Home Blog Page 1074

निवडणूक निरीक्षकांकडून जिल्ह्यातील निवडणूक तयारीचा आढावा

पुणे, दि. २७ : पुणे जिल्ह्यातील चारही लोकसभा मतदारसंघाचे निवडणूक निरीक्षक, निवडणूक पोलीस निरीक्षक आणि खर्च निरीक्षक यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित बैठकीत निवडणूक निर्णय अधिकारी, सहायक निवडणूक निर्णय अधिकारी तसेच पोलीस विभागाच्या अधिकाऱ्यांसह शुक्रवारी सायंकाळी निवडणूक तयारीचा आढावा घेतला.

यावेळी मावळ लोकसभा मतदारसंघाचे निवडणूक निरीक्षक बुदीती राजशेखर, निवडणूक पोलीस निरीक्षक विवेकानंद सिंग, निवडणूक खर्च निरीक्षक सुधांशू राय, पुणे लोकसभा मतदारसंघ निवडणूक निरीक्षक प्रसाद लोलयेकर, निवडणूक पोलीस निरीक्षक ज्योती नारायण, खर्च निरीक्षक कमलेश मकवाना, बारामती लोकसभा मतदारसंघ निवडणूक पोलीस निरीक्षक जॉएस लालरेम्मावी, खर्च निरीक्षक विजय कुमार, शिरुर लोकसभा मतदारसंघ निवडणूक निरीक्षक कुमार सौरभ राज, निवडणूक पोलीस निरीक्षक जया गौरी, खर्च निरीक्षक बी. मोहन, जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. सुहास दिवसे, मावळ मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी दीपक सिंगला, बारामती मतदारसंघाच्या निवडणूक निर्णय अधिकारी कविता द्विवेदी, शिरुरचे निवडणूक निर्णय अधिकारी अजय मोरे आदी उपस्थित होते.

मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी व्यापक जनजागृती करावी, मतदान केंद्रावर उपलब्ध करण्यात येणाऱ्या सुविधांची माहिती नागरिकांपर्यंत पोहोचवावी. निवडणूक कर्मचाऱ्यांना आवश्यक त्या सुविधा पुरविण्यात याव्यात. उमेदवारांचा निवडणूक खर्च योग्य पद्धतीने नोंदविला जाईल यावर लक्ष देण्यासह निवडणूक खर्चाची पडताळणी करावी. नियमाप्रमाणे वेळोवेळी निवडणूक खर्चाचे परीक्षण करावे. मतमोजणी केंद्रांच्या ठिकाणीदेखील सर्व सोयीसुविधा उपलब्ध करण्याच्यादृष्टीने वेळोवेळी आढावा घेऊन पूर्वतयारी करावी, आदी सूचना योवळी निवडणूक निरीक्षकांनी दिल्या.

निवडणुकीत रोकड, मद्य तसेच इतर कोणत्याही स्वरुपातील आमिषांचा वापर होऊ नये यासाठी तपासणी नाक्यांवर तसेच भरारी पथकांद्वारे जास्तीत जास्त वाहनांची तपासणी करावी. अवैध मद्य वाहतूक व विक्री प्रकरणात राज्य उत्पादन शुल्क विभागाने जप्तीसह कठोर कारवाई करावी, अशाही सूचना निवडणूक निरीक्षकांनी दिल्या.

जिल्हाधिकारी डॉ. दिवसे यांनी पुणे जिल्ह्यातील निवडणूक तयारीचा आढावा सादरीकरणाद्वारे देताना सांगितले, जिल्ह्यातील विशेषत: शहरी भागातील मतदाराची टक्केवारी वाढविण्यासाठी गेल्या तीन वर्षात युवा मतदार, उद्योगांमध्ये काम करणारे मतदार, महिला मतदार यांच्यावर विशेष लक्ष केंद्रीत करण्यात आले आहे. जिल्ह्यात ८३ लाख ३८ हजार ७४७ इतकी मतदार संख्या असून मतदान जागृती उपक्रमांतर्गत जास्तीत जास्त मतदारांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. पहिल्यांदा मतदान करणाऱ्या १८ ते १९ वयोगटातील युवा मतदारांची संख्या १ लाख १ हजार ४४४ तर २० ते २९ वयोगटातील मतदारांची संख्या १३ लाख ८० हजार ४३१ असल्याचे त्यांनी सांगितले.

जिल्ह्यात ८ हजार ३८२ मतदान केंद्रे असून १९ संवेदनशील मतदान केंद्रे आहेत. अतिसंवेदनशील मतदान केंद्र एकही नसून शॅडो भागातील ३८ मतदान केंद्रे आहेत. येथे संपर्कासाठी हॅम रेडिओसह अन्य व्यवस्था करण्यात आली आहे. सर्व मतदारसंघांसाठी मिळून १० हजार ३१ क्षेत्रीय (सेक्टर) अधिकारी तसेच ८५९ सेक्टर पोलीस अधिकारी यांची नेमणूक करण्यात आली आहे. टपाल, ईमेल आदीद्वारे तसेच सी-व्हिजीलद्वारे आचारसंहिता मोठ्या ७८२ तक्रारी प्राप्त झाल्या असून कार्यवाही करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

श्रीमती द्विवेदी यांनी सांगितले, बारामती लोकसभा मतदार संघात तिसऱ्या टप्प्यात ७ मे रोजी मतदान होणार असून मतदारसंघासाठी आवश्यक अतिरिक्त बॅलेट युनिट प्राप्त झाले त्यांच्या पुरवणी सरमिसळसह दुसरी सरमिसळ झाली आहे. मतदान कर्मचाऱ्यांचे तीन प्रशिक्षण झाले असून मतदान केंद्रांवरील तयारी अंतिम टप्प्यात असल्याचे त्यांनी सांगितले.

यावेळी पुणे शहरचे अपर पोलीस आयुक्त अरविंद चावरिया, पिंपरी चिंचवडचे अपर पोलीस आयुक्त वसंत परदेशी, पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक पंकज देशमुख यांनी कायदा व सुव्यवस्था तसेच निवडणुकीसाठी पोलीस बंदोबस्ताबाबत माहिती देतानाच परवानाप्राप्त शस्त्र जमा करण्याची कार्यवाही, मद्य, रोकड जप्तीची कारवाई आदी माहिती दिली.

बैठकीस सर्व विधानसभा मतदार संघांचे सहायक निवडणूक निरीक्षक, सर्व निवडणूकविषयक जबाबदाऱ्यांचे समन्वयक अधिकारी आदी उपस्थित होते.

पुणे महापालिकेच्या तिजोरीत एप्रिल अखेर पर्यंत अडिचशे कोटींचा मिळकत कर भरणा

  पुणे एप्रिल आणि मे महिन्यात जास्तीत जास्त उत्पन्न मिळावे यासाठी आमचे प्रयत्न सुरु आहेत.काल (ता. 26) पर्यंत 1 लाख 77 हजार 485 नागरिकांनी 253 कोटी 45 लाख रुपयांचा कर महापालिकेकडे जमा केला आहे. आणखी एका महिन्यापेक्षा जास्त कालावधी शिल्लक असून, यामध्ये पुणेकरांकडून कर भरणा मोठ्या प्रमाणात होईल, अशी माहिती पुणे महापालिकेचे उपायुक्त माधव जगताप यांनी दिली आहे.

पुणे महापालिकेतर्फे एप्रिल आणि मे या दोन महिन्यात 25 हजारापर्यंत मिळकतकर असणाऱ्या नागरिकांना 10 टक्के, तर त्यापेक्षा जास्त रकमेचा मिळकतकर असल्यास 5 टक्के सवलत दिली जाते. त्यामुळे नागरिकांकडून कर भरण्यास चांगला प्रतिसाद मिळत आहे.एप्रिल आणि मे महिन्यामध्ये निवासी मिळकतकरावर 10 टक्क्यापर्यंत सूट असल्याने महापालिकेच्या तिजोरीत पैसे जमा होण्यास सुरुवात झाली आहे. गेल्या 26 दिवसात 253 कोटी 45 लाख रुपये जमा झाले आहेत. या दोन महिन्यात एक हजार कोटीपेक्षा जास्त उत्पन्न मिळेल अशी शक्यता प्रशासनातर्फे व्यक्त करण्यात आली आहे.

2024-25 च्या अर्थसंकल्पात मिळकतकरातून 2 हजार 549  कोटी रुपयांचे उत्पन्न अपेक्षित आहे. हे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी निवासी मिळकतकर या दोन महिन्यात भरणे आवश्‍यक आहे. त्यासाठी प्रशासनातर्फे प्रयत्न सुरु आहेत. आत्तापर्यंत 11 लाख 50 हजार नागरिकांना मिळकतकराची बिले पाठविण्यात आले आहेत. पुढील आठवड्यापर्यंत पोस्टाने हे बिल नागरिकांना मिळतील. तसेच एसएमएस, इमेलद्वारे देखील बिल पाठविण्यात आलेले आहे.

कॅलिफोर्नियाच्या एसएइ एरो डिझाईन वेस्ट स्पर्धेत पीसीसीओईचे नेत्रदीपक यश

पिंपरी, पुणे (दि. २७ एप्रिल २०२४) कॅलिफोर्निया, यूएसए येथे सोसायटी ऑफ ऑटोमोटिव्ह इंजिनियर्स (SAE) इंटरनॅशनल द्वारे आयोजित करण्यात आलेल्या एसएई एरो डिझाईन वेस्ट स्पर्धेत पीसीसीओईच्या “टीम मावेरिक इंडिया” या संघाने नेत्रदीपक यश मिळवले. ७५ देशातील विविध संघांनी यामध्ये सहभाग घेतला होता. जागतिक पातळीवर प्रतिष्ठेच्या या स्पर्धेत “टीम मावेरिक इंडिया” संघाने विविध गटात उल्लेखनीय यश मिळवून एकूण स्पर्धेत जागतिक पातळीवर दहावा क्रमांक पटकावला आणि नेत्रदीपक यश मिळवले. या यशामुळे जागतिक पातळीवर भारतीय अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांमध्ये उच्च तांत्रिक क्षमता असल्याचे सिद्ध झाले आहे.
पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टच्या (पीसीईटी) पिंपरी चिंचवड अभियांत्रिकी महाविद्यालयातील (पीसीसीओई) विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या रेडिओ-नियंत्रित विमानाच्या डिझाइन, अभियांत्रिकी आणि उड्डाण क्षमतांचे मूल्यांकन उल्लेखनीय होते. या स्पर्धेत जगभरातील संघ नाविन्यपूर्णता, तांत्रिक कौशल्ये आणि टीमवर्कचे प्रदर्शन करतात.
पीसीसीओई टीमचे नेतृत्व रिफा अन्सारी हिने केले. यामध्ये पार्थ देशमुख, मिहीर रमेश झांबरे, अनिकेत पिंगळे, अपूर्वा परदेशी, तन्मय राजपूत, ओम दुर्गे, प्रणाली मगदूम, आयुष बोडखे, सर्वेश पाटील, अनिरुद्ध पाटील, मृणाल सागरे, तृप्ती बावनकर या विद्यार्थ्यांचा सहभाग होता.
पीसीसीओई संचालक डॉ. गोविंद कुलकर्णी, मेकॅनिकल विभागाचे प्रमुख डॉ. पी. ए. देशमुख, प्रा. डॉ. नरेंद्र आर. देवरे, प्रा. चंदन इंगोले यांनी मार्गदर्शन केले.
पीसीसीओईच्या मोटरस्पोर्ट्स संघाचे हे यश विद्यार्थ्यांमध्ये नावीन्य आणि व्यावहारिक कौशल्ये वाढवण्याचे महत्त्व अधोरेखित करते. स्पर्धात्मकता आणि उत्कृष्टतेच्या संस्कृतीला चालना देऊन, आंतरराष्ट्रीय स्तरावर तरुण अभियंत्यांना त्यांच्या कलागुणांचे प्रदर्शन करण्यासाठी पीसीसीओईचे व्यवस्थापन नेहमीच पाठबळ देते असे पीसीसीओई संचालक डॉ. गोविंद कुलकर्णी यांनी सांगितले.
पीसीईटीचे अध्यक्ष ज्ञानेश्वर लांडगे, उपाध्यक्षा पद्माताई भोसले, सचिव विठ्ठल काळभोर, खजिनदार शांताराम गराडे, विश्वस्त हर्षवर्धन पाटील, उद्योजक नरेंद्र लांडगे, अजिंक्य काळभोर, कार्यकारी संचालक डॉ. गिरीश देसाई यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक करत पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

