Home Blog Page 1061

निगडीच्या दुर्गादेवी टेकडीवर दुमदुमला ‘जय श्रीराम’चा नारा

‘मॉर्निंग वॉक’ करत खासदार बारणे यांनी साधला मतदारांशी संपर्क

निगडी, दि. 5 मे – निगडीची निसर्गरम्य दुर्गादेवी टेकडी ही मॉर्निंग वॉक आणि व्यायामासाठी पिंपरी-चिंचवडकरांची पहिली पसंती आहे. दररोज सकाळी हजारो नागरिक या ठिकाणी येतात. मावळ लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार खासदार श्रीरंग बारणे यांनी आज (रविवारी) सकाळी दुर्गादेवी टेकडीवर जात ‘मॉर्निंग वॉक’ करण्याबरोबरच मतदारांशी संपर्क साधला. त्यावेळी जय श्रीराम च्या नाऱ्याने परिसर दुमदुमून गेला.

मावळ लोकसभा मतदारसंघातील शिवसेना-भाजप-राष्ट्रवादी- मनसे- आरपीआय- रासप- मित्रपक्ष महायुतीचे उमेदवार खासदार श्रीरंग आप्पा बारणे यांनी प्रचाराच्या धामधुमीत वेळ काढून मॉर्निंग वॉकच्या निमित्ताने मतदारांशी संपर्क साधण्याची संधी घेतली. त्यावेळी भाजपचे नेते राजू दुर्गे, युवा सेनेचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र तरस, शिवसेना महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा शैला पाचपुते, शहर संघटिका सरिता साने, माजी नगरसेवक चेतन भुजबळ तसेच मयूर बारणे, दीपक गुजर, रवींद्र नामदे, शिवाजी शेडगे, आप्पा डेरे आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

सकाळी साडेसहा वाजता खासदार बारणे दुर्गादेवी टेकडीच्या पायथ्याशी पोचले. सहकाऱ्यांबरोबर टेकडी चढून जात असताना त्यांनी मतदारांशी संपर्क साधला. खासदार बारणे यांना टेकडीवर पाहून अनेकांना सुखद धक्का बसल्याचे दिसून येत होते. खासदार बारणे यांनी नागरिकांना अभिवादन करून मतदान करण्याचे आवाहन केले.

खासदार बारणे यांच्या समवेत फोटो व सेल्फी घेण्यासाठी नागरिक स्वतःहून पुढे येत होते. त्या सर्वांशी हस्तांदोलन करीत बारणे हसतमुखाने सर्वांना फोटो आणि सेल्फी देत होते. शहरातील अनेक व्यापारी, उद्योजक, वरिष्ठ अधिकारी, डॉक्टर, प्रतिथयश व्यावसायिक, खेळाडू यांची या ठिकाणी भेट झाली. ‘जय श्रीराम’च्या घोषणांनी परिसर दुमदुमून गेला होता. ‘आप्पा बारणे तुम आगे बढो, हम तुम्हारे साथ है’ च्या घोषणाही लोकांनी यावेळी दिल्या.

पत्नीच्या आणि सासरच्या छळवादाने ३७ वर्षीय तरुणाची आत्महत्या-पत्नीसह ९ जणांवर गुन्हा दाखल

पुणे- पतीकडून आणि सासरच्याकडून विवाहितेच्या छळाच्या बातम्या आपण नेहमीच ऐकतो, वाचतो पण आता पतीच्या छळाच्या बातम्याही ऐकायला आणि वाचायला मिळू लागल्या आहेत अशाच एका प्रकरणाची हडपसर पोलीस ठाण्यात नोंद झाली आहे याप्रकरणी पतीने आत्महत्या केल्याने पत्नीसह ९ जणांवर गुन्हा दाखल झाला आहे अद्याप अटक कुणाला झालेली नाही .

पोलिसांनी सांगितले कि,’हडपसर पोलीस ठाण्यात भादविक ३०६,३४ अन्वये याप्रकरणी गुन्हा नोंदविला आहे, पतीचा भाऊ अमित वाघमोडे वय ३५ वर्षे रा. कवडीपाठ ता. हवेली जि.पुणे याने पोलिसात तक्रार दिली आहे.फिर्यादी यांचा भाऊ अतुल बबन वाघमोडे वय ३७ वर्षे याने दि.२८/०४/२०२४ रोजी ११/१५ वा पुर्वी साधना शाळेमागे माळवाडी हडपसर येथे आत्महत्या केली आहे. अतुल ची पत्नी तेजश्री हिने लग्नानंतर काही दिवसातच त्याचे सोबत भांडण करुन त्याला मानसिक त्रास दिला तसेच तिचे नातेवाईक या सर्वाचे मानसिक त्रास देऊ लागले त्यांच्या दबावामुळेच फिर्यादी यांचा भाऊ अतुल वाघमोडे यास राहते घरी गळफास घेवुन आत्महत्या केली पोलीस उपनिरीक्षक सुवर्णा गोसावी (मो. नं. ७२७६२९२१०६) या प्रकरणी अधिक तपास करत आहेत.

मतदान केंद्रावर मेडीकल कीटची सुविधा

मतदान केंद्रांना मेडिकल कीटचे कृषी महाविद्यालय येथे वितरण

पुणे, दि. ५: बारामती लोकसभा मतदार संघातील सार्वत्रिक निवडणूक येत्या ७ मे रोजी होणार असून उन्हाळ्यातील वाढते तापमान लक्षात घेता निवडणुकीसाठी नियुक्त अधिकारी, कर्मचारी तसेच मतदानासाठी येणाऱ्या मतदारांसाठी १ हजार ७२४ प्रथमोपचार पेट्या आणि प्रत्येक मतदान केंद्रासाठी १० ओआरएसच्या पाकिटांचे वितरण कृषी महाविद्यालय येथील वितरण केंद्रातून करण्यात आले.

मतदान केंद्रावर काही दुर्घटना उद्भवल्यास तात्काळ प्राथमिक उपचार देण्याच्या भारत निवडणूक आयोगाच्या सूचना आहेत. त्याअनुषंगाने बारामती लोकसभा मतदार संघातील दौंड विधानसभा मतदार संघासाठी २३२, इंदापूर २५२, बारामती २८०, पुरंदर २४४, भोर ५२५ व खडकवासला १९१ याप्रमाणे १ हजार ७२४ कीटचे वितरण करण्यात आले. तर २ हजार ५१६ मतदान केंद्राना २५१६० ओआरएसच्या पाकिटांचे वितरण करण्यात आले.

