Home Blog Page 1331

मुंबई महानगरपालिकेच्या गेल्या २५ वर्षातील आर्थिक कारभाराचे होणार लेखापरीक्षण – मंत्री उदय सामंत

नागपूर, दिनांक १२ – मुंबई महानगरपालिकेच्या गेल्या २५ वर्षातील आर्थिक कारभाराचे लेखापरीक्षण करून त्याबाबतची श्वेतपत्रिका पुढील अधिवेशनात मांडण्यात येईल, अशी माहिती नगरविकास मंत्री उदय सामंत यांनी आज विधानसभेत पुरवणी मागण्यांना उत्तर देताना दिली. नियोजन विभागाचे अपर प्रधान सचिव, नगरविकास -१ चे प्रधान सचिव आणि संचालक (वित्त – लेखापरीक्षण) यांची समिती ही चौकशी करेल, असेही त्यांनी सांगितले.

मंत्री श्री.सामंत म्हणाले की, सदस्य योगेश सागर यांनी मुंबई महापालिकेच्या गेल्या २५ वर्षातील आर्थिक कारभाराची चौकशी करण्याची मागणी केली होती. ती मान्य करण्यात येऊन याबाबत निर्णय घेतल्याचे त्यांनी जाहीर केले.

याशिवाय, नगरविकास विभागाच्या अनुषंगाने ठाणे शहरातील घनकचरा, पाणीपुरवठा, याबाबतही तक्रारी नसल्याचे सांगून ठाणे शहराला ५८५ एमएलडी पाणीपुरवठा होत असल्याचे मंत्री श्री. सामंत यांनी सांगितले. सूरज परमार गुन्हा प्रकरणी तपास सुरू असून याप्रकरणी अतिजलद तपास करण्याच्या सूचना दिल्याचेही त्यांनी सांगितले.

दरम्यान, विधानसभेने आज नगरविकास विभागाच्या ५०१५ कोटी ११ लाख ९० हजार रुपयांच्या पुरवणी मागण्या मंजूर केल्या. तसेच महसूल विभागाच्या ६३१ कोटी ६७ लाख ३८ हजार रुपयांच्या, तर मदत व पुनर्वसन विभागाच्या ११२ कोटी ८४ लाख १ हजार रुपयांच्या पुरवणी मागण्या मंजूर केल्या. तसेच वन विभागाच्या ४२ कोटी ६१ लाख रुपयांच्या पुरवणी मागण्या मंजूर करण्यात आल्या.

वैद्यकीय शिक्षण विभागाच्या ३०८० कोटी ७३ लाख रुपयांच्या तर अन्न व औषध प्रशासन विभागाच्या ५४ लाख ९६ हजार रुपयांचे पुरवणी मागण्या यावेळी मंजूर करण्यात आल्या.

महिलांना राजकीय आरक्षणामुळे समाजात सकारात्मक बदल दिसतील- उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे

0

नागपूर, दि. 12 :- समाजकारण व राजकारणामध्ये महिला आपला वेगळा ठसा उमटवत आहेत. राजकीय आरक्षणामुळे महिलांना समाजकारण व राजकारण या क्षेत्रात अधिकची संधी निर्माण होणार आहे. या आरक्षणामुळे  समाजात सकारात्मक बदल दिसू लागतील, असा विश्वास विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे यांनी व्यक्त केला.

विधानभवनात आयोजित राष्ट्रकुल संसदीय अभ्यास वर्गात “संसदीय लोकशाही व महिला धोरण” या विषयावर अभ्यास वर्गासाठी सहभागी झालेल्या विविध विद्यापीठांच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना डॉ.गोऱ्हे बोलत होत्या. यावेळी विधानमंडळ सचिव विलास आठवले, दैनिक सकाळच्या नागपूर आवृत्तीचे संपादक संदीप भारंबे, विधिमंडळाचे जनसंपर्क अधिकारी निलेश मदाने उपस्थित होते.

उपसभापती डॉ. गोऱ्हे म्हणाल्या, महिला आज सर्व क्षेत्रात अग्रेसर आहेत. त्यांनी आयएएस, आयपीएस, न्यायाधीश यासह  क्रीडा  क्षेत्रात आपला वेगळा ठसा उमटवला आहे. आजच्या समाज माध्यमांच्या क्षेत्रातही त्या उत्कृष्टपणे काम करीत आहेत. या विविध क्षेत्रातील सहभागामुळे समाजात महिलांबद्दल अधिक आदर निर्माण होत आहे.  महाराष्ट्र राज्य हे महिलांना संधी देण्यात नेहमीच अग्रेसर राहिले आहे. यामुळे राज्यातील महिलांनी शिक्षण,राजकारण, क्रीडा प्रशासन अशा सर्वच क्षेत्रात आपली वेगळी छाप उमटवली आहे. या क्षेत्रात काम करणाऱ्या महिलांनी, महिला प्रश्नांचा अजेंडा अधिक समोर आणण्यासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहनही  डॉ. गोऱ्हे यांनी केले.

डॉ. गोऱ्हे म्हणाल्या की, 1990 साली तत्कालीन पंतप्रधान व्ही. पी. सिंग यांच्यासोबत महिला आघाडीची बैठक झाली. त्यामध्ये महिला आरक्षणाचा मुद्दा मांडण्यात आला. त्यानंतर राष्ट्रीय महिला आयोग तयार करण्यात आला. घटना दुरुस्तीनंतर  स्थानिक स्वराज्य संस्थात महिलांना आरक्षण लागू झाले. मात्र हे आरक्षण लोकसभा राज्यसभा निवडणुकीत लागू नव्हते. संसदेच्या 2023 च्या पावसाळी अधिवेशनाचे महिला सक्षक्तीकरणाच्यादृष्टीने ऐतिहासिक पर्व म्हणून नोंद झाली आहे. ‘नारी शक्ती वंदन अभियान’ या नावाने सादर केलेल्या 128 व्या घटना दुरूस्ती विधेयकावर संमतीची मोहोर उमटल्याने यापुढे लोकसभा आणि राज्य विधानसभांमध्ये किमान 33 टक्के महिला आरक्षणाचा मार्ग मोकळा झाला आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी यासंदर्भात घेतलेला पुढाकार निश्चितच आश्वासक ठरला असल्याचेही डॉ.गोऱ्हे म्हणाल्या.

या संसदीय अभ्यास वर्गातील अनमोल मार्गदर्शनामुळे सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांचे अनुभवविश्व निश्चितच विस्तारेल. तसेच महिला सबलीकरण आणि महिलांच्या राजकीय सहभागाबाबत त्यांचा दृष्टिकोन अधिक सकारात्मक आणि आश्वासक होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

प्रारंभी दैनिक सकाळचे संपादक संदीप भारंबे यांनी उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांचा परिचय करून दिला. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा विद्यार्थी शंतनू अहिर यांनी आभार मानले.

कारवाईचा निव्वळ फार्स नको … नळस्टॉप चौकातील नाईट लाईफचे काय ? संदीप खर्डेकरांनी आयुक्तांना केले आवहान

पुणे- प्रशासकीय कारकिर्दीत महापालिका ठिकठीकाणी अतिक्रमण कारवाई करत आहे पण हा निव्वळ फार्स असून अनेक ठिकाणच्या मोठमोठ्या अतिक्रमनांकडे दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोप त्यांनी केला आहे .या संदर्भात संदीप खर्डेकर यांनी महापालिका आयुक्त विक्रमकुमार यांना एक पत्र दिले आहे त्यात म्हटले हे कि,’मनपा प्रशासनाने अनेक ठिकाणी अतिक्रमणाविरुद्ध कारवाई सुरु केल्यावर पुणेकरांनी सुटकेचा निःश्वास सोडला. मात्र ह्या कारवाया अतिशय अपुऱ्या आणि देखावा आहे असे पुणेकरांचे मत झाले असून, सर्व स्तरातून आणि सर्व भागातून शहरातील वाढत्या अतिक्रमणा विरोधात नागरिक तक्रार करत आहेत. कर्वेनगर असो किंवा विमाननगर, शहराच्या मध्यवस्तीचा भाग असो अथवा उपनगर, सर्वत्र मोठ्या प्रमाणावर अतिक्रमण दिसून येते आणि यावरील कारवाई ही वर वरची असल्याचे ही लक्षात येते. अगदी ताजी कारवाई म्हणजे पुणे मुंबई महामार्गालगत सूस पुलाच्या अलीकडे उभारलेल्या फर्निचर च्या दुकानांवरील धडक कारवाई !! येथे काही ठराविक शो रूम वर कारवाई झाली आणि पुढचे शोरूम जैसे थे…. सदर दुकाने अधिकृत आहेत का याचा खुलासा करावा.आणि कारवाई नंतर तेथील तोडलेल्या शेड उचलायची, साफ करायची जबाबदारी कोणाची ? तेथे तर व्यवस्थित विक्री सुरु आहे. एखाद्या गरीब भाजी विक्रेत्याचा माल आपण कसा लगेचच जप्त करतो तसा न्याय येथे नाही असे दिसते.नळस्टॉप चौकातील नाईट लाईफ च्या तक्रारी देखील वाढत आहेत, येथे सर्वदर्शन सोसायटी ची परवानगी नसताना हॉटेल सुरु असून पहाटे पर्यंत तेथे धिंगाणा चालतो, तर रस्त्यावरील हातगाड्या ही उशिरापर्यंत सुरु असतात. रात्रीच्या वेळी मनपा अतिक्रमण कारवाई करत नसल्याने अश्यांचे फावते. ह्याचा नागरिकांना प्रचंड त्रास होतो.तक्रार केली तर अधिकारी ,कर्मचारी संबंधितांना तक्रारदाराचे नाव सांगतात आणि त्यामुळे बहुतांश नागरिक तक्रारी करण्यास धजावत नाहीत.अशीच परिस्थिती सर्वत्र आहे, कारवाई झाल्यावर आठवड्याभरात ही सर्व अतिक्रमणे परत जैसे थे स्थितीत येतात आणि तेथे व्यवसाय सुरु होतात. यामागचे गुपित अर्थातच सर्वच जण जाणून आहेत. सध्या तर प्रशासक राज आहे आणि आपले उत्तम काम करण्याचे नाव लौकिक आहे…त्यामुळे धडक कारवाई करण्यास कोणाचा अटकावं असण्याचे कारण नाही. तरी आपण व्यक्तिशः ह्यात लक्ष घालून विनादबाव कारवाई करण्याचे आदेश द्यावेत व सामान्य पुणेकरांना दिलासा द्यावा अशी आग्रही मागणी करत आहे.असे खर्डेकर यांनी म्हटले आहे.

लोकप्रतिनिधी आणि अधिकाऱ्यांनी दक्षिण पुणे बनवले बकाल -नमेष बाबरांचा आरोप

पुणे- पुण्याच्या निसर्ग संपदेची ..सोंदर्य खाण ऐतिहासिक पाण्याची मुबलकता अशी विशेषणे ज्या दक्षिण पुण्याला लावली जातात त्या दक्षिण पुण्याला लोकप्रतिनिधी आणि अधिकारी यांनी कायम फसवत ठेवून बकाल बनवले असा आरोप करत आज येथील सामाजिक कार्यकर्ते नमेश बाबर यांनी पुन्हा आपले उपोषण आंदोलन सुरु केले. दक्षिण पुण्यातल्या वाढत्या समस्यांवर मला वारंवार आंदोलन करावे लागते , माझ्यावर वारंवार सरकारी कामात अडथळे आणल्याचे गुन्हे दाखल करतात मग दक्षिण पुण्याला बकाल करणारे आणि वारंवार फसवी आश्वासने देणाऱ्यांवर गुन्हे का दाखल होत नाहीत असा सवाल बाबर यांनी केला आहे.

एकेकाळी मुबलक पाण्याचे सौख्य लाभलेले आणि मुबलक निसर्ग संपदा लाभलेले पुण्याचे दक्षिण द्वार आज बकाल कोणी बनवले आहे, इथली वाहतूक कोंडी, जीवघेणे अपघात ,पिण्याच्या पाण्याची हि कमतरता, वाढती बेरोजगारी , तरुणाइमध्ये वाढलेली नैराश्याची भावना आणि वाढत चाललेली गुन्हेगारी याला जबाबदार कोण आहे? असा सवाल यानिमित्ताने त्यांनी केला आहे.

कात्रज मधून जाणाऱ्या उड्डाणपुलांच्या बाबत काही मागण्या नोंदवीत त्यांनी आता उपोषणाचे हत्यार पुन्हा एकदा उपसले आहे.

कला केंद्रांच्या नियंत्रणासाठी एसओपी बनवण्यात यावी – उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे

0

नागपूर दि. 11 :-  कला केंद्रावर अल्पवयीन मुली असू नयेत यासाठी या कला केंद्रांची नियमित तपासणी होणे आवश्यक आहे. पोलीस, महसूल, आरोग्य, महिला व बालकल्याण व कामगार  विभागाच्या सहकार्याने कला केंद्रांच्या नियंत्रणासाठी प्रमाणित कार्यपद्धती (एसओपी) बनवण्यात यावी, असे निर्देश विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी दिले.

कला केंद्रांबाबत एसओपी तयार करणे संदर्भात विधान भवनात उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. बैठकीस छत्रपती संभाजीनगरचे पोलीस महानिरीक्षक ज्ञानेश्वर चव्हाण व पोलीस अधीक्षक मनीष कलवानीया प्रत्यक्ष उपस्थित होते. तर दूरदृश्य प्रणालीद्वारे बीडचे पोलीस अधीक्षक  नंदकुमार ठाकूर, नाशिक ग्रामीण पोलीस अधीक्षक शहाजी उमप, अहमदनगर पोलीस अधीक्षक  राकेश ओला, लातूर पोलीस अधीक्षक सोमय मुंडे, कलाताई शिंदे, सुनीताताई मोरे उपस्थित होते.

उपसभापती डॉ. गोऱ्हे म्हणाल्या, कला केंद्रावर काम करणाऱ्या महिलांच्या समस्या सोडविण्यासाठी भरोसा सेल, महिला दक्षता समितीसह पोलीस, महसूल, आरोग्य विभागातील अधिकाऱ्यांनी या केंद्रांना नियमित भेटी देऊन त्यांच्या समस्या जाणून घ्याव्यात. कला केंद्राच्या ठिकाणी महिला राहत असलेल्या ठिकाणीची जागा सुरक्षित आहे का यासह केंद्रावर कोणताही अनुचित प्रकार घडत नसल्याची खात्री करावी. याबरोबरच कला केंद्रांवर कोणतेही अवैध व्यवसाय होत नाही याची खातरजमा करावी. कला केंद्रावर काम करणाऱ्या महिलांना शासनाच्या योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी महिला व बाल विकास विभागाची मदत घ्यावी सूचना उपसभापती डॉ. गोऱ्हे यांनी दिल्या.

डॉ. गोऱ्हे म्हणाल्या, कोविड मध्ये  विधवा महिलांना मदत करण्यासाठी समिती केली होती. त्याच धर्तीवर कला केंद्रातील मुलींसाठी समिती नेमून त्या दृष्टीने त्या मुलींचे पुनर्वसन  करण्यावर भर देता येईल. कला केंद्रावर काम करणाऱ्या महिलांच्या अल्पवयीन मुलींना शिक्षण देण्यासाठी त्यांच्या पालकांना विश्वासात घेऊन त्या दृष्टीने कार्यवाही करावी. तसेच कला केंद्रांवर काम करणाऱ्या कलाकारांच्या सामाजिक पुनर्वसनासाठी त्यांची नोंदणी असणे आवश्यक आहे. यासाठी कामगार विभागामध्ये जशी कामगारांची नोंदणी केली जाते त्याच पद्धतीने कला केंद्रावरील कलाकारांची नोंदणी कामगार विभागाने करावी. यामधे तमाशा, लोक कलावंत, कला केंद्रावरील महिलांचा समावेश करावा, अशा सूचनाही त्यांनी दिल्या.

बैठकीत संबंधित जिल्ह्याच्या पोलीस अधीक्षकांनी आपापल्या जिल्ह्यातील कला केंद्राच्या सद्य:स्थितीची माहिती दिली.

अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाला निधीची कमतरता भासणार नाही- उपमुख्यमंत्री अजित पवार यांची ग्वाही

0

नागपूर, दि. 12 : समाजातल्या प्रत्येक घटकाला न्याय देत महाराष्ट्राचा सर्वांगीण विकास करण्याची सरकारची भूमिका आहे. अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या माध्यमातून राबविण्यात येणाऱ्या विविध योजना समाजातल्या गरजू लाभार्थ्यांपर्यंत प्रभावीपणे पोहोचविण्याच्या सूचना उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री अजित पवार यांनी दिल्या. अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाला निधीची कमतरता भासू दिली जाणार नाही, अशी ग्वाहीही त्यांनी आज दिली.

नागपूर विधानभवनातील उपमुख्यमंत्री कार्यालयात अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या रौप्य महोत्सवी वर्षाच्या निमित्ताने तयार करण्यात आलेल्या बोधचिन्हाच्या अनावरणप्रसंगी उपमुख्यमंत्री श्री. पवार बोलत होते. यावेळी अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील, आमदार अतुल भातखळकर, प्रमोद हिंदुराव उपस्थित होते.

उपमुख्यमंत्री श्री.पवार म्हणाले की, समाजाच्या उन्नतीसाठी अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या माध्यमातून विविध कल्याणकारी योजना राबविण्यात येतात. या योजना समाजाच्या गरजू लाभार्थ्यापर्यंत प्रभावीपणे पोहोचविण्यासाठी विशेष प्रयत्न करावेत. एकही पात्र लाभार्थी योजनेपासून वंचित राहू नये, याची काळजी घेण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या.

राज्यात १७ ठिकाणी ‘स्वयंचलित वाहन परवाना तपासणी मार्ग’- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

0

नागपूर,दि.12 : रस्ते उपघात रोखण्यासाठी असलेल्या उपाययोजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्यात येत असून त्याचे दृष्यस्वरूपात बदल दिसून येतील, अशी ग्वाही देतानाच राज्यात 17 ठिकाणी स्वयंचलित वाहन परवाना तपासणी मार्ग, 23 ठिकाणी स्वयंचलित वाहनयोग्यता प्रमाणपत्र केंद्र उभारण्यात येत असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासात सांगितले.

सदस्य अशोक चव्हाण यांनी राज्यात होत असलेल्या वाहन अपघाताबाबत प्रश्न उपस्थित केला होता. त्याला उत्तर देताना मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले, समृद्धी महामार्गावर वाहनांसाठी वेग मर्यादा निश्चित करण्यात आली आहे. आतापर्यत किमान 60 ते 70 लाख वाहनांनी प्रवास केला असून समृद्धी महामार्गावर होणारे अपघात रोखण्यासाठी विविध उपाययोजना करण्यात आल्या आहेत. त्यामध्ये प्रत्येक दहा किमी अंतरावर रम्बलर बसविण्यात आले आहेत. त्याचबरोबर कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) या अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा देखील वापर करण्यात येत असल्याचे मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी सांगितले.

वाहन चालक परवाना स्वयंचलित पद्धतीने देण्यासाठी राज्यात 17 ठिकाणी ऑटोमॅटीक ड्रायव्हिंग टेस्ट ट्रॅक उपलब्ध करून देण्यात येत असून त्यासंदर्भात त्याची कार्यवाही सुरू आहे. ट्रॅकसाठी दोन महिन्यात कार्यादेश देण्यात येईल. 23 ठिकाणी ऑटोमॅटीक फिटनेस सेंटर्सदेखील करण्यात येत असून वाहनांच्या फिटनेस प्रमाणपत्राची मुदत संपण्यापूर्वी संबंधितांना पूर्वकल्पना देण्याबाबत यंत्रणा करण्यात येईल, असेही मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी सांगितले.

यावेळी झालेल्या चर्चेत सदस्य श्रीमती वर्षा गायकवाड, देवयानी फरांदे यांनी भाग घेतला.

पिंपरी चिंचवड प्राणी संग्रहालयातील 36 प्राण्यांच्या मृत्यूची चौकशी नगरविकास विभागाच्या प्रधान सचिवांमार्फत करणार- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

नागपूर, दि. 12 : पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या संभाजीनगर येथील निसर्गकवी बहिणाबाई चौधरी प्राणी संग्रहालयातील 36 प्राण्यांच्या मृत्यू प्रकरणाची चौकशी नगरविकास विभागाच्या प्रधान सचिवांमार्फत करण्याचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज विधानसभेत जाहीर केला. हे प्राणी संग्रहालय वन विकास महामंडळाकडे हस्तांतरीत करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी महापालिकेला दिले आहेत.

यासंदर्भात सदस्या श्रीमती अश्विनी जगताप यांनी प्रश्नोत्तराच्या तासात मुद्दा उपस्थित केला होता. त्याला उत्तर देताना मुख्यमंत्री बोलत होते.

या प्राणी संग्रहालयाच्या नुतनीकरण व सुशोभिकरणासाठी केंद्रीय प्राणी संग्रहालय प्राधिकरणाने आराखडा मंजूर केला आहे. त्यानुसार काम करण्यासाठी 2017 पासून प्राणी संग्रहालय बंद आहे. केंद्रीय प्राणी संग्रहालय प्राधिकरणाच्या नियमाप्रमाणे काही कामे करावयाची असल्याने प्राणी संग्रहालय खुले करण्यात आलेले नाही.

दरम्यान, 2017 ते सन 2023 या कालावधीत एकूण 36 प्राणी मृत्युमुखी पडले आहेत. सदर प्राण्यांचा मृत्यू नैसर्गिक असून औंध येथील शासकीय रूग्णालयामार्फत शवविच्छेदन करून प्राधिकरणाला महानगरपालिकेमार्फत कळविण्यात आलेले आहे. 36 प्राण्यांचा मृत्यू ही गंभीर बाब असून त्याची प्रधान सचिव नगरविकास यांच्या माध्यमातून चौकशी करण्यात येईल, असे मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी सांगितले.

राज्याच्या वन विकास महामंडळाकडे महापालिकेने हे प्राणी संग्रहालय हस्तांतरीत करण्याचे निर्देश देखील मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी दिले.

यावेळी झालेल्या चर्चेत विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, सदस्य नाना पटोले, योगेश सागर यांनी भाग घेतला.

निखील विजय कुसाळकरआणि त्याच्या टोळीवर मकोका कारवाई

मकोका ची ९६ वी कारवाई

पुणे-दरोडा, दरोडयाचा प्रयत्न, जिवे ठार मारण्याच्या उद्देशाने अपहरणे, गंभीर दुखापत, दरोडा व नागरीकांच्या मालमत्तेचे तोडफोड करुन नुकसान करणे, सर्वसामान्य नागरीकांच्या मध्ये दहशतीचे वातावरण निर्माण करणे, बेकायदेशीर शस्त्र जवळ बाळगणे, पोलिसांच्या आदेशाचा भंग करणे, बेकादेशीर जमाव जमविणे या सारखे गंभीर स्वरुपाचे गुन्हे वांरवारकरणाऱ्या निखील विजय कुसाळकरआणि त्याच्या टोळीवर मकोका कारवाई पुणे पोलिसांनी केली आहे. यासंदर्भात पोलिसांनी सांगितले कि,’निखील कुसाळकर (टोळी प्रमुख) व त्याचे इतर ०५ साथीदार यांनी गैरकायदेची मंडळी जमवून तक्रारदार यांचे मित्राकरवी तक्रारदार यांना शेती महामंडळ चौक, पत्रकार नगर, पुणे येथे बोलावुन घेऊन “तु निशांत डोंगरे सोबत का राहतो त्याने मला शिवीगाळ केली आहे आता तुला दाखवतो असे म्हणुन” तक्रारदार यांना जीवे ठार मारण्याच्या उद्देशाने जबरदस्तीने अपहरण करुन अज्ञात स्थळी कॅनॉलच्या बाजुला नेऊन अर्धा ते एक तास हाताने मारहाण करुन लोखंडी हत्यार दाखवुन पोलीसात तक्रार केल्यास तक्रारदार यांचे घरच्यांना मारुन टाकील अशी धमकी देऊन जनवाडी येथे नेऊन तक्रारदार यांना मारहाण करुन त्यांचा चेहरा विद्रुप केला, दोन्ही डोळयावर मारहाण करुन डोळे सुजवुन टाकले व तक्रारदार यांना होमीभाभा चौकात सोडुन दिले त्याबाबत चतुःश्रृंगी पोलीस स्टेशन पुणे शहर ८७४/२०२३ भा.दं.वि.सं.कलम ३६४(अ)३२४,३२३,५०४, ५०६(२),१४१,१४३,१४७,१४९ भारतीय हत्यार कायदा कलम ४ (२५), महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम ३७ (१) सह १३५ प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
दाखल गुन्हयाच्या तपासा दरम्यान यातील निषन्न आरोपी नामे १) ओंकार सोमनाथ हिंगाडे, वय २२ रा.पी.एम.सी कॉलनी पांडवनगर, पुणे (टोळी सदस्य) २) निखील विजय कुसाळकर, वय २२ रा. कविता हॉटेलचे मागे, महाले नगर, वडारवाडी, दिप बंगला चौक, पुणे. (टोळी प्रमुख) ३) सुबोध अजित सरोदे, वय २० वर्षे, रा. हेल्थ कॅम्प, पांडवनगर, पुणे ४) अभिजीत ऊर्फ प्रफुल्ल बबन चव्हाण वय २१ वर्ष रा. चाफेकर नगर शिवाजीनगर पुणे. ५) आयाज रईस ऊर्फरईसुद्दीन इनामदार वय १९ रा. जनवाडी, पुणे ६) कल्पेश ऊर्फ पाकुळी रमेश कराळे, रा. गोखलेनगर, जनवाडी, पुणे हे असुन अ.नं.१ यास अटक करण्यात आली आहे. अ.नं.२ ते ६ हे पाहिजे आरोपी आहेत.
नमुद आरोपी निखील विजय कुसाळकर (टोळी प्रमुख) याने त्याचेसह अन्य सदस्यांसाठी आपले अधिपत्याखाली प्रत्येक गुन्हयात नवीन साथीदार यांना सोबत घेऊन स्वताःची संघटीत टोळी करुन गुन्हे केलेले असून त्यांनी अवैध मार्गान अर्थिक व इतर फायदा मिळवण्याच्या उददेशाने दरोडा, दरोडयाचा प्रयत्न, जिवे ठार मारण्याच्या उद्देशाने अपहरणे, गंभीर दुखापत, दरोडा व नागरीकांच्या मालमत्तेच तोडफोड करुन नुकसान करणे, सर्वसामान्य नागरीकांच्या मध्ये दहशतीचे वातावरण निर्माण करणे, बेकायदेशीर शस्त्र जवळ बाळगणे, पोलिसांच्या आदेशाचा भंग करणे, बेकादेशीर जमाव जमविणे या सारखे गंभीर स्वरुपाचे गुन्हे वांरवार केले आहेत त्यांचेवर वेळोवेळी प्रतिबंधात्मक कारवाई करुन देखील त्यांनी पुन्हा-पुन्हा गंभीर स्वरुपाचे गुन्हे केलेले आहेत.
यातील आरोपी यांनी संघटीत पणे दहशतीच्या मार्गाने स्वताःच्या अर्थिक फायदया करीता सदरचा गुन्हा केल्याचे दिसुन आल्याने प्रस्तुत गुन्हयास महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी नियत्रंण अधिनियम १९९९ चे कलम ३ (१) (ii),३ (२) ३(४) प्रमाणे अंतर्भाव करणेकामी चतुःश्रृंगी पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक श्री.बालाजी पांढरे यांनी पोलिस उपायुक्त परिमंडळ ०४ पुणे श्री. शशीकांत बोराटे यांचे मार्फतीने मा. अपर पोलिस आयुक्त पुर्व प्रादेशीक विभाग पुणे श्री. रंजनकुमार शर्मा यांना प्रस्ताव सादर केलेला होता.

सदर प्रकरणाची छाननी करुन चतुःश्रृंगी पोलीस स्टेशन, पुणे शहर गु.र.न.८७४/२०२३ भा.दं.वि. कलम ३६४(अ),३२४,३२३,५०४,५०६ (२), १४१,१४३,१४७,१४९ भारतीय हत्यार कायदा कलम ४ (२५), महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम ३७(१) सह १३५ प्रमाणे दाखल गुन्हयात महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी नियत्रंण अधिनियम १९९९ चे कलम ३ (१) (ii). ३ (२) ३ (४) अंतर्भाव करण्याची मा.अपर पोलिस आयुक्त पूर्व प्रादेशीक विभाग पुणे श्री. रंजनकुमार शर्मा यांनी मान्यता दिली आहे.
सदर गुन्ह्याचा पुढील तपास सहा. पोलीस आयुक्त, खडकी विभाग पुणे शहर श्रीमती आरती बनसोडे ह्या करीत आहेत.
सदरची उल्लेखनिय कामगिरी पोलीस आयुक्त रितेश कुमार, सह पोलीस आयुक्त श्री. रामनाथ पोकळे (अति. कार्यभार) अपर पोलीस आयुक्त, पुर्व प्रादेशिक विभाग, रंजनकुमार शर्मा, पोलीस उप-आयुक्त परी-४ पुणे शहर, शशीकांत बोराटे, सहायक पोलीस आयुक्त, श्रीमती आरती बनसोडे यांचे मार्गदर्शनाखाली चतुःश्रृंगी पोलीस स्टेशन पुणे शहरचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बालाजी पांढरे, पोलीस निरीक्षक (गुन्हे) अंकुश चिंतामण व जगन्नाथ जानकर, सहा. पोलीस निरीक्षक अनिल केकाण, निगराणी पथकाचे सहा. पोलिस निरीक्षक रत्नदीप गायकवाड, अमंलदार अमित गद्रे, सुहास पवार, दत्तात्रय रेड्डी यांनी केली आहे.
पोलीस आयुक्त, रितेश कुमार यांनी पुणे शहर पोलीस आयुक्तालयाचा कार्यभार स्विकारल्यानंतर गुन्हेगारी नियंत्रणावर बारकाईने लक्ष देवुन, शरीराविरुध्द व मालमत्ते विरुध्द गुन्हे करणारे व समाजा मध्ये दहशत निर्माण करणारे सराईत गुन्हेगार यांचे हालचालीवर बारकाईने लक्ष ठेवुन, गुन्हेगारीचे समुळ उच्चाटन होईल, यावर भर देण्याबाबत सर्व पोलीस अधिकारी व अंमलदार यांना निर्देश दिले आहेत. त्यांचे मार्गदर्शनाखाली मकोका अंतर्गत केलेली ही ९६ वी कारवाई आहे.