प्लास्टिक मुक्त वसुंधरेसाठी सर्वांनी सजग झाले पाहिजे – विनोद बोधनकर

चिंचवड येथे गांधी पेठ तालीम मित्र मंडळाच्या जिजाऊ व्याख्यानमालेचा रविवारी समारोप

पिंपरी, पुणे (दि. २७ एप्रिल २०२४) मानवाच्या पुढच्या पिढीचे अस्तित्व टिकवून ठेवण्यासाठी व प्लास्टिक मुक्त वसुंधरेसाठी सर्वांनी सजग झाले पाहिजे. यासाठी शाळांमध्ये भूगोलाबरोबरच “भूजलगोल” शिकवून विद्यार्थ्यांमध्ये जागृती केली पाहिजे. एक विद्यार्थी दोन पालकांमध्ये जागृती करतो. पुणे, पिंपरी चिंचवड मधील शाळांमधून अठरा हजार पाचशे विद्यार्थी दरमहा “सागरमित्र” या पथदर्शी प्रकल्पांतर्गत दहा टन प्लास्टिक गोळा करतात. हे प्लास्टिक रिसायकल केले जाते. विद्यार्थी पालकांबरोबरच समाजातील सर्व घटकांनी प्लास्टिक मुक्त वसुंधरा करण्यासाठी आपला खारीचा वाटा उचलावा. यासाठी पाण्यासाठी प्लास्टिकच्या बाटल्या बंद करून स्टीलच्या बाटलीचा वापर करावा. तसेच प्लास्टिक कॅरीबॅग ऐवजी ज्यूटच्या, कापडी पिशव्यांचा वापर करावा असे आवाहन पर्यावरण तज्ञ विनोद बोधनकर यांनी केले.
गांधी पेठ तालीम मित्र मंडळ ही पिंपरी चिंचवड शहरातील एक सामाजिक व प्रबोधनात्मक कार्यक्रम आयोजित करणारी अग्रगण्य संस्था आहे. संस्थेच्या वतीने जिजाऊ व्याख्यानमालेचे (वर्ष ३४ वे) तिसरे पुष्प गुंफताना बोधनकर यांनी “प्रदूषण नदीचे व प्लास्टिकचे” या विषयावर व्याख्यान दिले. यावेळी पिंपरी चिंचवड महानगरपालिका पर्यावरण विभाग प्रमुख संजय कुलकर्णी, संस्थेचे अध्यक्ष राजाभाऊ गोलांडे, व्याख्यानमालेचे समन्वयक सुहास पोफळे, हिरामण भुजबळ, राजू घोडके, गणेशोत्सव समिती अध्यक्ष विपुल नेवाळे, सदस्य महेश गावडे, नवनाथ सरडे,धीरज गुत्ते, जगदीश घुले, प्रवीण भोकरे, संदीप जंगम आदी उपस्थित होते.
व्याख्यानमालेचा समारोप रविवारी (दि.२८) निवृत्त न्यायाधीश संजय भाटे यांच्या “माझे संविधान माझा अभिमान” या विषयावरील व्याख्यानाने होणार आहे.
यावेळी बोधनकर म्हणाले की, अमेरिका, सिंगापूर सारखी विकसित राष्ट्रे विकसनशील व मागास राष्ट्रांपेक्षा कैक पटीने जास्त प्लास्टिकचा वापर करतात. यातील दहा टक्के रिसायकल साठी जाते. उर्वरित जमिनीवर पडून राहते ते नदीतून समुद्रात मिसळले जाते. हे प्लास्टिक विघटन व्हायला शेकडो वर्ष लागतात. समुद्रातील प्लास्टिक मुळे जलचर धोक्यात आले आहेत. तसेच ऑक्सिजन निर्माण करणाऱ्या खारफुटीच्या समुद्री वनस्पतींचे अस्तित्व संपुष्टात येत आहे. प्लास्टिक आणि नदी नाल्यात जाणाऱ्या प्रदूषण युक्त पाण्यामुळे नदीतील जलचर मृत पावतात. पूर्वी पुण्यातील मुळा, मुठा नदीत ८० प्रकारच्या विविध माशांच्या प्रजाती व इतर जलचर होते. आता फक्त चिलापी आणि मांगुर या परदेशी माशांचे अस्तित्व टिकून आहे. प्लास्टिकचा वापर थांबवा हे आपण म्हणतो, परंतु पुढची ४० वर्षे अमर्याद प्लास्टिक वापरले जाणार आहे यासाठी भांडवलदार उद्योजकांनी गुंतवणूक करून प्रकल्प उभारले आहेत. मानवाबरोबरच जलचरांना प्रदूषणापासून वाचवण्यासाठी आता प्रत्येकाने “जिवोत्तम” झाले पाहिजे. यातून स्वच्छता आणि अहिंसा दोन्ही हेतू साध्य होतील असेही बोधनकर यांनी सांगितले.
संजय कुलकर्णी यांनी सांगितले की, पाच वर्षांपूर्वी पवना नदीत पोहता येत होते. दहा वर्षांपूर्वी येथील पाणी पिता येत होते. आता पवना आणि इंद्रायणी नदीतील पाणी प्रदूषित झाले आहे. याला “विकास” जबाबदार आहे. घरातील बेसिन ते नदीपर्यंत प्रदूषण आहे. नदीच्या या प्रदूषणास पिंपरी चिंचवड महानगरपालिका जबाबदार नसून नदीकिनारी असणारे नागरिक व नागरिकरण जबाबदार आहे.
स्वागत संदीप जंगम आणि आभार राजाभाऊ गोलांडे यांनी मानले.

मी केलंं,मी केलं सांगत सुप्रिया मी केलेल्या विकासकामांचे श्रेय घेतेय:भाषणे करून जनतेचे पोट भरत नाही-सुप्रिया सुळे यांच्यावर अजित पवारांची टीका

पुणे/कात्रज -मी केलेली विकास कामे सुळे यांनी आपल्या प्रचार पुस्तकात छापली आणि त्याचं श्रेय घेतले असा आरोप उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केला आहे. मी केलं, मी केलं, मी केलं अशी राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळेंची नक्कल करत बारामतीतील विकासकामांवरुन अजित पवारांनी सडकून टीका केली आहे. भोर, वेल्हे आणि मुळशी तालुक्यात पदाधिकाऱ्यांचा मेळावा आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्यात बोलताना त्यांनी सुप्रिया सुळेंवर टीका केली आहे.

यावेळी बोलतांना अजित पवार म्हणाले, ”सुप्रिया सुळेंच्या प्रचार पुस्तकांत मी केलेली कामं छापण्यात आली आहेत. बारामतीतील सर्व इमारती मी बांधल्या आहेत. मात्र फोटो त्यांच्या पुस्तकात दिसत आहेत. सुप्रिया सुळे मी केलेल्या कामांचं श्रेय घेत आहेत. ही कामं केली असेल तर भोर, वेल्हा आणि मुळशीत काय केले हे त्यांनी दाखवावे. नुसती भाषणं करून होत नाही. भाषणं केल्याने जनतेचं पोट भरणार नाही त्यासाठी कृती करावी लागेल”, असा टोला अजित पवारांनी लगावला आहे.

याशिवाय मतदारांना अजित पवारांनी आवाहन केले आहे. ”ही भावकी-गावकीची निवडणूक नाही. ही देशाचे भवितव्य ठरवणारी निवडणूक आहे. आज देश मोठ्या प्रमाणात पसरलेला आहे. 135 ते 140 कोटी जनता अठरा पगड जाती इथे राहतात. देशाला स्वातंत्र्य मिळून 75 वर्षापेक्षा जास्त काळ लोटला आहे, तरी अजून काही भाग मुलभूत सुविधांपासून वंचित आहेत. मलाही तुमच्या पाठिंब्याची, तुमच्या पवित्र मतांची गरज आहे. बारामतीसाठी 7 तारखेला मतदान आहे. दोन नंबरला सुनेत्रा पवारांच नाव, शेजारी घड्याळ चिन्ह असेल ते बटण दाबा” असे अजित पवार म्हणाले.

