पुणे : शैक्षणिक अभ्यासक्रमांतर्गत प्रात्यक्षिक ज्ञान अवगत करण्याकरिता सूर्यदत्त विधी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी मुंबई उच्च न्यायालयाला भेट दिली. सूर्यदत्त एज्युकेशन फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. संजय बी. चोरडिया व उपाध्यक्षा सुषमा चोरडिया यांच्या मार्गदर्शनाखाली प्राचार्य प्रा. डॉ. मिथिलेश विश्वकर्मा, डॉ. मोनिका सेहरावत यांच्या नेतृत्वात बीएएलएलबी द्वितीय सत्रातील विद्यार्थ्यांची भेट आयोजित करण्यात आली.
भारताच्या कायदेशीर वारशाचे सखोल ज्ञान वाढवताना विद्यार्थ्यांना कायदेशीर व्यवस्थेचा प्रत्यक्ष अनुभव प्रदान करणे हा या भेटीचा उद्देश होता. मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश देवेंद्र कुमार उपाध्याय यांच्या न्यायालयासह सत्रातील इतर न्यायालयांमध्ये विद्यार्थ्यांना नेण्यात आले. विद्यार्थ्यांनी उच्च न्यायालयातील न्यायप्रणाली आणि कार्यपद्धतीचे बारकाईने निरीक्षण केले. तसेच न्यायालयीन विभागांना भेट दिली. तसेच सूर्यदत्त विधी महाविद्यालयाच्या प्राध्यापक आणि विद्यार्थ्यांनी मुख्य न्यायाधीश यांचे कुलसचिव आणि प्रधान सचिव यांची भेट घेतली. त्यांच्याकडून कार्यपद्धती जाणून घेतली.
सूर्यदत्त विधी महाविद्यालयाच्या वतीने सल्लागार मंडळ सदस्य गीता कस्तुरी, प्राचार्य प्रा. डॉ. मिथिलेश विश्वकर्मा, डॉ. मोनिका सेहरावत यांनी विद्यार्थ्यांना मुंबई उच्च न्यायालयातील कामकाजाबाबत माहिती दिली. विद्यार्थ्यांनी विचारलेल्या प्रश्नांची समर्पक उत्तरे दिली. तसेच न्यायालयीन शिष्टाचार यासंदर्भात माहिती दिली.
पुस्तकी ज्ञानासह प्रत्यक्ष अनुभव विद्यार्थ्यांच्या ज्ञानात भर घालतो. कोणत्याही क्षेत्रातील कौशल्ये आत्मसात करताना त्यात्या क्षेत्रातील संस्थांना भेटी देणे, त्या क्षेत्रातील दिगजांना भेटणे, चर्चासत्रे आयोजन करणे अशा स्वरूपाचे नियोजन सूर्यदत्त संस्था करते. यामुळे विद्यार्थी केवळ परीक्षेपुरते मर्यादित न राहता प्रत्यक्ष कार्यक्षेत्रातील कौशल्ये आत्मसात करतात. याकरिता संस्था नेहमी अशा उपक्रमांना प्रोत्साहन देते.– प्रा डॉ संजय बी चोरडिया, संस्थापक अध्यक्ष, सूर्यदत्त एज्युकेशन फाउंडेशन