Home Blog Page 1082

लोकसभा निवडणुकीत भाजप सुरतचे उमेदवार मुकेश दलाल बिनविरोध विजयी; काँग्रेस उमेदवाराचा अर्ज रद्द, 8 जणांनी घेतली माघार

सुरत-गुजरातमधील सुरत लोकसभा मतदारसंघातून भाजपचे उमेदवार मुकेश दलाल सोमवारी बिनविरोध निवडून आले. वास्तविक येथून काँग्रेसचे उमेदवार नीलेश कुंभानी यांचा अर्ज रद्द करण्यात आला. त्यांच्या अर्जात साक्षीदारांची नावे आणि स्वाक्षऱ्यांमध्ये चूक होती.या जागेवर भाजप आणि काँग्रेससह 10 उमेदवार रिंगणात होते. रविवारी 7 अपक्ष उमेदवारांनी अर्ज मागे घेतले होते. फक्त बसपचे उमेदवार प्यारे लाल भारती राहिले होते, त्यांनी सोमवारी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला. अशा प्रकारे मुकेश दलाल यांची बिनविरोध निवड झाली.

मुकेश दलाल यांनी पहिल्यांदाच सुरतमधून निवडणूक लढवली होती. या जागेवर भाजपच्या दर्शना जरदोश गेल्या तीन टर्मपासून विजयी होत होत्या. मात्र यावेळी त्यांचे तिकीट रद्द करून मुकेश दलाल यांना स्थान देण्यात आले आहे. दलाल हे भाजपचे गुजरात प्रदेशाध्यक्ष सीआर पाटील यांचे निकटवर्तीय आहेत. मुकेश दलाल हे गेल्या 43 वर्षांपासून भारतीय जनता पक्षाशी संबंधित आहेत. ते सलग तीन वेळा या भागातून नगरसेवक राहिले आहेत. याशिवाय भाजप युवा मोर्चातही त्यांनी अनेक महत्त्वाच्या पदांवर काम केले आहे.

गुजरात काँग्रेसचे अध्यक्ष शक्ती सिंह गोहिल म्हणाले, आमची कायदेशीर टीम सर्व पैलूंची चौकशी करत आहे. आधी हायकोर्टात याचिका दाखल करायची की थेट सुप्रीम कोर्टात जायची यावर कायदेशीर टीम विचार करत आहे.

भाजपचे माजी उपमहापौर दिनेश जोधानी यांनी निवडणूक आयोगाकडे काँग्रेसचे उमेदवार नीलेश कुंभानी यांच्या उमेदवारी अर्जात प्रस्तावकांच्या बनावट सह्या झाल्याची तक्रार केली होती. 21 एप्रिल रोजी डीईओ सौरभ पारधी यांनी याप्रकरणी खुलासा मागवत कुंभानींना रविवारी सकाळी 11 वाजेपर्यंतची वेळ दिली होती.

उमेदवारी अर्ज रद्द करण्याबाबत रविवारी जिल्हाधिकारी आणि निवडणूक प्राधिकरणासमोर सुनावणी झाली. फॉर्मवर स्वाक्षरी केलेले चार प्रस्तावकही सुनावणीवेळी गैरहजर होते. यामुळे अखेर निवडणूक अधिकाऱ्यांनी नीलेश कुंभानी यांचा फॉर्म रद्द केला.

बिनविरोध निवड झाल्याबद्दल मुकेश दलाल म्हणाले, ‘मी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि प्रदेशाध्यक्ष सीआर पाटील यांचा आभारी आहे. मी लोकशाही पद्धतीने जिंकलो आहे. मी माझ्या मतदार आणि कार्यकर्त्यांचाही मनापासून आभारी आहे. विरोधकांबद्दल मी एवढेच सांगेन की त्यांच्या अपेक्षेप्रमाणे गोष्टी घडतात तेव्हा त्यांना बरे वाटते. जेव्हा त्यांच्या अपेक्षेविरुद्ध गोष्टी होतात तेव्हा ते लोकशाहीची हत्या म्हणून पाहू लागतात.

चिंचवड येथे गांधी पेठ तालीम मित्र मंडळाची जिजाऊ व्याख्यानमाला बुधवारपासून

सामाजिक व प्रबोधनात्मक कार्यक्रमांचे ३४ वे वर्ष

पिंपरी, पुणे (दि. २२ एप्रिल २०२४) गांधी पेठ तालीम मित्र मंडळ ही पिंपरी चिंचवड शहरातील एक सामाजिक व प्रबोधनात्मक कार्यक्रम आयोजित करणारी अग्रगण्य संस्था आहे. गतवर्षीप्रमाणे या संस्थेच्या वतीने जिजाऊ व्याख्यानमालेचे (वर्ष ३४ वे) आयोजन करण्यात आले आहे. त्याचे उद्घाटन बुधवारी सायंकाळी सात वाजता, पिंपरी चिंचवड भाजपा शहराध्यक्ष शंकर जगताप यांच्या हस्ते होणार आहे.
चिंचवड गाव, चापेकर चौक, चापेकर स्मारक उद्यान येथे रोज सायंकाळी सात वाजता सुरू होणाऱ्या या व्याख्यानमालेचे पहिले पुष्प बुधवारी (दि. २४) माईंड पॉवर ट्रेनर व जेष्ठ समुपदेशक डॉ. दत्ता कोहिनकर हे “मनाची अमर्याद शक्ति व तणावमुक्ती” या विषयावर मार्गदर्शन करून गुंफणार आहेत अशी माहिती संस्थेचे अध्यक्ष राजाभाऊ गोलांडे व व्याख्यानमालेचे समन्वयक सुहास पोफळे यांनी प्रसिद्धीस दिली आहे.
गुरुवारी (दि.२५) निवेदिता धावडे या “प्रत्येक कृती राष्ट्रहिताची आणि विश्वशांतीची” या विषयावर, शुक्रवारी (दि.२६) विनोद बोधनकर हे “प्रदूषण नदीचे व प्लास्टिकचे”; शनिवारी (दि.२७) शिवशंभो विचार मंचचे संघटन मंत्री हभप शिरीष महाराज मोरे हे “शिवराज्याभिषेकाचे महत्व” आणि व्याख्यानमालेच्या समारोपाच्या दिवशी रविवारी (दि.२८) निवृत्त न्यायाधीश संजय भाटे हे “माझे संविधान माझा अभिमान” या विषयावर व्याख्यान देणार आहेत. व्याख्यान रोज सायंकाळी सात वाजता सुरू होईल.
या कार्यक्रमाच्या आयोजनात गणेशोत्सव समिती अध्यक्ष विपुल नेवाळे, सदस्य महेश गावडे, अमित चौधरी, सिद्धेश गोलांडे, गोपी बाफना, धीरज गुत्ते, जगदीश घुले, प्रवीण भोकरे, संदीप जंगम, राहूल वाघुले आदींनी सहभाग घेतला आहे.

ज्येष्ठांचा सन्मान हीच आमची संस्कृती : मुरलीधर मोहोळ

पुणे (प्रतिनिधी) – आपल्या वडिलांनी दिलेल्या वचनाची पूर्तता करण्यासाठी श्रीरामांनी आपल्या राज्याचा चौदा वर्ष त्याग केला. माता शबरीची उष्टी बोरं खावून तिचा सन्मान केला. ज्येष्ठांचा आदर, सन्मान करा हाच धडा रामायणातून आपल्याला मिळतो. त्यामुळेच ज्येष्ठांचा सन्मान हीच आमची संस्कृती आहे. पुण्यातील ज्येष्ठ, वडिलधारे हेच माझे स्टार प्रचारक आहेत आणि त्यांच्यासाठी असणाऱ्या मोदी सरकारच्या योजनांची प्रभावी अंमलबजावणी करु, असे महायुतीचे पुणे लोकसभेचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांनी सांगितले.

ऑस्कॉप, फेसकॉम, भाजप ज्येष्ठ नागरिक आघाडी आणि पुणे शहरातील सर्व १९० अंगीकृत ज्येष्ठ नागरिक संघांनी मोहोळ यांना पाठिंबा जाहीर केला. या ज्येष्ठ नागरिक मेळाव्यात मोहोळ बोलत होते. ज्येष्ठ नागरिकांच्या ॲस्कॉप संघटनेचे अध्यक्ष दिलीप पवार, कार्याध्यक्ष श्रीराम बेडकीहाळ, कोषाध्यक्ष अच्युत कुलकर्णी, सचिव ऊर्मिला शेजवलकर, तसेच उदय रेणूकर, अरुण रोडे, राजीव कुलकर्णी या पदाधिकाऱ्यांनी मेळावा आयोजनात मोलाची भूमिका बजावली. हेल्पेज इंडिया संघटनेचे वसंतराव दापोरकर, बंडोपंत फडके, अनिल कुलकर्णी, पद्माकर कुलकर्णी, सुरेखा पेंडसे, ऊषा जोईल, श्रद्धा चिटणीस आदीही उपस्थित होते.

आपल्या घरातील ज्येष्ठ किंवा वडिलधारे आपली ताकद असते असे सांगून मोहोळ म्हणाले, ‘आपल्याला कधी ना कधी तरी निराशा येते. त्यावेळी घरातील ज्येष्ठांशी संवाद साधल्यानंतर आपले नैराश्य दूर होते, हा माझा अनुभव आहे. अनेकदा मला गोंधळलेल्या मनस्थीतीत मला ज्येष्ठांच्या मार्गदर्शनातून त्यातून बाहेर पडणे शक्य झाले आहे. हे मी माझे अनुभव सांगतोय. भाजपने कायमच ज्येष्ठ नागरीकांची दखल घेतली आहे. कारण ज्येष्ठ नागरीक हे समाजातील अनुभवाची भांडारे आहेत. ज्येष्ठ, वडिलधारे माझ्यासाठी कायमच आदरणीय राहिले आहेत, पुढही रहातील. कोरोना काळात ज्येष्ठांची सेवा करण्याचे भाग्य मला मिळाले, त्यांच्या त्या आशिर्वादानेच मला या निवडणुकीत संधी मिळाली. त्यांचा आशीर्वाद माझ्यासाठी मोठा आहे. सर्वांशी कायमच गप्पा मारणारे, बोलणारे ज्येष्ठ नागरीक हेच खरे माझे स्टार प्रचारक आहेत.’

यावेळी पुणे शहरातील बहुसंख्य ज्येष्ठ नागरिक पदाधिकाऱ्यांसह राज्यसभेच्या खासदार मेधा कुलकर्णी, भाजपचे शहराध्यक्ष धीरज घाटे, महायुती समन्वयक संदीप खर्डेकर, शहर सरचिटणीस पुनीत जोशी, शिवसेनेचे उपशहरप्रमुख सचिन थोरात, महायुतीचे समन्वयक शाम देशपांडे, ज्येष्ठ नागरिक मेळाव्याचे समन्वयक बाळासाहेब टेमकर, कोथरूड दक्षिण मंडलचे अध्यक्ष डॉ. संदीप बुटाला, कोथरूड उत्तर मंडलचे अध्यक्ष सचिन पाषाणकर, माजी नगरसेविका उर्मिला आपटे, माजी उपमहापौर नाना नाशिककर, अनुपमा लिमये, कोथरूड सरचिटणीस अनुराधा येडके, मंजूश्री खर्डेकर, मनसे विभाग अध्यक्ष सुधीर धावडे, रिपाइंचे कोथरूड अध्यक्ष बाळासाहेब खंकाळ, शिवसेनेचे कोथरूड विभाग प्रमुख मयूर पानसरे, दीपक पवार, गिरीश खत्री, शहर चिटणीस प्रशांत हरसुले, राहुल कोकाटे, कोथरूड उपाध्यक्ष दिनेश माझिरे, अजित जगताप आदी उपस्थित होते.

मायलेकींच्या नात्यात दुरावा?’मायलेक’ मधील ‘नसताना तू’ भावनिक गाणे प्रदर्शित

नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ‘मायलेक’ चित्रपटावर सध्या प्रेक्षक भरभरून प्रेम करत असून आई आणि मुलीच्या सुंदर नात्याची गोष्ट सांगणारा हा चित्रपट प्रेक्षकांच्या पसंतीस उतरतोय. चित्रपटातील गाणीही सध्या प्रचंड व्हायरल होत असतानाच आता ‘मायलेक’मधील एक भावनिक गाणे प्रेक्षकांच्या भेटीला आले आहे. यापूर्वी ‘असताना तू’ हे हॅपनिंग गाणे प्रदर्शित झाले होते, जे आई-मुलीच्या नात्यातील जवळीक अधोरेखित करणारे होते. हे नाते तुफान गाजत असताना ‘नसताना तू’ हे सॅड साँग प्रदर्शित झाले आहे. आर्या आंबेकरच्या सुमधुर आवाजातील या गाण्याला क्षितिज पटवर्धनचे शब्द लाभले असून पंकज पडघनने या गाण्याला संगीतबद्ध केले आहे. सोनाली खरे आणि सनाया आनंदवर चित्रित करण्यात आलेल्या या गाण्यात दोघींमध्ये दुरावा आला असून मनात घालमेल सुरु आहे. त्यांच्या नात्यात हा दुरावा का आला आहे, याचे उत्तर मात्र प्रेक्षकांना चित्रपट पाहूनच मिळेल.

ब्लुमिंग लोटस प्रोडक्शन्स, सोनाली सराओगी प्रस्तुत, सोनाली आनंद निर्मित, प्रियांका तन्वर दिग्दर्शित ‘मायलेक’ या चित्रपटात सोनाली खरे, सनाया आनंद, उमेश कामत, शुभांगी लाटकर, संजय मोने, बिजय आनंद यांच्या प्रमुख भूमिका आहेत. तर कल्पिता खरे, बिजय आनंद या चित्रपटाचे सहनिर्माते आहेत. नितीन प्रकाश वैद्य या चित्रपटाचे असोसिएट प्रोड्यूसर आहेत.

या गाण्याबद्दल सोनाली खरे म्हणते, ” याआधी ‘असताना तू’ या आल्हाददायी गाण्यामधून मायरा आणि माझ्यामधील सुंदर नाते तुम्ही पाहिले. प्रेक्षकांनी या गाण्याला चांगला प्रतिसाद दिला. आता ‘नसताना तू ‘ हे भावनिक गाणेही प्रेक्षकांना नक्कीच आवडेल. काही कारणांमुळे या नात्यात दुरावा आला आहे. हे वय असे असते, जिथे मुलींच्या मनात चलबिचल असते, अनेक प्रश्न असतात, शंका असतात. त्यावर वेळीच चर्चा झाली नाही तर नकळत नात्यात दुरावा येऊ लागतो, हेच दाखवण्याचा प्रयत्न यात करण्यात आला आहे. कुटुंबातील प्रत्येकाने आवर्जून हा चित्रपट पाहावा.”

देशाच्या, राज्याच्या विकासप्रक्रियेला पुढे नेणारा जाहिरनामा – अजित पवार

आरोग्य, शिक्षण,स्वच्छता, पर्यावरण आणि रोजगार या ग्रामविकासाच्या पंचसूत्रीवर राष्ट्रवादी काम करणार…

‘राष्ट्रासाठी राष्ट्रवादी’ या संकल्पनेवर आधारित राष्ट्रवादीचा जाहिरनामा…

मुंबई दि. २२ एप्रिल – राज्यातील सर्व समाजघटकांना… अठरापगड जाती आणि बारा बलुतेदार यांचा विचार करणारा आणि त्यांच्या सर्वांगीण विकासाला एक चालना देणारा देशाच्या, राज्याच्या विकासप्रक्रियेला पुढे नेणारा हा जाहिरनामा आहे अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कौतुक केले.

‘राष्ट्रासाठी राष्ट्रवादी’ या संकल्पनेवर आधारित हा जाहिरनामा तयार करण्यात आलेला असून राष्ट्रवादी काँग्रेसची विकसित भारतासाठीची भूमिका स्पष्ट करणारा हा जाहिरनामा आहे. त्यामध्ये सार्वजनिक सेवा… पायाभूत सुविधासह आर्थिक प्रगतीचा संकल्प व्यक्त करण्यात आलेला आहे असेही अजित पवार यांनी स्पष्ट केले.

राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दिलीप वळसे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली ही जाहिरनामा समिती स्थापन करण्यात आली होती आणि त्यांनी हा जाहिरनामा केलेला आहे. पक्षासाठी एक चांगला जाहिरनामा तयार केला त्याबद्दल दिलीप वळसे पाटील यांना अजित पवार यांनी धन्यवाद दिले.

या जाहिरनाम्यात मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा द्यावा यासाठी पाठपुरावा करणार, स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांना भारतरत्न द्यावा, शेतकऱ्यांना एमएसबी मिळावी, अपारंपरिक वीज निर्मिती, पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी आणि ग्लोबल वॉर्मिगच्या संकटाला थांबवायचे असेल तर अपारंपरिक वीज निर्मितीला चालना, उद्योगांना प्राधान्य, कृषी पिक विम्याच्या व्याप्तीत वाढ, शेतकरी सन्मान निधीत भरीव वाढ, मुद्रा कर्ज योजनेत मर्यादित वाढ, जातीनिहाय जनगणना, ऊर्दू शाळांना सेमी इंग्रजीचा दर्जा, वन क्षेत्रात पाण्याचे साठे निर्माण व्हावेत यासाठी योजना, संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत भारताला स्थायी सदस्यत्व मिळावे यासाठी पाठिंबा, ही ठळक वैशिष्ट्ये अजित पवार यांनी यावेळी सांगितली.

आरोग्य, शिक्षण,स्वच्छता, पर्यावरण आणि रोजगार ही ग्रामविकासाची पंचसूत्री सांगतानाच त्यानुसार आम्ही काम करणार आहोत असे अजित पवार यांनी स्पष्ट केले.

यावर्षी लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीत महायुती म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली निवडणूक लढवत आहोत. मोदींच्या नेतृत्वाखाली आपला मोठा विजय निश्चित आहे. त्यांना तिसर्‍यांदा देशाचे पंतप्रधान करण्यासाठी आम्ही जनतेसमोर जाऊन मते मागत आहोत. एनडीएचा एक आत्मविश्वासू चेहरा म्हणून बरेचजण त्यांच्याकडे बघत आहेत असे सांगतानाच विरोधी पक्षात असा एकही चेहरा बघायला मिळणार नाही जो मोदींसोबत स्पर्धा करु शकेल आणि त्यांच्यासमोर उभा राहू शकेल असा जोरदार टोला अजित पवार यांनी लगावला.

विदर्भात मतदान टक्केवारीने कमी झाले आहे त्याला प्रचंड उष्णता होती हे नैसर्गिक संकट होते. यापुढे असे होऊ नये असा प्रयत्न करणार आहोत. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी घटनेत दिलेला मतदानाचा अधिकार सर्वांनी बजावला पाहिजे असे आवाहनही अजित पवार यांनी केले.

आम्ही महायुतीसोबत असलो तरी आम्ही आमची विचारधारा सोडलेली नाही. ही बाब तितकीच महत्वाची आहे. अलीकडच्या काळात राजकीय भूमिका, राजकीय परिस्थिती लक्षात घेऊन मायावती, ममता बॅनर्जी,जयललिता, फारुख अब्दुल्ला यांच्या भूमिका पाहिल्या तर तुम्हाला जाणवेल हेही आवर्जून अजित पवार यांनी सांगितले.

सबका साथ.. सबका विकास सबका प्रयास.. सबका विश्वास.. यावर राष्ट्रवादी काँग्रेसची श्रध्दा आहे. याच भूमिकेतून राष्ट्राचा विकास… राष्ट्राचा विश्वास आणि राष्ट्राची साथ या त्रिसूत्री आधारीत आजची लोकसभा महत्वाची आहे त्यासाठी आमच्या जाहिरनाम्यात आम्ही काही गोष्टी विषद केलेल्या आहेत असेही अजित पवार म्हणाले.

लोकसभेची रणधुमाळी सुरू आहे. उन्हाची तीव्रता आहे हवामान बदलत आहे. शेतकऱ्यांचे गारपिटीने नुकसान होत आहे. यामध्ये निवडणूकीची आचारसंहिता न आणता याबाबत संबंधित प्रशासनाने दखल घ्यावी असे आवाहनही अजित पवार यांनी केले.

आज जाहिरनामाचे प्रकाशन आपल्या सर्वांच्या साक्षीने झाल्याचे अजित पवार यांनी जाहिर यावेळी केले.

सुरुवातीलाच अजित पवार यांनी
मुश्ताक अंतुले यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्याबद्दल त्यांना धन्यवाद दिले.

आम्ही महायुती करुन या लोकसभेला सामोरे जात आहोत. या देशात एनडीएच्या माध्यमातून देशाचे यशस्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे तिसऱ्यांदा भारताचे पंतप्रधान होणार आहेत. सगळे विक्रम मोडून भाजप आणि मित्र पक्ष अब की बार ४०० पार हा नारा देऊन सामोरे जात आहोत असे खासदार प्रफुल पटेल यांनी यावेळी सांगितले.

राष्ट्रवादी काँग्रेस १९९९ पासून कार्यरत आहे. या पक्षाचे संस्थापक म्हणून छगन भुजबळ, अजित पवार, प्रफुल पटेल हेसुद्धा होते असेही प्रफुल पटेल यांनी स्पष्ट केले.

बॅरिस्टर अंतुले यांना कॉंग्रेसच्या अंतर्गत राजकारणामुळे खुर्चीवरून खाली उतरवण्याचे काम झाले होते. आमचे ७१ आमदार असताना आम्हाला मुख्यमंत्री पद मिळू नये असे काम कॉंग्रेसने केल्याचे प्रफुल पटेल यांनी सांगितले.

देशाच्या आणि राज्याच्या हितासाठी अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली ही भूमिका घेतली आहे असे सांगतानाच आपला जाहीरनामा प्रसिद्ध झाला त्यात पक्षाचे विचार आणि तत्वांचा समावेश करण्यात आला आहे. त्याचे वाचन केले पाहिजे. तो लोकांपर्यंत पोचला पाहिजे असे आवाहन खासदार प्रफुल पटेल यांनी केले.

मी या पक्षाचा संस्थापक अध्यक्ष आहे असे सांगतानाच शिव – शाहू – फुले – आंबेडकर यांच्याच मार्गाने हा पक्ष जाणार असून आमचा मार्ग कायम तोच राहणार आहे. गोरगरिबांसाठी आम्ही काम करणार आहोत… आदिवासी, दलित, ओबीसींसाठी यांच्यासह सगळ्यांसाठी काम करणार आहोत. स्वातंत्र्याची फळं सर्वांना चाखायला मिळाली पाहिजे. कुठलाही समाज मागे रहाता कामा नये. राज्यातील अनेक प्रश्न सोडवायचे आहेत. विकास करत असताना सामान्य माणूस समोर असला पाहिजे हे लक्षात घेऊनच काम केले पाहिजे. हेच विचार घेऊन राष्ट्रवादी काँग्रेस काम करत आहे असे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी स्पष्ट केले.

या कार्यक्रमात कृषीमंत्री धनंजय मुंडे,महिला प्रदेशाध्यक्षा रुपालीताई चाकणकर आदींनी आपले विचार मांडले.

या कार्यक्रमाला राष्ट्रीय अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री अजित पवार, राष्ट्रीय कार्याध्यक्ष खासदार प्रफुल पटेल, प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे, ज्येष्ठ नेते आणि अन्न व नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ, वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ, मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील, कृषीमंत्री धनंजय मुंडे, महिला व बालविकास मंत्री अदितीताई तटकरे, विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ, प्रदेश सरचिटणीस शिवाजीराव गर्जे, महिला प्रदेशाध्यक्षा रुपालीताई चाकणकर, मुंबई विभागीय अध्यक्ष समीर भुजबळ, वाय बी त्रिवेदी, प्रदेश उपाध्यक्ष प्रमोद हिंदूराव, मुख्य प्रवक्ते उमेश पाटील, युवक प्रदेशाध्यक्ष सुरज चव्हाण, बाबा सिद्दीकी, प्रदेश सरचिटणीस नजीब मुल्ला,अल्पसंख्याक सेलचे प्रदेश उपाध्यक्ष सलीम सारंग, अल्पसंख्याक सेलचे राष्ट्रीय अध्यक्ष सय्यद जलालुद्दीन, प्रदेश प्रवक्ते आनंद परांजपे, प्रदेश प्रवक्ते संजय तटकरे, मुंबई विभागीय कार्याध्यक्ष नरेंद्र राणे आदी उपस्थित होते.

जिल्ह्यातील सर्वात कमी मतदार असलेल्या दुर्गम मतदान केंद्र परिसरात मतदान माहिती चिठ्ठीचे वाटप

८९ वयाचे बाबूराव आखाडे १९६० पासून प्रत्येक निवडणुकीत न चुकता करतात मतदान

पुणे,दि. २२ : भोरचे सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी राजेंद्र कचरे यांनी जिल्ह्यात भोर तालुक्यातील सर्वात कमी मतदार संख्या असलेले दुर्गम मतदान केंद्र बुरुडमाळ परिसराला भेट देवून येथील सर्व मतदारांना मतदार माहिती चिठ्ठीचे वाटप केले तसेच त्यांना मतदान प्रक्रीयेची आणि मतदान केंद्रातील सुविधांची माहिती दिली.

भाटघर धरणाच्या बॅकवॉटर परिसरातील बुरुडमाळ हे मतदान केंद्र अतिशय दुर्गम भागात असून हा परिसर डोंगरांनी व्यापलेला आहे. या मतदान केंद्रावर २१ पुरुष आणि २० महिला असे एकूण ४१ मतदार आहेत. श्री. कचरे व त्यांच्या सहकाऱ्यांनी सर्व मतदारांना मतदार माहिती चिठ्ठीचे आज वाटप केले. या मतदारांना मतदानाचा हक्क बजावता यावा म्हणून येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत मतदान केंद्र उभारण्यात येणार आहे.

बुरुडमाळ येथील ८९ वयाचे बाबूराव आखाडे हे १९६० पासून प्रत्येक निवडणुकीत न चुकता मतदार केंद्रावर जाऊन मतदान करतात. श्री.कचरे यांनी त्यांची भेट घेतली आणि त्यांनाही प्रत्येक निवडणुकीप्रमाणे या निवडणुकीतदेखील मतदान करण्याचे आवाहन केले. आखाडे यांनीदेखील आपण मतदान केंद्रावर येवून मतदान करणार असल्याचे सांगितले.

श्री.आखाडे यांचा आदर्श समोर ठेवून नवमतदारांनी आपले पहिले मतदान करावे आणि लोकशाहीच्या उत्सवात सहभागी व्हावे असे आवाहन श्री.कचरे यांनी केले आहे.

जोरदार शक्तीप्रदर्शनासह मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत बारणे यांचा उमेदवारी अर्ज दाखल

आकुर्डी, दि. 22 एप्रिल – आकुर्डी खंडोबा माळ येथून भव्य मिरवणुकीने जोरदार शक्तीप्रदर्शन करीत, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत मावळ लोकसभा मतदारसंघातील शिवसेना- भाजप- राष्ट्रवादी- मनसे- आरपीआय- रासप- मित्रपक्ष महायुतीचे उमेदवार खासदार श्रीरंग बारणे यांनी आज (सोमवारी) उमेदवारी अर्ज दाखल केला.

मावळ लोकसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी दीपक सिंगला यांच्याकडे खासदार बारणे यांनी उमेदवारी अर्ज सादर केला. त्यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील, शिक्षण मंत्री दीपक केसरकर, भाजपचे विधान परिषदेतील गटनेते प्रवीण दरेकर, माजी मंत्री बाळा भेगडे, माजी खासदार रामशेठ ठाकूर, अमर साबळे, आमदार प्रशांत ठाकूर, अण्णा बनसोडे, सुनील शेळके, अश्विनी जगताप, उमा खापरे, महेश बालदी, भाजपचे क्लस्टर प्रमुख बाळासाहेब पाटील, अण्णाभाऊ साठे आर्थिक विकास महामंडळाचे माजी अध्यक्ष अमित गोरखे, रिपब्लिकन पक्षाच्या नेत्या चंद्रकांता सोनकांबळे, पिंपरी- चिंचवड भाजपचे शहराध्यक्ष शंकर जगताप, मावळ लोकसभा मतदारसंघ समन्वयक सदाशिव खाडे, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष बापूसाहेब भेगडे, शहर अध्यक्ष अजित गव्हाणे, मावळ तालुका अध्यक्ष गणेश खांडगे, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख बाळासाहेब वाल्हेकर, शहराध्यक्ष निलेश तरस तसेच नाना काटे राजू दुर्गे, भीमा बोबडे, नामदेव ढाके, भाजपचे मावळ तालुका अध्यक्ष भाऊ गुंड, निवडणूक प्रमुख रवींद्र भेगडे, शिवसेना तालुकाप्रमुख राजू खांडभोर, महायुतीतील सर्व घटक पक्षांचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

आकुर्डी खंडोबा माळ येथे श्री खंडेरायाचे आशीर्वाद घेऊन खासदार बारणे यांच्या मिरवणुकीस प्रारंभ झाला. ढोल ताशांचा दणदणाट, भगव्या टोप्या, फेटे, भगवे झेंडे, धनुष्यबाण चिन्ह, महायुतीतील पक्षांचे झेंडे घेऊन लोकसभा मतदारसंघाच्या कानाकोपऱ्यातून आलेले हजारो कार्यकर्ते मिरवणुकीत सहभागी झाले होते. मिरवणुकीतील महिलांची संख्या देखील लक्षणीय होती. ‘अब की बार, चार सौ पार’, ‘फिर एक बार, मोदी सरकार’, ‘महायुतीचा विजय असो’, ‘आप्पा बारणे तुम आगे बढो, हम तुम्हारे साथ है’, ‘होणार होणार, हॅटट्रिक होणार’ या घोषणांनी परिसर दणाणून गेला होता.

सकाळी साडेदहा वाजता सुरू झालेल्या या‌ मिरवणुकीत खासदार बारणे विजय रथावर आरूढ झाले होते. सुरुवातीला काही काळ छोटा नातू राजवीर यालाही त्यांनी कडेवर घेतले होते.

मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांचे जल्लोषात स्वागत

सकाळी अकराच्या सुमारास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री अजितदादा पवार हेही विजयरथावर बारणे यांच्या समवेत आरूढ झाले आणि कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला. आकुर्डी गावातील चौकात माजी नगरसेवक प्रमोद कुटे यांनी क्रेनच्या साह्याने विजय रथावरील मान्यवरांना भव्य पुष्पहार घातला व पुष्पवृष्टी केली. मुख्यमंत्री शिंदे व अजितदादा यांनी मिरवणुकीत सहभागी झालेल्या कार्यकर्त्यांवर व रस्त्याच्या दुतर्फा उभ्या असलेल्या नागरिकांवर फुलांच्या पाकळ्यांची उधळण करत अभिवादन केले.

प्राधिकरणग्रस्त शेतकऱ्यांना साडेबारा टक्के जमीन परतावा देऊन न्याय दिल्याबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा आकुर्डी ग्रामस्थांच्या वतीने विशेष सत्कार करण्यात आला. धनुष्यबाण चिन्हाची प्रतिकृती हाताने उंचावत मुख्यमंत्री शिंदे यांनी ‘जय भवानी, जय शिवाजी’, ‘छत्रपती शिवाजी महाराज की जय’ तसेच ‘आप्पा बारणे तुम आगे बढो, हम तुम्हारे साथ है’ची घोषणाही दिली. मिरवणुकीच्या रस्त्यावर दुतर्फा नागरिकांची मोठी गर्दी झाली होती.

सुमारे एक तास मिरवणुकीत सहभागी होऊन मुख्यमंत्री व अन्य मान्यवर पुढे मोटारीने पीएमआरडीए कार्यालयाकडे रवाना झाले. त्या ठिकाणी चंद्रकांत पाटील हे देखील आले. उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर पीएमआरडीए कार्यालयाच्या बाहेर मोठ्या संख्येने जमलेल्या महायुतीच्या कार्यकर्त्यांना बारणे यांनी धन्यवाद दिले. बारणे यांच्याबरोबर फोटो घेण्यासाठी कार्यकर्त्यांची एकच झुंबड उडाली होती.

मताधिक्याचा नवा विक्रम करणार – बारणे

उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर खासदार बारणे यांच्याशी पत्रकारांनी संवाद साधला. या निवडणुकीत आपण 2019 मधील आपलाच मताधिक्याचा विक्रम मोडून निवडून येऊ, असा विश्वास बारणे यांनी व्यक्त केला. मावळ लोकसभा मतदारसंघातील सहाही विधानसभा मतदारसंघात महायुतीचे आमदार आहेत. नरेंद्र मोदी हेच पुन्हा पंतप्रधान व्हावेत, अशी देशातील नागरिकांची भावना आहे. त्यामुळे या निवडणुकीत विक्रमी मताधिक्याने आपण विजयी होऊ, याचा त्यांनी पुनरुच्चार केला.

परिवाराकडून सदिच्छा

उमेदवारी अर्ज दाखल करायला निघण्यापूर्वी थेरगाव येथील निवासस्थानी खासदार बारणे यांना पत्नी सरिता, बहिण रुक्मिणी कस्पटे, अश्विनी जाधव, सुना स्नेहा प्रताप बारणे, नीता महेश बारणे, कावेरी नीलेश बारणे यांनी औक्षण करून निवडणुकीतील विजयासाठी शुभेच्छा दिल्या. त्यावेळी खासदार बारणे यांचे पुत्र प्रताप व विश्वजीत तसेच परिवारातील सर्व सदस्य उपस्थित होते.

