Home Blog Page 1208

अतिक्रमण कारवाई करणाऱ्या महापालिकेच्या निरीक्षकाला हडपसरमध्ये पोलीस बंदोबस्तात मारहाण: व्यवसायिकाला अटक

पुणे- हडपसर परिसरात पोलीस बंदोबस्तात अतिक्रमण कारवाई करणाऱ्या महापालिकेच्या एका सहायक अतिक्रमण निरीक्षकाला बेदम मारहाण होण्याची घटना काल घडली .या प्रकरणी संबधित महापालिका कर्मचाऱ्याने केलेल्या तक्रारीवरून येथील व्यावसायिक ख्रिस्तोफर जॉन नाईक, वय २६ वर्षे, रा. गोपाळपट्टी, मांजरी, पुणे याला अटक करण्यात आली आहे.
याप्रकरणी पोलीस अधिकारी वा महापालिका अधिकारी यांच्याशी संपर्क होऊ शकलेला नाही मात्र पोलिसांकडून दिलेली माहिती अशी कि,’दिनांक १४/०२/२०२४ रोजी दु.१५/१५ वा.चे. सुमारास पुणे महानगर पालिकेचे हडपसर क्षेत्रीय कार्यालय, हडपसर, पुणेयातील फिर्यादी हे सहाय्यक अतिक्रमण निरीक्षक या पदावर काम करीत असुन पुणे महानगर पालिकेचे हडपसर क्षेत्रीय कार्यालय येथे सरकारी काम करीत असताना व कर्तव्यावर असताना यातील नमुद ख्रिस्तोफर याने पुणे सोलापुर रोड, सावली फाउंडेशनच्या कॉर्नरला, हडपसर, पुणे येथील अनधिकृतपणे व रस्त्यावर अतिक्रमण केलेल्या गोरीला ग्लासच्या दुकानावर कारवाई केल्याच्या रागातुन व पुढे कारवाई करू नये म्हणुन फिर्यादी यांना हाताने मारहाण करून फिर्यादीचा शर्ट फाडून शिविगाळ करून ऑफिसमधल्या फाईली फेकुन देवून काच फोडून सरकारी कार्यालयाचे नुकसान करून पाहून घेण्याची धमकी देवून सरकारी कामामध्ये अडथळा आणला.सहायक पोलीस निरीक्षक वर्षा डोंगरे (मो. नं.९२८४१३६८८६) अधिक तपास करत आहेत

धनकवडीतील 2 गुंडांनी टोळी करून येरवडा जेलमध्ये केली जेलरला मारहाण

पुणे- येरवडा मध्यवर्ती कारागृहामध्ये बंदिस्त असलेल्या मारहाणीच्या गुन्ह्यातील धनकवडीतील २ गुंडांनी कारागृहात १० जणांची टोळी बनवून तुरुंग अधिकारी शेरखान पठाण यांना लाथा बुक्क्यांनी मारहाण करत जीवे मारण्याचा प्रयत्न केला आहे. या घटनेने खळबळ उडाली असून येरवड्यासारख्या प्रख्यात जेल मध्ये देखील गुंडांची गुंडगिरी वाढत चालल्याने चिंता व्यक्त होते आहे.

विकी बाळासाहेब कांबळे (रा. बनेश्वर महादेव मंदीरजळ, धनकवडी, पुणे) आणि प्रकाश विठ्ठल रेणुसे ( धनकवडी, पुणे)अशी या दोन गुंडांची नावे आहेत .पोलिसांनी याबाबत प्रसार माध्यमांना माहिती दिली आहे. .विकी कांबळे याच्यावर सहकारनगर पोलीस स्टेशन गु.र.नं-२२/२०२४ भा.द.वि कलम ३२६, ३२३, ५०४, ५०६, १४३, १४४, १४७ आर्म अॅक्ट-४ (२५), महाराष्ट्र पोलीस कायदाअन्वये दि. २५.०१.२०२४ पासून व न्यायाधीन बंदी क्र.७२९/२४ प्रकाश रेणुसे याच्यावर भारती विद्यापीठ पोलीस स्टेशन गु.र.नं-६५७/१८, भा. द. वि कलम ३०२, १४३, १४७, आर्म अॅक्ट ४(२५) मध्ये न्यायालयाचे आदेशान्वये दि.१७.०२.२०१८ पासून या कारागृहात ठेवण्यात आले हे. सर्कल क्र.०१ मध्ये त्यांना जेलरने ठेवले .दि.१५.०२.२०२४ रोजी सकाळी अंदाजे ०९.०० वा. दरम्यान सर्कल क्र.०१ येथे श्री. शेरखान पठाण, तुरुंगाधिकारी श्रेणी-०२ हे नियमितपणे कर्तव्यावर होते. त्यावेळी सर्कल क्रमांक ०१ मधील या दोन्ही गुंडांनी शेरखान पठाण यांच्यावर अन्य १० कैद्यांचे सहाय्याने हल्ला केला .लाथा बुक्यांनी मारहाण करून बाजुला असलेली कार्यालयातील खुर्ची शेरखान पठाण यांना मारण्याचा प्रयत्न केला तेव्हा अन्य कैद्यांनी,इतर अधिकारी / कर्मचारी मध्ये पडून पठाण यांना वाचविले.शेरखान पठाण, तुरुंगाधिकारी श्रेणी-०२ यांच्या उजव्या डोळ्याखाली जखम तसेच डाव्या हाताच्या मनगटाला इजा होऊन फॅक्चर झाले आहे. सदर घटनेच्या ठिकाणी इतर अधिकारी व कर्मचारी यांनी परीस्थितीत नियंत्रणात आणून गैरवर्तन करणा-या नमूद बंद्यांना विभक्तरीत्या इतर विभागात बंदिस्त केले आहे.

दोन दिवसांपूर्वी दहा ते बारा कैद्यांमध्ये आणि शेरखान पठाण यांच्यामध्ये बाचाबाची झाल्याची माहिती आहे. येरवडा कारागृहातील इतर अधिकारी या घटनेची माहिती घेत आहेत. आरोपींनी मारहाण केल्याने पठाण गंभीर जखमी झाले आहेत. आरोपींनी पठाण यांना शिवीगाळ केली. त्यावरुन ही मारहाण झाल्याची प्राथमिक माहिती आहे.या घटनेच्या अनुषंगाने गैरवर्तन करणाऱ्या कैद्या विरोधात स्थानिक येरवडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यासोबत कारागृह प्रशासनाकडून पुढील योग्य ती कायदेशीर कारवाई करण्यात येत असल्याची माहिती कारागृहाचे अधीक्षक सुनील ढमाळ यांनी दिली आहे.

