लेयन्स आणि तांत्रिक अनुप्रयोग म्हणजेच आयटी चा उपयोग कशा प्रकारे व्हावा, त्याबाबत आव्हाने आणि संधी काय आहेत, याविषयी चर्चा व मार्गदर्शन करण्याकरिता पुणे नागरी सहकारी बँक्स असोसिएशन लि., पुणे (महाराष्ट्र) तर्फे बुधवार, दिनांक ६ डिसेंबर रोजी सकाळी ९ ते सायंकाळी ५.३० यावेळेत राज्यस्तरीय बँकिंग परिषद पुणे रेल्वे स्टेशनजवळील हॉटेल शेरेटॉन ग्रँड येथे आयोजित करण्यात आली आहे. पुण्यासह इतर जिल्ह्यातील ११२ हून अधिक बँकांचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, मुख्य कार्यकारी अधिकारी, संगणक विभाग प्रमुख व पदाधिकारी सहभागी होणार आहेत, अशी माहिती असोसिएशनचे अध्यक्ष अ‍ॅड. सुभाष मोहिते यांनी पत्रकार परिषदेत दिली.

पत्रकार परिषदेला उपाध्यक्ष अ‍ॅड.साहेबराव टकले, संचालक निलेश ढमढेरे, मुख्य कार्यकारी अधिकारी प्रा. डॉ.अनिल कारंजकर, आदी उपस्थित होते.

राज्यस्तरीय परिषदेचे उद््घाटन बुधवारी सकाळी ९ वाजता राज्याचे सहकार आयुक्त अनिल कवडे यांच्या हस्ते होणार आहे. उद््घाटनप्रसंगी पुणे जिल्हा नागरी सहकारी बँक्स असोसिएशनचे अध्यक्ष अ‍ॅड. सुभाष मोहिते, बाळासाहेब अनास्कर, अतुल खिरवाडकर, आमदार संजय जगताप, विजय ढेरे, रमेश वाणी, मिलिंद काळे, निलेश ढमढेरे, माजी आमदार नामदेव पवार यांसह अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत. परिषदेत बँकिंग क्षेत्रात काम करणारे ३०० हून अधिक पदाधिकारी सहभागी होणार आहेत.

अ‍ॅड. सुभाष मोहिते म्हणाले, परिषदेमध्ये नागरी सहकारी बँकांमध्ये नियामक अनुपालन – आव्हान व संधी, व्यय परिणामकारक तांत्रिक अनुप्रयोग आणि परिणामकारक तांत्रिक अनुप्रयोगाच्या माध्यमातून नागरी सहकारी बँकांचे नियामक अनुपालन आदी विषयांवर चर्चा व सुसंवाद होणार आहे. यामध्ये विद्याधर अनास्कर, जयंत काकतकर, अपेक्षिता ठिपसे, राजेंद्र गांगुर्डे, प्रदीप भोईर, अतुल खिरवाडकर, विक्रांत पोंक्षे, अ‍ॅड.राजेश  पिंगळे आदी क्षेत्रातील अनेक मान्यवर परिषदेत उपस्थितांना मार्गदर्शन करणार आहेत.

नागरी सहकारी बँकेतील निर्णयाचे अधिकारी असणा-या अध्यक्ष, उपाध्यक्ष तसेच मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्यामध्ये चर्चा व्हावी व सहकारात सहकार निर्माण होऊन नागरी सहकारी बँकांना बळ द्यावे, हा परिषदेचा उद्देश आहे. तसेच अधिकारी व कर्मचा-यांना दैनंदिन कामकाजात येणा-या अडचणींवर मार्गदर्शन करण्यासाठी असोसिएशन सदैव तत्पर असते. बँकांचे संचालक, सेवक उत्तमप्रकारे प्रशिक्षीत व्हावेत आणि सहकारी चळवळ सुदृढ व्हावी, हा असोसिएशनचा प्रयत्न असतो.

महाबळेश्वरमधील बॉम्बे पॉईंट येथील स्टॉलधारकांची भाडेदरवाढ ५ टक्केच करावी यासाठी पाठपुरावा करणार – पालकमंत्री शंभुराज देसाई

