Home Blog Page 1081

दत्ता टोळ म्हणजे बाल साहित्य समर्पित जीवन : डॉ. न. म. जोशी 

0

अमरेंद्र भास्कर मराठी बालकुमार साहित्य संस्थेच्या वतीने श्रद्धांजली सभा 

पुणे : दत्ता टोळ पुणे महापालिकेत अधिकार पदावर असताना आपला फावला वेळ आणि निवृत्तीनंतरचे सारे जीवन त्यांनी बालसाहित्याला वाहिले होते, त्या अर्थाने त्यांचे जीवन म्हणजे बालसाहित्य समर्पित साहित्य जीवन होय. बालसाहित्याचे लेखक, प्रकाशक, बालसाहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष आणि नवोदित लेखकांना मार्गदर्शन करणारे उत्साही कार्यकर्ते अशी त्यांची विविध रूपे होती, त्यांच्या निधनाने बालसाहित्याच्या चळवळीत पोकळी निर्माण झाली आहे, अशा शब्दात सुप्रसिद्ध बालसाहित्यिक व शिक्षणतज्ज्ञ डॉ. न. म. जोशी यांनी ज्येष्ठ बालसाहित्यकार दत्ता  टोळ यांना श्रद्धांजली अर्पण केली. 
अमरेंद्र भास्कर मराठी बालकुमार साहित्य संस्थेच्या वतीने शुक्रवार पेठेतील महाराष्ट्र राष्ट्रभाषा प्रचार समितीच्या सभागृहात श्रद्धांजली सभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी माजी महापौर अंकुश काकडे, राजन लाखे, समितीचे संचालक ज. ग. फरे, डॉ. दिलीप गरुड, अनंत टोळ, अभया टोळ, मीरा शिंदे, भरत सुरसे, पं. वसंत गाडगीळ यांनीही श्रद्धांजली वाहिली.
राजन लाखे म्हणाले, दत्ता टोळ यांची कार्यशीली आम्हाला ही संस्था चालवताना मार्गदर्शक ठरेल. अमरेंद्र गाडगीळ हे दता टोळ यांचे गुरु होते. त्यांनी अमरेंद्र दत्त या नावाने ही लेखन केले आहे, असेही त्यांनी सांगितले. टोळ यांचा दीर्घकाळ सहवास लाभलेले पुण्याचे माजी महापौर अंकुश काकडे यांनीही त्यांच्या आठवणींना उजाळा दिला. 

वडगावला पोटोबा महाराजांचे आशीर्वाद घेऊन बारणे यांच्या मावळातील प्रचाराचा शुभारंभ

वडगाव मावळ, दि. 23 एप्रिल – वडगाव मावळ येथील ग्रामदैवत श्री पोटोबा महाराज यांच्या चैत्र पौर्णिमा उत्सवानिमित्त आशीर्वाद घेऊन मावळ लोकसभा मतदारसंघातील शिवसेना- भाजप- राष्ट्रवादी- मनसे- आरपीआय- रासप- मित्रपक्ष महायुतीचे उमेदवार खासदार श्रीरंग बारणे यांनी आज (मंगळवारी) मावळ तालुक्यातील प्रचाराचा शुभारंभ केला.

खासदार बारणे यांनी काल (सोमवारी) उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यानंतर आज मावळ तालुक्यापासून त्यांनी प्रचाराच्या दुसऱ्या फेरीला सुरुवात केली. त्यांच्या समवेत आमदार सुनील शेळके, भाजपचे मावळ तालुका निवडणूक प्रमुख रवींद्र भेगडे, मावळ पंचायत समितीचे माजी सभापती गुलाबराव म्हाळसकर, राष्ट्रवादीचे नेते सुभाष जाधव, गणेश आप्पा ढोरे, शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख शरद हुलावळे, तालुकाप्रमुख राजेश खांडभोर तसेच प्रवीण चव्हाण, सुनील चव्हाण, अविनाश चव्हाण, ॲड. अशोक ढमाले, अरुण चव्हाण, मनोज ढोरे, अविनाश बवरे, दीपक बवरे, अरविंदपंत पिंगळे, चंद्रशेखर भोसले चऱ्होलीकर, तुकाराम ढोरे, सुधाकर ढोरे, अनंता कुडे, मारुती चव्हाण सुनील ढोरे, सुनील मोरे, रवींद्र देशपांडे, नवनाथ हारपुडे आदी पदाधिकारी व महायुतीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

मदन बाफना यांची भेट

माजी राज्यमंत्री मदन बाफना व खासदार बारणे यांची श्री पोटोबा महाराज मंदिराच्या दारात भेट झाली. देवाच्या दारीच आपली भेट झाली, असा मिश्किल शेरा बाफना यांनी यावेळी मारला व बारणे यांना शुभेच्छा दिल्या.

वडगावचे नगराध्यक्ष मयूर ढोरे तसेच सुनील चव्हाण, पंढरीनाथ ढोरे यांच्या निवासस्थानी खासदार बारणे यांनी सदिच्छा भेट दिली. पाच पावली खंडोबा मंदिर तसेच विजय मारुती मंदिर येथे जाऊन त्यांनी दर्शन घेतले. वडगावच्या बाजारपेठेतून प्रचार फेरी काढून त्यांनी मतदारांशी संपर्क साधला. ठिकठिकाणी औक्षण व सत्कार करून बारणे यांना शुभेच्छा देण्यात आल्या.

विकासासाठी सहकार्याचे ग्रामस्थांना आवाहन

कान्हे येथील श्री भैरवनाथ महाराज व श्री हनुमान जयंती उत्सवातही बारणे यांनी हजेरी लावली. त्यावेळी आमदार सुनील शेळके तसेच रवींद्र भेगडे, प्रशांत ढोरे, गुलाब म्हाळसकर, निवृत्ती शेटे, रवींद्र देशपांडे आदी पदाधिकारी व कार्यकर्ते होते. ग्रामस्थांच्या वतीने किशोर सातकर, गिरीश सातकर, राजेंद्र सातकर, सतीश सातकर, बंडोबा सातकर, उत्तम सातकर, देवराम सातकर, स्वप्नील मोढवे, लक्ष्मण ठाकर आदींनी बारणे यांचे स्वागत केले.

आमदार शेळके म्हणाले की, ही गावकी-भावकीची, नात्यागोत्यांची निवडणूक नाही तर देश कोणाच्या हातात द्यायचा, यासाठी मतदान करायचे आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देश झपाट्याने प्रगती करत आहे. देशहितासाठी त्यांनाच पुन्हा पंतप्रधान करणे आवश्यक आहे. खासदार बारणे यांना दिलेले मत हे मोदींना दिलेले मत असणार आहे.

कान्हे येथील रेल्वे उड्डाणपूलाबाबत ग्रामस्थांनी सहकार्याची भूमिका घ्यावी, असे आवाहन खासदार बारणे यांनी केले. मावळात आणखी औद्योगिक विकास होणार असून त्याद्वारे मावळातील युवकांना मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध होईल, असे बारणे यांनी यावेळी सांगितले. देशातील नागरिकांनी विकासाला मतदान करावे, असे आवाहन त्यांनी केले.

कामशेतमध्ये प्रचार फेरी

कामशेत बाजारपेठेतून प्रचारफेरी काढून खासदार बारणे यांनी मतदारांना अभिवादन केले. ढोल-ताशांच्या दणदणाटात निघालेल्या या प्रचारफेरीत आमदार सुनील शेळके, भाजपचे तालुकाध्यक्ष भाऊ गुंड, निवडणूक प्रमुख रवींद्र भेगडे तसेच गुलाब म्हाळसकर, राजाराम शिंदे, निलेश दाभाडे, विजय शिंदे, सरपंच रुपेश गायकवाड, शंकर शिंदे, बाळासाहेब गोरे, संतोष कुंभार, मीनाताई माऊकर, जनाबाई पवार, सुरेखा बच्चे, सारिका शिंदे, सुवर्णा कुंभार, निवृत्ती टाकळकर, जितेंद्र बोत्रे आदी पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. कामशेतकडे जात असताना नायगाव येथे ग्रामस्थांनी बारणे यांचे स्वागत करून त्यांना शुभेच्छा दिल्या.

कार्ला येथे दीपक हुलावळे, सचिन हुलावळे, प्रदीप हुलावळे, वाकसाई येथे माजी सरपंच मारुती येवले तसेच भरत येवले, प्रतीक देसाई, विजय देसाई यांच्या निवासस्थानी खासदार बारणे यांनी सदिच्छा भेट दिली. टाकवे खुर्द येथील श्री काळभैरवनाथ मंदिर येथे उत्सवानिमित्त भेट दिली. त्यावेळी आमदार सुनील शेळके, पुणे जिल्हा दूध उत्पादक संघाचे माजी अध्यक्ष बाळासाहेब नेवाळे आदी मान्यवर उपस्थित होते. ग्रामस्थांच्या वतीने सरपंच तुशांत ढमाले, किसनराव गरुड, संदीप गरुड, सुधीर गरुड, पांडुरंग गरुड, विश्वास ढमाले यांनी खासदार बारणे यांचे स्वागत केले

भाजपाने चावी दिली तेवढेच बोलणाऱ्या एकनाथ शिंदेंनी काँग्रेसवर बोलू नये: नाना पटोले

पक्ष व चिन्ह चोरांना जनता निवडणुकीत जागा दाखवेल.

मुंबई, दि. २३ एप्रिल
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे भारतीय जनता पक्षाने दिलेली स्क्रिप्ट वाचण्यापलीकडे काहीही करु शकत नाहीत. काँग्रेसने दलित व मुस्लीमांचा व्होट बँक म्हणून वापर केला असे बोलण्याआधी एकनाथ शिंदे यांनी अभ्यास करायला हवा. स्वातंत्र्यापासून ६०-६५ वर्ष देशात सर्व जाती धर्माचे लोक भयमुक्त वातावरणात रहात होते ते काँग्रेस सरकारमुळेच. भाजपाच्या राज्यात दलित, आदिवासी, अल्पसंख्याक समाज जीव मुठीत घेऊन जगत आहे ह्याची शिंदे यांना जाणीव नाही. भाजपाने चावी दिली तेवढेच बोलणाऱ्या एकनाथ शिंदेंनी काँग्रेसवर बोलू नये, असा हल्लाबोल महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी केला आहे.

एकनाथ शिंदे यांच्या विधानाचा समाचार घेत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले की, एकनाथ शिंदे यांचे सरकारच असंवैधानिक आहे, भारतीय जनता पक्षाने कट कारस्थान करुन महाविकास आघाडीचे सरकार पाडून एकनाथ शिंदे यांच्या गळ्यात मुख्यमंत्रीपदाची माळ टाकली. शिंदे यांच्याकडे स्वतःचा पक्ष नाही, पक्षाचे चिन्ह नाही, ते सर्व चोरून आणलेले आहे. एकनाथ शिंदे हे भारतीय जनता पक्षाच्या मेहरबानीवर मुख्यमंत्री बनले आहेत, जोपर्यंत शिंदे यांची गरज आहे तोपर्यंत ते त्यांचा वापर करुन घेतील व एकदा का त्यांची गरज संपली की ‘वापरा व फेकून द्या’ प्रमाणे एकनाथ शिंदे यांची अवस्था होईल. एकनाथ शिंदे यांना मोदी-शहांचे गुणगान गावे लागणार आहेत कारण शिंदे यांना त्याशिवाय पर्याय नाही. भाजपा सरकारच्या काळात देशभरात दलित, आदिवासी, अल्पसंख्याक समाजावरील अत्याचार वाढले आहेत याची माहिती मुख्यमंत्री शिंदे यांनी घ्यावी.

राहुल गांधी हे कधीही पंतप्रधान बनू शकणार नाहीत हे एकनाथ शिंदे यांचे विधानही हास्यास्पद आहे. लोकशाही व्यवस्थेत कोण पंतप्रधान होणार, मुख्यमंत्री, मंत्री होणार हे जनतेच्या हातात आहे. राहुल गांधी यांची लोकप्रियता देशातच नाही तर जगभर आहे, देशातील सर्वात जुन्या पक्षाचे ते नेते आहेत, त्यांनी ठरवले असते तर २००४ ते २०१४ या दहा वर्षात ते केंव्हाही पंतप्रधान होऊ शकले असते परंतु ते गांधी आहेत आणि गांधी कुटुंबाला त्याग व बलिदानाची परंपरा आहे. सोनियाजी गांधी यांनी पंतप्रधानपदाचा त्याग केला हे एकनाथ शिंदे यांना माहित नाही का? लोकसभा निवडणुकीनंतर तुमची अवस्था काय असेल त्याची चिंता शिंदे यांनी करावी काँग्रेस पक्ष व राहुल गांधी यांची चिंता करु नये, असा सल्लाही नाना पटोले यांनी दिला.

छात्रपूर्व प्रशिक्षण केंद्रात प्रवेशासाठी मुलाखतीस हजर राहण्याचे आवाहन

पुणे, दि. २३: भारतीय सैन्यदल, नौदल व वायुदलामध्ये अधिकारी पदावर भरतीसाठी होणाऱ्या सर्व्हीस सिलेक्शन बोर्ड परीक्षेची पूर्वतयारी करून घेण्यासाठी पात्र उमेदवारांकरिता छात्रपूर्व प्रशिक्षण केंद्र नाशिकरोड, नाशिक येथे २० मे २९ मे या कालावधीत एसएसबी कोर्स क्रमांक ५७ चे आयोजन करण्यात आले आहे. उमेदवारांनी १५ मेपर्यंत जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय येथे मुलाखतीस हजर राहण्याचे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयाकडून करण्यात आले आहे.

या कोर्ससाठी प्रशिक्षणार्थीची निवास, भोजन आणि प्रशिक्षणाची निःशुल्क सोय करण्यात येणार आहे. केंद्रामध्ये प्रवेश मिळण्यासाठी उमेदवार हा कंम्बाईंड डिफेन्स सर्व्हीसेस एक्झामिनेशन (सीडीएसइ-युपीएससी) अथवा नॅशनल डिफेन्स अॅकेडमी एक्झामिनेशन (एनडीए-युपीएससी) उतीर्णं झालेली असावी. त्यासाठी सर्व्हिसेस सिलेक्शन बोर्ड मुलाखतीसाठी पात्र झालेले असावेत.

उमेदवार एनसीसी सी सर्टिफिकेट ए किंवा बी ग्रेड मध्ये उत्तीर्ण झालेले असावेत व एनसीसी ग्रुप हेडक्वार्टरने एसएसबीसाठी शिफारस केलेली असावी. टेक्नीकल ग्रॅज्युएट कोर्ससाठी एस.एस.बी. मुलाखतीसाठी कॉल लेटर असावे. विद्यापीठ प्रवेश प्रणालीसाठी (युनिर्व्हरसीटी इंट्री स्कीम) एसएसबी कॉल लेटर असावे किंवा एसएसबीसाठी शिफारस केलेल्या यादीत नाव असावे.

पुणे जिल्ह्यातील इच्छुक उमेदवारांनी जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, पुणे येथे १५ मेपर्यंत मुलाखतीस हजर रहावे. मुलाखतीस येण्यापूर्वी उमेदवारांनी डिपार्टमेंट ऑफ सैनिक वेल्फेअर, पुणे (डीएसडब्लू) यांचे संकेतस्थळ https://mahasainik.maharashtra.gov.in वर सर्च करुन त्यामधील एसएसबी ५७ कोर्ससाठी (किंवा संबंधित जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयाने प्रिंट दिलेल्या) प्रवेशपत्र व परिशिष्ठांची प्रत पूर्ण भरून तीन प्रतीत सोबत घेऊन यावी.

अधिक माहीतीसाठी उमेदवारांनी प्रभारी अधिकारी, छात्रपूर्व प्रशिक्षण केंद्र , नाशिक रोड, नाशिक ई-मेल आयडी training.pctcnashik@gmail.com, दूरध्वनी क्रमांक ०२५३-२४५१०३२ तसेच भ्रमणध्वनी क्रमांक ९१५६०७३३०६ येथे संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी लेफ्टनंट कर्नल हंगे स.दै. (नि.) यांनी केले आहे.

केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत सारथी संस्थेच्या २० विद्यार्थ्यांचे यश

पुणे, दि. २३: नुकत्याच जाहीर झालेल्या केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (युपीएससी) नागरी सेवा स्पर्धा परीक्षा २०२३ च्या अंतिम निकालात छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण व मानव विकास संस्थेच्या (सारथी) २० विद्यार्थ्यांची अंतिम गुणवत्ता यादीत निवड झाली आहे, अशी माहिती सारथीचे उपव्यवस्थापकीय संचालक अनिल पवार यांनी दिली आहे.

निवड यादीमध्ये पुणे जिल्ह्यातून ६, नाशिक जिल्ह्यातून ५, अहमदनगर जिल्ह्यातून २ तसेच कोल्हापूर बुलढाणा, जळगाव, अकोला, वाशिम, हिंगोली व सातारा जिल्ह्यातील प्रत्येकी एक विद्यार्थी अशा एकूण २० विद्यार्थ्यांचा समावेश आहे. यामध्ये ४ विद्यार्थिनींचा समावेश आहे.

मराठा, कुणबी, कुणबी-मराठा, मराठा-कुणबी ह्या लक्षित गटाच्या सामाजिक, शैक्षणिक व आर्थिक विकासासाठी काम करते. लक्षित गटातील होतकरु उमेदवारांना स्पर्धा परीक्षांमध्ये यश मिळून विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्याकरीता संस्था प्रयत्न करते. युपीएससी परीक्षेच्या तयारीकरिता विद्यावेतन देवून नवी दिल्ली व पुणे येथील नामांकित प्रशिक्षण संस्थेत निःशुल्क प्रशिक्षणाची संधी उपलब्ध करून देण्यात येते.

मागील तीन वर्षात सारथी संस्थेमार्फत ५८ विद्यार्थी केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या नागरी सेवा स्पर्धा परीक्षेत यशस्वी झाले होते. यावर्षी प्रशिक्षण देण्यात आलेल्या ४५ विद्यार्थ्यांपैकी २० विद्यार्थी यशस्वी झाले असून आतापर्यंत सारथी संस्थेमार्फत एकूण ७८ विद्यार्थी युपीएससी परीक्षेत यशस्वी झाले आहेत.

सारथी संस्थेचे अध्यक्ष अजित निंबाळकर यांनी सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आहे. यशस्वी विद्यार्थ्यांनी उत्तम प्रशासन करून या देशाच्या विकासात महाराष्ट्राचा ठसा उमटावा, अशा शुभेच्छा व्यवस्थापकीय संचालक अशोक काकडे यांनी दिल्या आहेत.
0000

आचारसंहितेचे उल्लंघन करणाऱ्या भाजपा उमेदवार नितीन गडकरींवर कारवाई कधी?: अतुल लोंढे

मुंबई, दि. २३ एप्रिल
भारतीय जनता पक्षाचे नागपूर मतदारसंघाचे उमेदवार नितीन गडकरी यांनी प्रचारासाठी शाळकरी मुलांचा वापर केल्याच्या तक्रारीची दखल घेत निवडणूक आयोगाने NSVM फुलवारी शाळेच्या संचालकावर कारवाई करण्याचे निर्देश दिले, त्याचे स्वागतच आहे परंतु नितीन गडकरी यांच्यावर कारवाई केलेली नाही. शाळा संचालकांना दोषी ठरवून कारवाई होत असताना नितीन गडकरी यांच्यावर कारवाई कधी करणार? असा प्रश्न प्रदेश काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे यांनी केला आहे.

यासंदर्भात माहिती देताना अतुल लोंढे म्हणाले की, दिनांक १ एप्रिल २०२४ रोजी NSVM फुलवारी हायस्कूलच्या विद्यार्थ्यांना दुपारी १२ ते १ वाजण्याच्या दरम्यान वैशाली नगर भागात भाजपा उमेदवार नितीन गडकरींच्या प्रचार रॅलीत सहभागी केले होते. शाळकरी मुलांना राजकीय प्रचारासाठी वापरणे हे चुकीचे व अत्यंत गंभीर आहे. निवडणुकीसंदर्भातील कार्यक्रमात लहान मुलांचा वापर करु नये असे निवडणुक आयोगाचे स्पष्ट निर्देश असतानाही त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले. या प्रकरणी दिनांक ३ एप्रिल २०२४ रोजी राज्य निवडणूक अधिकारी यांना पत्र लिहून काँग्रेस पक्षाच्या मुख्य प्रवक्ता या नात्याने तक्रार दाखल केली होती, या तक्रारीची दखल घेऊन शाळा संचालकांवर कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत ही स्वागतार्ह बाब आहे पण शाळकरी मुलांना प्रचारासाठी बोलावणारे व त्यासाठी शाळेवर दबाव टाकणा-या नितीन गडकरी आणि भाजपावर काहीही कारवाई केलेली नाही. या प्रकरणात नितीन गडकरी आणि शाळेचे संचालक दोघेही दोषी आहेत त्यामुळे नितीन गडकरींवरही कारवाई झाली पाहिजे असे अतुल लोंढे म्हणाले.

भाजपला वेगवेगळ्या ग्रहांवर 800 जागा मिळतील:पराभव दिसत असल्यानेच मोदींनी हिंदू-मुस्लिम मुद्दा काढल्याचा आदित्य यांचा आरोप

पुणे-महाराष्ट्रात उद्योग आले नाही तर उलट महाराष्ट्रातले उद्योग बाहेर गेले आहेत, असे म्हणत उद्धव ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांनी राज्य सरकारवर जोरदार टीका केली आहे. भाजपच्या वतीने या निवडणुकीत 400 पारचा नारा दिला जातोय. याला देखील आमदार आदित्य ठाकरे यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. भाजपला वेगवेगळ्या ग्रहांवर 800 जागा मिळणार असल्याचे म्हणत आदित्य ठाकरे यांनी महायुतीला टोला लगावला आहे. मिंदे सरकार मुळे महाराष्ट्राचा काय फायदा झाला? असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला आहे.

भारतीय जनता पक्षाच्या वतीने अब की बार 400 पारचा नारा दिला जात आहे. मात्र, या वेळी ते 200 पार देखील जाणार नसल्याचे आदित्य ठाकरे यांनी म्हटले आहे. महाविकास आघाडीचे मावळ लोकसभेचे उमेदवार संजोग वाघेरे पाटील ह्यांच्या प्रचारार्थ आदित्य ठाकरे यांच्या जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले होत. या नंतर त्यांनी पत्रकारांशी देखील संवाद साधला.

पहिल्या टप्प्यातील मतदान प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर भाजपच्या वतीने हिंदू – मुस्लिम विषय काढला जात आहे. पहिल्या टप्प्यात त्यांना आपला परभव दिसून आला आहे. त्यामळेच त्यांनी पुन्हा एकदा हिंदू – मुस्लिम मुद्दा पुढे केला असल्याचा दावा आदित्य ठाकरे यांनी केला आहे. आता सध्या हिंदू मुस्लिम या विषयावर भाजपचा प्रचार सुरू असल्याचे आदित्य ठाकरे यांनी म्हटले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेस सरकारवर केलेल्या आरोपाला देखील आदित्य ठाकरे यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले. भाजपला आपला पराभव दिसत असल्यामुळे ते हिंदू – मुस्लिम विषयावर प्रचार करत असल्याचा आरोप आदित्य ठाकरे यांनी केला आहे.

भाजपच्या कार्यकाळामध्ये शेतकऱ्यांना पिक विमा मिळाला नाही. रोजगार मिळाला नाही. आज राज्यातील प्रत्येक नागरिक नाखुश दिसून येतो आहे. त्यामुळेच भारतीय जनता पक्षाच्या वतीने आता पराभव दिसत असल्याने हिंदू मुस्लिम प्रचार केला जात असल्याचा दावा आदित्य ठाकरे यांनी केला आहे. मिंदे सरकारच्या कार्यकाळात महाराष्ट्राचा विकास थांबला असल्याचा आरोप देखील आदित्य ठाकरे यांनी केला आहे.

कसबा पेठ विधानसभा मतदार संघात ३ लाख ८० हजार रुपये जप्त

पुणे, दि. २२: पुणे लोकसभा मतदार संघाअंतर्गत कसबा पेठ विधानसभा मतदार संघात निवडणूक कामासाठी नियुक्त स्थिर सर्वेक्षण पथकामार्फत दुपारच्या सुमारास ३ लाख ८० हजार ५०० रुपये इतकी रक्कम हस्तगत करण्यात आली असल्याची माहिती सहायक निवडणूक निर्णय अधिकारी स्नेहा देवकाते यांनी दिली आहे.

फरासखाना पोलीस स्टेशन अंतर्गत शनिवार वाडा गेटसमोर आज दुपारी १२ वाजता एका इसमाकडून ही रक्कम जप्त करण्यात आली. रकमेबाबत सदर व्यक्तीने योग्य स्पष्टीकरण न दिल्याने ही रक्कम जिल्हा कोषागार कार्यालयात जमा करण्यात आली आहे.

00

हिंमत असेल तर स्टेज तुम्ही निवडा आणि समोरासमोर येऊन चर्चा करा – डॉ. अमोल कोल्हे

विरोधी उमेदवारला डॉ. कोल्हेंचे थेट जाहीर आव्हान

मंचर : विरोधक महागद्दार आहेत हे माहिती होत पण विरोध करण्याचा पोरकट बालिशपणा करत भेकडपणा करतील हे माहिती नव्हतं, अशा शब्दात खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी विरोधकांचा समाचार घेतला.

महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे उमेदवार खासदार अमोल कोल्हे यांच्या प्रचारार्थ मंचर शहरात पदयात्रा आणि कोपरा सभेचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी त्यांच्यासोबत देवदत्त निकम, सुरेश भोर, राजाराम बाणखेले, राजू इनामदार, आलू इनामदार, बाळासाहेब बाणखेले, दत्ता गांजाळे आदी उपस्थित होते.

या पदयात्रेदरम्यान, विरोधकांनी डॉ. अमोल कोल्हे यांच्या विरोधात बॅनरबाजी करत आपला पोरकट बालिशपणा दाखवून दिला. या बालिशपणाचा डॉ. कोल्हे यांनी खरमरती समाचार घेतला.

यावेळी डॉ. कोल्हे म्हणाले की, ज्या मंचर शहराला स्वर्गीय किसनराव बाणखेले यांच्या विचारांचा वारसा आहे, त्या शहरात विरोध करण्याचा पोरकट बालिशपणा करण्यात आला. त्यावरुन हे गद्दार आहेत हे माहिती होत हे इतके भेकड आहेत हे माहीत नव्हतं. स्टेज तुम्ही निवडा आणि समोरासमोर येऊन चर्चा करा आणि एकदा होऊनच जाऊ द्या, असं थेट जाहीर आव्हान विरोधकांना दिल.

कोविड काळात खासदार कुठं होते असं विचारणाऱ्या विरोधकांच खरचं हसू येत, असं सांगत डॉ. कोल्हे म्हणाले की, शिरूर तालुक्यातील पाच लाख नागरिकांचे मोफत लसीकरण करून घेणारा अमोल कोल्हे हा देशातील पहिला खासदार होता. इतकच नव्हे तर फॅबी फ्ल्यु या 105 रुपयांच्या गोळीची किंमत चाळीस रुपयांनी कमी करणाराही खासदार अमोल कोल्हेच होता.

घर कोणाचं, संसार कोणाचा आणि दारावर पाटी कोणाची?

डॉ. कोल्हे यांच्या पदयात्रे दरम्यान,विरोधकांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नावाने घोषणाबाजी करत गोंधळ घालण्याचा प्रयत्न केला. याला प्रत्त्युत्तर देताना डॉ. कोल्हे म्हणाले की, घोषणा जर पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नावाने दिल्या जात असतील, तर मग उमेदवारांनी याच उत्तर द्यावं, त्या पंतप्रधानांच्या हाताखाली काम करणाऱ्या सरकारने आमच्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांवर निर्यात बंदी लादली होती, तेव्हा तुमचं तोंड का शिवल होत, जेव्हा दुधाचे भाव दहा ते बारा रुपयांनी पडले तेव्हा तुमचं तोंड का शिवल होत? बिबटप्रवण क्षेत्रात दिवसा थ्री फ्रेज लाईट का दिली जात नाही हे विचारताना तुमचं तोंड का शिवल होत?

समोरच्या उमेदवारच डमी उमेदवार

माध्यमांमध्ये बातमी वाचली, समोरचा उमेदवार हा डमी उमेदवार आहे. मला फार खंत वाटली असं सांगत डॉ. अमोल कोल्हे यांनी शिवाजीराव आढळराव पाटील यांच्यावर निशाणा साधला. मुख्यमंत्र्यांकडून निधी आणला, म्हणून जे टिमकी वाजवत होते, त्या मुख्यमंत्र्यांच्या मनात यांना उमेदवारी देणंच नव्हतं, अशी बातमी माध्यमांनी दाखवली. मला वाटलं होतं समोरचा उमेदवार हा चॉईसने आलेला उमेदवार असेल, पण हा आता इलाज नाही म्हणून आलेला उमेदवार आहे, अशी बातमी समोर आली.

मी वैयक्तिक टिकेवर गेलो नाही, याचा अर्थ माझ्याकडे पुरावे नाहीत असा नाही

तेव्हा की ठरवलं होतं याविषयी बोलायचं नाही, पण राजकीय सुसंस्कृतपण अपेक्षित असताना, मी कोणत्याही परिस्थितीत पातळी सोडायची नाही, असं ठरवलं होतं. आणि अजूनही ते कसोशीने जपलं आहे. पण अश्या पद्धतीने जर पोरकटपणा दाखवत असाल, तर लक्षात ठेवा गद्दारीचा कधीच विजय होत नाही. पुरावे माझ्याकडे ही आहेत.

महाराष्ट्रातील राम नाईक आणि दत्तात्रय अंबादास मायाळू ऊर्फ राजदत्त यांना पद्मभूषण पुरस्कार प्रदान


नवी दिल्‍ली/मुंबई, 22 एप्रिल 2024

सार्वजनिक कार्य, या क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानासाठी राम नाईक यांना आणि कला क्षेत्रातील योगदानासाठी दत्तात्रय अंबादास मायाळू ऊर्फ राजदत्त यांना आज नवी दिल्ली येथे नागरी पुरस्कार प्रदान सोहळ्यात राष्ट्रपतींकडून पद्मभूषण पुरस्कार प्रदान करून सन्मानित करण्यात आले. राष्ट्रपतींनी डॉ. मनोहर कृष्णा डोळे (मेडीसिन), डॉ. झहीर इशाक काझी (साहित्य आणि शिक्षण) तसेच कल्पना मोरपारिया (व्यापार आणि उद्योग) यांना देखील नागरी पुरस्कार प्रदान सोहळ्यात पद्मश्री पुरस्कार देऊन सन्मानित केले.
महाराष्ट्रातील पुरस्कारविजेत्यांचे जीवन आणि कार्य यावर टाकलेला संक्षिप्त दृष्टीक्षेप पुढीलप्रमाणे आहे:

श्री राम नाईक (पद्मभूषण)

श्री राम नाईक हे एक प्रख्यात राजकारणी आहेत.

महाराष्ट्रातील सांगली येथे 16 एप्रिल 1934 रोजी जन्मलेल्या श्री. नाईक यांनी सांगली जिल्ह्यातील आटपाडी येथे शालेय शिक्षण घेतले, पुणे विद्यापीठातून त्यांनी बी. कॉम. केले आणि मुंबई विद्यापीठातून एल.एल.बीची  पदवी मिळवली. बालपणापासूनच ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (आर.एस.एस.) कार्यकर्ते आहेत. त्यांनी आकर्षक मोबदला देणाऱ्या कारकिर्दीचा त्याग करून 1969 मध्ये भारतीय जनसंघाचे संघटन सचिव म्हणून पूर्णवेळ काम करण्यास सुरुवात केली. तेव्हापासून त्यांनी आपले संपूर्ण जीवन जनसेवेसाठी समर्पित केले आहे.

श्री. नाईक हे मुंबईत सलग आठ निवडणुका जिंकणारे एकमेव व्यक्ती आहेत, जे बोरिवली विधानसभा मतदारसंघातून सलग तीन वेळा (1978-1985)आमदार म्हणून विजयी झाले आणि उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघातून सलग पाच वेळा(1989-2004) खासदार म्हणून विजयी झाले. मतदारांसमोर वार्षिक कामगिरी अहवाल सादर करून श्री. नाईक यांनी उत्तरदायित्वाच्या लोकशाही सिद्धांताचे पालन केले आणि 2014 मध्ये उत्तर प्रदेशचे राज्यपाल झाल्यानंतरही ही पद्धत त्यांनी कायम ठेवली. मुंबई शहराचे इंग्रजीमध्ये बॉम्बे आणि हिंदीमधील बंबई  हे नाव बदलून त्या ऐवजी मुंबई हे मूळ मराठी नाव करण्यासाठी सरकारवर दबाव आणण्यात त्यांना यश मिळाले. उत्तर प्रदेशचे राज्यपाल म्हणून त्यांनी अलाहाबादचे नाव प्रयागराज आणि फैझाबादचे नाव अयोध्या असे बदलले. 1992 पासून संसदेत ‘वंदे मातरम्’ आणि ‘जन गण मन’ गायनाची प्रथा सुरू करण्यामध्ये त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. त्यांच्या पुढाकाराने 24 जानेवारी हा दिवस उत्तर प्रदेश दिन म्हणून जाहीर करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेण्यात आला. MPLADS अर्थात खासदार निधी ही त्यांची संकल्पना असून त्यामुळे प्रत्येक खासदाराला आपापल्या मतदारसंघात लहान विकास प्रकल्प हाती घेणे शक्य झाले. स्तनपानाचा प्रसार आणि ‘बेबी फूड’च्या जाहिरातींवर बंदी घालणारे त्यांचे खाजगी सदस्याचे विधेयक सरकारने स्वीकृत केले आणि त्याचा कायदा तयार झाला.

श्री. नाईक हे रेल्वे प्रवासी संघटनेचे कार्यकर्ते असून ते रेल्वे राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) झाले. त्यांनी रेल्वे व्यतिरिक्त गृहराज्यमंत्रीपद, नियोजन आणि कार्यक्रम अंमलबजावणी तसेच संसदीय कामकाज राज्यमंत्रीपदही भूषवले आहे. सुमारे 80 लाख मुंबईकर प्रवाशांच्या कल्याणासाठी त्यांनी मुंबई रेल विकास कॉर्पोरेशन(MRVC)ची स्थापना केली. मुंबईमध्ये जगातील पहिली महिला विशेष उपनगरी रेल्वेगाडी सुरू करण्यामध्ये त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायूमंत्री म्हणून त्यांची कारकीर्द भारतातील पेट्रोलियम क्षेत्राचे सुवर्णयुग म्हणून ओळखली जाते. त्यांनी देशात इंधनामध्ये इथेनॉल मिसळण्याची सुरुवात केली. त्यांच्या कार्यकाळात कारगील युद्ध आणि संसद हल्ल्यातील हुतात्म्यांच्या विधवांना/ अवलंबून असणाऱ्यांना 439 पेट्रोल पंप आणि एलपीजी वितरकपदांचे वितरण करण्यात आले.

श्री. नाईक यांनी मच्छिमार, कुष्ठरोग पीडित व्यक्ती आणि तारापूर अणुऊर्जा प्रकल्प 3 व 4 यांमुळे प्रकल्पग्रस्त व्यक्तींच्या समस्यांसाठी देखील आवाज उठवला आहे. स्वातंत्र्यानंतर 50 वर्षांनी त्यांनी मनोरी-गोराई बेटांना समुद्राखालून पाईपलाईन नेऊन पाणीपुरवठा केला आणि समुद्रात टॉवर उभारून अर्नाळा बेटावरील किल्ल्याला वीजपुरवठा केला. त्यामुळे मच्छिमार बांधव त्यांना प्रेमाने प्रकाशदाता म्हणून हाक मारतात. त्यांनी मराठी दैनिक सकाळमध्ये त्यांचे आत्मचरित्र देखील लिहिले. त्यांचे एकत्रिकरण करण्यात आले आणि ‘चरैवेती चरैवेती!!’ या नावाने पुस्तक प्रकाशित करण्यात आले.

महाराष्ट्र सरकारचा लक्ष्मीबाई टिळक आत्मचरित्र पुरस्कार, उत्तर प्रदेशातील हिंदी-ऊर्दू साहित्य पुरस्कार समितीचा साहित्य शिरोमणी पुरस्कार यांसारख्या अनेक साहित्य पुरस्कारांचे श्री. नाईक हे मानकरी आहेत. कांची कामकोटी पीठमच्या जगद्गुरू शंकराचार्यांचा राष्ट्रीय महत्त्व पुरस्कार, सामाजिक परिवर्तनासाठी  ‘चॅम्पियन ऑफ चेंज’ हा महाराष्ट्र पुरस्कार, जीवन साधना, पुण्याच्या सावित्रीबाई फुले विद्यापीठाचा जीवन साधना गौरव पुरस्कार यांसारख्या अनेक पुरस्कारांचे देखील ते मानकरी आहेत.

श्री. दत्तात्रय अंबादास मायाळू ऊर्फ राजदत्त (पद्मभूषण)

श्री. दत्तात्रय अंबादास मायाळू ऊर्फ राजदत्त हे अशा प्रणेत्यांपैकी एक आहेत ज्यांच्या कार्यामुळे मराठी चित्रपट खऱ्या अर्थाने आंतरराष्ट्रीय स्तरापर्यंत पोहोचला आहे. “चित्रपट हे केवळ मनोरंजनासाठी नाहीत तर सामाजिक संदेश देण्यासाठी आणि समाजात सकारात्मक बदल घडवण्यासाठी एक प्रभावी साधन म्हणूनही त्यांचा वापर होऊ शकतो.” हा विचार मनात ठेवून त्यांनी मराठी चित्रपट उद्योगात एखाद्या योग्याप्रमाणे 60 वर्षांहून अधिक काळ काम केले आहे.

21 जानेवारी 1932 मध्ये अमरावती जिल्ह्यातील धामणगाव येथे जन्म झालेल्या राजदत्त यांनी वर्धा येथील जीएस कॉलेज ऑफ कॉमर्स मधून बी.कॉम. पर्यंतचे शिक्षण घेतले. बालपणापासूनच  ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे(आरएसएस) स्वयंसेवक राहिले आहेत.

श्री राजदत्त यांनी आचार्य विनोबा भावे( पवनार आश्रम) यांच्या कार्यात सहभाग घेतला. ते प्राध्यापक ठाकूरदास बंग यांच्यासोबत सेवाग्रामजवळच्या गोपुरी कुष्ठरोग केंद्र आणि बाबा आमटे यांच्या आनंदवन आश्रमात जाऊन कुष्ठरोग्यांची सेवा करत असत. गोवा मुक्ती संग्राम आणि दादरा नगर हवेली चळवळीत सहभागी झालेले ते एक स्वातंत्र्यसैनिक आहेत. त्यांनी अडीच महिन्यांचा तुरुंगवास भोगला. पदवीधर झाल्यानंतर दैनिक तरुण भारतमध्ये त्यांनी पत्रकार म्हणून आणि दैनिक भारत पुणे मध्ये सहाय्यक संपादक म्हणून काम केले. 

मद्रास (चेन्नई) येथे ‘चांदोबा’ या बाल मासिकासाठीही त्यांनी काम केले. येथे त्यांनी त्यांचे गुरू चित्रपट दिग्दर्शक राजा परांजपे यांची भेट घेतली आणि 7 वर्षे त्यांच्यासोबत काम केले. गुरुदक्षिणा म्हणून त्यांनी त्यांच्या गुरूच्या नावावरून ‘राज’ आणि स्वतःच्या नावावरून ‘दत्त’ असे राजदत्त या टोपणनावाने 1967 पासून स्वतंत्रपणे चित्रपट दिग्दर्शित करण्यास सुरुवात केली. त्यांनी 30 हून अधिक चित्रपट (मराठी आणि हिंदी) दिग्दर्शित केले. मधुचंद्र, देवकी नंदन गोपाला, शापित, पुढचं पाऊल, अष्टविनायक, माफीचा साक्षीदार, अंजाम, दूरी, सर्जा आदि त्यापैकी काही चित्रपट आहेत.

राजदत्त यांनी गोट्या, विनायक दामोदर सावरकर, राजगड, दुर्गा भागवत, डॉ. पंजाबराव देशमुख आणि इतर अनेक मालिका, टेलिफिल्म्स, माहितीपट दिग्दर्शित केले आहेत. त्यांनी अनुदान समितीचे ज्युरी सदस्य म्हणून काम केले असून ‘जागतिक मराठी परिषदे’साठी त्यांनी महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. ‘आनंद वनभुवनी’ या दिमाखदार लाईट अँड साउंड स्टेज शोचे दिग्दर्शनही त्यांनी केले. ‘आरएसएस’ची सांस्कृतिक शाखा असलेल्या संस्कार भारतीचे ते 10 वर्षांपासून अध्यक्ष आहेत. वयाच्या 92व्या वर्षीही ते आपली आवड जोपासत असून सिनेसृष्टीत त्यांनी ‘अभिनयाची’ दुसरी इनिंग सुरू केली आहे. 

श्री राजदत्त यांना मराठीतील सर्वोत्कृष्ट फिचर फिल्मसाठी तीन ‘राष्ट्रीय पुरस्कार’ मिळाले- शापित 1982; पुढचं पाऊल 1985 आणि सर्जा 1987, या तीन चित्रपटांसाठी राष्ट्रीय पुरस्कारांसह त्यांना 13 महाराष्ट्र राज्य चित्रपट पुरस्कार, शापितसाठी फिल्मफेअर पुरस्कार, व्ही. शांताराम पुरस्कार, झी गौरव जीवनगौरव पुरस्कार, नवरत्न पुरस्कार, राजकमल कला मंदिर व्ही. शांताराम पुरस्कार, राजा परांजपे प्रतिष्ठान पुरस्कार, ग.दि.माडगूळकर आणि इतर अनेक पुरस्कार प्राप्त झाले आहेत. रशियन कौन्सिलने शापित साठी राज दत्त यांचा सत्कार केला. ताश्कंद, व्हेनिस आणि कॉर्क महोत्सवात त्यांचे तीन चित्रपट निवडले गेले आणि ते दोनदा ‘राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांच्या’ ज्युरी सदस्यांपैकी एक होते.

डॉ. मनोहर कृष्ण डोळे (पद्मश्री)

डॉ. मनोहर कृष्ण डोळे हे एक अनुकरणीय व्यक्तिमत्व आहे, ज्यांनी ग्रामीण भारतातील वंचित आणि आदिवासी समुदायांना मोफत नेत्रसेवा देण्यासाठी आपले जीवन समर्पित केले आहे.

22 नोव्हेंबर 1928 रोजी पुण्यातील एका मध्यमवर्गीय कुटुंबात जन्मलेल्या डॉ. डोळे यांनी 1953 मध्ये पुणे विद्यापीठातून आयुर्वेदात पदवी संपादन केली. मूलभूत आरोग्य सेवा पायाभूत सुविधा उभारून प्रदेशातील आरोग्य सुविधांची कमतरता दूर करण्यासाठी त्यांनी 31व्या वर्षी शहरापासून 80 किमी दूर डोंगराळ आणि दुर्गम जुन्नर तालुक्यातील नारायणगाव या गावात जाण्याचा निर्णय घेतला. स्वत: नेत्र शल्यचिकित्सक नसले तरी, मोतीबिंदूमुळे होणारे अंधत्व ही या प्रदेशाची मुख्य समस्या असल्याचे त्यांच्या लक्षात आले आणि त्यांनी तेथे 1982 मध्ये मोहन ठुसे नेत्र रुग्णालय आणि संशोधन संस्था स्थापन केली. रुग्णालयाने ग्रामीण महाराष्ट्रातील कमी वस्तीच्या दुर्गम भागात  मोफत मासिक नेत्रतपासणी शिबिरे आयोजित केली. याद्वारे, त्यांनी रुग्ण ओळखून फिरत्या नेत्र देखभाल व्हॅनद्वारे त्यांच्यावर शस्त्रक्रिया, लेन्स बसवणे, शस्त्रक्रियापूर्व आणि पश्चात तपासणी आणि चष्म्यासह सर्व वैद्यकीय उपचार तसेच त्यांना भोजन, निवास आणि समुपदेशन प्रदान करून दृष्टिदोष दूर झालेल्या रुग्णांना त्यांच्या घरी परत सोडण्याची विनामूल्य व्यवस्था केली. महाराष्ट्रातील ग्रामीण आणि दुर्गम भागात दारोदारी जाऊन 25,000 हून अधिक मोफत नेत्र तपासणी शिबीरे भरवली आहेत. या रुग्णालयाने ग्रामीण महाराष्ट्रातील 1.5 कोटींहून अधिक रुग्णांची तपासणी केली आहे आणि आदिवासी जाती-जमातीतील 1,75,000 हून अधिक आदिवासी व्यक्तीवर आणि पश्चिम महाराष्ट्रातील पाच जिल्ह्यांतील दुर्गम भागात राहणाऱ्यांच्या  पूर्णपणे मोफत नेत्र शस्त्रक्रिया केल्या आहेत.

या क्षेत्रातील डॉ. डोळे यांच्या प्रयत्नांची दखल घेत, टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस आणि अमेरिकेच्या रॉकफेलर फाउंडेशन यांनी संशोधन क्षमता विकसित करण्यासाठी जागतिक स्तरावर 6,000 संस्थांपैकी 40 संस्थांपैकी एक म्हणून या प्रकल्पाची निवड केली. याशिवाय जागतिक बँकेने 14 लाख रुपयांचे अनुदान दिले आहे. ग्रामीण भागातील पहिली रक्तपेढी आणि नेत्रपेढी त्यांनी स्थापन केली. मोतीबिंदूच्या शस्त्रक्रिया न करणाऱ्या प्रदेशातील प्राथमिक आरोग्य सेवा केंद्रांतील रूग्णांवर हे रूग्णालय उपचार करते. महिला रूग्णांवर उपचार करण्यावर विशेष लक्ष केंद्रित केले जात आहे, कारण महिलांमध्ये मोतीबिंदूचे प्रमाण अधिक आहे. केंद्र सरकारच्या ‘नॅशनल प्रोग्रॅम फॉर कंट्रोल ऑफ ब्लाइंडनेस’ (एनपीसीबी) अर्थात राष्ट्रीय अंधत्व नियंत्रण कार्यक्रमांतर्गत 1976 मध्ये स्थापन करण्यात आलेल्या पहिल्या प्रकल्पांपैकी हा एक प्रकल्प आहे. वर्ष 2000 पासून, याद्वारे मोतीबिंदू शस्त्रक्रिया प्रशिक्षणाचा दोन वर्षांचा यशस्वी अधिछात्रवृत्ती (फेलोशिप) कार्यक्रम पूर्ण केलेले 250 अधिछात्र (फेलो) आहेत.

डॉ. डोळे यांचे रुग्णालय हे नेत्र प्रत्यारोपणासाठी एक अग्रणी संस्था असून ग्रामीण भागातील पहिली रक्तपेढी आणि नेत्रपेढी येथे आहे. ही नेत्रपेढी देशभरातील 100 नेत्रपेढीच्या साखळीचा एक भाग असून ती नागपूरच्या गुरुजी नेत्रपेढी द्वारे चालवली जाते. डॉ. डोळे यांनी, संबंधित क्षेत्रीय संशोधनानंतर आणि सुनियोजित पद्धतीने, नेत्र तपासणी शिबिरे (अगदी सुदूर आणि दुर्गम भागातही) आयोजित केली. याचा सर्वसामान्य भारतीय नागरिकांना मोठा फायदा झाला.

डॉ. डोळे यांना अनेक सन्मान आणि पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे, ज्यात राष्ट्रीय टिळक महाराष्ट्र विद्यापीठातर्फे सामाजिक कार्यातील उल्लेखनीय योगदानासाठी 2014 साली डी लिट पदवी, 2016 साली शिवनेरी भूषण पुरस्कार,
2008 साली सर्वाधिक मोतीबिंदू शस्त्रक्रिया करून सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय योगदानासाठी महाराष्ट्र राज्यसरकारतर्फे सत्कार,
2006 चा सामाजिक कार्यातील उल्लेखनीय योगदानासाठी महाराष्ट्र राज्य सरकारचा आणि पुणे महानगरपालिकेतर्फे दिला जाणारा नागरी पुरस्कार या पुरस्कारांचा समावेश आहे. 

डॉ. झहीर इशाक काझी (पद्मश्री) 

डॉ. झहीर इशाक काझी हे 1874 मध्ये स्थापन झालेल्या देशातील सर्वात मोठ्या अल्पसंख्याकांच्या शैक्षणिक समूह अंजुमन-इ-इस्लामचे अध्यक्ष आहेत. ते शिक्षण, साहित्य आणि वैद्यकीय क्षेत्रातील त्यांच्या उल्लेखनीय योगदानासाठी प्रसिद्ध आहेत.

26 जानेवारी 1954 रोजी जन्मलेल्या डॉ. काझी यांनी गोवा वैद्यकीय महाविद्यालयातून (मुंबई विद्यापीठ) एमबीबीएस पदवी संपादन केली आणि नंतर मुंबईतील टोपीवाला वैद्यकीय महाविद्यालय आणि नायर रुग्णालयातून रेडिओलॉजी आणि डीएमआरडीमध्ये पदव्युत्तर एमडी पूर्ण केले. त्यांना नंतर एफ.एम.आर.आय – अमेरिकेच्या फिलाडेल्फिया येथील पेनसिल्व्हानिया विद्यापीठ आणि एम.ए.आय.यु.एम – प्रिसेप्टर अल्ट्रासाऊंड – अमेरिकेच्या फिलाडेल्फिया येथील थॉमस जेफरसन विद्यापीठ यांच्या फेलोशिप कार्यक्रमाद्वारे त्यांना सन्मानित करण्यात आले. 

ते बॉम्बे रुग्णालय आणि हिंदुजा रुग्णालयासह मुंबईच्या प्रतिष्ठित रुग्णालयांशी जोडलेले आहेत. त्यांनी आरोग्य मंत्रालयाच्या अंतर्गत सौदी अरेबियातील मदिना येथील किंग फहद रुग्णालयात रेडिओलॉजिस्ट म्हणूनही काम केले आहे. 

डॉ. काझी यांचा अंजुमन-ए-इस्लामसोबतचा 30 वर्षांचा परिवर्तन घडवणारा प्रवास जनरल कौन्सिलपासून सुरू झाला, जिथे त्यांनी तिब्बिया वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयाचे अध्यक्ष म्हणून तसेच साडेतीन वर्षे मानद सरचिटणीस या महत्त्वाच्या भूमिका पार पाडल्या. त्यांच्या अध्यक्षपदाच्या कार्यकाळात अंजुमन-ए-इस्लामने विस्तार, बळकटीकरण आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे उत्कृष्टता याद्वारे विविध स्वरूपात मोठा विकास साधला आहे. त्यांच्या कार्यकाळात नवीन संस्था सुरु झाल्या. विद्यमान संस्थांमध्ये नवीन अभ्यासक्रम तसेच विद्यार्थ्यांच्या संख्येत वाढ झाली. सर्व संस्थांना प्राधिकरणाकडून मान्यता मिळण्यासाठी प्रेरित करण्यात त्यांनी महत्वाची भूमिका बजावली. त्यांनी आपल्या दूरदृष्टीतून, महिलांसाठीच्या दोन अनाथाश्रमांचे, एक मुंबईतील अंधेरी परिसरातील वर्सोवा आणि दुसरे पुण्यातील बंड गार्डन येथील अनाथाश्रमांचे बाल न्याय कायद्याच्या अनुषंगाने महिलांसाठी ‘ए’ श्रेणीच्या आश्रमात रूपांतर केले. 85% पेक्षा जास्त महिलांची संस्था प्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात त्यांनी घेतलेला पुढाकार हा खऱ्या अर्थाने महिलांच्या सक्षमीकरणाचे प्रतीक आहे. गेल्या 15 वर्षांत अध्यक्ष म्हणून त्यांच्या दूरदर्शी नेतृत्वाने संस्थेला राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय ब्रँड म्हणून ओळख मिळवून दिली. त्यांनी आर्थिक स्थैर्याकडे लक्ष दिले, प्रक्रिया  सुव्यवस्थित केल्या, अमेरिका आणि ब्रिटन मध्ये (ओव्हरसीज फ्रेंड्स ऑफ अंजुमन – ओएफए) परदेशी संस्थांची स्थापना केली आणि मॅसॅच्युसेट्स इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (एमआयटी), अमेरिका आणि वेस्टमिन्स्टर विद्यापीठ, ब्रिटन यांसारख्या प्रतिष्ठित परदेशी विद्यापीठांबरोबर काम केले.

डॉ. काझी यांची कायम उत्कृष्ट कामगिरी राहिली आहे, त्यांनी महाराष्ट्र आणि गोवा राज्यांसाठी तसेच भारत सरकारसाठी विविध समित्यांवर प्रतिष्ठित पदे भूषवली आहेत. त्यांनी अल्पसंख्याक शिक्षणाच्या राष्ट्रीय देखरेख समितीचे अध्यक्ष म्हणून काम केले आहे आणि केंद्र सरकारच्या शिक्षण मंत्रालयाच्या अल्पसंख्याक योजनांच्या अंमलबजावणीवर देखरेख ठेवणाऱ्या उपसमितीचे नेतृत्व केले आहे. महाराष्ट्र सरकारच्या अल्पसंख्याक शिक्षण विकास समितीचे सदस्य म्हणूनही त्यांचे महत्त्वपूर्ण योगदान आहे. मुंबईतील शूरपार्का एज्युकेशनल अँड मेडिकल ट्रस्टचे अध्यक्ष, ठाण्यातील आयडियल एज्युकेशन ट्रस्टचे अध्यक्ष आणि गोव्यातील गोवा विद्या प्रसारक मंडळाचे एक प्रतिष्ठित सदस्य म्हणून त्यांनी शैक्षणिक आणि सामाजिक क्षेत्रात  महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. मुंबई विद्यापीठाच्या सिनेटचे सदस्य म्हणून त्यांची व्यवस्थापन श्रेणीत निवड करण्यात आली.

डॉ. काझी यांना विविध राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पुरस्कारांनी गौरवण्यात आले आहे. भारतीय वैद्यकीय शिक्षण प्रणालीच्या क्षेत्रातील महत्त्वपूर्ण योगदानासाठी त्यांना भारत सरकारच्या आयुष मंत्रालयाने “जीवन गौरव पुरस्कार” देऊन सन्मानित केले. 2015 मध्ये ‘जायंट्स इंटरनॅशनल’ने शिक्षण क्षेत्रातील अनुकरणीय कार्यासाठी त्यांना पुरस्कार देऊन सन्मानित केले. अलीगढ मुस्लिम विद्यापीठाने त्यांना 2020 मध्ये ‘सर सय्यद उत्कृष्टता  राष्ट्रीय पुरस्कारा’ने सन्मानित केले.

कल्पना मोरपारिया (पद्मश्री)

कल्पना मोरपारिया या  भारताच्या बँकिंग क्षेत्रातील एक प्रतिष्ठित व्यक्तिमत्व असून त्यांची चार दशकांहून अधिक काळ अशी उल्लेखनीय  कारकीर्द आहे. या काळात त्यांनी वित्तीय सेवांमध्ये असाधारण नेतृत्व आणि कौशल्य दाखवले. मुंबई विद्यापीठातून कायदा आणि विज्ञानमध्ये पदवी शिक्षण पूर्ण केलेल्या कल्पना मोरपारिया यांनी व्यावसायिक क्षेत्रात  उल्लेखनीय कामगिरी केली आहे.

30 मे 1949 रोजी जन्मलेल्या मोरपारिया यांचा जेपी मॉर्गन या वित्त विषयक संस्थेच्या भारताच्या मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून कार्यकाळ, कॉर्पोरेट सेवा केंद्रे आणि नंतर आसियान  देशांच्या कामांची जबाबदारी त्यांचे  धोरणात्मक कौशल्य आणि ग्राहक सेवेप्रति वचनबद्धतेचे उदाहरण आहे. विविध व्यवसाय विभाग एकत्रित करण्यात, नेतृत्व विकासाला चालना देण्यात आणि अंतर्गत हितधारकांमध्ये समन्वय प्रस्थापित करण्यात त्यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली.

जेपी मॉर्गन मध्ये महत्वपूर्ण योगदान देण्यापूर्वी मोरपारिया यांची आयसीआयसीआय बँकेत उल्लेखनीय कारकीर्द राहिली आहे, जिथे त्या लीगल असोसिएट पदावरून संयुक्त व्यवस्थापकीय संचालक पदापर्यंत पोहचल्या, जे भारताच्या वित्तीय परिदृश्यात त्यांचे  महत्त्वपूर्ण योगदान अधोरेखित करते. ट्रेझरी स्थापन करण्यापासून ते नियामक संबंध, गुंतवणूकदार संबंध, अडचणीत सापडलेल्या मालमत्तेसाठी (दाभोळ पॉवर कंपनीसह) उपाययोजना आणि आयसीआयसीआय समूहाच्या मुख्य प्रवक्त्या म्हणून काम करण्यापर्यंतच्या अनेक जबाबदाऱ्या त्यांनी कुशलतेने पार पाडल्या. विलीनीकरणातील त्यांच्या महत्त्वपूर्ण भूमिकेमुळे आयसीआयसीआय बँक त्यावेळची भारतातील दुसऱ्या क्रमांकाची सर्वात मोठी बँक बनली आणि एक दूरदर्शी नेता म्हणून त्यांची ओळख अधिक दृढ झाली.

कार्यकारी भूमिकांव्यतिरिक्त, मोरपारिया यांनी डॉ. रेड्डीज लॅबोरेटरीज लिमिटेड, हिंदुस्तान युनिलिव्हर लिमिटेड, एचएसबीसी होल्डिंग्स पीएलसी, आणि फिलिप मॉरिस इंटरनॅशनल इंक यांसारख्या प्रमुख कंपन्यांच्या संचालक मंडळावर स्वतंत्र संचालक म्हणून अमूल्य योगदान दिले आहे. शिक्षण, कौशल्य विकास आणि लेखा परीक्षण गुणवत्ता वाढीवर केंद्रित प्रशासकीय मंडळे आणि परिषदांमध्ये कार्यरत असतानाच मानवतावादी उपक्रमांमध्ये त्यांचा सक्रिय सहभाग राहिला आहे. या काळात, कंपनी कायदा, कॉर्पोरेट प्रशासन आणि मर्यादित दायित्व भागीदारी या क्षेत्रांमध्ये भारत सरकारने स्थापन केलेल्या अनेक समित्यांच्या त्या प्रमुख सदस्य होत्या. भारताचे नियंत्रक आणि महालेखा परीक्षक यांनी स्थापन केलेल्या लेखापरीक्षण सल्लागार मंडळाच्याही त्या सदस्य होत्या.

कल्पना यांच्या उत्कृष्ट कामगिरीला व्यापक मान्यता मिळाली आहे. 2006 मध्ये फोर्ब्स मॅगझिनने ‘100 सर्वात शक्तिशाली महिला’ पैकी एक आणि 2008 मध्ये फॉर्च्यून मॅगझिनने आंतरराष्ट्रीय व्यापारातील 50 सर्वात शक्तिशाली महिलांपैकी एक म्हणून त्यांना गौरवले होते. बिझनेस टुडे द्वारे सात वर्षे त्या  भारतीय व्यवसायातील 25 सर्वात शक्तिशाली महिलांपैकी एक होत्या. 2013 मध्ये त्यांना  12व्या केल्विनेटर GR8 महिला पुरस्काराने सन्मानित करण्यात आले; 2013 मध्ये व्यवसायातील नेतृत्वासाठी लॉरिअल पॅरिस फेमिना महिला पुरस्कार; 2011 मध्ये युवा अनस्टॉपेबल यूथ आयकॉन पुरस्कार; फिक्की फ्लो द्वारा वुमन फिलांथ्रोपिस्ट पुरस्कार 2010-2011; ‘एशिया सेंटर फॉर कॉर्पोरेट गव्हर्नन्स अँड सस्टेनेबिलिटी’ द्वारे सर्वोत्कृष्ट महिला संचालक पुरस्कार 2013 पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. ‘बॉम्बे मॅनेजमेंट असोसिएशन फॉर मॅनेजमेंट वुमन अचिव्हर ऑफ द इयर 2012-2013’ आणि ‘असोसिएशन ऑफ इंटरनॅशनल वेल्थ मॅनेजमेंट ऑफ इंडिया’ द्वारे 2019 साठी वित्त क्षेत्रातील भारताच्या अव्वल 100 महिला म्हणून देखील त्यांना सन्मानित करण्यात आले आहे.

मोहोळ खासदार झाल्यावर गुन्हेगारांना पाठीशी घालतील…

काँग्रेस प्रवक्ते‌ अतुल लोंढे यांची‌ टीका

पुणे-देशासाठी मेडल जिंकणाऱ्या महिला कुस्ती पट्टूवर अत्याचार करणाऱ्या ब्रिजभूषनसिंग‌ यांचा सत्कार करणारे मुरलीधर मोहोळ जर उद्या खासदार झाले‌ तर ते महिलांवर अत्याचार करणाऱ्या गुन्हेगारांच्या पाठीशी उभे राहतील, अशी घाणाघाती टीका काँग्रेसचे प्रदेश प्रवक्ते‌ अतुल लोंढे यांनी केली.

पुणे लोकसभेचे महाविकास आघाडी व इंडिया आघाडीचे उमेदवार आ. रविंद्र धंगेकर यांच्या प्रचारार्थ काँग्रेस भवन येथे आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत लोंढे बोलत होते. यावेळी काँग्रेस शहर अध्यक्ष व निवडणूक समन्वयक अरविंद शिंदे, प्रदेश उपाध्यक्ष व लोकसभा निवडणूक प्रचारप्रमुख मोहन जोशी,  ॲडअभय छाजेड, कमल व्यवहारे, संजय बालगुडे, वीरेंद्र किराड,गोपाल तिवारी इत्यादी  उपस्थित होते.

