Home Blog Page 1193

कर्म,व भक्तियोगाने मानव सुखी होतो- डॉ. निशिकांत श्रोत्री


लेखिका डॉ. प्रचिती पुंडे लिखित ‘वेलनेस रीडिफाइंड’ पुस्तकाचे प्रकाशन

पुणे, दि.२२ फेब्रुवारी: “मन करारे प्रसन्न, सर्व सिद्धीचे कारण, या उक्ती नुसार प्रत्येक मनुष्य हा सुखी राहू शकतो. त्यासाठी कर्म, ज्ञान आणि भक्ती योग हा अत्यंत महत्वाचा आहे. कर्मयोगात सेवा महत्वाची असून अहंकाराला तिलांजली दयावी. तरच मानव हा शारीरिक, मानसिक व अध्यात्मिक स्तरावर सुखी राहतो.” असे विचार ज्येष्ठ साहित्यीक डॉ. निशिकांत श्रोत्री यांनी व्यक्त केले.
तितिक्षा इंटरनॅशनल आणि प्रोलक्स प्रोडक्शन यांच्या संयुक्त विद्यमाने गुरूवारी पुण्यातील जवाहरलाल नेहरू सांस्कृतिक भवन येथे आयोजित पहिली आंतरराष्ट्रीय आरोग्य आणि सांस्कृतिक परिषद २०२४ संपन्न झाली. यावेळी लेखिका डॉ. प्रचिती पुंडे लिखित ‘वेलनेस रीडिफाइंड’ या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. त्यावेळी ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते.
या प्रसंगी डॉ. आशितोष मिसाळ हे मुख्य अतिथि म्हणून उपस्थित होते. तसेच जापान येथील डॉ.कोटा नागुची, लेखिका डॉ. प्रचिती पुंडे आणि तितिक्षा इंटरनॅशनल फाउंडेशनच्या प्रिया दामले यांची प्रमुख उपस्थिती होती.
साहित्य क्षेत्रात आयुष्यभर अमुल्य योगदान दिल्याबद्दल मधुसुदन घाणेकर, सामाजिक, साहित्यीक, काव्य, नाट्य, सेवा व एनजीओ क्षेत्रातील कार्यकरणार्‍या व्यक्तींचा आणि आर.के मिडियाचे संचालक रामहरी कराड यांना शाल व सन्मानपत्र देऊन विशेष सत्कार करण्यात आला.
डॉ. निशिकांत श्रोत्री म्हणाले,”डब्ल्यूएचओ ने शारीरिक, मानसिक, सामाजिक व आध्यात्मिक आरोग्यवर विस्तृत विवेचन केले आहे. आध्यात्मिक आरोग्य महत्वाचे असून अधि आत्मा म्हणजे, ब्रह्मतत्व त्यांनंतर कॉस्मिक एनर्जी कशी असते याचा उलगडा केला. त्याचप्रमाणे धन्वतरी, शुश्रृत, चरक आणि शारंधर हे वैद्यकीय शास्त्रताील सर्व प्रथम आहेत. हे पुस्तक आरोग्याच्या क्षेत्रातील सर्वोत्तम असून सर्वांसाठी लाभदायक राहिल.”
डॉ. प्रचिति पुंडे म्हणाल्या,” ‘ग्लॅमर’ आणि ‘निरोगीपणाच्या’ अभूतपूर्व मिश्रणातून संपूर्ण जगाला ग्लॅमवेलची नवी ओळख या पुस्तकातून होईल. ग्लॅमोवेल तत्वज्ञान “२:२ ह्यूमन कोकोरो संकल्पनेवर आधारित आहे. वेलनेस, वेलबिइंग आणि ऑप्टिमल या तत्वांवर मानवाच्या आरोग्यात मोठे बदल घडू शकतात. वर्तमान काळात सेल्फ आयसोलेटेट ह्यमून बिइंग आहे. अशावेळेस ग्लॅमवेल महत्वाचे ठरेल. ”
डॉ. सतिश मिसाळ म्हणाले,” भगवद्गीता आणि वेलनेस यांचा खूप जवळचा संबंध आहे. ५५०० केसस हाताळतांना आलेल्या अनुभवातून डॉ. पुंडे यांनी वेलनेसची संकल्पना अस्तित्वात आणली. आज कार्पोरेट क्षेत्रात सर्वात जास्त शारीरिक, मानसिक व आध्यात्मिक आरोग्यावर भर दिला जातो. तंत्रज्ञानाच्या युगात प्रत्येक व्यक्ती दुखी असतांना हे पुस्तक सुखाचे दरवाजे उघडेल.”
कोटा नागुची म्हणाले,” द्वितिय महायुध्दानंतर जपान मध्ये हॅपी सायन्स उदयास आले. यानंतर असे लक्षात आले की ७० ते ८० टक्केलोक हे फक्त मानसिक व बौद्धिक तनावामुळेच अधिक आजारी पडतात. त्यासाठी सर्वांवर प्रेम करा, आदर करा आणि सकारात्मक विचारधारेवर चला.”
प्रिया दामले म्हणाल्या,”हसत खेळत आरोग्य सांभाळणे म्हणजे सहज आरोग्य होय. सुखी जीवन जगण्यासाठी कोणत्या गोष्टींचा स्विकार करावा किंवा करू नये हे डॉ.पुंडे यांनी आपल्या पुस्तकात मांडले आहे.”
यावेळी रमेश पाचंगे यांनी चौघड्याचे सुंदर वादन केले. अजित जाधव यांनी गाणे गायले. साक्षी यांनी प्रोलक्स अ‍ॅण्ड ग्लोमोवेल संदर्भातील माहिती देऊन आधुनिक काळात याची गरज किती महत्वाची आहे हे सांगितले.

पुण्याच्या अतिरिक्त विभागीय आयुक्त पदी कविता व्दिवेदी तर पुणे स्मार्ट सिटी प्रकल्पाच्या संचालकपदी कार्तिकी एन एस

0

पुणे-राज्यातील 12 आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश शुक्रवारी (दि.23) जारी करण्यात आले आहेत. पुणे स्मार्ट सिटी प्रकल्पाचे संचालक कौस्तुभ दिवेगावकर यांची बदली करण्यात आली असून त्यांची आयुक्त, पशुसंवर्धन पुणे येथे बदली करण्यात आली आहे. तर कार्तिकी एन एस यांची पुणे स्मार्ट सिटी प्रकल्पाच्या संचालक पदी नियुक्ती करण्यात आली आहे.

पहा पुढे कोणाची कुठे झाली बदली

  1. कविता द्विवेदी महापालिका आयुक्त, अकोला यांची नियुक्ती अतिरिक्त विभागीय आयुक्त, पुणे या पदावर
  2. डॉक्टर हेमंत वसेकर आयुक्त, पशुसंवर्धन पुणे यांची नियुक्ती प्रकल्प संचालक, बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन (स्मार्ट) प्रकल्प पुणे या पदावर.
  3. कौस्तुभ दिवेगावकर, प्रकल्प संचालक, स्मार्ट, पुणे यांची नियुक्ती आयुक्त, पशुसंवर्धन पुणे या पदावर
  4. कार्तिकी एन एस यांची नियुक्ती मुख्य कार्यकारी अधिकारी, स्मार्ट सिटी पुणे या पदावर
  5. मिलिंद शंभरकर यांची नियुक्ती मुख्य अधिकारी, मुंबई इमारत दुरुस्ती व पुनर्रचना मंडळ, मुंबई या पदावर
  6. एम जे प्रदीप चंद्र यांचे नियुक्ती अतिरिक्त विकास आयुक्त (उद्योग), उद्योग संचालनालय मुंबई या पदावर
  7. कावली मेघना यांची, प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प किनवट या पदावर.
  8. विजय सिंगल महाव्यवस्थापक, बेस्ट यांची नियुक्ती उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक, सिडको मुंबई या पदावर
  9. संजय सेठी यांची नियुक्ती अप्पर मुख्य सचिव, परिवहन व बंदरे या पदावर
  10. पराग जैन नैनोटिया, प्रधान सचिव (परिवहन व बंदरे) यांची नियुक्ती प्रधान सचिव, (माहिती तंत्रज्ञान) सामान्य प्रशासन विभाग, मुंबई या पदावर
  11. ओ पी गुप्ता अप्पर मुख्य सचिव (व्यय) वित्त विभाग यांची नियुक्ती अप्पर मुख्य सचिव (वित्त), वित्त विभाग या पदावर
  12. राजेश कुमार यांची नियुक्ती अप्पर मुख्य सचिव (महसूल), महसूल व वन विभाग या पदावर

राजकारण, समाजकारणातील सर्वांचे ‘सर’, सुसंस्कृत, व्यासंगी नेतृत्वाला महाराष्ट्र मुकला

0

मुंबई, दि. २३ :-  शिक्षणातील ‘सर’ ते लोकसभा अध्यक्ष म्हणून ‘स्पीकर सर’ अशी भारदस्त कारकीर्द असणाऱ्या महाराष्ट्र सुपुत्राला काळाने आपल्यातून हिरावून घेतले आहे, अशी शोकमग्न भावना व्यक्त करत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ज्येष्ठ नेते माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली आहे. आपल्यासाठी वैयक्तिक पातळीवर ही मोठी हानी आहे, असे नमूद करुन मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्र विकासाची चौफेर दृष्टी असलेल्या एका सुसंस्कृत, व्यासंगी नेत्याला मुकला असल्याचेही म्हटले आहे.

मुख्यमंत्री शोक संदेशात म्हणतात, ‘नगरसेवक, महापौर ते राज्याचे मुख्यमंत्री, केंद्रीय मंत्री आणि लोकसभा अध्यक्ष असा त्यांचा प्रवास राजकारण- समाजकारणात येऊ पाहणाऱ्या पिढ्यांकरिता दीपस्तंभासारखा मार्गदर्शक राहणार आहे. हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचे ते सच्चे पाईक होते. ते शिक्षक, उद्योजक, सामाजिक कार्यकर्ते, कला-साहित्य आणि सांस्कृतिक क्षेत्रातील व्यासंगी होते. राजकीय तसेच संसदीय लोकशाही प्रणालीवर गाढा विश्वास असणारे बहुआयामी व्यक्तिमत्त्वाचे होते. जिथे जिथे त्यांनी काम केले. तिथे तिथे त्यांनी आपल्या कार्याचा ठसा उमटवला. ‘स्वच्छ मुंबई -हरित मुंबई’ हा त्यांचा ध्यास होता. त्यावर त्यांनी पुस्तकही लिहिले. त्यांनी अखिल भारतीय महापौर परिषदेचे अध्यक्षपद भूषविले. राष्ट्रीय विरोधीपक्ष नेता संघाची स्थापना त्यांनी केली होती. जागतिक मराठी चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीच्या स्थापनेत ते पुढे होते. महाराष्ट्रात गुंतवणूक यावी याकरिता त्यांनी ‘ॲडव्हान्टेज महाराष्ट्र’, शेतीतील गुंतवणूकीसाठी ‘ॲग्रो ॲडव्हान्टेज महाराष्ट्र’ अशा संकल्पनांना मुर्त रुप दिले. महाराष्ट्रातील पायाभूत सुविधांच्या विकासाचा एक्स्प्रेस – वे म्हणता येईल असा मुंबई – पुणे द्रुतगती महामार्ग त्यांच्याच काळात साकारला गेला. सिंचनातील कृष्णा खोरे विकास महामंडळाची सुरुवातही त्यांच्याच काळात झाली. ‘टँकरमुक्त महाराष्ट्र’ ही देखील त्यांचीच घोषणा. ‘महाराष्ट्र भूषण’ या राज्याच्या सर्वोच्च नागरी पुरस्काराची सुरुवातही त्यांच्याच पुढाकाराने झाली. लोकसभा अध्यक्षपदाची त्यांची कारकीर्द वैशिष्ट्यपूर्ण राहिली. तिथेही ते कडक शिस्तीचे ‘स्पीकर सर’ आणि सर्वपक्षीयांसाठी आदरणीय होते. परखड विचारांचे आणि वाणीचे म्हणून त्यांची ओळख होती. शिवसेना पक्षासाठी देखील ही मोठी हानी आहे. आमचे सर्वांचे लाडके आणि मार्गदर्शक सर आपल्यात नाहीत ही कल्पना देखील करवत नाही. सरांच्या निधनामुळे जोशी परिवारावर, त्यांचे स्नेही, कार्यकर्ते यांच्यावर आघात झाला आहे. तो सहन करण्याची ईश्वराने या सर्वांना ताकद द्यावी, अशी प्रार्थना करून मुख्यमंत्र्यांनी ज्येष्ठ नेते, माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली आहे.

माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांचे योगदान महाराष्ट्र कायम स्मरणात ठेवेल – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची श्रद्धांजली

0

मुंबई, दि. 23 : महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री, लोकसभेचे माजी अध्यक्ष मनोहर जोशी यांच्या निधनाचे वृत्त अतिशय दु:खद आहे. त्यांचे सामाजिक आणि राजकीय कार्य महाराष्ट्र कायम स्मरणात ठेवेल, अशा शब्दांत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी श्रद्धांजली वाहिली आहे.

उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस आपल्या संदेशात म्हणतात, मनोहर जोशी सर आणि माझा वैयक्तिक ऋणानुबंध होता. नगरसेवक ते महापौर, आमदार ते मुख्यमंत्री आणि खासदार ते लोकसभा अध्यक्ष असे सर्व टप्पे त्यांनी आपल्या राजकीय जीवनात पूर्ण केले. विधानसभा आणि विधानपरिषद, लोकसभा आणि राज्यसभा अशा चारही सभागृहात प्रतिनिधीत्व करण्याचा मान त्यांनी मिळविला. अतिशय शिस्तबद्ध, संयमी आणि अभ्यासू नेता म्हणून त्यांची ओळख होती. वैयक्तिक जीवन असो की राजकीय जीवन वेळेची शिस्त त्यांनी कधी सोडली नाही. महाराष्ट्राच्या राजकीय-सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रात त्यांचे योगदान  कायमच स्मरणात राहिल. त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. त्यांच्या कुटुंबीयांच्या दु:खात मी सहभागी आहे.

देशातील सर्वात मोठे आणि महाराष्ट्रातील पहिले डिफेन्स एक्स्पो- उद्योगमंत्री

पुणे दि.२३: संरक्षण उत्पादन क्षेत्रात महत्त्वपूर्ण योगदान देण्यासाठी राज्यातील सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांना सक्षम करणाऱ्या देशातील सर्वात मोठ्या आणि महाराष्ट्रातील अशा प्रकारच्या पहिल्या ‘महाराष्ट्र एमएसएमई डिफेन्स एक्स्पो’तून देशाची संरक्षण दले, संरक्षण उपकरणे निर्मितीतील सार्वजनिक उपक्रम तसेच यातील खासगी उद्योग, नवीन स्टार्टअप यांची उत्पादने, नवसंकल्पना पाहता येणार असल्याने महाविद्यालयीन विद्यार्थी, उद्योजक आणि नागरिकांनी भेट द्यावी, असे आवाहन राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी केले.

इंटरनॅशनल एक्झिबिशन ॲण्ड कन्व्हेनशन सेंटर, मोशी येथे होत असलेल्या या प्रदर्शनात मांडण्यात येत असलेली शस्त्रास्त्रांची पाहणी करून माहिती घेतली. तसेच प्रदर्शन दालनांना भेट देऊन उर्वरित कामे गतीने पूर्ण करण्याचे निर्देश दिले. उद्योग विभागाचे प्रधान सचिव हर्षदीप कांबळे, पिंपरी चिंचवड महानगरपालिका आयुक्त शेखर सिंह, पीएमआरडीएचे आयुक्त राहुल महिवाल, उपमुख्यमंत्री महोदयांचे विशेष कार्य अधिकारी कौस्तुभ धवसे, प्रदर्शनाचे नॉलेज पार्टनर गणेश निबे, महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास महामंडळाचे सह मुख्य कार्यकारी अधिकारी विजय राठोड, मुख्य अभियंता प्रकाश चव्हाण आदी उपस्थित होते.

तीन दिवस प्रदर्शन पाहता येणार
श्री. सामंत म्हणाले, २४ फेब्रुवारी पासून सुरू होणाऱ्या या प्रदर्शनात भारतीय नौसेना, लष्कर आणि वायुसेना या तिन्ही सुरक्षा दलांचा महत्वाचा सहभाग आहे. प्रदर्शन २६ फेब्रुवारीपर्यंत ३ दिवस सुरू राहणार असून त्यासाठी २० दालने तयार करण्यात आली आहेत. तसेच खुल्या जागेत हेलिकॉप्टर, रणगाडे, जड संरक्षण वाहने, तोफा आदी पाहता येतील.

या प्रदर्शनातील विविध सत्रात भारताची संरक्षण सिद्धता, विविध शस्त्रास्त्रांची निर्मिती, संरक्षण क्षेत्रातील संधी याविषयी अभियांत्रिकी तसेच अन्य शाखेच्या विद्यार्थ्यांना उपयुक्त माहिती मिळणार असून सैन्यदलात दाखल होण्याची प्रेरणा मिळेल. याशिवाय या क्षेत्रातील तंत्रज्ञान सर्वसामान्यांना अनुभवता येणार आहे, शस्त्रास्त्रांना प्रत्यक्ष स्पर्श करून रोमांचक अनुभव घेता येणार आहे, असेही ते म्हणाले.

प्रदर्शनातील चार भव्य दालनांना शिवनेरी, सिंधुदुर्ग, रायगड आणि पन्हाळा असे नाव देण्यात येणार आहे. संपूर्ण परिसरात छत्रपती शिवाजी महाराजांच्या गडकिल्ल्यांच्या संरक्षण सिद्धतेची संकल्पना प्रदर्शित करण्यात येणार आहे, असे श्री.सामंत यांनी सांगितले.

बैठकीस विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

महालक्ष्मी मंदिरातील उत्सव मूर्तींची धान्य तुला व सोने-चांदी पुष्पअर्पण –

श्री महालक्ष्मी मंदिर सारसबाग तर्फे ४० व्या वर्धापनदिनानिमित्त आयोजन
पुणे : श्री महालक्ष्मी मंदिरातील उत्सव मूर्तींची धान्यतुला करुन ते धान्य अनाथ मुलांच्या संस्थेस देण्याचा उपक्रम सारसबागेसमोरील महालक्ष्मी मंदिरात पार पडला.  राजस्थान डिडवाना येथील अनंत श्री विभुषित जगतगुरु रामानुचार्य झालरिया पीठाधीपती पूज्य श्री श्री १००८ स्वामीजी घनश्यामाचार्यजी महाराज यांच्या हस्ते धान्य तुला पूजन आणि सोने-चांदी पुष्पअर्पण करुन देवीचरणी सुख-शांती समृद्धी करिता प्रार्थना देखील करण्यात आली. 
श्री बन्सीलाल रामनाथ अग्रवाल धार्मिक व सांस्कृतिक ट्रस्ट, श्री महालक्ष्मी मंदिर सारसबागच्या ४० व्या वर्धापनदिनानिमित्त आयोजित ब्रह्मोत्सवात मंदिरात विविध कार्यक्रम सुरु आहेत. यावेळी ट्रस्टचे प्रमुख संस्थापक विश्वस्त राजकुमार अग्रवाल, प्रमुख विश्वस्त अमिता अग्रवाल, विश्वस्त अ‍ॅड.प्रताप परदेशी, प्रविण चोरबेले, हेमंत अर्नाळकर, नारायण काबरा यांसह विश्वस्त उपस्थित होते.
राजकुमार अग्रवाल म्हणाले, सामाजिक कार्यक्रमांमध्ये मंदिरातील श्री महालक्ष्मी, श्री महासरस्वती, श्री महाकाली व श्री विष्णू यांच्या उत्सवमूर्तीची धान्यतुला करुन ते धान्य अनाथ मुलांच्या संस्थेस वाटप करण्याचा उपक्रम दरवर्षी राबविला जातो. धान्यतुलेमध्ये विविध प्रकारचे धान्य, तेल, बिस्कीटे व खाऊ ठेवण्यात आला होता. याशिवाय सोने व चांदीची फुले देखील मान्यवरांच्या हस्ते उत्सवमूर्तीला अर्पण करण्यात आली. 

शिक्षणाचे माहेरघर बनविले ड्रग्जच्या उत्पादनाचे केंद्र:पुण्याच्या नामुष्कीला जबाबदार कोण? कॉंग्रेसचा सरकारला सवाल

‘देशात येत असलेले कोट्यावधींचे ड्रग्ज’ मोदी सरकारचे अपयश..!
‘अंमली पदार्थांपासून’ देशास सुरक्षीत ठेवण्याची जबाबदारी सरकारची नाही का..?
ड्रग्ज मुक्त देशाची गॅरंटी मोदी का देत नाहीत ..?

पुणे दि २२ -सांस्कृतिक पुणे आणि शिक्षणाचे माहेरघर अशी ओळख असलेल्या पुणे शहराचा चेहरा आता बदलण्यात येत असून तो द्र्गाज्च्या उत्पादनाचे आणि वितरणाचे केंद्र बनविला जाऊ लागला आहे पुण्याच्या या नामुष्कीला कोण जबाबदार आहे ? गेल्या काही वर्षात पुणे अंमली पदार्थांबाबत महत्वपूर्ण केंद्र बनवून ठेवले आहे काय ? असे प्रश्न आता कॉंग्रेसचे प्रवक्ते गोपाल तिवारी यांनी केंद्रातील भाजपा सरकार आणि राज्यातील महायुती सरकारला केले आहेत
पुणे पोलीस आयुक्त व त्यांची टिम रोज विविध ठीकाणाहून ड्रग्ज पकडून जप्त करीत आहेत, मोदी सरकार देशात १० वर्षे सत्तेत राहूनही कोट्यावधींचे ड्रग्ज ‘अंमली पदार्थ’ आले कुठुन (?)या गंभीर प्रश्नापासून सरकार ला पळ काढता येणार नसल्याचे काँग्रेस ने म्हटले आहे.सत्तेतील भाजपला याची जबाबदारी स्वीकारावी लागेल, असे प्रतिपादन महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे राज्य प्रवक्ते गोपाळ तिवारी यांनी केली.
काही महीन्यापुर्वी सातत्याने गुजरात मधील अडानींच्या ‘मुंद्रा पोर्टवर’ पकडण्यात आलेले कोट्यावधींचे ड्रग्ज नष्ट केल्याचे दाखले – संदर्भ देखील ‘गृह विभागाने’ जाहीर करावेत, अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे राज्य प्रवक्ते गोपाळ तिवारी यांनी केली.
७० वर्षात सर्वाधिक क्राईम रेट देशात व राज्यात वाढला असून, बेरोजगारीचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे.
देशातील तरूण पिढीस नशेच्या खाईत ढकलण्याचे पापकर्म करण्याचे धाडस कोणी करू नये असा सज्जड दम देखील काँग्रेसने भरला.देशाच्या सिमा ओलांडून देशांतर्गत येत असलेले अंमली पदार्थ केंद्रीय गृह विभागास दिसत नाही काय..(?)
या ड्रग्जना मोदी सरकार रोखू शकत नसल्याचे सिध्द झाले आहे.
त्यामुळे ड्रग्ज पकडण्यास राज्यातील व पुणे शहरातील पोलिसांवर ताण पडत आहे. पोलीसांना ‘इतर सुरक्षेकडे’ लक्ष देण्यास मर्यादा येत आहेत, ही देशाच्या गृह – खात्यास लाजीरवाणी बाब असल्याचे ही काँग्रेसने म्हटले आहे.
एके काळी देशात सुरक्षीत व सुसंस्कृत शहर म्हणून ख्याती असलेले ‘पुणे शहर व महाराष्ट्रास’ ड्रग माफीयांचे केंद्र करावयाचे आहे काय..(?) असा सवाल काँग्रेस ने उपस्थित केला.ससून हॅास्पीटल मधून अंमली पदार्थाचे रॅकेट चालवणाऱ्या डॅा संजीव ठाकूरला अद्यापही अटक का केली जात नाही(?) ललीत पाटील वर आरोप पत्र दाखल का केले जात नाही (?) असे सवाल ही राज्य प्रवक्ते गोपाळ तिवारी यांनी केले.मोठ्या शहरांत रात्री ऊशीरा पर्यंत हुक्का पार्लर्स व पब ची संख्या वाढत असुन दहशत वादी कृत्ये व स्त्रियांवरील अत्याचार वाढत असल्याचा दावा ही काँग्रेस ने केला आहे.

 PM मोदींनी मध्यरात्री मतदारसंघातील रस्त्यांची केली पाहणी

0

गुजरातहून आल्यावर पंतप्रधान मोदींनी वाराणसीतील शिवपूर-फुलवारिया-लहारतारा मार्गाची पाहणी केली.काशीत उतरल्यावर शिवपूर-फुलवारिया-लहारतारा मार्गाची पाहणी केली. या प्रकल्पाचे नुकतेच उद्घाटन झाले आणि शहराच्या दक्षिणेकडील भागातील लोकांना त्याचा फायदा होणार आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी काल (गुरुवारी) रात्री उशिरा गुजरातहून थेट आपला लोकसभा मतदारसंघ वाराणसी येथे पोहोचले. तेथे आज ते अनेक विकास प्रकल्पांची सुरुवात करणार आहेत. पीएम मोदी जेव्हा बाबपूर विमानतळावर उतरले तेव्हा सीएम योगी, भाजप यूपी अध्यक्ष भूपेंद्र चौधरी यांच्यासह अनेक नेत्यांनी त्यांचे स्वागत केले.
पीएम मोदींचा ताफा बनारस लोकोमोटिव्ह वर्कशॉपच्या अतिथीगृहाकडे निघाला तेव्हा त्यांच्या वाहनांचा ताफा शिवपूर-फुलवारिया-लहारतारा रस्त्यावर थांबला, तेथून पीएम मोदींनी चौपदरीकरणाची पाहणी केली. पंतप्रधान मोदींसोबत उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथही उपस्थित होते. काही वेळ रस्त्यावर फेरफटका मारल्यानंतर पंतप्रधान मोदी रात्री गेस्ट हाऊसकडे रवाना झाले.

उच्च माध्यमिक व माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षा कॉपीमुक्त करण्यासाठी कृती कार्यक्रम राबविण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश

पुणे: उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षा (इ. १२ वी.) आणि माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षेतील (इ. १० वी) गैरप्रकार टाळण्यासाठी दक्षता समितीच्या अंतर्गत भरारी पथकांची नियुक्ती, कलम १४४ नुसार प्रतिबंधात्मक आदेश काढण्यासह परीक्षा कॉपीमुक्त करण्यासाठी कृती कार्यक्रम प्रभावीपणे राबविण्याचे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे यांनी दिले आहेत.

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, पुणे यांच्याकडून जिल्ह्यात २१ फेब्रुवारी ते १९ मार्च या कालावधीत उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षा (इ. १२ वी.) आणि १ मार्च ते २६ मार्च या कालावधीत माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा (इ. १० वी) आयोजित केलेल्या आहेत. या परीक्षा सुरळीतपणे पार पाडण्यासाठी व कॉपीमुक्त अभियानाची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्याचे अनुषंगाने उपाय योजना करण्यात आलेल्या आहेत.

परीक्षेदरम्यान कोणताही अनुचित प्रकार घेडू नये, कायदा व सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाकडून जिल्ह्यातील ग्रामीण भागातील सर्व परीक्षा केंद्राच्या परिसरात सीआरपीसी- कलम १४४ नुसार प्रतिबंधात्मक आदेश पारित करून परीक्षार्थीच्या व्यतिरिक्त इतर व्यक्तींना प्रवेश करण्यास मनाई करण्यात आली आहे.

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ पुणे यांच्या पत्राच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी कार्यालयाने सर्व परीक्षा केंद्रावर गैरप्रकार टाळण्यासाठी तहसिलदार व गट विकास अधिकारी यांना तहसिल कार्यक्षेत्रामध्ये सर्व परीक्षाकेंद्रावर भरारी पथके तयार करण्याबाबत आदेश दिले असून कॉपीमुक्त अभियान राबविण्यासाठी भरारी पथके नेमण्यात आली आहेत.

प्रत्येक परीक्षा केंद्रानजिकच्या प्राथमिक आरोग्य केंद्राचे आवश्यक ते सहकार्य करण्याबाबत जिल्हा शल्य चिकित्सक आणि जिल्हा आरोग्य अधिकारी यांना आदेश देण्यात आले आहेत. तसेच पुणे महानगरपालिका आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिका यांना त्यांच्या हद्दीमधील शाळांसाठी भरारी पथके नियुक्ती करण्याबाबतही कळविण्यात आले आहे, असे जिल्हा प्रशासनाकडून कळविण्यात आले आहे.

शिक्षण विभाग प्राथमिक, माध्यमिक, योजना जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था यांचीही भरारी पथके तैनात करण्यात आलेली असून सर्व परीक्षा केंद्रांवर बैठे पथकही पूर्णवेळ उपस्थित राहणार आहे. परीक्षा कॉपीमुक्त वातावरणात होण्याच्यादृष्टीने जिल्हा प्रशासन कार्यरत आहे. कॉपी व तत्सम गैरप्रकार आढळून आल्यास संबंधित केंद्र संचालक व संबंधित व्यक्तींवर तात्काळ शिस्तभंग कारवाई करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी व मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी दिलेले आहेत, अशी माहिती कमलाकांत म्हेत्रे शिक्षणाधिकारी माध्यमिक यांनी दिली आहे.

अनाथ मुलांना विविध प्रमाणपत्र वाटपासाठी ५ मार्चपर्यंत पंधरवड्याचे आयोजन

पुणे: शासन आपल्या दारी या संकल्पनेच्या माध्यमातून जिल्ह्यातील अनाथ बालकांना आधारकार्ड, रेशन कार्ड, जातीचा दाखला, राज्याचे अधिवास प्रमाणपत्र, राष्ट्रीयत्वाचा दाखला, मतदान कार्ड आदी २३ फेब्रुवारी ते ५ मार्च या कालावधीत पंधरवडा राबवून वाटपाचे नियोजन करण्यात आल्याचे जिल्हा महिला व बाल विकास कार्यालयाने कळविले आहे.

पंधरवडा कालावधीत गरजू अनाथ बालकांनी पंचायत समिती येथील तालुकास्तरीय संरक्षण अधिकारी व जिल्हास्तरावर जिल्हा महिला व बाल विकास कार्यालय, ३ रा मजला, गुलमर्ग सोसायटी, जाधव बेकर्स जवळ, पुणे यांच्या कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी मोनिका रंधवे यांनी केले आहे.

निवडणूक खर्च दरनिश्चिती समितीची बैठक संपन्न

पुणे,: लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी निवडणूक खर्च दरनिश्चिती समितीची बैठक जिल्हाधिकारी डॉ.सुहास दिवसे यांच्या उपस्थितीत घेण्यात आली. निवडणूकीसाठी राजकीय पक्षांना आवश्यक साहित्य व प्रचारासाठीच्या विविध बाबींचे दर निश्चित करताना जिल्ह्याच्या विविध भागातील आणि जिल्ह्याबाहेरील दरांची माहिती घेण्यात यावी, असे निर्देश जिलहधिकारी डॉ.सुहास दिवसे यांनी दिली.

बैठकीला निवडणूक खर्च समन्वय अधिकारी तथा अपर जिल्हाधिकारी सोनप्पा यमगर, उप जिल्हा निवडणूक अधिकारी मीनल कळसकर यांच्यासह विविध शासकीय विभागांचे अधिकारी उपस्थित होते. बैठकीत विविध प्रकारच्या निवडणूक खर्चाबाबत बाबनिहाय आढावा घेण्यात आला. दरनिश्विती करताना राजकीय पक्षांनादेखील प्रक्रियेची माहिती देण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या.

२४ फेब्रुवारी रोजी संभाजीनगर येथे ‘शिवदुर्गा मोहीम’ मेळाव्याचे आयोजन.

पुणे दि.२२: महिलांचे मतदानामध्ये अधिक सहभाग वाढावा आणि शिवसेना महिला आघाडीच्या पदाधिकाऱ्यांना विविध योजना राबवत असताना ज्या अडचणी येत असतात त्यातून सरकार त्यांच्या पाठीशी आहे याचा संदेश जावा म्हणून शिवसेना महिला आघाडीच्यावतीने ‘शिवदुर्गा मोहीम’ आयोजित करण्यात आलेली आहे. या मोहिमेचा भाग म्हणून येत्या २४ फेब्रुवारी रोजी संभाजीनगर लोकसभा मतदार संघाचा मेळावा होणार आहे. या मेळाव्याला उपसभापती तथा शिवसेना नेत्या डॉ. नीलम गोऱ्हे, शिवसेना उपनेत्या कला शिंदे, आशा मामेडी मार्गदर्शन करणार आहेत. या मेळाव्याचे संयोजन आमदार संजय शिरसाट व संभाजीनगर शिवसेना महिला आघाडीच्या सविताताई किवंडे, शिल्पाराणी वाडकर, हर्षदा शिरसाट, तेजस्विनी केंद्रे, जयश्रीताई घाडगे, उषाताई हांडे, सुरेखाताई चव्हाण, गायत्री ताई पटेल यांसह इतर महिला शिवसैनिकांनी केले आहे.

तसेच येत्या ४ मार्च रोजी पुणे जिल्ह्यातील शिरूर मावळ पुणे शहर आणि बारामती लोकसभा मतदारसंघातील महिला आघाडीच्या पदाधिकारींचा मेळावा होणार आहे. तसेच मार्चच्या पहिल्या आठवड्यात शिवसैनिकांना विविध ठिकाणी येणाऱ्या अडचणींचे निराकरण करण्यासाठी विभागीय आयुक्त आणि जिल्हाधिकारी यांच्यासोबत बैठक घेणार आहे. यामधून समोर येणारे मुद्दे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासमोर सादर करण्यात येणार आहेत. पुणे शहरातील वाहतूक कोंडीच्या समस्येबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली लवकरच बैठक घेण्यात येणार आहे. असे विधानपरिषद उपसभापती तथा शिवसेना नेत्या डॉ. नीलम गोऱ्हे यांनी सांगितले.

नुकतेच राज्य विधीमंडळाचे अधिवेशन पार पडलेला आहे आणि ते अधिवेशनाच्या नंतर झालेल्या जाहीर सभेला प्रचंड अशी गर्दी तिथे उपस्थित झालेली होती हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या सभांना जशी गर्दी असायची तसाच आशीर्वाद जनतेने कोल्हापूरला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दिला असल्याचे उपसभापती डॉ. गोऱ्हे यांनी सांगितले.

मराठी माणसाच्या न्याय्य हक्कांसाठी लढणारा सुसंस्कृत नेता हरपला–उपमुख्यमंत्री अजित पवार

0

मुंबई, दि. 23 :- शिवसेनेचे ज्येष्ठ नेते, माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांच्या निधनाने मराठी माणसांच्या न्याय्य हक्कांसाठी लढणारा सुसंस्कृत नेता काळाच्या पडद्याआड गेला आहे. त्यांच्या निधनाने महाराष्ट्राच्या राजकीय, सामाजिक, शिक्षण क्षेत्राची मोठी हानी झाली आहे, अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार आपल्या शोकसंदेशात म्हणतात की, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे निष्ठावान, विश्वासू सहकारी अशी जोशी सरांची ओळख होती. शिवसेना पक्षस्थापनेपासून पक्षसंघटनेत त्यांनी अनेक महत्त्वाच्या भूमिका पार पाडल्या. विधान परिषदेचे सदस्य म्हणून त्यांनी राजकीय कारकिर्दीची सुरुवात केली. मुंबईचे महापौर म्हणून त्यांची कारकीर्द उल्लेखनीय, संस्मरणीय ठरली. शिवसेना भाजपच्या युतीच्या सरकारमध्ये मुख्यमंत्री म्हणून काम करण्याची संधी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी जोशी सरांना दिली. मुख्यमंत्री म्हणून त्यांनी आपल्या कामाचा ठसा महाराष्ट्रात उमटवला. दिल्लीच्या राजकारणात केंद्रीय अवजड उद्योगमंत्री म्हणून त्यांनी काम केले. लोकसभेचे अध्यक्ष म्हणून नि:ष्पक्ष भूमिका त्यांनी बजावली. सामान्य कुटुंबात जन्मलेल्या जोशी सरांनी स्वकर्तृत्वावर लोकसभेच्या अध्यक्षपदापर्यंत मजल मारली. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी दिलेल्या प्रत्येक संधीचे त्यांनी सोने केले. राजकीय, सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रातील अभ्यासू, सुसंस्कृत नेतृत्व म्हणून त्यांची ओळख होती. कोहिनूर इन्स्टिट्यूटच्या माध्यमातून शिक्षण क्षेत्रात त्यांनी भरीव काम केले. अनेक मराठी तरुणांना उद्योगक्षेत्रातील संधींसाठी प्रशिक्षित केले. मराठी माणूस आणि महाराष्ट्राची अस्मिता जपण्यासाठी त्यांनी केलेले कार्य कायम स्मरणात राहील. ज्येष्ठ नेते मनोहर जोशी यांच्या कुटुंबियांच्या, कार्यकर्त्यांच्या, नातेवाईकांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत, अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपल्या शोकभावना व्यक्त केल्या आहेत.

बाळासाहेब ठाकरेंचे सहकारी शिवसेनेचे माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांचं निधन

0

मुंबई: महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि शिवसेनेचे ज्येष्ठ नेते डॉ. मनोहर जोशी यांचे आज पहाटे निधन झाले. दोन दिवसांपूर्वी जोशी यांना हृदयविकाराचा झटका आल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. हिंदुजा रुग्णालयात जोशी यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरु होते. मात्र आज पहाटे मनोहर जोशी यांनी अखेरचा श्वास घेतला

मनोहर जोशी हे मे २०२३ पासून आरोग्याशी संबंधित समस्यांनी त्रस्त होते. त्यांना ब्रेन हॅमरेज झाला होता. त्यांना हिंदुजा हॉस्पिटलच्या आयसीयू वॉर्डमध्ये दाखल करण्यात आले. ते कोमात गेले होते. दरम्यान आज त्यांनी अखेरचा श्वास घेतला आहे. बाळासाहेब ठाकरे यांचा कडवट शिवसैनिक हरवला. 

मनोहर जोशी यांनी १९७० च्या दशकात शिवसेनेकडून विधान परिषदेवर निवडून येऊन आपल्या राजकीय कारकिर्दीला सुरुवात केली. यानंतर ते १९७६ ते १९७७ या काळात मुंबईचे महापौरही होते.मनोहर जोशी यांनी १९९५-१९९९ पर्यंत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून काम पाहिले. यानंतर, अटलबिहारी वाजपेयी यांच्या सरकारमध्ये त्यांना २००२-०४ साठी लोकसभा अध्यक्ष बनवण्यात आले. मनोहर जोशी मुंबई सेंट्रल मतदारसंघातून लोकसभेचे खासदार झाले. राज्यसभेचे खासदार म्हणूनही त्यांनी सहा वर्षे काम केले.

विधान परिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या उपस्थितीत शिवाजीराव आढळराव पाटील यांनी पुणे म्हाडा अध्यक्ष पदाचा कार्यभार स्वीकारला

पुणे दि.२२: पुणे गृहनिर्माण व क्षेत्र विकास प्राधिकरण अर्थात म्हाडाच्या अध्यक्षपदी श्री शिवाजीराव आढळराव पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्या पदाचा कार्यभार महाराष्ट्र विधान परिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या उपस्थितीत श्री आढळराव पाटील यांनी आज पदभार स्वीकारला. याप्रसंगी विभागीय संपर्क नेते संजय माशीलकर, इरफान सैय्यद, जिल्हा प्रमुख रमेश कोंडे, बाळासाहेब वाल्हेकर, सुरेंद्र जेवरे, उपजिल्हाप्रमुख संभाजी शिरसाठ, महिला शहर प्रमुख पूजा रावेतकर, कांताताई पांढरे, मा. नगरसेवक लक्ष्मण आरडे, युवासेना शहर प्रमुख निलेश गिरमे, युवासेना जिल्हाप्रमुख निलेश घारे, पुणे लोकसभा निरीक्षक किशोर भोसले अभिजित बोऱ्हाडे म्हाडाचे कार्यकारी अधिकारी श्री अशोक पाटील आदी मान्यवरांसह शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

म्हाडाच्या माध्यमातून गोरगरिबांना स्वस्तात घरे मिळवून देणे, म्हाडा वसाहतींमधील नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी कार्य करून त्यांना न्याय देण्याचे कार्य नवनिर्वाचित अध्यक्षांद्वारे केलं जाईल याचा विश्वास आहे असे उपसभापती डॉ. गोऱ्हे यांनी सांगितले.