प्रथमोपचार पेटीमध्ये बँडेज, कापूस, बीटाडाईन ट्यूब, अँटीसेप्टीक सोल्युशन, हातमोजे, पॅरासिटामॉल, रँनटीडीन टॅबलेट उपलब्ध करुन देण्यात आल्या आहेत. किटचे वितरण सुलभतेने होण्यासाठी सर्व साहित्य असलेल्या प्रथमोपचार पेट्या पिशव्यांमध्ये भरुन पाठविण्यात आल्या. प्रत्येक पिशवीवर मतदारसंघाचे नाव लिहिण्यात आल्याने ती कीट मतदान केंद्रापर्यंत पोहोचविणे सोईचे होणार आहे. प्रथमोपचार साहित्य नेण्यासाठी विधानसभा मतदारसंघनिहाय वाहन व कर्मचाऱ्यांची व्यवस्था करण्यात आली होती.

साहित्य व्यवस्थापन कक्षाच्या समन्वयक अधिकारी रेश्मा माळी यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक समन्वयक अधिकारी सूर्यकांत पठाडे यांच्या उपस्थितीत मेडिकल कीटचे वितरण करण्यात आले.
0000

 हास्य जगण्याचे हे टॉनिक- मुरलीधर मोहोळ 

जागतिक हास्य दिनी नवचैतन्य हास्ययोग परिवारातर्फे विशेष कार्यक्रम

पुणे : “जागतिक हास्य दिन साजरा कसा करावा, याचा आदर्श पुणेकरांनी घातला आहे. हास्य जगण्याचे टॉनिक आहे. कोरोना काळात हास्ययोगाचा झालेला फायदा अनुभवला आहे.  स्वच्छ, हरित व सुंदर पुण्याला हसरे पुणे बनविण्यात आपण पुढाकार घेतला आहे. आनंदी व सुदृढ पुणे होण्यास ही चळवळ लाभदायक आहे.”असे येथे मुरलीधर मोहोळ म्हणाले

‘स्वच्छ पुणे, सुंदर पुणे’ याचा आपल्याला अभिमान आहेच. यासह आता पुण्याला हसरे, निरोगी व आनंदी ठेवण्याची गरज असून, त्यासाठी हास्ययोग महत्वाचा आहे. पुणेकरांमध्ये हास्ययोगातून नवचैतन्य फुलवण्याचे काम हास्ययोग चळवळ गेली तीन दशके करत आहे, अशा भावना त्यांच्यासह मान्यवरांनी जागतिक हास्य दिनी व्यक्त केल्या. 
जागतिक हास्य दिनानिमित्त नवचैतन्य हास्ययोग परिवारातर्फे बालगंधर्व रंगमंदिरात विशेष कार्यक्रमाचे आयोजन केले होते. हास्य प्रात्यक्षिके, शरीर व मनाचे आरोग्य आणि ‘स्वरगंधर्व सुधीर फडके’ चित्रपटातील कलाकारांशी संवाद असे या कार्यक्रमाचे स्वरूप होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला व शेवटी हास्ययोगाच्या विविध प्रकारातून विठ्ठल काटे व सुमन काटे आणि मकरंद टिल्लू यांनी प्रात्यक्षिके घेतली.
यावेळी लेखक-दिग्दर्शक योगेश देशपांडे, संवाद पुणेचे सुनील महाजन, अग्रवाल आय हॉस्पिटलचे डॉ. निखिल ऋषीकेशी, गंगोत्री होम्सचे मकरंद केळकर, प्रसिद्ध व्यावसायिक प्रकाश धोका, माजी महापौर मुरलीधर मोहोळ, उद्योजक प्रसन्न पाटील, नवचैतन्य हास्ययोग परिवाराचे संस्थापक विठ्ठल काटे व सुमन काटे, समन्वयक मकरंद टिल्लू, सचिव पोपटलाल शिंगवी, उपाध्यक्ष विजय भोसले व सहकारी आदी उपस्थित होते.
विठ्ठल काटे म्हणाले, “शरीर व मनाचे आरोग्य सुदृढ राहण्यासाठी हास्य योग अतिशय उपयुक्त आहे. हास्य योगाने प्रत्येकाच्या जीवनात नवचैतन्य फुलावे. गेल्या २७ वर्षांपासून हास्ययोग चळवळीतून आम्ही लोकांच्या जीवनात आनंद पेरण्याचे काम करत आहोत. व्याख्याने, उपक्रम यातून चळवळ अधिक व्यापक होत असल्याचा आनंद आहे.”

मकरंद टिल्लू म्हणाले, “एक लाख लोक या चळवळीला जोडण्याचे लक्ष्य आहे. गृहनिर्माण संस्था, विविध भाग, समूहात चळवळ पोहोचवायची आहे. लोकांना तणावमुक्त आणि आनंदी करण्याचे सर्वात मोलाचे काम आहे. रक्ताच्या नात्यासह हास्याची नाती जोडली जाताहेत, ही आनंदाची बाब आहे.”

डॉ. निखिल ऋषिकेशी म्हणाले, “या चळवळीने लोकांना तरुण केले आहे. हसण्याने डोळ्यांचे स्नायू सक्षम होतात. डोळ्यांतील कोरडेपणा जातो. रक्तदाब, मधुमेह यामुळे डोळ्यांचे बळावणारे आजार या व्यायामाने नियंत्रणात येतात. शारीरिक व मानसिक व्याधीमुक्त जीवन जगण्यासाठी हास्य योग उपयुक्त आहे.”
मकरंद केळकर म्हणाले, “आमच्या प्रकल्पात पर्यावरण पूरक विकासाला अधिक प्राधान्य दिले आहे. अनुभवातून जाणवलेल्या त्रुटी दूर करून आरोग्याला पोषक घरांची निर्मिती केली जात आहे. हास्ययोग सुरु करता येतील, अशा जागा उपलब्ध करून आनंदी विचार देणाऱ्या हास्य क्लबला प्रोत्साहन देत आहोत.”
यावेळी शंभर टक्के मतदान करण्याची शपथ उपस्थितांनी घेतली. पोपटलाल सिंघवी यांनी स्वागत-प्रास्ताविक केले. मकरंद टिल्लू यांनी सूत्रसंचालन केले. विजय भोसले यांनी आभार मानले. 

‘स्वरगंधर्व सुधीर फडके’ टीमशी संवादहास्य दिनाच्या या कार्यक्रमात ‘स्वरगंधर्व सुधीर फडके’ या चित्रपटाच्या टीमशी संवाद साधला. मकरंद टिल्लू यांनी चित्रपटाचे लेखक-दिग्दर्शक योगेश देशपांडे, अभिनेत्री अपूर्वा मोडक व कलाकारांची मुलाखत घेतली. चित्रपट निर्मितीचा प्रवास देशपांडे व मोडक यांनी उलगडला. हास्य ही वैश्विक भाषा असून, आनंदी जीवनासाठी आपण तिचा अंगीकार केला पाहिजे. आजच्या या कार्यक्रमाने मला आणखी जोमाने काम करण्याची प्रेरणा व नवचैतन्य मिळाल्याची भावना देशपांडे यांनी व्यक्त केली.

ट्रेलर बघताच आढळराव पाटलांची बोलती बंद

जो माणूस आव्हान देऊन शब्द फिरवतो त्याच्यावर विश्वास कसा ठेवायचा – डॉ. अमोल कोल्हे यांचा सवाल

मी पुरावे समोर ठेवलेत, शिवाजीदादा दिलेल्या शब्दाला जागणार का?

अमोल कोल्हेनी दाखवले आढळराव पाटलांनी संसदेत संरक्षण विषयी वारंवार विचारलेल्या प्रश्नाचे पुरावे

शिरूरसारख्या ग्रामीण मतदारसंघातल्या तत्कालीन खासदार आढळराव पाटलांनी संरक्षण विभागाला पार्टस पुरवणाऱ्या कंपनीचे प्रश्न विचारल्याने आश्चर्य!

आढळराव पाटिल कसा ‘डिफेन्स’ करणार त्याकडे लक्ष

गावाखेड्यातले, शेतीमातीचे प्रश्न सोडून आढळराव भलतेच प्रश्न लोकसभेत मांडत असताना आढळून आल्याने संशयचे मळभ आणखीन गडद होतय.

शिरुर – लोकसभेच्या शिरुर मतदारसंघात महाविकास आघाडी आणि महायुतीच्या उमेदवारांमध्ये चांगल्याच शाब्दिक चकमकी रंगल्यात. महायुतीचे उमेदवार माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी डॉ. अमोल कोल्हे यांनी केलेल्या आरोपांचे पुरावे सादर करण्याच आव्हान दिलं होतं. त्यावर पुराव्यांचा ट्रेलर दाखवल्यावर आढळराव पाटलांनी हा आपल्याला घेरण्याचा प्रयत्न असल्याचं सांगत, कोल्हेंच्या कोणत्याच आरोपांना उत्तर देणार नसल्याचं सांगितलं. त्यावर डॉ. कोल्हे यांनी ट्रेलर बघताच आढळराव पाटलांची बोलती बंद झाल्याचं सांगत,  आढळराव पाटलांचा शेलक्या शब्दात समाचार घेतलाय.

महाविकास आघाडीतील शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी ओतूर मध्ये झालेल्या शरद पवारांच्या जाहीर सभेत आढळराव पाटील यांच्यावर थेट निशाणा साधला होता. काही लोक फक्त व्यापार करण्यासाठी संसदेत गेले. संसदेत 60-70 प्रश्न फक्त संरक्षण खात्याविषयी विचारले गेले. हे प्रश्न विचारून कोणाच्या कंपनीच भल होतंय हे कळतय, असं म्हणत काही प्रश्न उपस्थित केले.

यानंतर दोन दिवसांनी आढळराव पाटलांनी कोल्हे यांनी केलेले आरोप फेटाळत, पुरावे द्या, राजकारणातून बाजूला होतो, असं आव्हान दिले. हे आव्हान स्वीकारत डॉ. कोल्हे यांनी आजच्या शिरुर तालुक्याच्या दौऱ्यात, पाणबुडीवरून क्षेपणास्त्र डागण्याचा प्रश्न एकदा नव्हे तर दोनदा विचारल्याच, पुराव्यानिशी डॉ. कोल्हे यांनी दाखवून दिलं.

यानंतर लगेच आढळराव पाटील यांनी, हा सगळा आपल्याला डॉ. कोल्हे यांच्या कोणत्याच आरोपांना उत्तर द्यायच नाही, असं सांगितलं. यावर कोल्हेंनी आढळराव पाटलांना चांगलचं धारेवर धरलं.

डॉ. कोल्हे म्हणाले की, सुरवातीलाच सांगितलं होतं, आव्हान दिल्यानंतर शब्द फिरवू नका. पण ट्रेलर बघितल्यावरच त्यांची बोलती बंद झाली. पानुबुडीवरून क्षेपणास्त्र डागण्याचा शिरूर लोकसभा मतदार संघाशी आणि विकासासाठी काय संबंध याच उत्तर त्यांनी द्यावं.
तीन टर्म विश्वास ठेवून संसदेत पाठवलं होत, मग कोणत्या कंपनीच भलं करण्यासाठी हे प्रश्न विचारले, याच उत्तर आढळरावांनी द्यायला हवं.आज सगळ्या सरड्यांनी संपावर जाण्याचा निर्णय घेतला असेल इतक्या पटकन त्यांनी रंग बदलेत, असा टोला लगावत आढळराव पाटलांनी संरक्षण खात्याला आवश्यक असणाऱ्या सांधनांच्या खरेदी संदर्भातच प्रश्न का विचारलेत, याच उत्तर देणे ही त्यांची नैतिक जबाबदारी आहे. त्यामुळं उत्तर देणार नाही, अस म्हणून चालणार नाही, अशा शब्दात आढळराव पाटलांना जाहीरपणे सुनावलं आहे.

100 कोटी घेऊन दक्षिण पुण्यातला खुटे दुबईला पसार झाल्याचा संशय-ED चे व्हीआयपीएस ग्रुप ऑफ कंपनीवर छापे

पुणे- जादा परताव्याचे आमिष देत गुंतवणूकदारांची १०० कोटी रुपयांंची फसवणूक करणाऱ्या पुण्यातील व्हीआयपीएस ग्रुप ऑफ कंपनीची ५ कोटी रुपयांची मालमत्ता सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) जप्त केली. ईडीच्या पथकाने पुणे, नाशिक, कोल्हापूर येथील कार्यालयांवर छापे टाकले. व्हीआयपीएस ग्रुप ऑफ कंपनीच्या पुणे, नाशिक, कोल्हापूर परिसरातील कार्यालयांवर छापे टाकण्यात आले.१०० कोटी रुपयांची रक्कम हवालामार्गे परदेशात पाठवून फसवणूक प्रकरणाचा मुख्य सूत्रधार विनोद खुटे दुबईत पसार झाल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे. व्हीआयपीएस कंपनी आणि ग्लोबल ॲफिलेट बिझनेस कंपनीने गुंतवणूकदारांना गुंतवणुकीवर आकर्षक व्याजदराचे आमिष दाखवले होते. विनोद खुटेने परदेशी मुद्रा विनिमय व्यवहार (फाॅरेक्स) ट्रेडिंग कंपनी सुरू केली होती. गुंतवणूकदारांकडून आलेले पैसे त्याने कान्हा कॅपिटल कंपनीत वळवले होते. त्याने गुंतवणूकदारांकडून आलेले पैसे बनावट कंपनीच्या नावाने उघडलेल्या खात्यात वळवले होते.

ED केलेल्या कारवाईत रोकड, मुदत ठेवीच्या पावत्या, दागिने असा ५ कोटी रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. व्हीआयपीएस कंपनीचे संचालक विनोद तुकाराम खुटे, संतोष तुकाराम खुटे, मंगेश खुटे (तिघे रा. निर्माण व्हिवा सोसायटी, सिंहगड महाविद्यालयाजवळ, आंबेगाव बुद्रुक), किरण पितांबर अनारसे, अजिंक्य बडघे यांच्यासह साथीदारांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुंतवणूकदारांना जादा परताव्याचे आमिष दाखवून व्हीआयपीएस कंपनीचा संचालक विनोद खुटे आणि साथीदारांनी फसवणूक केली होती. आंबेगाव बुद्रुक परिसरातील कार्यालयाला खुटे टाळे लावून पसार झाला. गुंतवणूकदारांना परतावा दिला नसल्याने शेकडो गुंतवणूकदारांनी पोलिसांकडे तक्रार दिली होती. तपासात खुटे आणि साथीदारांनी १०० कोटी रुपयांची फसवणूक केल्याचे उघडकीस आले. याबाबत ईडीचे सहायक संचालक रत्नेशकुमार कर्ण (४३) यांनी भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात फिर्याद दिली होती.

ईडीकडून या प्रकरणात तपास करण्यात येत होता. गेल्या वर्षी जून महिन्यात ईडीने पुणे, मुंबई, अहमदाबादमधील व्हीआयपीएस कंपनी तसेच अहमदाबादमधील ग्लोबल ॲफिलेट बिझनेस या वित्तीय संस्थांवर कारवाई केली होती. ईडीच्या मुंबई विभागीय कार्यालयाने ही कारवाई केली होती. पीएमएलए (प्रिव्हेन्शन ऑफ मनी लाँड्रिंग ॲक्ट) कायद्यान्वये कारवाई केली होती. विनोद खुटेच्या कुटुंबीयांच्या नावे असलेली ८ कोटी ९८ लाख रुपयांची मालमत्ता, व्हीआयपीएस आणि ग्लोबल ॲफिलेट बिझनेस कंपनीच्या नावावर असलेल्या ५ सदनिका, २ मालमत्ता, २ कार्यालये आणि नगर येथील दोन हेक्टर जमीन जप्त करण्यात आली होती. मार्च महिन्यात ईडीने छापे टाकून २४ कोटी ४१ लाख रुपयांची मालमत्ता जप्त केली होती. फसवणूक प्रकरणाचा मुख्य सूत्रधार विनोद खुटे याने वेगवेगळ्या नावे दोन वित्तीय संस्था सुरू करून गुंतवणूकदारांची १०० कोटी रुपयांहून जास्त रकमेची फसवणूक केली होती. हवालाच्या माध्यमातून त्याने ही रक्कम परदेशात पाठवल्याचे तपासात उघडकीस आले होते. आतापर्यंत ७० कोटी ८९ लाखांची मालमत्ता जप्त करण्यात आली आहे.

काश्मीरमध्ये दहशतवादी हल्ला..

श्रीनगर: जम्मू-काश्मीरमधील पूंछमध्ये शनिवारी, 4 मे रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात पाच जवान जखमी झाले. यातील 2 जणांची प्रकृती चिंताजनक आहे. त्याला रुग्णालयात नेण्यात आले आहे.पूंछमधील शशिधर भागात दहशतवाद्यांनी सुरक्षा दलाच्या दोन वाहनांवर जोरदार गोळीबार केला. त्यातील एक वाहन हवाई दलाचे होते. दोन्ही वाहने सनई टोपकडे जात होती.

21 डिसेंबर रोजी सुरनकोटमध्ये दहशतवाद्यांनी लष्कराच्या ताफ्यावर हल्ला केला होता. यामध्ये 5 जवान शहीद झाले. ही घटना 4 दहशतवाद्यांनी घडवली होती. दहशतवाद्यांनी अमेरिकन एम-4 कार्बाइन असॉल्ट रायफलमधून स्टीलच्या गोळ्या झाडल्या होत्या. या पोलादी गोळ्या लष्कराच्या वाहनांच्या जाड लोखंडी पत्र्यांमधून जाऊन सैनिकांच्या अंगावर आदळल्या.

पीपल्स अँटी फॅसिस्ट फ्रंट (PAFF) या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे. दहशतवाद्यांनी हल्ल्याच्या ठिकाणाची छायाचित्रेही सोशल मीडियावर जारी केली, ज्यामध्ये त्यांनी एम-4 रायफल वापरल्याचा दावा केला आहे.

पीएमपीचा प्रवास होणार आनंददायी-मुरलीधर मोहोळ

पुणे-जलद, सुरक्षित आणि किफायतशीर पीएमपीच्या सेवेतून पुणेकरांचा प्रवास आनंददायी व्हावा यासाठी कटिबद्ध असल्याची ग्वाही पुणे लोकसभा मतदारसंघातील भाजप महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांनी दिली.

वानवडी, क्लोव्हर व्हिलेज, गंगा सॅटेलाईट, नेताजीनगर, हौसिंग बोर्ड, साळुंखे विहार या परिसरात मोहोळ यांची प्रचार फेरी आयोजित करण्यात आली होती. आमदार सुनील कांबळे, बाबू वागस्कर, कालिंदाताई पुंडे, धनराज घोगरे, दिलीप गिरमकर, मकरंद केदारी, दिनेश होले, सागर गव्हाणे, कोमल शेंडकर, सचिन मथुरावाला, तात्या शेंडकर, मारूती भद्रावती, निलेश अशोक कांबळे, दिलीप जांभुळकर, प्रसाद चौघुले, मनोज चोरडिया, निशा कोटा, अतुल वानवडीकर, दिनेश सामल यांची प्रमुख उपस्थिती होती.

मोहोळ म्हणाले, सार्वजनिक वाहतुकीसाठी देशात सर्वाधिक इलेक्ट्रिक आणि सीएनजी बसेस पीएमपीच्या ताफ्यात आहेत. गेल्या पाच वर्षांत पीएमपीला केंद्र सरकारच्या फेम 2 योजनेअंतर्गत 150 ई बसेस मिळाल्या आहेत. अपेक्षित 650 ई बसेसपैकी 473 बसचा वापर सुरू झाला असून, उर्वरित बसेस लवकरच येतील.
शहराच्या चारही दिशांना सहा ई बस चार्जिंग डेपो कार्यान्वित करण्यात आले आहेत. नजिकच्या काळात 500 सीएनजी बसेसची निविदा प्रक्रिया सुरू आहे. इलेक्ट्रिक बसमुळे वहनखर्चात 70 टक्केत तर कार्बन उत्सर्जनात 50 टक्के घट होते. मेट्रो नेटवर्कला फीडर सेवेवर भर देण्यात येणार आहे.

एसी,एसटीच्या आरक्षणाविषयी भुमिका स्पष्ट करा-भाजपचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये

पुणे : एससी आणि एसटी आरक्षणाला धक्का लावणार नाही. त्याचबरोबर धर्मावर आधारित आरक्षण देणार नाही अशी ठाम भूमिका काँग्रेसचे नेते राहुल गांधी घेतील अशी अपेक्षा होती, मात्र यावर ते काहीच बोलले नाहीत असा सवाल प्रदेश भाजपचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी उपस्थित केला.

माजी नगरसेवक महेश वाबळे, रासपचे शहराध्यक्ष बालाजी पवार, कवाडे गटाचे प्रकाश भालेराव, नितीन पंडित, महायुतीचे समन्वयक संदीप खर्डेकर, अमोल कविटकर, हेमंत लेले, पुष्कर तुळजापूरकर उपस्थित होते.

काँग्रेस पक्षाच्या कथनी आणि करणीमध्ये फरक आहे. कर्नाटकामध्ये त्यांनी मुस्लिम समाजाला ओबीसीमधून आरक्षण दिले आहे. त्यामुळे पन्नास टक्के आरक्षणाची मर्यादा वाढविण्याची भाषा करत असताना इतर समाजाच्या आरक्षणाला धक्का लागणार नाही हे त्यांनी स्पष्ट करावे. राहूल गांधी यांनी रोहित वेमुलावरुन अनेक भाषणे केली. त्याच वेमुलाची फाईल बंद करण्यात आली आहे. काँग्रेस उघड हिंदू विरोधी भूमिका घेत आहे. त्यामुळे महाविकास आघाडीमध्ये सहभागी असणार्‍या शिवसेना उध्दव ठाकरे गटाला ही भुमिका मान्य आहे का? हे स्पष्ट करावे. 370 कलम पुन्हा आणू, ट्रिपल तलाक कायदा पुन्हा आणू, असे म्हणणार्‍या काँग्रेसची भूमिका ठाकरेंना मान्य आहे का ? ठाकरे हिंदुत्वाच्या पोकळ गप्पा मारतात.
रेवन्नाचा मुद्दा राहुल गांधी यांनी उपस्थित केला. एक वर्ष काँग्रेस सरकार या क्लिपवर शांत का होती? कारवाई का केली नाही. त्यांच्यावर कोणी दबाव आणला होता. केवळ त्यांना या मुद्द्यावरून राजकारण करायचे आहे का? असे सवाल उपाध्ये यांनी उपस्थित केले.

म्हाळुंगे येथे गावठी दारुसह २ लाख ६८ हजार रूपयांचा मुद्देमाल जप्त

पुणे, दि. ४: राज्य उत्पादन शुल्क पुणे विभागाच्या पथकाने गोपनीय माहिती मिळाल्यानुसार म्हाळुंगे गावाच्या हद्दीत टाकलेल्या छाप्यात गावठी दारुसह सोनेरी रंगाची सॅन्ट्रो कार असा २ लाख ६८ हजार २०० रूपयांचा मुद्देमाल जप्त केला.

या छाप्यात अंदाजे २ लाख २५ हजार रुपयांच्या सॅन्ट्रो कारमध्ये ३५ लीटर क्षमतेच्या १२ प्लास्टीक कॅनमध्ये अंदाजे ४३ हजार २०० रुपये किंमतीची दारु असा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या गुन्ह्यामधील फरार आरोपीचा शोध सूरू असून आरोपी विरूद्ध मुंबई दारूबंदी कायदा १९४९ चे कलम ६५ (ए)(ई) नुसार गुन्हा नोंद करण्यात आला आहे. निरीक्षक सचिन श्रीवास्तव पुढील तपास करीत आहेत.

ही कारवाई डी विभागाचे निरीक्षक सचिन श्रीवास्तव, दुय्यम निरीक्षक विजय सूर्यवंशी, शीतल देशमुख, सागर ध्रुवे जवान संजय गोरे, राजू

बॉईज स्पोर्ट्स कंपनी नाशिक रोड कॅम्प येथे तायक्वांदो खेळाडू मुलांच्या निवडीसाठी प्रेरणा रॅलीचे आयोजन

पुणे, दि. ४ : बॉईज स्पोर्ट्स कंपनी, आर्टिलरी सेंटर, नाशिकरोड कॅम्प येथे १७ ते १९ मे या कालावधीत तायक्वांदो क्रीडा प्रकारातील साधारण आणि सिद्ध खेळाडूंची स्पोर्ट्स कॅडेट म्हणून प्रशिक्षणास निवड करण्यासाठी प्रेरणा रॅलीचे आयोजन करण्यात येणार असून पुणे जिल्ह्यातील तायक्वांदो खेळाडूंना संधीचा लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

बॉईज स्पोर्ट्स कंपनी, आर्टिलरी सेंटर नाशिक रोड कॅम्प हा स्पोर्ट्स ऑथॉरिटी ऑफ इंडिया आणि भारतीय लष्कर यांच्यातील संयुक्त उपक्रम आहे. या रॅलीत क्रीडा शाखेतील निवड चाचण्या, शारीरिक आणि तांत्रिक कौशल्य चाचणी भारतीय क्रीडा प्राधिकरणाचे प्रशिक्षक आणि अधिकारी मंडळाच्या अंतर्गत घेतली जाईल. संरक्षण मंत्रालय (लष्कर), भारतीय क्रीडा प्राधिकरणाच्या एकात्मिक मुख्यालयाने मंजूर करेपर्यंत ही निवड तात्पुरती राहील. अंतिम मंजुरी मिळाल्यानंतर निवडलेल्या कॅडेट्सना प्रशिक्षणासाठी बोलावले जाईल.

खेळाडूंचे वय १७ मे २०२४ रोजी ८ ते १४ वर्षे दरम्यान (जन्म १७ मे २००८ ते १७ मे २०१४ दरम्यान) असावे. आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय स्तरावरील पदक विजेत्यांच्या अपवादात्मक उल्लेखनीय प्रकरणांमध्ये कमाल वयोमर्यादा १६ वर्षांपर्यंत राहिल. वयानुसार उंची व वजनाचे मापदंड राहतील. शारीरिक मापदंडामध्ये कोणतीही कमतरता सामान्यतः स्वीकारली जाणार नाही. तथापि, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय प्रमाणपत्रे किंवा पदके असलेल्या अपवादात्मक प्रतिभावान मुलांच्या बाबतीत उंची आणि वजनाचे निकष शिथिल केले जातील. वैद्यकीय तपासणी वैद्यकीय स्पोर्ट्स मेडिसीन सेंटरच्या तज्ज्ञ अधिकाऱ्याकडून केली जाईल.

खेळाडूंचा जन्माचा दाखला, शैक्षणिक प्रमाणपत्र, शाळेतून किंवा सरपंच यांनी दिलेले चारित्र्य प्रमाणपत्र व अधिवास प्रमाणपत्राच्या मूळ प्रती, जिल्ह्यातील क्रीडा सहभाग, पदक प्रमाणपत्रांच्या मूळ प्रती आणि ज्या पातळीवर खेळ खेळले आहेत त्या पातळीवरील मूळ प्रमाणपत्रे उमेदवाराला सादर करावी लागतील. त्याचबरोबर सहा रंगीत पासपोर्ट आकाराचे छायाचित्र व अर्जासोबत साक्षांकित केलेली प्रमाणपत्राची एक प्रत जमा करावी लागेल.

निवडलेल्या उमेदवारांना बॉईज स्पोर्ट्स कंपनीकडून बोर्डिंग व लॉजिंग, सहावी ते दहावीपर्यंतची इंग्रजी माध्यमाची पुस्तके, स्टेशनरी, वर्षातून एकदा पूर्ण स्पोर्ट किट, पूर्ण भारतात स्पर्धा प्रदर्शनासाठीचा खर्च आदी सुविधा मोफत पुरविण्यात येतील. त्याचबरोबर वैद्यकीय आणि अपघात विमा संरक्षण दिले जाईल. उमेदवार १० वी उत्तीर्ण झाल्यावर आणि १७ वर्षे वय झाल्यावर, सर्व अटी आणि शर्तीनुसार सैन्यात नावनोंदणीसाठी लागू असलेल्या अंतिम निवड प्रक्रियेत उमेदवाराचे नाव दिले जाईल. कोणत्याही कारणास्तव सैन्यात नावनोंदणी होऊ न शकल्यास अशा मुलांचे पालक मुलांवर शासनाने केलेल्या खर्चाची प्रतिपूर्ती करण्यास जवाबदार असतील. निवडलेल्या मुलांच्या पालकांनी यासाठी बिगर न्यायालयीन मुद्रांक कागदावर हमीपत्र देणे आवश्यक आहे.

प्रेरणा रॅलीच्या कालावधीत जेवण आणि राहण्याचा खर्च उमेदवारांनी स्वत: करणे आवश्यक आहे. चाळणीद्वारे निवड कालावधीत, उमेदवार आणि त्यांच्यासोबत आलेल्या व्यक्तींनी नाशिक येथे त्यांच्या राहण्याची व वाहतुकीची व्यवस्था स्वतः करावी. रॅलीच्या संपूर्ण प्रक्रियेदरम्यान उमेदवारांसोवत कोणत्याही महिलांना परवानगी दिली जाणार नाही.

नोंदणीसाठी उमेदवारांनी आर्टीलरी सेंटर, नाशिक रोड कॅम्प येथे १७ मे रोजी सकाळी ७ नंतर उपस्थित रहावे. संपूर्ण निवड प्रक्रिया तीन दिवसांत पार पाडण्याची शक्यता आहे. निवड प्रगतीशील टप्प्यात होईल. जे उमेदवार कोणत्याही टप्प्यावर योग्य नाहीत त्यांना निवड चाचणीच्या पुढील टप्यात सहभागी होण्याची परवानगी दिली जाणार नाही. निवड झालेल्या मुलांना निवड चाचणीच्या तारखेपासून ३ ते ६ महिन्यांच्या आत बीएससी, आर्टिलरी सेंटर, नाशिकरोड कॅम्पमध्ये रूजू होण्यासाठी एसआयए कडून योग्य मान्यता मिळाल्यानंतर निश्चित तारीख नंतर कळविण्यात येईल.

अधिक माहितीसाठी ऑफिसर कमांडिंग आर्मी बॉईज स्पोर्ट्स कंपनी, आर्टिलरी सेंटर, नाशिक रोड कॅम्प पिन – ९०८८०० द्वारा ५६ अेपीओ येथे किंवा तायक्वांदो प्रशिक्षक भ्रमणध्वनी क्रमाक ७००५०५३८८२ वर संपर्क साधावा. या रॅलीकरिताचे अर्ज जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, पुणे येथे उपलब्ध आहेत, असेही जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी लेफ्टनंट कर्नल हंगे स. दै. (नि). यांनी कळविले आहे.
0000

संजय राऊत म्हणाले,’ 800 कोटींचा भूसंपादन घोटाळा बाहेर काढणार

मुंबई-राज्यातील सत्ताधाऱ्यांनी नाशिकच्या महानगरपालिकेत मोठा भूसंपादन घोटाळा केल्याचा आरोप शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी केला आहे. तसेच, या घोटाळ्याचे पुरावे येत्या दोन दिवसात सादर करणार असल्याचेही ते म्हणाले. राऊतांच्या या गौप्यस्फोटानंतर राज्यातील राजकारणात चांगलीच खळबळ माजली आहे.

संजय राऊत यांनी एक्स (ट्विटर) या सोशल मिडिया माध्यमावर (ट्वीट) एक पोस्ट शेअर करत शिंदे-फडणवीस सरकारवर निशाणा साधला आहे. पोस्टमध्ये म्हटले आहे की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या काळात भ्रष्ट्राचार हाच शिष्टाचार ठरत आहे. सध्याचे महाराष्ट्रातील मिंधे सरकार हे त्याचे ज्वलंत उदाहरण आहे.नाशिक महानगरपालिका हद्दीत 800 कोटींचा भुसंपादन घोटाळा नगरविकास खात्याने केला असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व त्यांचे लोक या गैरव्यवहारातले थेट लाभार्थी आहेत. मी दोन दिवसांत यावर स्फोट करीन. तोपर्यंत लाभार्थ्यांनी शांतपणे झोपावे, असा इशाराही राऊतांनी दिला आहे. तसेच, महाराष्ट्र कोण लुटत आहे? असा सवाल देखील त्यांनी उपस्थित केला आहे. आता नाशिकमधील भूसंपादन घोटाळ्याचे नेमके प्रकरण आहे तरी काय? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. तसेच संजय राउतांच्या पोस्टनंतर शिंदे-फडणवीस सरकार यावर काय उत्तर देणार? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

संजय राऊत यांनी एका बाजूला मुख्यमंत्र्यांवर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप केलेले असतानाच राज्यातील कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न उपस्थित करून उपमुख्यमंत्री तथा राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावरही निशाणा साधला आहे. बॉलिवूड अभिनेता सलमान खानच्या वांद्रे येथील गॅलेक्सी अपार्टमेंट या घराजवळ झालेल्या गोळीबाराप्रकरणी मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने अटक केलेल्या आरोपींपैकी एक अनुज थापन याने बुधवारी (1 मे) पोलिस कोठडीत आत्महत्या केली आहे. या आत्महत्येच्या घटनेवरून राऊत यांनी थेट राज्याचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांवर आरोप केला आहे.संजय राऊत म्हणाले, या प्रकरणात अनेक रहस्य आहेत. पोलिस कोठडीत एखाद्या संशयित आरोपीचा मृत्यू झाला आहे, याचा अर्थ या घटनेला महाराष्ट्राचे गृहमंत्रालय, गृहमंत्री तथा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मुंबईचे पोलिस आयुक्त जबाबदार आहेत. या आत्महत्याप्रकरणी अधिक तपास करण्याची गरज आहे. आम्ही तशी मागणी करतोय. मात्र ही मागणी करून काहीच होणार नाही. कारण त्यासाठी सरकार बदलणे आवश्यक आहे. सरकार बदलले तर अशा प्रकरणांचा तपास होईल. अन्यथा हे लोक अशी प्रकरणे दाबतील.

अभिनेता गोविंदा पिंपरीत करणार रोड शो …

पिंपरी, दि. 4 मे – मावळ लोकसभा मतदारसंघातील शिवसेना-भाजप-राष्ट्रवादी- मनसे- आरपीआय- रासप- मित्रपक्ष महायुतीचे उमेदवार खासदार श्रीरंग बारणे यांच्या प्रचाराच्या शेवटच्या टप्प्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अजितदादा पवार, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, नामवंत अभिनेता गोविंदा या मान्यवरांच्या सभा व रोड शो होणार आहेत, अशी माहिती शिवसेनेचे जिल्हाप्रमुख बाळासाहेब वाल्हेकर यांनी दिली.

रविवारी (5 मे) संध्याकाळी पाच वाजता लोकप्रिय अभिनेता गोविंदा यांच्या हस्ते महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणे यांच्या मध्यवर्ती निवडणूक कार्यालयाचे उद्घाटन होणार आहे. पिंपरी येथे डॉ. आंबेडकर पुतळ्याच्या मागे हे निवडणूक कार्यालय सुरू करण्यात आले आहे. उद्घाटन समारंभानंतर पिंपरी कॅम्प, पिंपरीगाव भागात गोविंदा यांचा रोड शो होईल.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सोमवारी (6 मे) पिंपरी-चिंचवडमध्ये रहाटणी येथे तर पनवेल मध्ये खारघर येथे प्रचार सभा घेणार आहेत. रहाटणी येथील कापसे लॉन्स येथे दुपारी दोन वाजता तर खारघर येथील रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलच्या मैदानावर पाच वाजता त्यांची सभा होणार आहे.

केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी हे मंगळवारी (7 मे) संध्याकाळी सहा वाजता कर्जत तालुक्यातील चौक फाटा मैदानावर जाहीर सभा घेणार आहेत.

राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष व उपमुख्यमंत्री अजित पवार हे गुरुवारी (9 मे) पिंपरी-चिंचवडमध्ये एक सभा मावळ विधानसभा मतदारसंघात एक सभा घेणार आहेत.

निवडणुकीच्या प्रचाराची सांगता शनिवारी (11 में) पिंपरी-चिंचवडमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या रोड शोने होईल. त्यानिमित्त महायुतीच्या वतीने जोरदार शक्ती प्रदर्शन करण्यात येणार आहे.

चैतन्य, निक्षेप, शरयू उपांत्य फेरीत

सुधांशू बॅडमिंटन अकादमीच्या वतीने एसबीए कप सुपर – ५०० बॅडमिंटन स्पर्धा

पुणे : चैतन्य खरात, निक्षेप कात्रे, जयंत कुलकर्णी यांनी सुधांशू बॅडमिंटन अकादमीच्या वतीने आणि पीडीएमबीएच्या सहकार्याने आयोजित योनेक्स-सनराईझ एसबीए कप जिल्हा सुपर-५०० मानांकन बॅडमिंटन स्पर्धेत पुरुष एकेरीत आपापल्या प्रतिस्पर्ध्यावर मात करून उपांत्य फेरीत प्रवेश केला. महिला एकेरीत शरयू रांजणे, अनुष्का जयस्वाल यांनीही आगेकूच कायम राखली.

शिवाजीनगर येथील पीडीएमबीए मॉडर्न स्पोर्ट्स कॉम्प्लेक्समध्ये ही स्पर्धा सुरू आहे. या स्पर्धेत पुरुष एकेरीच्या उपांत्यपूर्व फेरीत अग्रमानांकित चैतन्य खरातने अरहम रेदासानीवर २१-१५, २१-१२ असा विजय मिळवला. आता चैतन्यची उपांत्य लढत निक्षेप कात्रेविरुद्ध होईल. निक्षेपने विवेक चंद्रवंशीवर २१-१६, १८-२१, २१-१८ असा विजय मिळवला. यानंतर जयंत कुलकर्णीने आदित्य शर्माला २१-१७, २१-१७ असे नमविले. जयंतची उपांत्य लढत द्वितीय मानांकित प्रणव गावडे विरुद्ध होईल. प्रणवने हर्षिल ललवाणीवर २१-१७, २१-१८ अशी मात केली. महिला एकेरीच्या उपांत्यपूर्व फेरीत शरयू रांजणेने मनाली देशपांडेवर २१-७, २१-५ असा, अनुष्का जयस्वालने दुस-या मानांकित श्रुती कुलकर्णीवर २१-५, २१-१७ असा, प्रिया शेळकेने नेहा गाडगीळवर २१-१०, १२-२१, २१-१४ असा, तर अग्रमानांकित सिया बेहेडेने गायत्री केंजळेवर २१-१२, २१-१५ असा विजय मिळवला.

जिया, शर्वरीची आगेकूच

स्पर्धेतील १७ वर्षांखालील मुलींच्या एकेरीच्या उपांत्यपूर्व फेरीत अग्रमानांकित यशस्वी काळेने पद्मश्री पिल्लईला २१-१८, २१-७ असे नमविले. यशस्वीची लढत जिया उत्तकेरविरुद्ध लढत होणार आहे. जियाने लाभा मराठेवर २१-११, २१-७ असा विजय मिळवला. शर्वरी सुरवसेने सिया बेहेडेला २१-१६, २१-९ असे नमविले. शरयू रांजणेला राधा गाडगीळ विरुद्ध पुढे चाल मिळाली.

उपांत्यपूर्व फेरीचे निकाल – १७ वर्षांखालील मुले – वरद लांडगे वि. वि. अथर्व गोस्वामी २१-१७, २१-१६, सोहम धामे वि. वि. पार्थ झालवाडिया १९-२१, २१-१४, २१-१८, श्रेयस मासळेकर वि. वि. तनिष्क आडे १२-२१, २१-१७, २१-१८, निक्षेप कात्रे वि. वि. सुदीप खोराटे २१-१९, १३-२१, २१-१६.

१३ वर्षांखालील मुले – अर्जुन श्रीगडीवार वि. वि. मीर शाहझर अली २१-१२, २२-२०, अतिक्ष अगरवाल वि. वि. जतिन सराफ २१-५, २१-१३, हृदान पाडवे वि. वि. आरुष प्रसाद सापळे २१-११, २१-८, रझा सोमजी वि. वि. विहान कोल्हाडे १४-२१, २१-७, २१-१२.

१३ वर्षांखालील मुली – आराध्या ढेरे वि. वि. रावी म्हेत्रे २१-१३, २१-६, स्वरा मोरे वि. वि. जॅस्नम कौर चहल २१-१०, २१-१४, समन्वया धनंजय वि. वि. वल्लारी वाटाणे २१-१४, २१-८, कायरा रैना वि. वि. अदिती गिरी २१-१०, २१-६.

१९ वर्षांखालील मुले – निक्षेप कात्रे वि. वि. आरुष अरोरा २१-११, २१-१७, सिद्धांत कोल्हाडे वि. वि. पार्थ झालवाडिया १७-२१, २६-२४, २१-१२, सुदीप खोराटे वि. वि. अद्वैत नेवले २१-९, २१-८, ओजस जोशी पुढे चाल वि. कृष्णा जसूजा.

१९ वर्षांखालील मुली – यशस्वी काळे वि. वि. संस्कृती जोशी २१-१५, २१-१९, जिया उत्तेकर पुढे चाल वि. राधा गाडगीळ, सिया बेहेडे वि. वि. पीयूषा फडके २१-१३, २१-१३, एस. डाखणे वि. वि. सयुरी थोकल २१-१८, २१-१९.

१५ वर्षांखालील मुले – विराज सराफ वि. वि. आरुष सापळे २१-१२, २१-१२, तनिष्क आडे वि. वि. अर्जुन श्रीगडीवार २१-१६, २१-७, चिन्मय फणसे वि. वि. अक्षर झोपे २१-१३, २१-१०, रझा सोमजी वि. वि. ध्रुव बर्वे १८-२१, २१-१८, २१-१६.

१५ वर्षांखालील मुली – शरयू रांजणे वि. वि. कायरा रैना २१-५, २१-६, सानिका बागळे वि. वि. वेनिशा कोल्हे १८-२१, २१-१७, २१-१५, सान्वी पाटील वि. वि. अरुंधती कन्वर १८-२१, २१-१३, २१-१७, शर्वरी सुरवसे वि. वि. लाराण्या नलावडे २०-२२, २१-१०, २१-१५.

११ वर्षांखालील मुले – अद्वैत फेरे वि. वि. वरद आठल्ये २१-१५, २१-१२, वेदांत मोरे वि. वि. अरहम अछलिया २१-११, २१-१०, ईशान रॉय वि. वि. कृष्णा सावंत २१-९, २१-१३, अर्चित खांदेशे वि. वि. अमन वर्मा २१-९, २१-१५.

११ वर्षांखालील मुली – दिविशा सिंग वि. वि. तेजस्वी दरेकर २१-९, २१-७, राजलक्ष्मी थेउरकर वि. वि. रनैशा शाह २१-१२, २१-१०, अग्रिमा राणा वि. वि. पूर्वा हांडे २१-१७, २१-६, निधी गायकवाड वि. वि. वल्लरी वाटाणे १८-२१, २१-१९, २१-१९.

पेठ येथील अनुसूचित जाती व नवबौद्ध मुलांच्या शासकीय निवासी शाळेत प्रवेश घेण्याचे आवाहन

पुणे, : आंबेगाव तालुक्यात पेठ येथील अनुसूचित जाती व नवबौद्ध मुलांच्या शासकीय निवासी शाळेत मोफत प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येत असून प्रवेश घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

या निवासी शाळेला आयएसओ मानांकन मिळाले असून शाळेत इयत्ता ६ वी ते १० वी इयत्तेची सेमी इंग्रजी व मराठी माध्यमासाठी प्रवेश प्रक्रिया सूरू झाली असून अनुसूचित जातीसाठी ८० टक्के, अनुसूचित जमाती १० टक्के, विमुक्त जाती आणि भटक्या जमाती ५ टक्के, विशेष मागास प्रर्वग २ टक्के आणि दिव्यांग प्रवर्गासाठी ३ टक्के जागा आरक्षित आहेत.

प्रवेश अर्ज विनामूल्य सकाळी १० ते सायं. ५ या वेळेत कार्यालयात उपलब्ध आहेत. अर्जासोबत गुणपत्रक, शाळा सोडल्याचा दाखला, जातीचा दाखला, उत्पन्नाचा दाखला, रहिवासी दाखला, विद्यार्थी नोंद पत्रिका, विद्यार्थी व पालकांची चार रंगीत छायाचित्रे, विद्यार्थ्यांचे आधार कार्ड व बँक पासबुक आदी कागदपत्रे आवश्यक आहेत.

शाळेत संगणकीकृत अध्यापन सुविधा, सायन्स पार्क, सेमी इंग्रजी माध्यम, मोफत भोजन व निवासाची सोय, स्वच्छ वातावरण व सुसज्ज इमारत, विविध खेळ व स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन, स्वतंत्र भव्य क्रीडांगण, स्वतंत्र प्रयोगशाळा व ग्रंथालय, ई ग्रंथालय आदी सोयी सुविधा असून दरवर्षी स्नेहसंमेलन, क्रीडा मेळावा व सहलीचे आयोजन करण्यात येते.

अधिक माहितीसाठी मुख्याध्यापिका यांचा भ्रमणध्वनी क्रमांक ८९९९०४२४२८ वर संपर्क करावा, असे आवाहनही शाळेच्या मुख्याध्यापिका व्ही. बी. खाडे यांनी केले आहे.
0000