Home Blog Page 1209

वैद्यकीय महाविद्यालयातील इंटर्नशिप विद्यार्थ्यांच्या विद्यावेतनात भरीव वाढ, आता मिळणार दरमहा १८ हजार

0

मुंबई-राज्यातील शासकीय व अनुदानित वैद्यकीय, दंत, आयुर्वेद, युनानी व होमिओपॅथी महाविद्यालयातील आंतरवासिता  प्रशिक्षणार्थींच्या (इंटर्नशिप) विद्यावेतनात वाढ करून ते दरमहा 18 हजार रुपये देण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते. तसेच परदेशातून वैद्यकीय पदवी अभ्यासक्रम पूर्ण केलेल्यांना इंटर्नशिप कालावधीसाठी 18 हजार रुपये विद्यावेतन देण्याचा निर्णय देखील घेण्यात आला.

या विद्यार्थ्यांना पूर्वी 11 हजार रुपये विद्यावेतन देण्यात येत होते ते आता  फेब्रुवारी, 2024 पासून दरमहा 18 हजार रुपये देण्यात येईल. तसेच परदेशातून वैद्यकीय पदवी अभ्यासक्रम पूर्ण केलेल्या उमेदवारांना (Foreign Medical Graduates-FMGs) आंतरवासिता प्रशिक्षण कालावधीमध्ये हेच विद्यावेतन देण्याचा निर्णय झाला आहे.

राष्ट्रवादीकडून प्रफुल्ल पटेलांना शिंदेसेनेकडून मिलिंद देवरा यांना राज्यसभा

मुंबई-अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने राज्यसभेच्या निवडणुकीसाठी (Rajya sabha Election) आपला उमेदवार जाहीर केला आहे. प्रफुल्ल पटेल (Praful Patel) हेच राज्यसभेचे उमेदवार असतील. राज्यसभेसाठी उमेदवारी अर्ज भरण्याचा उद्या १५ फेब्रुवारी ही शेवटची तारीख आहे. आजच महायुती आणि काँग्रेसने आपले उमेदवार जाहीर केले आहेत. महायुतीमध्ये भाजपकडून नुकतेच काँग्रेसमधून आलेले अशोक चव्हाण, पुण्याच्या माजी आमदार मेधा कुलकर्णी, डॉ. अजित गोपछडे यांना तर शिवसेनेकडून मिलिंद देवरा यांना उमेदवारी जाहीर केली. दुसरीकडे काँग्रेसने ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री चंद्रकांत हंडोरे यांना उमेदवारी दिली आहे.प्रफुल पटेल हे सध्या राज्यसभेचे खासदार आहेत. त्यांचा कार्यकाळ मे 2027 मध्ये संपणार आहे. मात्र त्यापूर्वीच 3 वर्षे आधी प्रफुल पटेल हे राजीनामा देऊन पुन्हा अर्ज भरतील. काही तांत्रिक मुद्दे असल्याने हा निर्णय घेत आहोत, असं प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी सांगितलं. मात्र कार्यकाळ संपण्याच्या तब्बल 3 वर्ष आधी हा निर्णय का घेतला याबाबत राजकीय वर्तुळात चर्चा सुरु आहेत.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या वतीने देखील राज्यसभेसाठी उमेदवाराच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे. काँग्रेस पक्षाला सोडचिट्टी देत एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेमध्ये दाखल झालेले मिलिंद देवरा यांना राज्यसभेची उमेदवारी देण्यात आली आहे. मिलिंद देवरा हे एकेकाळी मुंबई काँग्रेसचे मोठे नाव होते. प्रदेश काँग्रेसचे तगडे नेते म्हणून त्यांची गणना होत होती. मिलिंद देवरा यांना 15 व्या लोकसभेचे सर्वात तरुण सदस्य म्हणून ओळख मिळाली आहे. वयाच्या अवघ्या 27 व्या वर्षी ते खासदार झाले होते. 2004 च्या निवडणुकीत मिलिंद देवरा यांनी भाजप उमेदवार जयवंतीबेन मेहता यांचा 10 हजार मतांनी पराभव केला होता. मिलिंद देवरा यांनी 2009 मध्ये दक्षिण मुंबई मतदारसंघातून विजय मिळवला होता. त्यांचा जन्म 4 डिसेंबर 1976 रोजी मुंबईत झाला. त्यांचे वडील ज्येष्ठ राजकारणी आणि काँग्रेसचे मोठे नेते मुरली देवरा आहेत. मिलिंद देवरा यांनी काँग्रेसमध्ये अखिल भारतीय सह कोषाध्यक्ष म्हणूनही काम केले आहे. ते मुंबई काँग्रेसचे अध्यक्षही राहिले आहेत.अलीकडेच त्यांनी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला होता. त्यांना लोकसभेची उमेदवारी देण्यात येईल, अशी शक्यता वर्तवली जात होती. मात्र, त्यांना राज्यभेची उमेदवारी देण्यात आली आहे.

सर्व उमेदवार जाहीर 

भाजपचे उमेदवार – अशोक चव्हाण, मेधा कुलकर्णी, डॉ. अजीत गोपछडे

शिंदे गटाचे उमेदवार  – मिलिंद देवरा

अजित पवार गट – प्रफुल्ल पटेल 

चंद्रकांत हंडोरे -कॉंग्रेस

मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेत आणखी ७ हजार किमी रस्ते व पूल बांधणार

0

मुंबई, दि. १४ : मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेत आणखी 7 हजार किमी रस्ते व पूल बांधण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते.

मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेच्या टप्पा-२ मध्ये १० हजार किमी लांबीचे रस्त्यांचे उद्दिष्ट आहे. यापैकी ७ हजार किमी लांबीचे रस्ते कोणत्या जिल्ह्यांमध्ये बांधायचे ते ठरले आहे. ३ हजार किमी लांबीच्या रस्त्यांचे सविस्तर प्रकल्प अहवालास मान्यता देण्यात आली आहे.  या पार्श्वभूमीवर या टप्प्यात संशोधन व विकासासाठी आणखी ७ हजार किमी लांबीच्या रस्त्यांचा दर्जा वाढविण्यास मान्यता देण्यात आली आहे. या टप्प्यात महानगरपालिका, साखर कारखाने, औष्णिक विद्युत केंद्र, वाळू आणि खडीच्या खदानी, मोठ्या नद्या, औद्योगिक परिसरापासून १० किमी च्या आणि नगरपालिका, नगरपरिषदा, छावणी बोर्ड हद्दीपासून ५ किमी च्या मर्यादेतल्या रस्त्यांचा दर्जा वाढविण्यासाठी निवड करण्यात येईल. रस्त्यांची दर्जोन्नती केलेल्या मात्र पुलांअभावी दळणवळण होत नसलेल्या ठिकाणी पूल उभारण्यात येतील.

