Home Blog Page 1333

गर्भावस्‍थेच्‍या २५व्‍या आठवड्यात जन्‍मलेल्‍या बाळाचा अद्भुत प्रवास-अहमदनगरहून पुण्यातील सह्याद्रि हॉस्पिटल्समध्ये आणलेल्‍या ७०० ग्रॅम वजन असलेल्‍या बाळाला मिळाले जीवनदान 

पुणे, ११ डिसेंबर २०२३: सह्याद्रि सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, नगर रोड मधील निओनॅटल इंटेन्सिव्‍ह केअर युनिट (एनआयसीयू) येथील वै‍द्यकीय टीमने अहमदनगरमधील मेघना राव (नाव बदललेले) यांच्‍या पोटी जन्‍मलेल्‍या बाळाला त्याच्या आयुष्‍यातील ९३व्‍या दिवशी नवजीवनदान दिले. गर्भावस्‍थेच्‍या २५व्‍या आठवड्यात जन्‍मलेले आणि जन्‍माच्‍या वेळी फक्‍त ७०० ग्रॅम वजन असलेले हे बाळ सह्याद्रि हॉस्पिटल्समधील वैद्यकीय तज्ञांच्‍या समर्पित देखरेखीअंतर्गत खडतर आव्‍हानांवर मात करत जणू एक योद्धाच ठरले. 

अहमदनगरमधील एका हॉस्पिटलमध्‍ये मेघना रावने बाळाला जन्‍म दिला. त्यावेळी गर्भाशयातील अपुरे पाणी, त्याची होणारी गळती याशिवाय गर्भाशयाचे तोंड झाकणारी नाळ आणि आईच्या योनीमार्गात पॉझिटिव्ह ई कोलाय संसर्ग यासारख्या गंभीर गुंतागूंतींमुळे आपत्कालीन सिझेरियन सेक्शन करावे लागले. या गंभीर परिस्थितीमुळे नवजात बाळाला लक्षणीय धोका निर्माण झाला. २२ ऑगस्ट २०२३ रोजी जन्मानंतर लगेचच बाळाला श्वासोच्छवासाचा गंभीर त्रास होऊ लागला, ज्यामुळे त्‍याला त्‍वरित व्‍हेंटिलेटरवर ठेवण्‍यात आले.

नगर रोड स्थित सह्याद्रि सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल्सने या प्रसंगी महत्त्वपूर्ण वैद्यकीय सहाय्य प्रदान करण्‍याप्रती हॉस्पिटल्सची कटिबद्धतेला स्मरून मोफत रुग्णवाहिकेची व्यवस्था केली. व्हेंटिलेटरवर असलेल्‍या बाळाला कुशल डॉक्टर्स आणि परिचारिकांच्या मदतीने त्वरित पुण्यातील नगर रोड स्थित सह्याद्रि रुग्णालयाच्या टरशरी केअर सेंटरमध्‍ये यशस्‍वीरित्‍या आणण्‍यात आले. या हस्तांतरणानंतर व्‍हेंटिलेटरवर असलेल्‍या या बाळावर सुरूवातीला सर्फक्टंटचा वापर करत जन्‍मापासून सलग २० तास त्याचा जीव वाचवण्‍याचा प्रयत्‍न करत असताना, बाळाच्‍या फुफ्फुसामध्‍ये रक्‍तस्राव होऊन गंभीर स्थिती निर्माण झाली, ज्‍यामुळे बाळाला रि-इंट्युबेशन आणि उच्‍च वारंवारतेमध्‍ये व्‍हेंटिलेशन द्यावे लागले. 

ही केस आव्‍हानात्‍मक होती, ज्यामध्ये बाळाच्या हृदय, मूत्रपिंड, आतडी आणि फुफ्फुस या आवायवांमध्ये अनेक गंभीर धोके निर्माण झाले होते. फुफ्फुसातील रक्तस्रावामुळे मोठ्या प्रमाणात रक्त कमी होण्याला प्रतिबंध करण्यासाठी एकाधिक रक्त संक्रमण आणि सेप्सिस यांसारख्या अतिरिक्त गुंतागूंतांचे व्यवस्थापन करण्याची आवश्‍यकता होती. विशेष म्हणजे अधिक काळ उच्‍च वारंवारतेचे व्‍हेंटिलेशन आणि नॉन-इन्‍व्‍हेसिव्‍ह सपोर्टसह बाळाने स्‍टेरॉईड किंवा डाययुरेटिक थेरपीच्‍या गरजेशिवाय या गंभीर स्थितीवर मात केली. बाळाची तब्येत सुधारण्यासाठी संपूर्ण उपचारादरम्यान त्याच्यासाठी बारकाईने केलेले पोषण व्‍यवस्‍थापन अतिशय महत्वपूर्ण ठरले.  

पुण्‍यतील सह्याद्रि सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल्स, नगर रोड येथील निओनॅटोलॉजी अॅण्‍ड पेडिएट्रिक्‍सचे संचालक डॉ. प्रदीप सूर्यवंशी या यशाचे महत्त्व सांगताना म्‍हणाले, “ही महाराष्‍ट्रातील एक मोठी घटना आहे. जेथे गर्भावस्‍थेच्‍या २५व्‍या आठवड्यात फक्‍त ७०० ग्रॅम वजनासह जन्‍मलेल्‍या बाळाला नवीन जीवन मिळाले. तसेच बाळ व्‍हेंटिलेटरवर असताना देखील त्याचे यशस्‍वीरित्‍या टरशरी केअर सेंटरमध्‍ये हस्‍तांतरित करण्‍यात आले. अशा प्रकारच्या अत्यंत कमी वजनाच्या बाळांचे जगणे आणि बरे होण्यामधील उल्लेखनीय प्रयतनांमधून आपल्या देशाच्या आरोग्य सेवेत गेल्या दशकभरात झालेली लक्षणीय प्रगती दिसून येते.” 

ते पुढे म्‍हणाले, ”२६ आठवड्यांपेक्षा कमी वय असलेल्‍या आणि प्रसूतीकाळ पूर्ण होण्‍यापूर्वी जन्‍मलेल्‍या बाळाचे वाचणे अत्‍यंत दुर्मिळ गोष्ट आहे. अशा घटनांमधून तज्ञांच्या देखरेखेखाली घेण्यात आलेली रुग्णांची काळजी आणि वेळेवर केलेल्या हस्‍तक्षेपाचे महत्त्व दिसून येते. मी सह्यादी हॉस्पिटल्‍स, नगर रोड येथील संपूर्ण एनआयसीयू टीमचे त्‍यांची अविरत समर्पितता व कौशल्‍यासाठी आभार व्‍यक्‍त करतो. यामधून पुन्‍हा एकदा सकारात्‍मक परिणाम साधण्यासाठी वेळेवर केलेल्या हस्‍तांतरणाचे महत्त्वपूर्ण परिणाम दिसून येतात.” 

सह्याद्रि सुपर स्पेशालिटी, नगर रोड येथील निओनॅटोलॉजिस्‍ट व पेडिट्रिशियन डॉ. प्रदीप सूर्यवंशी यांच्‍या मार्गदर्शनांतर्गत ८ निओनॅटोलॉजिस्‍ट्स, ८ ज्‍युनिअर डॉक्‍टर्स, २५ परिचारिका व १० केअरटेकर्सचा समावेश होता. या एनआयसीयू टीममध्ये डॉ संतोष कैत, डॉ रवींद्र खेत्रे, डॉ प्रतीक कटारिया, डॉ अमर भिसे, डॉ निकिता मानकर,  डॉ सुष्मिता चंद्रन, डॉ अदिती बन्सल यांनी संपूर्ण केसदरम्‍यान अपवादात्‍मक केअर देण्‍याप्रती, तसेच रूग्‍णाच्‍या स्‍वास्‍थ्‍याची काळजी घेण्‍याप्रती समर्पितता दाखवली.  

आयुष्‍यातील ६७व्‍या दिवशी या बाळाला व्‍हेंटिलेटर सपोर्टवरून काढण्‍यात आले आणि तेव्‍हापासून बाळाला दूध पाजले जात आहे. यामुळे बाळाचे वजन वाढले असून आयुष्‍याच्‍या ९२व्‍या दिवशी बाळाचे वजन २.५ किग्रॅ होते. यामधून बाळाची सामान्‍य विकास गती दिसून येते. बाळाला २३ नोव्‍हेंबर रोजी हॉस्पिटल्समधून डिस्‍चार्ज देण्‍यात आला आणि आता त्‍याचे भविष्‍य प्रसूतीकाळ पूर्ण झाल्‍यानंतर जन्‍मलेल्‍या बाळासारखेच आहे. 

सह्याद्रि हॉस्पिटल्स येथील या घटनेमधून गंभीर आरोग्‍यविषयक आव्‍हानांचा सामना करणाऱ्या, प्रसूतीपूर्व जन्‍मलेल्‍या बाळांसाठी विशेषीकृत वैद्यकीय केअर देण्‍याप्रती हॉस्पिटल्सची क्षमता दिसून येते. महाराष्‍ट्रातील अग्रगण्‍य रुग्णालय समूह म्‍हणून सह्याद्रि  हॉस्पिटल्‍स सर्वांना सर्वसमावेशक आरोग्‍यसेवा देण्‍याप्रती कटिबद्ध आहे. 