सातारा : सातारा वनविभागात महाबळेश्वर हे प्रसिध्द थंड हवेचे पर्यटनस्थळ आहे. या ठिकाणी देश-विदेशाचे अनेक पर्यटक भेटी देत असतात. बॉम्बे पाँईंट या स्थानकावर सांयकाळच्यावेळी सूर्यास्त पाहण्यासाठी पर्यटकांची फार मोठ्या प्रमाणावर गर्दी असतेच. या ठिकाणी असणाऱ्या स्टॉल धारकांकडून सन 2011-2012 पासून प्रतिवर्षी 20 टक्के भाडेवाढ धोरणानुसार स्टॉल भाडे वसूल करण्यात येते. ही भाडेवाढ 20 टक्के ऐवजी 5 टक्के करावी अशी मागणी स्टॉलधारकांकडून करण्यात येत असून तसा प्रस्ताव शासनासा सादर करण्यात आला आहे. या प्रस्तावाच्या मंजुरीसाठी आपण स्वत: जातीने लक्ष घालून पाठपुरावा करु अशी ग्वाही पालकमंत्री शंभुराज देसाई यांनी दिली. जिल्हाधिकारी कार्यालय सातारा येथे पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी या विषयाबाबत झालेल्या बैठकीस जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी , मुख्य कार्यकारी अधिकारी ज्ञानेश्वर खिलारी, पोलिस अधिक्षक समीर शेख, उपवनसंरक्षक आदिती भारद्वाज, सार्वजनिक बांधकाम विभागाचे संतोष रोकडे, निवासी उपजिल्हाधिकारी नागेश पाटील, सहायक वनसंरक्षक महेश झांजूरने, महाबळेश्वरचे आर.एफ.ओ गणेश महांगडे, यांच्यासह विविध अधिकारी उपस्थित होते. महाबळेश्वर येथील बॉम्बे पॉईंट धारकांना 20 टक्के भाडेवाढीच्या धोरणानुसार स्टॉलभाडे उभारणी करण्यास शासनाने मे 2012 च्या पत्रानुसार मंजुरी दिली आहे. त्यानुसार संबंधीत स्टॉलधारकांकडून प्रतिदिवस स्टॉलभाडे वसुल करण्यात येत आहे. स्टॉलधारकांनी सन 2019-20 अखेर स्टॉल भाडे भरणा केला आहे. तथापि तद्नंतर सन 2021-22 पासून संबंधित स्टॉल धारकांनी स्टॉलभाडे भरणा केला नाही. ही दरवाढ कमी करावी ती 20 टक्क्यावरुन 5 टक्के करावी. अशी मागणी सदर स्टॉलधारकांनी केली आहे. याबाबतचा प्रस्तावा शासनास सादर करण्यात आला असून तो मंत्रालय स्तराव आहे. या प्रस्तावास लवकरात लवकर मंजुरी मिळावी यासाठी आपण स्वत: जातीने लक्ष घालून मार्गी लावू अशी ग्वाही पालकमंत्री यांनी यावेळी दिली.

DP रोड:नदीपात्रालगतचे लाँस,हॉटेल्स अतिक्रमणे तातडीने निघणार..राजकीय नेत्यांच्या अतिक्रमणांसह ३० नोटीसा जारी…

  • लग्न समारंभासाठी बुकिंग करताना सावधान

पुणे- प्रसिद्धीच्या झोतात राहणाऱ्या एका लोकप्रतिनिधीच्या अतिक्रमणासह मुळा नदीचा गळा घोटणाऱ्या ३० अतिक्रमणांना महापालिकेने नोटीसा बजावल्या आहेत आणि राष्ट्रीय हरित अधिकरण – National Green Tribunal च्या आदेशानुसार तातडीने हि अतिक्रमणे काढून घ्यायला सुरुवात झाल्याचा दावा करण्यात येतो आहे. सुजन सहकारी सोसायटीने २०१५ साली राष्ट्रीय हरित अधिकरण – National Green Tribunal कडे याबाबत याचिका दाखल केली होती. २०१७ मध्ये येथे महापालिकेने कारवाई केली होती.तत्कालीन महापौर आणि पदाधिकाऱ्यांनी त्यावेळी गणेश उत्सवापूर्वी सर्व अतिक्रमणे हटविण्यात येतील असे माध्यमांना सांगितले होते.पण प्रत्यक्षात तसे काही झाले नाही. १० ऑक्टोबर रोजी National Green Tribunal ने हि सारी अतिक्रमणे हटवून तातडीने १० डिसेंबर पर्यंत याबाबतचा अहवाल सादर करण्याचे आदेश महापालिकेला दिले होते.त्यानुसार महापालिकेने आता कारवाई ची तयारी ठेवत नोटीसा दिल्या आहेत.ज्यामध्ये एका मान्यवर लोकप्रतिनिधीच्या बेनामी अतिक्रणाचा समावेश देखील असल्याचे समजते.

म्हात्रे पुलाकडून राजाराम पुलाकडे जाणाऱ्या DP रोड वरील अतिक्रमणे आणि तेथील व्यवसायअति उच्चभ्रूंसाठी असल्याचे मानले जातात.हि चालविणारी मंडळी मोठी आहेत आणि येथे होणारे व्यवहार देखील मोठ्या आर्थिक स्वरूपाचे आहेत.याच ठिकाणी रात्री अनेक हॉटेलांच्या,लाॅन्स नावाखाली पब सदृश्य धांगडधिंगा देखील सुरु असतो.NGT च्या आदेशानुसार नदीच्या किनारी ब्ल्यू लाईन च्या क्षेत्रात येणारी अतिक्रमणे हटविण्यात येणार आहेत मात्र ब्ल्यू लाईन आणि DP रस्ता या दरम्यानच्या क्षेत्रात मात्र हे व्यावसायिक व्यवसाय करू शकतील असा दावा केला जातो आहे.

