Home Blog Page 1071

व्यवस्थेविरुद्ध लिखान करणारा पत्रकार म्हणजे तो देशद्रोही अशी वर्गवारी लोकशाहीला धोकादायी

पुणे – व्यवस्थे विरुद्ध लिखान करणारा पत्रकार म्हणजे तो देशद्रोही अशा स्वरूपाच्या वर्गवार्‍या गेल्या काही वर्षांमध्ये पत्रकारीतेत तयार केल्या जाऊ लागल्या आहेत. पत्रकारीतेच्या अशा वर्गवार्‍या करणे हे लोकशाहीच्या दृष्टीने लांछनास्पद आहे. पत्रकारांनी सामान्य जनतेच्या प्रश्नांशी नाळ जोडली पाहिजे. जेव्हा पत्रकार सामान्यांच्या प्रश्नासाठी आवाज उठवतो, तेव्हा त्या पत्रकाराचा व्यवस्थेशी संघर्ष हा अटळ असतो. मात्र, पत्रकारांनी या संघर्षापासून पळ काढता कामा नये, असे परखड मत ज्येष्ठ पत्रकार अनंत बागाईतकर यांनी व्यक्त केले.
पत्रकार वरूणराज भिडे मित्र मंडळातर्पेâ अनंत बागाईतकर आणि डॉ. डी. वाय पाटील शिक्षण संस्थेचे कुलपती डॉ. पी. डी. पाटील यांच्या हस्ते पत्रकारीतेत उल्लेखनिय कार्य केल्याबद्दल समर खडस, शैलेश काळे, डी. के. वळसे-पाटील, अरूण म्हेत्रे यांना विशेष पुरस्कार देऊन गौरव केला. त्यावेळी बागाईतकर बोलत होते. यावेळी कॉग्रेसचे ज्येष्ठ नेते, आमदार उल्हासदादा पवार, राष्ट्रवादी (शरदचंद्र पवार पक्षाचे) प्रवक्ते अंकुश काकडे, निवड समितीचे सत्यजित जोशी, शैलेश गुजर, सुर्यकांत पाठक आदी यावेळी उपस्थित होते.
बागाईतकर म्हणाले, व्यवस्थेच्या बाजूने लिखान केल्यास तुम्ही पत्रकार, विरोधात लिखान केल्यास पत्रकारांवर विविध प्रकारचे शिक्के मारले जात आहेत. सध्याच्या घडीला वेगवेगळ्या माध्यमातून पत्रकारांवर दबाव टाकला जात आहे. कौतुक करणे हे पत्रकाराचे काम नाही हे लक्षात घेतले पाहिजे. समाजात घडणार्‍या गोष्टींचे बारकावे शोधून सत्यपरिस्थिती समाजापुढे मांडणे म्हणजे पत्रकारीता आहे. वस्तूनिष्ठ आणि अचूक असलेली बातमी कोणीही दाबू किंवा नाकारू शकत नाही. त्यामुळे बातमी लिहिताना ती वस्तूनिष्ठ आणि सोप्या शब्दांत असेल याची काळजी पत्रकारांनी घेतली पाहिजे. पत्रकार जेव्हा सामान्यांचे प्रश्न मांडतो तेव्हा त्याचा व्यावस्थेशी संघर्ष हा अटळ आहे. मात्र, पत्रकारांनी या संघर्षापासून पळ न काढता, दबावाला बळी न पडता सामान्यांचे प्रश्न मांडले पाहिजे. सध्याच्या घडीला तंत्रज्ञानाचे सर्वात मोठे आव्हान पत्रकारांपुढे उभे ठाकले आहे. मात्र, काही वेळा वस्तूनिष्ठता आणि अचूकपणाचा अभाव पत्रकारीतेत दिसतो. त्यामुळे तंत्रज्ञानाला वस्तूनिष्ठता आणि अचूकतेची जोड देण्यासाठी प्रयत्न झाला पाहिजे.
डॉ. पाटील म्हणाले, सध्या कृत्रिम बुद्धीमत्ता वाढत असून, त्यातून समाजात गैरसमज निर्माण केले जात आहेत. त्यामुळे पत्रकारीतेपुढे खर्‍या अर्थाने आव्हाने उभी ठाकली आहेत. पत्रकारांनी या आव्हानांचा सामना करताना संयम बाळगून वस्तूनिष्ठ गोष्टी सामान्य जनतेपर्यंत पोहचवल्या पाहिजे.
उल्हासदादा पवार म्हणाले, गेल्या काही वर्षांत पत्रकारांपुढील आव्हाने वाढत आहेत. तंत्रज्ञानाच्या काळात वस्तुनिष्ठ पत्रकारीता करताना पत्रकारांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. मात्र, पत्रकार समर्थपणे ही आव्हाने पेलतील.
यावेळी समर खडस, शैलेश काळे, डी. के. वळसे-पाटील, अरूण म्हेत्रे यांनी मनोगत व्यक्त केले. अंकुश काकडे यांनी प्रास्ताविक केले. डॉ. शैलेश गुजर यांनी सूत्रसंचालन केले.

राम मंदिराच्या नावाखाली भाजप नेत्यांचा 2 हजार कोटींचा घोटाळा

मुंबई-अयोध्येतील राम मंदिराच्या नावाखाली झालेल्या दोन हजार कोटींच्या जमीन घोटाळ्यात सर्व भाजप नेत्यांचा समावेश असल्याचा गंभीर आरोप शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी आज प्रसार माध्यमांशी बोलताना केला. अजित पवार यांची ख्याती सध्या धमकीबहाद्दर झाली आहे. ते रोज उठून मतदारसंघातल्या 10 लोकांना धमक्या देतात, असा ही आरोप त्यांनी केला.

उत्तर मध्य मुंबईच्या जागेबाबत ,नसीम खान यांच्या नाराजीबाबत बोलतांना आज संजय राऊत म्हणाले, ”नसीम खान मुंबई काँग्रेसचे मोठे नेते आहेत. आमच्यासोबत त्यांचे चांगले संबंध आहेत. त्यांना निवडणूक लढवायची होती. माझ्यासोबत, उद्धव ठाकरेंसोबत त्यांचं बोलण झालं होतं. नसीम खान यांना उमेदवार बनवू नका, असं आम्ही बोललो नाही. हा काँग्रेसचा अंतर्गत निर्णय आहे. काँग्रेकडे ज्या जागा आहेत, तो त्यांचा निर्णय आहे. अजूनही काँग्रेसला वाटत असेल, उमेदवार बदलून नसीम खान यांना उमेदवारी द्यावी, तर तो त्यांचा निर्णय आहे. आम्ही मविआ धर्माच पालन करू आणि नसीम खान यांना निवडून आणू. नसीम खान यांना उमेदवारी नाकारण्याशी आमचा काहीही संबंध नाही”, असे राऊतांनी स्पष्टपणे सांगितले.

पुढे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा धमकी बहाद्दर असा उल्लेख राऊतांनी केला आहे. ते म्हणाले, ”अजित पवार अजून किती वेळा बोलणार, गुळगुळीत झाले आहे आता. आता दुसरे काहीतरी बोला. धमकी वगेरे द्या. अजित पवारांची ख्याती सध्या धमकी बहाद्दर अशी झाली आहे. रोज उठून ते सध्या मतदारसंघात 10 लोकांना धमक्या देतात. हे असे वैचारिक वक्तव्य तुम्हाला शोभत नाहीत”, अशी टीका राऊतांनी केली आहे. शरद पवारांच्या सांगण्यावरूनच 2019 चा शपथविधी झाला, असे उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले होते. यावर राऊतांनी भाष्य केले आहे.

