श्री महालक्ष्मी मंदिर सारसबाग ४० व्या वर्धापनदिनानिमित्त तीन दिवसीय उत्सवाला सुरुवात
पुणे : गरुड स्थापना, कलश स्थापना व यज्ञ स्थापनेने आणि माता माता की जय… च्या नादघोषात सारसबागेसमोरील श्री महालक्ष्मी मंदिरात ब्रह्मोत्सवाला थाटात प्रारंभ झाला. मंदिराच्या ४० व्या वर्धापनदिनानिमित्त ब्रह्मोत्सवाचे आयोजन करण्यात आले असून मंदिराला आकर्षक सजावट व विद्युतरोषणाई करण्यात आली आहे. तसेच, धार्मिक कार्यक्रमांसह सामाजिक उपक्रमे देखील होणार आहेत.
श्री बन्सीलाल रामनाथ अग्रवाल धार्मिक व सांस्कृतिक ट्रस्ट, श्री महालक्ष्मी मंदिर सारसबागच्या ४० व्या वर्धापनदिनानिमित्त आयोजित ब्रह्मोत्सवाचा प्रारंभ मंदिरात झाला. यावेळी ट्रस्टचे प्रमुख संस्थापक विश्वस्त राजकुमार अग्रवाल, प्रमुख विश्वस्त अमिता अग्रवाल, विश्वस्त हेमंत अर्नाळकर, नारायण काबरा आदी उपस्थित होते.
राजस्थान डिडवाना येथील अनंत श्री विभुषित जगतगुरु रामानुचार्य झालरिया पीठाधीपती पूज्य श्री श्री १००८ स्वामीजी घनश्यामाचार्यजी महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली हा उत्सव होत आहे. धार्मिक कार्यक्रमामध्ये होम-हवन, महाअभिषेक, सुवर्ण व रजत कमल अर्चना, उत्सवमूर्तींचा पालखी सोहळा व फुलांची होळी होणार आहे.
सांस्कृतिक आणि सामाजिक कार्यक्रमांमध्ये शालेय विद्यार्थी पालकत्व योजना व उत्सव मूर्तीची धान्यतुला करुन ते धान्य अनाथ मुलांच्या संस्थेस वाटप अशा उपक्रमांचा देखील समावेश आहे. सर्व कार्यक्रमांमध्ये पुणेकरांनी मोठया संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन मंदिरातर्फे करण्यात आले आहे.
गरुड, कलश, यज्ञ स्थापनेने ‘ब्रह्मोत्सवाला’ थाटात प्रारंभ
महापालिका घनकचरा व्यवस्थापन कार्यालयामार्फत “स्वच्छता विषयक कार्यशाळा व सत्कार समारोह”संपन्न
पुणे- स्वच्छ सर्वेक्षण २०२३ अंतर्गत आज दिनांक २१/०२/२०२४, बुधवार रोजी स.११:०० ते सायं ०४:०० या वेळेत क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले स्मारक, गंजपेठ, पुणे या ठिकाणी स्वच्छता विषयक कार्यशाळा व सत्कार समारोह चे आयोजन करण्यात आले होते. या कार्यशाळेस महापालिका आयुक्त, विक्रम कुमार व अतिरिक्त महापालिका आयुक्त (इ), डॉ. कुणाल खेमनार, अतिरिक्त महापालिका आयुक्त (वि), विकास ढाकणे, उप आयुक्त, घनकचरा व्यवस्थापन संदीप कदम व तसेच माजी अतिरिक्त महापालिका आयुक्त, सुरेश जगताप आणि ज्ञानेश्वर मोळक देखील उपस्थित होते. स्वच्छ सर्वेक्षण चे ब्रैड अॅम्बॅसडर, टेनिसपटू ऋतुजा भोसले देखील उपस्थित होते.तसेच “मनाची अमर्याद शक्ती व तणावमुक्ती” या विषयावर डॉ. दत्ता कोहिनकर माईड पॉवर ट्रेनर यांनी व्याख्यान दिले. तसेच स्वच्छताविषयक कामकाज करणारे अधिकारी/कर्मचा-यांचा/क्षेत्रीय कार्यालय/मुख्य विभाग यांचा महापालिका आयुक्त यांच्या हस्ते गौरव चिन्ह व प्रशस्तीपत्र देऊन सत्कार करण्यात आला.
या प्रसंगी घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उप आयुक्त, संदीप कदम यांनी प्रास्ताविक केले. महापालिका आयुक्त, विक्रम कुमार यांनी सर्व अधिकाऱ्यांचे / कर्मचा-यांचे अभिनंदन केले व सर्व क्षेत्रीय कार्यालयामधील हद्दीत दैनंदिन काम करणाऱ्या कर्मचा-यांमुळेच ही उपलब्धी प्राप्त झाली असले बाबत नमूद करून पुढील काळामध्ये स्वच्छ सर्वेक्षण मध्ये भारतात प्रथम तीन क्रमांकामध्ये येईल याबाबत बहुमूल्य मार्गदर्शन केले व त्यासाठी लागणारी यंत्रणा/सुविधा आवश्यक असल्यास प्राधान्याने उपलब्ध करून देणेबाबत आश्वासित केले. अतिरिक्त महापालिका आयुक्त (इ), डॉ. कुणाल खेमनार,माजी अतिरिक्त आयुक्तसुरेश जगताप आणि ज्ञानेश्वर मोळक यांनी देखील आपले मनोगत व्यक्त करून कर्मचाऱ्यांना प्रोत्साहन दिले.
स्वच्छ भारत अभियान २०२३ अंतर्गत भारत सरकार, आवासन और शहरी कार्य मंत्रालय यांच्यामार्फत दिनांक ११ जानेवारी २०१४ रोजी स्वच्छ सर्वेक्षण २०२३, सफाई मित्र सुरक्षा पुरस्कार व कचरामुक्त शहर पुरस्कार वितरण समारोह भारत मंडपम, प्रगती मैदान, नवी दिल्ली येथे दिनांक ११ जानेवारी २०२४ रोजी आयोजित करण्यात आला होता.
स्वच्छ सर्वेक्षण २०२३ अंतर्गत आयोजित स्पर्धेमध्ये पुणे
१० लाख लोकसंख्येपेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या शहरांमध्ये १ क्रमांकाचे मानांकन प्राप्त झाले आहे.
तर १ लाख लोकसंख्येपेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या शहरांमध्ये भारतात १० क्रमांकाचे मानांकन व. त्याचप्रमाणे Garbage Free City (GFC) अंतर्गत ५ स्टार मानांकनाने . हरदीप सिंग पुरी, कॅबिनेट मंत्री MoHUA व मनोज जोशी, सचिव, MoHUA यांच्या हस्ते गौरविण्यात आले. पुणे महानगरपालिकेच्या वतीने महापालिका आयुक्त विक्रम कुमार, अतिरिक्त महापालिका आयुक्त (इ), डॉ. कुणाल खेमनार व घनकचरा व्यवस्थापन विभागप्रमुख, उप आयुक्त संदीप कदम यांनी पुरस्कार स्वीकारला.महापालिकेचे सर्व अधिकारी, कर्मचारी यांनी केलेले अथक परिश्रम, नागरिकांनी दिलेला सकारात्मक प्रतिसाद व स्वयंसेवी संस्था या सर्वांचे सांधिक प्रयत्न व नाविन्यपूर्ण प्रकल्पाच्या अंतर्भाव, या मुळे हा सन्मान प्राप्त झाला आहे. पुढील काळात लोकसहभागातून स्वच्छतेसाठी महापालिका आणखी प्रयत्न करेल असे मत त्यावेळी आयुक्त विक्रम कुमार का यांनी व्यक्त केले होते.
अमित राज ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली शुक्रवारी पुण्यात मोर्चा …
पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने मराठी भाषा भवनाची निर्मिती पूर्ण करणे, विद्यापीठाची शांतता भंग करणाऱ्या व्यक्तींवर कडक कारवाई करावी, तातडीने नवे वसतिगृह बांधण्याची प्रक्रिया सुरू करावी यांसह अनेक मागण्यांकरिता महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेतर्फे म.न.वि.से. अध्यक्ष तथा मनसे नेते अमित राज ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली शुक्रवार, दिनांक २३ फेब्रुवारी रोजी सकाळी १० वाजता स्थळ – जे.डब्ल्यू मॅरीऑट इंटिल चौक, सेनापती बापट मार्ग, चतुः कुंभी मंदिर पायथा ते सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ पर्यंत हा मोर्चा काढण्यात येणार आहे, अशी माहिती मनसे प्रवक्ते व म.न.वि. से. राज्य सरचिटणीस गजानन काळे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
पत्रकार परिषदेला मनसे नेते राजेंद्र वामस्कर, पुणे मनसे शहराध्यक्ष साईनाथ बाबर, म.न.वि. से. राज्य सरचिटणीस आणि प्रवक्ते मजानन काळे, म.न.वि. से. राज्य प्रमुख संघटक प्रशांत कनोजिया, राज्य सचिव आशिष सावळे-पाटील, पुणे शहराध्यक्ष अमोल शिंदे, राज्य कार्यकारिणी सचिन पवार, सारंग सराफ, अभिषेक थिटे, शैलेश विटकर, रुपेश घोलप, रवि बनसोडे आदी उपस्थित होते.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाची स्थापना ही मराठी भाषेचा प्रसार प्रचार करण्यासाठी झाली आहे. हे लक्षात घेऊन विद्यापीठाने मराठी भाषा भवनाची निर्मिती पूर्ण करून, ते विद्यार्थी नागरिकांसाठी खुले करावे. त्याचप्रमाणे शैक्षणिक विभाग आणि संलग्न महाविद्यालयात दर्शनी भागात पुणे विद्यापीठ गीत ठळक भाषेत लावणे गरजेचे आहे. तसेच सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात काही दिवसांपासून अशांतता असल्याने, विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक क्षमतेवर आणि मानसिकतेवर नकारात्मक परिणाम होत आहे. अशावेळी विद्यापीठाची शांतता भंग करणाऱ्या व्यक्तींवर कडक कारवाई करावी; तसेच धार्मिक भावना दुखावण्याचे प्रकार होऊ नये, याची काळजी घ्यावी, अशी मागणी करण्यात आली.
पुणे विद्यापीठात सुमारे तीन हजार, तर पुणे, नाशिक, नगर जिल्ह्यातील संलग्न ८०० महाविद्यालयांमध्ये सुमारे सात लाख विद्यार्थी शिक्षण घेतात. या विद्यार्थ्यांच्या शिक्षणानंतर, त्यांच्या रोजगारासाठी विद्यापीठाने शैक्षणिक संकुलात रोजगार मेळावे घ्यावेत. उद्योग आणि सेवा क्षेत्रातील नोकरीच्या संधी पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या अंतिम वर्षातील विद्यार्थ्यांना समजण्यासाठी स्वतंत्र प्लेसमेंट विभाग सुरू करून, त्याला ऑनलाइन प्लेसमेंट पोर्टलवी जोड यावी. मनुष्यबळ उपलब्ध करून द्यावे.
विद्यापीठात शिकणाऱ्या साधारण हजार विद्यार्थ्यांना अजूनही वसतिगृहाची कमतरता आहे. त्यामुळे तातडीने नवे वसतिगृह बांधण्याची प्रक्रिया सुरू करावी. परदेशात किंवा परराज्यात शिक्षणासाठी जाणा-या विद्यार्थ्यांना पदवी प्रमाणपत्र, गुणपत्रिका, ट्रांस्क्रिप्ट अशा कागदपत्रांची गरज भासते. ही कागदपत्रे लवकर मिळण्यासाठी आणि संपूर्ण प्रक्रिया पास्दी होण्यासाठी विद्यार्थी सुविधा केंद्रातील सर्व सुविधा संपूर्णपणे ऑनलाईन कराव्यात. अर्जाच्या हार्ड कॉपी आणून देण्याची प्रक्रिया बंद करावी.
अनेक महाविद्यालयांच्या संकेतस्थळ अद्यावत नसून, त्यावर फारच त्रोटक माहिती आहे. अशा सर्व महाविद्यालयांना सूचना देऊन, संकेतस्थळ अद्यावत करून, त्यावर महाविद्यालयाच्या संबंधित सर्व माहिती प्रकाशित करण्याच्या सूचना चाव्या, नगर आणि नाशिक उपकेंद्राचे काम पूर्ण करून, तेथे तातडीने रोजगाराभिमुख अभ्यासक्रम सुरू करावेत. त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांला कोणतीही अडचण आल्यास किंवा त्याला शैक्षणिक कागदपत्रांची गरज भासत्यास ते तेथूनव उपलब्ध व्हावे. संबंधित विद्यार्थ्याला पुण्यात येण्याची गरज भासू नये.
राज्यात दुष्काळ सहश्य परिस्थिती आहे. अशा परिस्थितीत विद्यापीठाने या भागातील विद्यार्थ्यांची सीएसआस्ख्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक शुल्काची; तसेच एकवेळ जेवणाची सोय करण्यासाठी पावले उचलावीत, विद्यापीठाने १११ जागांसाठी प्राध्यापक भरती सुरू केली आहे. ठी भस्ती पास्टर्जी पद्धतीने पार पाडावी आणि गुणवत्ताधास्क उमेदवारांना न्याय मिळावा. या भरतीवर ठसविक व्यक्ती किंवा संघटनेचे वर्चस्व असू नये. असे झाल्यास तीव्र स्वरूपात आंदोलन करण्यात येईल.
मिळकत कर न भरणाऱ्या मिळकतधारकांवर मिळकत जप्त करणेची धडक मोहीम…उप आयुक्त माधव जगताप
पुणे-पुणे महानगरपालिकेमधील कर आकारणी व कर संकलन विभाग हा उत्पन्नाचा महत्वाचा स्त्रोत आहे. सन २०२३-२४ या आर्थिक वर्षाकरिता देण्यात आलेल्या उद्दिष्ट पूर्ततेच्या अनुषंगाने कर आकारणी व कर संकलन कार्यालयाकडून थकबाकी वसुली, मिळकत जप्तीची व आकारणी करण्याची मोहीम हाती घेतली आहे.अशी माहिती येथे उप आयुक्त ,आणि कर आकारणी व कर संकलनप्रमुख माधव जगताप यांनी दिली .
ते म्हणाले,’ पुणे महानगरपलिका कार्यक्षेत्रातील ज्या मिळकतधारकांनी अद्यापही मिळकत कर भरलेला नाही, अशा थकबाकी असलेल्या मिळकती जप्त करण्याची तीव मोहीम दिनांक २२/०२/२०२४ पासून सुरु करण्यात येत आहे. त्याअनुषंगाने पुणे महानगरपालिका कार्यक्षेत्रात परिमंडळ निहाय पथके तयार करण्यात आलेली आहेत.नागरिकांना मिळकत कर भरणे सुलभ व्हावे याकरिता सर्व शासकीय सुट्टीच्या दिवशी व प्रत्येक शनिवार सकाळी १० ते दुपारी ४:०० वाजेपर्यंत व रविवार सकाळी १०:०० ते दुपारी २:०० वाजेपर्यंत नागरी सुविधा केंद्रे सुरु ठेवण्यात आली आहेत.नागरी सुविधा केंद्र सुरु राहणार असले तरी, नागरिकांनी जास्तीत जास्त online प्रणालीद्वारे “propertytax.punecorporation.org” या संकेतस्थळावरून मिळकत कर भरणे बाबत आवाहन करण्यात येत आहे.
जादुई आवाजाचा विनम्र निवेदक ; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ज्येष्ठ निवेदक अमीन सयानी यांना श्रद्धांजली
मुंबई, दि. २१ :- ज्येष्ठ रेडिओ निवेदक अमीन सयानी यांच्या निधनाबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दु:ख व्यक्त करून, त्यांना विनम्र श्रद्धांजली अर्पण केली आहे.
