अमरावती-गेल्या 75 वर्षांत काँग्रेस सरकारने देशाला जेवढे लुटले नाही, तेवढे मोदी सरकारने दहा वर्षांत देशाला लुटले असल्याची टीका उद्धव ठाकरे यांनी केली. भावा बहिणीच्या नात्यावर गलिच्छ आरोप करणाऱ्या असंस्कृत नेत्याला राज्याचा सांस्कृतिक मंत्री केले, आणि आमच्या मानगुंटीवर बसवले असल्याचा आरोपही उद्धव ठाकरे यांनी केला आहे.अमरावती लोकसभा मतदार संघातील महाआघाडीच्या उमेदवारासाठी उद्धव ठाकरे यांनी अमरावतीमध्ये सभा घेतली. यात त्यांनी मतदारांना महाविकास आघाडीच्या उमेदवाराला विजयी करण्याचे आवाहन केले.
काँग्रेसला गेल्या 75 वर्षांत जे जमले नाही ते आम्ही दहा वर्षात केले असल्याचा दावा मोदी करत आहेत. आणि ते खरेही आहे. 75 वर्षांत काँग्रेसने देशाला लुटले नाही, तेवढे गेल्या दहा वर्षांत मोदी सरकारने देशाला लुटले असल्याचा आरोप उद्धव ठाकरे यांनी केला आहे. पुढच्या तीस वर्षात तुम्ही काय करणार आहात, हे सांगत बसण्यापेक्षा मागच्या दहा वर्षात काय केले? त्याचा आधी आम्हाला हिशोब द्या, अशा शब्दात उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आव्हान दिले आहे.निवडणूक रोखेच्या माध्यमातून तुम्ही हजारो कोटी रुपये लुटले आहेत. यात काँग्रेसला किती पैसे मिळाले आणि भाजपला किती पैसे मिळाले ते पहा. यावरुनच तुम्ही दहा वर्षात देशाला किती लुटले हे लक्ष्यात येते. काँग्रेस सत्तर वर्षांत जे करू शकले नाही, तेवढे गेल्या दहा वर्षांत मोदी सरकारने देशाला लुटले असल्याची टीका देखील उद्धव ठाकरे यांनी केली आहे. आणि आता याच पैशांतून मोदी सरकार मोठ-मोठाले होल्डिंग लावले जात असल्याचा आरोप उद्धव ठाकरे यांनी केला आहे. ज्या जाहिराती केल्या जात आहेत, हा सर्व पैसा जनतेचा लुटलेला पैसा असल्याचे उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे.
आम्ही महिलांबद्दल काही बोललो तर आमच्यावर कारवाईची भाषा करता. तर भाऊ बहिणीच्या नात्याचा विकृत उल्लेख करणारा असंस्कृम माणूस राज्याच्या सांस्कृतिक मंत्री तुम्ही आमच्या मानगुटीवर बसवला असल्याची टीका उद्धव ठाकरे यांनी केली. त्या मुनगंटीवारांविषयी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना प्रश्न विचारा, अशा शब्दात उद्धव ठाकरे यांनी सुधीर मुनगंटीवार यांच्यासह पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली आहे. तुमच्यातलाच एक मंत्री खासदार सुप्रिया सुळे यांना शिव्या देतो, अशा वेळी कुठे गेले भाजपचे सर्व नेते? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. तुम्ही आम्हाला हिंदुत्व शिकवण्याची आवश्यकता नसल्याचे उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे. जास्त मुले होतात त्यांना विरोधक पैसे वाटून टाकतील, असे तुम्ही म्हणत आहात. मात्र, तुम्ही दहा वर्षापासून सत्तेवर आहात. ज्यांना कमी मुले होतात त्यांना पैसे का नाही वाटले? असे म्हणत उद्धव ठाकरे यांनी मोदींवर पलटवार केला आहे.गेल्या दहा वर्षात किती शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट झाले? किती शेतकऱ्यांना पीक विम्याचे पैसे वेळेवर मिळाले? असा प्रश्न उद्धव ठाकरे यांनी उपस्थित केला. शेतकऱ्यांचे अश्रू पुसण्याची दानत तुमच्याकडे नसल्याची टीका उद्धव ठाकरे यांनी केली आहे. विदर्भाचा विकास झाला नाही, हे आम्ही मान्य करतो. मात्र गेल्या दहा वर्षात केंद्रात तुम्ही बसलेला आहात. मधले अडीच वर्ष सोडले तर दहा वर्षात राज्यात देखील तुम्ही सत्तेवर आहात. मग विदर्भाचा विकास तुम्ही दहा वर्षात का केला नाही? असा प्रश्न उद्धव ठाकरे यांनी उपस्थित केला. विदर्भामध्ये एकही उद्योग केंद्र सरकारने का आणला नाही? अशा शब्दात उद्धव ठाकरे यांनी भाजप सरकारवर टीका केली आहे.