Home Blog Page 1194

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पाच दिवशीय अश्वमेध महायज्ञात यज्ञ अग्नीमध्ये दिली आहुती

0

रायगड दि. २२: भारताचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी विकसित भारताचे स्वप्न पाहिले आहे. भारताच्या सांस्कृतिक योगदानामध्ये गायत्री परिवाराचे सर्वाधिक योगदान असेल, असा विश्वास उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.

अखिल विश्व गायत्री परिवाराच्या वतीने खारघरमध्ये पाच दिवशीय अश्वमेध महायज्ञाचे आयोजन करण्यात आले असून आज दुसऱ्या दिवशी उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी उपस्थित राहून देवावाहन, देवदर्शन घेतले. तसेच महायज्ञात सहभागी होऊन यज्ञ अग्नीमध्ये आहुती दिली.

यावेळी खासदार जे. पी. नड्डा, डॉ. मल्लिका नड्डा, गायत्री परिवाराचे संस्थापक शैलबाळा पंड्या,  डॉ.चिन्मय पंड्या, सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार, कौशल्य व रोजगार मंत्री मंगल प्रभात लोढा, आमदार सर्वश्री चंद्रशेखर बावनकुळे, आशिष शेलार, प्रविण दरेकर,  मंदा म्हात्रे, प्रशांत ठाकूर, जिल्हाधिकारी किशन जावळे, गीतकार समीर, गायक शंकर महादेवन, संगीत आणि गायक हिमेश रेशमिया आणि अभिनेता सुनील लहिरी यासह इतर मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

महाराष्ट्र ही वीरांची, संतांची तसेच ज्योतिर्लिंग आणि शक्तिपीठ असलेली भूमी आहे. या भूमीत वैश्विक शांती साठी महायज्ञ आयोजित करण्यात आला आहे, यासाठी गायत्री परिवाराचे आभार मानून  उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले की,  गायत्री परिवाराने यज्ञ परंपरेला वैश्विक महत्त्व प्राप्त करून दिले आहे. ही सनातन, यज्ञ संस्कृती विज्ञानाधिष्ठीत असून विश्व शांती तसेच सदाचारी वर्तनासाठी जागतिक पातळीवर पोहोचविण्याचे काम गायत्री परिवार करीत आहे.

हम बदलेंगे तो देश बदलेगा हा आपला मंत्र आहे. गायत्री परिवाराने नशामुक्ततेसाठी विशेष अभियान हाती घेतले आहे. विश्व कल्याणसाठी गायत्री परिवाराचे मोठे योगदान असल्याचेही उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी यावेळी सांगितले.

या अश्वमेध यज्ञात सहभागी सर्वानी यावेळी पर्यावरण संरक्षण, महिला सबलीकरण, अंमली पदार्थ मुक्त जग, मानव कल्याण, सहकार्य-संघटन आणि मजबूत राष्ट्र उभारणीसाठी संकल्प केला.

दोन दिवसीय मुंबई शहर ग्रंथोत्सवास प्रारंभ

0

मुंबई दि. २२ : उच्च व तंत्र शिक्षण विभाग, ग्रंथालय संचालनालय आणि जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने मुंबई शहर ग्रंथोत्सव २०२३ चे आयोजन दादर येथील मुंबई मराठी ग्रंथ संग्रहालयात करण्यात आले आहे. २२ व २३ फेब्रुवारी रोजी होणाऱ्या ग्रंथोत्सवाचे उद्घाटन महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाचे अध्यक्ष डॉ. सदानंद मोरे यांच्या हस्ते झाले.

दोन दिवसीय ग्रंथोत्सवात २२ फेब्रुवारी रोजी ग्रंथ दिंडी, अभिवाचन दृकश्राव्य कार्यक्रम, लेखक तुमच्या भेटीला या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. तर २३ फेब्रुवारी रोजी मराठीतील दुर्मिळ ग्रंथांचे प्रदर्शन, ग्रंथ भेट वितरण व व्याख्यान, वसा वाचन संस्कृतीचा या विषयावर परिसंवाद, कुटुंब रंगले काव्यात हे एकपात्री काव्य नाट्य अनुभव, हास्य संजीवनी अशा विविध कार्यक्रमांचा आस्वाद विद्यार्थी व साहित्यप्रेमींना घेता येणार आहे.

०००

गिरगाव चौपाटी येथील सेठ तुलसीदास किलाचंद उद्यानातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे अनावरण

0

भाजपा राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा मुंबई दौरा यशस्वी

मुंबई दिनांक २२ फेब्रुवारी २०२४
भाजपा राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा दोन दिवसीय मुंबई दौरा यशस्वीपणे पार पडला. गुरुवारी श्री.नड्डाजी यांच्या हस्ते गिरगाव चौपाटी येथील सेठ तुलसीदास किलाचंद उद्यानातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या शिल्पाकृती पुतळ्याचे अनावरण झाले. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत ‘हिरोज ऑफ मुंबई’ कार्यक्रमांतर्गत मुंबईच्या सर्वांगीण विकासासाठी योगदान देणाऱ्या १८ विभूतींच्या अर्धाकृती पुतळ्यांचे अनावरणही यावेळी करण्यात आले. कॅबिनेट मंत्री ॲड. मंगलप्रभात लोढा यांच्या संकल्पनेतून हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला.

येणाऱ्या काळात हे उद्यान हजारो पर्यटकांचे आकर्षण नक्कीच बनेल पण त्यासोबतच लाखो भारतीयांना प्रेरणा देणारा एक स्रोत म्हणून ओळखले जाईल असे मत भाजपा राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी यावेळी व्यक्त केले. गिरगाव चौपाटी येथील किलाचंद गार्डनमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर, स्वातंत्र्यवीर सावरकर, लता मंगेशकर, दादासाहेब फाळके, कुसुमाग्रज, होमी भाभा, जेआरडी टाटा, जगन्नाथ शंकर शेठ, अण्णाभाऊ साठे, बाळासाहेब ठाकरे, धीरूभाई अंबानी, रामनाथ गोयंका, सेठ मोती शाह, हुतात्मा बाबू गेन, अशोक कुमार जैन, कोळीबांधव, सचिन तेंडुलकर अशा विविध मान्यवरांच्या पुतळ्यांचा समावेश आहे.

यावेळी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर, भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, मुंबई भाजपा अध्यक्ष आ. ॲड. आशिष शेलार, मुंबई शहराचे पालकमंत्री दीपक केसरकर, डॉ. मंजू लोढा यांच्यासह महापुरुषांचे वंशज देखील उपस्थित होते. दरम्यान दुपारी नवी मुंबईत भाजपा राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्या उपस्थितीत १००८ कुंडीय अश्वमेध गायत्री महायज्ञही संपन्न झाला.

पंतप्रधानांकडून गुजरातमध्ये 13,500 कोटी रुपयांपेक्षा अधिक किमतीच्या अनेक प्रकल्पांची पायाभरणी आणि लोकार्पण

0

इंटरनेट कनेक्टिव्हिटी, रेल्वे, रस्ते, शिक्षण, आरोग्य, दळणवळण, संशोधन आणि पर्यटन क्षेत्रातील अनेक प्रकल्पांचे उद्घाटन

भारत नेट फेज-II – गुजरात फायबर ग्रिड नेटवर्क लिमिटेडचे राष्ट्रार्पण

रेल्वे, रस्ते आणि पाणी पुरवठा यासाठीचे अनेक प्रकल्प देशाला समर्पित

गांधीनगर येथील गुजरात जैवतंत्रज्ञान विद्यापीठाच्या मुख्य शैक्षणिक इमारतीचे राष्ट्रार्पण

आणंद येथे जिल्हास्तरीय रुग्णालय व आयुर्वेदिक रुग्णालयाची आणि अंबाजी येथील रिंछडिया महादेव मंदिर व तलावाच्या विकासकामाची पायाभरणी

गांधीनगर, अहमदाबाद, बनासकांठा आणि महेसाणा येथे अनेक रस्ते आणि पाणीपुरवठा सुधारणा प्रकल्पांची तसेच डीसा येथे हवाई दल तळाच्या धावपट्टीची पायाभरणी

अहमदाबादमधील मानव आणि जैविक विज्ञान गॅलरीची, गिफ्ट सिटी येथे गुजरात जैवतंत्रज्ञान संशोधन केंद्राच्या (जीबीआरसी) नवीन इमारतीची पायाभरणी

“महेसाणाला भेट देणे नेहमीच खास असते”

“आत्ताच्या काळात देवकार्य असो किंवा देशकार्य असो, दोन्ही वेगाने घडत आहेत”

“समाजातील प्रत्येक व्यक्तीचे जीवन बदलणे हे मोदी गॅरंटीचे ध्येय आहे”

“जी काही प्रतिज्ञा घेतात, ती मोदी पूर्ण करतात, डीसाची ही धावपट्टी त्याचे उदाहरण आहे, ही मोदींची गॅरंटी आहे.”

“नवभारतात केला जाणारा प्रत्येक प्रयत्न भावी पिढ्यांसाठी एक वारसा तयार करत आहे”

नवी दिल्‍ली, 22 फेब्रुवारी 2024

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज गुजरातमधील तारभ, महेसाणा  येथे 13,500 कोटी रुपयांपेक्षा अधिक किमतीच्या अनेक विकास प्रकल्पांची पायाभरणी आणि राष्ट्रार्पण केले. या प्रकल्पांमध्ये इंटरनेट कनेक्टिव्हिटी, रेल्वे, रस्ते, शिक्षण, आरोग्य, दळणवळण, संशोधन आणि पर्यटन अशा अनेक क्षेत्रांचा समावेश आहे.

अयोध्येत रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यात बरोब्बर महिन्यापूर्वी म्हणजे 22 जानेवारीला सहभागी झाल्याची आठवण त्यांनी आपल्या भाषणात करून दिली. 14 फेब्रुवारी रोजी वसंतपंचमीला अबुधाबी येथे आखाती देशांतील पहिल्या हिंदू मंदिराचे उद्घाटन केल्याचा तसेच उत्तर प्रदेशातील संभल जिल्ह्यात कल्कीधामच्या पायाभरणीचा उल्लेख पंतप्रधानांनी केला. तारभ येथील वलीनाथ महादेव मंदिरात आज पंतप्रधानांनी अभिषेक केला, दर्शन घेतले व पूजा केली.

जगासाठी वलीनाथ शिव धाम हे केवळ एक तीर्थक्षेत्र आहे, परंतु रेवाडी समाज आणि देशभरातील भक्तांसाठी ते पूज्य गुरूस्थान आहे, असे पंतप्रधान म्हणाले.

देवकार्य  आणि देशकार्य  ही दोन्ही  वेगाने सुरू असल्याने भारताच्या विकासाच्या प्रवासात सध्याच्या क्षणाचे महत्त्व पंतप्रधानांनी विशद केले. “एकीकडे  हा कार्यक्रम झाला आणि 13,000 कोटी रुपयांच्या विकास कामांचे लोकार्पण झाले किंवा पायाभरणी झाली,” अशी माहिती त्यांनी दिली. रेल्वे, रस्ते, बंदर, वाहतूक, पाणी, सुरक्षा, शहरी विकास आणि पर्यटन प्रकल्पांमुळे राहणीमान सुलभ होईल आणि या भागातील तरुणांसाठी रोजगाराच्या नवीन संधी निर्माण होतील, असेही ते म्हणाले.

महेसाणाच्या  पवित्र भूमीत दैवी ऊर्जा असून ती लोकांना भगवान कृष्ण आणि भगवान महादेव यांच्या हजारो वर्षांच्या आध्यात्मिक चेतनेशी तसेच गादीपती महंत वीरम-गिरी बापूजींच्या प्रवासाशी जोडते, असे पंतप्रधान म्हणाले. गादीपती महंत बलदेवगिरी बापूंचा संकल्प पुढे नेण्यासाठी आणि तो पूर्ण करण्यासाठी महंत श्री जयरामगिरी बापू यांनादेखील त्यांनी अभिवादन केले.   बलदेवगिरी बापूजींशी असलेल्या  चार दशके जुन्या  संबंधांना पंतप्रधानांनी  उजाळा दिला  आणि गुजरातचे तत्कालीन मुख्यमंत्री या नात्याने आपण त्यांचे अनेक वेळा आपल्या निवासस्थानी अध्यात्मिक चेतना जागृत करण्यासाठी स्वागत केल्याचे सांगितले.   2021 मध्ये बलदेवगिरी बापूजींचे निधन झाले आणि त्यांच्या संकल्पाच्या सिद्धीनंतर त्यांचा आत्मा आज सर्वांना आशीर्वाद देईल, अशा भावना त्यांनी व्यक्त केल्या. शेकडो कारागीर आणि श्रमजीवींच्या योगदानावर आणि त्यांनी केलेल्या प्रयत्नांवर प्रकाश टाकत पंतप्रधान म्हणाले, “शेकडों वर्षे जुने मंदिर 21 व्या शतकातील भव्यतेने आणि प्राचीन परंपरांच्या दिव्यतेने पूर्ण झाले आहे.” वलीनाथ महादेव, हिंगलाज माता जी आणि भगवान दत्तात्रेय यांच्या प्रतिष्ठापनेसाठी कारागीरांनी केलेल्या प्रयत्नांचे त्यांनी कौतुक केले आणि त्यांना शुभेच्छा दिल्या.

पंतप्रधान म्हणाले की, ही मंदिरे फक्त प्रार्थनास्थळे नसून ती आपल्या प्राचीन सभ्यतेची प्रतीके आहेत. समाजात ज्ञानाचा प्रसार करण्यात मंदिरांची भूमिका पंतप्रधानांनी सांगितली. ज्ञान प्रसाराची परंपरा पुढे नेल्याबद्दल पंतप्रधानांनी स्थानिक धार्मिक आखाड्यांची प्रशंसा केली. पुस्तक पर्व  तसेच शाळा आणि वसतिगृहाच्या स्थापनेमुळे लोकांमध्ये जागरूकता वाढली आणि शिक्षणाचा प्रसार झाला असे त्यांनी सांगितले.

देवासाठी केलेले कार्य आणि देशासाठी केलेले कार्य याचे याहून अधिक चांगले उदाहरण असू शकत नाही, असे पंतप्रधान म्हणाले. इतकी उज्ज्वल परंपरा जोपासल्याबद्दल त्यांनी रेवाडी  समाजाचे कौतुक केले.

