Home Blog Page 1291

अवैध धंदे, नियमबाह्य कामांना आळा घाला- पोलिस, महापालिका अधिकाऱ्यांकडे नागरिकांनी केली जाहीरपणे मागणी

0
  • डॉ. सिद्धार्थ धेंडे यांचा प्रभाग दोन मध्ये संवाद सभेचा अनोखा उपक्रम

पुणे -शाळांच्या परिसरात असणाऱ्या हुल्लडबाजांवर जरब बसवा. अवैध धंदे करणाऱ्यांच्या मुसक्या आवळा. नियमबाह्य डीजे वाजविनाऱ्यांवर कडक कारवाई करा. या मागण्यांसह अनेक समस्यांवर बोट ठेवत, प्रभागातील चुकीच्या कामाविरोधात संवाद सभेतून नागरिकांनी एल्गार पुकारला.

पुणे महापालिकेच्या प्रभाग दोन मध्ये ‘नागरिकांचे संरक्षण’ या विषयावर गुरुवारी (दि. 28) संवाद सभेचे आयोजन करण्यात आले होते. माजी उपमहापौर डॉ. सिद्धार्थ धेंडे यांच्या पुढाकाराने हा अनोखा उपक्रम राबविण्यात आला होता. पोलिस आणि महापालिका अधिकारी यांच्या उपस्थितीत आयोजित या सभेत नागरिकांनी आपल्या समस्यांचा पाढा वाचला.

या वेळी येरवडा पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाळकृष्ण कदम, येरवडा क्षेत्रीय कार्यालयाचे सहायक आयुक्त विजय नायकल, येरवडा पोलीस स्टेशनचे पोलिस उपनिरीक्षक डोंबाळे, कल्याणीनगर विभाग महावितरणचे सहायक अभियंता संतोष तळपे आदीसह प्रभागातील नागरिक, ज्येष्ठ नागरिक, विद्यार्थी, महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते.

येरवडा पोलिस स्टेशनचे अधिकारी, तसेच महापालिका अधिकारी यांनी नागरिकांच्या मागण्या नमूद करून घेतल्या. त्यावर कार्यवाही केली जाणार आहे.

या वेळी येरवडा पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाळकृष्ण कदम म्हणाले की, प्रभागातील नागरिकांनी मांडलेल्या अडचणींचे निराकरण करू. तक्रारींची दखल घेऊन शाळेच्या आवारात हुल्लडबाजी करणाऱ्यांवर कारवाई करू. लेखी तक्रार देणाऱ्या नागरिकांचे नाव गुप्त ठेवले जाईल. मात्र चुकीचे काम करणाऱ्या लोकांवर जरब बसवू, असे आश्वासन पोलिस निरीक्षक कदम यांनी दिले.

नागरिकांनी मांडल्या या समस्या –

या मध्ये प्रभागातील शाळांच्या परिसरात हुल्लडबाज थांबलेले असतात. त्याचा विद्यार्थी आणि विद्यार्थ्यांनी यांना त्रास होतो. त्यांच्यावर आळा घाला. प्रभागातील पदपथ मोकळे करा. अतिक्रमणवर कारवाई करा. शाळांनी मुलांच्या मोबाईल वापरावर निर्बंध घालावे. शाळांच्या बाहेर सीसीटीव्ही बसवावे. प्रभागातील दारू विक्री, गुटखा विक्री, अवैध धंदे बंद करावेत. क्राईम स्पॉट, चौक मोकळे करणे, मोकळ्या जागेत होणारे चुकीचे काम थांबवा. रात्री दहा नंतर वाजणारे डीजे बंद करावेत. त्याचा वयोवृद्ध लोकांना त्रास होतो. नियमबाह्य डीजे वाजविणाऱ्या लोकांवर कारवाई करावी. कालच विमाननगर येथे गॅस सिलेंडरचे स्फ़ोट झाले आहेत. खबरदारी म्हणून प्रभाग दोन मधील बेकायदेशीर गॅस विक्री करणाऱ्यांवर कारवाई करावी. प्रभागातील भिंतींवर चुकीचे केलेलं पेंटिंग काढून भिंत सुशोभित करा. आदींसह विविध मुद्दे नागरिकांनी मांडले.

माझ्या प्रभागातील विविध समस्यांवर नागरिकांकडून सातत्याने तक्रारी येत होत्या. काही जण लेखी तर काही जण वॉट्सप वर मेसेज करून सांगत होते. नागरिकांच्या या तक्रारी प्रत्यक्ष पोलिस आणि महापालिका अधिकाऱ्यांसमोर मांडल्या जाव्यात या उद्देशाने संवाद सभा आयोजित केली. त्यामध्ये नागरिकांनी देखील समस्या मांडल्या. त्या सोडविण्याबाबत पोलिस आणि महापालिका अधिकारी यांनी सकारात्मकता दर्शवली