राऊतांनी पंतप्रधान मोदींवरही निशाणा साधला आहे., ”मोदींना माझा सवाल आहे, तुम्ही आमचे बारा लोकं घेतले आहेत. ज्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप आहेत. त्यांच्यावर कारवाई करा. मोदी यांची भ्रष्टाचार विरोधीची बॉम्ब नसून पोकळ बांग आहे. सगळे भ्रष्टाचारी आपल्या मांडीवर घेऊन मोदी भ्रष्टाचार विरोधी लढाई करत आहेत. मोदींनी आधी अजित पवार यांच्यावर कारवाई करावी”, अशी टीका संजय राऊत यांनी केली आहे.

दरम्यान, नाशिक लोकसभा मतदारसंघाचे शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार राजाभाऊ वाजे आणि दिंडोरी लोकसभा मतदारसंघाचे शरद पवार गटाचे उमेदवार भास्कर भगरे हे आज जोरदार शक्तीप्रदर्शन करत आपला उमेदवारी अर्ज भरणार आहेत. याबाबत संजय राऊत म्हणाले की, ”महाविकास आघाडीला शक्तिप्रदर्शन करावे लागत नाही. नाशिक आणि दिंडोरी दोन्ही जागा महाविकास आघाडी प्रचंड मताधिक्याने निवडून येतील. राजाभाऊ समोर महायुतीला उमेदवारच मिळत नाही. नाशिकमध्ये आम्हाला समोर गद्दारच हवा आहे. त्यांना आम्ही गाडणारच”, असा इशारा राऊतांनी दिला आहे.

एमसीएच्या महिला प्रिमियर लीगसाठी संघांच्या मालकीसाठी विक्रमी किंमत

पुणे संघासाठी ४एस गटाची सर्वाधिक बोली

वाई एंटरप्रायझेस प्रायव्हेट लिमिटेडकडे नाशिक संघाची मालकी

कपिल सन्स ग्रुपने मिळवली रायगड फ्रॅंचाईजी

सोलापूर फ्रॅंचाईजीची मालकी रॉयल जिनियस स्पोर्ट्स प्रायव्हेट लिमिटेडकडे

पुणे – महाराष्ट्र क्रिकेट संघटनेच्या महिला प्रिमियर लीगसाठी चार संघांची मालकी घेण्यासाठी शनिवारी झालेल्या लिलाव प्रक्रियेत विक्रमी रुपयांची बोली लागली. चार संघांसाठी संघ मालकांनी तब्बल १५.९ कोटी रुपये खर्च केले.

सर्व राज्य संघटनांमध्ये महिला संघाच्या मालकीसाठी मिळालेला हा विक्रमी महसूल ठरला. महिलांसाठी स्वतंत्र ट्वेन्टी-२० लीग आयोजित करणारी महाराष्ट्र क्रिकेट संघटना ही एकमेव राज्य संघटना असून, लीगला २४ जूनपासून सुरुवात होणार आहे. स्पर्धेत एकूण १३ सामने खेळले जातील.

एमसीएचे अध्यक्ष रोहित पवार या कार्यक्रमाला उपस्थित राहू शकले नाहीत. पण, त्यांचा संदेश सचिव कलमेश पिसाळ यानी वाचून दाखवला. मला अभिमान आहे की एमसीए या नात्याने आम्हाला फ्रॅँचाईजी आधारीत महिला टी-२० लीगचे आयोजन करणारी पहिली संघटना म्हणून संधी मिळाली. गेल्या वर्षी एमपीएल खेळाडूंच्या लिलावात आम्ही महिला प्रिमियर लीगचे आयोजन करण्याचे वचन दिले होते. आम्ही आमचा शब्द पाळला आहे, असे रोहित पवार यांनी आपल्या संदेशात म्हटले आहे.

एमपीएलने आमच्या खेळाडूंना त्यांची प्रतिभा दाखविण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध करून दिले. मला खात्री आहे की महिला प्रिमियर लीग देखील आमच्या महिला क्रिकेटपटूंसाठी असेच व्यासपीठ बनले. मला विश्वास आहे की महिला प्रिमियर लीगमधून भविष्यातील भारतीय खेळाडू उदयास येतील, असेही पवार यांनी आपल्या संदेशात नमूद केले.

एमपीएल आणि महिला प्रिमियर लीग चे अध्यक्ष सचिन मुळ्ये यांनी लिलावाचा तपशील आणि प्रक्रिया सर्व बोलीदारांपुढे सादर केली. एमपीएलमधील पुणेरी बाप्पा संघाचे मालक असलेल्या सुहाना सह्याद्री सुजनिल्स ४ एस समूहाने महिला प्रिमियर लीगमध्ये देखिल पुणे संघासाठी सर्वाधिक ५.१ कोटी रुपयाची बोली लावली. महिला संघ देखिल पुणेरी बाप्पा संघाने ओळखला जाईल. फ्रॅँचाईजीने भारताची उपकर्णधार स्मृती मानधनाची आपल्या संघाची आयकॉन खेळाडू म्हणून निवड केली.

वाई एंटरप्रायझेस प्रायव्हेट लिमिटेडने नाशिक संघासाठी ३.८ कोटी रुपयाची दुसरी सर्वोत्तम बोली लावली. त्यांनी भारताची आंतरराष्ट्रीय खेळाडू अनुजा पाटीलची आयकॉन खेळाडू म्हणून निवड केली.

सोलापूर रॉयल्सची मालकी असलेल्या कपिल सन्स समूहाने या वेळी रत्नागिरी संघासाठी ३.६ कोटी रुपयांची बोली लावली. कंपनीने पुढे आपल्या शहर आणि जिल्ह्यातील बदलाचा निर्णय घेत रायगड सोबत जाण्याचा निर्णय घेतला. या संघाचे नाव रायगड रॉयल्स असे असेल. या संघाने आक्रमक फलंदाज आंतरराष्ट्रीय खेळाडू किरण नवगिरे आपली आयकॉन खेळाडू म्हणून निवडले.

रॉयल जिनियस स्पोर्ट्स प्रायव्हेट लिमिटेडने ३.४ कोटी रुपयांत सोलापूर संघाची मालकी घेतली. त्यांनी देविका वैद्यला आयकॉन खेळाडू म्हणून निवडले.

लिलावापूर्वी एमसीएसच्या सर्वोच्च परिषदेचे सदस्य विनायक द्रविड, राजू काणे, रणजित खिरीड, सुशील शेवाळे, सुनील मुथा यांनी संघ मालकांचा सत्कार केला. कल्पना तापीकर यांनी आभार मानले आणि महिला प्रिमियर लीग महाराष्ट्रातील महिला क्रिकेटसाठी बदलाचे पाऊल ठरेल असे मत व्यक्त केले.

महाराष्ट्रातील जनता परिवर्तन करण्याच्या मनस्थितीत – शरद पवार

उरुळी कांचन : महाराष्ट्रात लोकांची मनस्थिती परिवर्तन करण्याची आहे. दहा वर्षात देशाचा कारभार करण्याची जबाबदारी ज्यांच्याकडे होती, त्यांची काम करण्याची पध्दत पाहून लोक अस्वस्थ आहेत. देशाच्या संविधानाला कोणीही धक्का लावू शकत नाही, हे दाखवून देण्याची ताकद सर्वसामान्यांमध्ये आहे, असे प्रतिपादन जेष्ठ नेते खासदार शरद पवार यांनी केलं.