काही जणांनीआपापली अतिक्रमणे काढून घेण्यास सुरुवात केली आहे.

दरम्यान येथे लग्न समारंभासाठी बुकिंग करताना नागरिकांनी आता सावधानता बाळगली पाहिजे,अन्यथा लग्नसमारंभ करताना अडचणींचा सामना करावा लागण्याची दाट शक्यता आहे.

विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या उपस्थितीत दुष्काळ निवारण कार्यशाळेचे आयोजन

दुष्काळाची दाहकता कमी करण्यासाठी सामाजिक संस्थानी सक्रीय सहभाग घ्यावा- डॉ. नीलम गोऱ्हे

पुणे, दि.२ : कमी पावसामुळे राज्य शासनाने १५ जिल्ह्यातील ४० तालुक्यात दुष्काळ जाहीर केला असून या क्षेत्रातील दुष्काळाची दाहकता कमी करण्यासाठी स्वयंसेवी, सामाजिक संस्थानी सक्रीय सहभाग घ्यावा, असे प्रतिपादन विधानसभेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी केले.

महाराष्ट्र दुष्काळ निवारण आणि मदत कार्यक्रम समिती व स्त्री आधार केंद्र पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने विभागीय आयुक्त कार्यालयात दुष्काळ निवारण अंमलबजावणीबाबत आयोजित एक दिवसीय कार्यशाळेत त्या बोलत होत्या.

यावेळी महाराष्ट्र दुष्काळ निवारण आणि मदत कार्यक्रम समितीचे (एमडीआरएसपी) शिरीष कुलकर्णी व स्त्री आधार केंद्राच्या अपर्णा पाठक, गौतम गालफाडे, झेलम जोशी, राज्यातील विविध ठिकाणच्या सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

यावेळी डॉ. गोऱ्हे म्हणाल्या, राज्यात या वर्षी दुष्काळाची तीव्रता अधिक आहे. जून ते सप्टेंबर या कालावधीतील पर्जन्याची तूट, उपलब्ध असलेल्या भुजलातील कमतरता आदी निकष लक्षात घेऊन १५ जिल्ह्यातील २४ तालुक्यात गंभीर तर १६ तालुक्यात मध्यम स्वरूपाचा दुष्काळ जाहीर केला आहे. काही भागात अतिवृष्टी, तर काही भागात कमी पाऊस, सध्या अवकाळी पावसामुळे शेतकरी मेटाकुटीला आला आहे. अशा परिस्थितीत शासनाकडून मदत दिली जात आहे. त्याचबरोबर राज्यातील विविध भागात सामाजिक संस्था दुष्काळाची दाहकता कमी करण्यासाठी मोलाचे कार्य करीत आहेत.

त्या पुढे म्हणाल्या, दुष्काळात पिण्याचे पाणी, चारा टंचाई, बेरोजगारी इत्यादी परिस्थितीला सामोरे जावे लागते. बेरोजगारीमुळे वंचित घटक, आदिवासी, शेतमजूर आदी घटकातील नागरिक मोठ्या प्रमाणात स्थलांतर करतात. याची सर्वाधिक झळ महिला, जेष्ठ व्यक्ती, मुलांना बसते. त्यांचे स्थलांतर रोखून त्यांना रोजगार हमी योजनेअंतर्गत काम मिळवून देणे, त्यासाठी त्यांना जॉब कार्ड मिळवून देणे आवश्यक आहे, असेही त्यांनी सांगितले.

शालेय, महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या परीक्षा शुल्कात माफी, कृषी पंपाच्या वीजबिलात सुट, आवश्यक तेथे पिण्याचे पाणी पुरविण्यासाठी टँकरचा वापर होतो का आदींची माहिती संस्थानी निर्दशनास आणावी. दुष्काळ निवारणाच्या कामात स्वयंसेवी संस्था व शासकीय यंत्रणा यांच्यामध्ये समन्वय ठेवून जास्तीत जास्त दुष्काळग्रस्तांपर्यंत शासनाच्या विविध योजना पोहचविण्यात याव्यात. संस्थानी सक्षम होऊन चांगल्या प्रकारे सर्वेक्षण करावे. कामे करताना अडचणींना सामोरे जावे लागू नये यासाठी संस्थांच्या प्रतिनिधींना ओळखपत्र देण्यात यावे. दुष्काळाच्या परिस्थितीतही शाश्वत विकास कसा राहील, याची सर्वांनीच दक्षता घ्यावी, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.

यावेळी श्री. कुलकर्णी आणि श्रीमती पाठक यांनी त्यांचे मनोगत व्यक्त केले. तसेच विविध संस्थांच्या प्रतिनिधींनी आपापल्या भागातील दुष्काळाची परिस्थिती सांगितली.