Home Blog Page 1070

निवडणूक प्रचारात कोल्हे आढळराव आमनेसामने

हरिमान सप्ताहात आढळरावांनी ऐकलं डॉ. कोल्हेंच संपुर्ण भाषण

महाराष्ट्राचा स्वाभिमान डोळ्यासमोर ठेऊन मतदान करण्याचे डॉ. कोल्हे यांचे आवाहन

वाडा/राजगुरूनगर : लोकसभा निवडणुकीचा प्रचार रंगात यायला सुरुवात झाली आहे. त्यातच आज शिरुर लोकसभेतील डॉ.अमोल कोल्हे आणि शिवाजीराव आढळराव पाटील हे दोन्ही प्रतिस्पर्धी उमेदवार आमनेसामने आले. त्यावेळी डॉ. कोल्हे यांनी आढळराव पाटलांच्या पाया पडून नमस्कार केला. निवडणुका येतात-जातात, पद येतात जातात, पण माणूस टिकला पाहिजे. त्यासाठी वाचा शुद्धी, वर्तन शुद्धी आणि हेतू शुद्धी आवश्यक असल्याच सांगत, महाराष्ट्राचा स्वाभिमान डोळ्यासमोर ठेऊन मतदान करा, अस आवाहन डॉ. कोल्हे यांनी केलं. एरवी वैयक्तिक टीका करणाऱ्या आढळरांवांनी आज मात्र, डॉ. कोल्हे यांचं संपूर्ण भाषण ऐकलं.

महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार खासदार डॉ. अमोल कोल्हे आज राजगुरूनगर तालुक्यातील प्रचार दौऱ्यावर होते. यावेळी अमोल पवार, अशोक खांडेभराड, बाबाजी काळे, आबा धनवटे, अतुल देशमुख, सुधीर मुंगसे, निलेश कड, मयूर दौंडकर, राजमाला बुट्टे पाटील, सोमनाथ मुंगसे, सुधीर भोमाळे, संजय घनवट,

वाडा गावात सुरु असलेल्या हरिनाम सप्ताहात डॉ. कोल्हे आणि आढळराव आमनेसामने आले. डॉ. कोल्हे ज्यावेळी सप्ताहात पोहोचले तेव्हा, आढळराव पाटील भाषण करत होते. त्यांचं भाषण संपताच कोल्हेंनी पाया पडून त्यांना नमस्कार करत संवाद साधला.

त्यानंतर आपल्या भाषणात डॉ. कोल्हे म्हणाले की, वाचा शुद्धी, वर्तन शुद्धी आणि हेतू शुद्धी महत्वाची आहे. निवडणुका येतात जातात, पद येतात जातात, पण त्यातला माणूस टिकला पाहिजे. हीच भगवंतांची शिकवण आहे. संतांनी प्रत्येकाला आत्मभान दिल.

महाराष्ट्राचा स्वाभिमान समोर ठेऊन मतदान करा, अस आवाहन करताना डॉ. कोल्हे म्हणाले की, देश पुढची पाच वर्षे कोणाच्या हातात राहणार आहे, हे ठरवणारी ही निवडणूक आहे. २०१४ ला गॅस सिलेंडरची किंमत ४५० रुपये होती, त्यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सांगितलं होतं गॅस सिलेंडरला पाया पडा आणि मग मतदानाला जा. आज गॅस सिलेंडरचे भाव हजाराच्या पुढे गेलेत. त्यामुळे तीन वेळा पाया पडा, मग विचार करुन मतदान करा.
जेव्हा देश टिकतो तेव्हा धर्म टिकतो, आणि देहाकडून देवाकडे जाण्याचा मार्ग जो आहे त्याच्या मध्ये देश लागतो त्यामुळे देशाच्या भवितव्यासाठी मतदान करा, अस आवाहन ही डॉ. कोल्हे यांनी केलं.

एरवी प्रचारादरम्यान, वैयक्तिक टीका करणाऱ्या आढळराव पाटलांनी आज मात्र, डॉ. कोल्हेंच संपूर्ण भाषण ऐकलं. भाषण संपल्यावर आढळराव पाटील लगेच आपल्या पुढच्या दौऱ्याला रवाना झाले. तर डॉ. कोल्हे यांनी सप्ताहाच्या महाप्रसादात पंगत वाढली.

शिरूर लोकसभा निवडणूकीसाठी ३२ उमेदवार रिंगणात

शिरूरचे निवडणूक अधिकारी अजय मोरे यांच्या उपस्थितीत उमेदवारांना निवडणूक चिन्हांचे वाटप

पुणे,दि. २९ : भारत निवडणूक आयोगाच्या निवडणूक कार्यक्रमानुसार शिरूर लोकसभा मतदारसंघासाठी अर्ज माघारी घेण्याच्या अंतिम मुदतीनंतर नामनिर्देशन पत्र वैध ठरलेल्या ३५ उमेदवारांपैकी ३ उमेदवारांनी नामनिर्देशन पत्र मागे घेतल्याने शिरूर लोकसभेसाठी ३२ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. आज अंतिम करण्यात आलेल्या यादीनुसार उमेदवारांना निवडणूक निर्णय अधिकारी अजय मोरे यांच्या उपस्थितीत निवडणूक चिन्हांचे वाटप करण्यात आले.

यावेळी निवडणूक निरीक्षक कुमार सौरभ राज, सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी रेवणनाथ लबडे आदी उपस्थित होते. चिन्ह वाटपानंतर श्री. मोरे यांनी उमेदवारांना निवडणूक नियमांची माहिती दिली. निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सुचनांनुसार उमेदवारांना ९५ लाख खर्च करण्याची मर्यादा आहे. उमेदवारांकडून खर्च मर्यादेचे उल्लंघन होता कामा नये. नामनिर्देशन पत्र दाखल केल्यापासून खर्च गणना केली जाईल. उमेदवारांनी आदर्श आचारसंहितेचे पालन करावे. वाहने, सभा, रॅली, मिरवणूकीसाठी पूर्व परवानगी आवश्यक आहे.

प्रचार कालवधीमध्ये केवळ रुपये १० हजारापर्यंतचा खर्च रोखीने करता येईल, १० हजारांवरील खर्च धनादेशाद्वारे करता येईल, निवडणूक यंत्रणेमार्फत भरारी पथके स्थिर सर्वक्षण पथके तसेच व्हिडीओ संनियंत्रण पथकाद्वारे नियंत्रण ठेवण्यात येईल. शिरूर लोकसभा मतदारसंघात एकूण २ हजार ५०९ मतदान केंद्र आहेत. उमेदवारांनी प्रत्येक मतदान केंद्रावर दोन मतदान प्रतिनिधी नियुक्त करावेत, अशा सूचना श्री.मोरे यांनी केल्या.

उमेदवारांसाठी निवडणूक प्रचाराची वेळ सकाळी ६ ते रात्री १० वाजेपर्यंतची असेल. दोन धर्मात समाजात तेढ निमार्ण होईल असा प्रचार करू नका किंवा देव देवतांचा, धार्मिक चिन्हाचा प्रचारात वापर करू नये. मतदानापूर्वी ४८ तास प्रचार थांबविण्यात यावा. आचार संहितेचा भंग होत असल्याचे निदर्शनास आल्यास निवडणूक कार्यालयाकडे तक्रार करावी. मतदानाच्या दिवशी सकाळी साडे पाच वाजता मतदान प्रतिनिधी मतदान केंद्रावर उपस्थित राहणे आवशक आहे. मतदानाच्या दिवशी सकाळी साडे पाच वाजता मॉक पोल घेतले जाईल.

मतदानाच्या दिवशी मतदान केंद्रापासून २०० मीटर अंतरावर उमेदवारांनी त्यांचा बुथ लावणे आवश्यक आहे. बुथ लावण्यासाठी संबंधित ग्रामपंचायत, नगरपालिकेकडून उमेदवारांनी परवानगी घ्यावी, अशा सूचना देवून लोकसभा निवडणूक पारदर्शकपणे पार पाडण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे, असे आवाहनही श्री.मोरे यांनी केले.

पुणे लोकसभेसाठी ३५ उमेदवार रिंगणात

डॉ.सुहास दिवसे यांच्या उपस्थितीत उमेदवारांना निवडणूक चिन्हांचे वाटप

पुणे,दि. २९ : भारत निवडणूक आयोगाच्या निवडणूक कार्यक्रमानुसार पुणे लोकसभा मतदारसंघासाठी अर्ज माघारी घेण्याच्या अंतिम मुदतीनंतर नामनिर्देशन पत्र वैध ठरलेल्या ४२ पैकी ७ उमेदवारांनी नामनिर्देशन पत्र मागे घेतल्याने पुणे लोकसभेसाठी ३५ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. आज अंतिम करण्यात आलेल्या यादीनुसार उमेदवारांना निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. सुहास दिवसे यांच्या उपस्थितीत निवडणूक चिन्हांचे वाटप करण्यात आले.

यावेळी निवडणूक निरीक्षक प्रसाद लोलयेकर, सहायक निवडणूक निर्णय अधिकारी भाऊ गलांडे, समन्वयक अधिकारी प्रतिभा इंगळे, अनिल पवार, खर्च व्यवस्थापनाचे समन्वयक अधिकारी प्रकाश अहिरराव, खर्च प्रमुख महेश अवताडे उपस्थित होते.

डॉ.दिवसे यांनी निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सुचनांनुसार खर्चाचा दैनंदिन लेखा ठेवणे बंधनकारक असल्याचे यावेळी सांगितले. उमेदवारांना ९५ लाख रुपये इतक्या खर्चाची मर्यादा असून खर्च मर्यादेचे उल्लंघन करू नये. उमेदवारांनी आदर्श आचारसंहितेचे पालन करावे. वाहने, सभा, रॅली, मिरवणूकीसाठी पूर्व परवानगी आवश्यक आहे. निवडणूक यंत्रणेमार्फत भरारी पथके स्थिर सर्वक्षण पथके तसेच व्हिडीओ संनियंत्रण पथकाद्वारे नियंत्रण ठेवण्यात येईल,अशा सूचना यावेळी देण्यात आल्या. लोकसभा निवडणूक चांगल्या वातावरणामध्ये पारदर्शकपणे होण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे असे आवाहन डॉ.दिवसे यांनी उमेदवारांना केले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारताची उंच भरारी – श्रीरंग बारणे

बारणे यांच्या पनवेलमधील बाईक रॅली व कामोठेतील जाहीर सभेला प्रचंड प्रतिसाद

दक्षिण भारतीय मतदारांचाही बारणे यांना पाठिंबा

पनवेल, दि. 29 एप्रिल – मावळ लोकसभा मतदारसंघातील शिवसेना-भाजप-राष्ट्रवादी- मनसे- आरपीआय- रासप- मित्रपक्ष महायुतीचे उमेदवार खासदार श्रीरंग बारणे यांच्या प्रचारार्थ नवीन पनवेल, खारघर व कामोठे या परिसरात काढण्यात आलेल्या बाईक रॅलीला तसेच रात्री कामोठे येथे झालेल्या जाहीर प्रचार सभेत नागरिकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारताने उंच भरारी घेतली असल्यामुळे त्यांनाच पुन्हा पंतप्रधान करणे आवश्यक आहे, असे आवाहन बारणे यांनी यावेळी केले.

बाईक रॅलीमध्ये शेकडे तरुण महायुतीतील आपापल्या पक्षाचे झेंडे घेऊन सहभागी झाले होते. रॅलीमधील विजया रथावर खासदार बारणे, यांच्या आमदार प्रशांत ठाकूर, भाजपचे क्लस्टर प्रमुख बाळासाहेब पाटील, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख रामदास शेवाळे, भाजपचे जिल्हाध्यक्ष ‌अविनाश कोळी यांच्यासह महायुतीच्या घटक पक्षातील पदाधिकारी उपस्थित होते.

बाईक रॅलीला उत्स्फूर्त प्रतिसाद

चौका-चौकात फटाके वाजवून, पुष्पवृष्टीमध्ये सुवासिनींकडून औक्षण करण्यात येत होते. मोदींचा मुखवटा परिधान केलेल्या युवकही रॅलीत सहभागी झाले होते. रॅलीमध्ये रिक्षाचालकांचा सहभाग ही उल्लेखनीय होता. काही तरुण-तरुणींनी कोळी नृत्य सादर करीत बारणे यांचे जोरदार स्वप्न रस्त्याच्या दुतर्फा जमा झालेल्या जनसमुदायाला बारणे यांनी अभिवादन केले व मतदारांचे आशीर्वाद घेतले.

रॅलीची सांगता कामोठे येथे जाहीर प्रचार सभेने झाली. व्यासपीठावर खासदार बारणे, आमदार प्रशांत ठाकूर, भाजपाचे क्लस्टर प्रमुख बाळासाहेब पाटील, भाजपाचे जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख रामदास शेवाळे, तालुकाप्रमुख रुपेश ठोंबरे तसेच महायुतीच्या पदाधिकाऱ्यांबरोबर दिवंगत ज्येष्ठ नेते दि. बा. पाटील यांचे पुत्र अतुल पाटील हेही व्यासपीठावर उपस्थित होते.

बारणे यांनी वाचला विकास कामांचा पाढा

या सभेत खासदार बारणे यांनी गेल्या दहा वर्षांत केलेली विकास कामे, संसदेतील कामगिरी याची माहिती दिली. विरोधकांकडे प्रचारासाठी मुद्दे नाहीत, त्यांनी कोणतेही काम केलेले नाही. त्यामुळे केवळ आरोप प्रत्यारोप करण्यापलीकडे ते काहीही करत नाहीत, अशी टीका बारणे यांनी केली.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली घर कमी केल्या दहा वर्षात मोठी भरारी मारली आहे. भारत अगदी चंद्रावर जाऊन पोहोचला आहे. सर्वच क्षेत्रात भारताची कामगिरी उल्लेखनीय आहे, याकडे बारणे यांनी लक्ष वेधले. दुर्गम अशा आदिवासी वाड्या वस्त्यांवर वीजपुरवठा आणि रस्त्यांचे काम केल्याचेही बारणे यांनी सांगितले. नवी मुंबई- पनवेल येथे होत असलेल्या विमानतळाला दिवा पाटील यांचेच नाव देण्यात येईल याचा बारणे यांनी पुनरुच्चार केला.

दक्षिण भारतीयांचा पाठिंबा

कामोठे येथील सभेपूर्वी न्यू पनवेल ईस्ट भागात झालेल्या दक्षिण भारतीय समाज संमेलनात महायुतीचे उमेदवार खासदार श्रीरंग बारणे यांना एकमताने पाठिंबा जाहीर करण्यात आला. मेळाव्याचे आयोजन पनवेल महापालिकेचे माझी स्थायी समिती अध्यक्ष संतोष शेट्टी यांनी केले होते.‌ या कार्यक्रमाला शहरातील दक्षिण भारतीय नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.‌

ये मोदी अभी जिंदा है… और जब तक मोदी जिंदा है….

शरद पवारांचे नाव न घेत ‘भटकती आत्मा” म्हणत टीकास्त्र : इच्छा अपूर्ण राहिलेल्या अशा भटकणाऱ्या आत्म्यां पासून देशाला वाचविण्याची गरज

