उद्धव ठाकरे हे साधे आमदार आहेत. त्यांना अयोध्येतील सोहळ्याला बोलावण्याचे कारण काय? असे राज्याचे ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी म्हंटले आहे. तसेच केंद्राला वाटेल त्यांचा व्हीव्हीआयपीच्या यादीत समावेश असेल. केंद्र सरकारच्या व्हीव्हीआयपीच्या यादीत उद्धव ठाकरे नसतील पण राज ठाकरे असतील. त्यामुळेच राज ठाकरे यांना निमंत्रण दिले असेल, असेही महाजन यांनी म्हंटले आहे.
22 जानेवारी रोजी अयोध्येतील राम मंदिर सोहळ्याला उद्धव ठाकरे यांना भाजपकडून निमंत्रण दिले जाणार नाही अशी टीका ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत करत आहेत. याच टीकेला गिरीश महाजन यांनी उत्तर दिले आहे.
उद्धव ठाकरे यांचे योगदान काय? महाजन पुढे म्हणाले, ” श्रीराम मंदिरासाठी उद्धव ठाकरे यांचे योगदान काय आहे. घरात बसून भूमिका घेणे आणि प्रत्यक्ष कारसेवा करणे यात फरक आहे. आम्ही वीस, वीस दिवस कारागृहामध्ये होतो. तेव्हा संजय राऊत आणि उद्धव ठाकरे कुठे होते? बाळासाहेब ठाकरे यांच्या भूमिकेबाबत दुमत नाही. मात्र जे बोलतायेत ते आयत्या बिळावरचे नागोबा आहेत”, असे महाजन म्हणाले. तसेच संजय राऊत आणि उद्धव ठाकरे यांनी कारसेवा केल्याचा एखादा फोटो दाखवावा असेही महाजन यांनी म्हंटले आहे.
पुणे: पुणे शहर टीडीएफ व माध्यमिक शिक्षक संघाची त्रैवार्षिक कार्यकारिणी जाहीर करण्यात आली आहे. टीडीएफच्या अध्यक्षपदी प्रा.संतोष थोरात , माध्यमिक शिक्षक संघाच्या अध्यक्षपदी प्राचार्य राज मुजावर यांची निवड करण्यात आली आहे. पुणे शहर टीडीएफ माध्यमिक शिक्षक संघाच्या पदाधिकाऱ्यांची सहविचार सभा अँग्लो उर्दू बॉईज हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज आझम कॅम्पस येथे नुकतीच पार पडली. या सभेमध्ये पुणे शहर टीडीएफ व माध्यमिक शिक्षक संघाची त्रैवार्षिक नवनिर्वाचित कार्यकारिणी घोषित करून पदाधिकाऱ्यांना मान्यवरांच्या हस्ते नियुक्तीपत्रे प्रदान करण्यात आली.
यावेळी प्राचार्य शिवाजीराव कामथे ,सचिन दुर्गाडे, संतोष थोरात, विजय कचरे यांनी पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करून भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.तसेच भविष्यात शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा समस्या सोडवण्यासाठी शासन स्तरावर प्रयत्न करणार असल्याचे नवनिर्वाचित अध्यक्ष यांनी आश्वासन दिले. यावेळी देविदास बिनवडे यांचा पुणे शहर पत्रकार संघावर निवड झाल्याबद्दल संघटनेच्या वतीने संविधान प्रत देऊन सन्मान करण्यात आला. यावेळी पुणे शहर मुख्याध्यापक संघाचे सचिव प्राचार्य शिवाजीराव कामथे सर, प्रा. सचिन दुर्गाडे, कनिष्ठ महाविद्यालय टीडीएफचे अध्यक्ष प्रा. शशिकांत शिंदे पुणे शहर टीडीएफ नवनिर्वाचित पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. पुणे शहर टीडीएफकार्यकारिणी संतोष थोरात(अध्यक्ष पुणे शहर टीडीएफ), बाबुराव दोडके(सचिव टीडीएफ), भगवान पांडेकर(कार्याध्यक्ष) दत्ता बनकर(उपाध्यक्ष), संजय सोनवणे(उपाध्यक्ष), दत्ता हेगडकर(उपाध्यक्ष), संतराम इंदुरे(सोशल मिडिया प्रमुख) माध्यमिक शिक्षक संघ कार्यकारिणी
प्राचार्य राज मुजावर(अध्यक्ष, माध्यमिक शिक्षक संघ), धोंडीबा तरटे(सचिव ),अशोक धालगडे (कार्याध्यक्ष), संजय ढवळे(उपाध्यक्ष), द्वारकानाथ दहिफळे( उपाध्यक्ष ),सुनील गिरमे (उपाध्यक्ष )
महिला टीडीएफ कार्यकारिणी हर्षा पिसाळ-(अध्यक्षा) ,डाॅ.उज्वला हातागळे (सचिव), मधुरा चौधरी(उपाध्यक्षा), कल्पना कोल्हे(उपाध्यक्षा महिला माध्यमिक शिक्षिका संघ) भारती राऊत(अध्यक्षा), डाॅ.मंगल शिंदे(सचिव), रेखा खेडेकर(सहसचिव ) विनाअनुदानित सेल कार्यकारिणी संजय कांबळे -अध्यक्ष बाळासाहेब ईमडे -कार्याध्यक्ष
पुणे, दि. २६ डिसेंबर: “देशाचा जबाबदार आणि नितिमूल्याधारित नागरिक बनविणे, विज्ञान आणि आध्यात्माच्या समन्वयातून सर्वोत्कृष्ट विद्यार्थी घडविणे तसेच विद्यार्थ्याच्या चारित्र्य संवर्धनावर आणि शिस्तीवर विशेष भर देण्याचा मुख्य उद्देश्य ठेवून ‘एमआयटी विश्वप्रयाग विद्यापीठ’( एमआयटी-व्हीपीयू) ची स्थापना करण्यात आली आहे.” असे मत उपस्थित शिक्षण तज्ज्ञांनी मांडले. माईर्स एमआयटी शिक्षण संस्था समूहाचे सोलापूर येथे नव्याने सुरू करण्यात आलेल्या ‘एमआयटी विश्वप्रयाग विद्यापीठ’ ( एमआयटी-व्हीपीयू) च्या प्रथम नियामक मंडळाची बैठक संपन्न झाली. या वेळी नागपूर येथील आयआयएमचे संचालक प्रा.भीमराया मैत्री, संकल्प सेमीकंडक्टरचे संस्थापक आणि कार्यकारी अध्यक्ष विवेक पवार, प्रिसिजन कॅमशफ्टस लि. अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक यतीन शहा उपस्थित होते. माईर्स एमआयटीचे संस्थापक अध्यक्ष विश्वधर्मी प्रा.डॉ. विश्वनाथ दा. कराड हे अध्यक्षस्थानी होते. तसेच बंगलोर येथील आयआयआयटीचे माजी संचालक प्रा.एस.सदगोपन हे ऑनलाइन उपस्थित होते. तसेच एमआयटी एडीचे कार्याध्यक्ष प्रा.डॉ. मंगेश तु. कराड, एमआयटी विश्वप्रयाग विद्यापीठाच्या कार्याध्यक्षा प्रा. स्वाती कराड चाटे, कुलगुरू प्रा.डॉ. गोपालकृष्ण जोशी व कुलसचिव डॉ. प्रणेश मुरणाल उपस्थित होते. प्रा.भीमराया मैत्री म्हणाले,”तंत्रज्ञान, संशोधन, सामजिक नवननिर्मिती, भागीदारी व विश्वशांती या तत्वाच्या आधारावर व्हीपीयू ची स्थापना झाली. देशाचा जबाबदार व नितिमूल्याधारित नागरिक बनविण्यासाठी योगदान सर्वात महत्वाचे असेल. येथे विद्येचे उच्च कोटीचे शिक्षण देण्याच्या दिशेने वाटचाल सुरू आहे.” प्रा.