Home Blog Page 1297

ब्रिगेड, नोवाकोड, इनोवला प्रथम पारितोषिक

एमआयटी एडीटी विद्यापीठातील स्मार्ट इंडिया हॅकेथॉन स्पर्धेचा समारोप
पुणे : येखील एमआयटी आर्ट, डिजाईन व टेक्नॉलॉजी विद्यापीठ, पुणेच्या संत श्री.ज्ञानेश्वर महाराज विश्वशांत डोम येथे केंद्रीय शिक्षण मंत्रालयाची इनोव्हेशन सेल व एआयसीटीई द्वारे आयोजित राष्ट्रीय स्मार्ट इंडिया हॅकेथॉन (एसआयएच) स्पर्धेच्या हार्डवेअर गटाच्या अंतिम फेरीनंतर ब्रिगेड (शेती, अन्न व ग्रामीण विकास), नोवाकोड (मेड, बायो, हेल्थटेक), इनोव्ह-सांडपाणी विल्हेवाट मशीन (हेरिटेज व कल्चर), आयोनिक्स(स्पोर्टस व फिटनेस) आणि यू.पी. स्टार्स (स्मार्ट ऑटोमेशन) या संघांनी नाविन्यपूर्ण कल्पनांसह आपापल्या गटातील विजेतेपदाला गवसणी घातली.
या पाच दिवस चाललेल्या या स्पर्धेच्या अंतिम फेरीसाठी देशातील आंध्र प्रदेश, बिहार, हरियाणा, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, ओडिशा, पाँडेचेरी, कर्नाटक, केरळ, चंडीगढ, जम्मू-काश्मिर, राजस्थान आणि तामिळनाडू या राज्यांतील एकूण २७ संघांची निवड झाली होती. त्यामध्ये अंतिम फेरीत विविध स्तरांवर प्रत्येक गटातील विजेत्या संघाच्या नवकल्पनांचे परिक्षकांकडून मूल्यमापन करण्यात आले. या सर्व विजेत्या संघांच्या नवकल्पनांना भारत सरकारकडून प्रत्येकी एक लाख रूपयांचे पारितोषिक देण्यात आले.
याप्रसंगी, एमआयटी एडीटी मिटकॉमच्या संचालिका प्रा.डॉ.सुनीता कराड, ‘वाय४डी’ फाउंडेशनचे प्रफुल्ल निकम, ‘हिरो मोटोकॉर्प’चे उत्कर्ष मिश्रा, ‘फुलक्रम डिजीटल’चे बेंसली झकारिया, ‘एआयसीटीई’चे उपाध्यक्ष डॉ.अभय जेरे, विद्यापीठाचे प्र.कुलगुरू डॉ.मोहित दुबे, कुलसचिव डॉ. महेश चोपडे, नोडल केंद्र प्रमुख डाॅ.रेखा सुगंधी, डाॅ.सुरेश कापरे आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.
भारत सरकारकडून दूरदृष्ट प्रणालीद्वारे करण्यात आलेल्या हार्डवेअर गटाच्या समारोपात एआयसीटीई’चे चेअरमन टी.जी. सितारामन यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. यावेळी ते म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विकसित ‘भारत@२०४७’ या उपक्रमाची घोषणा केली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी गेल्या काही दिवस संशोधन करून मांडलेल्या नवकल्पनांमुळे या उपक्रमाच्या यशस्वितेत भर पडणार आहे. सध्या देशासमोर असणाऱ्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी संशोधनाला चालना देण्याचे काम स्मार्ट इंडिया हॅकेथाॅन या स्पर्धेच्या माध्यमातून होत आहे.
स्पर्धेचा निकाल

  • शेती, अन्न व ग्रामीण विकास-  ब्रिगेड (श्री रामकृष्ण अभियांत्रिकी महाविद्यालय, कोईंबतूर, तमिळनाडू)
  • मेड, बायो, हेल्थटेक- नोवाकोड (अविनाशिलिंगम गृहविज्ञान महाविद्यालय, कोईंबतूर, तमिळनाडू) 
  • हेरिटेज व कल्चर- इनोव्ह-सांडपाणी विल्हेवाट मशीन (श्री व्यंकटेश्‍वरा अभियांत्रिकी महाविद्यालय, पद्दूचेरी)
  • स्पोर्टस व फिटनेस-  आयोनिक्स (श्रीकृष्ण तंत्रज्ञान महाविद्यालय, कोईंबतूर, तमिळनाडू)
  • स्मार्ट अँटोमेशन-  यू.पी. स्टार्स (आयआयएटी विद्यापीठ, मेरठ, उत्तर प्रदेश)

