मुंबई-महसूल गुप्तचर संचालनालयाच्या मुंबई विभागाने, मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे, 4 डिसेंबर रोजी मुंबईच्या न्हावा-शेवा बंदरावरच्या कंटेनर मालवाहू स्टेशनमधील 40 फुटाचा एक कंटेनर जप्त केला. 5 डिसेंबर रोजी या कंटेनरची तपासणी केली असता या मालात सिगारेटच्या अघोषित (लपवलेल्या) कांड्या असल्याचे आढळले. कागदपत्रात जो माल सांगण्यात आला होता, त्याच्या ऐवजी या कंटेनरमध्ये, गच्च भरलेल्या सिगारेट्स सापडल्या. या सिगारेट लपवून त्याचा चोरटा व्यापार करण्याची शक्यता होती, मात्र डीआरआयच्या अधिकाऱ्यांनी वेळीच केलेल्या कारवाईमुळे हा गुन्हेगारी कट उधळला गेला.
धूम्रपान शरीराला हानिकारक असल्यामुळे, आणि पर्यायाने देशाच्या आरोग्यविषयक पायाभूत सुविधांवर त्यामुळे येणाऱ्या भारामुळे, सरकार अशा हानिकारक वस्तूंवर उच्च दर्जाचा कर लावते. हा कर आणि तंबाखूजन्य पदार्थांवरील आयातीशी संबंधित नियमने चुकवण्यासाठी, भ्रष्ट लोक अनेकदा, अशा वस्तूंची तस्करी किंवा काळा बाजार करतात. या छाप्यात, एकूण 14.67 कोटी रुपये मूल्याच्या 86,30,000 सिगारेटस, सीमाशुल्क कायदा, 1962 च्या तरतुदींअंतर्गत जप्त करण्यात आल्या. या प्रकरणी अधिक तपास जारी आहे.
दिल्लीमध्ये राजघाटा जवळ गांधी दर्शन येथे दहा डिसेंबर 2023 रोजी संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी महात्मा गांधी यांच्या दहा फूट उंच पुतळ्याचे अनावरण केले. आपल्या संबोधनात संरक्षण मंत्री यांनी सांगितले की भारताला परकीय सत्तेपासून स्वातंत्र्य मिळवून देण्यात आणि समाजातल्या दुर्बल घटकांच्या उत्थानाचे कार्य करत त्यांना एक सन्मानाचे आयुष्य देण्यात मध्यवर्ती भूमिका बजावणाऱ्या राष्ट्रपित्यासाठी ही समर्पक आदरांजली ठरेल.
“गांधीजी हे सशक्त, समृद्ध आणि स्वच्छ भारताची कल्पना मांडणारे महान स्वातंत्र्यसेनानी होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली आपलं सरकार हे राष्ट्रपित्यांच्या पावलावर पाऊल ठेवून मार्गक्रमण करत आहे. महात्मा गांधी यांनी कायमच प्रत्येक भारतीयाच्या हृदयात स्थान मिळवले होते, तसेच मार्टिन ल्युथर किंग जूनियर आणि नेल्सन मंडेला यांच्यासारख्या महान नेत्यांनी त्यांच्या देशातल्या जनतेच्या उन्नतीसाठी गांधीजी यांच्या कल्पना आणि दृष्टिकोनातून प्रेरणा घेतली होती असे सिंह यांनी निक्षून सांगितले.
देशभक्ती आणि वचनबद्धतेच्या माध्यमातून उपेक्षित घटकांच्या उत्थानासाठी कार्य केलेल्या महात्मा गांधी, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि पंडित दीनदयाल उपाध्याय यांच्यासारख्या क्रांतिकारकांचे संरक्षण मंत्र्यांनी स्मरण केले. हे महान नेते आपल्या सरकारसाठी दीपस्तंभाची भूमिका बजावत असल्याचे ते म्हणाले. शांतता, सामाजिक सलोखा, एकता आणि विकासाधारित बदल घडवणे ही आपली विचारसरणी असल्याचे त्यांनी सांगितले.
सरकारचे उद्दिष्ट हे कायमच योजनाबद्ध प्रगतीचे राहिले असून याच्या परिणामस्वरूप भारत हा जगातली पाचवी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनला आहे हे राजनाथ सिंह यांनी अधोरेखित केले. गांधीजी हे केवळ स्वातंत्र्य सेनानी नव्हते तर एक अर्थतज्ञ होते ज्यांनी जग हे प्रत्येकाच्या गरजेसाठी पुरेसे पण प्रत्येकाची लालसा शमवण्यासाठी अपूरे असल्याचे मानले असे सिंह यांनी सांगितले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकार पुरुष सहकाऱ्यांच्या बरोबरीनेचं महिलांचे सबलीकरण करत असून राष्ट्र उभारणीसाठी त्यांचे योगदान सुनिश्चित करत असल्याचे राजनाथ सिंह यांनी सांगितले.
लोकांची सेवा प्रामाणिकपणे आणि समर्पित भावनेने करून देशाला नवीन उंची गाठून देण्याच्या सरकारच्या वचनबद्धतेचा संरक्षण मंत्र्यांनी पुनरुच्चार केला. हीच महात्मा गांधी यांना खरी आदरांजली ठरेल असे ते म्हणाले.
मुंबई-भारतातील हातमाग साडी संस्कृतीला चालना मिळावी या उद्देशाने केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्रालयाच्या वतीने आज रविवारी 10 डिसेंबर 2023 रोजी सकाळी मुंबई येथील एमएमआरडीए ग्राउंड, वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्स, वांद्रे पूर्व, येथे ‘वन भारत सारी वॉकेथॉन’ चे यशस्वी आयोजन करण्यात आले . केंद्रीय वस्त्रोद्योग, वाणिज्य आणि उद्योगमंत्री पियुष गोयल,केंद्रीय वस्त्रोद्योग राज्यमंत्री दर्शना जरदोश आणि खासदार पूनम महाजन यांनी या वॉकेथॉनला ’हिरवा झेंडा दाखवून सुरुवात केली. महिलांनी त्यांची शक्ती दाखवण्याची ही वेळ आहे, हीच वेळ आहे आणि हीच ती योग्य वेळ आहे असे सांगत केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्री पियुष गोयल यांनी या उपक्रमाला शुभेच्छा दिल्या आणि जमलेल्या सर्व महिलांचे यात सहभागी झाल्याबद्दल आभार मानले.