गोदरेज सिक्युरिटी सोल्युशन्सने दक्षिण आशियातील सर्वात मोठ्या सिक्युरिटी एक्स्पो आणि कॉन्फरन्स – IFSEC INDIA 2023 मध्ये नाविन्यपूर्ण ऑफरिंगसहसुरक्षा मानकांची केली पुर्नव्याख्या

·         ब्रँड दिल्लीतील प्रगती मैदान येथे घर आणि संस्थात्मक सुरक्षा ऑफरिंग सादर करत आहे

दिल्ली, ११ डिसेंबर २०२३: गोदरेज समूहाची प्रमुख कंपनी गोदरेज अँड बॉयसचा एक भाग असलेल्या गोदरेज सिक्युरिटी सोल्युशन्सने प्रगती मैदान, दिल्ली येथील IFSEC मध्ये घर आणि संस्थात्मक सुरक्षेसाठी अत्याधुनिक नाविन्यपूर्ण कल्पनांचे सादरीकरण केले. कंपनीने ७ ते ९ डिसेंबर या कालावधीत भारतातील सर्वात मोठ्या सिक्युरिटी एक्स्पो – IFSEC 2023 या दक्षिण आशियातील सर्वात मोठ्या सिक्युरिटी एक्स्पो आणि परिषदेत आपल्या नाविन्यपूर्ण ऑफरिंगचे प्रदर्शन आणि प्रात्यक्षिक सादर केले.

कंपनी IFSEC 2023 मध्ये नाविन्यपूर्ण उत्पादनांचे प्रदर्शन करत सुरक्षाविषयक नवकल्पनांमध्ये आघाडीवर आहे. घराच्या सुरक्षिततेची पुन्हा व्याख्या करत, गोदरेज सिक्युरिटी सोल्युशन्सने घर, गिफ्टिंग आणि संस्थात्मक विभागामध्ये विविध सुरक्षा उत्पादनांचा संच सादर केला आहे. गिफ्टिंग विभाग झपाट्याने वाढत असताना, गोदरेजने पर्सनल लॉकर श्रेणीमध्ये व्हर्ज सीरीज नावाच्या लॉकर्सची नवीन श्रेणी सादर केली आहे. राहण्याची जागा उंचावण्यासाठी शैलीदार साठवणूक उपाय सुविधा शोधत असलेल्या वापरकर्त्यांना सेवा पुरवत व्हर्ज मालिका व्यवस्थित, काळजीपूर्वक डिझाइन केलेले वैयक्तिक लॉकर्स सादर करते.

मुलं खूप लवकर तंत्रज्ञानाचा अवलंब करत असतात. त्यामुळे खास मुलांमध्ये मौल्यवान वस्तू व्यवस्थित ठेवण्याची सवय रुजवण्यासाठी गोदरेजने द ड्रीम बॉक्स रेंज ही मुलांसाठी डिजिटल आणि मेकॅनिकल लॉकर्सची एक विशेष श्रेणी देखील सादर केली आहे. या व्यतिरिक्त, गोदरेजने त्यांच्या अग्रगण्य होम लॉकर मॉडेल्सपैकी एक – मॅट्रिक्सची अपग्रेड केलेली आवृत्तीही सादर केली आहे. कार्यक्षमतेच्या जोडीला अखंडपणे अभिजातता यांची जोड देत ती आता अत्याधुनिक प्रीमियम कॉफी ब्राऊन रंगात उपलब्ध आहे. शिवाय, एकाधिक लॉकिंग यंत्रणेच्या गरजेसह, गोदरेजने एनएक्स प्रो प्लस नावाच्या होम लॉकर्सची एक नवीन श्रेणी सादर केली आहे. कुटुंबातील कोणत्याही पिढीतील वापरकर्त्यांसाठी सहज प्रवेश सुनिश्चित करण्यासाठी मेकॅनिकल आणि डिजिटल लॉकिंग यंत्रणेसह ही श्रेणी सुसज्ज आहे. ब्रँडने सुरक्षितता आणखी वाढविण्यासाठी इलेक्ट्रॉनिक, मेकॅनिकल आणि बायोमेट्रिक लॉकिंग सिस्टीमच्या ट्रिपल लॉकिंग यंत्रणेसह NX अॅडव्हान्स रेंज देखील आणली आहे.

प्रिमायसेस आणि इलेक्ट्रॉनिक सिक्युरिटी सोल्युशन्समध्ये, गोदरेजने बॅटरीसह अँटी ड्रोन, बॉलर्ड्स, नंबर प्लेट रेकग्निशन कॅमेरे, एक्सप्लोसिव्ह व्हेपर डिटेक्टर, ई-फेन्सिंग अशा इतर अनेक नाविन्यपूर्ण उत्पादनांच्या सादरीकरणासह महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे.

भौतिक सुरक्षेच्या अंतर्गत, गोदरेज सिक्युरिटी सोल्युशन्सने संभाव्य धोक्यांपासून मालमत्ता आणि मौल्यवान वस्तूंचे संरक्षण करण्यासाठी स्मार्ट फॉग नावाची अत्याधुनिक सुरक्षा प्रणाली आणली आहे. मोशन सेन्सर ब्रेक-इन शोधतो आणि गॅस ट्रिगर करतो. धुके असलेली स्थिती ३०-४० मिनिटे टिकते, तर कमी दृश्यमानता (<1m) चोरट्यांना त्यांच्या योजनांपासून पळ काढायला आणि शक्य तितक्या लवकर तो परिसर सोडायला भाग पाडते!

या नाविन्यपूर्ण कल्पना गोदरेज सिक्युरिटी सोल्युशन्सच्या सध्या सुरू असलेल्या सिक्युर 4.0 उपक्रमामध्ये आघाडीवर आहेत. हा उपक्रम म्हणजे तयार होणा-या धोक्यांबद्दल जागरूकता निर्माण करण्याच्या ब्रँडच्या शाश्वत बांधिलकीची पावती असून उपलब्ध असलेल्या सर्वात मजबूत सुरक्षा उपायांचा अवलंब करण्यासाठी वापरकर्त्यांना प्रोत्साहित करण्याचे काम यातून होत आहे.

या प्रसंगी बोलताना, गोदरेज सिक्युरिटी सोल्युशन्सचे व्यवसाय प्रमुख श्री. पुष्कर गोखले म्हणाले, “IFSEC” या दक्षिण आशियातील सर्वात मोठ्या सिक्युरिटी एक्स्पो आणि कॉन्फरन्सचा भाग बनणे खरोखरच आनंदाची गोष्ट आहे. गोदरेज सिक्युरिटी सोल्युशन्स येथे आम्ही नाविन्यपूर्ण, प्रभावी, ग्राहक केंद्रित सुरक्षा उपाय सुविधा पुरविण्यासाठी वचनबद्ध आहोत. या कार्यक्रमात प्रदर्शित केलेली उत्पादने वापरकर्त्यांच्या जीवनाचा भाग बनत त्यांना उच्च दर्जाची सुरक्षा देण्याची आमची बांधिलकी अधोरेखित करतात. आमच्यासाठी सुरक्षा ही केवळ एक गरज नाही तर तो एक सर्वांगीण अनुभव आहे. हे व्यासपीठ आम्हाला नवकल्पनांचे प्रदर्शन करण्यास आणि आमच्या ग्राहकांसाठी सर्वात महत्त्वाच्या असलेल्या गोष्टींचे संरक्षण करण्यासाठी आमच्या समर्पित बांधिलकीचा पुनरुच्चार करण्यास अनुमती देते. यातून आम्हाला ग्राहक आमच्या अत्याधुनिक उपायांद्वारे त्यांचे परिसर सुरक्षित कसे बनवू शकतात याबद्दल प्रबोधन करण्याची परवानगी मिळते.”

उत्पादन पोर्टफोलिओ:

व्हर्ज PL2L BL व्हाईट: प्रगत सुरक्षा वैशिष्ट्ये समाविष्ट करून, व्हर्ज PL2L BL व्हाईट घराच्या सुरक्षिततेसाठी नवीन मानके प्रस्थापित करते. त्याची नाजुक आणि शैलीदार रचना आणि नाविन्यपूर्ण तंत्रज्ञान आधुनिक सुरक्षा गरजांसाठी एक मजबूत उपाय पुरविते.

व्हर्ज PL2L EL व्हाईट: व्हर्ज मालिकेचा हा प्रकार, त्याच्या मोहक व्हाइट फिनिशसह, अधिक सुरक्षिततेसाठी मोटाराइज्ड लॉक सारख्या कार्यक्षमतेसह नजाकतपणा मिळवून देते. वापरकर्त्यांना त्यांच्या घरांसाठी एक अत्याधुनिक सुरक्षा उपाय सादर करते.

लाल आणि निळ्या रंगात ड्रीम बॉक्स GS4.5L EL: चमकदार लाल आणि निळ्या रंगात ड्रीम बॉक्स GS4.5L EL, केवळ दृश्य पसंतीच वाढवत नाही तर प्रगत सुरक्षा उपायांनाही सामावून घेते. आपत्कालीन प्रवेश की, रोख ठेव कटआउट आणि इतर बऱ्याच वैशिष्ट्यांसह हे सुसज्ज आहे. डिझाइन आणि तंत्रज्ञान यांचा मिलाफ यातून दिसून येतो.

