Home Blog Page 1127

50 लाख रुपयांची रोकड पकडली…

पुणे :पोलिसांना नाकाबंदी दरम्यान उर्से टोल नाका येथे एका कार मध्ये 50 लाख रुपयांची रोकड आढळून आली आहे. संबंधित व्यक्तीकडे चौकशी केली असता त्याला या रकमेबाबत योग्य माहिती देता आली नसल्याने रोकड जप्त करण्यात आली आहे.
पोलीस उपायुक्त बापू बांगर यांनी दिलेल्या माहितीनुसार, लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने पिंपरी चिंचवड पोलिसांनी हद्दीमध्ये नऊ ठिकाणी नाकाबंदी लावली आहे. पुणे मुंबई द्रुतगती मार्गावर उर्से टोलनाका येथे देखील नाकाबंदी करण्यात आली आहे. मंगळवारी उर्से टोलनाका येथे शिरगाव पोलीस वाहनांची तपासणी करत असताना त्यांना एका स्कॉर्पिओ मध्ये 50 लाख रुपये रोख रक्कम मिळाली .

पोलिसांनी संबंधित चालकाकडे रकमेबाबत खुलासा मागितला. मात्र त्यास योग्य खुलासा करता आला नाही. त्यामुळे पोलिसांनी ती रक्कम जप्त केली आहे. या प्रकरणाची पोलिसांकडून चौकशी केली जात असल्याचेही पोलीस उपायुक्त बापू बांगर यांनी सांगितले.

शरद पोंक्षे – स्नेह पोंक्षे लवकरच घेऊन येणार नवीन चित्रपट

शरद पोंक्षे… मराठी कलाक्षेत्रातील एक दिग्गज नाव. नाटक, मालिका, चित्रपट अशा विविध माध्यमांमधून आपण त्यांचा दर्जेदार अभिनय पाहिला आहे. मात्र आता शरद पोंक्षे एका वेगळ्या भूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. लवकरच शरद पोंक्षे निर्मिती क्षेत्रात पदार्पण करणार असून या चित्रपटाचे दिग्दर्शन त्यांचा पुत्र म्हणजेच स्नेह पोंक्षे करणार आहे. सध्यातरी या चित्रपटाचे नाव ठरलेले नसले तरी या चित्रपटाच्या निमित्ताने वडिल-मुलाची जोडी मात्र एकत्र काम करणार आहे. या चित्रपटाच्या टीमने प्रभादेवीतील सिद्धिविनायकाचे आशीर्वाद घेऊन चित्रपटाचा शुभारंभ केला.

वि. एस. प्रोडक्शन्स व मोरया प्रोडक्शन यांच्या सहयोगाने प्रदर्शित होणाऱ्या या चित्रपटाची पूर्व तयारी सध्या ‘प्रॅाडक्शन नं १’ या नावाने होत असून रोहिणी विजयसिंह पटवर्धन या चित्रपटाच्या निर्मात्या आहेत तर शरद पोंक्षे सहनिर्माते आहेत. या चित्रपटाचे लेखन स्नेह पोंक्षे याने केले आहे. ही जोडी नक्की कोणत्या विषयावर चित्रपट घेऊन आपल्या समोर येणार आहेत, हे फार औत्सुक्याचे ठरणार आहे.

याबद्दल निर्माते शरद पोंक्षे म्हणतात, ‘’एका नवीन भूमिकेतून तुमच्या भेटीला येत आहे. विशेष म्हणजे मुलाच्या सोबतीने ही वेगळी भूमिका साकारत आहे. यापूर्वी स्नेहने पाच वर्षं सह दिग्दर्शक म्हणून काम केले आहे आणि या चित्रपटाच्या निमित्ताने तो दिग्दर्शनात पदार्पण करत आहे. मला खात्री आहे, तो ही जबाबदारी उत्तमरित्या पेलेल.’’

दिग्दर्शक स्नेह पोंक्षे म्हणतो, ” लवकरच हा चित्रपट आम्ही प्रेक्षकांच्या भेटीला घेऊन येणार आहोत. आम्ही सुद्धा या चित्रपटासाठी खूप उत्सुक आहोत. चित्रीकरणाला सुरूवात होणार असून विषय, शीर्षक, कलाकार हे लवकरच आम्ही जाहीर करू. पदार्पणातच वडिलांसोबत काम करण्याची संधी मिळाली आहे, त्याचा विशेष आनंद आहे.’’

80 टक्के लोक जर अजित पवारांसमवेत..तर मग पक्ष चोरला कसे म्हणता ? सुनेत्रा पवार

भोर : पक्षातले 80 टक्के लोक जर अजित पवारांसमवेत आले आहेत. लोकशाही आहे तर मग पक्ष चोरला किंवा सोडून गेला, चुकीचं वागला असं कसं काय म्हणता येईल. जर लोकशाहीच्या गप्पा आपण मारतो तर लोकशाही नक्की कशाला म्हणायचं?, असे प्रश्न करत सुनेत्रा पवार यांनी पहिल्यांदाच शरद पवार, सुप्रिया सुळे यांना टोला लगावला.

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बारामती टेक्सटाईल पार्कच्या अध्यक्षा सुनेत्रा पवार या बारामती लोकसभा मतदार संघाचा दौरा सुरु आहे. सध्या सुनेत्रा पवार या भोर तालुक्याच्या दौऱ्यावर आहेत. त्यांनी सारोळे गावात छत्रपती शिवाजीमहाराजांच्या पुतळ्याला अभिवादन करुन त्यांच्या दौऱ्याला सुरुवात केली. यावेळी ग्रामस्थांशी संवाद साधत सुनेत्रा पवार यांनी अडीअडचणी जाणून घेतल्या.
अजितदादांनी नेहमीच गटतट न पाहता, पक्षपातीपणा न करता नेहमीच लोकांच्या कामांना महत्व दिलं आहे.. विकासाशी बांधिलकी जपणाऱ्या अजितदादांच्या विचाराचा खासदार व्हावा यासाठी घड्याळाला मतदान करण्याचं आवाहन त्यांनी यावेळी सुनेत्रा पवार यांनी केलं.
दरम्यान, सुनेत्रा पवार यांनी संपूर्ण दिवसभरात भोर तालुक्यातील विविध गावांमध्ये जाऊन नागरीकांच्या भेटीगाठी घेतल्या.आणि लोकांच्या समस्या जाणून घेतल्या जेणेकरून भविष्यात त्यावर काम करता येतील.

नथूरामची भूमिकाही केलीय त्यांनी.. अमोल कोल्हेंच्या डॉयलॉगबाजीवर काय म्हणाले अजित पवार ..

पुणे- शिरूर लोकसभा मतदार संघात शिवाजीराव आढळराव पाटील हेच घड्याळ चिन्हावर लढतील, ते सामान्य जनतेच्या कामाला येणारे नेते आहेत , अमोल कोल्हे हे अभिनेते आहेत , ते छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका केल्याचे सांगतात पण त्यांनी नथुराम गोडसेची देखील भूमिका केलीय .. कॉंग्रेस वाल्यांना असे चालणार आहे काय ?असा सवाल करत आज अजित पवार यांनी आढळराव पाटील यांच्या राष्ट्रवादीत प्रवेशाच्या वेळी मोदी शहांचे भरभरून कौतुक करत आढळरावांची उमेदवारी जाहीर केली आणि अमोल कोल्हे यांच्यावर टीका केली .

‘सध्याचा खासदार डायलॉगबाजी करण्यात वस्ताद आहे. लोकांचे प्रश्न सोडविण्यासाठी घाम गाळावा लागतो. चित्रपट, मालिका तेवढ्यापुरते पाहू; पण सर्वसामान्य लोकांचे प्रश्न सोडविण्यासाठी आणि त्यांच्या हाकेला धावून जाणारा माणूस खासदार म्हणून निवडून द्यावा लागतो,’ अशा शब्दांत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शिरूरचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांच्यावर मंगळवारी टीकास्त्र सोडले.राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांना पवार यांनी शिरूर लोकसभेची उमेदवारी जाहीर केली.मंचर येथील कार्यक्रमात शिवसेनेचे माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील आणि शेकडो कार्यकर्त्यांचा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते आणि ‘राष्ट्रवादी’चे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील, आमदार दिलीप मोहिते पाटील, अतुल बेनके यांच्या उपस्थितीत ‘राष्ट्रवादी काँग्रेस’मध्ये प्रवेश झाला.’आढळरावांची घरवापसी झाली आहे. कोल्हे यांना मी शिवसेनेतून ‘राष्ट्रवादी’त आणून खासदार केले. त्यांची घरवापसी करायची झाली, तर शिवसेना, मनसे असे अनेक पक्ष शोधावे लागतील, असा टोला पवार यांनी लगावला. ‘नेता पराभूत होत नसेल, तर कलाकाराला समोर उभे करावे लागते. याचप्रमाणे मी कोल्हे यांना आढळरावांच्या विरोधात उभे केले. आढळरावांचा पराभव करताना आमच्या तोंडाला फेस आला होता,’ अशी कबुली देऊन आता त्याच आढळरावांना पुन्हा निवडून आणण्याचे आवाहन पवार यांनी केले.

शिवाजीराव आढळराव पाटील आणि कार्यकर्त्यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात जाहीर प्रवेश

पुणे-शिवसेना नेते शिवाजी आढळराव पाटील यांनी आज अखेर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत आढळराव पाटील यांनी राष्ट्रवादीचं घड्याळ हाती घेतलं.शिवाजी आढळराव पाटील राष्ट्रवादी अजित पवार गटात प्रवेश करतील, अशी गेल्या अनेक दिवसांपासून चर्चा होती. त्यानंतर आज अखेर त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला आहे. शिवाजी आढळराव पाटील यांना राष्ट्रवादी काँग्रेसकडून शिरुर लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी मिळणार आहे. त्यामुळे लोकसभा निवडणुकीत शरद पवार गटाचे उमेदवार अमोल कोल्हे यांच्या विरोधात अजित पवार गटाचे आढळराव पाटील अशी लढत आता बघायला मिळणार आहे. गेल्या लोकसभा निवडणुकीत अमोल कोल्हे यांनी आढळराव पाटील यांचा पराभव केला होता. त्यानंतर आगामी निवडणुकीत पुन्हा अमोल कोल्हे विरुद्ध शिवाजी आढळराव पाटील अशी लढत बघायला मिळण्याची शक्यता आहे.लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सध्या राज्यात वेगवेगळ्या राजकीय घडामोडी घडत आहेत. प्रत्येक पक्षाकडून उमेदवारांची निवड केली जात आहे. काही ठिकाणी उमेदवारांची चाचपणी केली जात आहे. सत्ताधारी आणि विरोधकांकडून जागावाटप निश्चित करण्यात येत आहे. या घडामोडी गेल्या अनेक दिवसांपासून सुरु आहेत. विशेष म्हणजे शिरुर लोकसभा मतदारसंघाबाबत गेल्या काही दिवसांपासून सस्पेन्स वाढला होता. कारण या मतदारसंघात सध्या राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाचे नेते अमोल कोल्हे हे खासदार आहेत. त्यामुळे या जागेवर अजित पवार गटाचा दावा होता.महायुतीच्या नेत्यांची जागावाटपाची चर्चा झाली त्यावेळी अजित पवार यांनी या जागेवर दावा सांगितला. दुसरीकडे शिवसेना नेते शिवाजी आढळराव पाटील हे या जागेसाठी आग्रही होते. ते या मतदारसंघाचे माजी खासदार आहेत. त्यांची या मतदारसंघात ताकदही आहे. त्यामुळे शिवसेनेला ही जागा मिळावी, अशी त्यांची मागणी होती. पण महायुतीत ही जागा राष्ट्रवादीला सुटणार असल्याची माहिती समोर आल्यानंतर आढळराव पाटील यांनी घड्याळ चिन्हावरही निवडणूक लढण्यासाठी अनुमती दर्शवली. यासाठी पडद्यामागे जोरदार हालाचाली घडल्या.दरम्यान, आढळराव पाटील यांनी आपल्या कार्यकर्त्यांसोबत बैठक घेतली. या बैठकीत सर्व कार्यकर्त्यांनी आढळराव पाटील यांना पाठिंबा दर्शवला. त्यानंतर आढळराव पाटील हे राष्ट्रवादी अजित पवार गटात सहभागी होतील, अशी चर्चा सुरु होती. अखेर ही चर्चा खरी ठरली आहे. आढळराव पाटील यांचा आज अजित पवार गटात प्रवेश झाला आहे.

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शस्त्र बाळगण्याबाबत निर्बंध लागू

पुणे दि. २६: भारत निवडणूक आयोगाने लोकसभा सार्वत्रिक निवडणूकीचा कार्यक्रम जाहीर केला असून जिल्ह्यात फौजदारी दंड प्रक्रिया संहिता १९७३ चे कलम १४४ तसेच शस्त्र अधिनियम १९५९ चे कलम १७(३)(ए) व (बी) अन्वये जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे यांनी निर्बंध लागू केले आहेत. पोटनिवडणूक सुरळीत, शांततेत व निर्भय वातावरणात पार पाडण्यासाठी तसेच कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होवू नये म्हणून ६ जूनपर्यंत हे निर्बंध राहणार आहेत.

या कालावधीत नागरिकांना स्वत:जवळ परवानाप्राप्त अग्नीशस्त्रे, हत्यारे, दारुगोळा बाळगण्यास व बरोबर नेण्यास मनाई करण्यात आली आहे. या आदेशातून बंदोबस्तासाठी असणारे अधिकारी, कर्मचारी तसेच बँका व सार्वजनिक मालमत्तेच्या सुरक्षिततेसाठी नेमण्यात आलेले सुरक्षा कर्मचारी यांना वगळण्यात आले आहे. बँका अथवा सार्वजनिक संस्था यांच्यावर निवडणूक कालावधीत त्यांच्याकडील हत्यारांचा गैरवापर होणार नाही याची जबाबदारी राहील.

या आदेशाचे उल्लंघन करणारी व्यक्ती भारतीय दंड विधान कायदा कलम १८८ अन्वये शिक्षेस पात्र राहील, असेही जिल्हाधिकारी यांनी जारी केलेल्या आदेशात नमूद करण्यात आले आहे.
0000

‘हायवे मॅन’ सिनेमाप्रमाणे गडकरीही निवडणुकीत फ्लॉप होणार, देशाला गांधी विचाराची गरज..

प्रकाश आंबेडकरांच्या प्रस्तावासाठी काँग्रेसचे एक पाऊल पुढे, पवार व ठाकरेंनी आंबेडकरांचा प्रस्ताव मान्य करावा: नाना पटोले

महाविकास आघाडीतील दोन जागांवरील पेच चर्चेतून सुटेल, सांगली व भिवंडी काँग्रेसच्या परंपरागत जागा.

नागपूर/मुंबई, दि. २६ मार्च

महाविकास आघाडीच्या जागा वाटपात दोन जागांवर अजून निर्णय झालेला नाही, त्यावर चर्चेतून लवकरच मार्ग निघेल. आघाडीचा धर्म सर्वांनीच पाळला पाहिजे. सांगली व भिवंडी या काँग्रेसच्या परंपरागत जागा आहेत, या जागांवर काँग्रेस पक्षाकडे चांगले उमेदवार आहेत. सांगलीत जे झाले ते बरोबर झाले नाही. असे म्हणत वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांच्या प्रस्तावासाठी काँग्रेसने एक पाऊल पुढे टाकले आहे आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार व शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या मित्र पक्षांनीही तो प्रस्ताव मान्य करावा, असे आवाहन महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी केले आहे.

नागपूर येथे प्रसार माध्यमांशी बोलताना नाना पटोले म्हणाले की, देशाचे संविधान व लोकशाही टिकवणे हे सर्वांचे काम आहे. आताची निवडणूक ही देश वाचवण्यासाठी आहे. भाजपाचा पराभव करणे हाच मुख्य उद्देश आहे. महाविकास आघाडी या लोकसभा निवडणुकीत भाजपाचा दारूण पराभव करेल. मागील १० वर्षात भाजपाने खोटी आश्वासने देऊन देशाला बरबाद केले त्याचा उगम हा नागपुरच आहे. महागाई, बेरोजगारी प्रचंड वाढलेली आहे, शेतकऱ्याला उद्ध्वस्त केले आहे. देशावर कर्जाचा मोठा डोंगर करून ठेवला आहे. जनतेमध्ये मोदी सरकारविरोधात प्रचंड असंतोष आहे त्यामुळे मोदी सरकारला धडा शिकवल्याशिवाय जनता गप्प बसणार नाही असे चित्र सगळीकडे आहे.

नागपूरमध्ये भाजपाचा उमेदवार कोण आहे हे महत्वाचे नाही. ही लढाई विचाराची आहे. हायवे मॅन चित्रपट फ्लॉप झाला, मोदींवर काढलेला चित्रपटही फ्लॉप झाला पण मुन्नाभाई एमबीबीएस चित्रपट मात्र सुपरहिट झाला होता. आज जनतेला गांधी विचाराची आवश्यकता आहे. विकासाच्या नावाखाली नागपूरचे बेहाल करुन ठेवले आहेत. नेमका कोणाचा विकास झाला? कुठे गेले मिहान? मालवाहतुक करणारी विमाने उतरतील आणि शेतकऱ्यांना फायदा होईल, या आश्वासनांचे काय झाले. नागपूर शहरात सिमेंटचे रस्ते बनवले आहेत, आधीच नागपुरात जास्त तपमान व आता सीमेंटचे रस्ते यामुळे तापमान आणखी वाढणारच. स्थानिक मुद्द्यांबरोबरच राष्ट्रीय मुदद्यांवरही या निवडणुकीत भर दिला जाणार आहे. काँग्रेस पक्षात एकजूट असून नागपूरमधून काँग्रेस व महाविकास आघाडीचा उमेदवार २.५ लाख मताधिक्क्याने विजयी होईल, असा विश्वास नाना पटोले यांनी व्यक्त केला आहे.

महाविकास आघाडीच्या विकास ठाकरे यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी सकाळी व्हरायटी चौकातील गांधी पुतळ्याला आदरांजली अर्पण करण्यात आली व नंतर अर्ज दाखल करण्यात आला. विकास ठाकरे यांचा अर्ज दाखल करतेवेळी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते माजी मंत्री अनिल देशमुख, माजी मंत्री सुनिल केदार, माजी केंद्रीय मंत्री विलास मुत्तेमवार, माजी मंत्री सतिश चतुर्वेदी, अनिस अहमद, आ. अभिजीत वंजारी, प्रदेश उपाध्यक्ष संघटन व प्रशासन नाना गावंडे, प्रदेश काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे, अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सचिव रामकिसन ओझा, प्रफुल्ल गुडधे यांच्यासह महाविकास आघाडीचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

स्वीप नोडल अधिकाऱ्यांच्या राज्यस्तरीय कार्यशाळेचे उद्घाटन

पुणे, दि. २६: भारत निवडणूक आयोग आणि मुख्य निवडणूक अधिकारी महाराष्ट्र राज्य यांच्यावतीने यशदा येथे लोकसभा निवडणूकीच्या अनुषंगाने मतदान जनजागृतीबाबत स्वीप नोडल अधिकाऱ्यांच्या दोन दिवसीय राज्यस्तरीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले.

यावेळी राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोक्कलिंगम, भारत निवडणूक आयोगाचे स्वीप संचालक संतोष अजमेरा, जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे, आयोगाच्या वरीष्ठ स्वीप सल्लागार अनुराधा शर्मा आदी उपस्थित होते.

कमी मतदान टक्केवारी असलेल्या मतदारसंघातील मतदानात वाढ करणे, शहरी नागरिकांचा निवडणूक प्रक्रियेतील सहभाग वाढावा यासाठी निवडणूक आयोगाच्यावतीने स्वीपअंतर्गत हाती घेण्यात आलेले उपक्रम यांची माहिती देण्यासह वेगवेगळ्या जिल्ह्यात राबविण्यात येत असलेले नाविन्यपूर्ण उपक्रमांबाबत कार्यशाळेत विचारमंथन करण्यात येणार आहे.
0000

गद्दारी:हेच आढळरावांचे क्वालिफिकेशन…

पुणे- काल ज्यांच्यावर अगदी हीन भाषेत टीका केली आज त्यांच्याच पक्षात जाऊन निवडणूक लढवायची हे गद्दारीचे क्वालिफिकेशन आढळराव यांचे असल्याचे शिक्कामोर्तब आज होईल . एवढेच नव्हे तर ज्यांचे बरेच काही खालच्या भाषेतील वक्तव्ये ऐकून अजितदादा कधी संतापत त्यांनाच आज पक्षात घेऊन उमेदवारी देण्याची नामुष्की अजीत दादांवर आली आहे .या पार्श्वभूमीवर डॉक्टर , अभिनेता असूनही एक प्रामाणिक , जनहिताची कळकळ असलेला, कुठलाही भ्रष्टाचाराचा डाग नसलेला नेता म्हणूनच अमोल कोल्हेंना जनता स्वीकारेल असे पुणे शहर राष्ट्रवादीचे अध्यक्ष प्रशांत जगताप यांनी म्हटले आहे. ते म्हणाले कि,’होय तेच शिवाजीराव आढळराव पाटील ज्यानीं अजितदादा पवार, दिलीप वळसे पाटील व राष्ट्रवादीच्या नेत्यांवर अतिशय खालच्या पातळीवर टीका केली, राष्ट्रवादी संपवण्याची भाषा केली त्यांचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियामध्ये उपलब्ध आहेत. त्यांनाच राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश देण्याची नामुष्की अजितदादा पवार यांच्यावर आली, मतदार संघात राष्ट्रवादी काँग्रेस सक्षम असती तर आयात उमेदवार घेण्याची वेळच आली नसती अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी टीका केली.
अशा गद्दार आढळराव पाटलांना शिरूर लोकसभा मतदारसंघातून मतदार निवडून देणार नाहीत. तर कर्तुत्वान डॉक्टर अमोल कोल्हे पुन्हा खासदार होणार असा विश्वासही प्रशांत जगताप यांनी व्यक्त केला, शिवाजीराव आढळराव पाटील यांचा आज अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश होत आहे या पार्श्वभूमीवर प्रशांत जगताप यांनी आढळराव पाटलांसह अजित पवारांना देखील चिमटे काढले आहेत.

रायगड लोकसभा मतदारसंघासाठी प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे यांच्या नावाची अजितदादा पवार यांच्याकडून घोषणा… इतर जागा नावे २८ मार्चला

पुणे दि. २६ मार्च – दिनांक २८ मार्चला एकत्रित महायुतीची मुंबईत पत्रकार परिषद घेऊन त्यावेळी जागा कुणाला किती मिळणार हे जाहीर केले जाईल. आतापर्यंत ९९ टक्के जागा वाटपाचे काम पूर्ण झाले असून आमच्या कार्यकर्त्यांचे समाधान होईल अशा जागा आम्हाला मिळणार असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष अजितदादा पवार यांनी पुणे येथील पत्रकार परिषदेत सांगितले.दरम्यान रायगड लोकसभा मतदारसंघासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे यांच्या उमेदवारीची घोषणा अजितदादा पवार यांनी आज पुणे येथे केली.आज पुणे येथे राष्ट्रवादी काँग्रेसच्या मंत्री, आमदार व पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडली. त्यानंतर अजितदादा पवार यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे, कृषीमंत्री धनंजय मुंडे, महिला प्रदेशाध्यक्षा रुपालीताई चाकणकर आदींसह पक्षाचे मंत्री, आमदार, पदाधिकारी उपस्थित होते. महायुतीच्या ४८ जागा असून त्यामध्ये जवळपास कुणी कोणत्या जागा लढवायच्या याबाबत मागेच ८० टक्के काम पूर्ण झाले आहे. आता ९९ टक्के काम झाले आहे. पहिल्या व दुसऱ्या टप्प्यातील उमेदवार जाहीर करणे क्रमप्राप्त होते. पहिल्या टप्प्यात विदर्भातील निवडणूक होणार आहे. आंबेगाव येथे शिवाजीराव आढळराव पाटील हे २० वर्षापूर्वी पक्षातून गेले होते ते आज पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करत आहेत. दुसरी जागा तिथेच जाहीर करेन असे सांगतानाच बाकीच्या जागा २८ मार्चला जाहीर करणार आहोत असे अजितदादा पवार म्हणाले. पाच वर्षांपूर्वी लोकसभा निवडणुका झाल्या त्यावेळी ४८ जागा होत्या. आम्ही महाविकास आघाडीच्या वतीने लढलो होतो. त्यामध्ये भाजपच्या २३ जागा निवडून आल्या. शिवसेनेच्या १८ जागा निवडून आल्या आणि ४ राष्ट्रवादी काँग्रेसला मिळाल्या एक नवनीत राणा यांना पुरस्कृत केले होते. तर एमआयएमची एक जागा अशा निवडून आल्या होत्या. मात्र माध्यमांमध्ये कारण नसताना राष्ट्रवादी फक्त तीन जागा लढवणार अशा पध्दतीने गैरसमज पसरवण्याचे काम करण्यात आले. आमच्या महायुतीत कुणाचेही गैरसमज नाहीत. मित्रपक्षांनी २३ जागा निवडून आणल्या आहेत तेवढ्या जागा मिळाव्यात अशी अपेक्षा होती. त्यात एकत्र बसून अतिशय व्यवस्थित मार्ग काढलेला आहे असेही अजितदादा पवार यांनी सांगितले. या बैठकीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या मंत्र्यांवर एक – एक लोकसभा आणि आमदारांवर एक एक विधानसभा मतदारसंघाची जबाबदारी टाकण्यात आली आहे. बाकीची टिम आमची काम करणारच आहे. शिवाय जिथे महायुतीचे उमेदवार असतील तिथे मंत्री व आमदारांनी उमेदवार निवडून आणण्यासाठी काम करायचे आहे असेही ठरल्याचे अजितदादा पवार यांनी सांगितले.जाहीरनाम्यावर काम सुरू आहे तो लवकरच दिला जाईल. स्थानिक प्रश्न आहेत तेही त्या जाहीरनाम्यात यावेत अशी भूमिका आहे. स्टार प्रचारक यादीवर एकत्र बसून चर्चा झाली आहे त्यामुळे ती यादी लवकरच जाहीर करण्यात येईल.राज्यातील लोकसभा प्रचारक म्हणून राष्ट्रवादीकडून धनंजय मुंडे हे अगोदरच जाहीर करण्यात आले आहे. अशा पध्दतीने आम्ही लोकांसमोर जाणार असून लोकांचा विश्वास आम्ही जिंकू आणि नरेंद्र मोदी यांना तिसर्‍यांदा पंतप्रधान करण्यासाठी महाराष्ट्राचे बळ त्यांच्या पाठीशी उभे करु असा निर्धार करण्यात आल्याचेही अजितदादा पवार यांनी स्पष्ट केले.लोकशाहीत कुणालाही भेटण्याचे आणि बोलण्याचा अधिकार आहे. माझ्यावर टिका होते आहे आणि तुम्हीही करु शकता माझी भूमिका ही फक्त विकासाला, देश प्रगतीपथावर पुढे चालला आहे. आज जगात देशाचे नाव वाढत आहे. प्रतिष्ठा मिळाली आहे असेही अजितदादा पवार यांनी ठणकावून सांगितले.

कामगार, अधिकारी, कर्मचाऱ्यांना मतदानाच्या दिवशी भरपगारी सुट्टी

मुंबई, दि. २६ : राज्यातील लोकसभा मतदारसंघात पाच टप्प्यात मतदान होणार आहे. या लोकसभा निवडणुकीत कामगार, अधिकारी व कर्मचाऱ्यांना मतदानाचा हक्क बजावण्यासाठी मतदानाच्या दिवशी भरपगारी सुट्टी मिळणार आहे. याबाबतचे शासन परिपत्रक राज्य शासनाने जारी केले आहे.

भारत निवडणूक आयोगाने लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. राज्यात या निवडणुकीचे मतदान दि. १९ एप्रिल, दि. २६ एप्रिल, दि. ७ मे, दि. १३ मे व दि. २० मे, २०२४ अशा पाच टप्प्यात होणार आहे.

भारत निवडणूक आयोगाने निर्गमित केलेल्या आदेशाप्रमाणे राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये लोकसभा सार्वत्रिक निवडणूक होणार आहे. यामध्ये सर्व मतदारांना त्यांचा मतदानाचा हक्क योग्यरितीने बजावता यावा, यासाठी परिपत्रक जारी करण्यात आले आहे.

या आदेशानुसार निवडणूक होणाऱ्या मतदान क्षेत्रात मतदार असलेले कामगार, अधिकारी, कर्मचारी यांना मग ते कामानिमित्त निवडणूक होणाऱ्या क्षेत्राबाहेर कार्यरत असले तरीही, त्यांना निवडणुकीच्या दिवशी मतदानाचा हक्क बजावण्यासाठी भरपगारी सुट्टी देण्यात येणार आहे.

ही सुट्टी उद्योग विभागांतर्गत येणाऱ्या सर्व उद्योग समूह, महामंडळे, कंपन्या व संस्था, औद्योगिक उपक्रम किंवा इतर आस्थापना आदींना लागू राहणार आहे.

अपवादात्मक परिस्थितीत कामगार, अधिकारी, कर्मचाऱ्यांना पूर्ण दिवस सुट्टी देणे शक्य नसेल तर, मतदान क्षेत्रातील कामगारांना मतदानाचा हक्क बजावण्यासाठी सुट्टी ऐवजी कमीत कमी दोन तासांची सवलत दिली जाणार आहे. मात्र त्याबाबत संबंधित जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी यांची परवानगी घेणे आवश्यक राहील.

कोणत्याही परिस्थितीत मतदारांना मतदानासाठी किमान दोन तासांची सवलत मिळेल, याची दक्षता संबंधित आस्थापनांनी घेणे आवश्यक राहणार आहे. उद्योग विभागांतर्गत येणाऱ्या सर्व महामंडळे, उद्योग समूह, कंपन्या व संस्थांमध्ये, औद्योगिक उपक्रम इत्यादींच्या आस्थापनांना या सूचनांचे योग्य ते अनुपालन होईल, याची काटेकोरपणे खबरदारी घ्यावी लागणार आहे.

मतदारांकडून मतदानाकरिता योग्य ती सुट्टी अथवा सवलत प्राप्त न झाल्याने मतदान करता येणे शक्य न झाल्याबाबत तक्रार आल्यास, त्यांच्याविरुद्ध योग्य कारवाई करण्यात येणार आहे, अशा सूचनाही या आदेशाद्वारे देण्यात आल्या आहेत.

निवडणूकीच्या विविध टप्प्यांवर सुरक्षेच्या उपाययोजना करा- डॉ.चंद्रकांत पुलकुंडवार

पुणे, दि. २६: महसूल प्रशासन आणि पोलीस प्रशासनाने परस्पर समन्वयाद्वारे निवडणुकीच्या विविध टप्प्यांवर सुरक्षेच्या आवश्यक उपाययोजना कराव्यात आणि निवडणुका मुक्त आणि भयमुक्त वातावरणात पार पाडण्यासाठीचे नियोजन करावे, असे निर्देश विभागीय आयुक्त डॉ.चंद्रकांत पुलकुंडवार यांनी दिले.

विभागीय आयुक्त कार्यालयात दूरदृष्य प्रणालीद्वारे आयोजित पुणे विभागाच्या निवडणूक आढावा बैठकीत ते बोलत होते. बैठकीस पुण्याचे जिल्हाधिकारी डॉ.सुहास दिवसे, सह पोलीस आयुक्त प्रविण पवार, पोलीस विशेष महानिरीक्षक सुनील फुलारी, अपर पोलीस आयुक्त वसंत परदेशी, पोलीस अधीक्षक पंकज देशमुख, महसूल उपायुक्त वर्षा लड्डा-उंटवाल, शिरुर लोकसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी अजय मोरे आदी उपस्थित होते.

डॉ.पुलकुंडवार म्हणाले, आदर्श आचारसंहिता आणि भारत निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सूचनांचे तंतोतंत पालन होईल याकडे विशेष लक्ष द्यावे. त्यासाठी निवडणूक आराखडा योग्यरितीने तयार करावा आणि त्यात सूक्ष्म बाबींचाही समावेश असावा. आंतरजिल्हा आणि आंतरराज्य समन्वयासाठीदेखील योग्य नियोजन करावे. पैशाचा आणि बळाचा वापर होऊ नये आणि नागरिकांना निर्भयपणे मतदान करता येईल यादृष्टीने प्रतिबंधक उपाययोजना कराव्यात.

युवक आणि ज्येष्ठ नागरिकांना मतदानासाठी प्रोत्साहीत करावे. पात्र मतदार मतदानापासून वंचित राहू नये याची दक्षता घेण्यासोबत मतदारांना त्यांचे मतदान केंद्र शोधण्याविषयी व्यापक जनजागृती करावी. उन्हाळ्यातील वाढते तापमान लक्षात घेता सकाळी आणि सायंकाळी दोन तास मतदानासाठी गर्दी होईल हे लक्षात घेऊन आवश्यक व्यवस्था करावी. उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर मतदान कर्मचाऱ्यांच्या आरोग्याचीही काळजी घ्यावी. क्षेत्रीय अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष मतदान केंद्रांना भेट देऊन तेथील समस्या जाणून घ्याव्यात, असे निर्देशही विभागी आयुक्तांनी दिले.

यावेळी पुणे विभागातील जिल्हाधिकारी आणि वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी दूरदृष्य प्रणालीद्वारे आपल्या जिल्ह्यातील निवडणूक तयारीची माहिती दिली. निवडणूक कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण आणि प्रतिबंधात्मक कार्यवाहीवर विशेष लक्ष देण्यात येत असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.

लोकसभा निवडणूक पूर्वपीठिकेचे मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोक्कलिंगम यांच्या हस्ते प्रकाशन

माध्यमांना निवडणूक विषयक संदर्भांसाठी पुस्तिका उपयुक्त

पुणे, दि. २६: लोकसभा सार्वत्रिक निवडणूक- २०२४ च्या अनुषंगाने पुणे जिल्हा निवडणूक प्रशासनाच्यावतीने तयार करण्यात आलेल्या निवडणूक पूर्वपीठिकेचे प्रकाशन प्रधान सचिव तथा राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोक्कलिंगम यांच्या हस्ते यशदा येथे करण्यात आले.

यावेळी भारत निवडणूक आयोगाचे स्वीप संचालक संतोष अजमेरा, जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे, आयोगाच्या वरीष्ठ स्वीप सल्लागार अनुराधा शर्मा, उपजिल्हा निवडणूक अधिकारी मीनल कळसकर आदी उपस्थित होते.

पुणे जिल्हा माहिती कार्यालयाने वृत्तपत्रे, इलेक्ट्रॉनिक माध्यमे आदी प्रसिद्धी माध्यमांसाठी उपयुक्त संदर्भ असलेल्या या पुस्तिकेची निर्मिती केली आहे. निवडणूक आचारसंहितेबाबत तरतुदी, निवडणूक वार्तांकनासाठी प्रेस कौन्सिलची मार्गदर्शक तत्त्वे, न्यूज ब्रॉडकास्टर्स अँड डिजिटल स्टँडर्डस् ऑथॉरिटीच्या (एनबीडीएसए) मार्गदर्शक सूचना, इंटरनेट अँड मोबाईल असोसिएशन ऑफ इंडियाची (आयएमएआय) स्वैच्छिक आचारसंहिता आदींबाबत सविस्तर माहिती या पुस्तिकेत दिली आहे. राजकीय जाहिरातींच्या प्रमाणीकरणासाठी माध्यम प्रमाणीकरण आणि संनियंत्रण समितीचे कामकाज (एमसीएमसी), पेड न्यूजबाबत तरतुदी आदी उपयुक्त माहिती या पुस्तिकेत देण्यात आली आहे.

२०१९ च्या सार्वत्रिक निवडणुकीतील महाराष्ट्राची मतदानाबाबतची ठळक बाबी तसेच पुणे जिल्ह्यातील निवडणुकीची ठळक वैशिष्ट्ये यांचा पुस्तिकेत समावेश आहे. सन १९५१ च्या निवडणुकीपासून २०१९ च्या निवडणुकीपर्यंत जिल्ह्यातील लोकसभा मतदार संघातील उमेदवार त्यांना झालेले मतदान, मतदार संख्या, वैध मतांची संख्या, मतदानाची टक्केवारी यांचाही पुस्तिकेत समावेश असल्याने ही पुस्तिका माध्यम प्रतिनिधींना संदर्भासाठी उपयुक्त आहे.

माध्यमांच्या माहितीसाठी जिल्ह्यातील चारही लोकसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी, सहायक निवडणूक निर्णय अधिकारी, निवडणुकीच्या अनुषंगाने विविध विषयांचे समन्वय अधिकारी यांचे दूरध्वनी क्रमांक, मतदार मदत कक्ष, जिल्हास्तरीय नियंत्रण कक्ष यांचे दूरध्वनी क्रमांक, आयोगाच्या विविध तंत्रज्ञान सहाय्यित उपयोजक (ॲप), पोर्टल आदींची माहितीही यात देण्यात आली आहे.

‘तितिक्षा हास्यगौरव दादा कोंडके स्मृती पुरस्कार’ चेतन चावडा यांना प्रदान तर तितिक्षा काव्य करंडकचा प्रथम मानकरी मृण्मयी काळे .

पुणे: ” प्रत्येकात एक कवी लपलेला असतो त्याचा शोध घेता आला पाहिजे. आजू बाजूच्या घडामोडींचा, वास्तवाचं बारकाईने निरीक्षण केल्यास त्याचे भाव सहज कवितेतून उमटतातं. कविता स्वतः जगते आणि कवी व कवयित्रीला जगवतात.”असे विचार बोल्ड कवी म.भा. चव्हाण यांनी व्यक्त केले.
तितिक्षा इंटनॅशनलच्या वतीने ‘कथा लेखणीची..प्रचिती संस्कृतीची’ या पहिल्या आंतरराष्ट्रीय सहजारोग्य साहित्यिक, सांस्कृतिक अभियान अंतर्गत आयोजित भव्य काव्य करडंक स्पर्धा २०२४ मध्ये ते बोलत होते.
या वेळी मिसेस युनिव्हर्स डॉ. प्रचिति पुंडे, काकडे देशमुख शिक्षण संस्थेचे प्रमुख शरदचंद्र काकडे देशमुख, ज्येष्ठ साहित्यिक मधुसूदन घाणेकर, ज्येष्ठ साहित्यिक व प्रकाशक वि.ग. सातपुते, नाट्यदिग्दर्शक सतीश इंदापूरकर, कवी म.भा. चव्हाण, गुलाब सम्राट बाबा ठाकूर, अ‍ॅड. रविंद्र भवार ,सोल्यूशनमाइंड चे सर्वेसर्वा श्री.सुजित दातार आणि लेखक, दिग्दर्शक व सिनेकलाकार चेतन चावडा यांची प्रमुख उपस्थिती होती.
या प्रसंगी तितिक्षा काव्य करंडकचा प्रथम क्रमांक बालकवी मृण्मयी काळे हिने पटकविला. द्वितीय पल्लवी पवार आणि गणपत तरंगे व महादेव लांडगे यांना उत्तेजनार्थ पारितोषिक देण्यात आले. तसेच विवेकानंद काव्यलेखन स्पर्धा, तितिक्षा मंदाश्री काव्यगौरव पुरस्कार, तितिक्षा माई गौरव पुरस्कार, तितिक्षा अमृत गौरव, तितिक्षा समाजभूषण पुरस्काराचे वितरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
तसेच मिसेस.यश वालिया, कलावती सुर्वे, अंजली महाजन, प्रियंका बोरकर, सुनिता मुरलीधरन, सुपर्णा वाबळे, आरती केरकर आदि महिलांचा नारी सन्मानाने पुरस्कृत करण्यात आले. त्याच प्रमाणे चेतन चावडा यांना ‘तितिक्षा हास्यगौरव दादा कोंडके स्मृती पुरस्कार २०२४’ ने गौरविण्यात आले.
म.भा. चव्हाण म्हणाले,” कवितेत दुःख, सुख, विरह, आनंद, हास्य या सारख्या रसांचा समावेश असतो. ती आपल्यापेक्षा वेगळी नसते. कल्पना आणि वास्तव यांचा समन्वय साधत ती जन्माला येते. याची भाषा हदयापासून हदयापर्यंत पोहचणारी असते. मनातील असंख्य विचारांना शब्दात मांडत ते रसिकापर्यंत पोहचविण्याचे कार्य कवी करतो.”
मधुसूदन घाणेकर म्हणाले, “स्वतःचे समाधान झाल्याशिवाय कविता पूर्ण होत नाही. कवित ही जगण शिकविते. त्यामुळे जो कवितेत जगतो तो उत्तम कवि असतो.”
वि.ग. सातपुते म्हणाले लिहीते व्हा. भावनांना शब्दरूपात व्यक्त करण्याच उत्तमोत्तम माध्यम म्हणजे कविता असते. ही अंतःकरणातून आली पाहिजेत. तसेच रचनेत काव्य मुक्त असायला हवे तेंव्हाच ती कविता प्रभावी होत असते. जो पर्यंत कवितेला आशय विषय, भाव, लय कळत नाही तो पर्यंत कवितेतून काय म्हणायचं आहे कळत नाही.
या नंतर तितिक्षा समाजभूषण पुरस्काराचे मानकरी..डॉ.अमित तथा आम्रपाली लक्ष्मी मोहिते.
..डॉ. प्रचिती पुुंडे, प्रिया दामले व चेतन चावडा यांनी  आपले विचार मांडले.
सूत्रसंचालन सुवर्णा जाधव व योगेश हरणे यांनी केले.

राष्ट्रीय पॅरा बॅडमिंटन चॅम्पियनशिप स्पर्धेत ‘पुनीतबालन ग्रुप’च्या आरती पाटीलला दोन कांस्य पदके

पुणे : – पुनीत बालन ग्रुप’ची पॅरा-बॅडमिंटन खेळाडू आरती पाटील हिने टाटा नगर (झारखंड) येथे झालेल्या ६ व्या ‘राष्ट्रीय पॅरा बॅडमिंटन चॅम्पियनशिप २०२३-२४ स्पर्धेत’ एकेरी आणि महिला दुहेरीत दोन कांस्य पदके पटकावली. कर्नाटकातील पॅरा-बॅडमिंटन खेळाडू आरती पाटीलचा नुकताच ‘पुनीत बालन ग्रुप’शी करार झाला. त्यानुसार आंतरराष्ट्रीय पॅरा-बॅडमिंटन खेळाडू आरती पाटीलच्या खेळातील करिअरसाठी ‘पुनीत बालन ग्रुप’कडून सर्वतोपरी मदत केली जात आहे. पाटील ही एक भारतीय पॅरा-बॅडमिंटन खेळाडू असून ती सध्या महिला एकेरी SU5 साठी पॅरा-बॅडमिंटन जागतिक क्रमवारीत १० व्या क्रमांकावर आहे.
कर्नाटकातील नंदगड गावात जन्मलेल्या आरतीने २००८ मध्ये धावपटू म्हणून खेळायला सुरुवात केली. तेंव्हाच २००९ मध्ये तिने रॅकेट उचलण्याचा निर्णय घेतला आणि तेंव्हापासून बॅडमिंटनपटू म्हणून तिच्या कारकिर्दीला खऱ्या अर्थाने सुरुवात झाली. तिने आत्तापर्यंत राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर अनेक पदके जिंकली आहेत. नुकत्याच झारखंडमधील टाटा नगर येथे झालेल्या ६ व्या ‘राष्ट्रीय पॅरा बॅडमिंटन चॅम्पियनशिप २०२३-२४’ या स्पर्धेत तिने एकेरी आणि महिला दुहेरीत दोन कांस्य पदके पटकावत आणखी एक उत्कृष्ट कामगिरी केली आहे. या दैदिप्यमान यशाबद्दल क्रिडा क्षेत्रात तिचं सर्वत्र कौतुक होत आहे.

आरती पाटील ही एक प्रतिभावान आणि होतकरु खेळाडू आहे. ६ व्या ‘राष्ट्रीय पॅरा बॅडमिंटन चॅम्पियनशिप स्पर्धेत’ तिने हे दाखवून दिलं असून या दैदिप्यमान विजयाबद्दल तिचं मनःपूर्वक अभिनंदन! आपल्यातील पूर्ण क्षमता पणाला लावून ती खेळत असते. भविष्यातही ती अशाच प्रकारे यशाची वेगवेगळी शिखरं पार करील, असा विश्वास आहे आणि आम्ही तिच्या पाठीशी सदैव उभे राहू!
पुनीत बालन
अध्यक्ष, पुनीत बालन ग्रुप