Home Blog Page 1207

बीएमसीसीत ग्रंथ प्रदर्शन

पुणे-डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या बृहन्महाराष्ट्र कॉलेज ऑफ कॉमर्सच्या (स्वायत्त) (बीएमसीसी) वतीने आयोजित करण्यात आलेल्या ग्रंथ प्रदर्शनाचे उद्घाटन लेखिका डॉ. गौरी ब्रम्हे यांच्या हस्ते करण्यात आले.

‘लोकांना समजेल-उमजेल असे लिखाण’ या विषयावर ब्रम्हे यांचे व्याख्यान झाले. प्राचार्य डॉ. आर. पी. कुचेकर ग्रंथालय प्रमुख डॉ. आसमा बागवान यांची प्रमुख उपस्थिती होती.

ब्रम्हे म्हणाल्या, लेखनामध्ये सहजता, सातत्य आणि सर्जनशीलता या तीन गोष्टी अत्यंत महत्वाच्या आहेत. मराठी भाषेमधून लिहिते व्हा. मराठी भाषेचे ज्ञान भारतात परदेशातून नोकरीनिमित्त येणाऱ्या नागरिकांसाठी आवश्यक आहे. या परकीय नागरिकांना मराठी भाषेचे ज्ञान देणे ही एक करियर संधी ठरू शकते.

वाचन संस्कृतीला प्रोत्साहन देण्यासाठी आयोजित करण्यात आलेले हे प्रदर्शन १७ फेब्रुवारीपर्यंत संध्याकाळी ५ वाजेपर्यंत प्रदर्शन सुरू राहणार आहे.

राज्यातील ४० गोशाळांसाठी’स्मार्ट गोशाळा’ प्रकल्प

१७ फेब्रुवारी रोजी
राज्य शासनाचा केंद्राबरोबर करार

पुणे, १५ फेब्रुवारी –
देशी गोवंशाच्या जतनाचे महत्त्व लक्षात घेऊन महाराष्ट्र गोसेवा आयोगाकडून अनेक चांगल्या योजना हाती घेतल्या जात आहेत. राज्यातील ४० गोशाळा स्मार्ट गोशाळा म्हणून विकसित केल्या जाणार असून केंद्र सरकारच्या सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्रालयाच्या सहाय्यातून हा स्मार्ट गोशाळा प्रकल्प साकारणार आहे. त्यासंबंधीचा सामंजस्य करार १७ फेब्रुवारी रोजी केला जाणार असल्याची माहिती आयोगाचे अध्यक्ष शेखर मुंदडा यांनी गुरुवारी दिली.

डेक्कन एज्युकेशन सोसायटीचे टेक्निकल इन्स्टिट्यूट पुणे आणि मोरोपंत पिंगळे गोधन फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या इन्स्टिटयुट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्चमधील सावरकर सभागृहात ‘गाईच्या शेणापासून रंगनिर्मिती’ या विषयावर एक दिवसाच्या तांत्रिक चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते. या चर्चासत्राचे उद्घाटन मुंदडा यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. रा. स्व. संघाच्या पश्चिम महाराष्ट्र प्रांताचे संघचालक प्रा. सुरेश उर्फ नाना जाधव यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती. संस्थेच्या नियामक मंडळाचे अध्यक्ष प्रमोद रावत, सदस्य जगदीश कदम, डॉ. रवींद्र आचार्य, खेमराज रणपिसे, कार्यवाह धनंजय कुलकर्णी, गोसेवा फाऊंडेशनचे अध्यक्ष मयुरेश जोगदेव यांची व्यासपीठावर उपस्थिती होती.

महाराष्ट्रातील गोवंशाची संख्या एक कोटी ३९ लाख एवढी असून त्यातील देशी गोवंशाची संख्या १३ लाख आहे. या देशी गोवंशाचा सांभाळ करतानाच एकही गाय कत्तलखान्यात जाणार नाही, हे लक्ष्य ठेऊन गोसेवा आयोगाचे काम सुरू आहे. राज्यात १,०६८ गोशाळा आहेत आणि त्यातील ४० गोशाळा अशा आहेत की ज्यामध्ये एक हजारपेक्षा अधिक गायींचा सांभाळ केला जात आहे. या गोशाळा स्मार्ट गोशाळा म्हणून विकसित केल्या जाणार असून तेथील गायीच्या शेणापासून सीएनजीची निर्मिती करण्याची योजना हाती घेतली जाणार आहे, अशी माहिती मुंदडा यांनी दिली.

केंद्र सरकार बरोबर या संबंधीचा करार १७ फेब्रुवारी केला जाईल. सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्रालयाकडून त्यासाठी अर्थसहाय्य उपलब्ध होणार असल्याचे सांगून मुंदडा म्हणाले, गायीचे शेण आणि गोमूत्राचा वापर, त्यापासून उत्पादने तयार करणे या क्षेत्रात क्रांती होणे आवश्यक असून तसे झाले तर देशी गायी वाचवण्यात यश येईल.

पाश्चात्यांच्या अंधानुकरणामुळे आपण प्रकृतीचे दोहन करण्याचा विचार विसरलो आणि शोषण सुरू झाले. हिंदू संस्कृतीच्या दोहन विचारांमध्ये गोविज्ञान होते. मात्र तो विचार मागास ठरवला गेला. त्यामुळे गोविज्ञानाच्या विचाराचे समाजात जागरण करण्याची आवश्यकता होती. हे काम आता सर्वत्र सुरू झाले आहे. गोसेवा करणारे, गोपालन करणारे, गायीचे शेण आणि गोमूत्रापासून उत्पादने तयार करणारे आणि त्यांचा वापर करणारे अशा सर्व घटकांना एकत्र आणून सहचिंतन करावे, असे प्रा. जाधव म्हणाले.

आपल्या पूर्वजांनी आपल्याला विवेकाचा विचार शिकवला आहे. निसर्गाशी दोस्ती करून आपण जगू शकतो. त्यामुळेच दूध न देणाऱ्या गायीला जगवणारेही हजारो शेतकरी आहेत आणि गायींचा असा सांभाळ फक्त आपल्याच देशात होतो, असे रावत म्हणाले.

हिंदू संस्कृतीमध्ये संपूर्ण जीवन हे गायीच्या आधारे उभे आहे. गायीच्या शेणापासून तसेच गोमूत्रापासून विविध उत्पादने तयार होणे, तसेच औद्योगिक उत्पादने तयार होणे आवश्यक आहे. त्यासाठी संशोधन करणाऱ्यांना एकत्र आणणे, त्यांना सुविधा पुरवणे अशाप्रकारचे काम गोधन फाऊंडेशन करत असल्याचे क्षीरसागर यांनी सांगितले.

‘पुणेकर उपाशी, महामेट्रो तुपाशी ‘!स्वारगेटची जागा महामेट्रोला कायमस्वरूपी देणे बेकायदेशीर: आबा बागुल

पुणे : पुणे महानगरपालिकेने महा मेट्रोला सार्वजनिक हितासाठी दिलेल्या जागेवर उभारण्यात येणाऱ्या मेट्रोच्या व्यापारी संकुलातून 50 टक्के हिस्सा हा पुणे महानगरपालिकेला मिळणे बंधनकारक असतानाही करदात्या पुणेकरांचे हित बाजूला सारून स्वारगेट ट्रान्सपोर्ट हबची जागा महामेट्रोच्या घश्यात कायमस्वरूपी घालून पुणेकर उपाशी आणि महामेट्रो तुपाशी या पालिका आयुक्तांच्या भूमिकेला माजी उपमहापौर आबा बागुल यांनी कडाडून विरोध दर्शवला असून यासाठी न्यायालयात दाद मागणार असल्याचा इशाराही दिला आहे.

यासंदर्भात माजी उपमहापौर आबा बागुल यांनी पुणे महानगरपालिकेचे प्रशासक तथा आयुक्त विक्रम कुमार यांना पत्र दिले आहे. त्यात म्हटले आहे की, महा मेट्रो प्रकल्पासाठी पुणे शहरात विविध ठिकाणच्या जमिनी महा मेट्रोला महानगरपालिकेने उपलब्ध करून दिल्या आहेत. पुणे महानगरपालिकेने महा मेट्रोला सार्वजनिक हितासाठी दिलेल्या जागेवर उभारण्यात येणाऱ्या मेट्रोच्या व्यापारी संकुलातून 50 टक्के हिस्सा हा पुणे महानगरपालिकेला मिळणे बंधनकारक आहे. तसा ठराव स्थायी समितीमध्ये मान्य झालेला आहे आणि मुख्यसभेनेही मंजूर केलेला आहे. आयुक्तांच्या अनुकूल अभिप्रायासह हा ठराव मंजूर झालेला आहे. त्यामुळे पुणे महानगरपालिकेने महा मेट्रोला सामाजिक हितासाठी दिलेल्या जागेवर उभारण्यात येणाऱ्या महा मेट्रोच्या व्यावसायिक संकुलातून 50 टक्के हिस्सा पुणे महापालिकेला महामेट्रोने देणे अनिवार्य आहे.मुख्यसभा अस्तित्वात नसताना लोकप्रतिनिधींची बॉडी अस्तित्वात नसताना प्रशासनाने परस्पसर या सार्वजनिक जागेचा व्यापारी उपयोगासाठी मान्यता देने गैर आहे. तसेच महापालिकेच्या जागा वाटप नियमावलीनुसार जागा भाडेपट्टे कराराने देताना सार्वजनिक हित सोडून व्यापारी हित जोपासण्याचा प्रयत्न केला असल्यास त्याच्या 50 टक्के व्यापारी उत्पन्न महानगरपालिकेला मिळणे बंधनकारक आहे व तो पैसा पुणेकरांच्या सार्वजनिक वाहतुकीसाठी वापरणे गरजेचे आहे. अन्यथा ज्या मूळ मालकाकडून सार्वजनिक हितासाठी जागा महानगरपालिकेला जागा उपलब्ध झाल्या आहेत त्याचा हेतू परस्पर बदलल्यास (कमर्शियल) झाला तर त्या जागा मूळ मालकाला परत द्याव्या लागतील याकडे देखील आयुक्तांचे लक्ष वेधले.

मनपा नियमावली नुसार महामेट्रोशी भाडे निश्चित करण्यात आले. त्यासाठी स्थापन केलेल्या समितीने १७ जानेवारी २०२३ रोजी रेडीरेकनर दराच्या १२ टक्के वार्षिक भाडे निश्चित केले. ही जागा १० वर्षे भाड्याने दिली जाणार असल्याने रेडीरेकनरचा दर वाढल्यानंतर भाड्यातही वाढ होणार होती. त्यामुळे महापालिकेला दरवर्षी पाच कोटींपेक्षा जास्त उत्पन्न मिळणे शक्य होते. मात्र असे असतानाही स्वारगेट येथील पालिकेचा अंदाजे १३ हजार ९४१ चौरस फुटांचा ( १५०००० चौ फूट) भूखंड ३८ कोटी ५४ लाख ५७ हजार रुपयांच्या बदल्यात महामेट्रोला देणे गैर ठरणार आहे. वास्तविक या जागेचा महामेट्रो व्यावसायिक वापर करणार असल्यास त्यातील ५० टक्के हिस्सा पुणे महापालिकेला देणे बंधनकारक आहे शिवाय मुख्यसभेचा यासंदर्भात झालेला ठराव हा निरस्त करता येत नाही. यासर्व बाबींचा विचार करून आयुक्तांनी महामेट्रोशी कोणताही नवीन करार करू नये तसे केल्यास ते बेकायदेशीर ठरेल व त्याची सर्व जबाबदारी ही आयुक्तांची राहील. तसे केल्यास वेळप्रसंगी न्यायालयात दाद मागितली जाईल असा इशाराही आबा बागुल यांनी दिला आहे.

अखिल भारतीय नागरी सेवा व्हॉलीबॉल स्पर्धेचे शिवछत्रपती क्रीडा संकुल बालेवाडी येथे आयोजन

पुणे, दि. १५: केंद्र शासन, महाराष्ट्र शासन व जिमखाना सचिवालय यांच्या संयुक्त विद्यमाने अखिल भारतीय नागरी सेवा व्हॉलीबॉल स्पर्धांचे २०२३-२४ चे १८ ते २२ फेब्रुवारी दरम्यान शिवछत्रपती क्रीडा संकुल बालेवाडी येथे आयोजन करण्यात आले आहे.

जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे यांच्या हस्ते १८ फेब्रुवारी रोजी स्पर्धेचे उद्घाटन होणार आहे. केंद्रीय नागरी सेवा सांस्कृतिक आणि क्रीडा मंडळाचे सचिव सुजीतकुमार मिश्रा यांच्यासह सचिवालय जिमखान्याचे पदाधिकारी यावेळी उपस्थित राहणार आहेत. स्पर्धेचा समारोप २२ फेब्रुवारी राजी सायं. ४ वा. मुख्य कार्यकारी अधिकारी रमेश चव्हाण यांच्या उपस्थितीत होणार असल्याची माहिती सचिवालय जिमखान्याचे मानद सह सचिव तथा स्पर्धा सचिव सुनिल आगरकर यांनी दिली आहे.

या स्पर्धेसाठी देशभरातील विविध राज्यातून ४५ संघ उपस्थित राहणार असून स्पर्धेकरिता पंच व अन्य तांत्रिक सहकार्य महाराष्ट्र राज्य व्हॉलीबॉल संघटनेकडून लाभणार आहे, असेही श्री. आगरकर म्हणाले.
0000

काँग्रेसचे दोन दिवसीय राज्यस्तरीय प्रशिक्षण शिबिर उद्यापासून लोणावळ्यात.

0

काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जून खरगेंच्या हस्ते उद्घाटन.

शिबिरात तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंथ रेड्डी, कर्नाटकचे उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांच्यासह महत्वाच्या नेत्यांचे मार्गदर्शन.

मुंबई, दि. १५ फेब्रुवारी
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे दोन दिवसीय राज्यस्तरीय प्रशिक्षण शिबिर उद्यापासून (१६ व १७ फेब्रुवारी ) लोणावळा येथे आयोजित करण्यात आले आहे. काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्या हस्ते या शिबिराचे उद्घाटन होणार असून प्रभारी रमेश चेन्नीथला, प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, विधिमंडळ काँग्रेस पक्षाचे नेते बाळासाहेब थोरात, तेलंगाणाचे मुख्यमंत्री रेवंथ रेड्डी, कर्नाटकचे उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार, अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस मुकुल वासनिक यांच्यासह प्रमुख नेते मार्गदर्शन करणार आहेत.