अशा उपक्रमांच्या आयोजनामुळे “वोकल फॉर लोकल”या संकल्पनेला समर्थन मिळते त्याचबरोबर महिलांमध्ये आरोग्यविषयक जागरुकता वाढवून आणि त्यांना निरोगी जीवन जगण्यास प्रवृत्त करण्यासाठी मदत मिळते असं वस्त्रोद्योग राज्यमंत्री दर्शना जरदोश यावेळी म्हणाल्या.
भारताची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईत होणाऱ्या या कार्यक्रमाचे विशेष महत्त्व आहे, जिथे स्त्रीत्वाची भावना स्त्रीच्या अस्तित्वाच्या प्रत्येक पैलूमध्ये खोलवर रुजलेली आहे. विविध क्षेत्रातल्या महिलांचा, त्यांच्या विशिष्ट प्रादेशिक शैलीचे प्रतिनिधित्व करणाऱ्या साड्या घालून इथे उपस्थित आहेत त्यातून , विविधतेचे सुंदर चित्र तयार झाले आहे आणि ते ‘एक भारत श्रेष्ठ भारत’ या भावनेला समर्थन देणारे आहे असे जरदोश यांनी सांगितले.
आजच्या या उपक्रमाने केवळ मुंबईच्या चैतन्यपूर्ण अभिव्यक्तीला प्रतिध्वनित केले नाही तर वॉकथॉनला साडीच्या वैशिष्ट्य पूर्ण सांस्कृतिक पैलूंने जोडले आहे असे या वॉकथॉनच्या एक आयोजक खासदार पूनम महाजन यांनी सांगितले. आर्थिक, सांस्कृतिक आणि प्रादेशिक घटकांना एकत्रित आणून, ‘वन भारत सारी वॉकेथॉन’ ने एक प्रभावी चित्र निर्माण केले आहे, ज्यामधून भारताचे वैशिष्ट्य असलेल्या विविधतेतील एकता देखील साजरी केली जात आहे आणि त्याचबरोबर हातमाग कारागिरीच्या चिरस्थायी वारशाला प्रोत्साहन मिळाले आहेअसे त्या म्हणाल्या.
सांस्कृतिक विविधता आणि सक्षमीकरणाच्या आजच्या उपक्रमात, अभिनेत्री सोनाली बेंद्रे, सोनाली कुलकर्णी, रूपा गांगुली, , गायिका फालगुनी पाठक डिझायनर अनिता डोंगरे,नीता लुल्ला,शायना एन सी यांच्यासह , दूरचित्रवाणीवरील तारका, क्रीडा क्षेत्रातील उल्लेखनीय महिला, उद्योग ,सामाजिक अशा विविध क क्षेत्रातील प्रभावशाली महिलासह 5000 हून अधिक महिला पारंपारिक हातमाग साड्यांबरोबर आधुनिक प्रकारच्या साड्या अभिनव पद्धतीने नेसुन या वॉकेथॉनमध्ये उत्साहात सहभागी झाल्या होत्या.
भारतातील सर्वात मोठी ‘वन भारत सारी वॉकेथॉन’ ठरलेल्या या कार्यक्रमाचा उद्देश भारतातील हातमाग साडी संस्कृतीला प्रोत्साहन देण्याबरोबरच देशभरातील महिलांच्या साड्या परिधान करण्याच्या विशिष्ट पद्धतींचा परिचय इतरांना करून देणे, भारताची “विविधतेतील एकता असलेला देश’ ही प्रतिमा अधोरेखित करणे हा आहे. यापूर्वी सुरतमध्ये अशा साडी वॉकेथॉनचे आयोजन करण्यात आले होते.
हातमाग क्षेत्र:
हातमाग क्षेत्र हे आपल्या देशाच्या समृद्ध आणि वैविध्यपूर्ण सांस्कृतिक वारशाचे प्रतीक आहे, शिवाय मोठ्या संख्येने कारागिरांना, विशेष करून महिलांना रोजगार देणारे हे प्रमुख क्षेत्र आहे. भारतातील हातमाग क्षेत्रात 35 लाखांहून अधिक लोक गुंतलेले आहेत. हातमागावर साडी विणण्याच्या कलेशी पारंपारिक मूल्ये जोडलेली आहेत आणि प्रत्येक प्रदेशात वैशिष्ट्यपूर्ण साड्यांचे प्रकार प्रचलित आहेत.
पैठणी, कोटपाड, कोटा डोरिया, टंगाईल, पोचमपल्ली, कांचीपुरम, थिरुभुवनम, जामदानी, संतीपुरी, चंदेरी, माहेश्वरी, पटोला, मोइरांगफी, बनारसी ब्रोकेड, तनछोई, भागलपुरी सिल्क, बावन बुटी, पश्मिना साडी असे काही साड्यांचे प्रकार आहेत जे आपल्या कला, विणकाम, डिझाईन्स आणि पारंपारिक आकृतिबंधांसह जगभराला आकर्षित करतात.
पुणे-तळवडे येथे झालेल्या आग दुर्घटनेत जखमी झालेल्या(Talavade )कामगार महिलांपैकी आणखी एका महिलेचा उपचारादरम्यान रविवारी (दि. 10) मृत्यू झाला. घटनेच्या दिवशी (शुक्रवारी) सहा कामगार महिला दगावल्या. त्यानंतर शनिवारी दोन तर रविवारी एका महिलेचा दुर्दैवी अंत झाला आहे.
ज्योतिबा नगर, तळवडे येथे प्लॉट नंबर 252 मध्ये केकवर (Talavade )लावल्या जाणाऱ्या स्पार्कल्स बनवणाऱ्या कारखान्यात शुक्रवारी (दि. 8) दुपारी पावणे तीन वाजताच्या सुमारास स्फोट झाला. या स्फोटात सहा महिला कामगारांचा होरपळून जागीच मृत्यू झाला. तर दहाजण जखमी झाले. जखमींवर ससून रुग्णालयात उपचार केले जात आहेत.
