Home Blog Page 1060

सेवानिवृत्त पोलीस अधिकारी कर्मचाऱ्यांकडून बाईक रॅलीद्वारे मतदान जागृती

पुणे: येत्या लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीत मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी जिल्हा प्रशासनाने केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत सेवानिवृत्त पोलीस वेल्फेअर असोसिएशन आणि मित्र संघटनेच्यावतीने सेवानिवृत्त पोलीस अधिकारी-कर्मचाऱ्यांकडून बाईक रॅलीद्वारे मतदान जागृती करण्यात आली.

पुणे महानगरपालिका आयुक्त डॉ. राजेंद्र भोसले, सेवानिवृत्त पोलीस वेल्फेअर असोसिएशनचे अध्यक्ष भानुप्रताप बर्गे, उपायुक्त राजीव नंदकर आदी यावेळी उपस्थित होते.

आयुक्त डॉ. भोसले यांच्या उपस्थितीत महानगरपालिकेच्या प्रांगणातून रॅलीची सुरुवात झाली. यावेळी मतदानाची शपथ घेण्यात आली. मतदानाच्या दिवशी सुट्टी साजरी न करता प्रत्येकाने राष्ट्रीय कर्तव्य म्हणून मतदानाचा हक्क बजवावा, असे आवाहन
डॉ. भोसले यांनी यावेळी केले.

सीमेवरील सैनिक २४ तास ३६५ दिवस आपल्या व देशाच्या संरक्षणासाठी अत्यंत उच्च तापमानामध्ये तसेच थंडी, पावसामध्ये तैनात असतो व आपले कर्तव्य बजावत असतो त्याचप्रमाणे आपणदेखील मतदानासाठी थोडा वेळ काढून मतदानाचे कर्तव्य आणि हक्क बजवावा असे आवाहन श्री.बर्गे यांनी यावेळी केले.

रॅलीमध्ये सुमारे ५०० दुचाकी स्वार सहभागी झाले. घोषणा देत आणि मतदारांना आवाहन करत शनिवार वाडा, लक्ष्मी रोड, अलका टॉकीज, सेनादत्त पोलीस चौकी, नळ स्टॉप, एस एन डी टी कॉलेज, लॉ कॉलेज रोड, भांडारकर रोड, कृषी महाविद्यालय, संचेती हॉस्पिटल, आरटीओमार्गे आंबेडकर चौकात रॅलीचा समारोप झाला.

जी भाषा पाकिस्तान करतेय तीच भाषा काँग्रेस का करतेय?

मुंबई भाजप अध्यक्ष आमदार ॲड.आशिष शेलार

विरोधी पक्षनेते विजय वड्डेटीवार यांच्या विरोधात निवडणूक आयोगाकडे तक्रार

मुंबई, ५ मे २०२४
कसाब किंवा आतंकवाद हा पाकिस्तानमधून पसरवलेला नाही, मुंबई हल्ल्यात पाकिस्तानने नाही, कसाबने निष्पाप लोकांचे बळी घेतले नाहीत, कसाबने आमच्या वीर पोलीस अधिकाऱ्यांना मारलं नाही, शहीद केलं नाही, या पद्धतीची जी पाकिस्तानची भूमिका आहे तीच काँग्रेसची भूमिका का आहे? जी भाषा पाकिस्तान करतेय तीच भाषा काँग्रेस का करतेय? असा थेट सवाल मुंबई भाजपा अध्यक्ष आमदार ॲड. आशिष शेलार यांनी केला.

विरोधी पक्षनेते विजय वड्डेटीवार यांनी ॲड. उज्वल निकम यांच्या विरोधात केलेल्या विधानाची तक्रार मुंबई भाजपा अध्यक्ष आमदार ॲड. आशिष शेलार यांनी मुख्य निवडणूक आयोगाकडे केली असून त्यांनी वड्डेटीवार आणि काँग्रेसवर कारवाईची मागणी केली आहे.

याबाबत वांद्रे पश्चिम येथील निवडणूक कार्यालयात आज घेतलेल्या पत्रकार परिषदेत बोलताना आमदार ॲड. आशिष शेलार यांनी माहिती दिली. यावेळी उत्तर मध्य लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार ॲड. उज्वल निकम उपस्थित होते.

माझ्याकडे बरीच माहिती आहे. माझ्या पोतडीत बरेच काही आहे पण देशहित माझ्यासाठी महत्त्वाचे आहे. त्यामुळे मी, काही बोलत नाही, असा गर्भित इशारा ॲड. उज्ज्वल निकम यांनी काँग्रेसला दिला आहे. तसेच विरोधी पक्षनेते विजय वड्डेटीवार यांनी केलेले आरोप बिनबुडाचे निराधार असल्याचे त्यांनी सांगितले. वड्डेटीवार पाकिस्तानला जे हवेय तेच का बोलत आहेत, असा सवालही ॲड. निकम यांनी केला.

यावेळी आमदार ॲड. आशिष शेलार म्हणाले की, विरोधी पक्षनेते वड्डेटीवार यांनी संशय निर्माण करणारी विधान केली, जी न्यायालयीन निवाड्याच्या विरोधातली आहेत, जी सत्य घटनेवर आधारित नाहीत, ती खोटी आणि असत्य आहेत आणि म्हणून केवळ मतांच्या लांगुलचालनासाठी या पद्धतीचे विधान केले गेले आहे.
हे विधान बदनामी करणारे असून भावना भडकवण्याचा आणि या निवडणुकीमध्ये असत्य पसरवण्याचा प्रयत्न करणारे आहे. त्यामुळे काँग्रेस पक्षावर आणि वड्डेटीवार यांच्यावर निवडणूक आयोगाने कारवाई करावी, अशा पद्धतीची तक्रार आम्ही मुख्य निवडणूक आयोगाकडे केली आहे असे आमदार ॲड. आशिष शेलार यांनी सांगितले.

काँग्रेस पक्षाला आम्ही काही थेट प्रश्न विचारू इच्छितो की, कसाब हा आतंकवादी होता, कसाबने गोळ्या झाडल्या, न्यायालयाने त्याच्यावर निवाडा दिला, आरोपीला शिक्षा झाली. मग जी भाषा पाकिस्तान करत आहे तीच भाषा काँग्रेस का करतेय?

दरम्यान, आशिष शेलार म्हणाले की, या विषयावर उद्धवजी आणि शिवसेना उबाठा यांनी त्यांची भूमिका स्पष्ट करावी. कसाबला झालेली शिक्षा, कसाबने आपल्यावर आतंकवादी केलेला हमला, कसाबच्या मागे असलेला पाकिस्तानी आतंकवादी हात, आणि निवाडा जो न्यायालयाने दिला, यावर उबाठाचे मत काँग्रेसच्या समर्थनाचे आहे की नाही ? याचाही खुलासा करावा. वड्डेटीवार आणि काँग्रेस जे बोलत आहे ते उबाठा गटाला मान्य आहे का? असा थेट प्रश्न उद्धव ठाकरे यांना आ. ॲड. शेलार यांनी यावेळी विचारला आहे.