पुढे अजित पवार म्हणाले, ”आम्ही इतरांसारखे खोटं बोलत नाही. काही जणांनी मला निवडून द्या, एमआयडीसी झाली नाही, तर 2019 मध्ये मत मागायला येणार नाही असे आश्वासन दिले होते. मात्र तरी ते येतात. माझे मात्र तसे नाही. मी सहजासहजी शब्द देत नाही. आणि शब्द दिला तर कोणाच्या बापाच ऐकत नाही. दिलेला शब्द मी पूर्ण करतो. कामाच्या माणसांना आपले करण्याचाही प्रयत्न करतो”, असे अजित पवार म्हणाले.

अतिउच्चदाबाच्या ४०० केव्ही उपकेंद्रात बिघाड ;पिंपरी, तळेगाव, चाकण परिसरात दीड तास वीजपुरवठा खंडित

पुणे,पॉवर ग्रीड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेडच्या (पीजीसीआयएल) तळेगाव अतिउच्चदाब ४०० केव्ही उपकेंद्रात बिघाड झाल्यामुळे शुक्रवारी (दि. २६) पिंपरी, चिंचवड, पिंपळे सौदागर, रहाटणी, वाकड, चाकण, तळेगाव, वडगाव, कामशेत, मरकळ, आकुर्डी या परिसरातील सुमारे १ लाख ३२ हजार ९०० ग्राहकांचा वीजपुरवठा दुपारी १.४९ ते ३.३० या कालावधीत खंडित झाला होता.

याबाबत माहिती अशी की, तळेगाव येथील ‘पीजीसीआयएल’च्या अतिउच्चदाब ४०० केव्ही उपकेंद्रात आज दुपारी पावणे दोनच्या सुमारास बिघाड झाला. त्यामुळे महापारेषणच्या २२० केव्ही काठापूर, १३२ केव्ही सणसवाडी, १३२ केव्ही मरकळ, २२० केव्ही थेऊर, १३२ केव्ही यवत, १३२ केव्ही रहाटणी, २२० केव्ही उर्से, २२० केव्ही चिंचवड या अतिउच्चदाबाच्या उपकेंद्रांचा वीजपुरवठा बंद पडला.

परिणामी महावितरणच्या १८ उपकेंद्रांचा वीजपुरवठा देखील खंडित झाला. अतिउच्चदाबाच्या आठ उपकेंद्रांचा वीजपुरवठा बंद पडल्याने तब्बल ५२३ मेगावॅट विजेची पारेषण तूट निर्माण झाली. त्यामुळे पारेषण यंत्रणेतील संभाव्य धोके व बिघाड टाळण्यासाठी स्वयंचलित भारव्यवस्थापन यंत्रणा म्हणजेच ‘एलटीएस’ (Load Trimming Scheme) यंत्रणा कार्यान्वित झाली. त्यामुळे पिंपरी गाव, चिंचवड, पुनावळे, वाल्हेकरवाडी, रहाटणी, पिंपळे सौदागर, वाकड, ताथवडे, किवळे, रावेत, थेरगाव, सांगवी, आकुर्डी परिसर तसेच चाकण, कुरळी, नाणेकरवाडी, निघोजे, शेल पिंपळगाव, धावडी, तळेगाव, वडगाव, कामशेत शहर व परिसरातील सुमारे १ लाख ३२ हजार ९०० ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित झाला.

त्यानंतर ‘पीजीसीआयएल’च्या अधिकाऱ्यांनी युद्धपातळीवर तांत्रिक उपाययोजना करून दीड तासांत पर्यायी स्वरुपात वीजपुरवठा उपलब्ध करून दिला व महापारेषणच्या अतिउच्चदाबाच्या व त्यानंतर महावितरणच्या उपकेंद्रांचा खंडित झालेला वीजपुरवठा टप्प्याटप्प्याने पूर्ववत झाला. ‘पीजीसीआयएल’च्या तळेगाव ४०० केव्ही उपकेंद्रातील बिघाड दुरूस्तीचे काम युद्धपातळीवर सुरु असून महापारेषण कंपनीचे पुणे येथील एक पथक याकामी सहकार्य करीत आहे. आज रात्री उशिरापर्यंत उपकेंद्रातील दुरुस्तीचे काम पूर्ण होणार असल्याची माहिती देण्यात आली. 

डॉ. अमोल कोल्हे यांच्या प्रचारासाठी शरद पवार मैदानात

शिरूर लोकसभेत शरद पवार घेणार पाच सभा, तर आदित्य ठाकरेंची होणार रॅली

पुणे – लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल झाल्यानंतर खऱ्या अर्थाने प्रचारात रंगत यायला सुरुवात झाली आहे. आपले उमेदवार निवडून आणण्यासाठी पक्षातले जेष्ठ नेते आता निवडणुकीच्या मैदानात उतरत आहेत. महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार खासदार डॉ. अमोल कोल्हे यांच्या प्रचारासाठी पक्षाचे अध्यक्ष शरद पवार हे मैदानात उतरणार आहेत.

शिरुर लोकसभा मतदारसंघात शरद पवार यांच्या एकूण पाच सभा होणार आहेत. तर शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे नेते आदित्य ठाकरे यांची भोसरी विधानसभेत 7 मे रोजी रॅली असणार आहे.

शिरुर-हवेली, हडपसर, आंबेगाव-शिरुर, खेड -आळंदी, जुन्नर या
विधानसभा मतदारसंघात शरद पवारांची प्रत्येकी एक सभा होणार आहे.

शिरूर लोकसभा मतदारसंघ, सभांचे नियोजन

शिरूर – हवेली विधानसभा
२८ एप्रिल – उरळीकांचन, या. हवेली
जुन्नर विधानसभा
३० एप्रिल – ओतूर बाजार, ता. जुन्नर
हडपसर विधानसभा
६ मे – कात्रज
भोसरी विधानसभा
७ मे – मा. आदित्य ठाकरे यांची रॅली
आंबेगाव – शिरूर विधानसभा
८ मे – रांजणगाव, ता. शिरूर
खेड – आळंदी विधानसभा
१० मे – चाकण बाजार समिती आवार

गुजरातच्या कांदा निर्यातीला परवानगी मिळत असताना शिंदे, फडणवीस व अजित पवार काय झोपा काढत होते काय? : अतुल लोंढे