शोकसंदेशात मुख्यमंत्री म्हणतात, अमीन सयानी यांच्या रसाळ शैलीतल्या निवेदनांमुळे श्रोते मंत्रमुग्ध होऊन जात. त्यांच्या जादुई आवाजाची भुरळ मागील काही पिढ्यांपासून अगदी आत्ताच्या पिढीपर्यंत देखील टिकून आहे. अमीन सयानी हे त्यांच्या आवाजाने करोडो कुटुंबातले सदस्यच झाले होते. त्यांच्या जाण्याने रेडिओच्या चाहत्यांत विनम्र असा आपला माणूस हरपल्याची भावना आहे, असे नमूद करून मुख्यमंत्र्यांनी अमीन सयानी यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली आहे.
79% भारतीय सुट्टीवर असताना घराच्या सुरक्षेची करतात चिंता
मुंबई,21 फेब्रुवारी,2024: सुट्ट्या म्हणजे आराम करणे, टवटवीत करणे आणि रोजच्या धकाधकीतून विश्रांती घेणे. आपल्या घराबद्दल सतत चिंता करत राहणे ही गोष्ट सुट्टीच्या दिवशी आपल्यापैकी कोणालाही अगदीच शेवटची असते. तरीही, गोदरेज समूहाची प्रमुख कंपनी, गोदरेज आणि बॉईसचा व्यवसाय, गोदरेज लॉक्स अँड आर्किटेक्चरल फिटिंग्ज अँड सिस्टीम्सच्या ‘Live Safe, Live Freely’ या नवीन संशोधन अभ्यासात असे आढळून आले आहे की अशी चिंता अनेकदा सुट्टीच्या प्लॅनिंगमध्ये व्यत्यय आणतात.
याबाबत बोलताना गोदरेज लॉक्स आणि आर्किटेक्चरल फिटिंग्ज अँड सिस्टीम्सचे बिझनेस हेड श्याम मोटवानी म्हणाले की, ‘LiveSafe, LiveFreely’ या अभ्यासाचे निष्कर्ष हे उघड करतात की सुट्टीतील प्रवासी त्यांच्या घराच्या सुरक्षिततेच्या चिंतेत कायम असतात. दारं नीट लावली होती की नाही हे प्रश्न त्यांच्या मनात वेकेशनवर असताना रेंगाळत राहतात. हे स्पष्ट आहे की चिंतामुक्त प्रवासासाठी घराची सुरक्षितता सुनिश्चित करणे सर्वात आवश्यक आहे. घराच्या सुरक्षेत तंत्रज्ञानाची महत्त्वाची भूमिका या अभ्यासात अधोरेखित करण्यात आली आहे, ज्यामुळे व्यक्तींना त्यांच्या व्हेकेशनचा पूर्ण आनंद लुटता येतो. डिजिटल लॉकसारख्या प्रगत उपायांसह, व्यक्ती आता चिंतामुक्त प्रवास करू शकतात, कारण ते हे लॉक दूरस्थपणे मोबाईल ॲपद्वारे Wi-Fi सह जगातील कोठूनही ऑपरेट करू शकतात. गोदरेज लॉक्स आणि आर्किटेक्चरल फिटिंग्ज आणि सिस्टम्समध्ये, सुरक्षिततेशी तडजोड न करता व्यक्तींना मुक्तपणे जगण्यासाठी चिंतामुक्त करणारे अत्याधुनिक उपाय प्रदान करण्याची आमची वचनबद्धता आहे.”
‘LiveSafe,LiveFreely’ या अभ्यासाचा उद्देश भारतीयांच्या जीवनशैलीबद्दल आणि घराच्या सुरक्षिततेसाठी तंत्रज्ञानाच्या निवडीबद्दल मौल्यवान माहिती देणे, त्यांना मानसिक शांती आणि चिंता न करता जगण्याचे स्वातंत्र्य देणे हा आहे.
प्रवास हा अभ्यासाचा एक महत्त्वाचा फोकस क्षेत्र म्हणून उदयास आला असून, प्रतिसादकर्त्यांपैकी 79% लोकांना सर्व दारे आणि खिडक्या व्यवस्थित लॉक केल्या आहेत की नाही याविषयी व्हेकेशनवर असताना सतत चिंता वाटत असते. शिवाय, 40 टक्के लोकांनी वृद्ध पालकांनी त्यांच्या चाव्या विसरल्याबद्दल किंवा हरवल्याबद्दल आणि लॉक आउट केल्याबद्दल चिंता व्यक्त केली आहे.जर त्यांच्या घराची चिंता त्यांना नसेल तर ते लांब व्हेकेशनला वर्केशनमध्ये बदलू इच्छितात असे 48 टक्के लोकांचे म्हणणे असल्याचे या संशोधन अभ्यासात दिसून आले आहे. टेक गॅजेट वापरू इच्छितात घराची सुरक्षा दिवसातून एकदा तरी तपासू इच्छितात असे 49 टक्के लोकांचे म्हणणे आहे. 29 टक्के लोक म्हणतात की ते त्यांच्या घराची सुरक्षितता ऑफिसमध्ये बसून दर तीन तासांनी तपासतील.
सुरक्षितता आणि सुविधा सुनिश्चित करण्यासाठी स्मार्ट-होम उपकरणांचा अवलंब करताना मानवी वर्तन समजून घेण्याचे उद्दिष्ट ‘LiveSafe,LiveFreely’ या अभ्यासाचे आहे. मुंबई, दिल्ली, कोलकाता, बंगळुरू आणि भोपाळ या पाच शहरांमध्ये 2,000 व्यक्तींचे सर्वेक्षण करून हा अभ्यास करण्यात आला आहे.
सान्या मल्होत्राला ने पटकवला “कठल ” साठी दादासाहेब फाळके पुरस्कार
सान्या मल्होत्राने नुकत्याच झालेल्या दादासाहेब फाळके पुरस्कार सोहळ्यात एक खास पुरस्कार पटकावला आहे. कठल मधल्या एका कॉमिक रोलमधील सर्वोत्कृष्ट अभिनेत्री पुरस्कार पटकावला. सान्याने कठल मध्ये एक आकर्षक सादरीकरण केले आणि इन्स्पेक्टर महिमा बसोद च अनोखं पात्र साकारून तिने ही भूमिका पार पाडली आहे.
उत्कृष्ट कॉमिक टाइमिंगने तिने प्रेक्षकांना मोहित केलं. दादासाहेब फाळके पुरस्कार प्राप्त केल्याने भारतीय चित्रपटसृष्टीतील त्यांच्या उल्लेखनीय योगदानाची आणि प्रभावी कामगिरीसाठी तिच्या समर्पणाची कबुली दिली जाते. कठल व्यतिरिक्त जवान’ आणि ‘सॅम बहादूर’ मधील सान्याने केलेल्या प्रशंसित कामगिरीने तिच्या अष्टपैलुत्वावर प्रकाश टाकला. सान्या सध्या “मिसेस” च्या रिलीजच्या तयारीत आहे. जो “द ग्रेट इंडियन किचन” या गाजलेल्या मल्याळम चित्रपटाचा रिमेक आहे आणि आरती कडव दिग्दर्शित आहे. ती वरुण धवनसोबत ‘बेबी जॉन’मध्ये दिसणार आहे
आई आणि मुलीच्या नात्यावर भाष्य करणारा ‘मायलेक’ येणार १९ एप्रिलला
आई आणि मुलीच्या हळव्या नात्यावर भाष्य करणाऱ्या’मायलेक’ चित्रपटाचे नवीन पोस्टर प्रेक्षकांच्या भेटीला आले असून या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीखही जाहीर करण्यात आली आहे. येत्या १९ एप्रिल रोजी माय लेकीची ही गोड कहाणी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ब्लुमिंग लोटस प्रोडक्शन्स, सोनाली सराओगी प्रस्तुत या चित्रपटाच्या प्रियांका तन्वर दिग्दर्शिका आहेत. तर या चित्रपटात सोनाली खरे, सनाया आनंद, उमेश कामत, बिजय आनंद, शुभांगी लाटकर, संजय मोने, महेश पटवर्धन, वंश अग्रवाल यांच्या प्रमुख भूमिका आहेत. या चित्रपटाच्या निमित्ताने रिअलमधील मायलेक रीलमध्ये एकत्र पाहायला मिळणार आहेत. कल्पिता खरे, बिजय आनंद या चित्रपटाचे निर्माते असून नितीन प्रकाश वैद्य असोसिएट प्रोड्यूसर आहेत.
आई आणि मुलीचे नाते हे नेहमीच खास असते. कधी त्या मैत्रिणी असतात, तर कधी त्यांच्यात रुसवे फुगवेही असतात. कधी मुलगी आई बनून आईला साथ देते. तर कधी आई मुलीच्या मागे खंबीरपणे उभी राहते. या नात्यातील अशीच अनोखी गंमत या चित्रपटात पाहायला मिळणार आहे. पोस्टरमध्ये सोनाली खरे आणि सनाया आनंद यांच्या नात्यातील सुंदर केमिस्ट्री पाहायला मिळत आहे. त्यामुळे आता यांचे नाते कसे असणार, हे चित्रपट पाहिल्यावरच कळणार आहे.
चित्रपटाबद्दल निर्माती सोनाली खरे म्हणतात, ” आई मुलीच्या सुंदर नात्याची कथा या चित्रपटात दाखवण्यात आली आहे. यात प्रेमासोबत काही आंबट गोड क्षणही आहेत. प्रत्येक आईमुलीला हा चित्रपट जवळचा वाटेल. मुळात आम्ही खऱ्या मायलेकी असल्याने हे पडद्यावर खूप नैसर्गिकरित्या साकारता आले.”
दिग्दर्शिका प्रियांका तन्वर म्हणतात, ” हा विषय खूप संवेदनशील आहे. विशेषतः मुली जेव्हा वयात येतात. त्यावेळी आई आणि मुलीचे नाते खूपच नाजूक वळणावर असते. यात एकतर मुलगी आणि आई मैत्रिणी तरी होतात किंवा मग त्यांच्यात नकळत दुरावा तरी निर्माण होतो. मग अशा वेळी दोघीनींही एकमेकींना समजून घेणे गरजेचे आहे. विषय जरी नाजूक असला तरी खूप हलक्याफुलक्या पद्धतीने मांडण्याचा प्रयत्न केला आहे. हा एक कौटुंबिक चित्रपट आहे.
पुण्यात सापडलेल्या ४ हजार कोटींच्या ड्रग्जचे गुजरात कनेक्शन सांगाल का?
राज्यातील तरुणांना धर्माची अफू व ड्रग्जचे विष देऊन बदबाद करण्याचे महायुतीचे सरकारचे पाप: नाना पटोले
ब्लॅकलिस्टेड BVG कंपनीलाच पुन्हा ऍम्ब्युलन्सचे कंत्राट, मुख्यमंत्र्यांच्या जवळच्या दोघांचा सहभाग.
मुंबई, दि. २१ फेब्रुवारी
पुण्यात तीन दिवसात तब्बल ४ हजार कोटी रुपयांचे अंमली पदार्थ सापडणे अत्यंत गंभीर व चिंताजनक आहे. गुजरातमधील मुंद्रा बंदरातून हजारो टन ड्रग्जचा धंदा होत असल्याचे वारंवार उघड झाले आहे. मुंद्रा बंदराचा मालक व भाजपाचे ‘आका’ यांचे काय संबंध आहेत, हे जगजाहीर आहे. महायुती सरकार राज्यातील तरुणांना धर्माचा अफू व ड्रग्जचे विष देऊन बरबाद करण्याचे काम करत आहे, असा हल्लाबोल महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी केला आहे.
टिळक भवन येथे पत्रकारांशी बोलताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले की, राज्यात अंमलीपदार्थांचा काळा धंदा जोरात सुरु आहे. याआधी नाशिक, छत्रपती संभाजी नगर, अमरावती, सोलापूर मध्येही अंमलीपदार्थांचे मोठे साठे सापडले होते. पोलिसांनी थातूर मातूर कारवाई केली, ड्रग माफिया मात्र मोकाटच राहिले म्हणूनच पुण्यात ४ हजार कोटी रुपयांचे ड्रग्ज सापडले आहेत. राज्यात कायदा सुव्यवस्थेचे तर धिंडवडेच निघाले आहेत. विधानसभेत राज्याचा एक वरिष्ठ मंत्रीच त्यांना धमक्या येत असल्याचे सांगतात यावरून कायदा सुव्यवस्थेची काय परिस्थिती आहे हे लक्षात येते. हे सरकार भ्रष्ट असून फक्त तिजोरी लुटण्यात व्यस्त आहे.
ब्लॅकलिस्टेड BVG कंपनीलाच पुन्हा ऍम्ब्युलन्सचे कंत्राट..
ऍम्ब्युलन्स सेवा पुरवणाऱ्या BVG कंपनीला देशभरातील ७ राज्यांनी ब्लॅकलिस्ट केले आहे, या कंपनीला काम देऊ नये असे आदेश आहेत. BVG कडे जुन्या व कालबाह्य झालेल्या ऍम्ब्युलन्स आहेत. कोरोना काळात या कंपनीला मुदतवाढ दिली होती, त्यानंतर नवीन टेंडर काढून दुसऱ्या कंपनीला कंत्राट द्यायला पाहिजे होते परंतु महायुती सरकारने पुन्हा BVG ह्याच कंपनीला कंत्राट दिले आहे. BVG कंपनीवर एवढी मेहरबानी दाखवायला या कंपनीचा मालक काय सरकारचा जावई आहे का? असा प्रश्न विचारत या ब्लॅकलिस्टेड कंपनीला कंत्राट देण्यात मुख्यमंत्र्यांच्या जवळच्या दोन लोकांचा सहभाग आहे, असा आरोप नाना पटोले यांनी केला आहे.
आंदोलक शेतकऱ्यांवर गोळ्या झाडण्याची नरेंद्र मोदींची तयारी!: नाना पटोले
अत्याचारी मोदी सरकारला शेतकरीच सत्तेवरून खाली खेचणार!
काँग्रेस सत्तेवर आल्यानंतर शेतमालाच्या हमी भावाचा कायदा करणार.
मुंबई, दि. २१ फेब्रुवारी
शेतमालाला किमान आधारभूत किंमत देण्याचा (MSP) कायदा करावा या मागणीसाठी दिल्लीच्या सीमेवर लाखो शेतकरी आंदोलन करत आहेत. हे शेतकरी दिल्लीत पोहचू नयेत म्हणून हुकूमशाही मोदी सरकारने रस्त्यावर खिळे ठोकले आहेत, सिमेंटच्या भिंती उभ्या केल्या आहेत. शेतकऱ्यांचे आंदोलन मोडून काढण्यासाठी मोदी सरकार कोणत्याही थराला जाऊ शकते. आंदोलक शेतकऱ्यांवर गोळ्या झाडण्याची तयारीही पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केली असल्याचा गंभीर आरोप महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी केला आहे.
शेतकरी आंदोलनावर बोलताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले की, शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याचे आश्वासन देऊन सत्तेत आलेल्या मोदी सरकारच्या १० वर्षांच्या काळात शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढलेले नाही उलट शेतकरी देशोधडीला लागला आहे. दोन वर्षापूर्वी लाखो शेतकऱ्यांनी तीन काळ्या कायद्याविरोधात वर्षभर तीव्र आंदोलन केले होते. या आंदोलनात ७०० शेतकऱ्यांचा मृत्यू झाला तरिही निर्ढावलेल्या, गेंड्याच्या कातडीच्या हुकूमशाही सरकारने शेतकऱ्यांचा वर्षभर छळ केला. खलिस्तानी, नक्षलवादी, आंदोलजीवी म्हणून अपमान केला. शेवटी निवडणुकीच्या तोंडावर सरकार नमले व काळे कायदे रद्द केले पण शेतमालाला हमी भाव देण्याचा कायदा मात्र अद्याप केला नाही, याच मागणीसाठी शेतकरी रस्त्यावर उतरला आहे. मोदी सरकारने या शेतकऱ्यांवर अश्रूधुरांच्या नळकांड्या फोडल्या, त्यांची धरपकड सुरु केली आहे. दिल्लीच्या तीन्ही सीमांवर पोलिसांबरोबरच निमलष्करी दलाचे जवान मोठ्या संख्येने तैनात करण्यात आले आहेत. शेतकरी देशाचा नागरिक नाही का? आपल्या मागण्यांसाठी दिल्लीत येण्यापासून त्यांना रोखण्याचे कारण काय? आणि शेतकऱ्यांशी चर्चा करण्यास पंतप्रधान नरेंद्र मोदींना कमीपणा वाटतो का? १० वर्षापासून मोदी सरकारने शेतकऱ्यांवर अत्याचार केले आहेत. शेतकरी आत्महत्या वाढल्या आहेत. शेती साहित्यावर १८ टक्के जीएसटी लावून शेतकऱ्यांना लुटले जात आहे. शेतकरी सन्मान योजनेखाली शेतकऱ्यांचा अपमानच केला जात आहे. शेतकऱ्यांवर अत्याचार करणाऱ्या भाजपा सरकारला हा शेतकरीच सत्तेतून खाली खेचल्याशिवाय गप्प बसणार नाही.
काँग्रेस पक्ष नेहमीच शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहिला आहे. दोन वर्षापूर्वी झालेल्या शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देत काँग्रेसने देशभर आंदोलने केली. खा. राहुल गांधी यांनी स्वतः या आंदोलनात सहभाग घेतला होता. शेतकऱ्यांनी आता केलेल्या मागण्यांनाही काँग्रेसचा पाठिंबा आहे. काँग्रेस पक्ष केंद्रात सत्तेत आला तर हमी भावाचा कायदा करण्याचे आश्वासनही काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जून खरगे व खा. राहुल गांधी यांनी जाहीरपणे दिले आहे, असेही नाना पटोले म्हणाले.
निवडणुकांच्या तोंडावर मराठा समाजाची दिशाभूल :- ॲड. यशोमती ठाकूर
मुंबई,
राज्य सरकारने आज मोठा गाजावाजा करत मराठा समाजाला दहा टक्के आरक्षण जाहीर केले आहे. याबद्दल मराठा समाजाचे अभिनंदनच मात्र, हे आरक्षण कायद्याच्या कसोटीवर टिकणारे आहे का? याबाबतची स्पष्टता सरकारला करता आली नाही. त्यामुळे पुन्हा एकदा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मराठा समाजाची दिशाभूल करण्याचे काम सरकारने केले आहे, अशी प्रतिक्रिया माजी मंत्री आणि काँग्रेसच्या नेत्या आमदार ॲड. यशोमती ठाकूर यांनी व्यक्त केली आहे.
यासंदर्भात बोलताना ॲड. ठाकूर पुढे म्हणाल्या की, राज्य सरकारने मराठा समाजाला नोकरी आणि शिक्षणात दहा टक्के आरक्षण देण्याचे विधेयक मांडले. या विधेयकाला काँग्रेसचे सुरुवातीपासूनच समर्थन होते. मराठा समाजाला आरक्षण मिळावे अशीच आमची ही भूमिका होती. मात्र, हे आरक्षण न्यायालयात टिकणारे, कायद्याच्या कसोटीवर आधारलेले असावे, अशी आमची भूमिका होती. त्या दृष्टीने आम्ही सभागृहात सरकारकडे चर्चेची मागणी केली मात्र सरकारने आम्हाला सभागृहात बोलू दिले नाही. जर सरकारचा हेतू शुद्ध होता तर विरोधी पक्षाला बोलण्याची संधी का दिली गेली नाही? याचा अर्थ सरकारने आणलेले विधेयक हे केवळ आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मराठा समाजाची दिशाभूल करणारे विधेयक आहे. मराठा समाजाला दिलेले दहा टक्के आरक्षण हे पुन्हा एकदा कोणत्याही कायदेशीर आधाराशिवाय दिले गेले आहे का? याबाबत सरकारने स्पष्टता केलेली नाही. मराठा समाजाचे आंदोलन नेते मनोज जरांगे पाटील यांनी या विधेयकात सगे सोयरे या शब्दाचा अंतर्भाव करण्यात यावा, अशी मागणी केली होती. मात्र, या विधेयकामध्ये हा शब्द कुठेही दिसून येत नाही. त्यामुळे या सरकारने पुन्हा एकदा मराठा समाजाला या निमित्ताने वाटाण्याच्या अक्षता लावण्याचे काम केले असल्याचे दिसते. न्यायालयात हे विधेयक टिपणे गरजेचे आहे, तरच मराठा समाजाला न्याय दिल्यासारखे होईल. मात्र सध्या तरी सरकारने घाई घाईत का होईना, पण मराठा समाजाला दहा टक्के आरक्षण देण्याचे औदार्य दाखवले आहे, आरक्षणासाठी गेले काही महिने सातत्याने लढा देणाऱ्या मराठा समाजातील सर्व बांधवांचे अभिनंदनही ॲड. ठाकूर यांनी यावेळी केले.
महाराष्ट्राला संरक्षण उत्पादनाचे प्रमुख केंद्र बणवणारा डिफेन्स एक्स्पो
एक वेळ अशी होती की, अमेरिकेच्या दबावापुढे झुकलेल्या रशियाने भारताला क्रायोजेनिक इंजिन प्रणाली देण्यास नकार दिला. प्रक्षेपण यानामध्ये असणारे हे इंजिन म्हणजे अतिवजनाच्या उपग्रहांना अंतरिक्षात पोहचवणारी अश्वशक्ती क्षमता आहे. आपल्या पीएसएलव्ही म्हणजेच भूउपग्रह प्रक्षेपण यानाचे यश याच इंजिनावर अवलंबून आहे. रशियाच्या नकारानंतर आपल्या वैज्ञानिकांनी दूरदृष्टी दाखवत स्वदेशी तंत्रज्ञानाचा वापर करून काही वर्षातच क्रायोजेनिक इंजिन तयार केले. तेव्हापासून भारतीय वैज्ञानिकांनी इतर देशांसमोर हात पसरण्यापेक्षा वेळोवेळी आव्हाने स्वीकारत देशी बनावटीचे तंत्रज्ञान विकसित करत अंतराळ संशोधनात आज पहिल्या पाच देशांमध्ये आपले स्थान पक्के केले आहे.
हीच स्थिती संरक्षण शस्त्रास्त्रे व साहित्य खरेदीबाबतही होती. अमेरिका शस्त्रास्त्रे निर्मिती करण्यात आणि विकण्यातही अग्रेसर आहे. याचप्रमाणे, रशिया, फ्रांस, इजराईल, उत्तर व दक्षिण कोरिया हे देशही यात आघाडीवर आहेत. पण आज भारत अनेक शस्त्रास्त्रे स्वदेशी बनावटीची वापरतो. स्वदेशी तंत्रज्ञान ही संकल्पना सरंक्षण क्षेत्रात आणल्यानंतर मोठ्या प्रमाणात सरंक्षण उत्पादने तयार करणाऱ्या एमएसएमई देशात तयार झाल्या आहेत. आज देशात मोठ्या प्रमाणात संरक्षण साहित्य निर्माण होत आहे. यात महाराष्ट्र आघाडीवर असुन राज्यात १० ऑर्डंनन्स फॅक्टरी आणि ५ डिफेन्स पीएसयू आहेत. टाटा, भारत फोर्ज, सोलार, एल ॲंड टी, महिंद्रा, निबे अशा मोठ्या कंपन्या राज्यात संरक्षण क्षेत्रात नाविन्यपूर्ण उपादने तयार करीत आहेत.
भारताच्या संरक्षण उत्पादन क्षेत्रात आत्मनिर्भर भारताच्या वाटचालीला आणखी बळकटी देण्यासाठी राज्य शासनाच्या उद्योग विभागामार्फत महाराष्ट्रातील संरक्षण साहित्य उत्पादन करणाऱ्या सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योग क्षेत्राला चालना देण्याच्या उद्देशाने २४ ते २६ फेब्रुवारी २०२४ दरम्यान ‘महाराष्ट्र एमएसएमई डिफेन्स एक्स्पोचे’ आयोजन करण्यात आले आहे. पुण्यातील मोशी येथे आंतरराष्ट्रीय प्रदर्शन आणि कन्व्हेन्शन सेंटर येथे हा एक्स्पो होत आहे. विशेष म्हणजे संरक्षण उत्पादन क्षेत्रात महत्त्वपूर्ण योगदान देण्यासाठी राज्यातील सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांना (MSMEs) सक्षम करणारा महाराष्ट्रातील या प्रकारातील हा पहिलाच डिफेन्स एक्स्पो आहे.
संरक्षण उत्पादन क्षेत्रातील अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि प्राविण्य असणाऱ्या उद्योगातील समन्वयाला चालना देण्याच्या उद्देशाने वायुसेना, नौसेना आणि स्थलसेना या तीनही सुरक्षा दलांचा यात महत्वाचा सहभाग असणार आहे. या एक्स्पोमध्ये सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योग, स्टार्ट-अप आणि अभियांत्रिकी विद्यार्थी एकत्र येऊन ज्ञान आणि तंत्रज्ञानाची देवाणघेवाण करतील. यात एल ॲंड टी, महिंद्रा, टाटा, डीआरडीओ आणि संरक्षण क्षेत्रातील सार्वजनिक क्षेत्रातील कंपन्या -पीएसयु (PSUs) यासह विविध प्रतिष्ठित उद्योगातील तज्ज्ञ असतील. हा एक्स्पो महाराष्ट्राला संरक्षण उत्पादनाचे प्रमुख केंद्र म्हणून निश्चितच पुढे नेणारा ठरणार आहे.
भारताच्या संरक्षण क्षेत्रात महाराष्ट्राची भूमिका
भारताच्या संरक्षण क्षेत्रात महाराष्ट्राची भूमिका अतिशय महत्वाची आहे. याचे प्रमुख कारण म्हणजे देशाच्या ४० पैकी १० संरक्षण उत्पादन आणि आयुध निर्माण करणारे कारखाने महाराष्ट्रात आहेत. मुंबई हे भारतीय नौदलाच्या पश्चिम कमांडचे मुख्यालय आहे. भारतीय नौदलाचे जनक छत्रपती शिवाजी महाराज यांची भूमी असलेले पुणे, भारतीय लष्कराच्या दक्षिण कमांडचे मुख्यालय आहे. राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीचेही (NDA) मुख्यालय आणि सरंक्षण संशोधन आणि विकास संस्था (DRDO) देखील याच जिल्ह्यात महत्त्वाची भूमिका बजावत आहे. पुण्याचे महत्त्व अधोरेखित करणारे सशस्त्र सेना वैद्यकिय महाविद्यालय आणि मुनिशन इंडिया लिमिटेडचे मुख्यालयदेखील पुण्यात आहे. भारतीय लष्कराचे आर्मड् कॉर्प्स स्कूल आणि सेंटर (ACS&C) हे महाराष्ट्रातील अहमदनगर जिल्ह्यात पुण्यापासून सुमारे 120 किलोमीटर अंतरावर आहे. लष्कराशी संबंधित एवढ्या मोठ्या यंत्रणा एकाच राज्यात असणारे महाराष्ट्र हे एकमेव राज्य आहे.
एक्स्पोची मुख्य उद्दिष्टे
सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योग( MSME) डिफेन्स एक्स्पो हे एक अभूतपूर्व प्रदर्शन असणार आहे. या क्षेत्रातील नवकल्पना आणि उद्योजकतेला प्रोत्साहन देण्यासोबतच संरक्षण क्षेत्रातील प्रमुख खरेदीदार म्हणजे तीनही सैन्य दल आणि विक्रेता यांच्यातील संपर्क वाढवणे, महाराष्ट्रातील डिफेन्स एमएसएमईची तयार झालेली इकोसिस्टम अधिक बळकट करण्यासोबतच संरक्षण क्षेत्रातील खरेदीदारांसाठी अर्थपूर्ण संवाद निर्माण करणे, यासोबतच व्यवसायाच्या परस्पर फायदेशीर संधी ओळखण्यासाठी ‘डायनॅमिक फोरमची’ स्थापना करणे, संरक्षण उत्पादन क्षेत्रात नावीन्यपूर्ण उद्योजकतेची संस्कृती जोपासणे, अत्याधुनिक उपायांच्या विकासास प्रेरणा व प्रोत्साहन देणे, धोरणात्मक उपक्रम राबवून शाश्वत आणि मजबूत वाढीसाठी आवश्यक सहाय्य प्रदान करून महाराष्ट्रातील एमएसएमई क्षेत्राच्या विस्तारासाठी सक्रियपणे योगदान देणे, महत्त्वाच्या क्षेत्रातील एमएसएमईसाठी अनुकूल संधी निर्माण करून खरेदीदार आणि विक्रेते यांच्यातील संपर्क मजबूत करणे हे या एक्स्पोमागील महत्त्वाचे उद्देश आहेत.
शिवाय महाराष्ट्रात डायनॅमिक एमएसएमई जाळ्यासाठी एक मजबूत आणि टिकाऊ पुरवठा साखळी फाउंडेशनची स्थापना करणे, संरक्षण उत्पादन आणि निर्यातीसाठी मार्ग मोकळा करणे, शैक्षणिक-उद्योग सहकार्याच्या प्रगतीद्वारे राज्य आणि राष्ट्रासाठी एक शक्तिशाली परिसंस्था उत्प्रेरित करणे हा या प्रदर्शनाचा उद्देश आहे.
महाराष्ट्राचे सक्षमीकरण: एमएसएमई, संरक्षण आणि तंत्रज्ञान
महाराष्ट्रातील स्टार्ट-अप कंपन्यांद्वारे तयार केले जाणारे काही भविष्यकालीन स्वदेशी तंत्रज्ञान हे संरक्षण तंत्रज्ञान क्रांतीचे पुढचे पाऊल ठरणार आहे. त्यामुळे राज्य या क्षेत्रात निश्चितच आघाडी घेईल यात शंका नाही. यातील महत्वाच्या बाबी अशा आहेत.
हवाई देखरेखीसाठी ड्रोन- पुरवठा आणि ड्रॉप डाऊनची क्षमता असलेले हे पहिले आणि एकमेव मानव-पोर्टेबल स्वायत्त ड्रोन आहे.
व्हिजन प्रोसेसिंग सिस्टीम उत्पादन- रणांगणाचे रिअल-टाइम चित्रण दाखवते. प्रगत इमेजिंग आणि सेन्सर तंत्रज्ञान एकत्र करते; यात दिवस आणि रात्रीचे चित्रण दाखवण्याची क्षमता आहे.
जैव-पॉलिमर प्लॅटफॉर्म – जखमेच्या काळजीसाठी आधारित उत्पादने- हे बायोएक्टिव्ह मायक्रोफायबर जेलिंग तंत्रज्ञानावर आधारित हेमोस्टॅटिक मलमपट्टी करते.
रोबोटिक सोल्यूशन्स- एकत्रित कार्यरत प्रणाली (युनिफाइड ऑपरेटिंग सिस्टीम) अनेक क्षेत्रांमध्ये जोडलेले रोबोट्स व्यवस्थापित करण्यात मदत करते.
दृष्य पाळत प्रणाली- हे संरक्षण आणि एरोस्पेस संस्थांसाठी उच्च-स्तरीय इलेक्ट्रो-ऑप्टिक पाळत ठेवणारी प्रणाली आहे .
लढाऊ शस्त्र प्रणाली – या टाक्या इंजिनसह मागील चाकांना शक्ती पुरवणारा मोटारीच्या यंत्राचा भाग, लढाऊ चिलखत,युद्ध भूमीवर ॲंटीड्रोन संरक्षण प्रणालीसह एकत्रीकरणासाठी तयार केल्या आहेत.
अशा नाविन्यपूर्ण तंत्रज्ञानासह महाराष्ट्र या एक्स्पोमध्ये आपली क्षमता सिद्ध करेल. त्याचबरोबर या प्रदर्शनात अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांशी प्रत्येक सत्रात होणारा संवाद विद्यार्थ्यांच्या भविष्यातील कारकिर्दीला वेगळा आयाम आणि प्रेरणा देणारा ठरेल. यातूनच भविष्यात काही नाविन्यपूर्ण स्टार्ट अप्स सुरु होतील यात शंका नाही.
मनीषा सावळे
वरिष्ठ सहायक संचालक
माहिती व जनसंपर्क.
‘इशरे,पुणे’ ला सर्वोत्कृष्ट कामगिरीचा पुरस्कार
‘इंडियन सोसायटी ऑफ हीटिंग रेफ्रिजरेटिंग अँड एअर कंडिशनिंग इंजिनियर्स कडून गौरव
पुणे :
द इंडियन सोसायटी ऑफ हीटिंग रेफ्रिजरेटिंग अँड एअर कंडिशनिंग इंजिनियर्स (इशरे) च्या पुणे शाखेला सर्वोत्कृष्ट कामगिरीचा राष्ट्रीय पुरस्कार नवी दिल्ली येथे नुकत्याच झालेल्या कार्यक्रमात प्रदान करण्यात आला.हॉटेल ली मेरिडियन, नवी दिल्ली येथे राष्ट्रीय अध्यक्ष योगेश ठक्कर हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. पाचशेहुन जास्त सभासद असलेल्या विभागात पुणे चॅप्टर ला २०२३-२४ चा सर्वोत्तम चॅप्टर म्हणून पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.
इशरे ,पुणे चॅप्टर तर्फे हा पुरस्कार अध्यक्ष नंदकिशोर कोतकर आणि नियोजित अध्यक्ष आशुतोष जोशी यांनी राष्ट्रीय अध्यक्ष योगेश ठक्कर यांच्याकडून स्वीकारला. इशरेची संपूर्ण देशात वाढ, प्रगती आणि समृद्धी करण्याकरिता इशरे पुणे चॅप्टर चे माजी अध्यक्ष रमेश परांजपे यांना उत्कृष्ट सेवा पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. तसेच इशरे पुणे चॅप्टरचे माजी अध्यक्ष जयंत देशपांडे, दीपक वाणी, वीरेंद्र बोराडे, सदस्य सौ अनुश्री रिसवाडकर आणि सुबोध मुरकेवार याना पुणे चॅप्टर करीता उल्लेखनीय कामगिरी करण्यासाठी या कार्यक्रमात विशेष पुरस्काराने गौरविण्यात आले.
या कार्यक्रमाला इशरे पुणे चे नंदकिशोर माटोडे, चेतन ठाकूर, सुभाष खनाडे, अमित गुलवाडे, उल्हास वटपाळ ,विमल चावडा , शामकांत मिराशी ,श्री .शशीधर , देशांतर्गत आणि आंतराष्ट्रीय इशरे चॅप्टर चे १०० हुन अधिक प्रतिनिधी उपस्थित होते. इशरे मुख्यालयाचे पंकज धारकर ,अनुप बलानी , मनीष गुलालकारी आणि विविध मान्यवर उपस्थित होते.
‘महाराष्ट्रातील पाणी : वस्तुस्थिती ,समस्या आणि उपाय’ या विषयावर राज्यस्तरीय परिषद
२५ फेब्रुवारी रोजी पुण्यात आयोजन
पुणे :
‘पुणे फोरम फॉर पॉलिसी अँड गव्हर्नन्स ‘या संस्थेतर्फे ‘महाराष्ट्रातील पाणी : वस्तुस्थिती ,समस्या आणि उपाय’ या विषयावर राज्यस्तरीय परिषद रविवार, दि २५ फेब्रुवारी २०२४ रोजी गोखले राज्यशास्त्र व अर्थशास्त्र संस्थेचे सभागृह, पुणे येथे आयोजित करण्यात आली आहे.पाणी वापर आणि सिंचनाशी संबंधित विषयांवर चर्चासत्रे,सादरीकरणे,खुली चर्चा असे या एकदिवसीय परिषदेचे स्वरूप आहे.पाणी वापर आणि सिंचनाशी संबंधित कार्यक्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्ती, संस्था, अभ्यासक,अधिकारी सहभागी होणार आहेत.’पुणे फोरम फॉर पॉलिसी अँड गव्हर्नन्स ‘या संस्थेचे अध्यक्ष शशिकांत पाटील,उपाध्यक्ष रवींद्र जायभाये यांनी पत्रकाद्वारे ही माहिती दिली.
परिषदेत सहभागी होण्यासाठी विनामूल्य पूर्व नोंदणी आवश्यक असून https://docs.google.com/forms/d/e/1FAIpQLSeT3qV6Jss4EQGWXOonz0TC0lSFDzBGLFso6npPZ89-DGGghw/viewform?vc=0&c=0&w=1&flr=0&fbclid=IwAR37l-76Sp8k9kbXxMfCRBQ81gY_w4xkW08UJTUTZ5H18wBb9wBr4vNMjng या लिंकवर विनामूल्य नोंदणी करावी किंवा ९८२२८३०७७१ या क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.
परिषदेचे उद्घाटन रविवारी सकाळी १० वाजता होणार असून सत्रासाठी डॉ. दि. मा. मोरे( निवृत्त सचिव, जलसंपदा विभाग ),एकनाथ डवले(प्रधान सचिव, ग्रामविकास), सुनील चव्हाण( सचिव, जलसंधारण विभाग), प्रकाश मिसाळ( मुख्य अभियंता, उत्तर महाराष्ट्र प्रदेश, जलसंपदा विभाग ) ,शशिकांत पाटील(अध्यक्ष, पुणे फोरम फॉर पॉलिसी अँड गव्हर्नन्स), संग्राम गायकवाड ( आयकर आयुक्त,पुणे) हे उपस्थित राहणार आहेत.
‘जलयुक्त शिवार / पाणलोट विकास कार्यक्रम – सद्यस्थिती, उपयुक्तता आणि मर्यादा’ या विषयावर सकाळी 10.35 ते 12.00 या वेळॆत चर्चासत्रात राजेंद्र भोसले(संचालक, मृदसंधारण व पाणलोट विकास व्यवस्थापन, पुणे),डॉ. अविनाश पोळ(मुख्य सल्लागार, पाणी फांऊडेशन, सातारा),सुनील कुशिरे(व्यवस्थापकीय संचालक, जलसंधारण महामंडळ, छत्रपती संभाजीनगर) हे मार्गदर्शन करणार आहेत.अध्यक्षस्थानी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते पोपटराव पवार हे असणार आहेत.
दुपारी 12.10 ते 01.35 या वेळेत ‘नदीजोड / नदी वळण प्रकल्प-गरज, संधी आणि आव्हाने’ या चर्चासत्रात विनय कुलकर्णी(
निवृत्त सचिव, जलसंपदा विभाग), रजनीश शुक्ल(निवृत्त मुख्य अभियंता, जलसंपदा विभाग),डॉ. भारत पाटणकर(श्रमिक मुक्ती दल) हे सहभागी होणार आहेत.व्ही.एम.रानडे (निवृत्त सचिव,जलसंपदा विभाग) हे अध्यक्षस्थानी असतील.
दुपारी 02.15 ते 03.40 या वेळेत ‘महाराष्ट्रातील साध्य सिंचन क्षेत्र आणि प्रत्यक्ष भिजणारे क्षेत्र यातील तफावतीची कारणमीमांसा आणि उपाय’ या विषयावरील चर्चासत्रात प्रदीप पुरंदरे(माजी प्राध्यापक, वाल्मी, छत्रपती संभाजीनगर), हनुमंत गुणाले(मुख्य अभियंता, जलसंपदा विभाग, पुणे),डॉ. राजेश पुराणिक(प्राध्यापक, वाल्मी, छत्रपती संभाजीनगर)सहभागी होणार आहेत. जलसंपदा विभागाचे निवृत्त सचिव अविनाश सुर्वे हे अध्यक्षस्थानी असतील.
दुपारी 03.50 ते 05.25 या वेळेत ‘बिगर शासकीय घटकांद्वारे पाणी व्यवस्थापनः धोरण आणि अंमलबजावणी’ या विषयावर होणाऱ्या चर्चासत्रात डॉ. एस. ए. कुलकर्णी(निवृत्त सचिव, महाराष्ट्र जलसंपत्ती प्राधिकरण), शहाजी सोमवंशी(वाधाड प्रकल्पस्तरीय पाणी वापर संस्था), रविंद्र उलंगवार(उपाध्यक्ष व प्रमुख -पाणी व्यवस्थापन विलो म्यँथर व प्लॅट पंप्स),प्रांजल दीक्षित(टाटा समाज विज्ञांन संस्था, मुंबई) सहभागी होणार आहेत. जलसंपदा विभागाचे निवृत्त सचिव राजेंद्र पवार हे अध्यक्षस्थानी असतील.
संध्याकाळी 05.25 ते 6.20 या वेळेत समारोप सत्र होणार असून त्यात डॉ. संजय बेलसरे(सचिव, जलसंपदा विभाग),सुनील चव्हाण(सचिव, जलसंधारण विभाग ),शशिकांत पाटील(अध्यक्ष, पुणे फोरम फॉर पॉलिसी अँड गव्हर्नन्स),सनदी अधिकारी समीर उन्हाळे हे सहभागी होणार आहेत.
‘पुणे फोरम फॉर पॉलिसी अँड गव्हर्नन्स’ विषयी
शासकीय धोरणे आणि त्यांच्या अंमलबजावणीच्या रचना कशा असाव्यात हे ठरवण्याच्या प्रक्रियांमध्ये शासन, नागरी समुदाय, अभ्यासक तसेच सर्वसामान्य नागरिक या सगळ्यांचा सहभाग महत्त्वाचा असतो. अशा प्रक्रियांमध्ये दर्जेदार आणि क्रियाशील सहभाग नोंदवण्यासाठी ‘पुणे फोरम फॉर पॉलिसी अँड गव्हर्नन्स’ या संस्थेची स्थापना झाली.
स्टेट इन्स्टिट्यूट फॉर ऍडमिनिस्ट्रेटिव्ह करियर्स (एसआयएसी) या संस्थेच्या काही माजी विद्यार्थ्यांनी एकत्र येऊन ‘पुणे फोरम फॉर पॉलिसी अँड गव्हर्नन्स’ ही संस्था स्थापन केली आहे. नव्वदच्या दशकामध्ये यूपीएससीच्या सिविल सर्विसेस परीक्षांसाठी मार्गदर्शन करणारी कुठलीही शासकीय अथवा खाजगी व्यवस्था महाराष्ट्रात नसताना महाराष्ट्र शासनाने एसआयएसी ही संस्था मराठी टक्का वाढवण्यासाठी स्थापन केलेली होती. या संस्थेतून मार्गदर्शन घेतलेल्या बऱ्याच जणांची राज्य किंवा केंद्रीय शासनामध्ये शासकीय सेवांमध्ये निवड झाली तर काही जणांनी बिगर शासकीय क्षेत्रामध्ये करिअर केले. गेल्या काही वर्षांपासून हा गट अनौपचारिक स्वरूपात कार्यरत आहे. एसआयएसीचेच माजी विद्यार्थी आणि राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयाचे माजी संचालक श्री विजय जाधव यांच्या अकाली मृत्यूनंतर ‘विजय जाधव प्रतिष्ठान’ या नावाने ट्रस्ट स्थापन करून त्या अंतर्गत सांस्कृतिक आणि स्वयंसेवी स्वरूपाचे विविध उपक्रम या गटाने हाती घेतलेले होते. या उपक्रमांचा पुढचा टप्पा म्हणून ‘पुणे फोरम फॉर पॉलिसी अँड गव्हर्नन्स’ या संस्थेची स्थापना झाली आहे. भारतीय समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी आणि उज्ज्वल भवितव्यासाठी ठोस धोरणे आणि अंमलबजावणीच्या रचना सुचवणारे अनेक उपक्रम संस्थेकडून प्रस्तावित आहेत.
मेट्रो, सायन्स पार्कच्या सफरीने हरखली मुले
पुणे : मेट्रो स्टेशनवर शाळकरी मुलांची जमलेली गर्दी…चेहऱ्यावर आनंद आणि कुतूहल… समोरून मेट्रो येताच मुलांचे खुललेले चेहरे… सायन्स पार्कमधील तारांगणात जमिनीवर राहून अवकाशात मारलेला फेरफटका… लढाऊ विमानाची प्रतिकृती… मनोरंजक वैज्ञानिक उपकरणे पाहून हरखलेली मुले… असा अद्भुत अनुभव नुकताच वस्ती भागातील मुलांनी घेतला.
वंचित विकासतर्फे अभिरुची वर्ग, फुलवा प्रकल्पातील वस्ती भागात राहणाऱ्या मुलांसाठी, तसेच ज्येष्ठ नागरिकांसाठी मेट्रो सफर व पिंपरी-चिंचवड सायन्स पार्क येथे अभ्यास सहलीचे आयोजन केले होते. नगरकर युथ फाउंडेशनचे प्रसाद नगरकर, रोटरी क्लब ऑफ पुणे साऊथ, रोटरी क्लब ऑफ पुणे सनराईज यांचे सहकार्य लाभले. तिन्ही संस्थांच्या वतीने मुलांना खाऊवाटप करण्यात आले.
जनता वसाहत, दांडेकर पूल, अप्पर-सुप्पर इंदिरानगर, सिंहगड रोड आदी १५ वस्त्यांमधील अभिरुची वर्गातील मुलांनी तर लालबत्ती विभागातील फुलावाच्या मुलांनी या सफरीचा आनंद लुटला. यावेळी २०० मुले व ५० हून अधिक पालक, ज्येष्ठ नागरिक सहभागी झाले होते. मेट्रोचे शुभम दळवी यांनी मेट्रोविषयी मुलांना सविस्तर माहिती सांगितली. मेट्रोच्या अन्य पदाधिकारी आणि कर्मचारी यांचे मोलाचे सहकार्य मिळाले.
संस्थेच्या संचालक सुनीता जोगळेकर म्हणाल्या, “मागील ३८ वर्षांपासून समाजाच्या विविध घटकांच्या विकासासाठी काम करत असलेल्या वंचित विकास संस्थेच्या माध्यमातून मुलांच्या व्यक्तिमत्व विकासासाठी अभिरुची वर्गात मुलांना जीवन कौशल्य शिक्षण देण्यासाठी प्रत्यक्ष अनुभव, पोषक वातावरण निर्मिती करण्याचा प्रयत्न सहल,चित्रकला,हस्तकला इ. विविध उपक्रमातून केला जातो. नैसर्गिक साधन संपत्तीचा आनंद घेण आणि तिची जोपासना करण, रक्षणं करणं इ. मूल्यशिक्षण प्रत्यक्ष अनुभवातून मुलांना मिळतात. छोट्याप्रमाणेच मोठ्यांनाही या सफरीतून त्यांचे बालपण पुन्हा अनुभवायला मिळाले.
प्रथमच मेट्रोमध्ये बसणाऱ्या या मुलांना मेट्रोची माहिती, चढते-उतरते सरकते जिने, चेकइन इ. शिस्तबद्ध प्रणाली अनुभवता आली. सायन्स पार्कमध्ये विज्ञान खेळणी, थ्रीडी शो आणि तारांगणाचा अद्भुत अनुभव घेतला. कोणत्याही दडपणाखाली नसलेली, मुक्तपणे बागडणारी मुले आपसूकच या सारख्या उपक्रमांतून शिस्त, नियोजन, अशा विविध गोष्टी शिकतात. त्यातून त्यांच्या व्यक्तिमत्व विकासात भर पडते, असेही त्यांनी नमूद केले.
फुलवा प्रकल्पाच्या सुप्रिया धोंगडे, अभिरुची वर्गाच्या प्रकल्प प्रमुख स्नेहल मासालीया यांसह अभिरुची वर्गाच्या सर्व ताईंनी सहल यशस्वी करण्यास परिश्रम घेतले तर सहलीचे नियोजन तेजस्विनी थिटे यांनी केले.
