मुंबई :
‘हर घर तिरंगा’ या अभियानाद्वारे प्रत्येकामध्ये राष्ट्रीयता आणि एकात्मता वाढविण्यासाठी मदत होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनानुसार राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात ‘हर घर तिरंगा’ अभियानांतर्गत मुंबईत २५ लाख तिरंगा ध्वजाचे वितरण करून मोहिम मोठ्या प्रमाणावर यशस्वी करू असे प्रतिपादन मुंबई भाजपा अध्यक्ष व आमदार ॲड. मंगलप्रभात लोढा यांनी शुक्रवारी केले. भारतीय डाक विभागाकडून जिपीओ ऑफीसमध्ये पहिल्या टप्प्यातील दीड लाख तिरंगा ध्वज मंगलप्रभात लोढा यांच्याकडे सुपूर्द करण्यात आले. त्याप्रसंगी ते जिपीओ ऑफीस येथे बोलत होते.
मंगलप्रभात लोढा म्हणाले, ‘आजादी का अमृत महोत्सव’ साजरा करणे हा आपल्या सर्वांसाठी अभिमानाचा आणि गौरवाचा क्षण आहे. देशाला स्वातंत्र्य मिळवून दिलेल्या प्रत्येकाची आठवण ठेवणे हे आपल्या प्रत्येकाचे कर्तव्य असून आजच्या पिढीला त्यांचे महात्म्य, कार्य आणि विचार समजणे गरजेचे आहे. नागरिकांमध्ये असलेले राष्ट्रप्रेम जागृत करण्याचे काम या अभियानाअंतर्गत होणार आहे. मुंबई भारतीय जनता पार्टीच्या वतीने ‘हर घर तिरंगा’ हा उपक्रम जनमानसात पोहोचविण्याकरिता अत्यंत सूक्ष्म नियोजन केले असून उपक्रमाचा प्रचार, प्रसार तसेच झेंड्याची उपलब्धता अशा दुहेरी आघाड्यांवर काम सुरू आहे. प्रभातफेरी, पथनाट्ये, पोवाडे अश्या पारंपरिक पद्धतीबरोबरच समाज माध्यमांचा प्रभावी वापर करून अभियानाचा प्रचार, प्रसार करणार असल्याची माहिती आमदार ॲड. मंगलप्रभात लोढा यांनी दिली. यावेळी मुंबई भाजपा उपाध्यक्ष आचार्य पवन त्रिपाठी, भाजपा मुंबई सचिव व राष्ट्रीय ओबीसी मोर्चा सदस्य प्रतिक कर्पे, दिनेश जगताप, भारतीय डाक विभागाचे अधिकारी अमिताभ सिंग, डॉ. सुधीर जाखेरे आदी उपस्थित होते.