मुंबई, दि. २६ एप्रिल २०२४
कांदा निर्यातबंदी करून मोदी सरकारने शेतकऱ्यांवर अन्याय केला असून कांदा निर्यातबंदी उठवावी अशी मागणी शेतकरी करत असताना त्याकडे केंद्रातील मोदी सरकारने दुर्लक्ष केले. आता लोकसभा निवडणुका सुरु असताना मोदी सरकारने गुजरातमधील २ हजार मेट्रीक टन कांदा निर्यातीला परवानगी दिली आहे. गुजरातला परवानगी देताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना शेजारचा महाराष्ट्र का दिसला नाही. मोदी सरकारचा हा अजब न्याय असून गुजरातला कांदा निर्यातीस परवानगी देता मग महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनी काय पाप केले आहे? असा संतप्त सवाल प्रदेश काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे यांनी विचारला आहे.
यासंदर्भात बोलताना अतुल लोंढे म्हणाले की, भारतीय जनता पक्षाचे सरकार हे शेतकरी विरोधी आहे याचा सातत्याने प्रत्यय येत आहे. कांदा उत्पादक शेतकऱ्यांना सुरुवातीला चांगला भाव मिळाला, शेतकऱ्यांच्या खिशात चार पैसे पडत असताना मोदी सरकारने कांदा निर्यात बंदी केली व कांद्याचे भाव घसरले. कांदा निर्यातबंदी उठवावी यासाठी महाराष्ट्रातील शेतकरी मागणी करत आहेत परंतु महाराष्ट्राच्या व इतर राज्यातील शेतकऱ्यांकडे मोदी सरकारने जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले व आता अचानक गुजरात राज्यातील कांदा निर्यातील परवानगी दिली आहे. नरेंद्र मोदी हे देशाचे पंतप्रधान नसून ते केवळ गुजरातचे पंतप्रधान असल्यासारखे वागत आहेत. मोदी सरकार गुजरातला कांदा निर्यातीची परवानगी देत असताना राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार हे काय झोपा काढत होते का? मोदींकडे जाऊन कांदा निर्यात बंदी उठवण्याची धमक या नेत्यांमध्ये नाही का? असा सवाल उपस्थित करत कांदा उत्पादक शेतकरी मोदी सरकारला धडा शिकवल्याशिवाय गप्प बसणार नाहीत, असेही अतुल लोंढे म्हणाले.

विक्रमी मताधिक्यासाठी मतदानाचा टक्का वाढवा – खासदार बारणे

थेरगाव, दि. 26 एप्रिल – मावळ लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार खासदार श्रीरंग बारणे यांना चिंचवड विधानसभा मतदारसंघात गेल्या निवडणुकीपेक्षा दुप्पट मताधिक्य मिळेल. सुमारे पावणेदोन ते दोन लाख मतांच्या फरकाने ते विजयी होतील, असा विश्वास पिंपरी-चिंचवड भाजपचे शहराध्यक्ष शंकर जगताप यांनी आज (शुक्रवारी) व्यक्त केला.

मावळ लोकसभा मतदारसंघातील शिवसेना-भाजप-राष्ट्रवादी- मनसे- आरपीआय- रासप- मित्रपक्ष महायुतीचे उमेदवार खासदार यांच्या प्रचारार्थ थेरगाव येथील संतोष मंगल कार्यालयात झालेल्या नमो संवाद सभेत ते बोलत होते. त्यावेळी खासदार बारणे, भाजपचे चिंचवड विधानसभा अध्यक्ष काळूराम बारणे, माजी नगरसेवक सिद्धेश्वर बारणे, अभिषेक बारणे, हर्षल ढोरे‌ तसेच प्रसाद कस्पटे, पियुशा पाटील, नितीन बारणे, रवी भिलारे आदी पदाधिकारी उपस्थित होते.

शंकर जगताप म्हणाले की, गेल्या दहा वर्षात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशात घडवलेल्या अमूलाग्र बदलांमुळे नरेंद्र मोदी यांची पंतप्रधानपदाची तर बारणे यांची खासदारकीची हॅटट्रिक निश्चित आहे. भारतात 400 पेक्षा अधिक खासदार निवडून आणताना त्यात मावळातून बारणे यांना पुन्हा संसदेत पाठवण्याची जबाबदारी आपल्या सर्वांची आहे. मागच्या निवडणुकीत चिंचवड विधानसभा मतदारसंघातून पारनेर यांना सर्वाधिक 96 हजारांचे मताधिक्य मिळाले होते. त्यात दुपटीने वाढ होऊन यावेळी पावणेदोन ते दोन लाखांपर्यंत मताधिक्य वाढेल.

प्रचंड उन्हामुळे मतदानाची टक्केवारी कमी होत असल्याबद्दल खासदार बारणे यांनी चिंता व्यक्त केली. विदर्भामध्ये 42-43% मतदान झाले आहे. विक्रमी मताधिक्याच्या गोष्टी करताना मतदानाची टक्केवारी वाढेल, यासाठी कार्यकर्त्यांनी काळजी घेणे आवश्यक आहे. सकाळच्या सत्रात जास्तीत जास्त मतदान होण्यासाठी कार्यकर्त्यांनी प्रयत्न करावेत, अशी सूचना त्यांनी केली.

मनसे ‘आपला माणूस’ म्हणून खासदार बारणे यांचे काम करणार – रणजीत शिरोळे

आकुर्डी, दि. 26 एप्रिल – महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे कार्यकर्ते मावळ लोकसभा मतदारसंघात ‘आपला माणूस’ म्हणून महायुतीचे उमेदवार श्रीरंग आप्पा बारणे यांचे काम करतील व त्यांना विक्रमी मताधिक्याने निवडून आणतील, अशी ग्वाही मनसेचे सरचिटणीस रणजीत शिरोळे यांनी आज (शुक्रवारी) दिली.

मावळ लोकसभा मतदारसंघातील शिवसेना- भाजप- राष्ट्रवादी- मनसे- आरपीआय- रासप- मित्रपक्ष महायुतीचे उमेदवार खासदार बारणे यांच्या प्रचाराच्या नियोजनासाठी काळभोर नगर येथे आयोजित करण्यात आलेल्या पिंपरी- चिंचवड मधील मनसे कार्यकर्त्यांच्या बैठकीत ते बोलत होते.

बैठकीस खासदार बारणे, मनसेचे शहराध्यक्ष सचिन चिखले, महिला अध्यक्ष सीमा बेलापूरकर तसेच हेमंत डांगे, प्रीती सिंह परदेशी, राजू भालेराव, अनिकेत प्रभू, राजू सावळे, अंकुश तापकीर, सागर लांघे, नितीन चव्हाण, अनिता पांचाळ, आकाश सागरे, अलेक्स झांजर, दत्ता देवतरासे, मयूर चिंचवडे, विशाल मानकरी, बाळा दानवले, नितीन सूर्यवंशी, राज अवसरे, कृष्णा बी रुणगीकर, काशिनाथ खजूरकर, चंद्रकांत दोडमणी यांच्यासह मनसेचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

देशाच्या प्रगतीची घोडदौड यापुढेही सुरू राहण्यासाठी नरेंद्र मोदी पुन्हा पंतप्रधान पुणे गरजेचे आहे. त्यामुळेच राज साहेबांनी महायुतीला बिनशर्त पाठिंबा दिला आहे. राज साहेबांच्या आदेशानुसार आपल्याला देशाच्या सुवर्णकाळाचे साक्षीदार व्हायचे आहे. त्यासाठी एकजुटीने, एकदिलाने ‘आपला माणूस’ आप्पा बारणे यांच्या हॅटट्रिकसाठी महाराष्ट्र सैनिक जीवाची बाजी लावतील, असे शिरोळे म्हणाले.