वलीनाथ धाममध्ये रुजलेल्या सब का साथ सब का विकासाच्या भावनेचा पंतप्रधानांनी उल्लेख केला आणि या भावनेतूनच केंद्र सरकार देशातील प्रत्येक घटकाचा विकास करण्यासाठी वचनबद्ध आहे, असे ते म्हणाले. समाजातील शेवटच्या घटकाच्या जीवनात परिवर्तन करण्याचे मोदींच्या गॅरंटीचे  ध्येय आहे. देशात नव्याने निर्माण होत असलेली मंदिरे आणि कोट्यवधी गोरगरिबांसाठी बांधण्यात येत असलेली पक्की घरे यांचा उल्लेख करून त्यांनी नुकतेच 1.25 लाख घरांचे राष्ट्रार्पण आणि पायाभरणीचे स्मरण केले. देशातील 80 कोटी नागरिकांना मोफत शिधा देणे म्हणजे देवाचा प्रसाद होय तसेच 10 कोटी नवीन कुटुंबांना पाईपद्वारे पाणी देणे म्हणजे अमृत होय असे त्यांनी सांगितले. गुजरात मधील वारसा स्थळांचा विकास करण्यासाठी केंद्र सरकार करत असलेल्या प्रयत्नांचा आणि  गेल्या दोन दशकात केलेल्या पायाभूत सेवा सुविधा कामांचाही त्यांनी उल्लेख केला. भारतातील विकास आणि वारसा यांच्यात अनेक दशकांपासून निर्माण झालेला संघर्ष, पवित्र सोमनाथ मंदिर वादाचे ठिकाण बनणे, पावागडच्या जागेकडे दुर्लक्ष, मोढेरा येथील सूर्य मंदिराचे मतपेटीचे  राजकारण, प्रभू रामाच्या अस्तित्वावर प्रश्नचिन्ह निर्माण करून त्याच्या मंदिराच्या विकासात अडथळे निर्माण झाल्याबद्दलच्या व्यथा त्यांनी व्यक्त केल्या. प्रभू रामचंद्रांच्या जन्मभूमीवर मंदिराचे निर्माण झाल्यामुळे संपूर्ण देश हर्षोल्हासात असतात हेच लोक अजूनही नकारात्मकता पसरवत आहेत, असे ते म्हणाले.

नवीन भारतात आज होत असलेले प्रत्येक प्रयत्न हे येणाऱ्या पिढीसाठी वारसा ठरावेत, या दृष्टीने केले जात आहेत. आज निर्माण होत असलेले नवीन आणि आधुनिक रस्ते आणि रेल्वेमार्ग हे विकसित भारताचे मार्ग असतील. आज मेहसाणाकरता रेल्वे संपर्कयंत्रणेची सुविधा अधिक मजबूत झाली आहे. कांडला, टुना  आणि मुंद्रा बंदरांसह बनासकांठा आणि पाटणची कनेक्टिव्हिटी  सुधारली आहे, असे ते म्हणाले. हवाई दलाच्या डीसा येथील तळाच्या   धावपट्टीसाठी दीड वर्षांपूर्वी आपण  पायाभरणी केल्याचे त्यांनी सांगितले. मोदी जी प्रतिज्ञा करतात ती पूर्ण करतात आणि डीसा  हे त्याचेच उदाहरण आहे, असे ते म्हणाले.

उत्तर गुजरातमध्ये औद्योगिकीकरणाच्या व्याप्तीसह संधी फारच मर्यादित होत्या, असा 20 ते 25 वर्षांपूर्वीचा काळ आठवून पंतप्रधानांनी पशुपालकांची आव्हाने आणि शेतातील सिंचन याकडे लक्ष वेधले. सध्याच्या सरकारने आणलेले सकारात्मक बदल अधोरेखित करून पंतप्रधान म्हणाले की आता शेतकरी वर्षभरात दोन ते तीन पिके घेतात आणि या संपूर्ण प्रदेशातील जलपातळी देखील वाढली आहे. पाणीपुरवठा आणि जलस्रोतांशी संबंधित 1500 कोटी रुपयांहून अधिक किमतीच्या 8 प्रकल्पांच्या उद्घाटन आणि पायाभरणीचा संदर्भ देताना पंतप्रधान म्हणाले की, यामुळे उत्तर गुजरातच्या पाण्याची समस्या सोडवण्यात आणखी मदत होईल. ठिबक सिंचनासारखे आधुनिक तंत्रज्ञान आणि रसायनमुक्त नैसर्गिक शेतीचा उदयोन्मुख कल आत्मसात केल्याबद्दल त्यांनी उत्तर गुजरातमधील शेतकऱ्यांचे कौतुक केले. “तुमचे प्रयत्न देशभरातील शेतकऱ्यांचा उत्साह द्विगुणित करेल”, असे त्यांनी सांगितले. आपल्या भाषणाचा समारोप करताना पंतप्रधानांनी देशाचा विकास करण्यासाठीच्या  तसेच आपला समृद्ध वारसा जतन करण्यासाठीच्या केंद्र सरकारच्या प्रयत्नांवर भर दिला तसेच आजच्या विकास प्रकल्पांबद्दल शुभेच्छा दिल्या.

यावेळी गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांच्यासह अनेक खासदार, आमदार आणि गुजरात सरकारचे प्रतिनिधी उपस्थित होते.

पार्श्वभूमी

पंतप्रधानांनी मेहसाणातील तारभ येथील सार्वजनिक कार्यक्रमात 8 हजारांहून अधिक ग्रामपंचायतींना अतिजलद (हाय-स्पीड) इंटरनेट पुरवणाऱ्या भारत नेट टप्पा दोन-गुजरात फायबर ग्रीड नेटवर्क लिमिटेडसह महत्त्वाचे प्रकल्प, रेल्वे मार्ग दुहेरीकरण, गेज रूपांतरण, महेसाणा आणि बनासकांठा जिल्ह्यांमध्ये नवीन ब्रॉड गेज मार्गासाठी अनेक प्रकल्प; खेडा, गांधीनगर, अहमदाबाद आणि महेसाणा येथे अनेक रस्ते प्रकल्प; गांधीनगर येथे गुजरात जैवतंत्रज्ञान विद्यापीठाची मुख्य शैक्षणिक इमारत; याबरोबरच बनासकांठा येथे अनेक पाणीपुरवठा प्रकल्प यांचे  राष्ट्रार्पण केले.

या कार्यक्रमादरम्यान, पंतप्रधानांच्या हस्ते आणंद जिल्ह्यातील नवीन जिल्हास्तरीय रुग्णालय आणि आयुर्वेदिक रुग्णालयासह अनेक महत्त्वाचे प्रकल्प;  बनासकांठामधील अंबाजी प्रदेशातील रिंछडिया महादेव मंदिर आणि तलावाचा विकास;  गांधीनगर, अहमदाबाद, बनासकांठा आणि महेसाणा येथे अनेक रस्ते प्रकल्प;  डीसा येथील वायुदलाची धावपट्टी; अहमदाबादमधील मानवी आणि जैव विज्ञान दालन; गुजरात जैवतंत्रज्ञान संशोधन केन्द्र  (जीबीआरसी) गिफ्ट सिटी येथे नवीन इमारत;  गांधीनगर, अहमदाबाद आणि बनासकांठा येथे पाणीपुरवठा सुधारण्यासाठी अनेक प्रकल्पांची पायाभरणी करण्यात आली.