सर्वोच्च न्यायालयाची इलेक्टोरल बाँडवर तत्काळ बंदी:राजकीय पक्षांनी 6 मार्चपर्यंत हिशेब द्या…

0

नवी दिल्ली-राजकीय पक्षांनी सर्वोच्च न्यायालयाने गुरुवारी इलेक्टोरल बाँडद्वारे देणग्या घेण्यावर तत्काळ बंदी घातली. बाँडची गुप्तता पाळणे घटनाबाह्य असल्याचे न्यायालयाने म्हटले आहे. ही योजना माहिती अधिकाराचे उल्लंघन करणारी आहे. पक्षांनी आपला हिशेब 6 मार्चपर्यंत द्यावा.5 न्यायाधीशांच्या घटनापीठाने एकमताने हा निकाल दिला. सरन्यायाधीश म्हणाले, ‘राजकीय पक्ष हे राजकीय प्रक्रियेतील महत्त्वाचे घटक आहेत. राजकीय निधीची माहिती ही अशी प्रक्रिया आहे ज्याद्वारे मतदाराला मतदान करण्यासाठी योग्य पर्याय मिळतो. मतदारांना निवडणूक निधीबद्दल जाणून घेण्याचा अधिकार आहे, त्याद्वारे मतदानाची योग्य निवड केली जाते. राजकीय पक्षांना मोठ्या देणग्या गुप्त ठेवणे घटनाबाह्य आहे.

सरन्यायाधीश डीवाय चंद्रचूड यांनी सरकारला इलेक्टोरल बाँड्सची गरज काय असा प्रश्न विचारला होता. त्यांना देणग्या कोण देत आहे हेही सरकारला माहीत आहे. इलेक्टोरल बाँड मिळताच पक्षाला कळते की कोणी किती देणगी दिली आहे.यावर सरकारच्या वतीने सॉलिसिटर जनरल तुषार मेहता म्हणाले होते की, किती पैसे कोणी दिले हे सरकारला जाणून घ्यायचे नाही. देणगीदाराला स्वतःची ओळख लपवायची असते. इतर कोणत्याही पक्षाला ते कळू नये असे त्याला वाटते. जर मी काँग्रेसला देणगी देत ​​असेल तर भाजपला ते कळू नये अशी माझी इच्छा आहे.

मुख्य न्यायमूर्ती डीवाय चंद्रचूड, न्यायमूर्ती संजीव खन्ना, न्यायमूर्ती बीआर गवई, न्यायमूर्ती जेबी परडीवाला आणि न्यायमूर्ती मनोज मिश्रा यांच्या खंडपीठासमोर निवडणूक रोख्यांच्या वैधतेवर सुनावणी सुरू आहे. यासंदर्भात चार याचिका दाखल करण्यात आल्या होत्या. याचिकाकर्त्यांमध्ये असोसिएशन फॉर डेमोक्रॅटिक रिफॉर्म्स (एडीआर), काँग्रेस नेत्या जया ठाकूर आणि सीपीएम यांचा समावेश आहे.केंद्र सरकारच्या वतीने ॲटर्नी जनरल आर. वेंकटरामानी आणि सॉलिसिटर जनरल तुषार मेहता सर्वोच्च न्यायालयात हजर झाले. याचिकाकर्त्यांच्या वतीने ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल उपस्थित होते.

सत्ताधारी विरोधी पक्षांच्या देणग्यांची माहिती का घेतात? विरोधक देणग्यांची माहिती का घेऊ शकत नाहीत?

इलेक्टोरल बाँड स्कीम प्रकरणाची सर्वोच्च न्यायालयात 1 नोव्हेंबर 23 रोजी सुनावणी झाली. केंद्र सरकारच्या वतीने सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी म्हटले होते की, निवडणूक रोख्यांमुळे राजकीय देणग्यांमध्ये पारदर्शकता आली आहे. यापूर्वी देणग्या रोख स्वरूपात दिल्या जात होत्या, मात्र आता देणगीदारांच्या हितासाठी देणग्यांबाबत गोपनीयता पाळण्यात आली आहे.

देणगीदारांना त्यांच्या देणगीबद्दल इतर पक्षाला कळू नये असे वाटत नाही. त्यामुळे त्यांच्याबद्दल इतर पक्षाची नाराजी वाढणार नाही. त्यावर सुप्रीम कोर्टाने म्हटले होते की, असे असेल तर सत्ताधारी विरोधी पक्षांच्या देणग्यांची माहिती का घेतात? विरोधक देणग्यांची माहिती का घेऊ शकत नाहीत?

प्रशांत भूषण यांनी म्हटले होते की, हे बाँड केवळ लाच आहेत, जे सरकारी निर्णयांवर प्रभाव टाकतात. कोणत्या पक्षाकडे पैसा कुठून आला हे जाणून घेण्याचा अधिकार नागरिकांना आहे.

केंद्र सरकारच्या वतीने ॲटर्नी जनरल आर वेंकटरामानी सर्वोच्च न्यायालयात हजर झाले, तर याचिकाकर्त्यांतर्फे ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल, प्रशांत भूषण आणि विजय हंसरिया हजर झाले.

सर्वोच्च न्यायालयात 31 ऑक्टोबर रोजी झालेल्या सुनावणीच्या पहिल्या दिवशी केंद्र सरकारच्या वतीने ॲटर्नी जनरल आर वेंकटरामानी सर्वोच्च न्यायालयात हजर झाले, तर याचिकाकर्त्यांच्या वतीने ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल, प्रशांत भूषण आणि विजय हंसरिया हजर झाले.

या योजनेला 2017 मध्येच आव्हान देण्यात आले होते, परंतु 2019 मध्ये सुनावणी सुरू झाली. 12 एप्रिल 2019 रोजी सर्वोच्च न्यायालयाने सर्व राजकीय पक्षांना निवडणूक बॉण्डशी संबंधित सर्व माहिती 30 मे 2019 पर्यंत एका लिफाफ्यात निवडणूक आयोगाकडे जमा करण्याचे निर्देश दिले. मात्र, न्यायालयाने ही योजना थांबवली नाही.

नंतर डिसेंबर 2019 मध्ये याचिकाकर्ता असोसिएशन फॉर डेमोक्रॅटिक रिफॉर्म्स (ADR) ने योजनेला स्थगिती देण्यासाठी अर्ज केला. यामध्ये मीडिया रिपोर्ट्सचा हवाला देत निवडणूक आयोग आणि रिझर्व्ह बँकेच्या इलेक्टोरल बॉण्ड योजनेच्या चिंतेकडे केंद्र सरकारने कसे दुर्लक्ष केले हे सांगण्यात आले.

यावर सुनावणीदरम्यान तत्कालीन सरन्यायाधीश एसए बोबडे यांनी सांगितले की, या प्रकरणाची सुनावणी जानेवारी 2020 मध्ये होईल. निवडणूक आयोगाने उत्तर दाखल करण्यासाठी सुनावणी पुन्हा पुढे ढकलली. तेव्हापासून या प्रकरणाची सुनावणी झालेली नाही.

