Home Blog Page 1292

भीती वाटणारी सत्ता उलथवलीच पाहिजे:सत्ता उलथवण्यासाठीच मी इथे उभा -ठाकरे

मुंबई

सत्ता उलथवण्यासाठीच मी इथे उभा आहे असे विधान ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी केले आहे. तसेच सत्तेला घाबरणार असाल तर काही उपयोग नाही. भीती वाटणारी सत्ता उलथवलीच पाहिजे असा हल्लबोलही त्यांनी केला आहे. ते कार्यकर्त्यांना संबोधित करत होते.

पाचोरा विधानसभा मतदारसंघातील शिंदे गट आणि भाजपमधील काही पदाधिकाऱ्यांनी आज मातोश्रीवर उद्धव ठाकरेंच्या पक्षात प्रवेश केला. यावेळी ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत हे देखील उपस्थित होते. यावेळी उद्धव ठाकरे यांनी सर्वांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा दिल्या. तसेच येणारे नवीन वर्ष हे देशासाठी लोकशाहीचे जावो, असे उद्धव ठाकरे म्हणाले.

यावेळी उद्धव ठाकरे म्हणाले, “शिवसेनेत प्रवेश करणाऱ्या सर्वांचे मी स्वागत करतो. वैशाली ताई यांचे कौतुक वाटत आहे. आर. ओ पाटील आमचा भक्कम माणूस होता. त्यांचे जाणे एक आघात होता. पण त्यांचा वारसा वैशाली ताई पुढे नेत आहेत, असे म्हणत ठाकरे गटाच्या स्थानिक नेत्या वैशाली सूर्यवंशी यांचे कौतुक केले आहे. वैशाली सूर्यवंशी यांच्या प्रयत्नामुळे ठाकरे गटात पदाधिकाऱ्यांचा पक्षप्रवेश झाला.

या पक्षप्रवेशाच्या वेळी संजय राऊत हे देखील उपस्थित होते. ते म्हणाले, ”आपल्याकडे पक्ष नाही. चिन्ह नाही. तरी लोक पक्ष प्रवेश करत आहेत. हाच वारसा वैशाली पाटील पुढे नेत आहेत. उद्धव ठाकरेंचे बळ वाढवत आहे. शिवसेना सत्तेला लाथ मारत पुढे जात आहे”,असे राऊत म्हणाले.

आत्मविश्वासाने तर्कसंगत मांडणी हीच खरी वकिलांची ओळख

आंतरराष्ट्रीय ख्यातीचे नामवंत सरकारी वकील पद्मश्री ॲड. उज्ज्वल निकम यांना ‘सूर्यदत्त’तर्फे ‘सूर्यदत्त सूर्यभूषण राष्ट्रीय पुरस्कार

पुणे : आंतरराष्ट्रीय ख्यातीचे विशेष सरकारी वकील पद्मश्री ॲड. उज्ज्वल निकम यांना सूर्यदत्त एज्युकेशन फाउंडेशनतर्फे ‘सूर्यदत्त सूर्यभूषण राष्ट्रीय पुरस्कार २०२३’ नुकताच प्रदान करण्यात आला. भारताचा नकाशा असलेले सन्मानचिन्ह, विद्यार्थ्यांनी बनवलेला विशेष स्कार्फ, सुवर्णपदक व सन्मान पत्र असे या सन्मानाचे स्वरूप आहे. लोकसेवा आणि कायद्याच्या क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाबद्दल, तसेच विविध महत्वाच्या खटल्यात महत्वाची कामगिरी बजावल्याबद्दल ॲड. उज्ज्वल निकम यांना सन्मानित करण्यात आले.
सूर्यदत्त एज्युकेशन फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. संजय बी. चोरडिया यांच्या हस्ते ॲड. उज्ज्वल निकम यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. यापूर्वी, त्यांना सूर्यदत्त राष्ट्रीय पुरस्कारानेही सन्मानित करण्यात आलेले आहे. ‘सूर्यदत्त’च्या बावधन कॅम्पसमध्ये झालेल्या या कार्यक्रमावेळी सूर्यदत्त विधी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मिथिलेश वर्मा, प्रा. केतकी बापट, प्रा. मोनिका सेहरावत आदी उपस्थित होते. यावेळी ॲड. उज्ज्वल निकम यांनी सूर्यदत्त विधी महाविद्यालयातील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थ्यांशी संवाद साधला.
माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद, केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन, शास्त्रज्ञ डॉ. के. सिवन, सामाजिक कार्यकर्ते वजुभाई वाला, लेफ्ट. जनरल डॉ. दत्तात्रय शेकटकर, केंद्रीय मंत्री गजेंद्रसिंह शेखावत, श्याम जाजू, खासदार सुप्रिया सुळे, पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील, डॉ. श्रीरंग लिमये, डॉ. शकुंतला काळे, पोलीस अधिकारी संजय जाधव, चंद्रशेखर सावंत, डॉ. चंद्रकांत कोकाटे, पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे आदी मान्यवरांना यापूर्वी ‘सूर्यभूषण राष्ट्रीय पुरस्कार’ प्रदान करण्यात आलेला आहे.
ॲड. उज्ज्वल निकम यांनी जळगाव येथील शाळा, महाविद्यालय, वकिलीचा अभ्यास, विविध खटल्यांमध्ये आलेले अनुभव आणि त्यातून झालेली ज्ञानप्राप्ती हा जीवनप्रवास विद्यार्थ्यांसमोर उलगडला. ते म्हणाले, “वकील होण्याची माझी इच्छा नव्हती. त्यामुळे विशेष सरकारी वकील होईन आणि उत्कृष्ट कामगिरी करेन, असे काही ध्येय समोर नव्हते. परंतु आलेल्या संधीचे सोने केले, असे म्हणू शकेन. सामान्य माणूस तर्कसंगत बोलू लागल्यास आपण त्याला ‘वकीलासारखा बोलू लागलास’ असे म्हणतो. म्हणजेच तर्कसंगत बोलणे ही वकिलांसाठीची ओळख आहे.” विशेष सन्मानाबद्दल त्यांनी ‘सूर्यदत्त’चे आभार मानले.
प्रा. डॉ. संजय बी. चोरडिया म्हणाले, “भारताच्या कायदेविषयक इतिहासात ॲड. उज्ज्वल निकम यांचे नाव सुवर्णाक्षरात लिहिले जाईल. उत्कृष्ट कायदेतज्ज्ञ व चांगला माणूस अशी त्यांची ओळख आहे. अत्यंत कठीण व महत्वाच्या खटल्यात त्यांनी विशेष सरकारी वकील म्हणून काम केले आहे. प्रामुख्याने खून, बलात्कार, दहशतवादी हल्ले यासंबंधित खटल्यांत त्यांनी आरोपीना कठोर शासन होण्यासाठी योगदान दिले आहे. १९९३ चा मुंबई बॉम्बस्फोट, गुलशन कुमार खून प्रकरण, प्रमोद महाजन हत्या प्रकरण आणि २००८ चा मुंबई दहशतवादी हल्ला, मुंबईतील सामूहिक बलात्कार प्रकरण, कोपर्डी बलात्कार आणि खून खटला अशा अनेक खटल्यांमध्ये त्यांनी काम पहिले आहे. वकील देशाची सेवा कशी करू शकतो, हेच त्यांनी दाखवून दिले आहे.”

पंतप्रधान नरेंद्र मोदी 30 डिसेंबर रोजी अयोध्या दौऱ्यावर

0


अयोध्येत, नागरी सुविधांमध्ये सुधारणा करण्यासाठी आणि जागतिक दर्जाच्या पायाभूत सुविधा विकसित करण्यासाठी 11,100 कोटी रुपयांहून अधिक खर्चाच्या अनेक विकास प्रकल्पांचे पंतप्रधान करणार उद्‌घाटन आणि पायाभरणी

श्रीराम मंदिर वास्तूची चित्रकृती असलेल्या अयोध्या विमानतळ टर्मिनल इमारतीच्या दर्शनी भागाचे पंतप्रधान करणार उद्‌घाटन

पंतप्रधानांच्या हस्ते होणार अयोध्या धाम जंक्शन रेल्वे स्थानकाचे उद्‌घाटन

पंतप्रधान दोन नवीन अमृत भारत गाड्यांना हिरवा झेंडा दाखवणार, देशात अमृत भारत गाड्यांचे सुरू होणार कार्यान्वयन

पंतप्रधान, सहा नव्या वंदे भारत गाड्यांना दाखवणार हिरवा झेंडा

आगामी श्रीराम मंदिरामध्‍ये प्रवेश सुलभता वाढवण्यासाठी अयोध्येत चार नवीन रस्त्यांचे पंतप्रधान करणार उद्‌घाटन

अयोध्येत 2180 कोटी रुपयांहून अधिक खर्चून विकसित होत असलेल्या हरितक्षेत्र नगरीची पंतप्रधान करणार पायाभरणी

संपूर्ण उत्तर प्रदेशात 4600 कोटी रुपयांहून अधिक किंमतीच्या इतर अनेक महत्त्वपूर्ण प्रकल्पांचे पंतप्रधान करणार उद्‌घाटन आणि राष्ट्रार्पण