अभिनेता गोविंदाच्या ‘रोड शो’ला पिंपरीत उत्स्फूर्त प्रतिसाद

बारणे यांच्या मध्यवर्ती प्रचार कचेरीचे गोविंदा यांच्या हस्ते उद्घाटन

गोविंदा यांच्या रोड-शोने बारणे यांचा प्रचार शिगेला

पिंपरी, दि. 5 मे – मावळ लोकसभा मतदारसंघातील शिवसेना-भाजप-राष्ट्रवादी- मनसे- आरपीआय- रासप- मित्रपक्ष महायुतीचे उमेदवार खासदार श्रीरंग बारणे यांच्या मध्यवर्ती निवडणूक कार्यालयाचे उद्घाटन नामवंत अभिनेते गोविंदा यांच्या हस्ते आज (रविवारी) झाले. त्यानंतर पिंपरी कॅम्प व पिंपरी गावात गोविंदा यांनी ‘रोड शो’ करीत मतदारांना बारणे यांनाच मतदान करण्याचे आवाहन केले.

मावळ लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे मध्यवर्ती कार्यालय पिंपरी येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याच्या मागील इमारतीत सुरू करण्यात आले आहे. कार्यालयाच्या उद्घाटन प्रसंगी खासदार बारणे, आमदार उमा खापरे, शिवसेना नेत्या शीतल म्हात्रे, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख बाळासाहेब वाल्हेकर, भाजपचे शहराध्यक्ष शंकर जगताप, भाजपचे निवडणूक समन्वयक सदाशिव खाडे, शिवसेनेचे शहर प्रमुख निलेश तरस, माजी नगरसेवक संदीप वाघेरे, युवा सेनेचे पश्चिम महाराष्ट्र सचिव विश्वजीत बारणे, युवा सेनेचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र तरस आदी प्रमुख पदाधिकारी व व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

गोविंदा यांनी संस्कृत मंत्र म्हणत खासदार बारणे यांना शुभेच्छा दिल्या. ‘आप्पा बारणे तुम आगे बढो, हम तुम्हारे साथ है’, ‘होणार होणार, हॅटट्रिक होणार’ अशा घोषणा देत कार्यकर्त्यांनी एक जल्लोष केला.

विजय रथावर आरूढ होऊन गोविंदा आणि खासदार बारणे यांनी जमलेल्या समुदायाला अभिवादन केले. दुचाकी घेऊन शेकडो युवक रॅलीमध्ये सहभागी झाले होते. डॉ. आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून रॅली पुढे इंदिरा गांधी रेल्वे उड्डाणपुलावरून पिंपरी बाजारपेठेत गेली.

पिंपरी कॅम्प मधून फिरून रॅलीची पिंपरी गावात सांगता झाली. गोविंदा यांना पाहण्यासाठी रस्त्याच्या दुतर्फा चहात्यांनी गर्दी केली होती. गोविंदा यांनी हात उंचावून सर्वांना अभिवादन केले. श्रीरंग बारणे यांच्या धनुष्यबाण चिन्हापुढील बटन दाबून त्यांना तिसऱ्यांदा लोकसभेत पाठवावे व नरेंद्र मोदी यांना पुन्हा पंतप्रधान करावे, असे आवाहन गोविंदा यांनी केले.

गोविंदा यांच्या ‘रोड शो’मुळे पिंपरी भागात निवडणुकीचे वातावरण चांगलेच तापल्याचे पहायला मिळत होते.

दिव्यांगांना सन्मानाने जगण्याची संधी देण्याला प्राधान्य हवे-भैय्याजी जोशी

पुणे: “जन्माला येणारी प्रत्येक व्यक्ती परिपूर्ण नसते. आपल्याला केवळ शारीरिक विकलांगपणा दिसतो. मात्र, वैचारिक दुर्बलता, विकृत मानसिकता हेही विकलांग असण्याचे लक्षण आहे. शारीरिक व्यंग असलेल्या व्यक्तींना ‘दिव्यांग’ संबोधून त्यांना सन्मान दिला गेला आहे. त्यांना मुख्य प्रवाहात आणून सन्मानाने जगण्याची संधी देण्याला आपण प्राधान्य द्यायला हवे,” असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे केंद्रीय कार्यकारिणी सदस्य सुरेश उर्फ भैय्याजी जोशी यांनी केले.

दिव्यांग कल्याणकारी शिक्षण संस्था व संशोधन केंद्र, सक्षम पश्चिम महाराष्ट्र आणि क्रिडा भारती पश्चिम महाराष्ट्र यांच्या संयुक्त विद्यमाने दिव्यांग विद्यार्थ्यांची यशोगाथा व ३५ वर्षापासून संस्थेची यशस्वी वाटचाल असलेल्या ‘कथा आत्मनिर्भरतेची’ व ‘विश्वस्त’ या पुस्तकाचे प्रकाशन, तसेच ‘१० मीटर रायफल शूटींग रेंज’ स्पर्धेचे उद्घाटन भैय्याजी जोशी यांच्या हस्ते झाले. वानवडी येथील संस्थेच्या मैदानावर या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. 
कार्यक्रमात ‘सक्षम’चे अखिल भारतीय संघटन मंत्री चंद्रशेखरजी, क्रिडा भारतीचे अखिल भारतीय महामंत्री राज चौधरी, संस्थेचे अध्यक्ष माजी खासदार प्रदीप रावत, कार्याध्यक्ष अॅड. मुरलीधर कचरे, ‘सक्षम’चे महेश टांकसाळे, दत्ता लखे, क्रिडा भारतीचे विजय पुरंदरे, शैलेश आपटे आदी उपस्थित होते. तत्पूर्वी, येथील विद्यार्थ्यांनी सांस्कृतिक व विविध गुणदर्शन कार्यक्रम सादर केले. गुणवंतांचा सत्कार, तसेच काही दिव्यांग विद्यार्थ्यांना व्हीलचेअर, कृत्रिम पाय, कॅलिपर आदी साहित्य प्रदान करण्यात आले.

भैय्याजी जोशी म्हणाले, “दृष्टिकोन, मानसिकता घडविणाऱ्या सामाजिक संस्थांना व मंडळीना अशी पुस्तके मार्गदर्शक ठरतील. दिव्यांगांसाठी कार्यरत संस्थांना समाजातील दानशूर नेहमीच मदतीसाठी पुढे येतात. परिस्थितीला सामोरे जात त्यावर मात करून स्वताच्या अस्तित्व निर्माण करणार्‍या या मुलांचा अभिमान वाटतो.”

राज चौधरी म्हणाले, “समाजातील दिव्यांग घटकांना आत्मविश्वास देण्यासाठी ही संस्था प्रयत्न करते. समाजिक समरसता इथे नसानसात आहे. प्रत्येकाने नागरी कर्तव्याचे पालन केले पाहिजे. एकदिलाने राहायला हवे. स्वयंपूर्ण व आत्मनिर्भर जीवन जगण्याला प्राधान्य हवे. दिव्यांगांच्या मदतीसाठी आपण पुढे आले पाहिजे.”