इलेक्टोरल बाँड म्हणजे काय?
2017च्या अर्थसंकल्पात तत्कालीन अर्थमंत्री अरुण जेटली यांनी इलेक्टोरल बाँड योजना आणली होती. केंद्र सरकारने 29 जानेवारी 2018 रोजी अधिसूचित केले. ही एक प्रकारची प्रॉमिसरी नोट आहे. ज्याला बँक नोट असेही म्हणतात. कोणताही भारतीय नागरिक किंवा कंपनी ते खरेदी करू शकते.

तुम्हाला ते विकत घ्यायचे असेल तर तुम्हाला ते स्टेट बँक ऑफ इंडियाच्या निवडक शाखेत मिळेल. खरेदीदार हा बाँड त्याच्या आवडीच्या पक्षाला दान करू शकतो. त्यासाठी तो पक्षच पात्र असावा.

तुम्ही ज्या पक्षाला देणगी देत ​​आहात तो पात्र आहे की नाही हे कसे ओळखावे?
रोखे खरेदीदार 1,000 ते 1 कोटी रुपयांपर्यंतचे रोखे खरेदी करू शकतात. खरेदीदाराला त्याचे संपूर्ण केवायसी तपशील बँकेला द्यावे लागतात. ज्या पक्षाला हे बाँड दान करायचे आहे त्या पक्षाला गेल्या लोकसभा किंवा विधानसभा निवडणुकीत किमान 1% मते मिळाली पाहिजेत. देणगीदाराने बाँड देण्याच्या 15 दिवसांच्या आत, ते पक्षाने निवडणूक आयोगाने पडताळणी केलेल्या बँक खात्याद्वारे कॅश केले जावे.

यावरून वाद का…
2017 मध्ये सादर करताना अरुण जेटली यांनी दावा केला होता की यामुळे राजकीय पक्षांच्या निधी आणि निवडणूक व्यवस्थेत पारदर्शकता येईल. काळ्या पैशाला आळा बसेल. दुसरीकडे, याला विरोध करणाऱ्यांचे म्हणणे आहे की, इलेक्टोरल बाँड खरेदी करणाऱ्या व्यक्तीची ओळख उघड केली जात नाही, त्यामुळे ते निवडणुकीत काळ्या पैशाचा वापर करण्याचे साधन बनू शकतात.

बड्या कॉर्पोरेट घराण्यांना डोळ्यासमोर ठेवून ही योजना आणल्याचा आरोप काही लोक करतात. याद्वारे ही कुटुंबे आपली ओळख उघड न करता राजकीय पक्षांना हवी तेवढी देणगी देऊ शकतात.

राष्ट्रवादी आमदार अपात्र प्रकरणी आज विधानसभा अध्यक्ष निकाल देणार; न्यायालयाने दिलेली मुदत संपली

मुंबई

विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदार अपात्रत प्रकरणी निर्णय देण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने 15 फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ दिली होती. ही मुदत आज संपत असून, या प्रकरणावर राहुल नार्वेकर आज निकाल देणार आहेत. त्यामुळं काय निर्णय येणार याबाबत उत्सुकता व्यक्त होते आहे.काही दिवसांपूर्वीच निवडणूक आयोगाने राष्ट्रवादीच्या पक्ष आणि चिन्हाबाबात निर्णय दिला. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि चिन्ह दोन्ही अजित पवार गटाकडे देण्यात आले.

अजित पवारांसोबत किती आमदार?
महाराष्ट्रातील 41आमदार
नागालँडमधील 7 आमदार
झारखंड 1 आमदार
लोकसभा खासदार 2
महाराष्ट्र विधानपरिषद 5
राज्यसभा 1

शरद पवारांसोबत किती आमदार?
महाराष्ट्रातील आमदार 15
केरळमधील आमदार 1
लोकसभा खासदार 4
महाराष्ट्र विधानपरिषद 4
राज्यसभा 3

संत सेवालाल महाराज यांच्या जयंती निमित्त उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून अभिवादन

0


मुंबई दि.15:- थोर समाजसुधारक, क्रांतीकारी, बंजारा समाजाचे आद्य गुरु श्रीसंत सेवालाल महाराज यांच्या जयंतीनिमित्त उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले.

मंत्रालयात आयोजित या कार्यक्रमावेळी सामान्य प्रशासन विभागाचे अवर सचिव रवींद्र पेटकर, वस्त्रोद्योग विभागाचे उपसचिव श्रीकृष्ण पवार, दिनेश चव्हाण, कक्ष अधिकारी तुषार राठोड, शिवाजी चव्हाण, निलेश जाधव यांच्यासह मंत्रालयीन विविध विभागातील अधिकारी-कर्मचाऱ्यांनी गुलाबपुष्प अर्पण करून श्रीसंत सेवालाल महाराजांना अभिवादन केले.


होमी भाभा हॉस्पिटल लवकर कार्यान्वित व्हावे:- आमदार सिद्धार्थ शिरोळे

पुणे – महापालिकेचे होमी भाभा हॉस्पिटल लवकरात लवकर कार्यान्वित व्हावे, अशा सूचना आमदार सिद्धार्थ शिरोळे यांनी बुधवारी प्रशासनाला दिल्या.

महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे यांच्यासमवेत होमी भाभा हॉस्पिटलच्या कामाबाबत सविस्तर आढावा बैठक आमदार शिरोळे यांनी बुधवारी घेतली. हॉस्पिटलच्या इमारतीचे रंगकाम, फर्निचरचे काम आणि इतर अनुषंगिक कामे लगेचच सुरू करावीत, असे बैठकीत ठरविण्यात आले.

वडारवाडी आणि गोखलेनगर परिसरातील रुग्णांवरील उपचारांसाठी होमी भाभा हॉस्पिटल अत्यंत सोयीचे असून ते शक्य तितक्या लवकर कार्यान्वित करण्याचा माझा प्रयत्न आहे, असे आमदार शिरोळे यांनी बैठकीत सांगितले.

या आढावा बैठकीला निलिमाताई खाडे, श्याम आप्पा सातपुते, अपर्णाताई कुऱ्हाडे, अभिजीत बगाडे आदी उपस्थित होते.

आयएमडीआर’चा पदवीप्रदान समारंभ संपन्न

पुणे:डीईएसच्या ‘आयएमडीआर’ संस्थेचा 49 वा ‘पदवी प्रदान समारंभ’ माजी विद्यार्थी व गोदरेज इंडस्ट्रीज लिमिटेडचे (केमिकल्स) मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल शर्मा यांच्या हस्ते करण्यात आला.

डीईएसच्या परिषद व नियामक मंडळाचे अध्यक्ष प्रमोद रावत कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते.

तंत्रज्ञानाचा अंगीकार आणि आजीवन शिक्षण महत्त्वाचे असल्याचे मत विशाल शर्मा यांनी व्यक्त केले.

तुम्हाला जे काम मिळेल त्यातून शिकायचे आहे. कामावर प्रेम करा म्हणजे यश मिळेल. इतरांच्या यशाने आनंदी होणे हा जीवन आनंदी करण्याचा मार्ग आहे असे रावत यांनी सांगितले.