नवी दिल्ली, 28 डिसेंबर 2023

पंतप्रधान नरेंद्र मोदी 30 डिसेंबर 2023 रोजी उत्तर प्रदेशातील अयोध्येला भेट देणार आहेत. सकाळी सुमारे 11:15 वाजता पंतप्रधान पुनर्विकसित अयोध्या रेल्वे स्थानकाचे उद्घाटन करतील आणि नवीन अमृत भारत गाड्या आणि वंदे भारत गाड्यांना हिरवा झेंडा दाखवतील. इतर अनेक रेल्वे प्रकल्पही ते देशाला समर्पित करतील. सुमारे 12:15 वाजता पंतप्रधान नव्याने बांधण्यात आलेल्या अयोध्या विमानतळाचे उद्घाटन करतील. पंतप्रधान, दुपारी 1 वाजण्याच्या सुमारास एका सार्वजनिक कार्यक्रमात सहभागी होतील. तिथे  ते  15,700 कोटी रुपयांहून अधिक खर्चाच्या राज्यातील अनेक विकास प्रकल्पांचे राष्ट्रार्पण आणि पायाभरणी करतील. यामध्ये अयोध्या आणि तिच्या आसपासच्या भागांच्या विकासासाठी सुमारे 11,100 कोटी रुपयांचे प्रकल्प आणि उत्तर प्रदेशातील इतर प्रकल्पांशी संबंधित सुमारे 4600 कोटी रुपयांचे प्रकल्प यांचा समावेश आहे. अयोध्येत आधुनिक जागतिक दर्जाच्या पायाभूत सुविधांचा विकास करणे, संपर्क व्यवस्था सुधारणे आणि शहराच्या समृद्ध इतिहास तसेच वारशाच्या अनुषंगाने नागरी सुविधांमध्ये सुधारणा करणे ही पंतप्रधानांची ध्येयदृष्टी आहे. या संकल्पनेला प्रत्यक्षात आणण्यासाठी शहरात नवीन विमानतळ, नवीन पुनर्विकसित रेल्वे स्थानक, नवीन नागरी रस्ते आणि इतर नागरी पायाभूत सुविधांचा शुभारंभ होत आहे. यासह, अनेक नवीन प्रकल्पांची पायाभरणी केली जाईल, त्यामुळे अयोध्या आणि आसपासच्या नागरी सुविधांचे सुशोभीकरण आणि सुधारणेला हातभार लागेल.

अयोध्या विमानतळ

अयोध्‍येतील अत्याधुनिक विमानतळाचा पहिला टप्पा 1450 कोटी रुपयांहून अधिक खर्चून विकसित केला आहे. विमानतळाच्या टर्मिनल इमारतीचे क्षेत्रफळ 6500 चौरस मीटर असेल.  दरवर्षी सुमारे 10 लाख प्रवाशांना सेवा देण्यासाठी ते सुसज्ज असेल. टर्मिनल इमारतीच्या  दर्शनी भागामध्‍ये  अयोध्येतील उद्घाटन होऊ घातलेल्या श्रीराम मंदिराच्या स्थापत्यकलेचे चित्रण केले आहे. टर्मिनल इमारतीचा अंतर्गत भाग  भगवान श्रीराम यांचे जीवन दर्शवणारी स्थानिक कला, चित्रे आणि भित्तीचित्रांनी सुशोभित केला  आहे.

अयोध्या विमानतळाची टर्मिनल इमारत  उष्णतारोधक छत प्रणाली, एलईडी दिवे, पावसाचे पाणी साठवणे, कारंज्यांसह मोहक हिरवळ, जलशुद्धीकरण प्रकल्प, सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प, सौर ऊर्जा प्रकल्प यासारख्या विविध शाश्वत वैशिष्ट्यांसह सुसज्ज आहे. अशा इतर अनेक वैशिष्ट्यांसह ‘गृह चार’ जीआरआयएचए- चार मानांकनाची पूर्तता ही विमानतळ वास्तू करते. या विमानतळामुळे या भागातील दळणवळण सुधारेल. परिणामी पर्यटन, व्यावसायिक उपक्रम आणि रोजगाराच्या संधींना चालना मिळेल.

अयोध्या धाम रेल्वे स्थानक

अयोध्या धाम जंक्शन रेल्वे स्थानक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पुनर्विकसित अयोध्या रेल्वे स्थानकाचा पहिला टप्पा 240 कोटी रुपयांहून अधिक खर्चून विकसित करण्यात आला आहे. तीन मजली आधुनिक रेल्वे स्थानकाची इमारत उद्वाहक, सरकते जिने, खाद्य पदार्थ, भोजन, उपाहारगृह परिसर, पूजा साहित्याची  दुकाने, कपडे ठेवण्यासाठीच्या खोल्या, बालसंगोपनासाठी कक्ष , प्रतीक्षालय यासारख्या सर्व आधुनिक सुविधांनी सुसज्ज आहे. स्थानकाची इमारत ‘सर्वांसाठी खुली’ आणि ‘आय. जी. बी. सी. प्रमाणित हरित स्थानक इमारत’ असेल.

अमृत भारत रेल्वेवंदे भारत रेल्वे आणि इतर रेल्वे प्रकल्प

अयोध्या धाम जंक्शन रेल्वे स्थानकावरील कार्यक्रमात देशातील अतिजलद प्रवासी गाड्यांच्या नवीन श्रेणी-अमृत भारत एक्स्प्रेसला पंतप्रधान हिरवा झेंडा दाखवतील.

अमृत भारत रेल्वे गाडी ही एलएचबी  पुश – पुल ट्रेन म्हणजे दोन्ही बाजूने खेचता येण्यासारखी गाडी असून तिचे डबे वातानुकूलित नाहीत.  चांगल्या वेगासाठी या गाडीच्या दोन्ही टोकांना लोको इंजिन आहेत. या गाडीत प्रवाशांसाठी सुंदर आणि आकर्षक रचना केलेली आसन व्यवस्था, सामान ठेवण्यासाठी उत्तम कप्पे, मोबाईल अडकवण्याच्या सोईसह मोबाईल चार्जिंग पॉइंट, एलईडी दिवे, सीसीटीव्ही, सार्वजनिक माहिती प्रणाली यासारख्या चांगल्या सुविधा आहेत.

पंतप्रधान, सहा नवीन वंदे भारत रेल्वेगाड्यांनाही हिरवा झेंडा दाखवतील. दरभंगा-अयोध्या-आनंद विहार टर्मिनल अमृत भारत एक्सप्रेस आणि मालदा शहर-सर एम. विश्वेश्वरय्या टर्मिनस (बंगळुरू) अमृत भारत एक्सप्रेस या दोन नवीन अमृत भारत गाड्यांनाही पंतप्रधान हिरवा झेंडा दाखवतील.

पंतप्रधान सहा नवीन वंदे भारत गाड्यांनाही हिरवा झेंडा दाखवतील.  यामध्ये, श्री माता वैष्णोदेवी कटरा-नवी दिल्ली वंदे भारत एक्सप्रेस,  अमृतसर-दिल्ली वंदे भारत एक्सप्रेस;  कोईम्बतूर-बंगळुरुर कॅन्ट वंदे भारत एक्सप्रेस, मंगळूरु-मडगाव वंदे भारत एक्सप्रेस,  जालना-मुंबई वंदे भारत एक्सप्रेस आणि अयोध्या-आनंद विहार टर्मिनल वंदे भारत एक्सप्रेस, या गाड्यांचा समावेश आहे.

या प्रदेशातील रेल्वे पायाभूत सुविधा मजबूत करण्यासाठी 2300 कोटी रुपयांचे तीन रेल्वे प्रकल्पही पंतप्रधान राष्ट्राला समर्पित करतील.  रुमा चकेरी-चंदेरी,  जौनपूर-अयोध्या-बाराबंकी दुहेरीकरण प्रकल्पातील जौनपूर-तुलसीनगर, अकबरपूर-अयोध्या, सोहवाल-पतरंगा आणि सफदरगंज-रसौली विभाग, आणि मल्हार-दळीगंज रेल्वे विभागाचे दुहेरीकरण आणि विद्युतीकरण प्रकल्प, असे हे तीन प्रकल्प आहेत.

अयोध्येतील सुधारीत नागरी पायाभूत सुविधा

निर्माणाधीन  श्रीराम मंदिराकडे जाणे सोपे व्हावे यासाठी, पंतप्रधान अयोध्येतील, रामपथ, भक्तिपथ, धर्मपथ आणि श्रीरामजन्मभूमी पथ या चार नव्याने पुनर्विकसित, रुंदीकरण केलेल्या आणि सुशोभित रस्त्यांचे उद्घाटन करतील.

नागरी पायाभूत सुविधांना बळकटी देणारे आणि अयोध्येतील आणि आसपासच्या सार्वजनिक ठिकाणांचे सुशोभीकरण करणाऱ्या अनेक प्रकल्पांचे पंतप्रधान उद्घाटन करतील आणि हे प्रकल्प राष्ट्राला समर्पित करतील.  या  प्रकल्पांमध्ये, राजर्षी दशरथ स्वायत्त राज्य वैद्यकीय महाविद्यालय, अयोध्या-सुलतानपूर रोड-विमानतळ यांना जोडणारा चौपदरी रस्ता,  राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 27 बायपास महोब्रा बाजार मार्गे तेढी बाजार श्रीरामजन्मभूमीपर्यंत चौपदरी रस्ता;  शहर आणि अयोध्या बायपास परिसरातील अनेक सुशोभित रस्ते, राष्ट्रीय महामार्ग क्रमांक-330A चा जगदीशपूर-फैजाबाद विभाग, महोली-बारागाव-देवधी रस्ता आणि जसरपूर-भाऊपूर-गंगारामन-सुरेशनगर रस्त्याचे रुंदीकरण आणि मजबुतीकरण, पंचकोसी परिक्रमा मार्गावरील बडी बुवा रेल्वे फाटकावर रेल्वे उड्डाणपूल,  पिखरौली गावात घनकचरा प्रक्रिया प्रकल्प,  आणि डॉ. ब्रजकिशोर होमिओपॅथिक महाविद्यालय आणि रुग्णालयामध्ये नवीन इमारती आणि वर्गखोल्या, अशा प्रकल्पांचा समावेश आहे.  मुख्यमंत्री नगर सृजन योजनेच्या कामांशी संबंधित कामे आणि पाच वाहनतळ तसेच व्यावसायिक सुविधांचे उद्‌घाटनही पंतप्रधान करणार आहेत.

अयोध्येत नवीन प्रकल्पांची पायाभरणी

अयोध्येतील नागरी सुविधांच्या सुधारणेत मदत करणाऱ्या, तसेच शहराचा समृद्ध सांस्कृतिक वारसा बळकट करणाऱ्या नवीन प्रकल्पांची पायाभरणी देखील, पंतप्रधान  करतील.  यामध्ये, अयोध्येतील चार ऐतिहासिक प्रवेशद्वारांचे संवर्धन आणि सुशोभीकरण,  गुप्तार घाट आणि राजघाट दरम्यान नवीन काँक्रीट घाट आणि पूर्वनिर्मित घाटांचे पुनर्वसन, नया घाट ते लक्ष्मण घाटापर्यंतच्या पर्यटन सुविधांचा विकास आणि सुशोभीकरण, ‘राम की पौडी’ इथे दीपोत्सव आणि इतर जत्रांसाठी अभ्यागतांसाठी सज्जा बांधणे, राम की पौडी  ते राज घाट आणि राजघाट ते राम मंदिर या यात्रेकरू मार्गाचे बळकटीकरण आणि नूतनीकरण, या प्रकल्पांचा समावेश आहे.

पंतप्रधान, अयोध्येत 2180 कोटी रुपयांहून अधिक खर्च करून विकसित केल्या जाणाऱ्या हरितक्षेत्र  नगर वसाहत आणि सुमारे 300 कोटी रुपये खर्चून विकसित होणाऱ्या वसिष्ठ कुंज निवासी योजनेची पायाभरणी करणार आहेत.

राष्ट्रीय महामार्ग क्रमांक-28 (नवीन राष्ट्रीय महामार्ग क्रमांक-27) च्या लखनौ-अयोध्या विभागाची पायाभरणी, राष्ट्रीय महामार्ग क्रमांक-28 (नवीन राष्ट्रीय महामार्ग क्रमांक -27) च्या विद्यमान अयोध्या बायपासचे बळकटीकरण आणि सुधारणा,  अयोध्येत CIPET केंद्राची स्थापना आणि अयोध्या महानगरपालिका, तसेच अयोध्या विकास प्राधिकरण कार्यालयाचे बांधकाम, या कामांची पायाभरणी सुद्धा पंतप्रधान करतील.

उत्तर प्रदेशातील इतर प्रकल्प

सार्वजनिक कार्यक्रमादरम्यान, पंतप्रधान उत्तर प्रदेशातील इतर महत्त्वपूर्ण प्रकल्पांचे उद्घाटन करुन ते राष्ट्राला समर्पित करतील.  यामध्ये गोसाई की बाजार बायपास-वाराणसी (घाघरा ब्रिज-वाराणसी) (राष्ट्रीय महामार्ग क्रमांक-233) च्या चौपदरी रुंदीकरण,  राष्ट्रीय महामार्ग क्रमांक-730 च्या खुटार ते लखीमपूर विभागाचे बळकटीकरण आणि सुधारणा, अमेठी जिल्ह्यातील त्रिशुंडी येथील एलपीजी प्लांटची क्षमतावाढ,   पांखा येथे 30 एमएलडी आणि जाजमाऊ, कानपूर येथे 130 एमएलडीचा सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प,  उन्नाव जिल्ह्यातील नाले अडवून ते वळवणे आणि त्यावर सांडपाणी प्रक्रिया  आणि कानपूरमधील जाजमाऊ येथे टॅनरी क्लस्टरसाठी सीईटीपी, अशा प्रकल्पांचा समावेश आहे.

एयर इंडियाच्या फॉगकेयर उपक्रमाच्या माध्यमातून यंदाच्या हिवाळ्यात धुक्याचा फटका बसलेल्या प्रवाशांना मदत केली जाणार

गुरुग्राम२८ डिसेंबर २०२३ – एयर इंडिया या भारतातील आघाडीच्या विमानवाहतूक कंपनीने आज दिल्ली आयजीआय विमानतळावर येणाऱ्या व जाणाऱ्या प्रवाशांना हिवाळ्यात त्यांच्या फ्लाइटच्या वेळांवर धुक्यामुळे मोठा परिणाम झाल्यास कोणत्याही अतिरिक्त शुल्काशिवाय त्या वेळांमध्ये बदल करण्याची किंवा बुकिंग रद्द करण्याची मुभा प्रवाशांना दिली जाणार आहे. हा गेल्या वर्षी सुरू करण्यात आलेल्या फॉगकेयर उपक्रमाचा भाग आहे.

एयर इंडियाद्वारे ग्रस्त प्रवाशांना सक्रिय सहकार्य केले जाईल व त्यांना कोणत्याही अतिरिक्त शुल्काशिवाय वेळ बदलण्याची किंवा तिकिट रद्द करण्याच मुभा मिळेल.

धुक्यामुळे विमानसेवेला फटका बसल्याने प्रवाशांची गैरसौय कमी करण्यासाठी फॉगकेयर हा उपक्रम हाती घेण्यात आला आहे. या उपक्रमामुळे नेटवर्कच्या वेळापत्रकाची अखंडता राखण्यास मदत होईलअसे एयर इंडियाचे प्रमुख ग्राहक अनुभव अधिकारी राजेश डोग्रा म्हणाले.

या विमानसेवांच्या प्रवाशांना विमानसेवेशी संबंधित वेळोवेळी माहिती दिली जाईल आणि त्यांचा प्रवास सुखकर होईल याची काळजी घेण्यात येईल.

अधिक माहितीसाठी http://www.airindia.com or click on fr.airindia.com/1mw

विदर्भातील ४७ प्रकल्पांना सुधारित प्रशासकीय मान्यता; एकूण २ लाख २३ हजार ४७४ हेक्टर क्षेत्र येणार सिंचनाखाली – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

0

मुंबई, दि. २८ : विदर्भातील ४७ सिंचन प्रकल्पांना आज १८ हजार ३९९ कोटी रुपयांची सुधारित प्रशासकीय मान्यता देण्यात आली. या प्रकल्पांच्या माध्यमातून विदर्भातील एकूण २ लाख २३ हजार ४७४ हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येणार असल्याचे उपमुख्यमंत्री तथा जलसंपदा मंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

सह्याद्री अतिथीगृह येथे विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळाच्या नियामक मंडळाची बैठक उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आज झाली. या बैठकीत सुधारित प्रशासकीय मान्यता देण्यात आल्या. तसेच यावेळी कृष्णा पाटबंधारे विकास महामंडळ, तापी पाटबंधारे विकास महामंडळ, कोकण पाटबंधारे विकास महामंडळ, गोदावरी पाटबंधारे विकास महामंडळाच्या नियामक मंडळाची बैठक झाली. या बैठकीस वित्त विभागाचे अपर मुख्य सचिव डॉ. नितिन करीर, जलसंपदा विभागाचे अपर मुख्य सचिव दीपक कपूर, उपमुख्यमंत्री यांचे प्रधान सचिव डॉ. श्रीकर परदेशी यांच्यासह विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

सिंचन प्रकल्पाचा दायित्व खर्च १०० टक्के किंवा १० कोटी पेक्षा जास्त होत असेल, तर त्या ठिकाणी नव्याने निविदा काढण्याच्या सूचना देऊन उपमुख्यमंत्री श्री फडणवीस म्हणाले की, या निविदा प्रक्रियांसाठी उच्चस्तरीय समिती स्थापन करावी. त्या उच्चस्तरीय समितीने नवीन निविदा मान्यता द्यावी. प्रकल्पाचा सर्वाधिक खर्च हा भूसंपादन प्रक्रियेवर होत आहे. भू संपादनाची प्रक्रिया वेळेत पूर्ण करावी. न्याय प्रविष्ट प्रकरणांमध्ये रक्कम न्यायालयात भरावी. त्यानंतर उच्चस्तरीय समिती गठित करून तडजोडीसाठी येणाऱ्या प्रकल्पग्रस्तांशी तडजोड करावी. भूसंपादनाच्या मोबदल्यात देण्यात येणाऱ्या रकमेवरील व्याज दर बँके प्रमाणे देण्याचा प्रस्ताव तयार करून तो केंद्राच्या मान्यतेसाठी सादर करावा. महसूल विभागाने मुदतीत प्रस्ताव पाठवावेत. मुदतीत प्रस्ताव न पाठविणाऱ्या भूसंपादन अधिकाऱ्यांवर जबाबदारी निश्चित करावी, अशा सूचना उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी दिल्या.

उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले की, दोन वर्षांच्या कालावधीत निधी खर्चाचे नियोजन करावे, सिंचन प्रकल्पाचा खर्च न झालेला निधी दोन वर्षानंतर पुनर्वसनासाठी खर्च करावा. धरणाच्या भिंतीवर तसेच जलाशयाच्या भागात तरंगते सौर ऊर्जा प्रकल्प उभारण्याबाबत विचार व्हावा. यातून पाटबंधारे विभागाला महसूल मिळेल, असेही त्यांनी सांगितले.

यावेळी जिंगाव मध्यम प्रकलपातील प्रकल्पग्रस्तांसाठी सुरू करण्यात आलेल्या बेसिक या ऑनलाईन प्रणालीचे व या प्रणालीच्या लोगोचे अनावरण करण्यात आले. या प्रणालीच्या माध्यमातून प्रकल्पग्रस्तांना त्यांचे दाखले ऑनलाइन मिळणार आहेत.

