Home Blog Page 1062

उन्हाची तीव्रता लक्षात घेऊन मतदान केंद्रावर आवश्यक उपाययोजना कराव्यात!

आ. चंद्रकांत पाटील यांची जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी सुहास दिवसे यांना विनंती

पुणे-उन्हाची तीव्रता लक्षात घेऊन मतदान केंद्रांवर आवश्यक उपाययोजना कराव्यात, अशी विनंती आज आ. चंद्रकांतदादा पाटील यांनी पुणे जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी सुहास दिवसे यांना केली. तसेच, त्यासंदर्भातील निवेदन आ. पाटील यांनी दिवसे यांना दिले. यावेळी भाजपा लोकसभा निवडणूक प्रभारी दिपक पोटे हे देखील उपस्थित होते.

लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ साठी मतदान प्रक्रिया सुरू आहे. पुणे जिल्ह्यातील बारामती लोकसभा मतदारसंघासाठी ७ जानेवारी, पुणे, शिरुर, मावळ लोकसभा मतदारसंघासाठी १३ मे रोजी मतदान होणार आहे. या चारही लोकसभा मतदारसंघात उन्हाची तीव्रता अधिक असून, तापमान सरासरी ४० अंश सेल्सिअसपेक्षा जास्त आहे. राज्यातील वेगवेगळ्या लोकसभा मतदारसंघात वेगवेगळ्या टप्प्यांतील आकडेवारी वरुन उन्हाच्या तीव्रतेमुळे मतदार मतदानासाठी बाहेर पडण्यास उदासिनता दिसून येत आहे.

त्या पार्श्वभूमीवर पुण्यात मतदानाचा टक्का वाढावा; यासाठी निवडणूक आयोगाने आवश्यक उपाययोजना कराव्यात अशी विनंती आ. पाटील यांनी निवेदनाद्वारे केली. यात प्रामुख्याने प्रत्येक मतदान केंद्रांवर मंडप आणि पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करणे, मतदान केंद्रांवर वैयकीय पथक तैनात करणे, दिव्यांगांसाठी व्हिलचेअरची व्यवस्था करावी, अशी विनंती करण्यात आली आहे.

तसेच, निवडणूक आयोगाने दिव्यांग आणि ८५ पेक्षा जास्त वय असलेल्या मतदारांना घरी मतदानाचा अधिकार दिला आहे. मात्र, अनेक ठिकाणी यासाठी आवश्यक प्रक्रिया योग्य पद्धतीने न राबविण्यात आल्याने, ते मतदानापासून वंचित राहू शकतात. त्यामुळे त्यासाठी आवश्यक उपाययोजना करुन मतदान करुन घ्यावे.

त्यासोबतच अनेकदा मतदारांना त्यांची नावे वगळण्यात मतदारयादीतून आल्याची माहिती मतदानाच्या दिवशी मतदान केंद्रांवर मिळते. त्यामुळे त्यांच्यात निवडणूक प्रक्रियेसंदर्भात रोष निर्माण होतो. त्यामुळे आयोगाने याचे वेळीच सविस्तर स्पष्टीकरण करावे, आदी आशयाचे निवेदन आ. पाटील यांनी निवडणूक निर्णय अधिकारी सुहास दिवसे यांना दिले. यावेळी आ. पाटील यांची निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांसोबत वरील सर्व विषयांवर सकारात्मक चर्चा झाली.

सीएंचे प्रश्न सोडविण्यासाठी नेहमीच कटिबद्ध-चंद्रकांतदादा पाटील आणि मुरलीधर मोहोळ यांचा सीएंशी संवाद

पुणे-विविध क्षेत्रांप्रमाणेच सीए हे सर्वात प्रभावशाली आणि समाजाच्या विकासात योगदान देणारा घटक आहे. त्यामुळे सीएंच्या समस्या सोडविण्यासाठी नेहमीच कटिबद्ध आहोत, अशी ग्वाही राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण वस्त्रोद्योग आणि संसदीय कार्य मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी केले.

पुणे सीए फॅटर्निटीच्या वतीने आयोजित ‘सीए संवाद रोड टू विकसित भारत’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी पुणे लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ,शशिकांत बर्वे, राजेश अग्रवाल, विवेक मठकरी, रेखा धामणकर, शिरीष कुलकर्णी यांच्या सह चार्टर्ड अकाऊंटंट क्षेत्रातील दिग्गज मान्यवर उपस्थित होते.

नामदार चंद्रकांतदादा पाटील म्हणाले की, समाजाच्या विकासात योगदान देणाऱ्यांमध्ये सीएंचा देखील समावेश आहे. त्यामुळे त्यांच्या समस्या सोडविण्यासाठी नेहमीच कटिबद्ध आहोत, अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली.

ते पुढे म्हणाले की, माननीय देवेंद्रजी फडणवीस सरकारच्या काळात सहकारी संस्थांचे लेखापरीक्षण सीएनी करण्याचा महत्त्वाचा निर्णय घेतला. याशिवाय व्यापाऱ्यांना अतिशय जाचक ठरलेला एलबीटी कर रद्द करुन, व्यापारी वर्गाला मोठा दिलासा दिला. त्यामुळे सीए वर्गाने असे समाजाच्या सर्वांगीण विकासात अडथळे निर्माण होणारे प्रश्न निदर्शनास आणून दिले, तर त्याचा सकारात्मक प्रतिसाद देऊ, असेही त्यांनी यावेळी आश्वास्त केले. तसेच, सीएनी आपल्या समस्यांसाठी नेहमीच प्रशासनाशी संवाद ठेवला पाहिजे, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.‌

महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ म्हणाले की, गेल्या दहा वर्षांत माननीय मोदीजींनी देशासाठी काम केलं. स्वतः साठी काहीही केलं नाही. समाजाच्या शेवटच्या घटकांचा सर्वात पहिल्यांदा विचार केला. हे करताना आंतरराष्ट्रीय स्तरावर देश महासत्ता होण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. काही वर्षांत देशाला जगातील तिसरी अर्थव्यवस्था होण्याचे मोदीजींचं स्वप्न आहे.