अर्णव आपटे यांना सुवर्ण आणि सिद्धीका जाधव यांना रौप्य पदकाने सन्मानित करण्यात आले.

डीईएसचे उपाध्यक्ष ॲड. अशोक पलांडे, विश्वस्त जगदीश कदम, कार्यवाह प्रा. धनंजय कुलकर्णी, संचालिका डॉ. शिखा जैन, डॉ. विनयकुमार आचार्य, महेश आठवले, एमसीडीसीचे व्यवस्थापकीय संचालक मिलिंद आकरे यांची प्रमुख उपस्थिती होती.

डॉ सन्मथ शेट्टी, डॉ. सोनाली खुर्जेकर आणि प्रा. प्रतिक पोतदार यांनी संपादित केलेल्या
‘मिलेट्स – नेचर्स न्यूट्रिग्रेन्स’ या पुस्तकाचे या वेळी प्रकाशन करण्यात आले.

प्रा. पृथा उबगडे, प्रा. अमिता कुलकर्णी, डॉ. सन्मथ शेट्टी यांनी संयोजन केले.

कोपाचे पुण्यात पहिले ‘ग्रेट इंडियन सायन्स फेस्टिव्हल’ 

●       16 फेब्रुवारी ते 18 फेब्रुवारी 2024 दरम्यान मुलांसाठी मनोरंजन, हँड-ऑन एक्सप्लोरेशन आणि शिकण्याच्या संधी यांचा एकत्रित रोमांचक अनुभव

पुणे, फेब्रुवारी 14, २०२४ – पुण्याच्या कोरेगाव पार्कमधील जीवनशैलीचे प्रमुख ठिकाण कोपाच्या वतीने १६ फेब्रुवारी ते १८ फेब्रुवारी २०२४ या कालावधीत ‘द ग्रेट इंडियन सायन्स फेस्ट’ आयोजित करण्यात आले आहे. मुंबई, बेंगळुरू आणि दिल्ली येथे मिळालेल्या अफाट यशानंतर, पुणेकर पालकांना आता त्यांच्या मुलांना विज्ञान आणि शिक्षणाच्या जगाशी ओळख करून देण्याची आणि मनमोहक शिक्षण कार्यक्रमांच्या मालिकेद्वारे विज्ञान प्रयोगांमध्ये गुंतवून घेण्याची एक उत्तम संधी आहे. हे फेस्टिव्हल सर्वांसाठी पूर्णपणे विनामूल्य आहे.

सायन्स फेस्टमध्ये तज्ञांच्या नेतृत्वाखालील कार्यशाळा, मजेदार तंत्रज्ञान प्रयोग, विज्ञान प्रकल्प, आव्हानात्मक कोडी, संवादात्मक आव्हाने, खेळ आणि पाच खास क्युरेट केलेल्या झोनमधील उत्साही विद्यार्थ्यांसाठी आकर्षक बक्षिसे यांचा समावेश असेल. याव्यतिरिक्त, थीम असलेले फोटो बूथ कुटुंबांना मजेदार प्रॉप्स आणि बॅकड्रॉपसह पूर्ण क्षण कॅप्चर करण्याची संधी मिळेल.

हॅम्लेज प्ले, स्मार्टस्टर्स, ॲडिडास किड्स आणि क्रॉसवर्डही कोपाच्या उपक्रमात सहकार्य करत असून, त्यामुळे इव्हेंटचा अनुभव आणखी चांगला होणार आहे. प्रत्येक भागीदाराच्या अद्वितीय ऑफरचाही यात समावेश असेल.

पुण्यातील उद्घाटन ग्रेट इंडियन सायन्स फेस्टमध्ये मजा, शिकणे आणि समुदाय उभारणीसाठी कोपाची बांधिलकी दिसून येते. मुलांसाठी तयार करण्यात आलेले मनोरंजन, प्रयोग आणि शिक्षण यांच्या मिश्रणाद्वारे, हा महोत्सव कुतूहल जागृत करेल आणि विज्ञान आणि शिक्षणाच्या जगाशी सखोल संबंध जोडण्याची इच्छा निर्माण करेल.

डॉ. सायरस पूनावाला यांना भारतरत्न पुरस्कार द्यावा – शरद पवार

वनराईतर्फे ‘स्व. डॉ. मोहन धारिया राष्ट्रनिर्माण पुरस्कार’ प्रदान

पुणे दिनांक 14 ( प्रतिनिधी): आज जगातील पाच पैकी तीन व्यक्ती सायरस पूनावाला यांच्या सिरम इन्स्टिट्यूटने तयार केलेली लस घेत आहेत. पूनावाला यांच्यामुळेच भारत कोरोना सारख्या संकटातून बाहेर पडू शकला, त्यांचे वैद्यकीय आणि सामाजिक क्षेत्रातील योगदान लक्षात घेता केवळ पद्मभूषण पुरस्कारापुरते त्यांना मर्यादित न ठेवता त्यांच्या कार्याचा योग्य सन्मान करण्यासाठी केंद्र सरकारने त्यांना भारतरत्न पुरस्काराने सन्मानित करावे अशी भावना माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांनी व्यक्त केली.
वैद्यकीय आणि सामाजिक क्षेत्रातील भरीव योगदानासाठी डॉ. सायरस पुनावाला यांना वनराई फाउंडेशन तर्फे शरद पवार यांच्या हस्ते ‘स्व. डॉ. मोहन धारिया राष्ट्रनिर्माण पुरस्कार’ प्रदान करण्यात आला, त्यावेळी ते बोलत होते. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, खासदार श्रीनिवास पाटील, वनराईचे अध्यक्ष रवींद्र धारिया, वनराई फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ. गिरीश गांधी, कृष्णा इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेसचे कुलपती डॉ. वेदप्रकाश मिश्रा, वनराईचे विश्वस्त गणपतराव पाटील, सचिव निलेश खांडेकर, विश्वस्त रोहिदास मोरे, सचिव अमित वाडेकर आदी यावेळी उपस्थित होते. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून सायरस पूनावाला यांना शुभेच्छा दिल्या.

शरद पवार म्हणाले, डॉ. मोहन धारिया यांनी आपल्या राजकारण आणि समाजकारणाने देशाला वेगळी दिशा दाखवून दिली, राष्ट्र प्रथम ही मोहन धारिया यांचे विचारसरणी होती. सिरम इन्स्टिट्यूट हे एक प्रकारे त्यांच्याच विचारांवर वाटचाल करून केवळ देशाचाच नव्हे तर जगातील प्रत्येकाचा विचार करून लस निर्मिती करत आहे. आज जगातील पाच व्यक्तींपैकी तीन व्यक्ती सिराम इन्स्टिट्यूटने तयार केलेली लस घेत आहेत, यावरूनच सिरम इन्स्टिट्यूट चे जागतिक स्तरावरील योगदान आपल्याला लक्षात येऊ शकते, त्यांनी दिलेले हे योगदान लक्षात घेता सायरस पूनावाला यांचे कर्तृत्व केवळ पद्मभूषण पुरस्काराने गौरवित न करता त्यांना देशातील सर्वोच्च भारतरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात यावे.

सायरस पूनावाला म्हणाले, डॉ. मोहन धारिया हे जेव्हा देशाच्या नियोजन समितीचे उपाध्यक्ष होते त्यावेळी आमच्या सिरम इन्स्टिट्यूट च्या वाटचालीमध्ये त्यांनी महत्त्वाचे योगदान दिले होते, त्यानंतरही त्यांनी श्रीराम इन्स्टिट्यूटला वेळोवेळी योग्य मार्गदर्शन केले, सिरम इन्स्टिट्यूट ही जगातील सर्वाधिक लस निर्माण करणारी संस्था व्हावी असे माझे स्वप्न नव्हते, तर आज कोट्यावधी लहान मुलांचे जीव आमच्या संस्थेने तयार केलेल्या लसीमुळे वाचत आहेत ही एक प्रकारे समाधानाची बाब आहे.

पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, सायरस पुनावाला यांचे योगदान हे डॉ. मोहन धारिया यांच्याप्रमाणे राष्ट्र निर्मितीचे आहे, डॉ. मोहन धारिया यांच्या नावाचा पुरस्कार त्यांना देऊन एक प्रकारे या पुरस्काराची उंची वाढली आहे. डॉ. मोहन धारिया यांनी भारतीय राजकारणाला वेगळी उंची निर्माण करून दिली त्याचप्रमाणे डॉक्टर सायरस पुनावाला यांनी वैद्यकीय क्षेत्रामध्ये केलेल्या कामामुळे केवळ देशालाच नव्हे तर जगाला मोठ्या संकटातून दूर केले आहे.

नितीन गडकरी म्हणाले, डॉ. सायरस पूनावाला यांच्यासारख्या दूरदृष्टी असणाऱ्या व्यक्तीमुळे आज देश विज्ञान तंत्रज्ञान आणि वैद्यकीय क्षेत्रामध्ये पुढे जात आहे. तरुणांना कॅन्सर मुक्त करण्याचा ध्यास डॉ. सायरस पूनावाला यांनी घेतला आहे ते निश्चितच या प्रयत्नामध्ये यशस्वी होतील. डॉ. मोहन धारिया यांचा राजकीय पिंड हा ज्याप्रमाणे रचनात्मक होता त्याचप्रमाणे डॉ. सायरस पुनावाला यांचा संशोधन आणि वैद्यकीय पिंड हा रचनात्मक आहे. त्यामुळेच दोन्ही महान व्यक्तींनी केवळ महाराष्ट्राचेच नव्हे तर देशाची निर्मिती करण्यामध्ये मोठे योगदान दिले आहे.

डॉ. वेद प्रकाश मिश्रा म्हणाले, आधुनिक भारताचा विचार करता विज्ञान आणि संशोधन क्षेत्रातील तीर्थक्षेत्र जर देशातील निवडायची झाली तर सायरस पुनावाला यांचे सिराम इन्स्टिट्यूट हे एक मोठे तीर्थक्षेत्र म्हणून आपल्याला सांगता येईल, कोविड काळामध्ये जगातील 47 देशांना सिरम इन्स्टिट्यूटने माफक दरामध्ये लस उपलब्ध करून देऊन  लहान मुलांचेच नव्हे तर नागरिकांचे प्राण वाचवले. आजही देशांमध्ये निर्माण होणाऱ्या 89% लस्सींचे उत्पादन सिरम इन्स्टिट्यूट मध्ये होते ही निश्चितच गौरवास्पद बाब आहे.

डॉ. गिरीश गांधी म्हणाले, कोणताही राजकीय पक्ष सत्तेमध्ये गेल्यानंतर पक्षाची समाजाविषयी असणारी ध्येयधोरणे शिथिल होतात  परंतु मोहन धारिया यांनी कायम सत्ताधाऱ्यांना समाज केंद्रित वागण्यासाठी प्रवृत्त केले. त्यांनी समाजाशी नाळ कधीही तुटू दिली नाही, त्यांच्याच मार्गावर एक प्रकारे सायरस पुनावाला काम करत आहे त्यामुळे हा पुरस्कार निश्चितच अतिशय योग्य व्यक्तीला देण्यात आला आहे.

रवींद्र धारिया म्हणाले, वनराईच्या पहिल्या ग्राम विकासाचे उद्घाटन शरद पवार यांनी १९८४ मध्ये केतकावळे या ठिकाणी मुख्यमंत्री असताना केले होते. डॉ.  मोहन धारिया यांचे उद्दिष्ट जंगल, जमीन आणि जल यांचे संवर्धन करणे हे होते, हा आजही संस्थेचा मुख्य हेतू आहे, लोकांच्या सहभागातून पर्यावरण संरक्षण करणे आणि तेथील स्थानिक अर्थव्यवस्थेला चालना मिळवून देण्यासाठी आजही वनराई संस्था कटिबद्ध आहे.

अखिल भारतीय कलासाधक संगम बंगळुरू येथे संपन्न : देशभरातून सुमारे २ हजार कला साधकांचा सहभाग


पुणे : संस्कार भारतीचा अखिल भारतीय कलासाधक संगम बंगळुरू येथील श्री श्री रविशंकर आश्रम येथे संपन्न झाला. यासाठी देशभरातून सुमारे २ हजार कला साधक उपस्थित होते. भारतीय कलादृष्टी, साहित्य, कला, संस्कृती याविषयीची जाणीव विकसित होण्यासाठी कलासाधक संगम या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

मैसूरचे राजवंश घराण्यातील राजा यदुवीर वाडियार, विजयनगर साम्राज्याचे वंशज कृष्णदेवराय, लोक कलाकार पद्मश्री मंजम्मा जोगती, ज्येष्ठ तबलावादक रवींद्र यावगल, इतिहास तज्ञ विक्रम संपत यांच्या प्रमुख उपस्थितीत कार्यक्रमाचे उद्घाटन झाले.

देशभरातील कलाकारांनी साहित्य, नाट्य, लोककला, चित्रकला प्रस्तुतींमधून समरसता या विषयावर सादरीकरण केले. कलासाधक संगमात भरतमुनी सन्मान कुडाळचे लोककलाकार गणपत मस्के यांना तर दृश्यकलेचा सन्मान मुंबईचे चित्रकार विजय आचरेकर यांना सरसंघचालक मोहन भागवत यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. कार्यक्रमाच्या समारोप प्रसंगी मोहन भागवत. श्री श्री रविशंकर. संस्कार भारतीचे उपाध्यक्ष नितीश भारद्वाज उपस्थित होते.
कलासाधक संगमात प्राचीन कला अंतर्गत विशेष प्रदर्शनीचे आयोजन करण्यात आले होते. समरसता या विषयावरील सौहार्द प्रदर्शनी लक्षवेधक ठरली. भारतातील प्राचीन वास्तू, मंदिरे, लेणी यांच्यातून समरसतेचा संदेश दिला गेला आहे. अशा प्राचीन स्थानांचा शोध घेऊन त्यावरील प्रदर्शनी तयार करण्यात आली होती. पश्चिम महाराष्ट्राच्या प्राचीन कलाविधासह संयोजिका विनिता देशपांडे यांनी प्रदर्शनीसाठी लेखन केले महामंत्री सतीश कुलकर्णी यांनी सजावटीचे काम केले.

वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या पद भरतीसाठी अर्ज सादर करण्यास १८ फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ

0

मुंबई, दि. 14 – सार्वजनिक आरोग्य विभाग अंतर्गत महाराष्ट्र वैद्यकीय व आरोग्य सेवा गट-अ वैद्यकीय अधिकाऱ्यांची पदभरतीसाठी ऑनलाईन अर्ज प्रक्रिया सुरू आहे. भरती प्रक्रियेदरम्यान अर्ज सादर करण्याची मुदत दि. 18 फेब्रुवारी 2024 रोजी रात्री 11.59 पर्यंत वाढविण्यात आलेली आहे. याची इच्छुक उमेदवारांनी नोंद घ्यावी, असे सार्वजनिक आरोग्य विभागातर्फे कळविण्यात आले आहे. याआधी अर्ज सादर करण्याची मुदत १५ फेब्रुवारीपर्यंत होती.

महाराष्ट्र सार्वजनिक आरोग्य विभागाअंतर्गत ‘वैद्यकीय अधिकारी गट-अ’ पदांच्या एकूण १७२९ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत. आरोग्य विभागांतर्गत वैद्यकीय अधिकारी गट-अ ची १७२९ रिक्त पदांची सरळ सेवेने पदभरती प्रक्रिया सुरु आहे. आरोग्य संस्थांमध्ये महाराष्ट्र वैद्यकीय व आरोग्य सेवा गट-अ (एस-२०) या संवर्गातील वैद्यकीय अधिकारी या पदावरील भरतीकरिता पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. सविस्तर जाहिराती बघण्यासाठी https://arogya.maharashtra.gov.in या संकेतस्थळाला भेट द्यावी, मुदतवाढीची सूचना संकेतस्थळावरही आहे, याची नोंद घ्यावी, असे आवाहन आरोग्य विभागाने केले आहे.

टिंबर मार्केट मधून व्यापाऱ्याचे साडेअकरा लाख चोरणाऱ्या युपीच्या चोरट्याला पकडले,तब्बल ३० चोऱ्या त्याच्या नावावर …

खडक पोलीस ठाण्याची कामगिरी

पुणे- दुचाकीच्या डीकीमधुन तब्बल ११,५०,०००/- रोख रक्कम चोरी करणाऱ्या सराईत गुन्हेगाराला पकडण्यात खडक पोलिसांना यश आले असून रामकेवल राजकुमार सरोज,( वय-४६ वर्षे, सध्या रा-ज्ञानदा सोसायटी शिक्रापुर रोड चाकण पुणे, मुळ रा.१७२ पीथीपुर, कधईपुर, सुलतानपुर, लंभुआ, राज्य-उत्तरप्रदेश)उत्तर प्रदेशच्या या चोर्त्यावर तब्बल चोरीचे तब्बल ३० गुन्हे दाखल असल्याची माहिती मिळाली आहे.

या संदर्भात पोलिसांनी सांगितलेकी,’ फिर्यादी महेश शिवाजी नाळे, वय ३४ वर्षे, धंदा व्यवसाय, रा. फ्लैट नं सी ९, फेज -२, निर्मल टाऊनशिप, काळेपडळ, हडपसर, पुणे हे दि.०२/०२/२०२४ रोजी दुपारी ०१.१५ वा ते ०१.४० वा. चे सुमारास मुकेश प्लाय, टिंबर मार्केट भवानी पेठ, पुणे येथे फिर्यादी यांच्यावर पाळत ठेवून, त्यांचे नकळत मुकेश प्लाय, टिंचर मार्केट भवानी पेठ, पुणे इमारतीचे पार्कीगमध्ये पार्क केलेले फिर्यादी यांचे गाडीचे डिकीतील रोख ११,५०,०००/- रु चोरुन नेल्याची तक्रारीवरून अज्ञात चोरटयाविरोधात खडक पोलीस स्टेशन गुन्हा रजि क्रमांक ४३/२०२४ भा.दं.सं. कलम ३७९ प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला होता

टिंबर मार्केट सारख्या व्यापारीक्षेत्रामध्ये भर दिवसा ११,५०,०००/-रु चोरी केल्याचा प्रकार पडल्याने त्याचा तपास करुन आरोपींचा शोध घेण्यासाठी वरिष्ठ पोलीस निरिक्षक रविंद्र गायकवाड.पोलीस निरिक्षक गुन्हे संपतराव राउत,यांचे मार्गदर्शनाखाली तात्काळ तपास पथक अधिकारी सहायक पोलीस निरिक्षक राकेश जाधव व तपास पथकातील अंमलदार यांना तपासाबाबत सुचना दिल्या. त्याप्रमाणे सहायक पोलीस निरिक्षक राकेश जाधव यांनी तपास पथकातील अंमलदार यांची दोन पथके तयार करुन तात्काळ तपास सुरु केला. तपास पथकातील पोलीस अंमलदार किरण ठवरे, संदीप तळेकर, प्रमोद भोसले, अक्षयकुमार धाबळे, सागर कुडले, प्रशांत बड़दे यांची दोन पथके तयार केली. प्रथमदर्शनी अज्ञात आरोपीने चोरी करण्यासाठी मोटारसायकलचा वापर केल्याचे तपासात निष्पन्न झाल्याने एका पथकाने चोरीची घटना घडल्यानंतरचा मार्ग व एका पथकाने चोरीच्या घटनास्थळी येण्याचा मार्ग असे दोन्ही मार्गाचे सी.सी.टि.व्ही.फुटेज पाहण्यास सुरुवात केली. सलग आठ दिवस दोन्ही मार्गाचे सी.सी.टि.व्ही. फुटेज तपासल्यानंतर सीसीटीव्ही फुटेजचे आधारे पाहीजे आरोपीचा माग घेत असताना सदर पाहीजे आरोपी हा बोपखेल फाटा येथे अंगात काळया रंगाचे जैकेट व निळ्या रंगाचे जिन्स पैन्ट परीधान करुन थांबला असल्याबाबत खात्रीशीर माहीती मिळाली. त्याअनुषंगाने बोपखेल फाटा याठिकाणी वरील वर्णनाची व्यक्ती तेथे संशयित रित्या वावरताना मिळुन आली तेव्हा पथकाने त्यास तो पळुन जाणार नाही अशा रितीने सापळा रचुन त्यास ताब्यात घेतले व त्याचे नाव पत्ता विचारता त्याने आपले नाव रामकेवल राजकुमार सरोज, वय-४६ वर्षे, सध्या रा-ज्ञानदा सोसायटी शिक्रापुर रोड चाकण पुणे, मुळ रा.१७२ पीथीपुर, कधईपुर, सुलतानपुर, लंभुआ, राज्य-उत्तरप्रदेश असे सांगितले. त्याचेकडे गुन्हयाबाचत अधिक विचारणा केली असता त्याने गुन्हा केल्याची कबुली दिल्याने त्यास ताब्यात घेवुन दाखल गुन्हयात दिनांक १०/०२/२०२४ रोजी २२.३५ वा अटक करण्यात आले.अटक आरोपीकडे गुन्हयात चोरी केलेल्या ११,५०,०००/- रु रोख रकमेबाचत चौकशी केलीअसता अटक आरोपीने चोरी केलेल्या रोख रक्कम ही बैंक ऑफ बडोदा, अहमदनगर शाखा, अॅक्सीस बैंक, चाकण शाखा या बँकेतील त्याचे स्वतःचे खात्यावर तसेच सेन्ट्रल बैंक ऑफ इंडिया, उत्तरप्रदेश शाखेत त्याचे पत्नीचे खात्यावर जमा केल्याबाबत सांगितले. संबंधित बँकांना पत्रव्यवहार करुन वरील नमुद बँकेची खाती गोठविण्यात आली आहेत.तसेच अटक आरोपीने चोरी करताना वापरलेल्या वाहनाबाचत तपास केला असता चोरी करताना वापरलेले होंडा शाइन एम.एच.१२ एस.एन.५८३० ही मोटारसायकल राजगड पोलीस स्टेशन गु.र.नं.२६/२०२४ भा.द.वि. कलम ३७९ प्रमाणे मधील चोरीस गेलेले वाहन असल्याचे तपासात निष्पन्न झालेले असुन हीमोटारसायकल ताब्यात घेतली आहे.

या चोरीच्या तपासाकरीता नेमलेल्या पथकातील अंमलदार किरण ठवरे, संदीप तळेकर, प्रमोद भोसले, अक्षयकुमार वाबळे, सागर कुडले, प्रशांत बडदे यांनी सहायक पोलीस निरिक्षक राकेश जाधव यांचे सुचनेनुसार सलग आठ दिवस घटनास्थळापासुन ते दिघी, विश्रांतवाडी परिसरातील सरकारी/खाजगी असे जवळजवळ ५०० पेक्षा अधिक सी.सी.टि.व्ही. जिदद्दीने व चिकाटीने तपासुन चोरटयाचा माग काढून आरोपीला ताब्यात घेवुन गुन्हा उघडकीस आणला आहे. अटक आरोपी याने यापूर्वी पुणे शहर, पिंपरी चिंचवड, मुंबई आयुक्तालयात असे एकुण चोरीचे ३० गुन्हे दाखल असुन तो सराईत गुन्हेगार आहे. राकेश जाधव, सहायक पोलीस निरिक्षक, (तपास पथक अधिकारी) हे पुढिल तपास करीत आहेत.

पोलीस आयुक्त अमितेश कुमार, सह पोलीस आयुक्त प्रविण पवार,अपर पोलीस आयुक्त प्रविण पाटील पोलीस उप आयुक्त परिमंडळ १ संदिपसिंह गिल, व सहा पोलीस आयुक्त फरासखाना विभाग रक्मीणी गलांडे यांचे मार्गदर्शनाखाली खडक पोलीस स्टेशन चे रविंद्र गायकवाड, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, संपतराव राउत, पोलीस निरीक्षक (गुन्हे), तपास पथक अधिकारी राकेश जाधव सहायक पोलीस निरीक्षक, पोलीस अंमलदार संदिप तळेकर, किरण ठवरे, हर्षल दुडम, प्रमोद भोसले, अक्षयकुमार चाबळे, सागर कुडले, लखन ढावरे, प्रशांत बडदे, रफिक नदाफ, आशिष चव्हाण यांचे पथकाने केली आहे.

धुळ्याचा सिव्हील इंजिनिअर दक्षिण पुण्यात गांजा विकताना पकडला :२७ किलो ३२५ ग्रॅम गांजा जप्त

पुणे-
शिरपुर जिल्हा धुळे येथील सिव्हील इंजिनिअरला त्याच्या साथीदारासह पुण्यात गांजा विक्री करताना पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखा, अंमली पदार्थ विरोधी पथक १,च्या टीमने पकडले आहे. या संदर्भात पोलिसांनी दिलेली माहिती अशी कि,’
दि.१३/०२/२०२४ रोजी अंमली पदार्थ विरोधी पथक १ कडील वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र लांडगे हे त्यांचे स्टाफ सोबत पुणे भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये पेट्रोलिंग करीत असताना पोलीस अंमलदार विशाल शिंदे यांना त्यांचे बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, काही इसम हे भारती विद्यापीठ कात्रज येथे गांजा विक्री करण्या करता येणार असल्याची माहिती मिळाली.त्यानुसार वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र लांडगे यांनी तात्काळ त्यांचे स्टाफसह सदर ठिकाणी सापळा रचुन दोघांना ताब्यात घेतले १) हरीओम संजय सिंग वय २१ वर्षे, रा. बी.एस.एन.एल टॉवर मागे, मोहाडी बँक ऑफ बडोदा जवळ, धुळे. २) करण युवराज बागुल वय २३ वर्षे, शिक्षण सिव्हिल इंजिनिअर रा, पदमावती कॉलनी मांडाळ शिवार प्लॉट नं.०२, ता. शिरपुर जि. धुळे अशी त्यांची नावे आहेत यांना ताब्यात घेतले असता त्यांचे ताब्यातुन एकुण ४,८३,८००/- रु किं.चा ऐवज त्यामध्ये ४,६१,८००/- रु किं.चा २३ किलो ९० ग्रॅम गांजा हा अंमली पदार्थ व २२,०००/- रु किं. चे दोन मोबाईल फोन मिळुन आल्याने त्यांना ताब्यात घेवुन त्यांचेकडे अधिक तपास करता यातील हरीओम संजय सिंग हा इलेक्ट्रीक ची कामे करीत असुन त्याचेवर शिरपुर पो.स्टे. गु.र.नं.३५१/२०२२ आर्म अॅक्ट ३ (२५) व करण युवराज बागुल हा सिव्हिल इंजिनिअर असुन त्याचेवर शिरपुर पो.स्टे. गु.र.नं.१०९/२०२३ भा.द.वि.कलम ३८०,४५७ प्रमाणे गुन्हा दाखल असल्याची माहिती मिळाली आहे. तसेच त्यांनी सोबतचा गांजा हा आंबेगाव बू। पुणे. येथे राहणारा साथीदार वसंत सुभाष क्षिरसागर यास पुणे परिसरात विक्री करीता देण्या करीता आणला असल्याचे सांगितले असता वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र लांडगे यांनी तात्काळ वसंत सुभाष क्षिरसागर रा. आंबेगाव बूा पुणे. याचा शोध घेतला असता वसंत सुभाष क्षिरसागर वय ३० वर्षे शिक्षण बी.बी.ए.रा, फ्लॅट नं.०२, श्री निवास अपार्टमेंट, स.नं.३४/३/१ तोरणा रेसीडेन्सी जवळ, कॉसमॉस बँकेजवळ, लेन नं.४ आंबेगाव बूा पुणे. हा त्याचे रहाते घरी मिळून आल्याने त्याचे घराची झडती घेतली असता त्याचे जवळ किं. रु ८४,७००/- चा ०४ किलो २३५ ग्रॅम गांजा हा अंमली पदार्थ, किं.रु. ६२,०००/- चे दोन मोबाईल फोन, किं.रु २०००/- चा एक इलेक्टॉनिक वजन काटा, कि.रु.००/- चे रिकाम्या प्लॅस्टिकच्या पिशव्यांचा बंच असा ऐवज मिळुन आल्याने त्यास अटक करण्यात आली आहे.

अशा प्रकारे तिघांकडे किं.रु. ८४,०००/- चे चार मोबाईल फोन, किं.रु २,०००/- चा एक इलेक्टॉनिक वजन काटा,रिकाम्या प्लॅस्टिकच्या पिशव्यांचा बंच, २७ किलो ३२५ ग्रॅम, गांजा हा अंमली पदार्थ किं. रु.६,३२,५००/- चा असा ऐवज संगणमताने अनाधिकाराने, बेकायदेशिर रित्या विक्रीकरीता जवळ बाळगताना मिळुन आले असल्याने वर नमूद आरोपी यांचे विरूध्द भारती विद्यापीठ पोलीस स्टेशन गु.र.नं. १४१/२०२४ एन.डी.पी.एस. अॅक्ट कलम ८ (क) २० (ब) (ii) (क) २९ प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला आहे. पुढील तपास सहा पोलीस निरीक्षक झेंडे भारती विद्यापीठ पोलीस स्टेशन हे करीत आहे.
वरील नमुद कारवाई ही पोलीस आयुक्त अमितेश कुमार,पोलीस सह आयुक्त प्रविण पवार, अपर पोलीस आयुक्त, शैलेश बलकवडे, पोलीस उप आयुक्त, गुन्हे, अमोल झेंडे, सहा पो आयुक्त, गुन्हे १ सुनिल तांबे यांचे मार्गदर्शनाखाली अंमली पदार्थ विरोधी पथक,१ गुन्हे शाखा पुणे शहर कडील वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र लांडगे, पोलीस अंमलदार विशाल शिंदे, पांडुरंग पवार, मारुती पारधी, सचिन माळवे, प्रविण उत्तेकर, ज्ञानेश्वर घोरपडे, संदेश काकडे, रेहना शेख, यांनी केली

“इंडिया” आघाडीचा महामेळावा होणार पुण्यात

शिरूर, बारामती व पुणे शहर लोकसभेसाठी इंडिया आघाडीचा एल्गार

पुणे-राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरदचंद्र पवार) पक्षाचे नेते शरद पवार यांच्या मोदी बाग या कार्यालयात झालेल्या बैठकीत नवीन नाव व नवीन चिन्हसह आगामी लोकसभा निवडणुका लढवण्यासाठी सज्ज राहण्याच्या सूचना सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांना देण्यात आल्या. आगामी लोकसभा निवडणुका इंडिया आघाडी एकत्रितपणे लढणार पासून या अनुषंगाने शरद पवार यांच्या नेतृत्वात 24 फेब्रुवारी 2024 रोजी इंडिया आघाडीचा मेळावा पुणे शहरात संपन्न होणार आहे. इंडिया आघाडीतील सर्व घटक पक्ष या मेळाव्यात सामील होणार असून या तीनही लोकसभा मतदारसंघात ऐतिहासिक मताधिक्याने विजय मिळवण्याचा निर्धार या बैठकीत करण्यात आला.
शरद पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या बैठकीत खा. सुप्रिया सुळे, खा. श्रीनिवास पाटील, माजी मंत्री अनिल देशमुख, राजेश टोपे, शशिकांत शिंदे, बाळासाहेब पाटील, खा. वंदना चव्हाण, खा. डॉ. अमोल कोल्हे, शहराध्यक्ष प्रशांत जगताप आमदार रोहित पवार, आमदार संदीप क्षीरसागर उपस्थित होते.

राज्यात सहा ठिकाणी नर्सिंग महाविद्यालय

0

मुंबई-राज्यात जळगांव, लातूर, बारामती, सांगली (मिरज), नंदुरबार व गोंदिया येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांशी संलग्न प्रत्येकी 100 विद्यार्थी प्रवेश क्षमतेचे शासकीय परिचर्या महाविद्यालय (नर्सिंग महाविद्यालय) सुरु करण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते.

राज्यात व देशामध्ये होणारा संसर्गजन्य आजाराचा फैलाव विचारात घेऊन परावैद्यकीय अभ्यासक्रमामध्ये आमूलाग्र बदल करण्याचे शासनाने ठरविले असून त्यादृष्टीने अशी नर्सिंग महाविद्यालये सुरु करण्यात येत आहेत. या 6 शासकीय परिचर्या महाविद्यालयांकरिता पहिल्या चार वर्षांसाठी सुमारे 173 कोटी 88 लाख इतका खर्च करण्यात येईल. तसेच पाचव्या वर्षापासून प्रतिवर्ष सुमारे 13 कोटी 99 लाख इतका निधी देण्यात येईल.

नंदुरबार व गोंदिया येथील परिचर्या महाविद्यालयांसाठी “Scheme for augmenting Nursing Education- Establishment of new Colleges of Nursing (CON) in co-location with Medical Colleges” या केंद्राच्या योजनेत प्रति परिचर्या महाविद्यालय रुपये १० कोटी इतका निधी देण्यात येईल. त्यापैकी केंद्र शासन ६० टक्के प्रमाणे रुपये ६ कोटी व राज्य शासन ४० टक्के प्रमाणे ४ कोटी निधी देणार आहे. बांधकाम, फर्निचर, यंत्रसामुग्री, मनुष्यबळ व दैनंदिन आवर्ती खर्च इ.साठी प्रति परिचर्या महाविद्यालय 32 कोटी 97 लाख आवश्यक असून या खर्चासही मान्यता दिली आहे.

जळगांव, लातूर, बारामती व सांगली (मिरज) या परिचर्या महाविद्यालयांसाठी बांधकाम, फर्निचर, यंत्रसामुग्री, मनुष्यबळ व दैनंदिन आवर्ती खर्च इ.साठी अंदाजे 107 कोटी 94  लाख  इतका खर्च अपेक्षित आहे. उच्चस्तरीय सचिव समितीच्या मान्यतेने आवश्यक पदे भरण्यात येतील.