पिंपरी, दि. 10 ऑक्टोबर 2020 : भोसरी येथील विद्युत रोहित्राच्या स्फोटाच्या दुर्दैवी घटनेतील तीन मृतांच्या कुटुंबियांना महावितरणकडूनशुक्रवारी (दि. 9) प्रत्येकी चार लाख रुपयांच्या मदतीचा धनादेश सुपूर्द करण्यात आला.
भोसरी येथील इंद्रायणीनगरमध्ये राजवाडा बिल्डींग 2 जवळ विद्युत रोहित्राचा दि. 4 सप्टेंबरला दुपारी दीडच्या सुमारास स्फोट झाला होता. या घटनेत शारदा दिलीप कोतवाल, हर्षदा सचिन काकडे व त्यांची मुलगी शिवण्या यांचा मृत्यू झाला होता. या मृतांच्या कुटुबियांना महावितरणकडून प्रत्येकी 4 लाख रुपयांची मदत जाहीर करण्यात आली होती. त्याप्रमाणे भोसरी विभागाचे प्रभारी कार्यकारी अभियंता श्री. अमित बारटक्के यांनी मदतीच्या रकमेचे धनादेश कुटुबियांना सुपूर्द केले. महावितरणकडून ही मदतीची प्रशासकीय प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी इतर शासकीय विभागांकडून काही कागदपत्रांची प्रतीक्षा सुरु होती. कोरोनाच्या संकटामुळे त्यास विलंब होत असल्याचे पाहून महावितरणच्या अधिकाऱ्यांनी पुढाकार घेऊन वैयक्तिकस्तरावर पाठपुरावा करीत आवश्यक सर्व कागदपत्रांची पुर्तता केली. त्यानंतर मृतांच्या कुटुबियांना मदतीचा धनादेश सुपूर्द करण्यात आले.
दरम्यान, पिंपरी व भोसरी शहरामधील रोहित्रांच्या परिसरातील साफसफाई तसेच देखभाल व दुरुस्तीचे काम युद्धपातळीवर सुरु आहे. यामध्ये आतापर्यंत 2412 रोहित्रांच्या परिसरातील झाडीझुडपे, वेली काढणे, रोहित्रांची तपासणी करणे, आवश्यकतेनुसार दुरुस्ती करणे आदी कामे करण्यात आली आहे.