उरुळी कांचन येथे महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार खासदार डॉ. अमोल कोल्हे यांच्या प्रचारार्थ आयोजित केलेल्या सभेत पवार बोलत होते. यावेळी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, डॉ. अमोल कोल्हे, आमदार अशोक पवार, जिल्ह्याध्यक्ष जगन्नाथ शेवाळ, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख अशोक खांडेभराड, काँग्रेसचे देवदत्त भन्साळी आदी उपस्थित होते.

शरद पवार म्हणाले की, गेली काही दिवस महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात हिंडतोय. जनतेच्या मनात काय आहे हे समजलं. कधी नव्हे इतका शेतकरी अस्वस्थ आहे. शेतकऱ्यांना त्याच्या घामाची किंमत मिळत नाही.

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी त्यांच्या दहा वर्षाच्या राज्यात शेतीसाठी काय केलं असा सवाल करत पवार म्हणाले की, आज या देशातली शेती संकटात आली आहे. या सरकारच शेतीवरच लक्ष कमी होत आहे, आत्महत्या वाढायला लागल्यात मी कृषी खात 10 वर्ष सांभाळले,नंतर मोदींचे राज्य आले..माझ्या काळात शेतकरी हिताचे निर्णय घेतले,मात्र मोदींच्या राज्यात शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढल्या.

सत्ता ही लोकांसाठी वापरायची असते, पण आज काय सुरु आहे, असे सांगत पवार पुढे म्हणाले की, या देशाचा कारभार हुकूमशाही पध्दतीने सुरु आहे. मोदींचा संसदीय लोकशाही पद्धतीवर विश्वास नाहीये,विरोधकांवर त्यांचा विश्वास नाहीये. मनमोहन सिंग पंतप्रधान असताना,पत्रकारांना सामोरे जायचे,मोदींनी ही दहा वर्षात एकही पत्रकार परिषद घेतली नाही.

या देशाची घटना संकटात आणण्याचे काम केलं जात आहे, या देशाची घटना बदलण्याचे काम त्यांना करायचे आहे, आणि म्हणूनच 400 पार चा नारा ते देतायेत. पण तुमच्या माझ्या हातात आहे की कोणीही घटनेला धक्का देऊ शकत नाही हे दाखवून देण्याची ही वेळ आहे, असेही पवार म्हणाले.

आमच्यावर टीका केल्याशिवाय पंतप्रधान मोदींना झोपच लागत नाही

पंतप्रधान नरेंद्र मोदी कधी नेहरूंवर टीका करतात. खर तर आज नेहरू हयात नाहीत. पणआता आमच्यावर टीका केल्याशिवाय त्यांना झोपच लागत नाही. कधी माझ्यावर टीका करतात, कधी उद्धव ठाकरेंवर टीका करतात, कधी राहुल गांधींवर टीका करतात. अस सांगत पवार म्हणाले की आमच्यावर टीका करा, आमच्या अंगाला काही भोक पडत नाही, असेही पवार म्हणालेत.

मोदीजी आता गॅस सिलेंडर ला कितीवेळा नमस्कार करून मतदानाला जायचं?

पुणे – समोरच्या उमेदवाराला पराभव दिसायला लागला की, दबाव तंत्र वापरलं जात, पण सर्वसामान्य जनतेने ही निवडणूक हाती घेतली आहे. वैयक्तिक टिका करण्याऐवजी देशातील महागाई कमी होणार का,शेतकऱ्यांच्या शेतमालाला हमीभाव मिळणार का.बेरोजगार तरुणांना रोजगार मिळणार का ? असे सवाल महाविका आघडीचे उमेदवार खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना विचारलेत. महाविकास आघाडीचे शिरूर लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार अमोल कोल्हे यांच्या प्रचारार्थ आज पुण्यातील हडपसर मतदारसंघात प्रचार रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते माध्यमांशी बोलत होते. यावेळी शहराध्यक्ष प्रशांत जगताप, माजी मंत्री बाळासाहेब शिवरकर, योगेश ससाणे आदी उपस्थित होते. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या पुणे दौऱ्यावर असून शिरूर,बारामती,पुणे आणि मावळ लोकसभा मतदारसंघाच्या अनुषंगाने ते सभा घेत मोठं शक्ती प्रदर्शन करणार आहेत.याबाबत अमोल कोल्हे यांना विचारल असता ते म्हणाले की आज सर्वसामान्य जनता ही इंडिया आघाडीच्या मागे उभी आहे.आज देशाच्या पंतप्रधानांना इथे यावं लागत आहे यातच इंडिया आघाडीचा विजय असल्याचं यावेळी कोल्हे यांनी म्हटल आहे. वारंवार निधी बाबत जे सांगितल जात आहे ते वक्तव्य पाहता सर्वसामान्य नागरिकांच्या करातील हा पैसा असून निधी हा कोणाच्याही मालकीचं नाही. विरोधकांकडून होत असलेल्या, दमदाटीबद्दल कोल्हे म्हणाले की, अश्या दमदाटीला सर्वसामान्य जनता या माध्यमातून उत्तर देणार आहे.निवडणूक हातातून निसटते तेव्हा अश्या पद्धतीने दमदाटी केली जाते. अजित पवार यांना पत्नी सुनेत्रा पवार यांच्या प्रचारासाठीच बारामतीत अडकाव लागत आहे, याप्रश्नावर कोल्हे म्हणाले, याबाबत कोल्हे एखाद्या राष्ट्रीय अध्यक्षाला जर चार जागांवर समाधान मानावे लागत असेल तर ही परिस्थिती काय आहे हे आपण समजावं. त्यातही एक स्वतःच्या प्रदेशाध्यक्षांना उमेदवारी द्यावी लागते तर एक पत्नींना उमेदवारी द्यावी लागते आणि दोन उमेदवार हे बाहेरून आयात करावे लागत आहे.आत्ता यातच काय परिस्थिती आहे हे आपल्याला माहीत आहे. असा टोला यावेळी कोल्हे यांनी अजित पवार यांना लगावला आहे. सर्वसामान्य जनतेने याचा विचार करावा जनतेच्या कर रूपाचा पैसा हा लोकप्रतिनिधी विकासासाठी वापरत असतो जर आपल्या विचाराचा उमेदवार नाही म्हणून निधी नाही, अस जर असेल तर ते लोकशाही प्रणालीला घातक असल्याचं यावेळी कोल्हे म्हणाले.

गुजराती व राजस्थानी बांधवांचा खासदार बारणे यांना एकमुखी पाठिंबा

गुजराती व राजस्थानी समाजाचा संपूर्ण देशाला अभिमान – प्रशांत ठाकूर

केंद्रातील भ्रष्टाचार नरेंद्र मोदींनी संपवला – श्रीरंग बारणे

खारघर, दि. 28 एप्रिल – पनवेल विधानसभा मतदारसंघातील गुजराती व राजस्थानी बांधवांनी मावळ लोकसभा मतदारसंघातील शिवसेना-भाजप-राष्ट्रवादी- मनसे- आरपीआय- रासप- मित्रपक्ष महायुतीचे उमेदवार खासदार श्रीरंग बारणे यांना आज (रविवारी) एकमुखी पाठिंबा जाहीर केला.

खारघर येथे झालेल्या गुजराती व राजस्थानी समाज संमेलनात महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणे यांना विक्रमी मताधिक्याने निवडून आणण्याचा निर्धार करण्यात आला. चंदन तिलक लावून व गुजराती पगडी घालून यावेळी बारणे यांचा सत्कार करण्यात आला.

व्यासपीठावर खासदार बारणे, आमदार प्रशांत ठाकूर, भाजपचे जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख रामदास शेवाळे, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सचिव शिवदास कांबळे तसेच प्रवीण पाटील, प्रथमेश सोमण, ब्रिजेश पटेल, आशिष पटेल, प्रवीण बेरा, कांतीभाई बामाणी, मोतीलाल जैन, विनोद बाफना, जीवजी पटेल, नीलेश बातेसरा, नारायण भाई, देवजीभाई चौधरी, हसमुख पटेल, कमल कोठारी, कुणाल सांगानी, अंबाबाई पटेल, संजय जैन, कविता चोथमल तसेच राजस्थानी व गुजराती बांधवांच्या विविध संघटनांचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

आमदार ठाकूर म्हणाले की, गुजराती व राजस्थानी समाजाचे देशाच्या विकासात मोठे योगदान आहे. त्यामुळे या दोन्ही समाजांचा संपूर्ण देशाला अभिमान आहे. दुकान, व्यवसाय या माध्यमातून या समाजाचा खूप लोकांशी दररोज संपर्क येतो. त्यामुळे कोणाला निवडून आणायचे, हे ही मंडळीच ठरवतात. देशाचा विकास कोणी केला, देश कोणाच्या हातात सुरक्षित आहे, हे त्यांना चांगले माहीत आहे.

झारखंडमधील जैन समाजाचे तीर्थक्षेत्र सम्मेद शिखरजीला पर्यटन स्थळाचा दर्जा देण्याच्या निर्णयाविरुद्ध आपण संसदेत आवाज उठवला होता, याकडे खासदार बारणे यांनी उपस्थितांचे लक्ष वेधले. पनवेल ते जेएनपीटी आठ पदरी रस्ता, अटल सेतू, नवीन विमानतळ, रेल्वे सुधारणा, मेट्रो, ग्रामीण भागात रस्ते व वीज पुरवठा अशा विविध कामांचा आढावा त्यांनी सादर केला. केंद्रातील भ्रष्टाचार मोदींनी संपवला, असेही ते म्हणाले. आपल्याकडून एखादे काम कमी होईल पण चुकीचे एकही काम आपण करणार नाही, अशी ग्वाही बारणे यांनी यावेळी दिली.

‘अब की बार, 400 पार’, ‘फिर एक बार, मोदी सरकार’, ‘तिसरी बार, आप्पा बारणे खासदार’ अशा घोषणा देत गुजराती व राजस्थानी बांधवांनी खासदार बारणे यांना शुभेच्छा दिल्या.

‘दगडूशेठ’ ला मोगरा महोत्सवाच्या निमित्ताने ५० लाख मोग-याचा पुष्पनैवेद्य

श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट व सुवर्णयुग तरुण मंडळातर्फे आयोजन ; भारतीय वारकरी मंडळातर्फे वासंतिक उटीचे भजन

पुणे : सुवासिक फुलांनी सजलेले दगडूशेठ हलवाई गणपती मंदिर आणि लाडक्या गणरायाचे रुप डोळ्यांमध्ये साठविण्यासाठी मोगरा महोत्सवाच्या निमित्ताने पुणेकरांनी मोठया संख्येने गर्दी केली. मोग-याच्या ५० लाख फुलांसह झेंडू, जास्वंद, गुलाब, चाफा सारख्या फुलांनी गाभा-यासह सभामंडपात आकर्षक सजावट करण्यात आली. फुलांचे शुंडाभूषण, मुकुट, कान व पुष्पवस्त्र परिधान केलेले गणरायाचे रुप अधिकच मनोहारी दिसत होते.

श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट व सुवर्णयुग तरुण मंडळातर्फे मंदिरात वासंतिक उटी, मोगरा महोत्सव आयोजित करण्यात आला. यावेळी ट्रस्टचे अध्यक्ष माणिक चव्हाण, उपाध्यक्ष सुनील रासने, कोषाध्यक्ष महेश सूर्यवंशी, उत्सव प्रमुख अक्षय गोडसे, सहचिटणीस अमोल केदारी आदी उपस्थित होते.

दोन दिवसांपासून पुष्पसजावटीची तयारी तब्बल २५० महिला व १०० पुरुष कारागिर करीत होते. यंदाच्या पुष्पसजावटीमध्ये ३५०० किलो गुलछडी, ८०० किलो झेंडू, १२० किलो कन्हेर फुले, १ लाख गुलाब, ७० हजार चाफा, १०० कमळे, १ लाख लिली, जाई-जुई, जास्वंद यांसह अनेक प्रकारची फुले वापरण्यात आली होती. गणरायाच्या मूर्तीला केलेली रंगीबेरंगी फुलांची सजावट प्रत्येक जण आपल्या मोबाईलमध्ये टिपत होता. गणरायाच्या चांदीच्या मूर्तीला उटीचे लेपन करण्यात आले. तसेच मोगरा महोत्सवासह वासंतिक उटीचे भजन भारतीय वारकरी मंडळातर्फे करण्यात आले.

सर्वाधिक घटनादुरुस्त्या काँग्रेस सरकारच्या काळात

भारतीय जनता पक्ष संविधान बदलणार नाही-माधव भंडारी

पुणे : भारतीय राज्यघटनेमध्ये सर्वाधिक दुरुस्त्या काँग्रेस सरकारच्या काळात झाल्या. घटनेची चौकट बदलण्याचे आणि मोडतोड करण्याचे काम माजी पंतप्रधान पंडीत नेहरुंपासून इंदिरा गांधी यांनी केले असल्याचा आरोप भाजपचे वरिष्ठ उपाध्यक्ष माधव भंडारी यांनी रविवारी केला.

महायुतीकडून आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. महायुतीचे समन्वयक संदीप खर्डेकर, भाजप शहर उपाध्यक्ष प्रशांत हरसुले, शाम सातपुते, पुष्कर तुळजापुरकर यावेळी उपस्थित होेते.

भारतीय जनता पक्ष राज्यघटना बदलणार असल्याचा खोटा प्रचार काँग्रेसकडून करण्यात येत आहे. काँग्रेसनेच मुळात घटनेची चौकट बदलली आहे. 26 नोव्हेंबर 1949 रोजी आपण संविधान स्वीकारले. गेल्या 74 वर्षांमध्ये 105 वेळा घटनेमध्ये दुरुस्त्या करण्यात आल्या आहेत. यापैकी 56 वर्षे सत्तेत असणार्‍या काँग्रेसच्या काळात सर्वाधिक 75 वेळा घटनादुरुस्ती झाली. यापैकी पंडीत नेहरुंच्या काळात 17, इंदिरा गांधी यांच्या काळात 29, राजीव गांधी यांच्या काळात 10 अशा एकंदर 56 घटना दुरुस्त्या नेहरु गांधीच्या परिवाराच्या काळात झाल्या. माजी पंतप्रधान नरसिंहराव यांच्या काळात 10 आणि मनमोहन सिंग यांच्या काळात 6 घटना दुरुस्ती झाल्या असल्याचे भंडारी यांनी सांगितले. माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या काळात बहुतेक घटना दुरुस्त्या वेगवगेवळ्या सामाजिक आरक्षणाची व्याप्ती किंवा काळ मर्यादा वाढवणार्‍या होत्या. प्रत्येकाला शिक्षणाचा अधिकार देणारी 86 वी दुरुस्ती आणि केंद्र व राज्य मंत्रिमंडळातील मंत्र्यांची संख्या नियंत्रित करणारी 91 वी दुरुस्ती अशा दोन महत्वपूर्ण व दुरगामी परिणाम करणार्‍या घटनादुरुस्त्या अटल बिहारी वाजपेयी यांनी केल्या. शिक्षणाच्या अधिकारामुळे शिक्षणाचा व्यापक प्रसार व्हायला गती मिळाली. मंत्र्यांच्या संख्येवर निर्बंध घातल्यामुळे मंत्रिमंडळाचा आकार काही प्रमाणात तरी अटोपशीर झाला असल्याचे भंडारी म्हणाले.

महिलांवरील अत्याचार आणि महागाईचे उत्तर द्या

– महाविकास आघाडीच्या महिला पदाधिकाऱ्यांचे पंतप्रधान मोदींना सवाल

पुणे -गेल्या दहावर्षात देशातील महिला, मुलींवर झालेले अत्याचार, महागाई, आणि मणिपूरातील हिंसाचार आणि अत्याचार, महिला कुस्तिपट्टूवर झालेला अत्याचार, उन्नाव आणि हाथरस  येथील अत्याचाराची घटना आदींसह महिलांच्या आरक्षणाची अंमलबजावणी का केली नाही ? या  विषयांवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुण्यात सभेत बोलावे, असे आवाहन महाविकास आघाडीतील घटक पक्षाच्या महिला पदाधिकाऱ्यांनी केले आहे.  यावेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना प्रश्न विचारले असून या प्रश्नांची उत्तरे देण्याची मागणीही केली आहे.

पुणे लोकसभा मतदार संघातील महाविकास आघाडी व इंडिया आघाडी काँग्रेस पक्षाचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांच्या प्रचारार्थ रविवारी काँग्रेस भवन येथे महाविकास आघाडी – इंडिया आघाडी महिला पदाधिकाऱ्यांची पत्रकार परिषद आयोजित केली होती. या पत्रकार परिषदेस काँग्रेसच्या माजी आमदार दीप्ती चवधरी, माजी महापौर कमल व्यवहारे,  रजनी त्रिभुवन, महापालिकेच्या‌ स्थायी समितीच्या माजी अध्यक्षा अश्विनी कदम, नीता रजपूत,  राष्ट्रवादी काँग्रेस‌ शरदचंद्र पवार पक्षाच्या महिला शहराध्यक्षा मृणाल वाणी, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे महिला शहरप्रमुख पल्लवी जावळे, काँग्रेस शहराध्यक्ष अरविंद शिंदे , निवडणूक प्रचारप्रमुख माजी आमदार मोहन जोशी , राज्य प्रवक्ते गोपाळ तिवारी आदी उपस्थित होते.

दिप्ती चवधरी म्हणाल्या, पुण्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी येत आहेत. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मुरू यांना भारताच्या‌ नवीन संसद भवनाच्या उद्घाटन कार्यक्रमापासून दूर का ठेवले, त्यांनी आदिवासी महिलेला का डावलले याचे उत्तर मोदी यांनी सभेत द्यावे.

कमल व्यवहारे म्हणाल्या, पंतप्रधान मोदी हे  छत्रपती शिवाजी महाराज, शाहू महाराज, महात्मा  फुले आणि डॉ. बाबसाहेब आंबेडकर यांच्या पदस्पर्षाने पावन झालेल्या पुण्यात येत आहेत. त्यंनी महिलांच्या‌ ३३ टक्के आरक्षणाची अंमलबजावणी का केली नाही ? याचे उत्तर द्यावे. गेली दहा वर्षे लोकसभेत हे बील पडून आहे. जनगणना केल्याशिवाय आरक्षण देवू शकत नाही, हे माहिती असतानाही महिलांची मते मिळवण्यासाठी हे आरक्षण आणले. मात्र, त्याची अंमलबजावणी केली नाही. आरक्षण आता लागू केले असते तर महाराष्ट्रातून १६ महिला लोकसभेत गेल्या असत्या. ‘बेटी पढावो ,बेटी बचाओ’ अशी केवळ घोषणा केली, अंमलबजावणी नाही.

पल्लवी जावळे म्हणाल्या, महिला कुस्तीपटूवर अत्याचार करणाऱ्या ब्रिजभूषण सिंग यांच्यावर गुन्हा दाखल करण्या‌‌स टाळाटाळ केली. जेव्हापासून मोदी सरकार आले आहे, तेव्हापासून महिलांवर अन्याय अत्याचार वाढले आहेत. ब्रिजभूषणसिंग‌ यांच्या अत्याचाराबाबत भाजपच्या एकाही महिला नेत्याने तोंड उघडले नाही. ब्रिजभूषणसिंग‌ यांना भाजपने पाठीशी का घातले, याचे उत्तर मोदींनी पुण्याच्या सभेत द्यावे. भाजपच्या जाहीरनाम्यात महिलांच्या सुरक्षेसंबंधी काय उल्लेख आहे, हेही सांगावे.

अश्विनी कदम म्हणाल्या, उन्नाव आणि हाथरस येथील पिडीतांवर अन्याय करणाऱ्यांना भाजप नेते पाठीशी घालतात. तक्रार करणाऱ्या पिडीतेला पोलिस हाकलून देतात. पिडीतेच्या‌ गाडीला ट्रक धडक देते, लैगिक अत्याचारानंतर पिडीतेचा मृत्यू झाल्यानंतरही पोलिस‌ परस्पर अत्यसंस्कार करतात. पंतप्रधानांच्या‌ मुलीसोबत हे घडले असते तर त्यांनी काय‌ केलं असते ? याचे उत्तर द्यावे. तसेच पंतप्रधानांनी देशातील महिलांची माफी मागावी.

मृणाल वाणी म्हणाल्या, मणिपूरचा जो हिंसाचार झाला. तेथील अत्याचाराची माहिती तीन महिन्यानंतर पत्रकारांना कळते, मात्र पंतप्रधानांना माहिती होत नाही. मणिपूरच्या घटनांवर मोदी‌ काहीच बोलत नाहीत, हे दुदैवी आहे. पंतप्रधान संपूर्ण जग फिरतात. मात्र, त्यांना मणिपूरला जायला वेळ मिळत नाही. याबाबत पंतप्रधानांनी सभेत बोलावे. देशातील महिला या निवडणुकीत आपली ताकद दाखवून देतील, असेही‌ वाणी म्हणाल्या.

रजनी त्रिभुवन म्हणाल्या, कुठे नेवून ठेवलाय माझा महाराष्ट्र , हे पंतप्रधानांनी सभेत सांगावे. महागाई वाढली  आहे. महिलांना महागाईमुळे घर चालवणे अवघड आले आहे. काँग्रेसच्या राजवटीत आंदोलन करणारी स्मृती इराणी कुठे आहे, त्यांना आता महागाई दिसत नाही का ? मला‌ जर संधी मिळाली तर मी व्यासपीठावर जावून मोदींना महागाई बद्दल प्रश्न विचारेन.

निता रजपूत म्हणाल्या, पंतप्रधान येणार, जातीवर बोलणार, हिंमत असेल तर त्यांनी आमच्या प्रश्नांची उत्तरे द्यावीत. मंगळसूत्र हे एकमेकांना बांधण्याचे साधन आहे, हेच मंगळसूत्र ते वेगळे करण्याची भाषा करत आहेत. ज्यांनी  आपल्या पत्नीला वाऱ्यावर सोडले आणि आता ते मंगळसूत्रावर बोलत आहेत. अनेक महिलांनी आपली मंगळसूत्रे देशाच्या‌ स्वातंत्र्यासाठी दिली. मंगळसूत्राचे पावित्र्य पंतप्रधान मोदी यांना माहिती आहे का ? याचे उत्तर द्यावे. बायकोची‌ जबाबदारी घेत नाहीत, आणि ते आता परिवार या विषयावर बोलत आहेत. त्यांनी मंगळसूत्र, परिवार व गॅरंटी यावर बोलू नये.

अध्यक्ष अरविंद शिंदे यांनी सर्वांचे स्वागत केले. राज्य प्रवक्ते गोपाळ तिवारी यांनी प्रस्तावना केली.

मुळशी धरणातून पाण्यासाठी केंद्र सरकारकडे पाठपुरावा करणार:मुरलीधर मोहोळ

पुणे:पुण्याच्या वाढत्या लोकसंख्येची तहान भागविण्यासाठी स्वतंत्र धरणे बांधणे सध्या अशक्य आहे. त्यामुळे मुळशीतून पुण्यासाठी पाच टीएमसी पाणी मिळावे यासाठी केंद्र शासनाकडे पाठपुरावा करणार असल्याचे आश्वासन पुणे लोकसभा मतदारसंघातील भाजप महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांनी दिले.

वडगावशेरी विधानसभा मतदारसंघात मोहोळ यांच्या प्रचार फेरीचे आयोजन करण्यात आले होते. आमदार सुनील टिंगरे, माजी आमदार जगदीश मुळीक, बापूसाहेब पठारे, माजी नगरसेवक योगेश मुळीक, डॉ. सिद्धार्थ धेंडे यांची प्रमुख उपस्थिती होती.

मोहोळ म्हणाले, ‘मी महापौर असताना 22 सप्टेंबर 2021 रोजी महापालिकेच्या सर्वसाधारण सभेची मान्यता घेऊन याबाबतचा प्रस्ताव राज्य शासनाकडे पाठविला आहे. हे धरण टाटा कंपनीचे आहे. कंपनीकडून पाणी मिळविण्यासाठी प्रसंगी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्र सरकारकडे पाठपुरावा करू.’

मोहोळ पुढे म्हणाले, ‘ समान पाणीपुरवठा योजनेची अंमलबजावणी करण्याचा दिलेला शब्द आम्ही पाळला आहे. या योजनेतील 82 पैकी 51 टाक्यांचे काम पूर्ण झाले असून, 20 टाक्यांचा वापर सुरू झाला आहे. बाराशेपैकी 921 किलोमीटरच्या जलवाहिन्या टाकण्यात आल्या असून,वितरण वाहिन्यांचे काम 80 टक्के पूर्ण झाले आहे. पन्नास टक्क्यांहून अधिक पाण्याचे मीटर्स बसविण्यात आले आहेत. या योजनेमुळे पाण्याची गळती कमी होणार असून, पुणेकरांना शुद्ध, पुरेसा आणि चोवीस तास पाणीपुरवठा होऊ शकेल असा विश्वास वाटतो.’

मोहोळ पुढे म्हणाले, ‘नगर रस्ता, येरवडा, लोहगाव, धानोरी, कल्याणीनगर, वडगावशेरी, खराडी, संगमवाडी या परिसरातील पाणीटंचाई दूर करण्याच्या दृष्टीने भामा-आसखेड धरणातून पाणीपुरवठा योजना पूर्ण करण्यात आली. या धरणातून 2.8 टीएमसी पाणी उपलब्ध होत आहे. 2041 च्या लोकसंख्येचा विचार करून या प्रकल्पाची आखणी करण्यात आली आहे.’

29 व 30 एप्रिल रोजी महाराष्ट्रात PM नरेंद्र मोदींच्या 6 सभांचे आयोजन

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या झंझावती सभांनी महाराष्ट्र ढवळून निघणार
भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांची माहिती

मुंबई:लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यात महायुतीच्या उमेदवारांसाठी राज्यात येत्या दोन दिवसांत 29 व 30 एप्रिल रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सहा सभा होणार आहेत, अशी माहिती भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी रविवारी दिली. श्री.मोदी यांच्या सोमवारी आणि मंगळवारी प्रत्येकी तीन सभा होणार आहेत. महायुतीच्या उमेदवाराच्या प्रचारासाठी सोमवारी सोलापूर,कराड आणि पुणे येथे तर मंगळवारी माळशिरस, धाराशिव आणि लातूर येथे प्रचारसभा होणार आहेत.
श्री.बावनकुळे यांनी प्रसिद्धी पत्रकात पंतप्रधान मोदी यांच्या राज्यातील दोन दिवसांतील सभांच्या कार्यक्रमाची माहिती दिली आहे. सोलापूर लोकसभा मतदारसंघातील भाजपा- महायुतीचे उमेदवार राम सातपुते यांच्या प्रचारासाठी दुपारी दीड वाजता होम मैदान येथे, कराड येथे उदयनराजे भोसले यांच्या प्रचारार्थ होणारी सभा दुपारी 3:45 वाजता, पुणे येथील सभा संध्याकाळी 5:45 वाजता हडपसर येथे रेसकोर्स मैदानावर होणार आहे. ही सभा पुण्याचे महायुती उमेदवार मुरलीधर मोहोळ, मावळ चे श्रीरंग बारणे, बारामतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार आणि शिरुरचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या प्रचारार्थ होणार आहे.
30 एप्रिल मंगळवारी दुपारी 11:45 ला माढा मधील महायुतीचे उमेदवार रणजित सिंह नाईक निंबाळकर यांच्या प्रचारासाठी माळशिरस येथे,दुपारी दीड वाजता धाराशिव येथे महायुतीच्या उमेदवार राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या अर्चना पाटील यांच्यासाठी, तर दुपारी 3 वाजता लातूर येथे भाजपाचे सुधाकर शृंगारे यांच्यासाठी सभा होणार आहे, असे श्री बावनकुळे यांनी पत्रकात म्हटले आहे.
भारतीय जनता पार्टी तसेच महायुतीतील सर्व घटक पक्षांकडून पंतप्रधान मोदी यांच्या सभांची जय्यत तयारी चालू आहे. या सभांच्या आयोजनाची जबाबदारी पुढील नेत्यांवर सोपविण्यात आली आहे . सोलापूर – आ.सचिन कल्याणशेट्टी, नरेंद्र काळे,कराड – धैर्यशील कदम, विक्रम पावसकर, पुणे – राजेश पांडे, जयंत येरवडेकर, धीरज घाटे, माळशिरस – आ .जयकुमार गोरे, प्रशांत परिचारक, धाराशिव – आ .राणाजगजितसिंह पाटील, आ. अभिमन्यू पवार, लातूर – आ.संभाजी पाटील निलंगेकर, आ.रमेश कराड, अरविंद निलंगेकर, अशी माहितीही श्री. बावनकुळे यांनी दिली आहे.

मोदींच्या ‘त्सुनामी’ पुढे विरोधकांची धूळधाण – प्रशांत ठाकूर

करंजाडेचा पाणी प्रश्न सप्टेंबर पू्र्वी सुटणार – आमदार बालदी

सांगण्यासारखे एकही काम नसल्यामुळे विरोधकांकडून टीका – खासदार बारणे

उरण, दि. 28 एप्रिल – आशावाद ते विश्वास आणि आता विश्वास ते गॅरंटी अशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची गेल्या दहा वर्षातील कारकीर्द आहे. त्यामुळे यावेळी देशात मोदींची लाट नाही तर त्सुनामी आहे. त्यापुढे विरोधकांची पुरती धूळधाण उडाली आहे, अशी टिप्पणी पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर यांनी काल (शनिवारी) रात्री केली.

मावळ लोकसभा मतदारसंघातील शिवसेना- भाजप-राष्ट्रवादी- मनसे- आरपीआय- रासप- मित्रपक्ष महायुतीचे उमेदवार खासदार श्रीरंग बारणे यांच्या प्रचारासाठी उरण तालुक्यातील करंजाडे येथे आयोजित करण्यात आलेल्या जाहीर सभेत ते बोलत होते. व्यासपीठावर खासदार बारणे, उरणचे आमदार महेश बालदी, दिवंगत जेष्ठ नेते दि. बा. पाटील यांचे पुत्र अतुल पाटील, भाजपचे जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी, शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख अतुल भगत, शिवसेना तालुकाप्रमुख महेंद्र पाटील, भाजपाच उरण तालुका अध्यक्ष रवी भोईर, पनवेल तालुकाध्यक्ष अरुण भगत, करंजळेचे सरपंच मंगेश शेलार तसेच महायुतीच्या घटक पक्षांचे पदाधिकारी उपस्थित होते.

आमदार ठाकूर म्हणाले की, केंद्रातील मोदी सरकार व राज्यातील महायुती सरकार यांनी उरण पनवेल भागातील विकास कामांना खऱ्या अर्थाने गती दिली. विकासाचा हा वेग कायम ठेवण्यासाठी महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणे यांना विक्रमी मताधिक्याने निवडून द्यावे. बारणे यांना दिलेले मत हे पंतप्रधान मोदी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अजित पवार यांना असणार आहे.

खासदार बारणे म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जगात भारताची मान उंचावली. देशाच्या सीमा सुरक्षित केल्या. जातीय दंगली झाल्या नाहीत. राम मंदिर, जम्मू-काश्मीर सारखे किचकट प्रश्न रक्ताचा थेंबही न सांडवता सोडवले. स्वातंत्र्यानंतर 70 वर्षात झाली नसतील, तेवढी विकास कामे मागील दहा वर्षात झाली आहेत. त्यामुळे मोदींवर जनतेचा प्रचंड विश्वास असून मोदी हेच पुन्हा पंतप्रधान व्हावेत, अशी जनतेची भावना आहे. आठ पदरी जेएनपीटी रोड, अटल सेतू, नवीन आंतरराष्ट्रीय विमानतळ यासारख्या प्रकल्पांनी उरण परिसराचा कायापालट झाला आहे. विरोधी उमेदवाराकडे दाखवण्यासारखे एकही काम नसल्यामुळे ते फक्त टीका करीत आहेत, असा आरोपही बारणे यांनी केला.

आमदार बालदी यांनी मतदारसंघात झालेल्या विविध विकासकामांचा आढावा सादर केला. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना त्यांना कोणतेही प्रश्न सोडवण्यात रस नव्हता, अशी टीकाही त्यांनी केली. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यानंतर खऱ्या अर्थाने विकास कामांना गती मिळाली आहे. विकासाची ही गती कायम ठेवण्यासाठी मतदारांनी महायुतीला साथ द्यावी, असे आवाहन त्यांनी केले. करंजाडे येथील पाण्याचा प्रश्न सप्टेंबर महिन्यापर्यंत सुटलेला असेल अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली.

दिवंगत ज्येष्ठ नेते दि. बा. पाटील यांना मानणारे प्रत्येक मत खासदार बारणे यांनाच मिळेल, असा विश्वास अतुल पाटील यांनी व्यक्त केला.

अविनाश कोळी यांचेही यावेळी भाषण झाले. समीर केणी यांनी आभार मानले. नीतेश पंडित यांनी सूत्रसंचालन केले.

14 बालकांची विक्री करणाऱ्या एका डॉक्टरसह 7 जणांना अटक

मुंबई-हॉस्पिटलमध्ये असलेल्या लहान बालकांची विक्री करणाऱ्या टोळीचा मुंबई पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. या टोळीत एका डॉक्टरचा देखील समावेश आहे. फर्टिलिटी केंद्रांत काम करणाऱ्या महिलांच्या मदतीने रॅकेट चालवलं जात असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. या टोळीने आतापर्यंत 14 बालकांची विक्री केल्याचे तपासात उघड झाल्याने मुंबईमध्ये एकच खळबळ उडाली आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, बालकांची विक्री करणाऱ्या महिला दलालासह एकूण 7 आरोपींच्या मुसक्या पोलिसांनी आवळल्या. तर तिघांची सखोल चौकशी केली जात आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये वंदना अमित पवार, शितल गणेश वारे, स्नेहा सूर्यवंशी, नसीमा खान, लता सुरवाडे, शरद देवर आणि डॉ. संजय सोपानराव खंदारे यांचा समावेश असल्याची माहिती पोलिसांनी दिली.बालकांची विक्री करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश केल्यानंतर संशयित आरोपींना न्यायालयासमोर हजर करण्यात आले. त्यांना सात दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली. दुसरे म्हणजे आरोपींकडून आतापर्यंत लहान बाळांमध्ये 11 मुले आहेत, तर तीन मुली अशा एकूण 14 जणांची विक्री करण्यात आलेली आहे. पोलिस उपायुक्त रागासुधा आर. यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की, सदर आरोपींमध्ये एका बीएचएमएस डॉक्टरला देखील बेड्या ठोकल्या आहेत. तर फर्टिलिटी केंद्रामध्ये काम करणाऱ्या महिलांच्या मदतीने रॅकेट चालवलं जात असल्याचेही अधिकाऱ्यांनी सांगितले.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आतापर्यंत 14 लहान बाळांची विक्री झाल्याचं समोर आलं असून 2 बाळांची सुखरुप सुटका करण्यात मुंबई पोलिसांना यश आलं आहे. अटकेतील आरोपी मुंबईमधील काही हॉस्पिटलमध्ये काम करत आहेत. बालक विक्री प्रकरणात काही हॉस्पिटल देखील मुंबई पोलिसांच्या रडारवर आहेत.

आरोपीमध्ये डॉ. संजय सोपानराव खंदारेचं दिव्यामध्ये दवाखाना आहे. मुळचा नांदेडचा रहिवासी असणारा हा डॉक्टर या रॅकेटमध्ये सहभागी असल्याचे समोर आलं आहे. पोलिस उपायुक्त रागासुधा आर. म्हणाले की, कदाचित या डॉक्टरकडे लहान मुलांचे हे पालक गेले असावेत. तिथं त्यांचा संपर्क झाला असावा असा आमचा संशय आहे. तेलंगणा आणि हैदराबादमधून खास करून बाळांच्या खरेदीची डिमांड असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे.

शंकर जगताप यांना बहुजन मित्र पुरस्कार प्रदान

बहुजन संघर्ष प्रतिष्ठानच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती महोत्सव साजरा

पिंपरी पुणे (दि. २८ एप्रिल २०२४) – वाल्हेकरवाडी येथील बहुजन संघर्ष प्रतिष्ठानच्या वतीने भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त विविध कार्यक्रम आयोजित शनिवार (२७ एप्रिल) करण्यात आले होते. यावेळी पिंपरी चिंचवड भारतीय जनता पक्षाचे शहराध्यक्ष शंकर जगताप यांना बहुजन मित्र पुरस्कार तर सुर्योदय ऊर्फ बाबू शेट्टी यांना विशेष पुरस्कार बहुजन संघर्ष प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष मनोज तोरडमल यांच्या हस्ते देऊन गौरविण्यात आले.
यावेळी इंडियन आयडॉल सोनी टीव्ही, सुर नवा ध्यास नवा, कलर्स मराठी फेम गायक रॉकस्टार संतोष जोंधळे यांच्या भीम गीतांचा कार्यक्रम आयोजित केला होता. फॉरेनला धनी गेला ग बाय, तिथं जन्मले भिमराव सखे बाई गं, कभी झुकेगा नही साला, नको मला दाग दागिना, राजा राणीच्या जोडीला, भीम का बच्चा, भीम राज की बेटी या गाण्याला उपस्थितांना उस्फुर्त दाद दिली.
यावेळी माजी उपमहापौर सचिन चिंचवडे, शेखर चिंचवडे, आदेश नवले, पल्लवी वाल्हेकर, बिभीषण चौधरी, पल्लवी मरकड, सोमनाथ भोंडवे, नितीन गवळी, मधुकर बच्चे, राजू दुर्गे आदी उपस्थित होते. मनोज तोरडमल यांच्या मार्गदर्शनाखाली प्रतिष्ठानचे उपाध्यक्ष शेषराव लोमटे, सचिव बुद्धी सागर आठवले, खजिनदार दादा गणगे, कार्याध्यक्ष श्रीकांत वाघमारे, याचबरोबर उत्तरेश्वर पालके, अमोल डंबाळे, बालाजी पतंगे, अंकुश तेलंग, दीपक तोरडमल, राहुल जगताप, गौतम गायकवाड, अनंत मस्के, कचरू पालके, स्वप्नील बनसोडे, महावीर जगताप, युवराज जगताप, सुधाकर सरेकर, बालाजी कांबळे, कल्याण शिंदे, एकनाथ भोकरे, केशव कटारे, श्रीनिवास सोनवणे, लहू मस्के, अरुण शिंदे, पोपट चौरे, पिनू गिरमे, अमोल वाघमारे, जाहीर जगताप, सुरेश साठे, प्रशांत जगताप यांनी कार्यक्रमाचे संयोजन केले.

जिजाऊंनी पुण्यात सोन्याचा नांगर फिरवून रयतेमध्ये विश्वास निर्माण केला – हपभ शिरीष महाराज मोरे

गांधी पेठ तालीम मित्र मंडळाच्या जिजाऊ व्याख्यानमालेचे चौथे पुष्प

पिंपरी, पुणे (दि. २८ एप्रिल २०२४) छत्रपती शिवाजी महाराज नऊ वर्षांचे असताना त्यांच्या हस्ते जिजाऊंनी पुण्यात सोन्याचा नांगर फिरवून रयतेमध्ये पुणे वसवण्यासाठी विश्वास निर्माण केला. ही घटना म्हणजे मोगलांच्या राजवटीतून रयतेला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी रचलेला पाया आहे. छत्रपती शिवाजी महाराज हे स्वराष्ट्र निर्मितीचा ध्यास घेतलेले, प्रखर राष्ट्रवाद जोपासणारे, सृजनशील व्यक्तिमत्व होते असे हभप शिरीष महाराज मोरे म्हणाले.
चिंचवड गावातील गांधी पेठ तालीम मित्र मंडळाच्या वतीने आयोजित केलेल्या व्याख्यानमालेत चौथे पुष्प गुंफताना मोरे बोलत होते. जिजाऊ व्याख्यानमालेचे हे ३४ वे वर्ष आहे. यावेळी उद्योजक एस. बी. पाटील, श्रीकृष्ण कुलकर्णी, माजी नगरसेवक वसंत शेवडे, तसेच राम साखरे, राजू शिवतरे, संजय कलाटे, संतोष माचूत्रे, नवनाथ तरडे, संस्थेचे अध्यक्ष राजाभाऊ गोलांडे, व्याख्यानमालेचे समन्वयक सुहास पोफळे, गणेशोत्सव समिती अध्यक्ष विपुल नेवाळे, सदस्य महेश गावडे, धीरज गुत्ते, जगदीश घुले, प्रवीण भोकरे, संदीप जंगम आदी उपस्थित होते.
मोरे यांनी सांगितले की, छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्यकाला पूर्वी मुघलांचे आक्रमण सुरू होते. यावेळी समाज व समाजाचे नेतृत्व असुरक्षित होते. मंदिरांवर आक्रमणे होत होती. पंढरपूर, काशी, सोरटी सोमनाथ येथील मंदिरांवर आक्रमण करून मूर्तीची विटंबना केली जात होती. आया, बहिणींना पळवून नेऊन गुलाम केले जात होते. निरपराध नागरिकांची हत्या केली जात होती. ही लूट व अन्याय ५०० वर्ष सुरू होते. हे सर्व धर्मांतरासाठी केले जात होते. राजमाता जिजाऊंनी अत्याचार, अन्याय आणि अधर्माचा नाश करण्यासाठी धर्माची राजवट उभारण्याचे स्वप्न पाहिले. छत्रपती शिवाजी महाराजांनी देव, देश आणि धर्म तसेच रयतेच्या रक्षणासाठी स्वराज्याची स्थापना केली. त्यांनी प्रथमच अष्टप्रधान मंडळाची स्थापना केली. शेतकऱ्यांना व रयतेला सोबत घेऊन कृषी क्रांती, सैनिक क्रांती, आर्थिक क्रांती, धर्म आणि सांस्कृतिक क्रांती करीत शेतकरी व रयतेच्या हिताचे निर्णय घेऊन अंमलबजावणी केली. स्वराज्यात शेतकऱ्यांना बी बियाणे, यंत्र, अवजारे मोफत दिली जात होती. शून्य टक्के व्याजाने शेतकऱ्यांना कर्ज, शेतसारा मध्ये मध्ये सवलत देऊन दोन वेळचे भोजन देखील मोफत दिले जायचे. शेतकऱ्यांच्या हिताला प्राधान्य दिले. शेती उत्पन्न वाढीसाठी प्रोत्साहन दिले. कास्तकरी, बलुतेदारांना, अलुतेदारांना कृषीक्रांती नंतर अर्थक्रांतीसाठी मदत करून प्रोत्साहन दिले. कृषीक्रांती बरोबरच सैन्यक्रांती ही केली. नंतर अर्थक्रांती केली. रयतेच्या मनामध्ये प्रखर राष्ट्रवाद निर्माण करणारे छत्रपती शिवाजी महाराजांचे व्यक्तिमत्व होते. स्वभाषेचा त्यांनी पुरस्कार केला. राजमुद्रेवर, चलनी नाण्यांवर सर्वात प्रथम देवनागरी लिपी आणि संस्कृत भाषेचा वापर केला. रघुनाथ पंतांना सांगून संस्कृत भाषेतील पहिला शब्दकोश तयार केला असेही हभप शिरीष महाराज मोरे यांनी सांगितले.
स्वागत महेश गावडे आणि आभार सुहास पोफळे यांनी मानले.