संगीता देवेंद्र आबदार (वय 28), पुनम अभय मिश्रा (वय 36), लता भारत दंगेकर (वय 40), मंगल बाबासाहेब खरबडे (वय 45), राधा सयाजी गोधडे (वय 18), कमलादेवी सुरज प्रजापती (वय 65) यांचा जागीच मृत्यू झाला होता. तर दुसऱ्या दिवशी प्रतीक्षा अशोक तोरणे (वय 16), कविता गणेश राठोड (वय 40) यांचा मृत्यू झाला. तिसऱ्या दिवशी म्हणजेच रविवारी शिल्पा गणेश राठोड (वय 31) या महिलेची मृत्यूशी झुंज अपयशी ठरली.
अपेक्षा तोरणे (वय 26), रेणुका ताथोड, (वय 20), शरद सुतार (वय 45), कोमल चौरे (वय 25), राधा उर्फ सुमन यादव (वय 40), उषा पाडवे (वय 40) आणि प्रियंका यादव (वय 32) या सात जणांची मृत्यूची झुंज सुरु आहे.
मुंबई दि. 10 : मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्षाने रुग्णसेवेत उत्कृष्ट कामगिरी करुन राज्यातील हजारो रुग्णांच्या जीवनात निरायम आरोग्याचा प्रकाश आणला आहे.या योजनेमुळे अनेक रुग्णांना अक्षरशः जीवनदान मिळत असल्याने ही योजना आता महाराष्ट्र राज्य सरकारची महत्वाकांक्षी योजना ठरत असल्याचे प्रतिपादन राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले आहे. गोरगरीब – गरजू रुग्णांना दुर्धर आणि महागड्या शस्त्रक्रियांसाठी मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षातून थेट अर्थसहाय्य केले जात आहे. या योजनेमुळे रुग्णांचे प्राण वाचत असल्याने मुख्यमंत्री कार्यालयात आलेला एकही रुग्ण हा मदतीविना वंचित राहता कामा नये याची दक्षता घेण्याचे आदेश मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी दिले आहेत.
आपल्या सातत्यपूर्ण कामगिरीचा आलेख कायम राखत या कक्षाने अवघ्या १७ महिन्यात १९ हजार पेक्षा अधिक गोरगरीब -गरजू रुग्णांना एकूण १५६ कोटी ६० लाख रुपयांची आर्थिक मदत वितरित केली आहे.
मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी मुख्यमंत्री पदाचा कार्यभार स्विकारताच महाविकास आघाडी सरकारच्या काळात बंद पडलेला मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्ष तात्काळ सुरू केला. मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्षाची मूळ संकल्पना मांडणाऱ्या मंगेश नरसिंह चिवटे यांची विशेष कार्य अधिकारी म्हणून नियुक्ती करून
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली मागील जुलै महिन्यात १७८ रुग्णांना ७६ लाखांची मदत देण्यात आली.ऑगस्ट महिन्यात २४४ रुग्णांना १ कोटी १ लाख, सप्टेंबर महिन्यात ३१९ रुग्णांना १ कोटी ८६ लाख, ऑक्टोबर महिन्यात २७६ रुग्णांना २ कोटी ३५ लाख, नोव्हेंबर महिन्यात ५२७ रुग्णांना ४ कोटी ५० लाख, डिसेंबर महिन्यात १०३१ रुग्णांना ८ कोटी ५२ लाख, जानेवारी २०२३ मध्ये १०३२ रुग्णांना ८ कोटी ९० लाख तर फेब्रुवारी २०२३ मध्ये १२७४ रुग्णांना १० कोटी ५९ लाख, मार्च २०२३ मध्ये १४६९ रुग्णांना ११ कोटी ९३ लाख, एप्रिल मध्ये ११९० रुग्णांना ९ कोटी ९१ लाख, मे मध्ये १३२९ रुग्णांना ११ कोटी २५ लाख, तर जून मध्ये १७२८ रुग्णांना १४ कोटी ६२ लाख, जुलै १४८८ रुग्णांना १२ कोटी ७२ लाख, ऑगस्ट मध्ये १५६७ रुग्णांना १३ कोटी १४ लाख, तर सप्टेंबर मध्ये विक्रमी १४०८ रुग्णांना ११ कोटी ७७ लक्ष रुपयांची वैद्यकीय मदत देण्यात आली आहे.तसेच मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता मदत मिळवण्यासाठी मंत्रालयात जाण्याची ही गरज नाही पूर्णपणे ऑनलाईन प्रोसेस करून वैद्यकीय मदत मिळणार असल्याचे कक्ष प्रमुख मंगेश चिवटे यांनी सांगितले. यासाठी 8650567567 या टोल फ्री क्रमांकावर कॉल करून थेट आपल्या मोबाईलवर अर्ज मिळविता येईल.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सूचनेनुसार मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी मध्ये विविध आजारांचा समावेश देखील करण्यात आला असल्याची माहिती यावेळी मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्ष प्रमुख मंगेश नरसिंह चिवटे यांनी दिली आहे.यामध्ये अँजिओप्लास्टी, बायपास सर्जरी , कर्करोगावरील शस्त्रक्रिया , केमोथेरपी, डायलिसिस, जन्मतः मूकबधिर लहान मुलांच्यासाठी अत्यावश्यक असणारी कॉकलीयर इनप्लांट शस्त्रक्रिया,सर्व प्रकारचे अवयव प्रत्यारोपण शस्त्रक्रिया,रस्ते अपघात ,विद्युत अपघात ,भाजलेले रुग्ण ,जन्मतः लहान मुलांच्या हृदयशस्त्रक्रिया आदींचा समावेश आहे.