ही लढाई मोदी विरुद्ध शेतकऱ्यांची….

सातगाव पठार भागात डॉ. कोल्हेंचा गावभेट दौरा.

पारगाव पेठ – शिरुर लोकसभा मतदारसंघाच्या महाविकास आघाडीचे उमेदवार खासदार डॉ. अमोल कोल्हे यांचा गावभेट दौरा आज आंबेगाव तालुक्यातील सातगाव पठार भागात सुरू झाला यावेळी पारगाव तर्फे खेड या गावातून नवखंड भैरवनाथ महाराजांचे दर्शन घेऊन कुरवंडीच्या चोंभाबाई देवीच्या अखंड हरीनाम सप्ताहमध्ये खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी महाप्रसादाचा आस्वाद घेतला.

यावेळी सातगाव पठार भागाला सर्वात जास्त भेडसावणारा शेतीच्या आणि पिण्याच्या पाण्याच्या प्रश्नांवर स्थानिक युवकांनी डॉ. कोल्हे यांचे लक्ष वेधले. ज्याप्रकारे बैलगाडा शर्यत सुरू करण्याचा शब्द पळाला तसा पाण्याचा देखील प्रश्न सोडवा अशी साद युवकांनी घातली. कळमोडीचे पाणी आम्हाला मिळत नाही तरी देखील आमच्या शेतजमिनीवर पुनर्वसनाचे शिक्के लाधले आहेत. हे उठविण्यासाठी प्रयत्न करावा अशी विनंती कार्यकर्त्यांनी डॉ. कोल्हे यांना केली. त्यावर डॉ. कोल्हे यांनी देखील पाण्याच्या विषयात बारकाईने लक्ष घालण्याची हमी दिली, याशिवाय जर कळमोडी प्रकल्पाचा लाभ मिळत नसेल, अर्थात लाभक्षेत्र नसेल तर पुनर्वसन काय कामाचे आपण सर्वजण मिळून यासाठी संघर्ष करू त्यासाठी तुमची साथ महत्वाची असल्याचे मत देखील डॉ. कोल्हे यांनी व्यक्त केले.

दरम्यान पारगाव येथे अशोक पवार या युवा शिवसैनिकाने माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्यावर तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केल्या. आढळराव पाटील यांचा १५ वर्ष एकनिष्टतेने प्रचार आम्ही शिवसैनिकांनी केला परंतु या माजी खासदारांनी राष्ट्रवादीमध्ये जाताना विश्वासात घेतले नाही, केवळ राष्ट्रवादी आपल्याला संपवत आहे, आपण शिवसेना जिवंत ठेवण्यासाठी संघर्ष करतोय असं कार्यकर्त्यांना भासवून जनतेला १५ वर्षे भावनिक केलं. मला आता मंत्रिपद मिळणार आहे असं खोटं बोलून आढळराव पाटलांनी वारंवार खासदारकी मिळवली.

शिवसेना जिल्हाप्रमुख सुरेश भोर यांनी सातगाव पठार या भागासाठी पाणी कशा प्रकारे मिळू शकते याशिवाय राज्यकर्त्यांनी या भागाला इच्छाशक्ती अभावी पाण्यापासून कशा प्रकारे वंचित ठेवलं याचा पाढा वाचला. दरम्यान उपस्थित कार्यकर्त्यांनी बोलताना सांगितले की आम्ही मतदार नव्हतो तेव्हापासून पाणी मिळणार हे ऐकतोय आता आमची मुलं मतदार झाली पण अजूनही आम्हाला पाणी मिळालं नाही.
दरम्यान कारेगाव येथील माजी सरपंच बबन रामभाऊ कराळे यांनी भाजप सरकारवर नाराजी व्यक्त करत ही लढाई केवळ डॉ. कोल्हे विरुद्ध आढळराव पाटील अशी नसून ही लढाई पंतप्रधान नरेंद्र मोदी विरुद्ध सर्वसामान्य शेतकरी अशी लढाई आहे. ही लढाई जिंकण्यासाठी सर्वसामान्य शेतकरी आणि सर्वसामान्य जनतेने ही निवडणूक हाती घेतली असल्याचा विश्वास त्यांनी बोलताना व्यक्त केला.

यावेळी सुरेश भोर, देवदत्त निकम, पूजा वळसे पाटील, दिलीपराव पवळे, भरत मोरे, हेमंत एरंडे, अशोक पवार, सूर्याजी सावंत, धनंजय जाधव, गणेश चिखले, प्रशांत, आचार्य, शुभम जेकटे, सुरेखा निघोट, विजय शेटे, बाळासाहेब गटे, उमा माटे यांसह महाविकास आघाडीतील अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

आढळरावांनी आपला पराभव मान्य केलाय – खासदार डॉ. अमोल कोल्हे

आंबेगाव : केंद्रातील सत्ता ही बदलत आहे आणि इंडिया आघाडीची सत्ता येत असल्याने केंद्रात सत्तेतील खासदार निवडून द्या हे विधान करून आढळराव यांनी आपला पराभव मान्य केला असल्याचा टोला खासदार डॉ.अमोल कोल्हे यांनी शिवाजीराव आढळराव पाटील यांनी लगावला.

महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार खासदार डॉ. अमोल कोल्हे आज आंबेगाव तालुक्यातील सातगाव पठार भागात दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांच्यासोबत देवदत्त निकम, सुरेश भोर, दिलीप पवळे, सुनील तोत्रे, मनीषा तोत्रे, निलेश वळसे, पुजा वळसे, विजय शेटे आदी उपस्थित होते.

२०२४ ची निवडणूक ही देशाची निवडणूक आहे, या निवडणुक प्रचारात धोरणात्मक मुद्दांवर बोललं जाईल ही अपेक्षा होती. मात्र, खोट बोल पण रेटून बोल यासवयीबरोबरच पंधरा वर्षांच्या अपयशाची पोटदुखी होत असल्याने वैयक्तिक टिका केली जात असल्याचं प्रतिउत्तर डॉ. अमोल कोल्हे यांनी शिवाजीराव आढळराव पाटील यांना दिल.

डॉ. कोल्हे यांच्यावर आढळराव पाटलांकडुन सातत्याने वैयक्तिक टिका केली जातीये. त्यावर प्रतिउत्तर देताना डॉ. कोल्हे म्हणाले की, देशाच्या लोकसभेची निवडणूक आहे. या निवडणुकीत धोरणात्मक बाबींवर बोलावं, पण त्यांच्याकडे वेगळे मुद्देच नाहीत. ही निवडणूक जनतेने हातात घेतली आहे. त्यामुळे तीच तीच वाक्य फिरवून ते बोलतायत. पंधरा वर्षातल त्यांचं अपयश आहे. पाच वर्षात शेतकऱ्यांच्या पोराने काम मार्गी लावली त्याची ही पोटदुखी आहे, असा टोला ही डॉ. कोल्हे यांनी लगावला.

मतदार जागृतीसाठी आयोजित भित्तीपत्रक प्रदर्शनाचे जिल्हाधिकारी कार्यालयात उद्घाटन

युवकांनी उत्साहाने लोकशाहीच्या महाउत्सवात सहभागी व्हावे-विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार

पुणे,दि. २२ : अभिनव कला महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी मतदार जागृतीचा संदेश देण्यासाठी रेखाटलेल्या भित्तीपत्रक चित्र प्रदर्शनाचे उद्घाटन विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांच्या हस्ते करण्यात आले. युवकांनी मतदानाचा हक्क बजावून लोकशाहीच्या या महाउत्सवात सहभागी व्हावे आणि इतरांनाही मतदान करण्यासाठी प्रेरित करावे, असे आवाहन यावेळी डॉ.पुलकुंडवार यांनी केले.

जिल्हाधिकारी कार्यालय व भारतीय कला प्रसारिणी पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित या कार्यक्रमाला जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ.सुहास दिवसे, निवासी उपजिल्हाधिकारी ज्योती कदम, उप जिल्हा निवडणूक अधिकारी मीनल कळसकर, स्वीप समन्वयक अधिकारी अर्चना तांबे, भारतीय कला प्रसारिणीचे पृथ्वीराज पाठक, प्राचार्य राहूल बळवंत उपस्थित होते.

डॉ.पुलकुंडवार म्हणाले, स्वातंत्र्यानंतर देशातील नागरिकांना मताधिकार मिळाल्याने मतदानाचा दिवस हा उत्सव साजरा करण्याचा दिवस आहे. प्रत्येक नागरिकाला लोकशाहीच्या उत्सवात सहभागी होता यावे व पात्र मतदार मतदानापासून वंचित राहू नये यासाठी निवडणूक आयोग प्रयत्नशील आहे. मतदानावेळी दिव्यांग, ज्येष्ठ नागरिकांना घरातून मतदानाची सुविधा उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. नागरिकांनीदेखील लोकशाही बळकट करण्यासाठी मतदानाचा दिवस हा सुट्टीचा दिवस म्हणून साजरा न करता लोकशाहीचा उत्सव म्हणून साजरा करावा. समाजामध्ये बदल घडविण्याची ताकद तरुण पिढीमध्ये असून नवमतदारांनी प्रत्येक निवडणुकीत मतदानाचा पवित्र हक्क बजवावा, असे आवाहन त्यांनी केले.डॉ.पुलकुंडवार यांनी कलेच्या माध्यमातून समाजाच्या प्रत्येक घटकाला मतदानाचे आवाहन करणारे संदेश दिल्याबद्दल विद्यार्थ्यांचे कौतुक केले. या प्रदर्शनाला भेट देणाऱ्यांच्या मनात निश्चितपणे मतदान करण्याची भावना निर्माण होईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

डॉ. दिवसे म्हणाले, कला हे प्रभावी माध्यम असल्याने कलेच्या माध्यमातून जास्तीत जास्त नागरिकांपर्यंत प्रभावीपणे संदेश पोहोचविता येतो. त्यामुळे विद्यार्थ्यांनी तयार केलली भित्तीपत्रके मतदारजागृतीसाठी उपयुक्त ठरतील. प्रदर्शनात मांडण्यात आलेल्या चित्रांतून मतदानाचा संदेश अधिकाधिक मतदारांपर्यंत पोहोचेल. अन्य माध्यमांचा उपयोग करून ही कलाकृती विविध शासकीय कार्यालयात प्रदर्शित करण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.

सजग नागरिक होण्यासाठी विद्यार्थ्यांनी विविध उपक्रमात सहभागी व्हावे, असे सांगून प्रत्येक पात्र मतदाराने येत्या १३ मे रोजी मतदानाचा हक्क बजवावा असे आवाहन डॉ. दिवसे यांनी केले. मतदानाची टक्केवारी वाढावी यासाठी जिल्हा प्रशासनाकडून स्वीप उपक्रमांतर्गत विविध उपक्रम राबविण्यात येत असल्याचेही ते म्हणाले.यावेळी स्वीप समन्वयक अधिकारी अर्चना तांबे यांनी मतदान जनजागृतीसाठी स्वीप मार्फत राबविण्यात आलेल्या विविध उपक्रमांची माहिती दिली. तसेच भारतीय कला प्रसारणीचे श्री. पाठक यांनी मनोगत व्यक्त केले. याप्रसंगी जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी- कर्मचारी तसेच विद्यार्थी- विद्यार्थीनी उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते भित्तीपत्रके तयार करणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रशस्तीपत्रक देऊन गौरविण्यात आले.

0000

आणि अंकिता बद्दलच सलमान खान ने केलेलं हे भाकीत ठरलं खर !

अंकिता लोखंडेने ‘बिग बॉस 17’च्या फिनालेदरम्यान सलमान खानच्या कारकिर्दीबद्दल वर्तवलेला अंदाज ठरला खरा ! 
 अंकिता लोखंडे बद्दल सलमान खान चा हा अंदाज ठरला खरा ‘बिग बॉस 17’ च्या मंचावर सलमान खान अंकिताच्या करिअरबद्दल जे काही भाकीत केले होते ते खरे ठरत असल्याने अंकिता लोखंडेला खूप आनंद होतोय. सलमान खान ने होस्ट केलेल्या ‘बिग बॉस 17’ या रिॲलिटी शोमध्ये उल्लेखनीय कामगिरी करून ती शोची चौथी उपविजेती ठरली. 

 अंकिता बाहेर पडल्याबद्दल सलमान ने एक गोष्ट आवर्जून सांगितली आणि एक अस भाकीत केले होते की ” अभिनेत्री रिॲलिटी शोनंतर बॅक-टू-बॅक प्रोजेक्ट्समध्ये व्यस्त होईल ” 
 रिॲलिटी शो संपल्यापासून अंकिता लोखंडे ‘स्वातंत्र्य वीर सावरकर’ च्या प्रमोशनमध्ये व्यस्त झाली ज्यामध्ये तिने यमुनाबाईच्या भूमिकेत सगळ्यांना आपलंसं केलं त्या नंतर विकी जैन सोबत ‘ला पिला दे शराब’ नावाच्या सिंगलमध्ये झळकली. 

सलमानच्या या वक्तव्याची आठवण करून देताना अंकिता एका मुलाखतीत म्हणाली, “जेव्हा सलमान सर म्हणाले की माझ्यासाठी ते सर्व काही आहे. मी “आनंद” आणि “कृतज्ञ” आहे की सलमान सरांचे शब्द माझ्यासाठी खरे ठरले आहेत आणि मी अनेक महत्त्वपूर्ण प्रोजेक्ट्स करतेय ” 

 सध्या अंकिता संदीप सिंगच्या मॅग्नम ओपस मालिका ‘आम्रपाली’ मध्ये प्रमुख महिला म्हणून काम करणार आहे.

फायरिंग करून फरार झालेल्या दक्षिण पुण्यातील 2 आरोपींना पकडले

पुणे- भारती विद्यापीठपोलिसांनी दक्षिण पुण्यातील फायरिंग करून फरार झालेल्या २ गुन्हेगारांना पकडण्यात यश मिळविलं आहे. तेजस महादेव खाटपे, वय २३ वर्षे रा. राम मंदीराशेजारी, जिल्हा परीषद शाळेजवळ, आंबेगाव बु, पुणे , तुषार धनराज चव्हाण, वय २४ वर्षे, रा. सच्चाईमाता रोड,आयप्पा स्वामी मंदीराचे मागे, कात्रज, अशी या गुन्हेगारांची नावे आहेत .

या संदर्भात पोलिसांनी सांगितले कि,’भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनकडील पोलीस अधिकारी व अंमलदार हे या आरोपींचा शोध घेत असताना पोलीस अंमलदार विक्रम सावंत, राहुल तांबे यांना त्यांचे बातमीदारामार्फतीने बातमी मिळाली की,हे वॉन्टेड आरोपी हे अंजनीनगर, कात्रज, पुणे येथे आले आहेत अशी खात्रीशीर बातमी मिळाल्याने लागलीच तपास पथकाचे अधिकारी व अंमलदार यांनी या ठिकाणी जावुन वर आरोपींना पकडले व ताब्यात घेवुन त्यांचेकडे तपास करुन त्यांना अटक केली आहे.