किल्लेदार भाजी मार्केट सुसज्ज करा:आमदार शिरोळे

पुणे : जनवाडी येथील बी.डी किल्लेदार भाजी मार्केट येथे प्रत्यक्ष पाहणी करून हे मार्केट सुसज्ज आणि आधुनिक करा,अशा सूचना आमदार सिध्दार्थ शिरोळे यांनी महापालिका प्रशासनाला दिल्या.

महापालिकेचे भाजी मंडई अधिकारी, भवन रचना विभाग अधिकारी व मालमत्ता अधिकारी यांच्या विशेष उपस्थितीत सर्व माहिती घेऊन मार्केट इमारतीची दुरावस्था आमदार शिरोळे यांनी अधिकाऱ्यांना दाखविली.गेल्या पाच ते सात वर्षांपासून बिल्डिंग बांधून आहे पण त्याचा उपयोग होत नव्हता. योग्य तो उपयोग व्हावा यासाठी प्रशासनासह पाहणी केली ,असे आ. शिरोळे यांनी सांगितले.

त्यावेळी गणेश बगाडे, किरण ओरसे,प्रकाश सोळंकी,विनोद धोत्रे, माजी नगरसेवक लक्ष्मण लोखंडे, लक्ष्मण नलावडे, सुरेश शिंदे, रमेश भंडारी आदी पदाधिकारी व नागरिक उपस्थित होते.

बारामती येथे नवीन शासकीय नर्सिंग महाविद्यालयाला मंजूरी

शासकीय महाविद्यालयाला संलग्न 100 विद्यार्थी प्रवेश क्षमता

राज्य मंत्रीमंडळाच्या बैठकीत आज निर्णय

मुंबई, दि. 14 : राज्यातील आरोग्य यंत्रणा सक्षम करण्यासाठी राज्यात बारामतीसह जळगांव, लातूर, सांगली (मिरज), नंदुरबार व गोंदिया अशा सहा ठिकाणी येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांशी संलग्न प्रत्येकी 100 विद्यार्थी प्रवेश क्षमतेच्या नवीन शासकीय नर्सिंग महाविद्यालयांना मंजूरी देण्याचा महत्वपूर्ण निर्णय आज राज्य मंत्रीमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या प्रयत्नातून हे बारामती शासकीय नर्सिंग महाविद्यालय होत आहे.

राज्यात व देशामध्ये होणारा संसर्गजन्य आजाराचा फैलाव विचारात घेऊन पॅरामेडीकल अभ्यासक्रमामध्ये आमूलाग्र बदल करण्याचे शासनाने ठरविले आहे. राज्यातील आरोग्य व्यवस्था सक्षम करण्याच्या दृष्टीने राज्य सरकारच्यावतीने विविध उपाययोजना राबविण्यात येत आहेत. त्याचाच भाग म्हणून आज राज्यात सहा नवीन शासकीय नर्सिंग महाविद्यालयांना मंजूरी देण्याचा महत्वपूर्ण निर्णय राज्य मंत्रीमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. यामध्ये बारामती, जळगांव, लातूर, सांगली (मिरज), नंदुरबार व गोंदिया या नर्सिंग महाविद्यालयांचा समावेश आहे. या निर्णयाचा फायदा पॅरामेडीकल क्षेत्रात करिअर करु इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना होणार आहे. नवीन नर्सिंग महाविद्यालयामुळे बारामतीच्या वैद्यकीय क्षेत्राला बळकटी मिळणार आहे. बारामतीमध्ये सध्या अहिल्याबाई होळकर बारामती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय कार्यान्वित झाले असून त्याला संलग्न हे शंभर विद्यार्थी प्रवेश क्षमतेचे शासकीय नर्सिंग महाविद्यालय होणार आहे. त्याचबरोबर बारामतीत शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालयाचे काम सुरु आहे. आता नव्याने मंजूर झालेल्या शासकीय नर्सिंग महाविद्यालयामुळे बारामतीच्या वैद्यकीय क्षेत्राला बळकटी मिळणार आहे. बारामती येथे होणाऱ्या या शासकीय नर्सिंग महाविद्यालयाचा फायदा पुणे जिल्ह्याबरोबरच बारामतीला लागून असणाऱ्या सातारा, अहमदनगर, सोलापूर येथील विद्यार्थ्यांना आणि तेथून येणाऱ्या रुग्णांना होणार आहे. बारामती येथे नवीन शासकीय नर्सिंग महाविद्यालय मंजूर झाल्याच्या निर्णयाचे सर्व क्षेत्रातून स्वागत होत आहे.


नांदेड शहर काँग्रेस कमिटीची कार्यकारिणी बरखास्त: नाना गावंडे

0

मुंबई दि. १४ फेब्रुवारी २०२४
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांच्या निर्देशानुसार नांदेड शहर काँग्रेस कमिटीची कार्यकारिणी बरखास्त करण्यात आली आहे. अशी माहिती महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे प्रदेश उपाध्यक्ष संघटन व प्रशासन नाना गावंडे यांनी दिली आहे. नांदेड शहर व ग्रामीण जिल्हा काँग्रेस कमिटीच्या समन्वयकपदी माजी आमदार ईश्वरराव भोसीकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

सरकारने मनोज जरांगे पाटलांना फसवले, आश्वासन पूर्ण केले तर उपोषणाची वेळ का आली?

भाजपाकडे नेतृत्व नसल्यानेच आयारामांना राज्यसेभेची उमेदवारी, निष्ठावंत कार्यकर्ते मात्र वंचितच: नाना पटोले.

चंद्रकांत हंडोरे काँग्रेसचे निष्ठावान कार्यकर्ते, ते विजयी होणार!

राष्ट्रवादी काँग्रेस-काँग्रेस विलिनिकरणाच्या अफवा, याबाबतीत कोणतीही चर्चा नाही.

मुंबई, दि. १४ फेब्रुवारी
राज्यसभेच्या निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाला आयात केलेल्या लोकांना उमेदवारी द्यावी लागली. जगातील सर्वात मोठा पक्ष व ‘विश्वगुरु’ असे नेतृत्व असल्याच्या वल्गणा करणाऱ्यांकडे राज्यसभेसाठी उमेदवार नसावा यातूनच भाजपा हा हवा भरलेला फुगा आहे तो कधीही फुटू शकतो हे दिसते. आयारामांना उमेदवारी आणि निष्ठावान कार्यकर्त्यांना डावलणे हीच भाजपाची पद्धत आहे, अशी टीका महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे.
टिळक भवन मध्ये पत्रकार परिषदेला संबोधित करताना नाना पटोले पुढे म्हणाले की, राज्यसभेची उमेदवारी आयात केलेल्या लोकांना देऊन कार्यकर्त्यांनी केवळ सतरंज्याच उचलाव्या हा संदेश भाजपाने दिलेला आहे. पक्ष वाढवण्यासाठी जे कार्यकर्ते आयुष्यभर मेहनत करतात त्यांना भाजपा संधी देत नाही. भिती दाखवून, दरोडे टाकून दुसऱ्या पक्षातील लोकांना भाजपात घेणे, दुसऱ्यांचे पक्ष फोडणे, चोरणे हेच काम भाजपा सध्या करत आहे. भाजपामध्ये नेतेच नाहीत, कालपर्यंत ज्यांना ते ‘डिलर’ म्हणत होते त्यांनाच आता ‘लिडर’ म्हणण्याची वेळ भाजपावर आली आहे. पंतप्रधानांनी ज्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केले त्यांना पक्षात घेऊन राज्यसभेची उमेदवारीही दिली हेच भाजपाचे Party with difference आहे का ? असा सवाल उपस्थित करत भाजपाचे खायचे व दाखवायचे दात वेगळे आहेत, असा टोलाही नाना पटोले यांनी लगावला आहे.

चंद्रकांत हंडोरे निष्ठावान कार्यकर्ते, विजयाची खात्री!
काँग्रेस पक्षाने ज्येष्ठ नेते चंद्रकांत हंडोरे यांना राज्यसभेची उमेदवारी दिली आहे. हंडोरे हे काँग्रेस पक्षाचे निष्ठावान कार्यकर्ते आहेत, संघटना बांधणीत त्यांचे मोठे योगदान आहे, तसेच त्यांना मानणारा मोठा वर्ग आहे. काँग्रेस पक्षाने हंडोरे यांनी उमेदवार देऊन कार्यकर्त्यांचा सन्मान केला आहे. चंद्रकांत हंडोरे यांचा विजय नक्की आहे, दगाफटका करण्यास काहीही वाव नाही, असेही नाना पटोलेंनी स्पष्ट केले.
जरांगे पाटील यांची शिंदे सरकारकडून फसवणूक..
मराठा आरक्षणासाठी लढा देत असलेले मनोज जरांगे पाटील यांची सरकारने फसवणूक केली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मराठा समाजाच्या सर्व मागण्या मान्य केल्या आहेत असे नवी मुंबईत जरांगे यांच्या लाखो कार्यकर्त्यांसमोर जाहीर केले. दिलेला शब्द आपण पाळला असेही मुख्यमंत्री म्हणाले. जरांगे पाटील यांनी केलेल्या सर्व मागण्या मान्य झाल्या तर मग पुन्हा उपोषण करण्याची वेळ त्यांच्यावर का आली? सरकारने मराठा समाजाला फसवले की ओबीसी समाजाला असा सवाल आम्ही त्याचवेळी केला होता याची आठवण नाना पटोले यांनी करून दिली.
राहुल गांधींच्या यात्रेचे महाराष्ट्रात भव्य स्वागत होईल.
एका प्रश्नाला उत्तर देताना नाना पटोले म्हणाले की, राहुल गांधी यांनी सुरु केलेल्या भारत जोडो न्याय यात्रेला जनतेचे मोठे समर्थन मिळत आहे. महाराष्ट्रात या यात्रेचे स्वागत धुमधडाक्यात होईल, भाजपाने त्याची चिंता करु नये. भारत जोडो यात्रेलाही महाराष्ट्राच्या जनतेने प्रचंड समर्थन देऊन यात्रा ऐतिहासिक बनवली होती आताही असेच चित्र असेल, असेही नाना पटोले म्हणाले.
या पत्रकार परिषदेला प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष संघटन व प्रशासन नाना गावंडे, प्रदेश काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे व प्रवक्ते राजू वाघमारे उपस्थित होते.

मंत्रिमंडळ बैठकीत प्रस्तावच नाही:विशेष अधिवेशनाची शक्यता धूसर; आणि गावात मनोज जरांगेंचे आमरण उपोषण सुरूच

0

मुंबई-मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी जालन्याच्या आंतरवाली सराटीत नव्याने आमरण उपोषण केले आहे. त्यांनी आरक्षणासंबंधी सरकारने जारी केलेल्या सगेसोयरेच्या अधिसूचनेची विशेष अधिवेशन बोलावून तत्काळ अंमलबजावणी करण्याची मागणी केली आहे. त्यानुसार, राज्य मंत्रिमंडळाच्या आजच्या बैठकीत यासंबंधीचा प्रस्ताव येणे अपेक्षित होते. पण त्यात असा कोणताही प्रस्ताव आला नसल्यामुळे मराठा आरक्षणासंबंधी सरकार विशेष अधिवेशन बोलावण्याची शक्यता धूसर झाली आहे.आंतर्वली सराटी त ..उपचार घ्या च्या घोषणातही …. जरांगे उपोषण सोडणार नाही या हट्टाला पेटल्याने त्यांची प्रकृतीही खालावते आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात बुधवारी राज्य मंत्रिमंडळाची बैठक झाली. या बैठकीत विविध विभागांचे महत्त्वपूर्ण प्रस्ताव हातावेगळे करण्यात आले. पण सगेसोयरे अधिसूचनेचे कायद्यात रुपांतर करण्यासाठी राज्य विधीमंडळाचे विशेष अधिवेशन बोलावण्याच्या मुद्यावर या बैठकीत कोणतीही चर्चा झाली नाही. सुरुवातीला सरकार या बैठकीद्वारे विशेष अधिवेशन बोलावण्याचा एखादा निर्णय घेईल असा दावा केला जात होता. पण असा कोणताही प्रस्ताव मंत्रिमंडळाच्या अजेंड्यावर आला नसल्यामुळे मराठा आरक्षणासाठी आंदोलन करणाऱ्या मनोज जरांगे पाटलांसह त्यांच्या सहकाऱ्यांचा पुरता भ्रमनिरास झाला आहे. यामुळे मराठा आरक्षणाचा मुद्दा अधिकच चिघळण्याची शक्यात निर्माण झाली आहे.दुसरीकडे, सगेसोयरे अधिसूचनेच्या अंमलबजावणीसाठी मनोज जरांगे यांनी गत शनिवारपासून आमरण उपोषणाला सुरुवात केली आहे. आज त्यांच्या उपोषणाच्या 5 व्या दिवशी त्यांच्या नाकातून रक्तस्त्राव झाला. यामुळे त्यांची प्रकृती चिंताजनक बनली आहे. डॉक्टरांनी बुधवारी त्यांना सलाईन लावून औषधोपचार सुरू केले. पण त्यांनी काही वेळातच सलाईन काढून फेकून दिले. यामुळे चिंता वाढली आहे.

अक्षय आणि टायगर ने ब्रोमान्स साजरा करत व्हॅलेंटाईन डे च्या दिल्या हटके शुभेच्छा

बडे मियाँ छोटे मियाँ जोडी अक्षय कुमार आणि टायगर श्रॉफ यांनी या व्हॅलेंटाईन डे च्या दिल्या ब्रोमान्समय शुभेच्छा 

 बॉलीवूडचा रिअल ॲक्शन चित्रपट “बडे मियाँ छोटे मियाँ” च्या रिलीजच्या आधी चर्चेचा विषय ठरतोय. आज व्हॅलेंटाईन डे निमित्ताने या बॉलीवूड च्या नवीन ॲक्शन जोडीने म्हणजे अक्षय कुमार आणि टायगर श्रॉफ ने भन्नाट ब्रोमान्स साजरा करत खास दिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. त्यांची ऑन-स्क्रीन डायनॅमिक केमिस्ट्री एड्रेनालाईन-पॅक मनोरंजन तर करणार आहे पण ऑफ स्क्रीन त्यांची ही धम्माल मस्ती सुरू असते हे सगळ्यांना दिसून येत. 
या दोघांनी त्यांच्या सोशल मीडिया हँडलवर त्यांचे काही ब्रोमन्स फोटो शेअर केले आहेत:

 “या व्हॅलेंटाईन डेवर रोमान्सपेक्षा ब्रोमान्स  
https://www.instagram.com/p/C3UWGKdLrnJ/?igsh=MXZndGp2OHVkYnZpeQ==

 ॲक्शन सुपरस्टार या थरारक प्रवास सुरू होत असताना चाहत्यांना खिलाडी कुमार आणि बॉलिवूडचा सर्वात तरुण ॲक्शन सुपरस्टार टायगर श्रॉफ यांच्यातील ॲक्शन आणि सौहार्दाचा रोलरकोस्टर राईड दिसणार आहे. अली अब्बास जफर यांनी लिखित आणि दिग्दर्शित केलेला आणि पूजा एन्टरटेन्मेंट आणि AAZ फिल्म्सच्या प्रोडक्शन बॅनरखाली निर्मित बॉलीवूडचा खरा ॲक्शन चित्रपट ‘बडे मियाँ छोटे मियाँ’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

शिवजयंती उत्साहाने साजरी करतानाच शिवभक्तांना सर्व सुविधा पुरविण्याची चोख व्यवस्था करा- जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे

पुणे, दि. १४: किल्ले शिवनेरी येथे आगामी शिवजयंती महोत्सव उत्साहाने साजरा करण्याच्यादृष्टीने सर्व यंत्रणांनी समन्वयाने काम करावे. शिवजयंती उत्साहात साजरी करत असतानाच येणाऱ्या शिवभक्तांना कोणत्याही असुविधांना सामोरे जावे लागू नये यासाठी आवश्यक सेवा सुविधा पुरविण्याची व्यवस्था करा, असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे यांनी दिले.

जुन्नर पंचायत समिती येथे शिवजयंती आढावा बैठकीत ते बोलत होते यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रमेश चव्हाण ग्रामीण पोलीस अधीक्षक पंकज देशमुख, उप वन संरक्षक अमोल सातपुते, उप विभागीय अधिकारी गोविंद शिंदे, जिल्हा नियोजन समितीच्या सदस्य आशाताई बुचके, माजी आमदार शरद सोनवणे, पर्यटन विभागाच्या उपसंचालक शमा पवार, गृहरक्षक दलाचे अतिरिक्त पोलीस अधीक्षक रमेश चोपडे, तहसीलदार रवींद्र सबनीस, गटविकास अधिकारी हेमंत गरिबे आदी उपस्थित होते.

शिवजयंती हा आनंद उत्सव असून त्यातून सर्वांनाच प्रेरणा मिळते असे सांगून डॉ. दिवसे म्हणाले, महसूल, पोलीस विभाग, वन विभाग तसेच अन्य विभागांची यात मोठी भूमिका आहे. यासह अन्य सर्वच यंत्रणांनी या उत्सवाचे व्यवस्थापन चांगल्याप्रकारे व्हावे यासाठी समन्वयाने काम करावे. सर्व व्यवस्था सज्ज ठेवण्यात यावी आपत्ती व्यवस्थापन यंत्रणेकडून सार्वजनिक उद्घोषणा यंत्रणा, मेगाफोन देण्यात येतील. हा उत्सव हरित असावा म्हणून प्लास्टिक नियंत्रण करावे तसेच कचरा जमा करण्याची व विल्हेवाट लावण्याची व्यवस्था करा, असेही ते म्हणाले.

गर्दी नियंत्रणासाठी मुख्य सभेचे ठिकाण बदलण्याविषयक भारतीय पुरातत्व विभागासोबत (एएसआय) चर्चा सुरू आहे, असे सांगून ते म्हणाले, शिवजन्म स्थळ तसेच शिवकुंजची सजावट, रोषणाई, पायथा ते दत्त मंदिर पर्यंत पथदिव्यांसाठी वीज व्यवस्था चांगल्याप्रकारे करावी. गडावर तसेच तसेच दत्त मंदिर आणि पायथ्यासह शहरातही स्वच्छ्ता गृहे आणि इतर स्वच्छता विषयक चांगले व्यवस्थापन करावे. पर्यटन विभागाच्या माध्यमातून राबविण्यात येणाऱ्या दुर्गोत्सवातील बचत गट आणि अन्य स्टॉल, टेन्ट सिटी, जाणता राजा महानाट्य आणि सांस्कृतिक कार्यक्रम आदींबाबत माहिती, प्रसिद्धी करावी असेही त्यांनी सांगितले.

मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. चव्हाण यांनी पाणीपुरवठा, स्वच्छ्ता, आरोग्य व्यवस्था आदींचा आढावा घेतला. पुरेशा प्रमाणात राखीव बेड, अतिदक्षता खाटा, आरोग्य पथकांची नेमणूक, रुग्णवाहिका ठेवण्यात येणार आहेत. तसेच पाण्याची तपासणी व ते शुद्धीकरण करण्यात येणार आहे. पंचायत समिती तसेच जुन्नर नगर परिषदेच्या माध्यमातून फिरते व स्थिर तात्पुरती स्वच्छ्ता गृहे उभारण्यात येणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले.

डॉ. पंकज देशमुख म्हणाले, शिवभक्तांना कार्यक्रम सुरू असताना दर्शनासाठी अधिक वेळ प्रतीक्षा करावी लागू नये प्रयत्न सुरू आहेत. फक्त मुख्य कार्यक्रमाच्या वेळी थोड्याच कालावधीसाठी गर्दीला थांबविण्यात येणार असून नागरिकांना हत्ती दरवाजा, मीना दरवाजा, कुलूप दरवाजा या ठिकाणी तसेच अन्य ठिकाणीही कार्यक्रम पाहण्यासाठी एलईडी स्क्रीन बसविण्यात येतील. दत्त मंदिर येथे नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात येणार असून आवश्यक तेथे मोठ्या प्रमाणात बंदोबस्त पुरविण्यात येईल. शिवजन्म उत्सव साजरा करत असताना त्याप्रसंगी गर्दी नियंत्रणाच्यादृष्टीने अत्यंत मर्यादित स्वरूपात प्रवेश पासेस देण्यात येणार आहेत, असेही ते म्हणाले.

शिवनेरी किल्ल्यावर कायमस्वरुपी वीज उपलब्ध होण्याच्यादृष्टीने सौर पॅनेल बसविता येतील का हे महाऊर्जाकडून तांत्रिक व व्यवहार्यता तपासणी करुन घ्यावी. परिवहन मंडळाने अधिकच्या बसेसची व्यवस्था करावी. पर्यटन विभागाने गडावरील कार्यक्रमात सहभाग घेण्याच्या दृष्टीने पुढील काळात पुढाकार घ्यावा, ड्रोनद्वारे गर्दीची पाहणी व नियंत्रण, आपत्ती व्यवस्थापनसाठी पथकांची नेमणूक आदी विषयांच्या अनुषंगाने यावेळी चर्चा झाली.

बैठकीस मराठा सेवा संघाचे पदाधिकारी, विविध कार्यान्वयन यंत्रणांचे अधिकारी उपस्थित होते.

गडावरील सुविधांची जिल्हाधिकाऱ्यांकडून पाहणी
तत्पूर्वी पहाटे जिल्हाधिकारी डॉ. दिवसे, मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. चव्हाण आणि पोलीस अधीक्षक श्री. देशमुख, उप वन संरक्षक अमोल सातपुते यांनी शिवनेरी गडावर भेट देऊन तेथील सुविधांची प्रत्यक्ष पाहणी करून संबंधितांना आवश्यक त्या सूचना दिल्या.

या प्रसंगी उप विभागीय अधिकारी गोविंद शिंदे, तहसीलदार रवींद्र सबनीस यांच्यासह वनविभाग, पोलीस, महावितरण, पंचायत समिती, एएसआय आदी विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

मेधा कुलकर्णी भाजपकडून राज्यसभेवर …

भाजप लोकसभेसाठीही धक्काच देणार ..

पुणे-राज्यसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्यासाठी अवघे दोन दिवस शिल्लक राहिले असतानाच भाजपकडून महाराष्ट्रातील तीन जागांसाठी उमेदवारांची घोषणा करण्यात आली आहे. नुकतेच काँग्रेसमधून भाजपमध्ये दाखल झालेले माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, महिला मोर्चाच्या राष्ट्रीय उपाध्यक्षा आणि कोथरूडच्या माजी आमदार मेधा कुलकर्णी , भाजपचे राज्य उपाध्यक्ष डॉ. अजित गोपछडे यांना अधिकृत उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.पुण्यातील भाजपच्या नेत्या मेधा कुलकर्णी यांची देखील नाराजी दूर करत त्यांना राज्यसभेवर पाठवण्याचा निर्णय घेण्यात आला.तसेच नांदेड येथील भाजपचे जुने कार्यकर्ते डॉ. अजित गोपछडे यांना देखील राज्यसभेची उमेदवारी देण्यात आली आहे.मात्र या सर्वात नारायण राणे यांचा पत्ता मात्र कट झाला आहे.

नगरसेवक ,आमदार आणि आता खासदार पदी विराजमान होणाऱ्या मेधा कुलकर्णी यांनी उमेदवारी जाहीर झाल्यावर पहा नेमके काय म्हटले.

नितीन गडकरींनी घरी जाऊन मेधा कुलकर्णींची घेतली होती भेट

पुण्यातील भाजपच्या नेत्या मेधा कुलकर्णी यांना आमदारकीचे तिकीट नाकारण्यात आल्यामुळे त्या नाराज होत्या. मेधा कुलकर्णी यांचे तिकीट कापत तत्कालीन भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना पुण्यातून उमेदवारी देण्यात आली होती. त्यामुळे मेधा कुलकर्णी नाराज असल्याच्या बातम्या वारंवार समोर आल्या आहेत.मध्यंतरी मेधा कुलकर्णी यांचे पक्षांतर्गत डावलले जाण्याची भावना जास्त बळावली तेव्हा स्वतः केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी त्यांच्या घरी जाऊन त्यांची समजूत काढली होती ., मेधा कुलकर्णी यांचे पुनर्वसन लवकरच होईल असे भाजपच्या वतीने सांगण्यात येत होते. त्यानुसार त्यांना आता राज्यसभेची उमेदवारी देण्यात आली आहे.

भाजपने कोथरूडमध्ये काय काय दिले 1) राज्यसभा 2)शिक्षण मंत्री 3)पालकमंत्री 4) महापौर 5)स्थायी अध्यक्ष 6)भाजप प्रदेश अध्यक्ष. एवढे दिले असताना आता कोथरूडमध्येच लोकसभेची उमेदवारी ही देईल ?

दरम्यान भाजपच्या तिकीटावर आगामी लोकसभा निवडणूक लढविणाऱ्या इच्छुकांची गणिते बिघडली आहेत.अनेक इच्छुकांनी गेल्या काही महिन्यापासून जोरदार तयारी सुरू केली आहे. यामध्ये शहराचे माजी महापौर मुरलीधर मोहोळ, भाजपचे शहराध्यक्ष आणि माजी आमदार जगदीश मुळीक यांच्यासह राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे माजी संघ प्रचारक आणि भाजपचे माजी राष्ट्रीय सचिव सुनिल देवधर यांच्या नावाचा समावेश आहे.राज्यसभेसाठी मेधा कुलकर्णी यांचे नाव जाहीर केल्याने भाजपकडून ब्राह्मण समाजावर अन्याय होतो, अशी टीका आता कोणालाही करता येणार नाही. कसबा मतदार संघाच्या आमदार मुक्ता टिळक, खासदार गिरीश बापट यांच्या निधनानंतर भाजपने ब्राह्मण समाजाला डावलल्याची टीका केली जात होती.

मात्र, कुलकर्णी यांच्या उमेदवारीमुळे भाजपकडून लोकसभेसाठी इच्छुक असलेले सुनील देवधर यांचे समीकरण बिघडले आहे. राज्यसभेसाठी ब्राह्मण उमेदवार पुढे केल्याने लोकसभेसाठी आता ब्राह्मण उमेदवार दिला जाईल असे वाट्त नाही.

प्रा. मेधा कुलकर्णी या कोथरूडमधील आहेत. त्यामुळे लोकसभेसाठी त्याच भागातील उमेदवार देण्याची शक्यता कमी आहे. त्यामुळे लोकसभेसाठी इच्छुक असलेले मुरलीधर मोहोळ यांचे उमेदवारीचे ‘ चान्सेस ‘ कमी झाले आहेत. तर दुसरे इच्छूक असलेले भाजपचे माजी शहराध्यक्ष जगदीश मुळीक यांची संधी वाढली आहे.मात्र त्यांचा कोणकोणत्या विधानसभा मतदारसंघात किती प्रभाव आहे याचा अहवालाने त्यांची गोची होऊ शकणार आहे. त्यामुळे मुळीक यांनाही वगळून लोकसभेसाठी कोणाला अपेक्षीत नसणारे आणि पुणे महापालिकेतील सत्ता खेचून आणणारे वेगळे नाव भाजपने घोषित केले तर फारसे आश्चर्य वाटायला नको. वडगावशेरी विधानसभा मतदारसंघाचे मुळीक हे माजी आमदार आहेत.. दुसरे असे की, मेधा कुलकर्णी यांना राज्यसभेची संधी देऊन कोथरूडचे विद्यमान आमदार आणि राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी देखील आपला मतदारसंघ ‘ सेफ ‘ करून ठेवल्याची चर्चा सुरू झाली आहे.आता देखील मेधा कुलकर्णी यांचे नाव कुठेही चर्चेत नव्हते. मात्र अखेरच्या क्षणी त्यांचे नाव भाजप श्रेष्ठींकडून अंतिम करण्यात आले. त्यांचे नाव समोर आल्यानंतर आगामी लोकसभा निवडणुकीसाठी चर्चेतील जे इच्छुक आहेत त्यांना डावलून इतर काही नावे देखील पक्षाकडून पुढे येऊ शकतात, असा सूचक इशारा भाजपने यानिमित्ताने दिला असल्याचे बोलले जात आहे.

कोण आहेत मेधा कुलकर्णी ?
प्रा. मेधा कुलकर्णी या 3 वेळा नगरसेवक होत्या. कोथरूड विधानसभा मतदारसंघाच्या भाजपच्या माजी आमदार आहेत. 2014 च्या विधानसभा निवडणुकीत त्या कोथरूड मतदारसंघातून विजयी झाल्या होत्या. मात्र, 2019 च्या निवडणुकीत पक्षाने त्यांचे तिकीट कापून तत्कालीन भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना या मतदारसंघातून उमेदवारी दिली होती. त्यामुळे कुलकर्णी काही प्रमाणात नाराज असल्याची चर्चा सुरुवातीच्या काळात सुरू झाली होती.

विधानसभेची उमेदवारी नाकारल्यानंतरही त्यांनी जाहीरपणे कधीही त्यांनी आपली नाराजी बोलून दाखविली नाही. त्यांच्या कामाची दखल घेत त्यांची नियुक्ती पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी महिला मोर्चाच्या केंद्रीय समितीवर केली होती.

पुणे जिल्ह्याच्या निमगाव येथील खंडोबाच्या दर्शनासाठी येणाऱ्या वृद्ध, दिव्यांग, मुले, महिला आदी भाविकांसाठी लिफ्टची सोय करा;उपमुख्यमंत्री अजित पवार

लिफ्टसह इतर सुविधांसाठी तातडीने जिल्हा परिषदेला विनामोबदला शासकीय जमीन उपलब्ध करून द्यावी…

मुंबई, दि. १४ फेब्रुवारी – पुणे जिल्ह्याच्या खेड तालुक्यातील निमगाव येथील खंडोबा मंदिर हे पौराणिक धार्मिक स्थळ आहे. याठिकाणी भरणाऱ्या यात्रेला दरवर्षी तीन ते चार लाख भाविक येत असतात. त्याचप्रमाणे वर्षभर येणाऱ्या भाविकांची संख्यादेखील मोठी आहे. त्यामुळे दर्शनासाठी येणाऱ्या ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग, मुले, महिला आदी भाविकांना मंदिरापर्यंत जाण्याची योग्य सोय होण्यासाठी अत्याधुनिक लिफ्टची सोय करावी. त्यासाठी लागणारी शासकीय जमीन जिल्हा परिषदेला विनामोबदला उपलब्ध करून देण्याबाबतची कार्यवाही तातडीने करण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री अजित पवार यांनी आज दिले.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयातील त्यांच्या दालनात खंडोबा मंदिर येथे लिफ्ट बसविणे आणि इतर सोयीसुविधांबाबत बैठक झाली.

या बैठकीला आमदार दिलीप मोहिते पाटील, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अपर मुख्य सचिव मनीषा म्हैसकर, महसूल विभागाचे अपर मुख्य सचिव राजगोपाल देवरा, नियोजन विभागाचे प्रधान सचिव सौरभ विजय, वन वभागाचे प्रधान सचिव बी. वेणूगोपाल रेड्डी, वित्त विभागाच्या सचिव शैला ए., पुण्याच्या सार्वजनिक बांधकाम विभागाचे मुख्य अभियंता अतुल चव्हाण आदी उपस्थित होते. तसेच पुण्याचे विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार, जिल्हाधिकारी सुहास दिवसे आदी दूरदृश्य संवाद प्रणालीच्या माध्यमातून उपस्थित होते.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी, निमगाव येथील खंडोबा मंदिर उंचावर असल्याने याठिकाणी भाविकांना विनासायास जाता येण्याच्यादृष्टीने स्थानिक लोकप्रतिनिधींनी रोपवेची मागणी केली होती. त्याठिकाणी रोपवेची योग्य उभारणी करता येत नसल्याने केंद्रसरकारच्या राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणकडून लिफ्ट उभारण्यास मंजुरी देण्यात आली आहे. लिफ्टसह इतर सुविधांसाठी केंद्रसरकारच्या केंद्रीय राखीव निधीमधून पैसे देण्यास मंजुरी मिळाली आहे. भाविकांना चांगल्या सोयीसुविधा दिल्यास येथे चांगले पर्यटनस्थळ निर्माण होऊ शकते. या सुविधांच्या उभारणीसाठी शासकीय जागेची आवश्यकता आहे. सार्वजनिक हितासाठी येथील जमिनीचा वापर होत असल्याने राज्य शासनाने जिल्हा परिषदेला निशुल्क जमीन उपलब्ध करून देण्याबाबतची कार्यवाही तातडीने करावी. संबंधित यंत्रणेने लिफ्टची सुविधा करताना सर्व खबरदारी घ्यावी, त्याची देखभाल दुरूस्ती पहावी, असे निर्देशही दिले.

निमगाव येथील खंडोबा मंदिर परिसरात छत्रपती शिवाजी महाराज स्मारक, भक्त निवास, अँम्पी थिएटर, बगीचा, पार्किंग, कार्यालय, प्रसादालय, स्वच्छतागृहे, स्कायवॉक उभारण्यास मान्यता देण्यात आली आहे. लिफ्टमधून दिव्यांग, वृद्ध, महिला, बालके यांना प्राधान्य देण्यात येणार असून एकावेळी २६ नागरिकांना लिफ्टमधून जाता-येता येणार आहे, अशी माहिती यावेळी देण्यात आली.

चंद्रकांतदादा पाटील यांची अशीही संवेदनशिलता…

स्केटिंग स्पर्धेतील सहभागी खेळाडूच्या उपचारासाठी सर्वतोपरी मदत

पुणे-सध्या राज्याच्या राजकीय परंपरेत सुसंस्कृत आणि संवेदनशील व्यक्तीमत्त्व आहेत, त्यामध्ये राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण, वस्त्रोद्योग आणि संसदीय कार्यमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांचे नाव आग्रक्रमाने घेतले जाते. त्यांचा संवेदनशिलतेचा परिचय कोथरुडमधील नागरिकांना पदोपदी येत असतो.

नुकताच त्यांनी राज्यातील सर्व महाविद्यालयातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबातील मुलींचे शिक्षण पूर्णपणे मोफत करण्याचा निर्णय घेतला. त्यांच्या या निर्णयामुळे संपूर्ण राज्यभरात आनंदाचे वातावरण आहे. कोथरुडकरांना तर चंद्रकांतदादांसारखं व्यक्तीमत्त्व लोकप्रतिनिधी म्हणून मिळाल्याने, ते अभिमान व्यक्त करतात. त्यामुळेच आपल्या व्यथा दादांसमोर निर्धास्तपणे मांडताना, त्यांना कशाचीही भिती वाटत नाही. कारण, कोथरुडकरांनाही याची जाणीव आहे की, दादांकडे केलेली मागणी नक्की पूर्ण होणार.

त्यांच्या या संवेदनशीलतेचा परिचय कोथरुडकरांना नुकताच आला. राज्यातील खेळाडूंच्या कलागुणांना वाव मिळावा यासाठी भारतीय जनता पक्षाच्या वतीने नमो चषक-२०२४ चे आयोजन करण्यात आले आहे. या अंतर्गत राज्यभरात विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे.

कोथरुडमध्ये ही रविवार दिनांक ११ फेब्रुवारी रोजी स्केटिंग स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. कोथरुडमधील स्केटिंगमध्ये निष्णात असलेल्या अनेक स्पर्धकांनी यात सहभाग घेतला होता. या स्पर्धेत ओवेश तांबोळी कात्रज येथील स्केटिंगपटूनेही सहभाग नोंदवला होता. गेली सहा वर्षांपासून ओवेश स्केटिंगचा सराव करत असल्याने, त्याने त्याच विशेष कौशल्या मिळवले होते.

स्पर्धेत सुरु होता क्षणीच ओवेशचा तोल जाऊन पडल्याने त्याच्या कंबरेला गंभीर दुखापत झाली. भाजपा कोथरूड दक्षिण मंडल अध्यक्ष डॉ संदीप बुटाला, सरचिटणीस प्रा. अनुराधा एडके, राज तांबोळी आणि युवा मोर्चा अध्यक्ष अमित तोरडमल या सर्वांनी तातडीने ओवेशला रुग्णालयात दाखल केले. त्यानंतर डॉ. बुटाला यांनी सर्व हकिकत नामदार पाटील यांना सांगितली. नामदार चंद्रकांतदादा पाटील यांना ही सर्व माहिती समजताच, त्यांनी तातडीने मंडल अध्यक्ष डॉ. बुटाला यांना यात जातीने लक्ष घालण्याची सूचना केली. तसेच, उपचारावर सर्व खर्च आपण करणार असल्याचेही सांगितले.

त्यानुसार डॉ. बुटाला यांनी आपल्या सर्व सहकाऱ्यांसह रुग्णालयातील डॉक्टरांशी चर्चा केली; आणि खर्चाची कोणतीही काळजी करु नका. ओवेशला उत्तमोत्तम उपचार द्यावेत, अशी सूचना केली. त्यानुसार, डॉक्टरांनीही अतिशय तातडीने त्याच्यावर योग्य उपचार सुरु केले. त्यामुळे ओवेशवरील गंभीर संकट टळले. नामदार चंद्रकांतदादांच्या समयसूचकतेमुळे आणि संवेदनशीलतेमुळे ओवेश आराम मिळाला. त्यामुळे तांबोळी कुटुंबियांनी नामदार पाटील यांचे आभार मानले. नामदार चंद्रकांतदादा पाटील यांची संवेदनशीलता पाहून सर्वांनाच अभिमान वाटला.

ओरीजनल भाजपा पक्ष हरविला,त्यांची संस्कृतीही हरविली -सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केली खंत

पुणे- येथे पत्रकारांशी बोलताना सुप्रिया सुळे म्हणाल्या,’घरे फोडा, पक्ष फोडा ,धमक्या द्या गोळ्या घाला, लाथा घाला हि भाजपची आता संस्कृती आहे . काय झालं’त्या’भाजपाला अटलबिहारी,अडवानी. सुषमा स्वराज, अरुण जेटली ,प्रकाश जावडेकर, राजनाथ सिंग असे मोठे नेते जे आदर्श म्हणविले जातात , मी स्वतः संसदेत त्यांचे कौतुक केले आहे.त्यांच्याकडून शिकण्यासारखे बरेच होते , त्याच भाजपला आज झालंय काय ? ओरीजनल भाजपा गेला कुठे ? ज्या भाजपसाठी ज्यांनी कष्ट केले , सतरंज्या उचलल्या , संघर्ष केला , त्यांच्यासाठी पक्षात आरक्षण ठेवण्याची वेळ आलीय. कारण जो बाहेरून येतोय तो चांदीच्या ताटावर गरम जेवतोय ,ज्यांनी संघर्ष केला तो कुठेतरी कोपऱ्यात ढकलला जातोय .

सोमेश्वर फौंडेशनच्यावतीने “सुपर सनी विक”चे आयोजन

जिल्हा स्तरीय तायक्वांदो, बॉक्सिंग, स्केटींग, “पुणे ट्वीन सिटी मॅरेथॉन – रन फार अमृतकाल”, भव्य डे नाईट टेनिस क्रिकेट स्पर्धांचे आयोजन

पुणे-युवा उद्योजक आणि माजी नगरसेवक सनी विनायक निम्हण यांच्या वाढदिवसानिमीत्त (२० फेब्रुवारी) क्रीडाक्षेत्राला व उदयोन्मुख खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी विविध खेळांच्या स्पर्धांचे  सुपर सनी विक (१७ ते २५ फेब्रुवारी) अंतर्गतआयोजन सोमेश्वर फौंडेशनच्या वतीने करण्यात आले आहे. तायक्वांदो, स्केटींग, बॉक्सिंग, पुणे ट्वीन सिटी मॅरेथॉन – रन फार अमृतकाल आणि भव्य डे – नाईट टेनिस बॉल क्रिकेट जिल्हा स्तर अजिंक्यपद स्पर्धांचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती सोमेश्वर फौंडेशनचे उमेश वाघ आणि प्रताप जाधव यांनी दिली.

बॉक्सिंगच्या स्पर्धा १७ ते १९ फेब्रुवारी दरम्यान होणार असून या स्पर्धांमध्ये आजपर्यंत २२७ स्पर्धकांनी नांव नोंदणी केली आहे त्यापैकी ९६ मुलींनी सहभाग नोंदवला असून जिल्हा पातळीवर हा एक विक्रम आहे. या स्पर्धा मुले आणि मुलींसाठी सब ज्युनिअर, ज्युनिअर, युथ आणि सिनीअर या वयोगट / वजनगटात घेण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा बॉक्सिंग असोसिएसनचे सचिव मदन वाणी यांनी दिली. या स्पर्धेत राज्य आणि राष्ट्रीय पदक विजेत्या खेळाडूंनी आपला प्रवेश निश्चित केला असून स्पर्धेसाठी गोखले नगर येथील शहिद तुकाराम ओंबाळे मैदानावर आंतरराष्ट्रीय दर्जाची बॉक्सिंग रींग उभारण्यात येणार आहे. स्पर्धा रोज दुपारी २:०० वाजल्यापासून सुरु होतील. स्पर्धकांची वजने व मेडकील १७ फेब्रुवारी रोजी सकाळी ८:०० ते १०:०० दरम्यान स्पर्धेठिकाणी होतील. स्पर्धेमधील विजेत्या खेळाडूंना मेडल, प्रशस्तिपत्र तसेच सांघिक विजेत्या व उपविजेत्या संघांना रोख पारितोषिके आणि चषक देण्यात येतील. स्पर्धेमधील सर्व सहभागी स्पर्धकांना मेडल आणि प्रशस्तीपत्र देण्यात येणार आहेत. ही स्पर्धा प्रकाश झोतात खेळवण्यात येणार आहे. स्पर्धा पारदर्शक होण्यासाठी आणि उदयोन्मुख खेळाडूंना देण्यासाठी राष्ट्रीय स्तरावर वापरण्यात येणारी कॉम्प्युटर स्कोअरींग सिस्टीम जिल्हा स्तरीय स्पर्धेत प्रथमच वापरण्यात येणार आहे. स्पर्धेच्या प्रवेशिका १६ फेब्रुवारी पर्यंत स्वीकारण्यात येणार आहेत.

जिल्हास्तरीय तायक्वांदो स्पर्धा शनिवार आणि रविवार दि. २४ आणि २५ फेब्रुवारी रोजी हॉटेल सेंट्रल पार्क येथील भव्य हॉल मध्ये होणार असल्याची माहिती पुणे तायक्वांदो ऑर्गनायझेसनचे अध्यक्ष मिलींद पठारे यांनी दिली. मुले आणि मुलिंसाठी सब ज्युनिअर, कॅडेट आणि ज्युनियर या वयोगटात एकूण ३८ वजनीगटात या स्पर्धा होणार असल्याची माहिती स्पर्धा संचालक प्रविण बोरसे यांनी दिली. स्पर्धेमधील विजेत्या खेळाडूंना मेडल, प्रशस्तिपत्र आणि रोख पारितोषिके देण्यात येतील तसेच सर्वसाधारण विजेत्या व उपविजेत्या संघास आकर्षक चषक देण्यात येतील. स्पर्धेमधील सर्व सहभागी स्पर्धकांना मेडल आणि प्रशस्तीपत्र देण्यात येणार आहेत. या स्पर्धेमध्ये आजपर्यंत ५०० हुन अधिक खेळाडूंनी नांव नोंदणी केली आहे. जिल्हा स्तरावरील या स्पर्धा प्रथमच संपूर्णपणे ESS (इलेक्ट्रॉनिक स्कोअरिंग सिस्टीम) द्वारे आणि ऑक्टोगन मॅटवर घेण्यात येणार आहेत.  स्पर्धेच्या प्रवेशिका २२ फेब्रुवारी पर्यंत स्वीकारण्यात येणार आहेत.

स्केटींग स्पर्धा रविवार २५ फेब्रुवारी रोजी रोडरेस प्रकारात होणार असल्याची माहिती स्केटींग असोसिएशन ऑफ पुणेचे सचिव अशोक गुंजाळ यांनी दिली. या स्पर्धा कॅडेट, सब ज्युनिअर, ज्युनिअर आणि सिनीअर या वयोगटात मुले आणि मुलींसाठी होतील. इनलाईन, क्वॉड, रिक्रीएशनल इनलाईन व बिगीनर्स प्रकारात स्पर्धा होतील. स्पर्धेमधील विजेत्या खेळाडूंना मेडल, प्रशस्तिपत्र देण्यात येतील तसेच सर्वसाधारण विजेत्या  व उपविजेत्या संघास आकर्षक चषक देण्यात येतील. या स्पर्धेत आजपर्यंत ३०० हुन अधिक खेळाडूंनी आपला प्रवेश निश्चित केला असून  या स्पर्धेमध्ये आत्तापर्यंत प्रचिती लगड, श्रेया महाजन, संचित गावडे, रीहान बाफना, शर्व वाळके, शिवाय महाजान व श्लोक भेलके या राष्ट्रीय पदकविजेत्या खेळाडूंनी आपल्या प्रवेश निश्चित केला आहे. या स्पर्धेच्या प्रवेशीक २३ फेब्रुवारी पर्यंत स्वीकारण्यात येणार आहेत.

सोमेश्वर फौंडेशनच्या वतीने भव्य डे नाईट टेनिस क्रिकेट स्पर्धा औंध येथील इंदीरा गांधी प्राथमिक शाळा मैदानावर दिनांक २० ते २५ फेब्रुवारीदरम्यान आयोजित करण्यात आल्या आहेत. पहिल्या चार विजेत्या संघांना एकूण रुपये ८५,५५५/- ची रोख पारितोषिके आणि चषक देण्यात येण्यात येणार आहेत. या स्पर्धेच्या प्रवेशीक १८ फेब्रुवारी पर्यंत स्वीकारण्यात येणार आहेत.   

पुणे जिल्हा हौशी अथलेटिक्स असोसिएसनच्या मान्यतेने विवध अंतराच्या “पुणे ट्वीन सिटी मॅरेथॉन – रन फार अमृतकाल” स्पर्धा रविवार दिनांक २५ फेब्रुवारी रोजी होणार आहे. २१, १०, ५ आणि ३ किमी अंतराच्या या स्पर्धा होतील. शिक्षणाचे माहेरघर पुणे आणि औद्यगिक क्रांतीचे पिपरी चिंचवड या दोन ऐतिहासिक शहरामध्ये समन्वय साधण्याच्या उद्देशाने / विचाराने प्रथमच पुणे ट्वीन सिटी मॅरेथॉन रन फार अमृतकाल स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. महाळुंगे-बालेवाडी येथील श्री शिवछत्रपती क्रीडा संकुलामधून या स्पर्धेस सकाळी ५:३० वाजता सुरुवात होणार आहे. आत्तापर्यंत विक्रमी २१ हजारहुन अधिक नागरिकांनी या स्पर्धेमधील आपला सहभाग निश्चित केला आहे. या स्पर्धेतील सहभागी खेळाडूंना टी शर्ट, गुडी बॅग, मेडल, ई टाईमिंग सर्टींफिकेट, वैद्यकीय मदत, हायड्रेशन सपोर्ट मोफत पुरविण्यात येणार आहे. स्पर्धेमधील सर्व वयोगटामधील पुरुष व महिला विजेत्या स्पर्धकांना एकूण रुपये ५,५५,५५५/- रुपयांची बक्षिसे व पारितोषिक देण्यात येणार आहे. स्पर्धेमधील सर्व सहभागी खेळाडूंना मेडल्स, प्रशस्तिपत्र देण्यात येणार आहे.    

स्पर्धेच्या नांव नोंदणीसाठी www.sunnynimhan.comया वेबसाईटवर जाऊन नांव नोंदणी करावी.