डॉ. विश्वनाथ दा. कराड म्हणाले,” शिक्षण हे आपल्या भविष्यासाठी आहे. त्यात देह आणि बुध्दीचा विचार आहे. दुसर्या बाजूला आत्मा आणि मन आहे. म्हणजेच कॉन्शसनेस वर शिक्षणात कार्य करावे लागेल. संत ज्ञानेश्वर महाराज, संत तुकाराम महाराज आणि स्वामी विवेकानंद यांच्या तत्वज्ञनाच्या मार्गाने जाण्याचा प्रयत्न एमआयटी विश्वप्रयाग विद्यापीठाकडून होत आहे. जगात सध्याची शिक्षण व्यवस्था आहे ती प्रगतीची परिसीमा आहे. आर्टिफिशियल इंटेलिजन्स, व्हर्च्युअल रिअॅलिटी, अॅप वगैरे शब्द आता आले. पण याचे चिंतन ज्ञानेश्वरांनी ७३० वर्षापूर्वी केले आहे.” प्रा.एस.सदगोपन म्हणाले,” भारतातील एक सर्वोत्तम शिक्षणाचे मॉडेल एमआयटी विश्वप्रयाग विद्यापीठाच्या माध्यमातून जगासमोर ठेवले आहे. शैक्षणिक क्षेत्रात भारताने नवीन दरवाजे उघडले. या क्षेत्राल नवीन दिशा आणि विश्वशांतीसाठी महत्वपूर्ण कार्याचा पाया ठेवण्यात आला आहे. येथे विद्यार्थ्यांच्या चारित्र्य संवर्धनावर आणि शिस्तीवर विशेष भर दिला जाईल.” डॉ. मंगेश तु. कराड म्हणाले,” या विद्यापीठाच्या माध्यमातून उद्योग आणि शैक्षणिक संस्था एकत्रितपणे काम करून विविधि प्रश्न, समस्या सोडविण्याचा प्रयत्न करीत. इंटर्नशिप, प्लेसमेंट, लाइव्ह प्रोजेक्ट, गेस्ट लेक्चर्स, अभ्यासक्रम, इंडस्ट्री व्हिजीट, टेक फेस्ट सेंटर अशा उपक्रमांद्वारे विद्यार्थी व एमआयटी विश्वप्रयाग विद्यापीठातील प्राध्यापकांना उद्योगामधील कामकाज, त्यासाठी आवश्यक ज्ञान आणि कौशल्यांची गरज लक्षात घेता प्रशिक्षण दिले जाईल.” प्रा.स्वाती कराड चाटे म्हणाल्या,” विद्यार्थ्यांना केवळ शिक्षण देऊन रोबोटिक निर्मिती केली जाणार नाही. तर एक चांगला मानव बनविला जाईल. त्यांना शिक्षणाबरोबरच मानवतेचे शिक्षण, अध्यात्म, नीतिमूल्य, शिस्त, चारित्र्य, जगात शांतता कशी निर्माण करता येईल यासाठी पीस सेंटर व मेडिटेशन शिकविले जाईल. सुसंस्कृत समाजनिर्मितीचा ध्यास असून मूल्याधिष्ठित वैश्विक शिक्षण देण्यात येईल.” भारतीय शिक्षण वसुधैव कुटुंबकम्, एकम् सत् विप्रा बहुधा वदन्ति अशा तत्त्वज्ञानाचे प्रतिक आहे. आताच्या शिक्षणात बदल करून त्याला मूल्यांचे अधिष्ठान असावे, तरच ते खरे शिक्षण ठरेल असे विचार यतीन शहा, प्रा.डॉ. गोपाळकृष्ण जोशी व डॉ. प्रणेश मुरणाल यांनी मांडले.
पुणे (दि. २६ डिसेंबर २०२३) निरामय जीवनासाठी आयुर्वेदाचे आचरण करावे. “हर दिन हर किसी के लिये आयुर्वेद” हे नवीन वर्षाचे केंद्रीय आयुष मंत्रालयाचे घोषवाक्य आहे. केंद्र सरकार सर्व सामान्य नागरिकांच्या आरोग्याबाबत संवेदनशील आहे. अध्यात्म आणि आयुर्वेदाचा अवलंब केला तर आरोग्य निर्देशांक उत्तम राहील असे प्रतिपादन भक्ती वेदांत आयुर्वेद हॉस्पिटल व रिसर्च सेंटर मुंबईचे आयुर्वेद विभाग प्रमुख वैद्य नानासाहेब मेमाणे यांनी केले. भोसरी येथील निर्विकार आयुर्वेद हॉस्पिटलच्या “निर्विकार आरोग्य दिनदर्शिका २०२४” चे प्रकाशन मेमाणे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी निर्विकार आयुर्वेद हॉस्पिटलचे संचालक डॉ. निलेश लोंढे, ज्येष्ठ पत्रकार जयंत जाधव, श्री मार्तंड देवस्थान जेजुरीचे विश्वस्त अनिल सौंदडे तसेच ज्ञान प्रबोधिनीचे मनोज देवळेकर, कामगार नेते सचिन लांडगे, पिंपरी चिंचवड हाउसिंग सोसायटी फेडरेशनचे अध्यक्ष संजीवन सांगळे, रोटरी क्लबचे विवेक येवले, वैद्य अरविंद कडूस, वैद्य संतोष सूर्यवंशी आणि निर्विकार हॉस्पिटलचे कर्मचारी उपस्थित होते. निर्विकार आयुर्वेद हॉस्पिटलचे संचालक डॉ. निलेश लोंढे यांनी सांगितले की, या दिनदर्शिकेचे उद्धिष्ट प्रत्येक घरात आयुर्वेदाबदद्ल माहिती पोहचावी. स्वस्थ्य व्यक्तीच्या स्वास्थ्याचे संरक्षण करणे असे आहे. दिनचर्या, ऋतुचर्या, योगाभ्यास, सणांचे आयुर्वेदिक महत्व, पौष्टिक पाककृती, प्रकृती परीक्षण,आहारीय वर्ग व त्यांचे उपयोग, शरीरातील दोष वाढण्याची कारणे व त्यांचे उपाय याविषयी सविस्तर माहिती यात देण्यात आली आहे. स्वागत, प्रास्ताविक करताना संचालिका डॉ. सारिका लोंढे यांनी सांगितले की,भोसरी येथील निर्विकार आयुर्वेद हॉस्पिटल हे १५ बेडचे अत्याधुनिक कॅशेलेस मेडिक्लेम सुविधा देणारे व राष्ट्रीय अधिस्वीकृती रुग्णालय संस्थेची मान्यता (NATIONAL ACCREDITATION BOARD OF HOSPITALS – NABH) असलेले रुग्णालय आहे. येथे सुसज्ज आंतररुग्ण विभाग, पंचकर्मासाठी ६ कक्ष,३५ अनुभवी कर्मचारी आहेत. तसेच योग व रुग्णानुसार आवश्यक असेल तर आहार योजनेची विशेष सोय केली जाते. हजारो रुग्ण आंतररुग्ण विभागात उपचार घेऊन निरामय जीवन जगत आहेत. तसेच हजारो रुग्णांचे मेडिक्लेम आजपर्यंत मंजूर झाले आहेत. सूत्र संचालन दिगंबर ढोकले आणि आभार डॉ. सारिका लोंढे यांनी मानले.
पुणे-“बात निकली हें तो दूर तक जायेगी”अशा स्पष्ट शब्दात पण तेवढ्याच प्रेमाने अगदी वादळात भरकटलेल्या नौकेला इशारा देणाऱ्या दीपस्तंभाप्रमाणे खासदार अमोल कोल्हेंनी अजितदादांना इशारा दिला आहे.
दादांचा दरारा सर्वांना माहित आहे.त्यांनी तो दरारा केंद्रात दाखवावा आणि ठामपणे सांगावे की आमचा शेतकरी संकटात आहे कांद्यावरील निर्यातबंदी तातडीने उठवा अशी टीका खासदार अमोल कोल्हे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर केली आहे.अमोल कोल्हे यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली.यावेळी ते बोलत होते.
शिरूर लोकसभा मतदारसंघात मी महायुतीचा उमेदवार निवडून आणून दाखवणार असे अजित पवार यांनी म्हंटले होते.याबाबत बोलताना अमोल कोल्हे म्हणाले की,मी सर्वसामान्य मध्यमवर्गीय कुटुंबातील आहे.एवढ्या मोठ्या उंचीच्या नेत्याने मला आव्हान देणे ही माझ्यासाठी गौरवाची बाब आहे.दादा मोठे नेते आहेत.त्यांच्याविषयी नेहमीच आदर राहील. त्यांचे हे असे विधान असेल तर भेटून मी त्यांची भूमिका समजून घेईन”, असे अमोल कोल्हे म्हणाले.
तसेच पुढे अमोल कोल्हे म्हणाले”अजितदादा हे मोठे नेते आहेत.मी 2019 मध्ये जिथे उभा होतो आजही 2023 मध्ये तिथेच उभा आहे.त्यांनी भूमिका बदलली.त्यांना कान धरण्याचा अधिकार होता मात्र सोबत होतो तेव्हाच त्यांनी माझे कान का धरले नाहीत?” असे अमोल कोल्हे म्हणाले.तसेच शिरूर मतदारसंघात दादांनी पाहणी केली.यासाठी मी त्यांचा आभारी आहे.नागरिकांसाठी हा उड्डाणपूल खुला करावा अशी मागणी 6 महिन्यांपूर्वीच दादांकडे केली होती.आता अपेक्षा आहे की, आज त्यांनी पाहणी केल्यानंतर नागरिकांच्या सोयीचा निर्णय घेतला जाईल”, असे मत देखील अमोल कोल्हे यांनी व्यक्त केले आहे.
दरम्यान,उद्यापासून 3 दिवस 30 डिसेंबरपर्यंत राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाकडून शेतकरी आक्रोश मोर्चा काढला जाणार आहे.याबाबत अमोल कोल्हे म्हणाले,शेतकऱ्यांच्या मुद्द्यावरील 6 प्रमुख मागण्या असतील.कांदा प्रश्न हा सर्वात प्रमुख मुद्दा असेल.तर 30 तारखेला जिल्हाधिकारी कार्यालायच्या परिसरात शरद पवार यांची सभा देखील होणार आहे.मविआ आघाडीच्या माध्यमातून हा मोर्चा होणार असल्याची माहिती अमोल कोल्हे यांनी दिली.
तसेच ”खासगीत झालेली चर्चा सार्वजनिक केली जात नाही. वरिष्ठ नेत्यांसोबत माझी खासगीत चर्चा झाली होती.त्यांनी ती सार्वजनिक केली असली तरी माझ्यासारख्या लहान कार्यकर्त्याने ती सार्वजनिक करणे योग्य नाही.लोकशाहीमध्ये प्रत्येकाला ताकद दाखवण्याचा अधिकार असून निर्णय मात्र जनतेकडून घेतला जातो.शिरूर मतदारसंघातील जनतेत शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्याबद्दल कृतज्ञता” असल्याचे अमोल कोल्हे यांनी यावेळी सांगितले.
मुंबई-उपमुख्यमंत्री अजित पवार पुढील 4 महिन्यांत तरुंगात जाणार असल्याचा दावा दिवंगत माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांच्या पत्नी शालिनीताई पाटील यांनी केला आहे. अजित पवार पुढील 4 महिन्यांत तुरुंगात जातील. त्यानंतर पक्षाशी कधीही विश्वासघात न करणारे देवेंद्र फडणवीस पुन्हा मुख्यमंत्रीपदी विराजमान होतील, असे त्या म्हणाल्यात. त्यांच्या या दाव्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात एकच खळबळ माजली आहे.
जरंडेश्वर कारखान्याच्या प्रकरणात आता माझा पंतप्रधान नरेंद्र मोदी व केंद्र सरकारच्या प्रभावाखाली काम करणाऱ्या ईडीवर विश्वास राहिला नाही. त्यामुळे या प्रकरणी मी आता हायकोर्टात याचिका दाखल करून अजित पवारांच्या अटकेची मागणी करणार आहे. अजित पवार यांचे मुख्यमंत्रिपदासाठी प्रयत्न सुरू असले तरी, ते पुढील 4 महिन्यांत तुरुंगात जातील, असा दावा शालिनीताई पाटील यांनी केला आहे.
अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मोठी बंडखोरी केली. त्यानंतर त्यांनी या प्रकरणी शरद पवारांना त्यांनी 1978 मध्ये वसंतदादा पाटलांविरोधात केलेल्या कथित बंडाची आठवण करून दिली. काही लोकांनी वयाच्या 38 व्या वर्षी वेगळी भूमिका घेतली होती. याऊलट आम्ही वयाच्या साठीनंतर वेगळी भूमिका घेतली, असे ते म्हणाले होते. त्यांच्या या टीकेच्या पार्श्वभूमीवर शालिनीताई पाटील यांनी त्यांच्यावर शरसंधान साधले आहे.
शालिनीताई पाटलांनी यावेळी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी देवेंद्र फडणवीस पुन्हा एकदा विराजमान होणार असल्याचा दावाही केला. अजित पवार जेलमध्ये जाणार असल्यामुळे ते मुख्यमंत्री होण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. एकनाथ शिंदेही पुन्हा मुख्यमंत्री होऊ शकणार नाहीत. कारण, त्यांना शेतकऱ्यांसह इतर प्रश्न सोडवण्यात अपयश आले आहे. त्यामुळे पक्षाचा केव्हाही विश्वासघात न करणारे देवेंद्र फडणवीस हेच नवे मुख्यमंत्री होऊ शकतात, असे शालिनीताई पाटील यांनी म्हटले आहे.
शालिनीताई पाटील यांनी यावेळी अजित पवारांनी शरद पवारांच्या बंडाशी केलेली तुलनाही चुकीची असल्याचा दावा केला. त्यांच्या मते, या दोन्ही बंडांमध्ये मुलभूत फरक आहे. शरद पवारांनी केलेले बंड हे त्यांचा पक्ष वाचवण्यासाठी केले होते. पण आता अजित पवार यांनी केलेले बंड पूर्णतः स्वार्थासाठी आहे.
मी शरद पवार यांच्यावर यापूर्वीही टीका केली. ती मी माझ्या पतीचे सरकार कोसळल्यामुळे संतापाच्या भरात केली होती. पण शरद पवार यांनी प्राप्त परिस्थितीनुसार ती भूमिका घेतली होती हे नंतर मला समजले, असेही शालिनीताई पाटील यावेळी पवारांविषयी सहानुभूती दाखवत म्हणाल्या.
पुणे, दि.२५- अटल संस्कृती गौरव पुरस्काराच्या माध्यमातून देशाला गौरव वाटेल अशा व्यक्तिमत्वांचा सन्मान करण्यात आला असून या पुरस्कार सोहळ्याच्या माध्यमातून भारतरत्न स्व.अटलबिहारी वाजपेयी यांचे विचार आणि शब्द कायम स्मरणात राहतील, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.
फडणवीस यांच्या हस्ते ज्येष्ठ गायिका पद्मविभूषण डॉ. प्रभा अत्रे यांना २०२२ साठी आणि उद्योजक डॉ.प्रमोद चौधरी यांना २०२३ साठी संस्कृती प्रतिष्ठानतर्फे देण्यात येणाऱ्या अटल संस्कृती गौरव पुस्काराने सन्मानित करण्यात आले. या पुरस्कार वितरण सोहळ्यात ते बोलत होते. कार्यक्रमाला राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील, खासदार प्रकाश जावडेकर, आमदार चंद्रशेखर बावनकुळे, विद्यावाचस्पती शंकर अभ्यंकर, पद्मविभूषण डॉ.रघुनाथ माशेलकर, पद्मभूषण डॉ.शां.ब. मुजुमदार, ज्येष्ठ पत्रकार विजय कुवळेकर, संस्कृती प्रतिष्ठानचे अध्यक्ष मुरलीधर मोहोळ आदी उपस्थित होते.