खासदार बारणे म्हणाले की, शिवसेना आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना या दोन संघटना प्रामाणिकपणे सर्वसामान्य माणसांसाठी काम करतात. स्वतःचा एकही उमेदवार न देता, केवळ देशहितासाठी महायुतीला बिनशर्त पाठिंबा दिल्याने राज साहेबांच्या मनाचा मोठेपणा दिसून येतो. मनसेचे आपल्याला नेहमी सहकार्य व पाठिंबा मिळालेला आहे. निवडणुकीनंतरही आपण या सहकार्याची जाणीव ठेवू.

मनसेच्या वतीने शिरोळे यांनी खासदार बारणे यांचा सत्कार केला व त्यांना निवडणुकीसाठी शुभेच्छा दिल्या. विशाल मानकरी यांनी सूत्रसंचालन केले तर अनिकेत प्रभू यांनी आभार मानले.

वडगाव शेरी व कोथरूड पदयात्रांमध्ये रवींद्र धंगेकरांना प्रतिसाद..

पुणे-पुणे लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडी व इंडिया आघाडीचे काँग्रेस पक्षाचे उमेदवार आ. रवींद्र धंगेकर यांच्या प्रचारार्थ गुरुवार सायंकाळी कोथरूड आणि शुक्रवार सकाळी वडगाव शेरी येथे झालेल्या जीपयात्रा / पदयात्रेला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. कोथरूड विधानसभा मतदार संघातील पदयात्रा पाषाण येथील छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून झाली. त्यावेळी कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. ही पदयात्रा संपूर्ण पाषाण, औंध, बालेवाडी, बाणेर भागांतून नागरिकांच्या भेटी घेत औंध येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळायेथे समाप्त झाली. मार्गातील भैरवनाथ मंदिर, हनुमान मंदिर, शंकर मंदिर आदी मंदिरांमध्ये धंगेकरांनी पुष्पहार अर्पण करून दर्शन घेतेले. ठिकठिकाणी महिलांनी त्यांचे औक्षण केले. व्यापारांपासून सर्वसामन्य नागरिकांपर्यंत अनेक जण धंगेकरांशी हस्तांदोलन करून सेल्फी घेत होते.

या रॅलीचे मार्गदर्शन व सूत्रसंचालन रवींद्र माझीरे यांनी केले या रॅलीमध्ये शिवसेना शहर प्रमुख गजानन थरकुडे, नगरसेवक चंदू शेठ कदम नगरसेवक पृथ्वीराज सुतार, तानाजी निम्हण, दत्ता जाधव, संतोष तोंडे, शैलेश कदम, संजय निम्हण,आम आदमी पक्षाचे अमोल मोरे, यशराज पारखी, जीवन चाकणकर मंगेश निम्हण,तसेच शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस आम आदमी या पक्षाचे महिला व पुरुष सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

वडगाव शेरी विधानसभा मतदार संघात सकाळी लोहगाव मधील श्रीराम स्वीट होम येथून पदयात्रेस प्रारंभ झाला. तेथून पुढे गुरुद्वारात दर्शन घेऊन शीख बांधवांशी धंगेकरांनी चर्चा केली, तसेच संपूर्ण परिसरात नागरिकांच्या भेटी घेऊन ‘पुण्याच्या विकासासाठी’ काँग्रेसला मत द्या असे आग्रह करून सांगितले त्याला नागरिकांनी देखील मोठा प्रतिसाद दिला. दोन्ही पदयात्रांमध्ये काँग्रेस पक्षा बरोबरच राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष, शिवसेना उद्धव बाळासाहेब पक्ष आम आदमी पार्टी व इतर मित्र पक्षांचे प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. सर्व पक्षांचे झेंडे, घोषणा, ढोल – ताशा यामुळे वातावरण निवडणूकमय झाले होते.

या पदयात्रेत वडगाव शेरी ब्लॉक अध्यक्ष राजू ठोंबरे, येरवडा ब्लॉक अध्यक्ष रमेश सकट, काँग्रेस ब्लॉक उपाध्यक्ष योगेश शिर्के, रामेशमामा खांदवे, माजी नगरसेवक राजेंद्र शिरसाट, माजी नगरसेवक संगीता देवकर, माजी नगरसेवक सुनिल मलके, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष वडगाव शेरी युवक अध्यक्ष सागर खांदवे, वडगाव शेरी महिला ब्लॉक अध्यक्ष शिवानी माने, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष कविता आम्रे, काँग्रेस प्रभाग क्र १ अध्यक्ष अमोल लोणार, काँग्रेस प्रभाग क्र २ अध्यक्ष डॉ. रमाकांत साठे, दिलीप डाळींबकर आदी सहभागी झाले होते.

भारतामध्ये‌ माध्यम स्वातंत्र्याची अवस्था बिकट : निरंजन टकले

पुणे-पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना देशातील लोकांप्रती आपले काय‌दायित्व आहे, हे माहितच नाही, त्यामुळे त्यांनी दहा वर्षात एकही पत्रकार परिषद घेतली नाही. उलट त्यांनी वृत्त वाहिन्या असोत‌ किंवा मुद्रुत माध्यमं असोत, सर्वांचे स्वातंत्र हिरावून घेतले आहे. यामुळे भारतामध्ये‌ माध्यम स्वातंत्र्याची आवस्था बिकट झाली आहे, अशी टिका ज्येष्ठ पत्रकार व प्रदेश काँग्रेसचे स्टार प्रचारक निरंजन टकले यांनी केली.

पुणे लोकसभा मतदार संघातील महाविकास आघाडी, इंडिया आघाडीचे उमेदवार रविंद्र धंगेकर यांच्या प्रचारार्थ काँग्रेस भवन येथे आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत टकले बोलत होते. यावेळी प्रदेश उपाध्यक्ष व लोकसभा निवडणूक प्रचारप्रमुख मोहन जोशी, सरचिटणीसवीरेंद्र किराड, राज्य प्रवक्ते गोपाळ तिवारी, राज अंबिके,  इत्यादी उपस्थित होते. प्रारंभी राज्य प्रवक्ते गोपाळ तिवारी यांनी प्रास्ताविक केले.