स्वागत प्रास्ताविकात अॅड. मुरलीधर कचरे म्हणाले, “संस्थेचे हजारो मुलांना घडवलेले आहे. विकलांगतेवर मात करून खऱ्या अर्थाने दिव्यांग होत यश संपादन करत आहेत. या कार्याचा लेखाजोखा मांडणारे हे पुस्तक आहे. मुलांचा सर्वांगाने विकास होण्यासाठी संस्थेचे कार्य यापुढेही मोठ्या जोमाने सुरू राहील.”

संजय भुजबळ यांनी सूत्रसंचालन केले. मुख्याध्यापिका शिवानी सुतार यांनी आभार मानले. कार्यक्रमास निमंत्रित तसेच संपूर्ण महाराष्ट्रातून आलेले संस्थेचे माजी दिव्यांग विद्यार्थी व त्यांचे कुटुंबीय दिव्यांग विद्यार्थ्यांचे पालक असे एकूण पाचशे लोक उपस्थित होते. कार्यक्रमानंतर संस्थेमध्ये सर्वांसाठी स्नेहभोजन आयोजिले होते.
कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी सक्षमचे सर्व कार्यकर्ते गहीनाथ नलावडे, शिवाजी भेगडे, कुणाल मिठारी, दत्ता लखे, अशोक सोनवणे, राहुल नागटिळक, कृषीका इंदुलकर त्याचबरोबर क्रीडा भारतीचे कार्यकर्ते विजय पुरंदरे, शैलेश आपटे, दीपक मेहंदळे, संजय रजपूत, अर्जुन पुरस्कार विजेती शकुंतला खटावकर व दिव्यांग कल्याणकारी संस्थेचे सेवक यांनी परिश्रम घेतले.

वैद्यकीय व्यावसायिक म्हणून स्वतःची योग्यता उंचावत न्यावी-डॉ. राकेश शर्मा

निमा प्रसूती स्त्रीरोग संघटनेतर्फे ‘सुश्रृती : द वुम्ब अँड वुंड सागा’ या आंतरराष्ट्रीय परिषद
पुणे : “वैद्यकीय व्यावसायिक म्हणून स्वतःची योग्यता उंचावत न्यावी. कारण ज्ञान आपल्याला निर्भय करते आणि विवेक शिकवते,” असे प्रतिपादन नॅशनल कमिशन फॉर इंडियन सिस्टीम ऑफ मेडिसीनच्या (एनसीआयएसएम) बोर्ड ऑफ द एथिक्स अँड रजिस्ट्रेशन फाॅर इंडियन सिस्टीम ऑफ मेडिसीनचे अध्यक्ष डॉ. राकेश शर्मा यांनी केले. 
नॅशनल इंटिग्रेटेड मेडिकल असोसिएशन (निमा), ऑब्स्ट्रेटिक अँड गायनॉकॉलॉजिकल सोसायटी (ओबीजीवाय), महाराष्ट्र, सुमतीबाई शहा आयुर्वेद महाविद्यालय आणि भारती विद्यापीठ काॅलेज ऑफ आयुर्वेद यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित आंतरराष्ट्रीय परिषदेच्या उद्घाटनप्रसंगी ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. तीन दिवसांची ही परिषद मांजरी येथील स्वोजस पॅलेस येथे आयोजित करण्यात आली होती. या परिषदेस ८००हून अधिक वैद्यकीय व्यावसायिक सहभागी झाले होते.
याप्रसंगी ‘निमा’ सेंट्रल कौन्सिलचे अध्यक्ष डॉ. आशुतोष कुलकर्णी, ‘ओबीजीवाय’च्या अध्यक्ष डॉ. कामिनी धीमान, डॉ.‌ एस.‌ एफ. पाटील, श्री. अनिल गुजर, श्री. अरुण गुजर, डॉ. तुषार सूर्यवंशी, डॉ. मंदा घोरपडे, डॉ. सुहास हेर्लेकर, डॉ. मनोज गायकवाड, डॉ. विष्णु बावणे, डॉ. प्रियंका नाकाडे, डॉ. मनोज चौधरी आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते. या आंतरराष्ट्रीय परिषदेचे आयोजक सचिव डॉ. सुजित शिंदे हे होते. डॉ. प्रशांत दळवी, डॉ. राहुल गरुडकर, डॉ. प्रदीप मुसळे, डॉ. प्रकाश दैठणकर, डॉ. उमेश लूनावत, डॉ. विवेक जोग, डॉ. हृषिकेश वाघमारे, डॉ. अमोल साबळे, डॉ. कमलाकर गजरे, डॉ. ज्योती गवळी, डॉ. तृप्ती गावडे, डॉ. रितेश दामले यांनी परिषदेच्या आयोजनात मोलाचे योगदान दिले.
उद्घाटन सत्राच्या सोहळ्यात ज्येष्ठ वैद्यकीय व्यावसायिक, अध्यापक डॉ. पुष्पा तुळपुळे यांचा जीवनगौरव सन्मान देऊन गौरव करण्यात आला. डॉ. अर्पिता शहा लिखित ग्रंथाचे, ‘सुश्रुती २०२४’ या स्मरणिकेचे प्रकाशनही यावेळी करण्यात आले. डॉ.‌ कामिनी धीमान यांनी ‘ओबीजीएन’च्या कार्याची, विविध उपक्रमांची माहिती दिली. डॉ. मंदा घोरपडे, डॉ. तुषार सूर्यवंशी, डॉ. आशुतोष कुलकर्णी यांचीही भाषणे झाली. डॉ. तुळपुळे यांनीही मनोगत व्यक्त केले. 
डॉ.‌ राकेश शर्मा यांनी आपल्या भाषणात स्त्रीशक्तीचा गौरवपूर्ण उल्लेख केला. ‘यत्र नार्यस्तु पूज्यन्ते रमन्ते तत्र देवता’ ही आपली परंपरा आहे. स्त्रियांनी आपले कर्तृत्व जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात सिद्ध केले असल्याचे त्यांनी नमूद केले. 
डॉ. राकेश शर्मा पुढे म्हणाले, “वैद्यकीय शाखेच्या विद्यार्थ्यांना इंटर्नशिप समस्या वाटू नये. प्रत्येकाला ती अनिवार्य आहे. पदव्युत्तर पदवीचे विद्यार्थी काॅलेजमध्ये फिरकत नाहीत, हेही अयोग्य आहे. अशा ‘ऑन पेपर पोस्ट ग्रॅज्युएट स्टूडेंटस’वर बंदी घातली पाहिजे. आयुर्वेदाच्या वैद्यकीय व्यावसायिकांनी प्राचीन ज्ञानपरंपरेचा ठेवा जपला आणि वृद्धिंगत केला पाहिजे.” 
डॉ. हेर्लेकर यांनी स्वागत-प्रास्ताविक केले. डॉ.‌ अर्पिता शहा व डॉ. अनुजा कुलकर्णी यांनी सूत्रसंचालन केले. डॉ. विभावरी वैद्य यांनी धन्वंतरी स्तवन केले. डॉ. अजयराज बाळ व डॉ. सुचिता राजेभोसले यांनी आभार मानले. 

सार्वजनिक वाहतुकीच्या सक्षमीकरणासाठी मेट्रोचा विस्तार करणार-मुरलीधर मोहोळ

पुणे-सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सक्षमीकरणासाठी मेट्रोचा मार्गाचा विस्तार करून, त्याला पीएमपी, एसटी, रिक्षा या वाहतुकीच्या साधनांची जोड देणार असून त्यामुळे शहरातील वाहतूक व्यवस्था गतिमान होऊन, प्रदूषण आणि वाहतूक कोंडीची समस्या सुटण्यास मदत होईल असा विश्वास पुणे लोकसभा मतदारसंघातील भाजप महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांनी व्यक्त केला.

वडगावशेरी विधानसभा मतदारसंघातील कळस, धानोरी, विश्रांतवाडी, फुलेनगर परिसरात मोहोळ यांच्या प्रचार फेरीचे आयोजन करण्यात आले होते.आमदार सुनील टिंगरे, माजी आमदार जगदीश मुळीक, बापू पठारे, सतीश मस्के, योगेश मुळीक, अनिल टिंगरे, डॉ. सिद्धार्थ धेंडे, मंगेश गोळे, अशोक कांबळे, शंकर संगम, रेखा टिंगरे, शशिकांत टिंगरे, ऐश्वर्या जाधव सहभागी झाले होते.

मोहोळ म्हणाले, एक दशकाहून अधिक काळ पुणे मेट्रो प्रलंबित होती. भाजप सत्तेत आल्यानंतर स्वारगेट ते पिंपरी आणि वनाज ते रामवाडी या मेट्रोच्या पहिल्या टप्प्याचे भूमिपूजन आणि उद्घाटन ही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाले. शिवाजीनगर-हिंजवडी मेट्रोचे कामही वेगाने सुरू आहे.
मोहोळ पुढे म्हणाले, कालबद्ध पद्धतीने शहरासाठी मजबूत सार्वजनिक वाहतूक व्यवस्था उपलब्ध करून देण्याची गरज होती आणि मेट्रोच्या माध्यमातून आम्ही ती पूर्ण करीत आहोत. ही व्यवस्था आणखी व्यापक आणि भक्कम करण्याच्या दृष्टीने मेट्रोचा विस्तार करणेही तितकेच आवश्यक आहे. नव्य मार्गांमध्ये स्वारगेट ते कात्रज 5.4 किमी, पिंपरी ते निगडी 4.4 किमी, वनाज ते चांदणी चौक 1.5 किमी, रामवाडी ते वाघोली 12 किमी, हडपसर ते खराडी 5 किमी, स्वारगेट ते हडपसर 7 किमी, स्वारगेट ते खडकवासला 13 किमी आणि एसएनडीटी ते वारजे 8 किमी या मार्गाचा समावेश आहे.

उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघातील लढाई असली विरुद्ध नकली- आशिष शेलार यांचा टोला

मुंबई दिनांक ५ मे २०२४
उत्तर पश्चिम मुंबई लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार रवींद्र वायकर यांच्या प्रचाराचा नारळ शनिवारी मुंबई भाजप अध्यक्ष आमदार अँड. आशिष शेलार यांच्या हस्ते वाढवण्यात आला. या मतदार संघातील लढाई असली विरुद्ध नकली अशी आहे, असा टोला त्यांनी लगावला.

मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार रवींद्र वायकर यांच्या प्रचारार्थ काल संध्याकाळी महायुतीची जाहिर सभा गोरेगाव बांगूर नगर येथे संपन्न झाली. ही लोकसभेची निवडणूक असली आणि नकलीमधली लढाई आहे. पाकिस्तानची भाषा बोलणारे आणि दहशतवाद्यांना घरात घुसून मारणाऱ्यांमधली ही लढाई आहे. त्यामुळे ही लोकसभा निवडणूक देशासाठी महत्त्वाची असून मतदारांनी असली शिंदे सेनेचे उमेदवार रवींद्र वायकर यांना भरघोस मतांनी विजयी करावे, असे आवाहन यावेळी केले.

ज्या काँग्रेसने मुंबईला केंद्रशासित केले, महाराष्ट्रापासून तोडण्याचा प्रयत्न केला, संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यामध्ये ज्या काँग्रेसने आंदोलन करणाऱ्यांवर गोळ्या झाडल्या, त्या काँग्रेसशी उद्धव ठाकरे यांनी हात मिळवणी केली आहे. त्यामुळे मराठी माणसाचे काँग्रेसच्या हाताला लागलेले रक्त उद्धव ठाकरे यांच्या हातालाही लागले आहे.त्यामुळे त्यांची शिवसेना नकली आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी काँग्रेसशी कधीच हात मिळवणी केली नाही. त्यांची असली शिवसेना आज आमच्या सोबत आहे असेही त्यांनी नमूद केले.

यावेळी खासदार गजानन कीर्तिकर म्हणाले की, नरेंद्र मोदी यांच्या सोबत संसदेत काम करण्याची मला संधी मिळाली. 370 कलम हटवले गेले, असे अनेक ऐतिहासिक निर्णय झाले, त्या ऐतिहासिक निर्णयांचा मला साक्षीदार होता आले, नरेंद्र मोदी यांनी केलेली देशातील कामे, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी केलेली कामे तुमच्या सोबत आहेत, त्यामुळे ती फक्त लोकांपर्यंत पोहोचवा, गैरसमज दूर करा, लोकांशी संवाद साधा, आपला विजय निश्चित आहे, असे त्यांनी सांगितले.

यावेळी आमदार अमित साटम, आमदार विद्या ठाकूर,आमदार डॉ.भारती लव्हेकर,आमदार राजहंस सिंह, यांच्यासह शिवसेना भाजपा रिपाई महायुतीचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते.

पराभव समोर दिसत असल्याने संविधान बदलण्याची भाषा!- चंद्रकांतदादा पाटील यांचा कॉंग्रेसवर जोरदार प्रहार

संविधान रथाचे नामदार पाटील यांच्या हस्ते उद्घाटन

पुणे- कॉंग्रेससह विरोधकांना पराभव स्पष्टपणे समोर दिसत आहे. त्यामुळे ते संविधान बदलाची भाषा करत आहेत. वास्तविक, कॉंग्रेसने स्वतः च्या राजकीय फायद्यासाठी संविधानात वारंवार दुरुस्त्या केल्या, असा प्रहार राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण वस्त्रोद्योग आणि संसदीय कार्य मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी केला. अतुल साळवे आणि सुखदेव अडागळे यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या संविधान रथाचे उद्घाटन नामदार चंद्रकांतदादा पाटील यांच्या हस्ते झाले. यावेळी ते बोलत होते.

यावेळी रिपाइंचे नेते परशुराम वाडेकर, ॲड. मंदार जोशी, बाळासाहेब खंकाळ, बापू ढाकले, राष्ट्रवादी काँग्रेसचे ॲड. राहुल म्हस्के, भारत भोसले, मायाताई पोसते, उज्ज्वलाताई सर्वगोड, जितेश दामोदरे, अतुल साळवे, डॉ संदीप बुटाला, शाम देशपांडे , छायाताई मारणे, शिवसेनेचे मयुर पानसरे, मनसेचे गणेश शिंदे, राज तांबोळी, आशुतोष वैशंपायन, दीपक पवार, अनुराधा येडके, सुखदेव आडगळे, अजय मारणे, दिनेश माथवड , दिनेश माझिरे, नंदकुमार गोसावी, सुरेखा जगताप यांच्या सह इतर मान्यवर उपस्थित.‌

मंत्री चंद्रकांतदादा पाटील म्हणाले की, डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे आपल्या सर्वांवर अनंत उपकार आहेत.
१५ ऑगस्ट १९४७ रोजी देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर १९५० ला आपल्याला संविधान मिळालं. त्यातून देश आणि राज्य कसं चालवलं पाहिजे; याची नियमावली तयार करण्यात आली. यासाठी डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी प्रचंड मेहनत घेतली. २६ नोव्हेंबर १९४९ ला त्यांनी संविधानाचा मसूदा लोकसभेत सादर केला. त्यानंतर २६ जानेवारी १९५० रोजी तो स्विकारला गेला. त्यामुळे डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी ज्या दिवशी हा मसुदा लोकसभेत सादर केला; तो दिवस माननीय मोदीजींनी संविधान दिवस म्हणून जाहीर केला. या दिवशी देशभरात संविधानाचं पूजन केलं जातं. संविधानाच्या उद्देशिकेचं वाचन केलं जातं. डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा असा सन्मान कॉंग्रेसने कधीही केला नाही.

ते पुढे म्हणाले की, डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानामुळेच महिलांना आणि गरीबांना मताचा समान अधिकार मिळाला. गरीब-श्रीमंत, स्त्री-पुरुष असा भेदभाव केला नाही. त्यामुळे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी तयार केलेल्या संविधानाचा संपूर्ण जगाने आदर्श घेऊन आपलं संविधान तयार केलं आहे.

कॉंग्रेसवर जोरदार हल्लाबोल करताना ते म्हणाले की, पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या पासून अनेकवेळा घटनेत दुरुस्ती झाली. कॉंग्रेसने घटनेच्या मूळ गाभ्यालाच बोट लावले.‌ इंदिरा गांधी यांनी स्वत:चं पद टिकवण्यासाठी घटना दुरुस्ती केली. तसेच, वेळोवेळी संविधानातील कलमांचा गैरवापर करुन राज्य सरकारे बरखास्त केली. दुसरीकडे नरेंद्र मोदीजींनी गरिबांना नोकरीमध्ये १० टक्के आरक्षण मिळवून दिलं. तसेच, महिलांना ३३ टक्के आरक्षण दिलं. अटलजींनी सर्वांना शिक्षणाचा समान अधिकार मिळवून दिला. माननीय मोदीजींनी देशाची सुरक्षा लक्षात घेऊन ३७० कलम हटवले.

ते पुढे म्हणाले की, कॉंग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी काल पुण्यातील सभेत आरक्षणाची मर्यादा वाढवली पाहिजे, असं मत व्यक्त केलं. पण इतके वर्ष कॉंग्रेसचं राज्य देशात आणि राज्यात होतं. तेव्हा त्यांना याची आठवण का नाही झाली. १९९२ ला ओबीसी कोट्यातून मराठा समाजाला आरक्षण देता येऊ शकत होतं. त्यावेळी तत्कालीन मुख्यमंत्री शरद पवार मुख्यमंत्री यांनी मराठ्यांना ओबीसी कोट्यातून आरक्षण मिळवून दिले नाही. त्यामुळे विरोधकांना पराभव दिसू लागल्याने आरक्षण बदलणार अशी अफवा पसरवत आहेत. मोदी सरकारने डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनातील पाच ठिकाणं तीर्थक्षेत्र म्हणून घोषित करून विकसित केली. कॉंग्रेसने का नाही केली. त्यामुळे दलित समाजाला याची जाणीव आहे, अशी भावनाही त्यांनी यावेळी व्यक्त केली.‌

रिपाइं आठवले गटाचे नेते परशुराम वाडेकर म्हणाले की, देशाचे लोकप्रिय पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदीजी हे संविधान पूजक आहेत. ते पंतप्रधान झाल्यापासून प्रत्येक खासदाराला संविधानाचं महत्व कळावं; यासाठी लोकसभेत दोन दिवस संविधानाची कार्यशाळा सुरू केली. कॉंग्रेसने यासाठी कधीही असा पुढाकार घेतला नाही. डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानामुळे नरेंद्र मोदीजी यांच्या सारखी सर्व सामान्य कुटुंबातील व्यक्ती पंतप्रधान पदी विराजमान होऊ शकली. त्यामुळे खालच्या जातीचा व्यक्ती पंतप्रधान होतो, हे कॉंग्रेससह विरोधकांच्या डोळ्यात खुपत आहे.

ते पुढे म्हणाले की, बाबासाहेब आंबेडकर यांच्या हयातीत भंडारा आणि मुंबईत झालेल्या निवडणुकांमध्ये त्यांचा पराभव कॉंग्रेसने केला, आणि आता संविधान बदलाचा खोटा प्रचार करून त्याचे भांडवल करत आहेत, तर‌ ते बरोबर नाही.‌ संविधान धोक्यात नाही, तुम्ही धोक्यात आहात. इंदू मिल साठी जागा पंतप्रधान मोदींनी दिली. त्यामुळे माननीय मोदीजी हेच संविधान रक्षक आहेत, अशी भावना त्यांनी यावेळी व्यक्त केली.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ॲड. मंदार जोशी यांनी केले. तर आभार जितेश दामोदरे‌ यांनी मानले.

टिपू सुलतानचे स्मारक होवू देणार नाही-भाजप शहाराध्यक्ष धीरज घाटे

पुणे : लोकसभा निवडणुकीत एमआयएमचे उमेदवार अनिस सुंडके यांनी टिपू सुलतान यांचे स्मारक पुण्यात उभे करु अशी घोषणा केली आहे. पुण्याच्या भूमित कोणत्याही परिस्थितीमध्ये स्मारक होवू देणार नाही. याविरोधात पोलिस तक्रार करणार असल्याचे भाजपचे शहराध्यक्ष धीरज घाटे यांनी रविवारी पत्रकार परिषदेत सांगितले.

यावेळी निवडणूक व्यवस्थापन समितीचे संयोजक श्रीनाथ भिमाले, पतित पावन संघटनेचे स्वप्नील नाईक, दत्ता खाडे, महायुतीचे समन्वयक संदीप खर्डेकर, सह प्रसिध्दीप्रमुख पुष्कर तुळजापुकर आदी उपस्थित होते.

यावेळी घाटे म्हणाले, एमआयएमचे उमेदवार सुंडके यांनी टिपू सुलतान यांचे स्मारक करण्याच्या घोषणेला भाजपचा तीव्र विरोध आहे. हिंदू समाजावर त्यानी अन्याय केला. देशामध्ये निवडणूका सुरु असताना अशा प्रकारे स्मारकाचा मुद्दा उपस्थित करुन जातीय तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न सुंडके करत आहेत. काही लोकांना टिपू सुलतान यांची जयंती साजरी करण्याचा प्रयत्न केला. यावेळी भाजपने तीव्र विरोध केला होता. त्यामुुळे कोणत्याही परिस्थितीमध्ये आमचा स्मारकाला विरोध असल्याचे घाटे म्हणाले.

पुणे शहराची ओळख सांस्कृतिक केंद्र म्हणून आहे. अनेक महापुरुषांचे पुणे आहे. टिपू सुलतान हा काही महापुरुष नव्हता, हजारो निरपराध हिंदू पुरुष आणि महिलांचे त्याने बळी घेतले. हिंदुत्ववादी संघटना हे कदापी होवू देणार नाही. यासाठी आम्ही पोलिसात जावू. मते मिळवण्यासाठी अशा प्रकारे ध्रुवीकरण करण्याचा प्रयत्न आहे. भाजप याचा तीव्र निषेध करत असल्याचे घाटे म्हणाले.

उज्वल निकमसारख्या देशभक्तावर बिनबुडाचे आरोप करताना जराही शरम वाटली नाही का? बावनकुळेंचा सवाल

मुंबई-विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी पोलीस अधिकारी हेमंत करकरे यांचा खून दहशतवादी कसाबच्या बंदुकीने झाला नव्हता. ती गोळी संघाशी (आरएसएस) संबंधित एका पोलीस अधिकाऱ्याची होती. निकम यांनी हे सत्य न्यायालयापासून लपवून ठेवले. या देशद्रोह्याला भाजपने उमेदवारी दिल्याचा आरोप त्यांनी केला आहे. यावरून भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी विजय वडेट्टीवार यांच्यावर जोरदार टीका केली आहे.चंद्रशेखर बावनकुळे यांनी एक्स या सोशल मिडिया माध्यमावर पोस्ट शेअर करत विजय वडेट्टीवार यांच्यावर निशाणा साधला आहे. त्यात म्हटले आहे की, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी पुन्हा एकदा अकलेचे तारे तोडत पाकिस्तान धार्जिणी भूमिका घेतली. शहीद हेमंत करकरे यांच्यावर चाललेली गोळी पाकिस्तानी दहशतवादी अजमल कसाबची नव्हती, असा जावईशोध वडेट्टीवार यांनी कोठून लावला, असेही ते म्हणाले.

काँग्रेसने पातळी सोडली? – बावनकुळे
निवडणुकीत मतं मिळविण्यासाठी काँग्रेस किती खालच्या पातळीला जाणार? भाजपाला विरोध करण्यासाठी तुम्ही 26/11 मुंबई हल्ल्यातील दहशतवादी अजमल कसाबची बाजू घेता? थोडी तरी लाज बाळगा. जेव्हापासून मोदीजी सत्तेत आले दहशतवाद्यांचं कंबरडं मोडलं पण आज काँग्रेस दहशतवाद्यांसाठी अश्रू गाळत आहेत. महाराष्ट्रात मविआ सत्तेत असताना याकुबच्या कबरीवर सुशोभीकरण केलं आता कसाबचा पुळका आला आहे. काँग्रेस आणि वडेट्टीवार यांच्या पाकधार्जिण्या भूमिकेबद्दल जनता धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही, अशी टीका चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली आहे.

हेमंत करकरेंना RSS धार्जिण्या पोलिसाने गोळी घातली:त्याचे पुरावे लपवणाऱ्या उज्ज्वल निकमांना BJPची उमेदवारी; वडेट्टीवारांचा हल्लाबोल

कोल्हापूर-हेमंत करकरे यांच्या शरीरात घुसलेली गोळी कसाबच्या किंवा कुठल्याही दहशतवाद्याच्या बंदुकीतील नव्हती. ती गोळी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ धार्जिण्या असलेल्या एका पोलिस अधिकाऱ्याच्या पिस्तुलमधील होती. त्यावेळेस ते पुरावे लपवणारा देशद्रोही कोण असेल तर तो उज्ज्वल निकम आहे. अशा देशद्रोह्याला भाजप तिकीट देत असेल तर मात्र भाजप देशद्रोह्यांना थेट पाठिशी घालणारा पक्ष आहे, असे वादग्रस्त विधान विजय वडेट्टीवार यांनी करत भाजपवर देखील निशाणा साधला. ते कोल्हापूरात आयोजित सभेत बोलत होते यावेळी त्यांनी हे विधान केले. ते कोल्हापूरात बोलत होते. त्यांच्या विधानानंतर भाजपकडून त्यांच्यावर जोरदार टीका होत आहे.

विजय वडेट्टीवार यांनी वकील तथा भाजपचे मुंबईतील उमेदवार उज्ज्वल निकम यांच्यावर जोरदार निशाणा साधला. ते म्हणाले की, तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख तेव्हा निकम यांना म्हणाले होते की, कसाबला फाशी झाली म्हणजे श्रेय घेण्याचे गरज नाही. तालुका लेव्हलच्या बेलआऊट करणाऱ्या वकिलानेही हा खटला लढवला असता तरीही कसाबला फाशी झाली असती. कारण कसाब हा दहशतवादी होता.

त्यामुळे त्याला फाशी झालीच असती. त्यामुळे यामध्ये उज्ज्वल निकम यांनी डिंग मारण्याचे किंवा बडेजाव मिरवण्याचे कारण नाही, असे विलासराव देशमुख यांनी म्हटले होते. विलासराव देशमुख यांनी उज्ज्वल निकम यांना तेव्हाच ओळखलं होतं, असे विजय वडेट्टीवार यांनी म्हटले. आम्ही जे काय बोललो आहोत, त्याविषयी उज्ज्वल निकम यांनी खुलासा करावा. लोकसभा निवडणुकीत त्यांचा पराभव नक्की आहे, असाही हल्लाबोल वडेट्टीवार यांनी केला.

वडेट्टीवारांनी केले स्पष्टीकरण
मुंबईवरील 26/11 हल्ल्याच्या वेळी शहीद झालेले पोलीस अधिकारी हेमंत करकरे यांच्या शरीरात घुसलेली गोळी अतिरेक्यांची नव्हती, असे वक्तव्य काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी केले होते. या वक्तव्यावरुन गदारोळ निर्माण होताच विजय वडेट्टीवार यांनी स्पष्टीकरण दिले आहे. हेमंत करकरे यांच्या शरीरात घुसलेली गोळी अतिरेक्यांची नव्हती, हे माझे वक्तव्य एस.एम. मुश्रीफ यांनी लिहलेल्या पुस्तकाच्या आधारे केले होते. त्यामध्ये तसा उल्लेख होता. ती गोष्ट खरी असेल तर हा देशद्रोहाचा प्रकार आहे, असे मी म्हटल्याचे वडेट्टीवार यांनी स्पष्ट केले.

‘एमआयटी-एडीटी’ला ‘क्यूएस वर्ल्ड युनिव्हर्सिटी’ रँकिंग

पुणेः विद्यार्थ्यांना कायमच गुणवत्तापूर्वक शिक्षण देण्यासाठी कटीबद्ध असणाऱ्या एमआयटी आर्ट, डिजाईन आणि टेक्नॉलॉजी विद्यापीठाच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला आहे. एमआयटी एडीटी विद्यापीठाने नुकतीच आपली शैक्षणिक कटिबद्दता सिद्ध करताना क्यूएस जागतिक विद्यापीठ क्रमवारी-२०२४(वर्ल्ड युनिव्हर्सिटी रँकिंग) च्या प्रतिष्ठित कला आणि डिझाइन श्रेणीमध्ये १५०-२०० अशा प्रभावी रँक बँडसह स्थान मिळवले आहे.या यशामुळे एमआयटी एडीटी विद्यापीठाने जागतिक स्तरावर उच्च शिक्षणातील अग्रगण्य संस्था म्हणून आपली प्रतिष्ठा मजबूत केली आहे. क्युएस वर्ल्ड युनिव्हर्सिटी रँकिंग हे शैक्षणिक गुणवत्तेचे आणि संस्थात्मक कार्यक्षमतेचे महत्त्वपूर्ण मापदंड म्हणून ओळखले जाते, जे शिक्षणातील उत्कृष्टतेचे मूल्यांकन आणि प्रोत्साहन देण्यासाठी महत्वपूर्ण काम करते.
एमआयटी एडीटी विद्यापीठ संस्थेचे कार्यकारी अध्यक्ष तथा कुलगुरू प्रा.डॉ.मंगेश कराड यांच्या दूरदर्शी नेतृत्वाखाली आणि कार्यकारी संचालिका प्रा.डॉ.सुनिता कराड यांच्या मार्गदर्शनाखाली आर्ट, डिजाईन आणि टेक्नॉलॉजी या शाखांत जागतिक दर्जाचे नाविण्यपूर्ण शिक्षण पुरवत आहे. त्यामुळे विद्यापीठाला या रँकिंगमध्ये स्थान मिळाल्याने विद्यार्थ्यांच्या पालकांसह राज्यभरातून एमआयटी एडीटी विद्यापीठावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.


एमआयटी एडीटी विद्यापीठ डॉ. रामचंद्र पुजेरी, डॉ. मोहित दुबे आणि डॉ. अनंत चक्रदेव हे तीन प्र.कुलगुरू तसेच शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांच्या कष्टांमुळे यशाची विविध शिखरे पादक्रांत करत आहे. त्यात विद्यापीठाला क्यूएस वर्ल्ड युनिव्हर्सिटी रँकिंग मध्ये स्थान मिळणे आमच्यासाठी अभिमानाची गोष्ट असून ती सर्वांच्या कष्टाची पावतीच आहे. या रँकिंगसाठी सातत्याने पाठपुरावा करणाऱ्या डॉ.विरेंद्र भोजवानी व डॉ.राकेश सिद्धेश्‍वर यांचेही खूप अभिनंदन!
-प्रा.डॉ.मंगेश कराड,
कार्यकारी अध्यक्ष तथा कुलगुरू,
एमआटी एडीटी विद्यापीठ, पुणे.

जिल्ह्यातील मतदान केंद्रावर मतदारांसाठी आवश्यक सुविधांची उभारणी- जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे

पुणे, दि. ५: जिल्ह्यात तिसऱ्या टप्प्यात बारामती लोकसभा मतदार संघात ७ मे रोजी तर चौथ्या टप्प्यात १३ मे रोजी मावळ, पुणे व शिरुर मतदार संघात मतदान होत असून त्या अनुषंगाने सर्व मतदान केंद्रावर किमान आश्वासित तसेच अन्य सुविधांची व्यवस्था करण्यात येत असल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे यांनी दिली.

मतदार हा लोकशाहीच्या केंद्रस्थानी असून त्याच्या सोयीसाठी आवश्यक सुविधा उपलब्ध करुन देण्याचे भारत निवडणूक आयोगाचे निर्देश आहेत. त्यामध्ये आश्वासित किमान सुविधा, अन्य सुविधा, दिव्यांग मतदार, ज्येष्ठ मतदार, महिला मतदार आदींसाठी विविध सुविधा देण्यात येणार आहेत.

मतदान केंद्र २ किलोमीटरच्या परिसरात आणि तळमजल्यावर उभारण्यात आलेली आहे. शारीरिकदृष्ट्या विकलांग मतदार (पीडब्ल्यूडी), ज्येष्ठ मतदार यांना मतदानासाठी सुलभपणे जाता यावे यासाठी मतदान केंद्राच्या ठिकाणी रॅम्पची सुविधा करण्यात आली आहे.

मतदान केंद्रामध्ये मतदान अधिकारी, कर्मचारी, उमेदवारांचे मतदान प्रतिनिधी, शारीरिकदृष्ट्या विकलांग मतदार, गर्भवती महिला, ज्येष्ठ नागरिक यांना बसण्यासाठी पुरेशा प्रमाणात खुर्ची, बाकडे, टेबल आदी फर्निचरची व्यवस्था करण्यात आली आहे. मतदान केंद्रात पुरेशा प्रकाशासाठी विद्युतव्यवस्था करण्यात आली आहे. दुर्गम भागात वीजजोड नसल्यास त्या ठिकाणी बॅटरीचालित एलईडी, चार्जिंगचे दिवे आदी व्यवस्था करण्यात येणार आहे. मतदान केंद्राच्या परिसरात मतदान केंद्रात उपलब्ध सुविधांबाबत माहिती दर्शविणारे चिन्हे (साईनेज) लावण्यात येतील.

उन्हाळा लक्षात घेता पिण्‍याच्या पाण्याची व्यवस्था आणि सावली नसल्यास मंडपाची व्यवस्था करण्यात येत आहे. महिला व पुरुषांसाठी पुरेशा पाण्याच्या उपलब्धतेसह स्वतंत्र शौचालये, महिला मतदारांसह आलेल्या बालकांसाठी पाळणाघरची सुविधा आहे. मतदारांना आपले मतदान केंद्र क्रमांक, मतदार यादी भाग मधील अनुक्रमांक शोधण्यासाठी मदत करण्यास मतदान केंद्रस्तरीय अधिकारी व कर्मचाऱ्यांचा समावेश असलेले मतदान मदत कक्ष उभारण्यात येणार आहेत.

याशिवाय औषधोपचार किट, मतदान केंद्रावर शारीरिक विकलांग मतदार, ज्येष्ठ नागरिक मतदार यांना मदत करण्यासाठी तसेच केंद्रावरील रांगांचे व्यवस्थापनात सहाय्य करण्यासाठी स्वयंसेवक, ज्येष्ठ, दिव्यांग, हालचाल करण्यास अक्षम (लोकोमोटिव डिसेबल्स) आदींना मतदानाच्या दिवशी सार्वजनिक वाहतूक सेवेचा मोफत पास देण्यात येईल. सार्वजनिक वाहतूक सेवा उपलब्ध नसल्यास त्यांना अन्य माध्यमातून घरुन मतदान केंद्रापर्यंत आणणे व मतदानानंतर घरी सोडण्याची व्यवस्था उपलब्ध केली जाईल.

मतदान केंद्रावर महिलांसाठी एक, पुरुषांसाठी एक आणि ज्येष्ठ व शारीरिक विकलांग मतदारांसाठी एक अशा तीन रांगा राहतील, असेही जिल्हा निवडणूक प्रशासनाच्यावतीने कळविण्यात आले आहे.

मावळ लोकसभा मतदार संघातील ज्येष्ठ, दिव्यांग नागरिक आणि मतदान कर्तव्यावरील कर्मचाऱ्यांच्या मतदानाचे वेळापत्रक जाहीर

पुणे, दि. ५: मावळ लोकसभा मतदार संघात ८५ वर्षावरील ज्येष्ठ, दिव्यांग नागरिक तसेच अत्यावश्यक सेवेतील अधिकारी कर्मचाऱ्यांसाठी टपाली मतदानाची सुविधा तसेच मतदान कर्तव्यावरील अधिकारी कर्मचाऱ्यांसाठी मतदान सुविधा केंद्रे स्थापन करण्यात आली असून या मतदानाचे वेळापत्रक निवडणूक निर्णय अधिकारी दीपक सिंगला यांनी जाहीर केले आहे.

मावळ तसेच चिंचवड विधानसभा मतदार संघात ८५ वर्षावरील ज्येष्ठ, दिव्यांग नागरिक यांच्या घरी जाऊन मत नोंदवून घेण्याची प्रक्रिया ८ व ९ मे रोजी तर निवडणूक कर्तव्यावरील अधिकारी कर्मचाऱ्यांचे मतदान सुविधा केंद्रावर (एफसी) ५ मे व ७ ते ९ मे दरम्यान नोंदवून घेण्यात येणार आहे.

पिंपरी विधानसभा मतदार संघात ८५ वर्षावरील ज्येष्ठ, दिव्यांग नागरिक यांच्या घरी जाऊन मत नोंदवून घेण्याची प्रक्रिया ७ व ८ मे रोजी तर निवडणूक कर्तव्यावरील अधिकारी कर्मचाऱ्यांचे मतदान सुविधा केंद्रावर ७ ते ९ मे
दरम्यान नोंदवून घेण्यात येणार आहे, असेही मावळ लोकसभा मतदार संघाच्या निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयाच्यावतीने कळविण्यात आले आहे.
0000

पाकिस्तानमध्ये जाऊन बिर्यानी खाणारा पंतप्रधान पाहिजे की मणिपूरमध्ये जाऊन पीडितांची सांत्वन करणारा पंतप्रधान पाहिजे ?

पराभव समोर दिसू लागल्याने भाजपकडून हिंदू-मुस्लीम आणि पाकिस्तान सारखे मुद्दे प्रचारात

मुंबई दि. ५ मे २०२४-पाकिस्तानमध्ये जाऊन बिर्यानी खाणारा पंतप्रधान पाहिजे की मणिपूरमध्ये जाऊन पीडितांची सांत्वन करणारा पंतप्रधान पाहिजे ? अशी जाहीर आम्ही द्यावी काय असा सवाल करत भाजपच्या या जाहिरातीला कॉंग्रेसने आक्षेप घेत निवडणूक आयोगाकडे तक्रार केली आहे.

भाजपच्या या जाहिरातीला कॉंग्रेसने आक्षेप घेत तक्रार केली आहे.

पहिल्या दोन टप्प्यात झालेले मतदान आपल्या विरोधात झाले आहे याची जाणिव झाल्याने भाजप आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी आता धार्मिक अजेंडा आणि पाकिस्तानला निवडणूक प्रचारात घेऊन आले आहेत. भाजपने आज आघाडीच्या मराठी वर्तमानपत्रात दिलेली जाहिरात त्यांच्या ध्रुवीकरणाच्या अजेंड्याचे प्रतिक आहे. निवडणूक आयोगाने याची गंभीर दखल घेऊन भाजपासह महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करून त्यांच्यावर आचारसंहिता भंगाचे गुन्हे दाखल करावेत अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे यांनी केली आहे.

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे यांच्या नेतृत्त्वाखाली काँग्रेस पक्षाच्या शिष्टमंडळाने आज राज्याच्या अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांची भेट घेऊन भारतीय जनता पक्षाने आज वर्तमानपत्रात दिलेल्या जाहिराती विरोधात तक्रार केली. यावेळी माध्यमांशी बोलताना अतुल लोंढे म्हणाले की पहिल्या दोन टप्प्यात झालेले मतदान आपल्या विरोधात झाले आहे याची जाणिव झाल्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी आता धार्मिक अजेंडा आणि पाकिस्तानला निवडणूक प्रचारात घेऊन आले आहेत. आज एका आघाडीच्या दैनिकात पहिल्या पानावर तुमच्या मताने कुठे जल्लोष व्हायला हवा आहे भारतात की पाकिस्तानात अशी जाहिरात दिली आहे. हा मतदारांची दिशाभूल करण्याचा प्रकार आहे. भारतीय जनता पक्षाला भारत आणि पाकिस्तान मधला फरक कळत नाही का? असा संतप्त सवाल करून पंतप्रधान हतबल, निराश आणि वैफल्यग्रस्त झाले आहेत. १० वर्षात जनतेच्या हिताचे काही केले नाही त्यामुळे मतं मागण्यासाठी त्यांना पाकिस्तानचा आधार घ्यावा लागत आहे. पाकिस्तान मध्ये जाऊन बिर्यानी खाणारा, पाकिस्तानी गुप्तहेर संस्था आयएसआयला पठाणकोट येथे बोलावणारा पंतप्रधान पाहिजे की, चीनसमोर निधड्या छातीने उभा राहणारा, मणिपूर मध्ये जाऊन पीडितांची सांत्वन करणारा, कन्याकुमारी ते श्रीनगर अशी पायी भारत जोडो यात्रा काढणारा पंतप्रधान पाहिजे अशी जाहिरात आम्हीही देऊ शकतो पण आमच्याकडे कार्यक्रम आहे. त्यामुळे आम्हाला अशी गोष्टींची आवश्यकता नाही.

भारताच्या लोकसभेची निवडणूक सुरु आहे. देशातील विविध राजकीय पक्ष ही निवडणूक लढवत आहेत. पाकिस्तानातील राजकीय पक्ष ही निवडणूक लढवत नाहीत; मग देशातील जनतेने कोणत्याही पक्षाला मतदान केले तरी भारतातलाच एक पक्ष विजयी होणार आहे. भारताचे सरकार बनणार आहे याच्याशी पाकिस्तानचा संबंध काय? पण भाजप आणि पंतप्रधान वारंवार खोटे बोलून जनतेची दिशाभूल करत आहेत हा आदर्श आचारसंहितेचा भंग तर आहेच त्यासोबतच भारतीय दंड संहितेच्या कलम 171(G), लोकप्रतिनिधी कायद्याच्या कलम 125, 153(A), 123 (3A) नुसार गुन्हा आहे. त्यामुळे निवडणूक आयोगाने या प्रकरणाची गंभीर दखल घेतली पाहिजे व भाजपासोबत ही जाहिरात देणारे त्यांचे मित्रपक्ष राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार, शिवसेना एकनाथ शिंदे यांच्यावरही कारवाई अशी मागणी लोंढे यांनी केली आहे.

या शिष्टमंडळात लोंढे यांच्यासोबत, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या विधी विभागाचे अध्यक्ष एड. रवी जाधव, गजानन देसाई यांचा समावेश होता.