NX प्रो प्लस – गोदरेजने NX प्रो प्लस नावाची होम लॉकर्सची एक नवीन श्रेणी सादर केली आहे जी मेकॅनिकल आणि डिजिटल लॉकिंग यंत्रणांनी सुसज्ज आहे आणि वापरकर्त्यांना त्यांच्या आवडीचा लॉकिंग पर्याय वापरून सहजतेने होम लॉकर्समध्ये प्रवेश करण्याची मुभा देते.

NX प्रो अॅडव्हान्स्ड – इलेक्ट्रॉनिक, मेकॅनिकल आणि बायोमेट्रिक लॉकिंग प्रणालीच्या ट्रिपल लॉकिंग यंत्रणेसह NX अॅडव्हान्स रेंज होम लॉकर्समध्ये सुरक्षिततेची पातळी वाढते हे सुनिश्चित करते.

कॉफी ब्राउनमध्ये मॅट्रिक्स 3016 V5 EL + KL: कार्यक्षमतेच्या जोडीला शैलीदार, नजाकत यांना एकत्र करून, कॉफी ब्राउनमधील मॅट्रिक्स 3016 V5 EL + KL संस्थात्मक वापरासाठी प्रगत सुरक्षा वैशिष्ट्ये सादर करते. त्याची रचना आधुनिक वास्तुकलेच्या गरजा पूर्ण करण्यासाठी तयार करण्यात आली आहे.

सोन्यामध्ये राइनो अॅडव्हान्स्ड डिजी ईएल: गोल्डमधील राइनो अॅडव्हान्स्ड डिजी ईएल सुरक्षा उपाय सुविधांमध्ये शैलीदारपणाची नवीन पातळी सादर करते. उच्च-स्तरीय सुरक्षा मानके राखून त्याचे गोल्ड फिनिश लक्झरीचा अधिकतम अनुभव देते.

आयव्हरी मध्ये Citadel 45 V2 GL: आयव्हरी मधील Citadel 45 V2 GL हे सौंदर्यशास्त्रावर लक्ष केंद्रित करून सुरक्षित स्टोरेज पर्याय पुरविण्याच्या गोदरेज सिक्युरिटी सोल्युशन्सच्या बांधिलकीची पावती आहे. हे विविध सेटिंग्जमध्ये अखंडपणे मिसळून जाते.

अँटी ड्रोन विथ बॅटरी – अँटी ड्रोन उपाय सुविधा सुरक्षा ऑपरेटर्सना संपूर्ण उच्च कार्यक्षमतेने समग्र आणि अत्यंत मोबाइल आणि उच्च कॉन्फिगर करण्यायोग्य उपायसुविधा सादर करून व्यापक ड्रोन धोक्यांशी लढा देतात.

ब्लॉकिंग बॉलर्ड्स – जीवन आणि मालमत्तेचे नुकसान करू शकणाऱ्या दहशतवादाच्या वाढत्या घटनांमुळे ब्लॉकिंग बोलर्ड्स अनधिकृत प्रवेश रोखण्यासाठी एक आधुनिक आणि नाविन्यपूर्ण उपाय आहे.

स्फोटक वाफ आणि ट्रेस डिटेक्टर – हे शुद्ध स्फोटक, संमिश्र, वेगवेगळ्या आर्द्रता आणि दाबांखाली वाफेच्या रूपात असलेली स्फोटके यासह विविध प्रकारचे स्फोटक शोधू आणि ओळखू शकतात.

सिथ्रू स्मार्ट सिरीज कॅमेरे- हे नेटवर्क-आधारित कॅमेरे आहेत. ते अत्यंत स्केलेबल असून ४ चॅनेलसह सुरू होतात आणि १२८ चॅनेलपर्यंत जातात. त्यांच्याकडे २,००० हून अधिक कॅमेरे घेऊ शकणारे सर्व्हर आहेत. या कॅमेऱ्यांमध्ये अंगभूत एआय व्हिडिओ अॅनालिटिक्स वैशिष्ट्य आहे. हे ऑटोमॅटिक लायसन्स प्लेट रेकग्निशन सिस्टीम (ALPRS) वैशिष्ट्य असून ते ९५% अचूकतेसह वाहनांच्या नंबर प्लेटवरून प्रभावीपणे क्रमांक कॅप्चर करू शकते. ते आदेश आणि नियंत्रण केंद्रांना पाठबळ देतात आणि व्हिडिओ फीडसह ऑडिओ एकत्रित करण्यासाठी सुसज्ज आहेत. ते मॉल्स, हॉटेल्स, रुग्णालये आणि शाळांसाठी अगदी योग्य आहेत.

बँक ऑफ इंडियातर्फे विशेष योजना व ऑफर्ससह नारी शक्ती बचत खात्याचा शुभारंभ

मुंबई – बँक ऑफ इंडिया या देशातील सार्वजनिक क्षेत्रातील आघाडीच्या बँकांपैकी एका बँकेने मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. रजनीश कर्नाटक यांनी मुंबईतील प्रमुख कार्यालयात संचालक मंडळाच्या उपस्थितीत ‘नारी शक्ती बचत खात्याचा’ शुभारंभ केला. १८ वर्ष आणि त्यापुढील वयोगटातील, कमावत्या स्त्रियांच्या आर्थिक उत्पादनविषयक गरजा पूर्ण करण्यासाठी हे नवे खाते सुरू करण्यात आले आहे. या बचत खात्यावर विविध सुविधा देण्यात येणार असून त्यात १०० लाख रुपयांपर्यंतचे वैयक्तिक अपघात जीवन विमाकवच, सवलतीच्या दरात आरोग्य विमा आणि स्वास्थ्य उत्पादन, गोल्ड आणि डायमंड बचत खातेधारकांसाठी आकर्षक सवलती, तर प्लॅटिनम बचत खातेधारकांना मोफत लॉकर सुविधा, किरकोळ कर्जावर सवलतीचा व्याज दर, किरकोळ कर्जावरील प्रक्रिया शुल्क माफ, क्रेडिट कार्ड वितरण आणि पीओएसवर ५ लाख रुपयांपर्यंतची कमाल वापर मर्यादा या सुविधा देण्यात येणार आहे. नारी शक्ती बचत खाते स्वतंत्रपणे उत्पन्न मिळवणाऱ्या नोकरदार महिलांसाठी लाभदायक, आर्थिक बचत शक्य करणारे असून त्याच्या मदतीने महिलांना खऱ्या अर्थाने आत्मनिर्भर बनून आर्थिक स्वातंत्र्याचा लाभ घेता येईल. बँकेत उघडण्यात आलेल्या प्रत्येक नारी शक्ती खात्यासह सीएसआर निधीमध्ये १० रुपयांचे योगदान दिले जाणार असून या सीएसआर रकमेचा वापर वंचित महिला/मुलींच्या आर्थिक विकासासाठी केला जाणार आहे. नारी शक्ती बचत खाते आमच्या सर्व ५१३२ शाखा आणि डिजिटल प्लॅटफॉर्मच्या माध्यमातूनही उघडले जाऊ शकते.

महाराष्ट्राच्या चंद्रभागा कचरे महिलांमध्ये विजयी..

पश्चिम बंगालचा हेमंत लिंबू एसआरटीएल १०० अल्ट्रा विजेता

पुणे: सिंहगड-राजगड-तोरणा-लिंगाणा (SRTL) अल्ट्रा ट्रेल मॅरेथॉन हेमंत लिंबू याने १०० किलोमिटर अंतर असलेली  ११ तास ४१ मिनिटात पुर्ण केली; तर महिलांमध्ये चंद्रभागा कचरे यांनी हे अंतर १९ तास ३७ मिनिटात पूर्ण केले. वेस्टर्न घाट्स रनिंग फाउंडेशन आयोजित SRTL अल्ट्रा ट्रेल मॅरेथॉन २०२३ या महाराष्ट्रातील पहिल्या आणि भारतातील सर्वोत्तम मानल्या जाणाऱ्या स्पर्धेचे हे सहावे पर्व होते. ४ विविध अंतर श्रेणींमध्ये ७ देशातून आणि २४ राज्यातील तब्बल १००० रनर्सचा सहभाग असलेली एसआरटीएल 100K ही आंतरराष्ट्रीय ट्रेल रनिंग मॅरेथॉन काल सह्याद्रीच्या डोंगररांगेत यशस्वी पार पडली.

हेमंतने एसआरटी स्पर्धेच्या मागील पाच वर्षांचे सर्व विक्रम यावेळी मोडीत काढले. हा ट्रेल रनिंग मधला राष्ट्रीय विक्रम असल्याचा दावा एसआरटीच्या आयोजकांनी केला आहे. पश्चिम बंगालच्या रिंबिक गावातील हेमंत लिंबू हा २६ वर्षाच्या युवक आहे. त्याने ११ तास ४१ मिनिटात १०० किलोमीटरचे अंतर आणि ३८०० मीटरची चढाई करत भारतातील अल्ट्रा धावपट्टुंमध्ये सर्वोच्च स्थान मिळवले आहे.
एसआरटीएल अल्ट्रा मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन अध्यक्ष दिग्विजय जेधे, विश्वस्त अनिल पवार, महेश मालुसरे, मंदार मते, मारूती गोळे, अमर धुमाळ, ऍड. राजेश सातपुते, हर्षद राव व टीम डब्ल्युजीआरएफ च्या ५०० स्वयंसेवकांनी यासाठी अथक परिश्रम केले. स्पर्धेचे उद्घाटन माजी सहाय्यक पोलीस आयुक्त भानुप्रताप बर्गे यांनी केले.