ते पुढे म्हणाले की, पुणेकर प्रत्येक क्षेत्रात आघाडीवर आहे. मागच्या पाच वर्षांत पुणेकरांच्या समस्या सोडविण्यासाठी खूप काम केलं. पुढच्या २५ वर्षाचा विचार करता नवीन विमानतळ, जुन्या विमानतळाचं विस्तारिकरण, मेट्रोचा विस्तार, असे अनेक विषय पुढे घेऊन जायचे आहेत. सीएचे देखील अनेक समस्या असतील, तर त्या दिल्लीत सोडविण्यासाठी काम करायचं आहे; आणि तुम्ही देणारी जबाबदारी शंभर टक्के पार पाडू, अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली.‌

सीए दिनेश गांधी यांनी स्वागत करताना म्हणाले की, सीए राजकारणापासून नेहमीच लांब असतात. जेव्हा सीएंवर अन्याय होतो, तेव्हा सीए त्याचा संघर्ष करत नाहीत. त्यामुळे भविष्यात सीएनी एकत्रित येण्याची गरज आहे. जे आपले प्रतिनिधी होणार आहेत, त्यांच्या पाठिशी आपण आपली ताकद उभी केली पाहिजे. चंद्रकांतदादा पाटील आणि मुरलीधर मोहोळ हे आपल्याला नेहमीच उपलब्ध असतात. त्यामुळे आपण सर्वांनी त्यांच्या पाठिशी आपली ताकद उभी केली पाहिजे.

स्वातंत्र्यानंतर सत्तेवर आलेल्या सरकारने भारताला पुनर्वैभव प्राप्त व्हावे, यासाठी विशेष प्रयत्न केले नाहीत-निर्मला सीतारामन

पुणे – भारतावरील आक्रमणांपूर्वी भारत केवळ शिक्षणातच नव्हे तर व्यापार, उद्योग आणि व्यवसायांमध्येही जागतिक आघाडीवर होता. परंतु, आक्रमणांनंतर आपण त्यात मागे पडलो. स्वातंत्र्यानंतर सत्तेवर आलेल्या सरकारनेही भारताला पुनर्वैभव प्राप्त व्हावे, यासाठी विशेष प्रयत्न केले नाहीत. मात्र, मोदी सरकारने २०१४ पासून उच्चशिक्षणावर विशेष भर दिला. त्यामुळे भारतात उच्चशिक्षणासाठी अनेक दर्जेदार पर्याय निर्माण होऊन शिक्षणासाठी परदेशात जाण्याचे प्रमाण घटले, असे मत केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी शनिवारी व्यक्त केले.

डेक्कन कॉलेज अभिमत विद्यापीठातर्फे पंतप्रधानांच्या विकसित भारत संकल्पनेमधील शिक्षण आणि शिक्षकांचे योगदान या विषयावरील व्याख्यानात त्या बोलत होत्या. विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. प्रमोद पांडे आणि प्र. कुलगुरू प्रसाद जोशी उपस्थित होते.

१९९१ साली आर्थिक सुधारणा घडवून देशाची अर्थव्यवस्था खुली केल्याचा दावा करणाऱ्या सरकारनेही आपल्याला पुनर्वैभवाच्या दिशेने नेण्यासाठी, आत्मविश्वास जागविण्यासाठी प्रयत्नच केले नाहीत. आपल्या पूर्वापार क्षमता, वैभवशाली वारसा, पराक्रमावर विश्वास ठेवून आपण पुन्हा महासत्ता बनू शकतो, हा विश्वासच त्यांना निर्माण करता आला नाही, अशी टीकाही सीतारामन यांनी केली.

मोदी सरकार सत्तेवर आल्यानंतर २०१४ पासून आतापर्यंत १९४७ ते २०१४ पर्यंत निर्माण झालेल्या संस्थांइतक्याच उच्चशिक्षण संस्था निर्माण झाल्या. यात आयआयटी, आयआयएम, एम्स आदी संस्थांचाही समावेश आहे. खासगी संस्थांनाही मोदी सरकारने प्रोत्साहन दिले. त्यांना त्यांचा अभ्यासक्रम निश्चित करण्याची मुभा दिली. परदेशी विद्यापीठांनाही भारतात येण्याची अनुमती देत गिफ्टसिटीमध्ये कोणत्याही सरकारी नियंत्रणाशिवाय अभ्यासक्रम सुरू करण्याची परवागी दिली. त्यामुळे भारतीय विद्यार्थ्यांना भारतातच उच्च शिक्षणाचे अनेक पर्याय निर्माण झाले. परिणामी, भारतातून शिक्षणासाठी परदेशात जाण्याचे आणि तिथेच स्थायिक होण्याचे प्रमाण घटले, असे सीतारामन म्हणाल्या.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आणलेले नवे शैक्षणिक धोरण भारतात नवी क्रांती घडवेल, असे सांगून निर्मला सीतारामन म्हणाल्या. नव्या धोरणामुळे शिक्षणात लवचिकता येईल. विद्यार्थ्यांना क्रेडिट बँक उपलब्ध होईल. त्यानुसार आपल्या शिक्षणामध्येच ते अन्य आवडीच्या विषयाचा अंतर्भाव करू शकतील. तंत्रशिक्षणासह सर्व प्रकारचे उच्चशिक्षण मातृभाषेतून उपलब्ध होईल. त्यामुळे इंग्रजीच्या दडपणामुळे उच्च अथवा तंत्रशिक्षणापासून दूर राहिलेल्यांनी दर्जेदार उच्चशिक्षण उपलब्ध होईल.

रोहित वेमुलाची आत्महत्या ही दुर्दैवीच घटना आहे. परंतु, तो दलित असल्याचा अपप्रचार करून त्यावरून देशभर आंदोलन करणे आणि देशासमोर खोटे चित्र उभे करण्याचा विरोधी पक्षांचा प्रयत्न त्याहूनही वाईट होता. ज्या राहुल गांधींनी संसदेत हा मुद्दा उपस्थित केला होता. त्यांनीच आता देशाची आणि रोहित वेमुलाच्या परिवाराची माफी मागितली पाहिजे, असेही निर्मला सीतारामन म्हणाल्या.

कांदा निर्यातीवर ४० टक्के निर्यातशुल्क आकारुन शेतक-याच्या ताटात माती कालविली – अमोल कोल्हे

काठापुर/शिरुर –  कांदा निर्यातबंदी उठवली पण ४० टक्के निर्यातशुल्क आकारुन शेतक-याच्या ताटात माती कालविल्याचे काम केंद्र सरकारने केलं अशा शब्दात महाविकास आघाडीचे उमेदवार खासदार डॉ. अमोल कोल्हेंनी केंद्र सरकारच्या कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर हल्लाबोल केलाय.

महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे उमेदवार खासदार डॉ. अमोल कोल्हे आज शिरुर तालुक्याच्या दौऱ्यावर होते. त्यावेळी त्यांच्यासोबत आमदार अशोक पवार, सुरेश भोर, शेखर पाचुंदकर, दामु घोडे, अरुणा घोडे, स्वप्नील गायकवाड, रामदादा गावडे, गणेश जामदार आदी उपस्थित होते.

डॉ. कोल्हे म्हणाले की, कांदा निर्यातबंदी उठवली असली तरी हा समाधानकारक निर्णय नसुन एका हाताने द्यायचे अन दुस-या हाताने काढुन घ्यायचे असे काम सुरु आहे. लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर कांदा निर्यातबंदी उठविण्यासाठी अमोल कोल्हेंनी केंद्र सरकारला चांगलेच धारेवर धरले.

मोदी माझ्या भावाला शहजादा म्हणतात, पण ते स्वतः शेहनशहासारखे महालात,श्रीमंतांत, चैनीत रमलेत, कधी गरीबाच्या घरात डोकावले त्यांनी …?

बनासकांठा-मोदी माझ्या भावाला शहजादा म्हणतात,पण ते तर मोदी स्वतः शहेनशहासारखे महालात बसले आहेत.अशा वाक्यात काँग्रेस सरचिटणीस प्रियंका गांधी वाड्रा यांनी आज गुजरातमधील बनासकांठा येथील लाखनी येथे जाहीर सभेला संबोधित करताना राहुल गांधींना शहजादा संबोधल्याच्या वक्तव्यावरून पंतप्रधानांवर निशाणा साधला.प्रियांका म्हणाल्या- हाच शहजादा देशाच्या भगिनी, शेतकरी आणि मजुरांच्या समस्या जाणून घेण्यासाठी 4 हजार किलोमीटर पायी चालला आहे. दुसरीकडे मोदींकडे बघा, त्यांचा चेहरा बघा, हे अगदी स्पष्ट आहे. स्वच्छ कपडे आणि एक केसही इकडून तिकडे फिरकत नाही.विदेशात फिरतात समुद्रकिनारी निवांत टाईमपास करतात ,कधी ते गरीबाच्या घरी डोकावलेत, आपल्या महालात रममाण झालेल्या त्यांना तुमच्या समस्या कशा समजतील?

कोविड लसीमुळे लोक मरत असताना भाजपने लस बनविणाऱ्या कंपनीकडून देणग्या घेतल्या
भाजपने आमची बदनामी केली आणि आज जगातील सर्वात श्रीमंत पक्ष बनला आहे. कार्यालय 60 हजार कोटी रुपयांना बांधले आहे. कोविड लसीवर मिळालेल्या प्रमाणपत्रावर मोदीजींचा फोटो होता. ज्या कंपनीला मोदीजींनी कोविड लस बनवण्याचा परवाना दिला होता, त्या कंपनीकडून पक्षाने देणग्या घेतल्या, आज या लसीचे दुष्परिणाम होत असल्याच्या बातम्या येत आहेत. तरुण असताना मरत आहेत.

आपले पंतप्रधान खूप खोटे बोलतात, पण आता ते फालतूही बोलू लागले आहेत.
त्या पुढे म्हणाल्या, भारतात निवडणुका होत असून पाकिस्तानबाबत चर्चा सुरू आहे. काँग्रेस एक्स-रे मशीन आणणार असल्याचं सांगितलं जात आहे. हे मशीन तुमचे सोने चोरेल. मंगळसूत्र चोरणार. तुम्ही देशाचे पंतप्रधान आहात आणि तुम्ही इतके अतार्किक बोलत आहात. तुम्ही जगासमोर स्पष्ट बोलता म्हणून देशातील जनतेने तुम्हाला निवडून दिले.आपले पंतप्रधान खूप खोटे बोलतात, पण आता ते फालतूही बोलू लागले आहेत. तुमच्याकडे दोन म्हशी असतील तर काँग्रेस त्यातील एक चोरेल, असे त्यांचे म्हणणे आहे. आमचे सरकार 55 वर्षे टिकले असे तुम्ही सांगा. काँग्रेसने कोणाचे काय चोरले? कोणाची म्हैस चोरली, कोणाचे मंगळसूत्र चोरले? पंतप्रधान असूनही ते अतार्किक बोलतात. मला ते एक्स रे मशिन आणि ते लोकांचे सोने कसे चोरते हेदेखील पाहायचे आहे.

पीएम मोदींना आता गुजरातची जनता ओळखत नाही, जर ते गुजरातच्या लोकांपासून तोडले गेले नाहीत तर ते इथून निवडणूक का लढवत नाहीत. कारण मोदीजींना तुमच्याकडून जो काही फायदा घ्यायचा होता, त्याचा फायदा त्यांना झाला. पंतप्रधान झाल्यानंतर मोदीजींना गुजरातच्या जनतेचा विसर पडला आहे.

कार्यक्रमातही फक्त मोदीजी दिसतात
मोदीजी सबका साथ, सबका विकास बोलतात, पण तुमच्यापैकी एकाचाही विकास होत नाही. फक्त मोठे कार्यक्रम करतात. एका गोष्ट तर मानते ते इव्हेंट फार मोठे करतात. त्यात कोणतीही कमतरता नाही आणि कार्यक्रमांमध्येही फक्त मोदीजीच दिसतात. एक काळ होता जेव्हा मीडिया पंतप्रधानांना खूप प्रश्न विचारत असे, पण आज सगळेच गप्प आहेत. आज प्रसारमाध्यमांमध्ये 70 कोटी बेरोजगारांची नाही तर मोदीजींच्या कपड्यांबद्दल बातम्या येत आहेत. संपूर्ण देशात एक विचित्र परिस्थिती निर्माण झाली आहे.

गेल्या 10 वर्षांत पंतप्रधानांनी केवळ जनतेचे अधिकार कमकुवत करण्याचे काम केले आहे. आजूबाजूचे लोक त्यांना घाबरतात. त्यांच्या विरोधात आवाज उठवण्याची हिंमत कोणी करत नाही. कुणी आवाज उठवला तरी त्याचा आवाज दाबला जातो. त्यांना राज्यघटना बदलायची आहे, म्हणजेच तुम्हाला मिळालेले अधिकार कमकुवत करायचे आहेत.

बेरोजगारीच्या मुद्द्यावर प्रियांका म्हणाल्या, आज देशात सर्वाधिक बेरोजगारी आहे. देशातील कोट्यवधी तरुण बेरोजगार बसले आहेत. या सरकारनेही अग्निवीर योजना आणून लष्कर संपवले. आज कोणताही तरुण सैन्यात भरती होऊ इच्छित नाही. तो म्हणतो की, मी 5 वर्षांनी घरी आलो तर पुन्हा बेरोजगार होईन. सर्व धोरणे फक्त अब्जाधीशांसाठी बनवली जात आहेत.

गुजरातमध्ये लोकसभेच्या 26 जागा आहेत. सुरत येथे भाजपच्या उमेदवाराने यापूर्वीच बिनविरोध विजय मिळवला आहे. आता उर्वरित 25 जागांसाठी 7 मे रोजी मतदान होणार आहे. राजकीय पक्षांना 5 मे रोजी सायंकाळी 5 वाजेपर्यंतच प्रचार करता येणार आहे.

गेल्या दोन टर्ममध्ये म्हणजे 2014 आणि 2019 मध्ये, भाजपने गुजरातमधील सर्व 26 लोकसभेच्या जागा जिंकल्या आहेत. यावेळी काँग्रेस आणि आम आदमी पार्टी (आप) यांनी राज्यात भाजपविरोधात आघाडी केली आहे. युती अंतर्गत, AAP गुजरातमधील भावनगर आणि भरूच जागांवर निवडणूक लढवत आहे, तर काँग्रेसने 24 जागांवर आपले उमेदवार उभे केले आहेत.

‘महाराष्ट्र दिन’ व ‘कामगार दिना’निमित्त महापालिकेच्या सफाई कामगारांचा सत्कार

श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्टचा स्तुत्य उपक्रम

पुणे :
‘महाराष्ट्र दिन’ व ‘कामगार दिना’चे औचित्य साधून हिंदुस्थानातील पहिला सार्वजनिक गणपती ‘श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्ट’च्यावतीने पुणे महापालिकेच्या ३० सफाई कामगारांचा सत्कार करण्यात आला.

शहर स्वच्छ आणि सुंदर ठेवण्यासाठी महापालिकेचे कर्मचारी अहोरात्र झटत असतात. त्यांचे हे योगदान लक्षात घेऊन ‘श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्ट’ने या सत्कार समारंभाचे आयोजन केले होते. यावेळी डॉ. अभिजित सोनावणे आणि डॉ. मनिषा सोनावणे यांनाही ट्रस्टच्यावतीने सामाजिक कार्याबद्दल सन्मानित करण्यात आले. डॉ. सोनावणे हे रस्त्यावरील भिक्षेकरी आणि अनाथ लोकांवर आजारी पडल्यावर मोफत उपचार करतात, तसेच त्यांना छोट्या व्यवसायासाठीही मदत देऊन त्यांना स्वावलंबी बनवण्यासाठी मदत करतात.

महापालिकेच्या सफाई कामगार विभागातील वरीष्ठ आरोग्य निरीक्षक अशोक बडगर व गाडगीळ शाळा मुकादम लक्ष्मण चव्हाण यांनी सफाई कामगारांचा सत्कार केल्याबद्दल ट्रस्टचे आभार मानले. याप्रसंगी जिजामाता आरोग्य कोठी कामगार मुकादम यांच्यासह ट्रस्टचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.


‘‘नागरिकांना आरोग्यसेवा देण्याचं मोठ काम सफाई कर्मचारी वर्षभर अव्याहतपणे करत असतात. त्यांच्या या कार्याचा सन्मान करण्याची संधी ट्रस्टला मिळणं, हा एक प्रकारे ट्रस्ट्रचा सन्मानच आहे. शहराच्या स्वच्छतेत सफाई कामगार हा महत्त्वाचा घटक असल्याने ‘श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्ट’ नेहमीच या कर्मचाऱ्यांसोबत राहील.’’

पुनीत बालन
(उत्सवप्रमुख व विश्वस्त, ‘श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्ट’)

७ मे रोजी कामगारांना भरपगारी सुट्टी- जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे

मतदान केंद्राच्या माहितीसाठी मतदार सहायता कक्षाशी संपर्क साधण्याचे आवाहन

बारामती, दि. ४: जिल्ह्यात तिसऱ्या टप्प्यात बारामती लोकसभा मतदासंघाकरीता मंगळवार ७ मे रोजी मतदान होत असून मतदारसंघातील सर्व आस्थापनांनी कामगारांना मतदानासाठी भरपगारी सुट्टी द्यावी, असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ.सुहास दिवसे यांनी दिले आहेत. बारामती लोकसभा मतदारसंघांतर्गत येणाऱ्या आणि पुणे शहराशी संलग्न असलेल्या भागातील नागरिकांनी मतदान केंद्राची माहिती घेवून मतदानाचा हक्क बजवावा, असे आवाहनही डॉ.दिवसे यांनी केले आहे.

बारामती लोकसभा मतदारसंघात दौंड, इंदापूर, बारामती, पुरंदर, भोर व खडकवासला असे एकूण सहा विधानसभा मतदारसंघ आहेत. भोर विधानसभा मतदारसंघात म्हाळुंगे, सूस व बावधन बु., ताथवडे, हिंजवडी, पिरंगुट, मान, भुकूम, भुगाव, लवळे तर खडकवासला विधानसभा मतदारसंघात कात्रज, धायरी, नऱ्हे, वडगाव बुद्रुक, वारजे, शिवणे खडकवासला, खेड शिवापुर, बिबेवाडी (काही भाग) या शहरी भागाचा समावेश करण्यात आलेला आहे. या भागातील मतदारांना मतदान करता यावे यासाठी मतदनाच्या दिवशी सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.

शहरी भागातील नागरिकांनी आपल्या मतदान केंद्राविषयी माहितीकरीता जवळचे मतदान केंद्र किंवा मतदान सहायता कक्षाशी संपर्क साधावा. भारत निवडणूक आयोगाच्या https://electoralsearch.eci.gov.in/pollingstation या लिंकवर क्लिक करुन आपल्या मतदान केंद्राविषयी माहिती घेता येणार आहे. वोटर हेल्पलाईन ॲपवरही मतदान केंद्राची माहिती घेता येईल.

बारामती मतदारसंघातील ग्रामीण भागासोबत शहराशी संलग्न भागात उद्योग, उर्जा व कामगार विभागाअंतर्गत असलेल्या सर्व आस्थापना, कारखाने व दुकान मालक, व्यवस्थापनांनी कार्यरत अधिकारी व कर्मचाऱ्यांना मतदानाचा हक्क बजाविण्यासाठी येत्या ७ मे रोजी भरपगारी सुट्टी देण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत. सर्व आस्थापना, कारखाने व दुकाने उदा. खाजगी कंपन्यामधील आस्थापना, दुकाने व इतर आस्थापना, निवासी हॉटेल, खाद्यगृहे, अन्य गृहे, नाट्यगृहे, व्यापार, औद्योगिक उपक्रम किंवा इतर आस्थापना, माहिती व तंत्रज्ञान कंपन्या, खरेदी केंद्रे , मॉल्स, किरकोळ विक्रेते आदी ठिकाणी कार्यरत अधिकारी, कर्मचाऱ्यांना भरपगारी सुट्टी देवून मतदान करण्यासाठी प्रोत्साहीत करावे, असेही आवाहन डॉ. दिवसे यांनी दिले आहे.

लोकसभा निवडणूक मतदानादिवशीचे आठवडे बाजार बंद

पुणे, दि. ४: जिल्ह्यातील लोकसभा निवडणुकीची संपूर्ण प्रक्रिया शांतता, निर्भय वातावरणात पार पाडण्यासाठी येत्या ७ मे रोजी बारामती व १३ मे रोजी पुणे, मावळ व शिरुर लोकसभा मतदार संघात मतदानाच्या दिवशी भरणारे सर्व आठवडे बाजार बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे यांनी आदेश जारी केले आहेत.

मुंबई मार्केट अॅण्ड फेअर अॅक्ट १८६२ चे कलम ५ अन्वये हे आदेश जारी करण्यात आले असून त्यानुसार बारामती लोकसभा मतदारसंघाअंतर्गत येणाऱ्या मुळशी तालुक्यातील पौड, बावधव खुर्द, पुरंदर तालुक्यातील वाल्हा, दौंड तालुक्यातील केडगांव, मलठण, रावणगाव व बोरीपार्धी, बारामती तालुक्यातील पणदरे, मुर्टी, करंजेपुल, निरावागज, उंडवडी सुपे व सोनगाव, इंदापूर तालुक्यातील लाकडी, कळस, काटी, टणू, निरवांगी व खोरोची व भोर तालुक्यातील भोर या ठिकाणचे आठवडे बाजार ७ मे रोजी बंद राहतील.

मावळ लोकसभा मतदारसंघाअंतर्गत येणाऱ्या मावळ तालुक्यातील टाकवे बु., शिरूर लोकसभा मतदारसंघाअंतर्गत जुन्नर तालुक्यातील बेल्हे, आंबेगाव तालुक्यातील धामणी, लाखणगाव, नागापूर, महाळुंगे पडवळ व तिरपाड, खेड तालुक्यातील कुरकुंडी, शिरूर तालुक्यातील केंदूर, तळेगांव ढमढरे, वडगांव रासाई व संविदणे या ठिकाणचे आठवडे बाजार १३ मे रोजी बंद राहतील.

या आदेशाचे कोणत्याही व्यक्तीने उल्लंघन केल्यास मुंबई मार्केट अॅण्ड फेअर अॅक्ट १८६२ मधील तरतुदीनुसार दंडनीय कार्यवाहीस पात्र राहतील, असेही आदेशात नमूद करण्यात आले आहे.
0000

बंद पडलेली माथेरान टॉय ट्रेन पुन्हा सुरू करण्यासाठी दिला 150 कोटींचा निधी – बारणे

माथेरानच्या पर्यटन विकासाला मोदी सरकारमुळे चालना – खासदार बारणे

माथेरान, दि. 4 मे – माथेरान येथील पर्यटन विकासाला केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारमुळे मोठी चालना मिळाली आहे. यापुढेही माथेरानच्या विकासासाठी मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून देण्यात येईल, अशी ग्वाही मावळ लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार खासदार श्रीरंग बारणे यांनी दिली.

शिवसेना-भाजप-राष्ट्रवादी- मनसे- आरपीआय- रासप- मित्रपक्ष महायुतीच्या वतीने माथेरान येथे आयोजित करण्यात आलेल्या प्रचार सभेत ते बोलत होते. व्यासपीठावर आमदार महेंद्र थोरवे, शिवसेना संपर्कप्रमुख विजय पाटील, जिल्हाप्रमुख संतोष भोईर, उपजिल्हाप्रमुख भाई गायकर, तालुकाप्रमुख संभाजी जगताप आदी पदाधिकारी होते.

खासदार बारणे म्हणाले की, माथेरान हे जागतिक कीर्तीचे थंड हवेचे ठिकाण आहे. माथेरानची पूर्ण अर्थव्यवस्था पर्यटन व्यवसायावर अवलंबून आहे. त्यामुळे माथेरानमधील पर्यटन विकासाला मोदी सरकारने नेहमीच प्राधान्य दिले आहे. पर्यटकांचे विशेष आकर्षण असलेली टॉय ट्रेन बंद करण्यात आली होती. ती पुन्हा सुरू व्हावी यासाठी आपण पाठपुरावा करून केंद्र शासनाकडून दीडशे कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला. त्यामुळे ही ट्रेन पुन्हा नव्या दिमाखात पर्यटकांच्या सेवेत रुजू झाली आहे. माथेरानला येणाऱ्या दहा लाख पर्यटकांपैकी पाच लाख पर्यटक या टॉय ट्रेन सुविधेचा लाभ घेत आहेत.

पूर्वी माथेरानमध्ये रिक्षा माणसांना ओढाव्या लागायच्या. त्या ठिकाणी आता ई-रिक्षा सुरू करण्यात आल्या आहेत. पर्यटकांसाठी अनेक अत्याधुनिक सुविधा देखील उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत, अशी माहिती बारणे यांनी दिली.

केंद्र शासन व राज्य शासनाच्या माध्यमातून माथेरानच्या विकासासाठी यापुढेही अधिकाधिक निधी उपलब्ध करून देण्यासाठी आपण प्रयत्नशील राहू, अशी ग्वाही त्यांनी दिली.

माथेरानमधील रहिवासी आणि व्यावसायिक यांनी खासदार बारणे यांचे स्वागत व सत्कार केला. निवडणुकीत बारणे यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहण्याचा निर्धार यावेळी करण्यात आला.

उद्धव ठाकरे हे आधुनिक महाभारतातील दुर्योधन – संदीप देशपांडे

कर्जत, 4 मे – कोरोनाच्या संकटकाळात घरातून बाहेर न पडता ‘फेसबुक लाईव्ह’ करण्यातच धन्यता मानणाऱ्यांना कायमचे घरी बसवा, असे आवाहन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते संदीप देशपांडे यांनी केले. सत्तेसाठी शरद पवार यांच्या मांडीवर जाऊन बसणारे उद्धव ठाकरे हे आधुनिक महाभारतातील दुर्योधनच आहेत, अशी टीका देखील त्यांनी केली.

मावळ लोकसभा मतदारसंघातील शिवसेना-भाजप-राष्ट्रवादी- मनसे- आरपीआय- रासप- मित्रपक्ष महायुतीचे उमेदवार खासदार श्रीरंग बारणे यांच्या प्रचारासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या कार्यकर्ता महामेळाव्यात ते बोलत होते.

त्यावेळी मनसेचे नेते अमेय खोपकर, दिलीप बापू धोत्रे, आमदार महेंद्र थोरवे, रायगड जिल्हाध्यक्ष जितेंद्र पाटील यांच्या नेतृत्वाखाली जिल्हा उपाध्यक्ष सचिन करणुक, कर्जत तालुका अध्यक्ष महेंद्र निगुडकर, खालापूर तालुकाध्यक्ष विजय सावंत, पनवेल तालुकाध्यक्ष रामदास पाटील, जिल्हा सचिव अक्षय महाले, जे पी पाटील, महिला जिल्हाध्यक्ष सपना राऊत यांच्यासह मनसेचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

‘सहानुभूतीची अपेक्षा कशी ठेवता?’

संदीप देशपांडे म्हणाले की, मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे यांना आमदार सांभाळता आले नाहीत. त्यामुळे त्यांना सहानुभूती दाखविण्याचे काहीही कारण नाही. मनसेचे नगरसेवक फोडणाऱ्या उद्धव ठाकरे यांना त्यांच्या आमदारांनी साथ सोडली तेव्हा वाईट वाटायचे काहीच कारण नाही.

सत्तेच्या लालसेपोटी पवारांच्या मांडीवर जाऊन बसलेले आधुनिक महाभारतातील ते दुर्योधन आहेत. संजोग वाघेरे हे मूळचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आहेत. राष्ट्रवादीची पोर सांभाळायला उद्धव ठाकरे यांनी पक्ष काढला आहे का, असा सवाल त्यांनी केला.

‘हुकूमशाही तर तुमची होती’

मशिदींवरील भोंग्यांच्या विरोधात आंदोलन केले म्हणून आमच्यावर खोट्या केसेस टाकल्या, माझ्यावर मारेकरी घातले, तेव्हा कुठे होती लोकशाही, असा प्रश्न करीत देशपांडे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर हुकूमशाहीचा आरोप केला. राजकारणी म्हणून उद्धव ठाकरे नीच आहेतच, पण भाऊ म्हणून देखील ते नीच आहेत, या शब्दांत देशपांडे यांनी टीका केली.

श्रीरंग बारणे हे अभ्यासू खासदार आहेत. त्यामुळे त्यांना तिसऱ्यांदा संसदेत पाठवून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे हात बळकट करा, असे आवाहन देशपांडे यांनी केले.

‘राज ठाकरे यांचा योग्य वेळी योग्य निर्णय’

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी महायुतीला बिनशर्पात पाठिंबा दिल्याबद्दल खासदार बारणे यांनी त्यांना धन्यवाद दिले. देशहिताचा विचार करून राज साहेबांनी योग्य वेळी योग्य निर्णय घेतला, असे ते म्हणाले. खासदार बारणे यांना कर्जत-सोलापूर विधानसभा मतदारसंघातून विक्रमी मताधिक्य मिळवून देण्याची ग्वाही आमदार थोरवे यांनी दिली.

कर्जत-खालापूर मतदार संघातून खासदार बारणे यांना एक लाखाचे रेकॉर्ड ब्रेक मताधिक्य मिळवून देण्याचा निर्धार मनसेच्या महामेळाव्यात करण्यात आला.

मतदानाचा टक्का वाढवण्यासाठी ‘वोट फॉर स्ट्रॉंग गव्हर्नमेंट’ अभियान

पुणे : लोकसभा निवडणुकीत मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावून १०० टक्के मतदान करावे, यासाठी ‘वोट फॉर स्ट्रॉंग गव्हर्नमेंट’ हे मतदान जागृती अभियान हाती घेत समाजातील ज्येष्ठ मंडळींनी नागरिकांना मतदान करण्याचे आवाहन केले आहे. 
या अभियानाचे प्रमुख यशवंत घारपुरे, मुकुंद पुराणिक, महाबळेश्वर देशपांडे, मुकुंद क्षीरसागर, हेतल बारोट यांनी पत्रकारांशी संवाद साधला. या अभियानात हेमंत कुमार, सीए सतीश घाटपांडे, रवींद्र महाजन, एस. एन. चंद्रचूड, बी. आर. देशपांडे, हरीश रूनवाल, हेमंत पांचाळ, सतीश घाटपांडे आदी सदस्य कार्यरत आहेत.
यशवंत घारपुरे म्हणाले, “मतदान हा आपल्याला संविधानाने दिलेला मूलभूत हक्क आहे. देशाच्या भवितव्याच्या दृष्टीने चांगले लोकप्रतिनिधी निवडण्याचे प्रमुख माध्यम आहे. मात्र, मतदार मतदानाच्या दिवशी सुटी घेऊन फिरायला जातात. लागून सुट्ट्या आल्या असल्या, तरी लोकांनी मतदान करून मग फिरायला गेले पाहिजे.”
“मतदान जागृती करणारी एक लाख पत्रके वाटप करत आहोत. तसेच हजारो बिल्ले तयार केले असून, पत्रके व बिल्ल्यांद्वारे समाजातील विविध घटकांना मतदान करण्याचे आवाहन करत आहोत. ज्येष्ठ नागरिकांचे ग्रुप, तरुणाईचे कट्टे, सामाजिक व सांस्कृतिक कार्यक्रमाच्या ठिकाणी, तसेच पुणे स्टेशन येथील रेल्वे स्थानक व बस स्टॅन्ड परिसरात ही पत्रके वाटली जात आहेत. फेसबुक व व्हाट्सअप या सोशल माध्यमातून मतदान करण्याचे आवाहन करत आहोत. साधारपणे तीन ते चार लाख लोकांपर्यंत आम्ही पोहोचू, असा विश्वास वाटतो,” असेही यशवंत घारपुरे यांनी नमूद केले.

‘आमचे नागरी प्रश्न सोडवा’वडगाव शेरीत नागरिकांची धंगेकरांकडे मागणी

पुणे-पुणे लोकसभा मतदार संघातील महाविकास आघाडी व इंडिया आघाडीचे काँग्रेस पक्षाचे उमेदवार आ. रवींद्र धंगेकर यांची पदयात्रा आज वडगाव शेरी प्रभाग क्र २ परिसरात झाली. विशेष म्हणजे या पदयात्रेत शेकडो नागरिक भेटत असताना त्या भागातील ट्राफिक, पाणी पुरवठा, ड्रेनेज समस्या यांबद्दलच्या तक्रारी नागरिक धंगेकरांकडे करीत होते.नागरिकांच्या विविध समस्यांमध्ये विश्रांतवाडी चौक, जेल रोड आणि टिंगरे नगर एअर पोर्ट रोड यातील वाहतूक कोंडी बाबत जास्त तक्रारी होत्या तसेच संपूर्ण वडगाव शेरीत कमी दाबाने आणि अपुरा पाणी पुरवठा तसेच जुनाट झालेली ड्रेनेज सिस्टिम याबाबतच्या तक्रारी जास्त होत्या.नागरिकांचे हे सर्व प्रश्न धंगेकरांनी नीट ऐकून घेऊन सोबतच्या कार्यकर्त्यास लिहून घायायला सांगितलेव या सर्व कामांचा मी १००% पाठपुरावा करेन व प्रश्न सोडवेन असा नागरिकांना विश्वास दिला.

गुरुवारी वडगाव शेरी मतदार संघात सायंकाळी ६ ते रात्री १० यावेळी झालेल्या भव्य पदयात्रेत काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष,शिवसेना उद्धव बाळासाहेब पक्ष आणि आम आदमी पार्टी यांचे प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते व नागरिक असे ४०० हून अधिक पदयात्रेत सहभागी झाले होते. प्रारंभी असणारा ढोल – ताशा, पदयात्रेतील सर्व पक्षांचे फडकणारे झेंडे, हाताच्या पंजाच्या प्रतिकृती, फटाक्यांचा डणडणाट आणि जिंदाबादच्या घोषणांसह चाललेल्या पदयात्रेत महिलांची संख्या लक्षणीय होती.

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकातून निघालेली ही पदयात्रा विविध सोसायट्या, इंदिरानगर, मेंटल कॉर्नर परिसर, कस्तुरबा सोसायटी मार्गे जाऊन आदर्श नगर परिसरात समाप्त झाली.

या पदयात्रेत उमेदवार रवींद्र धंगेकर यांसमवेत वडगाव शेरी ब्लॉक अध्यक्ष राजू ठोंबरे, येरवडा ब्लॉक अध्यक्ष रमेश सकट, वडगाव शेरी महिला ब्लॉक अध्यक्ष शिवानी माने, माजी नगरसेवक सुनिल मलके,राजेंद्र शिरसाट, पप्पू भोगले, संगीता देवकर, रमाकांत साठे, राकेश कुशवाह, डॅनियल मगर, प्रभाग २ वडगाव शेरी चे उपाध्यक्ष सचिन भोसले, विल्सन संदेवळ, योगेश शिर्के आदी प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले होते.

नवा नकाशा नेपाळ100 रुपयांच्या नोटेमध्ये छापणार..कालापानी, लिपुलेख आणि लिंपियाधुराला हे नेपाळमधील निवडणुकीचे मुद्दे

नेपाळने शुक्रवारी 100 रुपयांच्या नवीन नोटा छापण्याची घोषणा केली आहे. नेपाळ आपल्या 100 रुपयांच्या नव्या नोटेवर भारतातील लिपुलेख, लपियाधुरा आणि कालापानीसह नेपाळी नकाशा छापेल. भारताने आधीच या क्षेत्रांना कृत्रिमरित्या विस्तारित म्हटले आहे.

मंत्रिमंडळाच्या निर्णयाबाबत माहिती देताना नेपाळ सरकारच्या प्रवक्त्या आणि माहिती व दळणवळण मंत्री रेखा शर्मा यांनी पत्रकारांना सांगितले की, “नेपाळचा नवा नकाशा 100 रुपयांच्या नोटेमध्ये छापण्याचा निर्णय नेपाळच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिपरिषदेच्या बैठकीत घेण्यात आला.”

रेखा शर्मा शर्मा यांनी सांगितले की, “25 एप्रिल आणि 2 मे रोजी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंत्रिमंडळाने 100 रुपयांच्या नोटेचे डिझाइन आणि बँक नोटेच्या पार्श्वभूमीवर छापलेला जुना नकाशा बदलण्यास मंजुरी दिली आहे.” नेपाळच्या या निर्णयावर केंद्र सरकारने अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. याआधी नेपाळने एकतर्फी लिपुलेख, कालापानी आणि लिंपियाधुराला आपला प्रदेश म्हणून घोषित केला होता.

या तिन्ही क्षेत्रांवर आपला हिस्सा असल्याचा दावा नेपाळ वेळोवेळी करत आहे. यापूर्वी देखील नेपाळच्या माजी राष्ट्रपती विद्या देवी भंडारी म्हणाल्या होत्या की, कालापानी, लिपुलेख आणि लिंपियाधुराला हे नेपाळचे अविभाज्य भाग आहेत आणि यासंदर्भात भारतासोबत जो काही वाद आहे तो राजनैतिक मार्गाने सोडवला गेला पाहिजे.कालापानी, लिपुलेख आणि लिंपियाधुराला हे देखील नेपाळमधील निवडणुकीचे मुद्दे आहेत आणि माजी पंतप्रधान केपी शर्मा ओली यांनी निवडणुकीदरम्यान वचन दिले होते की जर त्यांचा पक्ष सत्तेवर आला तर ते कालापानी, लिंपियाधुरा आणि लिपुलेख भाग वाटाघाटीद्वारे परत घेतले जातील.

नेपाळच्या नकाशात कालापानी, लिपुलेख आणि लिंपियाधुरा आपला प्रदेश म्हणून दाखविल्यानंतर भारताकडून तीव्र प्रतिक्रिया उमटली होती. ही तिन्ही ठिकाणे पारंपारिकपणे भारत-नेपाळ सीमेवर उत्तराखंडमध्ये आहेत. एका भारतीय अधिकाऱ्याने सांगितले होते की, स्थानिक जमिनीच्या नोंदीवरून असे दिसून येते की कालापानी आणि लिपुलेखमधील जमीन भारत-नेपाळ सीमेवरील भारताच्या बाजूला असलेल्या दोन गावांतील रहिवाशांच्या मालकीची आहे.

नेपाळी संसदेच्या कनिष्ठ सभागृहाने सुमारे 3 वर्षांपूर्वी मंजूर केलेल्या नेपाळच्या नवीन राजकीय नकाशात हे भाग नेपाळचा प्रदेश म्हणून दाखविण्यात आल्यावर भारताकडून तीव्र प्रतिक्रिया उमटल्या होत्या.

देशातील लोकसभा निवडणुका पाहण्यासाठी 23 देशांतील 75 आंतरराष्ट्रीय अभ्यागत भारतात

नवी दिल्ली -“देशातील लोकसभा निवडणुका पाहण्यासाठी 23 देशांतील निवडणूक व्यवस्थापन संस्था (EMBs) मधील 75 आंतरराष्ट्रीय अभ्यागत भारतात आले आहेत. भूतान, मंगोलिया, ऑस्ट्रेलिया, मादागास्कर, फिजी, किर्गिझ या 23 देशांतील विविध EMB आणि संस्थांचे प्रतिनिधीत्व करणारे 75 प्रतिनिधी प्रजासत्ताक, रशिया, मोल्दोव्हा,
ट्युनिशिया, सेशेल्स, कंबोडिया, नेपाळ, फिलीपिन्स, श्रीलंका, झिम्बाब्वे, बांगलादेश, कझाकिस्तान, जॉर्जिया, चिली, उझबेकिस्तान, मालदीव, पापुआ न्यू गिनी आणि नामिबिया या स्पर्धेत सहभागी होणार आहेत.

भारताच्या निवडणूक व्यवस्थेतील बारकावे तसेच जगातील सर्वात मोठ्या लोकशाहीद्वारे वापरल्या जाणाऱ्या सर्वोत्तम पद्धतींसह परदेशी EMB चा परिचय करून देण्याचा हा कार्यक्रम आहे,”असे भारतीय निवडणूक आयोगाने म्हटले आहे.

मुख्य निवडणूक आयुक्त श्री राजीव कुमार, निवडणूक आयुक्त श्री ज्ञानेश कुमार आणि डॉ. सुखबीर सिंग संधू 5 मे 2024 रोजी प्रतिनिधींना संबोधित करतील. त्यानंतर हे प्रतिनिधी महाराष्ट्र, गोवा, गुजरात, कर्नाटक, मध्य या सहा राज्यांच्या दौऱ्यावर जातील. प्रदेश, आणि उत्तर प्रदेश-छोट्या गटांमध्ये विविध मतदारसंघातील निवडणुका आणि संबंधित तयारी पाहण्यासाठी. हा कार्यक्रम 9 मे 2024 रोजी संपेल.

समुद्र खवळणार, मोठ्ठ्या लाटा उसळणार

मुंबई- भारतीय हवामानशास्र विभाग (IMD) आणि इंडियन नॅशनल सेंटर फॉर ओशियन इनफॉर्मेशन सर्व्हीस मार्फत इशारा देण्यात आला आहे येत्या 36 तासांच्या कालावधीत समुद्रात जास्त उंचीच्या लाटा उसळण्याची शक्यता असू नागरिकांनी समुद्रात जाणे टाळावे, यंत्रणांना सहकार्य करावे असे आवाहन बृहन्मुंबई महानगरपालिकेने केले आहे.

IMD आणि INCOIS (इंडियन नॅशनल सेंटर फॉर ओशन इन्फॉर्मेशन सर्व्हिस) ने आज सकाळी 11:30 पासून पुढील 36 तासांसाठी मुंबई आणि जवळपासच्या किनारपट्टी भागात समुद्राच्या उंच लाटांचा इशारा दिला आहे. समुद्राच्या लाटा 0.5 मीटर ते 1.5 मीटर दरम्यान वाढू शकतात. बीएमसीने लोकांना किनारपट्टीच्या जास्त जवळ न जाण्याचा सल्लाही जारी केला आहे. तटीय सुरक्षा रक्षक आणि जीवरक्षक यासारख्या आपत्कालीन सेवा देखील तैनात केल्या आहेत असेही महापालिकेने म्हटले आहे.