पुणे : कोविड महामारीने जगभर थैमान माजवले आहे. परंतु या रोगावरील उपचार पद्धतीबद्दल सतत नवनवीन माहिती उपलब्ध होत असल्याने संभ्रमाची अवस्था निर्माण झाली आहे. अशा परिस्थितीत अनेक वेळा औषधांचा अतिरिक्त वापर होण्याचा धोका संभवतो. बहुतेक डॉक्टर मार्गदर्शक तत्त्वांचे आणि आचारसंहितेचे पालन करत आहेत. परंतु तरीही काही ठिकाणी हे पालन होताना दिसत नाही. त्यामुळे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर डॉक्टरांनी मार्गदर्शक प्रणालीप्रमाणेच आणि आचारसंहितेचे पालन करीत औषधे द्यावी, अशी विनंती अखिल भारतीय ग्राहक पंचायतीचे राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य सूर्यकांत पाठक यांनी डॉक्टरांना केली आहे.
कोरोना साथीचा सामना आपल्या देशातील डॉक्टर्स मोठ्या शर्थीने आणि समर्पित वृत्तीने करीत आहेत,याबद्दल त्यांचे ऋण मानायला हवेत. परंतु कोरोनावरील औषध उपचारांच्याबाबत काही ठिकाणी संभ्रमाची अवस्था निर्माण झाली आहे. रेमेडीसिविरमुळे औषधांची टंचाई आणि काळाबाजार यांसारख्या दुष्टप्रवृत्तींना खतपाणी मिळते व समाजात असुरक्षिततेची भावना निर्माण होते. त्याचबरोबर स्टिरॉइड्स व अँटिबायोटिक्सच्या अतिवापराने मधुमेह, काळी बुरशी इत्यादी दुष्परिणाम होऊ शकतात. त्यामुळे याबाबत प्रसिद्ध आरोग्य विश्लेषक डॉ.अविनाश भोंडवे, ह्रदयरोगतज्ञ डॉ.नरेंद्र जावडेकर आदी प्रख्यात डॉक्टरांशी यांच्याशी देखील ग्राहक पंचायतीतर्फे चर्चा करण्यात आली असून त्यांनीही या विनंतीला दुजोरा देत पाठिंबा दर्शविला आहे.
सूर्यकांत पाठक म्हणाले, बहुतेक सर्व डॉक्टर उपचार करताना जागतिक आणि भारतीय मार्गदर्शक तत्त्वांचे आणि आचारसंहितेचे पालन करतात. तरीही कोरोनावरील उपचाराच्या वेळी कोणत्याही दबावाला बळी पडून औषधे अतिरिक्त प्रमाणात वापरली गेल्यास त्यात सगळ्यांचेच नुकसान आहे. रुग्ण व डॉक्टर्स यांची उपचारादरम्यान परस्पर सहमती असणे या काळात खूप महत्वाचे आहे. तरच या साथीचा एकोप्याने यशस्वी मुकाबला करणे शक्य होईल.
कोरोना औषधोपचारावेळी मार्गदर्शन तत्वे आणि आचारसंहितेचे पालन व्हावे -सूर्यकांत पाठक
Date: