सातारा दि. 5 : स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवानिमित्त डाक घर सातारा विभागाच्या वतीने सातारा शहरामध्ये भव्य प्रभात फेरी काढण्यात आली. जिलह्यातील पोस्ट विभागाच्यावतीने प्रत्येक डाक घरांमध्ये तिरंगा ध्वज फक्त 25 रुपयांमध्ये उपलब्ध करुन देण्यात येणार असून सर्व नागरिकांनी दि. 13 ते 15 ऑगस्ट 2022 या कालावधीत आपल्या घरी तिरंगा फडकवून स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव उत्साहात साजरा करावा, असे आवाहन प्रवर अधीक्षक डाक घर सातारा विभाग ए व्यंकटेश्वर रेड्डी, यांनी केले.
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त डाक घर सातारा विभागमार्फत विविध उपक्रम राबविण्यात येणार आहेत. या उपक्रमांतर्गत जन जागृती प्रभात फेरीचे सातारा मुख्य डाक घर ते राजवाडा असे आयोजन केले होते. या प्रभात फेरीमध्ये डाक घर सातारा विभागाचे अधिकारी, कर्मचारी यांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला.
डाक घरामध्ये तिरंगा ध्वज सर्व नागरिकांसाठी फक्त २५ रुपयांमध्ये उपलब्ध करुन देण्यात आले आहेत त्याचा लाभ घेऊन स्वातंत्र्य संग्रामाचे स्मरण करून या अनोख्या उपक्रमात सर्वांनी एक दिलाने सहभागी व्हावे, असेही आवाहन प्रवर अधीक्षक डाक घर सातारा विभाग ए व्यंकटेश्वर रेड्डी, यांनी केले