सुरत-गुजरातमधील सुरत लोकसभा मतदारसंघातून भाजपचे उमेदवार मुकेश दलाल सोमवारी बिनविरोध निवडून आले. वास्तविक येथून काँग्रेसचे उमेदवार नीलेश कुंभानी यांचा अर्ज रद्द करण्यात आला. त्यांच्या अर्जात साक्षीदारांची नावे आणि स्वाक्षऱ्यांमध्ये चूक होती.या जागेवर भाजप आणि काँग्रेससह 10 उमेदवार रिंगणात होते. रविवारी 7 अपक्ष उमेदवारांनी अर्ज मागे घेतले होते. फक्त बसपचे उमेदवार प्यारे लाल भारती राहिले होते, त्यांनी सोमवारी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला. अशा प्रकारे मुकेश दलाल यांची बिनविरोध निवड झाली.
मुकेश दलाल यांनी पहिल्यांदाच सुरतमधून निवडणूक लढवली होती. या जागेवर भाजपच्या दर्शना जरदोश गेल्या तीन टर्मपासून विजयी होत होत्या. मात्र यावेळी त्यांचे तिकीट रद्द करून मुकेश दलाल यांना स्थान देण्यात आले आहे. दलाल हे भाजपचे गुजरात प्रदेशाध्यक्ष सीआर पाटील यांचे निकटवर्तीय आहेत. मुकेश दलाल हे गेल्या 43 वर्षांपासून भारतीय जनता पक्षाशी संबंधित आहेत. ते सलग तीन वेळा या भागातून नगरसेवक राहिले आहेत. याशिवाय भाजप युवा मोर्चातही त्यांनी अनेक महत्त्वाच्या पदांवर काम केले आहे.
गुजरात काँग्रेसचे अध्यक्ष शक्ती सिंह गोहिल म्हणाले, आमची कायदेशीर टीम सर्व पैलूंची चौकशी करत आहे. आधी हायकोर्टात याचिका दाखल करायची की थेट सुप्रीम कोर्टात जायची यावर कायदेशीर टीम विचार करत आहे.
भाजपचे माजी उपमहापौर दिनेश जोधानी यांनी निवडणूक आयोगाकडे काँग्रेसचे उमेदवार नीलेश कुंभानी यांच्या उमेदवारी अर्जात प्रस्तावकांच्या बनावट सह्या झाल्याची तक्रार केली होती. 21 एप्रिल रोजी डीईओ सौरभ पारधी यांनी याप्रकरणी खुलासा मागवत कुंभानींना रविवारी सकाळी 11 वाजेपर्यंतची वेळ दिली होती.
उमेदवारी अर्ज रद्द करण्याबाबत रविवारी जिल्हाधिकारी आणि निवडणूक प्राधिकरणासमोर सुनावणी झाली. फॉर्मवर स्वाक्षरी केलेले चार प्रस्तावकही सुनावणीवेळी गैरहजर होते. यामुळे अखेर निवडणूक अधिकाऱ्यांनी नीलेश कुंभानी यांचा फॉर्म रद्द केला.
बिनविरोध निवड झाल्याबद्दल मुकेश दलाल म्हणाले, ‘मी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि प्रदेशाध्यक्ष सीआर पाटील यांचा आभारी आहे. मी लोकशाही पद्धतीने जिंकलो आहे. मी माझ्या मतदार आणि कार्यकर्त्यांचाही मनापासून आभारी आहे. विरोधकांबद्दल मी एवढेच सांगेन की त्यांच्या अपेक्षेप्रमाणे गोष्टी घडतात तेव्हा त्यांना बरे वाटते. जेव्हा त्यांच्या अपेक्षेविरुद्ध गोष्टी होतात तेव्हा ते लोकशाहीची हत्या म्हणून पाहू लागतात.