Home Blog Page 1109

पुणे जिल्ह्यात ८१ लाख २७ हजार १९ मतदार

लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४
पुणे विभाग- एक दृष्टीक्षेप

भारत निवडणूक आयोगाने लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ चा कार्यक्रम जाहीर केला असून महाराष्ट्रात एकूण ५ टप्प्यात मतदान होणार आहे. पुणे विभागातील दहा लोकसभा मतदार संघात दोन टप्पात मतदान होणार आहे. निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक तत्त्वाप्रमाणे व विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांच्या मार्गदर्शनाखाली ही लोकसभा निवडणूक नि:पक्ष, पारदर्शी आणि आदर्श आचारसंहितेचे संपूर्ण पालन करुन पार पाडण्यासाठी पुणे विभाग सज्ज आहे. त्याची ही थोडक्यात माहिती…

पुणे विभागातील १० लोकसभा मतदार संघात लोकसभा सार्वत्रिक निवडणूक संपन्न होत आहे. याकरिता भारत निवडणूक आयोगाने जो कार्यक्रम जाहीर केला आहे त्यानुसार विभागातील बारामती, सोलापूर, माढा, सांगली, सातारा, कोल्हापूर व हातकणंगले लोकसभा मतदार संघात मतदान तिसऱ्या टप्प्यात म्हणजे ७ मे २०२४ रोजी होणार आहे. ज्यासाठीची अधिसूचना १२ एप्रिल रोजी तर मावळ, पुणे व शिरुर लोकसभा मतदार संघात मतदान चौथ्या टप्प्यात १३ मे रोजी होणार असून याची अधिसूचना १८ एप्रिल रोजी प्रसिद्ध होणार आहे. तर ४ जून २०२४ रोजी मतमोजणी होणार आहे.

विभागात सुमारे २ कोटी ४ लाख ६६ हजार मतदार नोंदणी पूर्ण झाली आहे. त्यापैकी १ कोटी ५ लाख ६१ हजार पुरुष व ९९ लाख ४ हजार ३६६ स्त्री मतदार आहेत. विभागातील पुणे, सातारा, सोलापूर, कोल्हापूर व सांगली जिल्ह्यांमध्ये २१ हजाराहून अधिक मतदान केंद्र असून त्यापैकी पुणे ८ हजार ३८२, सातारा ३ हजार २५, सोलापूर ३ हजार ६१७, कोल्हापूर ४ हजार १६ व सांगली २ हजार ४४८ मतदान केंद्र आहेत. विभागात सुमारे १ लाख २५ हजार मनुष्यबळ निवडणूक कामासाठी नियुक्त करण्यात आले आहेत.

पात्र मतदार
पुणे जिल्ह्यात ८१ लाख २७ हजार १९ मतदार असून त्यामध्ये ४२ लाख ४४ हजार ३१४ पुरुष व ३८ लाख ८२ हजार १० स्त्री मतदार आहेत. तर ८१ हजार ३३७ दिव्यांग मतदार, ८० वर्षावरील २ लाख ४८ हजार ८९० व ६९५ तृतीयपंथी मतदारांचा समावेश आहे. सातारा जिल्ह्यात एकूण २५ लाख ६४ हजार ४२७ मतदार असून त्यापैकी १३ लाख ५ हजार २७७ पुरुष व १२ लाख ५९ हजार ५६ स्त्री मतदारांचा समावेश आहे. सोलापूर जिल्ह्यात एकूण ३६ लाख २७ हजार ७५ मतदार असून त्यापैकी १८ लाख ७६ हजार ४९८ पुरुष व १७ लाख ५० हजार २९७ महिला मतदार आहेत. तर २७ हजार १९४ दिव्यांग मतदारांचा समावेश आहे.

कोल्हापूर लोकसभा मतदार संघात एकूण ३७ लाख २३ हजार १३४ मतदार आहेत. त्यापैकी १८ लाख ९७ हजार ३५६ पुरूष तर १८ लाख २५ हजार ५९८ स्त्री व १८० इतर मतदार आहेत. १८ ते १९ वयोगटातील एकूण मतदारांची संख्या ३९ हजार ६३३ असून सैनिकी मतदारांची संख्या ८ हजार ९२३ आहे. तसेच दिव्यांग मतदारांची संख्या २५ हजार ९११ आहे. ८५ व त्यापेक्षा जास्त वयोगटातील मतदार संख्या ४० हजार ५३ आहे. सांगली मतदार संघात २४ लाख २५ हजार ३१७ मतदार असून त्यापैकी १२ लाख ३७ हजार ७९६ पुरुष व ११ लाख ८७ हजार ४०५ स्त्री मतदार, ११६ तृतीयपंथी, ८५ वर्षावरील ३९ हजार २३२, दिव्यांग २० हजार ६१६ मतदार आहेत.

मतदान जनजागृती
भारत निवडणूक आयोगाने लोकशाहीच्या अधिकाधिक बळकटीसाठी मतदारांमध्ये जागृती करुन त्यांचा मतदान प्रक्रियेमध्ये सहभाग वाढविण्याच्या हेतूने ‘स्वीप’ (SVEEP- Systematic Voters` Education & Electoral Participation) हा महत्वकांक्षी कार्यक्रम हाती घेतला आहे. त्यांतर्गत विविध माध्यमातून मतदारांशी संपर्क साधून लोकशाहीचे महत्त्व विशद करणे आणि कुठलाही मतदार मतदानापासून वंचित राहू नये यासाठी सातत्याने प्रयत्न केले जात आहेत. मतदान जागृतीसाठी स्वीपमार्फत विविध उपक्रम राबविण्यात येत असून वाड्या-वस्त्यांवर, आठवडी बाजार, गर्दीची ठिकाणे, महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या सहभागातून रॅली, विविध स्पर्धांमधून मतदानाची टक्केवारी वाढावी यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत.

मतदारांना सुविधा

दिव्यांग व्यक्तींचा मतदान प्रक्रियेत सहभाग वाढवण्यासाठी आणि त्यांना सुलभरीत्या मतदान करता यावे यासाठी ‘पीडब्ल्यूडी ॲप’ च्या माध्यमातून दिव्यांग मतदारांना मतदान करण्यासाठी आवश्यक सुविधा उपलब्ध करून दिल्या जातात. मतदान केंद्रांवर दिव्यांगांसाठी व ज्येष्ठ नागरिकांसाठी मतदान केंद्रात प्रवेश करताना दिशादर्शक फलक, त्याठिकाणी सुस्थितीतील रॅम्प, व्हील चेअर, विश्रांती कक्ष, पिण्याच्या पाण्याची सुविधा, स्वच्छतागृह, प्रथमोचार पेटी, मतदान केंद्र तळमजल्यावर तसेच मतदान केंद्रांवर त्यांच्यासाठी स्वतंत्र वाहनतळ, मतदान केंद्रामध्ये जाताना रांगेत न थांबवता स्वतंत्र व्यवस्था असणार आहे.
मतदानासाठी आवश्यक ओळखपत्र
मतदान करतांना मतदार छायाचित्र ओळखपत्र सोबत असणे गरजेचे आहे. असे ओळखपत्र नसल्यास ओळख पटविण्यासाठी आधारकार्ड, मनरेगा जॉबकार्ड, बँकांचे/टपाल कार्यालयाचे छायाचित्र असलेले पासबुक, कामगार मंत्रालयाच्या योजनेअंतर्गत जारी केलेले आरोग्य विमा स्मार्टकार्ड, वाहन चालक परवाना (ड्रायव्हिंग लायसेन्स), पॅनकार्ड, भारतीय पारपत्र (पासपोर्ट), छायाचित्र असलेले निवृत्तीवेतन दस्तावेज, राज्य/केंद्र शासन, सार्वजनिक उपक्रम, सार्वजनिक मर्यादित कंपन्यांनी कर्मचाऱ्यांना जारी केलेले छायाचित्रासह सेवा ओळखपत्र, खासदार, आमदार यांना जारी करण्यात आलेले अधिकृत ओळखपत्र यापैकी कोणत्याही एक पुरावा मतदान केंद्रावर घेऊन जाणे आवश्यक राहील.

मतदारांना आवाहन

लोकशाहीच्या बळकटीकरणासाठी सर्व पात्र मतदारांनी आपला मतदानाचा पवित्र हक्क जरुर बजवावा. नि:पक्ष आणि निर्भयतेने मतदान करण्यासाठी निवडणूक यंत्रणा आपल्या सदैव मदतीला असते. सर्व पात्र मतदारांनी मतदान करुन मतदानाची टक्केवारी वाढवावी, मतदानाचे राष्ट्रीय कर्तव्य करुन आपली लोकशाही अधिक बळकट करण्यास पुढे यावे. आपणही आपले कर्तव्य निभावू….चला मतदान करुया….

डॉ. राजू पाटोदकर
उपसंचालक (माहिती),
पुणे विभाग, पुणे

शिवसेनेने, स्व वसंतदादां विषयीचे ऋणानुबंध लक्षांत घेता, ‘सांगली’ ची जागा मोठ्या मनाने काँग्रेस’ला सोडावी..

राज्य प्रवक्ते गोपाळ तिवारी
पुणे दि ४ एप्रिल-शिवसेनेने, स्व वसंतदादां विषयीचे ऋणानुबंध लक्षांत घेता, ‘सांगली’ ची जागा मोठ्या मनाने काँग्रेस’ला सोडावी.. अशी मागणी कॉंग्रेसचे राज्य प्रवक्ते गोपाळ तिवारी यांनी केली आहे .
तिवारी या संदर्भात म्हणाले,’ मुंबईत शिवसेनेच्या स्थापनेचे वेळी महाराष्ट्रात स्व वसंतदादा पाटील यांचे नेतृत्वाखालील सरकार होते. मुंबईत प्रादेशिक अस्मितेचा मुद्दा पुढे आला होता. त्या वेळी ‘केंद्रस्थानी असलेल्या राष्ट्रीय पक्षाच्या काँग्रेस श्रेष्ठींना, योग्य पध्दतीने वास्तवता समजाऊन, महाराष्ट्राची अस्मिता जपत, शिवसेने सारख्या प्रादेशीक पक्षाची पाया भरणी झाली होती.
तेंव्हा तत्कालीन मुख्यमंत्री स्व वसंतदादा पाटील यांनी केलेले अभितपुर्व सहकार्य मौलीक होते व या बाबत चे पुरक वक्तव्य स्व बाळासाहेब ठाकरे यांनी देखील केले होते. काही काळ स्व वसंतदादा बाजू घेत असल्यामुळे सेनेस काही काळ वसंत सेना देखील संबोधले गेल्याचे ही ऐकिवात येते.मात्र आज त्याच स्व वसंतदादा पाटील यांच्या सांगली च्या मतदार संघा साठी काँग्रेस ला वारंवार मनधरणी वा याचना करावी लागू नये हीच राज्यातील समस्त काँग्रेसजनांची भावना आहे.
यापुढेही जाऊन, सांगलीचे शिवसेनेचे ऊमेदवार .चंद्रहार पाटील यांनी देखील ‘काँग्रेसचे संभाव्य ऊमेदवार .विशाल पाटील व सांगली’साठी सकारात्मक सहकार्य करण्याची तयारी व मानसिकता ही दर्शवली होती, हे देखील विसरतां कामा नये.
श्रीमती सोनियाजींनी प्रसंगी राज्याच्या हितासाठी, प्रसंगी तत्वांना आवर घालुन, किमान समान कार्यक्रमावर आपल्या नेतृत्वा खालील मविआ सरकारला पाठींबा ही दिला.. याचे ही आधाडी धर्माचे पालन करीत सेना नेत्यांनी स्मरण ठेवावे व मोठ्या मनाने, प्रगल्भता दाखवून स्व वसंतदादा पाटीलांचा ऐतिहासीक वारसा असलेल्या सांगली’ची जागा काँग्रेस’ला सोडावी असे आवाहन केले.
तसेच माजी मंत्री व सांगलीचे युवा नेते डॅा विश्वजीत कदम यांनी प्रकट केलेल्या “सांगलीकर – काँग्रेसजनांच्या” भावनांचाही आदर करावा, असेही आवाहन केले.तसेच, आज जर स्व पतंगराव कदम असते तर ही वेळ आली असती काय? असा प्रश्न ही त्यांनी उपस्थित केला .
तसेच सातारा लोकसभेचे खासदार श्रीनिवास पाटील जर निवडणुक लढवत नसतील.. तर सातारा जिल्ह्यातील समस्त काँग्रेसजनांचा आग्रह पाहून ती जागा पवार शरद पवार साहेबांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने काँग्रेस करीता सोडावी, असेही विनंती वजा आवाहन राज्य काँग्रेस तर्फे करत असल्याचे राज्य प्रवक्ते गोपाळ तिवारी यांनी केले.
इंडीया आधाडीच्या जेष्ठ व श्रेष्ठ नेत्यांनी व्यापक देशहित, राज्याचे हित, संविधान व लोकशाही करीता ‘ऐक्य भावनेला’ सर्वोपरी प्राधान्य देण्याची गरज आहे
तसेच, शरद पवार यांनी “स्व राजीव गांधी सोबतचे ऋणानुबंध लक्षात घेऊन, स्व राजीव गांधींनीच राजकारणात पाचारण केलेल्या पृथ्वीराज चव्हाण यांचे साठी सातारा काँग्रेसला देणे बाबत विचार करावा” व इंडीया आघाडीतील कार्यकर्त्यांचे आपल्या विषयीचा आदरभाव आणखीन द्वीगुणीत करावा, अशी विनंती व आवाहन समस्त महाराष्ट्रातील काँग्रेसजनां तर्फे काँग्रेस नेते व राज्य प्रवक्ते गोपाळ तिवारी यांनी केले असल्याचे प्रसिध्दीस दिलेल्या निवेदनात म्हंटले आहे.

दलित पँथर संघटनेचा राष्ट्रवादी काँग्रेसला लोकसभेत पाठिंबा

मुंबई दि. ४ एप्रिल – दलित पँथर संघटनेने राष्ट्रवादी काँग्रेसला जाहीर पाठिंबा दिल्याचे पत्र संघटनेचे अध्यक्ष सुखदेव सोनवणे यांनी राष्ट्रीय अध्यक्ष अजितदादा पवार आणि प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे यांना दिले आहे.

दलित पँथर संघटनेच्या राज्य कार्यकारिणीची बैठक नुकतीच झाली असून त्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला पाठिंबा देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या संघटनेने आज राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष अजितदादा पवार यांची भेट घेऊन हा पाठिंबा जाहीर केला.

पदाधिकाऱ्यांना तोंडात साखर, डोक्यावर बर्फ आणि पायाला भिंगरी लावून घरोघरी संपर्काच्या सूचना

पुणे लोकसभेसाठी नामदार चंद्रकांतदादा पाटील यांचे सूक्ष्म नियोजन

सहाही विधानसभा मतदारसंघाच्या प्रभाग निहाय बैठका

पुणे

पुणे लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांच्या विजयासाठी नामदार चंद्रकांतदादा पाटील यांनी कंबर कसली आहे. पुणे लोकसभा मतदारसंघातून मुरलीधर मोहोळ यांना विक्रमी मतांनी विजयी करण्यासाठी नामदार पाटील सूक्ष्म नियोजन केले असून, गेल्या दोन दिवसांपासून सर्वच विधानसभा मतदारसंघाच्या प्रभाग निहाय बैठका घेत आहेत. या बैठकांमध्ये ते पदाधिकाऱ्यांना तोंडात साखर, डोक्यावर बर्फ आणि पायाला भिंगरी लावून घरोघरी संपर्काच्या सूचना करत आहेत.

पुणे लोकसभा मतदारसंघासाठी प्रचाराला रंगत येण्यास सुरुवात झाली आहे. भारतीय जनता पक्षाने महाविजयाचा  संकल्प केला असून, यासाठी सर्वच नेते जिवाचे रान करताना दिसत आहेत. राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण आणि  वस्त्रोद्योग मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी गेल्या आठवड्यात भाजपा पुणे शहरच्या सर्व आघाड्या आणि मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांशी संवाद साधून, मुरलीधर मोहोळ यांना विक्रमी मतांनी विजयी करण्याचे आवाहन केले.

आता त्यांनी सूक्ष्म नियोजनावर भर दिला असून, सहाही विधानसभा मतदारसंघात प्रभाग निहाय बैठका घेत आहेत. याची सुरुवात सोमवारी कसबा विधानसभा मतदारसंघातून केली. सोमवारी कसबा विधानसभा मतदारसंघातील प्रभाग क्रमांक १५ आणि २९ मधील पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला. त्यानंतर कोथरुड, शिवाजीनगर, पुणे कॅन्टोन्मेंट अशा मतदारसंघाची बैठक घेऊन पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले.