पुणे : जय भवानी, जय शिवाजी च्या घोषणा… छत्रपती शिवाजी महाराज की जय…असा जयघोष आणि पुणेकरांनी शिवरायांची मूर्ती ठेवलेली पालखी खांद्यावर घेत पुष्पवृष्टी करीत साजरा केलेला आनंदोत्सव… अशा शिवमय झालेल्या वातावरणात किल्ले राजगड उत्सवांतर्गत आग्य्राहून सुटका स्मृतीदिनानिमित्त आयोजित लाक्षणिक पालखी सोहळा पुण्यात उत्साहात साजरा झाला. शिवरायांच्या आग्य्राहून सुटका या घटनेला ३५७ वर्षे पूर्ण झाल्याबद्दल पालखी सोहळा व उत्सवाचे आयोजन करण्यात आले.
पुणे महानगरपालिका आणि श्री शिवाजी राजगड स्मारक मंडळ, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने ३५७ व्या आग्य्राहून सुटका स्मृतीदिनानिमित्त ‘किल्ले राजगड उत्सवा’ चे आयोजन करण्यात आले आहे. छत्रपती शिवाजी महाराज आग्य्राहून सुखरुप किल्ले राजगड येथे परतले, त्या घटनेला ३५७ वर्षे पूर्ण होत आहेत. त्यानिमित्ताने पुण्यामध्ये लाल महाल येथे लाक्षणिक पालखी प्रस्थान सोहळ्याचे आयोजन करण्यात आले.
यावेळी पुणे मनपा उपायुक्त माधव जगताप, शिवसेना उपनेते रविंद्र मिर्लेकर, राजगडाचे गडकरी राजेंद्र सूर्यकांत भोसले, व्याख्यात्या सायली गोडबोले, श्री शिवाजी राजगड स्मारक मंडळाचे संस्थापक अध्यक्ष वसंतराव प्रसादे, कार्यकारी समितीचे अध्यक्ष संजय दापोडीकर, अजित काळे, अनिरुद्ध हळंदे, उत्सव समिती अध्यक्ष सुनील वालगुडे,समीर रुपदे, संपत चरवड, सतीश सोरटे, राहुल पायगुडे,अभिजित पायगुडे, रामभाऊ पारीख, संजय मोरे, आदी उपस्थित होते. यंदा उत्सवाचे ४३ वे वर्ष आहे.
यावेळी पोवाडा व ढोल वादन सादरीकरण दि पूना स्कूल अँड होम फॉर ब्लाइंड ट्रस्ट यांनी केले. एच.व्ही.देसाई महाविद्यालयचे इतिहास विभाग प्रमुख गणेश राऊत, उपस्थित होते जिजाऊ साहेब यांचे चरित्र सायली गोडबोले-जोशी यांनी त्यांच्या भाषण सांगितले. आग्र्याहून सुटकेचा दिवस हा शिवरायांचा पुर्नजन्म होता. त्यामुळे दरवर्षी पुण्यात आणि गडावर उत्सव साजरा केला जातो.
यावर्षी दि. १६ व १७ डिसेंबर २०२३ रोजी आग्य्राहून सुटका स्मृतिदिन किल्ले राजगड पाल खु. येथील खंडोबाचा माळ व गडावरती साजरा करण्यात येत आहे. विविध क्षेत्रातील मान्यवर,वक्ते, इतिहासकार या कार्यक्रमासाठी उपस्थित राहणार आहेत. किल्ले राजगड खंडोबा माळावर, पाल गाव शनिवार दि.१६ डिसेंबर २०२३ सायंकाळी विविध सांस्कृतिक कार्यक्रम होतील. स्थिर वादन, मर्दानी खेळ होतील. सायली गोडबोले-जोशी यांचा राजमाता जिजाऊ नाट्याविष्कार सादर होईल. अॅड. रवींद्र यादव यांचे शिव व्याख्यान होईल. किल्ले राजगड पद्मावती माता मंदिर येथे शनिवारी गड जागरण कार्यक्रमांतर्गत आग्यार्हून सुटका याविषयी प्रास्ताविक भाषण होईल व व्याख्यात्यांची व्याख्याने होतील.
रविवार, दि. १७ डिसेंबर २०२३ सकाळी ६ वा किल्ले राजगड येथे सूर्योदयाला ध्वजारोहण होईल. किल्लेदार सुर्यकांत भोसले यांच्या शुभहस्ते ध्वजारोहण व पद्मावती देवीचे पूजन होणार आहे. छत्रपती श्री शिवाजी महाराज पालखी सोहळा ढोल, ताशांच्या गजरात पाली दरवाजा – सदर – पद्मावती माता मंदिर असा होणार आहे. तरी शिवप्रेमींनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आले आहे.