माणूसपणाला साद घालणारी रामदास पुजारी यांची कविता : डॉ. श्रीपाल सबनीस

रामदास पुजारी यांच्या ‌‘उद्याच्या श्वासासाठी’ काव्यसंग्रहाचे प्रकाशन
पुणे : एकीकडे क्रौर्याची, भोगवादाची, स्वार्थाची परिसिमा गाठली जात असताना समाज दु:खमुक्त व्हावा, प्रत्येकाच्या जाणिवा समृद्ध व्हाव्यात या उदात्त हेतूने रामदास पुजारी यांची काव्यनिर्मिती सुरू आहे. ते काव्यातून मांडत असलेली विश्वशांतीची भूमिका त्यांच्यातील प्रगल्भ कवी आणि डोळस माणसाची आहे, असे गौरवोद्गार अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष,ज्येष्ठ विचारवंत डॉ. श्रीपाल सबनीस यांनी काढले.सेवानिवृत्त वनाधिकारी रामदास पुजारी लिखित ‌‘उद्याच्या श्वासासाठी’ या काव्यसंग्रहाचे प्रकाशन डॉ. सबनीस यांच्या हस्ते झाले. त्या वेळी ते बोलत होते. साहित्य परिषदेच्या माधवराव पटवर्धन सभागृहात आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सेवानिवृत्त प्रधान मुख्य वनसंरक्षक, कवी डॉ. शेषराव पाटील होते. रामदास पुजारी यांच्यासह कुंडल वन प्रबोधिनीचे महासंचालक जे. पी. त्रिपाठी, हिंदी,उर्दू कवयित्री,गझलकार कांचन त्रिपाठी, पारनेर साहित्य साधना मंचचे समूह संचालक, ज्येष्ठ साहित्यिक संजय पठाडे, प्रकाशक विक्रम शिंदे, निलम पुजारी व्यासपीठावर होते.पुजारी यांच्या निसर्गासंदर्भातील काव्यात्मक घोषणा संपूर्ण समाजासाठी मार्गदर्शक असल्याचे सूचित करून डॉ. सबनीस पुढे म्हणाले, चिंतन हे पुजारी यांच्या कवितेचे सूत्र आहे. समाज जगविणारा आणि जागविणारा विचार त्यांच्या काव्यातून दिसून येतो. माणसाच्या माणूसपणाला साद घालणारी त्यांची कविता आहे. आई-वडिल आणि निसर्ग हे जिव्हाळ्याचे विषय असल्याचे सांगून लेखनाविषयी मनोगत व्यक्त करताना रामदास पुजारी म्हणाले, जल व जमीन सुरक्षित राहिली, लोकसंख्येच्या प्रमाणात वृक्ष लागवड होऊन वृक्ष संवर्धन झाले तरच उद्याच्या पिढीला श्वास घेणे शक्य होणार आहे. उद्याच्या पिढीला श्वासासाठी प्राणवायू मिळण्यासाठी, मोठ्या प्रमाणावर वृक्ष लागवड तसेच नैसर्गिक साधनसंपत्तीचे जतन व्हावे,निसर्गाशी संवाद वाढावा अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना डॉ. शेषराव पाटील म्हणाले, उद्या आपल्याला श्वास घेता येईल का याकडे गांभीर्याने बघण्याची, विचार करण्याची गरज आहे. पुजारी हे खऱ्या अर्थाने कविता जगले आहेत. पुजारी यांच्या काव्यांमधून निसर्गाविषयी सखोल ज्ञान मिळणार असल्याने निसर्ग शिक्षणासाठी हा काव्यसंग्रह महत्त्वाचा ठरणार आहे.पर्यावरणाचा मोठ्या प्रमाणावर ऱ्हास जरी झाला असला तरी पुजारी यांच्या काव्यातून आशादायी चित्र निर्माण झाले आहे. पर्यावरणविषयक आणि वृक्ष लागवडीसाठी जनजागृती व्हावी या दृष्टीने हा काव्यसंग्रह निश्चितच उपयुक्त ठरेल, असा विश्वास जे. पी. त्रिपाठी यांनी व्यक्त केला.निसर्गाबद्दल संवेदनशील असलेला कवी अशा शब्दांत रामदास पुजारी यांचे संजय पठाडे यांनी कौतुक केले. प्रास्ताविक प्रा.विजय लोंढे यांनी तर स्वागत रामदास पुजारी यांनी केले. सूत्रसंचालन डॉ.स्वप्निल घाटगे यांचे होते. आभार सुप्रभा पुजारी यांनी मानले. या प्रसंगी विविध क्षेत्रातील रसिक उपस्थित होते.

सांस्कृतिक महोत्सवात पं.शौनक अभिषेकी यांचा सत्कार

पुणे:
श्री गुरुदेव दत्त  मंडळ(ट्रस्ट)तर्फे ज्येष्ठ शास्त्रीय गायक पं.शौनक अभिषेकी यांचा सत्कार करण्यात आला.  श्री गुरुदेव दत्त मंडळ(ट्रस्ट) आयोजित सांस्कृतिक महोत्सवात मंडळाचे अध्यक्ष अप्पा खिलारे, सचिव नागेश करपे, अजित सांगळे,शिरीष बोधनी, सप्रे गुरुजी यांनी हा सत्कार केला. हा कार्यक्रम दत्त जयंती निमित्त रविवारी,२४ डिसेंबर रोजी सायंकाळी कमला नेहरू पार्कजवळील दत्त मंदिरात झाला.
१९८४ मध्ये या महोत्सवाची सुरुवातच पं.जितेंद्र अभिषेकी यांच्या गायनाने झाली होती. त्या क्षणाचे दुर्मिळ छायाचित्र शौनक अभिषेकी यांना यावेळी भेट देण्यात आले. पं.जितेंद्र अभिषेकी याना  त्यावेळी साथसंगत करणारे मेघन श्रीखंडे हेही या सत्कार कार्यक्रमात उपस्थित होते. अतिरिक्त जिल्हा न्यायाधीश संजय यादव, स्वप्नील रास्ते यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.’स्वराभिषेक’ हा भावसंगीत, नाट्यसंगीतावर आधारित कार्यक्रम पं.शौनक अभिषेकी यांनी सादर केला. रसिकांनी भरभरून दाद दिली.

भिंगरी’ ‘अल्ट्रा झकास’ओटीटीवर!

मुंबई: मराठी सिनेसृष्टीच्या चंदेरी दुनियेत आपलं नाव दिमाखात गाजवून प्रेक्षकांचं मन भारावून टाकणारे अभिनेते डॉ. श्रीराम लागू आणि निळू फुले यांचा मराठी चित्रपटाच्या  सुवर्णकाळातील ‘भिंगरी’ चित्रपट २८ डिसेंबर २०२३ रोजी ‘अल्ट्रा झकास’ या मराठी ओटीटीवर येत आहे. चित्रपटात रमेश देव, सुषमा शिरोमणी, विजू खोटे आणि विक्रम गोखले हे सुप्रसिद्ध अभिनेते असून उषा मंगेशकर यांच्या आवाजातील गाणी अनुभवून प्रेक्षक जुन्या आठवणींमध्ये गुंग होणार आहेत.

चित्रपटाचे दिग्दर्शन मराठी सिनेसृष्टीतील नामवंत दिग्दर्शक दत्ता केशव यांनी केले असून कथा अभिनेत्री सुषमा शिरोमणी यांनी स्वतः लिहिली आहे. दौलतराव पाटील आणि सदा जिवाभावाचे मित्र असून सदाच्या पत्नीसोबत दौलतने संबंध ठेवल्याचे सदाला कळते. तेव्हा संतप्त झालेला सदा दौलतचा बदला घेण्याच्या नादात काय काय करतो हे चित्रटातून कळणार आहे.

“प्रेक्षकांच्या जुन्या आठवणींना उजाळा देण्यासाठी आमच्या संग्रहातील सुवर्ण चित्रपटांना अल्ट्रा झकासच्या माध्यमातून सादर करत असल्याचा आम्हाला अत्यंत आनंद होत आहे.” असे अल्ट्रा मीडिया अँड एंटरटेनमेंट प्रा.लिमिटेडचे सी.ई.ओ. श्री. सुशीलकुमार अग्रवाल म्हणाले.

सुनिल केदार यांची आमदारकी रद्द करण्याची एवढी घाई का ?: अतुल लोंढे

0

भाजपाच्या आमदार-खासदारांना एक न्याय व विरोधकांना दुसरा न्याय का ?

मुंबई, दि. २४ डिसेंबर
भारतीय जनता पक्षाचे आमदार-खासदार यांना अपात्र करण्याची वेळ येते तेव्हा सर्व कायद्यांच्या पळवाटा व सत्तेचा दुरुपयोग करुन त्यांना वाचवले जाते. कायद्यापेक्षा कोणी मोठा नाही पण सत्ताधारी भाजपाच्या आमदार, खासदारांना वेगळा न्याय दिला जातो व विरोधी पक्षांच्या नेत्यांसाठी वेगळा न्याय, अशी पद्धत सध्या रुढ झालेली दिसत आहे. माजी मंत्री व काँग्रेसचे वरिष्ठ नेते सुनिल केदार यांच्यासंदर्भात मा. न्यायालयाने जे आदेश दिले आहेत त्यांचा सन्मानच केला आहे पण त्यांची आमदारकी एवढ्या तातडीने रद्द करण्याची गरज होती का? असा सवाल महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे कमिटीचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे यांनी विचारला आहे.

यासदंर्भात प्रतिक्रिया देताना अतुले लोंढे म्हणाले की, भारतीय जनता पक्षाचे आमदार, खासदारांना एखाद्या प्रकरणात न्यायालयाने दोषी ठरवले तर त्यांना अपिल करण्याची संधी दिली जाते, त्यांना वाचवण्यासाठी सत्ताधारी पक्ष भाजपा सर्व प्रयत्न करतो पण तोच न्याय काँग्रेसच्या आमदार, खासदारांना व विरोधी पक्षांच्या लोकप्रतिनिधींना दिला जात नाही त्यांना अपिल करण्याची संधीही दिली जात नाही. मा. खासदार राहुलजी गांधी यांना खोट्या प्रकरणात दोषी ठरवताच २४ तासात त्यांची खासदारकी रद्द करुन सरकारी निवासस्थानही सोडण्यास भाग पाडले. मा. सुप्रीम कोर्टाने राहुलजी गांधी यांच्या शिक्षेस स्थगिती देत त्यांची खासदारकी नंतर बहाल केली केली.
मुजफ्फरनगरचे भाजपाचे आमदार विक्रम सैनी, खासदार कांकरिया यांना मात्र अशा पद्धतीने तात्काळ कारवाई केली नाही पण काँग्रेसच्या आमदार सुनिल केदार यांच्यावर मात्र तातडीने कारवाई करत त्यांची आमदारकी रद्द करण्यात आली आहे. विरोधी पक्षांच्या आमदार, खासदारांना एक कायदा व सत्ताधारी भाजपाला वेगळा हे योग्य नाही, संसदीय प्रक्रियेत यावर विचार झाला पाहिजे, असे लोंढे पाटील म्हणाले.

विधानसभेच्या अध्यक्षांसमोर मागील जवळपास ९ महिन्यांपासून आमदार अपात्रतेचे प्रकरण सुरु पण अजून त्यावर निकाल दिला जात नाही. मा. सुप्रिम कोर्टाने तीव्र नाराजी व्यक्त करत गंभीर ताशेरे ओढले तरिही अजून ही प्रक्रिया पूर्ण होत नाही. असंसदीय मार्गाने मिळवलेली सत्ता टिकवण्यासाठी पळवाटांचा आधार घेतला जात आहे. सुनिल केदार यांच्याबाबतीत मात्र सर्व प्रक्रिया विनाविलंब राबवली गेली, असेही लोंढे म्हणाले.

भारत नव्या आत्मविश्वासाने पुन्हा उभा राहतोय – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

0

मुंबई, दि. 24- गुलामगिरी मानसिकता झुगारून आजची भारत एका नव्या आत्मविश्वासासह पुन्हा उभा राहतोय. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली आत्मनिर्भर भारताचा नवा अविष्कार जगाला पाहावयास मिळत आहे, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबई येथील तीन दिवस सुरु असलेल्या श्रीविद्या लक्षार्चन समारोहावेळी केले.

देशाची प्रगती आणि जागतिक शांततेच्या उद्देशाने युवा चेतनातर्फे आयोजित केलेल्या श्री विद्या लक्षार्चन समारंभात प्रमुख पाहुणे म्हणून श्री. फडणवीस बोलत होते. अध्यक्षस्थानी युवा चेतनाचे राष्ट्रीय संयोजक रोहित कुमार सिंह होते.

विद्या लक्षार्चन समारंभामुळे अध्यात्मिक वातावरण निर्माण झाल्याचे सांगून आणि उपस्थित संतांचे स्वागत करून श्री. फडणवीस म्हणाले, भारत पुन्हा एकदा आपली हरवलेली अस्मिता परत मिळवताना दिसतोय. एकेकाळी भारत जगाला विचार देत होता. विचाराबरोबर व्यवहार आणि व्यापारात तसेच सामरिक ताकदीमध्येही भारत जगात अग्रेसर होता. परंतु तो हळुहळू गुलामीच्या साखळदंडात जखडत गेला. विचारांच्या गुलामगिरीमुळे देशाची अधोगती झाली. अलीकडच्या काही वर्षांमध्ये त्यावर मात करून भारत नव्या आत्मविश्वासाने उभा राहत आहे. सनातन विचार देशात पुन्हा एकदा प्रस्थापित होत आहेत. नित्यनूतन असा हा सनातन विचार आहे. सनातन म्हणजे जो कधीही समाप्त होऊ शकत नाही. आपण पुन्हा एकदा आपल्या सुवर्णकाळाकडे वळत असल्याचेच हे निदर्शक आहे.

उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी २०४७ मध्ये विकसित भारताचे स्वप्न पाहिले आहे. हा विकसित भारत म्हणजे रामराज्य होय. राजाला जे स्थान असेल तेच स्थान रामराज्यात तळातल्या माणसाला असते, असे रामराज्य प्रस्थापित करण्याला आपले प्राधान्य आहे. येत्या २२ जानेवारीला आपण रामलल्लाची जन्मस्थानी प्रतिष्ठापना करीत आहोत, हा देशवासीयांसाठी भावूक करणारा क्षण आहे. सनातन धर्माचे विश्वरूप आपल्याला राम मंदिराच्या पुनर्निर्माणात पाहायला मिळेल. ही आत्मविश्वासाची नवी सुरुवात असून त्यानंतर मागे वळून पाहावे लागणार नाही.

राज्य मागासवर्ग आयोगाचे अध्यक्ष निवृत्त न्या. सुनील शुक्रे, स्वामी अभिषेक ब्रह्मचारी आदी यावेळी उपस्थित होते.

मुंबईला ड्रग्जच्या विळख्यातून पूर्णपणे बाहेर काढण्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आवाहन

0

मुंबई, दि. २४ : आपली पुढची पिढी सुरक्षित ठेवायची असेल तर आपल्याला ड्रग्ज विरोधात मोठा लढा लढावा लागेल. आपल्याला मुंबईला ड्रग्जच्या विळख्यातून पूर्णपणे बाहेर काढायचे आहे. म्हणूनच ‘ड्रग्ज फ्री मुंबई’ करण्याचे आपले सर्वांचे एकच लक्ष आहे, असे आवाहन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सर्व पोलीस अधिकारी आणि कर्मचारी यांना केले.