अटलजींच्या नावाचा पुरस्कार मिळविणारे कर्तृत्ववान व्यक्तिमत्व कार्यक्रमात उपस्थित असल्याचे नमूद करून उपमुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, अटलबिहारी वाजपेयी आपल्या ध्येयनिष्ठेमुळे आपल्याला परिचीत आहेत. देशाची अणूसंपन्नता स्थापित करण्यासाठी कुठल्याही दबावासमोर न झुकता त्यांनी अणुस्फोटाची अनुमती दिली. शक्तिशाली राष्ट्र शांतता प्रस्थापित करू शकतात या विचाराने त्यांनी अणुस्फोट घडवून आणला. त्यानंतर अनेक देशांनी लादलेल्या प्रतिबंधाना न जुमानता त्यांनी जगाला आपल्यासमोर झुकविण्याचे कार्य केले. त्यांच्या स्वभावातील हीच दृढता त्यांच्या काव्यातूनही प्रकट होते.
स्व.अटलजींनी देशाला एका सूत्रात जोडण्याचे कार्य केले
अटलजींनी अर्थकारणाची चांगली जाण होती. ग्रामीण भागातील अर्थकारणाला चालना देण्यासाठी त्यांनी प्रधानमंत्री ग्रामसडक योजना सुरू केली. त्यांनी खऱ्या अर्थाने नवभारताची सुरुवात केली. सुवर्ण चतुष्कोणच्या माध्यमातून देशाला एका सूत्रात जोडण्याचे कार्य त्यांनी केले. निराशेतून बाहेर पडण्यासाठी संघर्षाने पुढची वाटचाल कशी करावी याची प्रेरणा त्यांच्या शब्दातून मिळते.
प्रभाताईंच्या स्वरात नादब्रह्माची अनुभूती
काही व्यक्तिमत्त्व इतकी मोठी असतात की त्यांचं वर्णन करण्यासाठी शब्दही अपुरे पडतात, असे नमूद करून श्री.फडणवीस म्हणाले, प्रभाताईंनी संगीताची सेवा करताना भारतीय शास्त्रीय संगीत जनमानसात रुजविण्याचे आणि नव्या गायक-गायिकांना घडविण्याचे कार्य केले आहे. सृष्टीतल्या लय आणि नादाची अनुभूती सामान्य माणसाला करून देणारा प्रभाताईंचा स्वर आहे. त्यांच्या ‘एनलाईटनिंग द लिसनर्स’ या पुस्तकाचं प्रकाशन स्व.अटलजींनीच केलं होतं. केवळ गायनातूनच नव्हे, तर लेखनातूनही त्यांनी संगीत सर्वांपर्यंत पोहोचवलं. त्यांना पुरस्कार दिल्याने पुरस्काराची उंची वाढली आहे, अशा शब्दात उपमुख्यमंत्री श्री.फडणवीस यांनी ज्येष्ठ गायिका प्रभा अत्रे यांच्या कार्याचा गौरव केला.
डॉ.चौधरी महाराष्ट्राचे सुपूत्र असल्याचा अभिमान
स्व. अटलजींनी इथेनॉलचे महत्त्व सर्वप्रथम ओळखले आणि सर्वप्रथम भारताचे इथेनॉल, बायोफ्युएल धोरण तयार केले. या धोरणाची खऱ्या अर्थाने अंमलबजावणी करण्याचे काम डॉ. प्रमोद चौधरी यांच्या प्राज उद्योगाने केले. त्याचा देशाला मोठ्या प्रमाणात फायदा झाला आहे. महाराष्ट्रातील साखर कारखाने आज इथेनॉल तयार करत आहेत. त्याचे तंत्रज्ञान तयार करण्याचं काम त्यांनी केलं. आज इथेनॉल करणाऱ्या अनेक संस्था पुढे येत आहेत, त्यांचा आधार डॉ.चौधरी यांचे कार्य आहे. ते महाराष्ट्राचे सुपूत्र असल्याचा अभिमान वाटतो, असे कौतुगोद्गार श्री.फडणवीस यांनी काढले.
मंत्री श्री.पाटील म्हणाले, प्रभाताईंच्या तरुणपणीच्या शास्त्रीय संगीत गातांनाच्या भावमुद्रा आजही चेहऱ्यावर दिसतात, ही त्यांच्या साधनेची शक्ती आहे. डॉ. चौधरी यांच्या कार्यामुळे इंधन आयातीवर खर्च होणारे परकीय चलन मोठ्या प्रमाणात वाचले आहे. या दोघांचे कार्य महान आहे, अशा शब्दात त्यांनी दोन्ही पुरस्कार प्राप्त व्यक्तीमत्वांच्या कार्याचा गौरव केला.
ज्येष्ठ गायिका प्रभा अत्रे म्हणाल्या, प्रकृती ठीक नसतांनाही वाजपेयींजींचा आशिर्वाद पाठीशी असावा म्हणून पुरस्कार सोहळ्याला उपस्थित राहता आले. त्यांच्यासारख्या कवीमनाच्या, राष्ट्रप्रेमी अधिकारी पुरुषाच्या नावामुळे पुरस्काराची उंची वाढली आहे, असे त्या म्हणाल्या.
यावेळी डॉ.चौधरी यांनीही यावेळी मनोगत व्यक्त केले. अटलबिहारी वाजपेयी यांनी स्वदेशी इंधन असल्याने त्याला प्रोत्साहन दिले होते. त्यामुळे त्यांच्या नावाने पुरस्कार मिळणे हा चांगला योग आहे, असे ते म्हणाले.
श्री.मोहोळ यांनी प्रास्ताविकात अटल संस्कृती गौरव पुरस्कारामागची संकल्पना मांडली. स्व. अटलबिहारी वाजपेयी आणि पुण्याचे वेगळे नाते होते. त्यांच्या स्मृती जतन करण्यासाठी त्यांच्या नावाने पुरस्काराची सुरुवात करण्यात आली. अटलजींचा ज्या क्षेत्रात वावर होता त्या क्षेत्रातील व्यक्तींना या निमित्ताने सन्मानित करण्यात येत आहे, अशी माहिती त्यांनी दिली.
कार्यक्रमापूर्वी श्री.फडणवीस यांनी भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी यांच्या जयंतीनिमित्त आयोजित ‘अटलपर्व’ प्रदर्शनास भेट दिली. कार्यक्रमाला माजी राज्यमंत्री दिलीप कांबळे, आमदार सुनील कांबळे, भीमराव तापकीर, पद्मश्री मनोज जोशी, अभिनेत्री मृणाल देव कुलकर्णी, धीरज घाटे, राजेश पांडे, हेमंत रासने आदी उपस्थित होते.
पुणे- पुणे शहर पोलीस आयुक्तालयाचे वतीने पोलीस आयुक्त,रितेश कुमार यांचे संकल्पनेतुन पोलीस दलातील विविध शाखा, घटक यांची परिपुर्ण माहिती सर्वसामान्य नागरीकांना अवगत व्हावी तसेच पोलीस व जनता यांचेमध्ये सौदाहर्याचे वातावरण तयार व्हावे. यादृष्टीकोनातुन पुणे शहर पोलीस आयुक्तालय यांनी तरंग-२०२३ या उत्सव मैत्रिचा या बहुविध कार्यक्रम सोहळयाचे दिनांक २२ ते २४ डिसेंबर रोजी पोलीस मुख्यालय, शिवाजीनगर, पुणे याठिकाणी आयोजन केले होते. सदर कार्यक्रम सोहळ्याचे मुख्य आकर्षण हे वेगवेगळ्या पोलीस घटकांचे प्रदर्शन हे होते त्यामध्ये पोलीस दलातील विविध शाखा व त्या शाखांमधील चालणारे कामकाज याविषयी ऑडीयो/ व्हिडीओच्या माध्यमांतुन माहिती सांगण्यात आली त्यामध्ये पोलीस दलातील भरोसा सेल, सायबर सेल, दामिनी पथक हे महिलांचे सुरक्षिततेच्या दृष्टीकोनातुन यशस्वीरित्या कार्यरत आहेत. त्याप्रमाणे डायल ११२, राज्य राखील बल, दळणवळण संदेश वाहन यंत्रणा, डॉग शो, जलद प्रतिसाद पथक, एन.डी.आर.डेमोचे प्रदर्शन राज्य गुन्हे अन्वेषण कार्यप्रणाली व इतर घटकांची परिपूर्ण माहिती त्यांचे कामकाज याबद्दलची माहिती मेळावा पाहण्यासाठी आलेल्या नागरिकांना देण्यात आली.
सांस्कृतिक कलेचा वारसा असणारे पुणे शहरातील स्थानिक कलाकार यांची कलाकृती (Artison Gallery) या शिर्षकाखाली सर्व सामान्यांसाठी प्रदर्शित करण्यात आले. त्यामध्ये पुण्यातील स्थानिक कलाकार, मातीची भांडी, पर्यावरणपुरक प्लास्टिक पदार्थाचे पुर्नप्रकल्पाने उपयोगी वस्तु, तांबे पितळ या भांडयाचे प्रदर्शन, तसेच फुलेझाडे, रोपवाटीका पुस्तक स्टॉल इत्यादी यांचे प्रदर्शन लावण्यात आले होते. नविन पिढी, लहान बालके यांना विज्ञानाची आवड निर्माण व्हावी म्हणुन विज्ञात प्रदर्शन, मुलांसाठी खेळप्रकार, व्हिडीओचे माध्यमांतुन लहान बालकांसाठी गुड टच, बँड टच यासारखे प्रबोधनपर प्रदर्शन ‘किड्स झोन’ चे माध्यमांतुन प्रदर्शित करण्यात आले होते.
समाजातील सर्व घटकांचे या कालावधीत मनोरंजन व्हावे तसेच पोलीसांचे कामकाजाची माहिती व्हावी आणि पोलीस व जनता यांचेत सुसंवाद व्हावा या दृष्टीकोनातुन प्रयत्न करण्यात आले तसेच वाद्यवृंद (ऑकेस्ट्रा) आणि मराठी सिनसृष्टीतील नामवंत कलाकार इतर सिलीब्रीट्री यांचे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. या सर्व मनोरंजना बरोबरच खाद्य संस्कृतीचेही स्टॉल प्रदर्शनात होते. भारतातील विविध कलाकुसर, खादी, दाग-दागिने, देशी पदार्थ, कपडयाचे प्रदर्शन या विविध वस्तुंचे प्रदर्शन सदर मेळाव्याकरीता पोलीस खात्यामधील वरिष्ठ पोलीस अधिकारी, पोलीस आयुक्तालयातील सर्व वरिष्ठ अधिकारी, निमसरकारी अधिकारी, स्थानिक कलाकार आणि कल्पक व दर्जेदार कारागीर उपस्थित होते.
पोलीस घटकांशी संबंधीत क्वीक रिस्पोन्स टिम डेमो, एस.आर.पी.एफ (आखिल पोलीस बैंड स्पर्धेत सहा वेळा सुवर्णपदक मिळालेल्या) पाईप बँडचे सादरीकरण, डॉग शो, किड्स झोन पोलीस दलातील कलाकार यांनी सादर केलेल्या नृत्य गायन व पाचल वृंद यांनी केलेल्या कला व इतर कला, गार्ड ऑफ ऑनर साठी महिला पोलीस अंमलदार यांनी त्याबाबत केलेले सादरीकरण, किड्स झोन एरीया पोलीस सायन्स डोम अॅक्टीवीटी, नादब्रम्ह ढोलताथा पथक यांचे सादरीकरण प्रियदर्शनी शाळेचे ढोलताशा पथक यांनी केलेले सादरीकरण, हॅन्ड पॅन वादन, असे कार्याक्रम आयोजित करण्यात आले होते.
या मेळाव्यास उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उच्च आणि तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत दादा पाटील, माजी पोलिस महासंचालक अजीत पारसनीस, पोलीस आयुक्त पिंपरी चिंचवड विनयकुमार चौबे,अप्पर पोलीस महासंचालक निकेत कौशिक माजी पोलिस महानिरीक्षक अविनाश पारधी, विशेष पोलीस महानिरीक्षक, (एसआरपीएफ) अशोक मोरोळे, सिनेकलाकार मिनाक्षी शेषाद्री, वैशाली जाधव, ऋतुजा जुन्नरकर, प्रिया बर्ड, मकरंद अनासपुरे, मृणाल कुलकर्णी प्राजक्ता गायकवाड, अमृता खानविलकर, तेजा देवकर, शर्वरी जमिनी, राहुल बेलापुरकर, अमृता घोंगडे गायक सलिल कुलकर्णी व त्यांचा मुलगा शुभंकर कुलकर्णी, कार्तिकी गायकवाड अजीत विस्पुरे, सुजीत सोमन तसेच अथर्व सुदामे, डॅनी पंडीत,उद्योगपती पुनीत बालन व वेगवेगळ्या क्षेत्रातील लोकांनी सदर कार्यक्रमास भेट दिली. रेडिओ जॉकी आर.जे. संग्राम नयन जयप्रकाश, अक्षय बनकर भाग्यश्री पालेकर, महिला पोलीस उप-निरीक्षक सुप्रिया पंधरकर यांनी कार्यक्रमांचे सुत्रसंचलनाची जबाबदारी पार पाडली. सदर तरंग २०२३ या मेळाव्याला पुणेकर नागरीकांनी तसेच शालेय विद्यार्थ्यांनी यांना उत्स्फुर्तपणे सहभागी होवुन, पोलिस घटकांचे प्रदर्शन, कुशल कारागिर यांनी बनविलेल्या विविध वस्तु, खाद्य पदार्थ यांचा आस्वाद घेतला. तसेच प्रदर्शनात पोलीस घटकांचे विषयी लावण्यात आलेल्या प्रदर्शनाची माहिती घेतली.
पुणे दि.२५ – पिंपरी चिंचवड येथे आयोजित शंभराव्या अखिल भारतीय नाट्य संमेलनाच्या बोधचिन्हाचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते अनावरण करण्यात आले. १०० व्या नाट्य संमेलनामुळे पिंपरी चिंचवड शहराची ओळख सांस्कृतिक नगरी म्हणून होईल आणि हे संमेलन वेगळ्या उंचीवर जाणारे ठरेल, असा विश्वास श्री.पवार यांनी यावेळी व्यक्त केला.
कार्यक्रमाला आमदार अण्णा बनसोडे, पिंपरी चिंचवड महानगरपालिका आयुक्त शेखर सिंह, डॉ.पी.डी. पाटील, प्रकाशशेठ धारीवाल, माजी आमदार विलास लांडे, कृष्णकुमार गोयल,अखिल भारतीय नाट्य परिषदेचे पिंपरी चिंचवड शाखेचे अध्यक्ष भाऊसाहेब भोईर, राजकुमार साकला, सचिन इटकर आदी उपस्थित होते.
उपमुख्यमंत्री श्री.पवार म्हणाले, मराठी नाट्य संमेलनाला गौरवशाली इतिहास आहे. विष्णुदास भावे यांनी ‘सीता स्वयंवर’च्या माध्यमातून मराठी नाटकाची मुहूर्तमेढ रोवली. मराठी माणसाचे नाट्यवेड सर्वश्रुत आहे आणि म्हणूनच नाट्य चळवळ पुढे जाते आहे. प्रत्येक शहरात चांगले नाट्यगृह असावे असा प्रयत्न सुरू आहे. नाट्यगृहाच्या माध्यमातून नव्या कलाकारांना कला सादर करण्याची संधी मिळत असते. त्यांना चांगल्या सुविधांच्या माध्यमातून प्रोत्साहन देण्यासाठी नाट्यगृहाच्या देखभालीकडे संबंधितांनी लक्ष घालावे, असे आवाहन त्यांनी केले.
ते म्हणाले, मराठी नाटकांनी मनोरंजनासोबत सामाजिक, राजकीय, कौटुंबिक विषयांना स्पर्श केला. नाटकांमध्ये समाजाचे प्रतिबिंब असते. कोरोनामुळे नाट्यसृष्टीला फटका बसला आणि काहींचे संसार विस्कळीत झाले. अशावेळी शासनाने कलाकार आणि पडद्यामागच्या कलावंतांनाही मदत करण्याचा प्रयत्न केला. अशा अनेक अडचणींना सामोरे जात नाट्य चळवळ इथवर पोहोचली याचा मनापासून आनंद आहे, असे श्री.पवार म्हणाले.
पिंपरी चिंचवड शहराची अनेकांच्या प्रयत्नातून प्रगती झाली. सर्वांच्या सहकार्याने शहराचे विकसित स्वरूप समोर आले आहे. या विकासाला साहित्य, कला, संस्कृतीची जोड असणे महत्त्वाचे आहे. त्यादृष्टीने हे संमेलन उपयुक्त ठरेल आणि उद्योगनगरीची वाटचाल सांस्कृतिक नगरीकडे होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. शासनाने नाट्य संमेलनासाठी १० कोटी रुपये दिले असून या निधीतून नाट्य परिषद विविध उपक्रम राबविणार आहे. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेनेही नाट्य संमेलनासाठी आवश्यक सहकार्य करावे असेही उपमुख्यमंत्री पवार म्हणाले.
प्रास्ताविकात श्री.भोईर यांनी नाट्य संमेलनाच्या अयोजनाविषयी माहिती दिली. नाट्य संमेलनामुळे पिंपरी चिंचवड शहराच्या नावलौकिकात भर पडेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. संमेलनाच्या दोन दिवसांच्या कालावधीत विविध प्रकारच्या ६४ कार्यक्रमांचे आयोजन होणार असल्याचे ते म्हणाले.
कार्यक्रमात उपमुख्यमंत्री श्री.पवार यांच्या हस्ते ‘सत्यशोधक’ या चित्रपटाच्या ट्रेलरचे प्रदर्शन आणि पोस्टरचे अनावरण करण्यात आले. महात्मा ज्योतिबा फुले यांनी सर्व जातीधर्माला सोबत घेत समाज प्रबोधनाचे कार्य केले. त्यांच्या जीवनावरील चित्रपट नवीन पिढीने आवर्जून पहावा. महापुरुषांनी प्रतिकूल परिस्थितीत समाज घडविण्याचे कार्य कशाप्रकारे केले याचे दर्शन नव्या पिढीला याद्वारे घडेल असेही श्री.पवार म्हणाले.
सकल मतांग समाजाची राज्यस्तरीय बैठक पुण्यात संपन्न –
पुणे – मातंग समाजाला स्वतंत्र आरक्षण मिळावे,मातंग समाजाच्या विकासासाठी बार्टी च्या धर्तीवर आर्टी ची स्थापना करावी या मागण्यासाठी सर्व समाजाने एकत्र येवून राज्यभर लढा उभारावे लागेल असे मत मातंग एकता आंदोलनाचे नेते,माजी मंत्री रमेश बागवे यांनी व्यक्त केले .मातंग समाजाच्या विविध प्रश्नावर चर्चा करण्यासाठी पुण्यात राज्यव्यपी बैठकीचे आयोजन करण्यात आले होते त्यावेळी ते बोलत होते.पुढे ते म्हणाले की,मातंग समाज सामाजिक,शैक्षनिक व सर्वच बाबतीत अजुनही मागे आहे त्यासाठी आता समाजाला एकजुठ दाखवावी लागेल राज्यातील समाजाने आता एकत्र येने गरजेचे असल्याचे सांगितले.आमदार सुनील कांबळे यांनी आपण शासन स्तरावर समाजाच्या मागण्या पोहचवून न्याय देण्यासाठी कटिबध्द राहणार असल्याचे सांगितले .महाराष्ट्र शासनाच्या आरक्षण वर्गीकरण समितीचे सदस्य प्रा.मच्छिंद्र सकटे यांनी आपल्या मागण्याबाबत सविस्तर अहवाल करण्याचे काम लवकर पूर्ण होणार असल्याचे जाहीर केले.झोपडपट्टी सुरक्षा दलाचे नेते भगवान वैराट यांनी मातंग समाजाच्या विकासासाठी सर्व राजकीय आणि सामाजिक नेत्यांनी एकत्र येणे गरजेचे असल्याचे सांगितले.या राज्यव्यापी बैठकीच्या अध्यक्षस्थानी क्रांतिगुरू लहुजी वस्ताद साळवे स्मारक समिती चे अध्यक्ष विजय डाकले होते.यावेळी आमदार सुनील कांबळे,प्रा.मच्छिंद्र सकटे,झोपडपट्टी सुरक्षा दलाचे नेते भगवान वैराट,लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळाचे माजी अध्यक्ष अमित गोरखे,लहुजी समता परिषदेचे अध्यक्ष अनिल हतागाळे,माजी नागसेवक अविनाश बागवे,माजी नगरसेवक शांतिलाल मिसाळ,मारुती वाडेकर,राम चव्हाण,पंडित सूर्यवंशी,अशोक लोखंडे आदि मान्यवर यांनी मनोगत व्यक्त केले.प्रस्तविक भास्कर नेटके यांनी केले.सूत्रसंचालन अनिल हतागळे तर आभार दयानंद अडागळे यांनी मानले.या बैठकीला राज्यातील ४० पक्ष संघटनाचे नेते व प्रमुख पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
ज्येष्ठ नागरिक कट्ट्याचे भूमिपूजन तथा फिरते पुस्तक वाचनालयाचे लोकार्पण.
पुणे – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सूचनेनुसार भारतीय जनता पक्षाचे सर्व कार्यकर्ते काम करत असतात. त्यामुळे कोथरूड मधील प्रत्येक नागरिकाच्या अडचणी दूर करुन, त्यांना सुखी, समाधानी आयुष्य मिळवून देणे हे माझे कर्तव्य समजतो, अशी भावना राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण, वस्त्रोद्योग आणि संसदीय कार्य मंत्री तथा कोथरुडचे आमदार चंद्रकांतदादा पाटील यांनी व्यक्त केली. पाटील यांच्या आमदार निधीतून कोथरुड येथील हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे उद्यानात ज्येष्ठ नागरिक कट्टा उभारण्यात येणार आहे. या कामाचे भूमिपूजन आज त्यांच्या हस्ते झाले. यावेळी चंद्रकांतदादा पाटील यांच्या माध्यमातून कोथरुड मध्ये वाचन संस्कृतीला चालना देण्यासाठी सुरू केलेल्या फिरते पुस्तक वाचनालय उपक्रमाअंतर्गत ‘मृत्यूंजयकार’ शिवाजी सावंत यांच्या स्मरणार्थ दुसऱ्या फिरते पुस्तक वाचनालयाचे लोकार्पण पाटील यांच्या हस्ते झाले. यावेळी ते बोलत होते.यावेळी भाजपा प्रदेश प्रवक्ते संदीप खर्डेकर, भाजपा कोथरुड दक्षिणचे अध्यक्ष डॉ. संदीप बुटाला,शहर उपाध्यक्ष शाम देशपांडे,कोथरूड उत्तरचे अध्यक्ष सचिन पाषाणकर, नवचैतन्य हास्ययोग परिवाराचे विठ्ठल काटे सर, श्री.पुजारी, सरचिटणीस गिरीश खत्री, प्रा. अनुराधा एडके, दीपक पवार, विठ्ठल बराटे, भाजपा महिला मोर्चा प्रभारी व कोथरूडच्या सरचिटणीस मंजुश्री खर्डेकर, स्थानिक नगरसेविका हर्षाली माथवड, वासंती जाधव, बाळासाहेब टेमकर, रणजित हरपुडे यांच्या सह भाजपचे पदाधिकारी उपस्थित होते. चंद्रकांतदादा पाटील म्हणाले की, देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा सर्व कार्यकर्त्यांना आग्रह असतो की, तुम्ही ज्या समाजात राहता. त्या समाजातील प्रत्येक व्यक्ती सुखी, समाधानी होईल, यासाठी प्रयत्न करावेत. मोदींचा हा संदेश कार्यकर्त्यांसाठी ध्येय मंत्र आहे. त्यामुळे कोथरुड मधील प्रत्येक नागरिकाच्या अडचणी दूर करुन त्यांना सुखी समाधानी आयुष्य मिळवून देण्यासाठी सातत्याने प्रयत्न असतो. त्यासाठी विविध उपक्रम कोथरुड मतदारसंघात राबवित आहे. पाटील पुढे म्हणाले की, कोथरुडमध्ये वाचन संस्कृतीला चालना देण्यासाठी अडीच वर्षांपूर्वी मोफत फिरते पुस्तक वाचनालय सुरू केले. या उपक्रमाला कोथरुडकरांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. या उपक्रमाची लोकप्रियता दिवसागणिक वाढत असून, त्याचे थांबे वाढविण्याची मागणी सातत्याने होत होती. त्यानुसार आज कोथरुड मध्ये मृत्यूंजयकार शिवाजी सावंत यांच्या स्मरणार्थ दुसरे फिरते पुस्तक वाचनालय सुरू करत आहे. यामुळे कोथरुडकरांची अपेक्षा पूर्ण होईल. कोथरुडकरांच्या सेवेसाठी सदैव तत्पर असल्याची ग्वाही यावेळी त्यांनी दिली.
पुणे-उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सोमवारी पुन्हा एकदा शरद पवार यांच्यावर निशाणा साधत त्यांच्या गटाचे खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यांचा आगामी लोकसभा निवडणुकीत पराभव करून दाखवणार असल्याची गर्जना केली आहे. ज्यांची माझ्यासोबत राहून काम करण्याची इच्छा आहे, त्यांनी माझ्यासोबत यावे. उगीच दोन्ही बाजूला राहू नये, असा इशाराही त्यांनी राष्ट्रवादीच्या तळ्यात-मळ्यात करणाऱ्या नेत्यांना दिला आहे. कोल्हे यांच्या तत्कालीन उमेदवारीबाबत बोलताना ते म्हणाले,’,’त्यावेळी उमेदवारी देताना योग्य पद्धतीने दिली होतं. आम्हाला वाटलं होतं की, ते वक्ते उत्तम आहेत. उत्तम कलाकार आहेत, संभाजी महाराजांची भूमिका त्यांनी चांगली बजावली. ग्रामस्थांना खिळवून ठेवण्याचं काम त्यांनी केलं असेही अजित पवार म्हणाले. यादरम्यान आता त्यांच्या एवजी दुसरा बदली उमेदवार देणार का? असं विचारल्यानंतर, तु काळजी करू नको. आजच सांगतो, तिथं दिलेला उमदवार निवडूनच आणेन असं मिश्कील उत्तरही अजित पवारांनी यावेळी दिलं.
अजित पवार यांनी सोमवारी सकाळी पत्रकारांशी संवाद साधला. त्यात त्यांनी आगामी लोकसभा निवडणुकीत शरद पवार गटाचे शिरूरचे खासदार अमोल कोल्हे यांचा पराभव करण्याचा संकल्प व्यक्त केला.राष्ट्रवादीच्या दोन खासदारांकडून शेतकरी आक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात येणार असून पुण्यात जाहीर सभा देखील होणार आहे, याबद्दल अजित पवारांना प्रश्न विचारण्यात आला. यावर बोलताना अजित पवार म्हणाले की, चांगली गोष्ट आहे, पण त्यातल्या एका खासदाराने पाच वर्ष आपल्या मतदारसंघात लक्ष दिलं असतं तर बरं झालं असतं. त्यातला एक खासदार एक-दीड वर्षापूर्वी माझ्याकडे आला होता माला राजीनामा द्यायचा म्हणून… त्या खासदाराला उमेदवारी मी दिलेली आहे. त्या खासदाराला निवडणून आणण्यासाठी मी आणि दिलीप वळसे पाटील यांनी जीवाचं रान केलं आहे. त्यांना खासगीत समोरासमोर बोलवा.आता त्यांचं हे सगळं चाललं आहे, पण मधल्या काळात ते सहाही मतदारसंघात फिरत नव्हते. त्यांनी पूर्णपणे दुर्लक्ष केलं होतं. त्यांनी मला आणि त्यावेळचे आमचे वरिष्ठ यांना मी राजीनामा देतोय म्हणून सांगितलं होतं. मी एक कलावंत आहे, माझ्या सिनेमांवर परिणाम होतो आहे. मी काढलेला एक शिवाजी महाराजांवरील सिनेमा चालला नाही. माझा प्रपंच आणि आर्थिक गोष्टींवर परिणाम होतो आहे, अशा गोष्टी त्यांनी सांगितल्या होत्या
मुंबई-अजित पवार यांनी राष्ट्रवादीत स्वार्थासाठी बंड केले होते असे विधान शालिनीताई पाटील यांनी केले आहे. शरद पवार आणि अजित पवार यांच्या बंडामध्ये जमीन आस्मानाचे अंतर आहे. शरद पवारांचे बंड पक्षातील आमदार दुसरीकडे जाऊ नयेत यासाठी होते. तर अजित पवारांचे बंड स्वार्थासाठी होते. उपमुख्यमंत्रिपद मिळवण्यासाठी अजित पवारांचे बंड होते अशी टीका शालिनीताई पाटील यांनी केली आहे.पुढे शालिनीताई पाटील म्हणाल्या, 2024 मध्ये देवेंद्र फडणवीसच निवडणूक येतील असा विश्वास देखील शालिनीताई पाटील यांनी व्यक्त केला आहे. तसेच जो माणूस विश्वासघात करतो त्याच्यावर काय विश्वास ठेवावा असे शालिनीताही पाटील यांनी म्हंटले आहे.
ज्याने तुम्हाला लहानाचे मोठे केले त्याचाच विश्वासघात केला मग अशा व्यक्तीवर विश्वास का ठेवावा?, अजित पवारांवर कुणीही विश्वास ठेवणार नाही. अजितदादांसोबत गेलेली माणसे कोणत्या लायकीचे आहेत हे मी आधीच सांगितले. त्यात बाकी जे आमदार आहेत ते पुन्हा शरद पवारांकडे जातील. त्यानंतर जी दुर्दशा होईल. तुरुंगात आजीवन कारावास भोगून आलेल्या व्यक्तीसोबत जे होते. त्याला निवडणूक लढवता येत नाही”, असे शालिनीताई पाटील यांनी म्हंटले आहे.
तसेच ”मी सातारा मतदारसंघातून यशवंतराव चव्हाण यांच्याविरोधात निवडणुकीला उभी राहिलेली आहे. त्यावेळी ते उपपंतप्रधान होते. त्यांच्यासमोर उभे राहायला कुणी तयार नव्हते. आम्ही काँग्रेसमध्ये होतो आणि ते काँग्रेससोडून बाहेरून लढत होते. त्यांच्याविरोधात उभे राहण्याचा माझ्या पक्षाने आदेश दिला. सातारा जिल्ह्यात त्यांच्याविरोधात कुणी अर्ज केला नाही.
वसंतदादांना पक्षाने उभे राहण्यास सांगितले. परंतु मी सांगलीतून उभा राहतोय. तुम्ही शालिनीताई ज्यांचे माहेर सातारा आहे. माहेरची लोक त्यांना प्रेम करतात. पक्षाने शालिनीताईंना उमेदवारी द्यावी अशी शिफारस त्यांनी केली. त्यानंतर पक्षाने मला उमेदवारी दिली. आम्ही समोरासमोर निवडणूक लढवली. कुणाविरोधात कारस्थान केले नाही. हा माझा आणि माझ्या पतीचा स्वभाव नाही असं शालिनीताईंनी म्हटलं.
गुजरात सरकार अरबी समुद्रात प्रवासी पाणबुडी चालवणार
पर्यटन उद्योगाला महत्त्वपूर्ण चालना देण्यासाठी, 4,490 कोटी रुपयांचे 15 सामंजस्य करार (एमओयू) अंमलात आणण्यात आले. हे करार सुरू केल्यावर, 11,500 हून अधिक प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष रोजगाराच्या संधी निर्माण होण्याची अपेक्षा आहे. Mazagon Dock Shipbuilder Limited आणि राज्य सरकार यांच्यातील सामंजस्य करारांपैकी एक आहे, ज्यामुळे पर्यटन उद्योगातील एक विशिष्ट प्रकल्प आहे. या कराराचा उद्देश 32 लोकांना सामावून घेणारी पाणबुडी तयार करण्याचे आहे.
गांधीनगर:हजारो वर्षांपूर्वी समुद्रात बुडालेल्या भगवान श्रीकृष्णाच्या द्वारका नगरीचे दर्शन आता सहज होणार आहे. मूळ द्वारकेला भेट देण्यासाठी गुजरात सरकार अरबी समुद्रात प्रवासी पाणबुडी चालवणार आहे. पाणबुडीचे वजन सुमारे 35 टन असेल. यामध्ये एकावेळी 32 जण बसू शकतील. 2 डायव्हर्स आणि एक मार्गदर्शक असेल.
राज्याच्या पर्यटन विभागाचे प्रधान सचिव हरित शुक्ला यांनी दिलेल्या माहितीनुसार ही स्वदेशी पाणबुडी माझगाव डॉकद्वारेच चालवली जाईल. याची सुरुवात जन्माष्टमी किंवा दिवाळीपासून होईल. पाणबुडी समुद्रात 300 फूट खाली जाईल. या रोमांचक प्रवासाला 2 ते 2.5 तास लागतील. भाडे महाग असेल, पण सर्वसामान्यांना लक्षात घेऊन गुजरात सरकार त्यात सबसिडीसारख्या सवलती देऊ शकते.
माझगाव डॉक शिपयार्ड या भारत सरकारच्या कंपनीसोबत राज्य सरकारने सामंजस्य करार केला आहे. जानेवारीत होणाऱ्या व्हायब्रंट समिटमध्ये याची घोषणा केली जाईल.
पाणबुडीमध्ये अनेक वैशिष्ट्ये आहेत…
35 टन वजनाची पाणबुडी वातानुकूलित असेल. 32 लोक बसतील. त्यात मेडिकल किटही असेल.
यामध्ये 24 प्रवासी दोन रांगेत बसतील. दोन पाणबुडी, 2 डायव्हर्स, एक मार्गदर्शक आणि एक तंत्रज्ञ असतील.
प्रत्येक सीटवर खिडकीचे दृश्य असेल, ज्यामुळे 300 फूट खोलीवर समुद्राचे नैसर्गिक सौंदर्य सहज पाहता येईल.
ऑपरेटिंग एजन्सी प्रवाशांना ऑक्सिजन मास्क, फेस मास्क आणि स्कूबा ड्रेस प्रदान करेल. त्यांचे भाडे तिकिटात समाविष्ट केले जाईल.
त्यात नैसर्गिक प्रकाशाची सोय असेल. संपर्क यंत्रणा आणि व्हिडिओ कॉन्फरन्सिंगसारख्या सुविधाही असतील. पाणबुडीत बसूनही तुम्हाला समोरच्या स्क्रीनवर अंतर्गत हालचाली, प्राणी इत्यादी पाहता येतील आणि रेकॉर्ड करता येतील.
द्वारकाला जगाच्या नकाशावर आणण्यासाठी पाणबुडी प्रकल्प वास्तविक, देशातील धार्मिक आणि सांस्कृतिक पर्यटन वाढवण्यासाठी केंद्र सरकार अनेक प्रकल्पांवर काम करत आहे. काशी विश्वनाथ कॉरिडॉर, महाकाल लोक, अयोध्या, केदारनाथ, सोमनाथ आणि द्वारका कॉरिडॉर हे या प्रकल्पाचे महत्त्वाचे भाग आहेत.
मूळ द्वारकेला (बेट द्वारका) भेट देण्यासाठी द्वारका कॉरिडॉर अंतर्गत पाणबुडी प्रकल्प आणला जात आहे. अरबी समुद्रातील सर्वात मोठा केबल ब्रिज बेट द्वारका येथेच बांधला जात आहे, जो जन्माष्टमीच्या सुमारास सुरू होईल. या पुलामुळे समुद्रात बुडालेल्या द्वारकेला प्रदक्षिणा केल्याची अनुभूती मिळणार आहे.
कै. श्रीमती लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई दत्तमंदिर ट्रस्ट तर्फे विद्यार्थ्यांना अर्थ सहाय्य निधी प्रदान समारंभ
पुणे : सर्वसामान्य जनता भक्ती भावाने धार्मिक संस्थांना भरभरून मदत करीत असते. परंतु या संस्थांनी त्याचा उपयोग सत्कार्यासाठी करावा. श्रीमती लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई दत्तमंदिराच्या धार्मिक व्यासपीठावर असाच उत्तम शैक्षणिक उपक्रम राबविला जात आहे. अध्यात्म आणि विज्ञानाची सांगड घालत सर्व धार्मिक संस्थांना देखील अशा प्रकारचे उपक्रम राबिवले पाहिजेत, असे मत सह धर्मादाय आयुक्त सुधीरकुमार बुक्के यांनी व्यक्त केले. बुधवार पेठेतील कै.श्रीमती लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई दत्तमंदिर ट्रस्टतर्फे मंदिराच्या १२६ व्या वर्षी दत्त जयंती सोहळ्यांतर्गत वेदभवन आणि दोन गरजू विद्यार्थ्यांना ‘विद्यार्थी अर्थ सहाय्य निधी’ मंदिरासमोरील श्री दत्त कलामंच येथे झालेल्या कार्यक्रमात प्रदान करण्यात आला. यावेळी कोल्हापूरच्या डी.वाय.पाटील उद्योग समुहाचे अध्यक्ष डाॅ. संजय पाटील, विश्वेश्वर बँकेचे चेअरमन अनिल गाडवे, संचालक अजय डोईजड, वेदाचार्य मोरेश्वर घैसास गुरुजी, श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टचे कोषाध्यक्ष महेश सूर्यवंशी, दत्तमंदिर ट्रस्टचे अध्यक्ष युवराज गाडवे, खजिनदार अॅड. रजनी उकरंडे, उत्सवप्रमुख अक्षय हलवाई, उत्सव उप प्रमुख सुनील रुकारी, विश्वस्त अॅड.प्रताप परदेशी, महेंद्र पिसाळ, अॅड.शिवराज कदम जहागिरदार, राजू बलकवडे, आदी उपस्थित होते. वेदाचार्य मोरेश्वर घैसास म्हणाले, आज अनेक धार्मिक संस्थांमध्ये सत्कार्य केले जाते. परंतु तेथे वेदाचे ज्ञान असणारे व्यक्ती नसतात. प्रत्येक धार्मिक संस्थेत वेदाचे ज्ञान असणारा एक तरी व्यक्ती असावा. वेदपाठशाळांना काही सरकारी अनुदान नसते. त्यामुळे जसे आपण मंदिरामध्ये देणगी देतो, त्याचप्रमाणे वेदपाठ शाळांना देखील मदत करावी. समाजाच्या सहकार्यावर तेथील सर्व काम चालते, असेही त्यांनी सांगितले. महेश सूर्यवंशी म्हणाले, अत्यंत प्राचीन आणि अध्यात्माचे स्थान असलेल्या या दत्त मंदिराच्या वतीने धार्मिकबरोबर अनेक सामाजिक उपक्रम देखील राबविले जातात. असे अनेक उपक्रम राबवित या मंदिराने लक्ष्मीबाई यांच्या दातृत्वाची परंपरा राखली आहे, असेही त्यांनी सांगितले. अॅड.शिवराज कदम जहागिरदार यांनी सूत्रसंचालन केले.