जागतिक वारसा असलेल्या पश्चिम घाटातील सह्याद्रीच्या डोंगर रांगेत श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाची साक्ष देत शेकडो वर्ष ताठ मानेने उभ्या असलेल्या “सिंहगड राजगड तोरणा लिंगाणा” या किल्यांवरून धावण्याची महाराष्ट्रातील पहिली आंतरराष्ट्रीय स्पर्धा आणि भारतातील सर्वोत्तम स्पर्धा म्हणजे एसआरटीएल अल्ट्रा ट्रेल मॅरेथॉन आहे. या स्पर्धेत तब्बल ६३ रनर्सने १०० किलोमीटरचे अंतर वेळेत पूर्ण केल्यामुळे केवळ ही स्पर्धा महाराष्ट्राच्याच नव्हे तर भारताच्या ट्रेल रनिंग विश्वाच्या शिरपेचात मानाचा तुरा ठरली आहे.

स्पर्धेत गोळेवाडी (डोणजे) ते सिंहगड ११ किमी, डोणजे-सिंहगड ते राजगड २५ किमी, डोणजे-तोरणा ५३ किमी आणि डोणजे ते लिंगाणा १०० किमी अशा चार अंतर श्रेणीमध्ये ही स्पर्धा आहे. वेस्टर्न घाट रनिंग फाउंडेशन हे इंटरनॅशनल ट्रेल रनिंग असोसियेशनची (इट्रा) सदस्य आहे. एसआरटीएल ही स्पर्धा वेळेत पुर्ण करणारया स्पर्धकांना फ्रांस मधील UTMB पात्रतेसाठी अवश्यक गूण मिळतात. सिंहगडाच्या पायथा गोळेवाडी येथे पहाटे सहा वाजता छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयघोषात सुरू झाली. वेल्ह्यातील तोरणा विद्यालयात सांगता झाली. पर्यावरण रक्षण व गडकोट संवर्धनाचा संदेश देणारी स्पर्धा छत्रपती शिवाजी महाराजांना समर्पित केली आहे.

एसआरटीएल स्पर्धेच्या पाच वर्षांच्या यशस्वी परंपरेला साजेल अशीच या वर्षीची एसआरटीएल 100K ही स्पर्धा वेस्टर्न घाट्स रनिंग फाउंडेशनने यशस्वी केली. श्री छत्रपती शिवाजी महाराज आणि सह्याद्रीतील गडकोटांच्या गौरवशाली ऐतिहासिक सुवर्णक्षणांची आठवण करून देणाऱ्या आणि अतिशय चित्तथरारक व रोमांचकारी असलेल्या एसआरटीएल स्पर्धेसाठी जगभरातून आलेल्या १००० रनर्सच्या स्वागताची आणि सुरक्षिततेची जय्यत तयारी फाउंडेशनच्या सुमारे ५०० स्वयंसेवकांनी केली होती.

महाराष्ट्र राज्य पर्यटन विभाग, राज्य पूरातत्त्व विभाग, पुणे वन विभाग, महाराष्ट्र पोलिस दल, महाराष्ट्र शासन यांच्या विशेष परवानगीने मान्यता मिळाली. तसेच पुणे जिल्हा शिक्षण मंडळ, बिव्हीजी ग्रूप, सिंहगड ग्रूप ऑफ इंस्टिट्युट्स, व या मार्गावरील ग्रामपंचायतींचे व ग्रामस्थांचे विशेष सहकार्य लाभले.

• सिंहगड-राजगड-तोरणा-लिंगाणा – एसआरटीएल १०० कि.मी. अंतर व ३८७० मी. चढाईमध्ये
पुरूष विजेता –
क्र. १ – हेमंत लिंबू – ११:४१:२१
क्र. २ – सोम बहादूर थामी – ११:५७:००
क्र. ३ – देव चौधरी – १४:१४:५७

महिला विजेता –
क्र. १ – चंद्रभागा संतोश कचरे – १९:३७:३५
क्र. २ – यामिनी कोठारी – २०:०५:५१
क्र. ३. – तृप्ती काटकर चव्हाण – २०:०९:५६

• सिंहगड-राजगड-तोरणा – ५३ कि. मी. व २३२० मीटर चढाईमध्ये
पुरूष विजेता –
क्र. १ – विशाल राजभर – ६:५७:५५
क्र. २ – राकेश पाटील – ७:४३:००
क्र. ३ – सूरज यादव – ८:१६:४४

महिला विजेता –
क्र. १ – शिल्पा फडके – १०:१५:५४
क्र. २ – स्नेहल गोडांबे – १०:३२:३४
क्र. ३. – सुविधा कडलग – १०:३८:१८

• सिंहगड-राजगड – २५ कि. मी. व ११०० मीटर चढाईमध्ये
पुरूष विजेता –
क्र. १ – इनेश वासवा – २:१९:५३
क्र. २ – कैलास कोकरे – २:३९:२९
क्र. ३ – सार्थ साबळे – २:५८:०३

महिला विजेता –
क्र. १ – हेमा आवळे – ३:५७:२४
क्र. २ – दिपाली देवराये – ४:०४:०९
क्र. ३. – पल्लवी हडावले – ४:१४:४६

• सिंहगड हाफ व्हर्टीकल कि.मी. – ११ कि. मी. व ७०० मीटर चढाईमध्ये
पुरूष विजेता –
क्र. १ – भागवत धुमाळ – १:२६:२८
क्र. २ – तनय कचरे – १:२९:०३
क्र. ३ – सिद्धार्थ लोखंडे – १:३६:४६

महिला विजेता –
क्र. १ – वीणा तडसरे – १:५०:१८
क्र. २ – कविता मोरे – १:५६:२०
क्र. ३. – अनुष्का धोका – २:१०:०२

जम्मू-काश्मिरातून 370 हटवण्याचा निर्णय कायम:सुप्रीम कोर्टाने म्हटले- कलम 370 अस्थायी होते, राज्यात सप्टेंबर 2024 पर्यंत निवडणुका घेण्याचे आदेश

0

नवी दिल्ली-जम्मू-काश्मीरमधून कलम 370 हटवण्याचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने मान्य केला आहे. जम्मू-काश्मीरमधून कलम 370 हटवण्याचा अधिकार राष्ट्रपतींकडे आहे. आता इतक्या वर्षांनंतर कलम 370 हटवण्याच्या निर्णयाच्या वैधतेवर चर्चा करणे योग्य नाही, असा सर्वोच्च न्यायालयाने निकाल देताना म्हटले आहे. त्यामुळे जम्मू-काश्मीरमधून कलम 370 हटवण्याचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने कायम ठेवला आहे. राज्यातून कलम 370 हटवण्यासाठी विधानसभेच्या शिफारशीची गरज नाही, असेही सरन्यायाधिशांनी निकाल वाचताना म्हटलं आहे. यासोबतच ही कायमस्वरूपी तरतूद असल्याचे सांगणाऱ्या याचिकाही न्यायालयाने फेटाळून लावल्या आहेत.

. सर्वोच्च न्यायालयाच्या 5 न्यायाधीशांच्या घटनापीठाने सोमवारी सांगितले – कलम 370 ही तात्पुरती तरतूद होती. जम्मू-काश्मीर हा भारताचा अविभाज्य भाग असल्याचे घटनेच्या कलम 1 आणि 370 वरून स्पष्ट होते. भारतीय राज्यघटनेतील सर्व तरतुदी तेथे लागू करता येतील.

केंद्राने 5 ऑगस्ट 2019 रोजी जम्मू-काश्मीरमधून कलम 370 हटवले होते. 4 वर्षे, 4 महिने आणि 6 दिवसांनंतर आलेल्या निर्णयात न्यायालयाने म्हटले आहे की, ‘आम्ही कलम 370 रद्द करण्याचा राष्ट्रपतींचा आदेश वैध मानतो. लडाखला केंद्रशासित प्रदेश बनवण्याच्या निर्णयाची वैधताही आम्ही कायम ठेवतो. यासोबतच सुप्रीम कोर्टाने राज्यात 30 सप्टेंबर 2024 पर्यंत विधानसभा निवडणुका घेण्याचे आदेश दिले आहेत.

केंद्राने 5 ऑगस्ट 2019 रोजी कलम 370 हटवले, त्याविरोधात 23 याचिका दाखल झाल्या
मोदी सरकारने आपल्या दुसऱ्या कार्यकाळात 5 ऑगस्ट 2019 रोजी कलम 370 रद्द केले होते. तसेच, राज्याचे जम्मू-काश्मीर आणि लडाख असे दोन भाग करण्यात आले. याविरोधात सर्वोच्च न्यायालयात एकूण 23 याचिका दाखल करण्यात आल्या होत्या. 5 न्यायाधीशांच्या घटनापीठाने सर्व याचिकांवर एकत्रित सुनावणी केली.

घटनापीठात मुख्य न्यायमूर्ती डीवाय चंद्रचूड, न्यायमूर्ती बीआर गवई, न्यायमूर्ती सूर्यकांत, न्यायमूर्ती संजय किशन कौल आणि न्यायमूर्ती संजीव खन्ना यांचा समावेश होता. सलग 16 दिवस चाललेली खंडपीठासमोरची सुनावणी 5 सप्टेंबर रोजी संपली. त्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने निर्णय राखून ठेवला होता. 96 दिवसांच्या सुनावणीनंतर सुप्रीम कोर्टाने या प्रकरणावर निर्णय दिला.

CJI म्हणाले की, केंद्राने घेतलेल्या प्रत्येक निर्णयाला न्यायालयात आव्हान देता येणार नाही. असे केल्याने अराजकता पसरेल. केंद्राच्या निर्णयामुळे कोणत्याही प्रकारची अडचण निर्माण होत असेल तरच त्याला आव्हान दिले जाऊ शकते. सर्वोच्च न्यायालयाने याचिकाकर्त्यांचा युक्तिवाद फेटाळून लावला की राष्ट्रपती राजवटीत केंद्र कोणताही निर्णय घेऊ शकत नाही ज्यामध्ये बदल करता येणार नाही.

कलम 356 नंतर केंद्र संसदेमार्फतच कायदे करू शकते, असे म्हणणे योग्य ठरणार नाही, असेही सरन्यायाधीश म्हणाले. CJI म्हणाले की, या निर्णयात 3 न्यायाधीशांचे निकाल आहेत. एक निर्णय सरन्यायाधीश, न्यायमूर्ती गवई आणि न्यायमूर्ती सूर्यकांत यांचा आहे. दुसरा निर्णय न्यायमूर्ती कौल यांचा आहे. न्यायमूर्ती खन्ना दोन्ही निर्णयांशी सहमत आहेत.

आता POK ताब्यात घेण्याचेही प्रयत्न होतील, CM शिंदेंनी केले कलम 370 वरील निर्णयाचे स्वागत

सर्वोच्च न्यायालयाच्या कलम 370 वरील निर्णयामुळे एका ऐतिहासिक पर्वाला सुरुवात झाली आहे. आता तिथे मोकळ्या वातावरणात निवडणुका होतील. विशेषतः केंद्राने पाकव्याप्त काश्मीरमध्ये निवडणूक घेण्याचे सूतोवाच केल्यामुळे तो प्रदेशही लवकरच भारतात सामील करवून घेण्याच्या दृष्टीने प्रयत्न होतील, अशा शब्दांत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सुप्रीम कोर्टाच्या कलम 370 वरील निर्णयाचे स्वागत केले आहे.

जम्मू काश्मीरला विशेष राज्याचा दर्जा देणारे कलम 370 रद्दबातल करण्याचा केंद्राचा निर्णय कायदेशीरदृष्ट्या योग्य होता, असा ऐतिहासिक निर्वाळा आज सुप्रीम कोर्टाने दिला. कोर्टाच्या या निर्णयानंतर देशभरातून विविध प्रतिक्रिया येत आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही यावर भाष्य केले आहे.

काय म्हणाले एकनाथ शिंदे?

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यासंबंधी आपल्या एका ट्विटमध्ये म्हणाले की, सुप्रीम कोर्टाच्या आजच्या निर्णयामुळे एका ऐतिहासिक पर्वाचा प्रारंभ होत आहे. देशाची राजकीय एकात्मता राखणारे पाऊल पंतप्रधान नरेंद्र मोदी जी यांनी उचलले होते, ते कोर्टाने आज वैध ठरवले त्या बद्दल मी पंतप्रधान मोदी व गृहमंत्री अमित शहा यांचे अभिनंदन करतो.

जम्मू काश्मीर मधील दहशतवाद संपून ते देशाच्या मुख्य प्रवाहात सामील होण्याचा मार्ग आता मोकळा झाला आहे. तिथे आता मुक्त वातावरणात निवडणूक होईल. मला एक दिवस पंतप्रधान करा, मी काश्मीरवर लादलेले कलम 370 रद्द करतो, असे हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे म्हणत. मोदींनी हिंमतीने तो निर्णय घेऊन बाळासाहेबांची इच्छा पूर्ण केली, असे शिंदे म्हणाले.

काही विघ्नसंतोषी मंडळी काश्मीरला पुन्हा वेगळे पाडू इच्छितात. मात्र त्यांचे हे प्रयत्न सर्वोच्च न्यायालयाने हाणून पाडले आहेत. पाकव्याप्त काश्मीरमध्ये निवडणूक घेण्याचे सुतोवाच केंद्राने केले आहेच. तो प्रदेश भारतात सामील करुन घेण्याच्या दृष्टीनेही आता प्रयत्न होतील हे नक्की, असे शिंदे आपल्या ट्विटमध्ये म्हणाले.

आरती पाटील, लता, तुलिका उपांत्य फेरीत

0
  • खेलो इंडिया पॅरा बॅडमिंटन स्पर्धेला सुरुवात
  • महाराष्ट्राच्या बॅडमिंटनपटूंची शानदार कामगिरी
  • महिला खेळाडू उपांत्य फेरीत
  • निलेश गायकवाडची विजयी सलामी

दिल्ली, विशेष प्रतिनिधी:
क्रीडा मंत्रालय आणि साईचा संयुक्त उपक्रमाचा भाग असलेल्या खेलो इंडिया पॅरा स्पर्धेत महाराष्ट्राच्या बॅडमिंटनपटूंनी शानदार सुरुवात केली. महाराष्ट्राच्या आरती पाटील, लता उर्मेकर आणि तुलिका जाधव या तीन महिला खेळाडूंनी आपापल्या विभागातून उपांत्य पेरीत प्रवेश केला. पुरुष विभागात संभाजीनगरच्या निलेश गायकवाडने विजयी सलामी दिली. मात्र, मार्कला सलामीला पराभवाचा सामना करावा लागला.
कोल्हापूरच्या आरती पाटीलने महिला एकेरीच्या उपांत्यपूर्व फेरीत प्रतिस्पर्धी सरुमथीचा अगदीच सहज पराभव केला. सरळ दोन गेममध्ये आरतीने सरुमथीचे आव्हान २२-२०, २१-९ असे परतवून लावले. तुलिकाला देखिल विजयासाठी फार काही करावे लागले नाही. तुलिकाने पौर्णिमा पांडेला २१-४, २१-६ असे सहज पराभूत केले. लताची कामगिरी काही फार वेगळी नव्हती. तिलाही प्रतिस्पर्धी नलिनीकडून आव्हानच मिळाले नाही. संपूर्ण गेममध्ये लताने केवळ सात गुण गमावले. लताने ही लढत २१-२, २१-५ अशी जिंकली. रुहीला पुढे चाल मिळाल्यामुळे तिची वाटचाल विनासायास चालू राहिली.

पुरुष एकेरीत निलेशला मात्र विजयासाठी संघर्ष करावा लागला. पहिल्या फेरीत त्याने कार्तिक क्रिष्णनला २१-११, १९-२१, २१-११ असे तीन गेमच्या संघर्षपूर्ण लढतीत पराभूत केली. तमिळनाडूच्या सुदर्शनने महाराष्ट्राच्या मार्कचा पराभव केला.

विजयाने किताबाचा दावा मजबूत
आम्हाला स्पर्धेत कडवे आव्हान मिळेल असे वाटले होते. पण, प्रत्यक्षात आम्ही सहज विजय मिळविले. यामुळे आमच्यात आत्मविश्वास निर्माण झाला असून, आता पदकाची खात्री निश्चितपणे देऊ शकतो. प्रतिस्पर्ध्यांना आम्ही संधी मिळू दिली नाही. अचूक नियोजनामुळे आम्हाला ही कामगिरी शक्य झाली. आता सोनेरी यशासाठी आम्ही सर्वस्व पणाला लावून असे आरती पाटीलने सांगितले.

माधव भांडारी यांच्या ‘ दृष्टिकोन ‘ पुस्तकाचे प्रकाशन

पुणे-समज (परसेप्शन) आणि वास्तव (रियालिटी) यांच्यातील लढाईत समाजाच्या मनातील आणि बुद्धीचा अंधार दूर करताना विषारी अन्न आणि विषारी विचार ही 21व्या शतकातील दोन आव्हाने आहेत, ती पेलण्यासाठी भारतीयत्वाचा विचार महत्त्वाचा असल्याचे मत राज्याचे सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केले.

माधव भांडारी यांनी लिहिलेल्या आणि उत्कर्ष प्रकाशनाने प्रकाशित केलेल्या ‘ दृष्टिकोन ‘ या राजकीय वैचारिक लेखकांच्या पुस्तकाचे प्रकाशन सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी उच्च शिक्षण व तंत्रज्ञान मंत्री चंद्रकांत दादा पाटील भाजपचे मुख्य प्रदेश प्रवक्ते केशव उपाध्ये, प्रकाशक सुधाकर जोशी, मिलिंद एकबोटे यांची उपस्थिती होती.

मुनगंटीवार म्हणाले, जगाने आपल्या देशाची सहिष्णुता आणि मातीचा वैचारिक गुणधर्म ज्यात त्याग आणि सेवेची किंमत आहे आणि स्वामी पेक्षा सेवकाची पूजा केली जाते तो स्वीकारला आहे. वैचारिक भूमिकेतून हा विचार जगभर पसरला आहे. भारतीयत्वाचा हा विचार आयात करण्याची वेळ आपल्यावर येऊ नये.

मुनगंटीवार पुढे म्हणाले माधवराव मनाचा वैचारिक विस्तार करण्यासाठी भाजपच्या पाठीशी उभे राहिले. मनाचा विचार पक्का असला की कितीही संकटे येऊ दे माणूस निश्चल राहतो, हे माधवरावांचे वैशिष्ट्य आहे. त्यांनी स्पष्टपणे विचार मांडले, पक्षासाठी समर्पित भावनेने काम केले. भाजपच्या विस्तारात कार्यकर्त्यांप्रमाणे वैचारिक भूमिका महत्त्वाची ठरली.

पाटील म्हणाले, माधवरावांनी घडलेल्या घटनांवर वेळोवेळी पक्षाची भूमिका मांडली. ती भूमिका लोकांच्या पर्यंत खाली पोहोचविली. त्यातून पक्षाची भूमिका किंवा वैचारिक मते ठरत गेली.

केशव उपाध्ये यांनी मनोगत व्यक्त केले. जोशी यांनी स्वागत केले, माधव भांडारी यांनी प्रास्ताविक केले. हिमानी भांडारी यांनी सूत्रसंचालन आणि आभार प्रदर्शन केले.

भारतीय तत्वज्ञान जगातील सर्वश्रेष्ठ- हभप सद्गुरू शिवलाल महाराज

पुणे, दि.१० डिसेंबर :” भारतीय तत्वज्ञान हे जगातील सर्वश्रेष्ठ आहे. संपूर्ण मानवजातीचे कल्याण साधण्यासाठी ज्ञानेश्वरीला आपल्या जीवनात उतरावे. ज्ञानेश्वरीच्या माध्यमातूनच विश्वशांती निर्माण करता येईल.”असे विचार हभप सद्गुरू शिवलाल महाराज यांनी व्यक्त केले.
विश्वशांती केंद्र (आळंदी), माईर्स एमआयटी, पुणे, भारत व श्रीक्षेत्र आळंदी-देहू परिसर विकास समिती यांच्या संयुक्त विद्यमाने ‘श्रीसंत ज्ञानेश्वर-तुकाराम ज्ञानतीर्थ’,विश्वरूप दर्शन मंच, श्रीक्षेत्र आळंदी येथे संत शिरोमणी तत्त्वज्ञ श्री ज्ञानेश्वर माऊली यांच्या ७२७ व्या संजीवन समाधी सोहळ्यानिमित्ताने लोकप्रबोधनपर आयोजित करण्यात आले. यावेळी ते बोलत होते.
या प्रसंगी हभप सद्गुरू महाराज शिवलाल महाराज यांनी आपले संपूर्ण आयुष्य वारकरी संप्रदायासाठी समर्पित केले आहे. ते आज १०१ वर्षांचे आहे. त्यानिमित्ताने त्यांचा ‘समर्पित जीवन गौरव पुरस्काने’ सन्मान करण्यात आला. माजी खासदार श्रीनिवास पाटील व विश्वधर्मी प्रा.डॉ. विश्वनाथ दा. कराड यांच्या हस्ते त्यांना मानपत्र देण्यात आले.
अध्यक्षस्थानी विश्वशांती केंद्र (आळंदी), माईर्स एमआयटीचे संस्थापक अध्यक्ष विश्वधर्मी प्रा.डॉ. विश्वनाथ दा. कराड हे होते.
यावेळी हशप बापूसाहेब मोरे देहूकर, तुळीराम दा. कराड, उषा विश्वनाथ कराड, पं.वसन्तराव गाडगीळ, डॉ. मंगेश तु. कराड, डॉ. एस.एन.पठाण, डॉ. मिलिंद पांडे, योगगुरू मारूती पाडेकर गुरूजी, डॉ. सुदाम महाराज पानेगावकर व विष्णू भिसे उपस्थित होते.
हभप सद्गुरू महाराज शिवलाल महाराज म्हणाले,” वारकरी हा चिंतन भजन करणारे असतात. त्यामुळे त्यांनी कधीही व्यसनाच्या आहारी जाऊ नये, कोणावर ही अत्यचार करू नये आणि सतत आपल्यातील दोष दूर करण्याचा प्रयत्न करत राहावा. रामकृष्ण हरी या नावात अनंत शक्ती आहे. त्यामुळे हे नाव सतत मुखात असावे. भक्तीच्या मार्गावर चालतांना सतत संतुष्ट रहावे. ईश्वराने आम्हाला समाजसेवेसाठी निवडले आहे हे सतत ध्यानात ठेवावे.”
श्रीनिवास पाटील म्हणाले, “ज्ञानेश्वरांनी आम्हाला घडवल आहे. त्यांच्या नामस्मरणात अफाट शक्ती आहे. आज डॉ. कराड यांनी इंद्रायणीच्या नदीवर जो कायापालट केला आहे ते माऊलीच्या आशीर्वादानेच. यापुढे ही त्यांच्याय मार्गदर्शनात या घाटवर अनेक चांगल्या गोष्टी उदयाय येईल. ”
डॉ. विश्वनाथ दा. कराड म्हणाले, १९८७ साली घाटाच्या कामाची सुरूवात झाली. या घाटामुळे वारकर्‍यांसाठी योग्य सुविधा निर्माण झाल्या आहेत. विनम्रता, श्रध्दा, भक्ती आणि कर्मयोगामुळे आज हे सर्व काही घडले आहे. संपूर्ण जगात ज्ञानेश्वरी पोहचविण्याच्या दिशेने सर्वांना कार्य करावयाचे आहे.
यावेळी सामाजिक सलोखा या विषयावर संत साहित्याचे अभ्यासक डॉ. रफीक सय्यद यांनी प्रवचन केले. त्यांनी अनेक उदाहरणाच्या माध्यमातून हिंदू मुस्लीम एक असल्याचे सांगितले. भक्ती मार्गावर चालल्याने सामाजिक सलोखा वृध्दिगत होतो. वारीमध्ये सुद्धा कित्येक मुस्लिम बांधव वारी करतात आणि पांडूरंगाच्या चरणी लीन होतात. आज समाजात सलोख्याचे वातावरण जपूण ते पुढील पिढी पर्यंत पोहचविणे गरजेचे आहे.
त्यानंतर पं. वसंन्तराव गाडगीळ यांनी विचार व्यक्त केले.
नंतर इंद्रायणी मातेची आरती झाली.
हभप शालीकराम खंदारे यांनी सूत्रसंचालन व महेश महाराज नलावडे यांनी आभार मानले.

बोलीभाषा एकांकिका स्पर्धा जाहीर५ ते ७ जानेवारीला प्राथमिक फेरी

मुंबई – मराठी नाट्यवर्तुळातल्या महत्वाच्या आणि विशेष एकांकिका स्पर्धांपैकी एक असलेल्या सुप्रिया प्रॉडक्शन्स आणि व्हिजन व्हॉईस एन ऍक्ट आयोजित ‘बोलीभाषा एकांकिका स्पर्धे’च्या प्राथमिक फेरीचा बिगुल वाजला असून ५ ते ७ जानेवारी २०२४ या कालावधीत या स्पर्धेची प्राथमिक फेरी तर अंतिम फेरी १२ जानेवारीला दादरमध्ये होणार आहे.

प्रसिध्द नाटककार गंगाराम गवाणकर यांच्या संकल्पनेला प्रसिध्द नाट्यनिर्माते गोविंद चव्हाण यांनी मूर्त रुप दिले आणि २०१६ पासून ही स्पर्धा सुरु झाली. दोन वर्षांच्या कोविड काळानंतर तिकीट बुकींगने हाऊसफुल्ल झालेली ही पहिली एकांकिका स्पर्धा होती. गेल्या सहा वर्षांमध्ये महाराष्ट्रभरातील वेगवेगळ्या बोलींमधून २४९ संघ या स्पर्धेमध्ये सहभागी झाले आहेत.

रोख रक्कम, सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र असे पारितोषिकांचे स्वरुप असून प्रथम चारसांघिक विजेत्यांसाठी अनुक्रमे २५०००, २००००,१५००० व ५००० अशी पारितोषिके आहेत. प्रथम पारितोषिक विजेत्या संघाला नटश्रेष्ठ गोपीनाथ सावकार पुरस्काराने गौरवण्यात येणार असून हे पारितोषिक प्रख्यात अभिनेते अशोक सराफ व त्यांचे बंधू सुभाष सराफ यांनी पुरस्कृत केले आहे. अन्य पारितोषिकांमध्ये लेखन, दिग्दर्शन, नेपथ्य, प्रकाश, पार्श्वसंगीत, रंगभूषा, वेशभूषा, विनोदी लेखन, विनोदी अभिनय, वाचिक अभिनय, व्यवस्थापन या सर्वच घटकांसाठी पारितोषिके आहेत.

५ ते ७ जानेवारी या कालावधीत तीन दिवस कुर्ला-नेहरुनगर येथील प्रबोधन प्रयोग घरामध्ये या स्पर्धेची प्राथमिक फेरी होईल. स्पर्धेचे नियम व प्रवेश अर्ज www.supriyaproduction.com या वेबसाईटवर उपलब्ध असून अधिक माहितीसाठी ९९३०४६६९२४ या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे. या स्पर्धेत अधिकाधिक संघांनी सहभागी होण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे.

सिगारेटची तस्करी संशयास्पद : 14.67 कोटी रुपये किमतीच्या 86.30 लाख अघोषित सिगारेटच्या कांड्या केल्या जप्त

0

मुंबई-महसूल गुप्तचर संचालनालयाच्या मुंबई विभागाने, मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे, 4 डिसेंबर रोजी मुंबईच्या न्हावा-शेवा बंदरावरच्या कंटेनर मालवाहू स्टेशनमधील 40 फुटाचा एक कंटेनर जप्त केला. 5 डिसेंबर रोजी या कंटेनरची तपासणी केली असता या मालात सिगारेटच्या अघोषित (लपवलेल्या) कांड्या असल्याचे आढळले. कागदपत्रात जो माल सांगण्यात आला होता, त्याच्या ऐवजी या कंटेनरमध्ये, गच्च भरलेल्या सिगारेट्स सापडल्या. या सिगारेट लपवून त्याचा चोरटा व्यापार करण्याची शक्यता होती, मात्र डीआरआयच्या अधिकाऱ्यांनी वेळीच केलेल्या कारवाईमुळे हा गुन्हेगारी कट उधळला गेला.

धूम्रपान शरीराला हानिकारक असल्यामुळे, आणि पर्यायाने देशाच्या आरोग्यविषयक पायाभूत सुविधांवर त्यामुळे येणाऱ्या भारामुळे, सरकार अशा हानिकारक वस्तूंवर उच्च दर्जाचा कर लावते. हा कर आणि तंबाखूजन्य पदार्थांवरील आयातीशी संबंधित नियमने चुकवण्यासाठी, भ्रष्ट लोक अनेकदा, अशा वस्तूंची तस्करी किंवा काळा बाजार करतात. या छाप्यात, एकूण 14.67 कोटी रुपये मूल्याच्या 86,30,000 सिगारेटस, सीमाशुल्क कायदा, 1962 च्या तरतुदींअंतर्गत जप्त करण्यात आल्या. या प्रकरणी अधिक तपास जारी आहे.

राजनाथ सिंह यांनी महात्मा गांधी यांच्या दहा फूट उंच पुतळ्याचे केले अनावरण

दिल्लीमध्ये  राजघाटा जवळ गांधी दर्शन येथे दहा डिसेंबर 2023 रोजी संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी  महात्मा गांधी यांच्या दहा फूट उंच पुतळ्याचे अनावरण केले. आपल्या संबोधनात संरक्षण मंत्री यांनी सांगितले की भारताला परकीय सत्तेपासून स्वातंत्र्य मिळवून देण्यात आणि समाजातल्या दुर्बल घटकांच्या उत्थानाचे कार्य करत त्यांना एक सन्मानाचे आयुष्य देण्यात मध्यवर्ती भूमिका बजावणाऱ्या राष्ट्रपित्यासाठी ही समर्पक आदरांजली ठरेल.

“गांधीजी हे सशक्त, समृद्ध आणि स्वच्छ भारताची कल्पना मांडणारे महान स्वातंत्र्यसेनानी होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली आपलं सरकार हे राष्ट्रपित्यांच्या पावलावर पाऊल ठेवून मार्गक्रमण करत आहे. महात्मा गांधी  यांनी कायमच प्रत्येक भारतीयाच्या हृदयात स्थान मिळवले होते, तसेच मार्टिन ल्युथर किंग जूनियर आणि नेल्सन मंडेला यांच्यासारख्या महान नेत्यांनी त्यांच्या देशातल्या जनतेच्या उन्नतीसाठी गांधीजी यांच्या कल्पना आणि दृष्टिकोनातून प्रेरणा घेतली होती असे सिंह यांनी निक्षून सांगितले.

देशभक्ती आणि वचनबद्धतेच्या माध्यमातून उपेक्षित घटकांच्या उत्थानासाठी कार्य केलेल्या महात्मा गांधी, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि पंडित दीनदयाल उपाध्याय यांच्यासारख्या क्रांतिकारकांचे संरक्षण मंत्र्यांनी स्मरण केले.  हे महान नेते आपल्या सरकारसाठी दीपस्तंभाची भूमिका बजावत असल्याचे ते म्हणाले. शांतता, सामाजिक सलोखा, एकता आणि विकासाधारित बदल घडवणे ही आपली विचारसरणी असल्याचे त्यांनी सांगितले.

सरकारचे उद्दिष्ट हे कायमच योजनाबद्ध प्रगतीचे राहिले असून याच्या परिणामस्वरूप भारत हा जगातली पाचवी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनला आहे हे राजनाथ सिंह यांनी अधोरेखित केले. गांधीजी हे केवळ स्वातंत्र्य सेनानी नव्हते तर एक अर्थतज्ञ होते ज्यांनी जग हे प्रत्येकाच्या गरजेसाठी पुरेसे पण प्रत्येकाची लालसा शमवण्यासाठी अपूरे असल्याचे मानले असे सिंह यांनी सांगितले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकार पुरुष सहकाऱ्यांच्या बरोबरीनेचं महिलांचे सबलीकरण करत असून राष्ट्र उभारणीसाठी त्यांचे  योगदान सुनिश्चित करत असल्याचे राजनाथ सिंह यांनी सांगितले.

लोकांची सेवा प्रामाणिकपणे आणि समर्पित भावनेने करून देशाला नवीन उंची गाठून देण्याच्या सरकारच्या वचनबद्धतेचा संरक्षण मंत्र्यांनी पुनरुच्चार केला. हीच महात्मा गांधी यांना खरी आदरांजली ठरेल असे ते म्हणाले.

अभिनेत्री सोनाली बेंद्रे, सोनाली कुलकर्णी, गायिका फाल्गुनी पाठक यांच्यासह अनेक नामवंत आणि 5 हजार हुन अधिक महिलांनी नोंदवला ‘वन भारत सारी वॉकेथॉन’ मध्ये सहभाग

0

मुंबई-भारतातील हातमाग साडी संस्कृतीला चालना मिळावी या उद्देशाने केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्रालयाच्या वतीने आज रविवारी 10 डिसेंबर 2023 रोजी सकाळी मुंबई येथील एमएमआरडीए ग्राउंड, वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्स, वांद्रे पूर्व, येथे ‘वन भारत सारी वॉकेथॉन’ चे यशस्वी आयोजन करण्यात आले . केंद्रीय वस्त्रोद्योग, वाणिज्य आणि उद्योगमंत्री पियुष गोयल,केंद्रीय वस्त्रोद्योग राज्यमंत्री दर्शना जरदोश आणि खासदार पूनम महाजन यांनी या वॉकेथॉनला ’हिरवा झेंडा दाखवून सुरुवात केली. महिलांनी त्यांची शक्ती दाखवण्याची ही वेळ आहे, हीच वेळ आहे आणि हीच ती योग्य वेळ आहे असे सांगत केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्री पियुष गोयल यांनी या उपक्रमाला शुभेच्छा दिल्या आणि जमलेल्या सर्व महिलांचे यात सहभागी झाल्याबद्दल आभार मानले. 

अशा उपक्रमांच्या आयोजनामुळे “वोकल फॉर लोकल”या संकल्पनेला समर्थन मिळते त्याचबरोबर महिलांमध्ये आरोग्यविषयक जागरुकता वाढवून आणि त्यांना निरोगी जीवन जगण्यास प्रवृत्त करण्यासाठी मदत मिळते असं वस्त्रोद्योग राज्यमंत्री दर्शना जरदोश यावेळी म्हणाल्या. 

भारताची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईत होणाऱ्या या कार्यक्रमाचे विशेष महत्त्व आहे, जिथे स्त्रीत्वाची भावना स्त्रीच्या अस्तित्वाच्या प्रत्येक पैलूमध्ये खोलवर रुजलेली आहे. विविध क्षेत्रातल्या महिलांचा, त्यांच्या विशिष्ट प्रादेशिक शैलीचे प्रतिनिधित्व करणाऱ्या साड्या घालून इथे उपस्थित आहेत त्यातून , विविधतेचे सुंदर चित्र तयार झाले आहे आणि ते ‘एक भारत श्रेष्ठ भारत’ या भावनेला समर्थन देणारे आहे असे जरदोश यांनी सांगितले.

आजच्या या उपक्रमाने केवळ मुंबईच्या चैतन्यपूर्ण अभिव्यक्तीला प्रतिध्वनित केले नाही तर वॉकथॉनला साडीच्या वैशिष्ट्य पूर्ण सांस्कृतिक पैलूंने जोडले आहे असे या वॉकथॉनच्या एक आयोजक खासदार पूनम महाजन यांनी सांगितले. आर्थिक, सांस्कृतिक आणि प्रादेशिक घटकांना एकत्रित आणून, ‘वन भारत सारी वॉकेथॉन’ ने एक प्रभावी चित्र निर्माण केले आहे, ज्यामधून भारताचे वैशिष्ट्य असलेल्या विविधतेतील एकता देखील साजरी केली जात आहे आणि त्याचबरोबर हातमाग कारागिरीच्या चिरस्थायी वारशाला प्रोत्साहन मिळाले आहेअसे त्या म्हणाल्या.

सांस्कृतिक विविधता आणि सक्षमीकरणाच्या आजच्या उपक्रमात, अभिनेत्री सोनाली बेंद्रे, सोनाली कुलकर्णी, रूपा गांगुली, , गायिका फालगुनी पाठक डिझायनर अनिता डोंगरे,नीता लुल्ला,शायना एन सी यांच्यासह , दूरचित्रवाणीवरील तारका, क्रीडा क्षेत्रातील उल्लेखनीय महिला, उद्योग ,सामाजिक अशा विविध क क्षेत्रातील प्रभावशाली महिलासह 5000 हून अधिक महिला पारंपारिक हातमाग साड्यांबरोबर आधुनिक प्रकारच्या साड्या अभिनव पद्धतीने नेसुन या वॉकेथॉनमध्ये उत्साहात सहभागी झाल्या होत्या.

भारतातील सर्वात मोठी ‘वन भारत सारी वॉकेथॉन’ ठरलेल्या या कार्यक्रमाचा उद्देश भारतातील हातमाग साडी संस्कृतीला प्रोत्साहन देण्याबरोबरच देशभरातील महिलांच्या साड्या परिधान करण्याच्या विशिष्ट पद्धतींचा परिचय इतरांना करून देणे, भारताची “विविधतेतील एकता असलेला देश’ ही प्रतिमा अधोरेखित करणे हा आहे. यापूर्वी सुरतमध्ये अशा साडी वॉकेथॉनचे आयोजन करण्यात आले होते.

हातमाग क्षेत्र:

हातमाग क्षेत्र हे आपल्या देशाच्या समृद्ध आणि वैविध्यपूर्ण सांस्कृतिक वारशाचे प्रतीक आहे, शिवाय मोठ्या संख्येने कारागिरांना, विशेष करून महिलांना रोजगार देणारे हे प्रमुख क्षेत्र आहे. भारतातील हातमाग क्षेत्रात 35 लाखांहून अधिक लोक गुंतलेले आहेत. हातमागावर साडी विणण्याच्या कलेशी पारंपारिक मूल्ये जोडलेली आहेत आणि प्रत्येक प्रदेशात वैशिष्ट्यपूर्ण साड्यांचे प्रकार प्रचलित आहेत.

पैठणी, कोटपाड, कोटा डोरिया, टंगाईल, पोचमपल्ली, कांचीपुरम, थिरुभुवनम, जामदानी, संतीपुरी, चंदेरी, माहेश्वरी, पटोला, मोइरांगफी, बनारसी ब्रोकेड, तनछोई, भागलपुरी सिल्क, बावन बुटी, पश्मिना साडी असे काही साड्यांचे प्रकार आहेत जे आपल्या कला, विणकाम, डिझाईन्स आणि पारंपारिक आकृतिबंधांसह जगभराला आकर्षित करतात.

 तळवडे आग दुर्घटनेतील मृतांचा आकडा नऊ

पुणे-तळवडे येथे झालेल्या आग दुर्घटनेत जखमी झालेल्या(Talavade )कामगार महिलांपैकी आणखी एका महिलेचा उपचारादरम्यान रविवारी (दि. 10) मृत्यू झाला. घटनेच्या दिवशी (शुक्रवारी) सहा कामगार महिला दगावल्या. त्यानंतर शनिवारी दोन तर रविवारी एका महिलेचा दुर्दैवी अंत झाला आहे.

ज्योतिबा नगर, तळवडे येथे प्लॉट नंबर 252 मध्ये केकवर (Talavade )लावल्या जाणाऱ्या स्पार्कल्स बनवणाऱ्या कारखान्यात शुक्रवारी (दि. 8) दुपारी पावणे तीन वाजताच्या सुमारास स्फोट झाला. या स्फोटात सहा महिला कामगारांचा होरपळून जागीच मृत्यू झाला. तर दहाजण जखमी झाले. जखमींवर ससून रुग्णालयात उपचार केले जात आहेत.

संगीता देवेंद्र आबदार (वय 28), पुनम अभय मिश्रा (वय 36), लता भारत दंगेकर (वय 40), मंगल बाबासाहेब खरबडे (वय 45), राधा सयाजी गोधडे (वय 18), कमलादेवी सुरज प्रजापती (वय 65) यांचा जागीच मृत्यू झाला होता. तर दुसऱ्या दिवशी प्रतीक्षा अशोक तोरणे (वय 16), कविता गणेश राठोड (वय 40) यांचा मृत्यू झाला. तिसऱ्या दिवशी म्हणजेच रविवारी शिल्पा गणेश राठोड (वय 31) या महिलेची मृत्यूशी झुंज अपयशी ठरली.

अपेक्षा तोरणे (वय 26), रेणुका ताथोड, (वय 20), शरद सुतार (वय 45), कोमल चौरे (वय 25), राधा उर्फ सुमन यादव (वय 40), उषा पाडवे (वय 40) आणि प्रियंका यादव (वय 32) या सात जणांची मृत्यूची झुंज सुरु आहे.

मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्षामार्फत अवघ्या १७ महिन्यांमध्ये तब्बल १५६ कोटींपर्यंत अर्थसहाय्य

0

मुंबई दि. 10 : मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्षाने रुग्णसेवेत उत्कृष्ट कामगिरी करुन राज्यातील हजारो रुग्णांच्या जीवनात निरायम आरोग्याचा प्रकाश आणला आहे.या योजनेमुळे अनेक रुग्णांना अक्षरशः जीवनदान मिळत असल्याने ही योजना आता महाराष्ट्र राज्य सरकारची महत्वाकांक्षी योजना ठरत असल्याचे प्रतिपादन राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले आहे. गोरगरीब – गरजू रुग्णांना दुर्धर आणि महागड्या शस्त्रक्रियांसाठी मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षातून थेट अर्थसहाय्य केले जात आहे. या योजनेमुळे रुग्णांचे प्राण वाचत असल्याने मुख्यमंत्री कार्यालयात आलेला एकही रुग्ण हा मदतीविना वंचित राहता कामा नये याची दक्षता घेण्याचे आदेश मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी दिले आहेत.

आपल्या सातत्यपूर्ण कामगिरीचा आलेख कायम राखत या कक्षाने अवघ्या १७ महिन्यात १९ हजार पेक्षा अधिक गोरगरीब -गरजू रुग्णांना एकूण १५६ कोटी ६० लाख रुपयांची आर्थिक मदत वितरित केली आहे.

मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी मुख्यमंत्री पदाचा कार्यभार स्विकारताच महाविकास आघाडी सरकारच्या काळात बंद पडलेला मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्ष तात्काळ सुरू केला. मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्षाची मूळ संकल्पना मांडणाऱ्या मंगेश नरसिंह चिवटे यांची विशेष कार्य अधिकारी म्हणून नियुक्ती करून

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली मागील जुलै महिन्यात १७८ रुग्णांना ७६ लाखांची मदत देण्यात आली.ऑगस्ट महिन्यात २४४ रुग्णांना १ कोटी १ लाख, सप्टेंबर महिन्यात ३१९ रुग्णांना १ कोटी ८६ लाख, ऑक्टोबर महिन्यात २७६ रुग्णांना २ कोटी ३५ लाख, नोव्हेंबर महिन्यात ५२७ रुग्णांना ४ कोटी ५० लाख, डिसेंबर महिन्यात १०३१ रुग्णांना ८ कोटी ५२ लाख, जानेवारी २०२३ मध्ये १०३२ रुग्णांना ८ कोटी ९० लाख तर फेब्रुवारी २०२३ मध्ये १२७४ रुग्णांना १० कोटी ५९ लाख, मार्च २०२३ मध्ये १४६९ रुग्णांना ११ कोटी ९३ लाख, एप्रिल मध्ये ११९० रुग्णांना ९ कोटी ९१ लाख, मे मध्ये १३२९ रुग्णांना ११ कोटी २५ लाख, तर जून मध्ये १७२८ रुग्णांना १४ कोटी ६२ लाख, जुलै १४८८ रुग्णांना १२ कोटी ७२ लाख, ऑगस्ट मध्ये १५६७ रुग्णांना १३ कोटी १४ लाख, तर सप्टेंबर मध्ये विक्रमी १४०८ रुग्णांना ११ कोटी ७७ लक्ष रुपयांची वैद्यकीय मदत देण्यात आली आहे.तसेच मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता मदत मिळवण्यासाठी मंत्रालयात जाण्याची ही गरज नाही पूर्णपणे ऑनलाईन प्रोसेस करून वैद्यकीय मदत मिळणार असल्याचे कक्ष प्रमुख मंगेश चिवटे यांनी सांगितले. यासाठी 8650567567 या टोल फ्री क्रमांकावर कॉल करून थेट आपल्या मोबाईलवर अर्ज मिळविता येईल.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सूचनेनुसार मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी मध्ये विविध आजारांचा समावेश देखील करण्यात आला असल्याची माहिती यावेळी मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्ष प्रमुख मंगेश नरसिंह चिवटे यांनी दिली आहे.यामध्ये अँजिओप्लास्टी, बायपास सर्जरी ,  कर्करोगावरील शस्त्रक्रिया , केमोथेरपी,  डायलिसिस, जन्मतः मूकबधिर लहान मुलांच्यासाठी अत्यावश्यक असणारी कॉकलीयर  इनप्लांट शस्त्रक्रिया,सर्व प्रकारचे अवयव प्रत्यारोपण शस्त्रक्रिया,रस्ते अपघात ,विद्युत अपघात ,भाजलेले रुग्ण ,जन्मतः लहान मुलांच्या हृदयशस्त्रक्रिया आदींचा समावेश आहे.