मुंबई पोलीस आणि सोनी एंटरटेनमेंट टेलिव्हिजन यांच्यावतीने शनिवारी रात्री वांद्रे कुर्ला संकुल येथील जीओ कन्व्हेंशन सेंटर येथे आयोजित करण्यात आलेल्या ‘उमंग २०२३’ या सांस्कृतिक कार्यक्रमात उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस बोलत होते. या कार्यक्रमास मुंबई पोलीस आयुक्त विवेक फणसळकर, मुंबईचे विशेष पोलीस आयुक्त देवेन भारती, वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी, वरिष्ठ पोलीस अधिकारी, चित्रपट क्षेत्रातील कलाकार, संगीतकार, दिग्दर्शक आदी मान्यवर उपस्थित होते.

उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले, देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईला सुरक्षित ठेवण्याचे  कार्य आपणाकडून होत आहे. मुंबई शहर सर्वात सुरक्षित शहर ही ओळख करून देण्याचे काम मुंबई पोलीस करतात. मुंबई पोलीस आणि त्यांच्या परिवारासाठी चित्रपट क्षेत्रातील कलावंत वर्षातून एकदा उमंग या सांस्कृतिक कार्यक्रमातून मनोरंजन करतात, याबद्दल सर्व कलाकारांचे त्यांनी आभार मानले.

मुंबईला ड्रग्जच्या विळख्यातून पूर्णपणे बाहेर काढायचे आहे. आपल्याला ड्रग्ज विरोधात लढा लढावा लागेल. मुंबई पोलिसांनी हा लढा सुरू केला आहे. तो आपल्याला जिंकायचा आहे आणि त्याकरीता तुमची सर्वांची मदत, श्रम आवश्यक आहेत असे सांगून तुम्ही हे निश्चित करून दाखवाल, असा विश्वास उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी व्यक्त केला. पोलीस आमच्यासाठी अहोरात्र काम करतात, त्यांच्यासाठी ज्या ज्या गोष्टी करता येतील ती प्रत्येक गोष्ट करण्याकरिता शासन नेहमीच अग्रेसर राहील, असे त्यांनी यावेळी सांगितले.

000

यशस्वी उद्योगासाठी गुणवत्ता, ग्राहककेंद्री दृष्टीकोन गरजेचा-

विद्यार्थी साहाय्यक समितीच्या उद्योजकता विकास केंद्रातर्फे आयोजित उद्योजकता परिषदेत तज्ज्ञांचा सल्ला

पुणे : “ग्राहकाला केंद्रस्थानी ठेवून त्याच्या गरजा ओळखून गुणवत्ता, विश्वासार्हता जपत उत्पादन अथवा सेवा पुरविली, तर उद्योग यशस्वी होतो. समस्याभिमुख उद्योग सुरु करण्यावर भर हवा. ग्रामीण भागात उद्योग-व्यवसायाच्या मोठ्या संधी उपलब्ध आहे. बाजारपेठेचा अभ्यास करून पूरक उद्योग सुरु करावेत. नोकरी मागण्यापेक्षा नोकऱ्या निर्माण करण्याचा दृष्टीकोन ठेवावा,” असा सल्ला तज्ज्ञांनी दिला.

विद्यार्थी साहाय्यक समितीच्या उद्योजकता विकास केंद्रातर्फे आयोजित उद्योजकता परिषदेत दास ऑफशोर लिमिटेडचे अशोक खाडे, सह्याद्री फार्मचे विलास शिंदे, मार्क लॅब्स प्रायव्हेट लिमिटेडच्या व्यवस्थापकीय संचालक डॉ. वसुधा केसकर यांनी विद्यार्थ्यांना उद्योगांसाठी प्रेरित केले. या तिघांचाही औद्योगिक प्रवास ऐकून विद्यार्थी भारावून गेले.

सेनापती बापट रस्त्यावरील देवांग मेहता सभागृहात झालेल्या उद्योजकता परिषदेच्या अध्यक्षस्थानी विद्यार्थी साहाय्यक समितीचे अध्यक्ष प्रतापराव पवार होते. प्रसंगी समितीचे कार्यकारी विश्वस्त तुषार रंजनकर, विश्वस्त तुकाराम गायकवाड, ज्योती गोगटे, रत्नाकर मते, भाऊसाहेब जाधव, मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत कुलकर्णी, कार्यकर्त्या सुप्रिया केळवकर, उद्योजकता विकास केंद्राचे प्रमुख सुरेश उमाप आदी उपस्थित होते. समितीचे आजी-माजी विद्यार्थी, उद्योजक या परिषदेत सहभागी झाले.

अशोक खाडे म्हणाले, “उद्योग सुरु करण्यापूर्वी त्या क्षेत्राचा अनुभव, सखोल ज्ञान घ्यावे. समर्पित भावनेतून, झपाटून काम करावे. आपल्या क्षमता, कमतरता, धोके आणि संधी याचा सातत्याने मागोवा घेत राहावा. कामातील गुणवत्ता, दूर दृष्टीकोन, योग्य नियोजन आणि समर्पण तुम्हाला यशाकडे नेते. रोजनिशी लिहा. अपयशावर मात करण्याचे कौशल्य आत्मसात करा. ग्रामीण भागातील व्यवसायाच्या संधी शोधून त्यावर काम करा. शेतीपूरक व्यवसाय काळाची गरज आहे.”

विलास शिंदे म्हणाले, “ग्रामीण भागात जितक्या अधिक समस्या, तितक्या अधिक उद्योगांच्या संधी आहेत. नोकऱ्यांचे कमी होत असलेले प्रमाण, तंत्रज्ञानाचा होणारा अंतर्भाव यामुळे पुढील काळात स्वयंरोजगार, व्यवसाय व उद्योग करण्यावर भर द्यायला हवा. गुणवत्ता आणि क्षमता चांगली असेल, तर छोट्या कल्पनेतून मोठा उद्योग उभारता येतो. शेतकऱ्यांनी मानसिकता बदलून शेतीकडे व्यवसाय म्हणून पाहावे.”

डॉ. वसुधा केसकर म्हणाल्या, “ग्राहकांच्या तक्रारी आपल्या कामातील सुधारणा असतात. त्याकडे सकारात्मक पाहायला हवे. उद्योग सुरु करताना, वाढवताना अनेक अडचणी येतात. त्यावर मात करून खंबीरपणे सकारात्मक विचारांनी पुढे जावे. उद्योगांच्या नव्या संधींचा मागोवा घेऊन, आपण काय करू शकतो, हा विचार करावा. उद्योजकता हाच पुढील काळातील करिअरचा शाश्वत पर्याय आहे.

प्रतापराव पवार म्हणाले, “जोखीम पत्करण्याची तयारी नसल्याने मराठी माणूस उद्योगांत मागे पडतो. संकटाऐवजी संधींकडे पहा. भांडवल, वारसा यापेक्षाही व्यवसायातील शहाणपण अधिक महत्वाचे असते. ग्राहकांशी संवाद ठेवून त्यांच्या अडचणी, उत्पादन वा सेवेविषयी अभिप्राय जाणून घ्यायला हवा. उद्योगात सातत्य, चिकाटी, गुणवत्ता, वेगळेपण आणि ग्राहकांच्या गरजा पूर्ण करण्याची क्षमता असावी.”

यावेळी युवा उद्योजकांच्या चर्चासत्राचे, तसेच मुलाखतीचे आयोजन केले होते. समितीच्या वार्षिक दिनदर्शिकेचे प्रकाशनही यावेळी झाले. सुरेश उमाप यांनी प्रास्ताविकात परिषदेच्या आयोजनामागील भूमिका स्पष्ट केली. अंगारकी मांडे हिने सूत्रसंचालन केले. रत्नाकर मते यांनी आभार मानले.

तर भारत महासत्ता आणि विश्व गुरू होईल – पद्मश्री गिरीश प्रभुणे

एच. ए. स्कूलचे हीरक महोत्सवी वर्षानिमित्त विविध कार्यक्रम

पुणे (दि.२४ डिसेंबर २०२३) मेकॉलेची शिक्षण पद्धती ही ब्रिटिशांचे अनुकरण करणारी आणि गुलाम घडवणारी आहे. या शिक्षण पद्धतीमुळे भारताच्या संस्कृती आणि जुन्या परंपरेवर आक्रमण झाले आहे. यामध्ये बदल करण्याची नितांत गरज आहे. भारताला मेकॉलेच्या शिक्षण पद्धतीतून बाहेर काढण्यासाठी नव्या शिक्षण पद्धतीचा अवलंब केला, तरच भारत महासत्ता आणि विश्वगुरू होईल. या शिक्षण व्यवस्थेत खूप दोष आहेत. आपल्याला पुन्हा समृद्ध भारत घडवायचा आहे. त्यासाठी गुलाम घडवण्याऐवजी नव्या शिक्षण पद्धतीतून ‘माणूस’ घडविला पाहिजे असे प्रतिपादन पद्मश्री गिरीश प्रभुणे यांनी केले.
पिंपरी चिंचवड शहरातील नामांकित हिंदुस्थान अँटिबायोटिक्स स्कूलची स्थापना २० जुलै १९५८ रोजी भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या हस्ते झाली होती. शाळेच्या हीरक महोत्सवी वर्षानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमाचे उद्घाटन शुक्रवारी प्रभुणे यांच्या हस्ते करण्यात आले. कला, विज्ञान, शैक्षणिक प्रदर्शनाचे उद्घाटन उद्योजक जयदेव अक्कलकोटे यांच्या हस्ते करण्यात आले. तसेच प्राथमिक विभागाचे पारितोषिक वितरण माजी विद्यार्थी व कामगार नेते डॉ. कैलास कदम आणि माध्यमिक विभागाचे पारितोषिक वितरण उद्योजक अक्कलकोटे यांच्या हस्ते करण्यात आले.
तसेच मागील काळात शाळेच्या विकासात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या आजी-माजी शिक्षक आणि समाजाच्या विविध क्षेत्रात, केंद्र आणि राज्य सरकारमध्ये, शिक्षण, कला, क्रीडा, सांस्कृतिक, आरोग्य, पर्यावरण, राजकारण, कामगार अशा विविध क्षेत्रात ज्या माजी विद्यार्थ्यांनी नावलौकिक मिळविला आहे. त्यांचा प्रभुणे यांच्या हस्ते स्मृती चिन्ह, शाल, श्रीफळ देऊन गौरव करण्यात आला.
यावेळी संस्थेचे अध्यक्ष डॉ. शरद कुंटे, सचिव धनंजय कुलकर्णी, मिलिंद कांबळे, डॉ. शरद आगरखेडकर, डॉ. सविता केळकर, शाळा समिती अध्यक्ष खेमराज रणपिसे, मुख्याध्यापक सुनील शिवले, उपमुख्याध्यापिका दीपा अभ्यंकर, आणि हिंदुस्थान अँटिबायोटिक्स स्कूल माजी विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष शशांक परमाणे, उपाध्यक्ष गणेश गांवकर, सचिव आशिष म्हसे, समन्वयक मोहन बाबर, अशोक थोरात, विद्यार्थी प्रतिनिधी निखिल साबळे, आर्या मोटे, शिक्षक प्रतिनिधी रमेश गाढवे, उप कार्याध्यक्ष श्वेता नाईक, पालक शिक्षक संघ उपाध्यक्ष समाधान गेजगे आणि शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, पालक, माजी विद्यार्थी उपस्थित होते.
यावेळी प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते स्मरणिकेचे प्रकाशन करण्यात आले.
प्रभुणे म्हणाले की, पिंपरी चिंचवड शहराचे नाव उद्योग क्षेत्रामुळे जागतिक पातळीवर पोहोचले आहे. यामध्ये हिंदुस्तान अँटिबायोटिक्स शाळेच्या माजी विद्यार्थ्यांचा मोठा वाटा आहे.
दीपा अभ्यंकर यांनी मागील काळात शाळेच्या कामगिरीचा आढावा घेतला.
स्वागत व प्रास्ताविक मुख्याध्यापक श्री.सुनील शिवले, जगदीश पवार, सूत्र संचालन आणि आभार रमेश गाढवे यांनी मानले.

विजयस्तंभ अभिवादन दिनी बार्टी उभारणार ३०० पुस्तक स्टाॕलचे दालन

पुणे, दि. २४: पेरणे फाटा येथे १ जानेवारी रोजीच्या विजयस्तंभ अभिवादन सोहळ्यासाठी येणाऱ्या सर्व अनुयायांना प्रशासनाच्यावतीने सर्व सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. त्याचबरोबर बार्टीतर्फे पुस्तक महोत्सवाचे आयोजन करण्यात येणार असून वाचन प्रेमींसाठी ३०० पुस्तक स्टाॕल उभारण्यात येणार आहेत, अशी माहिती बार्टी संस्थेचे महासंचालक सुनिल वारे यांनी दिली.