पुणे-पंतप्रधान मोदी यांची महायुती संकल्प सभामहाराष्ट्राने देशात अनेक वर्ष राजकीय स्थिरता दिली आहे. काही स्वप्न अधुरी राहिले की आत्मा भटकता राहतो. महाराष्ट्र हे भटक्या आत्म्याचा शिकार झालेला आहे. 45 वर्षांपूर्वी येथील एका नेत्याने या खेळाला सुरवात केली. तेव्हापासून राजकीय अस्थिरतेचा खेळ सुरू झाला. ते केवळ विरोधकांना अस्वस्थ करत नाही ही आत्मा कुटुंबाला देखील सोडत नाही, अशी टीका शरद पवार यांचे नाव न घेता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली.पुण्यातील रेस्कोर्स येथे पुणे, बारामती, शिरूर आणि मावळ लोकसभा मतदारसंघासाठी आयोजित जाहीर प्रचार सभेत ते बोलत होते. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे , उपमुख्यमंत्री अजित पवार,केंद्रीय मंत्री रामदास आठवले, मंत्री, चंद्रकांत पाटील, मनसे नेते अमित ठाकरे, सुनेत्रा पवार, मुरलीधर मोहोळ, शिवाजीराव आढळराव, श्रीरंग बारणे, रूपाली चाकणकर, खा.मेधा कुलकर्णी, डॉ नीलम गोऱ्हे, प्रकाश जावडेकर उपस्थित होते.या भूमीतून जनतेला संदेशकसे आहे पुणेकर असे म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, केसर रंग सर्वत्र दिसत आहे. मुले माझी वेगवेगळी चित्र घेऊन आली त्यांनी खाली बसावे. या भूमीने अनेक समाज सुधारक देशाला दिले आहे. आज ही भूमी जगाला संशोधक देत आहे. पुणे जेवढे प्राचीन आहे तेवढे भविष्यकडे वाटचाल करणारे आहे. पुणे तिथे काय उणे असे त्यामुळे म्हणतात. काँग्रेसने देशात 60 वर्ष राज्य केले पण त्यांनी अर्धी जनता जवळ मूलभूत सुविधा देण्याचा प्रयत्न केला नाही. पण आम्ही सहा वर्षात मूलभूत सुविधा पूर्ण केल्या पण त्यासोबत प्रत्येक वर्गाची आकांक्षा पूर्ण करण्याचा प्रयत्न केला आहे. विविध विकास प्रकल्प हे विकसित भारताचे स्वप्न आहे.सर्वाधिक पेटंट भारतीय युवकांच्या नावावरमोदी यांची गॅरंटी आहे देशाच्या पहिले बुलेट ट्रेन मध्ये तुम्ही प्रवास करताल. काँग्रेसने मनमोहन सिंग रिमोट कंट्रोल सरकार काळात दहा वर्षात जे पैसे मूलभूत गरजांवर खर्च केले ते आम्ही एक वर्षात करत आहे. स्टार्टअप इंडिया मध्ये युवकांनी सव्वा लाख स्टार्टअप बनवले आहे. त्यातील अनेक पुण्यात आहे. रीफॉर्म , ट्रान्सफॉर्म, परफॉर्म यावर भर दिला आहे. देश जगात आपली ताकद दाखवून देत आग हे. सर्वाधिक पेटंट आपले युवक नोंदणी करत आहे. दहा वर्षापूर्वी मोबाईल आयात करत होतो पण आता आपण जगात दुसऱ्या क्रमांकाचे निर्यातदार बनलो आहे.कॉंग्रेसचा देशातील संपत्तीवर डोळामेड इन इंडिया अंतर्गत विविध क्षेत्रात विकास संधी दिली जात आहे. संशोधन हब, सेमी कंडक्टर हब, हायड्रोजन हब यावर लक्ष्य केंद्रित केले जात आहे. मध्यमवर्गीय, गरीब यांना दिलासा देण्यासाठी वेगवेगळे प्रयत्न केले आहे. देशात लायसन राज्य पुन्हा हवे आहे का? सरकारला सवय झाले की, सामान्य कामात अडथळा आणणे. पण माझे स्वप्न की, २०४७ पर्यंत सर्व सरकारी कटकट बंद करणे. काँग्रेसच्या युवराजला विचारले की, गरिबी कशी हटणार ते सांगते खटाखट, खटाखट,खटाखट..विकास कसा ठकाठक ,ठकाठक,ठकाठक..विकसित भारत टकाटक,टकाटक,टकाटक..ते आता देशातील नागरिकांच्या संपत्तीवर लक्ष्य केंद्रित करत आहे. काँग्रेसने डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा सतत अपमान केला आहे. भाजपने संविधान दिवस सुरू केला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याशी निगडित स्थाने तीर्थेरुपात विकसित केले.देशाच्या प्रगतीची ही निवडणूक – CM शिंदेमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, राज्यात मोदी यांच्या सर्व सभा रेकॉर्ड ब्रेक होत आहे. नागरिक मोठ्या संख्येने त्यांच्यावर प्रेम करत आहे. कलम ३७० हटवून दाखवत जम्मू काश्मीर देशाशी जोडले. अयोध्येत राम मंदिर करून करोडे राम भक्तांचे स्वप्न पूर्ण केले. काँग्रेसने ६० वर्षात देश बुडवला पण मोदी यांनी देश हित पहिले. देश बुडवणारे कुठे आणि देशभक्त कुठे याचा विचार करावा. देशाचा सन्मान जगात वाढवणारे नरेंद्र मोदी आणि देशाची बदनामी करणारे राहुल गांधी यांच्यात ही लढाई आहे. विश्वासाचे नाव मोदी आहे. राज्यात पाच लाख कोटीची गुंतवणूक आलेली आहे. २०१४ पूर्वी दंगली, भ्रष्टाचार, घोटाळे होत होते परंतु आता ते होत नाही. देशाच्या प्रगतीची ही निवडणूक आहे.

मोदी म्हणाले, “केंद्र सरकारच्या नवीन धोरणाचा थेट परिणाम पुण्यासारख्या शहरातील महत्त्वाकांक्षी तरुणांवर होत आहे. मॅपिंगच्या क्षेत्रात तरुण आघाडीवर आहेत. अवकाश संशोधन, संरक्षण साहित्याचे उत्पादन, संशोधन विभाग, नावीन्यपूर्ण उद्योग अशा विविध क्षेत्रांत पुणे प्रगती करत आहे. पुण्यात बुद्धिमान तरुण आहेत, त्यामुळे केंद्राने नवनिर्मितीला चालना देण्यासाठी अर्थसंकल्पात एक लाख कोटी रुपयांची तरतूद केली आहे. या तरुणांना ती डोळे झाकून देण्याचा निर्णय घेतला आहे.”

पुणे हे वाहन उद्योगाचे प्रमुख केंद्र आहे. दहा वर्षांपूर्वी भारतात मोबाईल आयात करावे लागायचे. पण भारत आज जगातला दुसरा सर्वांत मोठा निर्यातदार देश आहे. पुण्यात उत्पादित झालेल्या ‘मेड इन इंडिया’ चिपवर जगातील गाड्या धावताना दिसतील. भारतात हायड्रोजन हब बनविण्याचा संकल्प आहे. सर्वसामान्य नागरिकांचा विचार करणारे हे आमचे सरकार आहे,” असेही त्यांनी स्पष्ट केले.

ज्येष्ठ नागरिकांना मिळणार मोफत उपचार

“केंद्रात काँग्रेसप्रणीत आघाडीचे सरकार असताना महागाई आणि भ्रष्टाचार असे दुहेरी कर जनतेला भरावे लागत होते,” अशा शब्दांत मोदी यांनी विरोधकांवर टीका केली. ते म्हणाले, “सत्तेत आल्यानंतर सर्वप्रथम आम्ही महागाई नियंत्रणात आणली. भ्रष्टाचारमुक्त सरकार दिले. आयकराची मर्यादा वाढविली. आता वयाची ७० वर्षे ओलांडलेल्या प्रत्येक भारतीय नागरिकाला मोफत उपचार मिळतील, ही ‘मोदींची गँरेटी’ आहे.”

राहुल गांधींवर टीका

काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यावर टीकास्त्र सोडताना मोदी म्हणाले, “शहेजाद्याला विचारले गरिबीचे कसे निर्मूलन होणार, त्यावर शहेजादे म्हणतात, ‘खटाखट’ आहे. युवराजला विचारले विकास कसा होतो, तर त्यावर ते म्हणतात, ‘खटाखट,टकाकट आहे.’ काँग्रेस परत ‘लायसन्स राज’ आणू पाहत आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.

गरिबांना सरकार उपलब्ध होईल

देशातील मध्यम वर्गाला उद्देशून मोदी म्हणाले, “मध्यम वर्गीयांच्या आयुष्यात सरकार ही एक कटकट असते. ती बंद झाली पाहिजे. वेळोवेळी होणारा सरकारचा हस्तक्षेप नसला पाहिजे. तसेच गरिबांना प्रत्येक वेळेला सरकार उपलब्ध हवे, अशी व्यवस्था उभारणार आहे. हे परिवर्तन २०४७ पर्यंत होईल.”

भटकता आत्मा

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांचे नाव न घेता पंतप्रधान मोदी यांनी टीका केली. ते म्हणाले, महाराष्ट्रातील एका नेत्याने राजकारण अस्थिर केले आहे. हा अस्थिरतेचा खेळ त्यांनी ४५ वर्षांपूर्वी सुरू केला. अनेक मुख्यमंत्री अस्थिर केले. केवळ विरोधकांनाच नाही, तर स्वतःचा पक्षही अस्थिर केला. कुटुंबातही अस्थिरता आणली. ज्यांची स्वप्ने अद्यापही पूर्ण झाली नाहीत, असा भटकता आत्मा आहे. महाराष्ट्र त्याचा शिकार झाला आहे. हाच भटकता आत्मा १९९५ मध्ये युती सरकार अस्थिर करण्याचा सातत्याने प्रयत्न करत होता. २०१९ मध्ये या आत्म्याने राज्यातील जनतेच्या बहुमताचा अपमान केला.

वर्तमानपत्रे हे छापणार नाहीत…

‘रिमोटवर चालणाऱ्या मनमोहनसिंग सरकारने पायाभूत सुविधांवर दहा वर्षांत जेवढा खर्च केला, तेवढा आम्ही दरवर्षी करतो,’ असे सांगून मोदी यांनी पुणेकरांना हा आकडा लक्षात ठेवण्याचे आवाहन केले. ‘हा आकडा लक्षात ठेवायला सोपा आहे. लक्षात ठेवा, कारण वर्तमानपत्रे हे छापणार नाहीत. ते कुठे तरी फोन करून विचारतील, छापायचे की नाही’ अशी टिप्पणी मोदी यांनी केली.

मोदी अभी जिंदा है!

”विधानसभा निवडणुकीच्या वेळी कर्नाटकात काँग्रेसने एका रात्रीत मुस्लिमांना ‘ओबीसीं’चे आरक्षण दिले. केंद्रात काँग्रेसची सत्ता आली तर ते दलित, आदिवासी, ‘ओबीसीं’चे आरक्षण काढून ते मुस्लिमांना देतील. मात्र मी जिवंत असेपर्यंत या देशात धर्मावर आधारित आरक्षण होऊ देणार नाही,” असे त्यांनी स्पष्ट केले.

मोदी म्हणाले…

जनऔषधी केंद्रांमधून ८० टक्के सूट

ज्येष्ठांवरील दवाखान्याचा खर्च कमी करणार ही मोदींची गॅरंटी

मध्यमवर्गीयांच्या घरासाठी ‘रेरा’चा कायदा

गरिबांसाठी बँकांचे राष्ट्रीयीकरण, पण बँकेत गरिबांना स्थान नाही

ज्यांना बँकेत कोणी गॅरंटर नसते, त्यांना मोदींची गॅरंटी असते

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यामुळे गरिबाचा मुलगा पंतप्रधान झाला

डॉ. आंबेडकर हे मला देवापेक्षा कमी नाहीत

उपाययोजनांतील सातत्याने अचूक वीजबिलांच्या टक्केवारीत वाढ

प्रामुख्याने ग्रामीण भागात आणखी सुधारणा करा – मुख्य अभियंता राजेंद्र पवार

पुणे, दि२९ एप्रिल २०२४: गेल्या आर्थिक वर्षभरात द्वैमासिक आढावा व उपाययोजनांतील सातत्याने पुणे परिमंडलामध्ये अचूक वीजबिलांच्या प्रमाणात वाढ झाली असून सद्यस्थितीत ९५.४३ टक्के वीजग्राहकांना अचूक बिल देण्यात येत आहे. यामध्ये पुणे व पिंपरी चिंचवड शहरातील अचूक बिलिंगचे प्रमाण ९७ टक्क्यांपेक्षा अधिक आहे. तर  अचूक बिलिंगमध्ये आणखी सुधारणा करण्यासाठी प्रामुख्याने ग्रामीण भागामध्ये शाखा कार्यालयानिहाय कृती आराखडा तयार करून स्थानिक उपाययोजना कराव्यात असे निर्देश मुख्य अभियंता श्री. राजेंद्र पवार यांनी दिले.

रास्तापेठ येथील ‘प्रकाशदूत’ सभागृहात मीटर रीडिंगचे बिलिंग व फोटो मीटर रीडिंगबाबत सोमवारी (दि. २९) द्वैमासिक आढावा बैठक झाली. तीत मुख्य अभियंता श्री. पवार बोलत होते. यावेळी अधीक्षक अभियंताश्री. अरविंद बुलबुले, श्री. युवराज जरग, श्री. संजीव राठोड, सहायक महाव्यवस्थापक (वित्त) सौ. माधुरी राऊत यांच्यासह सर्व ७७ मीटर रीडिंग एजन्सीजचे संचालक, व्यवस्थापक तसेच सर्व विभागांचे कार्यकारी अभियंता, वित्त व लेखा अधिकारी उपस्थित होते.

पुणे परिमंडलामध्ये १०० टक्के अचूक बिलिंगचे लक्ष्य समोर ठेऊन विविध उपाययोजना सुरू आहेत. त्यामुळे अचूक बिलिंगचे प्रमाण मार्च २०२४ अखेर ९५.४३ टक्क्यांवर गेले आहे. तसेच मागील वर्षाच्या तुलनेत सरासरी वीजबिलांमध्ये १.१६ टक्क्यांनी तर मीटर रीडिंगच्या अस्पष्ट फोटोच्या प्रमाणात १.३६ टक्क्यांनी घट झाली आहे. वीजमीटरच्या अचूक रीडिंगसाठी पुणे परिमंडलाकडून दैनंदिन पर्यवेक्षण करण्यात येत आहे. तसेच  उपविभाग कार्यालयांकडून दरमहा मीटर रीडिंगच्या फोटोची १०० टक्के तपासणी करण्यात येत आहे. सोबतच बिलिंगमध्ये सातत्याने सुधारणा करण्यासाठी व विविध उपायोजनांच्या अंमलबजावणीसाठी परिमंडलस्तरावर द्वैमासिक आढावा घेण्यात येत आहे.

मुख्य अभियंता श्री. पवार म्हणाले की, अचूक मीटर रीडिंग हा बिलिंगचा आत्मा आहे. अचूक बिलिंगमध्ये सुधारणा होत आहे ही समाधानाची बाब असली तरी प्रामुख्याने ग्रामीण भागात स्थानिक उपाययोजनांना आणखी गती दिली पाहिजे. यासाठी संबंधित विभाग व उपविभाग कार्यालयांची जबाबदारी महत्वाची आहे. ग्रामीण भागात मागील वर्षाच्या तुलनेत २.७८ टक्क्यांनी अचूक बिलिंग वाढले आहे. तर सरासरी वीजबिलांचे प्रमाण देखील ३.२० टक्क्यांनी कमी झाले आहे. मात्र यापुढे आणखी सुधारणेसाठी शाखा कार्यालयस्तरावर कृती आराखडा तयार करून उपाययोजना कराव्यात. तसेच चुकीच्या वीजबिलांमुळे ग्राहकांना होणारा नाहक मनस्ताप व महावितरणच्या महसूलाचे नुकसान खपवून घेतले जाणार नाही असे मुख्य अभियंता श्री. पवार यांनी यावेळी स्पष्ट केले.  

२७-मुंबई उत्तर पश्चिम, २६-मुंबई उत्तर मतदारसंघाकरीता निवडणूक खर्च निरीक्षकांच्या नियुक्त्या

मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघाकरीता राजकुमार चंदनकिरण छत्रपती खर्च निरीक्षक

मुंबईदि. २९ : लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 करीता 27- मुंबई उत्तर पश्चिम मतदारसंघाकरीता भारत निवडणूक आयोगाने भारतीय राजस्व सेवेतील अधिकारी राजकुमार चंदन आणि किरण के. छत्रपती यांची नियुक्ती केली आहे. त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांची बैठक घेत आज आढावा घेतला. मुंबई उत्तर पश्चिम मतदारसंघाच्या निवडणूक निर्णय अधिकारी वंदना सूर्यवंशी यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकान्वये ही माहिती दिली आहे.

या बैठकीस निवडणूक निर्णय अधिकारी श्रीमती सूर्यवंशी यांच्यासह सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी, पोलिस, आयकर, राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधिकारी, अग्रणी बँकेचे व्यवस्थापक, खर्च विभागाचे नोडल अधिकारी यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

श्री. चंदन, श्री. छत्रपती यांनी नोडल अधिकाऱ्यांच्या कामकाजाचा आढावा घेत त्यांनी केलेल्या तयारीची माहिती करून घेतली. राजकीय पक्ष, उमेदवारांनी करावयाच्या निवडणूक खर्चावर देखरेख ठेवण्यासाठी संबंधित सर्व विभागांनी सतर्क राहावे, मतदानाची प्रक्रिया मुक्त व नि:पक्ष होण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करावेत, असेही त्यांनी निर्देश दिले.

खर्च निरीक्षकांची नागरिक भेट घेऊ शकतात. त्यांचा संपर्क क्रमांक असा : श्री. राजकुमार चंदन (मोबाईल क्रमांक – 93214-05417) यांच्याकडे विधानसभेचे मतदारसंघ 158- जोगेश्वरी पूर्व, 159- दिंडोशी, 163- गोरेगाव, तर श्री. किरण के. छत्रपती (मोबाईल क्रमांक – 8928571922) यांच्याकडे विधानसभेचे मतदारसंघ 164- वर्सोवा, 165अंधेरी पश्चिम, 166- अंधेरी पूर्वच्या खर्च निरीक्षणाशी संबंधित समस्यांबाबत तक्रारींसाठी संपर्क साधू शकतात, असे आवाहन खर्च विभागाचे निवडणूक निरीक्षक श्री. चंदन, श्री. छत्रपती यांनी केले आहे.

२६– मुंबई उत्तर मतदासंघाकरीता दीपेंद्रकुमार निवडणूक खर्च निरीक्षक

मुंबईदि. २९ : लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 साठी 26- मुंबई उत्तर मतदासंघांकरीता भारतीय राजस्व सेवेचे अधिकारी दीपेंद्रकुमार यांची खर्च विभागाच्या निवडणूक निरीक्षक म्हणून भारत निवडणूक आयोगाने नियुक्ती केली आहे. त्यांच्याकडे विधानसभेचे 160-कांदिवली पूर्व, 161 चारकोप आणि 162- मालाड पश्चिम या मतदासंघांचे कामकाज असेल, असे निवडणूक निर्णय अधिकारी पंकज देवरे यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकाद्वारे कळविले आहे.

निवडणूक खर्च निरीक्षक श्री. दीपेंद्रकुमार यांचा मोबाईल क्रमांक 8928567686 असा आहे. खर्च विभागाचे निरीक्षक श्री. दीपेंद्रकुमार यांनी 26- मुंबई उत्तर मतदारसंघाच्या कामकाजाचा सविस्तर आढावा आज घेतला. यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी श्री. देवरे यांच्यासह पोलिस उपायुक्त, सहायक निवडणूक निर्णय अधिकारी, महानगरपालिकेचे अधिकारी, राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक, खर्च पथकाचे नोडल अधिकारी आदी उपस्थित होते.

लोकसभा निवडणुकीत उमेदवारांच्या खर्चावर देखरेख ठेवून नोंद घ्यावी. त्यासाठी संबंधित सर्व विभागांनी सतर्क राहावे. मतदानाची प्रक्रिया मुक्त व नि:पक्ष होण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करावेत, असेही निर्देश निरीक्षक श्री. दीपेंद्रकुमार यांनी दिले.

०००

२६– मुंबई उत्तर मतदासंघाकरीता नेहा चौधरी निवडणूक खर्च निरीक्षक

मुंबईदि.२९: लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 साठी 26- मुंबई उत्तर मतदासंघांकरीता भारतीय राजस्व सेवेच्या अधिकारी नेहा चौधरी यांची खर्च विभागाच्या निवडणूक निरीक्षक म्हणून भारत निवडणूक आयोगाने नियुक्ती केली आहे, असे निवडणूक निर्णय अधिकारी पंकज देवरे यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकाद्वारे कळविले आहे.

श्रीमती चौधरी यांच्याकडे विधानसभा मतदारसंघ 152 बोरिवली, 153 दहिसर आणि 154 मागाठाणे) साठी खर्च निरीक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांचा मोबाईल क्रमांक 9372791082 असा आहे. खर्च विभागाच्या निरीक्षक श्रीमती चौधरी यांनी आज 26- मुंबई उत्तर मतदारसंघाचा आढावा घेतला. यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी श्री. देवरे यांच्यासह पोलिस उपायुक्त, सहायक निवडणूक निर्णय अधिकारी, महानगरपालिकेचे अधिकारी, राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक, खर्च पथकाचे नोडल अधिकारी आदी उपस्थित होते.

लोकसभा निवडणुकीत उमेदवारांच्या खर्चावर देखरेख ठेवून नोंद घ्यावी. त्यासाठी संबंधित सर्व विभागांनी सतर्क राहावे. मतदानाची प्रक्रिया मुक्त व नि:पक्ष होण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करावेत, असेही निर्देश निरीक्षक श्रीमती चौधरी यांनी दिले

सर्वोच्च न्यायालयाने निवडणूक रोखे बेकायदा ठरवल्या नंतरही नाशिक सिक्युरिटी प्रेस मध्ये 1 हजार कोटींच्या रोख्यांची छपाई – अॅड. असीम सरोदे यांचा गंभीर आरोप 

सोशल मीडिया आणि काही प्रसार माध्यमांना हाताशी धरून राज्यात महायुतीला पोषक वातावरण असल्याचे भासविण्याचा प्रयत्न सुरू आहे. मात्र राज्यात आज वस्तुस्थिती अशी आहे की भाजप, देवेंद्र फडणवीस यांच्या फोडाफोडीच्या राजकारणाला जनता वैतागली आहे. महागाई, बेरोजगारी, शेतकऱ्यांचे प्रश्न गंभीर आहेत, त्यावर मोदी, शहा, फडणवीस काहीच बोलत नाहीत, केवळ भावनेच्या मुद्द्यांना हात घालत आहेत, आज मतदार सुजाण आहे, जातीय, धार्मिक ध्रुवीकरणाला तो बळी पडणार नाही, आम्ही राज्यात 60 हून अधिक ‘निर्भय बनो’ सभा घेतल्या यातून असे दिसते की राज्यात महायुतीला फक्त 10 जागा मिळतील . -अॅड. असीम सरोदे

पुणे :ऐन लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर मोदी सरकारने केलेला निवडणूक रोखे घोटाळा जनतेसमोर आला आहे. सर्वोच्च न्यायालयाने निवडणूक रोखे अवैध ठरवत भाजप सरकारला चांगलेच फटकारले, मात्र सर्वोच्च न्यायालयाने 15 फेब्रुवारी 24 रोजी निवडणूक रोखे घटनाबाह्य व बेकायदा ठरवल्या नंतरही नाशिक सिक्युरिटी  प्रेसने 1 हजार कोटी रुपयांचे निवडणूक रोखे छापल्याचा गंभीर आरोप निर्भय बनो अभियानाचे प्रवर्तक, कायदेतज्ज्ञअॅड. असीम सरोदे यांनी आज पत्रकार परिषदेत केला. 

यावेळी कॉँग्रेस पक्षाचे राज्य प्रवक्ते गोपाळ तिवारी, सीए प्रसाद झावरे, शहर काँग्रेसचे उपाध्यक्ष सुभाष थोरवे, धनंजय भिलारे, ॲड बाळकृष्ण निढाळकर, ॲड स्वप्नील जगताप, गणेश शिंदे इ उपस्थित होते. 

पुढे बोलताना अॅड. असीम सरोदे म्हणाले, सर्वोच्च न्यायालयात निवडणूक रोखे वरील सुनावणी अंतिम टप्यात असतांना सुध्दा सिक्युरिटी प्रेसने 10 हजार कोटी रुपयांचे ईलेक्ट्रॅाल बॉन्ड छापले. प्रकरण न्यायाप्रविष्ट असताना ते छापणे चुकीचेच होते, मात्र त्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने निवडणूक रोखे घटनाबाह्य असल्याचे जाहीर केल्यावरही १५ ते २१ फेब्रुवारी या कालावधीत नाशिक सिक्युरिटी प्रेसने१ कोटी रुपयांचे निवडणूक रोखे छापल्याची माहिती समोर आली आहे.मात्र हे ईलेक्ट्रॅाल बाँड नेमके कोणी घेतले व कोणत्या पक्षास दिले याची माहीती नासिक च्या सिक्युरीटी प्रेस ने दिलेली नाही..!

या संदर्भात बाजारात आणलेले ईले बाँड सिक्यु प्रेसने परत घ्यावेत, अशी नोटीसनासिक सिक्युरिटी प्रेसला दिल्याचे ॲड असीम सरोदे यांनी या वेळी सांगितले.ईलेक्ट्रोरल बाँड प्रकरणी दुसरा घोटाळा पुढे आणतांना ॲड सरोदे यांनी सांगितले की,
निकालानंतर छापलेल्या बॉन्ड ची जीएसटी भरल्याचेही समोर आले आहे. मात्र ते बॉन्ड नेमके कुणी घेतले, कोणत्या पक्षाला दिले यांची माहिती सिक्युरिटी प्रेसने दिली नसल्याचे सरोदे यांनी स्पष्ट केले. 

राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 2019 मध्ये त्यांचा कार्यकाल संपत आलेला असताना बेकायशीररित्या अजय आंबेकर, हेमराज बागुल, किशोर गांगुर्डे, वर्षा आंधळे, अजय जाधव अशा ‘माहीती संचालनालयातील वरीष्ठ अधिकाऱ्यांना ‘कृषी तंत्रज्ञान व सरकारी योजनांची माहीती प्रभावीपणे प्रसारीत करण्याचे तंत्रज्ञान शिकण्यासाठी पाठविण्यात आल्याते सांगण्यात आले होते.
परंतू प्रत्यक्षात ‘वेब मिडीयाचा आधुनिक वापर,सायबर क्राईम व सायबर सुरक्षा इ बाबतीत सरकार साठी डीजीटल मार्केटींग अशा विषयांचा या मध्ये समावेश होता आणि महत्वाचे म्हणजे केवळ ईस्र्रायल सरकारच्या विभागा सोबतच नाही तर ईतर अनेक खाजगी मिडीया हाऊसेस, इलेक्ट्रॅानिक संदेश वहन क्षेत्रातील निर्मात्यां सोबत ही विविध चर्चा आणि प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
या प्रकरणा बाबत विविध शंका व्यक्त करणारी जनहित याचिका श्री लक्ष्मण एन बुरा नावाच्या व्यक्तिने दाखल केली होती.
परंतू काही कायदेशीर क्लुप्त्या करून
ती जनहित याचिका प्रलंबित ठेवण्यात आल्याचे आढळल्यावर रायगड जिल्ह्यातील प्रितम साळवी यांंनी आज दि २९ एप्रिल २०२४ रोजी एक हस्तक्षेप याचिका वकील असीम सरोदे व विनय खातू यांच्या द्वारे मुंबई ऊच्च न्यायालयात दाखल करून ईस्र्ायल दौरा प्रकरण तातडीने चालवायची मागणी केली आहे.
२०१९ मघ्ये सत्तांतर झाले व मा अनिल देशमुख गृहमंत्री असतांना त्यांनी या प्रकरणातील बाबींची ऊच्च स्तरीय चौकशी करण्यासाठी अतिरीक्त मुख्य सचिव व सिआयडी चे सह आयुक्त यांचे कडे सोपवली. सत्ता स्थापनेच्या काळात शिवसेना, राकाँ व काँग्रेस च्या वरीष्ठ नेत्यांचे फोन टॅपिंग झाले होते. व तसा आरोप देखील भाजप नेत्यांवर वर झाला होता. या फोन टॅपिंगचे तंत्रज्ञान शिकण्यासाठी राज्यातील कोणते अधिकारी ईस्रायल ला गेले व त्यांनी तेथुन कोणते सॅाफ्टवेअर आणले याची चौकशी होणार असल्याचे तत्कालीन मविआ सरकारने जाहीर केले होते आणि त्यानंतरच अनिल देशमुखांवर कथित १०० कोटीच्या वसुलीचे आदेश भाजप ने लावले होते हा घटनाक्रम जसा महत्वाचा आहे तसेच देवेंद्र फडणवीस यांचेवर अप्रत्यक्ष आरोप करणारी ऊच्च न्यायालयाची जनहित याचिका महत्वाची आहे. माहिती तंत्रज्ञानाचा गैरवापर करून निवडणुका कश्या जिंकायच्या हे तंत्रज्ञान समजून घेण्यासाठी हे अधिकारी गेल्याचे इस्त्रायल’ने दिल्याचे माहितीवरून उघडकीस आले आहे, या सत्तेच्या गैरवापराला फडणवीस यांनी अभ्यास दौरा असे गोंडस नाव दिल्याचे समोर आले आहे. या प्रकाणांची माहिती तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांना मिळाली, या प्रकरणाची त्यांनी चौकशी सुरू केल्यानेच देशमुख यांच्यावर 100 कोटीच्या वसुलीचे आरोप भाजपने लावण्यात आलेत का. पिगॅसीस प्रकरणाशी या घटनाक्रमाचा संबंध आहे का असे महत्वाचे प्रश्न पुढे येतात असे असीम सरोदे म्हणाले.

सोशल मीडिया, प्रसार माध्यमे, माहिती तंत्रज्ञान यांचा नरेंद्र मोदी, अमित शाह व देवेंद्र फडणवीस गैरवापर करतात असे आरोप त्यांच्यावर सातत्याने झाले आहेत . त्यामुळे त्यांनी स्पष्टीकरण देणे आवश्यक आहे. तंत्रज्ञानाचा राजकीय हेतूने संघटित गुन्हेगारी वापर करण्याच्या प्रकारांची चौकशी होऊन नागरिकांच्या शंकांचे निरसन झाले पाहिजे अशी मागणी यावेळी असीम सरोदे यांनी केली.

मोदींच्या नेतृत्वात भारत बनेल तिसरी मोठी अर्थव्यवस्था:मुरलीधर मोहोळ यांचा विश्वास

0

पुणे:पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात जगातील सर्वात मोठ्या अर्थव्यवस्थांच्या यादीत भारताने दहाव्या क्रमांकावरून पाचव्या क्रमांकावर झेप घेतली असून, 2027 पर्यंत भारत जगातील तिसऱ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था बनेल असा विश्वास पुणे लोकसभा मतदारसंघातील भाजप महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांनी व्यक्त केला.पुणे शहर भाजप व्यापारी आघाडीच्या वतीने आयोजित केलेल्या मेळाव्यात मोहोळ बोलत होते. शहर अध्यक्ष धीरज घाटे, उमेश शहा, प्रवीण चोरबेले, सुप्रसिद्ध व्यापारी फतेचंद रांका, महेंद्र पितलीया, रायकुमारजी नहार, तुलसीदास पटेल, रतन किराड, राजेंद्र भाटिया, दामजीभाई पटेल यांची प्रमुख उपस्थिती होती.

मोहोळ म्हणाले, मोदी सरकारच्या दशकात झालेली विदेशी गुंतवणूक दुपटीहून अधिक वाढून 640 अब्ज डॉलर्सवर गेली. 2014 पर्यंत देशात केवळ 500 स्टार्टअप्स होते, गेल्या दहा वर्षांत ती संख्या एक लाख 16 हजार इतकी झाली. स्टार्टअप्सच्या संख्येत भारत तिसऱ्या क्रमांकावर आहे. पीएम मुद्रा योजनेअंतर्गत 26.12 लाख कोटी रुपयांचे कर्ज वितरित करण्यात आले. जीएसटी करप्रणाली लागू केल्याने एक देश, एक कर धोरणाअंतर्गत व्यापारातील असमतोल दूर होऊन निर्यातीला चालना मिळाली.

मोहोळ पुढे म्हणाले, पुणे व्यापाराचे केंद्र होण्यासाठी दर्जेदार पायाभूत सुविधा निर्माण करणे, स्थानिक पातळीवर मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मितीसाठी प्रयत्न करणे, शहराच्या बाहेर मोठे व्यवसायिक केंद्र उभारणे, आंतरराष्ट्रीय दर्जाचे कन्वेंशन सेंटर विकसित करणे आणि व्यापाऱ्यांच्या छोट्या मोठ्या अडचणी सोडविण्यासाठी कटिबद्ध आहे.

प्रदूषणमुक्त हवेसाठी राष्ट्रीय शुद्ध हवा कार्यक्रमाची प्रभावीपणे अंमलबजावणी करणार:मुरलीधर मोहोळ

पुणे:पुणेकरांना प्रदूषणमुक्त, शुद्ध हवा मिळावी यासाठी राष्ट्रीय शुद्ध हवा कार्यक्रमाची (नॅशनल क्लीन एअर प्रोगॅम) प्रभावीपणे अंमलबजावणी करणार असल्याची ग्वाही पुणे लोकसभा मतदारसंघातील भाजप महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांनी दिली.

मोहोळ यांनी वेताळ टेकडीवर सकाळी फिरायला येणाऱ्या नागरिकांची भेट घेतली. माजी नगरसेविका छाया मारणे, अश्विनी जाधव, डॉ. संदीप बुटाला, कैलास पारीख, बाळासाहेब सुराणा, दीपक पवार, मिलिंद तलाठी, गणेश शिंदे, दत्ता गायकवाड, बाळासाहेब खंकाळ यांची प्रमुख उपस्थिती होती.

मोहोळ म्हणाले, “केंद्र सरकारने शहरांमधील वायू प्रदूषण नियंत्रणात आणण्यासाठी देशातील शंभरहून अधिक शहरांत हा कार्यक्रम राबविण्याचा निर्णय घेतला आहे. त्यात पुणे, खडकी, पिंपरी-चिंचवड आणि देहू रोड कॅन्टोन्मेंट बोर्डाला पहिल्या टप्प्यासाठी 504 कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. 2026 पर्यंत वायू प्रदूषण 25 ते 30 टक्क्यांपर्यंत कमी ठेवण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. या अंतर्गत पुण्याला 135 कोटी रुपयांचा निधी मिळाला आहे.”

मोहोळ पुढे म्हणाले, “सूक्ष्म धुलिकणांचे आणि अतिसूक्ष्म धुलिकणांचे प्रमाण कमी करायचे आहे. त्यासाठी पाणी शिंपडणारी कारंजी उभारणे, स्मशानभूमींमध्ये विद्युतदाहिन्या, गॅसदाहिन्यांची संख्या वाढवणे, विद्युत वाहनांची संख्या वाढविणे, वाहतूक कोंडी कमी करणे, रस्ते सफाईच्या कामात सुधारणा आणणे, सार्वजनिक वाहतुकीस प्रोत्साहन देणे, मेट्रोसाठी फीडर म्हणून 300 मिडी बसची खरेदी करणे आदी उपाययोजना करण्यात येणार आहेत. या उपायांची प्रभावी अंमलबजावणी करणार असून, पर्यावरणपूरक वाहतुकीला प्रोत्साहन देण्यासाठी केंद्राकडून अधिकाधिक निधी मिळविण्यासाठी पाठपुरावा करणार आहे.”

महाराष्ट्र राज्य स्थापना दिनाच्या मुख्य शासकीय समारंभाची रंगीत तालीम

मुंबई, दि. २९ : महाराष्ट्र राज्याच्या ६५ व्या स्थापना दिनानिमित्त दादर येथील छत्रपती शिवाजी महाराज मैदानावर मुख्य शासकीय समारंभ आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमाची रंगीत तालीम आज घेण्यात आली. यावेळी अवर सचिव मिलिंद हरदास यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.

अपर पोलीस महासंचालक (प्रशासन) निखिल गुप्ता, विशेष पोलीस महानिरीक्षक (प्रशासन) डॉ.आरती सिंह यांच्यासह वरिष्ठ शासकीय तसेच पोलीस अधिकारी याप्रसंगी उपस्थित होते.

आज झालेल्या रंगीत तालीमीत राज्य राखीव पोलीस बल, बृहन्मुंबई पोलीस सशस्त्र बल, बृहन्मुंबई दंगल नियंत्रण पथक, बृहन्मुंबई सशस्त्र महिला पोलीस दल, मुंबई लोहमार्ग पोलीस दल, महाराष्ट्र पोलीस ध्वज, मुंबई पोलीस ध्वज, राज्य राखीव पोलीस बल ध्वज, महाराष्ट्र अग्निशमन सेवा संचालनालय ध्वज, मुंबई अग्निशमन दल ध्वज, बृहन्मुंबई वाहतूक पोलीस दल, मुंबई अग्निशमन दल, बृहन्मुंबई महानगरपालिका सुरक्षा दल, बृहन्मुंबई व ठाणे जिल्हा सुरक्षा रक्षक मंडळ, बृहन्मुंबई पोलीस आणि मुंबई लोहमार्ग पोलीस ब्रास बॅण्ड पथक, राज्य राखीव पोलीस बलाचे पाईप बॅण्ड पथक, बृहन्मुंबई पोलीस विभागाचे निर्भया वाहन पथक, मुंबई अग्निशमन दलाचे हाय राईज फायर फायटिंग वाहन, हायड्रोलिक प्लॅटफॉर्म आणि 64 मीटर टर्न टेबल लॅडर आदी पथकांनी सहभाग घेतला.

उत्कृष्ट संचलन पुरस्कार

भारताच्या 75 व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात सर्वोत्कृष्ट संचलन केलेल्या पथकांना यावेळी मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आले. यामध्ये शासकीय सेवेतील सहभागी पथकांच्या गटात गडचिरोली व गोंदिया जिल्ह्याच्या सी-60 पथकाने प्रथम, राज्य राखीव पोलीस बलाने द्वितीय तर बृहन्मुंबई पोलीस दंगल नियंत्रण पथकाने तृतीय क्रमांकाचा पुरस्कार पटकावला. शालेय सहभागी पथकांमध्ये रोड सेफ्टी पेट्रोल (मुले), डॉ.अँटोनियो डा सिल्वा हायस्कूल, दादर च्या पथकाने प्रथम तर रोड सेफ्टी पेट्रोल (मुली), एमसीएम मुलींचे हायस्कूल, काळाचौकी च्या पथकाने द्वितीय क्रमांक पटकावला. स्टुडंट पोलीस कॅडेट प्रोग्राम गटात नायगाव/ परेल भोईवाडा म्युनिसिपल सेकंडरी स्कूलने प्रथम, ग्लोब मिल पॅसेज म्युनिसिपल सेकंडरी स्कूलने द्वितीय तर सांताक्रूझ (पूर्व) मराठी म्युनिसिपल सेकंडरी स्कूलने तृतीय क्रमांचा पुरस्कार मिळविला.

या समारंभात किरण सुरेश शिंदे, अरुण सुरेश शिंदे, विवेक विनोद शिंदे यांनी सनई चौघडा वादन केले. तर शिबानी जोशी आणि पल्लवी मुजुमदार यांनी सूत्रसंचलन केले.

०००

मतदारांशी थेट संपर्क साधत प्रचारावर कॉंग्रेसचा भर

पुणे-महाविकास आघाडी व इंडिया आघाडीचे काँग्रेस पक्षाचे उमेदवार आ. रवींद्र धंगेकर यांनी उमेदवारी अर्ज भरल्यानंतर पहिल्या १० दिवसांत संपूर्ण पुणे शहरात १४ जीप यात्रा / पदयात्रा काढून हजारो मतदारंशी थेट संपर्क साधत पहिल्या टप्प्यात प्रचाराचा झंजावात त्यांनी निर्माण केला. प्रत्येक विधानसभा मतदार संघ जीप यात्रा / पदयात्रांद्वारे त्यांनी अक्षरशः पिंजून काढला. त्यामध्ये कसबा – ३, कोथरूड – ३, पर्वती – ३, वडगावशेरी – ३ , आणि पुणे कॅन्टॉन्मेंट व शिवाजीनगर – प्रत्येकी १ अशा जीप यात्रा / पदयात्रांद्वारे त्यांनी सारे मतदार संघ आत्तापर्यंत पिंजून काढले.

काही सकाळी व बहुतांशी संध्याकाळी होणाऱ्या या पदयात्रांचा शुभारंभ उमेदवारी अर्ज भरल्याच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे शुक्रवार १९ एप्रिल रोजी सकाळी पुण्याचे ग्रामदैवत श्री कसबा गणपतीचे दर्शन घेऊन पदयात्रांना प्रारंभ झाला. त्यामध्ये काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि आम आदमी पार्टी यांचे सर्व प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते उमेदवार आ. रवींद्र धंगेकर यांच्या सोबत पदयात्रेत सहभागी होत राहिले. पदयात्रांमध्ये प्रमुख पक्षांचे झेंडे डौलाने फडकत राहिले. काँग्रेस पक्षाचे चिन्ह म्हणजे हाताचा पंजा सर्वत्र उंचावले जात होते.

याच परंपरेला साजेशी पदयत्रा रविवार सकाळी पर्वती विधानसभा मतदार संघ व संध्याकाळी शिवाजीनगर मतदार संघात निघाली. ढोल ताशांच्या गजरात ‘झिंदाबाद’ च्या घोषणांनी दुमदुमत राहिलेल्या पदयात्रांमध्ये उमेदवार आ. रवींद्र धंगेकर हजारो नागरिकांना भेटत राहिले. नागरिकांचा प्रतिसादही उत्साहवर्धक होता. ठिकठिकाणी स्वागत केले जात होते. अनेक दुकांनांमध्ये धंगेकरांना आवर्जून बोलावले जात होते. पर्वती मतदार संघातील अप्पर इंदिरा नगर येथून सकाळी ९.३० वाजता सुरु झालेली पदयात्रा दुपारी ३ पर्यंत चालूच राहिली. प्रत्येक ठिकाणी औक्षण, सार्वजनिक गाणेशउत्सोव मंडळांमध्ये श्री गणेशाची आरती, यामुळे पदयात्रेला विलंब होत राहिला मात्र कार्यकर्त्यांचा व नागरिकांचा उत्साह कमी झाला नव्हता.

या पदयात्रेत ॲड. अभय छाजेड, मार्केटयार्ड ब्लॉक अध्यक्ष रमेश सोनकांबळे, पर्वती ब्लॉक अध्यक्ष संतोष पाटोळे, माजी नगरसेवक बंडू नलावडे, भरत सुराणा, स्वप्नील नाईक, प्रथमेश आबनावे, राधिका मखामले, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष बाळासाहेब ओसवाल, माजी नगरसेविका दिपाली ओसवाल, सचिन जोगदंड, अमोल रासकर, शशिकांत पापळ,महेश कदम राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष शशिकांत तापकीर, पुणे शहर महिला अध्यक्ष मृणाल वाणी, सचिन पासलकर, सचिन अण्णा तावरे, सोनाली उजागरे, विजू पवार, सौरभ माने, तेजस मिसाळ, विद्या कळेकर आदी सहभागी झाले होते.

ज्येष्ठ नागरिकांतर्फे
रवींद्र धंगेकरांचा प्रचार सुरु

महाविकास आघाडी व इंडिया आघाडीचे पुणे लोकसभा मतदार संघातील काँग्रेस पक्षाचे उमेदवार आ. रवींद्र धंगेकर यांचा प्रचार करण्याचे पुणे शहर काँग्रेस जेष्ठ नागरिक संघातर्फे बैठकीत एकमताने ठरवण्यात आले. त्यानुसार संघटनेचे २००० हुन अधिक जेष्ठ नागरिक घरोघरी प्रचार पत्रके वाटायचे व रवींद्र धंगेकरांना निवडून आणण्याचे आवाहन करीत आहेत. संघटनेचे अध्यक्ष द.स. पोळेकर यांच्या पुढाकाराने ही प्रचार मोहीम सुरु झाली आहे. संघटनेचे कायदा सल्लागार बाळासाहेब बाणखेळे यांनी प्रचाराची रुपरेखा आखली असून या संदर्भात झालेल्या बैठकीत महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष व लोकसभा निवडणूक प्रचारप्रमुख माजी आमदार मोहन जोशी यांनी मार्गदर्शन केले. त्यांनी सांगितले की, रवींद्र धंगेकर यांचा पिंड कार्यकर्त्याचा आहे. ते जनतेचे नेते आहेत त्यांना मत म्हणजे पुण्याच्या विकासाला मत हे घरोघरी जाऊन सांगावे असे आवाहन त्यांनी या प्रसंगी केले.

कोथरूड मतदार संघात काँग्रेसचा घरेलू कामगार मेळावा

पुणे -पुणे लोकसभा मतदारसंघ महाविकास आघाडी व इंडीया आघाडीचे उमेदवार आमदार रवींद्र धंगेकर यांच्या प्रचारार्थ घरेलु कामगार, संजय गांधी निराधार योजना लाभार्थी मेळावा आयोजित करण्यात आला होता. या वेळी सौ. प्रतिभाताई रवींद्र धंगेकर, माजीनगरसेवक चंदुशेठ कदम, माजी नगरसेवक संजय बालगुडे, स्नेहल पाडळे, घरेलु कामगार संघटनेच्या अध्यक्ष किरणताई मोघे ह्यांनी ह्या मेळाव्यासाठी जमलेल्या महिलांना मार्गदर्शन केले.

महागाई, बेरोजगारी, समाजातील वाढलेला असंतोष ह्या विरोधात मतदान करण्याचे व रविंद्र धंगेकर यांना प्रचंड मतांनी विजयी करण्याचे आवाहन सर्व वक्त्यांनी केले.

ह्या मेळाव्यास महा. काँग्रेस प्रदेश प्रतिनिधी यशराज पारखी, शिवसेना महिला शहर प्रमुख सवीताताई मते, युक्रांदचे संदीप बर्वे कोथरूड ब्लॉक अध्यक्ष रवींद्र माझिरे,कोथरूड काँग्रेस महिला अध्यक्ष मनीषाताई करपे, कोथरूड राष्ट्रवादी काँग्रेस महिला अध्यक्ष ज्योतीताई सुर्यवंशी, राजीव गांधी पंचायत राज संघटन पुणे शहर उपाध्यक्ष मनीषा गायकवाड, छायाताई भोसले,आरती गायकवाड, शितलताई जाधव, भोपळे ताई, लोणकर ताई,रंजना पवार, निता पाटोळे, पुजा चव्हाण,युवराज मदगे, महेश विचारे, बंटी जाधव, पिंटु वराडे, हनुमंत गायकवाड, विकी कांबळे, थोरात, अंकुश आडसुळ, किरण आडागळे, नागेश गायकवाड, दयानंद घोडके, किरण मारणे, प्रीती मारणे, सवीता ताई डाहळे, निगडे काका, पुष्पा गोळे,जाधवताई, सुनीताताई आखाडे, माने मावशी, अरुण नाईकनवरे, राजु कंधारे ऋषिकेश मारणे उपस्थित होते.सदर मेळाव्याचे आयोजन हे किशोर मारणे, अध्यक्ष राजीव गांधी पंचायत राज संघटन अध्यक्ष कंत्राटी कामगार मजदूर कोंग्रेस व सुरेखा मारणे सरचिटणीस पुणे शहर महीला कोंग्रेस यांनी केले होते. सूत्रसंचालन राजीव गांधी पंचायत राज संघटन सरचिटणीस संदीप कुदळे यांनी केले. प्रास्ताविक किशोर मारणे यांनी केले व आभार प्रदर्शन ज्योतीताई सुर्यवंशी यांनी केले.

पंतप्रधान मोदींसाठी मोहोळांनी बनविली खास ‘दिग्विजय पगडी’

पुणे -पंतप्रधान नरेंद्र मोदी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुण्यातील रेसकोर्स येथे सभेला संबोधित करणार असून यावेळी मोदींच्या स्वागतासाठी खास दिग्विजय पगडी महायुतीचे पुणे लोकसभेचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांच्या संकल्पेनतून मुरुडकर झेंडेवाले यांनी साकारली आहे.मोहोळ म्हणाले, पाहताक्षणी डोळ्यात भरणारी ही पगडी पारंपारिक पुरातन पद्धतीने तयार केली आहे.

पंतप्रधान मोदी यांचे पुण्यात आजवर विविध पगडी घालून स्वागत करण्यात आले असून यंदाची पगडीही चर्चेचा विषय ठरली आहे. याबाबत माहिती देताना मोहोळ म्हणाले, ‘ऐतिहासिक मराठा शौर्याची साक्ष देणाऱ्या, मोत्यांचा तुरा असलेल्या, शुभचिन्हे लावलेल्या आणि पंचधातूंनी सजवलेल्या या विशेष पगडीच्या शीर्षस्थानी साक्षात तुळजाभवानीची प्रतिमा आहे. दिग्विजयाला साजेशा सात घोड्यांच्या मंचकाची संकल्पना यातून प्रतीत होते. त्यामुळे तिला दिग्विजय योद्धा पगडी नाव दिले गेले आहे’.

मोहोळ पुढे म्हणाले, ‘मोदीजींचे आजवर अनेक पुणे दौरे झाले, त्यात त्यांचे विविध पगड्या घालून स्वागत केले आहे. पण आजची पगडी निश्चितच विशेष आहे. दिग्विजयाची साक्ष देणारी ही पगडी आपल्या मराठी परंपरेचा बाज आणि शौर्य दर्शविणारी आहे’

छत्रपती शिवरायांच्या अश्वारुढ पुतळा देऊन होणार स्वागत !

पंतप्रधान मोदी यांच्या स्वागतासाठी खास पगडी साकारल्यानंतर त्यांचे स्वागतही जोरदार केले जाणार आहे. हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांचा अश्वारुढ पुतळा आणि तलवार भेट देऊन मोदींचे स्वागत करणार असल्याचेही मोहोळ यांनी यावेळी सांगितले.

मोदी सरड्यासारखा रंग बदलतात:प्रकाश आंबेडकरांची टीका

पुणे- पंतप्रधान नरेंद्र मोदी सरड्यासारखा रंग बदलत आहेत. त्यांच्या 400 पारच्या नाऱ्यात कोणताही दम नाही, अशी टीका टीका वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी सोमवारी केंद्रातील सत्ताधारी एनडीए सरकारवर निशाणा साधताना केली. महाविकास आघाडीने आम्हाला 2 जागा देण्याची तयारी दर्शवली होती. पण आम्ही त्यातून बाहेर पडलो. आम्ही पूर्वीपासूनच निवडणुकीची तयारी केली होती, असेही ते यावेळी म्हणाले.

भाजपने यंदाच्या लोकसभा निवडणुकीत 400 पारचा नारा दिला आहे. पण सर्व्हेनुसार त्यांच्या जागा 300 हून खाली घसरण्याची शक्यता आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी पुन्हा निवडणूक आल्यास ते संविधान बदलतील. कारण ते सरड्यासारखे रंग बदलत आहेत. ते कर्नाटकातील मुस्लिम समाजाला ओबीसी आरक्षण देण्याविषयी वेगळी भूमिका मांडत आहेत, असे प्रकाश आंबेडकर येथे पत्रकारांशी संवाद साधताना म्हणाले.

मुंबईत मुस्लिम मतदारांसह बिहार, उत्तर प्रदेश व दक्षिण भारतातील मतदारांचे मतदान अत्यंत महत्त्वाचे आहे. भाजपने राज ठाकरे यांना साेबत घेऊन स्वत:ला वाचविण्याचा प्रयत्न केला, परंतु मुंबईतील बिहार व उत्तर प्रदेशातील नागरिकांनी उन्हाळी सुट्टीत गावी जाण्यासाठी 26 विशेष रेल्वे गाड्यांची मागणी करणारे पत्र दिले आहे. त्यामुळे हे मतदार मतदानाच्या दिवशी मुंबई बाहेर गेल्यास, जाे नियमित मतदार भाजपचा आहे त्याचा फायदा त्यांना हाेऊ शकेल, असे मत वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी साेमवारी पत्रकार परिषदेत व्यक्त केले.

आंबेडकर म्हणाले, निष्ठावंत मतदार हा काँग्रेसकडे आहे. अकाेल्यामध्ये मी पाहिले की, काँग्रेसने मुस्लिम उमेदवार न देता हिंदू उमेदवार देऊन पुन्हा हिंदू मतदार आकृष्ट करण्याचा प्रयत्न केला. काँग्रेसचा ठराविक मतदार असून त्यांचे किती मतदार त्यांनी मतदानावेळी बाहेर काढले हे महत्वाचे आहे. जाे काेणी त्याठिकाणी जिंकेल ताे 25 हजाराने जिंकेल. काँग्रेस व ठाकरे गटाच्या हिंदू मतदारांचे मतदान ट्रान्सफर हाेत नाही. त्यामुळे शिवसेना उद्धव ठाकरे गट मुस्लिम मते वळवताना दिसत आहे.

या निवडणुकीत सगळ्यात दुर्लक्षित केले जाणारी एकनाथ शिंदे विरुध्द उध्दव ठाकरे अशी निवडणूक 12 मतदारसंघात हाेते. त्यात वंचितचा फायदा होणार आहे. त्या ठिकाणी सेक्युलर मतदार आमच्याकडे वर्ग हाेत आहे. सगळ्याच ठिकाणच्या निवडणुकीत असे माेठ्या प्रमाणात हाेत आहे. शिवसेना भाजप साेबत जाणार नाही हा प्रश्न उमेदवारांना मुस्लिम मतदार विचारत आहे. त्यांचे समाधान झालेले नाही, असेही आंबेडकर यावेळी बोलताना म्हणाले.

मागील निवडणुकीत जे भाजप उमेदवार लाखाच्या फरकाने निवडून आले, त्यांची यंदा परिस्थिती अवघड झाली आहे. 2014 ते 2022 दरम्यान शासनाने अधिकृतपणे सांगितले की, 17 लाख हिंदू कुटुंबांची मालमत्ता कमीत कमी 50 काेटींची आहे. ते परदेशात जाऊन बसले आहेत. त्यामुळे जे स्थलांतरित झालेत ते परत येऊ शकतात. पण अनेकजण देशाचे नागरिकत्वच साेडत आहेत, असे आंबेडकर म्हणाले. भाजपने निवडणूक रोख्यांची सक्ती केली होती का? हे स्पष्ट करावे, अशी मागणीही प्रकाश आंबेडकरांनी यावेळी केली. हिंदू समाजाचे ठेकेदार समजणारे देशाचे नागरिकत्व साेडणाऱ्या बाबत काही बाेलत नाही, असे ते म्हणाले.