पुणे ता. २८ : पुण्याला ‘आयटी हब’ अशी ओळख प्राप्त करुन देणाऱ्या हिंजवडी आयटी पार्क येथील वाहतूकीची समस्या आता लवकरच मार्गी लागणार आहे. स्वारगेट ते पिंपरी-चिंचवड आणि रामवाडी ते वनाज या पहिल्या टप्प्यातील मेट्रोच्या कामाला सुरुवात झाल्यानंतर लगेचच दुसऱ्या टप्प्यातील हिंजवडी ते शिवाजीनगर या मेट्रो मार्गालाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आता मंजुरी दिली असल्याची माहिती पालकमंत्री गिरीश बापट यांनी दिली.
मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण समितीची (पीएमआरडीए) बैठक आज मुंबई येथे पार पडली. या बैठकीत या मार्गाच्या प्रस्तावास मंजुरी मिळाली. यावेळी नगर विकास राज्यमंत्री रणजित पाटील, नगर विकास विभागाचे प्रधान सचिव नितीन करीर, पीएमआरडीएचे मुख्य कार्यकारी अधिकारी महेश झगडे यांच्यासह इतर पदाधिकारी उपस्थित होते.
दिल्ली मेट्रो कॉर्पोरेशनकडून या मार्गाचा सविस्तर आराखडा (डीपीआर) तयार झाला आहे. विशेष म्हणजे नुकत्याच पार पडलेल्या पुणे मेट्रोच्या भूमिपूजन सोहळ्यात हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रो मार्ग होणार असल्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली होती. घोषणेला फक्त तीन दिवसच उलटले असताना हा ‘सुपरफास्ट’ निर्णय घेऊन मुख्यमंत्र्यांनी पुणेकरांना नववर्षाची भेट दिली आहे.
याविषयी बापट म्हणाले की, माहिती तंत्रज्ञान क्षेत्राचा पुण्याच्या प्रगतीत मोलाचा वाटा आहे. हिंजवडी येथील राजीव गांधी आयटी पार्क येथे दोन लाखाहून अधिक कर्मचारी वर्ग कार्यरत आहे. या संख्येत दिवसेदिवस वाढ होत आहे. दुचाकी आणि चारचाकीसह सुमारे १.५ ते २ लाख वाहनांची वर्दळ या मार्गावर असतात, तर सार्वजनिक आणि खासगी अशा एकूण ८८५ बसेस याच मार्गावरुन येत-जात असतात. वास्तविक पाहता, पुण्याच्या माहिती तंत्रज्ञान क्षेत्राची एकूण वार्षिक उलाढाल १५०० कोटी इतकी आहे. त्यापैकी तब्बल ५० टक्के (७५० कोटी ) उपन्न हे फक्त हिंजवडी आयटी पार्कमार्फत प्राप्त होते. असे असतानाही येथे पायाभूत सुविधांची वानवा जाणवत होती.
हिंजवडी येथे भेडसावणाऱ्या वाहतूक समस्येचा मी स्वत: अनुभव घेतला होता. आणि या समस्येचे तातडीने निराकरण करण्यासाठी मेट्रोचा प्रस्ताव मुख्यमंत्र्यापुढे मी मांडला होता. मुख्यमंत्र्यांनीही तातडीने याची दखल घेऊन या प्रस्तावास मंजुरी दिली. या मार्गाच्या जलद प्रक्रियेसाठी ‘पीएमआरडीए’ मार्फत हा प्रकल्प राबविला जाणार असल्याचेही बापट यांनी सांगितले.
‘तब्बल साडेतेवीस कि.मी.च्या या मेट्रो मार्गाचा आराखडा दिल्ली मेट्रो कॉर्पोरेशनने तयार केला आहे. या मार्गावर किती आणि कुठे स्टेशन असणार आहेत, तसेच या मार्गासाठी किती खर्च येणार हे आराखड्यात असून, आजच्या बैठकीत या आराखड्याचे सादरीकरण झाले. या बैठकीत आराखड्यास आज मंजुरी मिळाली. विशेष म्हणजे याच बैठकीत ‘पीएमआरडीए’च्या माध्यमातून मेट्रोसारख्या मोठ्या प्रकल्पांसाठी आंतरराष्ट्रीय बाजारातून निधी उभारला जाणार आहे. एकीकडे पहिल्या टप्प्यातील मेट्रोसाठी दहा वर्षांची वाट पाहावी लागली असताना दुसर्या टप्प्यातील मेट्रोचा मार्ग मात्र अल्पावधीतच सुकर झाला असल्याने पुणेकरांना आता ‘अच्छे दिन’ अनुभवता येणार आहेत.