श्री.वारे , विभागप्रमुख डॉ. सत्येंद्रनाथ चव्हाण यांनी प्रशासनाच्यावतीने अनुयायांना उपलब्ध करून देण्यात येणाऱ्या सुविधांचा आढावा घेतला. येणाऱ्या अनुयायांच्या अभिवादनाचे नियोजन, प्रशासनाच्यावतीने उपलब्ध करून देण्यात येणाऱ्या सुविधा, पार्किंगचे नियोजन, अनुयायांना विश्रांतीसाठी निवारा इत्यादींचा आढावा घेतला. बार्टीच्यावतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या ‘द प्रॉब्लेम ऑफ रुपी’ या ग्रंथाच्या शताब्दी वर्षानिमित्त विजयस्तंभच्या पाठीमागील भव्य जागेत डॉ. बाबासाहेब आंबेडकर व इतर महापुरुषांच्या जीवनावरील मौल्यवान पुस्तकाचे दालन अनुयायांना उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

यावेळी अंतर्गत रस्ते, बॅरीगेट, प्रसिद्धी माध्यमांची स्वतंत्र व्यवस्था, भिखु संघ, समता सैनिक दल , महार रेजिमेंटची मानवंदना, हिरकणी कक्ष, पोलिस मदत व नियंत्रण कक्ष, पिण्याचे पाणी, शौचालयाची व्यवस्था, स्वच्छतेचे नियोजन आदी सुविधांचा त्यांनी आढावा घेतला.

यावेळी विविध पक्ष संघटनांचे पदाधिकारी आणि भिमा कोरेगाव विजयस्तंभ परिसरातील लोकप्रतिनिधी, ग्रामस्थ उपस्थित होते.

काहींनी 38व्या वर्षीच वसंतदादांना बाजूला सारलं:अन् मी 60व्या वर्षी वेगळी भूमिका घेतली; अजितदादांचा शरद पवारांना टोला

इकडे पण तिकडे पण असे करू नका जे माझ्यासोबत आले त्यांना मी दमदाटी केली का? प्रत्येकाचा एक उमेदीचा काळ असतोनरेंद्र मोदी यांच्याइतके कणखर दुसरे नेतृत्व नाही.

बारामती-मी 60 वर्षाचा झाल्यावर वेगळी भूमिका घेतली. काहींनी 38 व्या वर्षी वसंत दादांना मागे सारलं असे विधान करुन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शरद पवारांना टोला लगावला. तुम्ही 40 च्या आत निर्णय घेतला, मी तर 60 च्या नंतर निर्णय घेतला. त्यामुळे तुम्ही मला समजून घ्या, असे अजित पवार म्हणाले. बारामतीत झालेल्या राष्ट्रवादीच्या (अजित गट) कार्यकर्ता मेळाव्यात ते मार्गदर्शन करत होते.

अजित दादा पुढे बोलताना म्हणाले की, मी मागेही सांगितले आहे की काळ बदलत असतो. एक वर्ष चर्चा सुरु होती. मी घेतलेला निर्णय योग्य होता म्हणून इतकी लोकं माझ्यामागे आली असल्याचे अजित पवार म्हणाले. मी त्यांना काय दमदाटी केली का? भुजबळ, हसन मुश्रीफ, धनंजय मुंडे आपल्यासोबत आल्याचे अजित पवार म्हणाले. सत्तेचा फायदा आपल्याला होतोय. आजूबाजूच्या तालुक्याची आणि आपली परिस्थिती बघा असे अजित पवार म्हणाले.

अजित पवार या प्रसंगी बोलताना म्हणाले की, आता इथून पुढं फक्त माझं ऐका बाकी कोणाचं एकू नका असेही अजित पवार म्हणाले. इतके वर्ष बाकीच्यांचं खूप एकल्याचे अजित पवार म्हणाले. मी तुम्हाला असं काही करुन दाखवतो असेही अजित पवार म्हणाले.

अजित पवार म्हणाले की, प्रत्येकाचा एक उमेदीचा काळ असतो. आम्ही आत्तापर्यंत वरिष्ठांनी सांगेल तसेच काम करत आलो. 1967 ला बारामतीमधून नवीन नेतृत्व (शरद पवार) 17000 मतांनी निवडून आले. 1972 ला 34,000 ने निवडून आले. 1978 साली 18000 ने निवडून आले. नंतर 1980 साली 25000 निवडून आले. त्यानंतर 1985 ला 18000 आले. 1987 नंतर ती जागा 1 लाख मतांनी निवडून येऊ लागल्याचे अजित पवार म्हणाले. मलाही खासदार म्हणून साडेतीन लाखांनी तुम्ही निवडून दिल्याचे अजित पवार म्हणाले.

तुम्ही मला आजपर्यंत भरभरुन आशिर्वाद दिले आहेत. आता तुम्हाला एक निर्णय घ्यावा लागेल. इकडं पण तिकडं पण चालणार नाही. ज्यांना माझ्याकडे यायचे त्यांनी यावं असे अजित पवार म्हणाले. मी जे काही करेल त्या बारामतीकरांच्या हिताच्याच घेईल. देशपातळीवर नरेंद्र मोदी यांच्याइतके कणखर दुसरे नेतृत्व नाही.

शनिशिंगणापूरचे कर्मचारी सोमवारपासून संपावर:नाताळच्या सुट्टीत भाविकांची गैरसोय?

0

शनिशिंगणापूर देवस्थान ट्रस्टच्या कर्मचाऱ्यांची आणि ट्रस्टची चौथी बैठकही निष्फळ ठरल्याने कर्मचाऱ्यांनी सोमवारपासून संपावर जाण्याचा निश्चय केला आहे. अनुभव आणि शैक्षणिक पात्रतेनुसार पदनिश्चिती करावी, कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू करावा यासह विविध 10 मागण्या कर्मचाऱ्यांनी केल्या होत्या. त्यातील किरकोळ मागण्या या देवस्थान ट्रस्टकडून पूर्ण करू असे आश्वासन देण्यात आले आहे. मात्र मुख्य दोन मागण्या मान्य होत नसल्याने कर्मचारी आपल्या संपावर ठाम आहेत.

काय आहेत मागण्या?

  • कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू करावा.
  • अनुकंपा तत्वावर वारसास नोकरी मिळण्यात यावी.
  • वेतनश्रेणीनुसार 2003 ते 2023 फरक अदा करावा.
  • निवृत्तीचे वय 58 वरून 60 करावे कर्मचाऱ्यांचे अनुभव शैक्षणिक पात्रतेनुसार हुदा पदनिश्चिती लागू करावी.
  • कर्मचाऱ्यांना व कुटुंबातील व्यक्तींना आरोग्य सेवा मोफत मिळावे.

अशा विविध मागण्यासाठी दिनांक 25 डिसेंबर पासून मंदिरातील जवळपास साडेतीनशे कर्मचारी बेमुदत संपावर जात आहेत याच दिवशी नगर येथील निवासी जिल्हाधिकारी कार्यालयावर सर्व कर्मचारी मोर्चा करणार असून महा मुक्काम करण्याचे पत्र देवस्थान युनियन कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष श्यामसुंदर रामदास शिंदे उपाध्यक्ष अनिल सोपान शेटे यांनी दिली. साडेतीनशे ते चारशे एवढ्या मोठ्या प्रमाणात कर्मचाऱ्यांनी पहिल्यांदाच विविध मागण्यासाठी संपाची हाक दिल्याने येथील प्रशासनाचे धाबे दणाणले आहेत.