दिनांक २०/०३/२०२४ रोजी सायंकाळी ०६.४५ वा चे सुमारास संतोषनगर, संतोषी माता मंदीरा शेजारील घुंगरुवाला चाळ येथील बांधकाम चालु असलेल्या इमारतीचे तळमजल्यावर इसम नामे आकाश पवार, रोहन पवार, तुषार माने, तुषार चव्हाण, दादा चव्हाण, तेजस खाटपे, स्वरुप राठोड, गजानन माने या सर्वांनी मिळुन स्वामी नारायण मंदीराजवळ झालेल्या भांडणाचे रागातुन येवुन आकाश पवार याने एकाला शिवीगाळ करुन ऋषीकेश बर्डे यास हाताने मारहाण केली. त्या दरम्यान रोहन पवार याने त्याचेकडील कमरेची पिस्टुल फिर्यादी यांना धमकविण्यासाठी काढत असताना फिर्यादी यांनी त्यास मागुन पकडले असता त्याचे पिस्टलमधुन जमीनीवर गोळी झाडली गेली. त्यानंतर त्या सर्वांनी फिर्यादी व त्यांचे मित्रांना हाताने मारहाण करुन इसम नामे तुषार माने याने त्याचेकडील लोखंडी हत्यार काढुन फिर्यादी यांचे डोक्यात व डाव्या हातावर, तसेच तेजस खाटपे याने ऋषीकेश बर्डे याचे उजव्या हाताचे मनगटावर मारुन जखमी करुन पळुन गेले आहेत म्हणुन फिर्यादी यांनी तक्रार दिल्याने भारती विद्यापीठ पोलीस स्टेशन गुन्हा रजि.न.२३३/२०२४, भादंवि कलम ३०७,३२४,३२३,५०६ (२),५०४,१४३,१४४,१४७,१४८,१४९ महाराष्ट्र पोलीस कायदा कलम ३७ (१) (३) सह १३५, भारतीय हत्यार कायदा कलम ३ (२५), ४ (२५) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही कामगिरी अपर पोलीस आयुक्त, पश्चिम प्रादेशीक विभाग, पुणे, प्रविणकुमार पाटील, पोलीस उप आयुक्त परिमंडळ २, स्मार्तना पाटील सहाय्यक पोलीस आयुक्त स्वारगेट विभाग, पुणे श्रीमती नंदीनी वग्याणी, यांचे मार्गदर्शनाखाली भारती विदयापीठ पोलीस स्टेशनकडील वरिष्ठ पोलीस निरीक्षक डी.एस. पाटील, पोलीस निरीक्षक (गुन्हे) शरद झिने, तपास पथकाचे अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक समीर कदम, पोलीस उपनिरीक्षक धिरज गुप्ता, पोलीस अंमलदार विक्रम सावंत, राहुल तांबे, धनाजी धोत्रे, सचिन गाडे, सचिन सरपाले, निलेश जमदाडे, शैलेश साठे, नामदेव रेणुसे, चेतन गोरे, महेश बारवकर, निलेश ढमढेरे, मंगेश पवार, हर्षल शिंदे, अवधतु जमदाडे, निलेश खैरमोडे, अभिनय चौधरी यांच्या पथकाने केली आहे.

“परंपरा” च्या निमित्ताने आयुष्य आणि परंपरा यातील संघर्ष रुपेरी पडद्यावर झळकणार

अनेक आंतरराष्ट्रीय महोत्सवात गौरवलेला परंपरा चित्रपट  २६ एप्रिलला प्रेक्षकांच्या भेटीला

समाजाने जबरदस्तीने लादलेल्या परंपरेचा एका कुटुंबावर होणारा परिणाम या आशयसूत्रावर बेतलेला “परंपरा” हा चित्रपट २६ एप्रिल रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या चित्रपटाचा ट्रेलर लाँच करण्यात आला असून, उत्तम अभिनय, श्रवणीय संगीत, आशयघन कथानक असलेल्या या चित्रपटाविषयी या ट्रेलरने उत्सुकता निर्माण केली आहे. 

हरीश कुमार आणि अँड्र्यू रिबेलो यांच्या स्टार गेट मूव्हीज या निर्मिती संस्थेअंतर्गत “परंपरा” या चित्रपटाची निर्मिती केली असून फैजल पोपरे हे या चित्रपटाचे सहनिर्माते आहेत. तर दिग्दर्शन प्रणय निशाकांत तेलंग यांचे आहे. अभिनेते मिलिंद शिंदे आणि अभिनेत्री वीणा जामकर यांच्यासह प्रकाश धोत्रे, अरुण कदम, नम्रता पावसकर, किशोर रावराणे, जयराज नायर, रोहित चव्हाण, प्रशांत नेमण, भूषण घाडी, मास्टर मच्छिंद्र, दिवंगत अभिनेते जनार्दन परब यांचा दमदार अभिनय हे या चित्रपटाचं वैशिष्ट्य आहे. प्रतिकूल परिस्थितीतही परंपरेच्या जपणुकीवर लक्ष केंद्रित करणारा हा चित्रपट आहे. विशेषत: महाराष्ट्रातील, जिथे सांस्कृतिक वारसा खूप महत्त्वाचा आहे. प्रेक्षकांच्या मनात खोलवर परिणाम करणारं कथानक या चित्रपटात मांडण्यात आलं आहे. चित्रपटची पटकथा प्रणय निशाकांत तेलंग आणि संजय सावंत यांची असून छायाचित्र निशा तेलंग यांनी केले आहे. मंगेश कांगणे यांनी लिहिलेल्या गीतांना आनंद मेनन यांचे मधुर संगीत लाभले आहे. श्रीकांत तेलंग यांनी संकलक म्हणून काम पाहिले आहे तर पार्श्वसंगीत विजय गवंडे यांचे आहे.
“परंपरा” एक समृद्ध सिनेमॅटिक अनुभव देण्यास तयार आहे.

एकंदरीत ‘परंपरा’ हा चित्रपट केवळ मनोरंजनच नाही, तर आजच्या बदलत्या जगात वारसा आणि परंपरेचे महत्त्व दर्शवणारा आहे. त्याशिवाय ग्रामीण भागातील शेतकरी कुटुंबाचं जगणं, सामाजिक ताण याचं दर्शनही हा चित्रपट घडवतो. अनेक आंतरराष्ट्रीय महोत्सवात गौरवलेला हा चित्रपट प्रेक्षकांना नक्कीच अंतर्मुख करेल यात शंका नाही. 

पुण्यातील या 4 बिल्डर्सनी DSK यांच्या 16000 कोटींच्या मालमत्ता अवघ्या 826 कोटी रुपयांना हडपल्या..

पुणे-बांधकाम व्यावसायिक डी. एस. कुलकर्णी यांनी पुण्यातील चार बांधकाम व्यावसायिकांवर गंभीर आरोप केले आहेत. कुलकर्णी यांनी म्हटले की, डी. एस. कुलकर्णी डेव्हलपर्स लिमिटेड (DSK Developers Ltd) ही कंपनी पुण्यातील चार बांधकाम व्यावसायिकांनी कवडीमोल भावाने विकत घेतल्या असून ते ठेवीदारांचे पैसे परत करण्यास तयार नाहीत.

डी. एस. कुलकर्णी यांनी गंभीर आरोप करताना पुढे म्हटले की, १६ हजार कोटींच्या माझ्या मालमत्ता अवघ्या ८२६ कोटी रुपयांना विकत घेतल्या आहेत. व्ही. टी. पारलेशा, जयंत शहा, अशोक चोरडीया आणि प्रमोद रांका यांनी एनसीएलटीमार्फत या मालमत्ता विकत घेतल्या आहेत.

या गंभीर प्रकाराविरोधात डीएसके सुप्रीम कोर्टात गेले आहेत. सुप्रीम कोर्टाने १० मेपर्यंत या मालमत्ता विकण्यास स्थिगिती दिली आहे, असे डीएसके यांनी म्हटले.डी. एस. कुलकर्णी यांनी म्हटले की, सध्या अंगावरील कपडे सोडता माझ्याकडे काहीच नाही.
मालमत्ता तसेच बँक खाती गोठवली आहेत. मी ठेवीदारांचे पैसे परत कसे देऊ. २०१७ मध्ये एकाच वेळी ३२ हजार
जणांनी माझ्याकडे पैसे मागितले. मी आयुष्यात कधीही खोटे बोललो नाही. माझ्या जमिनी हडप केल्या आहेत.

डी. एस. कुलकर्णी म्हणाले, मी दिवाळखोर नाही. मला गुंतवणुकदारांचे पैसे परत द्यायचेत.आणखी एक महिन्याचा कालावधी दिला असता, तर सर्व मुद्दे निकाली लागले असते. मी पैसे देत होतो. पैसे कमी पडत नव्हते.पण, मला अटक होण्याआधी सर्व बँक खाती गोठवली. माझ्याविरोधात सर्व ठरवून केले गेले.

अंगावरील कपडे सोडता माझ्याकडं काहीच नाही
दरम्यान, सध्या अंगावरील कपडे सोडता माझ्याकडं काहीच नसल्याचे डीएसकेंनी सांगितलं. माझ्या मालमत्ता तसेच बँक खाती गोठवली आहेत. मी ठेवीदारांचे पैसे परत कसे देऊ असा सवालही त्यांनी केला. 2017 मध्ये एकाच वेळी मला 32 हजार जणांनी पैसे मागितल्याचे कुलकर्णी म्हणाले. मी आयुष्यात कधीही खोट बोललो नाही. माझ्या जमिनी हडप केल्याचा आरोप डी.एसकेंनी केलाय.