लोकशाहीची थट्टा करणाऱ्या मोदी व भाजपाला धडा शिकवा – मल्लिकार्जून खरगे.

इंदिराजी गांधींना विदर्भ व महाराष्ट्राने जशी साथ दिली तशीच साथ राहुलजी गांधींनाही द्या – नाना पटोले

देशाला व राज्याला मजबूत, स्थिर सरकार देण्यासाठी ‘इंडिया आघाडी’ला विजयी करा – अशोक चव्हाण

काँग्रेसच्या १३९ व्या स्थापना दिनी नागपूरच्या ‘भारत जोडो’ मैदानात अतिविराट जाहीर सभा.

नागपूर दि. २८ डिसेंबर
देशात सध्या लोकशाही व संविधान धोक्यात आहे, महागाई, बेरोजगारी प्रचंड वाढलेली आहे. केंद्रातील ३२ लाख सरकारी पदे रिक्त असतानाही मोदी सरकार नोकर भरती करत नाही, मागासवर्गीयांना संधी मिळेल म्हणून मोदी सरकार नोकर भरती करत नाहीत. मोदींना जगभर फिरण्यास वेळ आहे पण संसदेचे अधिवेशन सुरु असताना संसदेत येण्यास वेळ नाही. संसदेत प्रश्न विचारणाऱ्या विरोधी पक्षांच्या १४६ खासदारांना निलंबित करून कायदे पास करून घेतले ही लोकशाहीची थट्टा आहे. लोकशाहीला न जुमनणाऱ्या मोदी व भाजपाला धडा शिकवा असे आवाहन काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जून खरगे यांनी केले.

काँग्रेसच्या १३९ व्या स्थापना दिनी नागपूरच्या ‘भारत जोडो’ मैदानात अतिविराट जाहीर सभेला ते संबोधित करत होते. ते पुढे म्हणाले की, संविधानाने महिला, गरिब, मागास समाजाला अधिकार दिले ते भाजपा देऊ शकत नाही. काँग्रेस पक्ष फुले, शाहु, आंबेडकरांच्या विचारधारेवर चालतो तर मोदी आरएसएसच्या विचारधारेवर चालतात. मोदी सरकारने देशावर २०० लाख कोटी रुपयांच्या कर्जाचा डोंगर करुन ठेवला आहे पण कल्याणकारी योजनांवरील निधीमध्ये कपात केली जाते, मागास समाजातील विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती दिली नाही. मोदी सरकारच्या काळात दलितांवर अत्याचार वाढले आहेत. भाजपाला रोखले नाही तर देश बरबाद होईल, संविधान संपुष्टात येईल.

माजी अध्यक्ष खासदार राहुलजी गांधी यावेळी म्हणाले की, केंद्रात सत्ता आल्यापासून नरेंद्र मोदी यांनी सर्व सरकारी यंत्रणांवर कब्जा केला आहे यातून मीडिया, निवडणूक आयोग, न्यायालयेही सुटली नाहीत. दरवर्षी २ कोटी रोजगार देण्याचे आश्वास दिले होते पण १० वर्षात मोदींनी किती लोकांना रोजगार दिला? देशात आज ४० वर्षातील सर्वात जास्त बेरोजगारी आहे. नोकरी नसल्याने कोट्यवधी तरुणांची शक्ती वाया जात आहे. शेतकरी, तरुण संकटात आहे तर दुसरीकडे देशातील दोन-चार उद्योगपतींकडे देशातील सर्व संपत्ती सोपवली जात आहे. ओबीसी, दलित, मागासवर्गीयांना सत्तेत, प्रशासनात अत्यंत कमी वाटा मिळत आहे. सर्वच क्षेत्रात या समाज घटकांना कमी स्थान दिले जाते. काँग्रेस पक्षाने जातनिहाय जनगणना करण्याची मागणी केली त्यानंतर मोदींची भाषा बदलली व देशात गरिब ही एकच जात आहे असे ते बोलत आहेत. देशातील सर्व समाज घटकांना सोबत घेऊन जावे लागणार आहे, हीच काँग्रेसची विचारधारा आहे. काँग्रेस सत्तेत आल्यास जातनिहाय जनगणना करेल व देशातील तरुणांना रोजगाराची आवश्यकता आहे ते मोदी सरकार दे देऊ शकत नाही ते काम काँग्रेस पक्षच करेल. आपल्या मदतीने महाराष्ट्रात व देशात परिवर्तन आणू असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराज, राजर्षी शाहु महाराज, महात्मा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची विचारधारा असलेल्या भूमीत काँग्रेस स्थापना दिन साजरा होत आहे याचे स्वागत आहे. महात्मा गांधी यांनी याच नागपुरातून हुकूमशाही सत्तेच्या विरोधात नारा दिला व संपूर्ण देशातून जनता एकवटली आणि १५० वर्षांची ब्रिटिशांची हुकूमशाही राजवट संपुष्टात आणली. नागपुरातून याच भूमितून इंदिराजी गांधी यांच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाचा ठराव केला होता. भारताच्या मध्यवर्ती भागात ही सभा होत असून मल्लिकार्जून खरगे व राहुलजी गांधी यांचा संदेश देशात जावा यासाठी ही सभा महत्वाची आहे. हुकूमशाही सत्तेला बाहेर हाकलण्यासाठी, कामगार, शेतकरी, तरुणांना न्याय देण्यासाठी, लोकशाही व संविधान वाचवण्यासाठी है तैयार हम, हा संदेश या सभेतून दिला आहे. इंदिराजी गांधी यांनी देशात हरित क्रांती, श्वेत क्रांती आणली, देशाचा विकास केला. इंदिराजी गांधी यांनी त्यावेळी नागपुरात सभा घेतली व विदर्भातील जनतेने लोकसभेच्या ११ पैकी ११ जागा विजय मिळून दिला व इंदिराजी पंतप्रधान झाल्या. आज इंदिराजी यांचे नातू राहुलजी गांधी मोहब्बत का संदेश घेऊन आले आहेत, त्यांनाही विदर्भ व महाराष्ट्राने तशीच साथ द्यावी, असे आवाहन पटोले यांनी केले.
माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यावेळी म्हणाले की, स्वातंत्र्यापासून आजपर्यंत काँग्रेस पक्षाने बलिदान दिले आहे, हे बलिदान व्यर्थ जाऊ देऊ नका. चार राज्यातील विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला अपेक्षित निकाल लागला नाही तरी जनतेचा पाठिंबा मात्र वाढला आहे. देशासमोर आज मोठी संकटे उभी आहेत, महागाई, बेरोजगारी, शेतकऱ्यांचे प्रश्न, महिला अत्याचार या विषयावर भाजपा सरकार बोलत नाहीत. जनतेचे प्रश्न बाजूला ठेवून धर्मांध शक्ती वेगळे मुद्दे पुढे करत आहे. काँग्रेसला संपवण्याचा प्रयत्न आजपर्यंत अनेकांनी केला, काँग्रेस संपली नाही पण ते लोक मात्र संपले हे लक्षात ठेवा. राज्यात समाजा-समाजात वाद उभे केले आहेत, लोकांमध्ये भांडणे लावून सत्तेची पोळी भाजली जात आहे. जातनिहाय जनगणना करणे व आरक्षणाची ५० टक्क्यांची मर्यादा हटवणे ही काँग्रेसची भूमिका आहे पण भाजपा सरकार ते करत नाही. देशाची लोकशाही व डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या संविधानाचे रक्षण करण्यासाठी एकत्र येऊन काम करावे लागणार आहे. देशाला व राज्याला मजबूत व स्थिर सरकार देण्यासाठी इंडिया आघाडीला विजयी करा.

काँग्रेसच्या १३९ व्या स्थापना दिनी नागपूरच्या ‘भारत जोडो’ मैदानात अतिविराट जाहीर सभा झाली. या सभेला राष्ट्रीय अध्यक्ष खासदार मल्लिकार्जून खरगे, माजी अध्यक्ष, खासदार राहुलजी गांधी, अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस खासदार के. सी. वेणुगोपाल, मुकुल वासनिक, तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी, कर्नाटकचे उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार, हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री सुखविंदर सुख्खू, प्रभारी रमेश चेन्नीथल्ला, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, विधिमंडळ पक्षनेते बाळासाहेब थोरात, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, माजी मुख्यमंत्री CWC सदस्य अशोक चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण, सुशिलकुमार शिंदे, विधान परिषद गटनेते सतेज बंटी पाटील, गोवा, दिव व दमनचे प्रभारी माणिकराव ठाकरे, माजी मंत्री डॉ. नितीन राऊत, यशोमती ठाकूर, अमित देशमुख, वर्षा गायकवाड, डॉ. विश्वजित कदम, माजी खासदार मिलिंद देवरा, प्रदेश कार्याध्यक्ष नसीम खान, चंद्रकांत हांडोरे, बसवराज पाटील, आ. कुणाल पाटील, आ. प्रणिती शिंदे, महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्या संध्या सव्वालाखे, माजी केंद्रीय मंत्री विलास मुत्तेमवार, अल्पसंख्याक विभागाचे अध्यक्ष आ. वजाहत मिर्जा, नागपूर शहर अध्यक्ष आमदार विकास ठाकरे, नागपूर ग्रामीणचे अध्यक्ष राजेंद्र मुळक, मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे, आमदार अभिजित वंजारी, प्रदेश सरचिटणीस प्रमोद मोरे, देवानंद पवार, देशातील काँग्रेसचे मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्ष, विरोधी पक्षनेते, वरिष्ठ नेते, पदाधिकारी व लाखो लोक उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन खासदार मुकुल वासनिक यांनी केले तर आभार प्रदर्शन विधिमंडळ पक्षनेते बाळासाहेब थोरात यांनी केले.

शौर्य दिनी टँकरने होणारी गैरसोय टाळण्याचे प्रशासनाला आवाहन

पुणे:‘शौर्य दिनी भीमा कोरेगाव येथे टँकरने गर्दीत होणारी गैरसोय टाळून शासनाने पॅक बंद पाण्याची सोय करावी’, असे आवाहन संविधान ग्रुपचे सचिन गजरमल,राकेश सोनवणे, राजे प्रतिष्ठानचे मिलिंद गायकवाड,लष्कर-ए-भीमा संघटनेचे सचिन धीवार आणि सहकाऱ्यांनी पुणे जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.एक जानेवारी २०२४ रोजी होणाऱ्या भीमा कोरेगाव येथे शौर्यस्तंभाला अभिवादन करण्यासाठी आलेल्या भीम अनुयायांसाठी शासनाने पाण्याच्या टँकर च्या ऐवजी पॅक बंद बॉटलमध्ये पाणी वाटण्याची व स्तंभाजवळ बॅरिकेट काढून सर्वसामान्य नागरिकांना स्तंभा पर्यंत पोहोचून अभिवादन करता येईल अशी व्यवस्था करावी, असे त्यांनी निवेदनात म्हटले आहे.आज २८ डिसेंबर रोजी त्यांनी हे निवेदन दिले.

‘गेल्या दोन-तीन वर्षापासून आम्ही प्रशासनाकडे मागणी करीत आहोत की ,भीमा कोरेगाव एक जानेवारी शौर्य स्तंभाला येणाऱ्या अनुयायांसाठी तिथे टँकरने पाणीपुरवठा करू नये . गर्दीत गैरसोय होते.तिथे पॅक बंद बॉटल ने पाणीपुरवठा करण्यात यावा .यामध्ये शासनाचा धरसोड कारभार दिसून येतो. सर्व अधिकाऱ्यांसाठी तिथे पाण्याच्या बाटलीची व्यवस्था केली जाते .पण सर्वसामान्य भिम अनुयायांसाठी टॅंकरने पाणी दिले जाते. हा दुजा भाव आहे. टँकर ने सर्वाना पाणी कोणीच देऊ शकत नाही. ते पाणी वाया जाते .आणि सर्वसामान्य भीम अनुयायांना पाणी मिळत नाही. गर्दी असल्यामुळे टँकर आत येऊ शकत नाही .लोक पाण्यासाठी इकडे तिकडे भटकतात .त्यामुळे शासन भीमा कोरेगाव येथे कोट्यावधी रुपये खर्च करत असून उपयोग होत नाही.यामुळे आम्ही प्रशासनाकडे अशी मागणी करतो की आपण जर एक जानेवारी रोजी पाण्याची व्यवस्था केली नाही तर आम्ही पुण्याचे पालकमंत्री तथा उप मुख्यमंत्री अजित पवार यांना निवेदन देवू.आणि आमचे म्हणणे मांडू ,याची नोंद प्रशासनाने घ्यावी व याची सर्व सुविधा द्याव्यात.ही सर्व जबाबदारी प्रशासनाची राहील’,असे या निवेदनात नमूद करण्यात आले आहे.दरम्यान , शौर्य दिन हा शासन दरबारी एकच दिवस नोंद असून,दोन दिवस साजरा करण्याबाबत कोणी अफवा पसरवू नये,असे प्रशासनाने यावेळी स्पष्ट केले.

‘व्यसन टाळा, स्वच्छतेचे नियम पाळा’ -पद्मश्री डॉ.रमण गंगाखेडकर यांचा संदेश

पुणे, दि. २८: शिवछत्रपती क्रीडा संकुल येथे आयोजित राष्ट्रीय बाल वैज्ञानिक प्रदर्शनात पद्मश्री रमण गंगाखेडकर यांनी ‘आरोग्य आणि स्वछता’ या विषयावर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांनी आरोग्य चांगले रहावे म्हणून व्यसनापासून दूर रहावे आणि स्वच्छतेचे नियम कटाक्षाने पाळावे, असा संदेश शालेय विद्यार्थ्यांना त्यांनी यावेळी दिला.

श्री. गंगाखेडकर यांनी मानवी जीवनातील स्वच्छतेचे महत्व सांगताना दैनंदिन जीवनातील छोट्या छोट्या गोष्टींमधून स्वच्छतेच्या सवयी कशा विकसित करता येतील ते उदाहरणांसह सांगितले. ते म्हणाले, काहीही खाण्याआधी हात स्वच्छ धुणे, दररोज सकाळी उठल्यावर व संध्याकाळी झोपण्यापूर्वी दात घासणे, कोणत्याही उघड्या पृष्ठभागावर स्पर्श करणे टाळणे या सवयी आरोग्यासाठी महत्वाच्या आहेत. हात न धुता त्याच हाताने खाल्यास डायरियासारखे आजार होतात.

अस्वच्छतेमुळे विविध त्वचा विकार होतात. स्वच्छतेसोबत व्यायामही आरोग्यासाठी उपयुक्त ठरतो. चालणे हा सर्वात उत्तम व्यायाम असून दररोज चालण्याची सवय ठेवावी. किशोरवयातील काही चुकीच्या सवयीमुळे त्याचा प्रौढ जीवनावर परिणाम होतो. व्यसनाची लागलेली सवय मोडणे कठीण जाते. याबाबत मित्रांना वेळीच नाही म्हणायला शिकले पाहिजे, असे डॉ.गंगाखेडकर म्हणाले.

निरोगी आयुष्य जगण्यासाठी सकारात्मकता महत्वाची असल्याचे सांगून ते म्हणाले, मुलांची स्वतःची स्पर्धा ही स्वतःशीच असली पाहिजे. प्रत्यकाने स्वतःमधील क्षमता ओळखुन त्या वाढविण्याचा प्रयत्न करावा. स्वतःमध्ये सकारात्मक दृष्टिकोन निर्माण करणे सर्वात महत्त्वाचे आहे. स्वतःची कौशल्ये विकसित करणे आवश्यक आहे. अशाप्रकारे जीवनात लहान लहान गोष्टीमधील स्वच्छता, समाजातील लोकांमध्ये स्वच्छतेबद्दल जाणीव जागृती निर्माण करणे, देशाची आरोग्य विषयक धोरणे निश्चित करण्यासाठी योगदान देणे, स्वतःशी व देशाशी प्रामाणिक राहून देशाची सेवा करणे हेच आपले आद्य कर्तव्य आहे, असेही त्यांनी सांगितले.

प्लास्टिकचा अतिवापर मानवाच्या शरीरावर खूप परिणाम करत आहे. प्लास्टिकचा अंश आता मानवी रक्तामध्ये सापडत आहे ही धोक्याची घंटा आहे, असेही ते म्हणाले. यावेळी डॉ.गंगाखेडकर यांनी विद्यार्थ्यांच्या विविध शंकांचे समाधान केले.

यावेळी राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेचे संचालक अमोल येडगे, सहसंचालक रमाकांत काठमोरे, उपसंचालक डॉ. कमलादेवी आवटे, डॉ. नेहा बेलसरे, विज्ञान विभागांच्या विभाग प्रमुख तेजस्विनी आळवेकर, अधिव्याख्याता वृषाली गायकवाड उपस्थित होते.

खोट्या कागदपत्राच्या आधारे मतदार नोंदणी करण्याचा प्रयत्न करणाऱ्यांवर गुन्हा दाखल

पुणे, दि. २८: मुळशी तहसील कार्यालयाअंतर्गत खोट्या कागदपत्राच्याआधारे मतदार नोंदणी करण्याचा प्रयत्न करणाऱ्या व्यक्तींवर पौड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मतदार याद्यांच्या विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रमांतर्गत २०३ भोर मतदार संघ ता. मुळशी येथील पिरंगुट व यादी भाग क्र. २०४ मुकाईवाडी येथे मतदार नोंदणीसाठी ऑनलाईन पद्धतीने मोठ्या प्रमाणात अर्ज क्र.६ दाखल करण्यात आले. या अर्जासोबत रहिवासी पुरावा म्हणून विद्युत देयक जोडण्यात आले होते. याबाबत शंका आल्याने महावितरणच्या संकेतस्थळावर पडताळणी केली असता विद्युत देयकांवरील नाव व पत्त्यात तफावत असल्याचे आढळून आले. याप्रकरणी खोटे विद्युत देयक रहिवासी पुरावा म्हणून सादर केल्याबद्दल विजय मारणे, अमित शिंदे, भाऊसाहेब मोकर, शकील अहमद व महंमद आलम यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अशा प्रकारच्या घटना आपल्या परिसरात घडत असल्याचे निदर्शनास आल्यास नजीकच्या तहसील किंवा तलाठी कार्यालय, पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा, असे आवाहन मतदार नोंदणी अधिकारी, २०३ भोर विधानसभा मतदारसंघ तथा उपविभागीय अधिकारी भोर तसेच तहसीलदार तथा सहायक मतदार नोंदणी अधिकारी रणजीत भोसले यांनी केले आहे.

राहुल गांधींकडून राजा – महाराजांचा अवमान:देवेंद्र फडणवीस यांचा आरोप; काँग्रेसची नागपुरात महारॅली नव्हे तर सूक्ष्म सभा झाल्याचा दावा

नागपूर-राहुल गांधींनी राजे- महाराजांचा अपमान केल्याची टीका उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. काँग्रेसची नागपुरात महारॅली नाही तर सूक्ष्म सभा झाली. काँग्रेसने कितीही हम तैयार हैचा दावा केला तरी लोक त्यांना ऐकायलाही तयार नाहीत, अशी कोपरखळीही फडणवीस यांनी यावेळी काँग्रेसला हाणली.

राहुल गांधी यांनी नागपुरातील सभेत बोलत असताना काँग्रेसची लढाई फक्त त्यावेळी ब्रिटिशांशी नव्हती, तर त्या वेळच्या राजा-महाराजांशी होती. त्यावेळी दलितांना स्पर्शही केला जात नव्हता, ही आरएसएसचा विचारधारा होती. आम्ही ते सगळे बंद केले, लोकांना मताचा अधिकार देऊन आपला नेता निवडण्याचा अधिकार दिला , जो पूर्वी नव्हता यावर देवेंद्र फडणवीसांनी टीकास्त्र डागले आहे.

नेमके राहुल गांधींचे वक्तव्य काय?

राहुल गांधी म्हणाले की, स्वातंत्र्यापूर्वी या देशात पाचशे-सहाशे राजे, इंग्रज होते. त्यावेळी सामान्य जनता भरडली जात होती. त्यावेळी त्यांच्या हातात सर्व अधिकार ऐकवटले होते. राजाला जे काही हवे, जे त्याच्या मनात यायचे ते तो करायचा. त्यावेळी आरएसएसने कधीही भारतीय राष्ट्रध्वजाचा मान ठेवला नाही. त्यावेळी काँग्रेसचे कितीतरी नेते तुरुंगात गेले. स्वातंत्र्यानंतर काँग्रेसने सर्वांना समान मानले , आणि प्रत्येकाला एका मताचा अधिकार दिला. सर्वसामान्य असो वा दलित, आदिवासी असो, किंवा राजा असो, सर्वांनाच काँग्रेसने एका मताचा अधिकार दिला आणि संविधानाखाली आणले . काँग्रेसची लढाई फक्त त्यावेळी ब्रिटिशांशी नव्हती, तर त्या वेळच्या राजा-महाराजांशी होती, जे इंग्रजांचे पार्टनर बनले होते . त्यावेळी दलितांना स्पर्शही केला जात नव्हता, ही आरएसएसचा विचारधारा होती. आम्ही ते सगळे बंद केले. आता पुन्हा देशाला त्या मार्गाने नेले जात आहे, असा हल्लाबोल राहुल गांधींनी केला.

मतदार यादी शुद्धीकरणासाठी कार्यवाही-राजेश देशमुख

दुबार नाव नोंदणी व समान छायाचित्राबाबत दुरूस्ती करुन घेण्याचे आवाहन

पुणे, दि. २८ : निवडणूक आयोगाने विविध माध्यमातून मतदार यादी शुद्धीकरणासाठी कार्यवाही सुरु केलेली आहे. पुणे जिल्ह्यात दुबार नाव नोंदणीचे २८ हजार तर समान छायाचित्राचे १ लाख ४२ हजार ३४९ मतदार असून संबंधितांनी त्यांना मिळालेल्या नोटीशीवरील पर्याय निवडून १ जानेवारी २०२४ पर्यंत दुरूस्ती करून घेण्याचे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी केले आहे.

भारतीय लोकप्रतिनिधीत्व अधिनियम १९५० च्या कलम १७ व १८ नुसार एका मतदाराची मतदार यादीमध्ये एकच नोंद असणे आणि निवडणूक प्रक्रिया ही पारदर्शकपणे पार पाडण्यासाठी मतदार यादी त्रुटीरहीत असणे आवश्यक आहे. मात्र काही मतदारांचे नाव एकापेक्षा जास्त ठिकाणी नोंद असलेचे आढळुन आले आहे. त्यानुषंगाने निवडणूक आयोगाने एकापेक्षा अधिक ठिकाणी समान छायाचित्र व एका पेक्षा जास्त ठिकाणी मतदारांच्या इतर माहितीमध्ये साधर्म्य आढळलेल्या किंवा दुबार नाव नोंदणी आढळलेल्या मतदारांना नमुना अ मध्ये नोटीस पाठविल्या आहेत.

या नोटीशीद्वारे कोणत्या एका ठिकाणी नाव अपेक्षित आहे हे ठरविण्याचा अधिकार मतदाराला दिला आहे. संबधित मतदाराने ज्या ठिकाणी त्याचे नाव असणे त्यांना स्वतःला अभिप्रेत आहे त्याठिकाणी बरोबरची खूण करावी आणि दिलेल्या ईमेल पत्त्यावर आधारकार्डच्या झेरोक्स प्रतिसह अपलोड करावे किवा संबधित मतदार केंद्रस्तरीय अधिकारी यांची भेट घेवून त्यांच्यामार्फत पुष्टीकरण पत्रावर कार्यवाही करावी.

या मोहिमेनंतर दोन ठिकाणी मतदाराचे नाव आढळल्यास निवडणूक आयोगाच्या सुचनाप्रमाणे त्यांच्यावर कायदेशीर कार्यवाही केली जाईल, असेही श्री. देशमुख यांनी कळविले आहे.

राज्याबाहेरील शेतकऱ्यांच्या प्रक्षेत्रावर भेटीसाठी अर्ज करण्याचे कृषी विभागाचे आवाहन

पुणे, दि. २८ : एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान सन २०२३-२४ अंतर्गत मनुष्यबळ विकास कार्यक्रमांतर्गत राज्याबाहेर शेतकऱ्यांचे प्रक्षेत्र भेट हा कार्यक्रम राबविण्यात येणार असून या कार्यक्रमात सहभाग घेण्यासाठी जिल्ह्यातील इच्छुक फलोत्पादक शेतकऱ्यांनी ३१ डिसेंबर पर्यंत अर्ज करण्याचे आवाहन कृषी विभागाने केले आहे.

राज्याबाहेर दौरा कार्यक्रमात फलोत्पादक शेतकऱ्यांसाठी तसेच शेतकऱ्यांमध्ये फलोत्पादन विषयक जिज्ञासा व आवड निर्माण करण्याच्या हेतूने तसेच फलोत्पादनाची प्रतवारी, हाताळणी, शेतस्तरावर करावयाची प्रक्रिया उद्योग स्थापन करणे, फलोत्पादनाच्या विपणन व्यवस्थेबाबत अभ्यास करणे, आधुनिक लागवड व काढणीपश्चात तंत्रज्ञानाबाबत सखोल शास्त्रोक्त ज्ञान उपलब्ध करुन देणे, शेतकऱ्यांनी स्वतःची व त्याचबरोबर समूहाची फलोत्पादन विषयक शेती उन्नत करणे इत्यादी विषयावर मार्गदर्शन करण्यात येणार आहे.

या दौऱ्यात फळबाग, भाजीपाला, फुले लागवड, विदेशी फळपिक लागवड आधुनिक तंत्रज्ञान जाणून घेता येईल. फळबाग लागवड, भाजीपाला लागवड, फुले लागवड करणाऱ्या, शेडनेटगृह व हरितगृह उभारणी, फळप्रक्रिया इत्यादी बाबत प्रशिक्षणही देण्यात येणार आहे.

सहभाग घेण्यास इच्छुक असणाऱ्या शेतकऱ्यांनी संबंधित तालुका कृषि अधिकारी किंवा संबधित उपविभागीय कृषि अधिकारी यांचेकडे आपले अर्ज, सात बारा, ८ अ, आधारकार्ड व छायाचित्रासह सादर करावेत, असेही आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी संजय काचोळे यांनी केले आहे.

मोदींची हुकूमशाही रोखायला एकत्र या! प्रकाश आंबेडकर यांचे महाविकास आघाडीच्या नेत्यांना पत्र !

मुंबई: वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी आज महाविकास आघाडीतील नेत्यांना पत्र पाठवले आहे. शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, शरद पवार आणि मल्लिकार्जून खरगे यांना त्यांनी पत्र पाठवल्याचे त्यांनी ट्विट करत सांगितले.

पुढील वर्षी होणाऱ्या लोकसभा निवडणुकांसाठी महाविकास आघाडीच्या ३ घटक पक्षांमधील जागा वाटपाबाबत महाराष्ट्रात वेगवेगळे अंदाज बांधले जात आहेत. या अटकळींचा कितीही गोंगाट सुरू असला, तरी देशातील सर्वाधिक जागा निवडून देणाऱ्या दुसऱ्या क्रमांकाच्या राज्यातील, महाराष्ट्रातील जागा वाटपाबाबत महाविकास आघाडी किंवा इंडिया आघाडीकडून कोणताही ठोस निर्णय होताना दिसत नसल्याचे त्यांनी या पत्रात म्हटले आहे.

पंतप्रधान मोदींना सत्तेतून बेदखल करण्यासाठी ४८ जागांचे महत्त्व लक्षात घेता तसेच उत्तर प्रदेश, पश्चिम बंगाल, बिहार अशा महत्त्वाच्या राज्यांमध्ये जागा वाटपाबाबत इंडिया आघाडी अंतर्गत असणाऱ्या निर्णयाचा अभाव पाहता वंचित बहुजन आघाडीच्या महाराष्ट्र राज्य कार्यकारिणीने व्यवहार्य व “संघर्षमुक्त”  १२+१२+१२+१२ असे सूत्र २६ डिसेंबर २०२३ रोजी सुचवले असल्याचे त्यांनी नमूद केले आहे.

लोकसभेसाठी १२+१२+१२+१२ हे सूत्र आम्ही केवळ मविआ व इंडिया आघाडीत समावेशासाठीच नाही, तर मविआ अंतर्गत सर्व वाद संपवण्याच्याही दृष्टीने प्रस्तावित केले असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

“१२ + १२ + १२ + १२” फॉर्म्युला हा केवळ नरेंद्र मोदींना हटवण्यासाठी महाविकास आघाडी आणि इंडिया आघाडीमध्ये सहभागी होण्याची आमची इच्छा आणि स्वारस्य पुन्हा व्यक्त करण्यासाठी नाही, तर जागा वाटपाबद्दल मविआमधील सर्व मतभेद दूर करण्यासाठी सुद्धा प्रस्तावित करण्यात आला असल्याचा पुनरुच्चार त्यांनी पत्रात केला आहे.

महाविकास आघाडीमधील पक्ष – शिवसेना (उद्धव ठाकरे), राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष आणि भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेस आणि वंचित बहुजन आघाडी यांनी आगामी लोकसभा निवडणुका एकत्र आणि समान भागीदार म्हणून समान संख्येने जागांवर लढवाव्यात ही वंचित बहुजन आघाडीची इच्छा आहे.

श्री. उद्धव ठाकरे, श्री. शरद पवार आणि श्री. मल्लिकार्जुन खर्गे – आमच्या प्रस्तावित फॉर्म्युलावर गांभीर्याने विचार करा आणि प्रतिसाद द्या, अशी विनंती त्यांनी या पत्राच्या माध्यमातून केली आहे.

संपूर्ण महाराष्ट्र आमच्या १२ + १२ + १२ + १२ च्या प्रस्तावित फॉर्म्युल्याबद्दल तुमच्या अधिकृत भूमिकेची आतुरतेने वाट पाहत आहे. मला मनापासून आशा आहे की, महाराष्ट्रातील जनतेच्या हितासाठी विचारविनिमय करून निर्णय घेतले जातील आणि मोदींचा पराभव व्हावा केवळ याला एकमेव आणि एकमेव प्राधान्य दिले जाईल. असा आशावादही त्यांनी या पत्रातून व्यक्त केला आहे.

ब्रिटीशपूर्व काळातील राजेशाहीकडे देशाला नेले जातेय – राहुल गांधी

लोकशाहीचे रक्षण करणार्‍या सर्व संस्थांवर भाजपाचा कब्जा

नागपुरात काँग्रेसचा 139 व्या स्थापना दिनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे, त्यामध्ये बोलताना राहुल गांधींनी भाजपवर टीका केली आहे.

नागपूर – आपण फक्त इंग्रजांच्या विरोधात लढा नाही दिला तर जुन्या जुलमी राजेशाही विरोधातही कॉंग्रेसने आणि इथल्या जनतेने लढा दिला आहे हे आपण विसरता कामा नये स्वातंत्र्याच्या आधी जर तुम्ही या देशात आले असता, तर तेव्हा इथे ५००-६०० राजे होते, इंग्रज होते.अनेक राजे इंग्रजांचे परतणार बनले होते . भारतीय जनतेला कुठलाच अधिकार नव्हता. गरीबाची जमीन जर राजाला चांगली वाटली, तर एका सेकंदात तो राजा ती जमीन घेऊ शकत होता. या सगळ्या अधिकारांचं रक्षण राज्यघटना करते. आंबेडकरांनी, गांधीजींनी, नेहरूंनी मेहनतीनं ती बनवली. ती काँग्रेस पक्षानं दिली आहे. आरएसएसचे लोक याच्या विरोधात होते. आज राष्ट्रध्वजाच्या समोर उभं राहून हे सलाम ठोकतात. पण कित्येक वर्षं यांनी तिरंग्याला सलाम नव्हता केला”, अशा शब्दांत राहुल गांधींनी भाजपाबरोबरच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही आज आपल्या भाषणातून लक्ष्य केलं.देशाच्या हजारो वर्षांच्या इतिहासात एक गोष्ट पहिल्यांदा घडली. पहिल्यांदाच एका भारतीय व्यक्तीला एक मत देण्यात आलं. तो दलित असो, आदिवासी असो, महिला असो, कुठल्याही भागातला असो. प्रत्येक भारतीयाला राज्यघटनेनं एक मत दिलं. हे काँग्रेस पक्षानं केलं. गांधीजी तुरुंगात गेले. नेहरू तुरुंगात गेले. आंबेडकरांनी कित्येक वर्षं संघर्ष केला. हे काँग्रेस पक्षानं, आंबेडकरांनी, सगळ्यांनी मिळून केलं आहे”, असंही राहुल गांधी यावेळी म्हणाले. “जर तुम्ही इथे स्वातंत्र्यापूर्वी आले असते, तर तेव्हा भारतातील जनतेला कोणतेच अधिकार नव्हते. महिलांना अधिकार नव्हते. दलितांना कुणी स्पर्श करत नव्हतं. ही आरएसएसची विचारसरणी आहे. हे आम्ही बदललं आहे. पुन्हा एकदा हे भारताला त्याच काळात घेऊन जात आहेत”, असंही त्यांनी नमूद केलं.

भाजप तरुणांना रोजगार देऊ शकत नाही, इंडिया आघाडीच तरुणांना रोजगार उपलब्ध करुन देऊ शकते. देशातील मिडीयावर दबाव आहे. सर्व संस्था भाजपच्या ताब्यात असून त्यांच्या आधारे भाजपकडून विरोधकांवर दबाव टाकण्याचा प्रयक्त केला आहे, असा आरोप काँग्रेस नेते खासदार राहुल गांधी यांनी केला आहे.दरम्यान राहुल गांधी पुढे बोलताना म्हणाले की, भाजप सरकार आल्यापासून त्यांच्या काही मित्रांना केवळ फायदा होत आहे. मोजक्या लोकांच्या हातात देशातील संपत्ती जात आहे. मी याविरोधात संसदेत प्रश्न उपस्थित केला तर भाजपचे लोक शांत झाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 10 वर्षांमध्ये किती रोजगार दिले असा सवाल उपस्थित केला आहे. तर आम्ही सत्तेत आलो तर देशात जातीनिहाय जनगणना करु असे आश्वासन त्यांनी यावेळी बोलताना दिले आहे.राहुल गांधी म्हणाले की, राज्याच्या राजकारणात असो की प्रशासनामध्ये दलित, ओबीसी आणि आदिवासी लोकांना कुठेच संधी दिली जात नाही. ज्यां कंपन्यांना फायदा होत आहे. या कंपन्यांमध्ये दलित, ओबीसी कुठे आहे. देशात जातीय जनगणना केली पाहिजे. तर देशातील दीड लाख तरुणांना सैन्य दलात घेण्यात आले होते, त्यांना मोदी सरकारने अग्नीवीर योजना लागू करत सैन्य दलात येऊ दिले नाही. तरुण सांगत असतात की सरकारने आमचे जीवन खराब केले आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी देशात गरिबी हीच एकमेव जात असल्याचा दावा करतात. असे असेल तर ते स्वतःची ओळख ओबीसी म्हणून का करून देतात? असा सवाल काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी गुरुवारी पंतप्रधान मोदींवर निशाणा साधताना केला.

राहुल गांधी पुढे बोलताना म्हणाले की, आम्ही दिल्लीत सत्तेत आलो तर देशात जातीय जनगणना करणार असे आश्वासनही राहुल गांधी यांनी दिले.

तरुणांच्या हाताला रोजगार नाही

राहुल गांधी म्हणाले की, देशातील करोडो युवकांच्या हाताला काम नाही, त्यांची शक्ती वाया जात आहे. तो बेरोजगार असल्याने सोशल मिडीयावर जास्त वेळ देत आहे. देशातील तरुणांवर आणि शेतकऱ्यांवर हे सरकार हल्ले करत आहे, असा गंभीर आरोप त्यांनी केला आहे.

भाजपमध्ये गुलामी सुरू

राहुल गांधी पुढे बोलताना म्हणाले की, भाजपचे अनेक खासदार हे काँग्रेसमध्ये होते. यातील एक खासदार मला भेटले ते मला म्हणाले की राहुल गांधी आपल्यासोबत चर्चा करायची आहे. मी त्यांना विचारले सगळे काही ठीक आहे ना? तर भाजपचे खासदार म्हणाले की, भाजपमध्ये राहणे आम्हाला सहन होत नाहीये. आम्ही भाजपमध्ये असलो तरी आमचे मन मात्र काँग्रेसमध्येच आहे. काँग्रेसमध्ये येण्यापासून तुम्हाला कोण रोखत आहे. भाजपमध्ये गुलामी चालते, हायकमांड जे सांगते ते ऐकावे लागते. आमचे कुणी ऐकत नाही, पहिले जसे राजा ऑर्डर देत होते तसेच आम्हाला भाजपमध्ये रहावे लागते. ते पटो वा न पटो त्यांचे सर्व ऐकावे लागते.

राहुल गांधी म्हणाले की, आम्हाला दोन देश नको आहेत, ज्यांत एक श्रीमंताचा आणि मिडीया वाल्याचा आणि दुसरा गरीब लोकांचा असा वेगळा आम्हाला नको. तरुणांना रोजगार हवा आहे तो भाजप देऊ शकत नाही, रोजगार केवळ इंडिया आघाडीच देऊ शकते. नफरत कै बाजार मै मोहबब्त की दुकान हमने खोली है, हम सबको साथ लेकर चलना चाहते है असे म्हणत राहुल गांधींनी सर्वांना सोबत घेत सत्ता स्थापन करु असे म्हटले आहे.

  • देशातील लोकांना असे वाटते की देशात राजकीय आणि सत्तेची लढाई आहे. पण ही विचाराची लढाई आहे. ही अनेक पक्षांची लढाई असली तरी दोन विचारधारांची लढाई आहे, असे मत राहुल गांधी यांनी व्यक्त केले आहे.
  • राहुल गांधी म्हणाले की, भाजप सरकार आल्यापासून त्यांच्या काही मित्रांना केवळ फायदा होत आहे. मोजक्या लोकांच्या हातात देशातील संपत्ती जात आहे. मी याविरोधात संसदेत प्रश्न उपस्थित केला तर भाजपचे लोक शांत झाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 10 वर्षांमध्येकिती रोजगार दिले असा सवाल उपस्थित केला आहे.
  • राहुल गांधी म्हणाले की, देशात जर गरीब हीच एक जात आहे, तर पंतप्रधान नरेंद्र मोदी हे ओबीसी कसे झाले असा सवाल उपस्थित करत राहुल गांधींनी जर आमची सत्ता आली तर जातीय जनगणना करु असे जाही केले आहे.
  • राहुल गांधी म्हणाले की, आम्हाला दोन देश नको आहेत, ज्यांत एक श्रीमंताचा आणि मिडीया वाल्याचा आणि दुसरा गरीब लोकांचा असा वेगळा आम्हाला नको. तरुणांना रोजगार हवा आहे तो भाजप देऊ शकत नाही, रोजगार केवळ इंडिया आघाडीच देऊ शकते. नफरत कै बाजार मै मोहबब्त की दुकान हमने खोली है, हम सबको साथ लेकर चलना चाहते है असे म्हणत राहुल गांधींनी सर्वांना सोबत घेत सत्ता स्थापन करु असे म्हटले आहे.
  • राहुल गांधी म्हणाले की, राज्याच्या राजकारणात असो की प्रशासनामध्ये दलित, ओबीसी आणि आदिवासी लोकांना कुठेच संधी दिली जात नाही. ज्यां कंपन्यांना फायदा होत आहे, या कंपन्यांमध्ये दलित, ओबीसी कुठे आहे. देशात जातीय जनगणना केली पाहिजे.
  • राहुल गांधी म्हणाले की, देशातील दीड लाख तरुणांना सैन्य दलात घेण्यात आले होते, त्यांना मोदी सरकारने अग्नीवीर योजना लागू करत सैन्य दलात येऊ दिले नाही. तरुण सांगत असतात की सरकारने आमचे जीपन खराब केले आहे.
  • राहुल गांधी म्हणाले की, देशातील करोडो युवकांच्या हाताला काम नाही, त्यांची शक्ती वाया जात आहे. तो बेरोजगार असल्याने सोशल मिडीयावर जास्त वेळ देत आहे. देशातील तरुणांवर आणि शेतकऱ्यांवर हे सरकार हल्ले करतंय असा गंभीर आरोप त्यांनी केला आहे.
  • राहुल गांधी म्हणाले की, भाजपकडून ईडी, सीबीआय अशा संस्थाचा धाक दाखवून दबाव टाकण्याचा प्रयत्न केला जाताे, असा आरोप त्यांनी यावेळी केला आहे.
  • राहुल गांधी म्हणाले की, देशातील सर्व संस्थावर भाजपचा कब्जा आहे. भाजपने देशासाठी काय केले हे सांगावे असा सवाल राहुल गांधी यांनी उपस्थित केला आहे.
  • राहुल गांधी म्हणाले की, देशहितासाठी बाबासाहेब आंबेडकरांनी संघर्ष केला. भाजपवाले त्या जुन्या काळात जनतेला आणि देशाला घेऊन जाण्याच्या प्रयत्नात आहेत. आमचे चुकले तर आमचे कार्यक्रते थेट आमच्याशी बोलतात.
  • राहुल गांधी म्हणाले की, नेहरु, गांधीजी हे अनेकदा जेलमध्ये गेले. देशावर जनतेचे नियंत्रण असायला हवे, मागील काळात जसे राजा देश चालवत होता तसे पुन्हा होऊ नये. सामान्य माणसांनी देशाच्या स्वातंत्र्यांसाठी लढाई लढली. तेव्हा राजा महाराजा हे इंग्रजासोबत भागीदारीमध्ये होते. त्यांच्या विरोधात काँग्रेसची लढाई होती.
  • राहुल गांधी म्हणाले की, काँग्रेसमुळे देशामध्ये गरीबांना आणि मध्यमवर्गीय लोकांना घटना मिळाली, याला त्याकाळी रास्व संघाचा विरोध होता. घटनेमुळे सर्वासामान्य नागरिकांना त्यांचे अधिकार आणि हक्क मिळाले आहेत.
  • राहुल गांधी म्हणाले की, काँग्रेसमध्ये छोटा कार्यकर्ताही प्रयन विचारु शकतो, भाजपमध्ये गुलामी सुरू असल्याचे त्यांच्या खासदारांनी सांगितले.
  • नाना पटोले यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना एक प्रश्न विचारला आणि मोदींना ते आवडले नाही म्हणून त्यांना भाजपमधून दूर करण्यात आले असा टोला राहुल गांधींनी लगावला आहे.
  • राहुल गांधी पुढे बोलताना म्हणाले की, भाजपचे अनेक खासदार हे काँग्रेसमध्ये होते. यातील एक खासदार मला भेटले ते मला म्हणाले की राहुल गांधी आपल्यासोबत चर्चा करायची आहे. मी त्यांना विचारले सगळे काही ठीक आहे ना? तर भाजपचे खासदार म्हणाले की, भाजपमध्ये राहणे आम्हाला सहन होत नाहीये. आम्ही भाजपमध्ये असलो तरी आमचे मन मात्र काँग्रेसमध्येच आहे. काँग्रेसमध्ये येण्यापासून तुम्हाला कोण रोखत आहे. भाजपमध्ये गुलामी चालते, हायकमांड जे सांगते ते ऐकावे लागते. आमचे कुणी ऐकत नाही, पहिले जसे राजा ऑर्डर देत होते तसेच आम्हाला भाजपमध्ये रहावे लागते. ते पटो वा न पटो त्यांचे सर्व ऐकावे लागते.
  • 1920 मध्ये इंग्रज सरकारच्या विरोतज गांधीजींनी असहकार धोरणाला सुरूवात केली. या जमीनीतून इंग्रजाच्या विरोधात महात्मा गांधींनी चले जावची भूमिका ह्याच भुमीतून मांडली होती – नाना पटोले
  • इंदिरा काँग्रेसची मुहूर्तमेढ रोवली गेली आणि जनता राजवटीला पराभूत करुन त्यांनी करिश्मा दाखवला. नागपूर-विदर्भाने काँग्रेसला पुन्हा हात दिला. नरसिंह राव पंतप्रधान झाले तेव्हा ते नागपूर जिल्ह्यातील रामटेक मतदार संघातूनतून निवडून गेले होते आणि आन्ध्रातून पराभूत झाले होते – नाना पटोले
  • तानाशहा सरकारविरोधात आम्ही नागपुरातून आम्ही तैयार झाले आहोत. आम्ही कामगारांच्या साठी त्यांच्यासोबत उभे राहणार आहोत. जाती पातीचे भांडण लावणाऱ्याच्या विरोधात राहुल गांधींना आपल्याला साथ द्यायची आहे, असे आवाहन नाना पटोलेंनी उपस्थितांना केले आहे.

पुरंदरेंच्या शिवसृष्टीला गुजरातकडून ५कोटी

पुणे- : कै. शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या संकल्पनेतून आणि महाराजा शिवछत्रपती प्रतिष्ठानच्या वतीने आंबेगाव येथे साकारलेल्या शिवसृष्टीला गुजरात सरकारकडून ५ कोटी रुपयांची देणगी आज(दि.२८)सुपूर्त करण्यात आली.

महाराजा शिवछत्रपती प्रतिष्ठानचे विश्वस्त विनीत कुबेर यांनी गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांकडून मुख्यमंत्री निवासस्थानी विशेष निमंत्रितांच्या उपस्थितीत धनादेशाच्या स्वरूपात ही देणगी स्वीकारली.यावेळी गुजरात राज्याचे वन व पर्यटन मंत्री मुलु बेरा,पर्यटन सचिव सौरभ पारधी,राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ कार्यकर्ते संदीप जाधव आदी यावेळी उपस्थित होते.

यावेळी बोलताना विनीत कुबेर म्हणाले, ‘शिवसृष्टीच्या रुपाने महाराष्ट्रात साकारत असलेल्या ऐतिहासिक थीम पार्कला मदत करण्याची इच्छा गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांनी या आधीच व्यक्त केली होती.

त्यानुसार आज मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी ५ कोटी रुपयांचा धनादेश प्रतिष्ठानला सुपूर्त करण्यात आला.यावेळी पटेल यांना शिवसृष्टीची संपूर्ण माहिती देत या ठिकाणी त्यांनी नक्की भेट द्यावी असे आग्रहाचे निमंत्रण प्रतिष्ठानच्या वतीने त्यांना देण्यात आले.या देणगीचा उपयोग शिवसृष्टीच्या दुसऱ्या टप्प्याच्या कामासाठी करण्यात येणार असून यामध्ये प्रतापगडावरील भवानीमाता मंदिराबरोबरच रंगमंडल, गंगासागर तसेच गेल्या ३५० वर्षात शिवछत्रपतींच्या कल्पनेतील स्वराज्य संकल्पनेच्या दिशेने झालेली वाटचाल,मंदिरांचा जीर्णोध्दार,स्वभाषा,स्वधर्म या विषयात पुढील पिढ्यांनी केलेले कार्य याची माहिती देणारे दालन यांचा समावेश असेल. याबरोबरच छत्रपतींच्या राजसभेची निर्मिती पूर्ण करण्याचाही प्रतिष्ठानचा प्रयत्न राहील, अशी माहिती देखील कुबेर यांनी दिली.