Home Blog Page 1075

कितीही रडीचे डाव खेळा,येणार तर दणकून येणार, अन जनतेतून येणार -खासदार डॉ. अमोल कोल्हे

शिरुर – विरोधकांमध्ये धडकी भरली आहे. त्यामुळं ते रडीचे डाव खेळत आहेत. पण पराभवाची एवढी भीती कशाला बाळगता, येणार तर दणकून येणार अन जनतेतून येणार, असं सडेतोड उत्तर शिरूर लोकसभेचे महाविकास आघाडीचे उमेदवार खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी विरोधकांना दिल.

शिरूर लोकसभा मतदारसंघातील उमेदवारांच्या अर्जाची छाननी सुरु असताना, विरोधी उमेदवारांनी महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार खासदार डॉ. अमोल कोल्हे यांच्या उमेदवारी अर्जावर आक्षेप घेतला. डॉ. कोल्हे यांनी २०१६ मध्ये आपल्यावर दाखल असलेल्या गुन्ह्याची माहिती शपथपत्रात दिली नाही, असा आक्षेप घेण्यात आला होता.

निवडणूक आयोगाने दोन्ही बाजूचे म्हणणं ऐकल्यावर डॉ. अमोल कोल्हे यांचा उमेदवारी वैध ठरवला. अर्ज वैध ठरल्यानंतर डॉ. कोल्हे यांनी विरोधकांचा चांगलाच समाचार घेतला.

डॉ. कोल्हे म्हणाले की, विरोधकांच्या छातीत धडकी भरली, म्हणून रडीचे डाव खेळायला सुरवात झाली आहे.
बालिशपणाच राजकारण करतायेत. पणहे करुन ही उपयोग नाही म्हटल्यावर रडीचा डाव खेळायचं कमी होईना. विरोधकांना एकच सांगतो, सामना दिलेरीने खेळायचा असतो, भ्याडा सारखा खेळायचा नसतो.
एवढी पराभवाची भीती कशाला बाळगता, येणार तर दणकून येणार आणि जनताच घेऊन येणार हे ठणकावून सांगितलं. कारवाईच्या भीतीने जे भाजपच्या मांडीवर जाऊन बसलेत ते असले रडीचे डाव खेळत असल्याचे डॉ. कोल्हे म्हणालेत.

२०१६ ला ओवेसींच्या सभेला केला होता विरोध

डॉ. अमोल कोल्हे यांनी २०१६ ला पुण्यात होणाऱ्या ओवीसीच्या सभेला विरोध केला होता. धार्मिक तेढ वाढू नये, यासाठी हा विरोध केला होता, आणि त्यामुळे हा गुन्हा दाखल झाला होता. मात्र,यासंदर्भात डॉ. कोल्हे यांना कोणतेही कल्पना नव्हती, पोलिसांकडून कोणतीही नोटीस देण्यात आलेली नव्हती. त्याचबरोबर चारित्र्य पडताळणी प्रमाणपत्र देतानाही पुणे पोलिसांनी या गुन्ह्याची माहिती दिली नव्हती. हीच बाब डॉ. कोल्हे यांच्या वकिलांनी निवडणूक आयोगा समोर स्पष्ट केली.

देशाच्या विकासासाठी मतदान करा – मिलिंद कांबळे

पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्ट येथे युवा संमेलन जल्लोषात संपन्न

पिंपरी, पुणे (दि. २६ एप्रिल २०२४) – भारतातील तरुणांसाठी सध्या सुवर्णकाळ आहे. सोशल मीडियाचा उत्तम वापर केल्यास अभ्यास, नोकरी, व्यवसाय आणि अन्य क्षेत्रात नावीन्य मिळविता येईल. फक्त त्याच्या आहारी जाऊ नका. देशाच्या विकासात हातभार लावयचा असेल तर मतदानाचा हक्क बजावला पाहिजे असे मत दलित इंडियन चेंबरचे अध्यक्ष पद्मश्री मिलिंद कांबळे यांनी व्यक्त केले.
‘युवकांकडून, युवकांसाठी’ असे ब्रीद घेवून, पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्ट (पीसीईटी) येथे २ दिवसीय युवा संमेलनाच्या (युथ कॉन्फरन्स) समोर प्रसंगी कांबळे बोलत होते. पीसीईटी आणि मुख्य निवडणूक कार्यालय महाराष्ट्र, जिल्हाधिकारी कार्यालय पुणे, निवडणूक साक्षरता क्लब, पिंपरी चिंचवड महानगरपालिका, पीसीईटी इन्फिनिटी ९०.४ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या या चर्चासत्रामध्ये पत्रकारिता, युवकांचे मतदानातील योगदान, लोकशाही व चार स्तंभ, राष्ट्र बांधणीतील युवकांची भूमिका या सत्रांचा समावेश होता. यावेळी राज्याचे अतिरिक्त मुख्य सचिव श्रीकांत देशपांडे, वर्शीप अर्थ फाऊंडेशनचे महाराष्ट्र राज्य समन्वयक अल्ताफ पिरजादे, जिल्हा समन्वयक स्नेहल खानोलकर, पीसीईटीचे डिजिटल मार्केटिंग प्रमुख डॉ. केतन देसले आदी उपस्थित होते.
भारत हा तरुणांचा देश आहे आणि हीच आपली मोठी संपत्ती आहे. राष्ट्र उभारणी मधे तरुणांचा खुप मोलाचा वाटा आहे. कोणत्याही क्षेत्राच्या माध्यमातून ते राष्ट्र उभारणी मध्ये योगदान देऊ शकतात. तरुण पिढी मतदानाच्या माध्यमातून चांगली कामगिरी बजावतील अशी खात्री आहे. पीसीईटीने सामाजिक भान ठेवून विद्यार्थ्यांना चर्चासत्रात सहभागी करून घेतले यांचे विशेष कौतुक आहे, असे श्रीकांत देशपांडे म्हणाले.
पुण्याचे जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे यांच्या हस्ते युवा संमेलनाचे उद्घाटन करण्यात आले होते. पिंपरी चिंचवड महापालिकेचे उपायुक्त विठ्ठल जोशी, अण्णा बोदडे यांनी मार्गदर्शन केले. पहिल्या सत्रामध्ये विद्यार्थी वक्ते विराज चतुरे, प्रितेश खोलपकर यांनी मतदान जागृती या विषयावर मत मांडले. मोनिष मैद, श्रीकांत जाधव, ॲड. सुश्रुत कांबळे या विद्यार्थी वक्त्यांनी पत्रकारिता या विषयावर संबोधित केले. पुणे जिल्हा उपजिल्हाधिकारी व स्वीप नोडल अधिकारी अर्चना तांबे, लेखक अरविंद जगताप यांनी पत्रकारिता व युवकांचे राष्ट्र घडणीतील योगदान यावर मार्गदर्शन केले.
दुसऱ्या दिवशी क्षितिज नाईक, हर्षवर्धन शिंदे यांनी ‘लोकशाही व चार स्तंभ’ यावर विचार मंथन केले. दिशा फाऊंडेशनचे संस्थापक डॉ. गणेश राऊत, धुळ्याचे अतिरिक्त पोलीस अधीक्षक किशोर काळे, वर्शीप अर्थ फाउंडेशनच्या मुख्य एडिटर कोरीना मॅनुअल, सकल मराठा परिवारचे संस्थापक दिनेश कदम यांनीही विद्यार्थ्यांशी संवाद साधला. सुशांत बालगुडे, प्राजक्ता भांगे, ओमकार उबाळे या विद्यार्थी वक्त्यांनी ‘राष्ट्र घडणीत युवकांचा सहभाग’ यावर विचार मांडले. कार्यक्रमांची सांगता युथ कॉन्फरन्सच्या ‘लोकशाही की लोभशाई’ या नाटकाने झाली. डॉ. केतन देसले यांनी कार्यक्रमाचा आढावा घेतला.
पीसीईटीचे अध्यक्ष ज्ञानेश्वर लांडगे, उपाध्यक्षा पद्माताई भोसले, सचिव विठ्ठल काळभोर, खजिनदार शांताराम गराडे, विश्वस्त हर्षवर्धन पाटील, उद्योजक नरेंद्र लांडगे, अजिंक्य काळभोर, कार्यकारी संचालक डॉ. गिरीश देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली अल्ताफ पिरजादे, स्नेहल खानोलकर, विद्यार्थी प्रतिनिधी अभिजित बनसोडे, गौरव आरकास, स्वराज बांगर, सचिन गिरवले, अथर्व जाधव यांनी आयोजनात सहभाग घेतला.

पत्रकार नेहा पुरव यांना धमक्या देणा-या भाजप उमेदवार पियुष गोयल यांच्या गुंडांना तात्काळ अटक करावी: अतुल लोंढे

पत्रकारांना धमक्या देऊन पियुष गोयल यांना पराभव टाळता येणार नाही

मुंबई, दि. २६ एप्रिल २०२४
उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघातील भाजपचे उमेदवार आणि केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांनी बोरिवली(प) बाभई व वझिरा येथे प्रचार करताना माशांचा वास सहन न झाल्याने नाकाला रूमाल लावला होता. पत्रकार नेहा पुरव यांनी यासंदर्भातील बातमी आपल्या दैनिकात प्रसिध्द केल्याने चिडून पियुष गोयल यांच्या गुंडांनी नेहा पुरव याच्या राहत्या घरी जाऊन त्यांना धमकावले. ही अतिशय गंभीर बाब असून पत्रकारांच्या आणि माध्यमांच्या स्वातंत्र्याची गळचेपी करणारे आहे. काँग्रेस पक्ष भाजपाच्या गुंडगिरीचा निषेध करत असून या प्रकरणी पियुष गोयल यांच्यावर गुन्हा दाखल करून धमकी देणा-या गुंडांना तात्काळ अटक करावी अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे यांनी केली आहे.
यासंदर्भात बोलताना लोंढे म्हणाले की, माध्यमे हा लोकशाहीचा चौथा स्तंभ आहेत. महाराष्ट्राला निर्भीड आणि निष्पक्ष पत्रकारितेचा मोठा वारसा आहे. स्वातंत्र्यपूर्वीपासून महाराष्ट्राच्या भूमितीतील पत्रकारांनी लोकशाहीला समृद्ध करण्याचे आणि दिशा देण्याचे कार्य केले आहे पण केंद्रातील भाजप सरकारला लोकशाही नको आहे. म्हणून त्यांनी लोकशाहीचे चारही स्तंभ आणि स्वायत्त संस्थावर हल्ले करणे सुरु केले आहे. केंद्रीय मंत्री पियुष गोयल भाजपची हीच कार्यपद्धती पुढे घेऊन जात आहेत. हायप्रोफाईल कुटुंबातून आलेल्या गोयल यांना मासळीचा वास आणि निष्पक्ष पत्रकारिता सहन होत नाही. त्यामुळेच त्यांच्या गुंडानी काल गुरुवारी रात्री १० वाजता त्यांच्या घरी जावून “पुन्हा मच्छीची बातमी छापू नका” अशा शब्दांत धमकी दिली आहे. पत्रकरांना धमक्या देऊन पियुष गोयल आपला पराभव टाळू शकत नाहीत असा टोला अतुल लोंढे यांनी लगावला.

पुणे प्रार्थना समाजाचा चैत्रोत्सव रविवारपासून..

पुणे प्रार्थना समाज हरीमंदिराच्या ११६ व्या प्रवेश दिनानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन
पुणे : पुणे प्रार्थना समाजाच्या हरी मंदिराच्या  ११६ व्या प्रवेशदिन ‘चैत्र वद्य षष्ठी’ या दिवसाच्या निमित्ताने चैत्रोत्सव साजरा केला जाणार आहे. रविवार दिनांक २८ एप्रिल ते ५ मे या दरम्यान  होणाऱ्या चैत्रोत्सवात विविध कार्यक्रम होणार आहेत, अशी माहिती पुणे प्रार्थना समाजाचे सचिव दिलीप जोग यांनी दिली.

बुधवार पेठेतील हरी मंदिरात हे सर्व कार्यक्रम होणार आहेत. रविवार दिनांक २८ एप्रिल रोजी सकाळी १० वाजता नमिता मुजुमदार यांची उपक्रमोपासना होणार आहे. तर मंगळवार दिनांक ३० एप्रिल रोजी सायंकाळी ६.३०  वाजता डॉ. सुषमा जोग यांची ईश्वरोपासना होणार आहे.