संतांची विचारधारा विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी निगडीतील शिक्षण प्रसारक मंडळीचा उपक्रम
पुणे (दि.१० डिसेंबर २०२३) संत कृपा झाली इमारत फळा आली। ज्ञानदेव रचिला पाया तुका झालासे कळस।। या ओवी प्रमाणे शिक्षणाच्या मजबूत पायावर आयुष्याची उभारणी होत असते. विद्यार्थ्यांनी आई, वडील, गुरुजनांच्या मार्गदर्शनाखाली भरपूर अभ्यास करून ज्ञान प्राप्ती करून सद्विचारांचे अनुकरण केले तर जीवन यशस्वी होईल. देशाचे सुजाण, सुसंस्कृत नागरिक म्हणून तुम्ही प्रगती कराल, असे मार्गदर्शन हभप दिगंबर ढोकले महाराज यांनी प्रवचनातून विद्यार्थ्यांना केले. शिक्षण प्रसारक मंडळीच्या निगडी शाळेच्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त सुरू असलेल्या उपक्रमातील आणि आळंदी यात्रा कार्तिक भागवत एकादशी निमित्त विद्यार्थ्यांसाठी प्रबोधनपर प्रवचनाचे आयोजन करण्यात आले होते. वारकरी संप्रदाय आणि भागवत संप्रदायाची ओळख विद्यार्थ्यांना व्हावी तसेच महाराष्ट्रातील संतांची विचारधारा विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचावी आणि त्यांच्यावर संस्कार घडावे या उद्देशाने या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. यावेळी हभप किसन महाराज चौधरी, शाळा समिती अध्यक्ष ॲड. दामोदर भंडारी, मुख्याध्यापिका ज्योती बक्षी, लीना वर्तक, उमा घोळे, मुख्याध्यापक रविंद्र मुंगसे, मुख्याध्यापिका सविता बिराजदार उपस्थित होते. विठ्ठलपंत आणि रुक्मिणी यांच्या पोटी जन्मलेल्या निवृत्ती, ज्ञानेश्वर, सोपान, मुक्ताबाई या चार भावंडांना समाजाने वाळीत टाकले. पैठण येथील ब्रम्ह सभेत चराचरात चैतन्य भरलं आहे, प्रत्येक ठिकाणी परमेश्वराचे अस्तित्व आहे; याची जाणीव ज्ञानेश्वर महाराजांनी करून दिली. त्यावेळी ज्ञानोबांनी रेड्या मुखी वेद वदवून घेतला. म्हणूनच भाविक भक्त ज्ञानेश्वरांना ज्ञानोबा माऊली म्हणतात. ज्ञानोबा विश्व माऊली आहेत, असे हभप दिगंबर ढोकले महाराज यांनी सांगितले. शिक्षिका स्नेहल देशपांडे, रमा जोशी यांनी अभंग गायन केले. इयत्ता चौथीमधील विद्यार्थी सिद्धक शिंदेेेने तबल्याची साथ दिली. स्वागत सुनील सावंत, शिवाजी बांदल, सूत्रसंचालन प्रीती शेटे आणि दीपा सातपुते यांनी केले. शाळा समिती अध्यक्ष ॲड. दामोदर भंडारी यांच्या संकल्पनेतून तसेच मराठी, इंग्रजी माध्यमाच्या शाळेचे मुख्याध्यापिका यांच्या मार्गदर्शनाखाली आणि सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांच्या सहभागातून कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
पुणे, दि.१०: क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांचे भिडेवाडा येथील राष्ट्रीय स्मारक आधुनिक पद्धतीचे करतानाच त्याच्या दृश्य स्वरूपाची सावित्रीबाईंच्या काळात जसे असेल अशा जुन्या काळाशी सांगड घाला, असे निर्देश अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी दिले. स्मारकासाठी आवश्यक निधी राज्य शासनाच्यावतीने देण्यात येईल, अशी ग्वाहीदेखील त्यांनी दिली.
शासकीय विश्रामगृह येथे राष्ट्रीय स्मारक भिडेवाडा आणि महात्मा फुले व क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांचे स्मारक विस्ताराच्या अनुषंगाने आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी पुणे महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे, नगर रचना विभागाचे संचालक अविनाश पाटील, सहसंचालक राजेंद्र पवार, उपविभागीय अधिकारी अविनाश सूळ, महानगरपालिकेच्या अधीक्षक अभियंता हर्षदा शिंदे, कार्यकारी अभियंता सुनील मोहिते आदी उपस्थित होते.
श्री. भुजबळ म्हणाले, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांचे भिडेवाडा येथे स्मारक उभारताना ती ‘सावित्रीबाई फुले यांची पहिली मुलींची शाळा’ अशी वाटली पाहिजे. यासाठी स्पर्धात्मक स्वरूपात नामांकित वास्तुविशारदाकडून वेगवेगळे आराखडे तयार करुन घ्यावेत. आराखड्यात शाळेच्या परिसरात सावित्रीबाई फुले यांचा पुतळा, फर्निचर, क्रीडांगण, दृकश्राव्य साधने, जुन्यापद्धतीचे दर्शनी भाग आदी बाबींचा विचार व्हावा. जागेचा विचार करता शाळेच्या इमारतीत उद्वाहकाची व्यवस्था करावी.
या परिसरात वाहनतळाची इतरत्र व्यवस्था करण्याच्यादृष्टीने चाचपणी करावी. स्पर्धात्मक युगाचा विचार करता या शाळेतून महिला अधिकारी घडविण्याच्यादृष्टीने शाळेची रचना व आधुनिक अभ्यासक्रमाबाबत महानगरपालिकेने चाचपणी करावी. समितीने आराखडा अंतिम केल्यानंतर स्मारकाचे काम लवकरात लवकर सुरु करावे. स्मारक पूर्ण झाल्यानंतर अनेकांना समाजकार्याची प्रेरणा मिळेल, असे श्री. भुजबळ म्हणाले.
महात्मा फुले व क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांचे स्मारक आणि राष्ट्रीय स्मारक भिडेवाडा यांना जोडणाऱ्या मार्गाचे आरक्षण नगर रचना विभागाने लवकरात लवकर पूर्ण करावे. आरक्षण निश्चितीनंतर पुणे महानगरपालिकेने भूसंपादनाची कार्यवाही सुरु करावी. यासाठी लागणाऱ्या निधीची मागणी राज्य शासनाकडे करावी. नागरिकांच्या मागणीबाबत सकारात्मक विचार करण्यात यावा, असेही श्री. भुजबळ म्हणाले.
यावेळी अतिरिक्त आयुक्त श्री. ढाकणे आणि संचालक श्री. पाटील यांनी कामाच्या अनुषंगाने बैठकीत माहिती दिली.
पुणे : सामाजिक कार्यकर्ते तसेच ‘निर्भय बनो अभियान’चे प्रवर्तक डॉ.विश्वंभर चौधरी यांच्यावर सिन्नर येथे झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ शनिवार ,दि.९ डिसेंबर रोजी सायंकाळी साडे पाच वाजता गांधी भवन ,कोथरूड येथे जाहीर सभा आयोजित करण्यात आली होती. या जाहीर सभेला मोठा प्रतिसाद मिळाला. वैचारिक दहशतवादाविरोधात लढण्याचा निर्धार या सभेत करण्यात आला.महात्मा गांधी यांचे पणतू तुषार गांधी,महाराष्ट्र गांधी स्मारक निधीचे अध्यक्ष डॉ.कुमार सप्तर्षी,डॉ.विश्वम्भर चौधरी,एड.असीम सरोदे यांनी या सभेत मार्गदर्शन केले.युवक क्रांती दलाचे कार्यवाह जांबुवंत मनोहर हे सभेच्या अध्यक्षस्थानी होते. आनंद करंदीकर,संदीप बर्वे(सचिव, महाराष्ट्र गांधी स्मारक निधी),अप्पा अनारसे( राज्य संघटक, युक्रांद), डॉ. उर्मिला सप्तर्षी, प्रवीण सप्तर्षी, अन्वर राजन, प्रशांत कोठडिया,वर्षा शेडगे, अरूण खोरे,डॉ अभिजीत मोरे, दीपक ओव्हाळ, नीलम पंडीत, ऍड. राजेश तोंडे, प्रिया नेमाने, रोहन गायकवाड, दीपक मोहिते, विवेक काशीकर,राहुल तरकसे आदी मान्यवर उपस्थित होते. तुषार गांधी म्हणाले, ‘ सिन्नरचा हल्ला म्हणजे विश्वंभर चौधरी यांना जणू शौर्याची पोचपावती मिळाली आहे. आम्हाला लाज वाटली पाहिजे की समोरची हिंसेचे समर्थक मंडळी हल्ले करीत असताना आपले मनोबल पडत आहे. ते घाबरवतात , धमकी देतात आणि मग गोळी चालवतात. त्यांची विचारधारा हिंसेची आहे. अहिंसा रूपी कवच करून आपल्याला आता उभे राहावे लागेल. हे एक युध्द् आहे आणि ते अजून तीव्र होणार आहे. आपल्याला शांती सेना उभी करावी लागेल. विचारांच्या तलवारीला धारदार करणे गरजेचे आहे.विचारांची लढाई धारदार करावी लागेल. आपल्या देशाला वाचवायचे असेल तर आपल्याला कुर्बानी द्यावी लागेल. डॉ. कुमार सप्तर्षी म्हणाले, ‘ धर्म एकदा अंगात भिनला कि ते एक विष होते. म्हणून आपला विवेक जिवंत राहिला पाहिजे. लोकांना बोलू द्यायचे नाही याचे प्रयत्न चालू आहेत . सत्ताधाऱ्यांच्या नियंत्रणाबाहेर लोक जायला लागले की सत्ताधाऱ्यांची तडफड सुरू होते. २०२४ मधे लोकसभा निवडणूका जाहिर होतील. आतापासून ४ महिने आपण जोमाने काम केले पाहिजे.विवेकवाद जिंकवला पाहिजे.निर्भय बनो अभियान’ अजून मोठं केलं पाहिजे. ‘
डॉ. विश्वंभर चौधरी म्हणाले,’सिन्नरच्या घटनेतून आपण बरेच काही शिकलो आहे , आमच्या बाबतीत या आधी असे काही झालं नव्हते . पुढचा काळ हा खूप सावध राहण्याचा आहे. मी हिंदूचा द्वेष करत नाही . पण संघाच्या हिंदूत्वाविरोधात मी आहे.नथुरामचे हिंदुत्व आम्हाला मान्य नाही. सिन्नर मधे मोठी सभा घेऊन आपली ताकद दाखवून द्यावी लागणार आहे. शिवसेना ( उद्धव ठाकरे ) , काँग्रेस , राष्ट्रवादी ,लोकशाहीवादी संस्थांचा मी आभारी आहे. या सर्वानी खूप पाठिंबा दिला. सिन्नरच्या घटनेनंतर १४ जिल्हयांमथून सभांसाठी निमंत्रण आले आहे. आता दुप्पट वेगाने ‘निर्भय बनो अभियान’ राबविणार आहे. वारकऱ्यांमधे धारकरी पाठवणे आम्हाला मान्य नाही.मी आणि माझा राम यात दलालाची गरज नाही.सर्व धर्म आमचे आहेत’. एड.असीम सरोदे म्हणाले, ‘डॉ.विश्वंभर चौधरी यांच्यावरील हल्ला म्हणजे लोकशाहीवर हल्ला आहे.हा हल्ला म्हणजे विषारी हिंदूचा विचारी हिंदूवर केलेला हल्ला आहे. त्यांच्या विचारसरणीवर आपण हल्ला केला पाहीजे. हल्ला करणाऱ्यांना धडा शिकवायचा असेल तर सिन्नर मधे मोठी सभा घेतली पाहिजे. सभेचे अध्यक्ष जांबुवंत मनोहर म्हणाले , ‘युवक क्रांती दल हे विश्वंभर चौधरी यांच्या सोबत कायम राहील. शांती सेना उभी करून कायम सहकार्य करतील. अहिंसक नागरिकांची शक्ती उभी करून कायम सहकार्य केले जाईल.’
विवेक काशीकर यांनी प्रास्तविक केले.रोहन गायकवाड यांनी सूत्रसंचालन केले. अप्पा अनारसे यांनी आभार मानले.
महात्मा गांधी वरील निबंध स्पर्धेमुळे विद्यार्थ्यांना राष्ट्रभक्तीची प्रेरणा..! निबंध दाखल करण्यास शेवटचे ५ दिवस..!! पुणे दि १० डिसें – “राजीव गांधी स्मारक समिती व पुणे शहर माध्यमिक, उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघ” यांचे संयुक्त विद्यमाने आयोजित, इ. ८ वी ते १० वी (माध्यमिक शाळांमधील) विद्यार्थ्यांकरीता, “मला समजलेले बापू अर्थात महात्मा गांघी” विषया वरील निबंध स्पर्धां कालखंड सुरू झाला असुन, पुणे शहर परीसरातील सु १२५ शाळांमध्ये, राजीव गांधी स्मारक समितीचे कार्यकर्ते पोहोचले आहेत. शाळांकडुन देखील चांगला व सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे. तसेच ‘निबंध स्पर्धेची’ माहीती देणारे बॅनर्स ही लावण्यात आले आहेत. शाळा प्रशासना कडुन ‘स्मारक समिती सदस्यांना’ सन्मानाची वागणुक व सकारात्मक प्रतिसाद मिळत असल्याचे, स्पर्धेचे संयोजक व निमंत्रक गोपाळ तिवारी यांनी सांगितले. राष्ट्रपिता महात्मा गांधी, स्वातंत्र्य लढ्याचा ईतिहास, स्वातंत्र्या करीता शहीद झालेल्यांचे योगदान व ‘स्वतंत्र – भारताची’ ऊभारणी इ बाबत विद्यार्थ्यांना “निबंध स्पर्धेच्या माध्यमातुन अंतर्मुख करण्याचा अल्प प्रयत्न आहे…! महात्मा गांधींच्या विशाल नेतृत्व व व्यक्तिमत्वाचे, बापूंच्या सत्य, अहिंसा, मानवता आदी असाधारण गुणांचे, स्वातंत्र्य लढ्याच्या अनेक पैलु व प्रसंगांचे, त्यांना लाभलेली जागतिक मान्यता, मानवी जीवना विषयीच्या दृष्टीकोनाचे व त्यांनी अंगीकारलेल्या मुल्यांची माहीती व त्यायोगे विद्यार्थ्यांचे ठायी राष्ट्रभक्ती भावना जडावी, या ऊद्देशाने ही निबंध स्पर्धा आयोजित करत असल्याचे राजीव गांधी स्मारक समितीचे संस्थापक अघ्यक्ष गोपाळ तिवारी यांनी सांगितले. माजी शिक्षण संचालक श्री दिगंबर देशमुख, अभिनव शिक्षण संस्थेचे अध्यक्ष राजीव जगताप, पुणे शहर माध्यमिक व ऊच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष श्री सुजीत जगताप, सरचिटणीस श्री शिवाजी कामठे, कार्याध्यक्ष श्री शिवाजी शिंदे, श्री विजय कचरे, श्री सचिन दुर्गाडे, श्री नंदकुमार सागर इ. च्या अतुलनीय मार्गदर्शन व सहकार्याने या स्पर्धेच्या आयोजनाने वेग पकडला आहे..! शाळांमध्ये निबंध स्पर्धेची माहीती पत्रक पोहोचवणे, निबंध गोळा करणे इ कार्य स्मारक समितीचे सदस्य व सहकारी कार्यकर्ते सर्वश्री ॲड स्वप्नील जगताप, गणेश शिंदे, ॲड फैयाझ शेख, धनंजय भिलारे, संदिप मोकाटे, संजय अभंग, गणेश मोरे, महाजन सर, अमर पवार बंधू, योगीराज नाईक, भारत पवार, इ करत आहेत. कार्यालयीन समन्वय श्री ऊदय लेले, शंकर शिर्के, नरेश आवटे इ पहात आहेत.
आम आदमी पक्षाच्या विमान नगर भागातील कार्यकर्त्या शितलताई कांडेलकर यांची चार चाकी इकोफोर्ड मोटार काल रात्री 09.12.23 रात्री 12 ते पहाटे 4 या वेळेत अज्ञात भामट्यांनी फोडली.आपले प्रभागातील काम पाहून काही विरोधकांनी हे कृत्य केले असल्याचा दावा या कार्यकर्तीने केला गेले वर्षभरापासून मी या विमान नगर भागात वेगवेगळे प्रश्न उपस्थित करत आहेत, बऱ्याच समस्यांची दखल घेऊन त्या समस्या सोडवण्यासाठी वेगवेगळ्या वस्त्यांमध्ये जाऊन काम करत आहेत. यामुळेच कुठेतरी माझ्या गाडीची तोडफोड केली आहे असे शितल यांचे मत आहे. गाडीच्या तोडफोडीनंतर आम आदमी पार्टीचे विविध पदाधिकारी यांनी शितल यांची भेट घेऊन त्यांना धीर दिला व विमान नगर पोलीस स्टेशन येथे रितसर तक्रार दिली आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक अविनाश शेवाळे हे करत आहेत.
पुणे, १० डिसेंबर-जाणता राजा या कलाकृतीसह शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांनी ज्या ज्या कलाकृती निर्माण केल्या, त्या एवढ्या भव्य आहेत की, या कलाकृती दीर्घकाळ टिकून राहतील, असे मनोगत पं. अजय पराड यांनी व्यक्त केले.
अक्षय सेवा संशोधन प्रतिष्ठान आणि कौशिक आश्रम यांनी आयोजित केलेल्या शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे स्मृती व्याख्यानमालेत पं. पराड प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या पश्चिम महाराष्ट्र प्रांताचे व्यवस्था प्रमुख गुरुनाथ शिरोडकर यांचीही यावेळी प्रमुख उपस्थिती होती.
जे काही करायचे ते भव्य करायचे म्हणजे ते दिव्य होते. जे भव्य ते दिव्य असते, हा बाबासाहेबांचा विचार होता आणि त्यावर त्यांचा विश्वासही होता, असे पं. पराड यांनी सांगितले. समाजाला योग्य दिशा आणि योग्य विचार देण्याचे काम व्याख्यानमाला करतात, असे शिरोडकर म्हणाले.
समूह नाट्याचे प्रणेते संजय पुरंदरे, जाणता राजा महानाट्याचे प्रथम दिग्दर्शक दिवाकर पांडे, होनराज मावळे आणि सहकलाकारांनी यावेळी कला रसिक बाबासाहेब हा कार्यक्रम सादर केला. या कार्यक्रमाला श्रोत्यांनी उत्स्फूर्त दाद दिली आणि गायन, वादन, निवेदनाचे कौतुक केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक संस्थेचे विश्वस्त मंदार सहस्रबुद्धे यांनी, संयोजन राजाभाऊ पानगावे, शिरीष किराड यांनी आणि सूत्रसंचालन नागेश पाटील यांनी केले.
पुणे, १० डिसेंबर : “लोकांचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर विश्वास आहे. मोदी जे बोलतात ते करतात. मोदींची गॅरंटी ही गॅरंटी आहे. त्यामुळेच ‘विकसित भारत संकल्प यात्रे’ला देशभर मोठा प्रतिसाद मिळत असल्याचे मत खासदार प्रकाश जावडेकर यांनी व्यक्त केले.”
लोककल्याणकारी मोदी सरकारच्या योजनांची माहिती तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी व अंमलबजावणीसाठी विकसित भारत संकल्प यात्रा आज गोखलेनगर मध्ये पोहोचली. त्यावेळी जावडेकर बोलत होते. योगेश बाचल, आदित्य माळवे, राजश्री काळे, श्याम सातपुते, लक्ष्मण लोखंडे, सतीश बहिरट, विकास डाबी, संतोष काळे, लक्ष्मण नलावडे यांची उपस्थिती होती.
जावडेकर म्हणाले, “या अभियानाअंतर्गत 26 जानेवारी पर्यंत सर्व वस्त्यांवर व्हिडिओ रथ जाणार आहे. मोदी सरकारने पुढील पाच वर्षांसाठी गरीब अन्न योजनेअंतर्गत मोफत धान्य देण्याची घोषणा केली आहे. ज्या पात्र नागरिकांना या योजनेचा अजूनही लाभ मिळत नाही त्यांची या अभियानात नोंदणी केली जाणार आहे. तसेच आयुष्मान भारत आरोग्य योजनेचे सभासदत्वही दिले जाणार आहे. सर्व जनकल्याणाची कामे या अभियानात होत असून नागरिकांनी त्याचा लाभ घ्यावा.”
पुणे -महानगरपालिकेच्या पाण्याच्या पाईपलाईनच्या कामासाठी 5 डिसेंबर ते 19 डिसेंबर या कालावधीत बाणेर ते परिहार चौक या मार्गात तात्पुरता बदल करण्यात येणार आहे.
पुणे वाहतूक पोलिसांच्या प्रसिद्धीपत्रकानुसार, आयटीआय रोडवरील विस्तृत पाइपलाइनच्या कामामुळे वाहतूक प्रवाहात तात्पुरता बदल करणे आवश्यक आहे. पाइपलाइन टाकण्याची क्रिया रस्त्याच्या मध्यभागी केंद्रित आहे.त्यामुळे 5 डिसेंबर ते 19 डिसेंबर या कालावधीत वाहतूकीत बदल केले जातील.बाणेर फाट्यावरून परिहार चौकाकडे जाणार्या वाहनधारकांना बाणेर फाट्यावर डावीकडे वळावे, सीझन्स रोडवरील ईश्वर मेडिकलपासून उजवे वळण घ्यावे, त्यानंतर अविक पॉलीकेम येथे दुसरे उजवे वळण घ्यावे, असा सल्ला देण्यात आला आहे. परिहार चौकात जाण्यासाठी ते आयटीआय रोडवरून सरळ पुढे जाऊ शकतात.
2024 मध्ये देशाच्या इतिहासातून मोदी शहा संपून जातील. भाजपची पाटी कोरी होणार. भाजपची आता दशकपूर्ती झाली आहे. रावणाप्रमाणाचे भाजपची 10 तोंडे देखील उडवले जातील असा हल्लाबोल ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केला आहे. ते सोलापूरमध्ये बोलत होते.
घाणेरड्या राजकारणाची दशकपूर्ती झाली पुढे राऊत म्हणाले, ”राज्यातील राजकारण राजकारण आता पूर्वीसारखे राहिलेले नाही. इतके सुडाचे, बदनामीचे आणि बदलाचे राजकारण आम्ही कधीही पाहिले नाही. अशा प्रकारचे राजकारण गेल्या 10 वर्षात सुरू झाले. आणि या घाणेरड्या राजकारणाची आता दशकपूर्ती झाली आहे. रावणाप्रमाणे यांचीही 10 तोंडे उडवले जातील” असा हल्ला संजय राऊत यांनी भाजपवर चढवला आहे.
शिवसेना ठाकरेंची होती आणि राहणार राऊत म्हणाले, ”शिवसेना बाळासाहेब ठाकरेंची होती आणि राहणार आहे. निवडणूक आयोगाने कितीही गुलामी केली तर मूळ पक्ष हा दुसऱ्यांचा होत नाही. पक्षांचे अस्तित्व हे पक्षाच्या नेतृत्ववर अवलंबून असते. यापूर्वी शिवसेना संपवण्याचा अनेकदा प्रयत्न झाला तरी शिवसेना संपली नाही. मोदी शहांना तर शिवसेना अजिबातच संपवता येणार नाही. देशाच्या इतिहासातून मोदी शहा संपतील. हुकूमशाहीची नोंद इतिहासात रहात नाही” असे संजय राऊत म्हणाले.
घटना वाचवण्यासाठी प्रकाश आंबेडकर आघाडीवर पुढे राऊत म्हणाले, ”देशाची घटना वाचवण्यासाठी प्रकाश आंबेडकर हे आघाडीवर असतील. आंबेडकरांची ताकद आम्हाला जेव्हा मिळते तेव्हा महाराष्ट्रात नव्हे तर देशात विजयाचा मार्ग मोकळा होतो. फहार मोठा समाज त्यांच्या पाठीशी आहे. आम्ही सर्व एकत्र राहू. त्यामुळे सोलापूरचे राजकारण सुद्धा 2024 मध्ये बदलेल दिसेल” असेही राऊत म्हणाले.
बॅलेट पेपरवर निवडणूक घेऊन दाखवा तर 5 राज्यांच्या निवडणुकीच्या निकालांवर बोलताना राऊत म्हणाले, ”तेलंगणात सुद्धा भाजप आले होते. केसीआर यांचा पराभव करणे हे मोठे आव्हान होते. कारण केसीआर हे त्या राज्याचे निर्माते आहेत. मात्र त्यांचा पराभव मोदी शहा करू शकले नाहीत. 10 आमदारांचा टप्पाही भाजपला तिथे गाठता आला नाही. मात्र राहुल गांधींनी तो पोराभव करून दाखवला. राजस्थानमध्ये सरकार बदलण्याची जनतेची मानसिकता आहे. मात्र मध्य प्रदेशमधील निकाल हा आश्चर्यकारक होता. बॅलेट पेपरवर निवडणूक घेऊन दाखवा” असेही संजय राऊत म्हणाले.