पुणे लोकसभा निवडणुकीत मुरलीधर मोहोळ यांना विक्रमी मतांनी विजयी करायचे आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांनी हृदयामध्ये महाविजयाचा संकल्प करुन, तोंडात साखर ठेवून, डोक्यावर बर्फ ठेवून आणि पायाला भिंगरी लावून घरोघरी जाऊन मतदारांशी संपर्क साधावा असे आवाहन केले.

मार्चअखेर २८ लाख दस्तांची नोंदणी पूर्ण, ५०,५०० कोटी रुपयांची विक्रमी वसुली

नोंदणी व मुद्रांक विभाग; महसूल संकलनाची विक्रमी 112 टक्के उद्दिष्टपूर्ती— नोंदणी महानिरीक्षक हिरालाल सोनवणे

पुणे, दि.४ : महसूल संकलनाच्या उद्दिष्ट़पुर्तीसाठी विविध उपाययोजना व आर्थिक वर्षाच्या सुरुवातीपासून नियोजनबद्ध प्रयत्ऩाद्वारे सन २०२३-२०२४ साठी ४५,००० कोटी रुपयांचे महसूल संकलनाचे उद्दिष्ट असताना उद्दिष्टाच्या ११२ टक्के महसूल संकलित केला असून रुपये ५०,५०० कोटी रुपयांची विक्रमी वसुली करण्यात आली. मार्चअखेर २८ लाख २६ हजार १४९ इतक्या दस्तांची नोंदणी पूर्ण केली असून सन २०२३-२४ मध्ये वार्षिक बाजारमूल्य़ दरतक्त्यात कोणतीही दरवाढ न करता महसूल वसुलीचे उद्दिष्ट विभागाने पूर्ण केले असल्याची माहिती राज्याचे नोंदणी महानिरिक्षक व मुद्रांक नियंत्रक हिरालाल सोनवणे यांनी दिली.

मुद्रांक विभागाकडे सन १९८० पासूनची मुद्रांक शुल्काच्या थकीत वसुलीच्या प्रलंबित प्रकरणी महाराष्ट्र मुद्रांक अधिनियमाच्या कलम ४६ मधील तरतुदीनुसार सक्तीच्या मार्गाने वसुली करण्यासाठी थकबाकीदारांना नोटीस देण्यात आली. बाजारमूल्य दरतक्यानुसार मुद्रांक शुल्काची वसुली तसेच अंतर्गत तपासणी, तात्काळ दस्त तपासणी महालेखापाल तपासणीमधील मुद्रांक शुल्काच्या वसुलीच्या प्रलंबित प्रकरणांमध्ये वसुलीसाठी विभागातील अधिकारी, कर्मचारी यांनी थकबाकीदारांच्या घरी सुट्टीच्या दिवशी भेटी देऊन वसुलीसाठी पाठपुरावा करुन ही वसुली करण्यात आली.
मुद्रांक शुल्काच्या थकबाकीची काही प्रकरणे उच्च न्यायालय सर्वोच्च न्यायालयात न्यायप्रविष्ठ आहेत, अशा प्रकरणी स्थगिती उठविणे, तसेच प्रकरणे निर्गत करण्यासाठी सहायक सरकारी वकील यांच्याकडे मुद्रांक जिल्हाधिकारी यांनी पाठपुरावा करुन प्रकरणे प्राधान्याने निर्गत करण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत. मुद्रांक जिल्हाधिकारी यांच्याकडे अभिनिर्णयासाठी दाखल झालेली प्रकरणे प्राधान्याने निर्गत करुन त्याद्वारे मुद्रांक शुल्काची रक्कम मोठ्या प्रमाणात वसूल करण्यात आली.
नोंदणी महानिरिक्षक तथा मुख्य नियंत्रक महसूल प्राधिकारी यांच्याकडे मुद्रांक अधिनियमाच्या तरतुदीनुसार दाखल असलेली अपिल व पुनरिक्षण प्रकरणे निर्गत करण्यासाठी विशेष मोहीमेद्वारे मुंबई शहर व उपनगर येथील प्रकरणांची संख्या जादा असल्याने लोकांच्या सोयीसाठी या प्रकरणांची सुनावणी मुंबई येथे घेण्यात येत आहे. सन २०२३-२४ या वर्षात ४६१ अपिल,रिव्हीजन प्रकरणे निर्गत करण्यात आली. त्याद्वारे थकीत मुद्रांक शुल्काची मोठ्या प्रमाणात वसुली झाली.
महाराष्ट्र मुद्रांक अधिनियमाच्या कलम १० ड (१) अन्वये शासनाच्या ३ जून २०१६ रोजीच्या अधिसुचनेनुसार राज्य शासनाचे सर्व विभाग, स्थानिक स्वराज्य संस्था, शासकीय निमशासकीय संस्था इत्यादी कार्यालयांना त्यांच्या यंत्रणामार्फत करण्यात येणाऱ्या कार्यकंत्राट, विकसन करार, टी डी आर हस्तांतरण, भाडेपट्टा इत्यादी दस्तावरील मुद्रांक शुल्क जीआरएएस (GRAS) प्रणालीवर भरून त्याबाबत दरमहा मासिक अहवाल मुद्रांक जिल्हाधिकारी यांचेकडे सादर करण्याबाबत ७ जुलै २०२३ रोजीच्या परिपत्रकाद्वारे निर्देश देण्यात आले आहेत. तसेच या कामी समूचित प्राधिकारी व नोडल अधिकारी नियुक्त करण्याबाबत सूचना देण्यात आल्या असून त्याबाबत मुद्रांक जिल्हाधिकारी यांचे स्तरावरून संबंधित विभागाकडे पाठपुरावा करण्यात येत आहे.

नागरिकांच्या सोयीच्यादृष्टिने दस्त़ नोंदणी करण्यासाठी मार्च २०२४ अखेर येणाऱ्या २३,२४ तसेच २९,३० व ३१ मार्च या सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी राज्यातील सर्व दुय्य़म निबंधक कार्यालय तसेच सह जिल्हा निबंधक व मुद्रांक जिल्हाधिकारी यांची कार्यालये, नोंदणी उपमहानिरिक्षक तसेच नोंदणी महानिरिक्षक व मुद्रांक नियंत्रक महाराष्ट्र राज्य़ पुणे यांची कार्यालये सुट्टयांच्या दिवशी सुरु ठेऊन दस्त नोंदणी करण्यात आली.
अभय योजनेची प्रभावी अंमलबजावणी
शासनाने सन १९८० ते २०२० या कालावधीत निष्पादित करण्यात आलेल्या नोंदणीकृत तसेच अनोंदणीकृत दस्तांसाठी मुद्रांक शुल्क व दंडामध्ये सवलत, माफी देण्यासाठी महाराष्ट्र मुद्रांक शुल्क अभय योजना २०२३ लागू करण्यात आली आहे. त्यानुसार अभय योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी नोंदणी महानिरीक्षक कार्यालयातील अधिकारी यांची प्रत्येक विभागासाठी समन्वय अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली. समन्वय अधिकारी यांनी मुद्रांक जिल्हाधिकारी तसेच दुय्यम निबंधक कार्यालयांना भेटी देवून अभय योजनेमध्ये वसुलीवरील प्रलंबित प्रकरणांचा आढावा घेतला. तसेच नोंदणी महानिरीक्षक कार्यालयाकडून अभय योजनेचा साप्ताहिक आढावा घेण्यासाठी सर्व अधिकारी यांच्या दर आठवड्याला, पंधरावड्याला ऑनलाईन पद्धतीने बैठका घेऊन प्रलंबित प्रकरणांचा आढावा घेण्यात आला.
अभय योजनेमध्ये डिसेंबर २०२३ ते ३१ मार्च २०२४ या कालावधीत ६० हजार २५७ अर्ज प्राप्त झाले असून त्यापैकी ४३ हजार ६५९ प्रकरणांची निर्गती करण्यात आली आहे. अभय योजनेमध्ये रुपये २७७.९०कोटी एवढी थकीत मुद्रांक शुल्क व दंडाची रक्कम वसूल करण्यात आली आहे. तसेच सन १९८० ते २००० या कालावधीतील दस्तांवरील थकीत मुद्रांक शुल्क रुपये १ लाखापर्यंत असलेल्या २५ हजार ३१ प्रकरणांमध्ये रुपये ७१.७१ कोटी एवढ्या मुद्रांक शुल्काची व रुपये २३२.६३ कोटी दंडाची माफी देण्यात आली आहे

  • नोंदणी महानिरीक्षक हिरालाल सोनवणे

“अबकी बार भाजपा हद्दपार केल्याशिवाय शेतकऱ्यांना सुखाचे दिवस येणार नाही” – डॉ. अमोल कोल्हे

थेऊर – खासदार डॉ. अमोल कोल्हे यांचा आज हवेली तालुक्यातील दौरा अष्टविनायक पैकी एक असलेल्या श्री क्षेत्र थेऊर येथील “बाप्पा चिंतामणीच्या” चरणाशी लीन होऊन सुरुवात झाला. यावेळी श्री क्षेत्र थेऊरच्या ग्रामस्थांनी जंगी स्वागत करत वाजत गाजत मिरवणूक काढली. दरम्यान डॉ. कोल्हे यांच्या हस्ते बाप्पा चिंतामणीची आरती करण्यात आली. थेऊर येथून सुरू झालेला गाव भेट दौरा सायंकाळी उशिरा उरुळी कांचन परिसरात समारोप करण्यात आला.