टकले म्हणाले, नरेंद्र मोदी यांनी ज्या – ज्या ठिकाणी डोकं टेकवले, ते सर्व संपवण्याचे काम केले आहे. मग ती संसद असोत, लालकृष्ण आडवाणी असोत किंवा इतर नेते असोत. मोदी धार्मिक भावनेला आवाहन देण्याचे काम करतात. काँग्रेसने या‌ देशाला संविधान दिले, त्याच संविधानानुसार देश‌ चालतो. देश मनुस्मृतीनुसार नक्कीच चालणार नाही. मात्र भाजपला देश मनुस्मृतीनुसार चालवायचा आहे. त्यासाठी त्यांना देशातील संविधान हद्दापार करायचे आहे. संविधान बदलण्याची भाषा भाजपचेच नेते बोलत आहेत. त्यानंतर टिका होऊ लागल्याने मोदींनी संविधान बदलणार नाही, अशी गॅरंटी दिली.

काँग्रेसच्या‌ जाहीरनाम्यात हिंदू मुस्लिम उल्लेख कुठेच नाही, मात्र भाजप व मोदींकडून धादांत खोटा प्रचार केला जात आहे. देशातील  ४८ लाख लोकांनी काँग्रेसचा जाहीरनामा डाऊनलोड‌ केला. राहुल गांधी, प्रियंका गांधी यांच्या प्रत्येक सभेकडे भाजपचे बारीक लक्ष आहे, ते लगेच त्यावर बोलतात. काँग्रेसचा जाहीरनामा लोकांच्या हिताचा आहे, लोक‌तो‌ पसंत करत आहेत, म्हणून भाजपकडून जाहीरनाम्यावर टिका केली जात आहे. मंगळसुत्राचा वाद निर्माण केला जात आहे.

उलट भाजपच्या जाहीरनाम्यात ५३ वेळा मोदींचा फोटो आहे, यात बेकारी व बेरोजगारीचा उल्लेखही नाही. भाजपचा जाहीरनामा अत्यंत पोकळ आहे.  मोदी जितके खोटे बोलतील तितका काँग्रेसचा पाठिंबा वाढेल. दुसऱ्या टप्प्यातील मतदानानंतर आणखी भाजपच्या पायाखालची वाळू घसरणार आहे.

अग्निवीर योजना मोदींनी राजकारणात आणली. महाराष्ट्रात अग्निवीर योजना देवेंद्र फडणवीस‌ यांनी आणली. शिंदे व पवार भाजपचे अग्निवीर आहेत.

या दोघांना दोघे मिळून चार वर्षे मिळणार आहेत.

दहा वर्षात मोदी‌ सरकारने नागरिकांची आतोनात हानी केली आहे. त्यामुळे नागरिकांच्या मनात मोदी व भाजपबद्दल प्रचंड रोष आहे. दक्षिणेतल्या राज्यात भाजपचा एकही खासदार निवडून येणार नाही. महाराष्ट्रात महाविकास आघाडीच्या ४० जागा निवडून येतील, असा विश्वासही टकले यांनी व्यक्त केला.

रुपाली चाकणकरांची सुप्रिया सुळेंवर टीका पण सिलेंडरच्या किंमतीच्या प्रश्नांना चकवा

घरगुती गॅस सिलेंडरची किंमत किती असावी? 10 वर्षात किचन बजेट कसे राहीले आहे? महागाई च्या प्रश्नांनी घेरले रुपाली चाकणकर यांना.. सुप्रिया सुळे यांच्यावर टीका करताना म्हणाल्या ,’संसद रत्न आहात तर सारे घरदार प्रचारात कशाला लागते , कामे केली असती तर लोकांनी स्वतः डोक्यावर घेतले असते,प्रत्यक्षात दादांनी केलेल्या कामांचे श्रेय त्या लादू पाहत आहेत . राष्ट्रवादीच्या नेत्या रुपाली चाकणकर यांची पत्रकार परिषद

मोदी सरकारच्या काळात महिलाचे सबलीकरण व सशक्तीकरण झाले
रुपाली चाकणकर यांचे प्रतिपादन

पुणे : मोदी सरकारने देशातील महिलांसाठी राबविलेल्या योजनांमुळे महिलांचे सबलीकरण, सशक्तीकरण आणि आर्थिक सक्षमिकरण झाले आहे. असे मत राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या महिला प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केले.
यावेळी माजी उपमहापौर सुनिता वाडेकर, भाजप महिला आघाडीच्या शहराध्यक्षा हर्षदा फरांदे, सहसंपर्क प्रमुख पुणे जिल्हा शिवसेना महिला आघाडी सुदर्शना त्रिगुणाईत, पुष्कर तुळजापुकर आणि हेमंत लेले उपस्थित होते.
चाकणकर म्हणाल्या, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात अनेक कल्याणकारी योजनांची अंमलबजावणी मागील दहा वर्षात झाली आहे. उज्ज्वला गॅस योजनेच्या माध्यमातून प्रत्येक घरामध्ये गॅस कनेक्शन पोहचवले. महिलासाठी विविध साह्य करणार्‍या योजना देशभरात सुरू झाल्या आहे. महिला कौशल्य प्रशिक्षण, आर्थिक पाठबळ योजना, लेक लाडकी योजनाद्वारे महिला सक्षमीकरणासाठी पाठबळ दिले गेले. चौथ्या महिला धोरणा नुसार महिलेचे नाव पाल्यांच्या नावापुढे दिले गेले हा महिलांचा सन्मान आहे. मध्यमवर्गीय कुटुंब आणि गरीब कुटुंबातील महिलांसाठी मोदी सरकारची धोरणे अतिषण मोलाची आहेत. राज्य सरकाने सुध्दा महिलांचा आत्मविश्‍वास वाढवण्यासाठी अनेक महत्वाचे निर्णय घेतले. यामध्ये लेक लाडकी योजनेमुळे मुलींच्या शिक्षणासाठी आर्थिक पाटबळ मिळाले. राज्यातील महिलांना एसटी प्रवासात 50 टक्के सवलत देण्यात आली. राज्य महिला आयोगमध्ये काम करताना मुली बेपत्ता होण्याचे प्रमाण अधिक असल्याचे दिसून आलें. त्यात दीड वर्षात अतिशय कडक कायदे करुन चांगल्या प्रकारे अंमलबजावणी करण्याचे काम करण्याचे आल्याचे त्या म्हणाल्या.

शिवाजीनगर हिंजवडी मेट्रोमुळे वाहतुकीचा सक्षम पर्याय उपलब्ध-मुरलीधर मोहोळ

पुणे-आयटी हब असलेल्या हिंजवडीला शहराच्या मध्यवर्ती भागाशी जोडणारा शिवाजीनगर ते हिंजवडी हा मेट्रो प्रकल्प अतिशय महत्त्वाकांक्षी असून, त्यामुळे नागरिकांना वेगवान, सक्षम सार्वजनिक वाहतुकीचा पर्याय मिळणार असल्याचा विश्वास पुणे लोकसभा मतदारसंघातील भाजप महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांनी व्यक्त केले.

