मुंबई, दि. 12 नोव्हेंबर 2026
ज्या पद्धतीने एस.आर..ए ने झोपडपट्टी मुक्त मुंबई असा संकल्प केला आहे, त्याच पद्धतीने या झोपडपट्ट्यांमध्ये असणारे कुपोषण रोखण्यासाठी “कुपोषण मुक्त मुंबई” असा एक स्वतंत्र कार्यक्रम करावा, त्याचा कृती आराखडा येत्या पंधरा दिवसात सादर करा, असे निर्देश मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री ॲड. आशिष शेलार यांनी दिले.
मुंबईतील कुपोषित बालकांची संख्या आणि त्यावरील उपाययोजनांचा आज मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री ॲड. आशिष शेलार यांनी आढावा घेतला. यावेळी त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना विविध निर्देश दिले.

मुंबईत मध्यम कुपोषित बालकांची संख्या 5000 असून ही बाब आपल्या सगळ्यांसाठी अत्यंत शरमेची आहे. त्यामुळे ही परिस्थिती बदलण्यासाठी मुंबई महापालिकेने सर्व संबंधित प्राधिकरणे आणि शासकीय यंत्रणांशी समन्वय साधून ठोस कृती आराखडा तयार करावा व महिन्याभरात अहवाल सादर करावा, असे निर्देश त्यांनी दिले. तसेच दुष्काळी परिस्थितीमुळे मुंबईत स्थलांतरित होणाऱ्या कुटुंबांसोबत येणाऱ्या बालकांची तातडीने नोंदणी करून त्यांना पोषण आहार आणि आवश्यक आरोग्यसेवा उपलब्ध करून द्याव्यात, असेही त्यांनी स्पष्ट केले.
एसआरए योजनांतील झोपडपट्ट्यांमधील कुपोषित बालकांची संख्या कमी करण्यासोबतच अंगणवाड्यांच्या जागेचा प्रश्न कायमस्वरूपी सोडवावा. तसेच ‘झोपडपट्टीमुक्त मुंबई’ ही संकल्पना राबविणाऱ्या एसआरएने आता ‘कुपोषणमुक्त मुंबई’ हा स्वतंत्र कार्यक्रम हाती घ्यावा, असे निर्देश पालकमंत्री ॲड. आशिष शेलार यांनी दिले. त्यासाठी मुंबई महापालिका आणि राज्याच्या महिला व बालविकास या आरोग्य व संबंधित विभागाची मदत घ्यावी असेही त्यांनी सांगितले.
या बैठकीला मुंबई उपनगर जिल्हा अधिकारी सौरभ कटियार यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते.