यावेळी खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधला यावेळी टिळेकरवाडी (ता. हवेली) येथे बोलताना डॉ. कोल्हे यांनी भारतीय जनता पक्षाच्या केंद्र सरकारवर निशाणा साधला ते म्हणाले की, अब की बार भाजपा हद्दपार केल्याशिवाय शेतकऱ्यांना सुखाचे दिवस येणार नाही. या शेतकरी विरोधी सरकारला सत्तेवरून खाली खेचण्याची जबाबदारी आता आपल्या मायबाप जनतेत आहे. भाजपच्या चुकीच्या धोरणांमुळे देशातील शेतकरी मेटाकुटीला आला आहे. शेतकऱ्यांना जर चांगले दिवस हवे असतील तर या भाजप सरकारला हद्दपार करणे गरजेचे आहे. भाजपच्या मांडीला मांडी लावून बसलेल्या इतर पक्षांना मतदान करण्यापूर्वी या देशातील शेतकरी नक्कीच विचार करेल.

दरम्यान शिरुर लोकसभा मतदारसंघातील या शेतकऱ्याच्या पोराला घेरण्यासाठी राज्यातील मोठे मोठे नेते मतदारसंघात येतात परंतु माझा मायबाप जनतेवर विश्वास असल्याच्या भावना यावेळी बोलताना खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी व्यक्त केल्या. दरम्यान माध्यमांशी संवाद साधताना ते म्हणाले की, विरोधकांकडे इतर मुद्दे नसल्याने खोटं बोल पण रेटून बोल अशा पद्धतीचा प्रकार सुरू आहे. स्वतः ज्यांना तीन टर्म या जनतेने आशिर्वाद दिले, निधी खर्च हा ज्या मंजुऱ्या आणि प्र.मा. असतात त्या मोजल्या जात नाही. कोरोना काळात खासदार निधी मिळत नव्हता, त्यावेळेच्या बातम्या काढून शिळ्या कढीला ऊत आणण्याचा हा प्रकार आहे. संपूर्ण खासदार निधी खर्च करून वर तीन कोटींचा प्रस्ताव आहे. मी विरोधी खासदार असूनही खासदार निधी केवळ पाच कोटी असताना तरीही साडे एकोणीस हजार कोटी रुपये निधी मतदारसंघात आणू शकल्यामुळे हे सांगताना विरोधकांची अडचण होते म्हणून खोटं बोल पण रेटून बोल असा प्रकार सुरू आहे.
खासदार डॉ. कोल्हे गावात किती वेळा आले याची यादीच दिली सरपंचांनी.
पेठगाव (ता. हवेली) येथील माजीआदर्श सरपंच महादेव चौधरी यांनी खासदार डॉ. कोल्हे गेल्या पाच वर्षांत गावात कितीवेळा आले याची यादीच विरोधकांच्या माहितीसाठी जाहीर केली. ही यादी खासदार डॉ. अमोल कोल्हे यांच्याकडे सुपूर्द करत गावकऱ्यांना याची माहिती दिली. यावेळी डॉ. कोल्हे यांनी ही यादी हातात घेऊन आपण कितीवेळा या पेठगाव याठिकाणी आलो याची संपूर्ण माहिती सांगितली, याशिवाय गावामध्ये काय काय विकासकामे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांच्या माध्यमातून झाली किंवा मंजूर आहे याची देखील यादी या सरपंचांनी दिली.यावेळी आमदार अशोक पवार, संदीप गोते, जगदीश महाडिक, पांडुरंग काळे, सोनबा चौधरी, बाजीराव भालसिंग, भारती शेवाळे, सुरेखा बोर्डे, सुभाष टिळेकर, प्रदीप वसंत कंद, गणेश पुजारी, संदेश आव्हाळे, सोमनाथ गायकवाड आदी पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.

इंडियन सुपरक्रॉस रेसिंग लीगचे देशव्यापी होण्याची उद्दिष्ट, 15 स्टेडियमची केली जातेय चाचपणी

पुणे, 4 एप्रिल, 2024 : इंडियन सुपरक्रॉस रेसिंग लीग (ISRL) आता दुसऱ्या सीझनची तयारी करत असून देशभरात तिचा विस्तार करण्याच्या महत्त्वाकांक्षी योजना आहे. भविष्यातील संभाव्य शर्यतींसाठी 15 स्टेडियमचे मूल्यमापन करून, ISRL चे उद्दिष्ट त्याच्या उद्घाटन हंगामाच्या यशावर उभारण्याचे आहे. सीझन 1 मध्ये उल्लेखनीय कामगिरी दिसून आली. प्रत्येक स्टेडियम 90% पेक्षा जास्त क्षमतेने कार्यरत आहे आणि जवळपास 30,000 एकूण उपस्थितांना आकर्षित करत आहे, ज्यामुळे भारतातील मोटरस्पोर्ट्समध्ये एक नवीन बेंचमार्क स्थापित झाला आहे. याव्यतिरिक्त, लीगने विविध प्लॅटफॉर्मवर लाखो दर्शकांपर्यंत पोहोचून प्रभावी ऑनलाइन आणि प्रिंटेड छाप मिळवल्या. चाहते आणि सहभागींच्या जबरदस्त पाठिंब्याने, सीझन 2 अधिक भव्यदिव्य, वेगवान होण्याचे वचन देतो.

ISRL च्या पहिल्या सीझनमध्ये वेग आणि कौशल्यचा अनोखा संगम बघायला मिळाला. यामध्ये 5 स्पर्धात्मक शर्यती श्रेणींमध्ये 48 शीर्ष भारतीय आणि आंतरराष्ट्रीय रायडर्स आहेत. 6 सहभागी फ्रँचायझी संघांसह, 3 नेत्रदीपक ठिकाणी चाहत्यांनी जल्लोष केला. लीगचा पहिला सीझन जबरदस्त यशस्वी ठरला, स्टेडियममध्ये लोकांचा उत्साह पाहायला मिळाला. 

इंडियन सुपरक्रॉस रेसिंग लीग (ISRL) झपाट्याने लोकप्रिय होत असल्याने आणि मोठ्या प्रमाणात चाहत्यांना आकर्षित करत असल्याने, नवीन स्टेडियमची गरज अत्यावश्यक बनली आहे. संपूर्ण भारतातील 15 स्टेडियमचे चाचपणी करून, ISRL चे उद्दिष्ट अधिक क्षेत्रांपर्यंत पोहोचवण्याचे आहे, ज्यामुळे चाहत्यांना थेट सुपरक्रॉसचा थरार अनुभवण्यासाठी अधिक अॅक्सेस मिळेल. जगभरातील ॲथलीट्स आणि लीगशी जोडले जाण्यास उत्सुक असलेल्या जागतिक ब्रँड्सच्या चौकशीचा ओघ हा जागतिक स्तरावर ISRLच्या वाढती उंची दर्शवितो.