  • डॉ. सिद्धार्थ धेंडे, माजी उपहापौर, पुणे महापालिका

किरकोळ, विदेशी मद्य विक्रीच्या दुकानांना बंद करावयाच्या वेळेत दुरुस्ती

0

मुंबई, दि. 29 : मुंबई दारुबंदी कायदा 1949 अंतर्गत मुंबई विदेशी मद्य नियमावली 1953 व महाराष्ट्र देशी मद्य नियमावली 1973 अंतर्गत विविध तरतुदीनुसार मुंबई शहर जिल्ह्यातील किरकोळ, विदेशी मद्य विक्रीच्या दुकानांना बंद करावयाच्या वेळेत शिथिलता देण्यात आली आहे. ही शिथिलता 31 डिसेंबर 2023 रोजी रात्री 10.30 वाजेपासून ते दुसऱ्या दिवशी पहाटे 1 वाजेपर्यंत असणार आहे.

तसेच उच्च दर्जाची व अतिउच्च दर्जाची श्रेणीवाढ मिळालेल्या एफएल 2 अनुज्ञप्ती यांना रात्री 11.30 ते दुसऱ्या दिवशी पहाटे 1 वाजेपर्यंत, एफएलबीआर -2 अनुज्ञप्ती यांना  रात्री 10.30 वाजेपासून ते दुसऱ्या दिवशी पहाटे 1 वाजेपर्यंत, एफएलडब्ल्यू -2 अनुज्ञप्ती यांना रात्री 10.30 वाजेपासून ते दुसऱ्या दिवशी पहाटे 1 वाजेपर्यंत, बिअर बार मध्यरात्री 12 वाजेपासून ते दुसऱ्या दिवशी पहाटे 5 वाजेपर्यंत, वाईन बार मध्यरात्री 12 वाजेपासून ते दुसऱ्या दिवशी पहाटे 5 वाजेपर्यंत शिथीलता असणार आहे.

तसेच क्लब अनुज्ञप्ती व परवाना कक्ष यांना  पोलीस आयुक्तालयाच्या परिक्षेत्राच्या व्यतिरिक्त रात्री 11.30 ते दुसऱ्या दिवशी पहाटे 5 वाजेपर्यंत आणि पोलिस आयुक्तालयाच्या परिक्षेत्रासाठी रात्री 1.30 ते दुसऱ्या दिवशी पहाटे 5 वाजेपर्यंत शिथिलता असेल. सीएल -3 अनुज्ञप्ती यांना महानगरपालिका तसेच ‘अ’, व ‘ब’ वर्ग नगरपालिका क्षेत्रातील अनुज्ञप्तींसाठी रात्री 11 ते दुसऱ्या दिवशी पहाटे 1 वाजेपर्यंत व इतर ठिकाणी रात्री 10 ते दुसऱ्या दिवशी पहाटे 1 वाजेपर्यंत शिथिलता असणार आहे.  ही वेळेची शिथिलता 31 डिसेंबर रोजी असेल, असे आदेशान्वये मुंबई शहरचे जिल्हाधिकारी राजेंद्र क्षीरसागर यांनी कळविले आहे.

पीसीसीओईची ‘हॅकाथॉन २०२३’ वर मोहर !!!


हैद्राबाद येथील महाअंतिम फेरीत प्रथम क्रमांकसह पटकावले एक लाखाचे पारितोषिक
पुणे (दि. २९ डिसेंबर २०२३) – पिंपरी चिंचवड अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन विभागाच्या ‘हायड्रोमाइनेक्स’ संघाने भारत सरकारद्वारे आयोजित आणि नल्ला मल्ला अभियांत्रिकी महाविद्यालय, हैद्राबाद, तेलंगणा यांच्या सहकार्याने आयोजित ‘स्मार्ट इंडिया हॅकाथॉन २०२३’ च्या महाअंतिम फेरीत प्रथम पारितोषिक पटकावले.
पीसीईटीच्या संघाने ‘डिफिकल्टी इन ऑपरेटिंग हेवी अर्थ मूव्हिंग मशिनरीज ड्यूरिंग द रेनी सीजन’ या समस्येचा अभ्यास करून अभिनव प्रकल्प सादर केला. या प्रकल्पाला खाण मंत्रालयाच्या अंतर्गत हार्डवेअर प्रकारात एक लाख रुपयांचे पहिले पारितोषिक मिळाले. हायड्रोमाइनेक्स संघाचे नेतृत्व इ ॲण्ड टीसी विभागाच्या कौशल लवांडे याने तर आंचल गुल्हाने, अदिती चंदनवार, प्रथमेश चव्हाण, यश जाधव आणि संगणक विभागातून प्रथमेश चौगले यांचा समावेश होता. एनएमआरसीचे अध्यक्ष नल्ला मल्ला रेड्डी, संचालक डॉ. दिव्या नल्ला, खाण मंत्रालयाचे सदस्य राजेश विंचूरकर, एनएमआरसीचे प्राचार्य डॉ.एम.एन.व्ही. रमेश यांच्या हस्ते विजेत्या संघाला गौरवण्यात आले.
संघ मार्गदर्शक डॉ. वर्षा हरपळे, प्रा. प्रमोद सोनवणे, प्रा. वैशाली पाटील, डॉ. महेश कोलते विभाग प्रमुखांचे पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टचे अध्यक्ष ज्ञानेश्वर लांडगे, उपाध्यक्षा पद्माताई भोसले, सचिव विठ्ठल काळभोर, खजिनदार शांताराम गराडे, विश्वस्त हर्षवर्धन पाटील, उद्योजक नरेंद्र लांडगे, अजिंक्य काळभोर, कार्यकारी संचालक डॉ. गिरीश देसाई, पीसीसीओईचे संचालक डॉ. गोविंद कुलकर्णी, उपसंचालक डॉ. नीळकंठ चोपडे यांनी अभिनंदन केले.