लोंढे म्हणाले, मोहोळ यांना महापालिकेचे‌ स्थायी‌समिती अध्यक्षपद मिळाले, महापौर पद मिळाले, या काळात त्यांनी पुणेकरांसाठी काहीच केले नाही. त्यांच्या‌ काळातील समान पाणी पुरवठा योजनेचे काय झाले ? टक्केवारी न देणारा ठेकेदार मोहोळ यांना मिळाला नाही त्यामुळे जायकाचा पैसा दोन वेळा परत गेला. महिलांच्या सॅनेटरी नॅपकीनलाही ठेकेदार मिळाला नाही. महापालिकेचा कारभार करताना पुणेकरांना सेवा सुविधा देण्यास भाजप आणि मोहोळ अपयशी ठरले आहेत. देशात दहा वर्षात काहीच न केल्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुरलीधर मोहोळ यांच्याकडे दाखवण्यासारखे काहीच नाही. ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे, विश्वंभर चौधरी आणि अॅड. आसिम सरोदे यांना मारणाऱ्यांमध्ये मोहोळ यांच्या पुतण्याचा समावेश होता, त्यामुळे ते खासदार झाल्यावर पुणेकर कसे सुरक्षित राहतील ? असा‌ सवालही लोंढे यांनी केला.

संविधानाची तोडफोड केली जात आहे. ईडी, सीबीआय या संस्थांचा अमर्याद वापर करून राज्यपालांच्या मदतीने राजकीय अस्वस्थता निर्माण केली जात आहे. जाती धर्मात तेढ निर्माण करून मणिपूर, छत्तीसगड राज्य पेटवली. महिलांवरील अत्याचारात भाजपचे नेते आघाडीवर आहेत. आरोपींना सोडण्यासाठी पुरावे नष्ट करत आहेत. मणिपूर मध्ये पोलिसांदेखत महिलांवर अत्याचार होत होते. त्यामुळे देशामध्ये काँग्रेसची लाट असून पहिल्या टप्प्यात भापजचा पराभव दिसू लागला आहे. राज्यातील निवडणुका झालेल्या पाचही जागा महाविकास आघाडी जिंकणार असून नितीन गडकरी हे देखील पराभूत होतील. आमच्याकडे कार्यक्रम आहे, निती आणि नियत आहे. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी जेव्हढ्या जास्त सभा घेतील, तेवढ्या जास्त‌ जागा महाविकास आघाडी व इंडिया आघाडी जिंकेल, असा विश्वास लोंढे यांनी व्यक्त केला.

पंतप्रधानांच्या‌ समोर मुनगंटीवार बहिण भावाबद्दल बोलले, ही त्यांची‌ संस्कृती आहे का ? आमच्या नेत्यांच्या सभांना चांगला‌ प्रतिसाद मिळत आहे. आम्ही दिलेली आश्वासने पाळली, त्याचे उदाहरण कर्नाटक आहे. मोदींनी दिलेली आश्वासने पाळली का ? काहीही पाळले नाही. उलट वेदांत फॉक्सकॉन हा एक लाख रोजगार निर्मिती करणारा प्रकल्प गुजरातला पळवला. तरीही राज्यातील एक फुल दोन हाल्फ सत्तेतील नेते गप्प बसले. फडणवीस हे फौजदारचे हवालदार झाले आहेत. अजित दादा यांच्या वाट्याला चार जागा आल्या, त्याही ते हरत आहेत. राज्यात गद्दारी विरुद्ध खुद्दारी लढत आहे. मतदान कमी का झालं याचा विचार भाजपने करावा. ही लढाई लोकशाही व संविधान वाचवण्याची आहे, त्यामुळे जनता काँग्रेस व आघाडीच्या उमेदवारांना निवडून देईल, असेही लोंढे म्हणाले.

त्या जिल्हाधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी करणार :

काही समाजाची मते डिलीट करण्यात आली आहेत. उमेदवाराला यादी दिल्यानंतर नावे काढण्यात आली आहे. विदर्भात एका एका केंद्रावरील 100 मते कमी आहेत. त्यामुळे मी नागपूर व चंद्रपूर जिल्हाधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी निवडणुक आयोगाकडे करणार असल्याचेही लोंढे यांनी सांगितले.

म्हणून राज्यात पाच टप्प्यात निवडणुका :

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दहा वर्षात‌ केलेल्या  कारभारावर लोक नाराज आहेत. शिवाय राज्यातील कायदा व सुव्यवस्था सांभाळण्यास‌ गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना अपयश आले आहे. या दोन गोष्टींचा विचार करून राज्यात लोकसभेच्या निवडणुका पाच टप्प्यात घेतल्या जात आहेत. मोदी फेल आहेत, किंवा फडणवीस गृहमंत्री म्हणून अपयशी आहे, हे मात्र नक्की, असेही लोंढे म्हणाले.

आबा बागुल, विशाल पाटील यांच्यावर पक्ष कारवाई करणार :राज्यात महाविकास आघाडी भक्कम असून जागा वाटप अंतिम झाले आहे. असे असतानाही पक्षाच्या निर्णया विरोधात बोलणारे आणि कृती‌ करणारे कोणीही असोत त्यांच्यावर पक्ष कारवाई करेल, असे म्हणत लोंढे यांनी सांगलीचे विशाल पाटील व पुण्याचे आबा बागुल यांच्यावर कारवाई होऊ शकेल असे स्पष्ट केले. 

राष्ट्रीय शालेय रग्बी स्पर्धेचे शिवछत्रपती क्रीडा संकुल म्हाळुंगे-बालेवाडी येथे आयोजन

0

पुणे, दि. २३: भारतीय शालेय खेळ महासंघ, क्रीडा व युवक सेवा संचालनालय व जिल्हा क्रीडा परिषद, पुणे यांच्याद्वारे २३ ते २८ एप्रिल या कालावधीत शिवछत्रपती क्रीडा संकुल म्हाळुंगे-बालेवाडी येथे ६७ व्या राष्ट्रीय शालेय रग्बी क्रीडा स्पर्धा २०२३-२४ चे आयोजन करण्यात आले आहे.

या स्पर्धेचे उद्धाटन २३ एप्रिल रोजी सायं ५.३० वाजता संकुलातील वॉर्मअप ट्रॅकवर क्रीडा आयुक्त डॉ. राजेश देशमुख यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी क्रीडा व युवक सेवा सहसंचालक सुधीर मोरे, उपसंचालक संजय सबनीस, सुहास पाटील, महाराष्ट्र रग्बी फुटबॉल असोसिएशनच्या अध्यक्षा मीनल पटसाला, सचिव नासिर हुसेन आदी उपस्थित राहणार आहेत.

२३ व २४ एप्रिल रोजी १९ वर्षाखालील मुले व मुली तर २७ व २८ एप्रिल रोजी १७ वर्षाखालील मुले व मुली गटाच्या स्पर्धा होणार आहेत. या स्पर्धेत आंध्रप्रदेश, तेलंगणा, ओडिशा, छत्तीसगढ, गुजरात, बिहार, तामीळनाडू, राजस्थान, दिल्ली, जम्मू काश्मिर, मध्यप्रदेश, महाराष्ट्र या राज्यांसह विद्याभारती, आयपीएससी, सिबीएसई अशा १५ संघांचे ७०० खेळाडू, क्रीडा मार्गदर्शक, संघव्यवस्थापक, तांत्रिक अधिकारी सहभागी होण्यासाठी क्रीडानगरीत दाखल झालेले आहेत.

राष्ट्रीय पातळीवरील रग्बीच्या शालेय स्पर्धा प्रथमच पुणे शहरात होत असून स्पर्धेस संपूर्ण तांत्रिक सहकार्य इंडियन रग्बी फुटबॉल युनियन यांनी दिलेले आहे. या स्पर्धेमध्ये महाराष्ट्र राज्याच्या संघामधून एशिया रग्बी चॅम्पियनशिप स्पर्धेतील रजतपदक विजेते यश जाधव व नम्रता पाटील हे आंतरराष्ट्रीय खेळाडू हे प्रतिनिधित्व करतील. बिहार राज्याकडून आंतरराष्ट्रीय खेळाडू गुरिया कुमारी व अंशु कुमारी, दिल्लीकडून राष्ट्रीय खेळाडू शहबाज अन्सारी तसेच तामीळनाडूकडून राष्ट्रीय खेळाडू आकाश कुमार हे स्पर्धेमध्ये सहभागी होतील.

स्पर्धेच्या निमित्ताने देशातील विविध राज्यामधून आलेल्या खेळाडूंचे स्वागत पुणे शहरातील क्रीडाप्रेमी नागरीकांनी करावे तसेच जिल्ह्यातील उदयोन्मुख खेळाडु व नागरीकांनी मोठ्या संख्येने या स्पर्धा पहाण्यासाठी उपस्थित रहावे असे, आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी महादेव कसगावडे यांनी केलेले आहे.

अधिकारी कर्मचाऱ्यांनी गावपातळीवर मतदानाबाबत जनजागृती करावी-मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष पाटील

पुणे,दि. २२: पुणे जिल्ह्यातील चारही लोकसभा मतदार संघात जिल्हा परिषद, पंचायत समिती तसेच ग्रामपंचायतीतील अधिकारी कर्मचाऱ्यांनी गावपातळीवर नागरिकांमध्ये मतदान करण्याविषयी जनजागृती करावी, असे आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष पाटील यांनी केले.

जिल्हा परिषदेच्या सभागृहात आयोजित या कार्यक्रमाला अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत वाघमारे, स्वीप समन्वयक तथा उपजिल्हाधिकारी अर्चना तांबे, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या प्रकल्प संचालक शालिनी कडू, उप मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीकांत खरात, विजयसिंह नलावडे, शिक्षणाधिकारी संजय नाईकडे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सचिन देसाई आदी उपस्थित होते.

मतदान प्रक्रिया सुरळीत पार पाडण्यासाठी प्रशासनातील अधिकारी आपली जबाबदारी चोख पार पाडीत आहेत, असे सांगून श्री. पाटील म्हणाले, जिल्ह्यात बारामती लोकसभा मतदारसंघात ७ मे रोजी तर मावळ, पुणे आणि शिरूर लोकसभा मतदारसंघात १३ मे रोजी लोकसभा निवडणुकीचे मतदान होणार आहे. राज्यात मतदार संख्येच्यादृष्टीने पुणे हा मोठा जिल्हा आहे. त्यामुळे जिल्हा परिषदेच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांनी मतदानाचे प्रमाण वाढविण्यासाठी विशेष प्रयत्न करावे.