इंडियन सुपरक्रॉस रेसिंग लीगचे सहसंस्थापक आणि संचालक श्री वीर पटेल यांनी भविष्यासाठी आपला उत्साह व्यक्त करत सांगितले की“ISRL च्या उद्घाटन हंगामाचे यश खरोखरच अभूतपूर्व आहे. त्यामुळे जागतिक मोटरस्पोर्ट्स लँडस्केपमध्ये आमचे स्थान मजबूत झाले आहे आणि आमच्या वाढत्या व्यासपीठाशी जुळवून घेण्यास उत्सुक असलेल्या ब्रँड्सकडून लक्षणीय रस निर्माण झाला आहे. सुपरक्रॉस, सध्या भारतात सुमारे 20 दशलक्ष चाहत्यांशी जोडला गेला आहे आणि वेगवान वाढीसाठी सज्ज आहे. पुढील तीन वर्षांमध्ये, आमचे उद्दिष्ट 150 दशलक्ष प्रेक्षकांना आकर्षित करणे, सुपरक्रॉसला भारतात नवीन उंचीवर नेणे आणि खेळात वेगाने वाढ करणे हे आहे. आम्ही इंडियन सुपरक्रॉस रेसिंग लीगच्या सीझन 2 साठी तयारी करत असताना, चाहत्यांच्या आणि सहभागींच्या जबरदस्त पाठिंब्याने आम्ही रोमांचित झालो आहोत, जे आम्हाला एका भव्यदिव्य आणि वेगवान अनुभवाकडे घेऊन जात आहे.”

आगामी सीझन आंतरराष्ट्रीय प्रतिभेसाठी एक आकर्षणबिंदू आणि जागतिक ब्रँड्ससाठी त्यांची उत्पादने आणि सेवा विविध प्रेक्षकांसमोर प्रदर्शित करण्यासाठी एक व्यासपीठ आहे. उद्घाटनाच्या मोसमाने भारतातील मोटरस्पोर्ट प्रेक्षकसंख्येसाठी नवीन मानके प्रस्थापित करून मजबूत पाया घातला आहे. ऑटोमोबाईल सहाय्यक कंपन्यांना त्यांची उत्पादने व्यापक प्रेक्षकांसमोर प्रदर्शित करण्यासाठी, तीन दशकांचे अंतर भरून काढण्यासाठी आणि गतिशील ऑटोमोटिव्ह इकोसिस्टमला चालना देण्यासाठी एक महत्त्वपूर्ण व्यासपीठ मिळाले आहे. दुस-या सीझनचे उद्दिष्ट त्याच्या शुभारंभाचे यश, नवीन क्षितिजे शोधून काढणे आणि सुपरक्रॉसचा संपूर्ण थरार भारत आणि जगभरातील अधिक चाहत्यांपर्यंत पोहोचवणे आहे.

काँग्रेसमध्ये वेगवेगळी सत्ताकेंद्रे, वैचारिक संघर्ष, कार्यकर्त्यांमध्ये घोर निराशा- संजय निरुपम

मुंबई-काँग्रेसमधून हकालपट्टी करण्यात आलेल्या माजी खासदार संजय निरुपम यांनी 4 एप्रिल रोजी काँग्रेसवर गंभीर आरोप केले. काँग्रेसमध्ये सोनिया, राहुल, प्रियंका, नवे अध्यक्ष खरगे आणि वेणुगोपाल ही 5 वेगवेगळी सत्ताकेंद्रे आहेत. काँग्रेसमध्ये वैचारिक संघर्ष सुरू असून, त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये घोर निराशा पसरली आहे, असे ते म्हणालेत.निरुपम म्हणाले की, राहुल गांधींच्या आसपास असणाऱ्या डाव्यांचा श्रद्धेवर विश्वास नाही. एकट्या काँग्रेसने राम लल्लाच्या अभिषेकाच्या निमंत्रणाला उत्तर म्हणून पत्र लिहून हा भाजपचा प्रचार असल्याचे म्हटले आहे. त्यांनी रामाचे अस्तित्व नाकारले.तत्पूर्वी, संजय निरुपम यांनी गुरुवारी सकाळी सोशल मीडियावर एका पोस्टद्वारे, आपण पक्षाचा राजीनामा दिल्यानंतर काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी आपली हकालपट्टी केल्याचा दावा केला. खरगे यांनी बुधवारी रात्री शिस्तभंग व पक्षविरोधी विधान केल्याप्रकरणी निरुपम यांची पक्षातून 6 वर्षांसाठी हकालपट्टी करण्यास मंजुरी दिली होती.निरुपम यांनी आपल्या पोस्टमध्ये मल्लिकार्जुन खरगे यांना पाठवलेल्या राजीनाम्याचे छायाचित्र शेअर केले. त्यात ते म्हणाले की, असे दिसते की काल रात्री माझा राजीनामा प्राप्त होताच पक्षाने माझी हकालपट्टी जाहीर करण्याचा निर्णय घेतला. एवढी तत्परता पाहून छान वाटले.काय म्हणाले संजय निरुपम?काँग्रेसमध्ये पाच वेगवेगळी सत्ताकेंद्रे आहेत. आणि या पाचही जणांची स्वतःची लॉबी आहे. ते कायम एकमेकांशी वाद घालत राहतात. या पाच केंद्रांमध्ये सोनिया गांधी पहिल्या, राहुल गांधी दुसऱ्या, प्रियंका गांधी तिसऱ्या, अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे चौथ्या आणि काँग्रेसचे सरचिटणीस केसी वेणुगोपाल पाचव्या स्थानावर आहेत. हे सर्वजण आपापल्या परीने राजकारण करत आहेत.काँग्रेसमध्ये वैचारिक संघर्ष सुरू आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये निराशा पसरली आहे. काँग्रेस पक्ष हा पूर्णपणे दुभंगलेला असून त्याची विचारधारा दिशाहीन झाली आहे. येणाऱ्या काळात अनेक गोष्टी नष्ट होतील, असे निरुपम म्हणाले.काँग्रेस म्हणते की हा धर्मनिरपेक्ष पक्ष आहे. यात काही गैर नाही. गांधीजींच्या धर्मनिरपेक्षतेमध्ये कोणत्याही धर्माला विरोध नव्हता. नेहरूजींच्या धर्मनिरपेक्षतेत ही बरोबर व ही चूक अशी गोष्ट होती. पण, आज नेहरूंची धर्मनिरपेक्षतेची विचारधारा संपली आहे. पण काँग्रेस हे मान्य करण्यास तयार नाही. सध्या हा पक्ष डावी विचारधारा घेऊन वेगाने वाटचाल करत आहेत. त्यांनी स्वतःच स्वतःला संपवले आहे.राहुल गांधींच्या आसपास डाव्या विचारांचे लोक आहेत. हे लोक अयोध्येत रामाच्या उपस्थितीला विरोध करतील. त्यांचा श्रद्धेवर विश्वास नाही. रामलला विराजमान यांच्या कार्यक्रमाला अनेकांना आमंत्रित करण्यात आले होते. त्यानंतर सर्वांनी आदराने पत्र मिळाल्याचे व वेळ मिळेल तेव्हा येण्याचे प्रत्युत्तर दिले. या उत्सवावर कोणीही प्रश्न विचारला नाही. पण काँग्रेसने एकट्याने हा भाजपचा अपप्रचार असल्याचा आरोप केला. एकप्रकारे त्यांनी रामाचे अस्तित्व नाकारले, असे निरुपम म्हणाले.


मुंबई उत्तर-पश्चिम मतदारसंघातून तिकीट न मिळाल्याने मुंबई काँग्रेसचे माजी अध्यक्ष संजय निरुपम काँग्रेसवर नाराज आहेत. महाराष्ट्रात काँग्रेस, शिवसेना उद्धव ठाकरे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार यांची महाविकास आघाडी आगहे. 27 मार्च रोजी शिवसेनेच्या उद्धव गटाने 17 उमेदवारांची घोषणा केली होती. त्यात निरुपम यांच्या पसंतीच्या जागेवरून अमोल कीर्तिकर यांच्या नावाची घोषणा करण्यात आली. विशेष म्हणजे खुद्द राहुल गांधी यांनी निरुपम यांना येथून तिकीट मिळवून देण्याचे आश्वासन दिले होते.बुधवारी, संजय निरुपम यांनी सोशल मीडिया पोस्टमध्ये लिहिले – पक्षाने आपली उरलेली ऊर्जा आणि स्टेशनरी पार्टी वाचवण्यासाठी वापरली पाहिजे. कारण, पक्ष सध्या गंभीर आर्थिक संकटातून जात आहे. मी दिलेला एक आठवड्याचा कालावधी आज (बुधवारी) पूर्ण झाला आहे. उद्या (गुरुवारी) मी स्वतः निर्णय घेईन.यानंतर संजय निरुपम यांची राज्यातील स्टार प्रचारकांच्या यादीतून हकालपट्टी करण्यात आली. महाराष्ट्र काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले म्हणाले की, संजय निरुपम यांचे नाव पक्षाच्या स्टार प्रचारकांच्या यादीत आहे. पण आता ते वगळण्यात आले आहे. त्यांची विधाने ज्या प्रकारे येत आहेत, ती पूर्णतः पक्षविरोधी आहेत.

भाजप आमदार राणा जगजितसिंह पाटील यांच्या पत्नी अर्चना पाटील यांचा राष्ट्रवादीत प्रवेश; धाराशिवची उमेदवारीही जाहीर

धाराशिव जिल्ह्यातील तुळजापूर विधानसभा मतदार संघाचे भाजप आमदार राणा जगजितसिंह पाटील यांच्या पत्नी अर्चना पाटील यांनी आज अजित पवार यांच्या राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षात प्रवेश केला आहे. पक्षप्रवेश होताच प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी अर्चना पाटील यांना धाराशिव लोकसभेची उमेदवारी देखील जाहीर केली. या पक्षप्रवेश सोहळ्याप्रसंगी राष्ट्रवादीच्या नेत्या रुपाली चाकणकर, आमदार ज्ञानराज चौघुले, आमदार विक्रम काळे यांची उपस्थिती होती.

परभणी सोडल्याने धाराशिवची जागा मिळाली

परभणीची जागा राष्ट्रीय समाज पक्षाला सोडल्यानंतर अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला धाराशिव लोकसभेची जागा शिवसेना-भाजपकडून देण्यात आली होती. दरम्यान, भाजप आमदार राणा जगजितसिंह पाटील यांच्या पत्नी अर्चना पाटील ‘घड्याळ’ चिन्हावरुन मैदानात उतरणार असल्याचे आज अगदी स्पष्ट झाले. अर्चना पाटलांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अधिकृत पक्षप्रवेश झाला असून सुनील तटकरेंनी त्यांची उमेदवारी देखील जाहीर केली आहे.

ओमराजे VS अर्चना पाटील अशी थेट लढत

दरम्यान, धाराशिवमधून शिवसेना उद्धव ठाकरे यांच्याकडून विद्यमान खासदार ओमराजे निंबाळकर यांना पुन्हा उमेदवारी जाहीर करण्यात आलेली आहे. त्यामुळे ओमराजे निंबाळकर विरुद्ध अर्चना पाटील अशी थेट लढत होणार आहे.

कोण आहेत अर्चना पाटील?

अर्चना पाटील यापूर्वी धाराशिव जिल्हा परिषदेच्या उपसभापती होत्या, मात्र सध्या त्या कोणतेही पद सांभाळत नाहीत. लोकसभेच्या माध्यमातून त्या पुन्हा निवडणुकीच्या आखाड्यात उतरल्या आहेत.दरम्यान, अर्चना पाटील या सामाजिक कामात देखील अग्रेसर असतात. लेडीज क्लबच्या माध्यमातून बचत गटातील महिलांना व्यासपीठ उपलब्ध करून दिले. पुण्यातील भीमथडी किंवा मुंबईतील महालक्ष्मी सारख्या मोठ्या महोत्सवांसारखाच प्लॅटफॉर्म धाराशिव जिल्ह्यातील महिलांना मिळावा म्हणुन हिरकणी महोत्सवासारखी संकल्पना जिल्ह्यात आणली.

गेल्या अनेक वर्षांपासून जिल्ह्यातील बचत गटातील महिला उद्योजक या महोत्सवात दरवर्षी सहभागी होतात आणि लाखोंची उलाढाल करतात. तसेच तेरणा ट्रस्टच्या माध्यमातून हजारो नागरिकांचे मोफत रोगनिदान, शेकडो नागरिकांच्या मोफत शस्त्रक्रिया, आरोग्य शिबिरांमध्ये मोफत साहित्य वाटप यासारखे उपक्रम त्या राबवत असतात.

राणा जगजितसिंह यांनी 2019 ची लोकसभा निवडणूक राष्ट्रवादीच्या तिकिटावर लढवली होती. शिवसेनेच्या (आता ठाकरे गट) ओमराजे निंबाळकर यांच्याविरोधात राणा मैदानात उतरले होते. मात्र ओमराजेंनी त्यांना पराभवाची धूळ चारली होती.

राष्ट्रवादी ते भाजपात प्रवेश
2019 च्या विधानसभा निवडणुकांपूर्वी राणा जगजितसिंह यांनी अमित शहा यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला होता. त्यानंतर ते तुळजापूर विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवून विजयी झाले. याआधी 2004 ते 2008 आणि 2008 ते 2014 या काळात दोन वेळा महाराष्ट्र विधान परिषदेचे सदस्य राहिले आहेत.

पाटील VS निंबाळकर यांच्यात कौटुंबिक वैर
उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेने ओमराजे निंबाळकर यांना पुन्हा तिकीट दिले आहे. आता राणांची पत्नी त्याच मतदारसंघातून ओमराजेंविरोधातच मैदानात उतरली, तर पतीच्या पराभवाचा वचपा काढण्याची संधी त्यांना असेल. राणा जगजितसिंह आणि निंबाळकर यांच्यात कौटुंबिक वैर आहे, निंबाळकरांच्या वडिलांचा राणा जगजितसिंह यांच्या वडिलांनी खून केल्याचा आरोप आहे.

खाद्य संस्कृती जोपासणारे बंट्स बांधव ‘पक्के पुणेकर’ : मुरलीधर मोहोळ

४०० पारसाठी विविध संघटनांचा मोहोळ यांना सक्रिय पाठिंबा

पुणे – पुणे ही सांस्कृतिक राजधानी आहे. हॉटेल व्यवसायाच्या निमित्ताने भारताच्या दक्षिण भागातून बंट्स समाजाबांधव म्हणजे ज्यांना ‘पुणेकर आण्णा’ म्हणून ओळखतो ते पुण्यामुंबईत आले. त्यांनी त्यांचे लक्ष्य फक्त व्यावसायिक म्हणून ठेवले नाही, तर ते पुण्याच्या खाद्य संस्कृतीबरोबरच शहराच्या ऐतिहासिक संस्कृतीशी एकरूप झाल्याने पक्के पुणेकर म्हणून आता त्यांची ओळख झाली आहे. राहिला प्रश्न त्यांच्या समस्या, अडचणीचा तर त्या सोडवण्यासाठीच लोकआम्हाला त्यांचे प्रतिनिधी म्हणून निवडून देतात. लोकप्रतिनीधी म्हणून मी माझ्याकडून शंभर टक्के देत त्यांच्या समस्या सोडवण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला, अशा भावना भाजप-महायुतीचे पुण्यातील उमेदवार मुरलीधर मोहोळ यांनी व्यक्त केल्या.

बंट्स संघ पुणेने आयोजित केलेल्या समाजाच्या मेळाव्यात ते बोलत होते. लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने बंट्स समाजाची भूमिका निश्चित करण्यासाठी बंट्स संघ समाज बांधवांचा मेळावा नुकताच आयोजित केला होता. या मेळाव्याला राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील व पुणे लोकसभा मतदार संघातील महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ खास निमंत्रित होते.

यामेळाव्याला बंट्स संघ पुणेचे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते. पुण्यात बंट्स समाजाची साडेतीन ते चारहजार व्यावसायिक कुटुंब असून ती व्यवसायाच्या निमित्ताने किमान पंधरा हजार कुटुंबांशी थेट जोडले गेलेले आहेत.

पुणे शहरात हॉटेल व्यवसायाचे व्यवस्थापन करण्याचे बहुतांश काम बंट्स समाजातील व्यावसायिक करत आहेत. चारशेपेक्षा जास्त खासदारांसह देशात पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वाखाली तिस-यांदा सरकार आणण्यासाठीच आमच्याकडून प्रयत्न म्हणून आम्ही मुरलीधरजी मोहोळ यांना पाठिंबा देत आहोत असे अध्यक्ष संतोष शेट्टी यांनी सांगितले.

आमच्या व्यवसायाचा प्रामुख्याने महापालिका आणि राज्य शासनाशी संबंध येतो. राज्याचे मंत्री म्हणून चंद्रकांतदादा पाटील आणि महापालिकेत नगरसेवक आंणि नंतर महापौर म्हणून काम करताना मुरलीधर मोहोळ यांनी खूपच चांगला, सक्रिय, सकारात्मक सहयोग आम्हा व्यावसायिकांना दिलेला आहे. लोकसभा निवडणुकीसाठी त्यांना पुण्यातून उमेदवारी मिळाली असून यापुढेही त्यांचे आम्हाल पूर्ण सहकार्य मिळेल, असा विश्वास बंट्स संघाच्या पदाधिका-यांनी व्यक्त करत या निव़डणुकीत मोहोळ यांना बंट्स संघातर्फे जाहीर पाठिंबा व्यक्त केला आहे.