शुक्रवार दिनांक १६ फेब्रुवारी रोजी सकाळी ९.३० वाजता ध्वजारोहण होईल व त्यानंतर १० वाजता जिल्हाध्यक्ष व जिल्हा प्रभारी यांची बैठक होईल. दुपारी २ वाजता कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात येईल, मान्यवरांचे स्वागत व त्यानंतर प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचे स्वागतपर भाषण होईल त्यानंतर प्रभारी रमेश चेन्नीथला यांचे मार्गदर्शन होईल व दुपारी ३ वाजता काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जून खरगे यांच्या हस्ते उद्घाटन व मार्गदर्शनपर भाषण होईल. शिबीराच्या पहिल्या सत्राचे अध्यक्ष आदिवासी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शिवाजीराव मोघे असतील. पहिल्या सत्रात कर्नाटकचे उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार, अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस मुकुल वासनिक, विधिमंडळ पक्षनेते बाळासाहेब थोरात व माजी मुख्यमंत्री सुशिलकुमार शिंदे हे नेते मार्गदर्शन करतील.
दुसऱ्या सत्राचे अध्यक्ष माजी मंत्री व प्रदेश कार्याध्यक्ष नसीम खान असतील या सत्रात सामाजिक कार्यकर्ते विश्वंभर चौधरी व वरिष्ठ पत्रकार निरंजन टकले व राजू परुळेकर मार्गदर्शन करतील. संध्याकाळी ७.३० वाजता विधानसभा व विधान परिषद सदस्यांची बैठक होईल व त्यांनतर सांस्कृतिक कार्यक्रम होईल.
शनिवार दिनांक १७ फेब्रुवारी सकाळच्या सत्राचे अध्यक्ष CWC सदस्य चंद्रकांत हंडोरे असतील. पहिल्या सत्रात वरिष्ठ वकील असिम सरोदे, अशोककुमार पांडे त्यानंतर मुंबई काँग्रेसच्या अध्यक्ष वर्षाताई गायकवाड, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंथ रेड्डी, AICC चे संघटन महासचिव के. सी. वेणुगोपाल हे मान्यवर मार्गदर्शन करतील. दुसऱ्या सत्राचे अध्यक्ष प्रदेश कार्याध्यक्ष आमदार प्रणिती शिंदे असतील तर विधान परिषदेचे गटनेते सतेज बंटी पाटील व विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवर हे मार्गदर्शन करणार आहेत.
शिबिराच्या समारोप कार्यक्रमात प्रदेश काँग्रेसचे कार्याध्यक्ष शिबिराचा आढावा घेतील, त्यानंतर प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचे अध्यक्षीय भाषण होईल तर समारोपाचे भाषण हे प्रभारी रमेश चेन्नीथला करणार आहेत तसेच कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन पुणे ग्रामीण जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष संजय जगताप करणार आहेत.

सरकारी कार्यालयांच्या वीजबिलांची थकबाकी २३ कोटींवर

पश्चिम महाराष्ट्रातील स्थिती; थकबाकी भरा, महावितरणकडून लेखी विनंती 

पुणे, दि१५ फेब्रुवारी २०२४: वीजबिलांच्या वाढत्या थकबाकीमुळे महावितरणची आर्थिक स्थिती खडतर होत असताना काही विभागाच्या सरकारी कार्यालयांकडे वीजबिलाची थकबाकी वाढली आहे. यामध्ये पश्चिम महाराष्ट्रातील प्रामुख्याने पोलीस विभाग व जिल्हा परिषदेच्या ७३६५ विविध कार्यालयांच्या वीजबिलांची थकबाकी तब्बल २१ कोटी ४० लाख रुपयांवर गेली आहे. यासोबतच पुणे व पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या १३९२ कार्यालयांच्या वीजबिलांची थकबाकी १ कोटी ७३ लाख ५० हजार रुपये झाली आहे.

दरम्यान महावितरणचे पुणे प्रादेशिक संचालक श्री. अंकुश नाळे यांनी पुणे व पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे आयुक्त, पश्चिम महाराष्ट्रातील जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, पोलीस विभागाचे पोलीस आयुक्त व पोलीस अधीक्षक यांना वीजबिलांच्या थकबाकीची रक्कम तातडीने भरण्याबाबत कार्यवाही करावी अशी विनंती करणारे पत्र पाठवले आहे. या पत्रासोबतच संबंधित थकबाकीदार कार्यालयांची यादी देखील जोडण्यात आली आहे.

पश्चिम महाराष्ट्रात गेल्या काही महिन्यांपासून घरगुती, वाणिज्यिक व औद्योगिक ग्राहकांकडून मासिक वीजबिलांचा भरणा होत नसल्याने थकबाकीमध्ये वाढ होत आहे. सध्या पश्चिम महाराष्ट्रात घरगुती, वाणिज्यिक व औद्योगिक वर्गवारीतील १७ लाख ८५ हजार वीजग्राहकांकडे ३३२ कोटी ७९ लाख रुपयांची थकबाकी आहे. ही थकबाकी वसूल करण्यासाठी महावितरणने वीजपुरवठा खंडित करण्याची धडक मोहीम सुरु केली आहे. यासोबतच वीजबिलांची सर्वाधिक थकबाकी असलेल्या सरकारी कार्यालयांची यादी देखील तयार करण्यात आली आहे. संबंधित कार्यालयांकडे थकबाकी भरण्यासाठी महावितरणकडून पाठपुरावा सुरू आहे. थकीत रकमेचा भरणा झाला नाही तर प्रसंगी वीजपुरवठा खंडित करण्यात येईल असे स्पष्ट करण्यात येत आहे.

पुणे जिल्ह्यात ४ हजार ३४८ सरकारी कार्यालयांकडे ८ कोटी ५७ लाख रुपयांची थकबाकी आहे. यामध्ये पुणे महानगरपालिकेच्या ५५२ कार्यालयांकडे ६३ लाख, पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या ८४० कार्यालयांकडे १ कोटी ११ लाख, पुणे जिल्हा परिषदेच्या १९१३ कार्यालयांकडे ५ कोटी ५८ लाख तसेच पुणे, पिंपरी चिंचवड शहर  आणि पुणे ग्रामीण पोलीस विभागाच्या १०४३ कार्यालयांकडे १ कोटी २५ लाख रुपये थकीत आहे.

सातारा जिल्ह्यात १३९३ सरकारी कार्यालयांच्या वीजबिलांची २ कोटी ११ लाख रुपयांची थकबाकी आहे. यामध्ये सातारा जिल्हा परिषदेच्या १२८५ कार्यालयांच्या १ कोटी ९७ लाख आणि जिल्हा पोलीस विभागाच्या १०८ कार्यालयांच्या १३ लाख रुपयांच्या थकबाकीचा समावेश आहे. तसेच सोलापूर जिल्हा परिषदेच्या १६२१ कार्यालयांचे ४ कोटी ७६ लाख आणि जिल्हा पोलीस विभागाच्या ८५ कार्यालयांचे १७ लाख असे एकूण १७०६ कार्यालयांकडे ४ कोटी ९३ लाख रुपयांच्या वीजबिलांची थकबाकी सोलापूर जिल्ह्यात आहे.

सांगली जिल्हा परिषदेच्या ८९२ कार्यालयांकडे २ कोटी ९ लाख आणि पोलीस विभागाच्या २१९ कार्यालयांकडे १८ लाख असे एकूण १ हजार १११ कार्यालयांकडे २ कोटी २७ लाख रुपयांच्या वीजबिलांची थकबाकी सांगली जिल्ह्यात आहे. तर कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या १४६ कार्यालयांकडे ५ कोटी १९ लाख आणि जिल्हा पोलीस विभागाच्या ५३ कार्यालयांकडे ६ लाख असे एकूण १९९ कार्यालयांकडे ५ कोटी २६ लाख रुपयांच्या वीजबिलांची थकबाकी कोल्हापूर जिल्ह्यात आहे.

सरकारी कार्यालयांना महावितरणकडून सार्वजनिक सेवा वर्गवारीतून वीजदर आकारणी केली जाते. हे वीजदर घरगुती दरांएवढेच किंवा स्लॅबनुसार त्याहीपेक्षा कमी आहेत. यामध्ये शिक्षण व वैद्यकीय सेवांसाठी २० किलोवॅटपर्यंतच्या वीजजोडणीसाठी ४ रुपये १३ पैसे प्रतियुनिट तर २० किलोवॅटपेक्षा अधिक वीजजोडणीसाठी ५ रुपये ९४ पैसे आणि ५० किलोवॅटपेक्षा अधिक वीजजोडणीसाठी ७ रुपये ४५ पैसे प्रतियुनिट दराने वीजदर आकारणी होते. तर इतर सरकारी कार्यालयांसाठी २० किलोवॅटपर्यंत ५ रुपये ९४ पैसे प्रतियुनिट आणि त्यापेक्षा अधिक वीजजोडणीसाठी ९ रुपये ४० पैसे प्रतियुनिट दराने वीजदर आकारणी होत आहे.

वीजबिल भरण्यासाठी सर्व सरकारी कार्यालयांच्या वार्षिक अंदाजपत्रकामध्ये निधीची तरतूद केली जाते व त्याप्रमाणे संबंधित खात्याकडून निधी उपलब्ध होतो. मात्र पश्चिम महाराष्ट्रात प्रामुख्याने जिल्हा परिषद, पुणे व पिंपरी चिंचवड महानगरपालिका व पोलीस विभागाच्या विविध कार्यालयांकडून वीजबिलांचा नियमित भरणा होत नसल्याने थकबाकी वाढत असल्याची स्थिती आहे.

महिला डॉक्टरांची मेडिक्वीन सौंदर्यवती स्पर्धा २५ फेब्रुवारीला पुण्यात रंगणार 

– मेडीक्वीन क्लब ग्लोबल‘ संस्थेचा अनोखा उपक्रम

– महिला डॉक्टरांच्या योगदानाचा गौरव करणारा सोहळा

पुणे : वैद्यकिय क्षेत्रातील महिला डॉक्टरांच्या सामाजिक कार्याचा गौरव करण्यासाठी तसेच त्यांचा आत्मविश्वास वृद्धिंगत व्हावा, महिलांमधील कर्करोग व एकंदरीत आरोग्य जनजागृतीसाठी ‘मेडीक्वीन क्लब ग्लोबल’ या संस्थेकडून “मेडि आयकॉन अवॉर्ड 2024” व ‘मेडिक्वीन सौंदर्यवती स्पर्धे’चे आयोजन करण्यात आले आहे. महिला डॉक्टरांचा आत्मसन्मान उंचावणारा हा सोहळा रविवारी दि.25 फेब्रुवारी 2024 रोजी बलेवाडीतील हॉटेल ऑर्किड येथे सायंकाळी सहा वाजता रंगणार आहे. स्पर्धा विजेत्यांना अभिनेत्री किशोरी शहाणे यांच्या हस्ते गौरव केला जाणार आहे, अशी माहिती मेडिक्वीनच्या संस्थापिका डॉ. प्रेरणा बेरी यांनी पत्रकार भवन येथे आयोजित पत्रकार परिषदेत दिली. यावेळी मेडीक्वीनच्या समन्वयक डॉ. प्राजक्ता शहा,  कॅन्सर तज्ज्ञ डॉ. रेश्मा पुराणिक, सामाजिक आरोग्य तज्ज्ञ डॉ. अमृता बऱ्हाटे उपस्थित होत्या.

संस्थेच्या उद्देशाबाबत अधिक माहिती देताना डॉ. प्रेरणा बेरी म्हणाल्या की, मेडीक्वीन क्लब ग्लोबल ही संस्था महिलांच्या आरोग्यासाठी गेली पाच वर्ष काम करत आहे. महिला आरोग्य हे अजूनही खूप दुर्लक्षित आहे. सर्व त्यामुळे सर्वपॅथी मधील महिला डॉक्टरांनी एकत्र येऊन काम केलं पाहिजे असा विचार होता. आणि या उद्देशातून मेडिक्विनच काम सुरू झालं. ड्रीम, अचिव्ह, इन्स्पायर हे मेडिक्विंस ब्रीदवाक्य आहे. मेडिक्विनचे महिला आरोग्याबद्दल जागरुकता निर्माण करणे, त्यावर उपाययोजना करण्यासाठी महिलांना प्रवृत्त करणे आणि महिला डॉक्टरांना जे महिला आरोग्यासाठी काम करतात त्यांना प्रोत्साहित करणे त्यांच्या कामाबद्दल सन्मान करणे हा उद्देश आहे. विशेष उल्लेखनीय काम करणाऱ्या महिला डॉक्टर व प्रथितयश डॉक्टर या कार्यकामासाठी उपस्थित असतील.

तसेच निरामया हा मेडिक्विनचा उद्देश आहे. निरामया म्हणजेच प्रत्येक स्त्री आरोग्यपूर्ण शारीरिक मानसिक सामाजिक आणि आर्थिक अशा सर्व स्तरांवर सशक्तिकरण करणे हा मेडिक्विन चा उद्देश आहे. यामध्ये वर्कशॉप, अवेअरनेस लेक्चर्स, मासिक पाळी, कॅन्सर, वंद्यत्व, मानासिक विचार, पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट, त्वचा व केसांचे विक वर, आहार, व्यायाम, फिटनेस, आर्थिक साक्षरता फायनान्शिअल फिट नेस अशा अनेक गोष्टींचा समावेश निरामय या प्रोग्राम मध्ये केला आहे. आणि यासाठी आम्हाला ऑक्सीरीज कंपनी म्हणजे पुनीत बालन यांनी अगदी खूप मोलाचं सहकार्य केलं आहे, असेही डॉ. बेरी यांनी स्पष्ट केले.

डॉ. प्राजक्ता शाह म्हणाल्या की, मेडिक्विनची इंडिया आणि एशिया बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये नोंद झालेली आहे. मेडिक्विन ही महिला डॉक्टरांसाठी सौंदर्य स्पर्धा आयोजित करणारे एकमेव संस्था अशी त्यामध्ये नोंद झालेली आहे. सामाजिक भान ठेवून सामाजिक कार्य करतात आणि अशा महिला डॉक्टरांचा सन्मान होणं, त्यांना प्रोत्साहन मिळणं खूप महत्वाचा आहे. याच उद्देशातून मेडी आयकॉन अवॉर्ड ची सुरुवात झाली.याआधी अशा महाराष्ट्रातील 27 महिला डॉक्टरांचा मेडिक्विंन राज्यपाल भगतसिंगजी कोशियारी यांच्या हस्ते राजभवन येथे सन्मान केला होता.

डॉ. अमृता म्हणाल्या की, सध्या मेडीक्वीन संस्थेबरोबर महिला आरोग्याबाबत अनेक महिला डॉक्टर कार्यरत आहेत, आणि हे काम अजून व्यापक करण्यासाठी मी सर्व महिला डॉक्टरांना, सर्व पॅथीच्या महिला डॉक्टरांना आवाहन करते की त्यांनी मेडिक्विन या प्लॅटफॉर्मवर एकत्र या. आम्ही जे काम करतोय त्यामध्ये सहभागी व्हा आणि तुमच्या आरोग्याबाबत जागरूक व्हा. आम्ही तुम्हाला मदत करायला तयार आहोत.

डॉ. रेश्मा पुराणिक म्हणाल्या की, मेडिक्विन संस्था डॉक्टरांना प्रोत्साहन देण्यासाठी महिला आरोग्य आणि कॅन्सर जनजागृती या कार्यात अग्रेसर असते. आज महिलांमध्ये कँसरचे प्रमाण वाढत आहे. त्यामुळे महिलांमध्ये जागृती करण्यासाठी आपण डॉक्टर महिला पुढाकार घेत आहोत. 

शेतकर्‍यांचे कैवारी पंढरी चंदनखेडे यांना जीवनगौरव पुरस्कार प्रदान

लोकशाहीसाठी शिवाजी महाराजांचे मॉडेल आदर्श- इतिहास संशोधक पांडुरंग बलकवडे

सातवे राष्ट्रभक्ती साहित्य संमलेनाचे उद्घाटन

पुणे, दि.१५ फेब्रुवारी: “२१व्या शतकातील लोकशाही राष्ट्रासाठी छत्रपती शिवाजी महाराजांचे मॉडल हे आदर्श आहे. त्यासाठी यांचा आदर्श घेऊन समाज निर्मिती करावी. राष्ट्र, समाज व संस्कृतीच्या रक्षणासाठी सिद्ध असणारा आणि कोणत्याही त्यागाला, संघर्षाला कटिबद्ध असणारा समाज घडला तरच उद्याचा भारत दहशतमुक्त, भयमुक्त, भ्रष्टाचार मुक्त,व्यसनमुक्त आणि विज्ञाननिष्ठ परंतु श्रध्दावान संस्कारित समाज निर्माण होईल.” असे विचार सातव्या राष्ट्रभक्ती साहित्य संमलेनाचे अध्यक्ष व भारतीय इतिहास संशोधक समितीचे सचिव पांडुरंग बलकवडे यांनी व्यक्त केले.
महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडख, मुंबई व कर्नाळा चॅरिटेबल ट्रस्ट, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित सातव्या राष्ट्रभक्ती साहित्य संमलेनाचे उद्घाटन हडपसर येथील साधना विद्यालयात झाले. त्यावेळी अध्यक्षीय भाषणात बोलत ते होते.
या प्रसंगी धर्मादाय सह आयुक्त सु.मु. बुक्के हे उद्घाटक म्हणून उपस्थित होते. तसेच  स्वागताध्यक्ष डॉ. सुहास पायगुडे , ज्येष्ठ साहित्यिक चंद्रलेखा बेलसरे, रविंद्र बेडकिहाळ, शिक्षणतज्ज्ञ अनुराधा निकम आणि जागतिक कीर्तीचे समुपदेशक डॉ. महेश अभ्यंकर, कर्नल सचिन रंदाळे, साधना विद्यालयाचे मुख्याध्यापक डी.जी. जाधव  हे सन्माननीय पाहुणे म्हणून उपस्थित होते.
तसेच अ‍ॅड. नंदीनी शहासने, देशभक्तकोषाकार चंद्रकांत शहासने व मंजिरी शहासने उपस्थित होत्या.
या प्रसंगी चंद्रपूर येथील पंढरी सीतारामजी चंदनखेडे यांना कै. शांताराम भाऊशेट शहासने जीवनगौरव पुरस्काराने प्रदान करण्यात आला. सन्मानपत्र, शाल, श्रीफळ असे पुरस्काराचे स्वरूप होते.
पांडुरंग बलकवडे म्हणाले,” देशातील कोणत्याही समाजाने महाराजांची प्रेरणा स्विकारली तर तो समाज महान बनेल. महाराष्ट्रात ६ ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांच्या भव्य स्मारकांची निर्मिती करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नुसार राज्य सरकारने पुढाकार घेतला आहे. त्यासाठी ३०० कोटी रूपयांची भरीव योजना आखली आहे. सिंदखेड राजा येथे माता जिजाऊचे स्मारक ,रामटेक व मुंबई बरोबरच अन्य ठिकाणी महाराजांचे स्मारक उभारले जाणार आहे. या सर्व कार्यासाठी प्रसिद्ध आर्कीटेक्ट ओजस हिराणी यांनी १ रूपायांच्या मानधनावर कार्य करणार आहेत. ”
सु.मो.बुक्के म्हणाले,” समाजातील ज्या काही समस्या असतील त्या सोडविण्यासाठी आपले काम प्रामाणिकपणे करा. हीच खरी राष्ट्रभक्ती आहे. स्वतःची उन्नती करता करता राष्ट्राची उन्नती करा.”
डॉ. महेश अभ्यंकर म्हणाले,”शब्दांमध्ये सामर्थ असते. त्यामुळे विद्यार्थ्यांनी भाषेचे ज्ञान वाढवावे. छ.शिवाजी महाराजांच्या काळात हर हर महादेव, गांधीजींच्या काळात चले जावो, स्वामी विवेकांनद यांनी बदर्स अ‍ॅण्ड सिस्टर्स सारख्या अनेक शब्दांनी राष्ट्रामध्ये जादू निर्माण केली होती. विद्यार्थ्यांनी कौशल्य सामर्थ्य वाढवावे. सक्सेस पेक्षा एक्सलेन्सला महत्व दयावे.”
पुरस्काराला उत्तर देतांना पंढरी चंदनखेड म्हणाले,” चांगले काम करणार्‍या व्यक्तीची समाजाला गरज आहे. आपल्या कार्याची दखल समाज सतत घेत असतो. त्यातूनच उत्साह वाढून प्रेरणा मिळते. मणुष्याने नेहमी मातृ, पितृ, गुरू देव, समाज आणि राष्ट्राचे ऋण फेडावे.”
त्यानंतर कर्नल व्ही.पी. खाडगे, कर्नल सचिन रंदाळे, चंद्रलेखा बेलसरे, अनुराधा निकम यांनी विचार व्यक्त करून संमेलनाला शुभेच्छा दिल्यात.
प्रस्तावना डॉ. पायगुडे यांनी केले. अ‍ॅड. नंदिनी शहासने यांनी स्वागतपर भाषण केले.  सूत्रसंचालन व आभार देशभक्तकोषाकार चंद्रकांत शहासने यांनी केले. 

त्याने केल्या १२ दुचाक्यांच्या चोऱ्या,कोथरूडचा ३३ वर्षीय तरुण गजाआड

पुणे- कोथरुड पोलीसांनी १२ वाहन चोऱ्यांचा तपास लावला आहे , या १२ हि चोरीला गेल्लेल्या दुचाक्या हस्तगत करून त्या चोरणाऱ्या ३३ वर्षीय तरुणाला गजाआड केले आहे. निलेश रमेश कंधारे, वय ३३ वर्षे, रा. फ्लॅट नं ३४, जय मल्हार हौसिंग सोसायटी एम. आय. टी. रोड, कोथरुड असे या तरुणाचे नाव आहे.

