पुणे, ११ नोव्हेंबरः एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी(डब्ल्यूपीयू) च्या एमआयटी स्कूल ऑफ कॉन्शसनेस अँड अल्टिमेट रियॅलिटी, पुणे तर्फे देशात प्रथमच जागतिक दर्जाची ‘कॉन्शसनेसः द अल्टिमेट रियॅलिटी’ विषयावर दोन दिवसीय परिषदचे आयोजन करण्यात आले आहे. अशी माहिती एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीचे संस्थापक अध्यक्ष प्रा.डॉ. विश्वनाथ दा. कराड यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत दिली.
कोथरूड येथील एमआयटी डब्ल्यूपीयूच्या संत श्री ज्ञानेश्वर सभागृहात आयोजित परिषदेचे उद्घाटन सोमवार दि.१४ नोव्हेंबर रोजी सकाळी १०.०० होईल. या वेळी प्रमुख पाहुणे व बीजभाषण नालंदा विद्यापीठाचे कुलपती, जागतिक कीर्तिचे संगणक तज्ञ पद्मभूषण डॉ. विजय भटकर करतील. एमआयटी विश्वशांती विद्यापीठाचे संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. विश्वनाथ दा. कराड हे या उद्घाटन सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी असतील.
तसेच एमआयटी डब्ल्यूपीयूचे कार्याध्यक्ष राहुल विश्वनाथ कराड, प्रसिद्ध न्यूरोसर्जन डॉ. दीपक रानडे, एमआयटी स्कूल ऑफ कॉन्शसनेस अँड अल्टिमेट रियॅलिटीचे संचालक डॉ. जयंत खंदारे हे या परिषदेचे प्रमुख संयोजक व सहसंयोजक असतील.
परिषदेचा समारोप समारंभ दि.१५ नोव्हेंबर रोजी सायं ४.०० वा. होणार आहे. या परिषदेचा मुख्य उद्देश भारतीय संतांनी व तत्वज्ञानांनी समाज कल्याणासाठी मांडलेल्या सुख, समाधान आणि शांतीचे तत्व संपूर्ण जगासमोर मांडणे, विज्ञान आणि अध्यात्माचा धागा धरून जगात शांतता नांदावी यासाठी कार्य करणे ही आहे.तत्त्वज्ञ संत श्री ज्ञानेश्वर महाराजांनी ‘संपूर्ण विश्व हे चैतन्यस्वरुप आणि बुद्धिमान आहे’असं म्हटलं होतं. त्याचबरोबर, जगप्रसिद्ध शास्त्रज्ञ डॉ. अल्बर्ट आइनस्टाइन त्यांनी ‘विश्वाच्या शिस्तबद्ध समन्वयामध्ये मला ईश्वर दिसतो’ असं विधान केल होतं. अशा रितीने अध्यात्म आणि विज्ञान ह्या दोन्ही माध्यमातून व्यक्त होणार्या चैतन्य अर्थात कॉन्शसनेस आणि अंतिम सत्य अर्थात रियॅलिटी ह्या परिषदेमध्ये उहापोह होणार आहे.
परिषदेमध्ये जागतिक स्तरावर कॉन्शसनेस ह्या विषयावर काम करणारे पद्मभूषण डॉ. विजय भटकर, डॉ. युलिस डी. कार्पो, डॅा. अॅटोनेल्ला वॅनिनी, डॉ. अॅलेक्स हॅन्की, डॉ. मोहन उत्तरवार, डॉ.इएस.पी. शुक्ला, मा. महंत योगी अमरनाथ, डॉ. दिपक रानडे असे अनेक तत्त्वज्ञ, शास्त्रज्ञ, तत्त्वचिंतक, विद्वान भाग घेणार आहेत. क्वॅाटम फिजिक्स, सिंट्रोपी, फ्री-विल-डिटर्मिनजम, ब्रेन अॅन्ड न्यूरॅालॅाजी अॅाफ कॉन्शसनेस अशा वैज्ञानिक, तात्त्विक आणि अध्यात्मिक विषयांवर चर्चा व ते याविषयी आपल्या संकल्पना मांडतील.
तत्त्वज्ञ संत श्री ज्ञानेश्वर महाराज, जगद्गुरू तुकाराम महाराज यांच्या बरोबरच महाराष्ट्रातील अन्य संतांनी समाजात शांतता नांदावी व मानव सुखी रहावा यासाठी कार्य केले. तसेच स्वामी विवेकानंद यांच्या नुसार २१ व्या शतकात भारत विश्व गुरू बनेल. या तत्वांना सत्यात उतरविण्यासाठी ही परिषद एक महत्वपूर्ण भूमिका पार पाडेल.
आयोजित परिषदेत डॉ. दीपक रानडे, डॉ. जयंत खंदारे, डॉ. संजय उपाध्ये, एमआयटी डब्ल्यूपीयूचे कुलगुरू डॉ. रवीकुमार चिटणीस, डॉ. अॅलेक्स हॅन्की व एमआयटी डब्ल्यूपीयूचे प्र कुलगुरू डॉ. मिलिंद पांडे हे उपस्थित होते.