पतित पावन संघटनाही मोहोळ यांच्या पाठिशी !

पतितपावन संघटनेनेही मुरलीधर मोहोळ यांच्या प्रचारात सक्रिय सहभागी होण्याचा निर्णय घेतला आहे. पतित पावन संघटनेने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत पाठिंबा जाहीर केला आहे. यावेळी शिवाजीराव चव्हाण, जनाभाऊ पेडणेकर, धनंजय क्षीरसागर, विक्रम मराठे, राजाभाऊ शिंदे, स्वप्निल नाईक, गुरु भाऊ कोळी, संतोष शेंडगे, अशोक परदेशी, प्रवीण झोर, रमेश चलवादी यांच्यासह पदाधिकारी आणि संघटनेचे कार्यकर्ते उपस्थित होते.

लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी अद्याप सुरू झालेली नसली तरी मतदारांच्यात मात्र निवडणुकीबाबत प्रचंड उत्सुकता तयार होत आहे. त्यामुळेच उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वीच वेगवेगळ्या समाज घटकांकडून आपल्या पसंतीच्या उमेदवारांची निवड करून त्यांना समाजाच्चावतीने पाठिंबा जाहीर करायला सुरूवात झाली आहे. तसेच विविध समाज घटकांचे आणि विविधक्षेत्रात कार्यरत असणा-यांचे मेळावे सध्या शहरात सुरू असून मोहोळ यांना त्यात पाठिंबा देण्यात येत आहे.

जोगेश्वरीतील ट्रॉमा हॉस्पिटल जंक्शनवर एअर प्युरिफायर मशीन

भाजपा नगरसेवक पंकज यादव यांच्या मागणीला यश

मुंबई दिनांक ४ एप्रिल २०२४
मागील काही दिवसांपासून मुंबईतील वाढत्या प्रदूषणामुळे मुंबईकरांचे आरोग्य धोक्यात आले आहे. वातावरणातील प्रदूषणाच्या स्तरामुळे श्वसन विकारही वाढत आहेत. या पार्श्वभूमीवर जोगेश्वरीतील ट्रॉमा हॉस्पिटल जंक्शनवर प्रदूषण नियंत्रण मशीन बसविण्याची मागणी भाजपा माजी नगरसेवक पंकज यादव यांनी केली होती. या पार्श्वभूमीवर तातडीने प्रशासनाने एअर प्युरिफायर मशीन बसवून जोगेश्वरीतील नागरिकांना मोठा दिलासा दिला आहे. यासाठी प्रयत्नशील असलेल्या उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,मुंबई उपनगर पालकमंत्री ॲड. मंगलप्रभात लोढा यांचे स्थानिक नागरिकांनी आभार मानले आहेत.

वातावरणातील बदलांमुळे मुंबई महानगरासह मुंबई प्रदेशातील हवेच्या गुणवत्तेवर विपरित परिणाम होत आहे. याचा परिणाम म्हणून हवेतील प्रदूषणात वाढ होत असल्याचे निदर्शनास आले आहे. याबाबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच मुंबई उपनगरचे पालकमंत्री ॲड. मंगलप्रभात लोढा यांना ऑगस्ट महिन्यामध्ये पत्र लिहून माजी नगरसेवक पंकज यादव यांनी वस्तुस्थिती निदर्शनास आणून दिली होती. अखेरीस हे काम पूर्ण झाल्याने जोगेश्वरीतील नागरिकांनी आनंद व्यक्त केला आहे.

‘मैं तेरा हिरो’ ची 10 वर्षे ! चित्रपटाच्या प्रवासाबद्दल नर्गिस फाखरी ने केली खास आठवण शेयर 

 नर्गिस फाखरी हिच्या ‘ मैं तेरा हिरो’ या चित्रपटाला 10 वर्षे पूर्ण होत असून तिने या चित्रपटा बद्दल खास आठवणी जाग्या केल्या आहेत. ‘मद्रास कॅफे’ आणि ‘रॉकस्टार’ या ब्लॉकबस्टर चित्रपटानंतर नर्गिस हिचा हा तिसरा थिएटर रिलीज चित्रपट होता. ‘ मद्रास कॅफे’ आणि ‘रॉकस्टार’मध्ये तिने सगळ्यांची मन जिंकली. या कॉमिक कॅपरमध्ये ती एक आश्चर्यकारक पॅकेज म्हणून ओळखली गेली. 

प्रत्येक फ्रेममध्ये तिने लक्ष वेधून घेतल आणि चित्रपटात आयशा सिंघल म्हणून कामगिरी केली ज्यात वरुण धवन आणि इलियाना डिक्रूझ देखील होते. 78 कोटींच्या प्रभावी कलेक्शनसह हा चित्रपट नर्गिसचा सलग तिसरा बॉक्स ऑफिस हिट ठरला. चित्रपटाच्या यशाबद्दल बोलताना नर्गिस म्हणाली, “वेळ खूप वेगाने निघून जातो हे आज समजल. जेव्हा आम्ही चित्रपटाचे शूटिंग केल तेव्हा तो काल शूट केला असं वाटून जातं.

 दिग्दर्शक डेव्हिड धवन आणि माझे सहकलाकार वरुण धवन आणि इलियाना डिक्रूझ यांच्यासोबत काम करताना मला खूप आनंद झाला. ‘मैं तेरा हीरो’ सारखा चित्रपट येऊन तुम्हाला हसवत राहिला यापेक्षा वेगळं सुख काय असणार. ‘मद्रास कॅफे’ आणि ‘रॉकस्टार’ मध्ये गंभीर आणि तीव्र भूमिका साकारल्यानंतर आयशा सिंघलच्या रूपात मजेदार आणि हलकीफुलकी भूमिका साकारण्याची संधी मिळाल्याचा मला आनंद आहे. आयशा सिंघलने मला अजुन एक नवी ओळख दिली ” वर्क फ्रंटवर नर्गिस फाखरी शेवटची ‘ततलुबाज’मध्ये दिसली होती.

आनंदा डेअरी लिमिटेड ची उत्पादने पुण्यात ३ हजाराहून अधिक स्टोअर्समध्ये उपलब्ध

शुद्ध आणि आरोग्यदायी उत्पादनांना पुणेकरांची दाद ; सुमारे ८०० ते १०००  तरुणांना प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष रोजगाराच्या संधी
पुणे : आनंदा डेअरी लिमिटेड ही भारतातील डेअरी क्षेत्रातील सुप्रसिद्ध दूध आणि दुग्धजन्य पदार्थ उत्पादन आणि विक्री करणारी कंपनी आहे. नुकतेच आनंदा डेअरीचे उच्च दर्जाचे दुग्धजन्य पदार्थ जसे पनीर, फ्लेवर्ड दूध, रबडी आणि मिठाई महाराष्ट्रातील पुणे शहराच्या पवित्र भूमीवर लॉन्च करण्यात आले. ही उत्पादने पुणे शहरातील सुमारे ३ हजार किराणा दुकान व खाद्य पदार्थ विक्री दुकान (जनरल स्टोअर्स) मध्ये विकली जात आहेत, अशी माहिती आनंदा डेअरीचे चेअरमन व व्यवस्थापकीय संचालक डॉ.राधेश्याम दीक्षित यांनी पत्रकार परिषदेत दिली.

पत्रकार परिषदेला आनंदा डेअरीच्या संचालक सुनीता दीक्षित, संचालक सूरज दीक्षित आदी उपस्थित होते.

सुनीता दीक्षित म्हणाल्या, अगदी कमी कालावधीत आनंदा डेअरीच्या शुद्ध आणि आरोग्यदायी उत्पादनांना पुण्यातील ग्राहकांनी भरभरून दाद दिली. आनंदा डेअरीची उत्पादने अतिशय उत्कृष्ट दर्जाची आहेत. आनंदा डेअरीने शुद्ध आणि चविष्ट दुग्धजन्य पदार्थ उपलब्ध करून देण्याबरोबरच शेकडो तरुणांना प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षपणे रोजगार देण्याचे काम केले आहे.