पोलिसांनी या संदर्भात सांगितले कि,’. पोलीस आयुक्त यांनी वेळोवेळी वाहनचोरीस प्रतिबंध करणेबाबत व वाहनचोरीचे
गुन्हे तात्काळ उघडकीस आणणेबाबतच्या सूचना दिल्या होत्या. त्या अनुषंगाने अपर पोलीस आयुक्त, पश्चिम प्रादेशिक विभाग, पोलीस उप आयुक्त, परिमंडळ ३ व सहायक पोलीस आयुक्त, कोथरुड विभाग यांचे मार्गदर्शप्रमाणे तपास पथका मार्फत पोलीस ठाणे हद्दीमध्ये वाहनचोरीस प्रतिबंध व्हावा, याकरीता उपाययोजना चालू होत्या.
वाहनचोरीस प्रतिबंध होणेकामी करण्यात येणा-या उपाययोजनांचे अनुषंगाने कोथरुड पोलीस ठाणे हद्दीमध्ये वेगवेगळ्या प्रकारे पेट्रोलिंग नेमण्यात आली होती. त्यामध्ये ट्रॅप लावणे, सीसीटीव्ही फुटेज चेक करणे, गोपनीय बातमीदारामार्फत माहिती प्राप्त करणे वगैरे प्रकारे वाहनचोरीस प्रतिबंध करण्याची व गुन्हे उघडकीस आणण्याची कार्यवाही चालू होती.
या मोहीमे दरम्यान ज्या ठिकाणी वाहनचोरीचे गुन्हे घडलेले आहेत, त्या भागातील सीसीटीव्ही फुटेजची पडताळणी व गोपनीय बातमीदारामार्फत मिळालेल्या माहितीवरुन निलेश रमेश कंधारे, वय ३३ वर्षे, रा. फ्लॅट नं ३४, जय मल्हार हौसिंग सोसायटी एम. आय. टी. रोड, कोथरुड, पुणे याला तपासपथकामार्फत सापळा लावुन, त्यास ताब्यात घेऊन त्याचेकडे केलेल्या तपासामध्ये त्याच्या कडून एकुण १२ गुन्हे उघडकीस आलेले आहेत.
या आरोपीकडून अंदाजे रु. ६,००,०००/- रू.कि.च्या मोटर सायकली जप्त करण्यात आलेल्या आहेत.
हि कामगिरी ही अपर पोलीस आयुक्त, पश्चिम प्रादेशिक विभाग, पुणे शहर प्रविण पाटील, पोलीस उप आयुक्त, परिमंडळ ३, संभाजी कदम, सहा. पोलीस आयुक्त, कोथरुड विभाग भिमराव टेळे, यांचे मार्गदर्शनाप्रमाणे कोथरूड पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीप देशमाने, सपोनिरी बालाजी सानप, पोलिस अंमलदार अजिनाथ चौधर, विशाल चौगुले,. संजय दहिभाते, आकाश वाल्मिकी, विष्णु राठोड, अजय शिर्के, शरद राऊत, मंगेश शेळके यांनी कामगिरी केली आहे.

राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी अजित पवारांचीच,पण दोन्ही गटाचे आमदार पात्र- राहुल नार्वेकर यांचा निर्णय

मुंबई-राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदार अपात्रता प्रकरणाचा निकाल विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी जाहीर केला आहे. राहुल नार्वेकर यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी हा मुळ पक्ष हा अजित पवार गटाचा असल्याचा निर्वाळा दिला. कारण त्यांच्याकडे विधिमंडळात मोठ्या प्रमाणात बहुमत आहे. म्हणजेच शिवसेनेच्या आमदार अपात्रता प्रकरणाची निकालाची या ठिकाणी पुनरावृत्ती झाली आहे. अजित पवार गटासह शरद पवार गटाचे सर्व आमदार पात्र ठरवण्यात आले आहे.

उच्च शिक्षीत पण व्यसनाधीन गृहस्थ वाहनचोरीचे गुन्हे केल्याने गजाआड

पुणे- बिबवेवाडीतील चांगल्या वस्तीत राहणारा ४७ वर्षीय उच्चशिक्षित गृहस्थ व्यसनाधीनतेने वाहनचोरीचे गुन्हे केले आणि अखेरीस पोलिसांच्या तावडीत सापडला. सहकारनगर पोलीसांनी त्याला ३ वाहने चोरीच्या आरोपावरून अटक केली आहे. आणि त्याच्याकडून तिन्ही वाहने अर्थात दुचाक्या जप्त देखील केल्या आहेत. प्रशांत प्रभाकर कान्हेकर वय ४७ वर्षे रा.स.नं.५७३, प्लॉट नं.१६, साहील सोसायटी फ्लॅट नं.१, महाविर फर्निचर दुकानाजवळ बिबवेवाडी असे या अटक झालेल्या गृहस्थाचे नाव आहे.
इंटिरीअर डिझायनींगचा डिप्लोमा केलेला हा कान्हेरकर व्यसनाच्या आधीन गेल्याने दुचाकी वाहने चोऱ्या करत असे पोलिसांनी म्हटले आहे. पोलिसांनी असेही सांगितले कि,’त्याचेकडून १,९५,०००/- किंमतीच्या ३ दुचाकी जप्त करून वाहन चोरीचे ३ गुन्हे उघड करण्यात आले आहेत .
दि.११/०२/२०२४ सहकारनगर पोलीस स्टेशन कडील तपास पथकातील अधिकारी व अंमलदार असे वाहन चोरी, गुन्हे प्रतिबंधक पेट्रोलिंग व गुन्हेगार चेकिंग करीत असताना पोलीस अंमलदार अमोल पवार व विशाल वाघ यांना गुप्त बातमीदारांकडुन माहिती मिळाली की एक इसम चोरीची काळ्या रंगाची अॅक्टीव्हा गाडी हिच्यासह सावरकर चौक धनकवडी पुणे येथे थांबला आहे अशी खात्रीशिर बातमी मिळाली.
त्याबाबत वरिष्ठांना माहिती देवुन त्यांचे परवानगीने सहकारनगर पोलीस स्टेशन, तपास पथकाकडील स्टाफसह बातमीचे ठिकाणी जावुन पाहता बातमीतील वर्णनाचा इसम हा गाडी वरून सावरकर चौकातुन पुढे जात असताना दिसल्याने लागलीच त्यास स्टाफचे मदतीने थोड्याच अंतरावर ताब्यात घेवुन त्यास त्याचे नाव पत्ता विचारता त्याने त्याचे नाव प्रशांत प्रभाकर कान्हेकर वय ४७ वर्षे रा.स.नं.५७३, प्लॉट नं.१६, साहील सोसायटी फ्लॅट नं.१, महाविर फर्निचर दुकानाजवळ बिबवेवाडी पुणे असे असल्याचे सांगीतले. त्याचे ताब्यात एक अॅक्टीवा गाडी मिळुन आली त्या गाडी बाबत त्याच्याकडे चौकशी करता सदरची गाडी त्याने डीमार्ट पुणे सातारा रोड पुणे याठिकाणा वरून दि.०८/०२/२०२४ रोजी चोरल्याचे कबुल केले सदर गाडी बाबत सहकारनगर पोलीस स्टेशन येथे गु.रजि.नं. ४५/२०२४ भा.द.वि. कलम ३७९ प्रमाणे गुन्हा दाखल असल्याची माहिती मिळाल्याने सदर आरोपीकडे अधिक चौकशी करता त्याने आणखी दोन वाहने चोरल्याचे सांगितले सदर आरोपी कडुन एकुण १,९५,०००/- रु किं.ची ३ वाहने हस्तगत करण्यात आली असुन सहकारनगर पोलीस ठाण्याकडील गु. रजि. नं. ४५/२०२४ भादवि ३७९ २) २३०/२०२३ भादवि ३७९ ३) ४९/२०२४ भादवि ३७९ असे ०३ वाहनचोरीचे गुन्हे उघड करण्यात आले आहेत. याच आरोपी वर चोरीचा ०१ गुन्हा विश्रामबाग पोलीस स्टेशन येथे दाखल आहे.
अपर पोलीस आयुक्त पश्चिम प्रादेशीक विभाग प्रविणकुमार पाटील,पोलीस उपायुक्त परिमंडळ-२स्मार्तना पाटील सहा. पोलीस आयुक्त, स्वारगेट विभाग नंदिनी वग्यानी सहकारनगर पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुरेंद्र माळाळे, यांचे मार्गदर्शनाखाली तपास पथकाचे सहा. पोउपनिरी बापु खुटवड, पोलीस अंमलदार, अमोल पवार, महेश मंडलिक, विशाल वाघ, बजरंग पवार, निलेश शिवतारे, सागर सुतकर, सागर कुंभार, नवनाथ शिंदे यांनी केली आहे.