शिवाजीनगर गावठाण परिसरात आयोजित केलेल्या प्रचार फेरीच्या सांगता सभेत ते बोलत होते. आमदार सिद्धार्थ शिरोळे, दत्ता खाडे, आदित्य माळवे, रविंद्र साळेगावकर, सुनील पांडे, गणेश बगाडे, किरण ओरसे, डॉ. अजय दुधाने, हेमंत डाबी, अपर्णा कुऱ्हाडे, सचिन वाडेकर, सचिन मानवतकर, दयानंद इरकल, आकाश रेणुसे, संजय तुरेकर यांचा प्रचार फेरीत प्रमुख सहभाग होता.

मोहोळ म्हणाले, पुणे महानगर प्रादेशिक विकास प्राधिकरणामार्फत पीएमआरडीए सार्वजनिक खासगी भागीदारीतून हा प्रकल्प साकारला जात आहे. या प्रकल्पाची एकूण लांबी 23.3 किलोमीटर असून या मार्गावर स्थानकांची संख्या 23 इतकी आहे. हिंजवडी, वाकड, बालेवाडी, बाणेर, औफ्लध, गणेशखिंड, खैरेवाडी, शिवाजीनगर आदी भागांना एकमेकांशी जोडणारा हा प्रकल्प आहे. भविष्यात हडपसर व लोणी काळभोरपर्यंत विस्ताराची योजना आहे. सध्या प्रकल्पाचे 55 टक्के काम पूर्ण झाले असून, मे 2025 पर्यंत प्रकल्प पूर्ण होणे अपेक्षित आहे. त्यासाठी सातत्यपूर्ण पाठपुरावा करणार आहे.

गावठाणातील रोकडोबा मंदिरापासून प्रचार फेरीचा प्रारंभ झाला. परिसरातील गणेश मंडळे आणि सामाजिक संस्थांनी उत्साहात स्वागत केले. ठिकठिकाणी महिलांनी औक्षण केले. शिवाजीनगर गावठाण, राष्ट्रवादी भवन, तोफखाना, जंगली महाराज रस्ता, गोखले स्मारक चौक, फर्ग्युसन कॉलेज रस्तामार्गे ज्ञानेश्वर पादुका चौकात प्रचार फेरीची सांगता झाली.

अजितदादा शब्दाला पक्के, कार्यकर्त्यांनीही विजयी होणाऱ्या उमेदवाराचेच काम करावे – श्रीरंग बारणे

रावेत, दि. 26 एप्रिल – राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष व उपमुख्यमंत्री अजित पवार हे शब्दाला पक्के आहेत. त्यांनी महायुतीला शब्द दिलेला आहे. राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी देखील विजयी होणाऱ्या उमेदवाराचेच काम करून स्वतःच्या राजकीय भविष्याची काळजी घ्यावी, असा सल्ला मावळ लोकसभा मतदारसंघातील शिवसेना-भाजप-राष्ट्रवादी- मनसे- आरपीआय- रासप- मित्रपक्ष महायुतीचे उमेदवार खासदार श्रीरंग बारणे यांनी आज (शुक्रवारी) दिला.

पिंपरी चिंचवड राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने रावेत येथे आयोजित करण्यात आलेल्या माजी नगरसेवक व पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत ते बोलत होते. व्यासपीठावर राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष अजित गव्हाणे, माजी विरोधी पक्षनेते विठ्ठल तथा नाना काटे, ज्येष्ठ नेते भाऊसाहेब भोईर, माजी महापौर योगेश बहल, कार्याध्यक्ष श्याम लांडे तसेच प्रशांत शितोळे, संतोष बारणे, फजल शेख, महमंदभाई पानसरे, शेखर काटे, कविता अल्हाट, वैशाली काळभोर, नारायण बहिरवाडे, वर्षा जगताप, श्रीधर वाल्हेकर, विशाल वाकडकर, गोरक्ष लोखंडे, विशाल काळभोर, कैलास बारणे, राजेंद्र जगताप, मोरेश्वर भोंडवे, शमीम पठाण, विनोद नढे आदी उपस्थित होते.

खासदार बारणे म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विचारांचे सरकार पुढील दहा ते पंधरा वर्षे राहणार असल्यामुळे अजितदादांनी योग्य वेळी, योग्य निर्णय घेतला आहे. अजितदादांनी मावळात प्रामाणिकपणे राष्ट्रवादीची ताकद माझ्या पाठीशी उभी केली आहे. आम्हा दोघांमध्ये खूप चांगला समन्वय आहे. मावळात माझा विजय निश्चित आहे. मावळातील प्रत्येक घडामोडीवर अजितदादा व पार्थ पवार यांचे बारीक लक्ष आहे. त्यामुळे राष्ट्रवादीचा कोणता कार्यकर्ता वेगळा विचार करीत असेल तर त्याने फेरविचार करावा. विजयी होणाऱ्या उमेदवाराची साथ देणे कधीही फायद्याचे ठरते. त्यामुळे विजयी होणाऱ्या उमेदवाराचे काम करण्यास प्राधान्य द्या.

आता बैठका- मेळावे घेण्यापेक्षा कार्यकर्ता घराघरापर्यंत पोहोचणे महत्त्वाचे आहे, असे सांगून बारणे म्हणाले की, मतदार हुशार असल्यामुळे चिन्ह हा विषय अडचणीचा ठरत नाही. जिल्ह्यातील दोन मतदारसंघांमध्ये महायुतीचे कार्यकर्ते घड्याळाचाही प्रचार करत आहेत.

विरोधी उमेदवाराने नुसतीच टीका करण्याऐवजी त्यांनी केलेली विकास कामे जनतेला दाखवावीत, असे आव्हान बारणे यांनी यावेळी दिले. आपल्याला महायुतीत काम करण्याचा अनुभव आहे. त्यामुळे निवडणुकीनंतरही राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना आपले सहकार्य मिळेल, सकारात्मक दृष्टिकोन ठेवून एकत्र काम करूयात, माझ्याकडून कोणालाही त्रास होणार नाही, अशी ग्वाही त्यांनी दिली.

खासदार बारणे हे अनुभवी व विकासाचे राजकारण करणारे नेते आहेत, असे अजित गव्हाणे म्हणाले. अजितदादा यांच्या आदेशानुसार राष्ट्रवादीचे कार्यकर्ते बारणे यांच्या विजयासाठी जीवाचे रान करतील. अजितदादांची ताकद वाढली तरच आपली ताकद वाढणार आहे. त्यामुळे विरोधकांकडून सुरू असलेल्या वेगळ्या प्रचाराला उत्तर द्या आणि फक्त धनुष्यबाणाचेच काम करा. अजितदादा व पार्थ पवार तो दोघेही सातत्याने मावळ मतदारसंघाचा आढावा घेत आहेत. खासदार बारणे हे जास्तीत जास्त मताधिक्याने निवडून येतील यासाठी प्रयत्न करणे, हाच आपला महायुतीचा धर्म आहे.

नाना काटे, योगेश बहल, भाऊसाहेब भोईर, प्रशांत शितोळे, शमीम पठाण, राजेंद्र जगताप, विनोद नढे यांनीही यावेळी उपस्थित असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले.