पुणे : आज टिळक पथावरील माधव सदाशिव गोळवलकर गुरुजी माध्यमिक विद्यालयात मातृदिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी प्रशालेतील विद्यार्थ्यांनी हळद – कुंकू , दुध , अक्षता पायावर वाहत आईचे मनोभावे पूजन करून त्यांना दिप-आरतीने ओवाळले आणि वंदन केले.
अनन्या काळोखे , सारंग तारे , केदार मोरे , रुचिर वैद्य , नील वावीकर , यशराज पवार , मयुरेश वैराट या विद्यार्थ्यांनी आपल्या मातांचे पूजन करत त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त केली आणि आईच्या ऋणात राहणेच योग्य असल्याची भावना सर्व विद्यार्थ्यांनी आपल्या मनोगतातून व्यक्त केली.
आई आहे म्हणूनच मी आहे हे विद्यार्थ्यांनी कायम लक्षात ठेवल्यास वृद्धाश्रमातील संख्या वाढणार नाही अशी भावना प्रशालेच्या मुख्याध्यापिका सौ लिना तलाठी यांनी व्यक्त केली. प्रशालेतील शिक्षिका सौ सोनल एरंडे यांनी आईचे महत्व या विषयावर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. ज्येष्ठ शिक्षिका सौ वासंती बनकर यांनी सूत्रसंचलन केले. या कार्यक्रमासाठी सौ प्रिया जोशी , सौ मधुरा करमरकर , श्री अक्षय कुलकर्णी यांनी विशेष परिश्रम घेतले.