साखर हंगाम 24-25 (ऑक्टोबर-सप्टेंबर) :उसाच्या ‘रास्त आणि किफायतशीर किंमत’ (FRP) ला मंजुरी

0

10.25% मूळ वसुलीसाठी 340 रुपये प्रति क्विंटल या दराने उसाच्या रास्त आणि किफायतशीर किमतीला (FRP) मंजुरी

10.25% पेक्षा जास्त मूळ वसुलीतील प्रत्येक 0.1% वाढीसाठी क्विंटलमागे 3.32 रुपये प्रीमियम प्रदान केले जाईल

9.5% किंवा त्यापेक्षा कमी वसुली असलेल्या साखर कारखान्यांसाठी 315.10 रुपये प्रति क्विंटल दराने एफआरपी निश्चित

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील आर्थिक व्यवहारविषयक मंत्रिमंडळ समितीने साखर हंगाम 2024-25 (ऑक्टोबर-सप्टेंबर) साठी 10.25%  मूळ वसुलीसाठी 340 रुपये प्रति क्विंटल या दराने उसाच्या रास्त आणि किफायतशीर किमतीला (एफआरपी) मंजुरी दिली आहे. उसाला मिळालेला हा  ऐतिहासिक भाव असून चालू हंगाम 2023-24 च्या उसाच्या एफआरपीपेक्षा तो सुमारे 8 टक्क्यांनी जास्त आहे. एफआरपीचे सुधारित दर यावर्षी 1 ऑक्टोबर 2024 पासून लागू होतील.

उसाच्या उत्पादनाची A2 + FL किंमत (म्हणजेच वास्तविक भरलेली किंमत आणि कौटुंबिक श्रमाचे मूल्य) यापेक्षा 107% जास्त असलेल्या  नवीन एफआरपीमुळे ऊसउत्पादक शेतकऱ्यांना नक्कीच लाभ होईल. भारतात ऊसाला  संपूर्ण जगभरातील उच्चांकी किंमत दिली जाते हे उल्लेखनीय असून ग्राहकांना स्वस्त दरात साखर उपलब्ध व्हावी यावर केंद्र सरकार सातत्याने लक्ष ठेवते. देशातील 5 कोटी ऊस उत्पादक शेतकरी आणि त्यांच्यावर अवलंबून असणारे सदस्य तसेच साखर कारखाना उद्योग तसेच इतर संबंधित उद्योगांमध्ये कार्यरत असणाऱ्यांना या निर्णयाचा फायदा मिळणार आहे. शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्यासाठी मोदींची हमी पूर्ण झाल्याचे यामधून दिसून येते.

या मंजुरीनुसार, साखर कारखानदार 10.25% मूळ वसुलीसाठी उसाची एफआरपी 340 रुपये प्रति क्विंटल देतील. वसुलीच्या प्रत्येक ०. 1% वाढीसह, शेतकऱ्यांना 3. 32 रुपयांची अतिरिक्त किंमत मिळेल तर वसुली ०. 1% ने कमी केल्यावर तीच रक्कम वजा केली जाईल. मात्र  315.10 रुपये प्रति क्विंटल ही उसाची किमान किंमत आहे जी 9.5% मूळ वसुलीसाठी आहे. साखरेची वसुली कमी असली तरी, शेतकऱ्यांना 315.10 रुपये प्रति क्विंटल दराने एफआरपी  मिळेल. 

गेल्या 10 वर्षात मोदी सरकारने शेतकऱ्यांना त्यांच्या पिकाची योग्य किंमत योग्य वेळी मिळण्याची हमी दिली आहे. मागील साखर हंगाम 2022-23 मधील 99.5% उसाची थकबाकी आणि इतर सर्व साखर हंगामातील 99.9% शेतकऱ्यांना आधीच अदा करण्यात आली आहे, ज्यामुळे साखर क्षेत्राच्या इतिहासातील सर्वात कमी उसाची थकबाकी प्रलंबित आहे. केंद्र सरकार वेळोवेळी करत असलेल्या धोरणात्मक हस्तक्षेपामुळे साखर कारखानदारी आत्मनिर्भर बनली आहे आणि साखर हंगाम 2021-22 पासून सरकारकडून त्यांना कोणतेही आर्थिक सहाय्य दिले जात नाही. तरीही केंद्र सरकारने शेतकऱ्यांना ऊसासाठी ‘आश्वासित एफआरपी आणि आश्वासित हमीभाव’ देऊ केला आहे.

भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यातील फौजदाराच्या नावाने एक लाख रुपयांची लाच घेणाऱ्याला पकडले.

पुणे- .

ऑनलाइन फसवणुकीच्या प्रकरणात तक्रार मिटवण्यासाठी भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यातील पोलिस उपनिरीक्षकाच्या नावाने एक लाख रुपयांची लाच मागून 25 हजार रुपये घेतल्या प्रकरणी खाजगी व्यक्ती लाचलुचपत प्रतिबंधक पथकाच्या एसीबीच्या जाळ्यात सापडला .तुषार शितल बनकर (वय -30 )असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव असून बनकर हा आंबेगाव पठार या ठिकाणी राहावयास आहे .तसेच इम्पोर्ट एक्स्पोर्टचा व्यवसाय करतो .ही कारवाई बुधवारी (दि.21) कात्रज परिसरातील सुखसागर नगर येथील स्वामी समर्थ स्नॅक्स सेंटर येथे केली

तुषार बनकर याच्यावर भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम सन 1988 चे कलम सात नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार यांच्याविरुद्ध भारती विद्यापीठ पोलिस स्टेशन तसेच सायबर युनिट याठिकाणी फसवणुकीचा ऑनलाईन तक्रार अर्ज दाखल होता. सदर अर्जामध्ये चौकशी अधिकारी पोलिस उपनिरीक्षक संजय नरळे यांना सांगून मदत करण्यासाठी व प्रकरण मिटवण्यासाठी खाजगी व्यक्ती तुषार बनकर यांनी पीएसआय करिता एक लाख रुपयांची लाचेची मागणी केली. त्यामुळे त्यांनी याबाबत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली.

एसीबीने तक्रारीची पडताळणी केली असता ,तुषार बनकर यांनी पोलिस उपनिरीक्षक संजय नरळे यांना सांगून मदत करतो व प्रकरण मिटवतो असे सांगून संजय नरळे यांच्या करीता एक लाख रुपये याची मागणी केली. ते पैसे टप्प्याटप्प्याने देण्यास सांगून लाचेचा पहिला हप्ता 25 हजार रुपये घेण्यात आले आहे.याप्रकरणी भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून एसीबीचे पोलिस निरीक्षक प्रवीण निंबाळकर पुढील तपास करत आहे. सदरची कारवाई पोलिस अधीक्षक अमोल तांबे ,अप्पर पोलिस अधीक्षक डॉ. शितल जानवे ,सहाय्यक पोलिस आयुक्त नितीन जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली

तरुणीला रस्त्यात अडवून तिला किस करण्याचा प्रयत्न,महमंदवाडीच्या भुरट्याला अटक

पुणे : रस्त्याने पायी जाणाऱ्या तरुणीला अडवून तिला किस करण्याचा प्रयत्न करुन विनयभंग केल्याची घटना कोंढवा परिसरात घडली आहे. याप्रकरणी कोंढवा पोलिसांनी एका तरुणाला अटक केली आहे. हा प्रकार मंगळवारी (दि.20) रात्री आठच्या सुमारास महंमदवाडी येथील विबग्योर स्कूलच्या समोर घडला.

याबाबत 20 वर्षीय तरुणीने कोंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. यावरुन भारतलाल रामप्रसाद कुलदीप वर्मा (वय-19 रा. कृष्णानगर, महंमदवाडी) याच्यावर आयपीसी 354, 354अ नुसार गुन्हा दाखल करुन अटक केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित तरुणी मंगळवारी रात्री विबग्योर स्कूलच्या समोरील रस्त्यावरुन पायी जात होती. त्यावेळी आरोपी त्या ठिकाणी थांबला होता. त्याने मुलीचे तोंड दाबून जबरदस्तीने किस करण्याचा प्रयत्न केला. तसेच तिचे कपडे फाडण्याचा प्रयत्न करुन विनयभंग केल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक राजेश उसगावकर करीत आहेत.

दौंड रेल्वे स्थानकाच्या संदर्भातील मागण्यांकडे दुर्लक्ष करू नका – खासदार सुप्रिया सुळे यांची रेल्वेमंत्र्यांना विनंती

पुणे-दौंड स्थानकाला उपनगरीय स्थानकाचा दर्जा देणे, डेमू ऐवजी इमू आणि कोरोना काळात बंद करण्यात आलेले एक्सप्रेस रेल्वे गाड्यांचे थांबे पूर्ववत सुरू करणे आदी प्रमुख मागण्या रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांच्याकडे खासदार सुप्रिया सुळे यांनी केल्या आहेत .दौंड रेल्वे स्थानकाला पुणे विभागाशी संलग्न करण्याबाबत 21 फेब्रुवारी रोजी निर्णय घेण्यात आला. त्याबरोबरच आता या स्थानकाला उपनगरीय स्थानकाचा दर्जा देणे आवश्यक आहे. याशिवाय डेमू गाड्यांमुळे नागरीकांची सोय होण्याऐवजी गैरसोयच होत आहे. हे लक्षात घेता येथे इएमयू सुरु होणे आवश्यक आहे. याबाबत मंत्री यांनी सकारात्मक विचार करुन निर्णय घेणे गरजेचे आहे, असे सुळे यांनी सांगितले आहे.

त्या म्हणाल्या ,’ बारामती लोकसभा मतदारसंघातील महत्वाचे रेल्वे स्थानक अशी ओळख असणाऱ्या दौंड जंक्शनला पुणे विभागाशी जोडण्याचा निर्णय घेतल्याबद्दल रेल्वेमंत्री आश्विनीजी वैष्णव आपले मनापासून आभार. हा महत्वाचा निर्णय घेऊन नागरीकांची गैरसोय दूर केली हे आम्हा सर्वांसाठी मोलाचे आहे. यासोबतच रेल्वे खात्याकडे आमच्या काही महत्वाच्या मागण्या प्रलंबित आहेत. यातील पहिली मागणी अशी की, दौंड स्थानकाला उपनगरीय स्थानकाचा दर्जा देणे आवश्यक आहे. याशिवाय दुसरी महत्वाची बाब म्हणजे डेमू गाड्यांमुळे नागरीकांची सोय होण्याऐवजी गैरसोयच होत आहे. याऐवजी येथे इएमयू सुरु होणे आवश्यक आहे. याबाबत मंत्रीमहोदयांनी सकारात्मक विचार करुन निर्णय घेणे गरजेचे आहे. याचबरोबर प्रवाशांच्या सोयीसाठी दौंड रेल्वेस्थानकावर सर्व रेल्वे गाड्यांना थांबा देणे आवशयक आहे. याशिवाय पर्यटनाच्या दृष्टीने तसेच जैवविधतेचा अभ्यास करणाऱ्या राष्ट्रीय तथा आंतरराष्ट्रीय अभ्यासकांसाठी महत्वपूर्ण असणारे स्थलांतरीत पक्षी भिगवण येथील पाणलोट क्षेत्रात उतरतात. त्यांना पाहण्यासाठी अनेक लोक येथे येतात. परंतु येथे पोहोचण्यासाठी रेल्वेची सेवा पुर्वीसारखी तत्पर राहिलेली नाही. कारण पुर्वी प्रत्येक एक्सप्रेस गाडी या स्थानकावर थांबत असे. याचा फायदा पंचक्रोशीतील नागरीकांनीही होत होता. कोविड काळात हा थांबा बंद करण्यात आला. आजही अनेक गाड्यांना भिगवण हा थांबा देण्यात आलेला नाही. रेल्वे मंत्रालयाने पर्यंटनाच्या आणि नागरीकांच्या सोयीच्या दृष्टीकोनातून विचार करुन येथे थांबा देण्याबाबत गांभीर्याने विचार करावा

विषबाधा झालेल्यांना उपचार करून घरी सोडले;आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांनी वाचविले शेकडो लोकांचे प्राण            

0

मुंबई, दि. 21 : बुलढाणा जिल्हयातील लोणार तालुक्यातील सोमठाणा व खापरखेड येथे अखंड हरिनाम सप्ताहाच्या कार्यक्रमात जेवणातून 208 जणांना विषबाधा झाल्याची घटना समोर आली होती.  विषबाधा झालेल्या सर्वांवर वेळेत उपचार करून त्यांना घरी सोडून देण्यात आले आहे. तर चार रुग्णांना ग्रामीण रुग्णालय बीबी (ता. लोणार) आणि तीन रुग्णांना ग्रामीण रुग्णालय, मेहकर येथे पुढील उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे, अशी माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी, बुलढाणा यांनी दिली आहे.

या घटनेची माहिती मिळताच नजीकच्या आरोग्य केंद्रातील डॉक्टर्स, नर्सेस आणि रुग्णवाहिका प्रत्यक्ष घटनास्थळावर पाठवण्यात आल्या. त्यामुळे जिथे हरिनाम सप्ताह सुरू होतात, त्या विठ्ठल रुक्मिणी मंदिराच्या आवारात तात्काळ रुग्णांना उपचार पुरविण्यात आले. त्यामुळे कुठलीही जीवितहानी झाली नाही.

विषबाधा झाल्याने उलटी जुलाब होऊन रुग्णाच्या शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी होऊन जिवितास धोका निर्माण होण्याची शक्यता असते. त्यामुळे त्यांच्यावर परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन जागेवरच उपचार करण्यात आले. आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांनी शर्तीचे प्रयत्न करून अनेकांचे सर्वांचे प्राण वाचविले. खापरखेडा आणि सोमठाणा येथील पाणी नमुने तपासणी करिता उपजिल्हा अनुजीव तपासणी प्रयोगशाळा  देऊळगाव राजा येथे पाठविण्यात आले आहेत.

गावात स्वच्छता मोहीम राबविण्यात आली असून पिण्याच्या पाण्याचे शुद्धीकरण करण्यात आले.  201 जणांची प्रकृती सुधारल्याने त्यांना उपचारानंतर रुग्णालयातून घरी पाठविण्यात आल्याची माहिती, जिल्हा आरोग्य अधिकारी यांनी दिली आहे. आरोग्य विभागातील सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांनी केलेल्या अथक प्रयत्नांमुळे कुठलीही जीवित हानी झाली नाही.

मुनावळे येथे महिन्याभरात वॉटर स्पोर्टस सुरू करणार

0

पर्यटन विकासातून दुर्गम भागातील नागरिकांना रोजगाराची संधी – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

श्री क्षेत्र महाबळेश्वर, ऐतिहासिक प्रतापगड किल्ल्याचे पर्यटनाच्या दृष्टीने जतन करणार

मुंबई, दि. २२: सातारा जिल्ह्यातील पश्चिम घाट परिसरातील धार्मिक, ऐतिहासिक व निसर्ग पर्यटनस्थळांच्या एकात्मिक विकासाकरिता पर्यटन विकास आराखड्यास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या शिखर समितीत मान्यता देण्यात आली. या आराखड्यासाठी सुमारे ३८१ कोटी रुपये मंजूर करण्यात आले असून श्री क्षेत्र महाबळेश्वर, प्रतापगड किल्ला जतन व संवर्धन, सह्याद्री व्याघ्र राखीव व वनक्षेत्रातील पर्यटन विकास व कोयना हेळवाक वन विभागांतर्गत कोयना नदी जलपर्यटनाचा समावेश आहे.

मुनावळे येथे महिन्याभरात वॉटर स्पोर्टस सुरू करण्यात येणार असून नदीमध्ये मोठ्या प्रमाणावर वॉटर स्पोर्टस् असणारा हा पहिला प्रकल्प ठरणार आहे. त्यामुळे स्थानिकांना रोजगाराची मोठी संधी निर्माण होणार असल्याचे मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी सांगितले.

सह्याद्री अतिथीगृह येथे सातारा जिल्हा एकात्मिक पर्यटन विकास आराखडा शिखर समितीची बैठक मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली झाली. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार, साताऱ्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई, आमदार मकरंद पाटील, वित्त विभागाचे अपर मुख्य सचिव ओ.पी. गुप्ता, नियोजन विभागाचे प्रधान सचिव सौरव विजय, पर्यटन विभागाच्या सचिव जयश्री भोज, महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक श्रद्धा जोशी, उपस्थित होते. पुणे विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार दूरदृष्यप्रणालीच्या माध्यमातून सहभागी झाले होते. सातारा जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी यावेळी विकास आराखड्याचे सादरीकरण केले.

हा संपूर्ण परिसर निसर्ग संपन्न असून पर्यटनवृद्धीसाठी मोठी संधी आहे. याठिकाणी निर्सर्ग पर्यटन, दुर्गभ्रमंती, धार्मिक पर्यटनाबरोबरच वॉटर स्पोर्टस् देखील करता येणार असल्याने ह्या आराखड्याची अंमलबजावणी जलदगतीने करावी, असे निर्देश देतानाच पर्यटन विकासाच्या दृष्टीने होणाऱ्या कामांमुळे स्थानिकांना रोजगार मिळणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

मुनावळे येथे नदीत जलपर्यटन आणि वॉटर स्पोर्टस् सुरू करण्यात येणार आहे. त्यासाठी कृष्णा खोरे महामंडळ आणि एमटीडीसी यांच्यामध्ये लवकरच सामंजस्य करार करण्यात येणार आहे. याठिकाणी नदीमध्ये मोठ्या प्रमाणावर वॉटर स्पोर्टस्‌चे विविध प्रकार, बोटींग करता येणार आहे. त्यामुळे परिसरात पर्यटन विकासाला मोठी चालना मिळणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. त्यासाठी पर्यटन महोत्सव आयोजित करावा, संकेतस्थळ विकसित करण्यात यावे, अशा सूचना मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिल्या.

सह्याद्री व्याघ्र राखीव वनक्षेत्रातील पर्यटन विकास आराखड्यामध्ये प्रेक्षागृह, तंबू निवास, सफारी मार्गाचे बळकटीकरण, पर्यटन सफारीकरीता वाहने, आदी विविध कामे करण्यात येणार आहे. प्रतापगड किल्ला जतन व संवर्धन अंतर्गत किल्ला जतन, दुरूस्तीचे कामे, संग्रहालय निर्मिती, घनकचरा व सांडपाणी व्यवस्थापन, विद्युतीकरण, सीसीटिव्ही यंत्रणा आदी कामांचा समावेश आहे. श्री क्षेत्र महाबळेश्वर पर्यटन विकास आराखड्यामध्ये मंदिर व परिसर विकास , वाहन तळ, बाजारपेठ विकास कामे, अन्नछत्र, मंदिर परिसरातील प्राथमिक शाळा, आदी विविध विकास कामांचा समावेश आहे.

भोसरी विधानसभा मतदारसंघात महिला बचत गटासाठी मतदार नोंदणी शिबिराचे आयोजन

पुणे, २२: भोसरी विधानसभा मतदारसंघात महिला मतदारांचे प्रमाण वाढविण्यासाठी कै. अंकुशराव लांडगे सभागृह भोसरी येथे महिला बचत गटांसाठी विशेष मतदार नोंदणी शिबीराचे आयोजन करण्यात आले. पात्र महिलांनी मतदार नोंदणी करण्याबरोबरच आगामी लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ साठी मतदान करावे, असे आवाहन स्वीप समन्वयक अधिकारी तथा उपजिल्हाधिकारी अर्चना तांबे यांनी केले.

कार्यक्रमाला भोसरी विधानसभा मतदारसंघाचे मतदार नोंदणी अधिकारी रेवणनाथ लबडे, सहाय्यक मतदान नोंदणी अधिकारी अण्णा बोदाडे, पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या क्षेत्रीय कार्यालयाचे क्षेत्रीय अधिकारी राजेश आगळे, सीताराम बहुरे, नायब तहसिलदार अर्चना देशपांडे आदी उपस्थित होते.

श्रीमती तांबे म्हणाल्या, राज्यात स्त्री-पुरुष मतदारांचे प्रमाण ९२५ इतके असून जिल्ह्यात त्यापेक्षा कमी मतदानाचे प्रमाण असलेल्या विधानसभा मतदारसंघांमध्ये जिल्हाधिकारी डॉ.सुहास दिवसे यांच्या निर्देशानुसार महिलांसाठी विशेष मतदार नोंदणी व मतदान जनजागृती अभियान राबविण्यात येत आहे. भारत निवडणूक आयोगाच्या https://www.eci.gov.in या संकेतस्थळावर किंवा वोटर हेल्पलाईन ॲपवर ऑनलाईन पद्धतीने मतदार नोंदणी करता येते.

सर्व तालुक्याचे मतदार नोंदणी अधिकारी कार्यालय, मतदान केंद्रावर नेमलेल्या केंद्रस्तरीय अधिकाऱ्यामार्फत मतदार यादीमध्ये नाव समाविष्ट करण्यासाठी नमुना-६ मध्ये अर्ज भरुन देण्याची सोय करण्यात आली आहे. महिला मतदारांचे प्रमाण वाढविण्यासाठी जिल्ह्यात महिला संचलित मतदान केंद्र निर्माण करण्याचे कामकाज सुरु आहे, असेही श्रीमती तांबे म्हणाल्या.

श्री. लबडे म्हणाले, महिलांनी मतदार नोंदणी करण्यासाठी पुढे यावे. आपल्या परिचयातील महिलांनादेखील मतदार नोंदणी करण्याबाबत माहिती द्यावी.

महिला बचत गटाच्या सुमारे २५० ते ३०० महिलांनी या शिबिरात सहभागी होऊन मतदानाची शपथ घेतली.

श्रीमती तांबे यांनी एक्सलेंट इंटरनॅशनल स्कूल ॲण्ड ज्यु. कॉलेज मोशी येथील कार्यक्रमातदेखील नवमतदारांना मतदार नोंदणी करण्याचे आवाहन केले.

‘लावणी महाराष्ट्राची  हा नवा कार्यक्रम प्रेक्षकांच्या भेटीला

आपल्या महाराष्ट्रातील प्रमुख लोकनृत्य म्हणजे ‘लावणी’. लावणी म्हटलं की डोळ्यांसमोर उभं राहतं ते ठसकेबाज नृत्य आणि लावण्यवतीची दिलखेचक अदा. लावणी नृत्य सादर करणं किंवा ते शिकणं ही पण एक कलाच आहे. लावणीच्या कार्यक्रमांना अजूनही तितकाच उदंड प्रतिसाद प्रेक्षकांकडून मिळतोय. लावणी हे नृत्य दिवसेंदिवस लोकप्रिय होत चालले आहे.