शनिवार दिनांक ४ मे रोजी सकाळी १० वाजता ज्ञान- विज्ञान-तरंग हा विशेष कार्यक्रम तर विज्ञान आणि आध्यात्मिकता हे व्याख्यान होणार आहे.  प्रख्यात वैज्ञानिक डॉ. पार्थ घोस यावेळी बोलणार आहेत.

उपासना ग्लोबल फोरम यांची नृत्य संगीत उपासना देखील यावेळी होणार आहे.  सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या सायन्स पार्क व भौतिकी प्राध्यापकचे माजी संचालक दिलीप कान्हेरे यावेळी उपस्थित राहणार आहेत. शेवटच्या दिवशी रविवार दिनांक ५ मे रोजी सकाळी १० वाजता रविशंकर बंदा यांची उपासना होणार आहे.

सद््गुरु श्री जंगली महाराज १३४ व्या पुण्यतिथी उत्सवानिमित्त १००० किलो गव्हाच्या खिरीचा प्रसाद

श्री जंगली महाराज देवस्थान ट्रस्ट, पुणे ; ५ हजारहून अधिक भाविकांना वाटप
पुणे : तब्बल २३० किलो गूळ, २१० किलो गहू, १० किलो तांदूळ आणि २० किलो ड्रायफ्रुट वापरुन सलग ६ ते ७ तास सुमारे १० ते १२ सेवेक-यांनी १००० किलो गव्हाच्या खिरीचा प्रसाद श्री जंगली महाराज मंदिरात तयार केला. भव्य दिव्य कढईमध्ये खीर तयार करतानाचे दृश्य पाहण्याकरिता देखील भाविकांनी मोठी गर्दी केली. खिरीचा प्रसाद हे सन १९६५ पासून उत्सवाचे वैशिष्ट्य आहे. 
श्री जंगली महाराज देवस्थान ट्रस्ट, पुणेच्या वतीने व सद््गुरु श्री जंगली महाराज पुण्यतिथी उत्सव समितीच्या सहभागाने ‘सद््गुरु श्री जंगली महाराज १३४ वा पुण्यतिथी उत्सव’ साजरा करण्यात येतो. उत्सवाची सांगता ही महाप्रसादाने झाली. ट्रस्टचे अध्यक्ष राजेंद्र तांबेकर, उपाध्यक्ष चंद्रकांत शिरोळे, सेक्रेटरी शिरीष लोखंडे यांसह पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी उत्सवाचे नियोजन केले आहे. तसेच, सद््गुरु श्री जंगली महाराज पुण्यतिथी उत्सव समिती व श्री सद््गुरु जंगली महाराज भजनी मंडळ यांनी देखील उत्सवात सक्रिय सहभाग घेतला आहे. 
पालखी सोहळा आणि महाराजांची आरती झाल्यानंतर त्याचा अग्निने चूल पेटविली जाते. भव्य दिव्य कढईमध्ये मंदिराच्या मागच्या बाजूस असलेल्या पटांगणात हा प्रसाद केला जातो. मोठया संख्येने भाविक हा प्रसाद ग्रहण करण्याकरिता येतात. याशिवाय उत्सवात विविध विषयांवर मान्यवरांची व्याख्याने झाली. तसेच संगीत सभा अंतर्गत प्रसिद्ध गायक कलाकारांची भक्तीगीते आणि संगीताचे कार्यक्रम पार पडले. विविध महिला भजनी मंडळांचे भजनाचे कार्यक्रम देखील उत्साहात झाले. संपूर्ण उत्सवात मंदिराला आकर्षक व भव्य विद्युत रोषणाई करण्यात आली होती. महाप्रसादाने उत्सवाची सांगता झाली.

गुवाहाटीच्या गद्दारांना राहुल गांधींवर बोलण्याचा अधिकार नाही: नाना पटोले

राहुल गांधीची वाढत्या लोकप्रियमुळे भाजप आणि त्यांच्या मित्रपक्षांच्या नेत्यांचे संतुलन ढासळले आहे.

मुंबई, दि २६ एप्रिल २०२४
लोकसभेच्या निवडणुकीचा दुसराच टप्पा होत असताना भारतीय जनता पक्ष व त्यांच्या मित्रपक्षांची घाबरगुंडी उडाली आहे. पराभवाच्या भितीने ते सैरभैर झाले असून काँग्रेस व इंडिया आघाडीवर खालच्या पातळीवर येऊन टीका करत आहेत. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे भाजपाच्या मेहरबानीवर बसवलेले मुख्यमंत्री आहेत. भाजपा जेवढी चावी देती ते तेवढेच बोलू शकतात परंतु काँग्रेस पक्ष व राहुल गांधी यांच्याबद्दल बोलताना मुख्यमंत्री शिंदे यांनी मर्यादा सोडू नये. गुवाहाटीच्या गद्दारांना राहुल गांधींवर बोलण्याचा अधिकार नाही. राहुलजींवर टीका केल्याने एकनाथ शिंदेंच्या कपाळावरचा गद्दारीचा शिक्का पुसला जाणार नाही, असे सडेतोड उत्तर महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी दिले आहे.
राहुल गांधी यांच्या वरील एकनाथ शिंदे यांच्या विधानाचा समाचार घेताना नाना पटोले पुढे म्हणाले की, राहुल गांधी यांनी पदयात्रा काढून संपूर्ण भारत देश पिंजून काढला आहे. कन्याकुमारी ते काश्मीर ४ हजार किलोमीटरची पदयात्रा काढली. सर्व समाजाच्या लोकांच्या वेदना जाणून घेतल्या, त्यानंतर मणिपूर ते मुंबई ६७०० किमी ची भारत जोडो न्याय यात्रा काढली. राहुल गांधी यांनी ऊन, वारा, पावसाची तमा बाळगली नाही, सतत चालत राहिले ते केवळ देशातील जनतेसाठी, त्यामुळे गरम झाले की राहुल गांधी परदेशात जातात असे बाष्कळ विधान करुन एकनाथ शिंदे यांनी अकलेचे तारे तोडले आहेत. गद्दारी करुन सत्ता मिळवणाऱ्या भाजपच्या मिंध्यांना गांधी कुटुंबाचा त्याग, बलिदान व राहुल गांधी काय कळणार? असा प्रश्नही पटोले यांनी विचारला आहे.
एकनाथ शिंदे यांनी भाजपाच्या मदतीने बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना फोडून गद्दारी केली. भाजपाच्या मदतीने सुरत व तेथून गुवाहाटीला जावून महाविकास आघाडीचे सरकार पाडले. ईडी कारवाईच्या भितीने गद्दारी करून पक्ष चोरणाऱ्यांनी काँग्रेस व राहुल गांधी यांच्याबद्दल बोलू नये. भाजपाच्या वळचणीला गेलेल्या एकनाथ शिंदे यांनी काहीही केले तरी त्यांच्या कपाळावरचा गद्दारीचा शिक्का कधीही पुसला जाणार नाही, असेही नाना पटोले म्हणाले.

भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी राहुल गांधीवर केलेल्या टिकेचाही पटोले यांनी समाचार घेतला. बावनकुळे यांना त्यांच्या पक्षातच कोणी विचारत नाही. ते दररोज फक्त विरोधी पक्षांच्या नेत्यांवर गरळ ओकत असतात, देंवद्र फडणवीस यांनी त्यांना तेवढेच काम दिलेले आहे. राहुल गांधी यांच्यावर बोलण्याएवढे बावनकुळे यांची उंची नाही. राहुल गांधी यांच्याबद्दल बोलण्याआधी बावनकुळे यांनी त्यांच्या पक्षाचे सर्वोच्च नेते नरेंद्र मोदींनी विरोध पक्षांचे नेते, महिला यांच्याबद्दल कसे बोलावे याचे धडे द्यावेत मग दुसऱ्यांना शिकवावे, असेही नाना पटोले म्हणाले.

मुंबई शहर जिल्ह्यातील दोन्ही लोकसभा मतदारसंघांसाठी निवडणुकीची अधिसूचना प्रसिद्ध

मुंबईदि. २६ : लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-२०२४ साठी मुंबई शहर जिल्ह्यातील ‘३०- मुंबई दक्षिण मध्य’ व ‘३१- मुंबई दक्षिण’ या दोन्ही मतदारसंघांमध्ये दि. २० मे २०२४ रोजी सकाळी ७ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत मतदान होणार आहे. आज शुक्रवार दि. २६ एप्रिल २०२४ रोजी अधिसूचना प्रसिद्ध झाली असून दोन्ही लोकसभा मतदारसंघांसाठी आजपासून नामनिर्देशन पत्रे सादर करण्यास सुरुवात झाली आहे, असल्याची मुंबई शहर जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी संजय यादव यांनी दिली.

लोकसभा निवडणुकीची अधिसूचना ‘३०- मुंबई दक्षिण मध्य’ व ‘३१- मुंबई दक्षिण’ या दोन्ही मतदारसंघांचे निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या कार्यालयातील सूचना फलक, सहायक निवडणूक निर्णय अधिकारी यांचे कार्यालय येथील सूचना फलकावरही प्रदर्शित करण्यात आली आहे.

३ मे २०२४ पर्यंत सार्वजनिक सुट्टी व्यतिरिक्त कोणत्याही दिवशी सकाळी ११ ते दुपारी ०३ वाजेपर्यंत संबंधित निवडणूक अधिकारी यांच्या कार्यालयात नामनिर्देशन पत्रे उमेदवाराला किंवा त्यांच्या कोणत्याही प्रस्तावकाला दाखल करता येईल.

‘३०- मुंबई दक्षिण मध्य’ लोकसभा मतदारसंघासाठी नामनिर्देशन पत्रे निवडणूक निर्णय अधिकारी यांचे कार्यालय, खोली क्रमांक, २०५, दुसरा मजला, जिल्हाधिकारी कार्यालय, मुंबई शहर, जुने जकात घर, शहिद भगतसिंग मार्ग, फोर्ट, मुंबई-०१ येथे उपरोक्त नमूद कालावधीत मिळू शकतील.

तसेच ‘३१-मुंबई दक्षिण’ लोकसभा मतदारसंघासाठी नामनिर्देशन पत्रे निवडणूक निर्णय अधिकारी यांचे कार्यालय, मुंबई शहर जिल्हाधिकारी कार्यालय, जुने जकात घर, पहिला मजला, कक्ष क्रमांक १३२, शहिद भगतसिंग मार्ग, फोर्ट, मुंबई-०१ येथे उपरोक्त नमूद कालावधीत मिळू उपरोक्त नमूद कालावधीत मिळू शकतील.

४ मे २०२४ रोजी नामनिर्देशन पत्राची छाननी होणार आहे. ६ मे २०२४ रोजी दुपारी ३ वाजेपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख आहे. ४ जून २०२४ रोजी मतमोजणी होणार आहे.

लोकसभा निवडणुकीचे वेळापत्रक खालीलप्रमाणे

* निवडणुकीची अधिसूचना प्रसिध्दीची तारीख – २६ एप्रिल २०२४

* नामनिर्देशन पत्रे सादर करण्याची अंतिम तारीख व वेळ – ३ मे २०२४ रोजी दुपारी ०३.०० वाजेपर्यंत

* नामनिर्देशन पत्राची छाननी तारीख – ०४ मे २०२४

* उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख व वेळ – ०६ मे २०२४ दुपारी ०३.०० वाजेपर्यंत

* मतदानाची तारीख व वेळ – २० मे २०२४, सकाळी ७ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत

* मतमोजणीची तारीख – ०४ जून २०२४

* निवडणूक प्रक्रिया पूर्ण करण्याची तारीख – ६ जून २०२४

शाश्वत विकासासाठी बौद्धिक संपदा पूरक -प्रा. गणेश हिंगमिरे

पुणे, ता. 26 – पेटंटसारख्या बौद्धिक संपदा या संयुक्त राष्ट्राच्या शाश्वत विकासासाठी अत्यंत पूरक आहेत, त्याचा फायदा जगभरातील देशांनी घ्यावा, असे मत पेटंटविषयक तज्ज्ञ प्रा. गणेश हिंगमिरे यांनी व्यक्त केले.

डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या डीईएस पुणे विद्यापीठाच्या वतीने बौद्धिक संपदा दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात हिंगमिरे बोलत होते. विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. प्रसाद खांडेकर, फर्ग्युसन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. नितीन कुलकर्णी, बीएमसीसी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. राजेश कुचेकर यांची प्रमुख उपस्थिती होती.

हिंगमिरे म्हणाले, ‘माणसांसाठी आणि जगासाठी शांतता प्रस्थापित करणे आणि समृद्धी निर्माण करणे हे संयुक्त राष्ट्रसंघाचे शाश्वत विकास उद्दिष्ट आहे. त्यासाठी पेटंटबरोबरच भौगोलिक चिन्हांकन जीआय ही बौद्धिक संपदा महत्त्वाची आहे. जीआयमुळे पारंपरिक पद्धतीने तयार केल्या जाणाऱ्या शेतीजन्य पदार्थांना किंवा निसर्गाच्या सानिध्यात राहणाऱ्या आदिवासी मंडळींकडून तयार केल्या जाणाऱ्या वस्तूंना जीआय मानांकन मिळते.’

हिंगमिरे पुढे म्हणाले, ‘युरोपात साठ हजार जीआय नोंदी झाल्या आहेत. चीनमध्ये जवळपास अकरा हजार नोंदी आढळतात. भारतात ही संख्या सातशेच्या आसपास आहे. जीआय हा पूर्णपणे पर्यावरणपूरक आणि समूहाचा बौद्धिक संपदा अधिकार असल्याने त्यामध्ये सामाजिक आणि आर्थिक प्रगतीसह संयुक्त राष्ट्रांचे शाश्वत विकासाची उद्दिष्ट्ये साध्य होऊ शकतात. त्यासाठी शालेय स्तरापासून पेटंटसारखे विषय शिकवावेत आणि विद्यापीठात बौद्धिक संपदेच्या नोंदी करण्यास प्रोत्साहन द्यावे.’

केंद्र सरकारला फक्त गुजरातच्याच कांदा उत्पादक शेतकऱ्यांची चिंता

गुजरातच्या दोन हजार टन कांद्यासाठी निर्णयात बंदी उठवल्यावर डॉ. कोल्हे यांचा केंद्र सरकारवर निशाणा

शिरुर – महाराष्ट्रापेक्षा कमी कांदा उत्पादक शेतकरी हा गुजरात मध्ये आहे. तरी केंद्र सरकारने गुजरातच्या २ हजार टन कांद्याची निर्यात बंदी उठवली. मोदी सरकारला फक्त गुजरातच्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या हितसंबंधाची चिंता असल्याचं या निर्णयाने दाखवून दिलं आहे. त्यामुळे मत मागायला गुजरातलाच जा, इकडे येऊच नका. अशा खणखणीत शब्दात खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी कांदा निर्यातीच्या धोरणावरून मोदी सरकारवर थेट हल्ला केला.

महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार खासदार डॉ. अमोल कोल्हे आज शिरुर तालुक्याच्या दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांच्यासोबत देवदत्त निकम, शेखर पाचुंदकर, स्वप्नील गायकवाड,दामु घोडे, शंकर जांभळकर आदी उपस्थित होते.

डॉ. कोल्हे पुढे म्हणाले की, तुमच्या माझ्या कांद्याची माती होती. तुमच्या माझ्या ताटात माती कालवली जाती, याच्याशी मोदी सरकारला काही देणंघेणं नाही. हे आजच्या निर्णयावरून मोदी सरकारने दाखवून दिलं आहे.
जर मोदी सरकार फक्त गुजरातच्या कांदा उत्पादक शेतकऱ्यासाठी निर्णय घेत असेल तर आपण पण त्यांना सांगू शकतो मत मागायला तिकडेच जा. इकडे येऊच नका. असं सांगत भाजपच्या या निर्णयाला डॉ. कोल्हे यांनी कडाडून विरोध केला.

शेवटच्या क्षणी माघार घेत वंचित उमेदवार कॉंग्रेसच्या व्यासपीठावर -सुशीलकुमार शिंदेंची खेळी यशस्वी

सोलापूर : वंचित बहुजन आघाडीचे सोलापूर लोकसभेचे उमेदवार राहुल गायकवाड यांनी उमेदवारी मागे घेण्याच्या अखेरच्या दिवशी अचानक संविधान वाचवण्याचे कारण सांगत निवडणूक मैदानातून माघार घेतली, आणि ते गायब झाले. यानंतर ते थेट राहुल गांधी यांच्या सोलापुरच्या सभेत व्यासपीठावर अवतरले. या पाठीमागे काँग्रेस नेते सुशीलकुमार शिंदे यांची मोठी खेळी असल्याचे बोलले जात आहे. गायकवाड यांनी माघार घेतल्याने काँग्रेस उमेदवार प्रणिती शिंदे यांचा मार्ग सोपा झाला आहे.

बुधवारी दुपारी सोलापूर शहरातील मरीआई चौकात मोठ्या मैदानावर राहुल गांधी यांची महाविकास आघाडीच्या उमेदवार प्रणिती शिंदे यांच्यासाठी प्रचारसभा झाली. यावेळी व्यासपीठावर महाविकास आघाडीचे नेते उपस्थित होते. यामध्ये उमेदवारी मागे घेऊन वंचितला ऐनवेळी दगा देणारे उमेदवार राहुल गायकवाड देखील व्यासपीठावर होते.

राहुल गायकवाड यांनी उमेदवारी मागे घेताना एक व्हिडिओ संदेश प्रसारित केला, यात म्हटले होते की,
संविधान वाचवण्यासाठी मी उमेदवारी अर्ज मागे घेत आहे. यानंतर राहुल गायकवाड अचानकपणे गायब झाले,
ते थेट महाविकास आघाडीच्या मंचावर आले.

या राजकारणाच्या पाठीमागे सुशीलकुमार शिंदे यांची मोठी खेळी असल्याचे बोलले जात आहे.
ही खेळी यशस्वी झाल्याने त्यांची मुलगी प्रणिती शिंदे यांच्यासमोरील मोठा अडथळा दूर झाला आहे. वंचितकडून सोलापूर लोकसभा मतदार संघात उमेदवारी अर्ज दाखल करणारे राहुल गायकवाड यांनी २२ एप्रिल रोजी शेवटच्या दिवशी उमेदवारी अर्ज मागे घेत वंचितला मोठा दगा फटका दिला. गायकवाड यांनी माघार घेतल्याने आता प्रणिती यांची लढत थेट भाजपा उमेदवार राम सातपुते यांच्याशी होणार आहे.

जीवन आनंदी असणे हीच राष्ट्रहित आणि विश्वशांतीची पायाभरणी – निवेदिता धावडे

जिजाऊ व्याख्यानमालेस महिलांची व ज्येष्ठांची लक्षणीय उपस्थिती

पिंपरी, पुणे (दि. २६ एप्रिल २०२४) आपले विचार चांगले असतील, आचरणात प्रामाणिकपणा असेल तर केलेल्या कृतीमुळे अंतर्मनातून आनंद मिळतो. मत्सर, मोह दूर लोटून अनावश्यक स्पर्धेतून बाहेर पडले की वर्तणूक सकारात्मक होते.
अशा सकारात्मक कृतीतून व आचरणातून प्रत्येकाचे जीवन आनंदी राहते. हीच राष्ट्रहित आणि विश्वशांतीची पायाभरणी आहे असे मत निवेदिता धावडे यांनी व्यक्त केले.
चिंचवड गावातील गांधी पेठ तालीम मित्र मंडळ या संस्थेच्या वतीने सामाजिक व प्रबोधनात्मक कार्यक्रमाअंतर्गत जिजाऊ व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले आहे. या व्याख्यानमालेचे हे चौथीसावे वर्ष आहे. यातील दुसरे पुष्प गुंफताना निवेदिता धावडे यांनी “प्रत्येक कृती राष्ट्रहिताची आणि विश्वशांतीची” या विषयावर व्याख्यान दिले. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष बाळासाहेब मरळ, हभप किसन महाराज चौधरी, संस्थेचे अध्यक्ष राजाभाऊ गोलांडे, व्याख्यानमाला समितीचे समन्वयक सुहास पोफळे, मंगल नेवाळे, अतुल आचार्य, चंद्रकला शेडगे, शैलेश जोशी, प्रा. तुकाराम पाटील, माजी सहआयुक्त भावसार साहेब, डॉ. धनंजय भिसे, राज अहिरराव, राजेंद्र घावटे, भगवान पठारे, जयंत सोले, शशांक सोले आदींसह गांधी पेठ महिला मंडळाच्या पदाधिकारी उपस्थित होत्या.
यावेळी निवेदिता धावडे म्हणाल्या की, ज्या व्यक्ती अंतर्मनातून अपूर्ण असतात त्यांना बाह्य गोष्टींची गरज भासते. जे अंतर्मनातून पूर्ण असतात त्यांना बाह्य गोष्टींची गरज भासत नाही. आपल्यासोबत इतरांचेही भले होऊ दे ही बोलणारी कृती ही राष्ट्र व विश्वहितासाठी आवश्यक असते. आनंद वाटला की, त्याच्या बदल्यात तुम्हालाही आनंद मिळेल. मुखवटा घालून मिरवू नका जसे आहात तसेच राहा. दिखाव्यात जगू नका, आनंदी राहा अशा कृतीतून राष्ट्र आणि विश्व आनंदी होईल आणि आनंदाचा निर्देशांक वाढून राष्ट्रहित साध्य होईल. मोबाईल सारखी कोणतीही निर्जीव वस्तू माणसाला बिघडवत नसते. त्याचा वापर करताना विवेक बुद्धीचा वापर करावा. एखादा नकारात्मक संदेश पुढे पाठवू नये. राष्ट्राचा एक सुज्ञ नागरिक म्हणून तो पुढे न पाठवता थांबवण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे. याची सुरुवात प्रत्येकाने स्वतःपासून करावी असेही आवाहन धावडे यांनी केले.
कार्यक्रमाचे अध्यक्ष बाळासाहेब मरळ म्हणाले की ,एकत्रित कार्य केल्यास समाज परिवार वाढवता येतो.
स्वागत हेमा सायकर, आभार राजाभाऊ गोलांडे यांनी मानले.

‘जुनं फर्निचर’… या म्हातार्‍याला अडवूनच दाखवा-पुण्यात २७ एप्रिल रोजी विशेष शो 

पुणे : ” घरातल्या ज्येष्ठांना अनेकदा जुनं फर्निचर असे संबोधले जाते. नव्या घरात जुनं फर्निचर जसे आऊटडेटेड होते, मिसमॅच होते तशीच काहीशी अवस्था या ज्येष्ठांची झालेली असते. दोन पिढ्यांमधला हा दुरावाच्या वास्तवाचे चित्रण असलेला चित्रपट २६ एप्रिल रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होत आहे. तसेच २७ एप्रिल रोजी सायंकाळी ५ वा. सिटी प्राईड, कोथरूड येथे विशेष शो चे आयोजन केले आहे.” अशी माहिती जुनं फर्निचर या चित्रपटाचे दिग्दर्शक व मुख्य अभिनेता महेश मांजरेकर यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी लोट्स ग्रुपच्या लोट्स लाइफ फाउंडेशनचे संचालक सत्यप्रभा गिरी व मेधा मांजरेकर उपस्थित होते.
आज अनेक घरांमध्ये पालकांचा व्यावहारिक उपयोग करून घेतला जातो. एनआरआय मुलं महिन्यातून एखदा तरी फोन आईवडिलांना करतात. पण एकाच शहरात राहणार्‍या किंवा एकाच घरात राहणार्‍या मुलांकडे आई वडिलांना फोन करायला किंवा भेटायला वेळ नसतो. अनेक घरांमध्ये पालकांना जुनं फर्निचर संबोधले जाते. त्यातून हा विषय सुचला असे महेश मांजरेकर यांनी सांगितले.
आज घराघरातील प्रौढांच्या वाट्याला हताश अवस्था आलेली आहे. जुन्या फर्निचर प्रमाणे तेही अडगळ बनत आहेत. थोडी उसंत काढून या अडगळीकडे एकदा नीट पाहायला हवं. अडगळीमधला समृध्द वारसा शोधत त्याच्याशी कनेक्ट व्हायला हवं.
सत्य-सई फिल्म्स आणि स्कायलिंग एंटरटेन्मेंट प्रस्तुत जुन फर्निचर चे यतिन जाधव हे निर्माते आहेत. याची कथा, पटकथा, संवाद महेश मांजरेकर यांचे आहे. यामध्ये महेश मांजरेकर, मेधा मांजरेकर, सचिन खेडेकर, भूषण प्रधान यांच्या भूमिका आहेत. दिग्दर्शक महेश मांजरेकर यांचे आहे.
जुनं फर्निचर चित्रपटातील ७१ वर्षाचा गोविंद श्रीधर पाठक हा म्हातारा व्यवस्थेला आव्हान देतांना म्हणतो की या म्हातार्‍याला अडवूनच दाखवा. आपल्या पत्नीच्या निधनाचा ठपका आपल्या मुलांवर ठेवत कोर्टामध्ये नुकसान भरपाईचा दावा करतो. यामध्ये गोविंद पाठक अँग्री यंग मॅनच्या आवेशातही दिसतो. मोडेन पण वाकणार नाही हा त्यांचा बाणा आहे. दोन पिढ्यांमधील संघर्ष आज केवळ मतभेदांपुरता, जीवनमूल्यांमधील फरकांपुरता उरलेला नाही. या चित्रपटाचा विषय केवळ आपल्या कुटुंबात नाही तर आपल्या अंतरंगातही डोकावण्याची संधी आहे. यांतील संवाद हे चित्रपटाची उत्सुकता वाढवणारे आहेत. यामध्ये  काय चुकले सांग ना हे गाणं महेश मांजरेकर यांनी आपल्या आवाजात गायले आहे.
अनेकदा वयस्कर व्यक्तींना आउटडेटेड असं म्हंटल जातं. याचा सामानाची किंमत आणि ताकद काय आहे हे सांगणारा चित्रपट २६ एप्रिल रोजी प्रदर्शित होत आहे. महेश मांजरेकर दिग्दर्शित जुनं फर्निचर या चित्रपटाचा ट्रेलर प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला आहे.

