Home Blog Page 1073

पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून कोल्हापूरच्या सभेतही धार्मिक विष सरवण्याचे काम: नाना पटोले

संविधान बदलून धर्माच्या आधारावर काँग्रेस आरक्षण देणार ही मोदींची भाषा म्हणजे ‘चोरच्या उलट्या बोंबा’.

‘सरकार बनाओ, नोट कमाओ’ हेच काम मोदी सरकारने इलेक्टोरल बाँडमधून केले

मुंबई, दि. २७ एप्रिल
अयोध्येतील राम मंदिराच्या उद्घाटनाचे निमंत्रण काँग्रेसने ठोकरले हा पंतप्रधान नरेंद्र मोदींचा आरोप अत्यंत हास्यास्पद व केवळ राजकीय द्वेषातून केलेला आहे. मोदी सातत्याने सनातन धर्म, अयोध्येतील राम मंदिराचा उल्लेख करत काँग्रेस व विरोधी पक्षांना हिंदू विरोधी असल्याचे दाखवण्याचा प्रयत्न करतात. नरेंद्र मोदी जातीच्या व धर्माच्या नावाने समाजात द्वेषाचे विष पसरवण्याचे पाप करत आहेत, असे प्रत्युत्तर महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी दिले आहे.

नरेंद्र मोदी व भाजपाचा समाचार घेत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले की, कर्नाटक विधानसभा निवडणुकीत भाजपा व नरेंद्र मोदींनी बजरंग बलीच्या नावाने मते मागितली परंतु बजरंग बलींनी भाजपाच्या डोक्यावर गदा घालून सपशेल आपटले. आताही मोदी धार्मिक मुद्दे पुढे करत प्रभू रामाच्या नावावर मते मागत आहेत पण प्रभू रामचंद्रही बजरंग बली प्रमाणे भारतीय जनता पक्षाला जागा दाखवतील. खोटी आश्वासने देऊन १० वर्ष सत्ता मिळवली, या १० वर्षात काय काम केले हे मोदी सांगू शकत नाहीत. महागाई, बेरोजगारी, शेतकरी, कामगार यांच्याबद्दल ते बोलू शकत नाहीत म्हणून प्रत्येक सभेत मोदी धर्माच्या नावावर मते मागत आहे. हिंमत असेल तर मोदींनी विकासाच्या नावावर मते मागून दाखवावी.

काँग्रेस पक्ष संविधान बदलून धर्माच्या आधारावर आरक्षण देऊन ओबीसींचे आरक्षण हिरावणार असा खोटा प्रचार मोदी करत आहेत. भाजपानेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर, संविधान, दलित, अल्पसंख्याक समाजाचा सतत अपमान केला, मोदी सरकारच्या काळातच या समाजावर प्रचंड अत्याचार करण्यात आले. भाजपाने डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे संविधान पायदळी तुडवले. संविधान बदलाची भाषा भाजपाच करते आणि वरून काँग्रेसवर आरोप करतात याला चोराच्या उलट्या बोंबा म्हणतात. ओबीसींचे राजकीय आरक्षण भारतीय जनता पक्ष,नरेंद्र मोदी व देवेंद्र फडणवीस यांनीच घालवले आहे. राज्यात मराठा धनगर आदिवासी समाजाला आरक्षण देतो म्हणून त्यांची फसवणूकही भाजपानेच केली आहे परंतु खोटे बोल पण रेटून बोल हीच भाजपाची निती आहे.
इंडिया आघाडीचे सरकार आले की पैसे मिळवण्याचा त्यांचा मनसुबा आहे, सरकार बनाओ, नोट कमाओ, असे मोदी म्हणाले पण इलेक्टोरल बाँडच्या माध्यमातून कोट्यवधी रुपयांची खंडणी वसूल केली, मोदींची चोरी सुप्रीम कोर्टाने पकडली आणि आरोप मात्र इंडिया आघाडीवर करतात, हे मात्र अजब आहे. इंडिया आघाडीचा एकाही जागेवर विजय होऊ देऊ नका असे जाहीरपणे सांगणे ही हूकूमशाही वृत्ती आहे.पराभव दिसत असल्याने निराशेतून मोदी काहीही बडबड करत आहेत असेही नाना पटोले म्हणाले.

दुसऱ्या टप्प्यातील आठ मतदारसंघात अंदाजे ६२.७१ टक्के मतदान

मुंबई, दि. २७ : राज्यात लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यातील आठ मतदारसंघांमध्ये काल मतदान पार पडले. सकाळी ७ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत अंदाजे सरासरी ६२.७१ टक्के मतदान झाले आहे.

दुसऱ्या टप्प्यातील एकूण आठ लोकसभा मतदारसंघनिहाय मतदानाची टक्केवारी पुढीलप्रमाणे  

  • वर्धा : ६४.८५ %
  • अकोला : ६१.७९ %
  • अमरावती : ६३.६७ %
  • बुलढाणा : ६२.०३ %
  • हिंगोली : ६३.५४ %
  • नांदेड : ६०.९४ %
  • परभणी : ६२.२६ %
  • यवतमाळ-वाशिम : ६२.८७ %

कलाग्राममुळे मिळेल पर्यटनाला चालना-मुरलीधर मोहोळ

पुणे-सिंहगड रस्त्यावरील पु. ल. देशपांडे उद्यानात कलाग्राम विकसित करण्यात येत असून, त्या माध्यमातून स्थानिक आणि देश-विदेशातील कलाकारांना आपली कला सादर करण्याची आणि त्यांच्या वस्तूंचे प्रदर्शन व विक्री करण्याची संधी मिळणार आहे. या प्रकल्पामुळे पर्यटनाला मोठी चालना मिळेल असा विश्वास महायुतीचे पुणे लोकसभा मतदारसंघातील उमेदवार मुरलीधर मोहोळ यांनी व्यक्त केला.

मोहोळ यांनी आज पु. ल. देशपांडे उद्यानात सकाळी फिरायला आणि व्यायामाला येणाऱ्या नागरिकांची भेट घेऊन प्रचार केला. आमदार माधुरी मिसाळ, अनिता कदम, आनंद रिठे, महेश वाबळे, प्रशांत दिवेकर, जीतेंद्र पोळेकर, विनया बहुलीकर यावेळी सोबत होते.

मोहोळ म्हणाले, ‘दिल्ली हटच्या धर्तीवर हा वैशिष्ट्यपूर्ण प्रकल्प निर्माण करण्यात येत आहे. या ठिकाणी 200 नागरिक बसू शकतील इतक्या क्षमते आसन व्यवस्था असणारे ॲम्फिथिएटर, अल्पोपहार केंद्र उभारण्यात येत आहे.’

मुंबई उत्तर मध्य लोकसभा मतदारसंघातून उज्ज्वल निकम यांना भाजपची उमेदवारी जाहीर

मुंबई: भाजपने मुंबई उत्तर मध्य लोकसभा मतदारसंघातून विद्यमान खासदार पूनम महाजन यांचा पत्ता कट केला आहे. भाजपने या मतदारसंघातून उज्ज्वल निकम यांना उमेदवारी जाहीर केली आहे. या मतदारसंघातून महाविकास आघाडीकडून वर्षा गायकवाड यांना उमेदवारी देण्यात आली आहे. त्यामुळे उत्तर मध्य मुंबईत वर्षा गायकवाड विरुद्ध उज्ज्वल निकम अशी लढत पाहायला मिळणार आहे.महाविकास आघाडीकडून दोनच दिवसांपूर्वी काँग्रेसच्या वर्षा गायकवाड यांना उत्तर मध्य लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी जाहीर करण्यात आली होती. त्यामुळे भाजप वर्षा गायकवाड यांच्याविरोधात कोणाला उमेदवारी देते याची उत्सुकता होती. विद्यमान खासदार पूनम महाजन यांना पुन्हा संधी दिली जाते की नव्या चेहऱ्याला संधी दिली जाते याबाबत चर्चा सुरू असताना आशिष शेलार यांचे नाव देखील समोर आले होते. दरम्यान, कालच उद्धव ठाकरे यांनी वर्षा गायकवाड यांना निवडून आणण्यासाठी पूर्ण ताकद लावणार असल्याचे म्हटले होते.अनेक वर्ष विशेष सरकारी वकील म्हणून काम पाहणाऱ्या निकम यांच्या नावाची चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरू होती. कायदेपंडित अशी ओळख असलेल्या उज्ज्वल निकम यांनी देशातील अनेक महत्त्वाच्या खटल्यात काम केले आहे. ज्यात १९९३ साली मुंबईत झालेल्या साखळी बॉम्बस्फोट खटल्यासह मुंबईवर झालेला २६/११ दहशतवादी हल्ला, खैरलांजी,पुण्यातील राठी हत्याकांड , सोनई येथील दलित अत्याचाराच्या खटल्यांमध्ये निकम यांनी महत्त्वाची कामगिरी पार पाडली होती.

तुमच्या कमाईतला अर्धा हिस्सा काँग्रेस वसूल करण्याच्या विचारात -कॉंग्रेसला चीतपट करण्यासाठी कोल्हापुरातुनही मोदींचे डावपेच

कोल्हापूर- काँग्रेसचे राजपूत्र तुमच्या संपत्ती, महिलांचे दागिने आणि सोन्याची चौकशी करणार आहे. कांग्रेसने ही तुमची संपत्ती या देशावर ज्यांचा हक्क आहे, त्यांना वाटून देणार आहे. काँग्रेसने घोषणा केली आहे की, तुमची आयुष्यभर जेवढी संपत्ती जमा करणार, तुम्ही जेवढी कमाई करणार, ते तुम्ही तुमच्या मुलांना वारसाला देऊ शकत नाही.तुमच्या कमाईतला अर्धा हिस्सा काँग्रेस वसूल करण्याच्या विचारात आहे. तुम्ही जमा केलेली जमापुंजी तुम्ही काँग्रेसला लुटू देणार आहेत का?, असा सवाल पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जनतेला केला आहे.

कोल्हापूरमधील तपोवन मैदानात आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची जाहीर सभा संपन्न झाली. शिवसेना शिंदे गटाचे हातकंणगले लोकसभेतील उमेदवार धैर्यशील माने आणि कोल्हापूरचे उमेदवार संजय मंडलिक यांच्या प्रचारासाठी ही सभा घेण्यात आली होती. यावेळी ‘जगात भारी कोल्हापूरी’ असे म्हणत पंतप्रधान मोदींनी जोरदार फटकेबाजी केली. ते म्हणाले, “कोल्हापूरमध्ये फूटबॉल प्रसिद्ध आहे, असे मला कळलं. त्यामुळे फूटबॉलच्या भाषेतच सांगतो की, निवडणुकीच्या पहिल्या दोन टप्प्यानंतर एनडीए आणि भाजपा २-० ने पुढे आहे. तर काँग्रेस आणि इंडिया आघाडी शून्यावर आहे.”काँग्रेसने नेहमीच राम मंदिराला विरोध केला आहे. आज शिवसेना त्यांच्यासोबतच जाऊन स्वतःचे हिंदुत्व गमावून बसली आहे. आज जर बाळासाहेब असते तर त्यांना खूप वाईट वाटले असते. तसेच उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचा नकली शिवसेना असा उल्लेख करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे. तसेच, काँग्रेस 370 हटवणार असल्याचे सांगत आहे. हे जनतेला मान्य आहे का? तुम्ही जनता हा निर्णय मागे घेऊ देणार आहात का?, मोदींच्या निर्णयाला विरोध करण्याची कुणाची हिंमत आहे का?, असे मोदी कोल्हापुरातील सभेत बोलतांना म्हणालेत.

नेहमीच गरीबांचा अपमान करणारी काँंग्रेस आज बाबासाहेबांचे गुणगान गात आहे. काँग्रेस देशात कर्नाटक मॉडेल अवंलबविण्याच्या विचारात आहे.महिलांची सुरक्षा आणि महिलांना प्रत्येक क्षेत्रात समान संधी ही मोदींची गॅरंटी आहे. आम्ही त्यांना संधी देण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत आहोत. त्यामुळेच दहा कोटी महिला या स्वतः च्या पायावर उभ्या राहिल्या आहेत. सेल्प हेल्पच्या माध्यमातून हे साध्य झाले. आता तीन कोटी महिलांना लखपती दीदी बनविण्याचे ध्येय आहे. महिला आमच्या पाठीशी उभ्या आहेत. हे पाहून काँग्रेस हतबल झाली आहे.असेही मोदी म्हणालेत.

लोकसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी पंतप्रधान मोदी यांच्या सभेचे आयोजन.

पुणे: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची पुणे, शिरूर, बारामती आणि मावळ लोकसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी महाविजय संकल्प सभेचे आयोजन येत्या 29 एप्रिल रोजी वानवडी येथील रेस कोर्स मैदान येथे सायंकाळी 5 वाजून 30 मिनिटांनी करण्यात आले आहे. या सभेला महायुतीचे दोन लाख कार्यकर्ते उपस्थित राहतील अशी माहिती प्रदेश भाजपचे उपाध्यक्ष राजेश पांडे यांनी दिली.

यावेळी भाजपचे शहराध्यक्ष धीरज घाटे, शिवसनेचे शहर प्रमुख प्रमोद उर्फ नाना भानगिरे, शिवसेना सहसंपर्क प्रमुख अजय भोसले, मनसेचे अध्यक्ष साईनाथ बाबर, आरपीआयचे अध्यक्ष संजय सोनावणे, पुणे लोकसभा प्रभारी श्रीनाथ भिमाले, महायुती समन्वयक संदीप खर्डेकर, राजेंद्र शिळीमकर आदी उपस्थित होते.

पांडे म्हणाले, अनेक वर्षानंतर पुण्यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा होत असून रेसकोर्स याठिकाणी सभेचे आयोजन केले आहे. सभेच्या माध्यमातून महायुतीच्या चारही उमेदवारांची ही महाविजय संकल्प सभा असणार आहे. 128 एकरांमध्ये ही सभा होणार असून या सभेला 2 लाख नागरिक उपस्थित राहणार आहेत. भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना , मनसे, आरपीआय यांच्याबरोबर सर्व सहकारी पक्ष सभेच्या तयारीला लागले आहेत. 21 विधानसभा मतदारसंघामधून सभेसाठी कार्यकर्ते येणार असल्याचे पांडे म्हणाले.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार, मंत्री चंद्रकांत पाटील, विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोर्‍हे, मनसेचे युवा नेते अमित ठाकरे यांच्यासह 3 हजार व्हीआयपी या सभेला उपस्थित राहणार आहेत. सभेसाठी आठ ठिकाणी वाहनतळाची व्यवस्था करण्यात आली आहे. कार्यकर्त्यांना समाज माध्यमातून गुगल लिंक पाठवण्यात येणार आहे. त्यानुसार त्यांचे पार्किंग कोठे आहे ते त्यांना समजेल. कार्यकर्त्यांनी येताना पाण्याची बाटली आणू नये. पाण्याची सोय मैदानात करण्यात आली आहे. 22 ठिकाणी एलइडी लावण्यात येणार आहेत. पंतप्रधान मोदी येण्यापुर्वी सुरक्षेच्या दृष्टीने सर्व दरवाजे बंद करण्यात येतील. त्यामुळे नागरिक आणि कार्यकर्त्यांनी 4 वाजून 30 मिनिटापर्यंत सभेच्या ठिकाणी पोहचावे असे पांडे यांनी सांगितले.

पुण्याच्या आरोग्य सुविधांना मिळतोय मोठा बूस्टर-मुरलीधर मोहोळ

बिबवेवाडीतील ईएसआयसी रुग्णालय होणार लवकरच कार्यान्वित

पाचशे खाटांच्या रुग्णालयात मिळणार अत्याधुनिक आरोग्य सुविधा

पुणे-बिबवेवाडी येथील ईएसआयसी अर्थात कामगार विमा रुग्णालयात 100 बेडचे सुसज्ज रुग्णालय कार्यान्वित झाले असून 16 एकर जागेतील सात मजली इमारतीत 500 खाटांचे सर्व आधुनिक सोयींनी सुसज्ज विस्तारीत रुग्णालयाचे काम नजिकच्या काळात पूर्ण होईल. त्यामुळे पर्वती, बिबवेवाडी, सिंहगड रस्ता परिसरातील नागरिकांना दर्जेदार आरोग्य सुविधा उपलब्ध होतील, असे मत भाजप महायुतीचे पुणे लोकसभा मतदारसंघातील उमेदवार मुरलीधर मोहोळ यांनी व्यक्त केले.

पर्वती विधानसभा मतदारसंघातील आंबेडकर नगर, आदिनाथ सोसायटी, प्रेमनगर, गंगाधाम, मार्केट यार्ड बस डेपो, महेश सोसायटी, चिंतामणीनगर, अप्पर इंदिरानगर आदी परिसरात मोहोळ यांच्या प्रचार फेरीचे आयोजन करण्यात आले होते. शहराध्यक्ष धीरज घाटे, आमदार माधुरी मिसाळ, आमदार सुनील कांबळे, समन्वयक श्रीनाथ भिमाले, दीपक मिसाळ, राजेंद्र शिळीमकर, मानसी देशपांडे, वर्षा साठे, कविता वैरागे, राजश्री शिळीमकर, प्रविण चोरबोले, अनुसया चव्हाण, प्रशांत दिवेकर, शिवसेना नेते सुधीर कुरूमकर, नितीन लगस, श्रीकांत पुजारी, अविनाश खेडेकर, राष्ट्रवादीचे संतोष नांगरे, श्वेता होनराव, रुपाली धाडवे,यांची प्रमुख उपस्थिती होती.

मोहोळ म्हणाले, ‘ससूनच्या धर्तीवर रुग्णालय उभारू अशी घोषणा काँग्रेसकडून अनेक वर्षे केली गेली. पण ती कधीही प्रत्यक्षात आली नाही. आमदार माधुरी मिसाळ यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याने केंद्र शासन हे रुग्णालय उभारत आहे. नव्या प्रशस्त रुग्णालयात अतिदक्षता विभाग, बाह्यरूग्ण कक्ष, सुपर स्पेशालिटी सुविधांसाठी स्वतंत्र कक्ष, साधारण व अतिदक्षता विभागाचे कक्ष असतील. रेडिओलॉजी, बायोकेमिस्ट्री, मायक्रोबायोलॉजी प्रयोगशाळांचा समावेश असेल. पुढील दोन वर्षांत बांधकाम पूर्ण होईल.
महापालिकेचे पहिले वैद्यकीय महाविद्यालय सुरू
पुणे महापालिकेचे भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी वैद्यकीय महाविद्यालय माझ्या महापौर पदाच्या कारकिर्दीत सुरू करता आले याचा विशेष आनंद वाटतो. या महाविद्यालयामुळे वैद्यकीय शाखेच्या विद्यार्थ्यांना उच्च दर्जाचे शिक्षण आणि रुग्णांना किफायतशीर दरात आरोग्य सेवा उपलब्ध होणार आहेत. कोरोना काळात शहराच्या आरोग्य यंत्रणांचे आधुनिकीकरण आणि विस्तार करण्यात आला.

पुण्याचे पर्यावरण वाचवण्यासाठी पुढाकार घ्या- पर्यावरणवादी संस्थांची धंगेकरांकडे धाव

पुणे-आता पुण्यातील नदी अत्यंत भीषण स्थितीत आहे मुळात गरजेच काय आहे? नदी सुधारण गरजेच आहेच पण सगळ्यात आधी पुण्यातील नदी शुद्ध करणं गरजेच आहे, तिच्या भोवतालचा परिसर स्वच्छ करणं गरजेच आहे तर ते सोडून आपण सौदर्यीकरणाकडे चाललो आहोत म्हणजे आठवडाभर अंघोळ केली नाहीये पण ब्युटी पार्लर मध्ये जाण्यासारखं आहे. असे मत नदी सुधार चळवळ संदर्भातील जेष्ठ कार्यकर्ते सारंग यादवाडकर यांनी आज व्यक्त केले.

पुण्यातील पर्यावरणवादी संस्थांच्या वतीने महाविकास आघाडी व इंडिया आघाडीचे काँग्रेसचे उमेदवार आ. रवींद्र धंगेकर यांना काँग्रेस भवन येथे भेटून निवेदन देण्यात आले त्यावेळी ते बोलत होते. यावेळी लोकसभा निवडणूक प्रचार प्रमुख आणि माजी आमदार मोहन जोशी, सारंग यादवाडकर प्राजक्ता दिवेकर, स्वप्नील दुधाणे ( अर्बन सेल), भाऊसाहेब आसबे, संग्राम खोपडे आदि उपस्थित होते.   

  सारंग यादवाडकर पुढे म्हणाले की, जे काही ५ – १० कोटी आपण नदी सुधार प्रकल्पावर खर्च केलेत ते जर आपण नदीच्या शुद्धतेसाठी किंवा स्वछतेसाठी खर्च केले तर त्याचा नदीला जास्त उपयोग होईल. नदी पात्रात प्रचंड मोठ्या प्रमाणावर बांधकाम चालू आहे भारतातील सर्व नियम, सर्व कायदे, सर्व मानक डावलून हे सर्व सुरु आहे आणि ही केवळ मनमानी आहे. नदीपात्र ४०% नी आकुंचित होणार आहे अस त्यांचच रेकॉर्ड सांगतय. नदी पात्र अरुंद झाल तर पूर पातळ्या वाढतील. नदी सुधार म्हणजे पुराची गॅरंटी अस सांगून यादवाडकर पुढे म्हणाले की  ते आपण थांबवायचं की चालू द्यायचं हे आता आपल्या हातात आहे. सगळ्यात पहिल्यांदा आपण हे थांबवल पाहिजे कारण मुळात या कामाला पर्यावरणीय मंजुरी देखील नाहीये आणि पर्यावरणीय मंजुरी नसताना ही कामे राबवण म्हणजे केवळ हुकुमशाही आहे. हे काम थांबावणं, नदी पत्रातील राडारोडा काढणं, लोकसंख्येचा विचार करून सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प उभे करणं, घनकचरा व्यवस्थापन उत्तम करणं, नदीची स्वछता करणं हे आपण आता करणं गरजेच आहे. नदी ही मुळातच खूप सुंदर असते आपण तिला विद्रूप बनवले आहे आता तिला परत सुंदर करण्याच्या नावाखाली आपण हजार कोटी खर्च करतोय ही दुर्दैवाची गोष्ट आहे असे यादवाडकर म्हणाले. 

या वेळी उमेदवार रवींद्र धंगेकर म्हणाले की, मी सामान्य माणूस आहे माझं काम बोलत, भाजपाने गेली १० वर्ष जे काम केलंय त्यात त्यांनी सामान्य माणसाला लुटले आहे महागाई वाढली आहे.तुम्ही काँग्रेसला निवडून दिलेत तरच मी तुमची मदत करीन असे नाही सामान्य माणसाच्या मदतीसाठी हा सामान्य माणूस नेहमी तत्पर असेल. पुण्याच्या सामान्य नागरिकांच्या हिताचे प्रश्न मी याआधीही विधानसभेत मांडले आहेत पण आता मला ते लोकसभेत  देखील मांडायचे आहेत त्यासाठी मी तत्पर आहे मी हे आवाहन स्वीकारले आहे. माननीय खासदार सुरेश कलमाडी यांच्या काळात त्यांनी पुणे शहराच्या विकासाची एक सकारात्मक मोट बांधलेली आहे त्याची प्रेरणा घेऊन मी देखील तुमच्या सर्व समस्यांचे निराकरण करण्याचा आणि जमेल तितके नाही तर सर्वच प्रश्न साध्या सरळ आणि सोप्या सच्च्या मार्गाने सोडविण्याचे आश्वासन सर्व सुजाण पुणेकर नागिरकांना देऊ इच्छितो..कलमाडी सरांच्या आणि माझ्या कामाची पुण्यात नक्की तुलना होणार तोच आदर्श समोर ठेऊन तुमचा जहिरनामा व निवेदन आपण द्यावे. मी  नक्की आपल्यासोबत आहे काँग्रेस आपल्या सोबत भविष्यातील वाटचलीत कायमच बरोबर आहे आणि राहील याची ग्वाही मी तुम्हा सर्वांना देतो. असे रवींद्र धंगेकर म्हणाले.

याप्रसंगी पुणे लोकसभा निवडणूक प्रचारप्रमुख माजी आमदार मोहन जोशी म्हणाले की, ज्या ज्या चळवळी झाल्या त्या प्रत्येक चळवळीमध्ये मी कार्यकर्ता म्हणून तुमच्या बरोबर आहे. काँग्रेस पक्षाची भूमिका स्पष्ट आहे की पुण्याचे पर्यावरण हे चांगले राहिले पाहिजे. काँग्रेस पक्षाने आपल्या जाहीरनाम्यात क्लायमेट चेंज अथॉरिटीचि स्थापना करू असे आश्वासन दिले आहे असे सांगून मोहन जोशी पुढे म्हणाले की,  गेल्या १० वर्षातली जर आपण पुण्याची परिस्थिती पाहिली तर ती अतिशय बिकट आहे. पुणे शहराच्या पर्यावरणाचा प्रश्न, ट्रॅफिकचा प्रश्न, पुणे शहरातील हवेच्या गुणवत्तेचा प्रश्न असे कोणतेही प्रश्न भाजपला सोडवता आलेला नाही. हवेच्या प्रदूषणात दिल्लीनंतर आपल्या पुण्याचा नंबर येतो. आम्हाला आता नवीन पिढीच्या भविष्याचा विचार करायचा आहे, आणि तो आत्ता रवींद्र धंगेकर करतील काँग्रेस पक्ष करेल हे मी तुम्हाला इथे आवर्जून सांगू इच्छितो. विधी मंडळात मी काम करत असताना ग्लोबल वॉर्मिंगच्या प्रश्नंवर देखील आम्ही अनेक वेळा चर्चा केली आहे. वाहतूक कोंडी कशा प्रमाणात नियंत्रित करता येईल याची दृष्टी आमच्यकडे आहे. भाजप यातले काहीच गेल्या १० वर्षात करू शकलेला नाही. आज वर पुणेकरांना वेठीला धरण्याचे काम भाजपने केले आहे, रवींद्र धंगेकर यांचा दृष्टीकोन खूप वेगळा आहे म्हणून आपल्या पुण्याला वाचवण्यासाठी रवींद्र धंगेकर निवडून आले पाहिजेत यांना आपण निश्चितच निवडून आणू असा मला विश्वास आहे. असे मोहन जोशी म्हणाले.

वेताळ टेकडी बचाव कृती समिती तर्फे पर्यावरणाला हानिकारक जे प्रोजेक्ट्स पुणे महानगरपालिका, स्टेट गव्हरमेंट यांनी होऊ घातले आहेत, जे पुण्याच्या डेव्ह्लपमेंट मध्ये टाकले आहेत ते म्हणजे बाल भारती, पौड फाटा रस्ता आणि वेताळ टेकडी कोरून दोन बोगदे कोथरूड ते पाषाण पंचवटी आणि गोखले नगर ते पाषाण पंचवटी यामुळे पर्यावरणाची अतोनात हानी होणार आहे. तर या गोष्टीला आम्ही बरेच वर्ष विरोध करत आहोत. मागील वर्षी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष, वंदना चव्हाण आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष यांनी आम्हाला पाठींबा दिला होता. आम्ही रस्त्यावरती उतरलो होतो, ज्यांना आपलं पर्यावरण वाचवायचं होत, ज्यांना टेकड्या वाचवायच्या होत्या अशी साडेचार हजार लोकं आमच्याबरोबर रस्त्यावर उतरली होती, तेव्हा रवींद्र धंगेकर नुकतेच आमदार झाले होते त्यांनी आम्हाला चांगला सपोर्ट केला होता. आज आम्ही आम्हला पुण्याचे पर्यावरण खराब होऊन द्यायचे नाहीये आमचा लढा असाच चालू राहील या साठी आलो आहोत. आमची बाजू धंगेकरांसमोर आम्हला मांडायची आहे आम्हला त्यांचा पाठींबा हवा आहे त्यासाठी आम्ही त्यांना नक्कीच पाठींबा देऊन निवडून आणू असे मत प्रदीप घुंबरे यांनी व्यक्त केले.

काँग्रेसचे गॅरंटी कार्ड साडेपाच लाख घरामध्ये पोहचणार

– महाविकास आघाडीचे प्रचार प्रमुख मोहन जोशी यांची माहिती

पुणे -लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने अखिल भारतीय काँग्रेस कमिटीने देशवासियांना हमी देण्यासाठी तयार केलेल्या न्याय पत्रातील (जाहीरनामा) तरतुदींची माहिती देण्यासाठी तयार केलेले गॅरंटी कार्ड पुणे लोकसभा मतदार संघातील पाच ते साडेपाच लाख घरांपर्यंत पोहचविण्यात येणार आहे, अशी माहिती पुणे लोकसभा मतदार संघातील महाविकास आघाडीचे प्रचार प्रमुख व माजी आमदार मोहन जोशी यांनी दिली.

लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेस पक्षाने युवक न्याय, महिला न्याय, शेतकरी न्याय, श्रमिक न्याय, भागीदारी न्याय आदी संकल्पनांतर्गत गॅरंटी कार्ड तयार केले आहे. यामध्ये प्रत्येक सुशिक्षित तरुणाला पहिली नोकरी मिळेपर्यंत एक लाख रुपये विद्यावेतन, प्रत्येक गरीब कुटुंबातील महिलेला दरवर्षी एक लाख रुपये, शेतकर्‍यांना कर्जमाफी व स्वामीनाथन आयोगाच्या शिफारसीनुसार शेतमालाला हमी, भावाची कायदेशीर गॅरंटी, मनरेगात दरदिवशी किमान 400 रुपये मजुरी, सामाजिक व आर्थिक समानतेसाठी जनगणना आदींचा समावेश आहे. काँग्रेस पक्षाचे हे गॅरंटी कार्ड शहरातील वीस लाख मतदारांपर्यंत पोहचवण्यात येणार आहे. यासाठी महाविकास आघाडीच्या व इंडीया फ्रंट व मित्र पक्षांच्या कार्यकर्ते मतदार संघातील पाच ते साडेपाच लाख घरांमध्ये जाणार आहेत. या कामासाठी सर्व घटकपक्षांच्या कायर्र्कर्त्यांच्या बुथनिहाय समित्या स्थापन करण्यात आल्या आहेत. या समितीच्या माध्यमातून मतदार संघातील दोन हजार बुथवर एकाच वेळी गॅरंटी कार्ड पाठवण्याची मोहीम शनिवारपासून (27 एप्रिल) हाती घेण्यात येणार आहे.  या गॅरंटी कार्डच्या खाली असलेल्या स्लिपवर मतदाराचे नाव व इतर माहिती भरून घेवून त्या स्लिप संकलीत केल्या जाणार आहेत. हे काम आठवड्यात पूर्ण करण्याचे नियोजन केले असल्याचे मोहन जोशी यांनी सांगितले.

सहा मतदार संघात विजयी रथ:

पुणे लोकसभा मतदार संघातील सहाही विधानसभा मतदार संघात सहा विजयी रथ फिरणार आहेत. या रथामधून एलईडीद्वारे काँग्रेस नेते राहुल गांधी, प्रियंका गांधी, काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांची भाषणे, काँग्रेसचे गॅरंटी कार्ड व महाविकास आघाडीचे उमेदवार रविंद्र धंगेकर यांची कामे प्रदर्शित करण्यात येणार असल्याचेही मोहन जोशी यांनी सांगितले.

पंतप्रधान मोदींच्या सभेला संभाजी भिडेंची हजेरी

कोल्हापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कोल्हापुरातील सभेसाठी शिवप्रतिष्ठान हिंदुस्तान संघटनेचे प्रमुख संभाजी भिडे यांनी हजेरी लावली. मोदींच्या भाषणाला सुरुवात होण्यापूर्वी भिडे हे प्रेक्षकांमध्ये पुढच्या रांगेत बसले. या ठिकाणी बसून त्यांनी मोदींचं संपूर्ण भाषण ऐकलं. यावेळी त्यांच्या कार्यकर्त्यांनी देखील हजेरी लावली.हातकणंगले मतदारसंघातील उमेदवार धर्यशील माने आणि कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातील उमेदवार संजय मंडलिक यांच्या प्रचारार्थ पंतप्रधान मोदींची सभा पार पडली. यावेळी मोदींनी नेहमीप्रमाणं मराठीतून भाषणाला सुरुवात केली. यावेळी त्यांनी कोल्हापूरकरांना पुन्हा एकदा आपल्याला सत्तेत बसवण्याचं आवाहन केलंदरम्यान, मोदींनी यावेळी आपल्या सरकारनं राष्ट्रीय स्तरावर केलेल्या कामांची उजळणी केली. यामध्ये जम्मू आणि काश्मीरमधून कलम ३७० हटवलं, राम मंदिराची उभारणी, सीएएची अंमलबजावणी याचा समावेश होता. तसेच काँग्रेसवर टीका करताना काँग्रेसनं सनातनविरोधात भूमिका घेतल्याचं सांगितलं, तसेच राम मंदिराच्या उद्घाटन कार्यक्रमाला हजेरी लावणं टाळलं याची देखील आठवण करुन दिली.

मोदी चुटकीसरशी सर्व समस्या सोडवतात तर रोजगार व महागाईची समस्या का सोडवली नाही ?: प्रियंका गांधी

मोदीजी, देशात ७० वर्षात काहीच झाले नाही तर १० वर्ष सरकार असताना तुम्ही काय केले ?

संविधानाने सर्वसामान्य जनतेला दिलेले अधिकार कमी करण्यासाठीच संविधान बदलण्याचे भाजपाचे षडयंत्र.

मोदींची नौटंकी आता चालणार नाही;‘अब की बार जनता की सरकार’ !

लातूर मतदारसंघाचे काँग्रेस उमेदवार शिवाजी काळगेंच्या प्रचारासाठी प्रियंका गांधींची उदगीरमध्ये जाहीर सभा.

मुंबई, दि. २७
देशात आज सर्वात जास्त महागाई व बेरोजगारी आहे, केंद्र सरकारमध्ये ३० लाख सरकारी पदे रिक्त आहेत पण मोदी सरकारने ती भरली नाहीत. बेरोजगारीबरोबरच महागाई प्रचंड वाढली आहे. पेट्रोल, डिझेल,गॅस सिलिंडर, खाद्यतेल, सोने, चांदी सर्वांच्या महागाईची भेट मोदींनी दिली. शेती साहित्यावर जीएसटी लावला, सर्व बाजूंनी मोदी सरकारने जनतेला संकटात टाकले आहे.नरेंद्र मोदी जगातील सर्वात शक्तीमान नेते असून चुटकीसरशी सर्व समस्या सोडवतात असा भाजपाचा दावा आहे तर रोजगार व महागाईची समस्या का सोडवली नाही ? असा घणाघाती हल्ला काँग्रेस सरचिटणीस प्रियंका गांधी यांनी केला.

लातूर लोकसभा मतदारसंघातील काँग्रेस इंडिया आघाडीचे उमेदवार शिवाजी काळगे यांच्या प्रचारासाठी उदगीरच्या जाहीर सभेत त्या बोलत होत्या. प्रियंका गांधी यांनी भाषणाची सुरुवात मराठीतून केली. त्या पुढे म्हणाल्या की, महाराष्ट्राने सामाजिक न्यायाची परंपरा जपली आहे. छत्रपती शिवाजी महाराज, शाहू महाराज, महात्मा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची ही भूमी आहे. काँग्रेस सरकारने मराठवाड्यात विकासाची कामे केली आहेत.पण मागील काही वर्षांपासून चित्र बदलले आहे. मोदी सरकारच्या काळात दलितांवर शोषण व अत्याचार होत आहेत पण सरकार डोळे बंद करुन बसले आहे, जनता संकटात आहे, देशातील जनता संकटांचा सामना करत आहे परंतु टीव्हीवर मात्र सर्वकाही आलबेल आहे असे दाखवले जात आहे. मोदी शिवाय जगात दुसरा कोणताच नेता मोठा नाही असे भासविले जाते. पण परिस्थीती तशी नाही. मोदी सरकारने तुमच्यासाठी काय केले? रोजगार दिले का? महागाई कमी केली का? तुमच्या जीवनात काय बदल घडवला का? महिलांना काही मदत केली का? असे प्रश्न विचारून प्रियंका गांधी यांनी मोदी सरकारची पोलखोल केली. आपल्या मुलाला चांगले शिक्षण मिळावे, नोकरी मिळावी यासाठी गरिब घरातील लोक विपरीत परिस्थीतीत मुलांचे पालन पोषण करतात. पण मोदी सरकार गरिबांना केवळ ५ किलो रेशन देते, यातून तुमच्या मुलांचे भविष्य बनणार आहे का?

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानाने गरिब श्रीमंत सर्वांना समान अधिकार दिले आहेत, हे अधिकार काढून घेण्यासाठी भारतीय जनता पक्षाला संविधान बदलायचे आहे. भाजपाचा डाव जनतेच्या लक्षात आल्यानंतर आता मोदी प्रत्येक सभेत संविधान बदलणार नाही अशी सारवा सारव करत आहे. मोदींच्या पक्षांतील खासदारांनीच संविधान बदलण्याची भाषा केली आणि भाजपात मोदींच्या परवानगी शिवाय पानही हलत नाही, त्यांच्या परवानगीनेच संविधान बदलण्याची भाषा खासदारांनी केली पण आता त्यांची भाषा बदलली आहे. नरेंद्र मोदी सातत्याने म्हणतात ७० वर्षात काहीच झाले नाही, एकवेळ मोदी म्हणतात तसे काहीच झाले नाही तर जनतेने मोदींना १० वर्ष सत्ता दिली होती या १० वर्षात तुम्ही काय केले ते तरी सांगा, असा सवाल करत नरेंद्र मोदी हे अहंकारी नेते आहेत, ते सातत्याने खोटे बोलतात परंतु मोदींची नौटंकी आता चालणार नाही, ‘अब की बार जनता की सरका’, असा नारा देत आता जागे व्हा, तुमचे मत वाया घालवू नका, हा देश तुमचा आहे, आज देश वाचवण्याचा प्रयत्न केला नाही तर भविष्य अवघड आहे. मतदान करण्याआधी तुमच्या भविष्याचा विचार करा व मगच मतदान करा, असे आवाहनही प्रियंका गांधी यांनी केले.

शिवसंग्राम लोकसभा निवडणुकीत राहणार ‘तटस्थ’

डॉ. ज्योतीताई विनायकराव मेटे यांची माहिती; राज्यस्तरीय पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत झाला निर्णय
पुणे: लोकसभा निवडणुकीत शिवसंग्राम पक्ष महायुती किंवा महाविकास आघाडी कोणालाही समर्थन देणार नाही. लोकसभा निवडणुकीत तटस्थ राहण्याचा निर्णय झाला असून, लोकसभेनंतर विधानसभा निवडणुकीसाठी स्वतंत्र बैठक घेऊन पुढील दिशा ठरवली जाईल, अशी माहिती शिवसंग्राम पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षा डॉ. ज्योतीताई विनायकराव मेटे यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.
लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने शिवसंग्राम पक्षाची भूमिका ठरवण्यासाठी राज्यस्तरीय पदाधिकाऱ्यांच्या मंथन बैठकीचे आयोजन पुण्यातील बाळासाहेब ठाकरे सभागृहात शनिवारी करण्यात आले होते. त्यानंतर मेटे पत्रकारांशी बोलत होत्या. प्रसंगी शिवसंग्रामचे प्रदेशाध्यक्ष तानाजीराव शिंदे, प्रदेश सरचिटणीस विक्रांत आंब्रे, प्रदेश सचिव शेखर पवार, हिंदुराव जाधव, ज्येष्ठ नेते प्रभाकर कोलंगडे, खजिनदार रामनाथ जगदाळे, पुणे शहराध्यक्ष भरत लगड, चेतन भालेकर, विनोद शिंदे, लहू ओहोळ, भरत फाटक, सागर फाटक आदी उपस्थित होते.
डॉ. ज्योतीताई मेटे म्हणाल्या, “लोकनेते विनायकराव मेटे यांच्या निधनानंतर प्रथमच लोकसभा निवडणूक होत आहे. बीड लोकसभेच्या अनुषंगाने भूमिका जाहीर करण्याचा निर्णय यापूर्वीही झाला होता. त्यामुळे तटस्थतेचा निर्णय घ्यायला उशीर झाला असे नाही. आता सर्व पदाधिकाऱ्यांशी चर्चा करून लोकसभेसाठी तटस्थ राहण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. राजकारणात अनुषंगिक भूमिका असतात. त्यामुळे नाराजीचा प्रश्न उपस्थित होत नाही. योग्यवेळी योग्य निर्णय घेण्यालाच राजकारणात महत्व असते. आमचीही भूमिका अशीच होती. लोकसभा निवडणूक लढवण्याबाबत बीडच्या जनतेची इच्छा होती. त्यामुळे आमच्या संघटना पातळीवर हा विचार झाला होता. जनतेचा सन्मान करण्याच्या अनुषंगाने बीडमध्ये लोकसभा निवडणूक लढवणार नाही अशी भूमिका जाहीर केली होती. कारण यासाठी आम्ही लोकसभा क्षेत्रात सखोल चाचपणी करून त्यानांतर जनतेच्या हिताचा आदर करण्यासाठी आम्ही लोकसभेतून माघार घेतली.”
तानाजीराव शिंदे म्हणाले, “लोकसभेची निवडणूक झाल्यानंतर आम्ही पुन्हा राज्य कार्यकारिणीची बैठक घेऊ. यानंतर विधानसभेची तयारी केली जाईल. शिवसंग्राम विधानसभेच्या १२ जागा लढवणार आहे, हे आम्ही याआधीही जाहीर केले आहे. विधानसभेच्या दृष्टीने जी काही रणनीती आखावी लागेल, यासाठी ज्या पक्षांची मदत घ्यावी लागेल किंवा ज्यांच्यासोबत युती करावी लागेल याचाही विचार योग्यवेळी केला जाईल. आम्ही महायुतीमध्ये होतो, हा भुतकाळ आहे. नाराजीचा प्रश्न नसून सगळ्यांशी चर्चा करून हा निर्णय घेतला आहे. आम्ही मतदान करणार पण कोणत्याही पक्षाला पाठिंबा देणार नाही.”

वडगावशेरी विधानसभा मतदारसंघ निवडणूक कार्यालयाला निरीक्षकांची भेट

पुणे, दि. २७: भारत निवडणूक आयोगाकडून पुणे लोकसभा मतदारसंघातील निरीक्षणासाठी नियुक्त करण्यात आलेले सर्वसाधारण निवडणूक निरीक्षक प्रसाद लोलयेकर यांनी वडगावशेरी विधानसभा मतदार संघातील निवडणूक कार्यालयाला भेट देऊन कामकाजाचा आढावा घेतला.

यावेळी सहायक निवडणूक निर्णय अधिकारी सचिन बारवकर, अतिरिक्त सहायक निवडणूक निर्णय अधिकारी तृप्ती कोलते उपस्थित होत्या.

यावेळी श्री. लोलयेकर यांनी वडगाव शेरी मतदारसंघातील मतदारांची व मतदान केंद्रांची संख्या, ५ पेक्षा जास्त केंद्र असणाऱ्या ठिकाणी मतदारांसाठी करण्यात आलेल्या सोयी सुविधा, मतदानासाठी होणारे साहित्य वितरण केंद्रावरील कामकाज व कार्यवाही, २०१९ मधील लोकसभा निवडणुकीतील मतदानाच्या टक्केवारीबाबत माहिती घेतली. तसेच पुढील आठवड्यात प्रत्यक्ष मतदानकेंद्राची तपासणी करणार असल्याचे सांगितले.

इंडोनेशिया निवडणूक आयोगाच्या शिष्टमंडळाने साधला मुख्य निवडणूक अधिकारी यांच्याशी संवाद

मुंबई, दि.२७ : इंडोनेशिया देशाच्या निवडणूक आयोगातील उच्चस्तरीय अधिकाऱ्यांच्या शिष्टमंडळाने आज मंत्रालयातील राज्याच्या मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाला भेट दिली.  यावेळी परिषद सभागृह येथे मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोक्कलिंगम यांच्याशी त्यांनी संवाद साधला.

जगात सर्वात मोठी लोकशाही म्हणून भारत देशाची ओळख आहे.  भारत निवडणूक आयोगाच्या अंतर्गत राज्य निवडणूक अधिकारी यांचे कार्यालय राज्यात लोकसभा २०२४ ची निवडणूक प्रक्रिया काटेकोरपणे, नियोजनबद्धरित्या पार पाडत आहे. राज्यातील एकूण मतदार, मतदारांसाठी केलेल्या सोयीसुविधा, मतदार जनजागृती आदींची माहिती महाराष्ट्र राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोक्कलिंगम यांनी भेटी दरम्यान शिष्टमंडळाला  दिली.

यावेळी इंडोनेशिया निवडणूक आयोगाचे मुख्य निवडणूक आयुक्त इधाहम होलिक, सचिव बेनार्ड डेर, मा वन सृष्टोनो, उपमुख्य निवडणूक अधिकारी सुर्यदी, अधिकारी रोबि लिओ अगुस, मोह सकिर रंदिया, सायकीर, सरहा गोकसी, कौन्सिल जनरल तोल्ह उबादी, विजय तावडे, व्हिसा अधिकारी मोहमद  अख्यार, राजेश पाड्या, राज्याच्या निवडणूक विभागाचे सहमुख्य निवडणूक अधिकारी मनोहर पारकर यावेळी उपस्थित होते.

मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोक्कलिंगम यांनी यावेळी  भारत निवडणूक आणि महाराष्ट्र राज्य निवडणूक अधिकारी कार्यालय यांचे अधिकार व चालणारे कामकाज याविषयी देखील माहिती दिली. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका राज्य निवडणूक आयोगामार्फत स्वतंत्रपणे घेण्यात येतात.  राज्याची लोकसंख्या, लोकसभा मतदार संघ, एकूण मतदान केंद्र, राज्यातील मतदानाचे टप्पे, टप्पा निहाय सुरू असलेली  निवडणूक प्रक्रिया, ईव्हीएम, व्हीव्हीपॅट यंत्र, बॅलेट युनिट ,कायदा व सुव्यवस्था, राजकीय पक्ष आणि आचारसंहिता, मतदान वाढवण्यासाठी राबवण्यात आलेले उपक्रम, राज्यात उभारलेले चेक पोस्ट, आधुनिक तंत्रज्ञानचा निवडणूक प्रक्रियेतील उपयोग  करून विविध ॲप आणि पोर्टल आयोगाने विकसित केलेले आहेत याबाबत सविस्तर माहिती यावेळी त्यांनी दिली.

निवडणूक निरीक्षकांच्या उपस्थितीत मनुष्यबळाची दुसरी सरमिसळ संपन्न

पुणे दि.२७-लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी मावळ, पुणे आणि शिरुर मतदारसंघात नियुक्त अधिकारी-कर्मचाऱ्यांची विधानसभा मतदारसंघ क्षेत्रनिहाय दुसरी सरमिसळ निवडणूक निरीक्षकांच्या उपस्थितीत जिल्हाधिकारी कार्यालयात करण्यात आली.

यावेळी मावळ मतदारसंघाचे निवडणूक निरीक्षक बुदीती राजशेखर , पुणे मतदारसंघाचे निवडणूक निरीक्षक प्रसाद लोलयेकर, शिरुर मतदारसंघाचे निवडणूक निरीक्षक कुमार सौरभ राज, जिल्हाधिकारी तथा पुणे मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी डॉ.सुहास दिवसे, मावळ मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी दिपक सिंगला, शिरुर मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी अजय मोरे, मनुष्यबळ समन्वयक अधिकारी ज्योती कदम आदी उपस्थित होते.

मावळ मतदारसंघातील पुणे जिल्ह्यांतर्गत तीन विधानसभा क्षेत्रातील १ हजार ३३९ मतदान केंद्रासाठी ६ हजार ५९४ आणि रायगड जिल्ह्यांतर्गत तीन विधानसभा क्षेत्रातील १ हजार २२७ मतदान केंद्रासाठी ५ हजार ४४८, पुणे लोकसभा मतदारसंघाच्या २ हजार १८ मतदान केंद्रासाठी ११ हजार १७६ आणि शिरुर लोकसभा मतदारसंघातील २ हजार ५०९ मतदान केंद्रासाठी ११ हजार ५८६ अधिकारी-कर्मचाऱ्यांची सरमिसळ संगणकीय प्रणालीद्वारे करण्यात आली.

या सरमिसळ प्रक्रीयेच्या माध्यमातून संबंधित विधानसभा क्षेत्रातील पथक निश्चित झाले असून विधानसभा क्षेत्रस्तरावरील दुसऱ्या सरमिसळ प्रक्रीयेत मतदान केंद्रासाठी पथक निश्चित होईल.