पुणे, दि. ११ डिसेंबर : विश्वशांती केंद्र (आळंदी), माईर्स एमआयटी विश्वशांती विद्यापीठ, पुणे, भारत व श्रीक्षेत्र आळंदी-देहू परिसर विकास समिती यांच्या संयुक्त विद्यमानेे संत शिरोमणी श्री ज्ञानेश्वर महाराज यांचा ७२७ वा संजीवन समाधी सोहळा व जागतिक सहिष्णुता सप्ताहाचा समारोप विश्वरूपदर्शन मंच, श्रीक्षेत्र आळंदी येथे दुपारी १२.०० वाजता वारकर्यांच्या उपस्थितीत पार पडला. इंद्रायणी नदीच्या दोन्ही तीरावरील वारकर्यांनी गुलाल, बुक्का व फुलांची ओंजळ वाहून ज्ञानेश्वर माऊलीचे भावपूर्ण स्मरण केले. भजन करून नामस्मरणाचा गजर केला. यावेळी विश्वरुप दर्शन मंचावर घंटानाद करण्यात आला. विश्वशांती केंद्राच्या वतीने वारकर्यांना महाप्रसाद देण्यात आला.
तत्पूर्वी ह.भ.प.डॉ.सुदाम महाराज पानेगांवकर यांनी काल्याचे कीर्तन केले. त्यानंतर मान्यवरांच्या हस्ते दहीहंडी फोडण्यात आली. याद्वारे शेकडो वर्षांची परंपरा जपण्यात आली. इंद्रायणीच्या घाटावर वारकर्यांनी या समाधी सोहळ्याच्या काल्याच्या महाप्रसादाचा लाभ घेतला.
या समारंभासाठी विश्वशांती केंद्र (आळंदी), माईर्स एमआयटी विश्वशांती विद्यापीठाचे संस्थापक अध्यक्ष विश्वधर्मी प्रा.डॉ. विश्वनाथ दा. कराड, ह.भ.प. तुळशीराम दा. कराड, सौ. उषा विश्वनाथ कराड, माईर्स मायमर वैद्यकीय महाविद्यालयाच्या कार्यकारी संचालिका डॉ. सुचित्रा कराड-नागरे, प्रा.स्वाती कराड चाटे, नागपूर विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. एस.एन.पठाण, डॉ. मिलिंद पांडे व योगगुरू पाडेकर गुरूजी हे उपस्थित होते.
या सप्ताहात हभप अर्जुन महाराज लाड गुरूजी, हभप हरिहर महाराज दिवेगांवकर, हभप रामराव महाराज ढोक, हभप यशोधन महाराज साखरे व हभप चिन्मय महाराज सातारकर यासारख्या नामवंत कीर्तनकारांनी कीर्तनरूपी सेवा सादर केली. तसेच, प्रियंका ढेरंगे चौधरी, गायिका अपर्णा संत, ज्येष्ठ संगीतकार व गायक श्रीधर फडके, पं. शौनक अभिषेकी व विश्वशांती संगीत कला अकादमीच्या शिक्षक व विद्यार्थ्यांनी अभंगवाणी व भक्तीसंगीताचे कार्यक्रम सादर केले.
ह.भ.प.श्री.बापूसाहेब मोरे-देहूकर म्हणाले,” दुष्काळ पडला तर जनावरे मरतात. मोठा दुष्काळ पडला माणसे व जनावरे मरतात आणि चांगल्या संस्कारांचा व विचारांचा दुष्काळ पडला तर संपूर्ण मानवता मरते. त्यामुळे संताच्या वचनाचे महत्व सृष्टीवर अधिक आहे. संत हे जग वात्सल्य असतात म्हणून संताची महिमा ही शब्दात सांगता येत नाही. संत हे स्वतःच्या दुखांना विराम देऊन दुसर्यांचे दुख सावरण्यास पुढे येतात. त्यांना सुख व शांतीचा मार्ग दाखवितात.”
प्रा.डॉ. विश्वनाथ दा. कराड म्हणाले,”या सप्ताहात प्रवचन, कीर्तन, गायन व भजन या मार्गाने नामवंतांनी माऊलीचरणी आपली सेवा रुजू केली. यापुढेही वर्षभर लोकशिक्षणाचे विविध कार्यक्रम या विश्वरूप दर्शन मंचावर होणार आहेत. त्यामध्ये पर्यावरण स्वच्छता व निकोप, सुसंस्कृत समाजनिर्मितीसाठी जनजागृती याद्वारे विज्ञान व अध्यात्म यांचा संगम होईल. पवित्र तीर्थक्षेत्रांचे खर्या अर्थाने ज्ञानतीर्थक्षेत्रामध्ये परिवर्तन घडविण्याचा आमचा प्रयत्न आहे. ज्ञान, कर्म आणि भक्तीतून ईश्वर दर्शन होते. त्याग आणि समर्पणाचा संतांनी दिलेला संदेश व त्यांची शिकवण आत्मसात करून त्या मार्गाने चालण्याचा प्रयत्न करावा.”
शालीकराम खंदारे यांनी सूत्रसंचालन व महेश महाराज नलावडे यांनी आभार मानले.
संत श्री ज्ञानेश्वर माऊलींचा ७२७ वा संजीवन समाधी सोहळा व जागतिक सहिष्णुता सप्ताहाचा समारोप सोहळा संपन्न
शिवचरित्राच्या जागराने श्रोते भारावले
पुणे, ११ डिसेंबर
छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनचरित्रातील विविध पैलूंचे वक्त्यांनी घडवलेले मनोज्ञ दर्शन, श्री शिवरायांच्या पराक्रमाची थोरवी गाणारी भाषणे आणि हिंदवी स्वराज्याचे अनन्यसाधारण महत्त्व श्रोत्यांसमोर उलगडत गेले आणि शिवचरित्राच्या या जागराने श्रोतेही भारावले.
अक्षय सेवा संशोधन प्रतिष्ठान आणि कौशिक आश्रम यांनी आयोजित केलेल्या शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे स्मृती व्याख्यानमालेचा समारोप इतिहासाचे अभ्यासक महेश तेंडुलकर यांच्या व्याख्यानाने झाला. शिवचरित्राच्या या जागराला श्रोत्यांची उत्स्फूर्त दाद मिळाली. महर्षी विनोद रिसर्च फाऊंडेशनचे संचालक डॉ. संप्रसाद विनोद आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पुणे महानगर संघचालक रवींद्र वंजारवाडकर यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती. शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांनी शिवचरित्र सर्वदूर पोहोचवण्यासाठी लेखन आणि व्याख्यानांच्या रूपाने जे कार्य केले, त्या कार्याची थोरवी देखील यावेळी मांडण्यात आली.
छत्रपती शिवाजी महाराज सिंहासनाधीश्वर झाले आणि इतिहासाला वेगळे वळण मिळाले. त्यांचे प्रेरणादायी चरित्र सर्वांपर्यंत पोहोचवले पाहिजे, असे वंजारवाडकर म्हणाले. शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे कवी होते, लेखक होते, दिग्दर्शक होते, इतिहास संशोधक होते. छत्रपती शिवाजी महाराज यांचे कर्तृत्व त्यांनी विविध माध्यमातून सर्वांपर्यंत पोहोचवले. असे डॉ. विनोद यांनी सांगितले.
शिवचरित्र सर्वांना भावेल अशा पद्धतीने मांडणी करत बाबासाहेब पुरंदरे यांनी शिवचरित्राचा प्रसार केला. त्यांचे हे कार्य अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. त्यांचे शिवचरित्र मराठी मनावर पकड निर्माण करते. त्यांचे व्यक्तिमत्त्व कला, प्रतिभेसह अनेक गुणांनी संपन्न होते, असे तेंडुलकर म्हणाले.
संस्थेचे ज्येष्ठ विश्वस्त दिवाकर पांडे यांनी प्रास्ताविक आणि नागेश पाटील यांनी सूत्रसंचालन केले.
काँग्रेस का हात, भ्रष्टाचार के साथ….धीरज साहू व काँग्रेस विरोधात कोथरूडमध्ये निदर्शने
पुणे:
काँग्रेस चा अजून एक भ्रष्टाचार उघड झाला असून यावेळी तब्ब्ल 300 कोटी रुपये मोहब्बत च्या दुकानातून जप्त झाले असून आजवरच्या सर्व रेड मध्ये सापडलेली ही सर्वात मोठी रक्कम आहे, यावरूनच काँग्रेस चा भ्रष्ट कारभार उघड होतं आहे असा आरोप करत आज भारतीय जनता पार्टीच्या महिला आघाडी च्या वतीने महिला मोर्चा अध्यक्षा कोथरूड दक्षिण मंडल कांचन रुपेश कुंबरे यांच्या अध्यक्षतेखाली कोथरूड च्या कर्वे पुतळा चौकात जोरदार निदर्शने करण्यात आली. यावेळी
पुनीत जोशी सरचिटणीस पुणे शहर , डॉ. संदीप बुटाला कोथरूड दक्षिण मंडल अध्यक्ष , महिला मोर्चा अध्यक्षा कोथरूड दक्षिण मंडल कांचन रुपेश कुंबरे, कोथरूड च्या सरचिटणीस व महिला मोर्चा कोथरूड मंडल च्या प्रभारी सौ.मंजुश्री संदीप खर्डेकर,माजी नगरसेविका वासंतीताई जाधव , वृषाली चौधरी जयंत भावे , कोथरूड महिला मोर्चा सरचिटणीसकेतकी कुलकर्णी , पल्लवी गाडगीळ, सुप्रिया माझिरे, विद्या टेमकर,उपाध्यक्षा सुरेखा डाबी, गायत्री लांडे , रमा डांगे , चिटणीस जयश्री घाटे , पूनम चव्हाण, सारिका सणस, प्रियांका चव्हाण सुरेखा जगताप , निर्मला रायरीकर, अनिता तलाठी, जान्हवी जोशी , मनीषाताई बुटाला , वर्षा पाटील , प्राची बगाटे, कोथरूड मंडल सरचिटणीस दीपक पवार, गिरीश खत्री,कोथरूड युवा मोर्चा अध्यक्ष अमित तोरडमल, कोथरूड मंडल उपाध्यक्ष दिनेश माथवड, विशाल रामदासी,कुणाल तोंडे, सुहास साठे , नाना कुंबरे , अमोल डांगे, आशुतोष वैशंपायन , सुजित मगर व इतर पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्यने उपस्थित होते.
यावेळी पुनीत जोशी, डॉ. संदीप बुटाला, कांचन कुंबरे, मंजुश्री खर्डेकर, वृषाली चौधरी, ऍड. प्राची बगाटे आणि केतकी कुलकर्णी यांनी आपल्या भाषणात काँग्रेस चे वाभाडे काढले.जनतेला आता समजलं असेल की काँग्रेस ने एकीकडे गरीबी हटाव चा नारा दिला आणि दुसरीकडे स्वतःच्या तिजोऱ्या भरून घेतल्या.असा आरोप केला.
रिदमिक योगासन स्पर्धेत ध्रुव ग्लोबल स्कूलच्या महिका पटवर्धनला सुवर्णपदक
पुणे, दि.११डिसेंबर : १४ वर्षाखालील रिदमिक योगासन क्रीडा प्रकारात ध्रुव ग्लोबल स्कूलच्या महिका पटवर्धन ने चमकदार कामगिरी करत सुवर्ण पदक पटकावले. ध्रुव ग्लोबल स्कूलचे नाव विभागीयस्तरावर उंचावले आहे. अत्यंत लवचिक आणि शास्त्रशुद्ध पद्धतीने रिदमिक योगासन करणारी महिकाने सर्वांचीच मने जिंकली. तिच्या सादरीकरणाला उत्कृष्ट दाद मिळाली. तीच्या यशाबद्दल ध्रुव ग्लोबल स्कूलचे संचालक यश मालपाणी व प्रिन्सीपल संगीता राऊतजी यांनी कौतुक करून शुभेच्छा दिल्या.
अहमदनगर येथील वाडिया पार्क जिल्हा संकुल मध्ये शालेय विभागीय योगासन स्पर्धा संपन्न झाल्या. या स्पर्धेत पूणे विभागातील अनेक शाळांनी सहभाग नोंदविला होता. यामध्ये वैयक्तिक १४ वर्षाखालील मुलींच्या रिदमिक योगासन क्रीडा प्रकारात ७ व्या वर्गातील महिका पटवर्धन ने अप्रतिम खेळाचे प्रदर्शन केले. उल्लेखनीय म्हणजे, यापूर्वीही महिका ने अनेक योगासन स्पर्धेत पदके मिळवली आहेत. ही स्पर्धा १४, १७ आणि १९ वयोगटातील मुले व मुलींसाठी होती. प्रशिक्षक गायत्री वारे व वैष्णवी आंद्रे यांनी तिला मार्गदर्शन केले. तीच्या या यशाबद्दल सर्व स्तरांतून अभिनंदन होत आहे.
झोपी गेलेल्या सरकारला जागे करण्यासाठी काँग्रेसचा हल्लाबोल मोर्चा – अशोक चव्हाण
राज्यातील संकटात असलेल्या शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी जाहीर करा – नाना पटोले
जनविरोधी भाजपा सरकार घालवून काँग्रेस पक्षाचे सरकार आणा – बाळासाहेब थोरात

लोकशाही व डॉ. बाबासाहेबांचे संविधान टिकवण्यासाठी हल्लाबोल मोर्चा. – विजय वडेट्टीवार
दिक्षाभूमी ते मॉरिस कॉलेजपर्यंत काँग्रेसचा तिघाडी सरकार विरोधात भव्य हल्लाबोल मोर्चा.
नागपूर/मुंबई, दि. ११ डिसेंबर २०२३
राज्यात शेतकरी, शेतमजूर, कामगार, बेरोजगारांचे प्रश्न मोठे आहेत पण भाजपाचे आंधळे, बहिरे, मुके सरकार त्याकडे लक्ष देत नाही. मख्यमंत्री प्रश्नांना उत्तरे देत नाहीत तर सुपर मुख्यमंत्री उत्तरे देतात. शेतकऱ्यांना भरपूर मदत दिली असे सुपर मुख्यमंत्री म्हणतात पण ही मदत शेतकऱ्यांपर्यंत पोहचलीच नाही. सरकारने मदत केली तर मग ती गेली कुठे? राज्यात भिषण पाणीटंचाई आहे, एकीकडे कोरडा दुष्काळ तर दुसरीकडे ओला दुष्काळ पडला आहे. अवकाळी पावसानेही शेतकऱ्यांचे मोठे नुकसान केले आहे. शेतकरी संकटात असल्याने सरकारने शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी दिली पाहिजे, अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे.