इलेक्ट्रोरल बाँड मोठा घोटाळा असल्याच्या राहुलजी गांधींच्या विधानावर शिक्कामोर्तब..

0

चंद्रकांत हंडोरे सर्वाधिक मतांनी विजय होणार, आमदार गैरहजेरीच्या केवळ अफवा: नाना पटोले.

राज्यसभेसाठी चंद्रकांत हंडोरेंचा अर्ज महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या उपस्थितीत दाखल.

मुंबई, दि. १५ फेब्रुवारी
राज्यसभा निवडणुकीसाठी काँग्रेस नेते व महाविकास आघाडीचे उमेदवार चंद्रकांत हंडोरे यांचा उमेदवारी अर्ज प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत दाखल करण्यात आला. चंद्रकांत हंडोरे यांना काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे, समाजवादी पक्ष, शेकाप, माकपासह सर्व मित्रपक्षांचा पाठिंबा आहे. राज्यसभा निवडणुकीत मविआचे उमेदवार चंद्रकांत हंडोरे हे सर्वाधिक मतांनी विजयी होतील, असा विश्वास महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी व्यक्त केला आहे.

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले व काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते बाळासाहेब थोरात यांच्या प्रमुख उपस्थितीत काँग्रेस विधिमंडळ पक्षाची बैठक विधान भवनातील काँग्रेस पक्ष कार्यालयात पार पडली. या बैठकीनंतर राज्यसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या उपस्थितीत चंद्रकांत हंडोरे यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आला. यावेळी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, विधिमंडळ पक्षनेते बाळासाहेब थोरात, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, विधान परिषदेचे गटनेते सतेज बंटी पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड, शिवसेनेचे अजय चौधरी व काँग्रेस पक्षाचे आमदार उपस्थित होते.
प्रसार माध्यमांशी बोलताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले की, काँग्रेसचे आमदार गैरहजर असल्याच्या अफवा जाणीवपूर्वक पसरवल्या जात आहेत, त्यात काही तथ्य नाही. तीन-चार आमदार आले नाहीत, त्यांच्याशी विधिमंडळ पक्षनेते बाळासाहेब थोरात व माझी फोनवर चर्चा झाली आहे व त्यांनी परवानगीही घेतली आहे, वैयक्तिक कारणामुळे ते आलेले नाहीत. मविआला चिंता करण्याची गरज नाही, आमचा एकच उमेदवार आहे आणि तो बहुमताने निवडून येणार आहे. काँग्रेस सरकार अथवा मविआ सरकार असताना विरोधी पक्षांशी चर्चा करून सामोपचारातून बिनविरोध निवडणुका होत होत्या, ही महाराष्ट्राची राजकीय संस्कृती आहे परंतु भाजपाकडे भ्रष्ट मार्गाने कमावलेला पैसा आलेला आहे त्यातून ते निवडणुकीचे राजकारण करत आहेत, असे पटोले म्हणाले.

इलेक्ट्रोरल बाँड मोठा घोटाळा असल्याच्या राहुलजी गांधींच्या विधानावर शिक्कामोर्तब..

निवडणूक रोखे योजना असंविधानिक आहे, असा निकाल सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. मा. सुप्रीम कोर्टाच्या या निकालाचे काँग्रेस पक्ष स्वागत करत आहेत. काँग्रेस नेते राहुलजी गांधी यांनी निवडणूक रोखे (ईलेक्ट्रोरल बाँड) हा मोठा घोटाळा असल्याचे त्याचवेळी जाहीरपणे सांगितले होते, त्यांच्या विधानावर मा. सुप्रिम कोर्टाने आज शिक्कामोर्तब केले आहे. भाजपाने आता २०१९ पासून या योजनेखाली घेतलेले पैसे परत करावेत, असे नाना पटोले म्हणाले.

बार्टीच्या विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती तातडीने द्या.

राज्याच्या सर्वसामान्य जनतेच्या मुला मुलींसाटी बार्टी, महाज्योती, सारथी या संस्थांची स्थापना केलेली आहे. गरिब व सर्वसामान्य कुटुंबातील मुला मुलांना या संस्थाच्या माध्यमातून शिष्यवृत्ती दिली जाते परंतु बार्टीचे विद्यार्थी मागील २४५ महिन्यांपासून शिष्यवृत्ती मिळाली नाही म्हणून सरकारच्या दरवाज्यावर उभे आहेत. गरीब, शेतकरी, शेतमजुकरांच्या मुलांचे आयुष्य बरबाद करण्याचा ठेका सरकारने घेतला आहे का? सरकार या गोरगरिबांच्या मुलांचे दोनवेळचे अन्न व शिक्षण हिरावून घेत आहे. सरकारने या विद्यार्थ्यांची मागण्यांची दखल घेऊन तातडीने शिष्यवृत्ती द्यावी अशी मागणी नाना पटोले यांनी केली आहे.

जरांगे पाटील यांनी प्रकृत्तीची काळजी घ्यावी: थोरात

काँग्रेस विधिमंडळ पक्षनेते बाळासाहेब थोरात यावेळी म्हणाले की, काँग्रेसचे सर्व आमदार एकत्रित आहेत, तीन-चार आमदार परवानगी घेऊन गैरहजर राहिले आहेत, त्यांची पत्रे माझ्याकडे आहेत त्यामुळे आमदार गैरहजर होते या बातम्यामध्ये काहीही तथ्य नाही.
मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणावर बोलताना थोरात म्हणाले की, सरकारने जरांगे पाटील यांना काय आश्वासन दिले त्याची पूर्तता झाली पाहिजे परंतु कोणत्याही परिस्थितीत त्यांच्या तब्येतीची काळजी घेतली पाहिजे. माझी जरांगे पाटील व त्यांच्या सहकाऱ्यांना विनंती आहे की त्यांनी आधी तब्येतीची काळजी घ्यावी, असे आवाहनही थोरात यांनी केले आहे.

‘महावितरण’ला सर्वोत्कृष्ट वीज वितरण कंपनीचा राष्ट्रीय पुरस्कार

0

नवीकरणीय ऊर्जेसाठीही दोन राष्ट्रीय पुरस्कारांचा मान

मुंबई दि१५ फेब्रुवारी २०२४जागतिक दर्जाची तत्पर व डिजिटल ग्राहक सेवा तसेच दर्जेदार वीज पुरवठ्यासाठी वितरण यंत्रणेतील आमुलाग्र सुधारणांची दखल घेत इंडिपेंडंट पॉवर प्रोड्युसर्स असोसिएशन ऑफ इंडियाने (आयपीपीएआय) महावितरण कंपनीला सर्वोत्कृष्ट वीज वितरण कंपनीचा राष्ट्रीय पुरस्कार प्रदान करून गौरविले आहे. तसेच नवीन व नवीकरणीय ऊर्जेसाठी केलेल्या कामगिरीबद्दल प्रथम तर ग्राहकाभिमुख जनजागृतीबद्दल द्वितीय क्रमांकाच्या राष्ट्रीय पुरस्काराने महावितरणला गौरविण्यात आले. यासह वीज मिटरिंगसाठी नाविन्यपूर्ण तंत्रज्ञानाचा वापर केल्याबद्दल देखील महावितरणला विशेष पुरस्कार देण्यात आला.