आपल्या महाराष्ट्राची कला जपणं हे प्रत्येक मराठी रसिक प्रेक्षकांचं कर्तव्य आहे असं म्हणायला सुध्दा हरकत नसेल. लावणी ही लोककला जपण्यासाठी ‘सन नेटवर्क’च्या ‘सन मराठी वाहिनीने देखील पुढाकार घेतला आहे. “ढोलकीची थाप आणि तुणतुण्यासोबत झंकारणार घुंगराचे चाळ…” असं म्हणत ‘सन मराठी’ वाहिनी पुन्हा एकदा जिवंत करणार महाराष्ट्राच्या लावणीचा सुवर्णकाळ. ‘लावणी महाराष्ट्राची’ हा नवीन मनोरंजक कार्यक्रम येत्या २५ फेब्रुवारीपासून दर रविवारी रात्री ९ वाजता सन मराठीवर सुरु होणार आहे.

नुकतीच,‘लावणी महाराष्ट्राची’ या कार्यक्रमाची झलक सोशल मिडीयावर दाखवण्यात आली. या कार्यक्रमात मराठी मनोरंजनसृष्टीतील लोकप्रिय आणि कलागुण संपन्न अशा अभिनेत्रींचा सहभाग असणार आहे. अभिनेत्री किशोरी शहाणे, सोनाली कुलकर्णी, स्नेहलता वसईकर, भार्गवी चिरमुले, मीरा जोशी यांच्या सुरेख सादरीकरणामुळे या कार्यक्रमाची शोभा वाढणार हे नक्की. प्रेक्षक आणि कार्यक्रम यांना जोडून ठेवण्याचं काम निवेदक सुध्दा करत असतो तर या कार्यक्रमाचं निवेदन करण्याची जबाबदारी अभिनेते दिगंबर नाईक पेलणार आहेत.

लावणी नृत्याच्या संदर्भात महाराष्ट्रातील अनेक संगीतकार, कवी, आणि कलाकारांनी लावणीच्या क्षेत्रात कामं केले आहेत. त्यांची कला आणि संगीत परंपरा महाराष्ट्रातल्या सांस्कृतिक विरासतीचा अमूल्य भाग आहे. आपल्या या कलेचा वारसा जपण्यासाठी सन मराठीने एक पाऊल उचललं आहे. ‘लावणी महाराष्ट्राची’ येत्या २५ फेब्रुवारीपासून दर रविवारी रात्री ९ वाजता  ‘सन मराठी’वर प्रदर्शित होणार आहे.

श्री महालक्ष्मी मंदिरातर्फे ३५० गरजू विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती

 श्री महालक्ष्मी मंदिर सारसबाग ४० व्या वर्धापनदिनानिमित्त  ब्रह्मोत्सव ; शिक्षण उपसंचालक राजेंद्र अहिरे यांची उपस्थिती
पुणे : श्री बन्सीलाल रामनाथ अग्रवाल धार्मिक व सांस्कृतिक ट्रस्ट, श्री महालक्ष्मी मंदिर सारसबागच्या ४० व्या वर्धापनदिनानिमित्त आयोजित ब्रह्मोत्सवात पुण्यातील ७ शाळांमधील ३५० गरजू विद्यार्थी व विद्यार्थीनींना शिष्यवृत्ती प्रदान करण्यात येणार आहे. शुक्रवार, दिनांक २३ फेब्रुवारी रोजी सकाळी ९ वाजता मंदिरात होणा-या कार्यक्रमाला पुणे विभागाचे शिक्षण उपसंचालक राजेंद्र अहिरे उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती ट्रस्टच्या प्रमुख विश्वस्त अमिता अग्रवाल यांनी दिली. 
उत्सवकाळात धार्मिक विधींबरोबरच सामाजिक व सांस्कृतिक उपक्रमही मंदिरातर्फे राबविले जातात. यामध्ये गरजू विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मागील १० वर्षांपासून दिली जाते. यंदा हुजूरपागा मुलींची शाळा लक्ष्मी रस्ता, रेणुका स्वरुप मुलींची शाळा सदाशिव पेठ, विद्या विकास विद्यालय सहकारनगर, न्यू इंग्लिश स्कूल टिळक रस्ता, मॉडर्न हायस्कूल शिवाजीनगर, अहिल्यादेवी मुलींची शाळा, सौ. विमलाबाई गरवारे हायस्कूल शाळेतील इयत्ता ५ वी ते १० वी च्या गरजू विद्यार्थीनींना शिष्यवृत्ती प्रदान करण्यात येईल. 
प्रमुख संस्थापक विश्वस्त राजकुमार अग्रवाल म्हणाले, राजस्थान डिडवाना येथील अनंत श्री विभुषित जगतगुरु रामानुचार्य झालरिया पीठाधीपती पूज्य श्री श्री १००८ स्वामीजी घनश्यामाचार्यजी महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली हा उत्सव होत आहे. शुक्रवारी सायंकाळी ७ वाजता पालखी सोहळा देखील आयोजित करण्यात आला आहे. श्री महालक्ष्मी, श्री महासरस्वती, श्री महाकाली व श्री विष्णू यांच्या उत्सवमूर्तींची पालखी प्रदक्षिणा मंदिर परिसरात होणार आहे. तर, सायंकाळी ७.३० वाजता पुष्पउत्सव म्हणजेच फुलांची होळी होणार आहे. सर्व कार्यक्रमांमध्ये पुणेकरांनी मोठया संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन त्यांनी केले आहे.

तरुण शेतक-याला गोळ्या घालून ठार करणा-या निर्दयी, शेतकरी विरोधी मोदी सरकारचा धिक्कार: नाना पटोले

देशात परिवर्तनाचे वारे, मोदी सरकारच्या पराभवाचा पाया महाराष्ट्रच रचणार.

प्रदेश काँग्रेसच्या राज्य निवड मंडळाची बैठक टिळक भवन मध्ये संपन्न.

मुंबई, दि. २२ फेब्रुवारी
लोकसभेच्या निवडणुकीसाठी प्रदेश काँग्रेसची तयारी झाली असून मित्रपक्षांबरोबरचे जागा वाटप, संघटनेची तयारी, प्रचारातील मुद्दे यांवर राज्य निवड मंडळाच्या बैठकीत चर्चा करण्यात आली. महाविकास आघाडीची जागा वाटपासंदर्भातील चर्चा अंतिम टप्प्यात आहे. शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, समाजवादी पक्ष, शेकाप, माकपा, वंचित बहुजन आघाडीसह एकत्रितपणे निवडणुक लढवण्याची तयारी आहे. भारतीय जनता पक्ष विरुद्ध महाविकास आघाडी असा सरळ सामना असून मविआ लोकसभेच्या ४२ जागांवर विजय संपादन करेल, असा विश्वास महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी व्यक्त केला आहे.
राज्य निवड मंडळाच्या बैठकीनंतर टिळक भवन येथे प्रसार माध्यमांशी बोलताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले पुढे म्हणाले की, आजच्या बैठकीत जवळपास अडीच तास सर्व मुद्द्यांवर चर्चा झाली. ज्या मतदारसंघात ज्या पक्षाची संघटनात्मक ताकद आहे, त्या मतदारसंघात त्या पक्षाचा उमेदवार असेल,जागा वाटप हे मेरिटनुसारच होणार आहे, त्यात कोणतेही मतभेद नाहीत. देशातील वातावरण इंडिया आघाडीसाठी अनुकुल असून परिवर्तनाचे वारे वाहत आहेत. शेतकरीविरोधी, तरुणांचा अपेक्षाभंग करणारे, महागाई, बेरोजगारी नियंत्रित करु न शकलेल्या भाजपाच्या नरेंद्र मोदी सरकारविरोधात जनतेत प्रचंड चीड आहे. काँग्रेस पक्षावर जनतेचा विश्वास वाढलेला आहे. महाविकास आघाडी मजबूत असून केंद्रातील भारतीय जनता पक्षाच्या सरकारच्या पराभवाचा पाया महाराष्ट्रच रचणार आहे.
दिल्लीच्या सीमेवर सुरु असलेल्या शेतकरी आंदोलनावर बोलताना नाना पटोले म्हणाले की, नरेंद्र मोदींचे हुकुमशाही सरकार शेतकऱ्यांना शत्रू, आतंकवादी समजून त्यांच्यावर अंधाधुंद गोळीबार करत आहेत. दिल्लीच्या खनौरी सीमेवर पोलिसांच्या गोळीबारात एका तरुण शेतकऱ्याचा मृत्यू झाला असून तीन ते चार शेतकरी गंभीर जखमी झाले आहेत. देशाच्या पंतप्रधानाने संसदेत शेतकऱ्यांना खलिस्तानी, नक्षलवादी, आंदोलनजीवी म्हणून अपमान केला. शेतकरी विरोधी, निर्दयी मोदी सरकारचा काँग्रेस पक्ष तीव्र धिक्कार करत आहे. भाजपा सरकारला याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील, असा इशाराही नाना पटोले यांनी दिला.
काँग्रेसच्या राज्य निवड मंडळाची बैठक महाराष्ट्र काँग्रेस प्रभारी रमेश चेन्नीथला यांच्या प्रमुख उपस्थितीत व प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या अध्यक्षतेखाली टिळक भवन, दादर येथे संपन्न झाली. या बैठकीला केंद्रीय निवड समितीचे अध्यक्ष मधूसुदन मिस्त्री, विधिमंडळ पक्षनेते बाळासाहेब थोरात, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, गोवा, दिव दमनचे प्रभारी माणिकराव ठाकरे, आदिवासी काँग्रेसचे अध्यक्ष शिवाजीराव मोघे, मुंबई काँग्रेसच्या अध्यक्ष वर्षा गायकवाड, माजी केंद्रीय मंत्री विलास मुत्तेमवार, प्रदेश कार्याध्यक्ष नसीम खान, आ. प्रणिती शिंदे, AICC चे सचिव सोनल पटेल, आशिष दुआ, रामकिसन ओझा, संजय दत्त, हुसेन दलवाई, माजी मंत्री डॉ. नितीन राऊत, अस्लम शेख, के. सी. पाडवी, अमित देशमुख, डॉ. विश्वजित कदम, माजी खासदार संजय निरुपम, आमदार भाई जगताप, महिला काँग्रेस प्रदेशाध्यक्ष संध्या सव्वालाखे, युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष कुणाल राऊत, NSUI चे प्रदेशाध्यक्ष अमीर शेख, अल्पसंख्याक विभागाचे अध्यक्ष आ. वजाहत मिर्जा, एस.सी. विभागाचे प्रदेशाध्यक्ष सिद्धार्थ हत्तीअंबिरे, ओबीसी विभागाचे अध्यक्ष भानुदास माळी, प्रदेश काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे, प्रदेश उपाध्यक्ष संघटन व प्रशासन नाना गावंडे, प्रदेश सरचिणीस प्रमोद मोरे यांच्यासह राज्य निवड मंडळाचे सदस्य उपस्थित होते.

मविआच्या जागा वाटपाची चर्चा अंतिम टप्प्यात; २७ व २८ फेब्रुवारीला निर्णय: रमेश चेन्नीथला.

भ्रष्टाचारमुक्त भारतच्या केवळ वल्गनाच; सर्व भ्रष्ट नेत्यांना भाजपाकडूनच सुरक्षाकवच : नाना पटोले

मुंबई, दि. २२ फेब्रुवारी
लोकसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडी एकत्रीतपणे सामोरे जाणार आहे. महाविकास आघाडीची सातत्याने चर्चा होत असून जागा वाटप अंतिम टप्प्यात आले आहे. जागा वाटपावरून मविआत कोणतेही मतभेद नाहीत. काँग्रेस राज्य निवड मंडळाच्या बैठकीनंतर २७ व २८ फेब्रुवारीला मविआची बैठक होत आहे, त्या बैठकीत जागा वाटपाचा अंतिम निर्णय होईल, अशी माहिती प्रभारी रमेश चेन्नीथला यांनी दिली आहे.

राज्य निवड मंडळाच्या बैठकीआधी प्रसार माध्यमांशी बोलताना प्रभारी रमेश चेन्नीथला म्हणाले की, महाराष्ट्रात मविआ आघाडी मजबूत आहे, आम्ही एकत्रपणे निवडणुका लढवत जास्तीत जास्त जागा जिंकण्याचा प्रयत्न करत आहोत. सर्व मित्र पक्षांशी सातत्याने चर्चा सुरु आहे. वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांच्याशी चर्चा झाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार व शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आंबेडकर यांच्याशी चर्चा करत आहेत. प्रकाश आंबेडकर यांनी दिलेल्या सर्व मुद्द्यांवर सहमती झालेली आहे. काँग्रेस पक्ष लोकसभा निवडणुकीसाठी सज्ज आहे, लोणावळा येथे दोन दिवसांचे प्रशिक्षण शिबिर झाले. या शिबिरात संघटन मजबुत करण्याविषय़ी चर्चा झाली आहे, मुंबई काँग्रेसच्या तयारीचा आढावाही घेतला जात आहे.

यावेळी बोलताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले की, निवडणुका आल्यामुळे विरोधी पक्षांच्या लोकांवर सरकारी यंत्रणांच्या माध्यमातून धाडी टाकल्या जात आहेत. परंतु भाजपाच्या एकाही भ्रष्ट नेत्यावर कारवाई केली जात नाही. भ्रष्टाचारमुक्त भारत करण्याची वल्गना भारतीय जनता पक्षाने केली होती परंतु ज्या लोकांवर भाजपाने भ्रष्टाचाराचे आरोप केले त्यांनाच भाजपात घेऊन भ्रष्टाचारयुक्त भाजपा केला आहे. अजित पवार यांच्यावर ७० हजार कोटी रुपयांच्या घोटळ्याचा आरोप केला त्यांच्यावर छापे टाकले का? उलट त्यांना सत्तेत घेऊन उपमुख्यमंत्री केले. आदर्श घोटाळ्याचा उल्लेख पंतप्रधान मोदींनी संसदेत केला व त्यानंतर अशोक चव्हाणांना भाजपात घेऊन राज्यसभा खासदार केले. भाजपाने भ्रष्टाचारी लोकांनी सुरक्षाकवच दिले आहे. भारतीय जनता पक्षाच्या ३०३ खासदारांमध्ये विरोधी पक्षातातील ज्या १६५ जण आहेत तर काँग्रेसचे ६७ जण आहेत, ज्यांच्यावर भाजपने भ्रष्टाचाराचे आरोप केले होते. हे काय भ्रष्टाचारमुक्त भारत करणार? असा सवाल नाना पटोले यांनी केला आहे.

या पत्रकार परिषदेला प्रभारी रमेश चेन्नीथला, प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, मुंबई काँग्रेसच्या अध्यक्ष वर्षा गायकवाड, AICC चे सचिव आशिष दुआ, माजी मंत्री अनिस अहमद, उपाध्यक्ष प्रशासन व संघटन नाना गावंडे, मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे, प्रवक्त राजू वाघमारे आदी उपस्थित होते.