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांच्या नेतृत्वाखाली दिक्षाभूमी ते विधानभवन असा हल्लाबोल मोर्चा काढण्यात आला होता. या मोर्चात हजारो लोकांनी सहभाग घेतला. यावेळी विधिमंडळ पक्षनेते बाळासाहेब थोरात, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण, तेलंगणाचे प्रभारी माणिकराव ठाकरे, माजी केंद्रीय मंत्री विलास मुत्तेमवार, माजी मंत्री सुनिल केदार, डॉ. नितीन राऊत, यशोमती ठाकूर, वर्षा गायकवाड, अमित देशमुख, विधान परिषद गटनेते सतेज बंटी पाटील, माजी मंत्री सुरेश वरपुडकर, माजी मंत्री विश्वजित कदम, प्रदेश कार्याध्यक्ष नसीम खान, आमदार प्रणिती शिंदे, बसवराज पाटील, चंद्रकांत हंडोरे, आ. कुणाल पाटील, मुंबई काँग्रेसचे माजी अध्यक्ष आमदार भाई जगताप, अल्पसंख्याक विभागाचे अध्यक्ष आमदार वजाहत मिर्झा, महिला काँग्रेस प्रदेशाध्यक्ष संध्या सव्वालाखे, सेवादलाचे प्रदेशाध्यक्ष विलास औताडे, युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष कुणाल राऊत, एनएसयुआयचे प्रदेशाध्यक्ष आमिर शेख, एससी विभागाचे प्रदेशाध्यक्ष सिद्धार्थ हत्तिअंबिरे, आमदार अभिजित वंजारी, आ. सुभाष धोटे, आ. अमित झनक, नागपूर शहराध्यक्ष विकास ठाकरे, नागपूर ग्रामीणचे अध्यक्ष राजेंद्र मुळक, प्रदेश सरचिटणीस देवानंद पवार, प्रमोद मोरे, मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे, सोशल मिडीया प्रमुख विशाल मुत्तेमवार, मदन जाधव आदी उपस्थित होते.
मोर्चाला संबोधित करताना नाना पटोले पुढे म्हणाले की, भाजपा सरकारच्या काळात राज्यात गुन्हेगारी वाढली आहे. महाराष्ट्र आज गुन्हेगारी, भ्रष्टाचार, दंगली घडवण्यात देशात एक नंबरवर आहे. या सरकारला शेतकऱ्यांचे देणेघेणे नाही, बेरोजगारांची थट्टा चालवली आहे. शिक्षण भरतीचा प्रश्न आहे, जिल्हा परिषदेच्या शाळा बंद केल्या जात आहेत पण सरकार खोटे बोलून जनतेची दिशाभूल करत आहे. नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत छत्तिसगड व मध्य प्रदेशला लागून असलेल्या महाराष्ट्राच्या सीमाभागात काँग्रेस पक्षाला मोठे जनसमर्थन मिळालेले आहे. या भागातून ७५ ते १०० टक्के काँग्रेसचे उमेदवार निवडून आले आहेत, महाराष्ट्रातही काँग्रेसची लाट आहे हे लक्षात घ्या. भाजपा म्हणते तीन राज्यात जिंकलो मग हिम्मत असेल तर महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लावून दाखवा. जनता भाजपाच्या विरोधात आहे हे भाजपालाही माहित आहे म्हणून ते निवडणुकीला घाबरतात.
पंतप्रधान नरेंद्र मोदी छत्तिसगडमध्ये धानाला ३१०० रुपये भाव व एक हजार बोनस देण्याची तसेच ४५० रुपयांना सिलिंडर देण्याची घोषणा करता मग महाराष्ट्रात का देत नाही याचे उत्तर भाजपा सरकारला द्यावे लागेल. हल्ला बोल मोर्चा हा सरकारला एक इशारा आहे हे लक्षात ठेवा. शेतकरी, बेरोजगारांना न्याय मिळवून दिल्याशिवाय गप्प बसणार नाही.
विधिमंडळ पक्षनेते बाळासाहेब थोरात यावेळी म्हणाले की, महागाई प्रचंड असून जनतेला जगणे कठीण झाले आहे, शिक्षण झाले तरी तरुणांना नोकरी मिळत नाही, जनतेचे ज्वलंत प्रश्न आहेत पण सरकार त्याकडे लक्ष देत नाही. शेतकरी, कामगारांची परिस्थिती अत्यंत खराब आहे. हे सरकार आश्वासने भरपूर देते पण तूर्तता करत नाही. वीमा कंपन्या शेतकऱ्यांना फसवून लुटत आहेत पण सरकार त्यावर काहीच करत नाही. केंद्रातील भाजपा सरकार गेली ९.५ वर्ष लोकशाहीची पायमल्ली करत कारभार करत आहे. महाराष्ट्रातही तोडफोड करुन सरकार आणले आहे. आता या सरकारला घालवले पाहिजे. महाराष्ट्रातील भाजपा सरकार घालवून काँग्रेसचे सरकार आणायचे आहे.
यावेळी बोलताना माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण म्हणाले की, तेलंगणात काँग्रेसने सहा गॅरंटी दिल्या होत्या आणि जनतेने काँग्रेसला भरघोस मतदान करून सत्तेत आणले, कर्नाटकातही काँग्रेसने गॅरंटी दिल्या होत्या व तेथेही काँग्रेसचे सरकार आले आता महाराष्ट्रातही काँग्रेसचे सरकार आणू. बेरोजगारीची संख्या वाढलेली आहे पण सरकारने पाच वर्षात नोकर भरती केली नाही. MPSC च्या परिक्षा होत नाहीत, गावात वीज नाही, पाणी नाही, शेती संकटात आहे. बरोजगार, शेतकरी, महिला, शेतमजूर, सफाई कामगारांचे प्रश्न आहेत. सरकारमधील मंत्री एकमेकाविरोधात बोलत आहेत. आजचा हा मोर्चा फक्त काँग्रेसचा नसून जनतेचा आक्रोश दाखवणारा आहे आणि या हल्लाबोल मोर्चामुळे झोपी गेलेले सरकार जागे होईल.
विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यावेळी म्हणाले की, राज्यातील शेतकरी दुष्काळ, गारपिट, अवकाळी पावसाने देशोधडीला लागला आहे. अधिवेशनात शेतकऱ्यांना न्याय देण्याची मागणी लावून धरत आहोत पण सरकार ऐकत नाही. आता शेतकरीच सरकारला धडा शिकवल्याशिवाय गप्प बसणार नाही. शिंदे-पवार-फडणवीसांचे सरकार शेतकऱ्यांना उद्ध्वस्थ करत आहे. ‘जनतेला केला भिकारी आणि शासन आपल्या दारी’ अशी अवस्था आहे. अमृत महोत्सवी वर्षात ७५ हजार नोकर भरती करण्याचे आश्वासन दिले होते पण अजून नोकर भरती नाही. भ्रष्टाचाराकडे लक्ष जाऊ नये, मुळ प्रश्नाकडे लक्ष जाऊ नये म्हणून या सरकारने समाजा-समाजात भांडणे लावली आहेत. सत्तेसाठी नाही तर सत्यासाठी आम्ही लढतो. लोकशाही टिकवण्यासाठी, डॉ. बाबासाहेबांचे संविधान टिकवण्यासाठी हा मोर्चा आहे.
माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी यावेळी केंद्रातील मोदी सरकारवर तोफ डागली. केंद्र सरकारने नोटबंदी, जीएसटी, लॉकडाऊन लावून अर्थव्यवस्था बिघडवली परिणामी लघु, मध्यम, छोटे उद्योग बंद पडले आहेत. नरेंद्र मोदी यांनी अर्थव्यवस्था रसातळाला घालवली आहे. आगामी लोकसभा निवडणुकीत नरेंद्र मोदी सरकारचा पराभव केला नाही तर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे संविधान संपुष्टात आणले जाईल यासाठी सर्वांनी एकत्र येऊन केंद्रातील भाजपा सरकारचा पराभव करा, असे आवाहन त्यांनी केले.
माजी मंत्री डॉ. नितीन राऊत, यशोमती ठाकूर, वर्षा गायकवाड, प्रदेश कार्याध्यक्ष नसीम खान विधान परिषदेतील गटनेते सतेज उर्फ बंटी पाटील, मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे, यांनीही यावेळी मोर्चेकरांना संबोधित केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन प्रदेश सरचिटणीस देवानंद पवार यांनी केले.
टाटा पॉवर आणि इंडियन ऑइल कॉर्पोरेशन यांची भागीदारी:भारतभर ५०० पेक्षा जास्त वेगवान आणि अल्ट्रा-वेगवान ईव्ही चार्जिंग पॉईंट्स तैनात करणार
पुणे-११ डिसेंबर, २०२३: टाटा पॉवर समूहातील एक कंपनी आणि आघाडीच्या ईव्ही चार्जिंग सुविधा पुरवठादार कंपन्यांपैकी एक, टाटा पॉवर ईव्ही चार्जिंग सोल्युशन्स लिमिटेड आणि इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड (आयओसीएल) यांच्या दरम्यान एक समझोता करार करण्यात आला आहे. भारतभर वेगवान आणि अल्ट्रावेगवान इलेक्ट्रिक वेहिकल चार्जिंग पॉईंट्स तैनात करण्यासाठी हा समझोता करण्यात आला आहे. या भागीदारीच्या माध्यमातून टाटा पॉवर आयओसीएलच्या विविध रिटेल आउटलेट्सच्या ठिकाणी ५०० पेक्षा जास्त ईव्ही चार्जिंग पॉईंट्स इन्स्टॉल करणार आहे.
मुंबई, दिल्ली, कोलकाता, बंगलोर, अहमदाबाद, पुणे आणि कोची यासारख्या मोठ्या शहरांमध्ये तसेच मुंबई-पुणे एक्स्प्रेसवे, सालेम-कोची हायवे, गुंटूर-चेन्नई हायवे आणि गोल्डन क्वाड्रीलॅटरल यासारख्या मोठ्या महामार्गांवर हे ईव्ही चार्जिंग पॉईंट्स इन्स्टॉल केले जातील. विविध शहरांदरम्यान इलेक्ट्रिक वेहिकल चार्जिंगचे विश्वसनीय आणि विशाल नेटवर्क उभारण्यावर ही धोरणात्मक भागीदारी लक्ष केंद्रित करेल. त्यामुळे एका शहरातून दुसऱ्या शहरामध्ये प्रवास करत असताना ईव्ही मालकांना रेन्जची चिंता करावी लागणार नाही.
टाटा पॉवरचे ईव्ही चार्जिंगचे बिझनेस डेव्हलपमेंट विभागाचे हेड श्री. वीरेंद्र गोयल यांनी सांगितले, “देशात ईव्ही चार्जिंगचे विशाल नेटवर्क स्थापित करण्याच्या दृष्टीने आयओसीएलसोबत आमची भागीदारी हे महत्त्वाचे धोरणात्मक पाऊल आम्ही उचलत आहोत. आयओसीएलच्या विशाल उपस्थितीचा उपयोग करवून घेत टाटा पॉवर देशभरातील विविध प्रदेशांमध्ये वेगवान आणि अति वेगवान चार्जिंग पॉईंट्स उभारेल, त्यामुळे पर्यावरणपूरक इलेक्ट्रिक मोबिलिटी भवितव्य निर्माण करण्यासाठी पोहोच व समावेशकता यामध्ये योगदान दिले जाईल.”
तंत्रज्ञानाचा उपयोग आणि नाविन्यपूर्ण सुविधा यांच्यामार्फत ईव्ही युजर्सना अधिकाधिक प्रगत अनुभव मिळवून देण्यासाठी टाटा पॉवर वचनबद्ध आहे. टाटा पॉवर ईझेड चार्ज ऍप आणि इंडियनऑइल ई-चार्ज मोबाईल ऍप या दोन्हींमार्फत अगदी सहजपणे ईव्ही चार्जिंग करून घेण्याचा दुहेरी लाभ ईव्ही युजर्सना मिळवता येईल. या दोन्ही ऍप्सच्या साहाय्याने युजर्स आपल्या जवळचे व सोयीचे चार्जर्स शोधून ते बुक करू शकतील.
इलेक्ट्रिक वाहने स्वीकारण्याच्या वाढत्या ट्रेंडला अनुसरून उत्पादने, सेवासुविधा सादर करण्याची कॉर्पोरेशनची बांधिलकी अधोरेखित करत, आयओसीएलचे कार्यकारी संचालक (रिटेल-एनअँडई) श्री. सौमित्र श्रीवास्तव यांनी सांगितले, “ऊर्जा सुविधा आउटलेट्सना परिपूर्ण बनवण्यासाठी रिटेल नेटवर्कमध्ये परिवर्तन घडवून आणून २०२४ सालापर्यंत १०००० ईव्ही चार्जिंग स्टेशन्स पुरवण्याची आयओसीएलची योजना आहे. सध्या ६००० पेक्षा जास्त ईव्ही चार्जिंग स्टेशन्स असून, आमची कंपनी स्वतःची पोहोच सातत्याने वाढवत आहे. टाटा पॉवरसोबत आमची धोरणात्मक भागीदारी या परिवर्तनामध्ये महत्त्वपूर्ण भूमिका निभावण्यासाठी सज्ज आहे. या क्षेत्रातील आव्हानांना दूर सारून संधींचा लाभ घेण्यासाठी आयओसीएलमध्ये आम्ही सज्ज आहोत, ज्यामुळे अधिक पर्यावरणपूरक मोबिलिटीच्या दिशेने वाटचाल सहजसाध्य होईल.”समझोता करारावर स्वाक्षऱ्या करताना टाटा पॉवर आणि आयओसीएलच्या अधिकाऱ्यांबरोबरीनेच आयओसीएलचे रिटेल ट्रान्सफॉर्मेशनचे चीफ जनरल मॅनेजर श्री. के नवीन चरण, मार्केटिंग स्ट्रॅटेजीचे चीफ जनरल मॅनेजर श्री सौमित्र चक्रबोर्ती आणि टाटा पॉवरचे ईव्ही चार्जिंगचे बिझनेस डेव्हलपमेंटचे हेड श्री वीरेंद्र गोयल उपस्थित होते.
जवळपास ६०% इतक्या लक्षणीय बाजारपेठ हिस्सेदारीसह टाटा पॉवरने इलेक्ट्रिक वेहिकल चार्जिंग क्षेत्रातील नेतृत्वस्थान पटकावले आहे. टाटा पॉवरचे संपूर्ण देशभरातील विशाल नेटवर्क ४२० शहरांमध्ये पसरलेले आहे, त्यामध्ये ६२००० पेक्षा जास्त होम चार्जर्स, ४९०० सार्वजनिक आणि अर्ध-सार्वजनिक चार्जिंग पॉईंट्स तसेच ४३० बस चार्जिंग स्टेशन्सचा समावेश आहे, जी वेगवेगळ्या मोक्याच्या ठिकाणी उपलब्ध आहेत आणि देशभरात चार्जिंग सुविधा पोहोचवत आहेत. हे नेटवर्क सातत्याने वाढत असून संपूर्ण देशभरता इलेक्ट्रिक वेहिकल चार्जिंगची पोहोच वाढवण्याप्रती टाटा पॉवरची अढळ निष्ठा दर्शवते.
ओशो आश्रमाची जागा बजाज यांना विकण्यास मनाई-५० कोटी परत करण्याचे धर्मादाय सहआयुक्तांचे निर्देश;ओशो भक्तांच्या लढ्याला यश
पुणे : ओशो आश्रम वाचवण्यासाठी गेल्या अनेक वर्षांपासून लढा देणाऱ्या ओशो भक्तांच्या प्रयत्नांना यश आले आहे. कोरेगाव पार्क येथील ओशो आश्रमातील सर्व्हे नं. १५ व १६ मधील जागा राजीव बजाज यांना विकण्यास मनाई करण्यात आली असून, आश्रम व्यवस्थापनाने बजाज यांच्याकडून आगाऊ स्वरूपात घेतलेले ५० कोटी रुपये परत करण्याचे निर्देश धर्मादाय सहआयुक्त आर. यु. मालवणकर यांनी दिले आहेत. गेल्या अनेक दिवसांपासून हा निकाल प्रतीक्षेत होता. ही जागा विकण्याची ट्रस्टला खरोखर गरज आहे का? आणि ट्रस्टच्या हितासाठी व संरक्षणासाठी योग्य आहे का? या दोन मुद्द्यांच्या आधारे हा निकाल देण्यात आला आहे. धर्मादाय आयुक्तालयाच्या या ऐतिहासिक निकालाने जगभरातील ओशो शिष्यांना आनंद झाला आहे.
नुकत्याच एक डिसेंबरला झालेल्या युक्तिवाद व उलट तपासणीनंतर माननीय धर्मादाय सहआयुक्तांनी ओशो इंटरनॅशनल फाउंडेशन ट्रस्टची जागा विक्रीसाठीची याचिका क्रमांक २/२०२१ फेटाळून लावली.
धर्मादाय सहआयुक्तानी दिलेल्या निकालात म्हटले आहे की , याचिकाकर्त्या ट्रस्टने राजीवनयन राहुलकुमार बजाज व रिषभ परिवाराला बयाणा रक्कम ५० कोटी रुपये विनव्याज परत करावेत. ओशो इंटरनॅशनल फाउंडेशनच्या २००५ ते २०२३ या कालावधीत व्यवहारांचे सहायक धर्मादाय आयुक्तांच्या परवानगीने विशेष लेखापरीक्षकांच्या समितीमार्फत हा निकाल दिल्यापासून एक महिन्याच्या आत पीटीए विशेष लेखापरीक्षण करावे. महाराष्ट्र पब्लिक ट्रस्ट अधिनियम १९५१ मधील नियम २० नुसार या विशेष ऑडिटसाठी २५ हजार प्रतिवर्ष हे स्थिर शुल्क किंवा ओशो इंटरनॅशनल फाउंडेशनच्या वार्षिक उत्पन्नाच्या एक टक्के यापैकी जे कमी असेल ते अदा करावे. हा निकाल दिल्यापासून १५ दिवसांच्या कालावधीत ओआयएफच्या विश्वस्तांनी तरतूद म्हणून २,२५,०००/- रक्कम जमा करावी. विश्वस्त, व्यवस्थापक अथवा अन्य अधिकृत व्यक्ती जे फाउंडेशनच्या अकौंट्सचे काम पाहतात, त्यांनी विशेष ऑडिटर्सना सर्व रेकॉर्ड व खातेपुस्तके, पावत्या, व्हाउचर्स, लेजर्स उपलब्ध करून द्यावीत आणि निर्धारित वेळेत ऑडिट पूर्ण करण्यासाठी सर्व प्रकारचे सहकार्य करावे. विशेष लेखापरीक्षकांनी त्यांच्या नियुक्तीच्या तारखेपासून सहा महिन्यांच्या कालावधीत त्यांचा एकत्रित अहवाल या प्राधिकरणाकडे सादर करावा.
दरम्यान, हा निकाल देताना नोंदवलेल्या निरीक्षणांनुसार, ओशो इंटरनॅशनल फाउंडेशनच्या नोंदींनुसार विश्वस्तांकडून ट्रस्टच्या मालमत्तेसंदर्भात वारंवार व्यवहार करण्याचा प्रयत्न झालेला दिसतो आहे. ट्रस्टचा निधी आणि उत्पन्न याबाबत त्यांच्यामध्ये गांभीर्य दिसत नाही. कोणत्याही तज्ञाचा सल्ला न घेता घाईघाईने विश्वस्त निर्णय घेत आहेत, याचा दीर्घकालीन परिणाम ओशो इंटरनॅशनल फाउंडेशन, तसेच नियो सन्यास फाउंडेशनच्या (एनएसएफ) भविष्यातील आर्थिक स्वातंत्र्यावर होत आहेत. लाखो शिष्य आणि ओशो भक्तांच्या भावना या संस्थांशी, ओशो समाधी आणि ओशो समाधीच्या आजूबाजूच्या परिसराशी, इथल्या संपत्तीशी जोडलेल्या आहेत.
हा मनावर हृदयाचा, हेराफेरीवर भक्तीचा, उंदीरांच्या शर्यतीवर कृपेचा, खोट्या दाव्यांवर तथ्यांचा, द्वेषावर प्रामाणिकपणाचा हा विजय आहे. ओशो आश्रम हा निव्वळ मालमत्तेचा तुकडा नाही, तो आध्यात्मिक साधकांसाठी एक मरुभूमी आहे. ही जागा सर्व प्रकारे संरक्षित केली पाहिजे, अशी भावना ओशोभक्त स्वामी अखिल सरस्वती यांनी व्यक्त केली.
या लढ्यात ओशो भक्तांची बाजू मांडणारे वरिष्ठ विधिज्ञ ऍड. निखिल राजेशिर्के म्हणाले, माननीय धर्मादाय सहआयुक्तांनी मुंबई विश्वस्त संस्था कायदा १९५० मधील सेक्शन ३६ अंतर्गत निकाल देत मालमत्तेचे संरक्षण तर केलेच, शिवाय चौकशी करून ट्रस्टच्या व्यवस्थापनावरही नियंत्रण ठेवले आहे.
ऍड. राधिकेश उत्तरवार व पूजा ठाकूर यांनी हा निकाल जगभरातील ओशोंच्या लाखो शिष्यांचा आणि अनुयायांचा एक मोठा विजय आहे. हा निकाल कायद्यातील तरतुदी आणि ओशो भक्तांच्या भावनांचे अनोखे मिश्रण आहे. विशेष लेखापरीक्षणाचा आदेश दीर्घकाळ दिलासा देणारा होता. कारण गेल्या तीन दशकांपासून नियामक मंडळावर लावण्यात आलेल्या गैरव्यवस्थापनाच्या आरोपांबाबत सत्य समोर येण्याची शक्यता आहे, असे नमूद केले.
वरिष्ठ वकील ऍड. वेणुगोपाल म्हणाले, ओशो इंटरनॅशनल फाउंडेशनच्या २००५ ते २०२३ या कालावधीतील आर्थिक व्यवहारांच्या लेखापरीक्षणानंतर सर्व विश्वस्तांची गच्छंती निश्चित आहे. ट्रस्टच्या मालमत्तेचे संरक्षण करण्यासाठी ओशो प्रेमींच्या प्रामाणिक आणि निःस्वार्थ सेवेचा उल्लेखही माननीय न्यायाधीशांनी आदेशात केला आहे.
सर्वोच्च न्यायालयातही माघारमुंबई उच्च न्यायालय व धर्मादाय आयुक्तालयाने आश्रमाच्या जागा विक्रीसंदर्भात दिलेल्या अंतरिम आदेशाला आव्हान देण्यासाठी ओशो इंटरनॅशनल फाउंडेशनच्या वतीने काही महिन्यांपूर्वी सर्वोच्च न्यायालयात स्पेशल लिव्ह पिटिशन (एसएलपी) दाखल केली होती. तसेच जागा विक्रीच्या समर्थनार्थ काही दस्तावेज सादर केले होते. ओशो इंटरनॅशनल फाउंडेशनने सोमवारी (११ डिसेंबर) ही पिटिशन सर्वोच्च न्यायालयातून मागे घेण्याचा निर्णय घेतल्याने ही याचिका निकाली निघाली आहे.
श्रीरामाच्या अयोध्या येथील मूर्तीस वस्त्र विणण्यासाठीच्या ‘दो धागे श्रीराम के लिए’ अभियानाचे पुणे येथे उदघाटन
पुणे : अयोध्येतील श्रीराम जन्मभूमी मंदिरातील श्री रामाच्या मूर्तीसाठी लाखो हातांनी वस्त्र विणले जाणार आहे. त्याकरिता ‘दो धागे श्रीराम के लिए’ या अभियानाचे आज पुणे येथे केंद्रीय मंत्री स्मृती इराणी, विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री श्री. चंद्रकांतदादा पाटील, श्री राम मंदिर न्यास अयोध्या पूज्य श्री गोविंद देव गिरी महाराज यांच्या हस्ते उद्घाटन झाले. तसेच ‘रामजन्म भूमीचे रामायण’ या पुस्तकाचे प्रकाशनही यावेळी करण्यात आले. या दरम्यान उपसभापती डॉ. गोऱ्हे यांनी स्वतःच्या हाताने प्रभू श्रीराम यांच्या वस्त्राचे काही धागे विणले.
या कार्यक्रमाला केंद्रीय मंत्री स्मृती इराणी, विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री श्री. चंद्रकांतदादा पाटील, श्री राम मंदिर न्यास अयोध्या पूज्य श्री गोविंद देव गिरी महाराज, श्री राम मंदिर न्यास अयोध्या श्री सुरेशजी (भैय्याजी) जोशी यांसह अन्य मान्यवर उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे आयोजन श्रीमती. अनघा घैसास यांनी केले आहे.
राष्ट्रीय लोक अदालतीत एकूण ८३ हजार दावे निकाली
पुणे, दि. १२: राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण नवी दिल्ली, महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण उच्च न्यायालय मुंबई यांच्या निर्देशानुसार आणि प्रमुख जिल्हा न्यायाधीश तथा जिल्हा विधी सेवा प्राधिकरण पुणेचे अध्यक्ष के.पी.नांदेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली ९ डिसेंबर रोजी आयोजित करण्यात आलेल्या राष्ट्रीय लोकअदालतमध्ये जिल्ह्याने प्रलंबित ३३ हजार ३५९ आणि दाखलपूर्व ५० हजार ४५८ असे एकूण ८३ हजार ८१७ प्रकरणे निकाली काढण्यात आले. लोकअदालतीमध्ये सर्वाधिक प्रकरणे निकाली काढण्यात पुणे जिल्ह्याने सातत्याने प्रथम क्रमांक कायम राखला असल्याची माहिती जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या सचिव सोनल पाटील यांनी दिली आहे.
जिल्हा विधी सेवा प्राधिकरण पुणे तर्फे विधी सेवा प्राधिकरण अधिनियम १९८७ मधील तरतुदी अंतर्गत राज्य, जिल्हा विधी सेवा प्राधिकरणे व तालुका विधी सेवा समित्याद्वारे अशा प्रकारच्या लोकन्यायालयांचे वेळोवेळी आयोजन करण्यात येते. लोकअदालत किंवा लोक न्यायालय हे एक अनोखे व्यासपीठ आहे जिथे विवाद लवकर आणि परवडण्याजोगे सोडवले जातात.
लोकअदालतीमध्ये मोठ्या प्रमाणात खटल्यांचा यशस्वी निपटारा हा न्यायालयाच्या सक्रिय दृष्टिकोनाचा आणि पारंपारिक न्यायव्यवस्थेवरील भार कमी करण्याच्या क्षमतेचा पुरावा आहे. खटल्यांचा अनुशेष कमी करण्यासाठी आणि वेळेवर न्याय मिळेल याची खात्री करण्यासाठी हा टप्पा महत्त्वाचा आहे.
राष्ट्रीय लोक अदालतीला जिल्ह्यात चांगला प्रतिसाद मिळत असून लोकअदालत यशस्वी करण्यासाठी सर्व न्यायीक अधिकारी, जिल्ह्यातील सर्व तालुका विधीज्ञ संघटना, विविध शासकीय आणि सामाजिक संस्था, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण सदस्य, अधिकारी, कर्मचारी यांचे सहकार्य लाभले, असे जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या सचिव श्रीमती पाटील यांनी कळविले आहे.
पनवेल महानगरपालिका आस्थापनाची परीक्षा सुरळीत संपन्न
पुणे, दि. ११ : पनवेल महानगरपालिकेच्या आस्थापनेवरील गट ‘अ’ ते गट ‘ड’ मधील ४१ संवर्गातील ३७७ पदांकरीता राज्यातील विविध जिल्ह्यातील एकूण ५७ परीक्षाकेंद्रांवर ८ ते ११ डिसेंबर या कालावधीत तीन सत्रात घेतलेल्या परीक्षेत एकुण ५५ हजार २१४ उमेदवार बसले होते. ही परीक्षा टिसीएस कंपनीमार्फत घेण्यात आली असून पुणे जिल्ह्यातील ४ परीक्षा केंद्रावर कोणत्याही केंद्रावर अनुचित प्रकार न होता सुरळीत पार पडली, अशी माहिती जिल्हाधिकारी कार्यालयातील नगरपालिका प्रशासन शाखेचे जिल्हा सहआयुक्त व्यंकटेश दुर्वास यांनी दिली आहे.
परीक्षा सुरळीतपणे पार पाडण्यासाठी श्री. दुर्वास यांनी जिल्हा समन्वयक म्हणून काम पाहिले. परीक्षा केंद्रावर केंद्र निरीक्षक तथा समन्वयक म्हणून पुणे जिल्ह्यातील नगरपरिषदा, नगरपंचायतीचे मुख्याधिकारी यांनी कामकाज पार पाडले. परीक्षा केंद्रावर कोणताही अनुचित प्रकार घडू नये व कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये याकरीता सर्व परीक्षा केंद्रावर पोलिस कर्मचारी नेमण्यात आले होते.
परीक्षा केंद्रावर उमेदवारांनी कोणतेही इलेक्ट्रॉनिक उपकरण अथवा मोबाईलचा वापर होऊ नये याकरिता योग्य ती दक्षता घेण्यात आली होती. तसेच शासन मान्यता प्राप्त ईसीआयएल या कंपनीचे मोबाईल जॅमर परीक्षा केंद्रावर बसविण्यात आलेले होते, अशीही माहिती श्री.दुर्वास यांनी दिली आहे.
1 कोटी 17 लाखांची फसवणूक, महिला प्राचार्यांसह तिघांविरोधात गुन्हा दाखल
पुणे–
शाळेत व्यावसायिक भागिदारी देण्याच्या मुद्यावरून एका महिलेची तब्बल 1 कोटी 17 लाख रुपयांची फसवणूक केल्याची घटना पुण्यात घडली आहे. या प्रकरणी महिला प्राचार्यासाह 3 जणांवर आर्थिक फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणी येरवडा पाेलिस ठाण्यात पुर्णिमा मिलिंद काेठारी (वय-63,रा.येरवडा, पुणे) यांनी आराेपी प्राचार्य शेफाली तिवारी, तन्मय शर्मा, राेहीत भार्गव (रा.वाघाेली, पुणे) यांचे विराेधात फिर्याद दाखल केली आहे. सदरचा प्रकार ऑगस्ट 2019 ते मार्च 2023 दरम्यान घडला आहे. पाेलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सी.पी.गाेयंका इंटरनॅशनल स्कुलच्या प्राचार्य शेफाली तिवारी यांनी त्यांची आयुष्मती नावाची ट्रस्ट असल्याचे तक्रारदार काेठारी यांना सांगितले. त्या ट्रस्टची कॅनरी हाय इंटरनॅशनल स्कुल चालविण्याबाबतच्या सर्व परवानगी त्यांच्याकडे असल्याचे भासवून आराेपी यांनी तक्रारदार यांना सदर ट्रस्टच्या नावाने कॅनरी हाय इंटरनॅशनल स्कुल सुरु करुन भागीदारी देऊ असे सांगितले.
त्यानुसार एक ते दाेन वर्षासाठी पैशांची गुंतवणूक करण्यास सांगून तक्रारदार यांचेकडून भागीदारीसाठी 1 काेटी 17 लाख 67 हजार रुपये घेण्यात आले. त्याप्रमाणे तक्रारदार व त्यांचा मुलगा हे दाेघे सदर शाळेत 70 टक्के भागीदार असताना, प्राचार्य तिवारी व त्यांच्या साथीदारांनी तक्रारदार यांना काेणत्याही प्रकारचा अधिकार शाळेत दिला नाही. तसेच शाळेच्या नावाने भागीदार असताना देखील बँक खात्यावर जमा हाेणारा विद्यार्थ्यांचा निधी व इतर कामांचा निधी स्वत:च्या फायद्याकरिता वापरुन शाळा बंद हाेण्यास कारणीभूत ठरल्या. त्याचप्रमाणे तक्रारदार हे शाळा बंद हाेण्यास कारणीभूत असल्याचे विद्यार्थ्यांचे पालकांना सांगून त्यांची नाहक बदनामी केल्याचा प्रकार घडला आहे. याप्रकरणी कलम 156 (3) नुसार न्यायालयाचे आदेशाने याबाबत पाेलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. याबाबत पुढील तपास येरवडा पाेलिस करत आहेत.
हाॅटेल बझुकामध्ये पत्नीला जेवायला नेलेल्या पतीच्या डोक्यात घातली बिअरची बाटली
पुणे -मोठ्या हौसेने पत्नीला जेवणासाठी हाॅटेल बझुकामध्ये नेलेल्या पतीने हॉटेलमधील भांडणात महिलांपुढे अश्लील शिवीगाळ न करण्याची सूचना केली आणि भांडणे करणाऱ्या टोळक्याने या पतीच्या डोक्यात बिअरची बाटली फोडल्याची घटना घडली आहे. यावेळी या टोळक्याने घटनास्थळी आरडाओरडा करून दहशत पसरवण्याचा प्रयत्न केला.एकंदरीत अशा परिस्थिती पुण्यात सहकुटुंब हॉटेल वारी आता काळजीपूर्वक बाब ठरणार आहे
याप्रकरणी मुंढवा पाेलिस ठाण्यात मंगेश तांबे , अक्षय गागडे व गाेट्या (पूर्ण नाव माहिती नाही) यांच्या विराेधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत आराेपी विराेधात भैरवनाथ बाबुराव साळुंखे (36,रा.मुंढवा राेड,पुणे) यांनी पाेलिसांकडे तक्रार दाखल केली आहे. पाेलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार भैरवनाथ साळुंखे हे त्यांच्या पत्नीसह मुंढवा परिसरात धायरकर वस्ती याठिकाणी हाॅटेल बझुकामध्ये जेवणासाठी गेले हाेते. त्यावेळी सदर आरोपी हाॅटेलचे बील देण्याच्या मुद्यावरून हाॅटेल मॅनेजरशी वाद घालून अश्लील शिवीगाळ शिवीगाळ करत हाेते. त्यामुळे तक्रारदार साळुंखे यांनी त्यांना महिलांचा दाखला देत शिवीगाळ करु नका असे सांगितले. त्याचा राग धरून त्यांनी तक्रारदाराच्या डोक्यात थेट बिअरची बाटली घातली.
त्यानंतर तीच बाटली हवेत फिरवून हॉटेलमध्ये आरडाओरडा केला. यामुळे हॉटेलमध्ये आलेले ग्राहक व हॉटेलच्या कर्मचाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण तयार झाले. या प्रकरणी पुढील तपास सहाय्यक पाेलिस निरीक्षक आर व्ही महानाेर 9923406097करत आहेत.
अदिती राव हैदरी हिने ज्युबिली आणि ताजसाठी जिंकला लोकप्रिय अभिनेत्री-वेब मालिका सन्मान
अदिती राव हैदरी हिने ताज: डिव्हाइड बाय ब्लड अँड ज्युबिली या वेब सिरीजमधील उत्कृष्ट अभिनयासाठी मुंबई येथे आयोजित 23व्या ITA अवॉर्ड्समध्ये लोकप्रिय अभिनेत्री पुरस्कार प्राप्त केला. तिच्या अष्टपैलुत्व आणि आकर्षक अभिनयासाठी हा खास पुरस्कार तिने जिंकला असून प्रतिष्ठित अभिनेत्री म्हणून तिने स्वतः ला सिद्ध करून दाखवलं आहे.
ताज: डिव्हाइड बाय ब्लडमधील भावपूर्ण अनारकलीचे अदितीचे पात्र तिने उत्तम साकारल तिचे भावनिक अभिव्यक्ती आणि सुंदर अभिनय कायम प्रेक्षकांना भावून गेला.ज्युबिलीमध्ये 40 च्या दशकातील सुपरस्टार सुमित्रा कुमारी म्हणून आदितीने आणखी एक उत्कट कामगिरी केली आणि सुमित्रा कुमारीची भूमिका आपलीशी केली. अदिती सहजतेने भावपूर्ण नृत्यांगना पासून सुमित्रा कुमारीच्या करिष्माई आणि शक्तिशाली व्यक्तिमत्वात बदलते विविध भूमिकांवर तिची कमांड दाखवते.
वेब सीरिजच्या जगात एक उत्तम अभिनेत्री म्हणून तिने तिची बाजू पक्की केली आहे. प्रेक्षक तिच्या आगामी प्रोजेक्ट्सची आतुरतेने वाट पाहत असून ज्यात विजय सेतुपतीसोबतचा मूक चित्रपट “गांधी टॉक्स” आणि संजय लीला भन्साळी यांच्यासोबत “हीरामंडी” या वेब सिरीजचा समावेश आहे. पहिला इंडो-ब्रिटिश सहयोगी चित्रपट “लायनेस” मध्ये ती दिसणार आहे.
आपण देशासाठी काय देऊ शकतो ही भावना प्रत्येकाने जोपासावी- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
नागपूर, दि. 11 – आपल्याला काय मिळाले यापेक्षा आपण देशासाठी काय देऊ शकतो, ही भावना प्रत्येकाने जोपासावी, असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले.
नागपूर विधानभवन येथे आयोजित 50 व्या सुवर्ण महोत्सवी संसदीय अभ्यास वर्गाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. संसदीय कार्य प्रणालीचे महत्त्व लोकांपर्यंत पोहचवणे हा या अभ्यासवर्गाचा उद्देश आहे. यावेळी विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. निलम गोऱ्हे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, संसदीय कार्यमंत्री चंद्रकांत पाटील, विरोधीपक्ष नेते विजय वडेट्टीवार, राष्ट्रकुल संसदीय मंडळाचे खजिनदार आमदार ॲड्. आशिष शेलार, विधानमंडळ सचिव जितेंद्र भोळे, सचिव विलास आठवले तसेच विविध विद्यापीठांचे विद्यार्थी, अधिव्याख्याता उपस्थित होते.
संसदीय अभ्यास वर्गात राज्याचे, देशाचे भवितव्य घडताना पाहता येत असल्याचे सांगून मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले, राजकीय व्यक्ती व प्रशासनाविषयी जनमानसात आदर वाढवण्यासाठी संसदीय अभ्यासवर्गातील विद्यार्थ्यांनी प्रक्रिया समजून घ्यावी व ती लोकांपर्यंत पोहचवावी. विधानमंडळाला गौरवशाली परंपरा आहे. त्यामध्ये एक ऊर्जा आणि प्रेरणा आहे. विधानमंडळ म्हणजे जनतेसाठी एक ऊर्जा आहे. अनेक प्रश्नांवर येथे चर्चा होत असते. ती पाहण्याची व कशाप्रकारे प्रश्न सोडवले जातात हे समजून घेण्याची संधी या निमित्ताने मिळणार आहे. जनतेचे प्रश्न सोडवण्याचा प्रामाणिक प्रयत्न विधानमंडळाच्या माध्यमातून करत असतो. लोकांना त्यांच्या घरी जाऊन योजनांचा लाभ देणारी ‘शासन आपल्या दारी’ ही योजना आपण सुरू केली आहे. आपण सर्वांनी समर्पित भावनेने काम करूया. लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न करणे ही शासनाची भूमिका आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हे देशातील सर्वोत्कृष्ट लोकप्रतिनिधी आहेत. त्यांनी देशासाठी आपले जीवन समर्पित केले आहे. देशाला एका उंचीवर नेण्याचे काम त्यांनी केले आहे, असेही ते म्हणाले.
शासन लोककल्याणकारी अनेक योजना राबवत असते. या योजना लोकांपर्यंत पोहचण्यासाठी सातत्याने प्रयत्न होत आहेत. देशासाठी, राज्यासाठी, गावासाठी चांगले काही करण्याची भावना असली पाहिजे. समर्पित भावनेने काम केले पाहिजे. या अभ्यासवर्गामध्ये विधीमंडळाचे कामकाज कसे चालते, कायदे कसे निर्माण होतात हे पाहण्याची संधी मिळणार आहे. या कामकाजाची माहिती सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहचण्याचे काम आपल्या सर्वांकडून व्हावे हाच या अभ्यासवर्गाचा उद्देश आहे, असेही मुख्यमंत्री श्री. फडणवीस यावेळी म्हणाले.
सामान्यांचे सर्व प्रश्न सोडविण्याची विधिमंडळात क्षमता- उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी राज्य घटनेच्या माध्यमातून आपल्याला समृध्द लोकशाही दिली असल्याचे सांगून उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले, संधीची समानता शेवटच्या घटकापर्यंत पोहचवण्यासाठी सभागृह काम करत असते. लोकशाहीचे ज्ञान, सखोल माहिती लोकांपर्यंत पोहचावी, त्याचा अभ्यास व्हावा, प्रक्रिया समजावी व त्याची प्रगल्भता लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी हा अभ्यास वर्ग महत्वाचा आहे. राज्य घटनेने विधानमंडळांना दिलेल्या अधिकारानुसार विधानमंडळाचे कामकाज होते. या अधिकारानुसार सामान्यांचे प्रश्न सोडविण्याचे काम होत असून विधानमंडळ हे सरकारवर अंकुश ठेवण्याचे काम करीत असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी प्रास्ताविकात संसदीय अभ्यासवर्गाची परंपरा, महत्व आणि इतिहास याविषयी माहिती दिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आमदार अॅड्. शेलार यांनी केले.
यंदाच्या अभ्यास वर्गामध्ये राज्यातील विविध विद्यापीठांमधील राज्यशास्त्र व लोक प्रशासन विषयातील 81 विद्यार्थी व 12 अधिव्याख्याता सहभागी झाले आहेत.
बिग बॉस 17 मध्ये अंकिता लोखंडेचे सलमान खान कडून कौतुक
“वीकेंड का वार” च्या अलीकडील एपिसोडमध्ये करिष्माई दबंग अभिनेता आणि बिग बॉसचा होस्ट सलमान खान याने मन्नारा चोप्रा आणि ईशा मालवीय यांच्यासह अंकिता लोखंडे यांच्या उल्लेखनीय कामगिरीचे कौतुक केलं. बिग बॉस मधल्या तिच्या उत्तम खेळी साठी सलमान ने तिचं विशेष कौतुक केलं आहे. सलमान त्याच्या स्पष्ट भाष्य आणि उत्कट निरीक्षणांसाठी ओळखला जातो.
अंकिता तिच्या आकर्षक ऑन-स्क्रीन उपस्थितीसाठी ओळखली जाते आहे. सलमान खानकडून तिला विशेष पोच पावती मिळत असून मन्नारा चोप्रा आणि ईशा मालवीय यांच्यासोबत ती सामील झाली होती. ही प्रशंसा त्यांना केवळ प्रेरित करत असून बिग बॉस 17 चे कथानक आणि मनोरंजन मूल्य वाढवण्यामध्ये त्यांची महत्त्वपूर्ण भूमिका अधोरेखित करते. जसजसा सीझन पुढे जातो तसतसे प्रेक्षक अंकिता लोखंडेकडून अधिक आकर्षक क्षणांची आतुरतेने वाट बघत आहेत. सलमान खानच्या स्तुतीमुळे शोचे कथानक आणि मनोरंजनाचा भाग तयार करण्यात स्पर्धक म्हणून तिच्या महत्त्वपूर्ण भूमिकेवर जोर दिला जातो. बिग बॉस 17 ची कथा जसजशी उलगडत जात आहे तसच सलमान खानची ओळख अंकिता लोखंडेसाठी प्रेरणा आणि प्रमाणीकरण दोन्ही गोष्टी दाखवत आहे. घरातील तिची मनमोहक उपस्थिती प्रेक्षकांना सतत भुरळ घालते आणि बिग बॉसच्या प्रतिष्ठित विजेतेपदाच्या शोधात एक प्रमुख स्पर्धक म्हणून तिची स्थिती मजबूत करते.
