Home Blog Page 1196

परीक्षेदरम्यान विद्यार्थ्यांना व पालकांना येणाऱ्या समस्या निराकरणासाठी समुपदेशकाची व्यवस्था-मंडळाच्या विभागीय अध्यक्षा मंजुषा मिसकर यांची माहिती

पुणे, दि.२१: उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षा २१ फेब्रुवारी ते १९ मार्च; माहिती तंत्रज्ञान व सामान्य ज्ञान या विषयाची ऑनलाईन परीक्षा २० ते २३ मार्च तसेच माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा १ ते २६ मार्च  या कालावधीत आयोजित करण्यात आल्या असून विद्यार्थ्यांना व पालकांच्या समस्या निराकरणासाठी समुपदेशकाची व्यवस्था करण्यात आली आहे, अशी माहिती मंडळाच्या विभागीय अध्यक्षा मंजुषा मिसकर यांनी दिली.

परीक्षा कालावधीत विद्यार्थ्यांना अभ्यास व परीक्षेविषयी समस्या निर्माण झाल्यास त्यांना मार्गदर्शन करणे व तणावमुक्त वातावरणात परीक्षा देण्यासाठी प्रोत्साहान देण्याच्या उद्देशाने या विभागीय मंडळाच्या कार्यकक्षेतील  जिल्ह्यातील विद्यार्थी व पालकांसाठी समुपदेशनाची व्यवस्था करण्यात आलेली आहे. विद्यार्थ्यांना व पालकांना परीक्षेबाबत काही समस्या असल्यास समुपदेशकाच्या भ्रमणध्वनीवर सकाळी ८  ते रात्री ८ वाजेपर्यंत संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

जिल्हानिहाय समुपदेशक पुढील प्रमाणे: पुणे जिल्ह्याकरीता  गायत्री वाणी- ७३८७४००९७०, योगिनी पाटील- ९०१११८४२४२, सुजाता शिंदे- ८४२११५०५२८, पूनम पाटील ८२६३८७६८९६ ; अहमदनगर जिल्ह्याकरीता पूजा दोंदे- ८३६९०२१९४४. वर्षा शिंदे ८८२८४२६७२२, शीतल गुणदेकर ९८८१४१८२३६ आणि सोलापूर जिल्ह्याकरीता श्रेया दिघे -९३५९९७८३१५, पियुषा सामंत ७३८७६४७९०२, स्नेहा सडविलकर ९०११३०२९९७ या प्रमाणे समुपदेशकाची नियुक्ती करण्यात आली  विभागीय स्तरावर संपर्क क्रमांक इयत्ता १० वी करीता ९४२३०४२६२७ आणि  इयत्ता १२ वी करीता  ७०३८७५२९७२ संपर्क क्रमांक देण्यात आले आहेत.

उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षा आणि माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र परीक्षेअंतर्गत सुमारे ५ लाखाहून अधिक विद्यार्थी परीक्षा देणार

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळ पुणे विभागीय मंडळाच्या अंतर्गत पुणे, अहमदनगर व सोलापुर या जिल्ह्यामधून उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षा फेब्रुवरी-मार्च २०२४ परीक्षेस एकूण २ लाख ५९ हजार ६०३ विद्यार्थी परीक्षा देणार आहेत.  याकरीता पुणे जिल्ह्यात -२०, अहमदनगर-१७ आणि सोलापूर-११ अशी एकूण ४८ परिरक्षक तसेच पुणे जिल्ह्यात १९५, अहमदनगर ११० आणि  सोलापूर-११८ अशी एकूण ४२३ परीक्षा केंद्रे आहेत.

माध्यमिक शालात प्रमाणपत्र परीक्षा मार्च २०२४ परीक्षेमध्ये एकुण २ लाख ७४ हजार ५१८ विद्यार्थी परीक्षेस बसणार आहेत.  याकरीता पुणे जिल्ह्यात -२१, अहमदनगर-१८ आणि सोलापूर-१५ अशी एकूण ५४ परिरक्षक तसेच पुणे जिल्ह्यात २८५, अहमदनगर १८१ आणि  सोलापूर-१८२ अशी एकूण ६४८ परीक्षाकेंद्रे आहेत.

भरारी पथकाची नेमणूक

परीक्षा निकोप वातावरणात पार पाडण्याकरीता व परीक्षा केंद्रावर गैरप्रकार टाळण्याकरीता भरारी पथक नेमण्यात आली असून यात विभागीय आयुक्त कार्यालय, महसूल विभाग कार्यालय, मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद, शिक्षणाधिकारी व पोलीस विभागाच्या अधिकाऱ्यांचा समावेश करण्यात आलेला आहे. परीक्षा कालावधीत बैठे पथक मुख्य परीक्षा केंद्रावर कार्यरत राहणार आहे.

विद्यार्थ्यांना आवाहन
विद्यार्थ्यांना शांततापूर्ण वातावरणात परीक्षा देता यावी या उद्देशाने प्रत्येक केंद्रावर चोख बंदोवस्त ठेवण्यात येणार आहे. परीक्षा केंद्रापासून १०० मीटरच्या अंतरात प्रवेशबंदी राहणार आहे. प्रश्नपत्रिकेची गोपनियता अबाधित राहण्यासाठी मुख्य परीक्षा केंद्रावर प्रश्नपत्रिका पोहोच करण्यासाठी व उत्तरपत्रिका आणण्यासाठी नेमण्यात आलेल्या सहायक परिरक्षकांना जीपीएस प्रणाली सुरू ठेवणे आवश्यक केले आहे.

विद्यार्थ्यांनी परीक्षेमध्ये कोणत्याही प्रकारचा गैरप्रकार करू नये यासाठी विद्यार्थ्यांनी  प्रवेशपत्रावरील व उत्तरपत्रिकेच्या पृष्ट क्र. २ वरील सूचनांचे बारकाईने पालन करणे अनिवार्य करण्यात आले आहे.  अर्धा तास अगोदर परीक्षा केंद्रात प्रवेश दिला जाणार आहे. परीक्षा सुरू असताना विषयाशी संबंधित अथवा अन्य कोणतंही हस्तलिखित कागद, वह्या, टिपण्या, मार्गदर्शिका, पुस्तकातील पान, पुस्तक, नकाशे आदी जवळ बाळगणे, कपड्यावर, रायटिंग पॅडवर, हातावर किवा शरीराच्या भागावर लिहून ठेवणे,  टेबल, खुर्च्या, ड्युअल डेस्क  विषयाशी संबंधित असलेले कॉपी साहित्य आढळणे आदी बाबी आढळून आल्यास त्या परीक्षार्थीची संबंधित विषयाची संपादणूक किंवा पुराव्याच्या आधारे संपूर्ण परीक्षेची संपादणूक रद्द करण्यात येईल.

मंडळाच्या परीक्षेच्या प्रश्नपत्रिकची चोरी करणे, मिळवणे, विक्री किंवा खरेदी करणे तसेच भ्रमणध्वनी व अन्य इलेक्ट्रॉनिक्स माध्यमावर प्रसारित करणे अशा स्वरूपाचे  निदर्शनास आल्यास संपूर्ण परीक्षेची संपादणुक रद्द करणे, पुढील पाच परीक्षांना प्रतिबंध करणे यासह परीक्षार्थीविरुद्ध प्रकरणानुसार फौजदारी सायबर कायद्याअन्वये गुन्हा दाखल करण्यात येईल, यांची विद्यार्थी व पालकांनी नोंद घ्यावी, असेही श्रीमती मिसकर यांनी कळविले आहे.
००००

कुरकुंभच्या अर्थ केम लॅबोरेटरीत मॅफेड्रॉन (एमडी)ची निर्मिती..३ दिवसाच्या कारवाईत ८ अटकेत, १ ताब्यात आणि अंमली पदार्थाचा साठा (सविस्तर माहिती)

पुणे- पुणे पोलिसांनी अंमली पदार्थ विरोधी सुरु केलेल्या मोहिमेत अवघ्या ३ दिवसात देशाचे लक्ष वेधून घेणारी कारवाई केली असून या कारवाईचा या ३ दिवसातील हा संक्षिप्त अधिकृत गोषवारा ….

फिर्यादी-विठ्ठल वसंतराव साळुंखे, वय ४७ वर्षे, पो. हवा. १४००, गुन्हे शाखा, युनिट-१, पुणे.
अटक आरोपी

१. वैभव उर्फ पिंटया भारत माने वय ४० रा., सोमवार पेठ,,पुणे
२. अजय आमरनाथ करोसिया वय ३५ वर्ष रा भवानीपेठ, पुणे
३. हैदर नुर शेख, वय-४० वर्ष रा. विश्रांतवाडी, पुणे.
४. भिमाजी परशुराम साबळे वय ४६ वर्षे रा. पुणे
५. युवराज बब्रुवान भुजबळ वय-४१ वर्षे रा. डोबिंवली वेस्ट, मुंबई
६. दिवेश चिरंजीत भुटिया रा. नवी दिल्ली ७. संदिप राजपाल कुमार रा. नवी दिल्ली
८. संदिप हनुमानसिंग यादव रा. नवी दिल्ली

९ आज ताब्यात घेतलेला -आयुब अकबरशहा मकानदार वय ४४ वर्षे रा. कुपवाडा सांगली


गुन्ह्याची सुरुवात – दि. १९/०२/२०२४ रोजी ०२/०० वा. चे सुमारास महापालीका सहाय्यक आयुक्त कार्यालय, विश्रामबाग वाडा, पुणे महानगर पालीका प्रभाग-१६ सोमवार पेठ, खडीचे मैदान आरोग्य कोठी समोर सार्वजनिक रोडवरदि.१९/०२/२०२४ रोजी १०/४५ वा.


आजपर्यंत मिळालेला माल – १६८८ किलो मॅफेड्रॉन (एमडी) अंदाजे किंमत ३२७६ कोटी रुपये व इतर साहित्य

गुन्हयाची थोडक्यात हकिकत -दिनांक १९/०२/२०२४ रोजी गुन्हे शाखा युनिट-१ कडील पोलीस अंमलदार विठ्ठल सांळुखे यास मिळालेल्या बातमीवरुन खडीचे मैदान आरोग्य कोठी समोर, सोमवार पेठ, पुणे येथुन पांढरे रंगाची इर्टीगा कार नं. एम एच. १२ यु.जे. ४०८१ मधील रेकॉर्डवरील आरोपी नामे वैभव उर्फ पिंटया भारत माने वय-४० वर्षे रा. खडीचे मैदान सोमवार पेठ, पुणे व त्याचा साथीदार नामे अजय अमरनाथ करोसिया वय ३५ वर्ष रा. पुणे यांना ताब्यात घेवुन त्यांना पोलीसी खाक्या दाखवुन तपास करुन त्यांचेकडुन अंदाजे १ कोटी रुपयांचे ५०० ग्रॅम मेफेड्रॉन (एम.डी.) हा अंमली पदार्थ जप्त करण्यात आला. त्यांचेकडे केलेल्या तपासामध्ये हैदर नुर शेख रा. विश्रांतवाडी, पुणे यांचेकडुन अंदाजे २ कोटी ५० लाख रुपयांचे १ किलो २५० ग्रॅम मेफेड्रॉन (एम.डी.) जप्त करण्यात आले होते. असा एकुण नमुद आरोपींकडुन ३,५८,२८,४००/- रुपयांचा अंमली पदार्थ व इतर साहित्य जप्त करण्यात आले होते. सदरबाबत बेकायदेशीररित्या मेफेड्रॉन (एम.डी.) हा अंमली पदार्थ विक्रीसाठी जवळ बाळगला तसेच साठवणुक केली म्हणुन वर नमुद तिन्ही आरोपी विरोधात समर्थ पोलीस स्टेशन गुन्हा रजि नंबर ३८/२०२४ एनडीपीएस अॅक्ट ८(क), २२(क), २९ अन्वये गुन्हा नोंद करणेत आला होता.
नमुद आरोपींना न्यायालयात हजर केले असता त्यांना दिनांक २४/०२/२०२४ रोजीपर्यंत पोलीस कस्टडी मंजुर केली आहे. त्या अनुषंगाने अटक आरोपी नामे हैदर नुर शेख रा. विश्रांतवाडी, पुणे याचेकडे केलेल्या तपासामध्ये त्याचेकडुन मिळालेल्या माहितीवरुन पुणे शहरामध्ये विक्रीसाठी आणलेला मॅफेड्रॉन (एम.डी.) हा अंमली पदार्थ त्याने लेन नं.२ ए, भैरवनगर, धानोरी रोड, विश्रांतवाडी, पुणे येथील गोडावुन मध्ये साठवणुक करुन ठेवल्याचे सांगितल्याने सदर ठिकाणी गुन्हे शाखेकडील पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी छापा टाकला असता त्या ठिकाणी गोडावुनमध्ये वेगवेगळ्या मिठाच्या पोत्यामध्ये ठेवलेला अंदाजे किमंत १०५ कोटी रूपयांचा ५२ किलो ५२० ग्रॅम मॅफेड्रॉन (एम.डी.) हा अंमली पदार्थ मिळुन आल्याने तो जप्त केला
होता. गुन्ह्याची व्याप्ती लक्षात घेवुन अटक आरोपी नामे हैदर नुर शेख रा. विश्रांतवाडी, पुणे याचेकडे अधिकचा तपास करता त्याने गुन्ह्यात जप्त करण्यात आलेले मॅफेड्रॉन (एम.डी.) हा अंमली पदार्थ इसम नामे भिमाजी परशुराम साबळे रा. पिंपळे सौदागर, पुणे यांचे मालकीचे अर्थ केम लॅबोरेटरी, कुरकुंभ ता. दौंड जि. पुणे येथे इसम नामे युवराज बब्रुवान भुजबळ रा. मुंबई याचे सांगणेवरुन व त्याने पुरविलेल्या कच्चा मालातुन मॅफेड्रॉन (एम.डी.) तयार केले जात होते. सदर फॅक्टरी मध्ये दि.२०/०२/२०२४ रोजी पहाटेच्या सुमारास गुन्हे शाखेकडील पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार यांनी केलेल्या अचानक छापा कारवाई मध्ये वेगवेगळ्या ड्रम्समध्ये ठेवलेले सुमारे ६६३ किलो ८०० ग्रॅम मॅफेड्रॉन (एम.डी.) अंदाजे किमंत १३२७,६०,००,०००/-रुपयांचे जप्त करण्यात आलेले आहे. कुरकुंभ एमआयडीसी मध्ये तयार होणारे मॅफेड्रॉन एमडी हे युवराज भुजबळ याचे सांगणेवरुन त्याचा साथीदारांचे मदतीने पुणे शहर, दिल्ली व इतर वेगवेगळ्या ठिकाणी वितरीत करण्यात येत होते. आज रोजी युवराज बब्रुवान भुजबळ वय- ४१ वर्षे रा. मुंबई यास सदर गुन्ह्यात अटक करण्यात आलेली आहे तसेच सदरची फॅक्टरी चालविणारे फॅक्टरीचे मालक भिमाजी परशुराम साबळे वय ४६ वर्षे रा. पुणे यांना देखील सदर गुन्ह्यात अटक करण्यात आलेली आहे. सदरची फॅक्टरी अर्थ केम लॅबोरेटरी या नावाने चालु होती ती आज रोजी एमआयडीसी कुरकुंभ येथील अधिका-यांच्या मदतीने सील करण्यात आलेली आहे.
सदर फॅक्टरीमध्ये तयार होणारे मॅफेड्रॉन (एम.डी.) हे दिल्ली या ठिकाणी मोठया प्रमाणात पाठविल्याचे अटक आरोपींकडे केलेल्या तपासामध्ये निष्पन्न झाल्याने सदर ठिकाणी गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक, शब्बीर सय्यद, अजय वाघमारे व इतर अधिकारी व स्टाफ यांना पाठविण्यात आले होते. त्यांनी दिल्ली येथे जावुन छापा कारवाई मध्ये १) जगराम मंदिराजवळील, कटोला मुबारक साऊथ एक्सटेन्शन पार्ट १ येथुन एकुण ३१९ किलो मॅफेड्रॉन (एम.डी.) व २) मस्जिद मोड ३२३, साऊथ एक्सटेंन्शन पार्ट २ याठिकाणावरून ६५१ किलो मॅफेड्रॉन (एम.डी.) असे एकुण ९७० किलो मॅफेड्रॉन (एम.डी.) जप्त करण्यात आले असुन त्याची अंदाजे किंमत १९४० कोटी रूपये आहे. सदर कारवाईमध्ये १) दिवेश चिरंजीत भुटिया, रा. नवी दिल्ली २) संदिप राजपाल कुमार रा. नवी दिल्ली ३) संदिप हनुमानसिंग यादव रा. नवी दिल्ली यांना अटक करण्यात आली आहे.
तसेच अटक आरोपींकडे केलेले तपासामध्ये कुरकुंभ एम.आय.डी.सी. येथील फॅक्टरीमधुन तयार होणारे मॅफेड्रॉन (एम.डी.) हे कुपवाड जि. सांगली या ठिकाणी पाठविल्याचे तपासात निष्पन्न झाल्याने सदर ठिकाणी गुन्हे शाखेची ३ पथके पाठविण्यात आली होती. सदर ठिकाणी देखील (एम.डी.) मॅफेड्रॉनचा मोठ्या प्रमाणात साठा सापडला असुन तेथे छापा कारवाई सुरू आहे. सांगलीसाठी मदतीकरीता गुन्हे शाखेची आणखी २ पथके रवाना केलेली आहेत. कारवाई करण्यात आलेल्या ठिकाणावरून इसम नामे आयुब अकबरशहा मकानदार वय ४४ वर्षे रा. कुपवाडा सांगली याला ताब्यात घेण्यात आले असुन मॅफेड्रॉन (एम.डी.) जप्ती कारवाई चालु आहे.
अशा प्रकारे दाखल गुन्ह्यामध्ये आजपावेतो केले कारवाईमध्ये एकुण ८ आरोपींना अटक करून त्यांचेकडुन एकुण १,६८८ किलो मॅफेड्रॉन (एम.डी.) अंदाजे किंमत ३२७६ कोटी रुपये व इतर साहित्य असा मुद्देमाल जप्त करून ताब्यात घेतला आहे. तसेच गुन्ह्यातील पाहिजे आरोपींचा शोध सुरू असुन गुन्ह्याचा अधिक तपास करणेकरीता देशातील वेगवेगळ्या शहरांमध्ये पुणे शहर गुन्हे शाखेची पथके रवाना करण्यात आली आहेत.

मुळशी धरणाची उंची वाढविण्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निर्देश

0

मुळशी परिसरासह पुण्याच्या पश्चिम भागाला अतिरिक्त पाणी मिळणार

मुळशी प्रादेशिक पाणी पुरवठा योजनेच्या
टप्पा १ व २ मधील सर्व कामांना गती द्या

मुंबई, दि. २१ :- मुळशी धरणाखालील मुळशी परिसरातील गावांसह पुणे महानगर क्षेत्र विकास प्राधिकरण (पीएमआरडीए) क्षेत्रातील पश्चिम भागात वाढत असणाऱ्या लोकसंख्येसाठी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था होणे गरजेचे आहे. यादृष्टीने पुढील ३० वर्षांचा विचार करून मुळशी धरणाची उंची वाढवावी. तसेच मुळशी प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेच्या टप्पा १ व २ च्या माध्यमातून होणाऱ्या कामांसाठी टाटा पॉवर कंपनीबरोबर सामंजस्याने उपाययोजनांवर अंमलबजावणी करावी, असे निर्देश उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री अजित पवार यांनी दिले.

उपमुख्यमंत्री तथा वित्त मंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली आज मंत्रालयातील त्यांच्या दालनात मुळशी प्रादेशिक पाणीपुरवठा योजना टप्पा एक व टप्पा दोन मधील अडचणी दूर करण्यासाठी बैठक झाली. बैठकीला वित्त विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव ओ.पी. गुप्ता, पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाचे प्रधान सचिव संजय खंदारे, उपमुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव आशिष शर्मा, लाभक्षेत्र विकास विभागाचे सचिव डॉ. संजय बेलसरे, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे सदस्य सचिव अभिषेक कृष्णा, पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाचे कार्यकारी अभियंता राजेंद्र रहाणे, टाटा पॉवर कंपनीचे अधिकारी प्रभाकर काळे, तसेच बाबुराव चांदोरे आदी उपस्थित होते. पुणे विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार, पुणे जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे, पीएमआरडीएचे आयुक्त राहुल रंजन महिवाल दूरदृश्य प्रणालीद्वारे सहभागी झाले होते.

मुळशी धरणातून अतिरिक्त पाणी उपलब्ध होण्याच्या दृष्टीने टाटा पॉवर कंपनीचे अधिकारी सकारात्मक असल्याचे सांगून उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, मुळशी व पुणे परिसरातील पाण्याचा प्रश्न कायमस्वरुपी निकाली काढण्यासाठी मुळशी धरणाची उंची एक मीटरने वाढविल्यास अतिरिक्त पाणी उपलब्ध होऊ शकते. यासह धरणाच्या मृतसाठ्यामधील पाण्याचा वापर करता आल्यास पाण्याची वाढीव मागणी पूर्ण होईल. टाटा पॉवर कंपनीच्या सहकार्याने या कामांस प्राधान्य देण्यात यावे.

उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, हिंजवडीसह कोळवण खोऱ्यातील गावांमध्ये येत्या तीन वर्षात पाणी उपलब्ध करून देण्यासाठी पाणीपुरवठा योजनांची तातडीने अंमलबजावणी करावी. त्यासाठी मुळशी धरणाची उंची एक मीटरने वाढविण्यात यावी. उंची वाढविल्यामुळे पाण्याखाली जाणाऱ्या जमिनीपैकी ८० टक्के जमीन टाटा पॉवर कंपनीच्या क्षेत्रातील असून ती विनामोबदला देण्याची विनंती करण्यात यावी. उर्वरित २० टक्के जमीन शासनाच्या वतीने अधिग्रहण करावी. यासाठी जमीनधारकांना योग्य मोबदला देण्यात यावा, असे निर्देशही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले.

मुळशी प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेंतर्गत मंजूर कामांबाबत टाटा पॉवर कंपनीने हरकत घेतल्याने काम थांबले होते. या कामांना वेग देण्यासाठी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने जलसंपदा विभागास प्रस्ताव द्यावा. जलसंपदा विभागाने आवश्यक पाण्याचे आरक्षण जाहीर करून याबाबत टाटा पॉवर कंपनीला लेखी कळवावे. तसेच पौड येथील पाणीपुरवठा योजनेंतर्गत उभारण्यात येणाऱ्या जलशुद्धीकरण केंद्रासाठी ‘पीएमआरडीए’ने एक एकर जागा उपलब्ध करून दिली आहे. याठिकाणी पुरेशा क्षमतेचे जलशुद्धीकरण केंद्र उभारण्यासाठी शेजारी असणाऱ्या आणखी चार एकर जागेची आवश्यकता आहे. पुणे जिल्हाधिकाऱ्यांच्या सहकार्याने ‘पीएमआरडीए’ने ही जागा अधिग्रहण करून उपलब्ध करून घ्यावी, असे निर्देशही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले.

५७ व्या राज्य चित्रपट पुरस्कार सोहळा गुरुवारी

0

मुंबई, दि. २१ :  महाराष्ट्र शासनाकडून दिला जाणारा राज्याचा सर्वोच्च नागरी सन्मान असणारा ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्कार, येत्या गुरूवारी, दि. २२ फेब्रुवारी रोजी ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते प्रदान करण्यात येणार आहे. तर मानाचा “गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार” ज्येष्ठ पार्श्वगायक सुरेश वाडकर यांना प्रदान करण्यात येणार आहे. याशिवाय, मराठी व हिंदी चित्रपटसृष्टीसाठी आपल्या कलेच्या माध्यमातून अनेक वर्ष योगदान देत रसिकांची व कलासृष्टीची सेवा करणाऱ्या ज्येष्ठ कलावंतांना दिला जाणारा राजकपूर जीवनगौरव आणि विशेष योगदान पुरस्कार, चित्रपती व्ही. शांताराम जीवनगौरव आणि विशेष योगदान पुरस्कारही यावेळी प्रदान करण्यात येणार असल्याची माहिती सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली.

वरळी येथील डोम, एनएससीआय ( नॅशनल स्पोर्टस क्लब ऑफ इंडिया) येथे गुरुवारी सायंकाळी ६.३० वाजता होणाऱ्या ५७ व्या राज्य चित्रपट पुरस्कार सोहळ्यात हे पुरस्कार  मुख्यमंत्री श्री. शिंदे यांच्या हस्ते सन्मानपूर्वक प्रदान करण्यात करण्यात येतील. या समारंभास केंद्रीय वाणिज्य मंत्री पीयूष गोयल, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री अजित पवार हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत. तर, विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर, विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे, सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार, शालेय शिक्षण मंत्री तथा मुंबई शहर पालकमंत्री दीपक केसरकर, कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नावीन्यता मंत्री तथा मुंबई शहर उपनगर पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. या कार्यक्रमास स्थानिक लोकप्रतिनिधीही उपस्थित राहणार आहेत.

ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांना २०२३ साठीचा महाराष्ट्र भूषण पुरस्कार जाहीर झाला आहे. राजकपूर जीवनगौरव पुरस्कार सन २०२० साठी ज्येष्ठ अभिनेत्री श्रीमती अरुणा इराणी, सन २०२१ साठी ज्येष्ठ अभिनेते  मिथुन चक्रवर्ती आणि सन २०२२ साठी ज्येष्ठ अभिनेत्री श्रीमती हेलन यांना जाहीर झाला आहे तर राजकपूर विशेष योगदान पुरस्कार सन २०२० साठी ज्येष्ठ दिग्दर्शक  जे. पी. दत्ता, सन २०२१ साठी ख्यातनाम गायक  सोनू निगम आणि सन २०२२ साठी विधू विनोद चोप्रा यांना जाहीर झाला आहे. या समारंभात त्यांना सन्मानपूर्वक हे पुरस्कार प्रदान केले जातील.

ज्येष्ठ कलावंतांना दिला जाणारा चित्रपती व्ही. शांताराम जीवनगौरव पुरस्कार सन २०२० साठी ख्यातनाम चित्रपट अभिनेते स्व. रविंद्र महाजनी (मरणोत्तर), सन २०२१ साठी ज्येष्ठ अभिनेत्री श्रीमती उषा चव्हाण आणि सन २०२२ साठी ज्येष्ठ अभिनेत्री श्रीमती उषा नाईक यांना जाहीर झाला आहे. यासोबतच चित्रपती व्ही. शांताराम विशेष योगदान पुरस्कार सन २०२० साठी चित्रपट दिग्दर्शक गजेंद्र अहिरे, सन २०२१ साठी ज्येष्ठ पार्श्वगायक  रवींद्र साठे  आणि सन २०२२ साठी प्रसिद्ध चित्रपट अभिनेते-दिग्दर्शक  नागराज मंजुळे यांना जाहीर झाला आहे. या राज्य चित्रपट पुरस्कार सोहळ्याच्या समारंभात हे पुरस्कार प्रदान केले जाणार आहेत.

या पुरस्कार सोहळ्यासाठी उपस्थित राहण्याचे आवाहन मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव तथा सांस्कृतिक कार्य विभागाचे प्रधान सचिव विकास खारगे, महाराष्ट्र राज्य चित्रपट, रंगभूमी व सांस्कृतिक विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक डॉ.अविनाश ढाकणे आणि सांस्कृतिक कार्य संचालक  बिभीषण चवरे यांनी केले आहे. 

काजू प्रक्रिया उद्योगांना ‘एसजीएसटी’चा परतावा ५ मार्चपूर्वी द्या; ‘सीजीएसटी’ची अडीच टक्के रक्कमही तातडीने परत करावी-उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निर्देश

0

मुंबई, दि. २१ :- कोल्हापूर, सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यातील काजू उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा आणि काजू प्रक्रिया उद्योगाला चालना मिळण्यासाठी महाराष्ट्र राज्य काजू मंडळाच्या माध्यमातून काजूबोंड रसावर प्रक्रिया करण्याकरिता ब्राझीलचे तंत्रज्ञान वापरण्यात यावे. त्यासाठी ब्राझील देशाबरोबर सामंजस्य करार करावा. काजू प्रक्रिया उद्योगांना राज्य वस्तू व सेवा कराचा परतावा ५ मार्चपूर्वी द्यावा आणि केंद्रीय वस्तू व सेवा कराची अडीच टक्के रक्कम देखील राज्य शासनातर्फे तातडीने परत करावी, असे निर्देश उपमुख्यमंत्री तथा वित्त मंत्री अजित पवार यांनी दिले.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयातील त्यांच्या दालनात आज काजू उत्पादक शेतकऱ्यांच्या सर्वंकष विकासाच्या धोरणातून काजू उद्योगाचा विकास साधण्याच्या अनुषंगाने बैठक झाली. बैठकीस पणनमंत्री अब्दुल सत्तार, शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर, काजू उत्पादक विभागातील स्थानिक आमदार सर्वश्री प्रकाश आबिटकर, राजेश पाटील, शेखर निकम, महाराष्ट्र कॅश्यू मॅन्यूफॅक्चरर्स असोसिएशनचे अध्यक्ष सुरेश बोवलेकर, पणन विभागाचे अपर मुख्य सचिव राजेशकुमार, वित्त विभागाचे अपर मुख्य सचिव ओ.पी.गुप्ता, राज्य कर आयुक्त आशिष शर्मा, वित्त विभागाचे प्रधान सचिव सौरभ विजय, उद्योग विभागाचे प्रधान सचिव हर्षदीप कांबळे आदी यावेळी उपस्थित होते.

उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, काजू उत्पादकांना जीएसटीमध्ये सवलत देण्याबरोबरच काजू बोंडूपासून विविध उत्पादने तयार करण्यासाठी प्रक्रिया उद्योग उभारून काजू पिकाच्या सर्वंकष विकासाच्या धोरणातून काजू उत्पादकांचा विकास साधला जाईल. जीएसटी करप्रणालीमध्ये काजू बियांसाठी पाच टक्के व काजूगराला पाच टक्के असा दुहेरी कर लागला आहे. यापैकी राज्याचा २.५ टक्के कराचा परतावा मिळत असून ‘सीजीएसटी’च्या २.५ टक्के परताव्याची रक्कम देखील राज्य शासनामार्फत दिली जाईल. या अनुषंगाने उद्योग विभागामार्फत पाठविण्यात आलेल्या ३२ कोटींच्या प्रस्तावांपैकी २५ कोटींच्या प्रस्तावांना वित्त विभागाने मान्यता दिली असून शिल्लक १५० प्रस्तावांचा परतावा ५ मार्चपर्यंत देण्यात यावा. यासाठी २० कोटी रुपयांची तरतूद करण्यात येईल, असेही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले.

कोकण आणि कोल्हापूर परिसरात काजूची मोठ्या प्रमाणात लागवड होत असून या परिसरात काजू बियांवर प्रक्रिया करणारे उद्योग कार्यरत आहेत. या व्यतिरिक्त काजू बोंडूचे सुमारे २२ लाख मे.टन उत्पादन होत असून काजूच्या बोंडूंना विशिष्ट वास येत असल्याने ते प्रक्रिया न होता वाया जाते. ब्राझीलमध्ये यावर संशोधन होऊन अशा बोंडांचा वास घालवला जातो आणि त्यावर प्रक्रिया करून त्यापासून विविध उत्पादने तयार केली जातात. कोकणातील काजू बोंडांवर अशी प्रक्रिया करून उत्पादने तयार करण्यासाठी ब्राझीलसोबत करार करण्यात यावा. यासंदर्भात मंत्री दीपक केसरकर यांच्या नेतृत्वाखाली रत्नागिरी, सिंधुदूर्ग, कोल्हापूर जिल्ह्यातील काजू उत्पादन क्षेत्रातील स्थानिक लोकप्रतिनिधींनी पुढाकार घेऊन याबाबतची कार्यवाही करावी. यासाठी काजू मंडळाचे कार्यालय सिंधुदुर्ग जिल्ह्यातील काजू संशोधन केंद्राच्या इमारतीत स्थापन करावे. यासाठी लागणारा निधी वित्त विभागामार्फत देण्यात येईल, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले.

कृषी विभागामार्फत कोकण विभाग आणि कोल्हापूर जिल्ह्यातील चंदगड व आजरा तालुक्यांमध्ये काजू फळपिक विकास योजना लागू करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे पणन विभागामार्फत काजू फळ पिकाच्या विकासाकरिता महाराष्ट्र राज्य काजू मंडळ स्थापन करण्यात आले आहे. या मंडळामार्फत राज्याचा काजू ब्रँड तयार करणे, काजू प्रक्रिया आणि मूल्यवर्धनाबाबतच्या कार्यांना चालना देणे, उत्पादनांचे मार्केटिंग करणे आदी कामे करण्यात येत आहेत. कृषी विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या ठिबक सिंचन योजनेचा लाभ काजू उत्पादकांना मिळवून देण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यावेळी दिले.

हस्तकला कारागीर ते थेट ग्राहक योजनेतून खरेदीचा आनंद लुटण्याची संधी – चंद्रशेखर सिंग

राष्ट्रीय गांधी शिल्प बाजारच्या वतीने पिंपरीत हस्तकला आणि हातमाग प्रदर्शन

पिंपरी, पुणे (दि. २१ फेब्रुवारी २०२४) भारत सरकारच्या वस्त्र मंत्रालय, विकास आयुक्त कार्यालय (हस्तकला) यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रीय गांधी शिल्प बाजारच्या वतीने पिंपरीत शुक्रवार (दि.२१) पासून राष्ट्रीय हस्तकला आणि हातमाग प्रदर्शनाचे व विक्री दालनाचे आयोजन करण्यात आले आहे. यामधे देशातील विविध २९ राज्यातील ३५० कारागीर २५० स्टॉलसह पुण्यातील ११ आणि पिंपरी चिंचवड शहरातील ४ स्टॉल सह महाराष्ट्रातील एकूण ५० स्टॉलवर हस्तकला कारागीर पारंपारिक कलाकृती या प्रदर्शनात सादर करणार आहेत. त्यामुळे पिंपरी चिंचवड शहर आणि पुण्यातील कलाप्रेमी जाणकारांना कला आणि हस्तकलेचा वारसा पाहण्याची आणि हस्तकला कारागीर ते थेट ग्राहक योजनेतून खरेदीचा आनंद लुटण्याची संधी मिळणार आहे त्याचा नागरिकांनी लाभ घ्यावा असे आवाहन वस्त्र मंत्रालय, भारत सरकार (हस्तकला), वरिष्ठ सहाय्यक निर्देशक चंद्रशेखर सिंग यांनी केले आहे.
बुधवारी पिंपरी येथे आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत अधिक माहिती देताना सिंग यांनी सांगितले की, या प्रदर्शनाचे उद्घाटन शुक्रवारी सायंकाळी ५ वाजता मान्यवरांच्या हस्ते करण्यात येणार आहे. सर्व नागरिकांना या प्रदर्शनास मोफत प्रवेश आणि वाहनांसाठी मोफत पार्किंग आहे. शुक्रवार (दि. २३ फेब्रुवारी) ते रविवार (दि. ३ मार्च) या कालावधीत सकाळी नऊ ते रात्री दहा या वेळेत एच. ए. ग्राउंड, संत तुकाराम नगर, महेश नगर चौपाटी समोर, पिंपरी, पुणे १८ येथे प्रदर्शन भरविण्यात आले आहे.
मे. इंडियन नारी डेव्हलपमेंट एवंम इम्प्रूव्हमेंट अँड ॲडव्हान्समेंट ऑफ नेशन, नवी दिल्ली, विकास आयुक्त कार्यालय (हस्तकला), वस्त्रोद्योग मंत्रालय, भारत सरकार हे भारतीय हस्तकला आणि हातमाग यांचे जतन, संवर्धन आणि संरक्षण करणारी प्रमुख राष्ट्रीय एजन्सी हस्तकलेच्या संवर्धन आणि विकासासाठी, हस्तकला कारागीर यांच्या कल्याणासाठी प्रशिक्षण, प्रदर्शन, विक्री योजना वर्षभर वोकल फॉर लोकल आणि आत्मनिर्भर भारत अंतर्गत राष्ट्रीय गांधी शिल्प बाजार हे आयोजित करत असते. या राष्ट्रीय प्रदर्शनाचा मुख्य उद्देश देशभरातील कारागीर आणि विणकरांना व्यासपीठ उपलब्ध करून देणे हा आहे. या राष्ट्रीय प्रदर्शनात ग्राहक आणि कारागीर यांच्यात थेट बाजारपेठ जोडण्याची व्यवस्था, ग्राहकांच्या गरजा विचारात घेऊन गरजेनुसार डिझाइन तयार करून दिले जाते.
www.Indianhandicraft.gov.in या वेबसाईट वर नोंदणी केलेल्या २९ राज्यातील ३५० कारागिरांचे २५० स्टॉल या ठिकाणी उभारण्यात आले आहेत. महाराष्ट्रातील जी. आय. मानांकन प्राप्त पुणेरी पगडी, कोल्हापूरी चप्पल, वारली पेंटिंग, पैठणी तसेच सोलापूरी चादर टॉवेलचे स्टॉल लावण्यात येणार आहेत.
विविध राज्यांतील विकास आयुक्त (हस्तकला) कार्यालयाच्या क्षेत्रीय कार्यालयातून त्यांची निवड केली आहे. यामधे राष्ट्रीय पुरस्कार विजेते शिल्पगुरु, राष्ट्रीय गुणवत्ता प्रमाणपत्र धारक, राज्य पुरस्कार विजेते, बचत गट इत्यादींचा सहभाग आहे.
या प्रदर्शनात आर्ट मेटल वेअर, बीड्स क्राफ्ट, केन आणि बांबू उत्पादन, कार्पेट, शंख-शिंपले, बाहुली आणि खेळणी, भरतकाम आणि क्रोशेटेड वस्तू, काच, गवत, पाने, वेत वेळू आणि फायबर उत्पादन, हाताने छापलेले कापड स्कार्फ, इमिटेशन ज्वेलरी, ज्यूट क्राफ्ट, तंजावर पेंटिंग, टेक्सटाईल (भरतकाम), लाकडी वस्तू, कोल्हापुरी चप्पल, कोल्हापुरी ज्वेलरी क्राफ्ट, विविध पेंटिंग. छत्तीसगड डोकरा कास्टिंग, मधुबनी पेंटिंग, पंजाबची फुलकारी फॅब्रिक्स अशा विविध प्रकारच्या वस्तूंचे स्टॉल लावण्यात येणार आहेत.

धायरीतील रायकर मळा:जागेच्या वादातून तरुणाची रात्री निर्घुण हत्या


पुणे : जागेच्या वादातून सिंहगड रोडवरील रायकर मळा परिसरात एका तरुणावर धारदार हत्याराने वार करुन निर्घुण खून केल्याचा प्रकार समोर आला आहे.आदित्य ऊर्फ राजू जनार्दन पोकळे (वय १९, रा. खंडोबाचा माळ, रायकर मळा, धायरी) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे.याप्रकरणी सिंहगड रोड पोलिसांनी सागर पोपट रायकर व संपत तानाजी काळोखे यांच्याविरुद्ध खूनाचा गुन्हा दाखल केला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आदित्य पोकळे व संपत काळोखे हे नातेवाईक आहेत. त्यांच्यामध्ये जागेवरुन वाद सुरु आहे. आदित्य हा मंगळवारी रात्री या जागेवर कामगारांना घेऊन आला व पत्र्याची शेड उभारण्याचे काम करत होता. रात्री ९ वाजण्याच्या सुमारास संपत काळोखे व सागर रायकर हे दोघे तेथे आले. त्यावेळी त्यांच्यात वाद झाला. तेव्हा दोघांनी आदित्यच्या पाठीत धारदार हत्याराने वार केले. आदित्य रक्ताच्या थारोळ्यात जागीच पडल्यावर दोघे पळून गेले. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. आदित्य याला रुग्णालयात नेले असताना डॉक्टरांनी मृत घोषित केले. पोलीस मारेकर्‍यांचा शोध घेत आहेत. मात्र आज मृत आदित्य याचे नातेवाईक सिंहगड पोलिस स्टेशन समोर आंदोलनाला बसले होते आरोपींना ताब्यात घेत नाही तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेण्यास नकार दिला, मात्र पोलिसांच्या आश्वासनानंतर आज आदित्यच्या कुटुंबीयांनी त्याचा मृतदेह ताब्यात घेऊन अंत्यसंस्कार केले

बँक ऑफ इंडियातर्फे शेतीशी संबंधित खास फेस्टिव्ह ऑफर्स

मुंबई,- बँक ऑफ कृषी उपकरणे आणि कृषी वाहन या दोन योजनांवर आकर्षक फेस्टिव्ह ऑफर्स लाँच केल्या असून त्या ३१ मार्च २०२४ पर्यंत खुल्या राहातील. शेतकरी आणि शेती उद्योजकांना जाणवणाऱ्या महत्त्वाच्या समस्येवर – आवश्यक वित्तीय सहाय्य मिळवण्यावर तोडगा काढण्याचे या उपक्रमाचे उद्दिष्ट आहे. 

बँकेच्या कृषी वाहन आणि कृषी उपकरण कर्ज योजनेअंतर्गत शेतीशी संबंधित महत्त्वाच्या घटकांसाठी टर्म कर्ज सुविधा पुरवली जाते. त्यामध्ये शेती उपकरणे, वाहतुकीची साधने यांचा समावेश होतो. कृषी वाहन कर्ज योजनेचा विशेष उल्लेख करावा लागेल, कारण त्यामध्ये वाहनाची ९० टक्के एक्स शोरूम किंमत दिली जाते. महत्त्वाचे म्हणजे, शेतकऱ्यांसाठी २५ लाख रुपयांपर्यंतच्या कर्जासाठी, तर शेती उद्योजकांसाठी एक कोटी रुपयांपर्यंतच्या कर्जासाठी तारणाची गरज नसते. शेती उपकरणांसाठी खर्चाच्या ८५ टक्क्यांपर्यंतचे कर्ज उपलब्ध करून दिले जाते.

या योजनांचे वेगळेपण म्हणजे, त्या शेतकरी व शेती उद्योजकांना भरीव लाभ देतात. त्यामध्ये कोणत्याही प्रकारच्या छुप्या खर्चाचा समावेश नसून त्यासाठी लागणारी कागदपत्रांची प्रक्रियाही थेट आहे. हे कर्ज प्रकार ग्राहकाच्या सोयीनुसार, सोपी अर्ज प्रक्रिया असलेले व जलद वितरण करणारे आहेत.

बँक ऑफ इंडियाची ही बांधिलकी सहज व प्रभावी वित्त पर्याय उपलब्ध करून देण्याप्रती बँकेचे प्रयत्न दर्शवणारी आहे. बँकेने शेतकरी व शेती उद्योजकांना सक्षम करण्याचे, आधुनिक शेतीमधील आव्हानांना आत्मविश्वासाने सामोरे जाण्यासाठी बळ देण्याचे ध्येय ठेवले आहे. त्याशिवाय हा उपक्रम माननीय पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी यांच्या शेती उत्पन्न आणि उत्पादनक्षमता वाढवण्याच्या ध्येयाशी सुसंगत आहे. ही केवळ वित्त योजना नाही, तर अधिक समृद्ध शेती भविष्याच्या उचललेले लक्षणीय पाऊल आहे.

देशभक्त केशवराव जेधे करंडक वक्तृत्व स्पर्धा शनिवारी

श्री शिवाजी मराठा सोसायटीच्या वतीने आयोजन : राज्यस्तरीय आंतर महाविद्यालयीन वक्तृत्व स्पर्धा
पुणे : श्री शिवाजी मराठा सोसायटीच्या वतीने आंतर महाविद्यालयीन राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. शनिवार, दिनांक २४ फेब्रुवारी रोजी सकाळी ९ वाजता स्पर्धेचे उद्घाटन सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या राष्ट्रीय सेवा योजनेचे संचालक डॉ.सदानंद भोसले यांच्या हस्ते होणार आहे. शुक्रवार पेठेतील समाजभूषण बाबुराव उर्फ अप्पासाहेब जेधे कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय येथे ही स्पर्धा होईल. अशी माहिती स्पर्धा संयोजक आणि महाविद्यालयाच्या प्रभारी प्राचार्य डॉ. दिपाली आर. पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली.
यावेळी डॉ. अमित गोगावले उपस्थित होते.

डॉ. दिपाली पाटील म्हणाल्या, महाविद्यालयीन विद्यार्थ्यांमध्ये सामाजिकतेचे भान आणि जाण निर्माण होण्याच्या हेतूने व युवकांमध्ये वक्तृत्व व नेतृत्व गुण विकसित होण्याच्या दृष्टिकोनातून राज्यस्तरीय आंतर महाविद्यालयीन वक्तृत्व स्पर्धा आयोजित केली आहे. या स्पर्धेचे हे द्वितीय वर्ष आहे.


स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ त्याच दिवशी सायंकाळी ५ वाजता टिळक शिक्षणशास्त्र महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ.राधिका इनामदार यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी संस्थेचे उपाध्यक्ष राजेंद्र जगताप, मानद सचिव अण्णा थोरात,  सहसचिव विकास गोगावले, खजिनदार जगदीश जेधे उपस्थित राहणार आहेत.

स्पर्धेतील प्रथम क्रमांकाच्या विजेत्याला ११ हजार, द्वितीय क्रमांकाला ७ हजाराला, तृतीय क्रमांकाला ५ हजार आणि ५ उत्तेजनार्थ क्रमांकाना प्रत्येकी १ हजार रोख आणि स्मृतीचिन्ह आणि प्रमाणपत्र देण्यात येणार आहे.

मोठ्या संख्येने महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी स्पर्धेत सहभाग घ्यावा असे आवाहन संस्थेच्या वतीने करण्यात आले आहे. स्पर्धेसाठी प्रा. सीमा ढमे ९६५७६८९१९१, संतोष यादव ९७६७९०३९६, डॉ.अमित गोगावले ९९२२०७४८४७ या क्रमांकावर संपर्क साधावा.

राज्यातील १०० महाविद्यालयांमध्ये ४ मार्चपासून कौशल्य विकास केंद्र – महाराष्ट्र राज्य नाविन्यता सोसायटीच्या आयुक्त निधी चौधरी             

0

मुंबई, दि. 21 : राज्यात राबविण्यात येत असलेल्या ‘प्रमोद महाजन कौशल्य व उद्योजकता विकास अभियान’ योजनेच्या धर्तीवर राज्यातील 100 महाविद्यालयांमध्ये 4 मार्चपासून कौशल्य विकास केंद्र सुरू करण्यात येणार असून कौशल्य विकास या संकल्पनेचा अधिकाधिक लाभ राज्यातील युवक- युवतींनी घ्यावा असे आवाहन महाराष्ट्र राज्य नाविन्यता सोसायटीच्या आयुक्त निधी चौधरी यांनी केले.

एल्फिन्स्टंट तांत्रिक विद्यालय येथे महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास सोसायटी आयोजित महाविद्यालयांकरिता कौशल्य विकास कार्यशाळेत आयुक्त चौधरी बोलत होत्या. यावेळी राज्य कौशल्य विकास सोसायटीचे अत्तिरिक आयुक्त अनिल सोनवणे, राष्ट्रीय कौशल्य विकास मंडळाचे  अधिकारी गौरव दिमान यासह विविध महाविद्यालयांचे प्राध्यापक व शिक्षक उपस्थित होते.

आयुक्त निधी चौधरी म्हणाल्या की, कौशल्य विकास या संकल्पनेचा लाभ व्हावा यासाठी राज्यातील तीन हजार पाचशेहून जास्त महाविद्यालयाकडून कौशल्य विकास केंद्र स्थापन करण्याबाबत माहिती मागविण्यात आलेली आहे. कार्यशाळेतून कौशल्य विकास प्रशिक्षण केंद्रांची नोंदणी, कौशल्य विकास प्रशिक्षणासाठी सुसंगत अभ्यासक्रम निवडणे, महास्वयंम पोर्टल वर माहिती भरणे यासह सर्व माहिती या प्रशिक्षणामध्ये दिली जाईल. प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर ते ऑन जॉब ट्रेनिंग पर्यंत कौशल्य विकास विभागाने एक आदर्श कार्यपद्धती तयार केली आहे. जास्तीत जास्त महाविद्यालयाने  कौशल्य विकास केंद्र सुरू करणे या योजनेत सहभाग घ्यावा, असे आवाहन श्रीमती चौधरी यांनी केले.

आयुक्त चौधरी म्हणाल्या की, रोजगाराच्या जास्तीत जास्त संधी निर्माण व्हाव्यात यासाठी शासन प्रयत्नशील आहे. ग्रामीण भागातून शहरी भागाकडे होणारे स्थलांतर कमी करण्यासाठी तसेच स्थानिक पातळीवर रोजगार व स्वयंरोजगाराच्या संधी निर्माण  होण्यासाठी ग्रामीण भागात 500 कौशल्य विकास केंद्र सुरू करण्यात आली आहेत. प्रधानमंत्री विश्वकर्मा कौशल्य योजनेअंतर्गत १०१ केंद्रांचा आरंभ करण्यात आला आहे जिल्हास्तरीय रोजगार मिळावे आणि आता विभागस्तरीय होत असलेले रोजगार मिळावे यातून जास्तीत जास्त रोजगाराच्या संधी निर्माण केल्या जात आहेत. कुशल कामगारांचे कौशल्य अधिक विकसित करणे. विद्यार्थ्यांना कौशल्यपूर्ण शिक्षण देणे यासाठी विभाग प्रयत्नशील असल्याचे श्रीमती चौधरी यांनी सांगितले.

राज्य कौशल्य विकास सोसायटीचे अत्तिरिक आयुक्त अनिल सोनवणे यांनी प्रास्ताविक केले. कार्यशाळेमध्ये 30 महाविद्यालयातील प्राचार्य व प्राध्यापक यांनी सहभाग घेतला होता.

गरुड, कलश, यज्ञ स्थापनेने ‘ब्रह्मोत्सवाला’ थाटात प्रारंभ

श्री महालक्ष्मी मंदिर सारसबाग ४० व्या वर्धापनदिनानिमित्त  तीन दिवसीय उत्सवाला सुरुवात
पुणे : गरुड स्थापना, कलश स्थापना व यज्ञ स्थापनेने आणि माता माता की जय… च्या नादघोषात सारसबागेसमोरील श्री महालक्ष्मी मंदिरात ब्रह्मोत्सवाला थाटात प्रारंभ झाला. मंदिराच्या ४० व्या वर्धापनदिनानिमित्त ब्रह्मोत्सवाचे आयोजन करण्यात आले असून मंदिराला आकर्षक सजावट व विद्युतरोषणाई करण्यात आली आहे. तसेच, धार्मिक कार्यक्रमांसह सामाजिक उपक्रमे देखील होणार आहेत.  
श्री बन्सीलाल रामनाथ अग्रवाल धार्मिक व सांस्कृतिक ट्रस्ट, श्री महालक्ष्मी मंदिर सारसबागच्या ४० व्या वर्धापनदिनानिमित्त आयोजित ब्रह्मोत्सवाचा प्रारंभ मंदिरात झाला. यावेळी ट्रस्टचे प्रमुख संस्थापक विश्वस्त राजकुमार अग्रवाल, प्रमुख विश्वस्त अमिता अग्रवाल, विश्वस्त हेमंत अर्नाळकर, नारायण काबरा आदी उपस्थित होते. 
राजस्थान डिडवाना येथील अनंत श्री विभुषित जगतगुरु रामानुचार्य झालरिया पीठाधीपती पूज्य श्री श्री १००८ स्वामीजी घनश्यामाचार्यजी महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली हा उत्सव होत आहे. धार्मिक कार्यक्रमामध्ये होम-हवन, महाअभिषेक, सुवर्ण व रजत कमल अर्चना, उत्सवमूर्तींचा पालखी सोहळा व फुलांची होळी होणार आहे. 
सांस्कृतिक आणि सामाजिक कार्यक्रमांमध्ये शालेय विद्यार्थी पालकत्व योजना व उत्सव मूर्तीची धान्यतुला करुन ते धान्य अनाथ मुलांच्या संस्थेस वाटप अशा उपक्रमांचा देखील समावेश आहे. सर्व कार्यक्रमांमध्ये पुणेकरांनी मोठया संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन मंदिरातर्फे करण्यात आले आहे.

महापालिका घनकचरा व्यवस्थापन कार्यालयामार्फत “स्वच्छता विषयक कार्यशाळा व सत्कार समारोह”संपन्न

पुणे- स्वच्छ सर्वेक्षण २०२३ अंतर्गत आज दिनांक २१/०२/२०२४, बुधवार रोजी स.११:०० ते सायं ०४:०० या वेळेत क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले स्मारक, गंजपेठ, पुणे या ठिकाणी स्वच्छता विषयक कार्यशाळा व सत्कार समारोह चे आयोजन करण्यात आले होते. या कार्यशाळेस महापालिका आयुक्त, विक्रम कुमार व अतिरिक्त महापालिका आयुक्त (इ), डॉ. कुणाल खेमनार, अतिरिक्त महापालिका आयुक्त (वि), विकास ढाकणे, उप आयुक्त, घनकचरा व्यवस्थापन संदीप कदम व तसेच माजी अतिरिक्त महापालिका आयुक्त, सुरेश जगताप आणि ज्ञानेश्वर मोळक देखील उपस्थित होते. स्वच्छ सर्वेक्षण चे ब्रैड अॅम्बॅसडर, टेनिसपटू ऋतुजा भोसले देखील उपस्थित होते.तसेच “मनाची अमर्याद शक्ती व तणावमुक्ती” या विषयावर डॉ. दत्ता कोहिनकर माईड पॉवर ट्रेनर यांनी व्याख्यान दिले. तसेच स्वच्छताविषयक कामकाज करणारे अधिकारी/कर्मचा-यांचा/क्षेत्रीय कार्यालय/मुख्य विभाग यांचा महापालिका आयुक्त यांच्या हस्ते गौरव चिन्ह व प्रशस्तीपत्र देऊन सत्कार करण्यात आला.

या प्रसंगी घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उप आयुक्त, संदीप कदम यांनी प्रास्ताविक केले. महापालिका आयुक्त, विक्रम कुमार यांनी सर्व अधिकाऱ्यांचे / कर्मचा-यांचे अभिनंदन केले व सर्व क्षेत्रीय कार्यालयामधील हद्दीत दैनंदिन काम करणाऱ्या कर्मचा-यांमुळेच ही उपलब्धी प्राप्त झाली असले बाबत नमूद करून पुढील काळामध्ये स्वच्छ सर्वेक्षण मध्ये भारतात प्रथम तीन क्रमांकामध्ये येईल याबाबत बहुमूल्य मार्गदर्शन केले व त्यासाठी लागणारी यंत्रणा/सुविधा आवश्यक असल्यास प्राधान्याने उपलब्ध करून देणेबाबत आश्वासित केले. अतिरिक्त महापालिका आयुक्त (इ), डॉ. कुणाल खेमनार,माजी अतिरिक्त आयुक्तसुरेश जगताप आणि ज्ञानेश्वर मोळक यांनी देखील आपले मनोगत व्यक्त करून कर्मचाऱ्यांना प्रोत्साहन दिले.

स्वच्छ भारत अभियान २०२३ अंतर्गत भारत सरकार, आवासन और शहरी कार्य मंत्रालय यांच्यामार्फत दिनांक ११ जानेवारी २०१४ रोजी स्वच्छ सर्वेक्षण २०२३, सफाई मित्र सुरक्षा पुरस्कार व कचरामुक्त शहर पुरस्कार वितरण समारोह भारत मंडपम, प्रगती मैदान, नवी दिल्ली येथे दिनांक ११ जानेवारी २०२४ रोजी आयोजित करण्यात आला होता.

स्वच्छ सर्वेक्षण २०२३ अंतर्गत आयोजित स्पर्धेमध्ये पुणे

१० लाख लोकसंख्येपेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या शहरांमध्ये १ क्रमांकाचे मानांकन प्राप्त झाले आहे.

तर १ लाख लोकसंख्येपेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या शहरांमध्ये भारतात १० क्रमांकाचे मानांकन व. त्याचप्रमाणे Garbage Free City (GFC) अंतर्गत ५ स्टार मानांकनाने . हरदीप सिंग पुरी, कॅबिनेट मंत्री MoHUA व मनोज जोशी, सचिव, MoHUA यांच्या हस्ते गौरविण्यात आले. पुणे महानगरपालिकेच्या वतीने महापालिका आयुक्त विक्रम कुमार, अतिरिक्त महापालिका आयुक्त (इ), डॉ. कुणाल खेमनार व घनकचरा व्यवस्थापन विभागप्रमुख, उप आयुक्त संदीप कदम यांनी पुरस्कार स्वीकारला.महापालिकेचे सर्व अधिकारी, कर्मचारी यांनी केलेले अथक परिश्रम, नागरिकांनी दिलेला सकारात्मक प्रतिसाद व स्वयंसेवी संस्था या सर्वांचे सांधिक प्रयत्न व नाविन्यपूर्ण प्रकल्पाच्या अंतर्भाव, या मुळे हा सन्मान प्राप्त झाला आहे. पुढील काळात लोकसहभागातून स्वच्छतेसाठी महापालिका आणखी प्रयत्न करेल असे मत त्यावेळी आयुक्त विक्रम कुमार का यांनी व्यक्त केले होते.

अमित राज ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली शुक्रवारी पुण्यात मोर्चा …

0

पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने मराठी भाषा भवनाची निर्मिती पूर्ण करणे, विद्यापीठाची शांतता भंग करणाऱ्या व्यक्तींवर कडक कारवाई करावी, तातडीने नवे वसतिगृह बांधण्याची प्रक्रिया सुरू करावी यांसह अनेक मागण्यांकरिता महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेतर्फे म.न.वि.से. अध्यक्ष तथा मनसे नेते अमित राज ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली शुक्रवार, दिनांक २३ फेब्रुवारी रोजी सकाळी १० वाजता स्थळ – जे.डब्ल्यू मॅरीऑट इंटिल चौक, सेनापती बापट मार्ग, चतुः कुंभी मंदिर पायथा ते सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ पर्यंत हा मोर्चा काढण्यात येणार आहे, अशी माहिती मनसे प्रवक्ते व म.न.वि. से. राज्य सरचिटणीस गजानन काळे यांनी पत्रकार परिषदेत दिली.

पत्रकार परिषदेला मनसे नेते राजेंद्र वामस्कर, पुणे मनसे शहराध्यक्ष साईनाथ बाबर, म.न.वि. से. राज्य सरचिटणीस आणि प्रवक्ते मजानन काळे, म.न.वि. से. राज्य प्रमुख संघटक प्रशांत कनोजिया, राज्य सचिव आशिष सावळे-पाटील, पुणे शहराध्यक्ष अमोल शिंदे, राज्य कार्यकारिणी सचिन पवार, सारंग सराफ, अभिषेक थिटे, शैलेश विटकर, रुपेश घोलप, रवि बनसोडे आदी उपस्थित होते.

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाची स्थापना ही मराठी भाषेचा प्रसार प्रचार करण्यासाठी झाली आहे. हे लक्षात घेऊन विद्यापीठाने मराठी भाषा भवनाची निर्मिती पूर्ण करून, ते विद्यार्थी नागरिकांसाठी खुले करावे. त्याचप्रमाणे शैक्षणिक विभाग आणि संलग्न महाविद्यालयात दर्शनी भागात पुणे विद्यापीठ गीत ठळक भाषेत लावणे गरजेचे आहे. तसेच सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात काही दिवसांपासून अशांतता असल्याने, विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक क्षमतेवर आणि मानसिकतेवर नकारात्मक परिणाम होत आहे. अशावेळी विद्यापीठाची शांतता भंग करणाऱ्या व्यक्तींवर कडक कारवाई करावी; तसेच धार्मिक भावना दुखावण्याचे प्रकार होऊ नये, याची काळजी घ्यावी, अशी मागणी करण्यात आली.

पुणे विद्यापीठात सुमारे तीन हजार, तर पुणे, नाशिक, नगर जिल्ह्यातील संलग्न ८०० महाविद्यालयांमध्ये सुमारे सात लाख विद्यार्थी शिक्षण घेतात. या विद्यार्थ्यांच्या शिक्षणानंतर, त्यांच्या रोजगारासाठी विद्यापीठाने शैक्षणिक संकुलात रोजगार मेळावे घ्यावेत. उद्योग आणि सेवा क्षेत्रातील नोकरीच्या संधी पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या अंतिम वर्षातील विद्यार्थ्यांना समजण्यासाठी स्वतंत्र प्लेसमेंट विभाग सुरू करून, त्याला ऑनलाइन प्लेसमेंट पोर्टलवी जोड यावी. मनुष्यबळ उपलब्ध करून द्यावे.

विद्यापीठात शिकणाऱ्या साधारण हजार विद्यार्थ्यांना अजूनही वसतिगृहाची कमतरता आहे. त्यामुळे तातडीने नवे वसतिगृह बांधण्याची प्रक्रिया सुरू करावी. परदेशात किंवा परराज्यात शिक्षणासाठी जाणा-या विद्यार्थ्यांना पदवी प्रमाणपत्र, गुणपत्रिका, ट्रांस्क्रिप्ट अशा कागदपत्रांची गरज भासते. ही कागदपत्रे लवकर मिळण्यासाठी आणि संपूर्ण प्रक्रिया पास्दी होण्यासाठी विद्यार्थी सुविधा केंद्रातील सर्व सुविधा संपूर्णपणे ऑनलाईन कराव्यात. अर्जाच्या हार्ड कॉपी आणून देण्याची प्रक्रिया बंद करावी.

अनेक महाविद्यालयांच्या संकेतस्थळ अद्यावत नसून, त्यावर फारच त्रोटक माहिती आहे. अशा सर्व महाविद्यालयांना सूचना देऊन, संकेतस्थळ अद्यावत करून, त्यावर महाविद्यालयाच्या संबंधित सर्व माहिती प्रकाशित करण्याच्या सूचना चाव्या, नगर आणि नाशिक उपकेंद्राचे काम पूर्ण करून, तेथे तातडीने रोजगाराभिमुख अभ्यासक्रम सुरू करावेत. त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांला कोणतीही अडचण आल्यास किंवा त्याला शैक्षणिक कागदपत्रांची गरज भासत्यास ते तेथूनव उपलब्ध व्हावे. संबंधित विद्यार्थ्याला पुण्यात येण्याची गरज भासू नये.

राज्यात दुष्काळ सहश्य परिस्थिती आहे. अशा परिस्थितीत विद्यापीठाने या भागातील विद्यार्थ्यांची सीएसआस्ख्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक शुल्काची; तसेच एकवेळ जेवणाची सोय करण्यासाठी पावले उचलावीत, विद्यापीठाने १११ जागांसाठी प्राध्यापक भरती सुरू केली आहे. ठी भस्ती पास्टर्जी पद्धतीने पार पाडावी आणि गुणवत्ताधास्क उमेदवारांना न्याय मिळावा. या भरतीवर ठसविक व्यक्ती किंवा संघटनेचे वर्चस्व असू नये. असे झाल्यास तीव्र स्वरूपात आंदोलन करण्यात येईल.

मिळकत कर न भरणाऱ्या मिळकतधारकांवर मिळकत जप्त करणेची धडक मोहीम…उप आयुक्त माधव जगताप

पुणे-पुणे महानगरपालिकेमधील कर आकारणी व कर संकलन विभाग हा उत्पन्नाचा महत्वाचा स्त्रोत आहे. सन २०२३-२४ या आर्थिक वर्षाकरिता देण्यात आलेल्या उद्दिष्ट पूर्ततेच्या अनुषंगाने कर आकारणी व कर संकलन कार्यालयाकडून थकबाकी वसुली, मिळकत जप्तीची व आकारणी करण्याची मोहीम हाती घेतली आहे.अशी माहिती येथे उप आयुक्त ,आणि कर आकारणी व कर संकलनप्रमुख माधव जगताप यांनी दिली .

ते म्हणाले,’ पुणे महानगरपलिका कार्यक्षेत्रातील ज्या मिळकतधारकांनी अ‌द्यापही मिळकत कर भरलेला नाही, अशा थकबाकी असलेल्या मिळकती जप्त करण्याची तीव मोहीम दिनांक २२/०२/२०२४ पासून सुरु करण्यात येत आहे. त्याअनुषंगाने पुणे महानगरपालिका कार्यक्षेत्रात परिमंडळ निहाय पथके तयार करण्यात आलेली आहेत.नागरिकांना मिळकत कर भरणे सुलभ व्हावे याकरिता सर्व शासकीय सुट्टीच्या दिवशी व प्रत्येक शनिवार सकाळी १० ते दुपारी ४:०० वाजेपर्यंत व रविवार सकाळी १०:०० ते दुपारी २:०० वाजेपर्यंत नागरी सुविधा केंद्रे सुरु ठेवण्यात आली आहेत.नागरी सुविधा केंद्र सुरु राहणार असले तरी, नागरिकांनी जास्तीत जास्त online प्रणालीद्वारे “propertytax.punecorporation.org” या संकेतस्थळावरून मिळकत कर भरणे बाबत आवाहन करण्यात येत आहे.

जादुई आवाजाचा विनम्र निवेदक ; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ज्येष्ठ निवेदक अमीन सयानी यांना श्रद्धांजली

0

मुंबई, दि. २१ :- ज्येष्ठ रेडिओ निवेदक अमीन सयानी यांच्या निधनाबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दु:ख व्यक्त करून, त्यांना विनम्र श्रद्धांजली अर्पण केली आहे.

शोकसंदेशात मुख्यमंत्री म्हणतात, अमीन सयानी यांच्या रसाळ शैलीतल्या निवेदनांमुळे श्रोते मंत्रमुग्ध होऊन जात. त्यांच्या जादुई आवाजाची भुरळ मागील काही पिढ्यांपासून अगदी आत्ताच्या पिढीपर्यंत देखील टिकून आहे. अमीन सयानी हे त्यांच्या आवाजाने करोडो कुटुंबातले सदस्यच झाले होते. त्यांच्या जाण्याने रेडिओच्या चाहत्यांत विनम्र असा आपला माणूस हरपल्याची भावना आहे, असे नमूद करून मुख्यमंत्र्यांनी अमीन सयानी यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली आहे.