माझ्याविरोधात सर्व ठरवून केले
मी दिवाळखोर नाही. मला गुंतवणुकदारांचे पैसे परत द्यायचे आहेत असेही डीएसके म्हणाले. माझ्या सर्व मालमत्ता आणि बँकेची खाती गोठवली आहेत असं कुलकर्णी म्हणाले. सध्या अंगावरील कपडे वगळता माझ्याकडे काहीच नाही असे कुलकर्णी म्हणाले. मला आणखी एक महिन्याचा कालावधी दिला असता, तर सर्व मुद्दे निकाली लागले असते. मी पैसे देत होतो असे डीएसके म्हणाले. मला द्यायला थोडेचे पैसे कमी पडत होते. मला अटक होण्याआधी सर्व बँक खाती गोठवण्यात आली होती. माझ्याविरोधात सर्व ठरवून केल्याचे कुलकर्णी म्हणाले.

कुटुंबीयांसह कंपनीतील लोक होते अटकेत

तब्बल पाच वर्षांनंतर डी. एस. कुलकर्णी जामिनावर बाहेर आले आहेत. 2019 मध्ये गुंतवणूकदार आणि बँकांची फसवणूक केल्याच्या आरोपाखाली त्यांना अटक झाली होती, यानंतर आता त्यांची जामिनावर सुटका झाली आहे. गुंतवणूकदारांचे 800 कोटी अजूनही अधांतरी आहेत, येणाऱ्या काळात ते त्यांना परत मिळणार का? याचं उत्तर अद्याप तरी मिळालेलं नाही.फेब्रुवारी 2018 मध्ये डी. एस. कुलकर्णी आणि त्यांच्यासोबत त्यांची पत्नी, मुलगा, मेहुणे आणि जावयासह कंपनीतील लोकांना अटक करण्यात आली होती. ज्या कायद्याअंतर्गत त्यांना अटक करण्यात आली होती, त्या कायद्यानुसार जास्तीत जास्त किती दिवस या आरोपींना न्यायालयात ठेवता येतं? हा निकष न्यायालयाने पाहिला. नेमून दिलेल्या काळापेक्षा अधिक काळ लोटल्यानंतर या सर्वांची जामिनावर सुटका करण्यात आली.

महात्मा गांधी लिखित ‘सत्याग्रह विचार’च्या नव्या आवृत्तीचे दि.२४ एप्रिल रोजी प्रकाशन 

पुणे :
 राष्ट्रपिता महात्मा गांधी लिखित ‘सत्याग्रह विचार’ या पुस्तकाच्या चौथ्या खंडाच्या नव्या आवृत्तीचा प्रकाशन समारंभ बुधवार,दि.२४ एप्रिल रोजी  सायंकाळी ६ वाजता गांधी भवन(कोथरूड) येथे ज्येष्ठ विश्लेषक अशोक चौसाळकर यांच्याहस्ते होणार आहे.महाराष्ट्र गांधी स्मारक निधी आणि युवक क्रांती दलाचे  अध्यक्ष डॉ.कुमार सप्तर्षी हे या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी असणार आहेत.संयोजन समितीच्या वतीने अन्वर राजन,संदीप बर्वे आणि जांबुवंत मनोहर यांनी पत्रकाद्वारे ही माहिती दिली.
महात्मा गांधी यांच्या हत्येनंतर त्यांचे विचार मराठीत यावेत यासाठी महाराष्ट्र गांधी स्मारक निधीचे संस्थापक अध्यक्ष मामासाहेब देवगिरीकर यांनी विशेष प्रयत्न केले.त्यातून ‘सत्याग्रह विचार’ हे पुस्तक प्रकाशित करण्यात आले.प्रथमावृत्तीचे प्रकाशन मामासाहेब देवगिरीकर यांच्याहस्ते झाले  होते.महाराष्ट्र गांधी स्मारक निधीचे द्वितीय अध्यक्ष बाळासाहेब भारदे यांची प्रस्तावना या पुस्तकाला आहे.महात्मा गांधींच्या विचारांचे सार या पुस्तकात आहे. या पुस्तकाचेएकूण २० खंड आहेत.त्यातील चौथ्या खंडाच्या  पाचव्या आवृत्तीचे प्रकाशन या कार्यक्रमात होणार आहे.

धार्मिक ध्रुवीकरण करण्याचा भाजपा व नरेंद्र मोदींचा डाव.

मुंबई, दि. २२ एप्रिल
देशाच्या संपत्तीवर पहिला अधिकार मुस्लिमांचा आहे आहे असे डॉ. मनमोहन सिंह यांनी कधीच म्हटलेले नाही. डॉ. सिंह यांचा हवाला देत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेले विधान असत्य आहे. डॉ. सिंह यांच्या विधानातील एक वाक्य घेऊन नरेंद्र मोदी चुकीची माहिती पसरवत आहेत. मुस्लीम समाजाविरोधात देशातील जनतेमध्ये असंतोष निर्माण करुन आपली राजकीय पोळी भाजण्याचा हा डाव आहे परंतु जनता नरेंद्र मोदींच्या भुलथापांना बळी पडणार नाही, असे काँग्रेस नेते, माजी खासदार डॉ. भालचंद्र मुणगेकर यांनी स्पष्ट केले आहे.
टिळक भवन येथे पत्रकारांशी बोलताना डॉ. भालचंद्र मुणगेकर यांनी नरेंद्र मोदींच्या विधानाचा खरपूस समाचार घेत वस्तुस्थिती मांडली, ते पुढे म्हणाले की, राष्ट्रीय विकास मंडळाच्या ९ डिसेंबर २००६ च्या बैठकीत तत्कालीन पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह असे म्हणाले होते की, “देशातील दलित, आदिवासी, ओबीसी, महिला, मुले यांना विकासाची फळे चाखता आली पाहिजेत तसेच अल्पसंख्याक समाजाला सुद्धा त्याचा फायदा झाला पाहिजे”. डॉ. सिंह यांच्या वक्तव्याचा अर्थ, एससी, एसटी, ओबीसी, अल्पसंख्याक या सर्व समाज घटकांचा पहिला अधिकार आहे असे होता व या बैठकीनंतर अहलुवालिया व आपण पत्रकार परिषद घेऊन माहिती दिली होती. अल्पसंख्याक याचा अर्थ केवळ धार्मिक अल्पसंख्याक एवढाच नाही तर भाषिक अल्पसंख्याक असाही होतो. या बैठकीला सर्व राज्यांचे मुख्यमंत्री होते, त्यात नरेंद्र मोदी गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून उपस्थित होते. “काँग्रेस सत्तेवर आली तर देशाच्या संपत्तीवर मुस्लीमांचा पहिला अधिकार असून जास्त मुले असलेल्या मुस्लीम समाजाला ती वाटतील हे तुम्हाला मान्य आहे का?”, असे चुकीचे विधान करुन पंतप्रधान नरेंद्र मोदींनी धार्मिक ध्रुवीकरण करण्याचा प्रयत्न केला आहे. पंतप्रधान पदावरील व्यक्तीला असे विधान करणे शोभत नाही. लोकसभा निवडणुकीतील १०२ जागांच्या पहिल्या टप्प्यातील मतदान झाले असून भाजपाचा पराभव होणार असल्याचे चित्र स्पष्ट दिसत आहे, ४०० पार चा टप्पा ते गाठू शकत नाहीत त्यामुळे नरेंद्र मोदी निराश झालेले दिसतात.
समान नागरी कायदा हा भाजपाचा १९५२ पासूनचा अजेंडा आहे असे असताना सर्वांना मान्य होईल अशी आचार संहिता भाजपा आजपर्यंत का बनवू शकली नाही? समान नागरी कायद्याच्या बाबतीतही भाजपा जनतेत संभ्रम निर्माण करत आहेत. मुस्लीम समाजाला समान नागरी कायदा मान्य नाही असे चित्र भाजपाकडून सातत्याने निर्माण केले जात आहे. भाजपाचे नेते त्यांच्या संकल्पपत्रावर बोलत नाहीत कारण जनतेचा त्यांच्यावर विश्वास राहिलेला नाही. २०१९ च्या आश्वासनांना त्यांनी ‘चुनावी जुमला’ सांगून जनतेला फसवले आहे. तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधान बनवले हे भाजपाला मान्य नाही म्हणून संविधान बदलण्याची भाषा भाजपा नेते करत आहेत. वाजपेयी सरकार असतानाही संविधान बदलण्याचा प्रयत्न झाला होता. भाजपाचे खासदार अनंतकुमार हेगडे व पंतप्रधान मोदींचे आर्थिक सल्लागार विवेक देबरॉय यांनीही देशाला नवीन संविधानाची गरज आहे असे जाहीरपणे सांगितले आहे. आता संविधान बदलणार नाही असे नरेंद्र मोदी सातत्याने सांगत असले तरी त्यावर कोणीही विश्वास ठेवणार नाही, असेही मुणगेकर म्हणाले.