शनिशिंगणापूर देवस्थानचे सर्व कर्मचारी येत्या दिनांक 25 डिसेंबर पासून विविध मागण्यांसाठी संपावर जाणार आहेत. या संदर्भात देवस्थानच्या कामगार युनियनच्या वतीनं देवस्थानच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आलं आहे. या निवेदनात 25 मागण्या करण्यात आल्या आहेत. त्यापैकी 10 मागण्यांवर कर्मचारी ठाम आहेत.

मुंबई उच्च न्यायालयाकडून खून खटल्यातील आरोपीला जामीन मंजूर

पुणे: गाडीचा धक्का लागल्याच्या कारणावरून वाद होऊन पाच जणांच्या टोळक्याने तरुणावर ०३ ऑगस्ट २०२२ रोजी रात्री पालघनने वार करून खून केल्याची घटना पुणे येथील कोंढवा परिसरात घडली होती. यामध्ये महेश लक्ष्मण गुजर या तरुणाचा मृत्यू झाला होता. याप्रकरणी आरोपी अमर कैलास गव्हाणे यांच्यावर पोलिसांनी गुन्हा दाखल करत अटक केली होती.

या प्रकरणी सोनी गुजर यांनी कोंढवा पोलिस ठाण्यात फिर्याद दिली होती. कोंढवा पोलिसांनी या घटनेची गंभीर दाखल घेऊन पाच जणांवर गेल्यावर्षी चार ऑगस्ट रोजी गुन्हा दाखल करून आरोपींना अटक केली होती. फिर्यादी सोनी गुजर आणि आरोपी अमर कैलास गव्हाणे शिवनेरी नगर परिसरात राहतात. काही दिवसांपूर्वी महेश गुजर यांच्या गाडीचा धक्का आरोपी अमर कैलास गव्हाणे याला लागला होता. त्याचा राग मनात धरून आरोपींनी महेश गुजर याच्यावर पालघनने वार केले. यामध्ये गंभीर जखमी झाल्याने त्याचा मृत्यू झाला होता. अशी बाब तपासात निदर्शनास आली. या प्रकरणातील आरोपी अमर कैलास गव्हाणे यांनी मुंबई उच्च न्यायालयातील वकील ॲड. अनिकेत निकम यांच्यामार्फत जामिनासाठी अर्ज दाखल केला होता. सदर प्रकरणात ॲड. अनिकेत निकम यांना पुणे जिल्हा व सत्र न्यायालयातील ॲड. सुधीर पाटील यांनी सहकार्य केले.

या प्रकरणात ॲड. अनिकेत निकम यांनी मुंबई उच्च न्यायालयात न्यायमूर्ती मकरंद कर्णिक यांच्यापुढे युक्तिवाद करताना कोर्टाच्या निदर्शनास आणून दिले की, गेल्या सोळा महिन्यांपासून पासून आरोपी हा तुरुंगात आहे. परंतु अदयापही खटला सत्र न्यायालयात प्रलंबित आहे. त्याच बरोबर आरोपीने प्रत्यक्ष मारहाण केलेली नाही. केवळ सह-आरोपीच्या जबाबावरून आरोपीला गंभीर गुन्ह्यात गुंतविले आहे. ॲड. अनिकेत निकम यांनी साक्षीदारांच्या जबाबामध्ये असणारी विभिन्नता आणि विसंगती उच्च न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिली. त्याचप्रमाणे आरोपीकडून कोणतीही वस्तू/हत्यार जप्त करण्यात आलेले नाही तसेच आरोपीचा यापूर्वी कोणत्याही गुन्ह्यात सहभाग नसल्याचा व तशी कोणतीही गुन्हेगारी पार्श्वभूमी नसल्याचे न्यायालयाच्या निदर्शनास आणुन दिले.

सरकारी वकिलांनी आरोपीच्या जामीन अर्जाला तीव्र विरोध करताना कोर्टापुढे युक्तिवाद केला की, आरोपीला यापूर्वी तडीपार करण्यात आलेले होते. तसेच आरोपी हा प्रत्यक्ष घटनास्थळावर होता हे सी.सी.टी.व्ही. मधून दिसून येते. त्यामुळे आरोपीचा जामीन अर्ज फेटाळण्यात यावा, अशी मागणी केली. मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती मकरंद कर्णिक यांच्या खंडपीठाने दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकून ॲड. अनिकेत निकम यांचा युक्तिवाद ग्राह्य धरून आरोपी अमर गव्हाणे याला अटी व शर्तीवर जामीन मंजूर केला.

१३८ व्या वर्धापन दिनानिमित्त पुणे काँग्रेसच्या वतीने सायकल रॅली

पुणे-अखिल भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या १३८ व्या वर्धापन दिनानिमित्त पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने आज रविवार दि. २४/१२/२०२३ रोजी सकाळी देशभक्त केशवराव जेधे पुतळा, स्वारगेट ते काँग्रेस भवन पर्यंत ‘‘सायकल रॅली’’ काढण्यात आली. यावेळी पुणे शहरातील महापुरूषांच्या पुतळ्यांसमोर रांगोळी काढून त्यांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

     सदर सायकल रॅलीमध्य महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस ॲड. अभय छाजेड, दिप्ती चवधरी, सिमा सावंत, सतिश पवार, भरत सुराणा, रवि ननावरे, हेमंत राजभोज, विशाल जाधव, रमेश सोनकांबळे, शिलार रतनगिरी, अरूण कटारिया, अनुसया गायकवाड, योगिता सुराणा, शारदा वीर, आशितोष शिंदे, राज घेलोत, नरसिंह आंदोली आदींसह काँग्रेस कार्येकर्ते सहभागी झाले होते. 

पुढील पिढीला संस्कारक्षम करण्यासाठी ‘संस्कृतभाषा’ आत्मसात करा

 संस्कृतभारतीचे प्रांतमंत्री विनय दुनाखे यांचे आवाहन

पुणे ः संस्कृत ही जगातील सर्वात प्राचीन, समृद्ध, अभिजात आणि शास्त्रीय भाषा आहे. संस्कृतभाषेचे ज्ञानभाषा म्हणून असलेले महत्त्व आजही कायम आहे. आयुर्वेद, गणित, विज्ञान, खगोलशास्त्र, कृषीशास्त्राचे मूलभूत ज्ञानभंडार संस्कृतमध्ये उपलब्ध आहे. जगभरातील अनेक विद्यापीठात संस्कृत ग्रंथ आहेत, याचा अभ्यासदेखील केला जातो. आपल्या पुढील पिढीला संस्कारक्षम करण्यासाठी संस्कृत भाषेचा प्रचार-प्रसार केला पाहिजे. संस्कृत भाषेचे ज्ञान आपण घेतले पाहिजे, असे आवाहन संस्कृतभारतीचे प्रांतमंत्री विनय दुनाखे यांनी केले.संस्कृतभारती संस्थेतर्फे आयोजित संस्कृत संमेलन कात्रज येथील माऊली गार्डन येथे पार पाडले. संमेलनाचे उदघाटन माजी नगरसेविका मनीषा कदम यांच्या हस्ते  झाले. त्यावेळी दुनाखे बोलत होते. संमेलनाचे स्वागताध्यक्ष म्हणून जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते राजाभाऊ कदम यावेळी उपस्थित होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून संस्कृतभारतीचे प्रांतमंत्री विनय दुनाखे, प्रांतध्यक्ष निवृत्त कर्नल सतीश परांजपे, डॉ. रामचंद्र सिधये, संस्कृत भारती कात्रज विभागाच्या संयोजिका मुक्ता मराठे यांच्यासह आदी पदाधिकारी उपस्थित होते. याप्रसंगी संस्कृतभारती संस्थेचे ‘शिवकल्याणराजा’ स्मरणकिचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते झाले. छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्यभिषेकाला साडेतीनशे वर्षे पूर्ण झाली. त्यानिमित्त छत्रपती शिवाजी महराजांचे स्वभाषा अर्थात संस्कृत, स्वराज्य पद्धती, महसूलाचे नियम, स्वधर्म या विषयांवर स्मरणिकेत लेख आहेत.प्रारंभी दीपप्रज्वलन व भारत मातेचे पूजन करून मान्यवरांच्या हस्ते उदघाटन झाले. संमेलनची  सुरुवात संस्कृत गीताने झाली. दुनाखे म्हणाले, आपण सर्वांनी संस्कृभाषा शिकली पाहिजे. त्याचबरोब प्रचार-प्रसार करण्याठी पुढाकार घेतला पाहिजे. भारतात एक कोटीहून अधिक लोक संस्कृतमध्ये बोलतात. संस्कृत जनभाषा होण्यासाठी आपण सर्वांनी शिकण्यासाठी  प्रयत्न करावा. संस्कृत ही भारतीय प्राचीन भाषा सरळ, सोप्या अशा स्वरूपात जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचणे आवश्यक आहे.  संस्कृत भाषा संवर्धनासाठी संस्कृतभारती ही संस्था गेल्या 45 वर्षांपासून निरंतर कार्यरत आहे. संस्कृत शिकण्याची इच्छा असणार्‍या प्रौढांसाठी 10 दिवसांचे संस्कृत संभाषण शिबिर, पत्राचारद्वारा संस्कृतशिक्षण योजना, गीतेच्या माध्यमातून संस्कृत व्याकरणाचे शिक्षण तर लहान मुलांसाठी बालकेंद्र, सरला संस्कृत परीक्षा, प्रथमकक्षातः संस्कृतशिक्षणम् असे विविध वर्ग, उपक्रम संस्कृतभारती द्वारा राबविण्यात येतात. याच कार्याचा एक सर्वसमावेशक उपक्रम म्हणजे हे संमेलन आहे.पश्‍चिम महाराष्ट्र प्रातांमध्ये 17 जिल्ह्यांमध्ये संमेलनाचे आयोजित करण्यात आले आहे. चिन्मय मिशन, रामदेव महाराज, ईस्कॉन मंदिर, डेक्कन एज्युकेशन सोसायटी महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी यासह अनेक संस्थांचा यात समावेश असल्याचे यावेळी दुनाखे यांनी सांगितले.संत सेवा संघाच्या प्रतिभा घुबे यांचे ’संत साहित्यावरील संस्कृतचा प्रभाव’  या विषयावर व्याख्यान झाले. त्या म्हणाल्या, जगातील सर्व भाषचे जननी संस्कृत भाषा आहे. ऋषीमुनींनी आयुर्वेदात संशोधन केले. संस्कृत या शास्त्रीय भाषेत त्यांनी संशोधन केले. संत साहित्यावर संस्कृत भाषेचा पगडा होता. संत ज्ञानेश्वर महाराज प्रत्येक कामाची सुरुवात संस्कृत भाषेत आपल्या गुरूंची आराधना करुन केली. आपल्या पूर्वजांनी संस्कृत भाषेचे व्यवहार केले आहे. ही भाषा जीवन व्यवहारात आणू, असा संकल्प करू, असे आवाहन यावेळी त्यांनी केले. डोळे उघडे करून संस्कृत भाषा आत्मसात करा, असेही यावेळी त्या म्हणाले.निवृत्त कर्नल सतीश परांजपे यांचे ‘भगवद्गीता आणि आपले जीवन’ या विषयावर व्याख्यान झाले. ते म्हणाले, भगवद्गीता आदर्श आणि तत्वचिंतक ग्रंथ आहे. आपल्या अडचणीवर मात कशी करायची यात आदर्श तत्वे सांगण्यात आली आहे. तत्वज्ञानाचा स्तोत्र म्हणून या ग्रंथाकडे पाहिले जाते. समाज स्वास्थ्य, नीतिमत्ता वाढविण्याठी भगवद्गीतेचा अभ्यास केला पाहिजे, असेही यावेळी ते म्हणाले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक सहसंयोजिका यामिनी वेलणकर यांनी केले. संस्कृतभारती संस्थेच्या कार्याचा आढावा यावेळी त्यांनी सांगितला. सूत्रसंचालन अमिता जोशी यांनी केले. तर मुक्ता मराठे यांनी आभार मानले.संस्कृत भाषेचा प्रसार व्हावा आणि संस्कृत शिकण्याची इच्छा असणार्‍या सर्व वयोगटातील लोकांना संस्कृतविषयक विविध वर्गांची, शिबिरांची, उपक्रमांची माहिती संमेलनात देण्यात आली. त्याचबरोबर अनेक संस्कृत तज्ज्ञांचे मार्गदर्शन, संस्कृतविषयक व्याख्याने, संस्कृतमधून संभाषण, गीतगायन, प्रदर्शनी, भाषा क्रीडा, इत्यादी विविध कार्यक्रम पार पडली. संमेलनाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. तसेच संस्कृतविषयक पुस्तक विक्री केंद्रला नागरिकांचा प्रतिसाद मिळाला. पुण्यातील कात्रज परिसरात संस्कृतप्रेमींसाठी दिवसभराचे विशेष शिबिर घेण्यात आले.