सरकारी हस्तक्षेपाला कंटाळून राज्य मागासवर्ग आयोगाच्या अध्यक्षांचा राजीनामा

0

मुंबई-महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाचे अध्यक्ष माजी न्यायाधीश आनंद निरगुडे यांनी मागासवर्ग आयोगाचा राजीनामा दिला आहे. आनंद निरगुडे यांनी मागासवर्ग आयोगाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्याने मागासवर्ग आयोग बरखास्त होणार आहे. शासकीय हस्तक्षेपामुळे त्रस्त होऊन निरगुडे यांनी राजीनामा दिला असल्याचे बोलले जात आहे. या आधी देखील आयोगाच्या सदस्यांनी राजीनामे दिले होते. विशेष म्हणजे मराठा आरक्षणावर विधिमंडळात चर्चा होणार आहे. त्या आधी आयोगाच्या अध्यक्षांनी राजीनामा दिल्यामुळे हे प्रकरण चांगलेच तापण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

माजी न्यायाधीश आनंद निरगुडे यांनी शासकीय हस्तक्षेपामुळे त्रस्त होऊन, राजीनामा दिला असल्याची माहिती समोर येत आहे. या संदर्भात या आधी देखील सरकारी हस्तक्षेपामुळे त्यांनी नाराजी व्यक्त केली होती. दरम्यान त्यांचा राजीनामा मुख्य सचिव यांनी स्विकृत केला आहे. त्या अनुषंगाने OBC मंत्रालयातील अवर सचिव नरेंद्र आहेर यांनी पत्रकान्वये राज्य मागासवर्ग आयोगाच्या कार्यालयास कळवले आहे. दरम्यान मागासवर्ग आयोगाच्या अध्यक्षांनी राजीनामा दिल्याने मागासवर्ग आयोगच बरखास्त होणार का? अशी चर्चा सुरू आहे. या संदर्भात अद्याप स्पष्ट झाले नसले तरी यामुळे सरकारच्या अडचणी वाढणार आहेत.

ऑटो टॅक्सी मालकांना व्यवसाय वाढीच्या दृष्टीने महत्त्वाचा निर्णय : बाबा कांबळे

  • पुणे आरटीओ कार्यालयातील बैठकीत टॅक्सीचे दर निश्चित
  • महाराष्ट्र रिक्षा पंचायत ऑटो टॅक्सी फेडरेशनच्या पाठपुराव्याला यश

पुणे! प्रतिनिधी

गेल्या अनेक दिवसांपासून टॅक्सीचे दर वाढविण्यासाठी आंदोलन केले होते. आरटीओने त्याचे दर वाढविण्याला परवानगी दिली आहे.39 रुपये आणि पुढील प्रति एक किलोमीटरसाठी 26 रुपये हे जर टॅक्सी साठी निश्चित करण्यात आले आहेत हे आंदोलनाचे यश असून त्याचा सर्वसामान्य टॅक्सी व रिक्षा चालक मालकांना फायदा होणार त्यांचा व्यवसाय वार्तिक उत्पन्न वाढणार असल्याचे प्रतिपादन महाराष्ट्र रिक्षा पंचायत व ऑटो ट्रान्सपोर्ट फेडरेशनचे राष्ट्रीय अध्यक्ष बाबा कांबळे यांनी केले.

पुणे आरटीओ कार्यालयात टॅक्सी, ऑटो चालक मालक संघटनांच्या प्रतिनिधींच्या उपस्थितीत बैठकीचे आयोजन करण्यात आले. या बैठकीत बाबा कांबळे यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र रिक्षा पंचायतीचे प्रतिनिधी उपस्थित होते. या वेळी बाबा कांबळे यांनी संघटनेच्या वतीने आपली भूमिका मांडली.

महाराष्ट्र रिक्षा पंचायतीच्या वतीने पुणे येथील आरटीओ कार्यालयासमोर आंदोलन करून टॅक्सीचे दर वाढविण्यासाठी पाठपुरावा केला होता. तसेच पंत प्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडेही निवेदनाद्वारे मागणी केली होती. त्या मागणीला अखेर यश आले आहे. टॅक्सी दर वाढविण्याची कार्यवाही आरटीओने केली आहे.

या बैठकीत पुणे प्रादेशिक परिवहन अधिकारी संजय भोर यांच्या प्रमुख उपस्थित झालेल्या बैठकीमध्ये महाराष्ट्र रिक्षा पंचायत व ऑटो ट्रान्सपोर्ट फेडरेशनचे राष्ट्रीय अध्यक्ष बाबा कांबळे, पुणे रिक्षा प्रदर्शनचे अध्यक्ष जेष्ठ नेते आनंद तांबे, सत्यसेवा वाहतूक संघटनेचे अध्यक्ष एकनाथ ढोले, जनता गॅरेज संघटनेचे, सचिन वैराट अल्ताफ शेख, राष्ट्रवादी रिक्षा संघटनेचे विजय रवळे, महाराष्ट्र रिक्षा पंचायत पुणे शहराध्यक्ष मोहम्मद शेख बाळासाहेब ढवळे, शुभम तांदळे, विलास कमसे पाटील, अर्शद अंसारी, किरण एरंडे, लोणावळा शहराचे अध्यक्ष आनंद सदावर्ते, याकूब शेख आदी या वेळी उपस्थित होते.

ऑटो रिक्षाचे दर पहिल्या दीड किलो मीटरसाठी 25 रुपये व पुढील प्रत्येक किलो मीटरसाठी 17 रुपये दर निश्चित करण्यात आला आहे. टॅक्सीचे दर मात्र 17 रुपये होते. परिणामी प्रवासी रिक्षात येत नव्हते. त्याचा रिक्षा चालकांना फटका बसत होता. त्यामुळे टॅक्सीचे दर वाढविण्याची मागणी देखील बाबा कांबळे यांनी केली होती.

बाबा कांबळे म्हणाले की, एप्रिल 2023 मध्ये पुणे आरटीओ समितीने काळ्या पिवळ्या टॅक्सीचा दर हा पहिल्या दीड किलोमीटरला 31 रुपये व पुढील प्रति एक किलोमीटरला 21 रुपये दर करण्यात आला होता. त्यावेळी सीएनजी गॅसचा दर हा 86 रुपये होता. त्या सीएनजी दरामध्ये सध्या वाढ झाली नसल्यामुळे एप्रिल 2023 मध्ये निश्चित केलेला दरच कायम करण्यात आला आहे. खटवा समितीच्या शिफारशीनुसार काळ्या पिवळ्या टॅक्सीच्या दरापेक्षा ओला उबेरच्या एसी कॅबला 25 टक्के दरवाढ करण्यात यावी अशी शिफारस आहे. या शिफारशीनुसार सध्या झालेल्या आरटीओ अधिकाऱ्यांच्या बैठकीमध्ये असे ठरवण्यात आलेले आहे. त्यानुसार ओला उबेर कॅबचा दर हा पहिल्या दीड किलोमीटरसाठी 39 रुपये आणि पुढील प्रति एक किलोमीटरसाठी 26 रुपये दर शिफारस म्हणून पाठवण्याचे ठरले आहे.

भालाफेक प्रकारात भाग्यश्रीला सुवर्णपदक

0
  • खेलो इंडिया पॅरा गेम्स
  • ॲथलेटिक्समध्ये तीन रौप्यपदकांचीही कमाई
  • अक्षय सुतारला लांब उडीत कांस्यपदक
  • ज्योती कौटाळेला २०० मीटरमध्ये कांस्यपदक
  • बॅडमिंटनमध्ये आरती पाटील अंतिम फेरीत

नवी दिल्ली, विशेष प्रतनिधी:
महाराष्ट्राच्या पॅरा क्रीडापटूंनी पहिल्या खेलो इंडिया पॅरा क्रीडा स्पर्धेत जोरदार सुरुवात करताना सोमवारी ॲथलेटिक्स प्रकारात एक सुवर्ण आणि तीन रौप्य आणि तीन कांस्यपदकांची कमाई केली. बॅडमिंटनमध्ये आरती पाटीलने अंतिम फेरी गाठून महाराष्ट्राचे आणखी एक पदक निश्चित केले.
ॲथलेटिक्स क्रीडा प्रकारात महिलांच्या भालाफेक प्रकारात नांदेडच्या भाग्यश्री जाधवने महाराष्ट्राला पहिले सुवर्णपदक मिळवून दिले. ॲथलेटिक्समधील अन्य क्रीडा प्रकारात दिलीप गावीत, गीता चव्हाण, शुभम सिंगनाथ यांनी आपापल्या शर्यतीत रौप्यपदकाची कमाई केली.
आरतीने सुवर्ण कामगिरी करताना एफ-३३/३४ प्रकारात १३.५७ मीटर भाला फेक केली. पुरुषांच्या टी ४७ प्रकारात नाशिकचा दिलीप गावित १०० मीटर धावण्याच्या शर्यतीत ११.४१ सेकंद वेळेसह रौप्यपदकाचा मानकरी ठरला. नागपूरच्या शुभम सिंगनाथने टी १२ या प्रकारातून १०० मीटर शर्यतीत १२.०१ सेकंद वेळ देताना रौप्यपदक मिळविले. महिलांच्या १०० मीटर धावण्याच्या शर्यतीत मुंबईच्या गीता चव्हाणने टी ५३/५४ प्रकारात २४.८६ सेकंदासह रुपेरी यश मिळविले. अक्षय सुतार लांब उडीतील टी १३ प्रकारात कांस्यपदकाचा मानकरी ठरला. त्याने ५.२९ मीटर उडी मारली. ऋतुजा कौटाळेने २०० मीटर शर्यतीत टी ४७ प्रकारात ३१.५३ सेकंद वेळ देताना कांस्यपदक मिळविले.

धावपटूंची कामगिरी कौतुकास्पद – सुरेश काकड
पहिल्या पॅरा क्रीडा स्पर्धेत आंतरराष्ट्रीय धावपटू दिलीप गावित, शुभम सिंगनाथ,भाग्यश्री जाधव, गीता चव्हाण यांनी पदार्पणात सुरेख कामगिरी केली. आंतरराष्ट्रीय अनुभवाचा त्यांनी सुरेख फायदा करून घेतला. संघासाठी ही कामगिरी निश्चितच अभिमानास्पद ठरली, अशी प्रतिक्रिया संघाचे मुख्य प्रशिक्षक सुरेश काकड यांनी व्यक्त केली.

मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर गॅन्ट्री बसविण्यासाठी ब्लॉक

पुणे, दि. ११ : यशवंतराव चव्हाण द्रुतगती मार्गावर हायवे ट्रॅफीक मॅनेजमेंट सिस्टम अंतर्गत मुंबई व पुणे वाहिनीवर कुसगाव ढेकू गाव कि.मी ५६/९०० व ओझर्डे ट्रॉमा केअर सेंटरजवळ कि.मी ७४/९०० येथे महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळामार्फत गॅन्ट्री उभारण्याचे काम सुरू असून १२ डिसेंबर रोजी दुपारी १२ ते २ या वेळेत पुणे वाहिनीवरील सर्व प्रकारची अवजड वाहतूक तसेच छोटी वाहने (कार) कुसगाव टोलनाक्यावरून जुना मुंबई-पुणे महामार्गाने पुणे दिशेला वळविण्यात येणार असल्याची माहिती महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने दिली आहे.

संत श्री ज्ञानेश्वर माऊलींचा  ७२७ वा संजीवन समाधी सोहळा व जागतिक सहिष्णुता सप्ताहाचा समारोप सोहळा संपन्न

पुणे,  दि.  ११  डिसेंबर : विश्वशांती केंद्र (आळंदी), माईर्स एमआयटी विश्वशांती विद्यापीठ, पुणे, भारत  व श्रीक्षेत्र आळंदी-देहू परिसर विकास समिती यांच्या संयुक्त विद्यमानेे संत शिरोमणी श्री ज्ञानेश्वर महाराज यांचा ७२७ वा संजीवन समाधी सोहळा व जागतिक  सहिष्णुता सप्ताहाचा समारोप विश्वरूपदर्शन मंच, श्रीक्षेत्र आळंदी येथे दुपारी १२.०० वाजता वारकर्‍यांच्या उपस्थितीत पार पडला. इंद्रायणी नदीच्या दोन्ही तीरावरील वारकर्‍यांनी गुलाल, बुक्का व फुलांची ओंजळ वाहून ज्ञानेश्वर माऊलीचे भावपूर्ण स्मरण केले. भजन करून नामस्मरणाचा गजर केला. यावेळी विश्वरुप दर्शन मंचावर घंटानाद करण्यात आला. विश्वशांती केंद्राच्या वतीने वारकर्‍यांना महाप्रसाद देण्यात आला.
तत्पूर्वी ह.भ.प.डॉ.सुदाम महाराज पानेगांवकर यांनी काल्याचे कीर्तन केले. त्यानंतर मान्यवरांच्या हस्ते दहीहंडी फोडण्यात आली. याद्वारे शेकडो वर्षांची परंपरा जपण्यात आली. इंद्रायणीच्या घाटावर वारकर्‍यांनी या समाधी सोहळ्याच्या काल्याच्या महाप्रसादाचा लाभ घेतला.
या समारंभासाठी विश्वशांती केंद्र (आळंदी), माईर्स एमआयटी विश्वशांती विद्यापीठाचे संस्थापक अध्यक्ष विश्वधर्मी प्रा.डॉ. विश्वनाथ दा. कराड, ह.भ.प. तुळशीराम दा. कराड,  सौ. उषा विश्वनाथ कराड, माईर्स मायमर वैद्यकीय महाविद्यालयाच्या कार्यकारी संचालिका डॉ. सुचित्रा कराड-नागरे, प्रा.स्वाती कराड चाटे, नागपूर विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. एस.एन.पठाण, डॉ. मिलिंद पांडे व योगगुरू पाडेकर गुरूजी हे उपस्थित होते.
या सप्ताहात हभप अर्जुन महाराज लाड गुरूजी, हभप हरिहर महाराज दिवेगांवकर, हभप रामराव महाराज ढोक, हभप यशोधन महाराज साखरे व हभप चिन्मय महाराज सातारकर यासारख्या नामवंत कीर्तनकारांनी कीर्तनरूपी सेवा सादर केली. तसेच, प्रियंका ढेरंगे चौधरी, गायिका अपर्णा संत, ज्येष्ठ संगीतकार व गायक श्रीधर फडके, पं. शौनक अभिषेकी व विश्वशांती संगीत कला अकादमीच्या शिक्षक व विद्यार्थ्यांनी अभंगवाणी व भक्तीसंगीताचे कार्यक्रम सादर केले.
ह.भ.प.श्री.बापूसाहेब मोरे-देहूकर म्हणाले,” दुष्काळ पडला तर जनावरे मरतात. मोठा दुष्काळ पडला माणसे व जनावरे मरतात आणि चांगल्या संस्कारांचा व विचारांचा दुष्काळ पडला तर संपूर्ण मानवता मरते. त्यामुळे संताच्या वचनाचे महत्व सृष्टीवर अधिक आहे. संत हे जग वात्सल्य असतात म्हणून संताची महिमा ही शब्दात सांगता येत नाही. संत हे स्वतःच्या दुखांना विराम देऊन दुसर्‍यांचे दुख सावरण्यास पुढे येतात. त्यांना सुख व शांतीचा मार्ग दाखवितात.”
प्रा.डॉ. विश्वनाथ दा. कराड म्हणाले,”या सप्ताहात प्रवचन, कीर्तन, गायन व भजन या मार्गाने नामवंतांनी माऊलीचरणी आपली सेवा रुजू केली. यापुढेही वर्षभर लोकशिक्षणाचे विविध कार्यक्रम या विश्वरूप दर्शन मंचावर होणार आहेत. त्यामध्ये पर्यावरण स्वच्छता व निकोप, सुसंस्कृत समाजनिर्मितीसाठी जनजागृती याद्वारे विज्ञान व अध्यात्म यांचा संगम होईल. पवित्र तीर्थक्षेत्रांचे खर्‍या अर्थाने ज्ञानतीर्थक्षेत्रामध्ये परिवर्तन घडविण्याचा आमचा प्रयत्न आहे. ज्ञान, कर्म आणि भक्तीतून ईश्वर दर्शन होते. त्याग आणि समर्पणाचा संतांनी दिलेला संदेश व त्यांची शिकवण आत्मसात करून त्या मार्गाने चालण्याचा प्रयत्न करावा.”
शालीकराम खंदारे यांनी सूत्रसंचालन व महेश महाराज नलावडे यांनी आभार मानले.

शिवचरित्राच्या जागराने श्रोते भारावले

पुणे, ११ डिसेंबर
छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनचरित्रातील विविध पैलूंचे वक्त्यांनी घडवलेले मनोज्ञ दर्शन, श्री शिवरायांच्या पराक्रमाची थोरवी गाणारी भाषणे आणि हिंदवी स्वराज्याचे अनन्यसाधारण महत्त्व श्रोत्यांसमोर उलगडत गेले आणि शिवचरित्राच्या या जागराने श्रोतेही भारावले.

अक्षय सेवा संशोधन प्रतिष्ठान आणि कौशिक आश्रम यांनी आयोजित केलेल्या शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे स्मृती व्याख्यानमालेचा समारोप इतिहासाचे अभ्यासक महेश तेंडुलकर यांच्या व्याख्यानाने झाला. शिवचरित्राच्या या जागराला श्रोत्यांची उत्स्फूर्त दाद मिळाली. महर्षी विनोद रिसर्च फाऊंडेशनचे संचालक डॉ. संप्रसाद विनोद आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पुणे महानगर संघचालक रवींद्र वंजारवाडकर यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती. शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांनी शिवचरित्र सर्वदूर पोहोचवण्यासाठी लेखन आणि व्याख्यानांच्या रूपाने जे कार्य केले, त्या कार्याची थोरवी देखील यावेळी मांडण्यात आली.

छत्रपती शिवाजी महाराज सिंहासनाधीश्वर झाले आणि इतिहासाला वेगळे वळण मिळाले. त्यांचे प्रेरणादायी चरित्र सर्वांपर्यंत पोहोचवले पाहिजे, असे वंजारवाडकर म्हणाले. शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे कवी होते, लेखक होते, दिग्दर्शक होते, इतिहास संशोधक होते. छत्रपती शिवाजी महाराज यांचे कर्तृत्व त्यांनी विविध माध्यमातून सर्वांपर्यंत पोहोचवले. असे डॉ. विनोद यांनी सांगितले.

शिवचरित्र सर्वांना भावेल अशा पद्धतीने मांडणी करत बाबासाहेब पुरंदरे यांनी शिवचरित्राचा प्रसार केला. त्यांचे हे कार्य अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. त्यांचे शिवचरित्र मराठी मनावर पकड निर्माण करते. त्यांचे व्यक्तिमत्त्व कला, प्रतिभेसह अनेक गुणांनी संपन्न होते, असे तेंडुलकर म्हणाले.

संस्थेचे ज्येष्ठ विश्वस्त दिवाकर पांडे यांनी प्रास्ताविक आणि नागेश पाटील यांनी सूत्रसंचालन केले.