सूरज दीक्षित म्हणाले, आनंदा डेअरीने आपले सर्व उच्च दर्जाचे दुग्धजन्य पदार्थ बाजारात उपलब्ध करून दिले आहे. आगामी काळात २ लाख लिटर दूध व दुग्धजन्य पदार्थांची विक्री करण्याचे उद्दिष्ट आम्ही ठेवले असून, हे उद्दिष्ट गाठण्यासाठी सुमारे ८०० ते १००० तरुणांना प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहेत. आनंदा डेअरी लिमिटेडची उत्पादने भारताबाहेर तब्बल २० देशात  निर्यात केली जात असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

झरीन खान हिच्या हस्ते तिसऱ्या राष्ट्रीय ट्रान्सजेंडर पुरस्कारांचे उद्घाटन झाल 

 अभिनेत्री झरीन खानने 2 एप्रिल रोजी नवी दिल्ली येथे 3रा राष्ट्रीय ट्रान्सजेंडर अवॉर्ड 2024 ला प्रमुख पाहुनी म्हणून उपस्थित राहिली. सामाजिक कारणांना सक्रियपणे पाठिंबा देणाऱ्या आणि लैंगिक समानतेचा पुरस्कार करणाऱ्या या अभिनेत्रीने तिच्या उपस्थितीने सर्वसमावेशकता आणि सक्षमीकरणाचे महत्त्व अधोरेखित केले. या कार्यक्रमाचा भाग असणे हा तिच्यासाठी सन्मानाचा क्षण आहे असं ती म्हणाली.

 “तृतीय राष्ट्रीय ट्रान्सजेंडर अवॉर्ड 2024 चा एक भाग बनणे मला खरोखरच अभिमानास्पद वाटले. या कार्यक्रमाचा भाग होण्यासाठी मला आमंत्रित केल्याबद्दल मी *आचार्य महामंडलेश्वर स्वामी डॉ लक्ष्मी नारायण त्रिपाठीजी यांचे आभार मानतो. ट्रान्सजेंडर समुदायामध्ये आणि ते करत असलेले काम कौतुकास्पद आहे. समाजातील लोकांच्या धैर्याने आणि नम्रतेने मला प्रेरणा मिळाली. त्यांना अधिक शक्ती!” 3रा राष्ट्रीय ट्रान्सजेंडर पुरस्कार 2024, ज्याला ‘अधिनारीश्वर’ म्हणून ओळखले जाते, हा भारत सरकारने देशातील LGBTQAI+ समुदायाचा सन्मान करण्यासाठी आयोजित केलेला एक महत्त्वपूर्ण कार्यक्रम आहे.

 लक्ष्मी नारायण त्रिपाठी (गौरव ट्रस्ट) यांनी आयोजित केलेल्या या कार्यक्रमात विविध पार्श्वभूमीतील उल्लेखनीय व्यक्तींना त्यांच्या समाजासाठी आणि समाजासाठी दिलेल्या योगदानाबद्दल मान्यता देण्यात आली. या कार्यक्रमात सलमा खानला जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले, तर सीता (दिल्ली), रचना (तेलंगणा), गौरी सावंत (महाराष्ट्र), सामनाचा (मणिपूर), नक्षत्र (राजस्थान), आर जीवा (तामिळनाडू), आरती यादव यांना सन्मानित करण्यात आले. (आंध्र प्रदेश), अंकुरा (गुजरात) राहुल मित्रा (मध्य प्रदेश) आणि डॉ. अक्सा शेख (उत्तर प्रदेश) यांनी अनुक्रमे पाथ ब्रेकर अवॉर्ड, ट्रान्स ॲलीशिप अवॉर्ड आणि ऑर्गनायझेशनल अवॉर्ड जिंकले. डॉ बेला शर्मा आणि पद्मा अय्यर यांना विद्या पुरस्कार मिळाला.

रमजान स्पेशल…चोखंदळ पुणेकर खवय्यांना ‘शालिमार’ची मेहमाननवाजी

पुणे : मुस्लिम बांधवांसाठी पवित्र रमजान महिना सध्या सुरू असून, मुस्लिम बांधवांसह सर्वधर्मीय खवय्ये आतुरतेने या महिन्याची वाट पाहतात. चोखंदळ पुणेकर खवय्यांच्या ‘मेहमाननवाजी’साठी कोंढव्याच्या कौसर बागेतील शालिमार केटरर्स अविरत सेवा देत आहे. त्यामुळे रमजान महिन्यात दरवर्षी अस्सल खवय्यांची पावले स्वादिष्ट पदार्थांची चव चाखण्यासाठी ‘शालिमार’कडे वळतात. बिगरमुस्लिम समाजातील सर्वच वयोगटातील ग्राहक ‘शालिमार’चा मान आहे.


‘शालिमार’चे प्रमुख नुसरतभाई यांच्या विशेष मेहमाननवाजीमुळे ग्राहक स्टॉल शोधत येतात व मोठ्या चवीने येथील पदार्थ चाखतात. प्रत्येक ग्राहकांची आपुलकीने चौकशी करणे, ‘आधी चव बघा आणि मग खा’ या नुसरतभाईंच्या आपुलकीच्या आग्रहामुळे ग्राहकांना ते आपलेसे करतात. नुसरतभाई यांची मुलगी अर्शिन हॉटेल व्यवस्थापन शाखेत पदव्युत्तर पदवी घेऊन वडिलांच्या हॉटेल व्यवसायात इनोवेशन करीत नव्या पिढीला आवडणारे खाद्य पदार्थ समाविष्ट करत आहे. तर मुलगा रियाझही या कामात आहे.
अर्शीन शेख म्हणाल्या, “अब्बूजान (नुसरतभाई) यांचा प्रत्येक ग्राहकाशी जोडलेली नाळ आणि येथील ६०-७० मांसाहारी विशेष पदार्थ, जिभेवर विरघळणारे स्वीट खाल्ल्याशिवाय खव्वयांचे समाधान होत नाही. अफगानी लेग, दालचा खाना, कबाब, लखनवी पुलाव, चिकन-मटण बिर्याणी, चिकन सामोसा, चिकन ६५, लॉलीपॉप, मटण तवा, चिकन व मटण हंडी, रुमाली रोटी आदी पदार्थांना ग्राहकांची विशेष पसंती आहे. यातही दालचा खाना आणि गोड पदार्थात शाही तुकडा, फेरणी न खाता खवय्ये माघारी परत येणे अशक्यच आहे.
नुसरतभाई म्हणाले, “गेल्या १५ वर्षांपासून या व्यवसायात आहे. आपुलकी, सर्वधर्म समभाव, सर्वांशी मैत्री आणि जिव्हाळा जपत येणाऱ्या प्रत्येकाची व्यवस्थित मेहमाननवाजी करतो. चांगले काम करताना अडचणी खूप येतात पण मी थांबत नाही. त्यात सर्वधर्मियांची मोठी साथ मिळाली. मुस्लिम बांधव दिवसभराचा कडक उपवास धरल्यानंतर रात्री ७.३० नंतर रोजा सोडण्यासाठी रुचकर, स्वादिष्ट, पौष्टिक आणि वैविध्यपूर्ण खाद्यपदार्थासाठी शालिमार केटरर्सला भेट देतात. खाद्यपदार्थाचा मनसोक्त आस्वाद घेऊन मुस्लिम बांधव रोजा सोडतात. याशिवाय सर्वधर्मीय खवय्ये याठिकाणी मोठी गर्दी करतात. हा स्टॉल दुपारी ४ ते रात्री २ वाजेपर्यंत सुरू असतो.
नफ्यातील १० टक्के सामाजिक कार्यासाठी
दरवर्षी या व्यवसायाला नुसरतभाई सामाजिक उपक्रमाची जोड देतात. यंदा तृतीयपंथीयांना सन्मान देण्यासाठी व जागृती करण्यासाठी २०-२५ तृतीयपंथीयांना त्यांनी सन्मानाने स्नेहभोजन दिले आहे. तसेच त्यांच्यातील अनेकांना काउंटरवर सेवेची संधी दिली आहे. त्यांच्यासाठी वर्षभर राबविण्यात येणाऱ्या सामाजिक उपक्रमांना हातभार लावणार असल्याचे नुसरतभाई म्हणाले. यापूर्वी नफ्यातील १० टक्के हिस्सा सामाजिक कार्यावर खर्च केला आहे. भवानी पेठेतील झोपडपट्टी भागात धान्य वाटप, पुलवामा येथील जवांनाना, विविध शाळांतील विद्यार्थ्यांना मदत केली आहे.