मराठी संस्कृती जपणारे फाउंडेशन
लोट्स ग्रुपच्या लोट्स लाइफ फाउंडेशनचे संचालक सत्यप्रभा गिरी यांनी सांगितले की,  “आमचे फाउंडेशन मराठी संस्कृती जपणारी असून ज्येष्ठांचे प्रश्न व त्यांच्या समस्यांवर काम करतो. त्याच धर्तीवर हा चित्रपट असल्याने २७ एप्रिल रोजी संध्याकाळी ५ वा. सिटी प्राईड कोथरूड येथे विशेष शो चे आयोजन केले आहे. मराठी संस्कृती जपणारे अभिनेता महेश मांजरेकर हे आमचे जवळचे मित्र आहेत. मैत्रीखातर ते आमचे ब्रँड अ‍ॅम्बेसेडर आहेत. हा त्यांचा नवा चित्रपट जो नाते संबंध आणि माणुसकीला धरून आहे. आम्ही पुर्नविकासामध्ये ओल्ड एज लोकांचे महत्वाचे प्रश्न धरूनच काम करतो. हे करतांना घराबरोबरच ज्येष्ठाची मानसिकता बदलणे म्हणजेच रिडेव्हल्पमेंट  होईल.”

लोट्स ग्रुपच्या लोट्स लाइफ फाउंडेशनः
लोट्स ग्रुपच्या लोट्स लाइफ फाउंडेशनची स्थापना सत्यप्रभा गिरी यांनी केली आहे. समाजातील ज्येष्ठांच्या समस्या आणि विशेषकरून महिलांच्या सामाजिक आणि आरोग्यांवर विशेष लक्ष केंद्रित करून त्यांच्या कल्याणासाठी कार्य करत आहेत. फाउंडेशनच्या माध्यमातून कामगार कल्याण, कामाच्या ठिकाणी लहान मुलांसाठी पाळणाघर, महिलांन सुरक्षा प्रदान करणे व महिलांच्या सक्षमीकरणासाठी सतत प्रोत्साहन दिले जाते.

 मुंबई उच्च न्यायालय भेटीतून विद्यार्थ्यांनी जाणून घेतली कायद्याची कौशल्ये

पुणे : शैक्षणिक अभ्यासक्रमांतर्गत प्रात्यक्षिक ज्ञान अवगत करण्याकरिता सूर्यदत्त विधी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी मुंबई उच्च न्यायालयाला भेट दिली. सूर्यदत्त एज्युकेशन फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. संजय बी. चोरडिया व उपाध्यक्षा सुषमा चोरडिया यांच्या मार्गदर्शनाखाली प्राचार्य प्रा. डॉ. मिथिलेश विश्वकर्मा, डॉ. मोनिका सेहरावत यांच्या नेतृत्वात बीएएलएलबी द्वितीय सत्रातील विद्यार्थ्यांची भेट आयोजित करण्यात आली.
भारताच्या कायदेशीर वारशाचे सखोल ज्ञान वाढवताना विद्यार्थ्यांना कायदेशीर व्यवस्थेचा प्रत्यक्ष अनुभव प्रदान करणे हा या भेटीचा उद्देश होता. मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश देवेंद्र कुमार उपाध्याय यांच्या न्यायालयासह सत्रातील इतर न्यायालयांमध्ये विद्यार्थ्यांना नेण्यात आले. विद्यार्थ्यांनी उच्च न्यायालयातील न्यायप्रणाली आणि कार्यपद्धतीचे बारकाईने निरीक्षण केले. तसेच न्यायालयीन विभागांना भेट दिली. तसेच सूर्यदत्त विधी महाविद्यालयाच्या प्राध्यापक आणि विद्यार्थ्यांनी मुख्य न्यायाधीश यांचे कुलसचिव आणि प्रधान सचिव यांची भेट घेतली. त्यांच्याकडून कार्यपद्धती जाणून घेतली.
सूर्यदत्त विधी महाविद्यालयाच्या वतीने सल्लागार मंडळ सदस्य गीता कस्तुरी, प्राचार्य प्रा. डॉ. मिथिलेश विश्वकर्मा, डॉ. मोनिका सेहरावत यांनी विद्यार्थ्यांना मुंबई उच्च न्यायालयातील कामकाजाबाबत माहिती दिली. विद्यार्थ्यांनी विचारलेल्या प्रश्नांची समर्पक उत्तरे दिली. तसेच न्यायालयीन शिष्टाचार यासंदर्भात माहिती दिली.

पुस्तकी ज्ञानासह प्रत्यक्ष अनुभव विद्यार्थ्यांच्या ज्ञानात भर घालतो. कोणत्याही क्षेत्रातील कौशल्ये आत्मसात करताना त्यात्या क्षेत्रातील संस्थांना भेटी देणे, त्या क्षेत्रातील दिगजांना भेटणे, चर्चासत्रे आयोजन करणे अशा स्वरूपाचे नियोजन सूर्यदत्त संस्था करते. यामुळे विद्यार्थी केवळ परीक्षेपुरते मर्यादित न राहता प्रत्यक्ष कार्यक्षेत्रातील कौशल्ये आत्मसात करतात. याकरिता संस्था नेहमी अशा उपक्रमांना प्रोत्साहन देते.– प्रा डॉ संजय बी चोरडिया, संस्थापक अध्यक्ष, सूर्यदत्त एज्युकेशन फाउंडेशन

दुपारी १  वाजेपर्यंत ३१.७७ टक्के मतदान

मुंबई, दि.२६ : राज्यातील लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यातील मतदान आज दि.२६ एप्रिल २०२४ रोजी सकाळी ७.०० वा.पासून सूरु झाले आहे. दुसऱ्या टप्प्यातील एकूण आठ मतदार संघात दुपारी १ वाजेपर्यंत सरासरी ३१.७७ टक्के मतदान झाले आहे.

दुसऱ्या टप्प्यातील एकूण ८ लोकसभा मतदारसंघनिहाय टक्केवारी पुढीलप्रमाणे :

वर्धा – ३२.३२ टक्के

अकोला -३२.२५ टक्के

अमरावती – ३१.४०टक्के

बुलढाणा –  २९.०७ टक्के

हिंगोली –  ३०.४६ टक्के

नांदेड –  ३२.९३ टक्के

परभणी -३३.८८ टक्के

यवतमाळ – वाशिम -३१.४७ टक्के

राज्यात काही ठिकाणी ईव्हीएममध्ये तांत्रिक बिघाड; अधिकाऱ्यांची धावपळ, मतदार रांगेत ताटकळले

मुंबई : महाराष्ट्रातील ८ लोकसभा मतदारसंघात आज दुसऱ्या टप्प्यातील मतदान पार पडत आहे. सकाळी ७ वाजेपासून मतदानाला सुरुवात झाली आहे. अमरावती, अकोला आणि वर्ध्यात ईव्हीएममध्ये तांत्रिक बिघाड झाल्याचं पाहायला मिळालं.त्यामुळे मतदान केंद्राबाहेर काही वेळ मतदारांना करावी लागली प्रतीक्षा लागली. ईव्हीएममध्ये बिघाड होताच निवडणूक अधिकाऱ्यांची मोठी तारांबळ उडाली. अमरावती शहरातील रुक्मिणीनगर येथील शाळा क्रमांक १९ मधील खोली क्रमांक ५ मध्ये ईव्हीएम बंद पडले. जवळपास १५ मिनिटे वोटिंग मशीन बंद पडले होते. त्यामुळे मतदारांचा चांगलाच खोळंबा झाला होता. अखेर ईव्हीएममधील तांत्रिक बिघाड दुरुस्त करण्यात आला. सध्या अमरावतीमध्ये मतदान प्रक्रिया सुरळीत सुरू आहे.

दुसरीकडे, अकोला जिल्ह्यातील अकोट तालुक्यातही ईव्हीएम मशीनमध्ये बिघाड झाल्याचं पाहायला मिळालं. उमरा गावातील बुथ क्रमांक ३३३ मधील वोटिंग मशीन अचानक बंद पडलं. त्यामुळे साडेसात वाजेपर्यंत मतदानाला सुरुवात झालेली नव्हती. ईव्हीएम बदलण्यासाठी प्रशासनाचे प्रयत्न सुरू होते. तसेच, नांदेडच्या माहूर तालुक्यातील टाकळी येथील मतदान केंद्रावर ईव्हीएम मशीन बंद पडले आहे. जवळपास १ तासापासून ईव्हीएम बंद पडल्याने मतदान प्रक्रिया खोळंबली आहे. त्यामुळे मतदान केंद्राबाहेर मतदारांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. प्रशासनाकडून ईव्हीएममधील तांत्रिक बिघाड दुरुस्त केल्यानंतर पुन्हा मतदानाची प्रक्रिया सुरू आहे.

याचबरोबर, वर्ध्यात देखील ईव्हीएम मशीनमध्ये तांत्रिक बिघाड झाला. वर्धा लोकसभेचे उमेदवार खासदार रामदास तडस हे परिवारासह देवळी येथील यशवंत कन्या माध्यमिक शाळेच्या १८५ क्रमांकाच्या केंद्रावर सकाळी ७ वाजता मतदान करायला पोहोचले. अगदी सुरवातीलाच ईव्हीएम मशीन बंद पडल्याने येथील मतदान ४० मिनिट खोळंबले. सकाळी सव्वापाच वाजता संबंधित केंद्रावरील मशीन नादुरुस्त असल्याची तक्रार करण्यात आली होती. त्यानुसार मशीन दुरुस्त करण्यात आले होते. परंतु मतदान सुरवात झाल्यानंतर सुद्धा ही मशीन नादुरुस्त असल्याने खासदार तडस यांना थांबून राहावे लागले. त्यामुळे मतदारांची रांग लागली होती. ४० मिनिटानंतर सुरळीत सुरू झाले.

राज्यातील ८ लोकसभा जागांसाठी आज मतदान
महाराष्ट्रातील बुलडाणा, अकोला, अमरावती, वर्धा, यवतमाळ-वाशीम, हिंगोली, नांदेड आणि परभणी या ८ लोकसभा मतदारसंघांत आज मतदान पार पडत आहे. पहिल्या टप्पात विदर्भातील ५ जागांवर मतदान झाले होते. पहिल्या टप्प्यात बऱ्याच लोकांना मतदानाकडे पाठ फिरवल्याचे दिसून आले होते. त्यामुळे आज होणाऱ्या दुसऱ्या टप्प्यात मतदानाला मतदार कसा प्रतिसाद देतात, याकडे सर्वांचं लक्ष लागून आहे.