कारागृहातही नाही सुरक्षा ..येरवडा जेलमध्ये कैद्याचा निर्घृण खून

पुणे

येरवडा मध्यवर्ती कारागृहात गुरुवारी दुपारी एका बंद्याचा कात्री आणि दरवाजाच्या बिजागिरीने भोसकून खून करण्यात आला. याप्रकरणी चौघा बंद्याविरुध्द गुन्हा दाखल करण्याचे काम रात्री उशीरापर्यंत सुरु होते. दरम्यान या घटनेने खळबळ उडाली असून कारागृह प्रशासनाच्या कारभारावर प्रश्‍नचिन्ह निर्माण झाले आहे. ललित पाटील प्रकरणामुळे येरवडा कारागृह मागील काही दिवसांपासून चर्चेत आहे. काही महिण्यापूर्वीच एका बंद्याने नाडीने गळफास घेत आत्महत्या केली होती.

महेश महादेव चंदनशिवे ( रा.चखिली, पुणे ) असे खून झालेल्या बंद्याचे नाव आहे. त्याच्या खून प्रकरणी बंदी असलेले अनिकेत श्रीकृष्ण समदुर, महेश तुकाराम माने, आदित्य संभाजी भुरे, गणेश हनुमंत मोटे यांच्याविरुध्द गुन्हा दाखल करण्याचे काम येरवडा कारागृहात सुरु होते. दरम्यान चंदनशिवे याचा मृतदेह ससून रुग्णालयात शवविच्छेदनासाठी आणल्यावर तेथे मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनूसार चंदनशिवेविरुध्द पिंपरी पोलिस ठाण्यात दरोड्याची तयारी आणि आर्म ॲक्टचा गुन्हा दाखल झाला होता. याप्रकरणी तो 30 नोव्हेंबर 2022 पासून कारागृहात शिक्षा भोगत आहे. गुरुवारी दुपारी सव्वा तीनच्या सुमारास सर्कल नंबर 2 मधील बराक नंबर एकमध्ये आरोपींनी त्याला गाठले. त्याच्यावर हजामकामासाठी वापरण्यात येणारी कैची आणि दरवाजाच्या बीजागरीच्या तुकड्याने मानेवर आणि पोटावर वार केले. गंभीर जखमी चंदनशिवेला कारागृहातील रक्षकांनी तातडीने कारागृह रुग्णालया नेले. तेथे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी उपचार करुन ससून रुग्णालयात पाठवले. ससून रुग्णालयात उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.

दक्षिण पुण्यात राज्य उत्पादन शुल्क विभागाचे छापे, गोव्याची६ लाखाची दारू पकडली

पुणे- बकाल झालेले, अन गुन्हेगारुने वेढलेले पुण्याचे दक्षिण द्वार आता मद्य विक्रीच्या गैर प्रकारात देखील आघाडीवर असल्याचे दिसून येत असून या परिसरात ओरीजनल मद्य विकण्याऐवजी गोव्याची स्वस्तातील दारू विकून संपत्ती जमविण्याच्या व्यवसायाचा पर्दाफाश आता होऊ लागला आहे.

राज्य उत्पादन शुल्क राज्य आयुक्त विजय सुर्यवंशी , संचालक सुनिल चव्हाण ,यांच्या आदेशान्वये व विभागीय उपआयुक्त श्री. विजय चिंचाळकर तसेच अधीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, पुणे चरणसिंग राजपूत ,उप-अधीक्षक संजय पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, एच विभाग, पुणे या विभागाने बिबवेवाडी गावच्या हद्दीत, शिवतेज नगर, अप्पर, बिबवेवाडी, या ठिकाणी छापा घातला असता, सदर ठिकाणी गोवा राज्य निर्मित व विक्रीस परवानगी असलेला परंतू महाराष्ट्र राज्यात विक्री व बाळगण्याकरीता प्रतिबंदीत असलेले विदेशी मद्य १८० मिली क्षमतेचे ९६ सिलबंद बाटल्या एक दुचाकी वाहनासह आढळून आले. सदर आरोपीकडे अधिक चौकशी केली असता सदरचा मुद्देमाल सदरचा मुद्देमाल आरोपी क्र. १ हा त्याच्या स्वतःच्या घरात साठा करुन ठेवला असल्याचे सांगितले, त्यानुसार अप्पर, बिबवेवाडी, पुणे-३७ या ठिकाणी छापा घातला असता सदर ठिकाणी विविध ब्रॅण्डचे ७५० मिलीचे ३६ सिलबंद बाटल्या व १८० मिली क्षमतेचे ४८० सिलबंद बाटल्या (१३ बॉक्स) आढळून आले. सदर आरोपी इसमांना अवैध विदेशी मद्याबद्दल आधिक चौकशी केली असता, सदर गोवा बनावटीचे विदेशी मद्य त्यांनी आरोपी क्र. ३. रा. कात्रज पुणे याच्या राहत्या घरातून दुचाकी/तीनचाकी प्रवासी वाहनाने आणल्याचे सांगितले. त्यांच्या सांगण्यावरुन या कार्यालयाच्या स्टाफसह आरोपी क्र. ३, रा. कात्रज पुणे याच्या राहत्या घरी छापा टाकला असता सदर ठिकाणी गोवा राज्य निर्मित व विक्रीस परवानगी असलेला परंतू महाराष्ट्र राज्यात विक्री व बाळगण्याकरीता प्रतिबंदीत असलेले अवैध विविध ब्रॅण्डचे विदेशी मद्य ७५० मिली क्षमतेचे ८० सिलबंद बाटल्या आढळून आले. आरोपी क्र. ३ च्या सांगण्यावरुन कात्रज, पुणे या ठिकाणी छापा घातला असता सदर ठिकाणी विदेशी मद्याचे विविध ब्रॅण्डचे ७५० मिलीचे ३०१ सिलबंद बाटल्या (२५ बॉक्सेस) तसेच १८० मिली क्षमतेचे ३४८ सिलबंद बाटल्या (७ बॉक्सेस) आढळून आले. तीनही ठिकाणी छापे घातले असता सदर ठिकाणी अवैध विविध ब्रॅण्डचे विदेशी मद्य ७५० मिली क्षमतेचे ४१७ सिलबंद बाटल्या (३५ बॉक्सेस) व १८० मिली क्षमतेचे ८२८ सिलबंद बाटल्या (एकुण १७ बॉक्सेस) असे एकुण (५३ बॉक्सेस), एक होंडा कंपनीची अॅक्टीव्हा दुचाकी वाहन क्र. MH-१२-LY-८५३१ व एक अॅपल कंपनीचा आयफोन मोबाईल असा एकुण अंदाजे किमंत रू.५.८५,८५०/- चा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. सदर गुन्ह्यात निरीक्षक, अशोक एम. कटकम, दुय्यम निरीक्षक प्रशांत दळवी, संजय राणे सी विभागाचे नवनाथ मारकड, विशेष भरारी पथकाचे दुय्यम निरीक्षक प्रियंका राठोड व राहूल खाडगीर सहा. दु.नि. राजेश पाटील जवान सर्वश्री विशाल गाडेकर, माधव माडे, गोपाल कानडे, शरद भोर व महिला जवान शामल शिंदे यांनी सहभाग घेतला आहे. सदर गुन्हयाचा तपास राज्य उत्पादन शुल्क, एच विभागाचे निरीक्षक अशोक एम. कटकम हे करीत आहे.

सदरची कारवाई ३१ डिसेंबर व नववर्षांच्या पार्श्वभूमीवर करण्यात आली असुन अवैध विदेशी मद्य व बिअर वाहतुक व विक्री करणाऱ्यांना विरुध्द कारवाई करण्यासाठी या विभागाने विशेष भरारी पथके तयार केलेली असुन त्यांच्या मार्फत पुणे जिल्ह्यात ठिक ठिकाणी तपासणी करुन कारवाई करण्यात येत आहे.

बाजारात हफ्ते घेऊन शेतमालाची दुबार विक्री; ‘गुगल पे’वरून हफ्ते घेतल्याचे स्क्रीनशॉट व्हायरल

पुणे बाजार समितीवर संचालक मंडळ आल्यानंतर मांजरी बाजारात खोतीवर स्वस्तात माल घेऊन तेथेच तो चढ्या भावाने विक्री करणार्‍या खोती आणि दुबार शेतमाल विक्रीला बंदी घातली. दुसरीकडे काही संचालकांच्या माणसांनी चक्क हफ्ते घेऊन दुबार शेतमाल विक्री सुरू ठेवल्याची माहिती समोर आली आहे. याबाबतचे ‘गुगल पे’वरून पैसे घेतल्याचे स्क्रीनशॉट व्हायरल झाल्याने बाजारात खळबळ उडाली आहे.

एका बाजूला बाजार समितीचे संचालक सुदर्शन चौधरी दुबार विक्री होऊ नये म्हणून सातत्याने प्रयत्नशील होते. तसेच त्यांनी मोठ्या प्रमाणावर जनजागृती केली होती. पुणे बाजार समितीचा मांजरी बाजार हा शेतकरी ते ग्राहक थेट विक्रीसाठी बाजार उपलब्ध करून दिलेला आहे. या बाजारात खोतीवर स्वस्तात माल घेऊन तेथेच तो चढ्या भावाने विक्री करणारांची साखळी निर्माण झाली होती.

या बाजारात हवेली तालुक्यासह इंदापुर, बारामती, पुणे, पुरंदर, दौंड तालुक्यातील वरवंड, पाटस, खुटबाव, केडगाव, वाखारी, खोर, भांडगाव, खुटबाव, यवत, कासुर्डी, खामगाव, सहजपूर, नांदूर, बोरीऐंदी, डाळिंब, भरतगाव, ताम्हाणवाडीसह नगर रस्त्यावरील शेतकर्‍यांचा शेतमाल बाजारात विक्रीस येतो. एकीकडे शेतकर्‍यांसाठी चांगला निर्णय घेतल्याचे दाखवायचे आणि दुसरीकडे हफ्ते घेण्याचा प्रकार झाल्याने शेतकर्‍यांमध्ये नाराजीचे वातावरण आहे.

बाजार समितीवर संचालक मंडळ निवडुण आल्यानंतर मांजरी बाजारातील प्रकाराबाबत अनेक तक्रारी सुरू झाल्या होत्या. त्यामुळे शेतकर्‍यांना मारक असलेली खोती आणि दुबार शेतमाल विक्रीची प्रथा बंद करण्याचा निर्णय बाजार समितीचे सभापती दिलीप काळभोर आणि संचालक मंडळाने घेतला होता.

त्याची तातडीने काटेकोर अंमलबजावणीही सुरू केल्याचा परिणाम शेतकर्‍यांच्या मालाला चांगला भाव मिळण्यावर झाला. यामध्ये काही कार्यकर्त्यांनी हफ्ते घेत दुबार विक्री सुरू ठेवली. त्यामुळे संचालक मंडळाच्या दुटप्पी भुमीकेमुळे शेतकरी वर्गात प्रचंड नाराजी आहे.

संचालक मंडळाच्या काही माणसांनी चक्क गुगल पेवरून हफ्ते घेण्यास सुरूवात केली होती. एखाद्याने वेळेत हफ्ता न दिल्यास संबंधितांची दुबार विक्री बंद केली जात होती. गुगल पेवरून पैसे दिल्याचे स्क्रीनशॉट बाजारात व्हायरल झाले आहेत. तसेच याबाबतचे चॅटींगही समोर आल्याने खळबळ उडाली आहे.यासंबंधीत पैसे घेतल्याच्या तक्रारी माझ्याकडे आल्या होत्या. त्यानंतर खोती आणि दुबार शेतमाल विक्रीची प्रथा बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. निर्णय घेण्याआधीच हा प्रकार घडलेला आहे. अश्या प्रकारच्या तक्रारी प्राप्त झाल्यानंतर त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात येईल.

– दिलीप काळभोर, सभापती, कृषी उत्पन्न बाजार समिती, पुणे.

केडगाव येथील रोजगार मेळाव्यात १०४ उमेदवारांची निवड

पुणे दि. २९ : कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभाग पुणे व सुभाष बाबुराव कुल महाविद्यालय, केडगाव, ता. दौंड यांच्या संयुक्त विद्यमाने सुभाष बाबुराव कुल महाविद्यालय येथे आयोजित पंडीत दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळाव्यात १०४ उमेदवारांची निवड करण्यात आली.

रोजगार मेळाव्याच्या उद्घाटन प्रसंगी आमदार राहुल कुल, कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता व नाविन्यता विभागाचे सहायक आयुक्त सचिन जाधव, परिविक्षाधिन सहायक आयुक्त सागर मोहिते, सुभाष बाबुराव कुल महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. नंदकुमार जाधव उपस्थित होते.

रोजगार मेळाव्यासाठी २२३ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी उपस्थित १० उद्योजकांनी रोजगार मेळाव्याच्या ठिकाणी उमेदवारांच्या मुलाखती घेतल्या आणि १०४ उमेदवारांची निवड केली. या मेळाव्यात बारावी उत्तीर्ण, पदवीधर, आयटीआय उत्तीर्ण विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला.

यावेळी प्राचार्य डॉ. जाधव यांनी उपस्थित कंपनी प्रतिनिधींना महाविद्यालयाशी सामंजस्य करार करण्याचे आवाहन करून महाविद्यालयातून प्रशिक्षित मनुष्यबळ निर्माण करण्यासाठी उद्योगक्षेत्राने पुढाकार घ्यावा, असे सांगितले. श्री. जाधव यांनी नोकरीच्या संधीची माहिती दिली.

पॅराग्लाइडर्स, मायक्रोलाइट एअर क्राफ्ट, ड्रोनच्या वापरावर बंदी

0

मुंबई, दि. 29 : राष्ट्रीय हिताला बाधा पोहचविणाऱ्या तसेच राष्ट्रद्रोही कारवायांसाठी कारणीभूत ठरतील, असे घटक जसे पॅराग्लाइडर्स, रिमोट कंट्रोल्ड मायक्रोलाइट एअरक्राफ्ट, ड्रोन, पॅरा मोटर्स, हॅण्ड ग्लायडर्स हॉट एअर बलूनच्या उड्डाण क्रियांना बंदीचे आदेश बृहन्मुंबई  पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत दि. 18 जानेवारी 2024 रोजी मध्यरात्री 12 वाजेपर्यंत लागू करण्यात आले आहे, असे पोलीस उपायुक्त, विशाल ठाकूर यांनी कळविले आहे.

मुंबई पोलीस आयुक्तालयाच्या कार्यक्षेत्रात कुठेही कायदा व सुव्यवस्था बिघडणार नाही, सामान्य जनतेला धोका उत्पन्न होणार नाही, अति महत्त्वाच्या व्यक्तींना धोका निर्माण होणार नाही, सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान होऊ नये याकरीता हे आदेश लागू आहेत. मुंबई पोलिसांकडून हवाई पाळत ठेवणे किंवा पोलीस उप आयुक्त (अभियान), बृहन्मुंबई यांच्या लेखी विशिष्ट परवानगीने करण्यात येणारी अपवाद राहील, असेही या आदेशामध्ये स्पष्ट केले आहे.

या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर भारतीय दंड संहितेच्या कलम 144 अन्वये कारवाई करण्यात येईल.

विमानतळाच्या मुक्त उड्डाण क्षेत्रात फुगे, पतंग, उंच उडणारे फटाके उडविण्यास बंदी

0

मुंबई, दि. 29 : छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ, जुहू एरोड्रोम, नौदल हवाई स्टेशन आयएनएस शिक्राच्या आसपासच्या मुक्त उड्डाण क्षेत्रात विमानाच्या दिशेने व धावपट्टयांच्या दृष्टिकोन मार्गात फुगे, उंच उडणारे व हाय राइजर फटाके, प्रकाश उत्सर्जित करणारी वस्तू, पतंग, लेझर बीम प्रदीपन आदींमुळे विमानांचे सुरक्षित येणे-जाणे धोक्यात येते. त्यामुळे बृहन्मुंबई पोलीस आयुक्तालयाच्या कार्यकक्षेत छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या आजुबाजूच्या मुक्त उड्डाण क्षेत्रात उंच उडणारे फटाके उडवणे, प्रकाश उत्सर्जित करणाऱ्या वस्तू सोडणे, पतंग उडवणे आणि लेझर बीम प्रकाशित करणे, फुगे, पॅराग्लायडर्स उडविण्यावर बंदीचे आदेश बृहन्मुंबई  पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत दि. 20 फेब्रुवारी 2024 पर्यंत लागू करण्यात आले आहे, असे पोलीस उपायुक्त, विशाल ठाकूर यांनी कळविले आहे.

कोणत्याही विमानाच्या लॅण्‍डीग, टेक ऑफ आणि येण्याजाण्यामध्ये अडथळा आणण्याच्या उद्देशाने अशा प्रकारच्या वस्तूंचा वापर केल्याचे लक्षात येताच कोणतीही व्यक्ती जवळच्या पोलीस ठाण्यास माहिती देऊ शकेल, असेही या परिपत्रकामध्ये स्पष्ट केले आहे.

या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर भारतीय दंड संहितेच्या कलम 188 अन्वये कारवाई करण्यात येईल.

बृहन्मुंबई हद्दीत ३१ जानेवारीपर्यंत पेट्रोलियम क्षेत्रात फटाके, रॉकेट उडविण्यावर बंदी

0

मुंबई, दि. 29 : बृहन्मुंबई हद्दीत शांतता व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी महाराष्ट्र पोलीस अधिनियम, 1951 मधील अधिकारानुसार पोलीस उपआयुक्त (अभियान) यांनी बृहन्मुंबई पोलीस आयुक्त  हद्दीत 31 जानेवारी 2024  पर्यंत पेट्रोलियम क्षेत्रात कोणत्याही प्रकारचे फटाके, रॉकेट्स उडविणे किंवा फेकण्यास बंदी घालण्यात आली आहे.

भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लि., हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लि च्या परिमितीतील व बाहेरील क्षेत्र, बॉटलिंग प्लांट, बफर झोन, माहुल टर्मिनल क्षेत्र, भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लि. बीडीयू प्लांट क्षेत्र, हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लि. असे बीडीयू प्लांट क्षेत्र, स्पेशल ऑइल रिफायनरीच्या 15 आणि 50 एकर क्षेत्रामध्ये ही बंदी लागू राहणार आहे, पोलीस उपायुक्त विशाल ठाकूर यांनी कळविले आहे.

बृहन्मुंबई हद्दीत ५ जानेवारीपर्यंत जमावबंदी

0

मुंबई, दि. 29 : बृहन्मुंबई हद्दीत शांतता व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी महाराष्ट्र पोलीस अधिनियम, 1951 मधील अधिकारानुसार पोलीस उपआयुक्त (अभियान) यांनी बृहन्मुंबई पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत 5 जानेवारी 2024 रोजी मध्यरात्री 12 वाजेपर्यंत जमावबंदी आदेश जारी केला आहे.

या आदेशानुसार पाच किंवा त्यापेक्षा अधिक व्यक्तींच्या कोणत्याही संमेलनास प्रतिबंध, मिरवणूक काढणे, मिरवणुकीत लाऊडस्पीकर, वाद्ये, वाद्य बॅण्ड आणि फटाके फोडण्यास प्रतिबंध घालण्यात आला आहे. विवाह समारंभ, अंत्यविधी कार्यक्रम, कंपन्या, सहकारी संस्था आणि अन्य संस्था व संघटनांच्या कायदेशीर बैठका, क्लबमध्ये होणारे कार्यक्रम, सामाजिक मेळावे, सहकारी संस्था, इतर सोसायट्या आणि संघटना यांच्या बैठकांना या बंदी आदेशातून वगळण्यात आले आहे.

चित्रपटगृहे, नाट्यगृहे तसेच सार्वजनिक मनोरंजनाची अन्य ठिकाणे, न्यायालये, शासकीय, निमशासकीय कार्यालये, शाळा, महाविद्यालये तसेच अन्य शैक्षणिक संस्था, कंपन्या, कारखाने, दुकाने तसेच अन्य आस्थापनांमध्ये नियमित व्यापार, व्यवसाय या कारणांनी होणाऱ्या जमावास यातून वगळण्यात आले आहे. तसेच जमाव करण्यात तसेच शांततापूर्ण मार्गाने मोर्चास पोलिसांनी परवानगी दिलेली असल्यास त्यासही या जमावबंदीतून वगळण्यात आले आहे, असे  पोलीस उपायुक्त विशाल ठाकूर यांनी कळविले आहे.

पुण्याजवळ कात्रज घाटात अपघात:5 वाहने एकमेकांना धडकली

पुण्यातील कात्रज बोगद्यात मोठा अपघात झाला आहे. या बोगद्यात पाच गाड्या एकमेकांना धडकल्या आहेत. बोगद्यातील गाड्या बाजूला काढण्याचे काम सुरू आहे. घटनेची माहिती मिळताच वाहतूक पोलिस घटनास्थळी दाखल झाले आहेत.

दरम्यान अपघातानंतर बोगद्यातील गाड्या बाजूला काढण्याचे काम सुरू आहे. घटनास्थळी वाहतूक पोलिस दाखल झाले आहेत. सध्या दोन्ही बाजूंनी वाहनांच्या रांगा लागलेल्या आहेत. साताऱ्यावरून मुंबईच्या दिशेने गाड्या जात होत्या. त्याचवेळी बोगद्यात अचानक एका वाहनाने ब्रेक लाव्याने पाठीमागून येणाऱ्या गाड्या एकमेकांना धडकल्या. या अपघातात एक महिला जखमी झाली आहे.

राज ठाकरेंनी आमच्यासोबत यावे:शिंदे गटाच्या नेत्याने पुढे केला हात; राज-शिंदे एकत्र आले तर राजकारणात बॉम्बस्फोट होईल असा दावा

शिवसेनेच्या सत्ताधारी शिंदे गटाने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यापुढे मैत्रीचा हात पुढे केला आहे. राज ठाकरे आमच्यासोबत आले तर महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा बॉम्बस्फोट होऊन महायुतीला लोकसभेच्या 45 हून अधिक जागा मिळतील, असे शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांनी म्हटले आहे.

लोकसभेच्या 45 जागा जिंकायच्या असतील तर राज ठाकरे महायुतीत आले पाहीजे असे विधान शिंदे गटाचे प्रवक्ते आमदार संजय शिरसाट यांनी व्यक्त केले आहे. तर मुख्यमंत्री आणि राज ठाकरे यांची ही सहावी भेट आहे. राजकीय चर्चा झाली नाही, अशा बातम्या समोर आल्या. पण माझे मत आहे की, राजकीय चर्चा झाली पाहीजे असेही त्यांनी यावेळी बोलताना म्हटले आहे.

दरम्यान संजय शिरसाट पुढे बोलताना म्हणाले की,आगामी लोकसभा निवडणुकीत संपूर्ण ताकदीने आम्हाला विजय मिळवायचा आहे. राज ठाकरे हे लोकनेते आहेत. त्यांच्या सभांना लाखोंची गर्दी होते. भाजपा, शिवसेना (शिंदे गट) आणि राज ठाकरे यांची ताकद एकत्र आली तर लोकसभेत 45 हून अधिक जागा जिंकणे अवघड नाही. जानेवारी महिन्यात जेव्हा महायुतीची जागावाटपाची चर्चा होईल, तेव्हा या मुद्द्यावरही चर्चा होईल, असा माझा अंदाज आहे.

निकालाची आम्हाला चिंता नाही

संजय शिरसाट म्हणाले की, 10 जानेवारीच्या निकालाची आम्हाला चिंता नाही. आम्ही सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केलेली आहे. या प्रकरणाचा निकाल आमच्या बाजूने लागणार याचा आम्हाला पूर्ण विश्वास आहे.एकनाथ शिंदेंचा दौरा सहा जानेवारीपासून सुरू होणार आहे. 11 जानेवारीला छत्रपती संभाजीनगरला सभा येणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेचा हा कार्यकर्ता मेळावा असून जाहीर सभा नाही. आगामी लोकसभेच्या पार्श्वभूमीवर कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करण्यात येण्यात येणार. या मेळाव्याला जाहीर सभेचे स्वरुप देण्यात येणार नाही, असेही शिरसाट म्हणाले. आगामी काळातील युतीची नांदी अशी जोरदार चर्चा सध्या राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा रंगू लागली आहे. बंद दाराआड झालेल्या या चर्चेमुळे पुन्हा एकदा राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.

‘महालक्ष्मी सरस’ला मुंबईकरांचा भरभरून प्रतिसाद

0

मुंबई, दि. २९ : वांद्रे (पूर्व) येथील एम.एम.आर.डी.ए मैदान येथे महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत (उमेद) सुरू असलेल्या ‘महालक्ष्मी सरस २०२३-२४’ ला मुंबईकरांनी भरभरून प्रतिसाद दिला. महालक्ष्मी सरसच्या भव्य प्रदर्शन व विक्री स्टॉलला मुंबईकर भेट देत असून खरेदीतून विविध कला व कौशल्यांचा आस्वाद घेतल्याचे दिसून येत आहे.

महालक्ष्मी सरसच्या फूड कोर्टवर खवय्यांनी गर्दी केलेली दिसून आली. कोल्हापूरचा तांबडा-पांढरा रस्सा, खानदेशी मांडे व देशभरातून आलेल्या विविध खाद्य व्यंजनांचा मुंबईकर आनंद घेताना पाहायला मिळत आहेत.

मुंबईसह विविध ठिकाणाहून सहकुटुंब सहपरिवार याठिकाणी भेटीसाठी नागरिक येत आहेत.

दररोज संध्याकाळी सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. त्याचप्रमाणे महालक्ष्मी सरस प्रदर्शनात उज्ज्वला खेडेकर यांच्या मंगळागौर कार्यक्रमाचे आयोजन, प्रसिद्ध शाहीर देवानंद माळी यांच्या मनोरंजनाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या प्रदर्शनाला विविध क्षेत्रातील मान्यवर भेट देत आहेत.

न्यूक्लिअस बजेट योजनेंतर्गत १५ जानेवारीपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

0

मुंबई, दि. २९ : एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प मुंबई यांच्यामार्फत न्यूक्लिअस बजेट योजनेअंतर्गत सन २०२३-२४ या वर्षात विविध उत्पन्न वाढीच्या योजना राबविण्यात येत आहेत. या योजनेचा लाभ घेण्यासाठी मुंबई शहर व मुंबई उपनगर जिल्ह्यातील अनुसूचित जमातीच्या लाभार्थ्यानी १५ जानेवारी २०२४ पर्यत अर्ज करण्याचे आवाहन प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, मुंबई यांनी केले आहे.

अनुसूचित जमातीच्या लाभार्थ्यांना विविध व्यवसाय करण्यासाठी अर्थसहाय्य करणे (२५ हजार व ५० हजार रुपये करिता स्वतंत्र योजना) (गट-अ) या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जदाराचा जातीचा दाखला, शिधापत्रिका, दारीद्र्य रेषेखालील कार्ड किंवा चालुवर्षाचा उत्पन्नाचा दाखला (रुपये २.५० लाख पर्यंत मर्यादा), आधार कार्ड, बँकेचे पासबुक पहिले पान व फोटो, जो व्यवसाय करणार त्याचे खर्चाचे अंदाजपत्रक इत्यादी कागदपत्रे अर्जासोबत जोडणे आवश्यक राहील.  अनुसूचित जमातीच्या घरामध्ये २.५ विद्युत संच बसविणे (गट – क) या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जदाराचा जातीचा दाखला, शिधापत्रिका, दारीद्रय रेषेखालील कार्ड किंवा चालू वर्षाचा उत्पन्नाचा दाखला (रुपये २.५० लाख पर्यंत मर्यादा), आधार कार्ड, बँकेचे पासबूक पहिले पान व फोटो इत्यादी कागदपत्रे अर्जासोबत जोडणे आवश्यक राहील. या योजनेसाठी अर्जाचा नमुना एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प मुंबई,कस्तुरबा क्रॉस रोड न. २, कस्तुरबा महानगरपालिकेची मराठी शाळा क्र.2 सभागृह हॉल, तळमजला, बोरिवली पूर्व, मुंबई या कार्यालयामार्फत विनामूल्य उपलब्ध करुन दिला जाईल