जिल्हा परिषदेच्या अधिपत्याखाली सतरा ते आठरा हजार अधिकारी कर्मचारी कार्यरत आहेत. प्रशासनात काम करणाऱ्या अधिकारी कर्मचाऱ्यांची अधिक जबाबदारी असून इतरांना मतदानाचे आवाहन करताना त्याची सुरूवात आपण स्वत: मतदान करून करावी. गावातील ग्रामसेवक व इतर कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून मतदान जनजागृती करून गावातील जास्तीत जास्त नागरिकांना मतदानासाठी प्रवृत्त करावे. ग्रामसेवकांनी गावातील दिव्यांग, वयोवृद्ध नागरिकांचे मतदान करून घेण्यासाठी प्रयत्न करावे.

श्रीमती तांबे म्हणाल्या, गेल्या सहा सात महिन्यापासून जिल्ह्यात स्वीप कार्यक्रमाच्या माध्यमातून मतदार जनजागृती करण्यात येत आहे. जिल्हा परिषदेचेही यात खूप मोठे योगदान आहे. महाराष्ट्रात सर्वात जास्त मतदार असलेल्या पुणे जिल्ह्यात मतदानाची टक्केवारी खूप कमी असून मतदानाची टक्केवारी वाढावी यासाठी जिल्हा प्रशासनाकडून प्रयत्न करण्यात येत आहेत. मतदानावेळी दिव्यांग, ज्येष्ठ नागरिकांना घरातून मतदानाची सुविधा उपलब्ध करुन देण्यात येणार असून या तसेच अन्य सुविधांची माहिती देऊन मतदारांना मतदानाचे आवाहन करावे, असेही त्या म्हणाल्या.

श्रीमती कडू म्हणाल्या, जिल्हा परिषदेच्या विविध यंत्रणांच्या माध्यमातून नव मतदारांची नोंदणी करून घेतली आहे. महिलांची टक्केवारी वाढावी यासाठी महिला व बाल कल्याण विभाग व बचत गटांच्या माध्यमातून प्रयत्न केले जात आहेत. शिक्षण विभागामार्फत शाळेतील विद्यार्थ्यांनी आपल्या पालकांना मतदान करण्याविषयी पत्रलेखनातून जनजागृती करण्यात येत आहे. सर्व विभागप्रमुखांना त्यांच्या अधिनस्त कर्मचाऱ्यांनी मतदानाचा हक्क बजावावा याबाबत पत्र देण्यात आल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

यावेळी उपस्थित सर्व अधिकारी कर्मचाऱ्यांना मतदानाची शपथ देण्यात आली.

75 वर्षांत काँग्रेसने देशाला लुटले नाही, तेवढे गेल्या दहा वर्षांत मोदी सरकारने देशाला लुटले-उद्धव ठाकरे

अमरावती-गेल्या 75 वर्षांत काँग्रेस सरकारने देशाला जेवढे लुटले नाही, तेवढे मोदी सरकारने दहा वर्षांत देशाला लुटले असल्याची टीका उद्धव ठाकरे यांनी केली. भावा बहिणीच्या नात्यावर गलिच्छ आरोप करणाऱ्या असंस्कृत नेत्याला राज्याचा सांस्कृतिक मंत्री केले, आणि आमच्या मानगुंटीवर बसवले असल्याचा आरोपही उद्धव ठाकरे यांनी केला आहे.अमरावती लोकसभा मतदार संघातील महाआघाडीच्या उमेदवारासाठी उद्धव ठाकरे यांनी अमरावतीमध्ये सभा घेतली. यात त्यांनी मतदारांना महाविकास आघाडीच्या उमेदवाराला विजयी करण्याचे आवाहन केले.

काँग्रेसला गेल्या 75 वर्षांत जे जमले नाही ते आम्ही दहा वर्षात केले असल्याचा दावा मोदी करत आहेत. आणि ते खरेही आहे. 75 वर्षांत काँग्रेसने देशाला लुटले नाही, तेवढे गेल्या दहा वर्षांत मोदी सरकारने देशाला लुटले असल्याचा आरोप उद्धव ठाकरे यांनी केला आहे. पुढच्या तीस वर्षात तुम्ही काय करणार आहात, हे सांगत बसण्यापेक्षा मागच्या दहा वर्षात काय केले? त्याचा आधी आम्हाला हिशोब द्या, अशा शब्दात उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आव्हान दिले आहे.निवडणूक रोखेच्या माध्यमातून तुम्ही हजारो कोटी रुपये लुटले आहेत. यात काँग्रेसला किती पैसे मिळाले आणि भाजपला किती पैसे मिळाले ते पहा. यावरुनच तुम्ही दहा वर्षात देशाला किती लुटले हे लक्ष्यात येते. काँग्रेस सत्तर वर्षांत जे करू शकले नाही, तेवढे गेल्या दहा वर्षांत मोदी सरकारने देशाला लुटले असल्याची टीका देखील उद्धव ठाकरे यांनी केली आहे. आणि आता याच पैशांतून मोदी सरकार मोठ-मोठाले होल्डिंग लावले जात असल्याचा आरोप उद्धव ठाकरे यांनी केला आहे. ज्या जाहिराती केल्या जात आहेत, हा सर्व पैसा जनतेचा लुटलेला पैसा असल्याचे उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे.

आम्ही महिलांबद्दल काही बोललो तर आमच्यावर कारवाईची भाषा करता. तर भाऊ बहिणीच्या नात्याचा विकृत उल्लेख करणारा असंस्कृम माणूस राज्याच्या सांस्कृतिक मंत्री तुम्ही आमच्या मानगुटीवर बसवला असल्याची टीका उद्धव ठाकरे यांनी केली. त्या मुनगंटीवारांविषयी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना प्रश्न विचारा, अशा शब्दात उद्धव ठाकरे यांनी सुधीर मुनगंटीवार यांच्यासह पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली आहे. तुमच्यातलाच एक मंत्री खासदार सुप्रिया सुळे यांना शिव्या देतो, अशा वेळी कुठे गेले भाजपचे सर्व नेते? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. तुम्ही आम्हाला हिंदुत्व शिकवण्याची आवश्यकता नसल्याचे उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे. जास्त मुले होतात त्यांना विरोधक पैसे वाटून टाकतील, असे तुम्ही म्हणत आहात. मात्र, तुम्ही दहा वर्षापासून सत्तेवर आहात. ज्यांना कमी मुले होतात त्यांना पैसे का नाही वाटले? असे म्हणत उद्धव ठाकरे यांनी मोदींवर पलटवार केला आहे.गेल्या दहा वर्षात किती शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट झाले? किती शेतकऱ्यांना पीक विम्याचे पैसे वेळेवर मिळाले? असा प्रश्न उद्धव ठाकरे यांनी उपस्थित केला. शेतकऱ्यांचे अश्रू पुसण्याची दानत तुमच्याकडे नसल्याची टीका उद्धव ठाकरे यांनी केली आहे. विदर्भाचा विकास झाला नाही, हे आम्ही मान्य करतो. मात्र गेल्या दहा वर्षात केंद्रात तुम्ही बसलेला आहात. मधले अडीच वर्ष सोडले तर दहा वर्षात राज्यात देखील तुम्ही सत्तेवर आहात. मग विदर्भाचा विकास तुम्ही दहा वर्षात का केला नाही? असा प्रश्न उद्धव ठाकरे यांनी उपस्थित केला. विदर्भामध्ये एकही उद्योग केंद्र सरकारने का आणला नाही? अशा शब्दात उद्धव ठाकरे यांनी भाजप सरकारवर टीका केली आहे.

राज ठाकरेंना उच्च न्यायालयाकडून दिलासा

संभाजीनगर -मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना भडकाऊ भाषण प्रकरणी16 वर्षे जुन्या प्रकरणात न्यायालयाने मोठा दिलासा दिला आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने कथित प्रक्षोभक भाषण आणि चिथावणी देण्याबाबत कोणतेही पुरावे नसल्याचे म्हटले आहे. तसेच न्यायालयाने राज ठाकरे यांच्यावरील खटला फेटाळून लावला आहे. 16 वर्षे जुन्या प्रकरणात कनिष्ठ न्यायालयाने राज ठाकरे यांची निर्दोष मुक्तता करण्याची याचिका फेटाळली होती. या आदेशाला राज ठाकरे यांनी आव्हान दिले होते.वास्तविक, हे प्रकरण 21 ऑक्टोबर 2008 चे आहे, ज्यात तत्कालीन उस्मानाबाद (धाराशिव) जिल्ह्यात मनसे कार्यकर्त्यांनी एसटी बसेसवर दगडफेक केल्याचा आरोप करण्यात आला होता. 2008 मध्ये राज ठाकरे यांनी बिहार आणि उत्तर प्रदेशातील स्थलांतरित कामगारांनी महाराष्ट्रातील लोकांच्या नोकऱ्या काढून घेतल्याचा आरोप केला होता. मुंबईत रेल्वे प्रवेश परीक्षेला बसणाऱ्या काही उत्तर भारतीय उमेदवारांना मारहाण करणाऱ्या पक्ष कार्यकर्त्यांना भडकवल्याबद्दल त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता.

यानंतर राज ठाकरेंच्या सुटकेबाबत महाराष्ट्रात तुरळक घटना घडल्या, तरीही राज ठाकरे यांची लवकरच सुटका झाली. अशाच एका घटनेत त्यांच्यावर आणि त्यांच्या कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. तपासानंतर या प्रकरणी आरोपपत्रही दाखल करण्यात आले. त्यानंतर या प्रकरणात आरोपी म्हणून अटक करण्यात आलेल्या राज ठाकरे यांनी निर्दोष मुक्तीसाठी याचिका दाखल केली होती, मात्र ती ट्रायल कोर्टाने फेटाळली होती.राज ठाकरे यांची बाजू मांडणारे वकील राजेंद्र शिरोडकर आणि सयाजी नांगरे यांनी असा युक्तिवाद केला की, कथित घटना घडली तेव्हा मनसे नेते घटनास्थळी नसून तुरुंगात होते. राज ठाकरे यांचे कथित प्रक्षोभक भाषण फिर्यादीने रेकॉर्डवर ठेवलेले नाही आणि आरोपपत्रही जोडलेले नाही, या अनुपस्थितीत त्यांनी प्रक्षोभक भाषण केले असे म्हणता येणार नाही, हेही वकिलाने न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले .