पुणे, दि. 28–निश्चलनीकरणानंतर रोखरहित व्यवहाराला पर्याय नाही. निश्चलनीकरणामुळे देशाच्या अर्थव्यवस्थेमध्ये क्रांतीकारी बदल होत आहेत. केंद्र सरकारने रोखरहीत व्यवहाराला प्राधान्य देण्यासाठी डिजीटल धन व्यापार योजना जाहिर केली आहे. विविध शासकीय योजना राबविताना अधिकारी व कर्मचाऱ्यांनी डिजीटल व्यवहाराला प्रोत्साहन द्यावे व ही योजना यशस्वी करावी, असे आवाहन जिल्हाधिकारी सौरभ राव यांनी आज येथे केले.
जिल्हयात 7 जानेवारी,2017 रोजी डिजी धन मेळावा आयोजित करण्यात येणार आहे. डिजी धन मेळाव्याच्या आयोजनाचा आढावा घेण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या बैठकीत विविध विभागाच्या अधिकाऱ्यांना मार्गदर्शन करताना जिल्हाधिकारी सौरभ राव बोलत होते.
रोखरहित महाराष्ट्र देशातील पहिले राज्य करण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी जाहिर केलेल्या योजनेचा जिल्हयात प्रसार व्हावा तसेच डिजी धन मेळाव्याचे आयोजन, भाग्यवान ग्राहकाची निवड करणे या बरोबरच, कॅशलेस इंडिया उपक्रमाचाही आढावा बैठकीत घेण्यात आला. डिजी धन योजनेमध्ये व्यावसायीकांना बक्षीस देण्यात येणार आहे. त्यामुळे शासकीय व महानगरपालिका करांचा भरणा करणे, बचत गट वस्तू विक्री, वाहन अनुज्ञप्ति वाटप करणे, पॉईंट ऑफ सेल मशीन पुरवठा, ई-गव्हर्नन्स सेवा, खते व बियाणे उत्पादन विक्री, आपले सरकार, आधार कार्ड बँक खात्याला लिंक करणे,खाद्य पदार्थ विक्री, कृषी साहित्याचे उत्पादन करणाऱ्या कंपन्या आदिंचे स्टॉल डिजी धन मेळाव्यामध्ये लावण्यात येणार असून याद्वारे डिजीटल पेमेंटचा प्रसार करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी दिली.
बैठकीला निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्र मुठे, अग्रणी बँक व्यवस्थापक दिनकर देशमुख, विविध विभागांचे अधिकारी, पुणे व पिंपरी चिंचवड महानगर पालिकेचे लेखाधिकारी उपस्थित होते.