आयपीपीएआयच्या वतीने बेळगाव (कर्नाटक) येथे आयोजित कार्यक्रमात पॉवर अवार्ड २०२४ चे विविध पुरस्कार प्रदान करण्यात आले. केंद्रीय विद्युत प्राधीकरणाचे अध्यक्ष श्री. घनश्याम प्रसाद, केंद्रीय नवीन व नवीकरणीय ऊर्जा विभागाचे सचिव श्री. भूपिंदरसिंग भल्ला, केंद्रीय विद्युत प्राधीकरणाचे माजी अध्यक्ष डॉ. प्रमोद देव यांच्याहस्ते महावितरणचे मुख्य अभियंता (देयके व महसूल) श्री. संजय पाटील आणि वीज दर नियामक कक्षाचे अधीक्षक अभियंता श्री. मिलिंद दिग्रसकर यांनी हे पुरस्कार स्वीकारले. या पुरस्कारांबद्दल महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र यांनी सर्व अभियंते, अधिकारी व कर्मचाऱ्यांचे कौतुक केले आहे.

वीज वितरण कंपनी म्हणून देशात नावलौकीक असलेल्या महावितरणने वीज क्षेत्रात पायाभूत आराखडा विकास, वीजबिलांच्या प्रक्रियेतील सुधारणा आणि जागतिक दर्जाची तत्पर ग्राहकसेवांना प्राधान्य देत आमुलाग्र सुधारणा सुरु केल्या आहेत. तसेच राज्याचे उपमुख्यमंत्री व ऊर्जा मंत्री मा. ना. श्री. देवेंद्र फडणवीस यांच्या पुढाकारातून शेतकऱ्यांना दिवसा वीज देण्याचे स्वप्न मुख्यमंत्री सौर कृषिवाहिनी योजना- २.० नुसार साकारले जात आहे. इतर राज्यांनी देखील या क्रांतीकारी योजनेच्या अंमलबजावणीचा अभ्यास सुरु केला आहे.

छतावरील सौर ऊर्जा प्रकल्प कार्यान्वित करण्यात महावितरणने देशात मोठी आघाडी घेतली आहे. अपारंपरिक ऊर्जा वापरामध्ये देण्यात येणारे प्राधान्य व लक्षणीय कामगिरी तसेच केंद्र शासनाच्या नवीन व नवीकरणीय ऊर्जा मंत्रालयाने महावितरणला १९ जानेवारी २०२२ रोजी रूफ टॉप सोलार प्रोग्रॅम फेज -२ अंतर्गत १९ जानेवारी २०२४ पर्यंत दोन वर्षांमध्ये घरगुती ग्राहकांसाठी १०० मेगावॅटचे उद्दिष्ट दिले होते. महावितरणने हे उद्दिष्ट दि. २५ सप्टेबर २०२३ रोजी म्हणजे चार महिने आधीच पूर्ण केले आहे.

महावितरणने वीज वितरण कंपनी म्हणून सुरू केलेल्या पायाभूत आराखडा विकासाच्या व ग्राहकसेवांच्या आमुलाग्र सुधारणा, नवीन व नवीकरणीय ऊर्जा क्षेत्रात केलेली कामगिरी याची दखल घेऊन आयपीपीएआयच्या वतीने राष्ट्रीय पातळीवर चार पुरस्कार प्रदान करून महावितरणला गौरविण्यात आले आहे.

मोतीबिंदूमुक्त कोथरुडचा संकल्प .. चंद्रकांतदादा पाटील

८०० रुग्णांची मोफत वैद्यकीय तपासणी १५० रुग्णांवर मोतिबिंदूची शस्त्रक्रिया

पुणे-राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण, वस्त्रोद्योग आणि संसदीय कार्यमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी मोतीबिंदूमुक्त कोथरुडचा संकल्प केला असून, पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या स्मृतिदिनानिमित्त सुबोध हॉस्पीटलमध्ये ८०० रुग्णांची मोफत डोळे तपासणी करण्यात आली, त्यापैकी १५० रुग्णांवर मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया करण्यात आली.

मोतीबिंदू हे जगभरातील दृष्टीदोषाचे प्रमुख कारण आहे, त्यावर वेळीच उपचार न केल्यास, डोळ्यांचे कधीही भरुन न येणारे नुकसान होऊ शकते. मोतीबिंदू जितका जास्त काळ डोळ्यात असतो, तितका तो सरक्षितपणे आणि प्रभावीपणे काढणे अवघड असते. म्हणूनच लक्षणीय अशा मोतीबिंदूचे लवकरच निदान आणि त्यावर त्वरित उपचार होणे योग्य पद्धतीमध्ये अवश्यक असते. या शस्त्रक्रियेसाठी येणारा खर्च आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबातील व्यक्तींना अडचणीचे असल्याने, बहुतांश वेळेच अशा घटकातील रुग्ण याकडे दुर्लक्ष करतात.

त्यामुळे आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबातील रुग्णांच्या डोळ्याची योग्य पद्धतीने निगा राखली जावी, यासाठी राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण, वस्त्रोद्योग आणि संसदीय कार्यमंत्री तथा कोथरुडचे आमदार चंद्रकांतदादा पाटील यांनी पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या स्मृतीदिनानिमित्त मतदारसंघातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील रुग्णांसाठी मोफत मोतीबिंदू तपासणी शिबीराचे आयोजन केले होते.

कोथरुडमधील सुबोध हॉस्पिटलमध्ये या शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबीरात एकूण ८०० रुग्णांची मोफत तपासणी करण्यात आली. त्यापैकी १५० रुग्णांना मोतीबिंदूचे निदान झाले. या सर्वांवर सोमवार पासून अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करुन शस्त्रक्रिया करण्यात आली. यावेळी सर्व रुग्णांनी नामदार चंद्रकांतदादा पाटील यांचे आभार मानले असून, त्यांच्या कामावर समाधान व्यक्त केले.

काँग्रेसचे चंद्रकांत हंडोरे अन् राष्ट्रवादीच्या प्रफुल्ल पटेल यांचा उमेदवारी अर्ज दाखल

मुंबई-काँग्रेसकडून चंद्रकांत हंडोरे यांनी राज्यसभेसाठी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. यावेळी त्यांच्यासोबत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, बाळासाहेब थोरात, विजय वडेट्टीवारांसह राष्ट्रवादीचे जितेंद्र आव्हाड उपस्थित होते.

राष्ट्रवादी काँग्रेसचे राज्यसभेचे उमेदवार प्रफुल्ल पटेल यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. अर्ज दाखल करण्याच्या आधी पटेलांनी सिद्धिविनायकाचे दर्शन घेतले आहे.

राज्यसभा निवडणुकीचा उमेदवारी अर्ज भरण्यास पूर्वी प्रफुल पटेल दादर येथील सिद्धिविनायकाच्या चरणी लीन झाले. चांगल्या कामाची सुरुवात बाप्पाच्या दर्शनानं करायला हवी, यासाठी मी आज बाप्पाच्या दर्शनाला आलो होतो,असे त्यांनी यावेळी स्पष्ट केले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष अजित पवार, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आणि ज्येष्ठ सहकाऱ्यांचे त्यांनी उमेदवारी दिल्याबद्दल आभार मानले. माझी राज्यसभेचा कालावधी शिल्लक असलेली जागा त्या दुसऱ्या कोणाला संधी मिळेल, त्यामुळे फार काही अंदाज लावणे योग्य होणार नाही. मी मुदतपूर्वी पुन्हा राज्यसभेचा उमेदवारी अर्ज दाखल का केला, याचे रहस्य लवकरच तुमच्या समोर येईल, असेही त्यांनी म्हटले आहे.